लेखांक १३० : अट्ठयाच्या जंगलातला हल्ला , सेवाभावी भावसिंह अवलसिंह वास्केला आणि साकडीचा मेंगला पैरान सस्तिया

मध्यप्रदेशातल्या अलीराजपुर जिल्ह्यातल्या सोंडवा तालुक्यातले मथवाड गाव सोडले आणि उन्हाचा दाह जाणवू लागला . सकाळी सात वाजल्यानंतर उन्हाचे चटके बसू लागायचे . चालताना नको नको व्हायचे ! दक्षिण तटावरून चालताना सूर्य सकाळी पाठीशी असायचा . उत्तर तटावर तर सूर्याची उन्हे थेट डोळ्यावर यायची ! दक्षिण तटावर सूर्य जणू काही सांगायचा ! चालत रहा मी तुझ्या पाठीशी आहे ! मानेला भयानक चटके बसायचे . त्यामुळे गळ्यातला रुमाल मानेवर झाकून घ्यायचो . उत्तर तटावर मात्र सूर्य सतत समोर असायचा . त्यामुळे डोळ्याला अंधारी यायची . देहाकडे लक्ष नव्हतेच . पण लक्ष गेल्यावर लक्षात यायचे की आपला रंग आयुष्यात कधी नव्हे इतका काळवंडला आहे. म्हणजे आरशात बघायची संधी कधी मिळत नसे परंतु हाताच्या रंगावरून लक्षात यायचे . यालाच म्हणतात तापणे किंवा तप घडणे ! मैया परिक्रमावासीला रताळ्यासारखी भाजून उकडून काढते ! आधी ताप ताप तापायचे ! आणि मग अचानक मैया मध्ये बुडायचे ! सगळेच टोकाचे ! पण तीच सहनशक्ती देते . तीच तुम्हाला बळ देते . तीच तुमची रक्षणकर्ती असते . आपल्याला फक्त या गोष्टीचा विसर पडू द्यायचा नसतो . आज एक असा प्रसंग आला की मला क्षणभर या गोष्टीचा विसर पडला ! त्याचे असे झाले . अट्ठा गावात जाण्यासाठी रस्त्याने जाण्यापेक्षा जंगलातला एक चटकट होता . बामणसैरी नामक फलिया पार करून मनखर किंवा मनखड मार्गे अट्ठा असा तो मार्ग होता . मार्ग अत्यंत अप्रतिम होता ! चहुबाजूने डोंगर ! प्रचंड चढ-उतार ! परंतु इथे डोंगरावरून चालण्यापेक्षा डोंगरांच्या तळाशी असलेल्या ओढ्या नाल्यातून चालण्याचे मार्ग होते ! ओढ्यांच्या आजूबाजूला झाडे असायची . आणि इथे सूर्याची उन्हे पोहोचत नसल्यामुळे वातावरण अतिशय थंड असायचे ! रात्रभर साचलेली थंडी चालणाऱ्या तप्त परिक्रमावासीला फारच सुखद भासते ! त्या थंडीचा आनंद घेत चालत राहिलो ! एरव्ही सात वाजल्यापासून भाजून काढणारा रवी आज कृपा बरसत होता ! ओढयांना पाणी नसले तरी त्यांची कोरडी पात्रे चांगली गार होती . साधारण फुटावर पाणी असावे . त्याशिवाय इतका गारवा राहणार नाही . मी ओढ्यातून जात असताना उंचावर असलेल्या एका घरातून एका मातारामने मला आवाज दिला . ही या भागामधील अंगणवाडी ताई होती . त्यामुळे शिकलेली होती . तिने माझी चौकशी करून मला सुंदर असा काळा चहा पाजला . तिच्या अंगणात बसून मी कोंबड्यांची आणि बकऱ्यांची मजा पाहत होतो . तिने मला पुढचा मार्ग सांगितला . या मार्गाने कोणी परिक्रमा वासी जात नाही हे देखील तिने सांगितले . आणि निघताना जपून जा असा सल्ला दिला . हा शब्द माझ्यासाठी आश्चर्यकारक होता ! आज पर्यंत कोणी जपून जा असे सांगितले नव्हते . मी आपले नाम जपून चालू लागलो ! पुढे पुन्हा एकदा जंगल लागले . वाटेत एका माणसाचे घर होते . किडकिडीत तब्येतीचा आदिवासी मनुष्य होता . याचे नाव लक्ष्मण होते . त्याने देखील मला काळा चहा पाजला . याच्या मुलाचे नाव रमण होते . माझ्या काकांचे नाव देखील लक्ष्मण आहे हे त्याला सांगितल्यावर त्याला आनंद वाटला . तसेच माझे एक खूप जवळचे मित्र आहेत ज्यांचे टोपण नाव रमण आहे . ते देखील त्याला सांगितले . आदिवासी लोकांचा बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क नसतो . त्यामुळे त्याला आमची आदिवासींची नावे तुम्ही शहरी लोक कसे काय बुवा ठेवता ? असे आश्चर्य वाटले ! मग मी त्याला सांगितले की आदिवासी संस्कृती अशी वेगळी कुठली संस्कृती नसून भारतातील सर्व लोक हे भारत देशाचे आदिवासीच आहेत ! आदिवासी म्हणजे मूळ वासी ! मूलनिवासी ! ज्यांचे पूर्वज याच देशात जन्माला आले असे ! फक्त काही लोक नद्यांच्या काठावर राहायला आले आणि काही लोकांनी डोंगरदऱ्यांमध्ये राहणे पसंत केले . बाकी संस्कृती एकच आहे ! आदिवासी लोकांना सतत तुम्ही इतर भारतीय समाजापेक्षा वेगळे आहात , तुम्ही फार थोडे आहात , तुम्ही दलित आहात ,तुम्ही वंचित आहात ,तुम्ही शोषित आहात , तुम्ही पीडित आहात , असे ऐकवण्याची एक मोठी चळवळ स्वातंत्र्य नंतर अविरत चालू आहे . आदिवासी लोकांना मूळ प्रवाहामध्ये कधी येऊच द्यायचे नाही यासाठी केलेला हा खटाटोप आहे . प्रत्यक्षामध्ये असे काहीही नसून आदिवासी समाज सहजपणे शहरातल्या लोकांसोबत सहजीवन जगू शकतो आणि शहरातली माणसे देखील थोड्याशा सुविधांचा त्याग करून आदिवासी भागामध्ये सेवा कार्य करू शकतात . समाजाला एकत्र करणे आवश्यक असताना त्याचे विघटन करण्याचा प्रयत्न सतत देश विरोधी घटकांकडून केला जातो त्यापासून आपण सतत सावध राहिले पाहिजे . जंगलातून फिरताना ससे हरणे पकडण्यासाठी जागोजागी सापळे लावलेले असतात . तसे सर्वसामान्य लोकांना पकडण्यासाठी लावलेले हे डावे सापळे आपण ओळखून ते चुकवून चालले पाहिजे . अगदी भलेभले परिक्रमावासी साधुसंत अशा सापळ्यामध्ये अलगद फसलेले मी स्वतः पाहिलेले आहे म्हणून सांगतो आहे .असो . लक्ष्मण आणि रमण या दोघांना जंगलाचे खूप चांगले ज्ञान होते . लक्ष्मण ने मला इथून पुढचा इतका भारी चटकट सांगितला की मी थेट अट्ठा गावात पोहोचणार होतो ! आदिवासी लोक सतत पायी फिरतात त्यामुळे त्यांना जंगलातल्या सर्व वाटा तोंडपाठ असतात . तसेच त्यांना कुठल्या वेळी कुठे कोण असेल , कुठला प्राणी कधी व कुठे असेल याचे देखील चांगले ज्ञान असते . त्यामुळे त्यांनी सांगितलेले आवर्जून ऐकावे . लक्ष्मण ने मला सांगितले की पुढे एक ओढा लागेल . मला असे वाटेल की ओढ्याच्या काठाने चालण्यापेक्षा ओढ्यातून चालावे . परंतु मी काठाने चालले पाहिजे . मी ठीक आहे म्हणालो आणि चालू लागलो . आदिवासी लोक सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे सांगत नाहीत . ते असे गृहीत धरतात की आपण ऐकतो आहोत . परंतु इकडे तिकडे पहात निसर्गाचा आनंद घेत चालता चालता मी कधी त्या ओढ्याच्या मध्ये आलो हे मलाच कळले नाही .ओढ्यातून बाहेर यायचा प्रयत्न केला परंतु ओढा खोल खोल होत गेला . हा ओढा म्हणजे पाण्याने भरलेला ओढा नव्हता तर कोरडा ठणठणीत ओढा होता . हळूहळू ओढा अरुंद होत गेला . वर असलेल्या झाडीमुळे थोडेसे अंधारून आले होते . एकंदरीत एखाद्या भयपटाला शोभेल असे तिथले वातावरण होते . मला लहानपणी पाय खरडत चालण्याची खूप सवय होती . माझे वडील असे चालताना मी दिसलो की लगेच पायावर फटके मारायचे . अशा रीतीने मार खाऊन खाऊन माझी ती सवय कायमची गेली .त्यामुळे चालताना शक्यतो माझ्या पायांचा आवाज येत नसे . आता सुद्धा मी पाय उचलून सावधपणे चालत होतो . पायाखाली मोठे मोठे दगड गोटे होते . आजूबाजूला सात-आठ फूट उंच मातीच्या भिंती होत्या . त्यातून आलेली झाडांची मुळे मध्ये चालताना अडथळा करत होती . झाडांच्या गर्द सावलीमुळे ओढा अंधारून गेला होता . अचानक मला समोर काहीतरी हालचाल होते आहे असे जाणवले . आणि मला काही कळायच्या आत दणादण उड्या मारत सहा रानटी कुत्री ओढ्याच्या वर चढली ! ही सर्व मंडळी ओढ्यामध्ये बसलेली होती ! तिथे माझे असे अचानक येणे त्यांना अपेक्षित नव्हते . त्या सर्वांनी मिळून जोरजोरात भुंकत माझ्यावर हल्ला बोलला ! कुत्री मला चालू देईनात ! वरूनच आपले विक्राळ दात दाखवत ती माझ्या अंगावर उडी मारल्यासारखी करू लागली . क्षणात आलेल्या या संकटामुळे मी गांगरलो परंतु क्षणभरच . ताबडतोब मी माझा दंड हातात घेऊन हल्ल्याचा पवित्रा घेतला . आणि जोरजोरात त्यांच्या दिशेने दंड फिरवायला सुरुवात केली . विशेषतः ती खाली उडी मारू लागली की मी जोरात दंड फिरवायचो . मोठ्या चपळाईने कुत्री माझ्या दंडाचा आघात चुकवायची .अर्थात त्यांच्या गती पुढे माझी गती ही फारच किरकोळ आणि बालिश होती . परंतु माझ्याकडे दुसरे काही गत्यंतरच नव्हते . आता माझ्या लक्षात आले की लक्ष्मण ने मला ओढ्याच्या काठावरून जा असे का सांगितले होते . परंतु जे व्हायचे ते झाले होते . हळूहळू माझी शक्ती क्षीण होऊ लागली . बहुतेक याचसाठी मैयाने मला दोन कप गोड गट्ट कोरा चहा  पाजला होता .ज्यामुळे त्या कुत्र्यांशी चार पाच मिनिटे लढण्याची का होईना परंतु तयार शक्ती माझ्या देहाला प्राप्त झाली . परंतु हळूहळू मी थकू लागलो . ही सर्व कुत्री भयंकर होती . सर्वांचे जबडे मोठे विक्राळ होते .फाटलेले कान आणि नाकावर तसेच शरीरावर झालेल्या जखमांच्या खुणा याची ग्वाही देत होत्या की ही कुत्री संघर्षातून जगत आलेली आहेत ! मुळात त्यांनी मला त्यांचा शत्रू मानले होते . त्यामुळे काहीही करून आता ती मला खिंडीत पकडून चावून-चावून मारून टाकणार अशी माझी भविष्यातली अवस्था मला स्पष्टपणे दिसत होती . अचानक माझ्या पायामध्ये काहीतरी घुसले आहे असे मला जाणवले . पाहिले तर एक लोखंडाचा मोठा तुकडा माझ्या तळपायाच्या मधोमध खोल आत मध्ये शिरला होता . मी जोरात विव्हळलो . तो तुकडा उपसून हातात घेतला . एक क्षणभर मला सगळ्या गोष्टींचा विसर पडला होता .तो तुकडा पाहिला आणि मला असे वाटले की ते बाणाचे टोक आहे ! विषारी बाणाचे टोक !म्हणजे कुत्र्यांनी चावून किंवा अंगात विष भिनून आपला मृत्यू आज निश्चित आहे असे माझ्या लक्षात आले ! जशी मृत्यूची आठवण झाली तशी नर्मदा मातेची आठवण झाली ! आणि मग माझ्या लक्षात आले की मी सुखी जीवनाचा महामंत्र उच्चारलाच नाही ! मी जोरात नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे हर ! असा त्रिवार जयघोष केला . फट असा आवाज आला आणि माझ्यासमोरचे एक कुत्रे विव्हळत विव्हळत पळाले . एक नारळाच्या आकाराचा दगड त्याच्या जबड्यावर लागला होता . काही कळायच्या आत दगडांचा मारा सुरू झाला ! आणि सगळी कुत्री वेगाने डोंगराकडे पळाली . दगड इतके पडत होते की एखादा मला पण लागतो की काय असे मला वाटले ! कुत्री पळाल्याबरोबर दगडांची दिशा बदलली . धापा टाकत झाडांच्या मुळांचा आधार घेत मी वरती आलो . हातामध्ये असलेला तो लोखंडाचा तुकडा मी पोटातल्या कप्प्यात ठेवून दिला . त्याच्या रक्ताचा डाग माझ्या छाटीला पडला . इकडे माझ्या असे लक्षात आले की वरती असलेल्या एका शेतातून एक तरुण आदिवासी मुलगा आणि त्याची बायको अशा दोघांनी कुत्र्यांवर हल्लाबोल केलेला होता ! त्या दोघांनी कुत्र्यांना नेम धरून इतके दगड मारले की कुत्री अक्षरशः वेडी झाली ! त्यांचा एकही नेम चुकत नव्हता ! विशेषतः एरव्ही अतिशय मर्यादशील वागणाऱ्या त्या आदिवासी महिलेचा तो रणरागिणी स्वरूपातला अवतार पाहिला आणि माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना ! तिने आपला परकर गुडघ्याच्या वर खोचून असा काही रुद्रावतार धारण केला होता की कुत्री सळो की पळो झाली ! ती ज्या चपळाईने खाली वाकून दगड उचलायची आणि फेकायची ते पाहता कुत्र्यांना श्वास घ्यायला सुद्धा ती उसंत देत नव्हती . हे करताना ती आपल्या डोक्यावरचा पदर ढळू देत नव्हती याची मला विशेष कौतुक वाटले !कुत्र्यांना ठपाठप लागणारे दगड पाहून माझे श्वान प्रेम जागे झाले . मी तिला ओरडूनच म्हणालो , " बस करो माताराम बस करो ! " कारण कुत्र्यांनी शेपट्या घातलेल्या स्पष्टपणे दिसत होत्या . नंतर माझ्या असे लक्षात आले की या दोघांची गुरे वासरे आणि शेळ्या डोंगरात चरत होत्या . ही शिकारी कुत्री होती . शिकारी कुत्री जंगलात कशी शिकार करतात हे मी खूप वेळा जवळून पाहिलेले आहे . पुण्याला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये जेव्हा मी घोडेस्वारी करण्यासाठी जायचो तेव्हा तिथे फिरणारी भटकी कुत्री हरणांची वगैरे कशी शिकार करतात हे मी स्वतः पाहिलेले आहे . घोड्यावरून फिरताना या कुत्र्यांना शेजारी माणूस आहे हे लक्षात येत नाही . त्यामुळे ती माणसावर हल्ला करत नाहीत . जसे हत्तीवर बसून जंगली वाघ बघता येतो तसे घोड्यावर बसून या छोट्या रानटी प्राण्यांना शिकार करताना सहज बघता येते . एकमेकांच्या प्रांतामध्ये ढवळाढवळ करणे हे निसर्गाच्या नियमात बसत नाही .त्यामुळे ते एकमेकांना शक्यतो त्रास देत नाहीत . आता सुद्धा मी त्यांच्या थेट घरामध्येच असल्यामुळे त्यांनी माझ्यावर थेट हल्ला केला होता . एकदा तर या कुत्र्यांनी शिकार करत असताना एक हरीण जीव वाचवण्यासाठी आमच्या घोड्यांच्या कळपात येऊन उभे राहिले . कुत्र्यांच्या कळपाने त्याचे बेकार लचके तोडले होते . आम्ही लगेचच घोड्यावरून डिसमाउंट होऊन त्या हरणाला ताब्यात घेतले . आणि लष्कराच्या वाहनातून कात्रजच्या सर्प उद्यानामध्ये उपचारासाठी हलवले . परंतु दुर्दैवाने अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला . त्याला नेताना माझे सर्व कपडे आणि हात रक्ताने माखले होते . 
दि . २३ जून २०१० रोजी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या जंगलामध्ये कुत्र्यांनी जखमी केलेले चितळ ताब्यात घेताना प्रस्तुत लेखक आणि त्याचे अश्वप्रशिक्षक .
लष्कराच्या वाहनातून हरणाला कात्रजच्या सर्पोद्यानामध्ये नेताना . कुत्र्यांच्या अचानक हल्ल्यामुळे बिचारा जीव भेदरलेला आहे .
कुत्र्यांनी हरणाची केलेली अवस्था
कळपाने कुत्री काय करू शकतात याचा असा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला असल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर माझेही असेच काहीतरी होणार की काय असे क्षणभर तरळून गेले होते !
या हरणाला हाताळून रक्तबंबाळ झालेले प्रस्तुत लेखकाचे हात . या ताज्या रक्ताचा वास सर्वत्र सुटला होता .
त्या वासामुळे तिथल्या उपचारासाठी दाखल केलेल्या बिबट्यांना अस्वस्थ झालेले मी स्वतः पाहिले आहे . घरी येताना सुद्धा वाटेतली फिरस्ती कुत्री माझ्याकडे जीभा चाटत बघत होती .
तात्पर्य ,कुत्री समूहाने कितीही मोठ्या प्राण्याची शिकार सहज करू शकतात हे मी स्वतः अनुभवलेले आहे. प्रशिक्षण दिलेली दोनच कारवान कुत्री एका वाघाला सळो की पळो करून सोडू शकतात . त्यामुळे आज एका मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मातेने मला वाचवले होते ! अगदी निश्चितपणे जीवदान दिलेले होते ! या कुत्र्यांवर शेतकरी दांपत्याने केलेला हल्ला इतका भयानक होता की त्यांना दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने बहुतेक असे वाटले की मघाचा बुवा बरा होता ! त्यामुळे सर्व कुत्री निमूटपणे मानाखाली घालून माझ्या दिशेने येऊ लागली . त्यांची देहबोली बघता त्यांनी पराभव पत्करला आहे असे स्पष्ट जाणवत होते . मी देखील त्यांच्याकडे न बघता माझ्या वाटेने चालू लागलो . आता अट्ठा गावात उतरण्याची त्या कुत्र्यांची आणि माझी पायवाट एकच होती ! गंमत म्हणजे सर्व कुत्री शांतपणे माझ्यामागे रांगेत चालू लागली . चालता चालता मी त्यांच्याशी बोलू लागलो . की बाबांनो कशाला असे वागता ? किती मार खावा लागला तुम्हाला विनाकारण तुमच्या आरड्या ओरडयामुळे ! ती देखील जणू काही ऐकत आहेत असे मला वाटले . एका क्षणापूर्वी याच कुत्र्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला होता हे सांगूनही कुणाला पटले नसते ! मला आता सुद्धा यांची भीती वाटत नव्हती . आद्य शंकराचार्य नर्मदा मातेला भीतीहारी वर्मदे का म्हणतात ते इथे कळते ! गतम् तदैव मे भयम् त्वदम्बू विक्षितं यदा । अर्थात देखताच वारी भीती माझी दूरी सारीते ! तुझे केवळ पाणी पाहिल्याबरोबर माझी भीती नष्ट होऊन जाते !  त्यामुळे माझ्या हातात असलेल्या बहुतेक बाणाचा तुकडा वाटणाऱ्या त्या लोखंडाच्या तुकड्यामुळे आपल्याला मृत्यू येईल की काय हे भीती देखील हळूहळू नष्ट होऊन गेली . जसे गाव जवळ आले तसा कुत्र्यांनी मार्ग बदलला . आणि झाडीमध्ये अदृश्य झाली . पुन्हा पुढची शिकार शोधायला ! झाडीत जाण्यापूर्वी त्यातल्या एका कुत्र्याने मागे वळून माझ्याकडे पाहिले . त्याच्या डोळ्यातून कृतज्ञता ओथंबताना मला दिसली . आणि त्यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप त्याला झाला आहे असे मला वाटले . त्यांना वाटले होते तसा मी हिंसक आक्रमक प्राणी नव्हतो ,तर सर्वसामान्य परिक्रमावासी होतो हे त्याला कळून चुकले . कदाचित इथून पुढे कुठल्या परिक्रमावासी वर ही कुत्री हल्ला करणार नाहीत . नर्मदा मैया जाणे ! मला मात्र तिचे झालेले विस्मरण या प्रसंगामुळे नष्ट झाले !आणि मुखामध्ये अखंड तिचे नामस्मरण सुरू झाले ! ती समोर नसली तरी तिचे नाम मुखामध्ये होते ! आणि जिथे नाम तिथे रूप ! कुत्री माझ्यापासून वेगळी झाली त्या भागाचे नाव होते रिचीबयडा फलिया . पावरी भाषेमध्ये बयडा म्हणजे डोंगर .ही अट्ठा गावाची फलीया होती .
श्वानांनी माझ्यावर हल्ला केला तो साधारण परिसर . वरच्या बाजूला आश्रम दिसत आहे .
या गावामध्ये खाली रस्त्यावर एक आश्रम आहे असे मला कळलेले होते .ते घर आले . इथे भावसिंह अवलसिंह वास्केला नावाचा तरुण सेवादार परिक्रमावासींना सेवा देत असे . हुशार मनुष्य होता . अगदी टोकाचा मोदी भक्त होता . याने मला सुंदर अशी गरम गरम आमटी पोळी खायला घातली . 
 सेवाधारी भावसिंह अवलसिंह वास्केला अट्ठा
खाता खाता आम्ही भरपूर गप्पा मारल्या . झालेल्या प्रसंगा विषयी त्याला सांगितल्यावर त्याने त्या कुत्र्यांच्या टोळीने या परिसरामध्ये माजवलेल्या उत्पाताबद्दल मला सांगितले . रोज एखादी शेळी गायब करायचीच असा त्या कुत्र्यांचा नित्य नियम होता . त्यांना नवीन जन्माला आलेले वासरू सुद्धा वर्ज्य नव्हते . लहान मुलांना सुद्धा अशा कुत्र्यांचा धोका असतो . मी स्वतः एकदा सारसबागेमध्ये एका दोन वर्षाच्या मुलाला कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचवले होते . माँ गायत्री आश्रम असे या आश्रमाचे नाव होते . हिंदू धर्माविषयी भावसिंहच्या मनामध्ये अतिशय तरल भाव होते . या भागात सुरू असलेले धर्मांतरण त्याला व्यथित करत असे . सर्वच समाजातील लहान मुले हळूहळू धर्मापासून आणि पर्यायाने संस्कारांपासून लांब जात असल्यामुळे असे आयते पंथ त्यांना चटकन बळी पाडतात असे त्याचे मत होते , जे योग्यच होते . आपल्या धर्मातील एखादी तोडकीमोडकी अर्धवट कथा ऐकवून त्यावरून आपले तत्त्वज्ञान किती चुकीचे व अपूर्ण आहे असे सांगणाऱ्या आणि त्याद्वारे धर्मांतरण करणाऱ्या लोकांना उत्तर देण्याइतपत देखील धर्माचे ज्ञान आपल्या मुलांना राहिलेले नाही हे गंभीर व कटू वास्तव आहे . भावसिंहचे आभार मानून त्याने दिलेला शिक्का वहीमध्ये मारून घेऊन पुढे निघालो .
भावसिंह अवलसिंह वास्केला यांच्या घरातूनच चालविल्या जाणाऱ्या माँ गायत्री आश्रमाचा शिक्का . २५/४/२२  दुपारी भोजन अशी नोंद आहे . तत्पूर्वी ११२ वा मुक्काम मथवाडच्या हनुमान मंदिरात केलेला दिसतो आहे . 
इथून पुढे निघालो आणि थोडे अंतर चालल्यावर उमरठ नावाचे गाव आले . शिवछत्रपतींच्या सैन्यातील एक अनमोल रत्न नरवीर तानाजीराव मालुसरे यांचे मुळगाव देखील उमरठ नावाचेच आहे जे कोकणामध्ये आहे . पूर्वी एकदा पुणे ते सज्जनगड पायी गेलेलो असताना शिवथरघळीतून ढालकाठी मार्गे कांगोरी किल्ल्याला वळसा मारत या गावात पायी पोहचलो होतो . कोंढाणा सर केल्यावर तानाजी मालुसरे यांचे पार्थीव ज्या  घाटाने त्यांच्या गावात नेण्यात आले त्या घाटाला आजही मढे घाट असे नाव पडलेले आहे ते त्यामुळेच . असो . या गावांमध्ये आल्यामुळे त्या स्मृती जागृत झाल्या . इथे गरासिया भगत नावाचा एक नर्मदा भक्त अन्नक्षेत्र चालवितो . त्याने आवाज देऊन मला थांबविले आणि चहा टोस्ट खायला दिला . मी त्याला महाराष्ट्रातल्या उमरठ गावाचा इतिहास सांगितला . इथे मला चित्रकूट वाल्या मौनी बाबा ने मालसरच्या मुक्कामी असताना पुन्हा पुन्हा हे चोर आहेत असे सांगितले होते ते माता पुत्र भेटले ! आश्रम थोडासा आत मध्ये होता . परंतु परिक्रमावासी येताना दिसला की बरोबर त्याला आत बोलवायला कोणीतरी यायचे . आश्रमा समोरून जाणारा एकही परिक्रमावासी आश्रमामध्ये थांबल्याशिवाय जाणार नाही याची काळजी आश्रमाचे सेवक घेत होते . संपूर्ण नर्मदा खंडामध्ये थोड्याफार फरकाने असेच चित्र दिसते . विशेषतः आता परिक्रमा संपत आली होती . त्यामुळे आश्रमावरचा ताण कमी झालेला असायचा . त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक परिक्रमा वासीला आवर्जून थांबवले जायचे . 
आधुनिक आरसीसी बांधकामामध्ये एक सुंदर खोली परिक्रमावासींसाठी बांधली होती आणि शेजारी गरासिया मामाचे साधे सुधे चंद्रमौळी घर होते . पुढे त्याच्या मुलांनी काही बांधकामे केली होती . याही मामाला भरपूर मुले होती . पती-पत्नी दोघेही अत्यंत सेवाभावी होते . 
गरासिया मामाचे अन्नक्षेत्र गाव उमरठ तालुका सोंडवा जिल्हा अलीराजपुर मध्य प्रदेश
सिमेंटचे खांब बनवण्याची खूप सुंदर पद्धती इकडे आहे . पत्र्याचा वापर करून खूप छान खांब बनवले जातात .
इथल्या आदिवासी पद्धतीप्रमाणे गरासिया मामाच्या घराची लिपाई पुताई खूप सुंदर पद्धतीने केली होती व जमिनीवर सुरेख नक्षी काढली होती ! गरासिया मामाच्या घरातून दिसणारे सेवा क्षेत्र . 
हे आहेत गरासिया भगत पती-पत्नी . गरासिया म्हणजे शुद्ध मराठी मध्ये गराश्या
दोघांचा सेवाभाव पाहून मन प्रसन्न झाले .
चहा टोस्ट अप्रतिम होते . आश्रमाचा शिक्का वहीमध्ये मारून घेतला आणि पुढे निघालो . 
पुण्याच्या उदय जोशी यांनी गरासिया भगत याला दिलेले प्रमाणपत्र
 गरासिया भगत यांच्या अन्नक्षेत्राचा प्रस्तुत लेखकाच्या वहीतील शिक्का . अजूनही सोंडवा तालुका आणि अलीराजपुर जिल्हा चालू होता .खालील टोस्टचे चित्र आणि चाय असे केवळ मलाच कळेल इतपत घाणेरड्या अक्षरात लिहिलेले आहे ! माझ्या हाताचे मोडलेल्या हाडाचे दुखणे अजून बरे झालेले नव्हते . त्यात दंड हातात धरून करंगळीची वाट लागली होती . त्यामुळे हात खूप दुखायचा . असो .
पुढे दोन मोठ्या नद्या मला पार करायच्या होत्या . अनखेडी नदी आणि हथनी नदी . यातली हथनी नदी तर नावाप्रमाणे हत्तिणीसारखी जाड जूड आणि मोठी होती असे सर्वजण सांगत . त्यामुळे मी वेगाने चालू लागलो . जवळपास कुठे परिक्रमावासींची सेवा होत असेल अशी चिन्हे दिसत नव्हती . हळूहळू अंधारू लागले . आणि माझ्या लक्षात आले की मी आज पुन्हा एकदा संकटात सापडलो आहे ! इतक्यात डावीकडे एक शेत होते , त्या शेताच्या पलीकडे लांब असलेल्या घरातून कुणीतरी जोरजोरात नर्मदे हर असा मला आवाज देत असल्याचे लक्षात आले . पाहिले तर मगाशी भेटलेले चोर माता पुत्र इथे होते . खुणेनेच तो मला बोलवू लागला . तिथे एका शेतकऱ्याचे घर होते . मी तिथे गेलो . एका सधन शेतकऱ्याचे ते घर होते . शेतकरी आम्हाला घरामध्ये झोपा सांगत होता . परंतु या माता पुत्रांचे प्रताप मला माहिती असल्यामुळे मी अतिशय ठामपणे शेतकऱ्याला सांगितले की आम्ही परिक्रमावासी घरात झोपत नसतो . अंगणामध्ये आमची आसने आम्ही लावणार आहोत .
या उदार शेतकरी बांधवांचे नाव होते मेंगला पैरान सस्तिया . ही साकडी गावाची पुजारा फल्या होती .मेंगला मामाच्या चार पिढ्या मला इथे बघायला मिळाल्या ! स्वतः मेंगला मामा सस्तिया त्याचा मुलगा धुनासिंग सस्तिया त्याचा मुलगा विजय आणि त्याचा मुलगा अभिनंदन अशा चार पिढ्या एकाच घरात सुखेनैव नांदत होत्या . घर आणि शेत दोन्ही खूप मोठे होते .
या भागातील आदिवासींची घरे अशी असतात . इथे सुद्धा सस्तीया कुटुंबाचे एक असे जुने घर ठेवले होते आणि आजूबाजूला तीन-चार नवीन चांगली पक्की घरे बांधली होती .
 त्यामुळे ओळीने चार-पाच घरे होती . घराच्या मागून अनखेडी नदी वाहत होती . तिच्या कृपेने कुपनलिकांना पाणीच पाणी होते . शेतांचे सुंदर पट्टे आखले होते . बांधावर ताडाची ५० एक झाडे येथे लावलेली होती . परंतु आश्चर्य म्हणजे त्यांना या झाडाबद्दल शून्य ज्ञान होते ! त्यामुळे ही झाडे आता तोडून टाकावीत अशा निर्णयाप्रत ते आले होते . मेंगला मामाच्या पणजोबाने ही झाडे लावली होती .
 मेंगला मामाची घरे आणि शेते . बांधावर लावलेली ताडाची झाडे .खालच्या बाजूला रस्ता आणि सांकडी ग्रामपंचायत दिसते आहे .वरच्या बाजूला अनखेडी नदी वाहते आहे . मी गेलो तेव्हा नदी कोरडी होती .
 मी तमिळनाडू राज्यामध्ये भरपूर ताडाची झाडे लावलेली असल्यामुळे मला त्यांची चांगली माहिती होती . मी घरातल्या सर्वांना एकत्र करून ताडाचे झाड किती महत्त्वाचे आहे आणि त्याच्यापासून काय काय उत्पादने मिळवता येतात हे नीट समजावून सांगितले . जसा नारळ हा कल्पवृक्ष आहे तसाच ताड हा देखील कल्पवृक्ष मानला पाहिजे ! या झाडापासून इतके उपयोग आहेत हे कोणालाच माहिती नव्हते त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले आणि आनंद देखील झाला ! मेंगला मामा म्हणाला बहुतेक याचसाठी मैय्याने तुम्हाला इकडे मुक्कामाला पाठवले ! कारण लवकरच ती सर्व झाडे तोडण्याचे त्यांचे निश्चित झाले होते . आणि त्यांचे म्हणणे खरे होते .कारण मी खरोखरीच अतिशय वेगाने पुढे निघालो होतो . चोर माता पुत्रांनी हाक मारली नसती तर मी आलो पण नसतो . असो जे काही घडते आहे ती मैंयाची इच्छा . मेंगला मामाच्या घरी धनुष्यबाण आहे असे माझ्या लक्षात आले . तो मला पाहण्याची इच्छा आहे असे सांगितल्याबरोबर त्याने धनुष्यबाण बाहेर आणला . आधी त्याने बाण मारून दाखवली . त्यानंतर माझ्या हातात धनुष्यबाण दिला . इथे त्याला तीर कामठा म्हणतात . किंवा तीर कमान म्हणतात . धनुष्य हा शब्द पटकन कोणाला कळत नाही . तिथे पडलेला छोटा भीम चा एक टेडी होता . अर्थात कापसाची बाहुली होती . तिच्यावर नेम धरायला त्याने मला सांगितले .शेतामध्ये मका लावलेला होता . त्यातल्या एका मक्याच्या कणसामध्ये तो टेडी विजय खोचून आला . मी बाण मारला . बाण बिचाऱ्या छोट्या भीमच्या छातीतून आरपार गेला . मेंगला मामा अतिशय खुश झाला !मला देखील आनंद झाला ! आयुष्यात पहिल्यांदाच धनुष्यबाण हातात घेतला होता . बाण पुढे जाईल का मागे जाईल ते देखील सांगता येणार नाही अशी माझी अवस्था होती !  मेंगला मामा  म्हणाला की हा धनुष्य खूप जुना झाला आहे नाहीतर मी तुम्हाला दिला असता . हरकत नाही असे म्हणून मी घराच्या मागे असलेल्या नळावर स्नान वगैरे आटोपून घेतले आणि पूजा करून घेतली . त्यानंतर रात्री मस्तपैकी भाकरी भाजीचा बेत झाला आणि पोटभर भोजन प्रसाद घेतला . रात्रीच्या शेतातच आकाशाखाली आम्ही झोपलो . आई मुलगा चोर असल्यामुळे रात्री ते माझी पिशवी उचकणार याची मला खात्री होती . त्यांना जास्त कष्ट पडू नयेत म्हणून मी एक मजा केली . माझ्याकडे जितके पैसे होते ते सर्व माझ्या झोळीच्या बाहेरच्या पुढच्या कप्प्यात ठेवून दिले . चोर माझ्या शेजारीच झोपला होता . त्याच्या आणि माझ्यामध्ये मी ती झोळी अशा रीतीने ठेवली की त्याला झोपेतून न उठता सुद्धा माझा कप्पा उघडता येईल . आणि माझी अपेक्षा त्याने खरोखर पूर्ण केली ! सकाळी मी उठायच्या आधीच दोघे उठून पुढे निघून गेले होते . आणि माझ्या झोळीतले त्या कप्प्यात ठेवलेले सगळे पैसे गायब झालेले होते ! मला समाधान वाटले ! की तो चोर ज्यासाठी नर्मदा मातेची प्रार्थना करून परिक्रमेत आला होता ती इच्छा पूर्ण झाली . म्हणजे नर्मदा मातेवर त्याचा विश्वास अधिक दृढ झाला असणार !एक क्षणभर मनात असा विचार देखील आला की मेंगला मामाला हे सत्य सांगावे . पण नंतर मी असा विचार केला की त्यामुळे त्याच्या श्रद्धेला तडा जाऊ शकतो . परिक्रमावासी म्हणून त्याच्या मनात असलेला जो काही आदर आहे तो कदाचित कमी झाला असता किंवा नष्ट झाला असता . शिवाय या आदिवासी लोकांचे " नेटवर्क " खूप जबरदस्त आहे . चुकून माकून याने पुढच्या गावात दोघांना अडवायची व्यवस्था लावली तर कठीण व्हायचे . परंतु हे दोघे मायलेक सराईतपणे चोऱ्या करत परिक्रमा करताना मी स्वतः अनुभवले हे मात्र खरे ! बोलताना अगदी एखाद्या साधुसंता सारखे नर्मदा मैया चा जयजयकार करणाऱ्या गप्पा मारायचे ! मुलगा तर बोलायला फार हुशार होता ! मोठमोठे बोलबच्चन मारायचा ! आईचे पाय चेपत बसायचा . ते पाहून कोणालाही असे सहज वाटेल की हाच खरा पुंडलिकाचा अवतार ! आज आधुनिक श्रावण बाळ ! परंतु त्याच्या हाताला सफाई खूप होती ! बहुतेक यांच्या वाळत घातलेल्या साड्या सुद्धा गेलेल्या असणार याची मला खात्री होती . अशा मुठभर लोकांमुळे लाखो परिक्रमावासी बदनाम होतात याचे भान त्यांना नसते . अरे नर्मदा खंडातले लोक द्यायलाच बसलेले आहेत ! आपण किती घेणार ? 
अनंतहस्ते कमलाकराने । देता किती घेशील दो कराने ॥ अशी आपली अवस्था खचितच आहे ! मला आश्चर्य वाटले ते नर्मदा मातेचे ! ती चांगले वाईट काही बघत नाही . तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देऊन टाकते ! जो जे वांछील तो ते लाहो ! मग ते काही का असेना ! मी तुम्हाला सांगितले का नाही आठवत नाही परंतु एक परिक्रमावासी मला असा भेटला होता की जो एक विशिष्ट व्यक्ती मरावी असा संकल्प घेऊन परिक्रमेला आलेला होता ! ते कळल्यावर मी मुक्कामावरच्या साधूला विचारले होते की असे होऊ शकते का ? त्यावर साधू म्हणाला होता की का नाही होणार ! तुम्ही जो संकल्प घेऊन नर्मदा परिक्रमा करत आहात तो पूर्ण होणारच ! कारण त्याच्या बदल्यामध्ये नर्मदा मैया तुमच्याकडून पुरेसे तप करून घेत असते त्याची फलश्रुती मिळतेच मिळते ! मला एक प्रकारे समाधान वाटले की आपण आपला असा काहीच संकल्प सोडलेला नाही ! तर जे काही आहे ते नर्मदा मातेचे आहे आणि तिचाच संकल्प आपण स्वीकारलेला आहे ! संकल्पचे महत्त्व किती असते हे मला त्या क्षणी कळले . सकाळी मी मुद्दाम थोडासा उशीरच निघालो . घरातल्या अजून काय काय वस्तू या दोघांनी चोरलेल्या आहेत याची मला कल्पना नव्हती . त्या सगळ्या वस्तूंची एकदा शहानिशा झाल्यावर निघावे असे मी ठरवले .नाहीतर मी सुद्धा त्यांच्याच टोळीत सामील आहे असा भ्रम या लोकांचा व्हायचा ! किती दुर्दैव आहे पहा ना ! ज्यांनी आदरपूर्वक प्रेमपूर्वक रात्रभर आपल्याला आश्रय दिला त्यांच्याच घरात चोरी करून पळून जायचे ! धिक् त्वाम् !धिक्कार असो !
भिक्षापात्र अवलंबणे । जळो जिणे लाजिरवाणे ।ऐसीयासी नारायणे । उपेक्षिजे सर्वथा ॥ 
चहा घेऊन पुढे निघालो . पुढे टेमला नावाच्या गावामध्ये एका महादेवाच्या मंदिरामध्ये क्षणभर थांबलो . आज एकादशी होती . हे मनकेश्वर महादेवाचे मंदिर होते . इथे एक साधू सेवा देत असे . 
श्री मनकेश्वर महादेव मंदिर टेमला (अनखेडी तट )
श्री मंकेश्वर महादेव
 उपवासाचा चिवडा मिळाला तो खाल्ला आणि पुढे वाटचाल सुरू केली . अनखेडी  नदी ओलांडली . पुढे हथनी नदीकडे वाटचाल सुरू केली .
 टेमला गावात ओलांडलेली अनखेडी नदी आणि आजूबाजूचा निर्मनुष्य परिसर .
 चालत चालत मी घुलवाड नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये आलो . चालता चालता मी पोटाच्या कप्प्यात ठेवलेला बाणाचा तो तुकडा बाहेर काढला . तो मी पुढून मागून सगळीकडून पाहत होतो . मनातल्या मनात मी म्हणालो नर्मदा मैया कुणी बनवला असेल गं हा बाण ? आणि याच्या टोकाला विष तर लावले नसेल ना ?  इतक्यात माझ्या शेजारून एक आदिवासी मनुष्य चालत आहे असे माझ्या लक्षात आले . माझ्या हातातला बाणाचा तुकडा पाहून तो चक्रावला . आणि माझ्याशी बोलू लागला . "यह क्या है बाबाजी ? " "पता नही । मै भी वही सोच रहा हू । की शायद कही बाण तो नही ? " आदिवासीने बाणाचे टोक हातात घेतले मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे रंग बदलले ! तो मला म्हणाला " हा तुम्हाला कुठे मिळाला ? " मी त्याला विचारले की हे बाणाचे टोकच आहे ना ? त्याने मला सांगितले की होय हा बाणाचाच पुढचा भाग आहे परंतु तुम्हाला कुठे मिळाला ? मी त्याला सांगितले की अट्ठा गावाच्या अलीकडे एक ओढा आहे तिथे मला हा बाण मिळाला . "तिथून तुम्ही कशाला आलात ? " आदिवासी चिंतातूर आवाजात मला म्हणाला . मी त्याला सांगितले की तिथून ओढ्यामध्ये उतरून येणे ही माझी चूक ठरली कारण कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला होता ! आता मात्र आदिवासी अजूनच अचंबित झाला ! तो मला म्हणाला की बाबाजी म्हणजे तुम्ही खरोखरच त्या ओढ्या मधून आलेले आहात ! म्हणजे इतका वेळ मी त्या मार्गाने आलो हे सांगितलेले त्याला पटत नव्हते तर . आदिवासी मला सांगू लागला . आमच्या परिसरामध्ये पाच सहा भटक्या कुत्र्यांची एक टोळी आहे . आसपासच्या गावांमध्ये फिरून बकऱ्या शेळ्या आणि छोटी वासरे पळवून त्यांची शिकार ही कुत्री करतात . त्यामुळे त्या कुत्र्यांच्या मागावर एकदा मी त्या ओढ्यामध्ये गेलो होतो आणि कुत्र्याच्या दिशेनेच हा बाण सोडलेला होता ! ती कुत्री दिवसभर त्या ओढ्यामध्ये एका खड्ड्यामध्ये मुक्कामाला असतात . हा बाण माझाच आहे ! कारण आम्ही बाण स्वतः घरी बनवतो त्यामुळे स्वतःचा बाण लगेच ओळखता येतो ! त्याच्या सांगण्यामध्ये तथ्य आहे हे मला लगेच लक्षात आले कारण मी स्वतः त्या कुत्र्यांचा तो खड्डा आत मध्ये उतरून पाहिलेला होता ! प्रत्यक्ष जमिनीवर फिरण्याचा हा मोठा फायदा असतो तुम्हाला खरे खोटे लगेच कळते ! दोघांनीही एकाच वेळी अनुभवलेल्या धगधगीत सत्यामुळे एका क्षणात आम्ही दोघे जवळ आलो ! मी लगेच त्याला विचारले की याला वीष वगैरे तर लावलेले नव्हते ना?  "नाही नाही विषाची गरज नसते कुत्र्यांना किंवा छोट्या प्राण्यांना .मोठा प्राणी मारायचा असेल तर विषाचा वापर करावा लागतो .नाहीतर तो फिरून हल्ला करू शकतो. " तो आदिवासी सांगत होता . नंतर मला म्हणाला की आता तुम्ही घरी आले पाहिजे आणि चहा घेतल्याशिवाय पुढे जायचे नाही ! त्याचा प्रेमळ आग्रह न मोडता मी त्याच्यासोबत घरी गेलो . रस्त्याच्या उजव्या बाजूला थोडेसे चढावर त्याचे घर होते . घर साधेच होते परंतु मोठे होते . मला आश्चर्य वाटले की याचे हिंदी एवढे चांगले कसे ! आदिवासी बोलायला अतिशय स्मार्ट होता ! तो म्हणाला की त्याचे अकरावी पर्यंत शिक्षण झालेले आहे . आणि त्याने आपल्या मुलांना एम एस सी पर्यंत शिकवले आहे ! त्याने आतून माझ्यासाठी चहा आणला . आणि आमच्या पुन्हा एकदा बाणाबद्दलच्या गप्पा सुरू झाल्या . बाण कसा बनवतात वगैरे मी विचारू लागलो . त्याने मला बाण बनवण्याची सगळी प्रक्रिया समजावून सांगितली . मला तीर कामठा याच्याबद्दल जाणून घेण्यात रस आहे हे पाहिल्यावर तो मला म्हणाला की बाबाजी तुम्ही कधी धनुष्यबाण चालवला आहे का ? कालच फक्त एकदा बाण मारला आहे . बाकी कधी चालवलेला आहे हे सांगितल्यावर त्याने मला विचारले चालवणार का ? मी लागलीच होकार दिला ! काहीतरी नवीन करण्याची संधी आयुष्यात मिळत असेल तर ती कधीही दवडू नये ! लहानपणी पुण्यात सदाशिव पेठेतल्या नारद मंदिरामध्ये ज्येष्ठ भावगीत गायक बबनराव नावडीकर यांनी आम्हाला एक गाणे शिकवले होते ! ते मला त्यांचा नातू मानायचे ! ते गाणे असे होते , 
" संधी समोर येता । दवडू नका कधीही । जाता निघून वेळा । येणार ना कधीही । " त्यामुळे मी ही संधी दवडायची नाही असे ठरवले ! मामा आतून धनुष्यबाण घेऊन आला . नेम धरणासाठी त्याने एक छोटीशी पांढरी डबी दहा फुटावर ठेवली . मला धनुष्य आडवा धरतात का उभारतात हे देखील माहिती नव्हते ! त्यामुळे मी आडवा धनुष्य धरला आणि माझ्या पद्धतीने बाण सोडला . डबी उडाली . आदिवासी म्हणाला हे अंतर फार कमी झाले आहे . आणि त्याने साधारण पन्नास फुटावर ती डबी नेऊन ठेवली . आणि म्हणाला आता मारा ! मी पुन्हा एकदा बाण प्रत्यंचाला लावला आणि मला माझे लहानपण आठवले ! लहानपणी टीव्हीवर रामायण महाभारत मालिका लागायच्या तेव्हा त्यातील वीर योद्धे धनुष्यबाण कपाळाला लावून काहीतरी मंत्र म्हणतात असे दृश्य मला आठवले ! मिरखेल तसाच बाण कपाळाला जाऊन नर्मदे हर नर्मदे हर असा मंत्र म्हटला ! आणि नेम धरून डबीवर बाण सोडला ! नेम कसला धरतोय डोंबल्याचा ! मला कुठून नेम धरायचा काहीच माहिती नव्हते ! काही कळायच्या आत बाण बाटलीच्या आरपार गेला ! आदिवासी अचंबित झाला आणि मी आनंदीत झालो ! मला धनुष्यबाण जमतो आहे असे मला उगाचच वाटू लागले ! आदिवासीच्या घरासमोरचा रस्ता खूप लांब होता . त्याने जवळपास १०० फुटावर ती बाटली नेऊन ठेवली . आणि माझ्याकडे चालत येऊ लागला . तिथे शेजारी एक टायर पडलेले होते . मी त्याला उगाचच म्हणालो की मध्ये टायर ठेवा ! त्याने देखील टायर मध्ये आडवे ठेवले .  आता त्या टायरच्या भोकामधून मला बाटली दिसत होती ! मी पुन्हा एकदा फिल्मी स्टाईलने धनुष्यबाण कपाळाला लावून नर्मदे हर मंत्राचा जप केला ! आणि सप् कन बाण सोडला ! मला वाटले की आता आपले अवघड आहे . बाण टायर मध्ये घुसणार . पण टायरच्या मधून आरपार जात बाणाने पुन्हा एकदा बाटलीचा अचूक वेध घेतला ! आता मात्र आदिवासीची खात्री पटली की मला धनुर्विद्या अवगत आहे ! तो मला म्हणाला बाबाजी आपको ये सब आता है ! आप पहिली बार नही कर रहे । मी त्याला म्हणालो "नर्मदा मैया की कसम भगवन्  । मुझे धनुष्य बाण नही आता । मै सचमुच पहिली बार इसको इतना लंबा चला रहा हूँ । "  "फिर तो आपको तीर कमान अवश्य रखना चाहिए । आप बहुत अच्छा करेंगे । " आदिवासीने सर्टिफिकेट देऊन टाकले . त्याच्याशी बसून चर्चा करताना माझ्या असे लक्षात आले की जे लोक स्वतःचा बाण स्वतः बनवतात ते सर्वश्रेष्ठ धनुर्धारी मानले जातात आणि पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असतात . त्याप्रमाणे हा आदिवासी त्या संपूर्ण भागामध्ये प्रसिद्ध होता . तो स्वतःच्या बाणाची टोके घरी भात्यावर बनवायचा . बाण  सुद्धा स्वतः बनवायचा . तो मला म्हणाला माझी आठवण म्हणून मी तुम्हाला हाच माझा बाण जो आहे तो सुंदर पैकी बनवून देतो ! आणि त्याने बघता बघता त्या टोकाला एक बाण जोडून एक सुंदर असा बाण मला बनवून दिला ! बाणाच्या मागच्या बाजूला गरुडाची पिसे लावलेली असतात . ती देखील कशी बांधायची हे त्याने मला शिकवले . तो बाण कसा होता हे आपल्याला दाखवतो .
हे मला सापडलेले बाणाचे टोक आहे . हे सापडले तेव्हा याहून खूप अधिक गंजलेले आणि वाईट अवस्थेमध्ये होते . आता मी त्याला घासून पुसून स्वच्छ केले आहे . मग आदिवासीला हे त्यानेच बनवलेल्या बाणाचे टोक आहे हे कसे काय कळाले असेल ? 
तर हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला त्याचा उलगडा होईल ! इथे बाणाच्या टोकांची विविध आरेखने (डिझाईन्स ) असतात . पैकी याने बनवलेला बाण मध्ये आहे . त्याच्या बाणाला स्पष्टपणे कडेला दोन टोके दिसत आहेत .  हे याने स्वतः बनवलेले आरेखन होते . यामुळे बाण बाहेर काढताना प्राण्याचे अधिक नुकसान करता येते असा हेतू .  
(टीप : या सर्व बाणांची टोके नुसती ठेवलेली आहेत पूर्ण खोचलेली नाहीत हे आपल्याला सहज लक्षात येईल . पूर्ण व पक्के खोचण्यासाठी त्यात एक प्रकारचा डिंक गरम करून टाकावा लागतो तो माझ्याकडे नाही . त्यामुळे हे बाण वापरण्याच्या योग्यतेचे नाहीत . )
आदिवासीने मला दिलेला बाण ! या बाणाची लांबी लक्षात यावी म्हणून शेजारी एक लिटर पाण्याची बाटली ठेवलेली आहे . 
आता हा बाण ठेवायचा कुठे ? आदिवासीने मला युक्ती सांगितली . बाणाचे टोक काढून झोळीमध्ये एका वहीमध्ये ठेवून दिले . आणि बांबू माझ्या मागे लावलेल्या बिछान्याच्या गुंडाळी मध्ये खोचून दिला ! त्याची खरे तर मला एक धनुष्यबाण देण्याची इच्छा होती . परंतु जुना धनुष्यबाण द्यायचा नसतो अशी परंपरा आहे . आणि परंपरेला जरा देखील छेद आदिवासी लोक देत नाहीत . त्याने मला सांगितले की या संपूर्ण शूलपणीच्या झाडीमध्ये काही प्रसिद्ध धनुर्धारी आहेत . त्यातले एक प्रसिद्ध नाव म्हणजे धशा मामा ! धशा मामा आणि हा आदिवासी चांगले मित्र होते .तो स्वतः धनुष्य बनवायचा त्यामुळे मला त्याच्या गावाची माहिती सांगून आदिवासीने पुढे पाठवले आणि सांगितले की लवकरच नदी पार केल्यावर त्याचे गाव येणार आहे . तिथे गेल्यावर तू त्याला भेट आणि माझे नाव सांग .मी तुला धनुष्यबाण द्यायला सांगितला आहे असे सांग . तो तुला धनुष्यबाण देईल .पैसे वगैरे देऊ नकोस. हाथिनी नदी पार केल्यावर कुलवट नावाचे गाव होते . तिथे हा धशामामा उर्फ देवसिंग राहत असे . संपूर्ण शूलपाणी मध्ये याने बनवलेले धनुष्य सर्वोत्तम असतात असे मानले जाते . मी बाण खोचून मोठ्या दिमाखात चालू लागलो ! काहीतरी मोठी गोष्ट मिळाल्याचा आनंद मला झालेला होता ! लवकरच हथिनी नदीकडे जाणारा उतार लागला . मी पुढे गेलेलो असताना मागून कुणीतरी मला जोरात आवाज दिला , " नर्मदे हर बाबाजी ! इधर आओ ! आगे मत जाना ! " नर्मदा खंडामध्ये कोणीतरी काहीतरी करू नका असे सांगितल्यावर ते गांभीर्याने घ्यावे लागते हे माहिती असल्यामुळे मी जागेवर थांबलो आणि चार पावले उलटा आलो . आदिवासीचे घर त्या रस्त्यावरच होते . अतिशय साशंक नजरेने तो मला म्हणाला , " ये तीर किसका है ? " दुर्दैवाने मी त्या आदिवासी बांधवांचे नाव विसरलो परंतु तेव्हा माझ्या ताजे ताजे लक्षात होते . मी नाव सांगितल्याबरोबर त्याने मला अतिशय आदराने आत मध्ये बोलावले . आत म्हणजे घराच्या बाहेर असलेल्या ओसरीमध्ये . आणि बसायला आसन देऊन प्यायला पाणी आणून दिले ! आपण अशावेळी काही बोलायचे नसते हे नेहमी लक्षात ठेवावे . नर्मदा मैया काय काय गमतीजमती करते ते फक्त पाहत राहायचे असते ! मला पुढे जायची गडबड आहे वगैरे मी काहीही बोललो नाही . तो मला म्हणाला की तुमच्या आधी दोन परिक्रमावासी येऊन इथे भोजन प्रसाद घेत आहेत . माझी एकादशी होती त्यामुळे भोजन घेण्याचा विषयच नव्हता .  कोण परिक्रमावासी आहेत या उत्कंठेने मी पाहिले तर चोर माता पुत्र होते ! मला पाहून चोराच्या तोंडावरचा रंग उडाला ! परंतु मी जणू काही मला काही कळालेलेच नाही असे दाखवत त्याला मोठ्या प्रेमाने नर्मदे हर केले ! त्याने देखील लाजेखातर नर्मदेहर असे उत्तर दिले . माताराम तर डोके खाली घालून जी बसली ते तिने परत वर काढलेच नाही ! तिच्याच उदात्त संस्कारामुळे तिच्या मुलावर चोऱ्यामाऱ्या करण्याची पाळी आलेली होती ! या आदिवासी माणसाचे नाव होते रजेला गुलाबसिंग मुजलदा पटेल . यातील मुजलदा ही त्याची जात आहे आणि पटेल त्याचे आडनाव आहे . हे त्यानेच मला सांगितले . ही कुकडीया गावाची पटेल फलिया होती . याचा तंत्रविद्येचा अभ्यास होता आणि हा भूत प्रेत काढायचा (असे त्याने मला सांगितले ). त्याने मला हे देखील सांगितले की ज्या माणसाने मला बाण दिलेला आहे तो या भागातला सर्वोत्तम धनुर्धारी आहे ! आणि असा बाण तुला कुठेच मिळणार नाही ! तुमच्याकडे पण धनुष्यबाण आहे का असे मी विचारल्या बरोबर त्याने त्याच्याकडे असलेले बाण आणि धनुष्य बाहेर काढले . या लोकांचे धनुष्यबाण घराच्या बाहेरच्या बाजूने सहज ओढून काढता येतील अशा रीतीने कौलांच्या खाली खोचलेले असतात. खरोखरीच त्याच्याजवळ असलेले बाण खूप लहान होते आणि माझा बाण लांबीला जास्त होता . तो मला म्हणाला की तुम्हाला धनुष्यबाण चालवून पाहायचा आहे का ? मी अर्थातच होकार दिला ! आता माझा हात थोडाफार बसलेला होताच ! दूर रस्त्यावर दिसणाऱ्या फुफाट्यामध्ये त्याने मला बाण मारायला सांगितले . मी मारलेला बाण रस्त्यामध्ये घुसून बसला . आता त्याने माझ्या हातातला धनुष्य घेतला आणि त्याने असा काही बाण मारला की तो रस्त्याचा चढ-उतार संपवून पलीकडच्या रस्त्यावर जो चढ आहे तिथे जाऊन पडला ! हे अंतर किमान ३०० मीटर असावे ! त्यासाठी त्याला धनुष्य ज्या पद्धतीने ताणावा लागला होता तसे केल्यास कदाचित धनुष्य तुटेल या भीतीपोटी मी धनुष्याचा प्रत्यंचा जास्त मागे खेचत नव्हतो ! कारण या भागातील धनुष्याचा प्रत्यंचा दोरीचा नसून बांबूचा असतो ! तो योग्य ठिकाणी योग्य प्रकारे खेचला नाही तर तुटू शकतो ! आणि त्यासाठी अर्थातच प्रचंड ताकद लागते . इतकी ताकद लावल्यावर शरीर थरथरू लागते आणि नेम चुकतो ! त्याने शेजारीच असलेल्या एका घरातील दोन मुलांना आवाज दिला . त्याने आवाज दिल्याबरोबर दोन मुले ते बाण घेऊन धावतच परत आली . त्याने मला सरळ आकाशात वरती बाण मारून दाखवला ! तो बरोबर आम्ही जिथे उभे होतो तिथेच येऊन पडला ! मी पळत आडोशाला जाऊन थांबलो . परंतु रजेला मला म्हणाला की हा बाण इतक्या वेगाने येतो की कौलांमधून सुद्धा सहज आत मध्ये घुसतो ! त्यामुळे लपून उपयोग नाही . त्याच्याकडे पाहत राहणे हाच उपाय आहे !  रजेला स्वतः एक उत्तम धनुर्धारी वाटत होता ! आणि तो तर सांगत होता की मला भेटलेला मनुष्य हा या भागातला म्हणजे उत्तर तटावरचा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे!  दक्षिण तटावरच्या सर्वोत्तम धनुर्धारीला मी योगायोगाने आधी भेटलेलो होतोच ! ते म्हणजे महात्मा फोदल्या गारद्या पावरा ! 
नर्मदा मातेच्या शूलपाणीच्या झाडीमधील दक्षिण तटावरील सर्वोत्तम धनुर्धारी महात्मा फोदला गारद्या पावरा आणि त्यांचा इतिहास प्रसिद्ध धनुष्य बाण ! 
रजेला सांगतो आहे की मला भेटलेला आदिवासी सर्वोत्तम तीर कमान चालवतो आणि स्वतः तो आदिवासी मात्र मला सांगत होता की देवसिंग उर्फ धशा हा सर्वोत्तम धनुर्धारी आहे ! म्हणजे हा धशामामा किती भारी असेल याचा मी विचार करू लागलो ! रजेला देखील मला पुन्हा तेच म्हणाला . की मी तुम्हाला धनुष्यबाण दिला असता परंतु वापरलेला धनुष्य बाण द्यायचा नसतो . मी त्याला सांगितले की धशा मामा कडून तो घेण्यासाठी मला सुचविण्यात आलेले आहे . मग मात्र रजेलाला आनंद झाला ! तो म्हणाला की धशा मामा तुम्हाला नक्की धनुष्यबाण देईल ! तुम्ही त्याला माझे सुद्धा नाव सांगा . आणि मगाशी तुम्हाला भेटलेल्या माणसाचे नाव सुद्धा सांगा कारण धशामामा त्याला धनुर्विद्येतला गुरु मानतो ! थोडक्यात गुरु कडून विद्या प्राप्त करून तिच्यामध्ये सिद्धी मिळवून देवसिंग यांनी एक वेगळी उंची गाठलेली होती असे मला एकंदरीत लक्षात आले . आदिवासी लोक त्यांच्या परंपरांना खूप जपतात आणि सन्मान देतात . पूर्वी दक्षिण तटावरील सेमलेट गावामध्ये होळीच्या सणामध्ये धनुष्यबाणाची चौकशी करायला मी गेलेलो असताना मला अपमानपूर्वक कसे हाकलले होते हे माझ्या लक्षात होते . थोडक्यात त्यांना पूज्य असलेला धनुष्यबाण ते असा सहजासहजी कोणाला देत नाहीत .
नर्मदा मातेची असीम कृपा अशी की या भागातील बरोबर हीच मंडळी मला काहीही संबंध नसताना भेटत गेली ! काहीही संबंध नाही असे आपण म्हणू शकत नाही कारण मला शस्त्रास्त्र विद्येची आवड आहेच . ते नर्मदा रेवा मातेच्या लक्षात आल्यामुळे बरोबर त्या त्या क्षेत्रातले जाणकार तिने मला भेटवत नेले ! नाहीतर सकाळी चालता चालता माझ्या शेजारी तोच आदिवासी येणे ,आणि त्याच वेळी मी ठेवलेला बाण बाहेर काढून त्याकडे पाहणे , आणि त्या बाणाबद्दल ह्याच आदिवासी मनुष्याकडे चौकशी करणे हा निव्वळ योगायोग कसा काय म्हणायचा ? एकंदरीत आता मला धनुष्यबाण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे हे माझ्या लक्षात आले ! मी पुढे जाणार इतक्यात रजेला मला म्हणाला की तुम्ही ही नदी एकट्याने पार करू नका . नदी थोडीशी भयानक आहे .त्यामुळे सोबत ही दोन मुले देतो ती तुम्हाला नदी पार करून देतील . तोपर्यंत चोर माता पुत्रांचे भोजन झाले होते त्यामुळे ते देखील माझ्यासोबत निघाले . सोबत दोन मुले होतीच . 
कुकडीया आणि कुलवट गावांना वेगळी करणारी हथनी नदी . ही नावाप्रमाणे अजस्त्र आहे . खाली अनखेडी हथनी संगम दिसतो आहे .  नदीचे पात्र रुंद असले तरी खोल नाही . नर्मदा मातेचे पाणी उलटे शिरलेले आहे .
हथिनी नदीला हत्तीण का म्हणतात हे तुम्हाला हा नकाशा पाहिल्यावर लक्षात येईल कारण संगमापाशी तिचे पात्र नर्मदा मातेपेक्षा सुद्धा अधिक रुंदीचे आहे ! महाराष्ट्राचे उत्तरतम टोक खालच्या बाजूला दिसत आहे .
इकडे ही दोन्ही मुले आपापसात बोलत होती आणि आम्ही ऐकत होतो . एक मुलगा म्हणाला , " अरे बापरे नदीचे पाणी अचानक कसे काय वाढले ? " दुसरा मुलगा म्हणाला , " डोंगरात कुठेतरी पाऊस झालेला असणार . त्यामुळे पूर आला आहे . " "आता काय करायचे ? " " आता नावेने जावे लागणार " दोघांमधला संवाद ऐकून मला मजा वाटत होती . काठावर लावलेली एक नाव दोघांनी काढली आणि आम्हाला तिघांना बसायची सूचना केली . एक मुलगा नावे मध्ये वल्हे घेऊन बसला आणि दुसऱ्याने नाव ढकलायला सुरुवात केली . दोन्ही मुले साधारण १०-१२ वर्षांची होती . थोडीशी नाव ढकलून झाल्याबरोबर पाण्यात असलेल्या मुलाने पोहायला सुरुवात केली . मी त्याला हात देऊ केला तर तो म्हणाला ,"नाही महाराज . तुम्ही नावेत बसून रहा . मी पोहतच येणार आहे . " साधारण नदीच्या मध्यावर आल्यावर पोहणारा मुलगा बुडू लागला ! त्याला वाचवण्यासाठी मी आता पाण्यामध्ये उडी मारणार इतक्यात दुसऱ्या मुलाने चटकन माझा दंड घेऊन त्याच्या हातात दिला . आणि सांगितले " चटकन दंड धर नाहीतर महाराज पाण्यात उतरतील ! " पोहणारा मुलगा अधून मधून नाव का ढकलतो आहे हे माझ्या लक्षात येत नव्हते . अखेरीस आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो . दोन्ही मुले जमिनीवर उताणी पडली आणि धापा टाकू लागली ! आम्ही आता पुढे जाणार इतक्यात मुलांनी रडायला सुरुवात केली ! ते म्हणाले की आम्ही आमचा जीव धोक्यात घालून तुम्हाला एवढी नदी पार करून दिली तुम्ही आम्हाला काहीच दिले नाही ! माझे सगळे पैसे चोराकडेच होते ! त्यामुळे मी चोराला हक्काने म्हणालो की बाबाजी आप इनको थोडे पैसे दे देना ! त्याने देखील लगेच झोळीतून १० -१० रुपये काढून दोघांना दिले ! त्याबरोबर मुले २० रुपये पाहिजेत म्हणून हटून बसली . आई मुलगा पुढे निघाल्यावर त्यांना अडवत मुले म्हणाले आणि या बाबाजींचे पैसे कोण देणार ? त्यावर मी त्यांना म्हणालो की मी तुम्हाला खाऊ देणार आहे .  पैसे देणार नाही . आणि माझ्याकडे त्यावेळी असलेले बिस्कीटचे पुडे , गुळ शेंगदाणे वगैरे मी त्यांना देऊन टाकले ! मी आता पुढे निघणार होतो . परंतु चोर माता पुत्रांना पुढे जाऊ द्यावे असा विचार करून मी काही काळ नदीकाठी एका दगडावर बसून राहिलो . एक कोळी माझ्या शेजारी येऊन गप्पा मारू लागला ! आणि विचारले "बाबाजी कितने को काटा बच्चों ने ? "  " मतलब ?  मै कुछ समझा नही । " "अरे बाबाजी बडे हरामी बच्चे है ये ! आपसे कमसे कम २० रुपये लिये होंगे ! " "हो बरोबर " मी म्हणालो . त्यावर त्या कोळ्याने मला त्या मुलांची सगळी कर्म कहाणी सांगितली . तो म्हणाला की तुम्ही आता फक्त ती परत कशी जातात ते पहा ! दोन्ही मुलांनी दोन्ही बाजूने नाव पकडली आणि चालत चालत या काठावरून त्या काठापर्यंत घेऊन गेले ! याचा अर्थ नदीमध्ये केवळ गुडघाभर पाणी होते ! म्हणजे मगाशी तो मुलगा पोहण्याचे नाटक करत होता ! आणि बुडण्याचे तर महानाट्य होते ! परंतु तो इतके सुंदर बुडल्यासारखे करत होता की मला सुद्धा क्षणभर वाटले की आपण उडी मारून याला वाचवावे ! मी उडी मारली असती तर सगळाच खेळ खलास झाला असता ! म्हणून त्याच्या भावाने चटकन त्याला माझा दंड देऊन त्याला वाचवले ! हे सर्व कशासाठी तर परिक्रमावासींना असे वाटावे की या दोघांनी खरोखर त्यांचा जीव धोक्यात घालून मोठी कामगिरी केलेली आहे ! आणि मग भरभरून दान द्यावे ! काय अफाट बुद्धिमत्ता आहे नर्मदा खंडातल्या मुलांची पहा ! कोळी मला सांगू लागला . आता थोडा वेळ ती मुले इथेच खेळतील आणि पुन्हा पुढचा बकरा पकडतील ! ही नदी चालत पार करता येते ! दिवसभरात अशा रीतीने ही मुले शंभर दीडशे रुपये आरामात कमवायची . आणि त्या पैशातून विमल गुटखा आणि स्टिंग नावाचे प्रचंड कॅफिन असलेले शीतपेय प्यायची . मला हे ऐकून मात्र वाईट वाटले . कोणाला नर्मदा खंडामध्ये एखादे सामाजिक कार्य करण्याची इच्छा असेल तर त्यांनी शूलपाणी च्या झाडीतील लोकांची किंबहुना एकंदरीतच मध्य प्रदेशातील ग्रामीण भागातील व्यसनाधीनता कमी करावी ! त्या लोकांना खरोखरीच या व्यसनाचे दुष्परिणाम माहिती नाहीत . मुलांच्या बुद्धिमत्तेचे  तसेच अभिनय कौशल्याचे मनोमन कौतुक करत आणि त्यांच्या भवितव्याची चिंता करत मी पुढे चालू लागलो . वळणावळणाच्या वाटा घेत गावामध्ये आलो .थोडे अंतर चालल्यावर कुलवट नावाचे गाव होते .  इथे एक डांबरी सडक लागली . आणि नेमकी चोरांची चोरी मला सापडली ! मी रस्त्यावरून चालत असताना अचानक मागून एक बस आली . मध्यप्रदेश मध्ये सरकारी बस जवळपास दिसतच नाहीत . सर्वत्र महिंद्राच्या जीप पासून बनवलेली मिनीबस असते त्या गाड्या दिसतात . या गाडीमध्ये गुरांप्रमाणे माणसे कोंबून त्यांना नेले जाते . अशी एक बस नेमकी माझ्या शेजारी येऊन थांबली . पाहतो तर काय खिडकीमध्ये चोर माता पुत्र बसलेले ! आज-काल परिक्रमेमध्ये चालण्याचा जरा कंटाळा आला की मिळेल त्या गाडीला हात करून पुढे जाणारे परिक्रमा वासी फार मोठ्या प्रमाणात आहेत ! हा आकडा इतका गंभीर आहे की जर नर्मदा मातेची शपथ घेऊन सांगा की मी एकदाही गाडीवर बसलो नाही असे कोणाला विचारले तर एकेरी आकड्याची टक्केवारी निघेल जे पूर्ण वेळ चालतात ! हे काही फारसे चांगले चित्र नाही . आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण जर नर्मदा परिक्रमा करणार असाल तर ती १००% पूर्णपणे पायीच करा . गाडीवर बसू नका ! कदाचित तुम्हाला असे वाटू शकेल की कोणी बघितलेले नाही .परंतु नर्मदा माता सदैव आपल्याकडे बघत आहे हे सदा सर्वदा तिन्ही त्रिकाळ डोक्यात ठेवावे! इकडे  नेमका गावी पळून जाण्यासाठी गाडीत बसलेला चोर माझ्यासमोरच आला आणि गाडी थांबली ! मी चोराला नर्मदेहर केले !
मला बघून चोर एकदम ओशाळला आणि त्याने मान च खाली घातली ! मी त्याला विचारले , "काय रे बस ने कुठे चाललास ?  " तर लगेच त्याने सराईत उत्तर दिले की माझ्या आईची तब्येत बिघडली आहे म्हणून मी आता तिला दवाखान्यात घेऊन जाणार आहे . मला खूप वाईट वाटले . नर्मदा परिक्रमेसारख्या पवित्र परंपरेचा आधार घेत चोर्यामाऱ्या करत फिरणारी अशी जमात देखील असू शकते हे मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पहात होतो ! आश्चर्य म्हणजे यांना देखील जे हवे ते नर्मदा माता देत होती हे देखील मी याची देही याची डोळा पाहिले ! उगाच नाही श्रीमद आद्य शंकराचार्यांनी देखील नर्मदाष्टकामध्ये लिहून ठेवले , 
अहोsमृतं स्वनं श्रृतं महेशकेशजातटे ।
किरात सूत वाडवेषु पंडिते शठे नटे । 
अर्थात
जटेत शंभूच्या निघोनि दिव्य नादी वाहते ।
भिल्ल विप्र सूत चोर पंडितादि पाहते ॥
याचा अर्थ शंकराचार्यांना देखील नर्मदा मातेच्या काठावर चोरांनी झटका दिलेला असणार हे निश्चित ! 
जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव ! तुम्हाला नर्मदा माता नामक कामधेनुच्या किनाऱ्यावर जे काही हवे असेल ते ती द्यायला बसलेली आहे ! कुणी काय घ्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न !  दिनेश सारख्या दक्षिण तटावरच्या एका आदिवासी मुलाने माझी मैत्री पत्करली ! आणि उत्तर तटावरच्या या चोराने मात्र मला मिळालेली दक्षिणा लांबवली ! असो ! तुम्ही केलेली पूर्व जन्माची कर्मे तुम्हाला या जन्मात सुद्धा अशा पद्धतीने नाचवत असतात ! कदाचित त्या तरुणाला चोरी करायची इच्छा नसेल सुद्धा . परंतु आईच चोरटी मिळाल्यामुळे त्याचा नाईलाज झालेला असू शकतो ! आपण कोणाच्या पोटी जन्म घेणार हे सुद्धा आपल्या कर्मांचा हिशोब ठरवत असतो ! आपल्याला गुरु कोण लाभणार हे मात्र आपण आपल्या क्रियमाण कर्माने आणि प्रयत्नांनी ठरवू शकतो ! किंबहुना काहीच प्रयत्न केले नाहीत तर तुमचा गुरु देखील प्रारब्धाने ठरवून ठेवलेला असतो ! सगळेच गमतीशीर गणित आहे ! ज्याला सुटले त्याला सुटले ! ज्याला नाही सुटले त्याचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी अनंत काळापर्यंत सुरू राहते ! इचलकरंजी जवळ बाळ महाराज नावाचे एक सत्पुरुष आहेत . त्यांनी हे गणित फार सोपे करून सांगितले आहे ! ज्याला दोन कळाले त्याला एक माहिती नाही . ज्याला एक समजला आहे त्याला दोन माहिती नाहीत ! 
समजतंय का बघा !
नर्मदे हर !





लेखांक एकशे तीस समाप्त ( क्रमशः )

टिप्पण्या

  1. 26 ऑक्टोबर ला प्रदक्षिणा प्रारंभ केली असे वरील फोटोत दिसते .

    हीच सर्वमान्य प्रदक्षिणा सुरु करण्याची तारीख आहे किंवा कसे त्याचे मार्गदर्शन करावे .

    आणि कुठला मार्ग सुरुवात करायला सोपा (दक्षिण की उत्तर ) त्यावरही थोडे सांगावे .

    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. परिक्रमा कार्तिकी एकादशीनंतर चालू करतात . उत्तर दक्षिण कुठल्याही तटावरून आपण परिक्रमा उचलू शकता . यावर्षी १२ नोव्हेंबर पासून परिक्रमा सुरू होणार आहे . ओंकारेश्वर इथून परिक्रमा उचलल्यास गर्दी जास्त लागते त्यामुळे मी असे सुचवेन की अन्य कुठलाही घाट निवडावा . शांतपणे परिक्रमा करता येते . अमरकंटक इथून उचलल्यास अतिउत्तम .मी जबलपूर वरून उचलली होती

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर