लेखांक १२९ : शूलपाणी झाडीच्या उत्तर तटावरील राणीकाजल माता आणि मथवाडची नेहा

नर्मदा मातेच्या उत्तर तटावरून माझी मार्गक्रमणा सुरू होती . हांफेश्वर ओलांडले म्हणजे उत्तर तटावरील शूल पाणीच्या झाडीचा मध्यभाग आला होता .
वरील नकाशा मध्ये हिरव्या रंगाने दाखवलेला भाग म्हणजे शूलपाणी ची झाडी आहे . हिच्या मधोमध नर्मदा माई वाहते आहे . खाली महाराष्ट्र आणि वरती गुजरात व मध्य प्रदेशाच्या सीमा आहेत . महाराष्ट्रातील तोरणमाळ अभयारण्य , गुजरात मधील शूलपाणेश्वर अभयारण्य आणि गुजरात मध्य प्रदेश सीमेवरील रतनमहल अस्वल अभयारण्य हा सर्व शूलपाणी झाडीचाच भाग आहे . हाफेश्वर हा झाडीचा मध्यभाग असून लाल रंगाने दाखवला आहे .
 इथून पुढे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत . मला देवा दादा ने सर्व मार्ग समजावून सांगितले होते . प्रत्येकाला आपला मार्ग निवडता यावा म्हणून सर्वच मार्ग इथे व्यवस्थित देतो आहे . कृपया नीट अभ्यासावेत . सर्वात पहिला मार्ग जो खरा परिक्रमा मार्ग होता तो आता १००% जलमग्न झाला आहे याची कृपया नोंद घ्यावी . त्यामुळे जुन्या पुस्तकांमध्ये सापडणारे उल्लेख आणि मंदिरे तुम्हाला इथे आता सापडणार नाहीत .  किंबहुना सरदार सरोवर धरणाची उंची दर काही वर्षांनी थोडी थोडी वाढवली जात आहे त्यामुळे कदाचित आता मी सांगितलेली गावे सुद्धा काही वर्षात जलमग्न होऊ  शकतात . तरीदेखील मी माहीत करून घेतलेले विविध मार्ग खालील प्रमाणे .
सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे डांबरी सडक .
त्यासाठी तुम्हाला पुन्हा उलटे फिरावे लागते . हांफेश्वर कवाट  रेणदा छकतला उमराली सोंडवा कवडा डही धर्मराय कोटेश्वर गेहलगाव चिखलदा किंवा कोटेश्वर निसरपूर कडमाल नर्मदानगर चिखलदा असा तो मार्ग आहे . वयस्कर परिक्रमा वासी इथून जातात .
दुसरा मार्ग पूर्णपणे नर्मदा मातेच्या काठावरून जाणारा आहे .इथे मंदिरे किंवा आश्रम अजिबात नाहीत . त्यामुळे जाताना स्वतःच्या सोबत शिधा बाळगलेला बरा पडतो असे मला देवा दादाने सांगितले .परंतु मार्ग मात्र निश्चितपणे आहे . हा मार्ग खालील प्रमाणे आहे .
हाफेश्वर अबादीया चिखलदा जलसिंधी सकर्जा मथवाड अजानबारा भिताडा सुगत झंदाना हाथिनीनदी ककराना दभानी छाछकुवा दसाना कष्टा धर्मराय देहर चंदनखेडी कोटेश्वर खापरखेडा . यातील भिताडा या गावासमोर आपली भाबरीची शाळा येते .
मथवाड मार्गे जाण्यासाठी अजून एक मार्ग आहे . तो असा . हाफेश्वर (गुजरात ) अंबासापडी (मध्य प्रदेश ) रानीकाजल खटामडी वाकनेर मुरब्या वेलीफल्या मथवाड बामणसैरी अट्ठा उमरठ टेमला कवडा डही धर्मराय पिपरीपुरा कोटेश्वर गेहलगाव चिखलदा. हा मध्यम मार्ग समजावा . 
मी पहाटेच मुक्काम सोडला होता . मध्ये आडवा आलेला एक मोठा ओढा मला ओलांडायचा होता . पावसाळ्यामध्ये हा भरून जातो . आता मात्र पाणी उतरल्यामुळे लोकांनी जागजागी शेती केली होती आणि कुंपणे घातली होती . इथून ओढा ओलांडण्याचा मार्ग मोठा मजेशीर होता ! वाटेमध्ये अनेक घरे , शेते ,कुंपणे ओलांडून जावे लागते .  स्थानिक गावकरी सुद्धा तसेच जात होते . एके ठिकाणी इतर चक्क एका घराच्या आतून जावे लागले . ते लोकही सरावले होते  . काही बोलत नसत . एके ठिकाणी मात्र पाच फूट कुंपणावरून उडी मारून जावे लागले ! आदिवासी स्त्रिया सुद्धा या पाच फूट कुंपणावर लीलया चढून उड्या मारताना पाहिल्या आणि मला अचंबा वाटला ! 
खूप चिवट लोक आहेत . पुरुष झाडावर चढून लाकडे तोडतातच  . परंतु स्त्रिया देखील न घाबरता झाडाच्या टोकावर चढून लाकडे तोडताना दिसतात ! दणादण चढतात आणि उतरतात !  पटापट उतारावरून पळत उतरतात ! चार चार हांडे डोक्यावर घेऊन चालतात . कित्येक किलोमीटर चालतात .  कुठली तक्रार नाही , काही नाही ! याच वयाच्या शहरातील तरुणी कशा वागतात याची जर तुलना केली तर त्यांना या आदिवासी महिलांकडून शिकण्यासारखे खूप आहे असे वाटते . नर्मदा खंडातील स्त्रिया या एकंदरीतच अत्यंत कष्टाळू , सुस्वभावी , गृहकर्तव्यदक्ष , निरोगी , सुदृढ ,सुशील आणि आनंदी आहेत . लहानपणापासूनच एक स्त्री म्हणून नर्मदा मातेच्या रूपाने तिला पुजले जाते व त्या माध्यमातून मिळणारा मानसन्मान कदाचित तिला थोडेसे वेगळे घडवतो की काय हा संशोधनाचा विषय निश्चितपणे आहे . या भागाला एकाच गोष्टीचा शाप मात्र लागलेला आहे तो म्हणजे व्यसनाधीनतेचा . इथे आबालवृद्ध स्त्री-पुरुष सर्वजण व्यसनं करतात .इथल्या एक जात सर्व स्त्रिया बिमल पान गुटखा खातात . गुजरात मध्ये विमल प्रसिद्ध आहे . मध्यप्रदेशच्या सीमेवर सिल्वर महक नावाचा पान मसाला मिळतो आणि पुढे मध्य प्रदेशात राजश्री पान मसाला सर्रास खाल्ला जातो . महाराष्ट्रामध्ये देखील विमलचे प्रस्थ जास्त आहे . मोहाची दारू तर इथे सर्वच जण पितात .किंबहुना त्याला दारू मानतच नाहीत . ते इथले सार्वजनिक पेय मानले जाते . 
चार पैशांसाठी असल्या विषारी पदार्थांची जाहिरात करणारे देशद्रोही कलाकार
केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि टिचभर पोटासाठी समाजाचा विचार न करणाऱ्या अशा कलाकारांचा करावा तेवढा निषेध थोडा आहे
सरकारने अशा कलाकारांवर कारवाई करण्याचे धोरण ठेवले पाहिजे . तसेच अशी एकही जाहिरात त्यांनी केली की त्यांना चित्रपटात काम करायला बंदी केली पाहिजे .त्यांचे सर्व पुरस्कार काढून घेतले पाहिजेत. कारण चित्रपटात आदर्श वागून जाहिरातीतून ते त्यांचा खरा आदर्श समाजापुढे मांडतात . हे फार भयानक आहे . असो .
मोहाच्या झाडांना चैत्राची पालवी फुटली होती ! नव्या लुसलुशीत हिरव्यागार पानांनी पळसाचे झाडे डवरत होती ! कुठून पाणी आणतात ही झाडे काय माहिती ! काल मी ज्या वाजेपूरच्या विहिरीमध्ये किंवा बावडी मध्ये गेलो होतो तिथे एकाने मला सांगितले होते ते मला या निमित्ताने आठवले . या विहिरीचे बांधकाम करताना एक मोठे जाडजूड वडाच्या झाडाचे मूळ आडवे आले होते . ते छाटल्याबरोबर इकडे दहा किलोमीटर दूर असलेल्या मथवाड गावातला वटवृक्ष अचानक वठला ! इतकी दूर यांची मुळे जातात ! हाफेश्वर मार्गे सर्वात प्रचलित झालेला मार्ग म्हणजे परत कडीपाणीला जाऊन लिंबी वखतगड मार्गे अट्ठा गावात येणे . कलहंसेश्वर या नावाची कथा मोठी रंजक आहे . कलहंस कृषी तप करत असताना त्यांची परीक्षा पाहायला इंद्रदेव आले . कलहंस ऋषींनी त्यांना ओळखल्यावर इंद्रदेवांनी वर मागण्यास सांगितला .तेव्हा त्यांनी असा वर मागितला की शंकरांना इथे बोलवावे  व त्याप्रमाणे कलहंसेश्वर महादेव तिथे प्रकट झाले ! इथे धरण होण्यापूर्वी हा पर्वत खूप कठीण होता . व इथे येताना परिक्रमावासी धापा टाकत अथवा हाफत हाफत येत म्हणून याचे दुसरे नाव हाफेश्वर पडले हे तर आपण पाहिलेच . मी चालताना पायाखाली अखंड डोंगरांच्या वाट्या होत्या . कधी चढ तर कधी उतार . सपाट रस्ता लागतच नव्हता ! वस्ती अत्यंत विरळ होती .किंबहुना नव्हतीच म्हटले तरी चालेल . या रस्त्याने कधीच कोणी परिक्रमावासी जात नसल्यामुळे मला बघितल्यावर लहान मुलेच काय परंतु स्त्री-पुरुषही घरात पळून जात आणि लपून मला बघत . या भागामध्ये घरोघरी धनुष्यबाण आणि हत्यारे असतात . इथे नुकतेच काही रस्ते बनविण्यात आले होते परंतु ते अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने बनवले गेले होते . कुठल्याही गाडीला सहन होणार नाहीत अशा प्रकारचे उतार आणि चढ इथे देण्यात आलेले होते ! इथे गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांची सीमा रेषा आखण्याचे काम एक छोटासा नाला करतो त्याच्या प्रवाहाने या दोन्ही राज्यांना विभाजित केलेले आहे . आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जसे मुख्य गाव असते ज्याच्या बृहत वस्तीला किंवा बुजुर्ग अर्थात जुन्या वस्तीला बुद्रुक म्हटले जाते आणि किरकोळ किंवा खुर्दा असलेल्या वस्तीला खुर्द म्हटले जाते , तसेच विशिष्ट समूहाच्या किरकोळ वस्तीला वाडी म्हटले जाते तसेच इथे फल्ली अथवा फल्‍या असतात . साध्या भाषेत फळी . हा मध्य प्रदेशचा भाग असून देखील इथे भाषा मात्र भील आणि पावरी हीच चालत होती . हिंदी मराठी किंवा इंग्रजी कोणाला फारसे येत नव्हते .  मध्यप्रदेशचा हा अलीराजपुर जिल्हा होता .
चालत चालत मी आंबा सापडी (चापडी ) नावाच्या गावात पोहोचलो . नर्मदा माता माझ्या उजव्या हाताने वाहतच होती परंतु इथून तिचे विशेष सुंदर असे दर्शन झाले ! एका घरातून मला आवाज देऊन पाणी पाजण्यात आले तर दुसऱ्या घरातील आदिवासींनी सुंदर असा कोरा काळा चहा पाजला ! त्या आदिवासीच्या तरुण मुलाने दोन्ही घरांच्या मधोमध एका जागी नेऊन माझा सुंदर फोटो काढला ! आणि माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . इथे मागे नर्मदा माता वाहताना दिसते आहे . परंतु तिचे पाणी इतके स्थिर आणि शांत आहे की नीट पाहिल्याशिवाय ती नर्मदा माता आहे हे कळत नाही . कारण डोंगरांचे सुंदर असे प्रतिबिंब नर्मदा मैया मध्ये पडलेले असून नीट पाहिल्याशिवाय पाण्याची पातळी सुद्धा कळत नाही !
हेच ते चित्र आहे !पहा बरं तुम्हाला नर्मदा मैया सापडते का या चित्रात ? अहो प्रत्यक्ष डोळ्यांनी सुद्धा ती सापडत नव्हती तर फोटोमध्ये सापडणे किती कठीण आहे !
आता पहा बरं !  दिसली का आपली नर्मदा मैय्या ! माझ्या फेट्याच्या पातळीला नर्मदा मातेचे पाणी आहे !
समोर दिसणारे डोंगर दक्षिण तटावरचे आहेत . तिथे कुंभरी गाव आहे . दुर्दैवाने दक्षिण तटावरच्या या गावात आदिवासींची परंपरा नष्ट करत पैशाच्या बळावर ख्रिस्तीकरण सुरू झालेले आहे . 
कुंभरी गावात उभे राहिलेले चर्च . जर आदिवासी लोकांना चर्च चालू शकते तर मंदिर देखील चालू शकेल नाही का ? 
इथून पुढे भयानक चढउताराचा रस्ता लागला . म्हणजे हा कच्चा रस्ता होता ज्यावरून दुचाकी जाऊ शकत होती . परंतु दुचाकीला ब्रेक दाबला तरी ती खाली पळणार इतका तीव्र उतार होता ! त्यामुळे गाडी थांबवणे हा प्रकारच नव्हता ! फक्त पळवणे ! वर खाली उतार चढत वाटेतील घरे मनुष्यवस्ती शेती पहात पुन्हा एका मोठ्या रस्त्याला लागलो . मोठा रस्ता म्हणजे कच्चाच . परंतु आकार थोडा रुंद . इथे एक खिंड लागली . खिंडीमध्ये एक मोठे घर लागते . इथे मनजी आणि सुनजी म्हणून भाऊ आहेत . सुनजी सध्या सरपंच होता . त्यांनी मला आदराने बोलावून घेतले . मिश्किल हास्य आणि हुशार माणूस होता ! याच्या मुलाचे नाव आलसा होते त्याने मला चहा पाजला आणि जेवून जाण्याचा आग्रह केला . पुढे काही मिळण्याची शक्यता नाही हे देखील सांगितले .त्यामुळे मी जेवणाला थोडासा वेळ असूनही होकार दिला . याच्या घरामध्ये लगीन घाई चालली होती . चैत्र वैशाखात किंवा साधारण एप्रिल मे महिन्यामध्ये आदिवासींची लग्नसराई असते .त्याहून सोपी खूण म्हणजे मोहाची फुले वेचून संपली आणि पळसाच्या शेंगा खाली पडू लागल्या की लगीन सराई सुरू होते ! आता आल्यासारखी तुम्ही लग्नासाठी थांबा असा आग्रह सरपंचाने धरला परंतु मी विनम्र नकार दिला . यांनी मला मस्तपैकी मक्याची भाकरी आणि डाळभाजी चारली . पोटभर जेवलो ! डोंगर चढून उतरून पायातले बळ कमी झाले होते . ती झीज या भोजनाने भरून काढणे आवश्यक होते !शेजारीच त्याचा भाऊ मनजी याची झोपडी आणि दुकान होते त्याने मला आदराने झोपडी मध्ये नेले . आणि थंडगार सावली मध्ये बसवून चंदनाच्या चारोळ्यांची आंबटगोड फळे आणि चारोळ्या खायला दिल्या .तसेच सोबत थंडगार पाणी देखील पाजले ! सगळ्याच थंड गोष्टी एकत्र आल्यामुळे डोके एकदम थंड होऊन गेले ! मजा आली ! 
सुनजी मनजी च्या घरामध्ये थांबलेल्या परिक्रमावासींचे संग्रहित छायाचित्र
आता मला खूप चालायचे होते पुढे वाकनेर गावाच्या फल्या लागू लागल्या . खटांबडी मुरब्या वेलीफल्या करीत राणी काजल देवीच्या पायथ्यापाशी आलो . आपल्याला एव्हाना माहिती झाले असेलच की आदिवासी लोकांची देवी देवमोगरा किंवा राणी काजल नावाने प्रसिद्ध आहे .वाटेमध्ये बाजार करून येणारे दोन आदिवासी भेटले . एक बाप आणि त्याची सात-आठ वर्षाची मुलगी होती .  बाप मोकळा चालला होता आणि सर्व ओझे मुलीच्या डोक्यावर दिले होते . मी तिच्या डोक्यावरचे ओझे माझ्या डोक्यावर घेतले . आणि माझ्या काठीचे एक टोक तिने पकडले ! अशी विचित्र दिसणारी ती वरात अतिशय वेगाने डोंगर चढू उतरू लागली ! ते दोघेही बाप लेक आरामात चालत होते आणि मला मात्र अक्षरशः पळावे लागत होते ! माझी मजा करण्यासाठी की काय परंतु तो आदिवासी मुद्दाम वेगाने चालतोय असे मला उगाचच वाटले ! अखेरीस वाटेत एका दुकानदाराने आम्हाला थांबवले . दोघे पावरी भाषेमध्ये बोलू लागले . बहुतेक आदिवासी दुकानदाराला सांगत होता की बाबाजी चालायला चांगला तयार आहे ! या लोकांच्या दृष्टीने मी अतिशय जाड होतो ! माझ्या दृष्टीने माझे आतापर्यंतचे सर्वात बारीक रूप मी पाहत होतो ! दुकानदाराला मी राणी काजल माते विषयी विचारल्यावर त्याला आश्चर्य वाटले ! तो म्हणाला ती आमची देवी आहे . तिथे परिक्रमा वासी जात नाहीत . मी त्याला म्हणालो की अरे देव कधीपासून आमचे आणि तुमचे व्हायला लागले ? देव हा देव आहे . देवी म्हणजे साक्षात शक्ती ! ती विविध रूपाने प्रकट होते ! कधी आईच्या रूपाने , तर कधी मावशीच्या रुपाने , तर कधी शिक्षिकेच्या रूपाने , कधी मैत्रिणीच्या रूपाने ,तर कधी पत्नीच्या रूपाने , कधी रण चंडिका बनून ती रण गाजवते ,तर कधी गृहलक्ष्मी बनून उभे घर सांभाळते ! 
या देवी सर्व भूतेषु । विविधरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै | नमस्तस्यै नमो नमः ॥
दुकानदाराला खूप आनंद झाला . तो मला म्हणाला बाबाजी तुम्ही एक काम करा . याहा मोगीचे स्थान डोंगरावर आहे .डोंगराला खूप खडा चढ आहे . आणि डोंगरावर जाण्याचा मार्ग आपल्या दुकानात शेजारूनच जातो . त्यामुळे तुम्हाला पुन्हा खाली यावे लागणार आहे . तरी तुम्ही अनावश्यक सामान दुकानात ठेवून जा . फक्त नर्मदा मैया सोबत ठेवा आणि वर जाऊन या ! ही युक्ती मला फारच आवडली ! लगेचच मी झोळी खाली ठेवली आणि केवळ मैय्याची पिशवी आणि दंड हातात घेऊन निघालो ! वरपर्यंत कच्चा रस्ता गेलेला होता . आज रविवार असल्यामुळे आदिवासी लोकांची वरती प्रचंड गर्दी होती . मी एकटाच चढत निघालो होतो . सगळेजण माझ्याकडे पाहत होते . माझा एकट्याचा वेष वेगळा दिसत होता ! नर्मदा मातेच्या काठावर राहणाऱ्या लोकांना परिक्रमावासी पाहण्याची सवय आहे .परंतु इथे संपूर्ण मध्यप्रदेश गुजरात महाराष्ट्रातून लोक येतात . त्यातील बऱ्याच लोकांना हा नक्की काय प्रकार आहे ते कळत नव्हते !  त्यात आज रविवार असल्यामुळे सर्वांनी सोबत कोंबडे आणि बकऱ्या आणलेल्या होत्या !  देवीचे स्थानापशी आलो ! अलीकडे भरपूर चार चाकी व दुचाकी गाड्या लागल्या होत्या . देवीचे स्थान म्हणजे केवळ चार भिंती होत्या .खांब बांधून अर्धवट सोडून दिले होते. मोठे झाड होते . अनेक लहान मोठे दगड रंगवण्यात आले होते . हेच देवीचे मुख्य स्थान होते . लोकांनी वारलेली मडकी इथे पडली होती . घरी पुजलेले मातीचे देव आणि बैल सुद्धा पडले होते . पुजारी देखील आदिवासी समाजाचा होता . मला पाहून त्याला फार आनंद झाला ! त्याने मला भरपूर खोबरे आणि पेढे खायला दिले !  देवीचे दर्शन घेऊन मागे पाहिले आणि अक्षरशः भान हरपले ! नर्मदा मातेचे इतके सुंदर रूप आजपर्यंत पाहिलेच नव्हते ! ते रूप अतिशय सुंदर आणि अतिशय भव्य दिव्य असे होते ! सरदार सरोवर धरण झाल्यापासून नर्मदा मातेच्या काठावरून चालत नसल्याचा हा परिणाम आहे . तिचे धरणातले रूप पाहायला मिळतच नाही . अधून मधून एखादी छोटीशी झलक दिसते . जशी आपण वरच्या चित्रात पाहिली  तशी . परंतु एकाच दृश्यामध्ये उभी नर्मदा माता दिसणे अतिशय कर्म कठीण !  ते इथून दिसत होते ! याचसाठी नर्मदा मातेने मला इथे येण्याची बुद्धी दिली असावी !  सुमारे ७० ते ८० किलोमीटरचा परिसर अगदी सहज दिसत होता ! संपूर्ण शूल पाण्याची झाडीच दिसत होती म्हणाना ! माझी अशी विनंती आहे की जमल्यास प्रत्येकाने ह्या ठिकाणी अवश्य जावे आणि हे अद्भुत दर्शन अनिमिष नेत्रांनी आपल्या हृदयामध्ये कायमचे साठवून ठेवावे !
या भागातले डोंगर असे चढण्या उतरण्यास कठीण आहेत
नर्मदा मातेच्या बाजूला असे कडे दिसतात
तशा डोंगरातूनच गाडीवर नेण्यासाठी कच्चा रस्ता बनविण्यात आला होता
हे देवमोगरा किंवा राणी काजल मातेचे डोंगरावरील स्थान आहे मागे नर्मदा माता दिसते आहे .
लोकांनी वाहीलेली मडकी आणि मातीचे बैल वगैरे शेजारी अक्षरशः ढिगाने पडलेले आहेत .
स्थान अतिशय रम्य आहे परंतु लोकांनी भरपूर कचरा केलेला दिसला .
याच देवीचे खाली एका डोंगरावर देखील स्थान आहे तिकडे मी काही गेलो नाही . परंतु ते स्थान असे आहे .
इथून नर्मदा मातेचे होणारे अद्भुत दर्शन असे आहे !वातावरण स्वच्छ असेल तर अजून लांबचे दिसते !
 मी आल्याबरोबर सर्वांनी बकरे कोंबडे कापणे थांबवले होते . मी उतरू लागताच मला त्या मुक्या प्राण्यांचे आर्त आवाज ऐकू आले .फार वाईट वाटले . या विषयावर समोरच्या तटावर असताना फोदला मामा पावरा यांच्याशी माझी चर्चा झाली होती .त्यांचे याबाबतीतले विचार फार स्पष्ट होते . ते म्हणत , " जेव्हा एखाद्या प्राण्याची हत्या होते , तेव्हा त्याला मारणारा प्राणी अपराधी नसून मरणारा प्राणी खरा अपराधी आहे ! तो प्रतिकार करत नाही म्हणून त्याला मारले जाते ! वाघाचा कोणी बळी का बरं देत नाही ? गरुडाचा , मांजराचा किंवा कुत्र्याचा बळी का देत नाहीत ? कारण हे प्राणी थोडा का होईना प्रतिकार करतात . ससा कोंबडी हरण शेळी मेंढी गाय बैल म्हैस हे मात्र अत्याचार करणाऱ्या प्राण्याला लगेच शरण जातात आणि मान टाकून देतात . त्यामुळे ते मरतात . " भारतीय लोकांनी या गोष्टीचा विचार अवश्य करावा .
 नर्मदा मातेला नेत्रामध्ये साठवत उतरू लागलो . थोड्याच वेळात ती दिसायची बंद झाली . दुकानातून माझे सामान उचलले आणि पुढे चालू लागलो . कडकडीत दुपार होती ती हळूहळू संध्या छायेमध्ये परिवर्तित होऊ लागली . सलग अंतर चालत मथवाड नावाचे गाव गाठले . इथे गावाच्या चौकात एक हनुमान मंदिर आहे . इथे परिक्रमावासींची सोय होते असे मला देवा दादाने सांगितले होते . परंतु मी गेलो तेव्हा मंदिर बंद होते . नंतर माझ्या असे लक्षात आले की गावामध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे . आणि सगळीकडे धावपळ सुरू आहे . इतक्यात एक कार्यकर्ता तिथे माझ्याशी येऊन गप्पा मारू लागला . मंदिराच्या बाहेर थोडीशी फरशी घातली होती तिथे आसन लावायला त्याने मला सांगितले . अतिशय गंभीर चेहरा करून तो मला सांगू लागला , "आमच्या गावामधले जे प्रमुख लोक परिक्रमावासींची सेवा करतात ते सगळे आज दुसऱ्या गावाला गेलेले आहेत . फार मोठा विषय झालेला आहे ! " या क्षेत्रात अतिशय जघन्य मानला जाणारा अपराध घडलेला होता . गावातील एक सून दुसऱ्या गावातील आदिवासी नसलेल्या मुलाबरोबर पळून गेल्यामुळे अख्खा गाव तिला आणायला गेलेला होता . या भागातील आदिवासी लोकांचे विवाहाच्या बाबतीतले नियम फार सोपे आहेत . इथे मातृसत्ताक पद्धत आहे . म्हणजे मुलीच्या घरी जरी नवरा राहायला जात नसला तरी मुलीला जास्त अधिकार असतात आणि मुलगीच घर सांभाळते .पुरुषाला हुंडा द्यावा लागतो .मुलीकडून हुंडा घेतला जात नाही . त्या बदल्यात पुरुषाला बहुपतिकत्वाचा अधिकार दिलेला आहे . अर्थात त्याला विवाहबाह्य संबंध ठेवायला परवानगी नाही तर थेट लग्न करूनच अशी व्यक्ती घरात आणावी लागते . हा नियम सर्वमान्य असल्यामुळे विवाहबाह्य संबंध हा प्रकार या भागात दिसत नाही . कोणाला असे वाटू शकते की हा महिलांवर अन्याय आहे . तर तसे देखील नाही कारण महिलेला कितीही मुले झाल्यानंतर जर असे वाटले की आपला पती , पती म्हणवून घेण्याच्या योग्यतेचा नाही तर ती ताबडतोब त्याला सोडून तिला आवडेल त्या व्यक्तीसोबत जाऊ शकते . अशावेळी झालेली मुले पित्यालाच सांभाळावी लागतात . ती सांभाळणे तिच्यावर बंधनकारक नाही परंतु बापावर बंधनकारक आहे . हा द्वितीय संबंध देखील महिलेच्या परिप्रेक्ष्यातून समाजाने स्वीकारलेला आहे . फक्त दुसरा पती आदिवासी असणे आवश्यक असते . आणि त्यासाठी पहिल्या पतीची परवानगी असो नसो दिला तो अधिकार दिलेला आहे . त्यामुळे पती पत्नीला फार जपून वागवताना दिसतात . दोघांच्या नात्यात आदर असलेला दिसतो . इथे मात्र आदिवासी नसलेल्या मुलासोबत ती पळून गेली होती हा मोठाच अपराध तिने केला होता . उभा गाव तिला आणायला गेलेला असल्यामुळे गावामध्ये फक्त महिला आणि मुले होती . आज आपल्याला उपाशी झोपायला लागणार याची मी तयारी मनोमन करून ठेवली .एक छोटी मुलगी मंदिरामध्ये शिरल्यानंतर माझ्या लक्षात आले की दाराला कडी आहे कुलूप नाही . मग मी मंदिर उघडून आत गेलो आणि मारुतीची उपासना करत बसलो . त्या छोट्याशा मुलीने सगळे मंदिर झाडून घेतले . मग मंदिरातली सगळी भांडी उपकरणे बाहेर घेऊन गेली आणि स्वच्छ घासून पुसून घेऊन आली . मंदिरातली फरशी तिने पुसून घेतली आणि मला बाहेर बसायला सांगितले . नंतर तिने मारुतीला फुले वाहून हार घालून त्याची सुंदर पूजा केली व आरती केली ! दिवाबत्ती केली . एव्हाना अंधारू लागले होते . मी कुठून आलो आहे वगैरे चौकशी तिने केली ! ही मुलगी फक्त तिसरी मध्ये होती ! म्हणजे तिचं वय आठ वर्ष असावे ! तिचे नाव होते नेहा ! मंदिरासमोरच कोपऱ्यावर तिचे घर होते . घराशेजारी एक हापसा आहे तिथे तुम्ही स्नान करू शकता हे तिने मला सांगितले . मी अगदी मनोमन तोच विचार करत होतो की आता स्नान कोठे करावे तो तिने ओळखला ! इतक्यात तिथे नंदू नावाचा एक मुलगा शेळ्या घेऊन आला . मंदिरा बाहेर पिंपळाचे झाड होते . त्याची पाने तोडून तो शेळ्यांना खाऊ घालत होता . मी पण त्याला मदत केली . पिंपळाची कोवळी पाने शेळ्यांना लपालपा खाताना पाहून मला खूप मौज वाटली ! शेळी हा प्राणी मला लहानपणापासून आवडतो ! माझ्या आजोळी एक शेळी होती . आमच्या गड्याची बायको मला रोज त्या शेळीचे दूध काढून पाजायची ! ते दूध पिले की मिशा येतात असे त्याने मला सांगितले होते . त्यामुळे मी ते दूध पिऊन आरशात जाऊन मिशा बघायचो ! पुढे आदमापूरला दर्शनाला जायला सुरुवात केली . बाळुमामाची अनुभूती येत गेली . घरी बाळूमामांच्या मेंढ्या येऊन गेल्या ! समोरच्या तटावर असताना मला भेटायला आलेले माझे मित्र चन्ने मामा आणि मी एकत्र जाताना कुठेही कुठल्याही मेंढ्या दिसला की आम्ही बाळूमामाच्या नावानं चांगभलं ! असं आजही म्हणतो ! तात्पर्य शेळ्या मेंढ्या आणि त्यांच्या लीला मला आवडतात . अतिशय चपळ चिवट आणि कठीण प्राणी आहे ! आपले अजिबातच ऐकत नाही ! तिला वाटेल तेच खरे करणार ! त्यांच्या ओरडण्याचे विविध अर्थ काढायला मला फार आवडायचे ! आणि तसा आवाज काढून त्यांना फसवायचे हा एक लहानपणीचा आवडीचा उद्योग ! शेळ्या दगडावर कडे कपारी मध्ये कशा चढतात हे पाहायला मला मजा यायची .
हेच ते पिंपळाचे झाड आहे ज्याची पाने मी शेळ्यांना खाऊ घातली . समोरून गेलेला रस्ता खेरवाडा कडे जातो . फोटो ज्यावर उभा राहून काढला आहे तो रस्ता भिताडा गावाकडे जातो
हे हनुमंताचे मंदिर आहे . बाहेर टाकलेल्या टाइल्स जागोजागी तुटलेल्या आहेत . परंतु गावाकडे आधुनिक फरशी घालण्याची हौस फार मोठी असते !
शेजारीच माती शेती आणि रस्ता असल्यामुळे ही फरशी सतत स्वच्छ ठेवावी लागे .
मी या विटांच्या बांधकामाला लागूनच आसन लावले होते . बरोबर समोर नेहाचे घर दिसते आहे !
मथवाडचे हनुमान दादा !
 बराच वेळ शेळ्यांशी खेळण्यावर मी असे ठरवले की आता लवकर झोपून टाकावे म्हणजे भुकेची जाणीव होणार नाही .स्नान पूजा आटोपून घेतली आणि झोपायच्या तयारीला लागलो इतक्यात नेहा तिथे आली आणि मला म्हणाली बाबाजी रुको !तिच्या हातात तिने तांब्या आणि झाकलेले ताट धरले होते !माझ्यासमोर ताट ठेवत तांब्या बरोबर माझ्या डाव्या हाता समोर ठेवत म्हणाली , "भोजन पालो बाबाजी ! " मला आश्चर्याचा धक्काच बसला !तू कसे काय माझ्यासाठी जेवण आणलेस ? असं विचारल्यावर नेहा म्हणाली आमच्या गावातून कधीही कोणीही परिक्रमावासी उपाशी जात नाही . आणि आज नेमके सगळेच लोक बाहेर गेलेले आहेत . म्हणून मी विचार केला की आज तुम्हाला भोजन प्रसाद मी देणार ! कल्पना करून पहा बर का  ! हे सर्व बोलणारी मुलगी आठ वर्षाची आहे ! मी तिला म्हणालो की अगं पण तेवढ्या करता तुझ्या आईला कशाला त्रास दिलास ? त्यावर तिने जे उत्तर दिले ते ऐकून मी हतबुद्धच झालो ! ती म्हणाली की आई दुकान सांभाळते आहे . त्यामुळे मीच स्वयंपाक केलेला आहे ! आमटी भात पोळी भाजी असे सर्व पदार्थ त्या मुलीने स्वतः केलेले होते ! माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या ! परिक्रमेमध्ये नर्मदा माता भेटते नर्मदा माता भेटते असे म्हणतात ना ! ती कोण असते ?तर अशीच नर्मदा खंडातली एखादी चुणचुणीत मुलगी असते ! विचार करून पहा आपल्या घरातली किंवा आपल्या आजूबाजूची आठ वर्षाची मुले आजकाल आलेल्या पाहुण्यांशी कसे वागतात ? किंबहुना घरात आल्यावर त्यांच्याकडे बघतात तरी का ? उठून उभे तरी राहतात का ? पाया पडणे आणि ख्याली खुशाली विचारणे ही तर फारच पुढची गोष्ट !  नर्मदा खंडाने आपली उदात्त भारतीय संस्कृती जपली आहे असे मी जे छातीठोकपणे पुन्हा पुन्हा सांगतो त्याला कारण तिथे मला आलेले हे असले दिव्य अनुभव आहेत ! मी या समाजाचा एक भाग आहे ही शिकवण आपल्या मुलांना देण्यामध्ये आपण कमी पडतो आहोत का याचा विचार प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर करणे अतिशय आवश्यक आहे . योग्य वयात म्हणजे निदान वय वर्षे सहा ते वय वर्षे दहा या कालावधीमध्ये मुलांवरती पूर्णवेळ काम करणे हे अत्यंत अत्यावश्यक आहे .कारण याच काळात त्यांचे व्यक्तिमत्व आकाराला येत असते . नेहाने केलेला स्वयंपाक म्हणजे साक्षात अमृत होते ! तिने अतिशय मनापासून भक्ती भावाने स्वयंपाक केलेला असल्यामुळे त्याला अक्षरशः अमृताची , प्रसादाची चव होती ! मला अजून एक भावलेली गोष्ट म्हणजे बरोबर माझी जेवढी भूक आहे तेवढेच तिने वाढून आणलेले होते ! इतक्यात तिथून मोटरसायकल वरून जाणाऱ्या एका तरुणाने शेजारी कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन माझ्यासाठी मिरचीची भजी आणली . भोजन झाल्यावर ती गरमागरम भजी खाल्ली आणि नेहाला सुद्धा दिली . माझ्याकडे असलेला गोळ्या बिस्किटे वगैरे खाऊ तिला देऊन टाकला . मी तिला दक्षिणा देत होतो ती तिने अजिबात घेतली नाही . मला त्या मुलीचे फार कौतुक वाटले . तिला मी मनोमन साष्टांग नमस्कार केला ! माझ्यासाठी मथवाडची नेहा साक्षात नर्मदा मातेचे रूपच ठरली होती .पोटभर भोजन झाल्यामुळे शांत झोप लागली . मनोमन मी नर्मदा मातेला प्रार्थना केली की ही नेहा आयुष्यात जिथे कुठे जाईल तिथे तिला सुखी ठेव . जीवनातले कुठलेही दुःख तिच्या वाट्याला येऊच नये ! आणि येणारही नाही ! इतकी सालस समंजस सात्विक सोज्वळ आणि हुशार मुलगी असल्यावर ती आयुष्य उत्तमच जगणार यात काही शंकाच नाही ! सकाळी उठायला थोडा उशीरच झाला . उजेडामध्ये उठले की डोलडालची अडचण होते . सर्वत्र लख्ख उजेड असल्यामुळे आणि लोकांची कामाची लगबग चालू असल्यामुळे फार लांब जावे लागले . आता इथून पुढे अट्ठा नावाच्या गावात मला जायचे होते . परंतु गावात जाण्यासाठी डोंगरातला जंगलातला असा एक चटकट होता .मला वाटले की चला बरे झाले आता आपले चालणे वाचले ! परंतु त्या मार्गाने जाताना मला असा भयानक अनुभव आला की जवळपास मी यमराजाच्या दारावरची घंटा वाजवूनच परत आलो ! त्याचे असे झाले . . .



पुढील लेखांक

लेखांक एकशे एकोणतीस समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर