लेखांक ७५ : शालीवाहन ,नावडा टोडी , भव्य सहस्रधारा अन ढालखेडा
जसा खरगोन जिल्हा सुरू झाला तसे पाण्यातील मोटर्सचे प्रमाण वाढले . इथे ५० -१०० अशा समूहाने मोठ्या मोठ्या अश्वशक्तीच्या मोटर्स लावलेले असायच्या . त्यासाठी तोफे सारखे गाडे बनवलेले असायचे . इथून चालताना फार काळजी घ्यावी लागायची .मोटर साठी जोडलेल्या विद्युत तारा बरेचदा उघड्या असायच्या . त्यांचा चिखलाला स्पर्श झाला की जमिनीमध्ये विद्युत प्रवाह उतरायचा . अतिशय सावधपणे हा टापू पार करावा लागायचा . खाली माजलेला चिखल चुकविण्यासाठी मोटर मधून येणारे मोठे मोठे पाण्याचे नळे तुडवत चालावे लागायचे . त्याच्यावरून पाय सटकण्याची भीती असायची . त्यामुळे समोर मोटर दिसल्या की अंगावर काटाच यायचा !
इथे तशी काठावर फारशी शेती नव्हती . परंतु आत मध्ये लांब लांब पर्यंत शेतात नर्मदेचे पाणी नेले जायचे . त्यामुळे मोटर्स ची संख्या जास्त होती . शिवाय इथे नर्मदेची पाणी पातळी कमी जास्त होत असल्यामुळे मोटर खूप लांब ठेवलेल्या असायच्या .या भागात वाळू उपसा देखील फारसा कुठे नव्हता . खडकाळ प्रदेश होता . मध्ये एका पुलावर पाकोळ्यांची अक्षरशः हजारो घरटी दिसली होती . त्यांच्या आवाजाने मैयाचा काठ दुमदुमला होता . पाण्याच्या मोटर्समुळे माजलेला चिखल या पाकोळ्यांसाठी घर बनवण्याचा उत्तम कच्चामाल ठरत होता . त्याचे गोळे बनवून त्या न्यायच्या आणि ते लाळेत मिसळत चिकटवून घरटी बांधायच्या .
नराने अर्धे घरटे बांधले की मादी येऊन पाहणी करते . तिला घरटे आवडले तर संसार थाटला जातो आणि घरटे पूर्ण होते . अन्यथा अर्धवट सोडले जाते . बिचाऱ्या पाकोळ्यांना सुद्धा हा कर्मभोग चुकलेला नाही !
वाटेमध्ये लाखो टिटव्या पाहिल्या होत्या परंतु तिचे घरटे मात्र सहजा सहजी सापडत नाही . आज मात्र अचानक एक घरटे सापडले . अगदी दगड धोंड्या मध्ये तीन अंडी घातलेली होती . नीट पाहिले नाही तर सापडले सुद्धा नसते . टिटवी तुम्हाला घरट्यापासून दूर नेण्यात वाकबगार असते . तुमच्या अगदी जवळ येऊन तुम्ही आता तिला पकडणार अशी भावना तुमच्या मनात ती निर्माण करते . आणि पळवत पळवत तुम्हाला दूर घेऊन जाते . किंवा सरळ उडत येऊन तुमच्यावर हल्ला करते . घरट्याचे काही काळ निरीक्षण करून मी पुढे निघालो . परिसराशी उत्तम तादात्म्य पावणारी टिटवीची अंडी .
इंग्रजीमध्ये याला कॅमोफ्लाज म्हणतात .
मागील लेखांक
पुढील लेखांक
आज काठाने चालताना खूप आनंद येत होता . काल झालेल्या पावसामुळे सर्वत्र सुखद गारवा होता . भरपूर अंतर चालल्यावर उजव्या हाताला महेश्वर चा घाट दिसू लागला ! माझ्यामते हा जगातील कुठल्याही नदीवरील सर्वात सुंदर घाट आहे !मला त्याचे दर्शन आयुष्यात प्रथमच घडत होते ! डावीकडे एक अतिशय आलिशान हॉटेल बांधलेले आहे . हॉटेल आराम बाग माहेश्मती असे त्याचे नाव आहे .मी आत मध्ये गेलो कारण आधी मला वाटले की हा कुठला तरी आश्रम दिसतो आहे . परंतु ते एक तारांकित हॉटेल आहे कळल्यावर मी पुन्हा काठावर आलो . इथून महेश्वर घाटाचे सुंदर दर्शन होते .
बाहुबली चित्रपटात माहिष्मती हे नाव सर्वांनी ऐकले असेल . प्रत्यक्षात महेश्वर नगरीचे हे प्राचीन नाव आहे .
इथे परिक्रमावासींची सेवा केली जात नाही . परंतु कुणाला पर्यटना निमित्त जायचे असेल तर माहिती असावे म्हणून हॉटेलची माहिती दिली . असो . इथून लगेच पुढे गेल्यावर शालिवाहन घाट लागतो . शाली म्हणजे घोडा . शालिवाहन म्हणजे घोडेस्वारी जाणणारा राजा . आपल्या देशावर शक कुशाण हूण अशा अनेकांनी बाहेरून येऊन राज्य केलेले आहे . आपण जे शालीवाहन शक पाळतो तो शक-कुळातला असा पहिला राजा होता ज्याच्याकडे घोडदळ होते . त्यामुळे आपण त्याला शालीवाहन शक म्हणू लागलो . मात्र हे लोक आपल्या संस्कृतीशी तादात्म्य पावले व अन्य काही लोक अजूनही स्वतःचे वेगळेपण जपून आहेत इतकाच फरक आहे . इथे एक अतिशय सुंदर असे शिवमंदीर होते . मंदिराला दोन मंडप होते . नंदी मंडपा मधला नंदी अतिशय सुंदर होता . मंदिर पुरातन होते . मंदिराच्या कट्ट्यावर बसल्यावर महेश्वर घाट अतिशय सुंदर दिसायचा . मी बराच काळ तिथे बसून होतो . अतिशय शांतता संपूर्ण परिसरामध्ये व्यापून उरलेली होती .
मंदिराच्या मागे मोठे मैदान होते व त्याच्यापुढे परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी बांधलेला एक आश्रम होता . इथून मला आवाज दिल्यावर मी तिकडे गेलो . अंधाऱ्या खोली मध्ये आसन लावले . सेवाधारी साधूने मस्तपैकी फोडणीचा भात खायला घातला . माझ्या अपेक्षेप्रमाणे तो मराठीच निघाला ! परंतु मराठी मध्ये बोलत नसे .
इथे देखील मोटारींचे जंजाळ आहेच ! मोटर्स त्याच्या वायर्स आणि पाणी नेणारे नळे यांचे जाळे पहा .इथल्या नावा शिकारासारख्या केलेल्या दिसतात .
महेश्वर घाट डोळ्याचे पारणे फेडणारा आहे ! पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची समाधी देखील आपल्याला इथून दर्शन देते . या महान साध्वीचे उपकार आपल्या कातड्याचे जोडे करून तिला घातले तरी फिटणार नाहीत .
क्षणभर विश्रांती घेतली आणि झोळी उचलली . इथून पुढे थोडेसे चालल्यावर नावडाटोडीचा घाट लागतो . नावडा टोडी हे नावाड्यांची टोळी असे सुचित करणारे नाव आहे . संपूर्ण नर्मदा खंडामध्ये जेवढे म्हणून केवट आहेत , नावाडी आहेत त्या सर्वांचे एक वार्षिक संमेलन या गावामध्ये भरते . गंमत म्हणजे त्या संमेलनासाठी बहुतांश नावाडी आपापल्या नावा घेऊन येतात . केवट लोकांचे हे सर्वात महत्त्वाचे संमेलन आहे . अनेक महत्त्वाचे निर्णय इथे घेतले जातात . इथे मला एक केवट भेटला ज्याने माझी चौकशी करून काही फोटो देखील काढले . मी सांगितलेल्या क्रमांकावर त्यांने ते फोटो पाठवून दिले .
इथून महेश्वर कडे पाहताना मध्ये एका बेटावर महादेवाचे मंदिर दिसते . हे बाणेश्वराचे मंदिर आहे . याचे वैशिष्ट्य असे आहे की हे पात्राच्या मधोमध आहे . त्यामुळे परिक्रमा वासी इथे जाऊ शकत नाहीत . परंतु आजपर्यंत हजारो पूर झेलून देखील हे मंदिर एकही दगड न हलता उभे आहे ! यावरून भारतीय स्थापत्यशास्त्र किती उच्च कोटीचे होते याचा अंदाज जगाला येतो ! वर्षातील बहुतांश काळ हे मंदिर जलमग्न असते .
अत्युत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना ,श्री बाणेश्वर महादेव
धरणातून पाणी सोडले की मंदिराच्या पातळीला पाणी येते . पाणी उतरले की असे असते . मंदिराच्या चबुतऱ्याचा एक दगड देखील पाण्यामुळे हललेला नाही .वास्तुविशारदांनी या मंदिराचा अवश्य अभ्यास करावा .
बाणेश्वराच्या या दर्शनी भागाने नर्मदेचे किती पूर , महापूर पाहिले असतील याचे गणित लावता येणे कठीण आहे .
बाणेश्वर मंदिरातून दिसणारा शालिवाहन घाट .
पुण्यातील बाणेर गावात देखील बाणेश्वराचे शिवलिंग आहे . इथे एका नैसर्गिक गुहेमध्ये हे शिवलिंग आहे . नर्मदे काठी सापडणाऱ्या शिवलिंगांना सर्वसाधारणपणे बाण असे म्हणायची पद्धत आहे . धनुष्यबाण या शब्दा मधील बाणाशी याचा काही संबंध नाही . तर भेडाघाट जवळ नर्मदेला बाण नावाची एक नदी येऊन मिळते . ही सर्वाधिक गुळगुळीत गोटे नर्मदेला आणून वाहते . म्हणून नर्मदेतील गोट्यांना बाण म्हणायची पद्धत पडली आहे . रमेश जाधव सारखे तज्ञ लोक हा गोटा नर्मदेतील आहे का बाण नदीचा आहे हे ओळखू शकतात . असाच बाण नदीतला एखादा सुबक शिवलिंगाचा आकार सापडला की त्याला बाणेश्वर असे नाव दिले जाते . बाकीचे नर्मदेश्वर असतात . असो .
इथून पुढे काठाने चालल्यावर नर्मदेची नितांत सुंदर सहस्त्रधारा लागते .इथे नर्मदेचे पात्र अक्षरशः हजारो धारांमध्ये विभागले गेलेले आहे . हा संपूर्ण खडकाळ टापू आहे . इथे नुकतीच कयाकिंग ची स्पर्धा होऊन गेली होती . खेलो इंडिया अंतर्गत इथे कयाक स्पर्धेचे अर्थात एकल नौकानयन स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते . या काठावरून त्या काठावर ताणून केबल बांधल्या होत्या . त्याला लाल पांढरे चट्टे पट्टे असलेल्या काठ्या लटकवल्या होत्या . या काठ्यांना स्पर्श करत प्रवास करायचा असतो . पाण्याचा प्रवाह भयंकर होता . त्यामुळे ही स्पर्धा खरोखरीच खूप साहसी लोकांसाठीच आहे . मुख्यत्वे करून केवट समाजातील तरुण याच्यामध्ये जास्त भाग घेतात . त्यांना जन्मतःच पाण्याची भीती नसते . तसेच पाणी कुठे खोल आहे कुठे उथळ आहे याचा त्यांना जन्मजात अंदाज असतो . मी इथे बराच वेळ बसलो . सहस्त्रधारेचा विराट आवाज सर्वत्र दुमदुमत होता . इथे नर्मदेच्या मध्ये एक बेट तयार झालेले असून त्याच्या चहुबाजूने नर्मदा वाहते . तिच्या अनेक शाखा इथे दिसतात . त्या विविध दिशांना वाहतात . ही शाखा तर चक्क उलटी फिरुन पुन्हा नर्मदेला येऊन मिळताना दिसते . नर्मदेच्या मध्येच तिचाच एक प्रवाह पुन्हा उलट दिशेला वाहताना कसा दिसत असेल कल्पना करून पहा !
वरील चित्रात केशरी रंगाने दाखवलेली धारा नर्मदेच्या उलट दिशेला वाहताना दिसते . नर्मदा रिव्हर राफ्टिंग पॉईंट लिहिले आहे त्याचे चित्रे खाली देत आहे .म्हणजे तुम्हाला भौगोलिक स्थानाचा अंदाज येईल .
इथे मला एक अतिशय सुंदर बाण सापडला . या नैसर्गिक बाणावर कैलास पर्वतासारखा आकार उठलेला होता . तसेच ॐ आकार देखील यावर दिसत होता .
इथे मला अजून एक अर्धनारी नटेश्वर सापडला . ज्याच्यावर गणपतीच्या मुखाचा आकार नैसर्गिकरित्या उठला होता आणि गळ्यात हार घातल्यासारखा भास होत होता .
दिव्य सहस्त्रधारेचे समोरच्या तटावरून काढलेले चित्र .
कयाकिंग अथवा रोईंगच्या स्पर्धेसाठी सहस्त्रधारेमध्ये लावलेले मार्कर्स . हाच तो 'रिव्हर राफ्टिंग पॉईंट ' .
आपली कयाक नौका घेऊन मार्कर हिट करताना खेळाडू . कार्बन फायबर पासून बनविलेल्या अशा नौका समोरच्या महेश्वर घाटावर खूप दिसतात . तिथे यांचा एक क्लबच आहे . समोरच्या तटावर गेल्यावर आपण तो पाहणार आहोत .
कार्तवीर्यार्जुन या सहस्त्र बाहू राजाने आपल्या हजार बाहुंनी नर्मदा इथे अडवली होती . म्हणून ती शतखंडित झाली असे मानले जाते . परशुरामाने इथेच त्याला मारले . त्यामुळे त्याची समाधी महेश्वर घाटावर आहे . असो .
इथे एक अद्भुत दृश्य मला पाहायला मिळाले . मध्ये तयार झालेल्या बेटावर भरपूर गवत आहे . ते खाण्यासाठी या काठावरची गुरे तिकडे जातात . जाण्यासाठी कुठलाही मार्ग नसल्यामुळे पोहत जातात . आणि पोहतच परत येतात . ही गुरे परत कशी येतात ते मी तिथे थांबून पाहिले . साधारण पन्नासेक गुरे होती . मी वरती उल्लेख केला त्याप्रमाणे नर्मदा मैया चा एक उलटा प्रवाह तिथे वहातो .त्या प्रवाहातून ती पोहत आली आणि मूळ धारेला लागली . शंभर दीडशे मीटर रुंदीचे पात्र पार करायला त्यांना सुमारे पाचशे मीटर पोहावे लागले ! पुढे एके ठिकाणी सर्व गुरे काठाला लागली ! त्यांच्या मागोमाग गुराख्याने देखील पाण्यात उडी मारली . तो देखील एका गायीची शेपटी धरून काठाला लागला . परंतु त्या सर्व गुरांची ती चिकाटी पाहून मला खूप कौतुक वाटले . फक्त देशी गाय बैलच हा पराक्रम करू शकतात असे मला त्या गुराख्याने नंतर गप्पा मारताना सांगितले . त्याच्याकडून मी ही सर्व प्रक्रिया समजून घेतली . गेली अनेक वर्षे त्यांचा हा उपक्रम नित्य चालू आहे . विशेष म्हणजे छोटी वासरे देखील पोहत होती . रावेरखेडीनंतर इथे मी गुरे पोहताना पाहिली . तिथे पाणी तुलनेने संथ होते . येथे मात्र भयानक वेगाचा प्रवाह आहे . खोली सुद्धा खूप आहे . मध्ये अध्ये चित्रविचित्र खडक आहेत . ते सर्व धोके टाळून जनावरे पोहत होती . गुरांना शाबासकी देऊन पुढे निघालो . परंतु इथे स्नान करण्याचा मोह होऊ लागला . सहस्रधारा म्हणजे धुवाधारचीच भव्य प्रतिकृती . इतक्या धारा होत्या की मन मोहून गेले . खडकातून वाहणारी स्वच्छ मैय्या ! यथेच्छ स्नान केले ! अतिशय स्वच्छ आणि थंडगार पाणी होते ! काळा कुळकळीत चमकदार खडक पायांना अल्हाददायक होता . पाणी अतिशय खोल होते . परिसर निवांत , निर्मनुष्य होता .
इथे ढालखेडा नावाचे एक गाव लागले . गावामध्ये नर्मदेच्या काठावरच अन्नपूर्णा मातेचे मंदिर आहे . मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले . इथे गावातील काही तरुण गप्पा मारत बसले होते . त्यांनी मला सांगितले की पुढे एक नवीन परिक्रमावासी सेवा क्षेत्र निर्माण झाले आहे तिथे मी जावे . तिथे रामायण कथा देखील सुरू होती .
अन्नपूर्णा माता मंदिरासमोरील नर्मदातट
अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेतल्यावर गावातील रस्ता पकडला आणि परिक्रमावासी सेवाक्षेत्रपाशी आलो . एका ओसाड माळाच्या खाली एका झाडाखाली हा आश्रम बांधला होता . नुकतेच बांधकाम झाले होते आणि रामायण कथेने आश्रम सुरू करण्यात आला होता . गावातून भरभरून कन्या गोळा करून भोजनासाठी घेऊन जाणारे टेम्पो मी पाहिले . जाताना सर्व कन्या नर्मदे हर आवाज देत होत्या ! त्यांच्या मागोमाग आश्रमावर पोहोचलो . एक मराठी साधू आश्रम चालवीत होता . हाच तो ढालखेडा आश्रम
या आश्रमामध्ये मला खूप लोक भेटले . विशाखापट्टणम येथून परिक्रमेला निघालेले पिता-पुत्र राजेश प्रजापती आणि तनय इथे मुक्कामी थांबले होते . त्यांच्यासोबत दोन नागा साधू होते . एक अतिशय तरुण होता आणि एक वयस्कर होते . पैकी वयस्कर साधूला कुठेतरी पाहिले आहे असे सारखे मला वाटत होते . तरुण साधू खूप विनोदी स्वभावाचा होता . अतिशय बारीक अंगयष्टी असलेला तो साधू अतिशय चपळ विद्वान आणि हुशार होता . विशेषतः हिंदी भाषेवर त्याचे फारच चांगले प्रभुत्व होते . इथे अजून एक कानफाट्या गोसावी आला होता . याने याच वर्षी संन्यास घेतला होता . त्याचे वय साधारण १८ ते २० वर्षे असावे . तब्येत मजबूत होती . म्हातारा नागा साधू त्याची सारखी खेचत होता . त्यामुळे तो मुलगा वैतागला होता . आता विषय निघालाच आहे तर प्रजापती पिता-पुत्रांविषयी थोडेसे सांगतो . राजेश प्रजापति हा कॉर्पोरेट मनुष्य होता . मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला प्रजापती नोकरी निमित्त विशाखापट्टणम मध्ये स्थिरस्थावर झाला होता . एच एस बी सी नावाच्या बँकेत एका मोठ्या ग्लोबल कम्प्लायन्स युनिटचा तो प्रमुख होता . प्रचंड पगार होता . घरात सर्व सुख सुविधा होत्या . दारू-मटण-पार्ट्या यात आयुष्य मजेत चालले होते . नर्मदा हा शब्द देखील त्याला महिन्याभरापूर्वी माहिती नव्हता . परंतु कुठेतरी आत मध्ये असे जाणवत होते की आपल्याला काहीतरी कमी पडते आहे . ते नक्की काय कमी पडते आहे हे त्याला कळत नव्हते .म्हणून एक दिवस बसल्या बसल्या युट्युब वर तो व्हिडिओ चाळत होता . अचानक नर्मदा परिक्रमा या विषयावरचा एक व्हिडिओ त्याच्या पाहण्यात आला . स्वतः राजेश प्रजापती सांगतात त्याप्रमाणे त्यांना नर्मदा हे नाव देखील माहिती नव्हते . परंतु त्या व्हिडिओने त्यांना वेड लावले . यानंतर नर्मदा परिक्रमा या विषयावरती त्याने संशोधन चालू केले .आणि हळूहळू लक्षात येऊ लागले की हीच एक गोष्ट करायची राहिलेली आहे .आणि हीच गोष्ट आयुष्यातला परमोच्च आनंद मिळवून देणार आहे ! अपेक्षेप्रमाणे घरी पत्नीकडून विरोध झाला . मुलाला कोण सांभाळणार ? पगार पाण्याचे काय वगैरे वगैरे . राजेशने निर्णय घेतला की मुलाला म्हणजे तनयला घेऊन परिक्रमा करायची .आणि
पैसा प्रॉपर्टी चा प्रश्न येऊ नये म्हणून आपली सर्व प्रॉपर्टी त्यांनी विकून टाकली . त्याचे पैसे पत्नीच्या हातात टेकवले आणि तिला माहेरी पाठवून दोघांनी घर सोडले ! किती मोठा निर्णय आहे पहा ! हा घेता येणे सोपे नाही ! राहिला प्रश्न तनयच्या शिक्षणाचा तर तो नर्मदा मातेने कसा सोडवला याचा मी स्वतः साक्षीदार आहे ! तनयची मातृभाषा भोजपुरी . घरी बोलायचे हिंदी . बाहेर चालायचे तेलुगु . आणि शाळेत शिकायचं इंग्रजी . यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झालेली ! त्यातल्या त्यात इंग्रजी वगळता अन्य भाषा त्याला फारशा लिहिता वाचता बोलता येत नव्हत्या. परंतु माझ्यासमोर त्या तरुण साधूने तनयला तुलसी रामायण वाचायला शिकवले . त्या साधूला तुलसी रामायण पाठ होते . अक्षर ओळख माझ्यासमोर ढालखेडा अक्षरांमध्ये करून दिली . पुढे बराच काळ मला हे लोक भेटत राहिले . आणि तनय किती गतीने रामायण वाचायला शिकला आणि त्याचा अर्थ देखील सांगायला शिकला हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे . तीनच दिवसात तो हिंदी वाचायला शिकला . हिंदी म्हणजे आजचे हिंदी नव्हे , तर जुने हिंदी अथवा अवधी अशी ती भाषा आहे . परंतु तनय त्या भाषेमध्ये तरबेज झाला ! घरी राहून शाळेत जाऊन हे सर्व शिकायला तीन वर्षे आरामात जातील ! गुरुकुल पद्धतीचे शिक्षण श्रेष्ठ कसे व का आहे हे मी स्वतः येथे अनुभवले . राजेश आणि तनय यांच्यामध्ये अतिशय सुंदर असा सुखसंवाद व्हायचा . तनय या साधूं सोबत शास्त्र चर्चा करायचा . आधुनिक तर्कशास्त्र अधिष्ठित पद्धतीने शिकलेला असल्यामुळे त्याला शंका कुशंका फार होत्या . कधी कधी त्याची उत्तरे देताना साधूंची भंबेरी उडायची ! त्यांचा हा वादविवाद पाहायला मला फार मजा यायची ! ढालखेडा आश्रमामध्ये तर म्हातारा नागा साधू त्याच्यावर इतका उखडला होता की त्याला शाप द्यायला निघाला होता ! तरुण साधूने झडप घालून त्याला शांत केले ! एकंदरीत सर्व प्रकार मजेशीर होता ! तनय परिक्रमेमध्ये जे काही शिकेल ते बाहेर कुठेही शिकणे शक्यच नाही ! तेरा वर्षे असे त्याचे वय होते . इंग्रजीमध्ये twelve नंतर thirteen येते.इथून पुढे Nineteen पर्यंत प्रत्येक आकड्याच्या स्पेलिंगच्या अखेरीस teen हे शब्द येत असल्यामुळे पौगंडावस्थेतील मुलांना इंग्रजी मध्ये टीनेजर असे म्हणतात . नेमक्या याच वयात तो योग्य ठिकाणी आला होता . प्रत्येक पाऊल ,प्रत्येक व्यक्ती ,प्रत्येक ठिकाण ,प्रत्येक देवस्थान , प्रत्येक आश्रम ,प्रत्येक धर्मशाळा , प्रत्येक ऋतू ,प्रत्येक दिवस त्याला काही ना काही नवे शिकवून जात होता . त्याच्या प्रगतीचा आलेख मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिला ! अनुभवला ! तसा हा मुलगा गुटगुटीत होता . इंग्रजीमध्ये ज्याला ओबीज़ म्हणतात असा तो होता असे त्याच्या वडिलांनीच मला सांगितले .परंतु परिक्रमेमध्ये त्याची तब्येत देखील सुधारली . दिवसागणिक तो प्रगल्भ होत गेला . त्याला मी प्रेमाने तनु म्हणायचो . त्याला देखील माझा लळा लागला होता कारण त्याला उत्तरे कुठल्या पद्धतीने द्यावीत याचा अंदाज मला होता . शहरी जीवनाचा स्पर्श झालेला तो बालक होता . एकंदरीत हे चौघे सतत शास्त्र चर्चा करत परिक्रमा करीत होते . या चौघां पैकी तिघांचे पुढे एक ठिकाणी छायाचित्र काढले गेले . आपल्यासमोर व्यक्तिरेखा उभ्या राहाव्यात म्हणून इथे देतो आहे .
साधूंच्या कुठल्याही मताशी या दोघांचे काही मतैक्य शेवटपर्यंत झाले नाही ! तिथेच मस्तपैकी पूजा वगैरे आटोपून भोजन केले .इथे रामायणाचा भंडारा घेतला . जमनादास नामक फलटणचा मराठी त्यागी साधू हा आश्रम चालवत असे . ग्रामस्थ आश्रम चालवायला त्याला मदत करत असत . बाबांच्या सात परिक्रमा झालेल्या होत्या . या गावांमध्ये मुख्यत्वे करून राजपूत समाज होता व सर्वजण झटून सेवा करत होते . धर्मपालनाच्या बाबतीत राजपूत लोक अतिशय काटेकोर असतात असे मला जाणवले . मी मगाशी उल्लेख केला तो नागा साधू आणि कानफाट्या गोसावी यांची कुरबुर चालूच होती . गांजा ओढण्यासाठी सर्वजण जेव्हा बसले तेव्हा गांजा मळता येत नाही म्हणून कानफाट्या गोसावी ला नागा साधूने बरेच झापले . कानफाट्या गोसावी अतिशय वैराग्यशील होता . इतक्या थंडीमध्ये देखील त्याने फक्त कमरेला एक बिबट्याचे कातडे असते तशी नक्षी छापलेले कापड गुंडाळले होते . बाकी तो उघडाच होता . माझे त्या नागा साधूकडे सारखे लक्ष लागले होते . त्याला कुठे पाहिले आहे ते मला आठवत नव्हते . त्याचे बोलणे ,त्याचे हसणे ,त्याचा आवाज सर्व परिचित वाटत होते . मी त्याच्याकडे पाहतो आहे हे साधूच्या लक्षात आले . तो मला म्हणाला आप यही सोच रहे हो ना की इस बाबा को पहले कहा देखा है ! मी म्हणालो जी महाराज . साधू मला म्हणाला याद करके देखो मेरे जैसा दिखने वाला कोई आदमी तुमने कही देखा है क्या । मी आठवू लागलो . साधू म्हणाला वैसे मैं किसी को कभी बताता नही । लेकिन तुम कबसे घूर रहे हो इसलिये बता देता हु । मै जनरल व्ही के सिंग का भाई हू । हम छह भाई है । भैय्या पहले फौज में फिर राजनीति मे गये ।और मै साधू बन गया । आता मला सर्व संगती लागली .या दोघांच्या चेहऱ्यात , हसण्यात , बोलण्यात खरोखरच साम्य होते . आता तो खरोखरीच त्यांचा भाऊ होता का नव्हता हे फक्त मैयालाच माहिती . परंतु मला साम्य जाणवले खरे .
या साधूच्या वागण्यात देखील एक प्रकारचा रुबाब , आदब ,करारीपणा होता . आम्ही पुन्हा झोपायच्या ठिकाणी आलो . इथे रात्री बारा वाजेपर्यंत पुन्हा एकदा तनय आणि साधू यांची शास्त्र चर्चा चालली ! रामायण पाठ असलेला साधू आणि मी खूप हसायचो . त्या वादविवादाचा आनंद घेत झोपी गेलो . उघड्यावर झोपताना कुत्र्यांपासून सामान जपावे लागायचे . पादत्राणे , सामान ,पूजा साहित्य ,सोबतचा खाऊ इत्यादी चोरून , फोडून खाणे कुत्र्यांना आवडायचे . सगळेच सामान पांघरूणामध्ये घेऊन आम्ही झोपायचो . सकाळी उठल्यावर कानफाट्या गोसावी या साधूं सोबत चालणार होता . त्याला हळूच बाजूला घेऊन मी नर्मदेच्या काठाने चालण्याचे आणि एकट्याने चालण्याचे महत्त्व समजावून सांगितले . त्याच्या पायामध्ये पादत्राणे नव्हती . हातामध्ये काठी नव्हती . सोबत झोळी नव्हती . फक्त कमरेला गुंडाळलेले व्याघ्र चर्म इतकेच त्याचे सामान होते . त्याला मी तीन महत्त्वाच्या गोष्टी मनावर ठसाविल्या . एक : कधीही गांजा च्या आहारी जाऊ नकोस .
दोन : काठाकाठाने परिक्रमा कर .
तीन : एकट्याने परिक्रमा कर .
तिथून तो जे सुटला तो त्याने थेट काठच गाठला . पुढे मला बराच काळ त्याची पावले काठावर सापडत होती . मातीमध्ये चिखलामध्ये त्याचे पाय उठलेले मला दिसायचे . त्याने शेवटपर्यंत किनारा सोडला नाही याचा मला आनंद वाटला . बलगांव गावामध्ये एक सुंदर आश्रम होता तिथे मी पोहोचलो . मौनी बाबांचा आश्रम असे त्याचे नाव आहे . इथे मोठ्या प्रमाणात गोसेवा चालते .सुमारे ७०० गाई इथे होत्या . आश्रम अतिशय सुंदर असून मोठे आवार ,प्रशस्त परिसर आणि भरपूर झाडी आहे .
इथे अप्रतिम असे चहा पोहे मिळाले . या ठिकाणी एक भगवे कपडे घातलेला तमिळ साधू भेटला . तीन वर्षे तीन महिने तेरा दिवसाची परिक्रमा करताना आश्रम आवडल्यामुळे तो इथे राहिला होता . या संपूर्ण आश्रमात आणि परिसरात कोणालाही तमिळ भाषेचा गंध नव्हता . तसेच याला तमिळ सोडून अन्य कुठलीही भाषा येत नव्हती . त्यामुळे तो बिचारा सुकला होता . मी चेहऱ्यावरून हा मनुष्य तमिळ आहे हे ओळखले . आणि वणक्कम स्वामी असे म्हटल्याबरोबर त्याने आनंदाने उडीच मारली ! मला थोडेफार तमिळ येथे आहे हे पाहून त्याला अतिशय आनंद झाला ! माझ्याशी किती बोलू आणि किती नाही असे त्याला झाले होते ! तो मौनी साधू आहे असा समज सर्वांनी करून घेतला होता ! कारण तो बोलणे टाळायचा . तिरुअण्णामलईचा हा साधू होता .
सदृत्ती स्वामी असे त्याचे नाव होते . याने आधी हा रामेश्वरम चा आहे असे मला सांगितले . परंतु याची भाषा रामेश्वरम सारखी वाटली नाही म्हणून मी पुन्हा एकदा विचारले . मग त्याने तिरुअण्णामलै चे नाव सांगितले .
आपल्याला देखील एक वाईट सवय असते . कोणी गावाचे नाव विचारले की आपण मूळ गावाचे नाव न सांगता जवळच्या मोठ्या गावाचे नाव सांगतो . आपल्याला वाटते की आपल्या मूळ गावाचं नाव कोणाला माहिती नसेल . परंतु ते नाव माहिती करून देण्याची संधी अशा रीतीने आपण गमावत असतो ! आजही आपण गावाचे नाव विचारल्यावर मूळ गावाचे नाव थेट सांगितले पाहिजे असे माझे मत आहे . आता देखील साधूला वाटले की रामेश्वरम सर्वांना माहिती असते . म्हणून त्याने रामेश्वरम सांगितले . परंतु प्रत्यक्षामध्ये या दोन गावात शेकडो किलोमीटर चे अंतर आहे . तसेही छत्रपती शिवाजी महाराजांनी तिरुअण्णामलई येथील अरुणाचलपती देवस्थानचा जीर्णोद्धार केलेला आहे हा इतिहास सर्वांना माहिती आहे . रमण महर्षी देखील याच गावचे होते त्यामुळे या नावानेच प्रसिद्ध आहेत . अरुणाचलपती देवस्थानच्या एका गोपुराला राजा गोपूर असे नाव दिलेले असून त्यातला राजा म्हणजे आपला सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी राजे आहेत ,ही हिंदू माणसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे ! या साधूला मी हा इतिहास सांगितला . त्याला खूप आनंद वाटला . त्याने देखील मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या . तमिळनाडूमध्ये पाच तत्वांना वाहिलेली पाच मंदिर आहेत . भूमी , जल , श्वास , आकाश , अग्नी , अशी तत्वे अनुक्रमे तमिळ लोक मानतात . नीलम् , नीर , काट्र , आकायम् आणि अग्नि अशी या तत्त्वांची तमिळ नावे आहेत . या तत्त्वांची देवस्थाने अनुक्रमे खालील गावात आहेत . कांचीपुरम , तिरुवणैकावल ( तिरुचिरापल्ली जवळ ) , कालश्री ,चिदंबरम ,तिरुअण्णामलै . ही सर्व माहिती मला साधू देत होता . आणि माझ्या वहीमध्ये मी तमिळ मध्ये लिहीत होतो . त्यामुळे त्याला अत्यानंदाचे भरते आले . आधी त्याला वाटले मी माझ्या मातृभाषेत लिहितो आहे . परंतु तमिळ लेखन पाहिले आणि त्याने मला मिठीच मारली ! मला साधू म्हणू लागला की आता तू इथून जाऊ नकोस . आपण इथे राहुयात ! दोघे एकत्र परिक्रमा करू ! परंतु मी नम्रपणे त्याला नकार दिला .
सदृत्तीस्वामीने दिलेली माहिती प्रस्तुत लेखकाने तोडक्या मोडक्या तमिळ भाषेत लिहून घेतली . दुर्दैवाने हाताचा नुकताच अस्थिभंग झालेला असल्यामुळे आणि तो पूर्ण भरून न आल्यामुळे अक्षर सुवाच्य नाही याची कृपया नोंद घ्यावी .तमिळ वगळता मात्र आकडे इत्यादी लिहिण्यासाठी मी जन्मापासून आजपर्यंत मातृभाषेचाच वापर करतो .अर्थात देवनागरी लिपी वापरतो . ती लिपी आपण जपली नाही तर अन्य कोणीही जपणार नाही . आपल्या आईला आपल्या शिवाय अन्य कोणीही सांभाळणार नाही .
तमिळ साधू तेजस्वी होता . तपस्वी होता . तरुण होता सात्विक होता आणि नावाप्रमाणे सदवृत्तीचा होता . आपल्या देशामध्ये अशा लोकांना भाषेची अडचण कधी येत नाही . कोणीही अतिशय प्रेमाने अशा लोकांचा प्रतिपाळ करते . वरील चित्रात मागे नर्मदा माता दिसते आहे पहा . तिथून काठाने मार्ग नाही असे मला सर्वजण सांगत होते . परंतु मला तिथूनच जायचे आहे असे मी निक्षून सांगितले . आणि निघालो . तिथे मार्ग होता . प्रचंड काटे कुटे होते . परंतु एक पाऊल ठेवता येईल एवढा रस्ता सर्वत्र होता . माझ्या आधी गेलेल्या कानफाट्या गोसाव्याच्या पायाचे ठसे पाहत मी चालू लागलो . नर्मदा माता हातात हात धरून सोबत होतीच !
लेखांक पंचाहत्तर समाप्त (क्रमशः )
मागील लेखांक
पुढील लेखांक
सुंदर
उत्तर द्याहटवाएवढ्या लवकर पुढील परिक्रमा करता येईल असे वाटत नव्हते पण आपल्या बरोबर आम्हालाही हे पुण्य लाभते आहे ❤️🙏
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवापुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवा