लेखांक १३२ : कुआचे बालमुकुंद राठोड अन धर्मीकोटच्या कुंतेश्वर गुप्तलिंगी गायवाल्या बाबांचा अद्भुत अनुभव
धनुष्यबाण हातात घेऊन दिमाखात निघालो ! तुम्ही जशी वस्त्रे घालता तसे आपले वर्तन आपोआप होत असते ! उदाहरणार्थ ऐतिहासिक वस्त्रे धारण केल्यावर तुम्ही आपसूकच रुबाबात चालू लागता ! हातात नुसती काठी किंवा दंड होता तोपर्यंतचे माझे चालणे आणि जेव्हा हातात धनुष्य आला तेव्हाचे चालणे यात उगाचच फरक पडला आहे असे मला वाटून गेले . काल रात्री भेटलेला रवीन् भाऊ उर्फ रौभौ याला भेटायचा शब्द देऊन ठेवला होता त्याप्रमाणे त्याच्या वस्तीमध्ये गेलो . सुदैवाने ती माझ्या जाण्याच्या वाटेतच होती . झोपडी वजा घरे होती . तिथे रस्त्यावरून फिरणाऱ्या एका युवकाला मी रविनचा पत्ता विचारला . कुणीतरी परिक्रमावासी रौ भौ ला हातात धनुष्यबाण घेऊन शोधतो आहे अशी बातमी बघता बघता त्या परिसरात पसरली आणि दहा-पंधरा लोक गोळा झाले . त्यांना असे वाटले की नेहमीप्रमाणे रौभौ ने काहीतरी प्रताप केलेला आहे ! आणि आता हा त्याला मारायला आलेला आहे ! त्याच्या संरक्षणासाठी हे स्थानिक लोक गोळा होत आहेत हे माझ्या लक्षात आले . याला म्हणतात समाज ! नाहीतर आजकाल शहरांमध्ये एखाद्या भागावासात अर्थात फ्लॅटमध्ये घुसून कोणी धुडगुस जरी घातला तरी शेजारच्यांना कळत नाही ! रवीनचे घर आल्यावर त्याने मला पाहिले आणि येऊन पाया पडला ! मी त्याला मिठी मारल्यावर सगळे शांत झाले ! सगळ्यांनाच चहा देण्याची आज्ञा रौभौ ने सोडली ! तो या भागातील स्थानिक गुंड असावा . काल झालेल्या अनाहूत प्रकाराबद्दल आम्ही काही काळ चर्चा केली . त्याच्या सगळ्या शंकांना मी उत्तरे दिली . आणि मग पुढे निघालो . इथून पुन्हा एकदा नर्मदा मातेचा काठ पकडण्याची माझी इच्छा असल्यामुळे जिथून कोणीच जात नाही असा एक मार्ग मी निवडला . इथून कोणी न जाण्याचे कारण नंतर मला कळले परंतु नर्मदा मातेच्या दर्शनाशिवाय फार काळ चालता येत नाही ही माझी तळमळ रौभौ च्या लक्षात आली आणि त्याने पुढचा सगळा मार्ग व्यवस्थित समजावून सांगितला . मांडव वाले निलेश राठोड यांचे सख्खे काका पुढच्या कुआ गावात राहतात आणि परिक्रमासीयांची सेवा करतात हे मला रवीन् ने सुद्धा सांगितले . दुपारच्या कडकडीत उन्हात मी निघालो होतो . डहीचा बाजार संपवून घराकडे निघालेले लोक माझ्यासोबत चालत होते . इथे गाड्यांचा वापर फार कमी केला जातो . लोक कितीही किलोमीटर पायी चालतात . सोबत त्यांनी नवीन खरेदी केलेली गुरे होती . गरीब बिचारी मुकी जनावरे त्या भर उन्हामध्ये वेगाने चालून थकलेली स्पष्ट दिसत होती .त्यांच्या तोंडातून फेस वाहत होता . परंतु नवीन मालकांना अजून त्यांच्या नव्या साथीदाराबद्दल फारसे प्रेम वाटत नसावे त्यामुळे तसेच उन्हातानात फरफटत गुरांना नेले जात होते . ज्या माणसाला मुक्या जनावराची वेदना कळली त्याला अर्धे अध्यात्म कळले ! वाटेत लोक चहा पाजत होते परंतु त्या भयानक गर्मीमध्ये चहा देखील नकोसा वाटत होता . एका घरामध्ये चहासाठी बोलावले . त्यांच्या दारामध्ये हापसा होता . मी त्याला विनंती केली की एक टब हापशाच्या इथे ठेवावे . त्याने मोठा टब आणला . मी त्यात पाणी भरून ठेवले . वाटेतून जाणारी गुरे ते पाणी आनंदाने पिऊ लागली ! आधी मी हापसत होतो परंतु नंतर गुरे घेऊन जाणारी माणसेच पाणी हापसू लागली आणि तहानलेल्या मुक्या जीवांना पाणी पाजण्याची माझी इच्छा नर्मदा मातेने अशा रीतीने पूर्ण केली ! मी त्या माणसाला सांगितले की दर गुरुवारी तू इथे फक्त एक टब ठेवत जा ! तुला खूप पुण्य मिळेल ! ही कल्पना त्याला देखील आवडली . जे पिंडी ते ब्रह्मांडी हे महा सत्य आहे . अर्थात स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा करीत जावी . रामदास स्वामी म्हणतात
आपणास चिमोटा घेतला । तेणें कासाविस जाला । आपणावरून दुस-याला । राखत जावे ।।
स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा करीत जावी . त्या भर उन्हामध्ये चालून जर माझे शरीर तापते आहे आणि जीव तहानेने व्याकुळ होतो आहे तर माझ्यासोबत चालणारे मुके जनावर देखील तहानलेले असेल ! ही शक्यता गृहीत धरलीच पाहिजे ! ती जेव्हा मुक्त असतात तेव्हा त्यांचा प्रश्न नसतो कारण परमेश्वराने त्यांना अन्न आणि पाणी यांचा शोध घेण्याची उपजत बुद्धी दिलेली आहे . परंतु त्यांच्या गळ्यामध्ये जेव्हा आपण मुसक्या आवळतो तेव्हा मात्र त्यांना काय हवे काय नको ते पाहणे ही आपली जबाबदारी ठरते . इथून पुढे मी निघाल्यावर एक जामदा नावाचे गाव लागले . ते पार करून पुढे गेल्यावर कुवा किंवा कुआ गावात मी आलो . इथे एक मारुत मंदीर आणि शिव मंदिर होते आणि त्या शिव मंदिराच्या समोरच बालमुकुंद राठोड हे निलेश राठोड चे काका गेली सत्तर वर्ष परिक्रमावासींची अविरत सेवा करत होते ! त्यांचे एक दुकान होते . आणि दुकानाच्या मागेच घर होते . मी गेलो तेव्हा मंदिराच्या कट्ट्यावर काही वयस्कर मंडळी गप्पा मारत बसली होती . त्यांनी मला मंदिरामध्ये आसन लावायला सांगितले . पुढे जवळपास कुठलाही आश्रम किंवा मंदिर नसल्यामुळे इथेच रहा असा सुयोग्य सल्ला त्यांनी मला दिला . तशी देखील संध्याकाळ झालेली होतीच . परिक्रमेमध्ये असताना विशेषतः संध्याकाळी तुम्हाला लोक जे काही सांगतात ते अवश्य ऐकले पाहिजे . कारण पुढे काय धोके वाढून ठेवलेले आहेत हे आपल्याला माहिती नसते . स्थानिक लोकांना त्याची चांगली जाणीव असते . त्या ठिकाणी गुगल नकाशावर विश्वास ठेवून वाटचाल करू नये . आजकाल बरेच लोक google नकाशाचा आधार घेऊन परिक्रमा करताना दिसतात म्हणून हे सांगितले . गुगल वर दिसणारा नकाशा हा कित्येक वर्ष जुना असू शकतो . तो काही सतत अद्ययावत केलेला नसतो . उदाहरणार्थ नकाशामध्ये दिसणारे कोरडे ठणठणीत पात्र प्रत्यक्षामध्ये कित्येक फूट खोल पाण्याने भरलेले असू शकते . किंवा तिथे रिकामे दिसणारे शेत प्रत्यक्षामध्ये मोठ्या मोठ्या झाडांनी भरलेले असू शकते . नव्हे नव्हे असतेच !
मी मंदिरामध्ये आसन लावले आणि एका कोपऱ्यामध्ये शांत बसून राहिलो . इथून पुढे धर्मराय हे गाव तीन किलोमीटर होते जिथे धर्मराज युधिष्ठिर यांनी तपश्चर्या केलेली होती . तसेच तिथे त्यांनी फार मोठा यज्ञ देखील केला होता . स्थानिक लोक मला सांगू लागले की इतका मोठा यज्ञ परत कोणालाच करता आलेला नव्हता . फक्त साध्वी उमा भारती या जेव्हा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या तेव्हा त्यांनी ईश्वरचरणदास महाराज यांच्या प्रेरणेने इथे तसलाच भव्य दिव्य यज्ञ केला होता . इथे धर्मीकोट नावाचे धर्म राजाचे स्थान आणि पुढे हिरनफाळ नामक प्रसिद्ध स्मशान घाट बघून पुढे कोटेश्वराकडे जायचे असे नियोजन मी मनातल्या मनात करत होतो . असे नियोजन परिक्रमेमध्ये आपण करायचे नसते हे माहीत असून देखील मन त्याचे काम करत होते . संध्याकाळी आरतीची वेळ झाल्यावर गावातील सर्व महिला आणि लहान मुले मुली मंदिरामध्ये आरतीसाठी आली . हे दृश्य मी संपूर्ण परिक्रमेमध्ये पहिल्यांदाच पाहत होतो . बघता बघता मंदिर गच्च भरून गेले . लहान मुली माझ्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या कारण त्या सर्वांना माझी नर्मदा मैया बघायची होती ! त्या सर्वांना ती खूपच आवडली ! सगळ्या कुमारिकांनी तिला लहान बाळासारखी अंगा खांद्यावर खेळवली ! मी मोजले तर आरतीला लहान मोठ्या ३० मुली आलेल्या होत्या ! हे दृश्य अत्यंत आश्वासक आणि आनंददायक होते ! आज कालच्या काळामध्ये जेव्हा तरुण-तरुणींना स्वतःकडे पाहायला सुद्धा वेळ नाही तेव्हा चक्क देवाच्या आरतीसाठी इतका वेळ कोणीतरी काढत आहे हे पाहून मला फार बरे वाटले . इतके छोटे गाव असून इतकी भक्ती आणि जागृती पाहून मन प्रसन्न झाले . नंतर चौकशी केल्यावर असे कळाले की त्या गावात राहणारे ईश्वर दत्त महाराज नामक एक संत होते त्यांनी गावाला हे वळण लावले होते . गावामध्ये आदिवासी आणि राजपूत क्षत्रिय लोक होते . गेल्या गेल्या दर्शन राठोड यांनी अप्रतिम असे गोड मसाला ताक पाजलेले होतेच .रात्री सुंदर अशी दाल भाटी करून त्याने पोटभर खाऊ घातली . सोबत गूळ होताच . स्वतःचे दुकान असल्यामुळे परिक्रमावासींची सेवा करणे त्यांना थोडेसे सोपे जात असेलही . परंतु तरीदेखील वाटेतील सर्व दुकानदार काही अन्नदान करत नाहीत . त्यामुळे त्यांची ही कृती विशेष अभिनंदनीयच होती .कारण सलग ७० वर्षे अशी सेवा सुरू ठेवणे हे काही येरा गबाळ्याचे काम नव्हे ! रात्री मुक्कामाला मंदिरात झोपू नका तर आमच्या घरी या असे सांगायला एक जण बालमुकुंद राठोड यांच्या घरी आले . मंदिराच्या चौकातच समोर यांचे घर होते . टुमदार दोन तीन मजले बांधलेले होते .
यांचे नाव होते ठाकूर वीरेंद्रसिंह चौहान ! घराच्या वरच्या मजल्यावर मोठीच सभागृह वजा खोली होती . परंतु ती शेकडो किलो गव्हा ने भरलेली होती . त्यामुळे ते मला खाली घरामध्ये आसन लावा म्हणत होते . परंतु परिक्रमे मध्ये परिक्रमावासी ने कधीही कोणाच्या घराच्या आत मध्ये जाऊन आसन लावू नये असा शास्त्र संकेत आहे . त्याला अनेक कारणे आहेत . आणि ती सर्व अत्यंत महत्त्वाची आहेत . मुख्य कारण असे की तुम्ही आपल्या घरादाराचा काही काळापुरता त्याग करून संसारिक मायेचा विसर पडावा म्हणून परिक्रमेला आलेले असता . अशावेळी कोणाच्या घरामध्ये राहिले की पुन्हा एकदा ती माया तुमच्या डोक्यावर स्वार होऊ शकते ! घरातील आई-वडील पती-पत्नी मुलेबाळे पाहून तुम्हाला तुमच्या घरची आठवण येण्याची शक्यता असते . दुसरे कारण म्हणजे तुम्ही जरी परिक्रमेच्या तीव्र वैराग्य वृत्तीमध्ये राहत असाल तरी त्या घरातील सदस्य तितके वैराग्यपूर्ण असतीलच असे नाही . त्यातून देखील काही नवी समस्या उद्भवू नये हा शास्त्रकारांचा स्पष्ट हेतू असावा असे वाटते . तिसरे कारण म्हणजे तुमच्या हातून जर काही चूक झाली तर त्यामुळे तुम्ही बदनाम न होता संपूर्ण नर्मदा परिक्रमा परंपरा बदनाम होत असते . तुम्हाला तिथे नावाने कोणी ओळखतच नसते . एक परिक्रमावासी हीच तुमची खरी ओळख असते . पुरुष परिक्रमा वासीला सुद्धा म्हणूनच लोक आओ मैय्या असे म्हणताना दिसतात . त्यामुळे आपली जबाबदारी शतपटीने वाढते . तुम्ही पर्यटक म्हणून अमेरिकेत फिरायला गेलात तर तुम्ही कसे वागू शकता आणि तुम्ही भारत देशाचे राजदूत म्हणून जर अमेरिकेमध्ये गेलात तर तुम्हाला कसे वागावे लागते अशी कल्पना करून पहा म्हणजे फरक तुमच्या लक्षात येईल . नर्मदा परिक्रमा वासी हा नर्मदा मातेचा जणू राजदूत असतो . परिक्रमावासीचे पाय अंगणाला लागणे म्हणजे नर्मदा मातेचे अंगणामध्ये आगमन होणे असा भाव नर्मदा खंडामधील प्रत्येकाचा असतो . त्यामुळे अंगणापर्यंत अवश्य जावे . गरज पडल्यास ओसरी मध्ये बसावे . खुर्चीवर किंवा तखत अथवा बिछान्यावर बसू नये . आताही वीरेंद्रसिंह ठाकूर यांना मी सांगितले की मी घरामध्ये झोपणार नाही . बंगल्याला गच्ची आहे त्या गच्चीमध्ये झोपू शकतो . त्यांचा चेहरा पडला . गेले सहा महिने कोणी गच्चीमध्ये गेलेलेच नव्हते . कारण वरती जाणाऱ्या जिन्यामध्ये मधोमध मधमाशांचे फार मोठे मोहोळ लागलेले होते . साध दिवा जरी लावला तरी सगळ्या मधमाश्या एकदम उडायच्या . मधमाशा किती भयानक असू शकतात याचा जीवघेणा अनुभव मी पूर्वी घेतलेला आहे . सज्जनगड किल्ल्याला खालून परिक्रमा करूया अशी एकदा इच्छा झाली . गडावर सेवेसाठी राहिलेला बदलापूर येथील सागर रामदासी नावाचा मुलगा होता तो देखील माझ्याबरोबर परिक्रमेसाठी येण्यास तयार झाला . साधारण दोन तासांचे अंतर आहे . धाब्याच्या मारुती पासून आम्ही खाली उतरून चालायला सुरुवात केली . ब्रह्मपिसा नावाचे स्थान आहे त्याच्याबरोबर खाली डोंगरामध्ये एक घळ आहे असे माझ्या लक्षात आले . उन्हाचा तडाखा होता .आणि वणवे लागून गडावरील सर्व गवत जळून गेले होते . फक्त त्या गवताच्या देठाची टोके जमिनीतून वर आलेली होती तेवढी शिल्लक राहिली होती . ती पायाला फार टोचायची . म्हणून क्षणभर घळी मध्ये बसुया असे ठरवले . आत मध्ये एक सुंदर नैसर्गिक पाण्याचे छोटेसे टाके होते ! आनंदाने मी पाणी पिण्यासाठी वाकलो . शेजारी एक मोठा गोल दगड होता . थोड्याच वेळात त्या दगडातून आवाज येऊ लागला . आणि पाहिल्यावर माझ्या असे लक्षात आले की तो गोल दगड बिगड काही नसून आगी गांधिण मधमाश्यांचे प्रचंड मोठे पोळे होते ! एका क्षणात सगळ्या माशा उडाल्या आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला ! मी आणि सागर अक्षरशः पळत सुटलो ! उजवीकडे दगडाचा उंच कडा आणि डावीकडे खोल दरी अशा भूगोलातून आम्ही १०० मीटर स्पर्धा धावतात त्या गतीने धावत होतो ! खाली पडले तरी मृत्यू होता आणि मागे तर साक्षात मृत्यू लागलेला होता ! अशा रीतीने पळत आम्ही संपूर्ण गडाची परिक्रमा केली ! पुढे एक तुटलेला कडा आहे . तिथे आम्ही अचानक वळलो आणि माशा सरळ निघून गेल्या . गवताचे खुंट पायामध्ये घुसून दोघांचे पाय रक्तबंबाळ झाले होते . परंतु या अनाहूत प्रकारामुळे आमची परिक्रमा मात्र केवळ २५ मिनिटांमध्ये आटोपली ! आणि एक नवीन जागतिक उच्चांक प्रस्थापित झाला ! माझे आजही खुले आव्हान आहे की कोणीही २५ मिनिटांमध्ये सज्जनगडाला परिक्रमा करून दाखवावी ! ते केवळ अशक्य आहे ! केवळ मधमाशांच्या जीवघेण्या हल्ल्यामुळे तो पराक्रम शक्य झाला ! त्या प्रसंगामध्ये सागरला दोन माशा वाईट पद्धतीने चावल्या होत्या . आणि मी थोडक्यात बचावलो होतो . परंतु त्या दिवसापासून मनामध्ये मधमाशांचे पोळे दिसले की एक अनामिक भीती बसलेली होती ! परंतु नर्मदा परिक्रमेमध्ये सुद्धा जर तुम्ही तुमच्या जुन्या संस्कारांचे जतन ,संगोपन आणि संवर्धन करणार असाल तर परिक्रमा व्यर्थ आहे असा विचार करून मी त्यांना सांगितले की हरकत नाही मी गच्चीमध्ये जाऊनच झोपेन . आणि शांतपणे कुठलाही आवाज न करता मी गच्चीमध्ये गेलो . मधमाशांना उग्र दर्प , धूर तसेच अचानक आलेला उजेड किंवा मोठा आवाज याचा त्रास होतो हे नेहमी लक्षात ठेवावे . अगदी हातातला दंड देखील मी लपवून नेला . मधमाशांच्या अनेक जाती आहेत त्यातील ही कमी तापट जात होती . गच्ची मध्ये गेल्यावर मी स्वच्छ झाडून गच्ची स्वच्छ केली आणि मधोमध आसन लावून मस्तपैकी आकाशाकडे पाहत झोपलो . या गच्चीमध्ये आसन लावण्याचा अजून एक स्वार्थ होता . इथून दूरवर नर्मदा मातेचे अतिशय सुंदर असे दर्शन होत होते ! याचा अर्थ मी पुन्हा एकदा नर्मदा मातेच्या खूप जवळ आलेलो होतो ! वीरेंद्र दादा रात्री बराच वेळ माझ्याशी गप्पा मारत बसले . नर्मदा खंडामध्ये राहणारे जे जिज्ञासू लोक आहेत ते अशा शेकडो परिक्रमावासींशी ,साधू संतांची गप्पा मारून ,सत्संग करून अत्यंत ज्ञानी आणि विद्वान झालेले आहेत ! तुम्हाला त्यांच्या प्रत्येक वाक्यातून ते जाणवते . त्यामुळे अशा लोकांना काही शिकवण्यापेक्षा त्यांच्याकडून आपण शिकलेले फार उत्तम असते ! बरेचदा एखादा प्रश्न भाबडेपणान विचारून ते तुम्ही नक्की किती पाण्यात आहात त्याची परीक्षा पाहत असतात ! मी वीरेंद्र भाईंकडून परिसरातील समाजकारण ,राजकारण ,अर्थकारण , धर्मकारण याची माहिती घेतली . याबाबतीत माझे मत स्पष्ट आहे . काही साधकांच्या मते परिक्रमेमध्ये आपण नसत्या भानगडी मध्ये पडू नये . परंतु रामदास स्वामी असे सांगतात की
पहिले ते हरि कथा निरूपण । दुसरे ते राजकारण । तिसरे ते सावधपण । सर्व विषयी ॥
चौथा तो अत्यंत साक्षेप । फेडावे नाना आक्षेप ।
अन्याय बहु अथवा अल्प । क्षमा करीत जावे ॥
त्यामुळे आपण आपल्या जीवनापासून धर्मकारण समाजकारण अर्थकारण राजकारण हे वेगळे काढू शकत नसतो .वस्त्राचे जसे उभे आडवे धागे असतात तशी ही वरील सर्व प्रकारच्या धाग्यांची घट्ट वीण आहे ज्याने आपल्या आयुष्य वस्त्र बनते . त्यामुळे यातील एकच काहीतरी पकडून चालणे हे एकांगी ठरेल असे मला वाटते . आपले जीवन समग्र असावे एकांगी नसावे . एकांगी जीवन जगण्याचे तोटे काही विशिष्ट समाज सध्या भोगत आहेत . त्यांना एकांगी जीवन जगायला भाग पाडणारी परिस्थिती किंवा नॅरेटिव्ह काही चतुर परंतु कुटील लोकांनी आधीच उभे करून ठेवलेले होते ! त्याचा हा परिपाक आहे . त्यामुळे आपले समाज वस्त्र हळूहळू जीर्ण शीर्ण होत गेले . विरत गेले . एक एक धागा उसवला की वस्त्र फाटायला वेळ लागत नाही . त्यामुळेच प्रत्येक धाग्याचा मजबुतीने सांभाळ करणे आवश्यक असते . या रात्री एक चमत्कार झाला . वीरेंद्र सिंह यांनी मला संपूर्ण गप्पा मारण्याच्या कालावधीमध्ये सुमारे तीन लिटर थंडगार फ्रिज मधले पाणी पाजले ! मी देखील वेड्यासारखा पाणी पीत गेलो . हे असे का झाले त्याचा उलगडा दुसऱ्या दिवशी झाला . ते पुढे सांगतोच . रात्री अकरा वाजेपर्यंत वीरूभाई आणि मी गप्पा मारत बसलो होतो . त्यांच्या गुरुदेवांचा आश्रम धर्मराय या गावांमध्ये डुबक्षेत्रामध्ये बुडून गेला होता . त्याचा जिर्णोद्धार त्यांनी आरंभला होता . तीन ते चार करोड रुपये खर्च अपेक्षित होता . मला मंदिरे बांधण्याचा थोडासा अनुभव असल्यामुळे माझ्या लक्षात आले की इतका खर्च करण्याची गरज नाही . या क्षेत्रातले तज्ञ असलेले माझे मित्र श्री बाळासाहेब वाल्हेकर तथा भाऊ यांचा फोन क्रमांक पाठ असल्यामुळे मी त्यांचा भाऊंशी संवाद घडवून दिला . त्यातून बरेच खर्च कमी होण्याचे मार्ग त्यांना मिळाले . किमान ४०% तरी बांधकामाचा खर्च कमी होईल अशा संकल्पना आम्ही त्यांना सांगितल्या . योगायोगाने शेलार साहेब म्हणून माझे एक तहसीलदार मित्र आहेत ते देखील वाल्हेकर भाऊंकडे आलेले होते . त्यांच्याशी देखील थोडे बोललो . रात्री आकाशाकडे पाहत छान झोप लागली . आकाश निरीक्षण जे करतात त्यांना प्रकाश प्रदूषण म्हणजे काय हे माहिती आहे . आकाश दर्शन करण्यामध्ये येणारा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे प्रकाश ! आपल्याला ध्वनी प्रदूषण माहिती आहे . वायू प्रदूषण माहिती आहे .जलप्रदूषण माहिती आहे . परंतु प्रकाशाचे देखील प्रदूषण असते हे फक्त अवकाश निरीक्षकांनाच माहिती असते ! ज्यांना आकाशाची ओळख नाही त्यांना सगळेच तारे एकसारखे दिसतात . परंतु ज्यांना आकाशातील तारका समूह , ग्रह , नक्षत्रे ओळखण्याची सवय आहे त्यांना प्रकाशामुळे किती टक्के आकाश झाकोळलेले आहे हे लगेच लक्षात येते . जिथे जवळपास कुठलेही मोठे गाव नाही अशा ठिकाणी फार भरगच्चा आकाश दिसते . कुआ हे एक असे ठिकाण होते की जिथून जवळपास कुठलेही मोठे शहर नव्हते . आणि एका बाजूला संपूर्ण नर्मदा मातेचा जलविस्तार असल्यामुळे आणि त्याच्या पलीकडे जंगल असल्यामुळे प्रकाश प्रदूषण जवळपास नव्हते . आकाश निरीक्षकांसाठी हा परिसर म्हणजे पर्वणी आहे . अर्थात जोपर्यंत शूलपाणीच्या झाडीमध्ये वीज पोहोचत नाही तोपर्यंतच ! सकाळी लवकर उठून अंधारातच सर्व आटोपले . मधमाशांना त्रास होऊ नये म्हणून दिवे लावले नाहीत . वीरू भाईंचे कुटुंबीय खूप धार्मिक होते . तसेच त्यांना सामाजिक कामाची देखील आवड होती . धीरूभाईंनी स्वतः डही मध्ये आयटीआय उभे करण्यासाठी त्यांची दहा एकर जागा दान केलेली होती .
ही अतिशय मोक्याची जागा असूनही त्यांनी एक रुपया सुद्धा न घेता केवळ आदिवासी मुलांचा विकास व्हावा यासाठी जागा दान केलेली होती . या भागात डावी चळवळ पसरवू पाहणारे काही लोक समाजाची वीण उसवण्यासाठी आदिवासी तरुणांना स्थानिक जमीनदार किंवा क्षत्रिय यांच्याविरुद्ध भडकवत असतात . परंतु त्यांना वीरेंद्र भाईंसारखे एखादे उदाहरण समोर दिसत असूनही ते लोकांच्या पुढे मांडायचे नसते . कारण त्यामुळे त्यांचा घट्ट वीण असलेले समाजवस्त्र विदीर्ण करण्याचा हेतू साध्य होत नसतो .दही आयटीआय मधून शिकणाऱ्या ९९ टक्के आदिवासी मुलांना १००% हे माहिती नाही की ही जागा एका क्षत्रीय ठाकूर माणसाने त्यांच्या कल्याणाकरता दान केलेले आहे . जीची किंमत आज कोट्यावधी रुपये आहे . परंतु त्याच मुलांना डाव्यांकडून आम्ही कसे वंचित आहोत आणि आमच्यावर कसा अत्याचार झाला हे मात्र लगेच पटवून दिले जात असते ! पुन्हा एकदा सर्वांना हात जोडून नम्र विनंती करून सांगतो . आपल्या धडावर आपलेच डोके ठेवत चला ! आपला स्वानुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु माना !अगदी सख्या आई-वडिलांनी सांगितलेल्या सुद्धा ऐकीव माहितीवर चटकन विश्वास ठेवू नका ! पूर्वी अफवा फक्त कर्णोपकर्णी पसरत असत . सध्या व्हाट्सअप नावाचा एक नवाच भस्मासुर आलेला आहे . त्याच्यावर अनेक विद्वान आपली मते ठोकून देत असतात . भोळ्या भाबड्या लोकांना तिथे लिहिलेले सगळेच खरे आहे असे वाटत असते .बरं लिहिणारे पुस्तक पंडित इतके हुशार असतात की ते ९०% बरोबर असलेले असेच काहीतरी लिहितात .आणि त्यात बेमालूमपणे दहा टक्के विष मिसळून देतात . आता घेणाऱ्या माणसाकडे यातले विष कुठले आणि अमृत कुठले ही ओळखण्याचा विवेक नसतो . त्यामुळे यांचे फावते . ज्याला आपल्या आयुष्याचे कल्याण करून घ्यायचे आहे त्यांनी एक दीर्घ श्वास घ्यावा आणि व्हाट्सअप उडवून टाकावे ! मी गेली अनेक वर्षे त्याच्याशिवाय सुद्धा जिवंत आहे ! तुम्ही सुद्धा राहाल ! प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे ! असो अधिक विषयांतर नको .
वीरू भाईचे एक काका आहेत . त्यांनी प्रतीक्षा नावाचा एक अतिशय सुरेख बंगला बांधलेला आहे .सगळे कुटुंबीय हनुमानाचे भक्त आहेत त्यामुळे बंगल्यातही त्यांनी सुरेख हनुमंताची मूर्ती स्थापन केलेली आहे . तो बंगला मी काल येताना पाहिलेला होताच . त्यांच्याच मदतीने यांनी कुवा गावात प्रवेश करतानाच एका टेकाडावर देखील भव्य दिव्य असे हनुमंताचे मंदिर बांधलेले होते . मंदिर आणि त्याचा परिसर अतिशय सुंदर होता .
कुआ गावातील हनुमान मंदिराचे प्रवेशद्वार
हनुमान दादा मंदिर
सकाळी जाऊन वीरू भाऊंच्या सोबत मी त्या मंदिराचे दर्शन घेतले .आणि आता मात्र पुढे निघालो . आजचा दिवस वेगळाच ठरणार होता . याची मला कल्पना नव्हती . पहाटेचे सहा-साडेसहा वाजले असावेत . मी झपाझप चालायला सुरुवात केली . एक ओढा ओलांडून पुढे कच्च्या रस्त्याला लागताक्षणी सर्वत्र डोंगर आणि जंगल दिसू लागले . मागची वस्ती मागे पडली आणि आता मी संपूर्णपणे जंगलातून एकटाच चालू लागलो . उजव्या हाताला मोठे मोठे डोंगर होते . रस्ता डावीकडे चालला होता . परंतु हिरणफाळ उजव्या हाताला कुठेतरी आहे असे मला कळाले होते त्यामुळे मी थोडेसे उलटे जावे लागले तरी तिकडेच जाणार होतो . थोडेसे अंतर चाललो आणि मला अचानक एका गोमातेचा हंबरडा ऐकू येऊ लागला .आजूबाजूला सगळे जंगल होते . आणि हंबरडा इतक्या जवळून ऐकू येत होता की जणूकाही ती गोमाता माझ्यापासून शंभर एक मीटर अंतरावर असावी ! गेले अनेक दिवस सकाळ संध्याकाळ विविध गावातील गोमातांचे आवाज ऐकून आता मला त्यांचा आवाज ऐकून त्यांना काय हवे आहे हे ओळखण्याची कला प्राप्त झाली होती . ही गोमाता संकटात आहे असा स्पष्ट संदेश तिच्या ओरडण्यातून देत होती . मी वेगाने त्या आवाजाच्या दिशेने जंगलामध्ये घुसलो . आवाज खूप स्पष्ट आणि जवळून ऐकू येत होता परंतु कितीही चालले तरी दूरवर मला काहीच दिसत नव्हते ! मी जसं जसा पुढे निघालो होतो तसं तसा तो आवाज देखील पुढे पुढे जातोय की काय असे मला वाटू लागले . तो आवाज अतिशय स्पष्ट होता . आणि गोमाता मात्र मला दिसत नव्हती . मला काही हा मायावी प्रकार कळेना . परंतु मी जवळजवळ जाऊ लागलो तसतसा तिचा आवाज अजून तीव्र होऊ लागला एवढे मात्र नक्की . क्षणभर मला असे वाटायचे की उलट फिरावे की काय ? त्यावेळी गोमातेचा आवाज अजून तीव्र व्हायचा ! अखेरीस सुमारे दोन किलोमीटर अंतर तुडवल्यावर एक मोठे जंगल आणि डोंगर पार केल्यावर मला दूरवर एक मंदिर व एक छोटासा आश्रम दिसू लागला . हातामध्ये असलेल्या धनुष्यामुळे आणि पाठीवर ठेवलेल्या बाणांमुळे सोबतचे वजन थोडेसे वाढलेले होते . काठी पेक्षा धनुष्य मोठा असल्यामुळे तो पकडून माझा हात दुखायला सुरुवात झाली होती . मी मंदिराच्या दिशेने धावतच गेलो . गोमातेचा आवाज देखील त्याच दिशेने येत होता . मंदिर एका टेकडीवर होते . त्या टेकडीच्या खाली एक कुपनलिका होती आणि त्यातून ३०० ४०० फूट लांबीचा पाईप बाहेर उपसून ठेवण्यात आलेला होता .तिथे तीन माणसे एका झाडाखाली थकून आडवी पडलेली होती . येताना दोन्ही तिन्ही हनुमंताची दर्शनं घेतलेली असल्यामुळे मी त्यांना नर्मदे हर किंवा रामराम असे न म्हणता चक्क जय हनुमान म्हणालो ! मला पाहताक्षणी तिघेही ताडकन उठले . आणि धावतच येऊन त्या तिघांनी मला साष्टांग नमस्कार घालायला सुरुवात केली ! या अनाहूत प्रकारामुळे मी गडबडलो . मी देखील त्यांच्या पाया पडू लागलो ! परस्परो देवो भव ! ते तिघे म्हणू लागले ! "महाराज की जय हो ! सद्गुरु नाथांचा विजय असो ! गुरुजी म्हणाले तसेच झाले ! गुरुजी जो बोले वैसा ही हुआ ! जय हो गुरुदेव की ! " कोण गुरु ? कोण महाराज ? ते काय म्हणाले मला काहीच कळेना ? मी त्यांना शांत करत विचारले की नक्की काय झाले आहे ? त्यांच्यातला एक जण म्हणाला , "हम बहुत बडे संकट मे है प्रभू । और हमारे गुरुदेव कल रात बोले थे की चिंता मत करना । मेरे प्रभू राम कल आयेंगे और हमे संकट से बाहर निकालेंगे । " माझ्या हातात असलेला धनुष्य पाठीमागे खोचलेले बाण आणि हनुमंताच्या मंदिरामध्ये वीरूभाईंनी कपाळावर लावलेले सुरेख गंध यामुळे त्यांचा असा गैरसमज झाला होता की हाच राम बनून आपल्याला वाचवायला आलेला आहे ! बापरे ! हा तर फारच मोठा " रॉंग नंबर " त्यांच्याकडून लागला होता ! मी त्यांना सांगणार की बाबा रे मी राम नाही इतक्यात नर्मदा मातेने जणू माझे तोंड दाबले आहे असे मला जाणवले . आणि तिने मला गप्प केले . "मी राम नाही " या केवळ तीन शब्दांच्या उच्चारानंतर त्या तिघांचा त्यांच्या गुरुदेवांवर असलेला विश्वास , त्यांच्या गुरुदेवांच्या वचनावर असलेला विश्वास , तसेच माझ्याकडून त्यांना असलेल्या अपेक्षा या सगळ्यांचा चक्काचूर होणार होता ! आणि मारुतीराया ने रामाला दिलेले ऐतिहासीक उत्तर तर आपण जाणताच ! जेव्हा रामरायांनी मारुती रायांना विचारले की तू कोण आहेस आणि मी कोण आहे तेव्हा मारुतीरायांनी सुंदर श्लोक सांगितला होता . ते म्हणतात
देहबुध्या तु दासोहम् जीवबुद्ध्या त्वदंशको | आत्मबुद्ध्या त्वमेवाहम् इति मे निश्चिता मति: ||
देहबुद्धी च्या पातळीवर मी तुमचा दास आहे .जीव भावे पाहू जाता मी तुझा अंश आहे . आत्मबुद्धीने पाहायला गेले तर मात्र तू आणि मी एकच आहोत ! आणि हे मला अगदी निश्चितपणे ठाऊक आहे ! ( असे मारुतींचे वचन आहे) त्यामुळे जास्ती चर्चा न करता
मी त्यांना विचारले कुठे आहेत गुरुदेव ? तिघांनी देखील टेकडीच्या वर असलेल्या मंदिराच्या दिशेने हात केला . मी धावतच टेकडी चढलो आणि आश्रमामध्ये आलो . समोर चार गाई बांधलेल्या होत्या . म्हणजे दोन गायी होत्या आणि एक तरुण वळू होता जो आकाराने लहान होता परंतु अत्यंत सुंदर होता . एक अतिशय मोठा गीर जातीचा वळू होता . एवढा मोठा वळू मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नव्हता ! शेजारी उघड्यावर बाज टाकून एक अगडबंब बाबा आडवे पडलेले होते . मी गेलो आणि पुकारा केला " हर हर महादेव ! क्या सेवा है गुरुदेव ? " मला बघितल्या क्षणी बाबा धडपडत उठले ! बाजे वरून खाली आले आणि त्यांनी मला साष्टांग नमस्कार घातला . माझे दोन्ही पाय त्यांनी घट्ट पकडले . त्यांच्या अश्रुंनी माझ्या पायावर अभिषेक केला ! या अचानक झालेल्या प्रकारामुळे माझ्या देखील अश्रूंचा बांध फुटला . आणि महाराजांना खांद्याला धरून उभे करून मी मिठी मारली . महाराज जोरात ओरडले " आ s s " ! माझ्या लक्षात आले की त्यांना काहीतरी वेदना होते आहे . मी त्यांना खाली बसवले . आणि कमंडलू काढला . त्याच्या झाकणातून त्यांना थंडगार पाणी प्यायला देणार इतक्यात त्यांनी माझा कमण्डलू खसकन् हिसकावून घेतला आणि घटाघटा करत सर्व पाणी त्यांनी पिऊन टाकले ! पाणी पिल्यावर त्यांना जरा हुशारी आली आहे असे मला वाटले . हा सगळा काय प्रकार चालला आहे मला काहीच उलगडत नव्हते . बाबा मला म्हणू लागले ! , "मुझे पता था तुम आओगे ! और मुझे इस संकट से बाहर निकालोगे ! " मला अजून देखील नक्की काय प्रकार सुरू आहे याचे आकलन झालेले नव्हते . मी आजूबाजूला पाहिले . सगळीकडे कोरडे ठणठणीत वातावरण पडलेले होते . कुठल्याही आश्रमामध्ये गेल्यावर जाणवणारा एक नैसर्गिक ओलावा मृदूपणा तिथे नावाला देखील शिल्लक नव्हता . सगळे रखरखीत झालेले होते . बाबांच्या शेजारी पाण्याची कोरडी ठणठणीत भांडी पडली होती . बाबा मला सांगू लागले . " मेरा नाम संतदास महाराज है । लेकिन मुझे शूलपाणी झाडी मे गाय वाला बाबा करके बुलाते है । मेरा शरीर ओडीसा का है । " संत समाजामध्ये आपले मूळ गाव किंवा जन्मस्थान कुठले आहे ते सांगण्याची ही पद्धत आहे . हमारा शरीर अमुक अमुक जगह का है असे ते सांगतात । याचा अर्थ पांचभौतिक देह त्या ठिकाणी जन्माला आलेला असतो . बाकी हार्डवेअर जरी तिकडचे असले तरी सॉफ्टवेअर गुरुदेवांचे असते ! ऑपरेटिंग सिस्टिम वेगळी असू शकतेच ना ! या संतांना गाय वाला बाबा नावाने ओळखण्याचे महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या सर्वोत्तम गाई ! एक काळ्या रंगाची अतिशय सुंदर आणि आदर्श कपिला गाय त्यांच्याकडे होती . मगाशी मी पाहिला तो भव्य दिव्य वळू देखील होता . अजूनही दोन चांगल्या प्रतीच्या गायी होत्या . हा वळू परिसरातील लोकांना ते लागवडीसाठी ते मोफत उपलब्ध करून देत असत . त्यामुळे यांचे नाव गाय वाला बाबा पडले होते .उत्तम प्रजातीच्या देशी गाईच्या शुद्ध बीजाचा प्रचार प्रसार व्हावा हा उदात्त हेतू त्यामागे होता ! हे फारच मोठे सामाजिक धार्मिक आणि राष्ट्रीय कार्य ते करत होते ! कारण मध्यंतरीच्या काळामध्ये दूध उत्पादनाच्या नावाखाली होलस्टेन फ्रिजियन आणि जर्सी या डुकराच्या संकरापासून तयार केलेल्या नासक्या बियाणाचा प्रचंड प्रादुर्भाव भारतामध्ये पाश्चात्य देशांनी घडविला होता . त्याची विषारी फळे आपण अजूनही चाखत आहोत . असो तर ही झाली गाय वाल्या बाबांची पार्श्वभूमी . परंतु गेले चार दिवस बाबांच्या आश्रमात असलेले जे बोरवेल किंवा कुपनलिका होती त्याची मोटर जळालेली होती . हा संपूर्ण खडकाळ प्रदेश आहे . त्यामुळे नर्मदा मातेचा काठ जवळ असून देखील पाणी खूप खोल लागते हे आपण मागे देखील पाहिले . हा आश्रम जरी नर्मदा मातेच्या काठावर असला तरी देखील उन्हाळ्यामध्ये सरदार सरोवर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला की या भागातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली उतरते . आणि आता नर्मदा मातेचा किनारा या आश्रमापासून सुमारे दीड किलोमीटर लांब गेलेला होता ! त्यामुळे पाण्याचा थेंब जरी हवा असेल तरी दीड किलोमीटर जाणे क्रमप्राप्त होते . खाली असलेले जे तीन भगत होते त्यातले दोघेजण उत्तर प्रदेश मधून आलेले होते . त्यांनी आत्तापर्यंत तीन वेळा संपूर्ण मोटार उपसून काढली होती आणि पुन्हा बसवली होती . त्यामध्येच ते थकून गेले होते कारण हे सर्व करताना त्यांच्याजवळ पिण्याच्या पाण्याचा थेंब ही नव्हता . पवन नावाचा कुक्षी गावातला एक बघत होता जो रातोरात काढलेली मोटर इंदोरला घेऊन गेला होता आणि त्याने तिथून ती दुरुस्त करून आणली होती परंतु तरीदेखील मोटर काही फिरत नव्हती . तो बिचारा हेलपाटे मारून थकलेला होता .गंमत म्हणजे मला जरी गाईचा आवाज ऐकू आलेला असला तरी प्रत्यक्षामध्ये आश्रमात गेल्यावर चारही गाई शांतपणे उभ्या असलेल्या मी पाहिल्या . चार दिवस पाणी प्यायला न मिळाल्यामुळे त्या गाई इतक्या मवाळ झाल्या होत्या की विचारू नका. आता काही वेळात त्या मरतील की काय अशी त्यांची देहबोली सांगत होती . चारही गाईंच्या मागे रक्तासारखे लाल भडक गोमूत्र पडलेले होते . त्यांना आता देखील चक्क रक्तासारखी लाल भडक लघवी होताना मी स्वतः पाहिली .मग बाबा पाणी पिण्यासाठी आणि गाईंना पाणी पाजण्यासाठी नर्मदा मातेवर का जात नाहीत असा प्रश्न माझ्या मनात पडला इतक्यात बाबांनी त्याचे देखील उत्तर दिले ! बाबा म्हणाले की मी काहीही करायच्या लायकीचा राहिलेलो नाही ! हे पहा असे म्हणून त्यांनी त्यांच्या अगडबंब नगाऱ्यासारख्या पोटावर पांघरलेले उपरणे बाजूला घेतले . समोर जे दिसले ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली ! बाबांना छातीच्या खाली पोटाच्या वर साधारण आपले उदर पटल असते त्या भागात डाव्या बाजूला चांगली दीड दोन इंच आकाराची मोठी आणि खोल जखम झालेली होती ! जखम चांगलीच चिघळलेली दिसत होती . जखम इतकी खोल होती की आतले अवयव दिसत होते . मला ती जखम पाहून क्षणभर शिसारीच आली ! बाबांनी जखम पुन्हा एकदा झाकून घेतली आणि सांगायला लागले . "कुछ दिन पहले यहा परिक्रमा मे एक तांत्रिक आया था । बंगाली बाबा था । उसने मुझे बोला की वह तंत्र मार्ग से मेरे पेट की सारी हवा निकाल सकता है । " बाबा सांगत होते आणि मी आश्चर्यचकित होऊन ऐकत होतो . "उसने एक बडी पूजा करी । यज्ञ किया । और उस यज्ञ में उसने एक लोहे की सरिया गरम करी । वह गरम सरीया यहा घोप दी । " असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा ती जखम दाखवली ! " फिर ? " फिर क्या मै बेहोश हो गया । और तांत्रिक साला भाग गया । पानी की मोटर दिन रात चलती रही और जल गई ।दो दिन बाद यह पवन भगत आया और मुझे पानी पिलाया इसलिये मै जिंदा हू । लेकिन आप मुझे इस संकट से बाहर निकालना प्रभू। मै जानता हूँ आप कौन हो । मेरे प्राणो की रक्षा करना प्रभू । मेरी गायों की रक्षा करना प्रभू । आप ही इस संकट से हमे बाहर निकालने वाले तारणहार है । मुझे मैया ने कल रात को ही बताया है । " बाबा मला जे समजत होते ते मी नव्हतो हे मला खात्रीशीरपणे माहिती होते . परंतु अशा कठीण प्रसंगी बाबांना मदत करणे हे देखील माझे धर्म कर्तव्य होते . प्रत्यक्षामध्ये आज बरेच अंतर चालून कोटेश्वर गाठण्याचे माझे नियोजन होते . परंतु हे फारच मोठे संकट समोर येऊन ठेवलेले होते . आणि संतदास महाराज आणि त्यांचे शिष्य या सर्वांची नर्मदा मातेवर असलेली श्रद्धा राखण्याची मोठीच जबाबदारी माझ्यावर येऊन पडलेली होती . मी शांतपणे माझी झोळी खाली ठेवली . आणि प्राधान्यक्रम लावायला सुरुवात केली . सर्वप्रथम बाबांच्या जखमेवर उपचार करणे अत्यावश्यक होते . त्यासाठी लागणारे साहित्य मला शोधावे लागणार होते . कारण बाबा हालचाल देखील करू शकत नव्हते . दुसरे प्राधान्य गाईंना पाणी पाजण्याचे होते . कारण भगत मंडळी निदान नर्मदा मातेवर जाऊन पाणी पिऊ शकत होती . गाई मात्र दावणीला बांधलेल्या होत्या आणि सर्वांच्या जिभा बाहेर आलेल्या होत्या . कुठल्याही . क्षणी त्या प्राण सोडतील अशी त्यांची अवस्था मला स्पष्ट दिसत होती . तिसरी गोष्ट होती या सर्वांना खाऊ पिऊ घालणे ! चौथा मुद्दा होता तो मोटर दुरुस्त करण्याचा . प्रत्येक गोष्टीसाठी भरपूर पाणी लागणार होते . आणि इथे असलेला सर्वात जवळचा जलस्त्रोत होता तो म्हणजे नर्मदा मैयाचा प्रचंड जलसाठा जो इथून दीड किलोमीटर खाली उतरला होता ! पाणी साठवण्याचे मोठे मोठे लोखंडी टब तिथे पडले होते . सिंटेक्स ची फाटलेली अर्धी टाकी होती . बाकी पाणी साठवण्यासाठी अन्य काही सुविधा नव्हती . कारण एकंदरीत नर्मदा खंडामध्ये मी केलेले निरीक्षण असे आहे की इथे पाणी मुबलक उपलब्ध असल्यामुळे पाणी जपून वापरणे हा प्रकार कुठेही पाहायला मिळत नाही तर पाण्याची अत्यंत नासाडी लोक करताना सर्रास दिसतात . म्हणजे उदाहरणार्थ मोटर चालू करून ठेवली तर पाणी नळ्यातून अखंड वाहत असते जे अक्षरशः जमिनीमध्ये जाऊन मुरते परंतु कोणी पाणी बंद करत नाही . वीज देखील बऱ्यापैकी आकडी टाकून चोरून घेतलेली असते त्यामुळे त्याची देखील चिंता कोणी करत नाही . अर्थात हे मी शेतकऱ्यांचे सांगत आहे . आश्रमांमध्ये व्यवस्थित विजेचे मीटर बसवलेले असतात . परंतु जल व्यवस्थापन ढिसाळ आहे हे मात्र अगदी निश्चित ! ती देखील नर्मदा मातेचीच लीला आहे ! मैया कधी आटतच नसल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य या भागातील कोणाला माहितीच नाही ! आश्रमामध्ये पाणी भरण्यासाठी कुठले भांडे आहे का ते मी शोधू लागलो . मला एक पस्तीस लिटरचा अजस्त्र हंडा सापडला . स्टेनलेस स्टीलचा हा हंडा गोल गरगरीत होता . साधारण २० लिटर पाण्याचे बाटले उचलण्याची सवय आपल्याला होती . त्याच्या साधारण दुप्पट वजनाचा हंडा भरल्यावर किती जड होतो याची कल्पना मी केली . आणि असा विचार केला की आधी पाणी भरून आणावे आणि मग ठरवावे . त्याप्रमाणे झपाझप चालत दीड किलोमीटर अंतर गेलो ! समोर नर्मदामाता जणू हात पसरून मला मिठी मध्ये बोलावत होती ! धावतच जाऊन मी तिच्या गळ्यामध्ये पडलो . "खूप काळ असे अंतर नको गं देत जाऊ माई मला ! आणि असे अचानक धर्मसंकटात पण टाकत जाऊ नकोस ! आणि आता टाकलेच आहेस तर मला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील सांग ! " नर्मदेच्या पाण्यामध्ये मी पूर्णपणे बुडलेला असल्यामुळे मी करत असलेली ही प्रार्थना माझ्या डोळ्यावाटे तिच्या पाण्यात मिसळून गेली . एका महान संताने माझ्या पायावर केलेला अश्रूंचा अभिषेक मी नर्मदा मातेला अर्पण केला . एका थोर संतांची अशी दयनीय अवस्था झालेली पाहून मला इतके वाईट वाटत होते तर नर्मदा मातेला किती वाईट वाटले असावे ! त्यात भर त्या चार मुक्या जीवांची ! सोमा नावाचा सांड तसा तरुण होता . काळीभोर श्यामा गोमाता देखील अत्यंत चपळ होती . छोटे वासरू अजून हळूहळू मोठे होणार होते . परंतु श्याम सुंदर वळूची मात्र वाट लागली होती कारण त्याचा भव्य दिव्य देह पोसण्यासाठी त्याला पाण्याची अत्यंत गरज होती . नर्मदा मातेने मला उत्तर दिले ! आणि मी तिला शक्ती देखील मागून घेतली ! घटाघटा नर्मदा मातेचे पाणी प्यायलो आणि पाण्याच्या बाहेर आलो .खाली वाकून नर्मदे हर हर महादेव असे म्हणत पस्तीस लिटर चा तो हंडा मी भरून घेतला ! इतका मोठा हंडा मी आज पर्यंत पाहिलेला नव्हता .परंतु तो एका दृष्टीने सोयीचा होता कारण त्याच्या मध्ये भरपूर पाणी मावत असल्यामुळे कमी फेऱ्यांमध्ये जास्त पाणी उपसले जात होते . तो हंडा खांद्यावर घेऊन संपूर्ण चढ चढत मी टेकडीवर आलो . येताना वाटेत दोन वनस्पतींच्याकडे माझे लक्ष गेले . एक होती कोरफड आणि एक होता दगडी पाला . हंडा महाराजांच्या शेजारी असलेल्या रांजणामध्ये मी रिकामा केला . तांब्याभर पाणी घेऊन स्वच्छ हात धुतले . आणि कोरफड दगडी पाला तोडून आणून त्याची पाने धुवून घेतली . हातावरतीच दोन्ही वाटून त्याचा लेप महाराजांच्या जखमेला व्यवस्थित लावला . त्यावर त्यांचा गमछा घट्ट बांधला . महाराजांना मधुमेह होता त्यामुळे ती जखम लवकरात लवकर बरी होणे फार आवश्यक होते .
मी असा विचार केला की किमान गाईंना जर मी नर्मदा मातेवर घेऊन गेलो तर त्यांना पाणी पाजता येईल आणि आंघोळ घालता येईल . त्याप्रमाणे मी महाराजांना सुचवले असता ते म्हणाले की त्यांना पाण्यावर जाण्याची सवय नाही त्या कायम बांधलेल्या असतात . तरी देखील एक प्रयोग करावा असा विचार करून मी चौघांना सोडले असता चारही जनावरे चार दिशांना पळाली आणि माझी पाचावर धारण बसली ! काळी कपिला गाय तर इतकी चपळ होती की तिने धावतच जाऊन एका काटेरी कुंपणावरून अशी काही उडी मारली की ती आश्रमाच्या बाहेर जात थेट जंगलामध्ये गायब झाली ! आता मात्र मला रडू येऊ लागले . मला वाटले की मी महाराजांचे संकट सोडवायच्या नादात त्यांना अजून मोठ्या संकटात टाकले आहे ! बर महाराज इकडे शांतपणे डोळे मिटून पडले होते त्यामुळे त्यांना काय झाले कळलेच नाही . तो वळू दिसायला इतका भयानक होता परंतु केवळ पाणी न मिळाल्यामुळे तो अतिशय मवाळ झाला होता आणि त्याला कितीही जवळ जाऊन हात लावला तरी तो शिंग सुद्धा दाखवत नव्हता . तो देखील हिच्या मागे बाहेर जाऊ लागला . मग मात्र मला एक युक्ती सुचली . त्यांचे पाणी पिण्याचे जे लोखंडी टब होते त्याचा आवाज मी केला . पाणी पिण्याच्या टबाचा आवाज आल्या बरोबर चौघेही गुरे धावतच जागेवर आली ! ताबडतोब मी त्यांना बांधून टाकले आणि त्यानंतर मी पुन्हा हंडा घेऊन नदीवर गेलो . सकाळचे सात वाजून गेले होते . आणि हळूहळू उन्हाने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली होती . मी धावतच जायचो .थेट मैया च्या पाण्यामध्ये उतरून डुबकी मारायचो आणि पटकन हंडाभर पाणी भरून बाहेर यायचो . इथे मगरी होत्या त्यामुळे जास्त वेळ पाण्यात थांबता येणे शक्य नव्हते . मी तो हंडा डोक्यावर घेऊन आश्रमाचा चढ चढत यायचो आणि शामसुंदर सांड ते सर्व ३५ लिटर पाणी काही सेकंदातच संपवून टाकायचा ! अशा रीतीने नर्मदा मातेवर जाऊन पाणी भरून आणण्याची सेवा मी सकाळी सात ते दुपारी दीड वाजेपर्यंत केली . माझी देह बुद्धी पूर्णपणे नष्ट झालेली होती . माझ्या डोक्यात एकच ध्यास होता आणि तो म्हणजे या पाच जीवांचे रक्षण करणे आणि त्या सर्वांच्या देवावरील विश्वासाचे जतन करणे . मी एका तंद्री मध्ये होतो .नर्मदा मातेच्या कृपेने मला कुठलाही शारीरिक त्रास त्यावेळी झाला नाही किंवा जाणवला नाही . एक एक करून चारही जनावरांना मी भरपूर पाणी पाजले . त्यांचे गोमूत्र स्वच्छ पांढरे होईपर्यंत त्यांना पाणी पाजत राहिलो . त्यानंतर मी महाराजांचे सर्व पाण्याचे साठे भरून ठेवले . त्यांना आंघोळीसाठी पाणी भरून ठेवले . तसेच स्वयंपाकासाठी पाणी भरून ठेवले . परिसरातील झाडांना पाणी घातले . तुळशीला पाणी घातले .पुढील काही दिवस महाराजांना कोरफड आणि दगडी पाला लागणार होता त्यामुळे त्यांना देखील पाणी घातले . तोपर्यंत मी भरलेले पाणी पिऊन बघत मंडळी थोडीशी तरतरीत झाली होती . त्यांनी मस्तपैकी स्वयंपाक बनवला . दीड वाजता सर्व पाण्याचे साठे भरून झाल्यावर मी महाराजांच्या पुढे येऊन बसलो . महाराजांनी लहान बाळाप्रमाणे मला जवळ घेतले आणि ते खूप रडले . मला म्हणाले आता तू इथून जायचे नाहीस ! हा आश्रम तुझा झाला ! मला काहीतरी म्हणून दाखव असे महाराज म्हणाल्यावर मी त्यांना भगवद्गीतेतला पंधरावा अध्याय म्हणून दाखवला . तो त्यांना इतका आवडला की त्यांनी माझ्याकडून चार वेळा म्हणून घेतला . त्यांना एक मराठी भजन देखील ऐकवले . "आम्ही काय कुणाचे खातो । श्रीराम आम्हाला देतो । " हे ते भजन होते . त्याचा अर्थ देखील महाराजांना सांगितला आणि त्यांना तो खूप आवडला . स्वयंपाकाची सिद्धता होत होती तोपर्यंत कुंती मातेने स्थापन केलेले गुप्तलिंग बघून ये असे महाराजांनी मला सांगितले . त्यांच्या आश्रमाच्या पलीकडे डोंगराच्या उत्खननामध्ये मातीत लपवून ठेवलेले हे मंदिर सापडलेले आहे . महाराज येथे तीस वर्षे राहत आहेत . त्यांनी हळूहळू यथाशक्ती या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे . अजून बरेच काम बाकी आहे असे ते म्हणाले . मंदिरात जाण्याचे द्वार खड्ड्यामध्ये होते . सर्वात खालच्या पातळीला नंदी देव होते . पुन्हा नवीन बांधलेल्या तीन पायऱ्या सोडून वर आल्यावर मंदिराचे छोटेसे दार होते . आत मध्ये उतरायला पायरी नसून उडी मारावी लागायची . आत मध्ये काही पुरातन मूर्ती पार्वतीची मूर्ती आणि महादेवाची पिंड होती . या महादेवाला कुन्तेश्वर महादेव असे देखील म्हणतात . कुन्तीने स्थापन केलेले गुप्तलिंग म्हणून कुन्तेश्वर ! इथेच धर्मराजाने देखील तपस्या केलेली आहे . इथून दोन किलोमीटर पुढे गेल्यावर हिरणफाळ नावाचे ठिकाण आहे जिथे एका गर्भिणी हरणीच्या मागे लागलेल्या सिंहापासून सुटका करण्यासाठी तिने नर्मदा मातेची प्रार्थना केली होती . तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन नर्मदा मातेने ती हरिणी जिथे जिथे उड्या मारेल तिथे दगडांची निर्मिती केली आणि अशा रीतीने हरिणी नर्मदा मैया पार करून पळून गेली ,अशी या स्थानाची आख्यायिका आहे . या संपूर्ण परिसरामध्ये जुन्या भग्न मंदिरांचे अनेक अवशेष आढळतात तसेच बरीच मंदिरे जलमग्न झालेली आहेत . कुणकेश्वर महादेवाच्या आजूबाजूला देखील अनेक जुन्या मूर्ती आणि मंदिराचे भाग खांबांचे भाग पडलेले होते इथे अजून एक गुप्त मंदिर होते ज्याला फक्त छोटेसे , एक मांजर आत जाईल अशा आकाराचे प्रवेशद्वार होते . परंतु आत काय आहे कळत नव्हते .
या परिसराचा तुम्हाला अंदाज यावा म्हणून एका व्हिडिओमध्ये मला सापडलेले काही स्क्रीनशॉट सोबत जोडत आहे . बाकी या भागाचे फारसे फोटो उपलब्ध नाहीत .
मंदिराच्या शेजारील टेकडीवरून दिसणारे नर्मदा मातेचे विलोभनीय रूप ! इतक्या दूर जाऊन मला पाणी आणावे लागत होते . या मधला टेकडीला वळसा मारून जावे लागे .हेच आहेत परमपूज्य संत दास महाराज उपाख्य गाय वाले बाबा
आत मध्ये बऱ्याच देवांचे फोटो पूजेमध्ये ठेवले होते त्यातला हा साधू योगी माझ्या लक्षात राहिला .
इथे असलेल्या एका गुप्त मंदिराचे प्रवेशद्वार
परिसरात अशा अनेक भग्नमूर्तींचे अवशेष सापडतात उदाहरणार्थ ही विष्णू देवाची मूर्ती आहे .
मूर्तीच्या खांबावर लावण्याचा तोडी इतस्ततः पडलेल्या दिसतात
साधारणपणे या तोडीच्या आकारावरून मंदिराच्या भव्यतेचा अंदाज लावता येतो
कोरीव कामाची शैली बघता हे साधारण बाराशे ते पंधराशे वर्षे जुने मंदिर असावे असा माझा अंदाज आहे .
कुठल्याही पाच मूर्ती एकत्र दिसले की त्यांना पाच पांडव म्हणून सांगण्याची पद्धत आपल्याकडे रूढ झालेली आहे तसेच इथे देखील सांगतात . परंतु येथील महादेवाचे कुन्तेश्वर हे नाव आणि किल्ल्याचे धर्मी कोट हे नाव तसेच गावाचे धर्मराय ही नावे सूचित करतात की हे खरोखरच महाभारतातल्या पांडवांशी निगडित क्षेत्र असावे .
श्री कुन्तेश्वर महादेवाचे दर्शन घेऊयात
पार्वती मातेची मूर्ती म्हणून इथे ठेवलेली मूर्ती कुठल्यातरी नरदेवतेची आहे . ज्याच्या हातात शिवलिंग आहे आणि चार हात आहेत .
शिवलिंग मात्र अतिशय अद्भुत आहे .
चार दिवस महादेवाला अभिषेक झालेला नव्हता त्यामुळे मी याच अभिषेक पात्र मध्ये देखील पाणी भरून आलो होतो .
मंदिराचे दगडी बांधकाम चांगले आहे . हा वरचा घुमट आहे .
मूर्ती तज्ञांनी कृपया या मूर्तीवर प्रकाश टाकावा अशी प्रार्थना आहे .
जुन्या मंदिरातील सुंदर भौमितिक आकार इथे चक्क कोनाड्यांमध्ये दिवे लावण्यासाठी वापरण्यात आलेले आहेत
उत्खननामध्ये सापडलेल्या अशाच एका सुंदर मूर्तीला भग्न भागाच्या ठिकाणी शेंदूर फासून डोके तयार करून देवी म्हणून पुजले आहे .
त्याच मूर्तीचा पायाकडील भाग .
मंदिरातील जुने जोते दाखविताना एक स्थानिक भक्त ( हे संग्रहित चित्र आहे )
मंदिराचा नव्याने बांधण्यात आलेला भाग आणि नंदिकेश्वर
इथे भव्य दिव्य पुरातन मंदिर होते असे सूचित करणाऱ्या अनेक गोष्टी इथे आजही विखुरलेल्या आहेत
या भागामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन केल्यास फार मोठ्या मंदिराचे अवशेष मिळण्याची शक्यता आहे
मंदिराकडे उतरण्याचा खड्ड्यातला रस्ता
शेजारीच गाईंचे शेणखत येऊन पडलेले दिसत आहे . इथे लगेचच महाराजांची कुटिया आहे
आपल्या स्थानावर निवांत बसलेले गायवाले बाबा . इथेच मी त्यांना गीता आणि गीते ऐकवली होती .
श्यामा कपिला गाय आणि तिचे वासरू . ही फार चपळ आहे !
सोमा सांड . नेमका श्यामसुंदर सांड त्या व्हिडिओमध्ये दिसला नाही . तो कोटेश्वरच्या महाराजांनी गाय वाल्या बाबांना भेट दिला आहे . तो नेहमी मागच्या बाजूला बांधलेला असतो . त्याचे डुरकणे वाघाच्या डरकाळी सारखे भयानक आहे .
महाराजांनी आपल्या आश्रमामध्ये सुंदर असे कबीराचे दोहे लिहून घेतलेले आहेत . याच ठिकाणी गाई बांधलेल्या होत्या आणि खालची फरशी लाल भडक गोमूत्राने माखलेली होती .
असे काटेरी कुंपण संपूर्ण आश्रमाला घातलेले असून अशाच कुंपणावरून उडी मारून मागच्या बाजूने मी सटकलो होतो . तो प्रसंग पुढे येईल .
अगदी असेच आश्रमाचे दर्शन आल्या आल्या मला झाले होते . फक्त आत्ता जी हिरवळ दिसते आहे ते सर्व वाळलेले होते .
साधारण लाल खूण दिसले आहे त्या ठिकाणी मी पाणी भरण्यासाठी येत होतो कारण पाणी तिथपर्यंत उतरले होते आणि वरती शिवमंदिर लिहिले आहे तिथे आश्रम आहे . खालच्या बाजूला हरणफाळ दिसत आहे .
इकडे महाराजांचे गावातील गांजा प्रेमी भक्त येऊन बसले आणि सर्वजण मिळून गांजा फुंकू लागले . मी गुपचूप आत मध्ये जाऊन भोजन प्रसाद आटोपून घेतला . महाराज भगत लोकांना सांगत होते की आता हा आमचा चेला आलेला आहे त्याच्या ताब्यात आश्रम देऊन आम्ही अमरकंटकच्या दर्शनाला जाणार आहोत . तो गाईंची आणि आश्रमाची उत्तम काळजी घेणार आहे ! इतके सारे भक्त इथे येत आहेत हे जर मला आधी कळाले असते तर मी त्या सर्वांना मदतीला घेऊन खूप लवकर सर्व पाणी भरले असते . परंतु गांजा पिणाऱ्या लोकांच्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट असते . त्यांची प्रत्येक कृती अतिशय मंद असते . त्यांच्या मेंदूवर गांजाचा प्रभाव असल्यामुळे झटपट कृती करण्याची आणि झटपट निर्णय घेण्याची त्यांची क्षमता नष्ट झालेली असते . त्यामुळे एक प्रकारे ते बरेच झाले . इकडे बाबांनी सगळ्या लोकांना जखम दाखवली तेव्हा माझ्या असे लक्षात आले की संपूर्ण जखमेला आता खपली धरलेली आहे जी फारच आनंदाची गोष्ट होती ! गांजाच्या वासाचा मला त्रास होऊ लागला म्हणून मी हळूच माझे आसन उचलले आणि बाबांना म्हणालो की मी मंदिराच्या जवळ आसन लावतो आहे . मगाशी श्यामा कपिला गायीने कुठून उडी मारली होती ते ठिकाण मी पाहून ठेवले होते ! हळूच तिथे गेलो आणि उडी मारून आश्रमातून मी चक्क पोबारा केला ! कारण गाय वाल्या बाबांची माया मोठीच होती ! त्यांना फार काळ नकार देणे मला जमले नसते त्यापेक्षा त्या चित्रातून अदृश्य होणे हा मी सोपा उपाय म्हणून पत्करला ! कारण जर मी इथे अडकलो असतो तर माझी परिक्रमा चातुर्मास लागण्यापूर्वी पूर्ण झाली नसती . आणि शिवाय माझा जितका कार्यभाग होता तितका मी चोख बजावलेला होता त्यामुळे मला जाण्यापासून कोणीही अडवू शकले नसते !
मी जंगलामध्ये गायब झालो आणि मागून मला बाबांचे भगत हाका मारत आलेले दिसले परंतु त्यांना मी दिसत नव्हतो . भक्तांसाठी मी जसा प्रकट झालो तसाच अंतर्धान देखील पावलो होतो ! बाबांना बहुतेक लक्षात आले असावे . मी तिथे उभे राहूनच त्यांची मनोमन क्षमा . संत दास महाराज उर्फ गाय वाले बाबा उदार अंतःकरणाने मला क्षमा करतील याची मला खात्री आहे . कारण माझा शुद्ध अंतस्थ हेतू त्यांना नक्कीच माहिती असणार .समोरच दिसणाऱ्या नर्मदा मातेला सांगितले की नर्मदा मैया मी परिक्रमेमध्ये तुझ्या दर्शनासाठी आलेलो आहे तरी कृपा करून असल्या परीक्षा घेऊन माझे सत्व पाहू नकोस ! बरेच परिक्रमावासी परिक्रमा पूर्ण करायच्या आधीच अशा एखाद्या प्रेमळ आग्रहाला बळी पडून स्थानधारी झालेले आहेत . मला तसे काही करायचे नव्हते . त्यामुळे मी अतिशय वेगाने जंगलातला मार्ग पकडला ! आजच्या दिवशी मी जितका घाम गाळला तितका संपूर्ण परिक्रमेत कधीही गाळला नाही .आजच्या दिवशी मी नर्मदा मातेमध्ये जितके वेळा स्नान केले तितक्या वेळा संपूर्ण परिक्रमेमध्ये कधीही केले नाही . आजच्या दिवशी मी नर्मदा मातेचे जितके पाणी पिलो तितके पाणी उभ्या आयुष्यात मी कधीही पिलो नाही .आजच्या दिवशी मी जितके पाणी भरले तितके पाणी आयुष्यात कधी भरले नव्हते . त्यामुळेच की काय परंतु परिक्रमेतला हा दिवस माझ्या कायमचा लक्षात राहिला !
बोलिये संत दास महाराज की जय !
बोलिये गौ माता की जय !
बोलिये कुन्तेश्वर महादेव की जय !
नर्मदे हर !
हर हर महादेव !
लेखांक एकशे एकतीस समाप्त (क्रमशः )
अद्भुत, अद्भुत आहे ही गाथा!
उत्तर द्याहटवाआई नर्मदे हर बाबाजी 🙏
आपण ही प्रतिक्रिया दिली तेव्हा लिखाण अपूर्ण होते . कृपया पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा वाचणे ही विनंती .
हटवाअपूर्ण लेख पूर्ण होईपर्यंत मी पुनः पुन्हा वाचतच असतो.
हटवामैय्याची अपरंपार कृपा आहे आपल्यावर.
आम्हा वाचकांची काहीतरी पुण्याई असावी म्हणून ही अविस्मरणीय आणि अतुलनीय परिक्रमा गाथा वाचता आली आहे.
आई नर्मदे हर बाबाजी 🙏
नर्मदे हर !
हटवाHari Om !!!!! Narmade Har!!!!!
उत्तर द्याहटवाKharach adbhut !!!!! Gaay valyaa babanchi aata tbyet kashi aahe ?