नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...


नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो .
९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा ! 
२५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो .

सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला . तोल गेला की कपाळमोक्ष निश्चित ! अशा ज्या पारंपारिक मार्गाने केवळ एक टक्का परिक्रमावासी व नागा साधू जातात ,त्या मार्गाची ही एक डोळस अंतर्यात्रा ... 


परिक्रमेदरम्यान रोज रात्री थोडेसे लिहून ठेवायचो मगच पाठ टेकायचो.अशा चार वह्या भरल्या .खरे सांगायचे तर अनुभव कथन हा शब्द चुकीचा आहे कारण अनुभव हा सापेक्ष असतो .परंतु सर्वजण मागे लागल्यामुळे त्यातील निवडक भाग सर्वांसाठी मांडतो आहे . हेतू हाच की त्यामुळे नर्मदा परिक्रमा नक्की कशी असते ते लक्षात यावे .
ही लेखमाला वाचून तुम्हाला नर्मदेविषयीच्या पौराणिक , ऐतिहासिक , भौगोलिक , नैसर्गिक , अध्यात्मिक ,पर्यावरण विषयक , आयुर्वेदिक , सामाजिक , सांस्कृतिक ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय ,  स्थानिक , भाषीक , शास्त्रीय , राजकीय , दैवी , दुर्दैवी अशा अनेक अंगांची तोंड ओळख निश्चितपणे होणार आहे . प्रत्येकाला नर्मदा परिक्रमा करता येणे शक्य होईलच असे नाही . परंतु ही लेख माला वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानस परिक्रमा नक्की घडेल असा विश्वास वाटतो .

कलीयुगात अनेक देव आहेत परंतु ते प्रत्येक उपासकाला दिसतीलच असे नाही . नर्मदा मात्र अशी एकमेव देवता आहे जी साक्षात तुमच्यासमोर प्रकट रुपाने वहाते आहे .
आणि तिचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाला ती अनुभूती देतेच . देते म्हणजे देतेच !

नर्मदे काठी बसून घराचे , प्रपंचाचे , कामाचे स्मरण करण्यापेक्षा प्रपंचामध्ये राहूनच , घरामध्ये बसूनच , सर्व कामे करता करताच अंतःकरणापासून नर्मदेच्या काठाचे चिंतन करणे कधीही श्रेष्ठ !


चला तर मग ! मनातील सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून आपण सर्वजण मिळून पुन्हा एकदा करूयात . . . नर्मदा परिक्रमा

 नर्मदे हर !
हर हर नर्मदे !
(वाचनाचा अधिक आनंद मिळवण्यासाठी कृपया सर्व लेख क्रमानुसार वाचावेत . प्रत्येक लेखाच्या आरंभी आणि शेवटी लेखांक दिलेला आहे .
टीप : मला एक डायरी व पेन फुकट देऊन लिहीण्यास प्रवृत्त करणारा अज्ञात दुकानदार व जाता येता " बाबा जी एक फोटू " म्हणत फोटो काढून मित्राच्या तोंडपाठ क्रमांकावर पाठविणाऱ्या शेकडो नर्मदातट वासी छायाचित्रकारांचे विशेष आभार मानले पाहीजेत . नुसत्या वर्णनाने प्रसंगचित्र उभे करण्या इतकी प्रज्ञा या पामरा जवळ खचितच नाही . चित्रे ते काम सोपे करतात .
 )

हाच लेख ऑडिओ स्वरूपात ऐकण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  (टीप : सदर ऑडिओ ची गती कमी किंवा जास्त करण्याची सोय युट्युब मध्ये असते तिचा वापर करावा )


नर्मदा कधी शांत असते तर कधी प्रफुल्लित !
त्या ठिकाणी उसळणारे तिचे खळाळते जल पाहून मग हृदयांतर्यामी वास करणारी सरस्वती देखील उफाळून येते आणि त्या नर्मदा मातेचे गुणगान करू लागते !


तुषारसागरे खळाळत्या जलात शोभते ।

धुवून द्वेषपाप हो जिचे सलील टाकते ।

मरावयास भीती त्या भयास पूर्ण भेदिते ।

नमू तुझ्या पदारविंदी माय देवी नर्मदे ॥


नर्मदे हर ! मातुगंगे हर ! जटाशंकरी हर! ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव ! 

पुढील लेखांक

टिप्पण्या

  1. श्री राम समर्थ, नर्मदे हर जीवन भर, सुंदर, आमचीही मानस श्री नर्मदा मय्या ची परीकरमा घडली. धन्यवाद. नर्मदे हर जीवन भर

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. बहुतेक तुम्ही पूर्ण ब्लॉग वाचलेला दिसत नाही . लेखकाने प्रत्येक फोटोच्या आधी उल्लेख केलेला आहे की कोणी फोटो काढला आणि कोणाच्या क्रमांकावर पाठवून दिला . वाटेमध्ये लोक फोटो काढायचे आणि त्यांच्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून द्यायचे .

      हटवा
    2. संपूर्ण वाचणारे कमीजण, चाळणारे खूपजण

      हटवा
  3. मला एक डायरी व पेन फुकट देऊन लिहीण्यास प्रवृत्त करणारा अज्ञात दुकानदार व जाता येता " बाबा जी एक फोटू " म्हणत फोटो काढून मित्राच्या तोंडपाठ क्रमांकावर पाठविणाऱ्या शेकडो नर्मदातट वासी छायाचित्रकारांचे विशेष आभार मानले पाहीजेत . नुसत्या वर्णनाने प्रसंगचित्र उभे करण्या इतकी प्रज्ञा या पामरा जवळ खचितच नाही . चित्रे ते काम सोपे करतात .

    उत्तर द्याहटवा
  4. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. https://mazinarmadaparikrama.blogspot.com/2023/01/blog-post_24.html?m=1

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. या पध्दतीने प्रत्येक भागाच्या शेवटी “पुढचा भाग” असे म्हणून लिंक टाकल्यास वाचकांना सोपे जाईल असे वाटते.

      हटवा
  6. तुमचा लेख वाचून, तो वाचन
    करणाऱ्या व्यक्तीला, परकाया प्रवेश करून जणू आपणच परिक्रमा करत आहोत असे वाटते.
    नर्मदे हर हर🤝

    उत्तर द्याहटवा
  7. नर्मदे हर!! आपले सर्व लेख वाचले. ५६ भाषा ही नवीनच गोष्ट कळाली आपल्यामुळे

    उत्तर द्याहटवा
  8. मानापसून अभिनंदन मित्रा!

    उत्तर द्याहटवा
  9. नर्मदे हर ! जिंदगी भर 🙌🙌
    मैय्याला काहीजण तरल ब्रह्म म्हणतात ते काही खोटे नाही. लेख अप्रतिम!
    अनुभव माईच्या किनाऱ्यावर नेउन आणणारा.

    उत्तर द्याहटवा
  10. नर्मदे हर
    मि मागील 5/6 दिवसापासून आपला ब्लोग वाचत आहे , दररोज असे वाटत असे कि मि स्वतः नर्मदा परिक्रमा करत आहे ,तुम्ही जे तुमच्या परिक्रमेचे जीवन्त निरुपण केले आहे ते अद्भुत आहे . अगदी असे वाटत होते वाचताना कि जणु नर्मदा माता आपल्या सोबत आहे .
    आज 91 वा ब्लोग वाचला ,आता पुढील भागाची प्रतिक्षा आहे .
    नर्मदे हर

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नर्मदे हर ! तिचे स्मरण केले की ती आपल्या सोबत असतेच ! ती स्मर्तृगामी आहे .

      हटवा
  11. श्री गुण्ये, गो. नि. दांडेकर आणि कै. जगन्नाथ कुंटे यांची पुस्तके तसंच माई चितळे आणि इतर बरेच व्हिडीओ पाहून नर्मदा परिक्रमा करायची इच्छा 2007 पासून माझ्या मनात होती पण योग येत नव्हता शेवटी निर्धार करून घरच्या लोकांची नाराजी पत्करून नुकताच नोकरीचा राजीनामा दिला पण राजीनामा स्वीकारण्या ऐवजी ऑफिसने परिक्रमेसाठी लागेल तितकी रजा घेऊन परत जॉईन करा असं सांगितलं. त्यामुळे कुटुंबाच्या नाराजीचे कारण पण उरले नाही . ही सर्व मय्याचीच योजना असावी असं वाटण्या सारखा हा घटनाक्रम आहे

    हे सर्व घडून गेलं आणि नुकताच एक आठवड्यापूर्वी आपला ब्लॉग वाचनात आला. वाचून खरं तर उत्साह वाटायला हवा होता पण प्रत्यक्षात गुगल मॅप चे फोटो आणि किनाऱ्याने परिक्रमा करण्याची काठिण्य पातळी बघता आपल्या सारख्या रफ-टफ व्यक्तीला जे जमलं ते मला जमेल का या बद्दल साशंकता वाटायला लागली आहे.
    परिक्रमा तर एकट्यानेच करायची आहे तेव्हा किनाऱ्या ऐवजी सरळ रस्त्याने परिक्रमा करावी अशा विचारात आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपल्याला जर रजा मिळत असेल तर आवर्जून परिक्रमा करावी ! एकट्यानेच करावी ! आणि माईच्या काठा काठानेच करावी .चिंता करू नये माई सर्व अडचणी दूर करते ! तुम्हाला वाटत कुठलेही विघ्न येणार नाही . फार कठीण वाटले तर त्या वेळापूर ते गावातून जाऊ शकता . परंतु आधीपासूनच रस्त्याने चालायचा निर्णय घेऊ नका असे वाटते . नर्मदे हर !

      हटवा
  12. लेखांक २५ मध्ये रामकुटी नंतर भेटलेले सोमनाथ गिरी गोसावी यांचा व्हिडिओ " Om Darshan " या यूट्यूब चॅनेल वर अगदी खात्रीने होता. दुसर्‍या एका यूट्यूब चॅनेल च्या खालील लिंकवर तोच व्हिडिओ एक परिक्रमा वासी मोबाईलमध्ये ११ व्या मिनिटाला दाखवतांना पण दिसतात-
    https://youtu.be/yyohSpvGuAg?si=Y7t9jo_XCB-z5hHf

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर