मराठी नर्मदाष्टक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
श्री आद्य शंकराचार्य विरचित
श्री नर्मदाष्टक स्तोत्राचा
मराठी भावानुवाद
तुषारसागरे खळाळत्या जळात शोभते ।
धुवून द्वेषपाप हो जिचे सलील टाकते ।
मरावयास भीती त्या भयास पूर्ण भेदिते ।
नमूं तुझ्या पदारविंदी माय देवि नर्मदे ॥१॥
जळी तुझ्याच दीन मीन त्यांसी स्वर्ग दाविते ।
कलीमला निवारी सर्व तीर्थराज्ञी शोभते ।
जळीं तू मत्स्य कूर्म चक्रवाक मकर मोदिते ।
नमूं तुझ्या पदारविंदी माय देवि नर्मदे ॥२॥
महापुरे प्रचंड भूवरील पाप दंडिते ।
ध्वनीभयें समस्त पापपर्वतांस खंडिते ।
मृकंडुसूत रक्षुनी महाप्रलय निखंदिते।
नमूं तुझ्या पदारविंदी माय देवि नर्मदे ॥३॥
देखताचि वारि भीति माझी दूरी सारीते।
मारकंड शौनकां सुरांस सेव्य भारी ते ।
पुनर्जनूनीं प्राप्त भोगसागरास वारीते।
नमूं तुझ्या पदारविंदी माय देवि नर्मदे ॥४||
देव दैत्य किन्नरें तुलाच पूजीती बरें ।
गाती तीरीं सुस्वरेचि लक्ष लक्ष पाखरें ।
पिप्पलाद कर्दमां मुनी वसिष्ठ मोददें।
नमूं तुझ्या पदारविंदी माय देवि नर्मदे ॥५॥
सनत्कुमार नाचिकेत कश्यपादि भृंग ते।
पादपद्मयुग्म सेविताती आदि नारदे ।
चंद्रसूर्य देवराज रंतिदेव शांती दें।
नमूं तुझ्या पदारविंदी माय देवि नर्मदे ॥६॥
लक्ष सारसायुते अलक्ष्य पाप भंजिते ।
तुझ्यामधील जंतु तंतु होतीं भुक्त मुक्त ते ।
ब्रह्मदेव विष्णु शंकरास पूज्यधाम जे।
नमूं तुझ्या पदारविंदी माय देवि नर्मदे ॥७॥
जटेत शंभूच्या निघोनि दिव्य नादीं वाहते ।
भिल्ल विप्र सूत चोर पंडितादि पाहते।
ताप दायी पाप, त्यातूनी जीवांस तारीते ।
नमूं तुझ्या पदारविंदी माय देवि नर्मदे ॥८॥
त्रिकाळ पाठ गायने, स्मरोनी नर्मदे सदा।
दुर्गती सरोनी सर्व वारीताती आपदा ।
महेशधाम प्राप्त होय दूर देहिया कदा।
करेल जन्म मृत्यू चक्र भेद माय नर्मदा ॥९॥
करोनी अष्टकांत प्रार्थना आचार्य शंकरे।
माय नर्मदा प्रसन्न केली अल्प अक्षरें
बाळकृष्णसूत मूढबुद्धी गाई काव्य है।
माय नर्मदेस प्रार्थी वारी जन्ममूळ गे ॥१०॥
॥ नर्मदे हर॥
श्रावण कृ. ८ शके १९४६
(गोकुळाष्टमी)
चिंचवड
सर्व अधिकार नर्मदा मातेच्या आधीन!
एक परिक्रमावासी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा