लेखांक ३ : चोराची धन
मनोमन अशी इच्छा मी करीत होती की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये (डिसेंबर २०२१ ) कुठल्याही परिस्थितीमध्ये परिक्रमा उचलायचीच ! जोपर्यंत आपण नर्मदा परिक्रमा करत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःच्या इच्छेने वागण्याची खूप सवय झालेली असते ! एकदा नर्मदा परिक्रमा झाली की आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नष्ट होऊन जातात आणि केवळ देवाच्या इच्छेने वर्तावे ।देव करील ते मानावे । मग सहजची स्वभावे । कृपाळू देव ॥ या समर्थ उक्तीप्रमाणे वागण्याची सवय अंगी बाणते ! तसेच काहीसे घडले . परिक्रमेची इच्छा केली तर होती परंतु अचानक अमरावतीच्या शंकर महाराजांचा पुणे दौरा ठरला . पुण्यामध्ये धनकवडी येथे शंकर महाराजांची समाधी आहे .यांची देखील एक जबरदस्त अनुभूती मला परिक्रमे दरम्यान आली ती योग्य वेळी सांगतो परंतु हे शंकर महाराज निराळे आणि मी उल्लेख करतो आहे ते शंकर महाराज निराळे . मी उल्लेख करतो आहे ते शंकर महाराज अजून देहामध्ये आहेत . शंकर बाबांचा हा ऐतिहासिक दौरा होता ज्यामध्ये ते भक्तांच्या नियोजनानुसार हेलिकॉप्टरने पंढरपूरला गेले व तेथील नवीन आश्रमाचे उद्घाटन करून हेलिकॉप्टरने पुण्याला आले व पुन्हा हेलिकॉप्टरने पिंपळखुट्याला परत गेले . त्यांच्या आगमनामुळे माझा नर्मदा परिक्रमेचा मनोवांछित मुहूर्त जरी हुकला होता तरी या दौऱ्यामध्ये मला त्यांच्या दर्शनाचा व सेवेचा भरपूर लाभ मिळाला .
पुणे दौऱ्यामध्ये परमपूज्य शंकर बाबांसोबत प्रस्तुत लेखक
दौऱ्यामध्ये पुण्यातील सर्व भक्तांच्या घरी लोकांनी त्यांना फिरविले . अखेरीस त्यांच्याकरिता खास बनवलेल्या हेलिपॅड वरून बाबांनी अमरावतीसाठी पुन्हा उड्डाण केले . शंकर बाबा अमरावतीला गेले आणि मला असे वाटले की केवळ आपल्याकरिता ते इतक्या दुरून येथे आले तर आपण किमान त्यांना पुन्हा सोडायला म्हणून अमरावतीला जायला हवे होते असा विचार करून आश्रमाची इनोवा गाडी घेऊन रातोरात मी अमरावती आश्रम गाठला .दुसऱ्या दिवशी गोटीराम तथा रामदास दांगट शेठ यांचे सोबत परत पुण्याला आलो .माझे लष्करातील एक मित्र चीनच्या सीमेवरून सुट्टीवर आले होते आणि दोनच दिवसात परत जाणार होते त्यांना शिवाजी महाराजांच्या एखाद्या किल्ल्याची यात्रा करायची होती . त्यांना सोबत घेऊन तोरणा किल्ला पादाक्रांत करून आलो .गडावर माझे इतिहास अभ्यासक मित्र श्री सचिन जोशी भेटले .या यात्रेमध्ये माझ्या असे लक्षात आले की मी न थकता न भागता बरेच कष्ट अजूनही करू शकत आहे . दोनच दिवसात बाळासाहेब वाल्हेकर यांच्या नित्य गुरुवारच्या वारीसाठी पुन्हा गाडी चालवत पिंपळखुटा गाठले सोबत वेदमूर्ती यदुवीर पाटील गुरुजी देखील होते . मोठा दौरा झाल्यामुळे बाबांच्या थकलेल्या शरीराला गुरुजींनी अतिशय चांगला रगडा मसाज करून दिला व त्यामुळे बाबांची तब्येत एकदम खुश होऊन गेली .त्या दोन दिवसांमध्ये परमपूज्य शंकर महाराजांचा अतिशय मोलाचा सहवास मला लाभला व त्यांचे खूप मौलिक मार्गदर्शन देखील याच काळात मला झाले .
एकदा बाबा मला म्हणाले " तुम्ही पुणेकरांनी मला सोन्याचे कडे , मुकुट दिलेत . चांदीची भांडीकुंडी दिलीत . दक्षिणा दिलीत ,सर्वांनी आपापल्या प्रॉपर्टी आम्हाला फिरवून फिरवून दाखविल्या . अहो पण हे सोने-नाणे-पैसा-प्रॉपर्टी ही सर्व चोराची धन आहे . त्याचा कुणाला काय उपयोग ? " बाबांच्या या एकाच वाक्याने मनामध्ये तीव्र वैराग्य उत्पन्न झाले . साधू संतांच्या सहवासामध्ये राहण्याचे हेच फायदे असतात की तुम्हाला कधी कुठल्या क्षणी कुठल्या रूपातून काय बोधामृत मिळेल हे सांगता येत नाही !
इकडे त्याच काळामध्ये स्वतःची चार-पाच घरे असताना घरातल्या लोकांच्या नादाला लागून मी जमीन खरेदी करून तिथे बंगला बांधण्याचा घाट घालीत होतो . त्याकरिता जवळपासचे सोने नाणे विकून आणि काही साठलेला पैसा जमा करून तो एकांना मी विसार म्हणून दिला देखील होता ! परंतु एकीकडे माझे विवेकशील मन मला सांगत होते की याची तुला गरज नाही ! परंतु नातेवाईकांच्या अपेक्षांच्या दबावामुळे मी हे सर्व करायला तयार झालो होतो ! शंकर बाबांनी एका क्षणात माझे सर्व प्रश्न सोडवून टाकले ! अमरावती वरून पुण्याला घरी आलो . अंगावरील सर्व कपडे काढून ठेवले आणि एक धोतर घेऊन छाटी सारखे गुंडाळले . आई वडील मावशी यांना साष्टांग नमस्कार करून त्यांना सांगितले की मी नर्मदा परिक्रमेला निघालो आहे . मला परवानगी असावी . हे सर्व अचानक घडल्यामुळे त्यांना देखील काही कळाले नाही व तिघांनी मला आनंदाने आशीर्वाद दिला ! ही देखील नर्मदा मातेचीच कृपा ! आणि अनवाणी पायांनी घर सोडले . सोबत एकही रुपया , पाकीट , आयकार्ड , डेबीट कार्ड ,मोबाईल , पिशवी , कपडे ,चप्पल ,बूट काहीही घेतले नाही ! झप झप पावले टाकत नर्मदा मातेच्या दिशेने निघालो ! नर्मदे हर !
समर्थ रामदास स्वामी म्हणतात
जयासी वाटे वैराग्य व्हावे । तेणे काहीच न विचारावे । उठोनि वाटेसी लागावे । दिगंता प्रती ॥
मनोमन हा बोध स्मरत , सद्गुरूंनी दिलेले नाम मुखाने जपत रस्ता तुडवू लागलो . नर्मदा माता पुणे शहराच्या उत्तर दिशेला आहे हे डोक्यात असल्यामुळे उत्तर दिशा धरून चालत राहायचे असे एकंदर ठरविले होते . पुढे जे काही होईल ती नर्मदा मातेची इच्छा ! जाता जाता अचानक मला आठवले की माझे एक मार्गदर्शक श्री अरुण धारणे काका यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचे मुद्रित शोधन मी करत होतो . त्या पुस्तकाची एकमेव प्रत माझ्याकडे होती व ती त्यांना परत नेऊन देणे आवश्यक होते . इतके एकच काम राहून गेलेले माझ्या लक्षात आले ! परंतु एकदा घर सोडल्यामुळे पुन्हा मी घरी जाण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे आता काय करावे अशा विचारात मी पडलेलो असतानाच गोटीराम तथा रामदास दांगट शेठ यांचे जय हरी मिसळ हॉटेल माझ्यासमोर आले !
त्यानाच हे काम सांगावे असा विचार करून मी हॉटेलमध्ये गेलो असता समोर परमपूज्य शंकर महाराज यांची मोठी तस्वीर दिसली आणि बरे वाटले ! त्या चित्रामध्ये बाबांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान पसरले आहे असे मला जाणवत होते ! पुस्तकाचा विषय मी शेठ ना सांगितला परंतु त्यांनी या विषयांमध्ये असमर्थता व्यक्त केली व परस्पर बाळासाहेबांना फोन लावून दिला . मी परिक्रमेला निघालो आहे हे ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता बाळासाहेब वाल्हेकर स्वतः त्यांच्या शिवमंदिरातून गाडी घेऊन तत्काळ मला घ्यायला तिथे आले . खरे तर कोणालाच न सांगता निघण्याचा माझा बेत होता परंतु तो इथे अशा पद्धतीने फसला . बाळासाहेब वाल्हेकर हे भारतीय सेनेमध्ये स्पेशल फोर्सेस मध्ये कामगिरी केलेले कट्टर राष्ट्रभक्त माजी सैनिक आहेत . परंतु ऐन तारुण्यांमध्ये साधू वृत्तीने त्यांनी भरपूर संचार केलेला आहे . त्यामुळे त्यांनी दिलेला सल्ला ऐकणे माझ्यासाठी क्रमप्राप्त होते . त्यांची मित्रमंडळी त्यांना भाऊ म्हणतात आणि मित्रमंडळींमध्ये एक प्रसिद्ध अनुभव सिद्ध म्हण आहे . भाऊ बोले , देव बोले ! त्यामुळे आता भाऊ म्हणतील तसे वागायचे हे मी ठरविले . त्यांनी देखील अतिशय आनंदाने मला शंकर महाराजांची एक काठी किंवा दंड , एक छोटी रुद्राक्षांची माळ ,दोन छाट्या , दोन शाली , एक शबनम पिशवी , जिच्यावर विठ्ठल रखुमाई आणि ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो होता , थर्मल कपडे, बाबांचा एक अंगरखा ,भगवद्गीतेचे एक छोटे पुस्तक ,विविध स्तोत्रावली असलेले एक पुस्तक असे सर्व देऊन पाटणापर्यंतचे रेल्वेचे तिकीट त्यांनी मला काढून दिले . सोबत पैसे देऊ लागले असता मी नकार दिला . आणि त्यांना सांगितले की मला पहायचे आहे की पैशाशिवाय परिक्रमा होऊ शकते का . त्यामुळे कृपया पैसे सोबत देऊ नका . तरी देखील शंकर बाबांनी त्यांना पाकिटामध्ये ठेवण्यासाठी दिलेली पाचशे रुपयांची एक नोट त्यांनी माझ्यासोबत दिली आणि सांगितले की ही नोट खर्च करू नकोस फक्त तु हिला आणि शंकर महाराजांच्या दंडाला परिक्रमा घडवून मला परत आणून दे . प्रत्यक्षात झाले उलटेच !मी दंडाला परिक्रमा घडवून आणण्याऐवजी दंडानेच मला परिक्रमा घडवून आणली , अशा अनुभूती पुढे येत गेल्या ! असो . १८५६ रुपये तिकिटाचे झाले . भाऊंनी मला सांगितले ओंकारेश्वर ला परिक्रमा उचलायची असेल तर खंडवा स्टेशनला उतरावे . अमरकंटक वरून उचलायची असेल तर कटनी स्टेशनला उतरावे .परंतु त्यांनी असा सल्ला दिला की जबलपूर येथून परिक्रमा उचलावी हे उत्तम . पूर्वी त्यांनी जबलपूर परिसरात भ्रमण केले होते . त्यांनी त्यांचा फोन क्रमांक त्या शबनम पिशवीवर पेनाने लिहून दिला आणि सांगितले की काही अडचण आली तर या क्रमांकावर अवश्य फोन कर .तसेच माझे एक आधार कार्ड त्यांच्याकडे पडून होते ते देखील त्यांनी मला सोबत दिले .साधू माणसाने काहीतरी ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे हा त्यांचा अनुभव होता , त्यामुळे मी नकार दिला नाही . खरे तर मी कुठल्याच गोष्टीला होकार किंवा नकार देण्याच्या पलीकडे पोहोचलो होतो . फक्त
तुका म्हणे उगेची रहावे । जे जे होईल ते ते पहावे ॥
ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ॥ असे सर्व सुरू होते . आता पुढे तू ठरव असे सांगून रिक्षामध्ये मला त्यांनी बसवून दिले आणि माझा निरोप घेतला . दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी हे सर्व घडले .
ओला रिक्षा असल्यामुळे पैसे देण्याचा प्रश्न नव्हता .परंतु परिक्रमा काय आहे याची अनुभूती यायला मला त्या रिक्षा पासून सुरुवात झाली कारण पुणे स्थानकावर उतरल्या उतरल्या त्या रिक्षावाल्याने मला उतरून नमस्कार केला आणि नर्मदा परिक्रमेला शुभेच्छा दिल्या !वर पन्नास रुपये दक्षिणा हातावर टेकवली ! सोबत पैसे बाळगायचे नाहीत असा निश्चय करून मी निघालो होतो त्यामुळे पुढे एका याचकाला मी ते पैसे देऊन टाकले .
बाळासाहेब वाल्हेकर यांनी सोबत झोमॅटो वरून मागविलेला एक डबा आणि एक सफरचंद दिलेले होते तेवढे मला जबलपूर पर्यंत पुरवायचे होते !योगायोग असा की अनवाणी पायांनी साधूच्या वेषामध्ये त्या रेल्वेमध्ये बसलेला मी कदाचित आजूबाजूला कोणी बसले असते तर पहिलटकरी साधू म्हणून संकोचलो असतो .परंतु मी बसलो होतो त्या कंपार्टमेंटमध्ये ,एक कानात हेडफोन घालून बसलेला तरुण मुलगा वगळता अन्य कोणीच नव्हते ! त्यामुळे निवांत प्रवास झाला !
समोर बसलेल्या मुलाने माझा एक फोटो काढला आणि म्हणाला तुमचा नंबर सांगा तुम्हाला पाठवितो . मी फोन सोबत आणलेला नाही असे सांगितल्यावर तो म्हणाला तुमच्या एखाद्या मित्राचा नंबर सांगा त्यावर पाठवतो .मग मी पिशवीवर लिहिलेला बाळासाहेबांचा क्रमांक त्याला सांगितला आणि त्याने तो फोटो पाठवून दिला .
एरवी रेल्वेमध्ये येणाऱ्या प्रत्येक पदार्थाचा आस्वाद आवर्जून घेणारा भोगी असा मी आणि आज खिशात दमडी देखील नसल्यामुळे की काय परंतु खरा योगी शोभत होता ! आजूबाजूला कोणीच नसल्यामुळे संपूर्ण प्रवास एकांत वासात आणि चिंतनामध्ये गेला ! कुठलीही मोठी गोष्ट करण्यापूर्वी हे आत्मचिंतन अत्यंत गरजेचे असते ! ते जितके अधिक काळ घडेल तितकी पुढील गोष्ट सुकर होत जाते . आता पुढे कुठे जायचे काय करायचे हे काहीही ठरविले नव्हते ! मुळात नर्मदा परिक्रमा म्हणजे काय ? तिचे नियम काय ?ती कुठून सुरू करतात ? कुठे समाप्त करतात ?हे काहीही मला माहिती नव्हते . माझ्याकडे एकच भांडवल होते ते म्हणजे नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा !
लेखांक तीन समाप्त (क्रमशः)
मागील लेखांक
पुढच्या भागाकडे जा
उत्तर द्याहटवायोगा योग हा कि मलाही मैय्याने परिक्रमा करण्यासाठी याच तारखेला ओंकारेश्वरी बोलवले होते. संकल्प करून व मांधाता परिक्रमा करून दि ३ जाने ला माझ्या कडून परिक्रमा उचलणे घडवले.
उत्तर द्याहटवाAti uttam anubhuti ,maza sathi khas marg darshan.
उत्तर द्याहटवातिचं बोलावणं आलं की आपण आपले राहत नाही असं खूप जण सांगतात. त्यांची प्रचिती आली, प्रशांत. नर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवादेवाच्या इच्छेने वर्णावे |.....दासबोध द4-8-23
उत्तर द्याहटवा