लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश
घाटाची लांबी इतकी आहे की चालून चालून मनुष्य कंटाळतो परंतु घाट संपत नाही . आणि इतका लांब घाट असून देखील प्रत्येक फुटावर कोणी ना कोणी नर्मदा नदीमध्ये स्नान करताना तुमच्या दृष्टीपथास पडते . या घाटावर नेहमीच गर्दी राहते . घाटावर अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत .
नर्मदा नदीच्या मधोमध एक बेट असून तिथे देखील मंदिर आहे . समोरच्या काठावर एक मोठा गुरुद्वारा आहे . पांढरा शुभ्र गुरुद्वारा आपले लक्ष वेधून घेतो .शेजारीच एका पंडिताची गोशाळा असून तिथे अतिशय भव्य अशी "नमामि देवी नर्मदे । " अशी अक्षरे रात्रंदिवस विजेच्या लखलखाटामध्ये झळकत असतात आणि ती खूप सुंदर दिसतात .
घाटावर तर्पण , श्राद्ध कर्म व अन्य नैमित्तिक कर्मे करणाऱ्या ब्राह्मणांची लगबग सदैव सुरू असते . पंडित या शब्दाचा अपभ्रंश पंड्या .इथे पुजाऱ्यांना पंड्या म्हणायची पद्धत आहे . लोटी वाला पंडा ,पाच नारियल वाले पंडे , तलवार वाले पंडे ,छाता वाले पंडे ,त्रिशूल वाले पंडा , हाथी वाले पंडे अशी आपल्या कुळाची ओळख ते मिरवत असतात . अशी १४ विविध घराणी इथे आहेत व आपापला ट्रेडमार्क दिमाखात मिरवीत आहेत .पूजेसाठी येणारा बहुसंख्य समाज हा अशिक्षित असल्यामुळे व अनेक वर्षांनी येत असल्यामुळे आपला पंडित कुठला होता त्याचे नाव कदाचित ते विसरले तरी चिन्ह मात्र लक्षात ठेवतात की तलवार वाला हमारा पंडा है! त्यामुळे गादीवर आजोबा बसोत , वडील बसोत किंवा मुलगा बसो , माणूस योग्य त्या घराण्याकडे येतो . या पंडितांचा इतिहास मोठा रंजक आहे १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात सक्रिय सहभाग घेतला म्हणून इंग्रज जागोजागी ब्राह्मण समाजाच्या मागे हात धुवून लागले होते त्या काळामध्ये काशी परिसरातील ब्राह्मण नर्मदे काठी असलेल्या गोंडवन या जंगल परिसरामध्ये लपण्याकरता म्हणून येऊन राहिले .तेच पुढे इथे स्थिरावले .त्यांनी केलेली मोठी कामगिरी म्हणजे ते इथे आले तेव्हापासून आसपासच्या गावानुसार ,जिल्ह्या नुसार , गल्लीनुसार ,जातीनुसार अशी त्यांनी रीतसर वर्गवारी करून लोकांच्या वंशावळीची लेखी नोंद ठेवलेली आहे .
या सर्वांच्या ठरलेल्या पिढीजात जागा असून तिथे एक लाकडी / लोखंडी खाटा टाकून नर्मदा मातेची मूर्ती ठेवून ते बसलेले असतात . लोक आपल्या ठरलेल्या वंशपरंपरागत पंड्याकडेच पूजेसाठी जातात .एकदा त्यांच्याकडे आलेला मनुष्य कुठल्याही गावचा असू दे त्याला हे ब्राह्मण कधीच विसरत नाहीत ,अशी अद्भुत सिद्धी त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे येणाऱ्या यजमानांची सर्व लिखापढी मोठमोठ्या पेटाऱ्यांमध्ये ठेवलेल्या चोपड्यांमध्ये व्यवस्थित ठेवलेली असते .परंतु एखादा नवीन मनुष्य आला तर मात्र त्याला आपल्याकडे खेचण्यासाठी या पंड्यांची मजेशीर स्पर्धा चालू असते !
अशा रम्य सकाळी नर्मदा मातेमध्ये जाऊन स्नान करणे हा एक अलौकिक अनुभव असतो . दिवसभर प्रदूषित झालेले पाणी आता वाहून गेलेले असते आणि अतिशय ताजे स्वच्छ निर्मळ जल घेऊन ती आपली वाट पाहत असते ! शरीराचा , मनाचा , चित्ताचा ,बुद्धीचा मळ अंतर्बाह्य धुवून टाकणारी ही जणू कामधेनुच होय !
ग्वारीवारी घाटावरील सूर्यास्ताची वेगळीच मजा आहे ! दिवसभर आग ओतून अंगाची लाही लाही करणारा सूर्यनारायण संध्याकाळी मात्र अचानक शांत होऊ लागतो ! गोशाळे जवळील नमामि देवी नर्मदे या अक्षरांच्या मागे हळूहळू लपणारा भास्कर आकाशामध्ये जबरदस्त भगव्या रंगाची उधळण करतो। . आणि जणू सांगत असतो की दिवसभर तुम्ही कुठल्याही रंगात रंगा ! तुमचा आरंभ आणि शेवट केवळ भगव्याचा रंगात होणार आहे !
रात्र होता क्षणीच हाच ग्वारी घाट जणु क्षणात आपले अंग झटकतो आणि सर्व रंग इथे परततात !आपल्या मानवी डोळ्यांना दिसू शकणाऱ्या सर्व रंगांची उधळण येथे मुक्तहस्ताने होत असते !
पंडे ,न्हावी , साधू , संधीसाधू ,मुलेबाळे ,तरुण-तरुणी , प्रेमीयुगूले , नवविवाहित ,जराजर्जर , भिकारी ,पर्यटक ,विदेशी पर्यटक , हौसे , नवसे ,गवशे , चोर ,परिक्रमावासी , नावाडी , मच्छीमार , धुणे धुणाऱ्या बायका , पोलीस , पोहणारी लहान मुले , रिकाम टेकडे , दारुडे , गांजाडे , नशेडी , भाविक भक्त अशा सर्वांनी हा घाट सदैव गजबजलेला असतो .सर्वांशी नर्मदा मैया चा व्यवहार एकसारखाच असतो ! कोणी कशाही दृष्टीने तिच्याकडे पाहू दे ती मात्र सर्वांकडे कृपादृष्टीनेच पाहते !
मासे , कासव , कुत्री , गाई , म्हशी ,शेळ्या ,मेंढ्या आणि सायबेरियावरून स्थलांतर करून येणारे सायबेरियन सीगल पक्षी या सर्वांना इथे भरपूर अन्न उपलब्ध आहे !
पांढऱ्या शुभ्र रंगाचे सायबेरियन सीगल पक्षी हजारोंच्या संख्येने इथे पाहायला मिळतात . विशेषतः नर्मदेच्या विशिष्ट रंगाच्या पाण्यामध्ये त्यांचे पांढरे शुभ्र पोहणारे थवे अतिशय मनोहारी दिसतात .
लोक या पक्षांना शेव व अन्य पदार्थ खायला घालतात . असा खायला घालणारा कोणी दिसला की हे पक्षी सर्व भीती ,लाज ,लज्जा सोडून त्या माणसावर अक्षरशः तुटून पडतात ! हे पक्षी दुरून लहान दिसत असते तरी जवळ आल्यावर लक्षात येते की आकाराने खूप मोठे आहेत . यांचा कलकलाट सतत या घाटावर ऐकू येत असतो .
काश्मीरच्या दल सरोवरातील शिकारा नौकांची आठवण यावी अशा पद्धतीने सजविलेल्या शेकडो नावा हे ग्वारी घाटाचे अजून एक वैशिष्ट्य आहे ! अशा रंगीबेरंगी नावांनी हा किनारा कायम गजबजलेला असतो . या नावे मध्ये बसून लोक मधल्या बेटावर जातात किंवा समोरच्या गुरुद्वारापर्यंत जाऊन येतात . काही लोक केवळ पक्षांना आणि माशांना खायला घालण्यासाठी नावेचा वापर करतात .
या घाटाचे दिवसाच्या प्रत्येक वेळी एक वेगळेच सौंदर्य आहे. पहाटे सूर्योदयाच्या वेळी हा घाट एखाद्या शांत तपस्व्या प्रमाणे भासतो . नर्मदेच्या पाण्यावरून हलके वाहणारे धुके ,पक्षांचा किलबिल किलबिल आवाज ,मंदिरात वाजणाऱ्या घंटा आणि शंख यांचे आवाज ,ढगांशी स्पर्धा करत उगवण्याचा प्रयत्न करणारा सूर्यदेव ,पाण्यातून गाणे म्हणत निघालेला एखादा केवट अर्थात नावाडी , आणि कानांना हळुवारपणे ऐकू येणारा नर्मदेचा खळखळ आवाज ! असे वाटते परिक्रमा करूच नाही ! हेच दृश्य पाहत आयुष्यभर तिथे बसून राहावे !
जस जशा संध्या छाया गडद होऊ लागतात तसं तसे स्नान करणारे लोक , इकडे तिकडे विहार करणाऱ्या नौका हे सर्व हळूहळू आपापल्या मूळ स्थानी परततात .आणि मग तीच अवखळ चंचळ नर्मदा मैया थोडीशी धीर गंभीर वाटू लागते !
वाराणसी येथे ज्याप्रमाणे गंगामैया ची आरती केली जाते अगदी त्याच धरतीवर ग्वारी घाटावर देखील नर्मदा मातेची भव्य दिव्य आरती केली जाते ! हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो ! अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जबलपूर गावातील पंडित घराण्यातील ठरलेले मानाचे लोक ही आरती करतात .
त्यांच्या वेशभूषेमध्ये , केशभूषेमध्ये , हालचालींमध्ये ,नजाकतीमध्ये आणि सर्व उपचारांमध्ये कमालीची समानता असते व हे पाहून डोळ्यांना खूप आनंद वाटतो ! ही आरती पाहण्यासाठी अक्षरशः हजारो लोक रोज उपस्थित असतात .
तसेच कुणी विशेष पाहुणे आले असतील तर त्यांच्या हस्ते देखील एक छोटी आरती केली जाते . शक्यतो हे पाहुणे त्या दिवशीच्या आरतीचा सर्व खर्च उचलतात व सर्व प्रसाद , तीर्थ , खीर ,दूध जे काही वाटले जाईल त्याचा भार स्वतःच्या माथ्यावर घेतात . परंतु हा भार मानला जात नाही तर तेवढे पुण्य आपल्या खात्यावर जमा झाले असा त्यांचा भाव असतो !
विशेषतः एखादा परिक्रमावासी आला तर त्याला अतिशय आदराने आरती मध्ये सम्मिलित करून घेतले जाते व व्हीआयपींच्या देखील पुढे बसायला जागा दिली जाते ! परिक्रमावासींचा संपूर्ण नर्मदा खंडामध्ये अतिशय मान राखला जातो ! साक्षात देवाच्या खालोखाल तुम्हाला मान दिला जातो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही ! त्यामुळे परिक्रमावासी ची जबाबदारी कित्येक पटीने वाढते ! असो .
लेखांक पाच समाप्त (क्रमशः)
मागील लेखांक
पुढील लेखांकमागील लेखांक
माँ नर्मदा, जबलपुर को जीवन देती है।
उत्तर द्याहटवाग्वारीघाट की इतनी महत्वपूर्ण व्याख्या करने के लिए आपको कोटि कोटि नमन।
नर्मदे हर हर
पुढच्या भागाकडे जा
उत्तर द्याहटवाwwachtey khup chan
उत्तर द्याहटवामैय्याच्या नयनरम्य आरती नंतर घेतली जाणारी सामुदायीक मैय्येचे पात्र स्वच्छ ठेवण्या संबंधी शपथ ही प्रत्येक जण आत्मियतेने घेत असल्याचे पाहून मी तर भाराऊन गेलो होतो. आपल्याला हा शपथ ग्रहण सोहळा अनुभवता नाही कां आला ?
उत्तर द्याहटवाग्वारी घाटाचे यथार्थ वर्णन!
उत्तर द्याहटवाइथल्या पंड्यांच्या बद्दलचा इतिहास नव्याने कळला. साधारणत: स्थानिक लुटालूट करणारे अशीच ओळख स्थानिक उपाध्याय किंवा पंडे लोकांची करून दिली जाते. पण बहूतेकवेळा त्या तीर्थक्षेत्रामधलं क्षेत्रत्व जपण्याचं काम हीच लोकं करताना दिसली आहेत. पंढरीच्या विठूरायाची मूर्ती असो किंवा बाबा केदारनाथांच्या, बद्रीनाथांच्या पालखीच प्रस्थान असो. तिन्हीही ऋतूत तितक्याच निष्ठेने करणं अवघड आहे.
आणि त्या केवट आणि नंभिक बंधूंची सेवा खरंच डोळ्यात पाणि आणते. सगळी मैय्याची लेकरं पूजनीय आहेत. नर्मदे हर 🙏