लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट
ग्वारी घाटाचे महात्म्य तर तुम्हाला सांगितले .नर्मदे काठी भेटलेल्या त्या साधूने मला सांगितले , " इथे दोन चांगले आश्रम आहेत .एक धुनीवाले बाबांचा आश्रम आहे आणि दुसरा झुलेलाल आश्रम आहे . झुलेलाल आश्रमामध्ये गेलास तर तिथे एक साधू आहे . तो तुला सर्व माहिती देईल परिक्रमेची . " हा नर्मदा मातेचा आदेश मानून मी झुलेलाल आश्रमामध्ये गेलो .आश्रम अतिशय सेवाभावी वृत्तीने चालविला जातो आणि इथे नित्य परिक्रमा वासियांची ये जा सुरू असते .मुन्ना नामक एक सेवक , एक अपंग गुरुजी , अजून दोन विमनस्क माणसे आणि दोन बायका असे पाच जण मिळून सर्व डोलारा सांभाळतात .जय झुलेलाल अन्न (क्षेत्र ) , माँ नर्मदा सेवा समिती ,असे शिक्क्यावर असलेले आश्रमाचे नाव आहे .
आश्रमाचे प्रमुख असलेले स्थूल असे एक सिंधी गृहस्थ आहेत ते रोज तिथे न चुकता येतात आणि जातीने सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालतात . इथे भोजन प्रसाद घेण्यासाठी अनेक याचक भटके अनाथ अपंग बाहेर ताटकळत उभे असतात .अगदी घाटावर फिरणाऱ्या गाई सुद्धा या आश्रमाच्या बाहेर येऊन काहीतरी खायला मिळेल याची वाट पाहत उभ्या असतात . कानाला ऐकायला अतिशय विचित्र वाटेल अशा पद्धतीने सिताराम सीताराम असे माईकवर जोरजोरात ओरडत , (होय ओरडत हा शब्द योग्य आहे ) जप सांगितला जात असतो . तो अगदी तीन-चार किलोमीटर पर्यंत स्पष्ट ऐकू जातो .स्वयंपाक होईपर्यंत आणि वाढून होईपर्यंत चांगला तास दीड तास सर्वांकडून सीताराम सीताराम जप करून घेतला जातो .आणि मग सर्वांना भोजन प्रसाद दिला जातो . असो .
आश्रमाचे प्रमुख असलेले स्थूल असे एक सिंधी गृहस्थ आहेत ते रोज तिथे न चुकता येतात आणि जातीने सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालतात . इथे भोजन प्रसाद घेण्यासाठी अनेक याचक भटके अनाथ अपंग बाहेर ताटकळत उभे असतात .अगदी घाटावर फिरणाऱ्या गाई सुद्धा या आश्रमाच्या बाहेर येऊन काहीतरी खायला मिळेल याची वाट पाहत उभ्या असतात . कानाला ऐकायला अतिशय विचित्र वाटेल अशा पद्धतीने सिताराम सीताराम असे माईकवर जोरजोरात ओरडत , (होय ओरडत हा शब्द योग्य आहे ) जप सांगितला जात असतो . तो अगदी तीन-चार किलोमीटर पर्यंत स्पष्ट ऐकू जातो .स्वयंपाक होईपर्यंत आणि वाढून होईपर्यंत चांगला तास दीड तास सर्वांकडून सीताराम सीताराम जप करून घेतला जातो .आणि मग सर्वांना भोजन प्रसाद दिला जातो . असो .
आश्रमामध्ये पाऊल ठेवताच , "ये ये ! बाळ !इकडे ये असा! " असा आश्वासक मराठी आवाज कानावर पडला ! हे पुण्यातील हडपसर येथील एक परिक्रमावासी होते श्री बबनराव पवार !भारत फोर्ज मध्ये आयुष्यभर नोकरी केली होती आणि संघ विचारांचे होते .
पुढील लेखांक
झुलेलाल आश्रमामध्ये भेटलेले अवलिया श्री बबनराव पवार काका
मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना म्हणालो , "तुम्ही कसं ओळखलंत मी मराठी आहे ते ? "पवार काका म्हणाले "७४ दिवस नर्मदा परिक्रमा करून झाल्यावर इतके सुद्धा ओळखता येत नसेल तर काय उपयोग ! " आणि दिलखुलास हसू लागले ! खरे सांगायचे तर मला कडकडून भूक लागली होती !ते देखील काकांनी लगेच ओळखले ! आणि माझ्यासमोर त्यांनी खाऊची पाकिटे टाकली ! शेव फरसाण बिस्किटे इत्यादी जिन्नस होते . परिक्रमे मध्ये कोणीतरी काहीतरी खायला देते आहे हा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे मी संकोच करत घेत नव्हतो आधी ! पण काकांनी सांगितले , " अरे असे लाजलास तर उपाशी राहशील परिक्रमे मध्ये ! जे समोर येईल त्याला नाही म्हणायचे नाही ! गप गिळायचे आणि मोकळे व्हायचे ! हर हर महादेव !" मग काय विचारता ! एका क्षणात तुटून पडलो मी !माझ्या भुकेचा आवाका लक्षात आल्यावर त्यांनी अजून काही पदार्थ खायला दिले ! पवार काकांचा स्वभाव अतिशय दिलखुलास होता . काका अतिशय गप्पीष्ट होते . खाता खाता त्यांचे अनुभव कथन सुरू झाले .मी एखाद्या आसुसलेल्या टीप कागदासारखा एक एक गोष्ट टिपून घेत होतो .ह्या एका परिक्रमावासी कडून मला परिक्रमे विषयी प्रचंड माहिती कळाली . पवार काका आणि सातार पुण्याचे चार-पाच जण गट करून परिक्रमेला निघाले होते .परंतु काकांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे ते गाडीने ५५ किमी पुढे येऊन थांबले होते . जबलपूर मध्ये औषधोपचाराची सोय आहे , ती मागे पुढे कुठे नव्हती . परंतु ७४ दिवस मात्र ते एकदाही गाडीवर बसले नव्हते . त्यामुळे ते निवांत होते आणि त्यांचा पूर्ण वेळ सहवास मला दोन-तीन दिवस लाभला . दोन-तीन दिवस का वाढले ते देखील सांगतो . खाली नदीवर मला साधूने ज्या महात्म्याबद्दल सांगितले होते ते मूळचे नाशिक परिसरातील सदानंद गिरी नावाचे साधू होते जे जनार्दन स्वामींचे शिष्य होत .ते या आश्रमामध्ये एक छोटीशी खोली भाड्याने घेऊन राहत होते . त्यांनी आम्हाला चहा प्यायला वरती बोलवले . माझा एकंदर वेश पाहून मी परिक्रमे मध्ये नाही हे जाणकार लोकांच्या लगेच लक्षात यायचे . एखादा सीआयडी ज्याप्रमाणे एखाद्या गुन्हेगाराची कसून चौकशी करतो त्या पद्धतीने सदानंद गिरी महाराजांनी माझी आगदी कसून चौकशी केली ! मला परिक्रमेपासून परावृत्त करण्याचे देखील प्रयत्न त्यांनी केले ! घरी भांडण करून आला असशील तर आता सर्व शांत झाले असेल , परत जा असा गमतीशीर सल्ला त्यांनी दिला ! यातील विनोदाचा भाग सोडून द्या परंतु प्रत्यक्षामध्ये असे होते की बहुतांश परिक्रमावासी कुठेतरी भांडण करून किंवा काहीतरी घोटाळे करून मग परिक्रमेला येत असतात ! त्यामुळे थोडे दिवस त्या रागाच्या भरात ते चालतात परंतु एकदा परिक्रमेतील काठिण्य पातळीचा अनुभव आला की मात्र घराची आठवण येऊ लागते आणि मग अर्धवट परिक्रमा सोडून ते पळून जातात ! मी माझ्या परिक्रमेमध्ये अशी अनेक उदाहरणे प्रत्यक्ष पाहिली ती पुढे वेळोवेळी सांगेनच ! परंतु माझा निर्धार पक्का आहे हे देखील त्यांच्या अनुभवी तर्कबुद्धीला लगेच कळले ! आणि मग मात्र त्यांनी मला अतिशय पद्धतशीरपणे परिक्रमेचे सर्व नियम समजावून सांगितले ! सुंदर असा चहा पिता पिता परिक्रमेविषयी भरपूर माहिती मी त्या तासाभरात गोळा केली ! तुम्ही पुणेकर प्रश्न फार विचारता ! विचार विचार ! असे म्हणून त्यांनी माझ्या मनातील सर्व शंका दूर केल्या ! मी सोबत काय काय सामान आणले आहे याचा अंदाज घेऊन त्यांनी भिंतीवर लटकवलेली निळ्या रंगाची जीन्स च्या कापडाची एक सॅक मला काढायला लावली .ती झोळी रिकामीच होती . मला म्हणाले ही माझी झोळी तू परिक्रमेला घेऊन जा .
ही झोळी घेऊन मी एक परिक्रमा केलेली आहे आता तू एक करशील ! त्यांनी दिलेला हा आशीर्वाद मी मनापासून स्वीकारला ! खाली आश्रमामध्ये सांगून त्यांनी अजूनही बारीक सारीक पूजेचे साहित्य मला मिळवून दिले . फुलवाती ,तूप ,तेल ,काड्यापेटी , खाली वर टाकायला रंगीत वस्त्र असे बरेचसे सामान आश्रमाने मला दिले . सदानंद बाबा म्हणाले की आज उद्या (१-२) अमावस्या आहे .तीन तारखेला मात्र सोमवार आहे . शुभ दिवस आहे . पूर्वाषाढा नक्षत्र आहे व तुला देखील पूर्व दिशेलाच जायचे आहे त्यामुळे तीच तिथी योग्य ठरेल . मला तर काही कळतच नव्हते . त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीला होकार देत होतो .परंतु परिक्रमा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक परिक्रमावासीला एक प्रमाणपत्र बनवून घ्यावे लागते . एखाद्या स्थानिक नगरसेवकाकडून ते बनवून घेण्याचा सल्ला त्यांनी मला दिला . मी लगेचच बाहेर पडलो . एकाने मला वीस रुपये हातात दिले . फोटो स्टुडिओमध्ये गेलो आणि माझ्याकडे वीस रुपये आहेत आणि मला माझा फोटो काढून हवा आहे असे सांगितल्यावर त्या चुणचुणित मुलीने सहा फोटो वीस रुपयात मला काढून दिले . ते घेऊन मी भाजपच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये गेलो . आणि परिक्रमेचे प्रमाणपत्र त्यांना मागितले .करोना काळातील बौद्धिक लॉकडाऊनचा प्रभाव अजून राजकीय लोकांवर शिल्लक होता त्यामुळे त्यांनी मला परिक्रमा न करण्याचा सल्ला दिला ! मग मी तसाच पुढे काँग्रेसच्या नगरसेवकाच्या कार्यालयात गेलो .कार्यालयात फक्त कार्यकर्ते होते व त्यांनी देखील मला परत घरी जाण्याचा सल्ला आधी दिला होता . परंतु भाजपने मला नकार दिला आहे हे सांगितल्या सांगितल्या मात्र त्यांनी मला पार्षद अर्थात नगरसेवकाच्या घराचा पत्ता समजावून सांगितला ! पार्षद जी चे घर शोधत शोधत मी दारात उभा राहिलो . सौ. प्रिया पटेल ह्या त्या भागातील अर्थात जबलपूर वार्ड क्रमांक आठ , ग्वारी घाट येथील नगरसेविका होत्या . परंतु प्रत्यक्षात त्यांचे पती अश्विनी पटेल हे सर्व कारभार सांभाळत आहेत असे माझ्या लक्षात आले .
त्यांनी माझे अतिशय उत्तम आगत स्वागत केले . यांच्या वडिलांनी पायी परिक्रमा केलेली असल्यामुळे ते देखील माझ्याशी गप्पा मारण्याकरिता बाहेर आले व त्यांनी अतिशय उत्तम आदर सत्कार करून मला गरमागरम चहा , प्रशस्तीपत्रक अर्थात प्रमाणपत्र तर दिलेच परंतु सोबत एक चांगली शाल व पाचशे रुपये दक्षिणा तसेच खूप शुभेच्छा देखील दिल्या !
हा माझ्यासाठी नवीनच अनुभव असल्यामुळे मला त्याचे अप्रूप वाटले परंतु पुढे हळूहळू अशा प्रकारच्या आदरातिथ्याची सवय होत गेली ! काँग्रेस पक्षाचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री दिग्विजय सिंह यांना मध्य प्रदेशचे लोक राजाजी किंवा दिग्गीराजा म्हणून ओळखतात , त्यांनी देखील आपल्या तृतीय धर्मपत्नीसह पायी नर्मदा परिक्रमा केली होती ,असे अश्विनी पटेल यांच्याकडून कळले . या परिक्रमेदरम्यान ते पटेल यांच्या घरी देखील येऊन गेले होते .
मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री दिग्विजय सिंह यांचे नर्मदा परिक्रमेदरम्यान स्वागत करताना पटेल दांपत्य
दिग्विजय सिंह यांच्या विषयीचे असे अनेक किस्से पुढे अनेक गावांमध्ये मला ऐकायला मिळाले व त्यांच्या संदर्भात मला नर्मदेच्या कृपेने एक अनुभव देखील आला तो योग्य वेळी सांगेनच . असो .
प्रमाणपत्र मिळाल्यामुळे माझे महत्त्वाचे काम झाले होते . आता मला कुठल्याही आश्रमामध्ये बिनदिक्कतपणे जाता येणार होते . तसेच प्रत्येक आश्रमामध्ये एक शिक्का ठेवलेला असतो तो आपण आपल्या वहीमध्ये मारून घेणे अपेक्षित असते, ज्यामुळे तुम्ही कुठल्या कुठल्या आश्रमात जाऊन आला याची माहिती तुमच्याकडे राहते .
विविध आश्रमांचे शिक्के अशा पद्धतीने एका पुस्तिकेमध्ये मारून घ्यावे लागतात . साधूंना यातून सवलत असते .
मी परिक्रमा अनवाणी करणार आहे असे सदानंद बाबांना सांगितले .तसेच जमेल तितका काठाने चालण्याची इच्छा आहे हे देखील त्यांना मी सांगितले . परंतु त्यांनी मला काठाने अनवाणी परिक्रमा करण्यातील धोके समजावून सांगितले .नर्मदे काठी करोडो पाण्याचे पंप अर्थात मोटर्स आहेत .त्याच्या पाईपलाईन व विजेच्या वायरी अर्थात तारांची भेंडोळी यांचे अक्षरशः जंजाळ नर्मदेच्या काठी निर्माण झालेले असते .
यातील बऱ्याचशा तारा तुटलेल्या , जोड लावलेल्या असल्यामुळे त्यातून विद्युत प्रवाह थेट जमिनीमध्ये , चिखलामध्ये ,पाण्यामध्ये ,किंवा लोखंडी नळ्यामध्ये वगैरे उतरतो . व याचा विद्युत झटका खाऊन आजपर्यंत अनेक परिक्रमावासी ,ग्रामस्थ , शेतकरी व गुराढोरांनी आपले प्राण गमावले आहेत . नुकतीच भोर तालुक्यामध्ये अशीच दुर्दैवी घटना घडून नीरेकाठचे काही शेतकरी बांधव हकनाक प्राणाला मुकले . हाच अनुभव पुढे मला अनेक साधूंनी सांगितला .मी काठाने आलो आहे हे कळल्या कळल्या सर्वप्रथम साधू हेच विचारत की पायात चप्पल आहे का ? सदानंद बाबा मला म्हणाले की नर्मदा मातेची अशी इच्छा आहे की तू काठाने परिक्रमा करावीस परंतु पायात वाहाणा घालाव्यास . त्यामुळे सोबत मिळालेले पाचशे रुपये घेऊन पवार काका आणि मी जबलपूर मध्ये चपलांचे "शॉपिंग" करू लागलो ! एक कॅनवास चे बूट आणि मोजे मी विकत घेतले . २०० रु झाले . ५०० ते ६०० रुपयांचा बूट त्याने दोनशे रुपयाला दिला . सदानंद गिरी बाबांनी दिलेल्या सॅकच्या अर्थात झोळीच्या चेन खराब झाल्या होत्या . त्या देखील एका मोची अर्थात चांभाराकडून बदलून घेतल्या व सगळे टाके मजबूत करून घेतले . तसेच त्याने मला ज्याच्यावर सुखाने झोपता येईल अशी एक फोमची गादी भेट दिली . मी माझ्याकडे होते नव्हते तेवढे सर्व पैसे त्याला देऊन टाकले . कारण तो फोम खरोखरच खूप चांगल्या दर्जाचा होता . बाहेर त्याची किंमत हजाराच्या पुढेच झाली असती .
रिक्षाच्या सजावटीसाठी म्हणून त्याने तो आणून ठेवला होता . या शीटवर ०.०८ मिमि जाडीचा अल्युमिनियम धातूचा पातळ थर असतो . याची घनता सुमारे १४ किलोग्रॅम प्रति घनमिटर होती . माझ्या गादीचे माप होते ( १० मिमी x ६ फूट x २.५ फूट ) आणि वजन फक्त २०० ग्रॅम ! या गादीने पुढे माझे फारच उत्तम काम केले . संपूर्ण परिक्रमेदरम्यान इतकी सुंदर गादी मला कोणाकडे आढळली नाही .जणू काही खास माझ्या मापाची गादी नर्मदा मैयाने कापून ठेवली होती त्या मोची कडे . पुढे पवार काका आणि मी त्यांना काहीतरी हवे होते ते घेण्याकरिता म्हणून एका मॉलमध्ये शिरलो . दोघांचा वेश गबाळा होता . त्यामुळे मॉल मधील सुरक्षारक्षक आम्हाला बोलवायला आला व हाताला धरून बाहेर काढू लागला . मग मात्र मला खूप राग आला आणि मी अस्खलित इंग्रजी भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली ! कार्पोरेट जगामध्ये हाताखालच्या माणसाला इंग्रजीमध्ये झाडण्याची एक विशिष्ट पद्धत आहे . ती मी माझ्या एक्स कलीग्स अर्थात माजी सहकर्मचाऱ्यांकडून चांगली आत्मसात केलेली आहे . मी इंग्रजीमध्ये बोलतो आहे हे पाहता क्षणी स्टोअर मॅनेजर तिथे आला व माझी क्षमा मागू लागला . त्यामुळे तर माझे डोके अजूनच फिरले ,कारण केवळ मनुष्याचा वेष बघून त्याला बावळट ठरवण्याची जी एक भांडवलशाही मानसिकता आपल्या देशामध्ये पद्धतशीरपणे रुजवली गेली आहे त्याला आपण सर्व भारतीय बळी पडल्याचा हा परिणाम होता . महागडे कपडे खपावेत म्हणून साधे कपडे घालणारी माणसे बावळट असतात असा एक भ्रम पद्धतशीरपणे मार्केटिंग वाल्यांनी , जाहिरातदारांनी गेली अनेक वर्ष पसरविला आहे .त्याची ही कटु फळे .अगदी त्याचप्रमाणे इंग्रजी बोलणारा म्हणजे कोणीतरी फार भारी असा देखील भ्रम पसरविला गेला , ज्याच्यामुळे इंग्रजी भाषेची अनाठायी अनैसर्गिक वाढ आपल्या देशामध्ये झाली . या दोन्ही वरून त्याला चांगले सुनावून तिथून काहीही न घेता आम्ही बाहेर पडलो . दोघांकडेही शून्य रुपये होते . इतक्यात पवार काकांना समोर एके ठिकाणी मिळणारी गरमागरम जिलेबी पाहून जिलेबी खायची इच्छा झाली आणि तत्काळ मला रस्त्यावर पडलेले वीस रुपये सापडले !लगेच दोघांनी जिलेबी खाल्ली !
पुढे पायी जाता जाता पवार काका मला म्हणाले परवा एका बाईने मला पन्नास रुपये दिले . असे ते म्हणतात इतक्यात त्यांच्या शेजारी एक कार येऊन थांबली आणि एका बाईने त्यांना पुन्हा ५० रुपये दिले ! अशी मजा मजा सुरु होती !
आश्रमाकडे परत येताना अजून एक अनुभव आला . रस्त्याच्या कडेला चक्क भिक मागत बसलेल्या एका याचकाने मला पाहून उठून चटकन दहा रुपये माझ्या हातावर टेकवले . मला संकोच वाटला परंतु तो म्हणाला ," आपको यह रखना ही पडेगा ।लक्ष्मी को मना नही करते । " .एका भिकाऱ्यापेक्षा लक्ष्मीची किंमत अधिक कोणाला ठाऊक असणार ! थोडेसे पुढे गेल्या गेल्या एका सदगृहस्थाने गाडी थांबवून माझ्या हातात पाचशे रुपयाची नोट टेकवली , पाया पडला आणि निघून गेला ! मी पवार काकांना म्हणालो , " हे सर्व काय सुरू आहे ?मला हे पैसे नको आहेत . " . पवार काका म्हणाले , " मग दान करून टाक . सोपे आहे " मग मी त्या पैशातून चहापत्ती ,साखर आणि दूध घेतले व ते सदानंद बाबांना दिले .
असे गमतीशीर अनुभव घेत आम्ही फिरत होतो . काकांच्या पायाला नक्की काय दुखापत झाली आहे तेच मला कळत नव्हते कारण इथे सुद्धा ते माझ्यापेक्षा दुप्पट वेगाने चालत होते !आणि त्यांना गाठता गाठता माझी दमछाक होत होती .मला कुठल्याही परिस्थितीमध्ये अमावस्या संपण्याच्या आत क्षौर देखील करून घ्यायचे होते . क्षौर करणे म्हणजे डोक्याचा चमन गोटा करणे . थोडक्यात तुमच्या सर्व जुन्या गोष्टी टाकून एक नवीन सुरुवात करायची ती परंपरा असते . ही परंपरा आपल्या धर्मामध्ये खूप जुनी आहे . त्यामुळे लगबगीने मी ग्वारी घाट गाठला .
लेखांक सहा समाप्त (क्रमशः)
मागील लेखांकपुढील लेखांक
पुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवाDon Vela vachala tari ha maicha sandarbh asle la vrutant punha punha vachava ase vat te ahe.Narmade har💐💐💐💐💐
उत्तर द्याहटवा