लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !
जबलपूर स्थानकावर उतरलो आणि बाहेर आलो . जबलपूर बद्दल मी खूप वर्षांपासून ऐकून होतो .
सज्जनगडावर येणाऱ्या एक रामदासी साध्वी पूज्य कमलताई पटवर्धन रामदासी यांचा जबलपूर येथे मठ होता .यांनी स्वतः १९७२ / ७३ साली दोन पायी परिक्रमा केलेल्या होत्या व त्यांच्या अनुभूती देखील अलौकिक अशा होत्या . त्यांचा आश्रम कुठे आहे हे मला माहिती नव्हते परंतु "इंद्रपुरी कॉलनी , ग्वारी घाट मार्ग " असा त्यांचा पत्ता माझ्या डोक्यामध्ये पक्का बसलेला होता .मला असे वाटले की जबलपूर स्थानकापासून नर्मदा मातेचा काठ जवळ असेल परंतु चौकशी केली असता असे सांगण्यात आले की तिथून नर्मदा मैयाचा काठ आठ किलोमीटर लांब आहे ! आठ किलोमीटर पायी चालायचे ? असा मोठा प्रश्न मला त्या क्षणी पडला होता हे प्रामाणिकपणे नमूद करतो ! परंतु खिशात दमडी नसल्यामुळे पर्याय देखील नव्हता त्यामुळे शांतपणे ग्वारी घाटचा रस्ता पकडला . वाटेत एक शेअर रिक्षावाला माझ्या शेजारी थांबला आणि मला म्हणाला , " बाबाजी बैठ जाओ । " बाबाजी वगैरे कोणी मला म्हणते आहे अशी अजिबात सवय नव्हती त्यामुळे मौज वाटली आणि मी त्याला म्हणालो , "भैय्या मेरे पास पैसे नही है ।आप जाइये । " तर तो म्हणाला , " बाबाजी आपसे पैसे थोडी ना लेंगे !आप तो परिक्रमावासी है ! " आणि पुन्हा एकदा माझ्या लक्षात आले की हा मार्गच वेगळा असणार आहे ! रेल्वेमध्ये माझ्यासोबत बसलेला मुलगा कटनीचा होता . 'रेस्क्यू ऑपरेशन स्पेशालिस्ट' असा त्याचा 'जॉब' होता . त्याने मला अर्धा डझन केळी घेऊन दिली होती . त्यातील चार मी खाल्ली होती . उरलेली दोन केळी त्या रिक्षावाल्याला देऊन टाकली . घेत नव्हता परंतु प्रसाद म्हणून घे असे सांगितल्यावर त्याने ठेवली . इंद्रपुरी कॉलनी जवळ त्याने मला सोडले .
पूज्य कमलाताई रामदासी मला खूप चांगले ओळखायच्या . मंदार बुवा रामदासी परिक्रमे मध्ये जेव्हा त्यांच्या दर्शनाकरता गेले तेव्हा त्यांना अत्यंत आनंद झाला होता ! त्यांनी सांगितलेले एक एक प्रसंग अनुभव माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते आणि मी एक एक पाऊल त्यांच्या घराच्या दिशेने निघालो होतो . आजन्म नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळलेल्या कमलताई या एक थोर विभूती आहेत .
समर्थांच्या घराण्यातील दहावे वंशज पूज्य बाळासाहेब स्वामी यांचे सोबत कमलताई रामदासी (लाल साडीत) सोबत समर्थ पादुकांच्या पूजनासाठी जमलेली जबलपूर येथील शिष्य मंडळी .
शर्माजी नावाचे त्यांचे एक हिंदी भाषिक शिष्य होते . त्यांनी कमलताई उपाख्य अम्मांची खूप सेवा केली . परंतु एक दिवस अचानक धडधाकट असलेला हा मनुष्य सर्वांना सोडून समर्थ चरणी निघून गेला . आणि जाताना त्याचा बंगला व सर्व मालमत्ता कमलताईंच्या नावावर करून गेला . कमल ताईंचे वय ८० - ८५ असेल . हा शर्माजींचा बंगला म्हणजेच जबलपूर येथील रामदासी मठ होय . जबलपूर शहरामध्ये भरपूर मराठी लोक आहेत व त्यांचे येणे जाणे मठामध्ये सुरू असते . स्थानिक लोक देखील खूप जोडले गेलेले आहेत मठाशी . विशेषतः डॉक्टर चैतन्य ओक आणि सतीश देशपांडे नावाचे दोन शिष्य ब्रह्मचारी राहून कमलताई पटवर्धन यांची मनोभावे सेवा करत असतात . हे सर्वजण आता आपल्याला भेटणार या आनंदामध्ये मी होतो आणि ३६ क्रमांकाच्या बंगल्यासमोर येऊन उभा राहिलो आणि जोरात आरोळी ठोकली जय जय रघुवीर समर्थ ! मला वाटले आता आपली परिक्रमा सुरळीत सुरु होणार ! परंतु बराच वेळ झाला तरी आतून कोणीच आले नाही . थोड्या वेळाने सतीश देशपांडे आले परंतु बंगल्याला आतून कुलूप लावलेले होते . त्यांनी मला सांगितले कमलताई परगावी गेलेल्या आहेत तसेच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे मठ बंद आहे ,तरी दार उघडता येणार नाही . तसेच नर्मदा परिक्रमा देखील बंद झालेली आहे तरी मी ताबडतोब घरी निघून जावे ! हे माझ्यासाठी अनपेक्षित होते कारण सतीश दादा मला खूप चांगले ओळखतो ! मी त्याला विचारले अरे दादा तू मला ओळखले की नाही ? सतीश दादा म्हणाला मी तुला ओळखले आहे परंतु मठाच्या नियमानुसार मी तुला आत्ता आत मध्ये घेऊ शकत नाही ! माझा चांगलाच हिरमोड झाला . तरी मी त्याच्याकडून डॉक्टर चैतन्य ओक यांचा क्रमांक मागून तो टिपून घेतला . कपर्दिकेश्वर मंदिरा मध्ये जा तुला सर्व माहिती कळेल असे त्याने मला सांगितले . तसेच नर्मदा इथून एक दीड किलोमीटर दूर आहे असे देखील सांगितले . थोडे चालल्यावर एका टेलरच्या दुकानातून मी चैतन्य दादाला फोन लावला .
त्याने देखील मला परिक्रमा बंद असून ताबडतोब घरी जा असा सल्ला दिला ! ( याच तीन व्यक्तींविषयी मी या लेखमालेच्या अगदी शेवटी आवर्जून काही अनुभव सांगणार आहे ! ) आता मात्र खरी पंचाईत झाली !
एका क्षणात मला मी निराधार असल्याचे वाटू लागले !
आणि माझ्या लक्षात आले की कुठल्याही जिवाचा आधार मानणे व्यर्थ असून आता केवळ नर्मदा मैयाचाच मला आधार उरलेला आहे ! एक किलोमीटर म्हणता म्हणता मैयाचे दर्शन होईपर्यंत तीन चार किलोमीटर पायपीट झाली ! आधीच उपास घडलेला , त्यात ही पायपीट ,त्यात झालेला अपेक्षाभंग आणि त्यात भरीस भर म्हणून की काय तो २०२२ या आंग्ल नववर्षाचा पहिला दिवस होता , तसेच शनिवार असून अमावस्या देखील होती . त्यामुळे नववर्ष आणि शनी अमावस्या अशी एकत्र पर्वणी साधण्यासाठी नर्मदा नदीच्या काठावर अक्षरशः जत्रा भरली होती ! जागोजागी पोलिसांनी रस्ते बंद केले होते आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये गर्दीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न चालू होता . रस्त्याने चालता सुद्धा येत नव्हते इतकी गर्दी ! गर्दी हळूहळू वाढू लागली . कोणीच विश्वासार्ह वाटत नव्हते ! सर्व लोक जत्रेचा आनंद घेण्यात मश्गुल झालेत असे मला वाटले . शाळेमध्ये एक सुभाषित ऐकले होते ते आठवले .
भो दारिद्र्य नमस्तुभ्यं सिद्धोऽहम् त्वत् प्रसादतः ।
पश्याम्यहं जगत् सर्वम् न मां पश्यति कश्चन ॥
अर्थात कवी उपहासाने दारिद्र्याला म्हणतो अरे दारिद्र्या ! तुला नमस्कार असो ! कारण तुझ्यामुळे मला अशी सिद्धी प्राप्त झाली आहे की मी सर्व जग पाहू शकतो परंतु मी चारचौघांमध्ये असून देखील मला कोणीच पाहत नाही ! माझ्याकडे कोणाचेच लक्ष नाही !
तसेच काहीसे माझे झाले आणि मी धावतच नर्मदा मैया चा काठ गाठला ! मागचा पुढचा कुठलाही विचार न करता नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडी मारली आणि खूप वर्षांनी आपल्या आईला भेटलेले मूल तिच्या गळ्यामध्ये पडून जसे ढसाढसा रडते तसा हमसून हमसून रडू लागलो .
या जगामध्ये आता तुझ्याशिवाय मला कोणीच वाली उरलेला नाही ! आई ! मला वाचव !मला तार ! ह्या जगामध्ये आता तुझ्याशिवाय मला कोणाचाच आधार उरलेला नाही !
समर्थ रामदास स्वामी जेव्हा सर्वस्वाचा त्याग करून तपस्येसाठी निघून गेले तेव्हा रामचंद्राला ते म्हणतात ,
रामचंद्रा तुझा वियोग । ऐसा नको रे प्रसंग । तुज कारणे सर्व संग । त्यक्त केला ॥
अरे रामा ! तुझे स्वामीत्व स्वीकारून तुझ्या नावाने मी माझ्या घरादाराचा , सर्वस्वाचा त्याग करून आलेलो आहे रे ! तू मला भेटला नाहीस असे करू नकोस !नाहीतर मी कुठलाच उरणार नाही ...
अगदी हाच भाव माझ्या प्रार्थनेमध्ये होता . सर्व लोक आजूबाजूला स्नान करत होते . कोणी फोटो काढत होते . कोणी हास्यविनोद करत होते .कोणी भोजन प्रसाद घेत होते . कोणी पितरांना तर्पण करत होते . कुणी नौका विहार करत होते . मी एकटाच माझ्या आईला बिलगून बसलो होतो . दिवस थंडीचे होते आणि पाणी अतिशय थंड होते . परंतु बाहेरचा एकाकीपणा मला इतका बोचत होता की त्यापुढे ते थंड पाणी देखील मला उबदार वाटू लागले होते ! इतक्यात कानावर आवाज पडला , नर्मदे हर ! मी प्रत्युत्तर दिले , "नर्मदे हर ! " भगवी वस्त्रे घातलेला पांढरीशुभ्र दाढी असलेला एक गोरापान साधू माझ्या दिशेने आला आणि म्हणाला , " चेला , परिक्रमा मे हो क्या ? " मी म्हणालो , "नही बाबाजी ,अब तक शुरू नही की । लेकिन परिक्रमा करनी है । " "कहा से उठाओगे परिक्रमा ? " " पता नही बाबाजी । जैसी मैया की इच्छा ।" मी उत्तरलो . साधूच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू बदलू लागले . " साथ मे क्या लाये हो ? " मला या प्रश्नाचा अर्थ कळला नाही . मी म्हणालो ,"यह जो वस्त्र पहना है उतनाही लेकर आया हु घर से । " साधू बुचकळ्यात पडला आणि मला म्हणाला , "और कुछ नही लाये साथ मे ? झोला , कपडे , पैसे ,जूते ? इतने कडाके की ठंड मे मर जाओगे ! संकल्प छोडने के लिए , मुंडन करने के लिए , नावडी से समंदर पार करने के लिए , कढाई करने के लिये पैसा तो लगेगा ना ? कैसे करोगे यह सब ?" मी म्हणालो , "वह मुझे कुछ पता नही बाबाजी ।अपने को बस परिक्रमा करनी है । "
साधूच्या डोळ्यात चमक दिसली ! एका क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचे सर्व भाव बदलून गेले ! आणि मला म्हणाला , "तुम तो कह रहे हो तुम साथ में कुछ नही लाये । "
" जी बाबाजी । "
"और बोल रहे हो की परिक्रमा करने की इच्छा है । "
" हाँ बाबाजी । बहुत तीव्र इच्छा है। "
मोठ्यांदा हसत साधू मला म्हणाला , " झुठा कही का ! सब कुछ तो लेकर आये हो साथ में ! नर्मदा माई की परिक्रमा करने के लिए और क्या लगता है ? बस तुम्हारी इच्छा हो और उसका बुलावा आना चाहिये ! "
त्यांच्या या उत्तराने मला अतोनात आनंद झाला ! दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ! आनंदाने मी पाण्यामध्ये उड्या मारू लागलो ! तो ही काठावर नाचू लागला ! आणि ओरडू लागला ,
" जय हो माई की ! चिंता काहे की ? "
पुढच्या भागाकडे जा
उत्तर द्याहटवाहे सगळं लिहून काढण्यासाठी वेळ दिल्याबद्दल खूप आभार. साधकांना अशा लिखाणाने खूप मदत होते. एकाच वेळी आत्मपरीक्षण आणि श्रद्धा ह्या दोन्हींसाठी बळ आणि उत्तेजन मिळत राहतं. श्री गुरुदेव दत्त. नर्मदे हर हर.
उत्तर द्याहटवामुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . नर्मदे हर !
हटवाखुप सुंदर वर्णन,जणू काही आम्ही नर्मद काठावर आहोत असे वाटते
उत्तर द्याहटवा