लेखांक १३१ : कवड्याचे हनुमान आणि डही बाजारात प्राप्त झाले तीरकमान

कुलवट गावातून चोराची गाडी जेव्हा निघाली तेव्हा जाताना मी शेवटचे वाक्य त्याला ओरडून सांगितले , " मैने तुमको माफ कर दिया है । दुबारा ऐसा मत करना । नर्मदे हर ! " गाडी धुळीचा लोट उडवत निघून गेली . चोराने मनोमन नक्की थोडे तरी आत्मचिंतन केले असेल .करो न करो ! त्याचा प्रश्न ! आम्हा काय त्याचे ! मला ध्यास लागला होता धशामामाला भेटण्याचा . त्याला इकडे कामठीवाला धशा म्हणूनच ओळखत . तो अतिशय श्रेष्ठ धनुर्धारी असावा . कारण आजूबाजूच्या पंचक्रोशी मध्ये त्याचे नाव सर्वांना माहिती होते . आताही एका दुकानदाराने मला त्याच्या घराचा पत्ता सांगितला . पत्ता शोधत मी त्याच्या घराजवळ आलो . त्याच्या घरी कोणी नव्हते . शेजारी एक दुकानदार होता . त्याच्याकडे जाऊन मी धशा मामाची चौकशी केली . आधी तो साशंक झाला . परंतु जेव्हा मी गुलवट गावातील भिल्लाची  इतिवार्ता सांगितली तेव्हा तो माझ्याशी नीट बोलू लागला . धशा मामाचा संपूर्ण परिवार एका लग्नासाठी परगावी गेलेला होता . त्याच्याकडे फोन देखील नव्हता . आता आपल्याला धनुष्यबाण मिळणार नाही हे माझ्या लक्षात आले . परंतु दुकानदाराने मला एक युक्ती सांगितली . पुढे डही नावाचे गाव आहे . इथे भरणारा बाजार या पंचक्रोशीतला सगळ्यात मोठा बाजार आहे . अगदी समोर लखनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये मी राहत असताना सुद्धा ते सामान डहीच्या बाजारातून नावेतून आणतात हे मी ऐकले होते . या बाजारामध्ये धशा मामाचा मुलगा धनुष्यबाण विकतो असे त्यांनी मला सांगितले . मी त्याला विनंती केली की मी बाजारामध्ये त्याची भेट घेतो आहे इतका त्याला निरोप द्यावा . त्याने होकार दिला आणि मी पुढे निघालो . माझ्या डोक्यातून तीर कमान हा विषय कायमचा निघून गेला .
या कुलवट गावामध्ये एक प्राचीन शिव मंदिर आहे .


कुलवट गावातील प्राचीन शिवमंदिर
मंदिरातील शिवपिंडी

मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे
हे मंदिर म्हणजे एखादे पुरातन मंदिर पुनर्स्थापित कसे करता येते याचे आदर्श उदाहरण आहे कारण हे मंदिर पुनर्स्थापित आहे

हिंदूंची पुनर्स्थापित मंदिरे सुद्धा मूर्ती भंजकांकडून सुटलेली नाहीत हे फार मोठे दुर्दैव आहे ! धार्मिक भावना फक्त एकाच समूहाच्या दुखावतात असा आपल्या देशातला समज आहे . हिंदू समाजाने मात्र आपली प्रजाती संपूर्णपणे नष्ट होईपर्यंत सहिष्णुतेचा जागतिक ठेका घेतलेला आहे ! धिक्कार असो ! 

 वाटेत एका दुकानदाराने थांबवून कलिंगड आणि केळी दिली . कलिंगड थोडेसे सडलेले होते . अर्थात जास्ती झालेले होते . परंतु आज दिवसभर कडकडीत उपवास घडलेला असल्यामुळे मी ते आनंदाने ग्रहण केले . केळी खाल्ल्यावर पोटाला थोडासा आधार आला . पुढे काही अंतर चालल्यावर कवडा नावाच्या गावात डाव्या हाताला एक मोठे हनुमान मंदिर लागले . उजव्या हाताला एक पाण्याची टाकी होती . खडकाळ माळरान होते . मंदिरामध्ये गेल्या गेल्या एक थंडगार पिण्याच्या पाण्याचा कुलर लावलेला होता . या कुलरचे पाणी पिण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर लोक या मंदिरात येत होते . ९० टक्के लोक पाणी पिऊन बाहेरच्या बाहेर निघून जातात . मंदिराच्या समोर पवन किराणा नावाचे एक दुकान होते . मंदिरामध्ये गेल्यावर तिथल्या हनुमंताचे आधी दर्शन घेतले आणि महंत साधूंना भेटायला  गेलो . यांचे नाव बालकदास महाराज होते . या नावाचे अनेक संत आपल्या देशामध्ये आहेत . महाराजांचा एक नानसिंग नावाचा सेवक होता . दोघांनाही परिक्रमा वासींबद्दल शून्य अगत्य आहे असे मला जाणवले . मी महाराजांना आसन कुठे लावू असे विचारल्यावर त्यांनी पहिली दहा मिनिटे काही उत्तरच दिले नाही . शेवटी नानसिंग मला सांगायला आला मंदिराच्या अंगणात कुठेही आसन लावावे . मग मी दाराजवळ एका झाडाखाली आसन लावले . बाबा प्रचंड दमेकरी होता व अखंड खोकत होता . तरी देखील अक्षरशः २४ तास गांजाचे सेवन सुरू होते . त्याच्या त्या खोकल्याची उबाळे करून मला कसंतरीच व्हायचे इतका तीव्र खोकला बाबाला झालेला होता . बाबासाठी कुटीच्या आकाराचा एक स्वतंत्र एसी कक्ष होता . भक्तमंडळींकडून देणग्या गोळा करून परिक्रमावासींसाठी देखील उत्तम खोल्या बांधलेल्या होत्या असे मला नंतर कळाले . परंतु मला मात्र त्या दोघांनी देखील अजिबात विचारले नाही . इथून पुढे डही गावापर्यंत काही व्यवस्था नसल्यामुळे इथे राहणे क्रमप्राप्त होते . 
अतिशय मजबूत कुंपण घातलेला कवडा येथील हनुमान मंदिर आश्रम .रस्त्याच्या समोर छोटेसे दुकान दिसत आहे .

ज्यांच्या पुण्याईवर आणि तपोबळावर हा आश्रम उभा राहिला आहे अशी संत मंडळी .


पवन किराणा
दुकान आणि घर टुमदार होते . दुकानातील काकूंनी मात्र माझी व्यवस्थित चौकशी केली .
आश्रमाचे भव्य प्रवेशद्वार .उजव्या दरातून आत गेल्यावर कुलर लावलेला आहे
गोलात दाखवली आहे ती आश्रमासमोरची पाण्याची टाकी आहे
मंदिर मात्र अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य आहे
हनुमान दादांची मूर्ती पण छान आहे ! इथे अशा पद्धतीने मूर्तीला शृंगार करण्याची पद्धत आहे
बालकदास महाराजांसाठी एक वातानुकूलित कुटी बांधण्यात आलेली आहे

इथे अखंड ध्वनी प्रज्वलित केलेली असते . त्याच्यासमोर बसून बाबांचे अखंड गांजा सेवन सुरू असायचे .

महाराज रात्रभर खोकत राहिले . त्यांना देता येण्यासारखे एक औषध माझ्याकडे होते . परंतु दुर्दैवाने त्यांनी माझ्याशी अबोला धरून मला सूचित केले होते की तुझे मला काहीही नको आहे . नानसिंग शी बोलताना मला त्या औषधाबद्दल कळाले . परंतु महाराज औषध घेत नाही . गांजा हेच औषध मानतात असे देखील त्याने मला सांगितले . मला वाईट वाटले . उंचापुरा आणि तगडा साधू होता . जटाभार देखील मोठा होता . परंतु गांजाच्या व्यसनाने त्याचा घात केलेला होता . रात्रभर बिचारा तळमळत राहीला . त्यात वातानुकूलन यंत्र त्याचा अजून घात करत होते हे त्याच्या लक्षात येत नव्हते . दमेकऱ्यांसाठी सर्वात उत्तम जागा म्हणजे धगधगणारी धूर विरहित धुनी . जी इथे होती. परंतु यांचे सगळे विपरीत चालले होते . सांगायची खूप इच्छा होत होती परंतु महाराज ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते . त्यांची त्या दिवशीची परिस्थिती पाहता ते काही दिवसातच जातील असे मला वाटले . आवाज मात्र मोठा होता . आणि जोरदार शिव्या हासडायचे ! मूर्तीमंत तमोगुण जणु माझ्यापुढे बसलेला होता .  रात्री मी उपाशीच झोपणार होतो . परंतु कुलरचे पाणी पिण्यासाठी तिथे सतत लोकांची येजा होती . लग्नसराईचे डीजे जोरजोरात पावरी किंवा नेमाडी संगीत वाजवत येत आणि झोप मोड करत . दारात डीजे उभा करून सर्वजण पाणी पीत आणि मग डीजे पुढे जाई . रात्रभर स्वस्थ झोप लागलीच नाही . तत्पूर्वी संध्याकाळी समोरच्या टाकीवर जाऊन मस्त स्नान केले . टाकी भरून वाहत होती . त्या पाण्यामध्ये स्नान केले . पूजा अर्चा आटोपली . नानसिंग ने रात्री एक मिरची आणि एक बटाटा दिला . त्यात थोडे मीठ टाकून परतून भाजी करून खाल्ली . आणि पडून राहिलो . रात्रभर मंदिराचे दार उघडेच होते . रात्री भटकणाऱ्या कुत्र्यांनी येऊन माझे सगळे सामान इतस्ततः विस्कटून टाकले . कपडे फाडून ठेवले . दप्तरही थोडेसे फाटले . नशिबाने वह्या वाचल्या . परंतु पूजा साहित्य देखील संपूर्ण मंदिर भर पसरले होते . मैया तेवढी पिशवीत राहिली ! कदाचित तिचा चेहरा बघून कुत्री दचकली असावीत . द्वादशी च्या दिवशी उपवास सोडण्यासाठी ठेवलेले थोडेफार पदार्थ कुत्र्यांनी संपवून टाकले . पहाटे जाग आली तेव्हा सामान सगळीकडे विखुरलेले दिसले . मला फार वाईट वाटले . आत मध्ये परिक्रमावासींसाठी उत्तम सुविधा असताना तिकडे ते मला फिरकू सुद्धा देत नव्हते . अगदी स्वयंपाक सुद्धा मी बाहेरच्या बाजूला तीन दगडांची चूल तयार करून माझा मी केला . आत स्वयंपाक घरात त्याने मला येऊ दिले नाही . समोरचे दुकान नानसिंगच चालवायचा . अतिशय कंजूष आणि हिशोबी मनुष्य होता . त्यांच्या या स्वभावामुळे एका परिक्रमावासीचे सामान भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः गावभर पसरवून ठेवले होते . पहाटेच मी स्नान आटोपले आणि मारुतीरायाला नमस्कार करून अंधारातच पुढे प्रस्थान ठेवले . जाताना बराच वेळ मला साधूचा खोकल्याचा आवाज ऐकू येत होता . त्याच्या या कर्मांची फळे तो याच जन्मामध्ये भोगत होता . त्याच्या दुखण्यावरचे औषध माझ्याकडे असून देखील केवळ तो माझ्याशी बोललाच नाही त्यामुळे त्याला ते मिळू शकले नाही . आज बुधवार होता . डही गाव बारा किलोमीटर होते आणि मला गुरुवारच्या बाजारामध्ये जायचे होते . त्यामुळे आज कुठेतरी एक मुक्काम करावा असे ठरवले . बरेच अंतर चालल्यावर डही गावाच्या थोडेसे आधी डोंगरामध्ये एक गुहा लागली ज्याच्या पुढे कुटी बांधण्यात आली होती . हे भैरवनाथाचे एक स्थान होते आणि इथे काळी वस्त्रे घालणारा एक साधू होता जो परिक्रमेला गेला होता आणि हरी नामक एका बिहारी बाबाला तिथे तो बसवून गेलेला होता . बिहारी बाबाने अतिशय प्रेमाने बोलावून बिहारी पद्धतीचे दूध पाणी आणि साखर मिसळून तयार केलेले सरबत मला पाजले ! यात दूध नावाला होते . पाणी आणि साखरच  होते ! दुधाचा फ्लेवर किंवा वास दिलेले गोड पाणी असे फार तर म्हणूयात ! परंतु हे अतिशय थंडगार पेय असून त्याच्यामुळे उष्णता कमी होते वगैरे बरेच फायदे बाबांनी मला सांगितले . मला देखील पेय आवडले ! थंडगार पेय पिल्यावर त्या गुहेमध्ये असलेल्या गारव्यात छान डोळा लागला . थेट संध्याकाळी जागा झालो . समोर एक मोठी पाईपलाईन टाकण्याचे काम चालले होते . डोंगर खोदून त्यातून १२ फूट व्यासाचा मोठा लोखंडी नळा रतलाम पर्यंत टाकण्याचे काम चालू आहे असे मला सांगण्यात आले . नळा इतका मोठा होता की त्यातून जीप चालवता यायची . नर्मदा मातेचे पाणी उपसून नेण्याचे काम हा नळा करणार आहे . इथे साधूने बाहेरच्या लोकांना पाणी पिण्यासाठी एक टाकी बसवली होती . परंतु तिचा नळ रस्त्याच्या पातळीला असल्यामुळे तिचा वापर होत नव्हता . साधूने मी मदतीला आलो आहे तर टाकी धुवून घ्यावी असा विचार करून टाकी धुवायला काढली . टाकीचे पाणी वाया जाऊ नये म्हणून कुठल्या झाडाला पाणी घालावे तर तिथे अक्षरशः गवताची काडी सुद्धा उगवली नव्हती इतका संपूर्ण परिसर उजाड झालेला होता . मी त्या साधूला रस्त्याच्या कडेला एक खड्डा करून दिला आणि खड्ड्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या केल्या . आता टाकीच्या खाली ठेवून बादली सुद्धा भरता येईल इतकी जागा तयार झाली . मी घामाघुम झालो परंतु काम उत्तम झाले ! साधू बाबा  भलताच खुश झाला !  टाकीचे वाहून जाणारे पाणी जिथे जात आहे तिथे आजूबाजूची काही झाडे आणून मी लावली . कदाचित ती आता वाढली असतील . 
डोंगरातील एका गुहेत बनवलेला हाच तो आश्रम . आता इथे दत्त मंदिर देखील आहे
आश्रमाच्या याच कट्ट्यावर बसून आम्ही गप्पा मारत होतो . खाली बसलेला भगत रस्त्यावर चटई अंथरून बसला आहे रस्त्याच्या पलीकडे टाकी बसवली होती .

थोड्या वेळाने इथे मोटरसायकलवर परिक्रमा करणारा एक बाबा आला . याचे नाव कल्पेश मोदी किंवा कैलास गिरी बाबा असे होते . परंतु तो स्वतःला ध्वजावाले मोदी असं म्हणवायचा . त्याच्या गाडीला ध्वजा लावलेली होती . तो देखील सतत ध्वजा घेऊन फिरायचा . बाबा अतिशय बडबडा होता . आल्यापासून तो अखंड बोलत राहिला . त्याची एक एक वाक्यं इथे देण्याच्या योग्यतेचे नाहीत ! इतक्यात तीन चार तरुण मुले तिथे आली . पाणी पिण्यासाठी म्हणून थांबली . परंतु ध्वजावाले मोदी बाबा ने त्यांना कब्जात घेतले !  यातल्या एकाचे नाव होते चिंटू . एकाचे नाव होते रौ भौ ! अर्थात रविन् . अरुण नावाचा एक तरुण होता जो आदिवासी चॅनल नावाचे चॅनेल युट्युब वर चालवायचा . आणि चौथा आदेश किंवा महेश . या चौघांना बाबांनी ब्रह्मज्ञान द्यायला सुरुवात केली . मुले तरुण होती त्यामुळे मोदी बाबाची चेष्टा करत होती . बाबा मात्र पोट तिडकीने त्यांना ब्रह्मज्ञान सांगू लागला . मुले त्याची फारच चेष्टा करू लागली . अचानक त्याने सगळे कपडे काढून टाकून दिले . संपूर्ण दिगंबर अवस्थेत गेला . आणि म्हणाला इस दुनिया मे दो ही चीजे चलती है । या तो दंड । या तो , असे म्हणत त्याने तीन विटा घेऊन त्या खाली बांधल्या आणि आपल्या अवयवाने उचलून दाखवल्या ! मुले घाबरली !मी पण एकदम या अनपेक्षित प्रकारामुळे अचंबित झालो . लगेच त्याने आपल्या गळ्यातला गमछा काढला आणि जागेवरच त्या चारही मुलांना कानामध्ये गुरुमंत्र देऊन टाकला ! मुले बिथरली होती . त्यांना काय झाले काहीच कळेना . जाताना रौ भाऊ ने मला सांगितले की उद्या जाताना तुम्हाला माझे घर वाटेत लागेल . कृपया मला भेटून जा . आज काय घडले आहे त्यावर उद्या चर्चा करू . त्याला मी येतो असे आश्वासन दिले आणि चारही मुलं निघून गेली . मी तर म्हणेन अक्षरशः पळून गेली . मोदी बाबा थोड्यावेळाने शांत झाला . याची उलटी परिक्रमा चालली होती . एकंदरीत सगळे प्रकरण अंगावर येणारच होते ! मधेच तो ओरडायचा नो लोकशाही !ओन्ली एके ४७ ! थोडीशी मनोरुग्ण वाटावी अशी बाबाची अवस्था झाली होती . 
हा आश्रम एका घाटामध्ये असल्यामुळे जाणारे येणारे बरेच लोक इथे थांबायचे . काही वेळाने अजून एक तरुण तिथे येऊन थांबला . निलेश राठोड असे त्याचे नाव होते . आलेल्या परिक्रमावासींची ख्याली खुशाली विचारून हे लोक पुढे जायचे . निलेश राठोड रोज इथे ताजी भाजी आणि दूध आणून द्यायचा . त्याच्याशी बराच वेळ गप्पा मारल्या . याचे डही गावांमध्ये टेन्ट हाऊस होते अर्थात मांडवाचा धंदा होता .थोड्या वेळाने तो निघून गेला . फार सज्जन आणि सात्विक मनुष्य होता .
डही काँग्रेसचा नगराध्यक्ष राकेश चौहान ठाकूर नावाचा एक सात्विक सज्जन आणि तेजस्वी तरुण होता .तो इथे रोज रात्री येऊन सेवा म्हणून स्वयंपाक करून जायचा . थोड्यावेळाने तो देखील आला . त्याच्या हातची अतिशय उत्कृष्ट अशी पोळी भाजी आम्ही सर्वांनी खाल्ली . स्वयंपाक करताना त्याच्याशी गप्पा देखील झाल्या . बऱ्याच आदिवासी लोकांना अजून इंदिरा गांधी गेलेल्या आहेत हे ही माहिती नसल्याचे त्याने सांगितले . सर्वांची जेवणं झाल्यावर सगळे अन्न व्यवस्थित झाकून ठेवून राकेश चौहान निघून गेला आणि उद्या डही गावामध्ये मला भेटून जा असे आमंत्रण देऊन गेला . त्या रात्री एक मजाच झाली . बिहारी बाबा मोठ्या ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारायचा . रात्री बराच वेळ त्याचे प्रवचन ऐकले . आणि अखेरीस आत मध्ये जाऊन झोपलो . ध्वजावाले मोदी आणि बिहारी बाबा बाहेर कट्ट्यावर झोपले . रात्री आत मध्ये फार गरम होऊ लागले म्हणून मी बाहेर येऊन झोपलो . मी दार लोटले होते परंतु कसे काय माहिती नाही परंतु पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांनी आपला प्रताप दाखवला ! त्यांनी दार उघडून आत मध्ये जाऊन एक लिटर दूध फस्त केले ! आणि एक किलो तुपाचा फडशा पडला ! बिहारी बाबाला रात्री तीन वाजता जाग आली ! त्याने झालेला प्रकार पाहिल्यावर इतका अकांडतांडव मांडला की विचारू नका ! त्याने दोघांच्या झोपेचे खोबरे करून टाकले ! कालपासून मला प्रभू भगवान ईश्वर महाराज म्हणून संबोधणारा तो बिहारी बाबा आता मला अस्सल बिहारी भाषेतल्या खालच्यातल्या खालच्या शिव्या घालू लागला ! त्याचा दुधामध्ये फार जीव होता त्यामुळेच काल त्याने चमचाभर दूध मला पाजले होते ! आज मैयाने त्याचे एक लिटर दूध गायब केले ! कारण मला मी दार लावलेले आठवते होते .ते कुत्र्यांनी कसे काय उघडले माझ्या हे लक्षात आले नाही . परंतु बाबा ने अक्षरशः घरातले कुणीतरी गेल्यावर आक्रोश करता तसा आक्रोश करायला सुरुवात केली . मग मात्र मी सर्वसामान उचलून रात्री साडेतीन वाजताच तिथून प्रस्थान ठेवले . जाताना सुमारे एक किलोमीटर अंतर चालेपर्यंत बाबा मला घालत असलेल्या शिव्या मला ऐकू येत होत्या ! त्याचे कालचे रूप खरे की आजचे रूप खरे हेच मला कळेना ! साधूची परीक्षा संकटात केलेली चांगली असते ! अंधारातच मी पुढचा मार्ग चालू लागलो . मनोमन मला खूप वाईट वाटले . मी केलेल्या अपराधा बद्दल मी मैयाची क्षमा मागितली . बिहारी बाबाची सुद्धा मी क्षमा मागत होतो परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नव्हता . अक्षरशः छाती डोके बडवून त्याचा आकांत चालला होता . मी त्याला सांगत होतो की तुला पाच किलो तूप मी पाठवून देतो काळजी करू नकोस . परंतु बाबा काही रडायचा थांबत नव्हता . दुधामध्ये आणि तुपामध्ये एखाद्या माणसाचा इतका जीव असू शकतो हे पाहून मला शिसारीच आली ! इतकीच आसक्ती ठेवायची असेल तर संसारात राहिलेले अति उत्तम ! साधूच्या पोटाला हर्निया झालेला दिसत होता . त्याने ते देवावर सोडून दिले होते . जाता जाता मात्र त्याला मी हर्नियाचे ऑपरेशन अवश्य कर असा सल्ला दिला आणि निघालो . असो . अंधारामध्ये माझे मार्गक्रमण चालू होते . हळूहळू उजाडू लागले . वाटेत एक वीट भट्टी होती . ती भट्टी चालवणाऱ्या मातारामने आवाज दिला . आणि सकाळ सकाळी मस्तपैकी काळा चहा करून दिला . भट्टी कशी करतात वगैरे माझ्या सगळ्या शंकांचे समाधान करून घेतले . तिला सर्व माहिती होती . अतिशय तल्लख बुद्धिमत्तेची महिला होती . त्या परिसराची ती जाणकार होती . एवढ्या पहाटे मी कसा काय आलो विचारल्यावर तिला रात्री झालेला प्रकार सांगितला . घरातले सगळेजण हसायला लागले ! घर म्हणजे छोटेसे पाल होते . किंवा तात्पुरता तंबू असतो तसा तंबू समजा . परंतु सगळे खूप समाधानी होते . ज्याच्याकडे सगळे आहे तोच दुःखी असतो आणि ज्याच्याकडे काही नाही तो समाधानी असतो असे मी आजवर आयुष्यात पाहिलेले सोपे गणित आहे ! तिथून निघालो . आता मात्र चालताना मी एकटा नव्हतो ! दूर दूरच्या गावातून डहीच्या बाजारासाठी पहाटे लवकर निघालेले लोक , हातात कोंबडे आणि सोबत त्यांची गाई गुरे बकऱ्या असे सर्व माझ्यासोबत चालत होते . अर्थातच सर्वजण मला मागे टाकून पुढे जात होते . या लोकांची चालण्याची गती एवढी तुफान असते की जनावरांना अक्षरशः पळावे लागते . बाजारात तुम्ही जितक्या लवकर पोहोचाल तितका चांगला भाव मिळून पटकन घरी परतण्याची शक्यता वाढते . एखादी गाय बैल विकून त्या पैशातून बाकीचा बाजार विकत घेऊन घरी परत यायचे असे एकंदर नियोजन असते . डही गावाची वस्ती साधारण १००० उंबरे आहे असे मला स्थानिकांनी सांगितले . वाटेत एकाने पुन्हा एकदा चहा नाष्टा खाऊ घातला . त्याला नर्मदे हर करून पुढे निघालो . गावामध्ये मोठे हनुमान मंदिर असून तिथेच उतरावे असे त्यांनी मला सांगितले . त्याप्रमाणे भरवस्ती पार करत मी हनुमान मंदिरामध्ये आलो . भव्य दिव्य मंदिर होते . आत मध्ये अनेक देवतांची मंदिरे होती . अतिशय सुंदर परिसर होता . मंदिर संपन्न होते ! कारण प्रत्येक देवाला एसी लावलेला होता ! कल्पना करून बघा संपूर्ण उघडे मंदिर आहे ! देव्हारे देखील उघडे आहेत ! आणि प्रत्येक देव्हाऱ्यामध्ये एक एसी असाच लावून दिलेला आहे ! वातानुकूलन यंत्रणा ही नेहमी बंदिस्त जागेत काम करते . अशी उघड्यावर लावून दिली तर ती संपूर्ण पृथ्वी गार करण्याचा प्रयत्न करते आणि त्यात संपून जाते ! मी हे तिथल्या सेवेकऱ्यांना सांगायचा प्रयत्न केला . परंतु ते म्हणाले , "क्या फरक पडता है ! हनुमान दास महाराज थोडी ना अपने जेबसे पैसा डाल रहे है ! " अच्छा म्हणजे इथले महंत हनुमान दास महाराज आहेत तर ! माझ्या हळूहळू एक एक गोष्ट लक्षात येऊ लागली . इथे सुद्धा परिक्रमावासींचे शून्य अगत्य आहे असे मला जाणवले . मला कोणीही कुठे आसन लाव ते सांगितले नाही .मी पाळत असलेल्या प्रथेप्रमाणे मी हनुमान दास महाराजांना भेटायला गेलो .अतिशय अगडबंब देह होता ! बाबा अतिशय तगडा होता ! परंतु पुन्हा तोच अनुभव आला ! माझ्याशी एक शब्द देखील बाबा बोलला नाही . जणूकाही समोर कोणी दिसतच नाही असा त्याचा भाव होता . मी देखील त्यांना दंडवत प्रणाम केला आणि एका कोपऱ्यात आसन लावले . काल रात्री भैरवनाथ गुहेच्या इथली टाकी साफ केल्यामुळे तिथले पाणी संपले होते . त्यामुळे राहिलेली सर्वच आन्हीके इथे आटोपून घेतली .ही खरे म्हणजे कमलदासजी महाराज नावाच्या थोर संतांची तपोभूमी . बाकी संडास बाथरूमची व्यवस्था मात्र इथे उत्तम होती . त्यामुळे कपडे धुवून काटे तारेवर वाळत घातले .   आणि बाजारात एक फेरफटका मारून यावा असा विचार केला . बाजारातून एक चक्कर मारून आलो . वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी विकले जायचे . काल दूध घेऊन आलेले निलेश राठोड पुन्हा एकदा मला भेटले . त्यांनी मला कलिंगड खायला घातले . काँग्रेसचा नगराध्यक्ष मला भेटला होता त्याची देखील भेट घेतली आणि त्याने मला डही गावातील संघाचे काम बघणाऱ्या एका माणसाची देखील भेट त्याच्या दुकानामध्ये नेऊन घडवली . दोघांची चांगली मैत्री होती . पुन्हा एकदा मंदिरामध्ये गेलो . आणि शांतपणे आसन लावून बसलो . गावातील धनिक स्त्रिया दर्शनासाठी येत होत्या . संपूर्ण नर्मदा परिक्रमेमध्ये मी केलेले एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण इथे नमूद करून ठेवतो . जे जे लोक समाजामध्ये श्रीमंत धनिक किंवा मोठमोठे व्यापारी उद्योगपती म्हणून प्रसिद्ध आहेत असे सर्व लोक सकाळी लवकर उठून किंवा संध्याकाळी न चुकता जवळच्या मंदिरामध्ये जातात असे मी पाहिले आहे . याउलट जे लोक दरिद्री भिकारी कर्म दरिद्री आळशी क्रोधी तामसी असतात ते मात्र कधीच मंदिरात येताना दिसत नाहीत . कदाचित मंदिरात आल्यावर त्यांचे हे सर्व दुर्गुण नाहीसे होऊन पुन्हा एकदा त्यांना वैभव प्राप्त होऊ शकते . ज्याप्रमाणे धावणाऱ्या गाडीला सर्विसिंग ची गरज असते तसे मंदिर तुमच्या मन बुद्धी चित्त अहंकाराची 'सर्विसिंग ' करत असते . सर्विसिंग झाल्यावर वॉशिंग सेंटर मधून बाहेर पडलेली गाडी जशी चकाचक दिसते तसा मंदिरातून बाहेर पडलेला सद्भक्त अतिशय तेजस्वी दिसतो ! कधीतरी निरीक्षण करून पहा ! पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जिथे लोकांना व्यग्रतेमुळे देवळात जायला वेळ नसतो अशा ठिकाणी धनिकांनी घरातच मोठी मोठी मंदिरे बांधलेली आपल्याला पाहायला मिळतात . थोडक्यात केवळ रोज मंदिरात जाणे एवढा एक नित्य नियम जरी आपण पाळला तरी त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक अमुलाग्र बदल होऊ शकतात हे तरुणांनी लक्षात घ्यावे . यात कुठलाही कमीपणा नसून हे १००% शास्त्रशुद्ध उपयोजन आहे . तुम्ही दारूच्या दुकानात गेलात तर दारू मिळते . फटाक्याच्या दुकानांमध्ये फटाके मिळतात . कापड दुकानांमध्ये कपडे मिळतात . दुग्धालयामध्ये गेल्यावर दुधाचे पदार्थ मिळतात . त्याचप्रमाणे मंदिरामध्ये गेल्यावर मनाची स्थिरता , चित्ताची शांतता , बुद्धीची एकाग्रता , अहंकाराची नष्टता आणि परमेश्वराचे आशीर्वाद मिळतात ! तेही फुकट ! तुम्ही देवाला फक्त दोन हस्तक तिसरे मस्तक एवढे जोडले तरी पुरेसे असते ! असो .
हे आहे डहीचे भव्य दिव्य सुंदर हनुमान मंदिर .
नर्मदा खंडातील परंपरेप्रमाणे इथे देखील नर्मदेश्वर महादेव आहेतच
गोपाळकृष्ण व अन्य काही देवतांची मंदिरे देखील आहेत ज्यांना सतत एसी लावलेला असतो .
कमल दासजी महाराजांची तपोकुटी देखील आहे
परंतु मुख्य अधिष्ठात्री देवता हनुमानजी आहेत आणि त्यांच्या अतिशय सुंदर आणि वेगळीच मूर्ती इथे आहे . हा वीर हनुमान किंवा प्रताप हनुमान किंवा दास मारुती नसून वरद हनुमान आहे
रस्त्यावरून मंदिरापर्यंत जाण्यासाठी मोठा रस्ता केलेला असून दुतर्फा बाग बगीचा आहे
हे आहेत हनुमान दास महाराज . भव्य दिव्य देहयष्टी आहे .
हनुमान जी ची अजूनही काही स्थाने इथे आहेत
मंदिराला अप्रतिम सजावट केलेली दिसते
परिक्रमावासींना देण्यासाठी लोकांनी आणून दिलेल्या धान्याच्या थप्प्या इथे लागलेल्या आपल्याला दिसतात .
मंदिराचे प्रवेशद्वार देखील सुंदर आहे
कमलदास महाराजांची धुनी इथे आहे
आत्ता जो परिक्रमावासी बसलेला दिसत आहे अगदी त्याच ठिकाणी मी आसन लावले होते
मंदिर मात्र सुंदर भव्य दिव्य आणि लक्षात राहणारे आहे !

 इकडे भोजनगृहामध्ये भोजनाची उत्तम तयारी चालली होती . हनुमान दास महाराज एका आसनावर बसले होते . आणि येणाऱ्या जाणाऱ्या धनिक भक्तांशी अतिशय आनंदाने हास्य विनोद करत होते . थोड्याच वेळाने तिथे जेवणाच्या पंगती वाढण्यात आल्या . बाबांच्या समोर साधारण पंधरा-वीस श्रीमंत घरातल्या महिला बसल्या होत्या . काही पुरुष आणि मुले देखील होती . श्रीमंतांची मुले लगेच लक्षात येतात . त्यांना लहानपणापासून तुम्ही कोणीतरी विशेष आहात असे सांगून वाढवलेले असते . त्यामुळे शक्यतो ती वरकरणी सर्वसामान्य दिसणाऱ्या माणसांच्या कच्छपी लागत नाहीत . अबोल आणि एकटे एकटे राहणे पसंत करतात . त्या सर्वांना घेऊन बाबा जेवणाच्या पंगतीकडे गेले . संपूर्ण परिसरामध्ये मी एकटाच परिक्रमावासी होतो . आणि मी काही मला भोजन प्रसाद मिळेल का वगैरे विचारलेले नव्हते . एकादशीच्या उपासामुळे बऱ्यापैकी भूक लागलेली होती . परंतु बाबांनी सर्व भक्तांना जेवायला बसवले आणि जेवणे सुरू झाले . हे सर्व माझ्या अगदी समोर सुरू होते . मी शांतपणे बाहेर गेलो आणि माझे वाळत घातलेले कपडे आत मध्ये आणले . सर्वसामान गोळा केले आणि तिथून बाहेर पडलो . मंदिरापासून रस्त्यापर्यंत जाणारा एक सुंदर शंभर मीटरचा रस्ता होता ज्याच्या दोन्ही बाजूने बाग होती . त्या रस्त्याच्या मधोमध मी आलेलो असताना एक श्रीमंत माताराम धावतच माझ्यामागे आली . आणि माझ्या पाया पडू लागली . म्हणाली , " भगवान कृपा करके भोजन पाइये ! ऐसे रूठ के चले मत जाइये । मै आपके पाव पकडती हूँ। "  मी देखील त्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हणालो , " माताराम आप क्यू शर्मिंदा हो रही है ? मुझे भोजन कराना यहा के महंत जी का काम है । आपका नही । आप भोजन पा लिजिये | हम एक बार जहाँ से निकले वहा वापस नही जाते ।" असे म्हणून मी ताड ताड ताड बाहेर पडलो . " मै उनकी तरफ से क्षमा मांगती हूँ महाराज! भोजन किये बिना मत जाइये ! " माताराम रडू लागली . माझा निर्धार पक्का झाला होता . केवळ भोजनासाठी बोलावले नाही हे त्यामागचे कारण नसून एकंदर आल्यापासूनच तिथले वातावरण आणि निवडक आगत्य मी पाहत होतो . त्या सगळ्याचा हा परिपाक आहे असे मला सुरुवातीला वाटले होते . परंतु खरे कारण देखील लवकरच कळाले. माझ्या माघारी ती माताराम ढसाढसा रडते आहे असा आवाज मला ऐकू आला . परंतु मी मागे वळून न बघता अतिशय निर्दयपणे बाहेर पडलो आणि गुरुवारच्या बाजाराच्या गर्दीमध्ये नाहीसा झालो . वाटेमध्ये मला निलेश राठोड च्या कामगाराने पाहिले आणि ओळखले . त्याचे नाव राम होते . त्याने मला विचारले की महाराज कुठे निघाले आहात ? मी त्याला पुढे जाण्याचा रस्ता विचारू लागलो . नर्मदा खंडामध्ये प्रत्येक मनुष्य तुम्हाला हा प्रश्न आवर्जून विचारतो तसा त्याने देखील विचारला . "भोजन प्रसादी पाली ना बाबाजी ? " मी नाही असे उत्तर दिल्याबरोबर त्याने माझ्या नकळत निलेशजी ना फोन लावला आणि काही क्षणातच स्वतः निलेश राठोड तिथे उपस्थित झाले ! मोठ्या आग्रहाने ते मला त्यांच्या जवळच असलेल्या दुकान अधिक घर अशा वास्तूमध्ये घेऊन गेले . यांचा मांडव घालण्याचा व्यवसाय असल्यामुळे दुकान कायम सामानाने भरलेले असायचे . आत मध्ये अजून दोन-तीन खोल्या होत्या . बाहेरची जागा कमी पडली की घर देखील दुकान होऊन जायचे ! त्यांनी मला मोठ्या प्रेमाने आत मध्ये नेऊन बसवले आणि सुंदर असे घरगुती जेवण मला वाढले ! हनुमान मंदिरामध्ये काय झाले याबाबत मी काहीही बोललो नाही . निलेश राठोड ला दोन मुली आणि एक मुलगा होता . मुलगा श्रवण सात वर्षाचा होता . मुली १३ आणि १६ वर्षाच्या होत्या . वयाच्या मानाने दोघींची उंची चांगली होती व तब्येतही उत्तम होती . निलेश भाई ने मुलांना काहीतरी चांगले सांगायला सांगितले . मी त्या दोघींना लष्करामध्ये भरती होण्याचा सल्ला दिला . आणि लष्करामध्ये त्यांना काय काय संधी आहेत त्याची यथामती माहिती दिली . बसल्या बसल्या मी मांडव व्यवसायातील या भागातील परिस्थिती काय आहे ते समजून घेऊ लागलो . या क्षेत्रात काम करणारे माझे काही मित्र आहेत . भापकर नावाचे एक मित्र आहेत त्यांचा हाच व्यवसाय आहे . विठ्ठल नावाचा अजून एक मित्र आहे . यांच्यामुळे महाराष्ट्रातील किंबहुना शहरातील मंडप व्यावसायिकांच्या समस्या आणि संधी मला माहिती आहेत . इथे मात्र सगळे वेगळेच गणित होते . बऱ्यापैकी उधारीवर व्यवसाय करावा लागायचा . आसपासचे सर्व क्षेत्र आदिवासी लोकांचे असल्यामुळे गरिबी खूप आहे . त्यामुळे मोठे मांडव फारसे टाकले जात नाहीत . आला दिवस ढकलण्यापुरते पैसे मिळतात इतकेच . गप्पा मारता मारता माझे बाजारातल्या गर्दीकडे लक्ष गेले . काहीतरी रंगीबेरंगी हलताना दिसले . पाहतो तो काय ! तो तर एक सजवलेला सुंदर असा धनुष्य होता ! मला अचानक आठवण झाली की धशा मामा चा मुलगा आज बाजारात येणार होता ! मी निलेश भाईला विचारले की इथे धनुष्यबाण कोण विकते ? तो म्हणाला हे काय आपल्या घरासमोरच विकतो एक मुलगा ! 


डहीच्या बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेले धनुष्य

डहीच्या बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेले बाण


विशेष सजावट केलेले धनुष्यबाण . पाहुण्यांना वगैरे देताना असा सजवलेला धनुष्य देण्याची पद्धत आहे .

मी सर्वांचा निरोप घेऊन एका लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या धशा मामाच्या मुलाकडे गेलो . माझ्या आधीच तिथे तीन-चार लोक येऊन धनुष्यबाण पाहत होते . मी त्याला विचारले की धनुष्य केवढ्याला दिला ? त्याने माझा आवाज ऐकून न ऐकल्यासारखा केला . आणि तो बाकीच्या आदिवासी लोकांशी बोलू लागला . मी खाली वाकून एक बाण उचलला . त्याबरोबर तो मुलगा एकदम चवताळून माझ्या अंगावर आला ! " ए बाबाजी ! हात मत लगाव ! चलो आगे ! " मला थोडेसे वाईट वाटले . आणि असे वाटले की पुढे निघून जावे . मी जाता जाता फक्त एवढेच म्हणालो . " धशामामा नही आया क्या ? " " कौनसा धशा मामा ? " "वही कुलवट वाला जिसका नाम देवसिंग कामठेवाला है । " " आप कैसे जानते है उनको ? " "अरे उसके गुरुने भेजा था घुलवाड वाले ।"  "अरे बापरे ! कही आप वह बाबाजी तो नही जो कल हमारे घर आये थे ? " "हा मै ही आया था ! " असे म्हटल्याबरोबर त्याचा मुलगा एकदम धंदा सोडून उडी मारून माझ्यासमोर आला आणि माझ्या पाया पडला ! मी देखील पाया पडलो . परस्परो देवो भव । ये लीजीये आपका तीर कमान ! असे म्हणत त्याने झाडाला टेकून उभ्या केलेल्या अनेक धनुष्यापैकी एक सुंदर धनुष्य बाहेर काढले . तो धनुष्य पाहिल्याबरोबर आजूबाजूचे आदिवासी मामा अस्वस्थ झाले . एक म्हणजे आदिवासी असल्याशिवाय हा धनुष्यबाण कोणाला दिला जात नाही . दुसरे म्हणजे हा धनुष्य आकाराने थोडासा मोठा आणि जाडीला खूप जास्त जाड असल्यामुळे त्यांचे असे म्हणणे पडले होते की मला याचा प्रत्यंचा चढवता येणार नाही !  त्यातल्या दोघांनी तो धनुष्य मागितला . दोघे मिळून शक्ती लावून गुडघेबिडघे लावून तो धनुष्य वाकवून त्याचा प्रत्यंचा चढविण्याचा प्रयत्न करू लागले . परंतु त्यांना काही जमेना . ते पावरी भाषेमध्ये सांगू लागले . पहा आम्हाला जमत नाही तर याला कुठून जमणार ? मी त्यांना म्हणालो बघू बरं धनुष्य ? आणि डाव्या हाताने थोडासा दाब देऊन त्याला गोल केले आणि उजव्या हाताने सहज प्रत्यंचा चढवला !तड तड तड असा आवाज करत धनुष्याला लावलेले आरसे तुटून उडाले ! सर्वजण डोळे विस्फारून पाहू लागले !त्यांच्यातला एक जण म्हणाला , "धनुष्य तुटला वाटतं ! " त्याची शंका स्वाभाविक होती . मलाही क्षणभर वाटले की धनुष्य तुटला असेल . म्हणून मी पुन्हा डाव्या हाताने दाब दिला आणि प्रत्यंच्या मोकळा केला . त्या दोघांना पुन्हा धनुष्य बघायला दिला . पुन्हा दोघे गुडघा लावून धनुष्याला झटू लागले परंतु त्यांना प्रत्यंचा चढवता येईना . मी पुन्हा तो चढवून दाखवला . धशा मामा चा मुलगा म्हणाला बाबाजी हा धनुष्य तुमच्यासाठी बनलेला आहे म्हणून तुम्हाला चढवायला एवढा सोपा जातो आहे !  तसेही हा इथे कोणाला चढवता येईल असे वाटत नाही . असे म्हणत त्याने मला तो सुंदर पैकी सजविलेला धनुष्य आणि त्याचे काही बाण दिले . 

नर्मदा मातेने प्रस्तुत लेखकाला मिळवून दिलेले हेच ते तीर कमान ! 



हा सजवलेला तीरकमान आदिवासी अस्मितेचे इतके अतूट प्रतीक आहे की या परिसरात येणाऱ्या प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला देखील त्याचा आश्रय घ्यावाच लागतो !

राहिला विषय आरशांचा तर पहिल्यांदा प्रत्यंचा चढविताना आरसे तुटतातच असे मला त्याने सांगितले . माझे मलाच आश्चर्य वाटले की इतकी ताकद माझ्याकडे कुठून आली ?साक्षी भावाने विचार केल्यावर लक्षात येते की हा श्री नर्मदा परिक्रमेचा पुण्यप्रताप आहे . आजही तो धनुष्य माझ्याकडे आहे . परंतु त्या दिवशी मी ज्या सहजतेने तो चढवला त्या सहजतेने मला आज तो चढवता येत नाही . नर्मदा परिक्रमा करत असताना नर्मदा मैया परिक्रमा वासीला काहीतरी अतिमानवी अतिंद्रीय शक्ती प्रदान करत असते याची अनुभूती अशा अनेक प्रसंगी मला आलेली आहे . अनेकांना आलेली आहे . एखादी अशक्य वाटणारी उडी मारणे असेल . उंचावरून खाली उडी मारून उतरणे असेल . चिखलावरून चालणे असेल . एखादी कठीण नदी पार करणे असेल . उन्हाचा मारा सहन करणे असेल . किंवा थंडी काढणे असेल . पोहणे असेल . नर्मदा मैया परिक्रमावासीला नेहमीपेक्षा अधिक सुदृढ अधिक बलवान आणि अधिक सहनशील बनवते याची अनुभूती अनेकांनी आजवर  घेतलेली आहे . मी पैसे देऊ लागल्यावर धशा मामाच्या मुलाने स्पष्ट नकार दिला . नुकतीच मला भोजनदक्षिणा मिळालेली होती . त्याचे पाकीट न उघडता मी तसेच त्या आदिवासी युवकाच्या खिशामध्ये कोंबले . हा नर्मदा मैया चा प्रसाद आहे असे म्हटल्यावर त्याचा नाईलाज झाला . त्याने मला तो धनुष्य माझ्या काठीला व्यवस्थित बांधून दिला . बाणांची टोके काढून ती एका डबी मध्ये भरून दिली . आणि बाण माझ्या फोमच्या गादीमध्ये खोचून दिले . क्षणात माझ्या जवळचे वजन वाढले ! परंतु समोरच्या तटावर असताना मला हव्या असलेल्या तीर कामठ्याची इच्छा मैय्याने अशा रीतीने महिनाभरातच पूर्ण करून टाकली ! ती देखील सर्वोत्तम तीर कमान बनवणाऱ्या माणसाच्या हातातील कलाकृती मला देऊन ! 
आणि मला डही च्या हनुमान मंदिरामध्ये जो विपरीत अनुभव आला तो खरे म्हणजे मला हा धनुष्यबाण मिळावा यासाठी माईनं दिलेला अनुभव होता ! कारण तिथे जर मला भोजन प्रसाद मिळाला असता तर धनुष्यबाण विसरून मी निश्चितपणे पुढे निघून गेलो असतो ! म्हणून बरेचदा देव आपल्याला एखादी गोष्ट देत नसेल तर जास्त त्यासाठी त्याच्याजवळ अकांडतांडव , दंगाधोपा , आरडाओरडा , रडारडी , मिनतवाऱ्या करू नयेत . योग्य वेळ आल्यावर ,योग्य ठिकाणी , योग्य ती वस्तू ,तुम्हाला योग्य त्या प्रकारे , योग्य स्रोताकडून मिळेल याची यथायोग्य काळजी तो योगेश्वर घेतच असतो . त्या काळाचे ज्ञान आपल्याला नसते . ते ज्ञान ज्याला आहे त्याला महाकाळ म्हणतात . आणि असे महाकाळ जिच्या केवळ दर्शनाने धन्य होऊन जातात अशी आपली पुण्यसलीला पावना नर्मदा मैया आहे !





लेखांक एकशे एकतीस समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. छे, छे काय प्रतिक्रिया द्यायची, उलट नर्मदा माईची कृपा आठविली की डोळ्यात अश्रू आपोआपच येतात, माई परिक्रमेत अतींद्रिय शक्ती देते हे त्रिवार सत्य आहे.
    जय हो माई की 🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. छे, छे काय प्रतिक्रिया द्यायची, उलट नर्मदा माईची कृपा आठविली की डोळ्यात अश्रू आपोआपच येतात, माई परिक्रमेत अतींद्रिय शक्ती देते हे त्रिवार सत्य आहे.
    जय हो माई की 🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. काही फोटो दिसत नाहीयेत कृपया काय गडबड आहे पाहता का. बाकी लेखांक नेहमी प्रमाणेच सुंदर आहे तुम्ही खूप मोठे काम करत आहात माता नर्मदा आपल्या सर्व ईच्छा पुर्ण करो

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर