लेखांक १५९ : हथनोरा जैत नांदनेर भारकच्छ गादरवास , परिक्रमेतील सर्वात सुंदर काठाने प्रवास

शहागंज चिंचली सोडले आणि मस्त किनाऱ्याचा रस्ता पकडला . इथून पुढे नर्मदा मैया उथळ आणि त्यामुळे वेगवान होत जाते . वाळूमुळे नर्मदा मातेचे पात्र बुजून उथळ झाले आहे . काठाकाठाने चालत बनेटा गाव पार केले आणि एक मोठे झोकदार वळण घेत हतनोरा गावामध्ये आलो . इथे अतिशय सुंदर जागेवरती एक अप्रतिम आश्रम होता . या ठिकाणी अमावस्येचा भंडारा सुरू होता . तो प्रसाद घेतला आणि नर्मदा मातेच्या काठाच्या बाजूला असलेल्या ठिकाणी येऊन बसलो . इथून नर्मदा मैया काहीच्या काही सुंदर आणि समान दिसत होती ! आपल्यापैकी ज्यांनी कधी भोर शहराकडे जाताना लागणारे नदीचे प्रसिद्ध वळण पाहिले असेल त्यांच्या लक्षात माझे म्हणणे येईल . अगदी तशीच वळणदार नर्मदा नदी परंतु त्याच्यापेक्षा कैक पटीने ने भव्य दिव्य इथे दिसत होती ! समोरचा किनारा वाळूचा होता . इथूनच प्रसिद्ध धनुष्य घाटाचे धनुष्य सुरू होते इथे केरळी संन्यासी अर्थात दास स्वामी देखील आले . पटेल नावाचे आजचे अन्नदाता होते यांची मुले अतिशय गुणी आणि कामसु होती . या आश्रमामध्ये एक पाठीचा कणा वाकलेले महात्मा व अन्य काही गांजा ओढणारे शिष्य होते . दास स्वामी सारखा संन्यासी तिथे आला परंतु यांनी त्यांना विचारले सुद्धा नाही . मला खूप वाईट वाटले .मीच मग दास स्वामींना भोजन मिळेल अशी व्यवस्था केली. या सर्वांचे झोपून पेटीवर भजने म्हणणे सुरू होते . एका साधूच्या मदतीने मी सारे मंदिर धुतले आणि थोडेसे भजन करून सर्वांची रजा घेतली . हा आश्रम मात्र लक्षात राहिला . इथून नर्मदा मातेचे जे रूप दिसते त्याच्या मी प्रेमातच पडलो ! परंतु मला खरोखरच माहिती नव्हते की इथून पुढे नर्मदा मातेचे प्रत्येक रूप पहिल्यापेक्षा अधिक सुंदर अधिक व्यापक आणि अधिक अद्भुत होत जाणार आहे !

बनेटा गाव नर्मदा नदीच्या काठावर असे वसलेले आहे .इथे एक उपसा जलसिंचन योजना देखील आहे .
नर्मदा मातेला वेळोवेळी अशा नद्या मिळत राहतात . 
हाथनोरा गावाचा घाटा असा वळणावर आहे . काठा ने पुढे केल्यावर सूर्यकुंड लागते .
याच ठिकाणी मी बसलो होतो . सर्वत्र भंडाऱ्याची लगबग चालू होती
मंदिराचा परिसरा अतिशय सुंदर आहे . यज्ञशाळा वगैरे असून नर्मदा मातेच्या बाजूला बसायला खूप सुंदर जागा केलेली आहे .
इथून नर्मदा माता फार सुंदर दिसते
धनुष्य घाट म्हणून ओळखली जाणारी नर्मदा मातेची वळणे अवकाशातून अशी दिसतात पहा !
त्यातला हाथनोरा हा भाग आपण बघतोय . 
मंदिरातून समोर दिसणारा नर्मदा मातेचा सुंदर प्रवाह . याला मराठीमध्ये नेकलेस पॉईंट म्हणतात
हे नर्मदा मातेचे अतिशय सुंदर असे रूप आहे ! इथून पुढच्या प्रत्येक नकाशामध्ये उत्तर दिशा कशी आहे ते पाहून घ्यावे . कारण महत्वाची गावं दिसावीत या दृष्टीने नकाशा फिरवलेला आहे .


माझ्या वहीमध्ये ( हे वळण माझ्या लक्षात राहावे म्हणून ) मी त्याचे चित्र काढून ठेवले होते !आजही हे चित्र पाहिल्याबरोबर मला त्या दिवसाचे दृश्य आठवते ! सोबत कॅमेरा नसला म्हणून काय झालं !

काठाचा मार्ग पकडत मी पुढच्या वळणावर असलेले सूर्य मंदिर गाठले . दुर्दैवाने येथे नर्मदा मातेची मोठी मोठी वळणे असल्यामुळे आणि ती कमीत कमी दहा ते बारा किलोमीटर लांबीची असल्यामुळे कोणीही परिक्रमावासी इथून जात नाहीत . ते वळण जर टाळले तर पुढचे गाव दोन किलोमीटर अंतरावरती असते . त्यामुळे लोक तसेच जाणे सोयीचे मानतात .परंतु त्यामुळे नर्मदा मातेचा जगातील सर्वात सुंदर किनारा आपल्याकडून सुटतो आहे याची दुर्दैवाने त्यांना कल्पना नसते !सूर्यकुंड म्हणजे वेगळे कुंड नसून नर्मदा मातेचा हा जो किनारा आहे तिथे एका विशिष्ट जागी स्नान केल्यावर कुष्ठरोग बरा होतो अशी मान्यता आहे . मला इथल्या पाण्याच्या रंग आणि चव किंचित वेगळी वाटली . याचा अर्थ नक्कीच इथल्या मातीमध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये असे काही गुणधर्म असलेले अणु रेणू आहेत जे कुष्ठ बरे करण्यास सहाय्यक किंवा पूरक ठरत असतील .दक्षिण तटावरून जाताना या भागाचे दर्शन झाले नव्हते कारण मध्ये बुढीमाई लागते . अर्थात नर्मदा मातेचा जुना सरळ जाणारा प्रवाह लागतो . त्यामुळे हा किनारा टाळून पुढे चालावे लागले होते .त्यामुळे पहिल्यांदाच मी न पाहिलेला नर्मदा मातेचा समोरचा किनारा देखील मला इथे दिसत होता ! इथे देखील अमावस्येचा मोठा भंडारा सुरू होता . भोजन घेण्याचा खूप आग्रह झाला परंतु पोटात जागाच नसल्यामुळे पुढे निघालो . 

सूर्यकुंड येथील सूर्य मंदिर
सूर्य मंदिराचे गर्भगृह
सूर्य मंदिराची कमान . सरदार गाव देखील सिहोर जिल्ह्यात येथे
जयाच्या रथा एकची चक्र पाही | नसे भूमि आकाश आधार कांही || असे सारथी पांगुळा ज्या रथासी | नमस्कार त्या सूर्यनारायणासी ||

आश्रमामध्ये भिंतीवर लिहिलेली सूर्याची नावे
मोहनदास बाबा गादर वाले यांनी या मंदिराची निर्मिती केली
घाटाकडे जाणारा रस्ता असा आहे आणि इथून पुढे अतिशय सुंदर किनारा आहे .

इथे काही साधू गांजा ओढत बसले होते . त्यातील एक जण मला म्हणाला की काठाने अजिबात जाऊ नकोस भयंकर काटे कुटे असलेला मार्ग आहे .माझे ऐक ! मी अमुक अमुक वर्षे याच काठावर राहतो आहे .मला एक क्षणभर वाटले की या माणसाचे आपण ऐकावे परंतु आतून आवाज आला की काही नाही काठाने चल ! आणि बघतो तो काय !आज पर्यंत मी चाललेला नर्मदा मातेचा सर्वात सुंदर किनारा या भागात होता ! येथे काटेरी झुडूपे काय एक काटा सुद्धा नव्हता .आणि चिखलगाळ वगैरे तर नावाला देखील नव्हतं ! याचा अर्थ हा बिचारा साधू इथे इतकी वर्षे राहून एकदा सुद्धा या सुंदर किनाऱ्याचे दर्शन करण्यासाठी गेलेला नव्हता ! गांजा एके गांजा ! व्यसन हे फार वाईट असते मित्रांनो . आपल्यापैकी कोणाला कुठलेही व्यसन जर असेल ना तर त्याचा ताबडतोब त्याग करा ! कारण व्यसनातून काहीच लाभ होत नसतो . उलट हानी अशी होत असते की जी कधीच भरून निघत नाही . ज्यांना आत्मघात करून घ्यायला आवडते अशा वृत्तीची माणसेच शक्यतो व्यसनाधीन होतात . प्रस्तुत लेखकाने आयुष्यात कधीही कुठलेही व्यसन केलेले नाही आणि त्याचा मला काहीही तोटा झालेला नाही . त्यामुळे अनुभवावरून सांगतो आहे . या उलट व्यसनामुळे विविध प्रकारचे शारीरिक मानसिक आध्यात्मिक रोग झालेले किंबहुना स्वर्गवासी झालेले लोक देखील मी जवळून पाहिलेले आहेत . आता या साधूचेच उदाहरण पहा . साक्षात सूर्यकुंडावर राहत असून आणि नर्मदा मातेचा सर्वात सुंदर किनारा त्याला खुणावत असून हा कधीही तिथे गेला नाही त्यामुळे त्याच्या मनामध्ये असा भ्रम उत्पन्न झालेला होता की इथे जाण्यासाठी वाटच नसावी ! हा भ्रम उत्पन्न करण्याचे काम व्यसन करते . यदा कदाचित तो शुद्धीवर राहणारा असता तर नर्मदा मातेने त्याला लगेच बोलावून घेतले असते परंतु तिलाच त्याला बोलवायचे नव्हते ! घाई गडबड करणाऱ्या परिक्रमा वासींना सुद्धा नर्मदा माता तिच्या आशा ठेवणीतल्या जागा कधीच दाखवत नाही ! पुढे पाठवून देते ! आणि जर व्यसनच करायचे ना तर मला शाळेत शिकलेला एक श्लोक आठवतो . 

व्यसनानि सन्ति बहूनि । 

व्यसनद्वयमेवकेवलम् व्यसनम् ।

विद्याभ्यसनम् व्यसनम् ।

अथवा हरीपादसेवनम् व्यसनम् ॥

अर्थात या जगामध्ये अनेक प्रकारची व्यसने आहेत परंतु खरी व्यसने दोनच ! एक म्हणजे विद्याभ्यासाचे व्यसन ,काहीतरी नवीन शिकण्याचा ध्यास लागणे हे व्यसन ,आणि दुसरे म्हणजे हरिभक्तीचे व्यसन ! या दोहोंपैकी कुठल्याही एका व्यसनामध्ये जर आपण व्यसनाधीन झालात तर आयुष्याचा उद्धार झाल्याखेरीज राहणार नाही ! आता बसल्या बसल्या संकल्प करा ! इथून पुढे मी कुठल्याही प्रकारे दारू सिगारेट बिडी तंबाखू मावा गुटखा पानसुपारी पान मसाला रम बियर देशी गावठी मिश्री तपकीर ड्रग्ज ईसिगारेट ताडी माडी जुगार मटका आकडे लॉटरी जंगलीरमी लुडो ऑनलाईन गेम्स गांजा भांग चरस ब्राऊन शुगर परदारा यातील कशालाही स्पर्श करणार नाही ! अहो आमच्या शूलपाणी च्या झाडीतील आदिवासी मंडळी जर एका शब्दाखातर कायमचे व्यसन सोडू शकतात तर तुम्हाला काय जड आहे ! तिथे तर कुटुंबेच्या कुटुंबे व्यसनमुक्त होत आहेत !अगदी आहार सुद्धा बदलत आहेत ! आपण तर विवेकी माणसे म्हणून जाणली  जातो ! मग असा अविवेक का बरं करावा ? रामदास स्वामी मूर्ख लक्षणे सांगताना म्हणतात 

सप्त व्यसनी जयाचे मन । तो एक मूर्ख । 

ही सात व्यसने कुठली ? 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बुधभूषणम् नावाचा ग्रंथ आहे . त्यात त्यांनी व्यसनाधीनतेवर एक श्लोक टाकलेला आहे . त्यात ते म्हणतात ,

द्यूतं च मासं च सुरा च वेश्या । पापर्धि चौर्यं परदारसेवा ।

एतानि सप्तानि व्यसनानि लोके । नरं सुघोरं नरकं नयन्ति ॥

अर्थात जुगार खेळणे ,मांस खाणे ,दारू पिणे , वेश्यागमन करणे , शिकार करणे ,चोरी करणे आणि व्यभिचार करणे ही सात व्यसने मनुष्याला सुघोर नावाच्या नरकापर्यंत घेऊन जातात !


भाबरी गावामध्ये वृक्षारोपणासाठी छापलेल्या वृक्ष मित्रांच्या टी-शर्ट वर देखील व्यसनमुक्तीचा संदेश आपण प्रकर्षाने छापला आहे . ती काळाची गरज आहे .

जे व्यसन करत नाहीत त्यांनी कृपया वाईट वाटून घेऊ नये परंतु हजारातला एखादा वाचक जरी व्यसन करणारा असेल तर त्याच्यासाठी मी हे पोट तिडकीने लिहितो आहे .मला सर्वांना एकच सांगायचे आहे . ज्यांना तंबाखूचे वगैरे व्यसन असेल त्यांनी एकदा खरोखरीच मुंबईच्या टाटा कर्क रोग रुग्णालयामध्ये जावे . हे आशिया खंडातील सगळ्यात मोठे कर्करोग रुग्णालय आहे . माझ्या एका बहिणी वरील उपचारासाठी मी तिथे जाऊन राहिलो होतो .तेव्हा मी तिथली परिस्थिती जवळून पाहिली. सर्वाधिक तरुण रुग्ण तिथे रोज दाखल व्हायचे . सुमारे ५०० तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण रोज तिथे दाखल होतात !यातील ९०% तरुण असतात ! कुणाचे ज जबडे लटकलेले , कोणाची तोंडे फाटलेली अक्षरशः बघवत नाही ! बहुतेक लोकांना नळीने पातळ अन्न थेट घशात ओतावे लागते .ज्या तोंडाने अभिमानाने गुटखा चघळला आणि पचापच धरणीमातेवर थुंकलो त्या तोंडाची शेवटी अशी अवस्था होते . यातील बहुतांश लोकांचे असे मत असते की असे होणार आहे हे माहिती असते तर आम्ही तंबाखूचे पदार्थ खाल्लेच नसते ! ज्यांना व्यसन आहे त्यांनी खरोखरीच एकदा मुंबईला टाटा मेमोरियल हॉस्पिटल ची चक्कर मारून यावे !नाही व्यसन सुटले तर नाव बदलीन ! म्हणून पुन्हा एकदा सर्वांना हात जोडून विनंती करतो . कृपा करून कुठलेही व्यसन करू नका ! परिक्रमेमध्ये पिपरहा नामक मुक्कामावर मला भेटलेले महान संन्यासी स्वामी सदाशिव नित्यानंद गिरी तथा चंगाबाबा नंतर स्वतः परिक्रमेला गेले तेव्हा घरोघर आपली झोळी पसरून व्यसनाच्या पदार्थांची भिक्षा मागायचे आणि सांगायचे की आज पासून तुझे व्यसन तू मला अर्पण केले ! त्यांच्या परिक्रमेमध्ये त्यांनी हजारो लोकांना व्यसनमुक्त केले ! त्याचे व्हिडिओ youtube वर उपलब्ध आहेत ! 

आपल्या परिक्रमेदरम्यान भिक्षा मागून लोकांची व्यसने भिक्षेमध्ये स्वीकारणारे महान संन्यासी स्वामी सदाशिव नित्यानंद गिरी तथा चंगाबाबा
आपल्या परिक्रमेदरम्यान चंगाबाबांनी शब्दशः हजारो लोकांचे व्यसन सोडवले ! आणि ते नर्मदा मातेच्या साक्षीने तिच्या समोरच त्यांना शपथ घालायचे की तुला नर्मदा मातेची शपथ आहे तू पुन्हा गुटखा खाऊ नकोस !
आपल्याला असे काही करायची गरज नाही . परंतु वाचकांपैकी ज्यांना व्यसन असेल त्यांनी आपण होऊनच नर्मदा मातेला सांगून असा संकल्प करावा की आतापासून मी व्यसन करणार नाही . व्यसन करायची इच्छा झालीच तर तुझ्या नामाचा जयजयकार करेन जप करेन ! नर्मदे हर चा पुकारा करेन !नर्मदे हर ! नर्मदे मम व्यसन हर !  हे नर्मदा माते माझे व्यसन दूर कर ! व्यसन या शब्दाचा दुसरा अर्थ संकट असा आहे . ती खरोखरीच तुम्हाला संकटातून दूर करेल ! विषयांतर झाले त्याबद्दल क्षमा असावी परंतु मनापासून सांगावेसे वाटले म्हणून हा विषय मांडला .हे पाहून एका जरी व्यक्तीचे व्यसन सुटले तरी या लेखन प्रपंचाचे सार्थक झाले असे मानावयास हरकत नाही . नर्मदे हर ! चला पुढे !

फार सुंदर किनारा होता . झोकदार वळण होते .माझ्याजवळची पिण्याचे पाणी संपले होते . परंतु इथे उथळ किनारा असल्यामुळे काठावरचे पाणी थोडेसे गढूळ होते . तहान तर फार लागली होती . वाळूतून चालताना उष्णता जास्त जाणवते . शरीरातील पाणी लवकर कमी होते . एका झोपडी मध्ये वाळू काढून दमलेले सात आठ लोक पाठ टेकून पडले होते . मी त्यांच्याजवळ पाणी मागितलं . त्यांच्यातला एकजण चटकन उठला आणि डोंगा घेऊन नर्मदा मातेच्या प्रवाहाच्या मधोमध गेला आणि माझ्यासाठी ताजे ताजे पाणी घेऊन आला ! कोण असता हो तुम्ही ? त्याला मला सरळ नाही म्हणता आले असते ! तो ही दमलेलाच होता ना ! परंतु नर्मदा खंडातील लोक असा शहरी विचार करत नाहीत . सेवा परमो धर्मः ! सर्विस बिफोर सेल्फ . स्वतःच्या आधी दुसऱ्याची सेवा हा त्यांचा जगण्याचा बाणा आहे . शिवभावे जीव सेवा हे त्यांच्या जगण्याचे सूत्र आहे . परिक्रमावासींची निरंतर निर्लोभ सेवा हेच त्यांच्या जगण्याचे सार आहे ! त्याने पाणी आणेपर्यंत मी बाकीच्या पाणडुब्यांशी गप्पा मारत बसलो . त्यातील बरेचसे ३५ ते ४० वर्षाचे होते . व सर्वांना नातवंडे होती ! होय होय ४० वर्षांचे आजोबा ! तुम्ही बरोबर ऐकलेत ! ते म्हणाले आमच्या भागामध्ये विशीपर्यंत लग्न झाले नाही तर मुला मुलींमध्ये काहीतरी गडबड आहे असे मानले जाते ! त्यामुळे चाळिशी पर्यंत आजोबा होणे स्वाभाविक आहे ! आणि कुणाला काय वाटो आणि ते वाटू देत परंतु मी या मताचा शंभर टक्के समर्थक आहे !कारण मी जे काही अल्पसे जग पाहिले आहे त्यात मला लवकर लग्नाचे अनेक फायदे लक्षात आलेले आहेत ! उशिरा लग्नाचे तोटे त्यात अनुस्यूत आहेत . कसं आहे सांगतो . कोल्ह्याला द्राक्षे आंबट या न्यायाने उशिरा लग्न करणारे त्या गोष्टीचे समर्थन करतात . आपले लग्न लवकर ठरले नाही याचे शल्य मनात कुठेतरी असतेच ! असो . निसर्गाच्या नियमाने चालावे हे उत्तम ! इथे एकाकडे स्मार्टफोन होता .त्याला माझा फोटो काढायचा होता . तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे खेड्यापाड्यांमध्ये छोटी बातमी सुद्धा सगळ्यांना माहिती असते . त्याप्रमाणे कदाचित त्याला त्याच्या मित्रांना दाखवायचा असेल की आज मला अमुक अमुक बाबाजी भेटला होता . परंतु त्याचा फोटो हलत होता म्हणून मीच त्याच्या मोबाईलवर एक फोटो काढून दिला .मी मित्राचा नंबर त्याला सांगितला आणि त्यावर फोटो आणि लोकेशन पाठवायला सांगून दिले आणि पुढे निघालो ! 


माझ्यासाठी पाणी घेऊन आलेला महामानव मागे दिसतो आहे .सोबत त्याचा विवाहित मुलगा उभा आहे ज्याला दोन मुले आहेत ! या सर्वांना जेव्हा मी शहरातले सरासरी लग्नाचे वय सांगितले तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला ! ते म्हणाले एवढ्या उशिरा लग्न करण्यापेक्षा न केलेले उत्तम ! आणि ते मला खरोखरच पटले . असो . आठवले म्हणून सांगितले ! या सर्वांचे आभार मानून पुढे निघालो . क्षणभरच सावलीमध्ये बसल्यामुळे खूप मोठा श्रमपरिहार झाला . आणि पुन्हा एकदा पायांना गती दिली . पायांना गती देण्याचं सोपं साधन म्हणजे नाम ! हाथनोर ते सरदारनगर हे अंतर तसे दोन किलोमीटर आहे . परंतु मी जो किनारा निवडला होता त्यामुळे मला साधारण दहा-बारा किलोमीटर नर्मदा मातेच्या काठाकाठाने चालायला मिळाले . अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या . शिकायला मिळाल्या .अनुभवायला मिळाल्या . सर्वसामान्य मनुष्याला वाळूतून चालणे दोन प्रकारे त्रासदायक होते .एकतर अंतर वाढते आणि दुसरं म्हणजे वाळू चालताना तुमची अर्धी अधिक शक्ती काढून घेते त्यामुळे चालायला दुप्पट शक्ती लागते आणि गती निम्मी होऊन जाते ! परंतु तुम्ही मैय्याच्या जवळून चाललात की तुम्हाला चालण्यायोग्य पट्टा मिळतो . पूर्वी देखील मी एका ठिकाणी सांगितले आहे त्याप्रमाणे पायाखालील वाळूचा रंग बघत चालायचे . रंग पांढरा आहे तोवर बिनधास्त चालावे . रंग काळपट झाला की याचा अर्थ खालून ओढा वाहतो आहे .इथे तुमचा पाय कमीत कमी एक फुट आत जाणारच ! त्यासाठी तयार राहायचे आणि आनंद घ्यायचा ! आयुष्य म्हणजे संकटांची मालिका नसून संकटांच्या मालिकेवर मात करण्याचा आनंद आहे ! संकटाच्या मालिकेचे दुःख मानणे देखील शक्य आहे आणि प्रत्येक संकटावर आपण मात कशी केली याचा आनंद व्यक्त करणे देखील शक्य आहे ! मग आनंदच घेत चालावे ना ! बरेचदा आपण बाहेर निघतो आणि अचानक पाऊस येतो आणि आपण भिजू लागतो ! अशावेळी बरेचदा आपली चिडचिड होते . आता पाऊस पाडणे तर आपल्या हातात नाही आणि थांबवणे तर त्याहून नाही ! मग अशावेळी आपले बालपण आठवावे आणि आपण लहानपणी पावसात कसा आनंद घ्यायचो तो आठवावा ! मला आठवते आहे . एकही पाऊस मी सोडलेला नाही ! पाऊस आला की मी अंगणात पळालोच ! मग आपले हे बालपण आपला हा मुक्त स्वभाव आपला हा मोकळेपणा आपण काळाच्या ओघात हरवला तर नाही ना याचा प्रत्येकाने आपला आपण शोध घ्यावा ! आणि अगदी प्रॅक्टिकल भाषेत बोलायचे तर सध्या पर्याय नाही त्यामुळे पावसाला शिव्या घालण्यापेक्षा पावसात भिजण्याचा आनंद घ्यावा ! 

आणि हो ! आपल्यातला हरवलेलं मुल जागा करण्याची एकही संधी सोडू नये ! कारण लहान मुलांच्या डोक्याला ताण कमी असतो ! आणि ती अधिक निरागस निष्पाप असतात ! त्यामुळे लोक तुम्हाला बालिश म्हटले तरी चालेल परंतु तुमच्या डोक्याचा ताण कमी होतो हे काय कमी आहे ! तमिळनाडू मध्ये अत्यंत दुर्मिळ असलेल्या पावसामध्ये मुलासोबत खेळताना प्रस्तुत लेखक !असो . 

इथला देखील किनारा पक्षी जीवन संपन्न आहे . तो पार करून सरदार नगरला आल्यावर महामंडलेश्वर केशवदासजी महाराज यांचा आश्रम होता . आपले गुरु भगवानदास जी महाराज यांच्या नावे आश्रम काढलेला होता . हे एक राम मंदिर होते . सरदार नगर खालसा असे यांच्या आखाड्याचे नाव होते . मी आत मध्ये गेलो तेव्हा बरेच शिष्य इकडे तिकडे फिरत होते . माझे अतिशय थंड स्वागत झाले . म्हणजे मी नर्मदे हर असा पुकारा केल्यावर मला कोणीच प्रतिसाद दिला नाही . एका बाजूला केशवदास महाराज त्यांच्या सिंहासनावर बसले होते आणि समोर भक्त मंडळी येऊन बसली होती . मी जाऊन त्यांना दंडवत प्रणाम केला . आणि नर्मदे हर म्हणालो . बरेच लोक असल्यामुळे मी मागे जाऊन बसलो . तिथे एक कुलर होता . त्याची हवा लागेल असा मी बसलो . जेणे करून आलेला घाम निघून जाईल आणि थोडे थंड वाटेल . महाराज माझ्यावर जोरात ओरडले . " अक्कल नही है क्या ? कुलर के सामने क्यू बैठ गये ? " याचे उत्तर खरे तर फार सोपे होते ! माणूस कुलर समोर कशासाठी बसतो ? हवा खाण्यासाठी ना ! बरे हा कुलर त्यांच्या दिशेने पण लावलेला नव्हता ! एकूणच त्य खोलीतली हवा गार करण्यासाठी लावला होता . मी उठून उभा राहिलो आणि महाराजांची क्षमा मागितली . आणि हातानेच पुढे निघण्यासाठी आज्ञा मागितली . महाराजांनी लगेच आज्ञा दिली . वास्तविक त्यावेळी सर्वांना चहावाटप चालू होते . महाराज मला म्हणू शकत होती की चहा पिऊन जा . परंतु तसे ते काही म्हणाले नाहीत . मी देखील तशी अपेक्षा ठेवलेलीच नव्हती . शांतपणे मी माझी झोळी उचलली आणि पुढे चालू लागलो . अशावेळी शक्यतो शिष्य मंडळी येऊन आडवतात . परंतु तसेही काही झाले नाही . मला मजा वाटली ! प्रचंड दमलेले असताना स्वतः नाव वल्हवत वाहत्या प्रवाहाच्या मध्यभागी जाऊन माझ्यासाठी पाणी आणणारा केवट माझ्यासमोर तरळला . त्याला देखील मी मनोमन नमस्कार केला . तो देखील देवाचेच एक रूप . आणि हे देखील देवाचेच रूप ! नानाविध रूप आणि नटलेला भगवंत विविध प्रकारे आपली परीक्षा घेत असतो ! खरे तर संध्याकाळ झाली होती .परवानगी मिळाली असती तर या आश्रमामध्ये मला मुक्काम करता आला असता . परंतु नर्मदा मातेची तशी इच्छा नसावी .  
हथनोर ते सरदारनगर हे अंतर सरळ न जाता गोलाकार वळणावरून गेले की खूप मजा येते !
महंत केशव दासजी महाराज सरदारपुर
महंत तरुण होते तेजस्वी होते . काही सत्संग लाभावा अशी माझ इच्छा होती .परंतु कदाचित नर्मदा मातेची तशी इच्छा नसावी .
इथे सर्व वयोगटातील यांचे अनेक शिष्य राहतात
साधूकडे नेहमीच दर्शनार्थींचा राबता असतो . 
परिक्रमावासींसाठीचे इथले नियम थोडे कडक आहेत .मला कुठेही मास्क लावण्याची बळजबरी कुणी करताना दिसले की आवडायचे नाही .आता सुद्धा कदाचित मी मास्क न लावल्यामुळे मला बाबांनी पुढे पाठवले असावे ! कारण मठात गेल्या गेल्या शिष्यांनी मला मास्क लावून म्हणून सांगितले होते ! आणि कुठल्याही गोष्टीचा कार्य कारण भाव कळल्याशिवाय आणि पटल्याशिवाय आपण काही ते करत नसतो !
या गुरुजींचा कुंभमेळ्यातील तंबू
सरदार नगरचा नर्मदा मातेचा किनारा खूप सुंदर आहे .
आश्रमाची भव्य वास्तू बाहेरून अशी दिसते


आता मी पुन्हा एकदा किनारा पकडला . माझ्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे मलाच माहिती नव्हते ! इथे नर्मदा माता एक आतले वळण घेते . त्यामुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचे जन्मगाव जैत जरी समोर दिसत असले तरी तिथपर्यंत जाण्याचा मार्ग हा अक्षरशः उभा कडा आहे ! ८० ते ८५ अंशाचा कडा आहे ! मी मात्र ठरवले होते . मनोमन ठरवले होते . काहीही झाले तरी नर्मदा मातेचा किनारा सोडायचा नाही ! त्यामुळे मी याच मार्गाने जायचे ठरवले . हा संपूर्ण टापू निर्मनुष्य होता .सडक मार्गे जैतगाव चार-पाच किलोमीटर दूर होते आणि या मार्गाने एक किलोमीटर ! काठावर एक दोघांनी मला सांगितले की इथून रस्ता नाही . परंतु मैय्या सांगत होती , ये आहे रस्ता ! पायाखाली छोटीशी पायवाट होती . ती एका ठिकाणी संपली आणि उभा कडा सुरू झाला ! आता मात्र एक पाऊल ठेवता येईल एवढीच पायवाट होती . जरा भिंतीकडे पाठ केली तर झोळी गाळ वाळूच्या त्या भिंतीला धडकायची आणि खाली पडण्याची भीती वाटायची ! नर्मदा मातेतून वाहत आलेली काटेरी झाडे खाली साठलेली होती . त्यामुळे चुकून माकून पायाखालची माती तुटली आणि नर्मदा मातेमध्ये मी पडलो तर पाण्यात न पडता काट्यांमध्ये पडणार होतो ! अशा भयानक परिस्थितीमध्ये मी अडकलो ! परंतु हळूहळू पुढे जात राहिलो . एक क्षण मात्र असा आला की आता पुढे जायला जागाच नाही . कारण पाय ठेवायला जागा नाही ! मी नर्मदा मातेपासून सुमारे ३० मीटर वर होतो ! आणि वर किती अंतरावर जमीन आहे याचा काही अंदाज लागत नव्हता . पाण्यामध्ये एकही नावाडी नव्हता . पुढे जावे का मागे जावे काहीच कळेना ! इतक्यात माझे लक्ष एका हालचालीकडे गेले ! माझ्यापासून थोड्या अंतरावर एक माकड याच उभ्या भिंतीवरून झाडांची मुळे पकडत चाललेले दिसले ! याचा अर्थ इथे झाडांची मुळे आहेत ! मी माझ्या शेजारची माती पाहू लागलो . थोडीशी उपमुळे दिसली . हाताने उकरल्यावर मोठे मूळ हाताला लागले .ते मूळ हाताला लागल्याबरोबर माझा आत्मविश्वास दुणावला ! त्या मुळीच्या साह्याने मी अजून चार पावले पुढे गेलो . दुसरे मूळ पकडले ! असे करत करत मी अजून शंभर एक फूट अंतर पार केले . अर्थातच हे पार करताना माझा घाम निघाला होता ! परंतु पर्याय नव्हता . अजूनही खाली काटे दिसत होते . 

मी वहीमध्ये या कड्याचे चित्र काढून ठेवले आहे !पाय ठेवण्यासाठी मी पायाने उकरून जागा तयार करत होतो . क्षणभर असे वाटायचे की परत फिरावे आणि मागे जावे . परंतु उलटे वळण्यासाठी सुद्धा जागा नव्हती ! हा कडा इतका उभा होता की गवत सुद्धा उगवायला येथे जागा नव्हती ! माझा अनुभव असे सांगत होता की अशा प्रकारचा कडा लागला की मध्ये एखादी तरी फट येतेच त्याप्रमाणे एक फट आली ! साधारण आठ फूट खोल मला उडी मारायची होती . उडी बरोबर बसली तर मी फटीमध्ये पडणार होतो पण जर उडी चुकली तर थेट काटे कुटे आणि मग तसाच मैय्यार्पणमस्तु ! दहा-बारा वेळा उडी मारायचा प्रयत्न केला आणि सोडून दिला . हिम्मतच होत नव्हती . शेवटी नर्मदे हर असा जोरात पुकारा केला आणि डोळे मिटून उडी मारून टाकली !डोळे उघडले तर मी अतिशय सुरक्षितपणे त्या फटीमध्ये पडलेलो होतो ! अंधार पडू लागला होता . अर्धे अंतर कापून झाले होते . पण उरलेले अर्धे अंतर लवकर कापणे आवश्यक होते . कारण ही वन्य श्वापदं बाहेर पडण्याची वेळ असते .अर्थात एवढ्या कठिण  ठिकाणी वन्य श्वापदं कुठून येणार म्हणा ! माझी मीच स्वतःची समजूत घालत होतो . पुन्हा मुळे धरत धरत थोडासा पुढे चालू लागलो . आता आपल्याला चालता येते हा आत्मविश्वास निर्माण झाला होता ! पुढे पुन्हा एक मोठी फट आली . ही फट म्हणजे पावसाचे पाणी नर्मदा मातेला येऊन मिळत असल्यामुळे तयार झालेली उभी नाळ असते . त्यात खाली एखादा दगड वगैरे असेल तर त्यावर माती साठून थोडीशी जागा तयार होते . थोडे अंतर पुढे आलो आणि खाली बारा फूट खोल उडी मारायची आहे असे मला लक्षात आले !त्यानंतर एका पावलाची पायवाट दिसत होती . मगाशी उडी मारली होती त्यापेक्षा ही उडी कठीण होती .कारण मगाशी मी जिथे उभा आहे तिथून उडी मारली होती . आता मात्र मला जिथून उडी मारायची ती जागा पाच फूट पुढे होती . आणि हातातली मुळे वगैरे सर्व काही सोडून ते पाच सहा फूट अंतर मला दोन उड्यांमध्ये पार करून मग तिसरी उडी मोठी मारायची होती ! इतक्यात माझं लक्ष वरती असलेल्या एका झाडाकडे गेले . त्याची मोठी मुळे लटकत होती . मी ती मुळे एकत्र केले . दोन पावले मागे गेलो आणि त्या मुळांना घट्ट धरून माझे सर्व वजन नर्मदा मातेच्या बाजूला झुकवत दोन्ही पायांचे तळवे त्या भिंतीला टेकवत अक्षरशः पळत पाच फूट अंतर कापले आणि जोरात उडी मारली ! उडी मारताना हवेमध्ये नर्मदे हर चा जोरदार पुकारा केला ! ही उडी १२ फूट म्हणजे दोन पुरुष खोल पडली !इथे कोणीच कधीच जात नसल्यामुळे साधारण फुटभर तरी मातीचा फुफाटा साठलेला होता ! मी उडी मारल्यामुळे मोठाच खकाणा उडाला ! माझ्या नाकात तोंडात कानात दाढी मध्येअंगाला सर्वत्र मातीच माती झाली ! मी खोकू लागलो . मातीचा एक प्रचंड मोठा ढग माझ्या भोवती निर्माण झाला ! मी क्षणभर तसाच पालथा पडून राहिलो ! आपण वाचलो आहोत याची जाणीव फार आनंददायी असते ! परंतु ती जाणीव क्षणभरच टिकली ! जसा तो ढग खाली बसला तसे माझे लक्ष समोर गेले ! माझ्यापासून केवळ पाच फूट अंतरावर एक अतिशय तरुण तडफदार आणि चमकदार डोळ्यांचा धिप्पाड नर कोल्हा उभा होता ! झालेल्या प्रसंगामुळे तो देखील दचकला होता . माझे लक्ष खाली नर्मदा मैया मध्ये गेले . इथे एक गोमाता मरून पडलेली होती . म्हणजे प्रवाहतून वाहत आली होती आणि वळणाला इथे येऊन जाळी झुडपामध्ये अडकली होती . ती खाण्यासाठी साहेब खाली चालले होते . बरे तो उभा होता ती जागा अशी होती की त्याला मागे सरकायला जागाच नव्हती ! कसाबसा मागेपुढे पाय ठेवून तो देखील उभा होता !आता आपले काही खरे नाही असे एक क्षणभर वाटून गेले . कदाचित मी त्याच्या गुहे समोर आलोय की काय असे मला वाटू लागले . परंतु डावीकडे गुहा वगैरे आहे का हे वळून बघण्याची देखील हिंमत होत नव्हती . माझी नजर अखंड त्याच्या नजरेला मी जुळवली होती . त्याचे ते सुंदर डोळे पाहून मला खूप छान वाटले ! मी दोन-तीन वेळा डोळे मिटल्यावर त्याने देखील डोळे मिटले . त्याला देखील कळाले की हा बाबा आपल्यासारखाच जीवावर उदार होऊन कुठेतरी चालला आहे ! मी मनातल्या मनात त्याला सांगितले की बाबारे तुझा मार्ग अडवण्याची माझी इच्छा नाही . परंतु मी ज्या मार्गाने आलो तिथे आता वर परत जाऊ शकत नाही . तरी कृपा करून मला मार्ग करून दे . कोल्ह्याने वळायचा प्रयत्न केला परंतु त्याला वळता येत नव्हते .माझ्या देहबोलीतून त्याला संदेश मिळाला होता की मी त्याला काही त्रास देणार नाही . प्राण्यांना हे लगेच कळते . तो अतिशय हळूहळू दहा-बारा पावले उलटा चालत मागे गेला .आणि ज्या क्षणी त्याला वळायला जागा मिळाली त्या क्षणी एका गिरकीमध्ये वळून तो क्षणात वरती पळून गेला ! वर गेल्यावर सुरक्षित जागी जाऊन तो एक क्षणभर थांबला .माझ्याकडे खाली पाहिले आणि जंगलात अदृश्य झाला .कदाचित धन्यवाद म्हणण्याची वन्य श्वापदांची ही पद्धत असावी ! पूर्वी देखील अनेक श्वापदांनी अशा रीतीने मला जाताना टाटा बाय-बाय केल्याचे मला आठवते ! आम्हाला सुरक्षित जाऊ दिल्याबद्दल धन्यवाद असा भाव त्या नजरेमध्ये असायचा .अखेर मी जैत गाव गाठले .  
माझ्या वहीमध्ये या प्रसंगाचे छोटेसे चित्र मी काढून ठेवले होते .नुसते एवढे चित्र पाहिले की सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो . आपल्या मेंदूची रचना मजेशीर आहे ! संगीत किंवा चित्राच्या स्वरूपात पाहिलेले ज्ञान अधिक लक्षात राहते ! इथे खाली मरून पडलेली गाय दिसते . वर कोल्हा उभा आहे ती जागा दिसते . त्याच्या समोरच मी पडलो होतो ! असो .

हाच तो सरदार नगर ते जैत चा किनारा !
जैत गावापाशी नर्मदा मैया मोठे वळण घेत किनारा कापत जाते
हीच ती जागा जिथे मी मोठी उडी मारली ! मला अगदी पक्की लक्षात आहे !इथून कड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही परंतु इथे खोल कडा आहे .
जैत गावाच्या घाटावरून काढलेले या चित्रामध्ये तो खडा किनारा थोडासा लक्षात येईल !
या मार्गावरून कोणीही येऊ नये अशी नम्र विनंती आहे . मी देखील पुन्हा या मार्गाने जाईन असे वाटत नाही ! सरदारपुर ते जैत हे अंतर रस्त्याने पार करावे !

जैत गावाचा घाट निर्माणाधिन आहे . महेश्वर चा घाट आणि नर्मदापुरमचा शेठानी घाट याच्या खालोखाल जैतच्या घाटामध्ये निर्मितीसाठी खर्च केला असावा असे माझे मत आहे . शेवटी राजाचेच गाव ! इतके प्रचंड सिमेंट काँक्रेट वापरून अतिशय सुंदर आणि मोठा घाट बांधण्याचा घाट येथे घालण्यात आलेला आहे ! वळणावरच्या कुठल्याच घाटावर इतका मजबूत घाट अलीकडे कोणी बांधलेला नाही ! एक सोडून तीन चार घाट आहेत ! अर्थातच हे सर्व सरकारी खर्चातून केलेले आहे . परंतु जैत या गावातील घाट अतिशय सुरक्षित आणि अतिशय मोठा आहे हे मात्र नक्की . 
हेच ते जैत गावातले तीन चार घाट . म्हणजे तसा हा एकच घाट असून त्याचे बांधकामाच्या सोयीसाठी तीन चार टप्पे केलेले आहेत .
हे बांधकाम इतके मजबूत आहे की अवकाशातून सुद्धा दिसते !असे काम केले नाही तर केलेले सर्व काम नर्मदा मैया आपल्या पोटामध्ये वाहून घेऊन जाते . अशी अनेक उदाहरणे नर्मदा काठी पाहायला मिळतात .
घाट बांधताना खोल पाया घेऊन सुंदर आणि मजबूत घाट बांधला जात आहे .

या भागामध्ये घाट बांधणे खरंच खूप कठीण होते मोठे शिवधनुष्य उचलून शिवराज सिंह चौहान यांनी पेलले आहे .

मला काठावरून चालत येताना पाहून स्नान करणाऱ्या सगळ्यांची तोंडे बघण्यासारखी झाली होती ! खरं सांगायचं तर माझंच तोंड बघण्यासारखं झालं होतं ! मी परिक्रमावासी आहे हे देखील ओळखता येत नव्हते इतकी माती माझ्या अंगाला लागली होती . एखाद्याला खरोखरच असे वाटू शकले असते की ठार वेडा मनुष्य येतो आहे ! त्यामुळे मी सर्वप्रथम  नेसल्या वस्त्रांनिशी नर्मदा मातेमध्ये उतरलो आणि स्वच्छ पैकी स्नान केले ! खूप भारी वाटले ! सगळा थकवा क्षणात निघून गेला !एका दमत पायऱ्या चढत घाट चढलो आणि थेट तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलो ! अर्थातच आता ते स्वतः या घरात राहत नाहीत परंतु त्यांचे गावांमध्ये येणे जाणे असते असे कळाले . त्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये एक हेलिपॅड बनवले आहे . परंतु या हेलिपॅडचा एक तोटा असा झाला आहे की त्यामुळे या परिसरातील रस्ते अजूनही कच्चे आणि खडकाळ राहिलेले आहेत ! बाकीच्या मध्य प्रदेश मध्ये जसे चांगले रस्ते आहेत तसे या भागात मला आढळले नाहीत याची विशेष नोंद करून ठेवतो ! मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे बंधू नरेंद्र सिंह चौहान या घरामध्ये राहतात .पण तेही इथे कमी आणि भोपाळला जास्त असतात असे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी मला सांगितले . मी जेव्हा घर शोधत गेलो तेव्हा बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांशी संवाद साधला तेंव्हा त्यांनी तिथे बांधत असलेल्या एका छोट्या मंदिराजवळ  मला बसायला खुर्ची दिली आणि चांगल्या तासभर गप्पा मारल्या .त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी समजल्या . कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठे कार्य करण्याची इच्छा ज्या तरुणांना आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे सूत्र सांगून ठेवतो की ऐकव माहितीवर किंवा आताच्या काळामध्ये व्हाट्सअप फेसबुक अन्य प्रसार माध्यमे यावर प्रसारित होणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष त्या व्यक्तीला  ओळखणाऱ्या , तिला भेटलेल्या जाणकार व्यक्तींकडून मत घेतले तर अधिक चांगली आणि विश्वासार्ह माहिती मिळते .संघटनेचे हे सर्वात महत्त्वाचे सूत्र आहे . आज नरेंद्र मोदी नावाचा कार्यकर्ता इतक्या मोठ्या पदावर कशामुळे गेला त्याच्यामागे त्यांची ही सवय आहे ! तळागाळातील माणसांपासून संघटन करायला त्यांनी सुरुवात केलेली असल्यामुळे आज ते या उंचीवर पोहोचू शकले आहेत .त्यांच्या हाताखाली काम करणारा सर्व कर्मचारी वर्ग देखील तळागाळातून वर आलेलाच आहे ! थोड्यावेळाने मुख्यमंत्र्यांचे अजून एक भाऊ आणि पुतण्या तिथे आले . हे चक्क म्हशीचे दूध काढून त्याचे रतीब घालायला निघाले होते ! इतकी साधी माणसं पाहून मला खरंच खूप भारी वाटलं ! त्यांना देखील मी खास जैत गावामध्ये राहायला आलो आहे हे ऐकून बरे वाटले ! आणि माझी मनोमन तशी इच्छा खरोखरच होती ! मी माझ्या पुस्तकामध्ये दोन-चार दिवस अलीकडे जैत इथे जायचे आहे असे लिहून ठेवले होते . ही सर्व माणसे फार साधी आहेत . कुणी शेती करते . तर कोणाचे किराणा मालाचे दुकान आहे .सणवार असेल तेव्हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येतात . जवळच्याच शेतामध्ये उतरतात . मुख्यमंत्र्यांचे घर पण खूप साधे होते . फक्त घराच्या वरती वायरलेस कम्युनिकेशनचा एक अँटिना लावलेला होता . ज्याच्यावरून पोलिसांचा चालताबोलता अर्थात वॉकीटॉकी चालायचा . तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे क्षत्रिय किरात समाजाचे असल्यामुळे त्यांनी आपल्या घराजवळच क्षत्रिय किरात समाजाची धर्मशाळा बांधली आहे .इथे परिक्रमावासींची उतरण्याची व्यवस्था ते करतात .मालवीय नामक अजून एकांची धर्मशाळा येथे जवळच आहे .अतिशय सुंदर असे महाकालेश्वराचे मंदिर देखील आहे .   मुख्यमंत्र्यांची धर्मशाळा येथे नुकताच येऊन राहिलेला एक अडखळत बोलणारा साधू सांभाळत होता . इथे देखील दोन भंडारे सुरू होते . म्हणजे रात्री भंडारा करण्यासाठी स्वयंपाकाची लगबग सुरू होती . आसपासच्या गावात राहणारे किरात क्षत्रिय समाजाचे अनेक लोक इथे येऊन राहिलेले होते . कमीत कमी वीस एक कुटुंबं तिथे असावीत . दोन वेगवेगळे गट होते . माणसे वाढल्यामुळे मधोमध असलेल्या एका झाडाच्या पारावरती मी आसन लावले .साधू साठी करतलभीक्षा तरुतलवास: यासारखे सुख काही असत नाही ! अर्थात हाताच्या ओंजळीत मावेल अशी भिक्षा मागून घेणे . आणि झाडाखाली झोपणे ! वा !  सुख-सुख म्हणजे अजून ते काय ! दोन्ही बाजूच्या लोकांनी मला जेवण्यासाठी बोलावले ! मग मी त्या सर्वांना असे सांगितले की मी मध्ये पारावरच जेवायला बसणार आहे . तुम्हाला जे हवे ते मला आणून वाढा ! हळूहळू त्या परिसरात खेळणारी सर्व छोटी मुले माझ्याभोवती गोळा झाली ! एक एक करून इतकी मुले मला चिकटली की हलायलाच तयार होईनात ! मग मी त्यांना गमतीदार गोष्टी सांगू लागलो ! मला भेटलेल्या कोल्ह्याची गोष्ट सांगितली ! नर्मदा मातेच्या गमती जमती सांगितल्या ! माझी एक गोष्ट संपली की मुले अजून सांगा अजून सांगा असे मागे लागायची ! जगाच्या पाठीवर कुठेही जा मुले सारखीच ! अक्षरशः कोरड्या स्पंजा सारखी त्यांची अवस्था असते ! कितीही पाणी ओता ! ते पिऊन टाकतात ! मुलांना भरपूर चित्रे काढून दिली ! जो मिळेल तो कागद जी मिळेल ती वस्तू मुले मला आणून देत होती आणि त्यावर चित्र काढून घेत होती ! कागद संपल्यावर मुलांनी अंगावर चित्रे काढून घेतली ! मी नेहमी म्हणतो की ते लोक फार पुण्यवान आहेत ज्यांना लहान मुलांसोबत काम करायची संधी मिळते ! लहान मुलांच्या मध्ये राहिले की सर्व थकवा निघून जातो ! आजकाल लोकांना ताणतणाव डिप्रेशन वगैरे येते याचे कारण घरात कमी असलेली लहान मुले हेच आहे ! पूर्वी घरामध्ये कायम लहान मुले असायची त्यामुळे मोठ्या माणसांना ताणतणाव डिप्रेशन कधी यायचे नाही आणि जर फार तणाव आलाच तर एखाद्या मोठ्या पोराला बदड बदड बदडले की तो निघून जायचा ! आपले बालपण आठवून पहा ! तुम्हाला पटेल मी काय म्हणतोय ते ! आताच्या काळामध्ये पालक डिप्रेशन मध्ये आहेत कारण त्यांना मुले नाहीत ! आणि मुलं डिप्रेशन मध्ये आहेत कारण त्यांना भावंडं नाहीत ! आजी आजोबा कंटाळले आहेत कारण त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नाही ! आणि आजी आजोबांना वेळ द्यायला नातवंडे जातात तेव्हा त्यांना लक्षात येते की ते व्हाट्सअप मध्ये किंवा टीव्ही सिरीयल मध्ये मशगुल आहेत ! एकंदरीत सगळाच सामाजिक तोल ढासळवणारा हा प्रकार आपण विकासाच्या आणि प्रगतीच्या नावाखाली पत्करला आहे ! असो . रात्री डासांनी फोडून काढले ! तसेही झाडाजवळ डास जास्त असतात . 
इथे राहणारा साधू फार सेवाभावी होता . आठवडाभर रहा असा आग्रह मला करत होता . परंतु चातुर्मास जवळ येत चालला होता त्यामुळे मला पुढे जाणे आवश्यक आहे हे मी त्यांना समजावून सांगितले . आश्रम नदीपासून तसा आत मध्ये असल्यामुळे स्नानासाठी पहाटे लवकर उठून खूप लांब जावे लागले . परंतु भीतीदायक गतीने वाहणाऱ्या नर्मदा माते मध्ये स्नान करून खूप आनंद मिळाला ! या भागामध्ये नर्मदा मातेची गती कल्पनेपेक्षा खूप जास्त आहे . वरून पाणी संथ दिसते परंतु पाण्यात उतरल्यावर कळते की प्रवाहाला भयंकर गती आहे . पोहायला न येणाऱ्या माणसाचा चुकून तोल गेला तर त्याला सावरता येणार नाही इतकी ती गती असते ! त्यामुळे वळणाच्या ठिकाणी नर्मदा मातेमध्ये स्नान करताना सावध राहावे हे उत्तम ! 
हे आहे शिवराज सिंह चौहान यांचे साधेसे घर . यांच्या घरापेक्षा खूप मोठी मोठी घरे या गावात आहेत ! त्यांनी सुरू केलेल्या अन्नक्षेत्राला मामा अन्नक्षेत्र असे लोक म्हणतात .
घर किती साधे आहे पहा ! डंपरचा धक्का लागून घराचा एक तुकडा तुटलाय ! तो देखील दुरुस्त केलेला नाही . घराच्या वर पांढरा अँटेना दिसतो वायरलेसकम्युनिकेशनचा अँटेना आहे .
हे घराचे अंगण असून इथे एका मंदिराचे बांधकाम सुरू होते आणि आजही ते तसेच दिसते आहे म्हणजे बहुतेक मंदिर पूर्ण झालेले नाही ! याच्यात सावलीमध्ये पोलीस आणि मी खुर्ची टाकून बसलो होतो .
इथे मामा वरचेवर येतात . त्यांनी आपल्या मूळ गावाशी आणि ग्रामीण संस्कृती शी  नाळ अजून तोडलेली नाही हेच त्यांच्या यशाचे गमक आहे ! गावातील अनेक लोकांशी मी गप्पा मारल्या . ते सर्वांना नावाने ओळखतात . नातवंडांची पण नावे त्यांना पाठ आहेत . तसेच ते बिनधास्त कुठल्याही घरामध्ये जातात येतात . गावामध्ये आल्यावर त्यांचा मी मुख्यमंत्री आहे असा कुठलाही अविर्भाव नसतो ! अर्थात हे सर्व त्या काळातले आहे . आता शिवराजसिंह चव्हाण हे केंद्रीय कृषिमंत्री आहेत . अतिशय योग्य व्यक्तीची निवड कृषी मंत्री म्हणून केली आहे असे माझे मत आहे . मध्यप्रदेश मध्ये शेतकरी हे खरोखरच खूप प्रगतिशील आणि अभ्यासू शेतकरी आहेत .
विशेषतः नर्मदा मातेची त्यांच्यावर अशी काही कृपा आहे की त्यांना वाटेल ते प्रयोग करून बघता येतात !
त्यामुळेच इथे एका गव्हाच्या एकाच झाडाला अनेक लोंब्या लागलेल्या सहज पाहायला मिळतात !नर्मदा मातेची सुपीक गाळमाती आणि अप्रतिम रेव जल !अजून काय हवे !

हेच क्षत्रिय किरात समाजाचे अन्नक्षेत्र आणि बाहेर दिसणाऱ्या पारावर मी झोपलो होतो !

पूजा अर्चा करून पहाटे लवकर प्रस्थान ठेवले .दिवस मोठा झाल्यामुळे सकाळी लवकर उजाडायचे . वाटेमध्ये एका तरुण साधूने सुंदर चहा करून पाजला . एका दगडाखाली त्याने तपस्या चालवली होती . तो अशा भयानक ठिकाणी राहत होता की जिथे कोणीच येणार नाही ! मला पाहून त्याला खूप आनंद झाला . कुठे कुठे दऱ्याखोऱ्यामध्ये लोक जाऊन बसलेले आहेत ! पाहून खरंच आश्चर्य वाटते . रामदास स्वामी यांचे वर्णन करून ठेवतात .ते म्हणतात  
किती दास ते तापसी तीर्थ वासी ।
गिरी कंदरी भेटी नाही जनासी ।
माझ्याकडून असे काहीच घडत नाही म्हणून मग ते म्हणतात .
परस्तावलो (प्रस्तावलो ) कावलो तप्त झालो ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो ॥
माजी अवस्था देखील तशीच होती . आधी मी शेतातून किनारा धरला . परंतु वाट नव्हती . मग जंगल -शेत _जंगल -शेत असा एक मार्ग शोधून काढला आणि नारायणपूरला आलो . इथे अतिशय सुंदर मंत्र म्हणणाऱ्या एका गुरुजींनी मला नाही नाही नको नको म्हणत असताना बळेच तखतावर बसविले .एका मातारामने चहा आणून दिला . त्या तखतावर बसल्यावर माझी अवस्था अळूच्या पानावर पडलेल्या पाण्याच्या थेंबा सारखी झाली होती !त्यावर मी बसलो तर होतो परंतु त्या सुखासनाचा स्पर्श मला नकोसा होत होता ! नर्मदा माई माझी परीक्षा बघत होती . की हा त्या तखतावर आरामात बसतोय की अवघडत बसतोय !सुखासन मिळाल्यावर सुखावतोय की सावधान होतोय ! गुरुजी गेल्यावर मी चटकन चहाचा कप घेऊन जमिनीवर बसलो आणि मग मला बरे वाटले ! जमिनीवर ठेवलेली वस्तू कधीही स्थिर राहते ! जितकी वर जाईल तितकी अस्थिरता वाढते ! थोडे पुढे गेल्यावर एका यादवाने घरी नेऊन निरसे दूध पाजले .या भागात सर्व यादव लोकांची वस्ती होती . दूरवर कुठेतरी भजन चालू आहे असा आवाज येत होता . आवाजाच्या रोखाने गेलो तर रामकिशन यादव नामक एका रेवा भक्ताच्या घरी अखंड नर्मदेहरचा जप सुरू होता ! गंमत म्हणजे हा जप करण्यासाठी सगळी लहान मुले बसलेली होती ! अतिशय सराईतपणे माईकवर ही मुले जप करत होती ! विशेष म्हणजे नर्मदे हर या महामंत्राला वेगवेगळ्या चाली लावून ती अतिशय तन्मयतेने गात होती !  एक बहीण भावाची जोडी तर फारच सुंदर चालीमध्ये जप करत होते ! इथे पेटी ढोलक अशी सर्व वाद्ये ठेवली होती आणि मुलेच ती वाजवत होती .एकदा जपाला बसलेली मुले चार चार तास जप करत होती ! मी थोडा वेळ ढोलक वाजवला . काही काळाने ढोलक वाजवणारा आल्यावर मी पेटी वाजवली . जपही केला . खूप आनंद मिळाला! विशेषतः सहा ते दहा वयोगटातील ती लहान लहान मुले डोळे मिटून पूर्ण तन्मयतेने घशाच्या शिरा ताणूताणून नर्मदा मातेला आळवताना पाहून इतके समाधान वाटले की काय सांगू ! एक परिक्रमावासी आल्यामुळे सर्वजण खुश झाले . मुलांच्या उपजत वृत्तीतून काही जणांनी माझ्या झोळीतली माझी नर्मदा मैया शोधून काढली !ती सर्वांना एवढी आवडली ! नर्मदा मातेचा जप चालू असताना साक्षात नर्मदा माता तिथे प्रकट झाली हे पाहून परिसरातील अनेक बायका तिथे आल्या आणि त्यांनी नर्मदा मातेचे औक्षण केले ! मला जेवण करण्याचा आग्रह सुरू झाला होता परंतु आता माझ्याकडे खरोखरच खूप कमी दिवस उरले होते . जरा देखील पुढेमागे झाले तर चातुर्मास करावा लागणार म्हणून मी नम्रपणे नकार दिला आणि पुढे चालू लागलो . पुन्हा काठाला लागलो . 
हे आहे नारायणपूर . इथून नांदनेर समोर सरळ रेषेत ३ किमी आहे परंतु मी काठ पकडला त्या काठाने ते बारा किलोमीटर दूर पडते .परंतु हा मैय्याचा आजवरचा सर्वात सुरेख , सर्वात सुंदर , सर्वात रमणीय काठ निघाला !  अमावस्या असूनही कोणीही स्नानासाठी आलेले नव्हते . समोरून समोरून बुढी मैय्या गेली असल्याने आणि कापलेला उभा काठ असल्यामुळे समोरून देखील कोणीही जात नाही !इथे वाळूच वाळू आहे ! मी नर्मदा मातेचे जल आणि वाळू जिथे भेटते अशा पट्ट्यावरून अनवाणी चालायला सुरुवात केली . नर्मदा मातेच्या पाण्याच्या लाटांमुळे वाळूमध्ये तीन-चार थर केलेले असतात . त्यातल्या सर्वात खालच्या थरावरून मी चालत होतो . याच्या खाली मात्र उभी भिंत असते त्यामुळे तुम्ही दंड नर्मदा मातेमध्ये बुडवला तर तो वाळूला टेकत नाही . अधांतरी राहतो .
हा किनारा कसा आहे याचे एक चित्र मी माझ्या वहीमध्ये काढून ठेवले होते . पाण्यामध्ये दंड बुडलेला दिसतो आहे . उजवीकडे वाळूचे थर दिसत आहेत . कमी जास्त वाहणाऱ्या प्रवाहामुळे असे दोन-तीन थर तयार होतात . असो .
 हा संपूर्ण किनारा मी एका अवस्थेमध्ये वेड्यासारखा चाललो. पाणी सर्वत्र उथळ असल्याने पाणपक्ष्यांसाठी हा स्वर्ग आहे !परंतु मला खरा आनंद देऊन गेले ते इथे दिसलेले सारस पक्षी ! मी इथे एकूण पंधरा सारस पक्षी पाहिले . खूप जवळून पाहिले . हे अक्षरशः माझ्या उंचीचे आणि भव्य दिव्य होते ! माझ्या जवळून जेव्हा ते उडाले तेव्हा आम्ही पाहिले की त्यांच्या पंखांचा विस्तार किमान १२ फूट तरी असावा ! सारस पक्षी इतके मोठे असतात हे मी ऐकून होतो परंतु आज प्रत्यक्ष अनुभवत होतो ! मला नुकतेच काही दिवसापूर्वी दोन सारच पक्षी दिसले होते परंतु ते माझ्यापासून खूप लांब होते .इथे मला त्यांचे जवळून निरीक्षण करता आले . मी सारस पक्ष्यांना बराच वेळ दिला . त्यांना देखील लक्षात आले की हा आपल्याला काही करणार नाही . एकदा तर ते माझ्या इतके जवळ आले होते की एक झेप मारून मी त्यातला एखादा पक्षी पकडू शकलो असतो ! उडण्या पूर्वी ते विमानाप्रमाणे पळत पळत टेक ऑफ घेतात हे देखील बघण्यासारखे असते ! एकदा तर ते माझ्या जवळून उडाले तेव्हा मला वारे लागले इतके ते जवळ होते ! मी हा प्रवास कधीच विसरू शकणार नाही ! नर्मदा परिकमेमध्ये मी पाहिलेला सर्वात सुंदर किनारा कुठला असे कोणी विचारले तर तो निःःसंशयपणे हाच किनारा होय ! आणि मी या किनाऱ्याने कोणी जावे असे सुचवणार देखील नाही ! कारण या बारा किलोमीटर निर्मनुष्य नर्मदा काठाची वाट लावण्याचे काम परिक्रमावासी अतिशय सहज करू शकतात ! तसे खरेच होऊ नये . तिथे कोणी जात नाही तेच बरे आहे ! सारस पक्ष्यांना मानवी वावर जरा सुद्धा खपत नाही . मी जसं जसा पुढे चाललो होतो तसतसे ते देखील चालत चालत पुढे जात होते . त्यांच्या ढांगा अर्थातच माझ्यापेक्षा फार मोठ्या होत्या . पुण्यातील सारसबागेमध्ये पूर्वी सारस पक्षी घरटी करायचे . आज तिथे सारस फक्त बागेच्या नावात उरला आहे . मला आनंदाचे भरते तेव्हा आले जेव्हा मी सारसांचे नृत्य पाहिले ! सारस पक्ष्यांचे नृत्य ज्याला पाहायला मिळाले त्याच्यासारखा भाग्यवान तोच ! हे दृश्य इतके बघण्यासारखे आणि इतके सुंदर असते की मी तुम्हाला ते शब्दांमध्ये सांगू शकत नाही ! सारस पक्षी हा जोडीदारा प्रती असलेल्या प्रेमासाठी आणि निष्ठेसाठी प्रतीक म्हणून ओळखला जातो . भारतातून ही निष्ठा जशी कमी होत चालली आहे त्याचबरोबर हा सारस पक्षी देखील त्याचमुळे कमी होत चालला आहे की काय कोण जाणे ! या सारस पक्ष्यांच्या पायाचे ठसे आपल्या हाताच्या ठशांपेक्षा सुद्धा मोठे होते ! 

मी त्याचे कच्चे तुलनात्मक रेखाटन / चित्र  माझ्या वहीमध्ये काढून ठेवले आहे !यांच्यापुढे चक्रवाक सारखा पक्षी किंवा चित्र बलाक सुद्धा छोटे दिसत होते !किंबहुना चक्रवाक आता दिसायचे बंद च झाले . काय काय असे विचारत आपले स्वागत करणारे चक्रवाक किंवा आला आला असे म्हणत उडून जाणारे हे सुंदर पक्षी बहुतेक स्थलांतर करून विणीच्या हंगामासाठी आपल्या मूळ गावी अर्थात सायबेरिया ला गेले असणार . स्थलांतरित पक्ष्यांची उडण्याची क्षमता किती असते याचा अंदाज आपल्याला लावता येत नाही . बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ऑफ इंडिया नावाची मुंबई मधील एक संस्था आहे जी पक्षांच्या स्थलांतराचा अभ्यास गेली अनेक वर्ष करत आहे . पक्षांना रेडिओ टॅग लावणे किंवा रंगीतफिती पायाला बांधून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे ही पद्धत गेली अनेक दशके या संस्थेचे शास्त्रज्ञ करत आहेत . त्यांना नुकतेच एक आश्चर्यकारक निरीक्षण पाहायला मिळाले आहे !  Black-tailed Godwit नावाचा टिटवी पेक्षा थोडासा मोठा एक पक्षी आहे . हा सायबेरिया ते भांडुप हे अंतर तीन दिवसांमध्ये उडून आलेला आहे ! दहा हजार किलोमीटर अंतर कापण्यासाठी या इवल्याशा पक्षाने फक्त तीन दिवसाचा वेळ घेतला ! स्थलांतरित पक्षी हे असे अचाट काहीतरी करत असतात ! सध्या जगभरातील पक्षी जगतामध्ये त्याच्या या तीन दिवसाच्या प्रवासाची चर्चा सुरू आहे ! छोट्या छोट्या पक्षांमध्ये जर एवढी ताकद असेल तर सारस सारखे मोठे पक्षी किती महान असतील याची आपण फक्त कल्पना करून पहावी ! देवाने अतिशय वेळ घेऊन कष्टपूर्वक या पक्ष्याला बनवले आहे असे वाटते ! 
सारस पक्ष्याचा तुलनात्मक आकार लक्षात यावा म्हणून ही चित्रे !
सारस पक्ष्याची उंची पाच फूट ११ इंच पर्यंत सहज असते !
सारस पक्ष्याचा पंखविस्तार पाहताना अखिलेश यादव .
सारस पक्ष्यांच्या जोडीचे अप्रतिम नृत्य !
हे नृत्य तासंतास पाहत बसावे असे असते !
याच्यामध्ये ते विविध प्रकारच्या गिरक्या उड्या घेत असतात . यांचे पदलालित्य पाहण्यासारखे असते .
विशेषतः पंखांचा फुलोरा करून मान वर करून जेव्हा सारस पक्षी उभा राहतो तेव्हा ते दृश्य अविस्मरणीय असते ! विविध प्रसंगी सारस पक्ष्यांचे फोटो काढणाऱ्या सर्व छायाचित्रकारांचे आभार !

मागून हा फुलोरा खरोखरच खूप सुंदर दिसतो !

असो . सारस या पक्ष्याने मला अशी काही भुरळ पाडली आहे की मी त्यावर अजून कितीही लिहू शकतो ! सध्या आपण पुढे असलेल्या गावात जाऊया ! इथली वाळू इतकी स्वच्छ होती अगदी समुद्रासारखी ! बहुतेक समुद्रामध्ये बरीचशी वाळू नर्मदा माईनेच नेऊन टाकली असणार असेच मला वाटले !इथले पाणी इतके स्वच्छ होते आणि इतके शुद्ध होते की मी दर थोड्या वेळाने ते पाणी प्यायचो ! काठाने चालताना बिसाखेडी जनावासा तिलोट आणि नांदनेर अशी गावे लागतात .  जनवासा गावामध्ये गुरे राखणाऱ्या तिघांची मला जेवायला घरी नेण्यासाठी स्पर्धा लागले ! अखेर मी निवाडा केला . त्या तिघांपैकी एकाच्या घरी मी बसलो . कैलास मेहरा म्हणून गुराखी होता त्याच्या घरी मी बसलो . दुसऱ्या दोघांनी जेवण बनवून आणावे असे ठरले ! या मार्गावरून कुणीतरी परिक्रमा वासी जात आहे याचा या लोकांना इतका आनंद झाला होता की या तिघांनाही सेवा करायची उर्मी दाटून आली होती ! घरी जाऊन अंगणात बसलो . याला प्रशांत , सौरव नावाची मुले आणि पुनम व पूजा नावाच्या दोन मुली होत्या . पूजा नावाची याची एक कन्या भारकच्छ गावामध्ये दिलेली होती . दोन्ही जावई मास्तर होते . भरपूर रोट्या पुरी भाजी या तिघांनी प्रेमाने खाऊ घातली ! प्रशांत तब्येतीने चांगला पैलवान होता . त्याला भारतीय लष्करामध्ये जाण्यासाठी प्रेरित केले . माझे लष्करातील एक मित्र आहेत . त्यांचा क्रमांक मला पाठ होता . त्यांच्याशी वडिलांच्या फोनवरून त्याचा संवाद घडवून आणला . त्याला खूप आनंद झाला . आणि आता मी आर्मीतच जाणार असे त्याने मला निक्षून सांगितले ! तो इतका हुशार होता की जेसीबी डंपर ट्रॅक्टर सर्व काही चालवायचा . बघून शिकला होता . तिघांना पोटभर आशीर्वाद देऊन पुढे निघालो . नर्मदा खंडातील लोक अतिशय सात्विक धार्मिक आणि दानशूर आहेत ! त्यांच्याशिवाय नर्मदा परिक्रमा निर्विघ्न पणे पार पडणे अशक्य आहे . नर्मदा खंड की जय हो !इथून बरेच अंतर काठाने चालत नांदनेर या गावी पोहोचलो . हे स्थान देखील अतिशय रम्य होते . इथे घाटावर दोन्ही बाजूला दोन मंदिरे होते आणि मध्ये त्यांना जोडणारा पूल बांधलेला होता . या ठिकाणी भव्य दिव्य मनोकामनेश्वर आणि महाकालेश्वर महादेव स्थापित आहेत ! गंमत म्हणजे शिवलिंगे तिरकी आहेत . अर्थात मंदिर पूर्व पश्चिम बांधलेले नाही . तर घाटाला समांतर बांधले आहे .परंतु जगात कुठेही जा शिवलिंगाची दिशा बदलत नाही ! त्याची जलहरी उत्तर दिशेलाच असते . मी पहिल्यांदाच अशी दोन शिवलिंगे शेजारी शेजारी पाहिली होती त्यामुळे वहीमध्ये त्याचे चित्र काढून घेतले ! या मंदिरामध्ये एक तरुण साधू व्यवस्था पाहण्यासाठी काही दिवस थांबला होता . हा  बिचारा दुखी आत्मा होता !काहीही केले तरी याच्या चेहऱ्यावर हसून उमटत नव्हते . वयस्कर साधू त्रस्त दिसला तर आपण समजू शकतो कारण शारीरिक व्याधींचा त्रास असू शकतो . परंतु तरुणांनी तोंड वाकडे केले की वाईट वाटते . आयुष्याचा आनंद तरुणांनी घ्यायचा तर कोणी घ्यायचा ? बरं झाले त्या निमित्ताने आठवले म्हणून सांगतो . तुम्हाला जर तुमच्या घरातील तरुणांचे मन जिंकायचे असेल तर त्यांना हे करू नको ते करू नको असे सांगू नका . कारण आयुष्याचा आनंद घेण्याचे हेच वय असते . त्यांना पडू द्या ,  धडपडू द्या , स्वतःच्या अनुभवातून स्वतः शिकू द्या ! हे करू नको असे म्हणणे नकारात्मक आहे . त्यापेक्षा असे करून पाहिले तर ? असे बोलणे सकारात्मक आहे . या साधूची इथे सेवा देण्याची इच्छा आहे असे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत नव्हते .त्यामुळे आपसूकच पुढे निघालो . मला वाटेमध्ये भेटलेले पुण्याचे परिक्रमावासी अक्षय आंबेडकर आणि कुलकर्णी गुरुजी या दोघांनी पुढे इथेच चातुर्मास केला . ते मधून अधून मला व्हिडिओ कॉल करून हा परिसर दाखवायचे !
हे नांदनेर येथील मंदिर आहे . दोन्ही बाजूच्या मंदिरांना जोडणारा पूल आणि त्या घालून जाणारा घाटाचा रस्ता आपल्याला दिसतो आहे . 
मंदिर परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे .
परिक्रमावासींची निवास व्यवसाय या दोन खोल्यांमध्ये होते .आंबेडकर आणि कुलकर्णी यांनी याच खोलीमध्ये चातुर्मास केला होता .
मंदिरातील हनुमान जी
श्री मनोकामनेश्वर आणि श्री महाकालेश्वर भगवान नांदनेर

मी नक्की कुठल्या ठिकाणाबद्दल लिहितो आहे हे नंतर मला संदर्भा  सहित कळावं म्हणून माझ्या वहीमध्ये मी एखादे खुणेचे छोटेसे चित्र काढून ठेवायचो . नांदनेरच्या मनकामनेश्वर आणि महाकालेश्वर महादेवांचे हे चित्र मी वहीत रेखाटले होते !
खरं सांगायचं तर आता आपली परिक्रमा संपण्याच्या टप्प्यावर येऊ लागली आहे हे माझ्या अंतर्मनाला कळू लागलं होतं . त्यामुळे प्रत्येक ठिकाणी खूप वेळ घालवावा असं वाटायचं . ही परिक्रमा संपूच नये असं वाटायचं . नर्मदा मातेला पाहिल्यावर उगाचच भरून यायचं . उगाचच तरी कसं म्हणावं ! त्यामागे केवढी मोठी कारण परंपरा होती हे आपण जाणताच ! आपल्यासाठी कोणीही एवढं करणार नाही जेवढे ती न बोलता ,शांतपणे , निमूटपणे करत होती .
पुन्हा एकदा किनारा पकडला . पुढचा मार्ग दिसायचा बंद झाला . कारच्या काचेवर पाणी आले तर पुसायला वायपर असतो ना !
डोळ्यांचे काय करायचे ! 
नर्मदे हर !





लेखांक एकशे एकोणसाठ समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका (Index)

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !