लेखांक १३२ : कुआचे बालमुकुंद राठोड अन धर्मीकोटच्या कुंतेश्वर गुप्तलिंगी गायवाल्या बाबांचा अद्भुत अनुभव
धनुष्यबाण हातात घेऊन दिमाखात निघालो ! तुम्ही जशी वस्त्रे घालता तसे आपले वर्तन आपोआप होत असते ! उदाहरणार्थ ऐतिहासिक वस्त्रे धारण केल्यावर तुम्ही आपसूकच रुबाबात चालू लागता ! हातात नुसती काठी किंवा दंड होता तोपर्यंतचे माझे चालणे आणि जेव्हा हातात धनुष्य आला तेव्हाचे चालणे यात उगाचच फरक पडला आहे असे मला वाटून गेले . काल रात्री भेटलेला रवीन् भाऊ उर्फ रौभौ याला भेटायचा शब्द देऊन ठेवला होता त्याप्रमाणे त्याच्या वस्तीमध्ये गेलो . सुदैवाने ती माझ्या जाण्याच्या वाटेतच होती . झोपडी वजा घरे होती . तिथे रस्त्यावरून फिरणाऱ्या एका युवकाला मी रविनचा पत्ता विचारला . कुणीतरी परिक्रमावासी रौ भौ ला हातात धनुष्यबाण घेऊन शोधतो आहे अशी बातमी बघता बघता त्या परिसरात पसरली आणि दहा-पंधरा लोक गोळा झाले . त्यांना असे वाटले की नेहमीप्रमाणे रौभौ ने काहीतरी प्रताप केलेला आहे ! आणि आता हा त्याला मारायला आलेला आहे ! त्याच्या संरक्षणासाठी हे स्थानिक लोक गोळा होत आहेत हे माझ्या लक्षात आले . याला म्हणतात समाज ! नाहीतर आजकाल शहरांमध्ये एखाद्या भागावासात अर्थात फ्लॅटमध्ये घुसून कोणी धुडगुस जरी घातला तरी शेजारच्यांना कळत नाही...