लेखांक १ : नर्मदे हर !

नर्मदे हर ! परमहंस परिव्राजकाचार्य अवधूतानंद महाराज अर्थात पूर्वाश्रमीचे श्री जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेले नर्मदे ss हर हर हे पुस्तक वाचल्यापासून नर्मदा जलाचा खळखळाट कानाला रुंजी घालत होता .कृष्णमेघ आणि चैतन्य हे त्यांचे दोन्ही चिरंजीव मुलखाचे अवलिया आणि कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यामुळे खात्री होती की पुस्तकातले अनुभव बऱ्यापैकी अद्भुत आणि सत्य असणार . माझ्याकडे नर्मदे हर या पुस्तकाची स्वतः कुंटे यांनी स्वाक्षरी केलेली प्रत आहे !
प.प. अवधूतानंद महाराज ( पूर्वाश्रमीचे श्री जगन्नाथ कुंटे )
अवधूतानंद स्वामी यांची स्वाक्षरी असलेली प्रत

परंतु खरे सांगायचे तर त्यातील काही गोष्टी ह्या अतिरंजीत आहेत असे मला विनाकारण वाटायचे .तसेच त्यांनी पुस्तक मेधा पाटकर यांना अर्पण केले होते ते देखील मला मान्य नव्हते , कारण मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात मेधा पाटकर यांच्याबरोबर जवळून काम केलेले होते व त्यांच्या कामाचे "खरे गमक " मला पक्के उमगल्यामुळे मी त्या कामातून बाहेर पडलो होतो .  त्यांची बाकीची अनेक पुस्तके देखील मी वाचली आहेत . परंतु नर्मदे हर या पुस्तकातील त्यांचे अनुभव हे जास्त हृदयस्पर्शी वाटायचे . आणि त्यांच्या ओघवत्या भाषा शैलीमुळे आपण स्वतः तिथे राहून तो अनुभव जगतो आहोत असे वाटायचे .काहीही म्हणा परंतु नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा कोणाच्याही मनामध्ये सहज उत्पन्न करणारे हे पुस्तक आहे हे कोणी देखील मान्य करेल . 

ह्या पुस्तकामुळे नर्मदा परिक्रमेतील मराठी टक्का निर्विवादपणे वाढला आहे

माझ्या मावशीची एक घनिष्ट मैत्रीण सौ माया दिवाण यांनी देखील दोन परिक्रमा केल्या होत्या व त्यातील एक परिक्रमा पायी आणि एकटीने केली होती त्याचे अनुभव देखील तिने मला खूप सांगितले होते .ते अनुभव ऐकून खूप अद्भुत आणि जबरदस्त वाटले होते .त्या अनुभव कथनामुळे देखील नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा झाली होती .सज्जनगडावरील एक तरुण रामदासी मंदार बुवा रामदासी यांनी देखील दरम्यानच्या काळात ९२ दिवसाची शीघ्र नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती व त्यांचे देखील अलौकिक अनुभव सज्जनगडावर बसून ऐकण्याचा योग आला होता . तेव्हा देखील असे वाटले होते की आपण कधी ही परिक्रमा करणार कोण जाणे .

       समर्थ भक्त मंदार बुवा रामदासी (दादेगाव )
मला अनेक साधुसंतांचा सहवास परमेश्वरी कृपेने आजवर लाभला आहे .परंतु देहधारी सद्गुरूंचा सहवास लाभणे यासारखे भाग्य नसते .त्या बाबतीत देखील मी भरपूर श्रीमंत आहे . माझे सद्गुरु देहात असताना त्यांचा पुरेपूर सहवास मला लाभलेला आहे .बडोदा येथील थोर संत श्री जनार्दन स्वामी खेर यांच्या सहवासामध्ये असताना मी त्यांना परिक्रमेविषयी विचारले होते . 

बडोदा जिल्ह्यातून नर्मदा नदी वाहत असल्यामुळे परमपूज्य स्वामींना नर्मदेविषयी विशेष आकर्षण आणि ओढ नेहमीच होती .
श्री नाना महाराज तराणेकर आणि टेंबे स्वामी
श्री रंगावधूत महाराज आणि टेंबे स्वामी

त्यांनी मला परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती उपाख्य श्री टेंबे स्वामी महाराज , श्री नाना महाराज तराणेकर इंदोर आणि बापजी श्रीरंगावधूत महाराज नारेश्वर यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमांविषयी माहिती सांगितली होती .आणि शक्य होईल त्या प्रत्येकाने नर्मदा परिक्रमा केलीच पाहिजे हे सांगितलं होतं .ही सर्व दत्त संप्रदायातील अतिशय थोर विभूतीमत्वे आहेत . जनार्दन स्वामींचे गुरु म्हणजे नाना महाराज तराणेकर . रंगावधूत महाराज देखील याच परंपरेतील .आणि या तिघांवर अनुग्रह केला होता टेंबे स्वामींनी !थोडक्यात माझ्या गुरु परंपरेतील या सर्व लोकांनी नर्मदा परिक्रमा आवर्जून केली होती !मी माझे भाग्य समजतो की मला अशा थोर विभूती मत्त्वाचा ऐन तारुण्यात सदेह सहवास लाभला !
परमपूज्य जनार्दन स्वामी यांच्या सेवेत प्रस्तुत लेखक
सद्गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांच्या लेखा कोण करी
 बारामतीचे राहणारे व निवृत्त आरटीओ कमिशनर असणारे श्री पांडकर साहेब हे देखील माझे चांगले परिचित आहेत व आम्ही हिमालयामध्ये एकत्र ट्रेकिंग साठी गेलो असताना त्यांनी मला एकत्र नर्मदा परिक्रमा करण्याविषयी सुचविले होते . चालत नाही जमली तरी किमान सायकलने ही परिक्रमा करूयात असा त्यांचा आग्रह होता . आणि मला ती कल्पना आवडली होती परंतु मनोमन असे वाटायचे की नर्मदा परिक्रमा आयुष्यात पहिल्यांदा केली तर ती पायीच करावी सायकलने करू नये . या एकाच मुद्द्यावर आमचा किरकोळ तात्विक मतभेद होता . परंतु परिक्रमा करण्याची इच्छा मात्र तीव्र होत चालली होती . 

माझा एक लाडका मामे भाऊ आहे , वेदमूर्ती प्रीतेश दावलभक्त . त्याला भेटण्याकरिता गेलो होतो तेव्हा कळले की ह्याने देखील अतिशय सुंदर अशी पायी नर्मदा परिक्रमा केली आहे . त्याचे देखील अनुभव ऐकले आणि मन पुन्हा एकदा नर्मदा खंडामध्ये विहार करू लागले !

    २०१३ मध्ये नर्मदा परिक्रमा करणारे माझे बंधू                   वेदमूर्ती प्रीतेश दावलभक्त गुरुजी

 मी माझे केस स्वतः घरी कापतो . लॉकडाऊन लागल्यापासून मी ती सवय करून घेतली आणि स्वतः आरशाशिवाय यंत्राने मी माझे केस उत्तम कापतो ! परंतु असे असून देखील एक दिवस मी रस्त्याने असाच जात असताना एक अतिशय हाय फाय एसी युनिसेक्स सलून मला दिसले .सिजर्स नावाचे हे सलून बिबवेवाडी मध्ये भगली हॉस्पिटल रस्त्यावर आहे . अशा कुठल्या सलून मध्ये मी आयुष्यात कधी जाण्याची शक्यताच नाही परंतु असे असून देखील मला असे उगाच वाटले की आपण या सलून मध्ये आत्ता जावे आणि केस कापून घ्यावेत !

एकदा केस कापले की महिनाभर केस दाढीकडे मी पुन्हा लक्ष देत नाही आणि पुढच्या वेळी केस कापताना जे काय कापाकापी करायची असेल ती करून घेतो . आपल्या जिवंत मानवी शरीरामध्ये दोन मृत अवयव आहेत ,त्यातील एक म्हणजे केस आणि दुसरा म्हणजे नखे . त्यामुळे या दोघांची सर्वसामान्य स्वच्छता वगळता फारशी काळजी घेणे मला आवडत नाही आणि तशी काळजी , रंगरंगोटी , स्टाईल्स प्रमाणाबाहेर व विनाकारण करून घेणारी माणसे ही मला थोडीशी दांभिकच वाटतात ! असो . या सलून मध्ये गेल्यावर तिथले मालक वैभव दळवी हे शक्यतो कोणाचे केस कापत नाहीत . गल्ल्यावर बसलेले असतात . आणि त्यांची माणसे केस कापत असतात . अगदीच फार गर्दी असेल तर ते स्वतः काही ठराविक लोकांचे केस कापून देतात . 
 
श्री वैभव दळवी आपल्या केशकर्तनालयामध्ये

परंतु त्या दिवशी फारशी गर्दी नसताना ते स्वतः माझे केस कापायला आले . आणि केसाला कात्री लावल्या लावल्या त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला तुम्ही नर्मदा परिक्रमा केली आहे का ? हा प्रश्न माझ्यासाठी त्या ठिकाणी अतिशय अनपेक्षित असाच होता ! कारण माझ्या डोक्यामध्ये नर्मदा परिक्रमेविषयी विचार चालू आहेत हे माझ्या काही जवळच्या मोजक्या मित्रांना सोडले तर कोणालाच माहिती नव्हते अगदी घरी सुद्धा माहिती नव्हते ! कारण पाच सहा महिने घरापासून लांब राहायचे अशी परवानगी तरुण वयामध्ये घरून मिळण्याची शक्यता अतिशय दुरापास्तच आहे !
 या प्रश्नाने मी एकदम चमकलो आणि त्यांना म्हणालो तुम्ही मला असे का विचारत आहात ? ते म्हणाले मला असे वाटले की तुम्हाला हा प्रश्न विचारावा . मी विचारले तुमचा काय अनुभव आहे नर्मदा परिक्रमे विषयी ? ते म्हणाले मी नुकतीच नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण करून आलो आहे ! झाले ! मी त्यांना अनुभव विचारले आणि केस कापता कापता त्यांनी एक एक अनुभव सांगायला सुरुवात केली ! 
श्री वैभव दळवी यांच्या परिक्रमातील काही क्षण खालील प्रमाणे



(प्रस्तुत लेखक धूम्रपानाचा तीव्र निषेध करतात याची कृपया नोंद घ्यावी)







ते अनुभव कथन इतके रंजक होते की संपूच नये असे वाटत होते , त्यामुळे केस कापून झाल्यावर मी त्यांना दाढी सुद्धा करायला सांगितली जेणेकरून अजून वेळ मिळेल ! अशा पद्धतीने सर्व करून झाल्यावर ते मला म्हणाले तुम्ही नर्मदा परिक्रमा अवश्य करा ! मला हा एक प्रकारे नर्मदा मातेकडून आलेला संकेतच वाटला! 




लेखांक एक समाप्त (क्रमशः)
मागील लेखांक

टिप्पण्या

  1. नर्मदे हर जीवन भर, छान, लेखनाचा श्री गणेशा छानच केलात, उत्सुकता वाढली.

    उत्तर द्याहटवा
  2. मेधा पाटकर यांचेविषयी तुमच्या मताशी मी सहमत आहे.
    वैभव दळवी यांच्याशी माझीही भेट झाली होती पण ती माझ्या तीन नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर.

    उत्तर द्याहटवा
  3. माझा मुलगा अभिजित ज्ञानप्रबोधिनी सहनिवासात तुम्ही तेथे असताना रहात होता.कदाचित आठवत असेल तुम्हाला.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अडकर काका ! साष्टांग नमस्कार ! काका अभिजीतच्या च खोलीमध्ये मी राहायचो ! माझे मराठी सुधारण्यामध्ये अभिजीतचा हात आहे आणि मला जंगलांची आवड तुमच्यामुळे निर्माण झाली काका ! तुम्ही आम्हाला जंगलातील तुमचे जीवन या विषयावर मार्गदर्शन केले होते ! अभिजीत पण तुमचे किस्से सतत सांगायचा ! त्यामुळे मी तिथून पुढे शाळेमध्ये मी कोण होणार असा निबंधाचा विषय आला की वन अधिकारी असे लिहायचो आणि त्यावेळी तुम्ही माझ्या डोळ्यासमोर असायचात ! तुम्हाला साष्टांग नमस्कार ! नर्मदे हर !

      हटवा
  4. माई कोणाकडून मॅसेज पाठवेल सांगता येत नाही 😃. केवळ अनाकलनीय आणि अद्भुत 🙏 नर्मदे हर l

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर