लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

जबलपूर स्थानकावर उतरलो आणि बाहेर आलो . जबलपूर बद्दल मी खूप वर्षांपासून ऐकून होतो . सज्जनगडावर येणाऱ्या एक रामदासी साध्वी पूज्य कमलताई पटवर्धन रामदासी यांचा जबलपूर येथे मठ होता .यांनी स्वतः १९७२ / ७३ साली दोन पायी परिक्रमा केलेल्या होत्या व त्यांच्या अनुभूती देखील अलौकिक अशा होत्या . त्यांचा आश्रम कुठे आहे हे मला माहिती नव्हते परंतु "इंद्रपुरी कॉलनी , ग्वारी घाट मार्ग " असा त्यांचा पत्ता माझ्या डोक्यामध्ये पक्का बसलेला होता .मला असे वाटले की जबलपूर स्थानकापासून नर्मदा मातेचा काठ जवळ असेल परंतु चौकशी केली असता असे सांगण्यात आले की तिथून नर्मदा मैयाचा काठ आठ किलोमीटर लांब आहे ! आठ किलोमीटर पायी चालायचे ? असा मोठा प्रश्न मला त्या क्षणी पडला होता हे प्रामाणिकपणे नमूद करतो ! परंतु खिशात दमडी नसल्यामुळे पर्याय देखील नव्हता त्यामुळे शांतपणे ग्वारी घाटचा रस्ता पकडला . वाटेत एक शेअर रिक्षावाला माझ्या शेजारी थांबला आणि मला म्हणाला , " बाबाजी बैठ जाओ । " बाबाजी वगैरे कोणी मला म्हणते आहे अशी अजिबात सवय नव्हती त्यामुळे मौज वाटली आणि मी त्याला म्हणालो , "भैय्या म...