लेखांक ७६ : खलघाट आणि कठोऱ्याचा ग्यारहलिंगी आश्रम

तो कानफाट्या गोसावी , काटे-कुटे ,चिखल , दगड कशाचीही तमा न करता चालत गेल्याचे दिसत होते . त्याचे उठलेले प्रत्येक पाऊल माझ्यासाठी प्रेरणादायी होते . त्याच्या ढांगा खूप मोठ्या होत्या .योग्य वयात वैराग्याची आग आत मध्ये लागलेली व्यक्ती कशी असू शकते हे मी त्याच्या रूपाने अनुभवत होतो . तो पुन्हा काही दिसला नाही .वाचकांना कानफाट्या गोसावी म्हणजे काय हे माहिती नसेल तर कळावे म्हणून एका प्रतिनिधिक गोसाव्याचे चित्र टाकलेले आहे . हे नाथपंथीय साधू लोक कानामध्ये छिद्र करून मोठी लाकडी किंवा धातूची कडी कानात घालतात . योगी आदित्यनाथ देखील त्या अर्थाने कानफाटे गोसावी आहेत . हा मराठी भाषेतील प्रचलित शब्द आहे . 
काठावरचा रस्ता कठीण होता परंतु अगम्य नक्कीच नव्हता . प्रत्येक पावलाला नर्मदा मैया तिची सुंदर सुंदर रुपे दाखवत होती ! इथून पुढे खलघाट लागणार होता . महाराष्ट्रापासून इंदोरला जाणारा महामार्ग खलघाट वरूनच नर्मदा ओलांडतो . सियाराम बाबांच्या आश्रमात भेटलेले माऊली शिंदे त्यांच्या शिष्यां सोबत इथूनच नाशिकला चालत जाणार होते .  इथे देखील मध्ये अनेक नद्यानाले नर्मदेला येऊन मिळत होते . ते सर्व सहज पार झाले .
काठाने चालताना बरीच गावे मागे टाकत होतो . अनेक आश्रम , मंदिरे , महावृक्ष ओलांडत पुढे चाललो होतो . नर्मदे काठी असलेले प्राचीन महावृक्ष हे केवळ झाडे नसून त्यांना ऋषीमुनींचा दर्जा दिला जातो . ते जुने तपस्वी आहेत अशी मान्यता असते . असे अनेक तपस्वी या भागात पाहिले ! 
प्राचीन महावृक्ष . मागे खलघाटचा पूल दिसतो आहे
अशा वृक्षा खाली बसल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते . इथे सूक्ष्म रूपाने कोणी ना कोणी तपस्या करत आहे असा भास होतो . इथली स्पंदने वेगळी असतात . 
या भागात शिवलिंगे भरपूर सापडत होती . चांगली चांगली शिवलिंगे सापडायची . परंतु ती सोबत घेतली की पाठीवर ओझे व्हायचे . त्यामुळे मी ती पोटातल्या कप्प्यात ठेवायचो . आणि पुढे जो कुठला आश्रम येईल तिथे एखाद्या झाडाखाली किंवा देवळात ठेवून द्यायचो . जेणेकरून जाणारा येणारा एखादा भक्त भाविक ग्रामस्थ ते उचलेल आणि घरी घेऊन जाईल . कधी कधी कोणाच्यातरी हातात ते देऊन टाकायचो . देण्यातला आनंद फार मोठा आहे . आपण तो कधी घेतला नसेल तर एकदा घेऊन पहा ! जे सर्वोत्तम आहे ते देऊन टाकायचे ! सर्वोच्च प्रतीचा आनंद मिळालाच पाहिजे ! असो . सहस्त्रधारेचा आवाज तीन किलोमीटर पर्यंत ऐकू यायचा ! थंडीचे दिवस असतील आणि निरव शांतता असेल तर कधी कधी नऊ दहा किलोमीटर पर्यंत तो आवाज पोहोचायचा ! म्हणून तर नर्मदेला रेवा म्हणतात . तिचा रवा ऐकू येतो म्हणून ती रेवा . मी अजूनही तिच्या आवाजाच्या टप्प्यामध्ये होतो . हळूहळू समोर तीन पूल दिसू लागले . खलघाटचे हे पूल आहेत . मुंबई इंदोर राष्ट्रीय महामार्ग येथून जातो . या पुला पूर्वी खल बुजुर्ग नावाचे गाव आहे . इथे नम्मदुस नावाचे रिसॉर्ट लागते .रिसॉर्ट चा परिसर खूप मोठा आहे . मी अर्थातच बाहेरूनच मार्गक्रमणा केली . पुढे साटक नावाची नदी आडवी येते . नदीचे पात्र खूप मोठे आहे . ती पार करून साटकेश्वर महादेवाच्या मंदिरात गेलो . 
साटकेश्वर महादेव
सटकेश्वर महादेवाच्या शेजारील मारुती . मारुतीची ही सर्व रुपे समर्थ स्थापित मारुती सारखी दिसतात .
खलघाट चे पुल मोठे आहेत त्यामुळे लक्षात राहतात .
इथून इंदोर साधारण ९० - ९२ किलोमीटर आहे . पुलाच्या वर जायची गरज पडत नाही . खालूनच निघता येते . 
नर्मदा मातेमधील नावांचा आकार आता हळूहळू मोठा होऊ लागला होता . इथे पाणी खोल आणि पात्राची रुंदी जास्त असल्यामुळे नाव मजबूत आणि मोठी असणे आवश्यक होते . 
इथे नर्मदेच्या मध्यभागी एक दगडी स्तंभ आहे . याच्या आजूबाजूला वाळूचा बेट बाजार टापू तयार झाला आहे . खलघाटच्या पुलावरून पाहिल्यावर हा आकार भारताच्या नकाशासारखा दिसतो .अर्थातच परिक्रमावासीना हे दृश्य पाहायला मिळत नाही . परंतु वाचकांसाठी संग्रहित चित्र सोबत जोडत आहे
इथे काठावरून चालताना कठीण असे काही ओढे पार केल्यावर एक राम मंदिर लागले . मंदिरामध्ये स्थानिक ग्रामस्थ खूप सेवा करत होते . एक साधु महाराज तिथे राहत होते . म्हणजे त्यांचा वेश साधूसारखा होता . परंतु अजून ते पूर्णपणे साधू बनले नसावेत असे मला वाटले . कारण त्यांनी संपूर्ण दाढी आणि केस कलप लावून काळे केले होते ! साधूला हे सर्व करण्याची गरज नाही ! तसेच जटा देखील वाढलेल्या नव्हत्या. 
कलप लावलेला कुठलाही मनुष्य दिसला की मला भिडे गुरुजींचा तो श्लोक आठवतो .

केले जरी कलप लावून केस काळे ।
 तारुण्य त्यातुनी कधी तरी का उफाळे ॥
फसवून पूर्ण जगतास ,आणि स्वतःस ।
लाभेल का कधी कुणा गत यौवनांश ॥
असो .
त्यांच्याशी गप्पा मारल्यावर असे लक्षात आले की ते आयुष्यामध्ये थोडेसे दुःखी देखील होते .  किंवा मी असे म्हणेन की पूर्णपणे सुखी नव्हते . परंतु परिक्रमावासींची सेवा मात्र ते मनोभावे करत यात काही शंकाच नाही . इथे प्रजापती पिता पुत्र पुन्हा एकदा मला भेटले . मी चहा आणि पोहे खाऊन पुढे निघालो होतो . परंतु प्रजापती पिता-पुत्र आल्यावर त्यांनी मला थांबवून घेतले आणि आमच्या सोबत जेऊन पुढे जा असे सांगितले .दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी उत्तम असे जेवण बनवून आम्हाला जेवायला वाढले . या भागाची काही छायाचित्रे आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे . 
खलघाट येथील राम जानकी मंदिर
सडक मार्गाने येणाऱ्या परिक्रमावसंना हे महाद्वार लागते . ( मी मात्र अतिशय कठीण गटारवजा असलेला ओढा ओलांडून आश्रमात चढून वर आलो . )
मंदिरातील हनुमान जी
इथून समोरच भारताचा तो आकार नर्मदा पात्रात उठलेला आहे . इथे एक स्तंभ उभा केलेला आहे
 हेच राम मंदिराचे महंत
मंदिराचे आवार मोठे आहे .बाबांना भेटायला भक्त मंडळी येत असतात . इथे सतत काहीतरी पूजापाठ चालू असते .
मी पोहोचलो तेव्हा सुद्धा एका कुटुंबाची काहीतरी पूजा चालली होती . त्या पूजेसाठी आलेल्या काही तरुणांनी माझे फोटो काढले . आणि माझ्याकडे फोन नाही कळल्यावर मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी ते पाठवून दिले . 
राम जानकी मंदिर खलघाट येथे प्रस्तुत लेखक .मागे दिसणारे भारताच्या आकाराचे बेट आणि स्तंभ .

हीच ती जागा जिथे फोटो काढले आहेत . इथे उभी असलेली सवत्स धेनू . 

मागे खलघाट चे मुंबई इंदोर महामार्ग पूल दिसत आहेत . 


मध्यंतरी महाराष्ट्र एसटी मंडळाची एक बस अपघात ग्रस्त झाली होती पहा , ती याच पुलावरून खाली पडली होती . 


मध्ये जो जाड खांब दिसतो आहे त्याच्याखाली दगडांचे एक वर्तुळ आहे , तिथे ती पडली होती . 


परिक्रमा वासींचे फोटो आणि परिक्रमावासीं सोबत फोटो काढण्याचा आनंद नर्मदा काठावर अनेक जण घेत असतात . त्याचा लाभ मला या लिखाणाला अधिक आकर्षक  व स्वीकारार्ह बनविण्यासाठी निश्चितपणे होतो आहे ! या फोटोत तुम्हाला माझे वजन बऱ्यापैकी कमी झालेले लक्षात येईल .

राजेश प्रजापती आणि तनय यांच्याकडे मोबाईल फोन होता . त्यामुळे त्याने देखील माझ्यासोबत सेल्फी काढून घेतला . तो अलीकडे परिक्रमा झाल्यावर मला मिळाला .
विशाखापट्टणम इथून परिक्रमेसाठी आलेले राजेश प्रजापती आणि तनय प्रजापती . सध्या राजेश दिल्लीला असतो . तनयचे वाराणसी येथे शिक्षण चालू आहे . प्रस्तुत लेखकाचा दंड साधू लोकांना का आवडायचा ते तुम्हाला या चित्रातला दंड पाहिल्यावर लक्षात येईल !
आश्रमातील महंतांनी जाताना आश्रमाचा शिक्का वहीत मारून दिला .


 तपोभूमी प्राचीन श्रीराम मंदिर नर्मदा तट
महंत खल बुजुर्ग श्री श्री 1008 श्री बालक दास जी महाराज , अध्यक्ष , षट दर्शन रेवा मंडल खरगोन , मध्य प्रदेश
हा दिवस होता ९ मार्च २०२२ चा . परिक्रमेतील ६६ वा दिवस !रस्ता मार्गाने चालणारे परिक्रमावासी सुमारे दोन तास उशिरा येथे पोहोचले . निघताना सर्वजण मला सांगायचे की रस्त्याने अंतर कमी पडते . परंतु दर मुक्कामी हे सिद्ध व्हायचे की काठाने चालणारा लवकर पोहोचतो ! इथून पूल ओलांडल्याबरोबर आळंदी मधील वारकरी मंडळींकडून चालवला जाणारा एक आश्रम आहे . इथे मी थांबलो नाही . परंतु परिक्रमा झाल्यावर मध्यंतरी खलघाटचा पूल गाडीने ओलांडताना या आश्रमामध्ये आवर्जून थांबलो होतो . तेव्हा परिक्रमावासींचे दर्शन देखील झाले ! खूप आनंद वाटला होता ! त्या वेळचे फोटो टाकत आहे . हे फोटो २०२३ च्या मार्गशीर्ष महिन्यात काढलेले आहेत . 

अलीकडच्या काळात पुन्हा खलघाटच्या काठावर जाऊन नर्मदा तटाचे अवलोकन करताना प्रस्तुत लेखक (डावीकडील ). सोबत मित्र . मागे नर्मदा मैयाचे विस्तीर्ण पात्र .
याच काठावरून ९ मार्च२०२२ रोजी चालत गेलो होतो ! ३० नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेले चित्र !
खाली जोग महाराज आश्रम दिसतो आहे . हा फोटो पाहिल्यावर काठावरचा रस्ता कसा आहे त्याचा अंदाज येईल .
मैयाचे विस्तीर्ण पात्र !नर्मदे हर !
अथांग नर्मदा मैया
जोग महाराज आश्रमाचा घाट . इथून पुन्हा किनारा पकडला 
पुढे खल टाका किंवा टाका खल गाव लागते . इथे रामाचे मंदिर आणि शिवमंदिर आहे . एक छोटा आश्रम सुद्धा आहे . हे सर्व पाहत पुढे निघालो . 

 खल टाक्याचा खडकाळ किनारा

पाणी चढत उतरत असल्यामुळे किनारा गाळाने भरलेला आहे . चालताना जपून चालावे लागते .

अशी मोठी झाडे दिसली की तिथे शक्यतो एखादा आश्रम असतोच
किनाऱ्याने चालत चालत चिंचली गाव गाठले . इथे एक खूपच खोल नाला आडवा आल्यामुळे नाईलाजास्तव व गावात जावे लागले . 
आडवा आलेला नाला पार करणे किती कठीण आहे पहा !

वाटेतील हनुमान जी
गावामध्ये उत्खननात जुन्या वस्तीचे अवशेष मिळाले होते . इथे देव नाला होता त्याचे दर्शन घेऊन गावातून पुन्हा एकदा नर्मदेचा काठ पकडला . कठीण अशा रस्त्याने काठाकाठाने चालताना डावीकडच्या झाडीमध्ये अचानक मंदिर दिसू लागले  .हे एक पुरातन शिवालय होतं . आणि याचं नाव मनकामनेश्वर असं होतं .इथे भंडारा सुरू होता त्यामुळे मांडव वगैरे घातलेला होता . गावकऱ्यांनी मोठ्या आदराने मला एका खोलीमध्ये नेऊन बसवले . आणि भोजन प्रसाद जागेवर आणून दिला . मंदिर अतिशय सुंदर होते . आजूबाजूला गर्द झाडी होती . परिसरातील नागरिकांची उत्सवामुळे गर्दी झालेली होती . या मंदिरातील शिवलिंग थेट ममलेश्वरासारखे किंवा अमलेश्वरासारखे होते . साक्षात प्रति रूपच ! 
मनकामनेश्वर मंदिरापर्यंत जाताना नर्मदा मातेच्या अगदी काठाने चालताना प्रचंड झाडी लागते . वरवर पाहता मार्ग नसेल असे वाटते . परंतु एका पावलाची पायवाट सर्वत्र आहे . अशा झाडीतून थोडे जपून चालावे इतकेच . मी जपून चालण्यापेक्षा नाम जपून चालायचो ! आणि कठीण टापू सहज पार होऊन जायचा !
श्री मनकामनेश्वराचे सुरेख मंदिर
मंदिराचा परिसर अतिशय शांत आहे
श्री अमलेश्वराची प्रतिकृती असलेल्या श्री मनकामनेश्वराचे दर्शन घेतल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात असा लोकांचा विश्वास आहे .
या धर्मशाळेमध्ये बसवून भोजन प्रसाद दिला गेला 
इथून पुढे नर्मदा मैया अतिशय सुंदर असे एक वळण घेते . वळताना तिच्यामध्ये एक बेट तयार होते . या बेटावर परिक्रमावासी जाऊ शकत नाहीत . परंतु इथे असलेले प्राचीन शिवालय प्रसिद्ध आहे . 
एखादी उभी रेष मारल्यासारखे हे बेट नर्मदेच्या उदरामध्ये निर्माण झालेले असून त्याच्या टोकावर बिल्वामृतेश्वर महादेवाचे मंदिर आहे . बाकी बेटावर घनदाट झाडी आहे .
मनकामनेश्वर मंदिरापासून ग्यारहलिंगी आश्रमा पर्यंत जाण्याचा किनारा मार्ग बऱ्यापैकी खडतर आहे हे नकाशा पाहिल्यावर लक्षात येईलच .
आपल्या अस्थि देऊन पृथ्वी वाचवणारे दधीची महामुनी इथे रहायचे . ही त्यांची तपस्थळी असून इथे त्यांची व त्यांच्या पत्नीची समाधी देखील आहे .
 श्री बिल्वामृतेश्वर महादेव मंदीर
 दधीचि ऋषी पूजित श्री बिल्वामृतेश्वर महादेव
मंदिर घनघोर जंगलाच्या मधोमध आहे
कितीही मोठा पूर आला तरी मंदिर जलमग्न होत नाही
दधीचि ऋषींनी वज्र बनविण्यासाठी आपली हाडे याच बेटावर दान केली होती . अज्ञातवासाच्या काळात पांडव देखील या बेटावर राहिलेले आहेत . त्यामुळेच धर्माराजावरून समोरच्या गावाला धर्मपुरी नाव पडलेले आहे .या बेटावर दत्तात्रेय आणि नर्मदा माता यांची देखील मंदिरे आहेत . परिक्रमेदरम्यान या बेटावर जाता येत नसले तरी हे एक पवित्र तीर्थस्थान मानले जाते म्हणून त्याची अधिक माहिती दिली .असो .पुन्हा आपल्या काठावर येऊयात .
या भागामध्ये नर्मदेच्या काठावर दगड गोटे खूप सापडतात . त्यांच्यावरून चालताना पायाला खूप आराम मिळतो . विशेषतः प्रत्येक पाऊल वेगळ्या वेगळ्या भागातील गुळगुळीत टोकदार दगडांवर टेकवले की तळ पायांना चांगला ॲक्युप्रेशर मसाज होतो . अशा गुळगुळीत दगडांच्या साठ्याची चालताना पावले उत्सुकतेने वाट बघत असत . अशा भागातून पाच-दहा मिनिटे चालले तरी पायांचा दिवसभराचा थकवा निघून जायचा . 
अशा मध्यम आकाराच्या दगडांवरून चालायला खूप बरे वाटते
वरील दोन्ही छायाचित्रांमध्ये डावीकडील दगड गोटे पाहावेत स्वच्छ नर्मदा जल पहावे आणि उजव्या हाताचे बिल्वामृतेश्वराचे बेट पहावे .
 कठोरा गावाचा घाट
यानंतर कठोरा गावाचा छोटासा घाट लागला . गावाकडे न जाता तसाच सरळ गेलो . इथे दोन-तीन केवट चहा पीत बसले होते .त्यांनी मला छोट्या कागदी कपात गार झालेला चहा पाजला . आणि पुढे ग्यारहलिंगी नावाचे स्थान असून तिथे साधूंसाठी आश्रम असल्याचे मला सांगितले . जिथे नर्मदा माई डावीकडे वळत होती त्या ठिकाणी खोल पात्राच्या आत मध्ये ११ स्वयंभू शिवलिंगे आहेत त्यामुळे या स्थानाला ग्यारहलिंगी असे नाव पडले आहे असे मला त्यांनी सांगितले . इथे समोर धर्मपुरी नावाचे गाव होते . इथे अर्थात समोरच्या तटावर कुब्जा नावाची नदी नर्मदेला येऊन मिळत होती .हिलाच खुजनदी असे सुद्धा नाव असल्यामुळे अलीकडच्या काठावर खुजावा गाव होते . इथे दक्षिण तटावर दोन देवनाले नर्मदार्पण होत होते .या अकरा शिवलिंगांपैकी अकरावे लिंग ओंकारेश्वराचा मोठा भाऊ मानले जाई . त्यामुळे हे स्थान अतिशय पवित्र होते . समोरच्या तटावरून नावेने या बेटावर येणाऱ्या लोकांची सतत वर्दळ दिसायची . काठाकाठाने चालत मी ग्यारहलिंगी आश्रम शोधू लागलो . उंच एका टेकाडावर झेंडा दिसला म्हणून वर गेलो . डावीकडे एक जुनी पुराणी इमारत होती . उजवीकडे एक  बैठा आश्रम दिसला . दोन्हीकडून मला नर्मदे हर चा पुकारा झाला . बालकदास महाराज या नावाने दोन साधू दोन वेगळेवेगळे आश्रम येथे चालवीत होते . मी आधी जुन्या इमारतीमध्ये गेलो . 
साधु महाराज बसले होते ती आश्रमाची इमारत .

एक प्रचंड जटाभार वाढलेले साधू अंधाऱ्या खोलीमध्ये गांजा पीत बसले होते . इमारतीच्या भिंती मजबूत असल्या तरी छप्पर फाटके तुटके होते . त्यातून आत येणाऱ्या प्रकाश रेखा गांजाच्या धुराने अधिक ठळक होत होत्या . " नर्मदे हर ! भोले बाबा की प्रशादी पाओगे ? " साधूने करड्या आवाजात प्रश्न केला . भोले बाबाचा प्रसाद म्हणजे गांजा पिणे . " नही बाबा । हम नही पाते ।" मी नम्रपणे साधूला सांगितले . त्याच्या आजूबाजूला चार-पाच भगत मंडळी "प्रसाद भक्षण " करण्यासाठी बसली होती . त्यातल्या एकाला चहा बनवण्याचा आदेश साधूने दिला . थोडासा निरीच्छेनेच तो उठला आणि अंगणामध्ये चहा बनवायला गेला .
याच ठिकाणी साधू बाबांनी मला उपदेश केला .

 साधू बहुतेक बराच वेळ गांजा ओढत असावा . त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली होती . एका खोल भावावस्थेमध्ये जाऊन तो माझ्याशी बोलत होता . साधू जीवनामध्ये जो काही पक्का उपदेश त्याने आत्मसात केलेला आहे तेवढाच अशाप्रसंगी आठवतो . बाकी सर्व विसरायला होते . तो मला जीवनातील अतिशय मूलभूत अशी काही तत्वे फार चांगल्या भाषेत सांगू लागला .
" देख बेटा । तू नर्मदा माई की परिक्रमा कर रहा है । मतलब तुझे पता है ,जीवन मे क्या करना है । और क्या नही करना । फिर भी याद रख । दुनिया गई भाड मे । तेरे मरने के बाद कोई तेरा नही , तू किसी का नही । दुनिया से उतनाही लगाव रखना , जितना खाने में नमक होता है । दुनियादारी करेगा तो ये भी जिंदगी बेकार की मौत मरेगा । " भगतरामने हातात चहा आणून दिला .
 (कृत्रिम प्रज्ञेने तयार केलेले काल्पनिक चित्र )
साधू बोलताना त्याची नजर धुनीवर स्थिर होती . डोळे लालबुंद झाले होते . परंतु आवाजात जरब कायम होती . " तेरा आज का दिन आखरी दिन है । " साधूने असे म्हटल्यावर माझा चहाचा कप जागेवरच थांबला . "कल तू मरने वाला है । " मी आजूबाजूच्या भगत लोकांकडे पाहू लागलो . सर्वजण खदाखदा हसू लागले . साधू म्हणाला "फट गई ना xx ? " मी हातातला कप खाली ठेवून हात जोडून बसलो . "पिले पिले । चाय पिले । ऐसी चाय पी , की मानो जिंदगी की आखरी चाय पी रहा है । ऐसी जिंदगी जी , की मानो जिंदगी का आखरी दिन चल रहा हो ! " साधूने बोलता-बोलता मला आयुष्यातील अतिशय मोलाचा उपदेश देऊन टाकला ! आणि स्वतः त्या गांजाचा एक असा झुरका मारला की जणूकाही हा त्याच्या जीवनातील शेवटचा झुरका असावा ! आणि साधारण पाच ते सहा फूट लांब बसलेल्या माझ्या अंगावर त्याने जोरात धूर फुंकला . त्या धुराने एक क्षणभर मला पूर्णपणे व्यापले . आजूबाजूचे दृश्य अदृश्य झाले . "भागो बाबाजी । तुम्हारा काम हो गया । दादाजी ने फूक मारी । अब दुनिया तुम्हारी नही मारेगी । " एक सीनियर भगत गांजाच्या नशेत बरळला . मी साधूला नमस्कार करून त्या खोलीतून बाहेर आलो . समोरच्या आश्रमामध्ये गेलो . इथे एका झाडाखाली सर्व संसार थाटलेला होता . 
या चित्रात जुना आश्रम दिसतो आहे .मी इथेच पारावर झोपणार होतो पण एका भगतरामने सांगितले की समोरच्या आश्रमात कुत्रा आहे तिथे झोपावे . म्हणजे बिबट्याचे भय नाही .
एका झाडाखाली कट्टा बांधून तिथे इथल्या साधूने त्याचे सर्व देव बसविले होते आणि धुना देखील स्थापन केला होता . हे महाराज देखील नित्य भोले बाबाचा प्रसाद सेवन करायचे . यांनी इथे कमांडो नावाचा एक काळा पांढरा चपळ कुत्रा पाळला होता . तेवढा एकच प्राणी तिथे शुद्धीमध्ये होता ! बाकी सर्वच माणसे एका पेक्षा एक विचित्र वाटत होती . विशेषतः मी जिथे आसन लावले होते , त्या कट्ट्याच्या समोर एका झाडाखाली अजून एका तांत्रिकाने आसन लावले होते . चित्रपटांमध्ये कवटी आणि हाडे वगैरे घेऊन बसलेली भयावह तांत्रिक माणसे दाखवायची पद्धत आहे पहा . हा मनुष्य अगदी तसाच होता .काळा कुळकुळीत रंग , कुरळे लांब केस , मजबूत बांधा ,कमरेला काळे वस्त्र , हातात गळ्यात अनेक प्रकारच्या माळा , लाल भडक डोळे अशा अवतारातला हा तांत्रिक होता . त्याच्यासमोर त्याने मानवी कवटी ठेवली होती . हातामध्ये मांडीचे हाड ( जे लांबीला सर्वात जास्त असते ) घेऊन त्या कवटीवर ते आपटत हा मंत्र म्हणायचा . याने तिथे आल्यापासून मला त्रास द्यायला सुरुवात केली . मला म्हणायचा , " चेला , जाव , पानी लेके आओ । " आता कोणाला पाण्याला नाही म्हणू नये अशी आपली संस्कृती आहे . त्यामुळे मी त्याला एकदा पाणी आणून दिले .नंतर याचे नखरेच सुरू झाले . मी त्या माणसाच्या प्रत्येक क्रियेचे निरीक्षण करत होतो . अतिशय तामसी प्रवृत्तीचा तो जीव होता . थोड्यावेळाने त्याला भेटायला गावातील गांजाडे आले . सगळे मिळून गांजा ओढत बसले .तेव्हा सुद्धा याने मला एक दोन कामे सांगितली . मी फारसे आढेवेढे न घेता ती केली देखील . परंतु याने मला चेला म्हणणे मला काही पटले नाही .सर्वच जण गांजा पीत असल्यामुळे कोणाला भुकेची जाणीव होत नव्हती . त्यात मला असे लक्षात आले की हा तांत्रिक त्याच्या मोबाईलवर ऑनलाइन मटका खेळत होता . चला भेटायला आलेले गांजाडे शिष्य सुद्धा त्याच्याकडून आकडे घेत होते . कुठून इथे आलो असे मला झाले . परंतु परिक्रमेच्या नियमानुसार एकदा लावलेले आसन बदलता येत नाही . अशी देखील एखादी रात्र असू शकते इतकाच धडा नर्मदा मैया मला देत होती . नाही म्हणायला तिचे अतिशय सुंदर असे दर्शन मात्र समोर होत होते .समोरच्या बेटावरील महादेवाचे मंदिर पुसटसे दिसत होते . मला या माणसाची भीती वाटत नव्हती परंतु आत्यंतिक घृणा मात्र येऊ लागली होती . या माणसाच्या हिंदीवर सांगली कोल्हापूरकडच्या मराठीचा संस्कार वाटला ! म्हणून तो फार बोलायला लागल्यावर मी एक-दोन अस्सल कोल्हापुरी सुभाषिते कमांडो कुत्र्याला ऐकवली . तो मराठी असल्याचे लपवित होता . पण मी तो मराठी असल्याचे ओळखले आहे असे वाटल्यावर मात्र तो माझ्याशी बोलायचा बंद झाला . रात्री अकराच्या सुमाराला साधू महाराजांना आठवण झाली की मी उपाशी आहे . त्यांनी एक-दोन भगताना कामाला लावून आमटी पोळी करून मला खाऊ घातली . तिथले वातावरण अतिशय नकारात्मक असल्यामुळे इथून कधी एकदा निघून जातो असे मला झाले होते . आपण रात्री मला जाग आली . तेव्हा माझ्यासमोर असलेल्या झाडापाशी बसून ती मानवी कवटी झाडामध्ये खोचून या तांत्रिकाची काहीतरी अघोरी साधना चालू झाली . या पूर्ण काळामध्ये माझे ऐकणारी एकमेव व्यक्ती तिथे होती ती म्हणजे कमांडो कुत्रा ! तो पूर्णवेळ माझ्या पाया पाशीच बसला होता .हा कुत्रा अथवा नर्मदा खंडातील भाषेत भैरव आश्चर्यकारक रित्या अतिशय स्वच्छ होता . घरी सांभाळलेला , आंघोळ घातला जाणारा , पेडिग्री खाणारा कुत्रा जितका स्वच्छ असतो तितका हा स्वच्छ होता . त्यामुळे रात्री तो माझ्या अंथरुणातच झोपला . आणि मी देखील त्याला झोपू दिला . त्याला सुद्धा खूप दिवसांनी एखादा शुद्धीवरचा चांगला माणूस मिळाल्यासारखे वाटत होते . या भागात फारसे परिक्रमा वासी मुक्कामाला येत नाहीत असे माझ्या लक्षात आले . कारण हे मैयाचे वळण आहे . आणि इथे पारंपारिक प्रशस्त रस्ता नाही . काटे कुटे यांनी भरलेला कठीण मार्ग आहे . 
या भागातील काठावरचा चालण्याचा मार्ग कसा आहे हे लक्षात यावे म्हणून काही फोटो सोबत जोडत आहे .
बाभळीची प्रचंड बेटे सर्वत्र माजलेली आहेत . याच्यातून मार्ग काढत पुढे चालावे लागते . 
किनाऱ्याचा मार्ग हा असा असल्यामुळे बहुतांश परिक्रमावासी या मार्गाने जात नाहीत . परंतु "सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियले नाही बहुमता । " या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे काठाकाठाने मार्गक्रमणा सुरु ठेवली .
मी झोपलो होतो तिथून समोरचे बेट ,त्याच्या वरील बिल्वामृतेश्वर मंदिराकडे जाणारा घाटमार्ग असे सर्व दिसत होते .
मध्यप्रदेश काँग्रेसचे सर्वेसर्वा दिग्विजयसिंहजी त्यांच्या पायी परिक्रमे दरम्यान या आश्रमामध्ये आवर्जून येऊन गेल्याचे आता गुगल नकाशा पाहिल्यावर कळले .
उद्या सकाळी उठल्यावर तुला चहा आणि बालभोग करून देतो असे सांगून साधू झोपी गेला . मी रात्रभर विचारात पडलो . इथून कधी एकदा निघून जातो असे मला झाले होते . त्यामुळे सकाळी चहा बालभोग वगैरे ची वाट न बघता लवकर निघून जायचे मी ठरवले . मला पहाटे उठून मी सर्व गुपचूप आवरून घेतले . आणि उजाडायच्या आधीच अंधारातच धूम ठोकली ! पटापटा उतरून किनार्‍यापाशी आलो . आणि वेगाने पुढे पुढे पळू लागलो . इतक्यात माझ्या असे लक्षात आले की दोन खोल ओढे मला आडवे आलेले आहेत .मागचा पुढचा अधिक विचार न करता मी अंधारातच त्या ओढ्यामध्ये उतरून ते पार केले . छातीपर्यंत पाण्याने भिजून गेलो . या परिसरामध्ये पायवाट नावाचा प्रकार नव्हताच . झाडीमध्ये खाली वाकून घुसावे लागायचे . ग्यारहलिंगीच्या त्या आश्रमातून माझी सुटका झाली असे मला वाटले खरे . परंतु मी न सांगता निघून गेलेले त्या साधूच्या उशिरा लक्षात आलेले असेल . आणि त्याने माझ्या नावाने नक्की बोटे मोडलेली असणार याची प्रचितीच मला त्यादिवशी आली ! त्यादिवशी मला मैयाने आश्रमात देऊ केलेल्या अन्नाचा अव्हेर केल्याबद्दल लक्षात राहील अशी शिक्षा दिली !  मैया है वह । सब जानती है !



लेखांक शहात्तर समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर