लेखांक ७६ : खलघाट आणि कठोऱ्याचा ग्यारहलिंगी आश्रम
तो कानफाट्या गोसावी , काटे-कुटे ,चिखल , दगड कशाचीही तमा न करता चालत गेल्याचे दिसत होते . त्याचे उठलेले प्रत्येक पाऊल माझ्यासाठी प्रेरणादायी होते . त्याच्या ढांगा खूप मोठ्या होत्या .योग्य वयात वैराग्याची आग आत मध्ये लागलेली व्यक्ती कशी असू शकते हे मी त्याच्या रूपाने अनुभवत होतो . तो पुन्हा काही दिसला नाही . वाचकांना कानफाट्या गोसावी म्हणजे काय हे माहिती नसेल तर कळावे म्हणून एका प्रतिनिधिक गोसाव्याचे चित्र टाकलेले आहे . हे नाथपंथीय साधू लोक कानामध्ये छिद्र करून मोठी लाकडी किंवा धातूची कडी कानात घालतात . योगी आदित्यनाथ देखील त्या अर्थाने कानफाटे गोसावी आहेत . हा मराठी भाषेतील प्रचलित शब्द आहे . काठावरचा रस्ता कठीण होता परंतु अगम्य नक्कीच नव्हता . प्रत्येक पावलाला नर्मदा मैया तिची सुंदर सुंदर रुपे दाखवत होती ! इथून पुढे खलघाट लागणार होता . महाराष्ट्रापासून इंदोरला जाणारा महामार्ग खलघाट वरूनच नर्मदा ओलांडतो . सियाराम बाबांच्या आश्रमात भेटलेले माऊली शिंदे त्यांच्या शिष्यां सोबत इथूनच नाशिकला चालत जाणार होते . इथे देखील मध्ये अनेक नद्यानाले नर्मदेला येऊन मिळत होते