लेखांक १२८ : कडीपानी ची कडी परीक्षा व जलमग्न कलहंसेश्वर अर्थात हाफेश्वर

वाजेपूरची बावडी सोडली आणि पुढे तलाव लिंबडी रायसिंगपुरा बुंजर चिखली अशी गावे पार करत कडीपानी या ठिकाणी आलो . हे सर्व आदिवासी क्षेत्र आहे . डोंगराळ प्रदेश ,कठीण माणसं ! मध्ये रायसिंगपुरा या गावामध्ये एक मूर्तिकार भेटला . त्याचे नाव होते नागिनभाई कोदरभाई सिलावट . याने मला चहा पिण्यासाठी घरी बोलावले . चक्क मराठी भाषेमध्ये बोलत होता ! नंतर कळाले की याच्या सौभाग्यवती नंदुरबार जिल्ह्यातल्या असल्यामुळे याला मराठी येत होते . मूर्ती बनवण्यासाठी हा महाराष्ट्र मध्ये फिरलेला होता . तसा हा पूर्वीचा महाराष्ट्राचाच भाग ! नवीन राज्य रचनेमुळे मध्य प्रदेश आणि गुजरातला मिळालेला . पूर्वी गुजरातचा विस्तार मुंबईपर्यंत होता . आता सुद्धा कानबेडा या गावातून मी एक गंमत पाहिली होती आणि तिची नोंद डायरीमध्ये केलेली आहे ! या गावावरून दर पाच मिनिटाला एक विमान उडत होते . साधारण उडाण्याची दिशा पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की हा बहुतेक मुंबई ते कर्णावती (अहमदाबाद ) हवाई मार्ग आहे . अशा अनेक गमतीशीर गोष्टी परिक्रमेमध्ये दिसायच्या . लिहून ठेवल्या तेवढ्या लक्षात राहतात . बाकीच्या हळूहळू विस्मरणात जातात . रायसिंग पुरा गावामध्ये एक जैन मंदिर नुकतेच बांधून झालेले दिसत होते .
रायसिंगपूरा गावातील जैन मंदिर
हा सगळा उंच सखल टेकड्यांचा भाग होता . त्यामुळे कधी चढ तर कधी उतार असे चालत राहिलो आणि कडी पाणी गावात आलो . कडी पाणी हे गुजरात राज्यातील शेवटचे गाव . इथून पुढे मध्य प्रदेश सुरू होतो . येथे जीएमडीसी अर्थात गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशन ची आस्थापना आणि शाळा होती . मी निळकंठ मंदिरात पोचलो तेव्हा अंधारून आले होते . मंदिर उंचा वरती होते . बाहेर झाडे वगैरे लावलेली होती . पायऱ्या चढून वर गेल्यावर मुख्य सभामंडप होता . उजव्या बाजूला स्वयंपाकाची खोली आणि पाण्याची टाकी होती . डावीकडे साधूची राहण्याची व्यवस्था होती . समोर महादेव होते . डावीकडे बसण्यासाठी एक मोठा कट्टा केलेला होता . मंदिरामध्ये मी गेलो तेव्हा एकटाच होतो . नर्मदे हर असा मी पुकारा केला . त्याबरोबर एक गोरे पान व थोडेसे स्थूल असलेले महंत बाहेर आले . यांनी पांढरी शुभ्र दाढी भरपूर वाढवली होती . केस कापून चुपून बांधलेले होते . एकही केस मोकळा उडत नव्हता . याचा अर्थ त्यांनी बांधण्यासाठी बरेच कष्ट घेतले होते . कपाळाला गंध वगैरे व्यवस्थित आकारात लावलेले होते . कपडे पण स्वच्छ होते . एकंदरीत या साधूंना चांगले राहण्याची आवड आहे असे लक्षात येत होते . महंत दिसायला तर टीव्ही मालिकेतल्या साधू सारखे होते परंतु तुलनेने अगत्य कमी वाटले . मुळात या भागात फारसे परिक्रमा वासी येत नाहीत . तसेच हे बहुतांश आदिवासी क्षेत्र असल्यामुळे इतर गावांसारखे भगत इकडे दिसत नाहीत . भगत म्हणजे गावातील प्रतिष्ठित भक्त मंडळी जी त्या आश्रमाशी विविध कारणाने जोडली गेलेली असतात . कारण काहीही असो परंतु साधू माझ्याशी बोलायचं टाळत होते . मी त्यांना विचारले "हम आज यहा आसन लगा सकते है क्या महाराज ? " साधू माझ्यावर ओरडला , " तो क्या आगे जंगल मे जाओगे ? " " पता नही महाराज । आपकी जैसी आग्या हो वैसा करेंगे । " महत्त्व दिल्यावर साधू थोडेसे खुलले . " गांजा पिते हो ? " साधने तारपट्टीतल्या आपल्या आवाजात मला विचारले . "नही भगवन् " मी उत्तरलो . "बिडी सिगरेट ? " "ना " " तमाखू तो खाते होगे " " नही प्रभू " प्रत्येक प्रश्नाला साधूचा आवाज आणि क्रोध चढत चालला आहे असे मला जाणवले . "नशा पाणी नही करते मतलब " "जी महाराज । बिलकुल नाही करते । " " तो जिंदगी में करते क्या हो ? " चिडून साधूने मला विचारले . मला या प्रश्नाचा अर्थच कळला नाही ! बहुतेक नशा पाणी न करणारा मनुष्य आयुष्याचा आनंद घेत नाही असे त्यांना म्हणायचे होते . "बहुत कुछ करते है महाराज । जसे अभी नर्मदा परिक्रमा कर रहे है । "माझ्या या उत्तरामुळे साधू खुश व्हायच्या ऐवजी भडकले . "दम नही मारते और बोलते हो बहुत कुछ कर रहा हू ।जिंदगी में क्या देखा है तुमने । अरे जो दम के साथ छुटे ना वही दम है ! " असे म्हणत त्या दमेकरी साधूने खोकत खोकत चिलीम पेटवली . एकंदर प्रकार माझ्या लक्षात आला . जे गांजा पिणारे परिक्रमा वासी असतात त्यांना वाटेतील भगत मंडळी चक्क गांजा सुद्धा पुरवतात . कारण मध्यप्रदेश मध्ये गांजा पिणाऱ्या लोकांचे प्रमाण खूप आहे . काही परिक्रमावासी तर केवळ गांजा गोळा करण्यासाठी परिक्रमा करतात . असे परिक्रमावासी गांजाचे व्यसन असलेल्या महंत मंडळींना हवे असतात . त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजा यांना मिळतो . फुकट मिळतो . माझ्याकडून काहीच प्राप्ती होणार नाही हे लक्षात आल्यामुळे साधूला माझा राग आला होता . प्रचंड खोकत असूनही आणि दम्याची उबळ आलेली असूनही महाराज गांजा ओढत राहिले . मी माझी आन्हिके आटोपून घेतली आणि पूजा वगैरे करून मंदिरामध्ये शांत बसून राहिलो . खरे तर या मंदिरामध्ये महादेवाची भजने स्तोत्रे म्हणायची मला खूप इच्छा होती परंतु गांजाडे साधू खूप लवकर चिडतात . त्यामुळे मी शिवमानसपूजा केली . साधू काही भोजन प्रसादाचे नाव काढेना . मी त्याच्याजवळ बसून पुढच्या भागाची माहिती त्याला विचारत होतो . परंतु हा एकाही प्रश्नाचे उत्तर देत नव्हता . गांजा एके गांजा ! व्यसनामध्ये पूर्णपणे डुबलेला असा तो मला वाटला . मी शांतपणे बसून राहिलो . साधारण रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास साधूला काय वाटले कुणास ठाऊक , मला म्हणाले , " भोजन पाओगे ? " " जो आप कहे स्वामीजी " मी म्हणालो . "मै तो कह रहा हू गांजा पिलो । और तुम मना कर रहे हो । फिर काय को बकर करता है ? " साधूच्या बोलण्यात तथ्य होते . मी केवळ वरवर त्यांच्याकडे सौजन्य दाखवतो आहे हे त्यांच्याही लक्षात आले होते . मनोमन पाहायला गेले तर मला त्यांचे वागणे आवडलेले नव्हते . तसाही असला तरी शेवटी तो साधू होता . त्यामुळे माणसे ओळखण्याची कला त्याला प्राप्त होती . "एक काम कर ना । अंदर जाओ । दोपहर का भोग लगा हुआ पडा है । वह पा लेना । " मला आनंद झाला ! कारण खरंच खूप भूक लागली होती .  मी आतल्या स्वयंपाक घरात गेलो . तिथे फक्त एक चुल होती . एक ताट झाकून ठेवले होते . उघडून पाहिले तर त्याच्यामध्ये पाच पेढ्याच्या आकाराचे गक्कड , चमचाभर भरीत , थोडासा भात आणि थोडीशी आमटी असे अन्न होते .
या भागातील लहान मुले सुद्धा याच्यापेक्षा दुप्पट आहार करतात . परंतु अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे स्वतःला समजून सांगत मी खाली बसलो . अन्नाचा नैवेद्य दाखवला . आणि नेहमीप्रमाणे श्लोक म्हणून " या स्वामी जेवायला . ये नर्मदा माईजेवायला " असे म्हणालो . थंडगार भातामध्ये हात घातला . मला  असा भास झाला की भात खूप चिकट आहे . त्यात मी आमटी ओतू लागलो . जेवताना शक्यतो मी डोळे मिटून जेवायचो . पहिला घास तोंडात घातला मात्र तो तोंडातच फिरला ! काहीतरी खराब झाले होते ! घास तोंडात तसाच धरून मी खाली पाहिले . माझ्या चारही बोटातून तारा निघत होत्या . आमटीत बोट घालून पाहिले तर तिच्यातूनही तार निघत होती . भातही चिकट झाला होता . भरीत पाहिले तेही खराब झाले होते . गक्कड तेवढे चांगले होते . इतक्यात साधू बाहेरून ओरडला "मिला के नही है प्रशाद ? " "प्रसाद ? अरे होय की ! हा तर महादेवांचा प्रसाद आहे ! नर्मदा मैया चा प्रसाद आहे ! कसा का असेना ! ग्रहण केलाच पाहिजे ! " मी मनाशी बोललो आणि तोंडातल्या तोंडात फिरणारा तो तोंडातला ओशट घास गिळत साधूना म्हणालो "हा महाराज मिल गया । " 
नर्मदा मैया पदोपदी माझे चोचले पुरवत होती . ज्या दिवशी जे हवे ते मला भरपेट खायला घालत होती . त्यावेळी मी कधी तिचे आभार मानत नसेन तर आज हे तिकडच्या भाषेमध्ये "बासी अन्न " मिळाल्यावर तक्रार तरी कशाला करायची ? आणि थोड्याच वेळापूर्वी मी स्वतःला अन्न हे पूर्णब्रह्म आहे वगैरे समजून सांगत होतो . मग जर पूर्णब्रह्म स्वरूप माझ्यासमोर प्रकट झालेले असेल तर ते कसे का असेना त्याचा स्वीकार करायला नको का ? खाणारा देखील ब्रह्म !  खातो आहे ते देखील ब्रह्म ! खाण्याची क्रिया देखील ब्रह्म ! सगळेच ब्रह्म ! आ  हा हा! काय ती अवस्था ! काय तो आनंद ! मला अन्नाची चव कळायचे बंद झाले ! कारण मीच खाणारा ! मीच अन्न ! आणि मीच चव ! माझे जेवण कधी पूर्ण झाले मलाच कळले नाही ! तृप्तीचा ढेकर आला ! नर्मदा मैया तृप्त झाली ! जोपर्यंत परिक्रमावासी जेवत नाही तोपर्यंत ती देखील उपाशी राहते ! प्रत्येक परिक्रमावासी जेवल्यावरच ती तृप्त होते ! मी ताट धुवून ठेवले . आणि बाहेर येऊन आसनावर बसलो . साधने विचारले "भरले का पोट ? " "हो स्वामीजी ! खरंच पोट भरलं ! " आणि यावेळी माझे बोलणे मनापासून आहे हे साधूने देखील ओळखले . अन्न हे पूर्णब्रह्म आहे ! त्याला कधीच नावे ठेवू नयेत ! आपल्याला लहानपणापासून जसे अन्न खायची सवय लावली जाते तसे अन्न हळूहळू सवयीमुळे आवडू लागते . जन्मतः आपण कुठलीही आवड निवड घेऊन जन्माला येत नाही . शूल पाणीच्या झाडीमध्ये लोकांना फक्त बाजरीची भाकरी आणि तिखटाचा गोळा खायला मिळतो . तिथली एक जात सर्व लहान मुले तिखटाचा गोळा आरामात खातात . शहरातील मुलांसारखी नाटके करत नाहीत . एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच तिथली बालके मिरची खाऊ लागतात हे मी स्वतः पाहिलेले आहे ! याचाच अर्थ एकदा पोटामध्ये भूक लागली की वरून कुठलेही अन्न आहुती स्वरूपात टाकले की स्वाहा होते ! कारण मुळात उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ! आपल्या पोटामध्ये एक मोठा यज्ञ पेटलेला आहे ! त्या यज्ञातील आहुती म्हणून आपण अन्नाचे घास टाकतो आहोत ! 
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः। प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्।।
असे भगवंत भगवद्गीतेत सांगतात . अर्थात मीच प्रत्येक जीवाच्या पोटामध्ये वैश्वानर नामक अग्नीच्या रूपाने अन्नाचे पचन करतो आणि ग्रहण करतो . त्यामुळे अन्नाला कधीच नावे ठेवू नयेत . हे चांगले आहे ते वाईट आहे असे अन्नाच्या बाबतीत कधीच म्हणू नये . अन्न हे पूर्णब्रह्म आहे . तुमच्यासाठी एखादे अन्न खराब झालेले असले तरी अन्य जीव ते खात असतात . याचाच अर्थ ते अन्न अन्नच असते . केवळ तुमची आवड निवड वेगळी असल्यामुळे तुम्ही त्याला नाव ठेवता . किंबहुना आवड निवड असते म्हणून तुम्हाला नावे ठेवायला सुचते . असे कधीच करू नये . जे पानात पडेल ते मुकाट्याने खावे !अन्नाच्या बाबतीत कसली आली आहे आवड किंवा निवड ? जे अन्नपूर्णा माता देईल ते प्रसाद म्हणून ग्रहण करावे ! अन्नाची स्तुती किंवा निंदा होऊ नये म्हणूनच बहुतेक आपले पूर्वज भोजन करताना मौनव्रत पाळायचे . जेवताना बोलूच नये . कारण त्यामुळे पोटामध्ये अतिरिक्त हवा शिरते.  अन्नग्रहण चालू असताना आपले आतडे म्हणजे त्याचे मुख उघडे पडलेले असते . अशावेळी बाहेरून हवा आत जाणे हिताचे नसते . आणि मुख्य म्हणजे प्रत्येक घासावर एकाग्रतेने लक्ष देऊन घडावयाचे चिंतन घडत नाही . मग जेवताना काय करावे ? ते तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे . "रामनाम ग्रासो ग्रासी । तो जेवीलाची उपवासी ॥ " अर्थात जो मनुष्य प्रत्येक घासाला रामनाम घेतो त्याने भरपेट जेवण केले तरी त्याला उपवासाचे फळ प्राप्त होते ! कारण तो उपाशीच राहतो ! आणि त्याच्या त्या अन्नाचा स्वीकार साक्षात परमेश्वर करत असतो !आणि मग तोच जगण्यासाठी लागणारे बळ थेट अशा नाम साधकाला पुरवतो ! वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हे त्यासाठी सांगितले आहे . एकदा अन्नाला परब्रह्म मानून ते ग्रहण गेले की त्यातला कुठलाही दोष आपल्याला लागत नाही हे मला नर्मदा परिक्रमे शिकवले ! माहेश्वरी किंवा मारवाडी लोक ज्याप्रमाणे जेवण झाल्यावर ताटामध्ये पाणी टाकून ताट स्वच्छ करून ते पाणी पितात तसेच मी संपूर्ण परिक्रमेमध्ये करत होतो . हेतू इतकाच होता की मला प्रसाद म्हणून देण्यात आलेल्या अन्नाचा एक कणही वाया गेला नाही पाहिजे . आजही मी ते केले . आणि खरोखरच वरवर पाहता कदान्न असले तरीदेखील ते ग्रहण केल्यावर मला मिष्टान्न भोजनाचा आनंद मिळाला होता ! नर्मदा मातेने बहुतेक माझी परीक्षा पाहिली होती . कारण नर्मदा खंडामध्ये कुठलाही साधू कधीही स्वप्नात देखील परिक्रमा वाशीला असे अन्न देऊ शकत नाही . ही नर्मदा मातेची अगम्य लीला होती . तिला बहुतेक पाहायचे होते की आपला मुलगा अन्नाच्या बाबतीत कितपत आसक्त आहे ?  बाहेर येऊन बसलो आणि थोड्याच वेळात दोन परिक्रमा वासी तिथे आले . एक मंगलोरचा विजयकुमार होता आणि दुसरे मला सकाळी भेटलेले " जय भीम  ,नर्मदे हर" म्हणणारे दलित परिक्रमावासी आजोबा होते . यातील आजोबा गांजा प्यायचे . म्हणजे घरी पीत नव्हते . परंतु परिक्रमेत कोणी दिला तर नाही म्हणत नव्हते . त्यामुळे साधू सोबत बसून थोडा वेळ त्यांनी गांजा ओढला . आणि मग साधू त्या दोघांसाठी स्वयंपाक करायला आत मध्ये गेले ! दोघांसाठी त्यांनी गरमागरम वाफाळलेला भात आणि पिठले केले ! माझ्यासमोरच दोघे जेवायला बसले . याचा स्पष्ट अर्थ असा होता की साधूला अन्न बनविण्याचा कंटाळा नव्हता . तर केवळ नर्मदा मातेला माझी परीक्षा घ्यायची होती ! साधु महाराजांना जर मी सांगितले असते की अन्न खराब आहे तर त्यांनी नक्कीच मला नवीन बनवून दिले असते . परंतु नर्मदा मातेची अगम्य लीला अशी होती की त्यांना देखील गांजा पिण्याची बुद्धी दिली आणि माझी इकडे परीक्षा घेतली ! असो . विजयकुमार माझ्या एका मित्रासारखा दिसायचा . कोल्हापूर जवळ वेंगरूळ नावाचे छोटेसे गाव आहे . गारगोटीच्या जवळ भुदरगड रांगणा किल्ल्यांच्या कुशीमध्ये हे गाव वसलेले आहे . इथे माझे एक मित्र नितीन काका जोशी म्हणून राहतात . त्यांनी आपली अडीच एकर जमीन दान करून एक शस्त्र शास्त्र विद्या शिकवणारे गुरुकुल उभे केले आहे . हे गुरुकुल ज्यांच्या स्वप्नातील विश्व होते ते माझे मित्र श्री लखन जाधव गुरुजी म्हणून एक तरुण आहेत . सव्यसाची गुरुकुलम नावाची संस्था ते चालवतात . हा विजयकुमार म्हणजे अगदी त्या लखन गुरुजींची झेरॉक्स कॉपी आहे असे मला वाटायचे . मी त्यांना हे सांगितले . त्यांना लखन गुरुजींचा फोटो बघायचा होता . त्यांचे शस्त्र चालवतानाचे अनेक व्हिडिओ युट्युब वर आहेत . आणि विजयकुमार फोन वापरायचा . त्यामुळे त्याच्या फोनवर मी ते व्हिडिओ शोधले . गंमत म्हणजे त्यांचा क्रमांक लिहिलेला होता . मी लगेचच त्यांना फोन लावला . नंतर व्हिडिओ कॉल लावला . आणि सुमारे दोन अडीच तास आम्ही मनसोक्त बोललो ! खूप वर्षांनी आमची भेट होत होती . रामनवमीला लखन गुरुजींना पुत्र प्राप्ति झाली होती . मोठीच आनंदवार्ता होती . जी माणसे समाजासाठी काहीतरी जबरदस्त काम करत आहेत अशा माणसांची पिढी पुढे वाढणे अतिशय आवश्यक असते . त्यांची जीन्स टिकून राहणे मानवी समाजाच्या हितासाठी आवश्यक असते . कारण गुरूकडून शिष्याला किती जरी ज्ञान प्राप्त झाले तरी जन्मतः आलेली जीन्स अर्थात गुणसूत्रे आपले गुण योग्य वेळी दाखवतातच ! श्रीकांत हा लखन गुरुजींचा पट्टा शिष्य आहे त्याच्याशी देखील बोललो . नितीन काका जोशी यांच्याशी देखील बोललो . सर्वांनाच खूप आनंद झाला ! हे सर्व माझे ध्येय मित्र ! अर्थात आम्ही सर्वजण एकाच ध्येयाने प्रेरित झालेली माणसे ! त्यामुळे घरी फोन लावून चिंता करणाऱ्या घरातल्या नातवकांशी बोलणे वेगळे आणि हा हृद्य संवाद वेगळा . आमच्या संभाषणामध्ये एकही इकडचा तिकडचा विषय आला नाही . जे आमचे नेहमीचे बोलायचे विषय आहेत त्याच विषयावर आम्ही बोललो . आजही माझा फोनचा वापर असाच आहे . माझा कुठलाही फोन कॉल पंधरा ते वीस सेकंदाच्या पुढे चालत नाही . अगदीच महत्त्वाचा विषय असेल तर काही काळ अधिक बोलतो इतकेच . अन्यथा पाल्हाळ लावून बडबड फोनवर करणे यासारखा वेळेचा अपव्यय नाही असे मला फार वाटते . त्या अडीच तासामध्ये दोन अडीच वर्षातले राहिलेले सगळे विषय आम्ही संपवून टाकले . विजयकुमार देखील लखन गुरुजींशी बोलला . आणि त्यानंतर मी शांतपणे निद्रादेवीच्या कुशीमध्ये शिरलो .
हे आहे श्री निळकंठ महादेव मंदिर कडी पाणी
श्री निळकंठ महादेव
मी आसन लावले ती जागा
कडी पाणी येथील महंत !
हे आहेत शस्त्र शास्त्र सकल विद्यापारंगत लखन जाधव गुरुजी ज्योतिबा कोल्हापूर
हे आहेत नितीन काका जोशी वेंगरूळ कोल्हापूर .
हे आहेत अभियंता आणि शस्त्र शास्त्र पारंगत श्रीकांत गुरुजी 
या सर्वांशी बोलल्यावर शांतपणे झोपी गेलो . सकाळी लवकर उठून सर्व आटोपले आणि हाफेश्वराकडे प्रयाण ठेवले . समोर उगवणारा सूर्य दिसत होता . आणि वरती मात्र ढगांची दाटी चालली होती ! अचानक पावसाने हजेरी लावली ! अतिशय अप्रतिम दृश्य होते ! समोरून सूर्याची कोवळी उने ! डोक्यावर काळेभोर ढग ! आणि रिमझिम पाऊस ! आजूबाजूला डोंगरच डोंगर ! कधी चढ कधी उतार ! सरळ रस्ता नावाला सुद्धा नाही ! संपूर्ण आदिवासी क्षेत्र होते . आदिवासी लोक स्वभावाने थोडेसे आत्ममग्न असतात . मध्यप्रदेशातील लोक जसे आपण होऊन येऊन आपल्याशी बोलतात तसे इथे कोणी बोलत नाही . थोडेसे लाजाळू किंवा बुजऱ्या स्वभावाचे लोक असतात . तुम्ही काही विचारले तर उत्तर नक्की मिळते . परंतु आपण होऊन कोणी बोलायला शक्यतो येत नाही . मध्ये एक मोठा जलप्रकल्प पाहिला . इथे पाण्याच्या दोन मोठ्या टाक्या होत्या . टाक्या प्रचंड खोल होत्या . आणि जिना वरून कोणीही वर जाऊ शकेल अशी अवस्था होती . सुरक्षिततेसाठी काहीतरी करणे आवश्यक होते असे वाटले . इथे फारसे कोणी जात नसावे . मी मात्र प्रकल्पाच्या भिंतीवर चढून पाण्याच्या दोन्ही टाक्या पाहिल्या ! 
 हाफेश्वरच्या वाटेवरील जलशुद्धीकरण प्रकल्प
चालत चालत नवीन हाफेश्वर गाठले . नवीन हाफेश्वर म्हणजे हाफेश्वराचे पुनर्स्थापित केलेले मंदिर आहे . जुने मंदिर जलमग्न आहे . धरणाचे पाणी फार जास्त उतरले तर त्याचा कळस दिसतो . अन्यथा कायम त्या मंदिराच्या वर कित्येक फूट पाणी राहते . मूळ मंदिर अजूनही सरदार सरोवर धरणाच्या जलाशयामध्ये सुरक्षित आहे .नवीन मंदिर अतिशय सुंदर आहे .इथे स्वच्छता खूप आहे . रोज मंदिर धुतले जाते . मोठ्या प्रमाणात सेवेकरी देखील आहेत . इथली व्यवस्था बघणारे नर्मदा दास नावाचे उडिया बाबा होते . मी गेल्या गेल्या यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला . परंतु त्यांनी अत्यंत तुसडेपणाने आणि तुच्छ वागणूक देत मला हाकलून लावले . त्यांना परिक्रमावाशींशी बोलण्यात जरा देखील स्वारस्य नव्हते असे मला जाणवले . नर्मदा खंडाविषयी त्यांना अत्यल्प माहिती होती किंवा जी काही माहिती होती ती देण्याची इच्छा अजिबात नव्हती . मी तिथल्या वास्तव्यामध्ये अनेक वेळा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला . शेवटी ते माझ्यावर फारच भडकले . ते अत्यंत व असमाधानी आणि दुःखी आहेत असे मला स्पष्टपणे दिसत होते .परंतु त्यांच्या दुःखाचे मूळ काही कळाले नाही . मला तो बाबा फार उलटे पालटे बोलला ! हरियाणवी साधू देखील इथे पोहोचला होता . त्याचा देखील त्यांनी विनाकारण पाणउतारा केला . तो देखील मूग गिळून शांत राहिला . या आश्रमातले सर्वच सेवेकरी या साधूला घाबरतात असे माझ्या लक्षात आले . कारण तो कोणाशीच आनंदाने प्रेमाने बोलत नव्हता . साधू असे अजिबात नसतात . सेवकांशी बोलल्यावर लक्षात आले की हा मनुष्य पहिल्यापासून असाच आहे . सर्व ग्रामस्थ खाजगी मध्ये या बाबाला शिव्या घालतात असे मला सांगण्यात आले . आणि स्थानिक परिक्रमावासींशी कधी खोटे बोलणार नाहीत .मी त्या साधूला उलटून काहीच बोललो नाही . फक्त मनातल्या मनात नर्मदा मातेला सांगितले की बघ बाई कसे काय वागणे आहे यांचे ते ! इथे इश्राम नावाचा एक सेवेकरी होता . तरुण होता . त्याला जेव्हा मी माझा काठाने जाण्याचा संकल्प सांगितला तेव्हा त्याने मला सांगितले की निश्चिंत रहा काठाने मार्ग नक्की आहे ! मी उडिया साधूला काठावरून जाण्याचा मार्ग आहे का हेच तर विचारत होतो . परंतु त्यांना या प्रश्नाचा फार राग आला . मी काय इथे तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला बसलो आहे काय ?वगैरे ते माझ्यावर ओरडले .व्यक्ती कशी आहे हे लक्षात आल्यावर मी त्यांचा नाद सोडून दिला . इश्रामने मात्र मला संपूर्ण नकाशा गुगल नकाशावर दाखवला . आज मी तुम्हाला जागोजागी नकाशे जोडून दाखवत आहे परंतु परिक्रमे दरम्यान मला फार कमी वेळा असा नकाशा पाहायला मिळाला होता . मैय्या नेईल त्या मार्गाने आणि मैया सुचवेल त्या पद्धतीने मी चालत होतो .
इथे शांती पुजारी म्हणून जो पुजारी होता तो खूपच प्रेमळ होता . नावाप्रमाणे शांत आणि प्रेमळ स्वभावाचा असल्यामुळे तो सर्वांनाच आवडायचा . परिक्रमावासींशी तो अतिशय नम्रपणे बोलायचा . साधू महाराजांशी बोलल्यावर लोकांना आलेला राग या सर्व सेवेकरी मंडळींना भेटले की शांत व्हायचा . विशेषतः मराठी लोकांबद्दल या महाराजांच्या मनात विशेष अढी आहे असे मला जाणवले . परिक्रमे ला जाणाऱ्या मराठी माणसांनी या गोष्टीचा आवर्जून विचार करावा असे सांगावेसे वाटते . इथे देवा नावाचा एक कार्यकर्ता होता . हा देखील खूप जुना होता ! त्याला या भागातील सर्वच रस्ते माहिती होते ! माझी काठाने चालण्याची इच्छा आहे हे पाहिल्यावर त्याने मला संपूर्ण मार्ग समजावून सांगितला . या सर्वच सेवेकरी लोकांनी मला अतिशय प्रेम व आदर दिला . इश्राम मला  म्हणाला , " मी तुम्हाला जुने हाफेश्वराचे मंदिर दाखवून आणतो चला ! " "परंतु ते तर जलमग्न झाले आहे ना ? " मी अल्पमती पणाने विचारले . त्याने सांगितले की मंदिर जरी पाण्यामध्ये बुडालेले असले तरी सध्या पाण्याची पातळी उतरली आहे . आपले नशीब चांगले असेल तर मंदिराचा कळस दिसू शकेल . आम्ही दोघे साधारण एक किलोमीटर चालत नर्मदा मातेच्या काठावर आलो ! समोर एक मोठी उपसा विहीर होती . तिचे लोखंडी खांब मैय्या मध्ये खोल गेलेले दिसत होते . सर्वत्र तासले गेलेले उभे दगडी कडे होते . दगड अखंड नसून तुकड्या तुकड्यांचा होता . इथे काही नावा उभ्या होत्या व काही नावा समोरच्या तटावर जायला निघाल्या होत्या . काठावर बऱ्यापैकी लोक होते . सेवेकरी मला म्हणाला की आपण अशा ठिकाणी जाऊ तिथे कोणीच नसते . तिथून आपल्याला हाफेश्वराचे मंदिर देखील जवळ आहे आणि तुमचे स्नान देखील छान पैकी होईल ! आणि एका टेकडीला वळसा मारून तो मला एका दरी पाशी घेऊन आला . म्हणजे आता जरी  मला तो छोटासा डोंगर आणि समोर पाणीच पाणी दिसत असले तरी इथे खाली खोल दरी आहे हे डोंगरांची रचना पाहून लक्षात येत होते . इथे मी बराच वेळ मनसोक्त स्नान केले ! पाण्यातून बाहेर आल्यावर मला इथे भरपूर मगरी आहेत हे सांगण्यात आले ! पाण्यात असेपर्यंत कोणी मगरीचे नाव काढत नाही ! मगर परिक्रमावासींना काही करत नाही याची जणू काही त्यांना खात्री असते ! इश्राम कडे मोबाईल होता . त्याने यावेळी काही फोटो काढले . आणि नंतर माझ्या मित्राच्या क्रमांक पाठवून दिले .

जुने हाफेश्वर मंदिर इथून खूप जवळ पाण्यामध्ये बुडालेले आहे ! अगदी त्याच ठिकाणी नर्मदा मातेमध्ये स्नान करताना काढलेले छायाचित्र.
सकाळचे साधारण साडेनऊ दहा वाजले होते . मी लवकर पोहोचल्यामुळे अजून पूर्ण दिवस माझ्या हातात होता . आणि इथे मुक्काम करण्याचे निश्चित झाले होते . त्यामुळे काहीच गडबड नव्हती ! मी बराच वेळ त्या जागेवर स्नानाचा मनसोक्त आनंद घेतला ! इथे एका टेकडीच्या उतारावर मी स्नानासाठी उभा होतो . एक पाऊल पुढे टाकले की खोली पाच फूट वाढत होती ! पोहण्याची परवानगी नसल्यामुळे मी छाती एवढे पाणी येईल अशा ठिकाणी उभा राहून नर्मदा मातेच्या कृपेचा अनुभव घेत राहिलो !

या चित्रामध्ये टेकडीचा उतार स्पष्ट दिसतो आहे . समोर मात्र खोल कडा होता . आणि या दोन्हीच्या मध्ये एक जबरदस्त खोल अशी दरी होती ! जिच्यामध्ये मगरींचा निवास होता ! माझे स्नान पूजन चालू असताना इश्राम काठावर बसून फोटो काढत राहिला .

वरून पाणी उपसण्याची व्यवस्था केलेली दिसत आहे . हा एक मोठा नळा सतत पाणी उचलत होता आणि मी काही वेळापूर्वी पाहिलेल्या भव्य जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये हे पाणी जात होते .
या चित्रांमध्ये दिसणे अवघड आहे परंतु मागे पाणी उपसा जिथे होतो आहे त्या रेषेमध्ये जुन्या हाफेश्वर मंदिराच्या कळसाचे टोक दिसत होते . प्रत्यक्षा मध्ये तो कळसावर बांधलेला झेंडा होता .
इथले पाणी सरदार सरोवराचे असल्यामुळे शांत खोल आणि गंभीर होते
इश्राम ने घेतलेला सेल्फी !
मी पूर्णपणे स्नान करून बाहेर येईपर्यंत हा काठावर का बसून होता हे नंतर त्याने मला सांगितले ! उंचावर बसले की मगरी येताना दिसतात ! मगरी आला रे आल्या की मला सावध करायचे असे त्याने ठरवले होते
तोपर्यंत मैय्याला लाथ लागून देता जी काही जलक्रीडा करायची ती त्याने मला करू दिली ! आपले सर्वस्व मैयावर वाहून असे पडून राहण्यात फारच आनंद मिळतो ! या चित्रामध्ये दिसणारे समोरचे डोंगर दक्षिण तटावरचे आहेत . 
मनसोक्त स्नान आटोपल्यावर आम्ही पुन्हा मंदिरात आलो . जुनी हाफेश्वराची पिंड जागेवरून अजिबात हलली नाही . त्यामुळे इथे नवीन पिंड स्थापन करण्यात आली आहे . परंतु जुन्या मंदिरातील एक पिंड मात्र इथे आणली आहे जिच्याबरोबर एक वडाचे झाड देखील आलेले आहे जे मातीशिवाय वाढलेले आहे ! आजही ते मातीशिवाय वाढतेच आहे ! लोक त्याचे दर्शन अवश्य घेतात कारण जुन्या मंदिरातील तेवढी एकच गोष्ट इथे आणता आली आहे ! मंदिर फारच सुंदर आहे . परिसर भव्यदिव्य आहे . सरकारने भरपूर खर्च करून सर्व काही उभे करून दिले आहे . 
हांफेश्वर या नावाचा इतिहास मोठा मजेशीर आहे . हे मंदिर डोंगरामध्ये वसलेले आहे . मी जुन्या मंदिराबद्दल बोलतो आहे बरं का ! तर पूर्वी परिक्रमावासी जेव्हा इथे यायचे तेव्हा हा डोंगर आणि त्याची अतिशय कठीण अशी चढण चढून येताना त्यांना दम लागायचा ! हिंदीमध्ये याला हाफना असं म्हणतात . हाफते हांफते परिक्रमावासी यहा आते थे इसलिये इसका नाम हाफेश्वर पडा ! नाहीतर तसे या महादेवाचे नाव कलहंसेश्वर असे आहे ! आहे की नाही गंमत ! आणि आता हेच मंदिर आपल्या पातळीच्या कित्येक फूट खोल गेलेले आहे ! 
या परिसराची काही संग्रहित छायाचित्रे आता आपण पाहूयात .
वरती आपण उपसा विहिरीचे चित्र पाहिले . पाण्याची पातळी वाढली की विहीरीचे खांब असे बुडून जातात . मी गेलो तेव्हा पाणी उतरले होते .
पाणी उतरले की असे दृश्य असते

या भागात असे डोंगर असल्यामुळे पाणी जागा मिळेल तेथे शिरलेले दिसते
याच डोंगरांच्या कुशीमध्ये नवीन हाफेश्वराचे मंदिर बांधण्यात आलेले आहे
मोहनदासी महाराजांची समाधी येथे आहे
नवीन हाफेश्वराचे शिवलिंग

मंदिर खूप सुंदर आणि भव्य आहे . मंदिरात भरपूर घंटा आहेत .
मंदिराचे बांधकाम उत्तम आहे
मंदिराचे कळस बसवले होते त्या दिवशीचे छायाचित्र
याच ठिकाणी मारुती सोबत जुने शिवलिंग ठेवलेले आहे
महादेवाची एक मोठी मूर्ती बागेत ठेवलेली आहे  . आरतीच्या वेळी याच घंटांचा दणदणाट सर्व सेवेकरी करतात ! ते ऐकायला फार छान वाटते ! घंटांच्या दणदणाटात मन निर्विचार होऊन जाते .
श्री नूतन हाफेश्वर
नर्मदा खंडामध्ये झेंडूची अशी झाडे दिसले की हमखास ओळखायचे की मध्ये एखादे गांजाचे रोप असणार ! दोघांची पाने अगदी एक सारखी दिसतात
मंदिराचा परिसर भव्य असून आजूबाजूला छोटी छोटी मंदिरे आहेत
मंदीर आकाशातून देखील खूप सुंदर दिसते ! मला मंदिरं बांधण्याची आवड असल्यामुळे याही मंदिराच्या रचनेचा मी अभ्यास केला होता . उत्कृष्ट स्थापत्य शैलीचा हा नमुना आहे
महादेवांच्या पिंडीवर मातीशिवाय वाढलेले हेच ते वडाचे झाड !
केवळ हवेवर जगणारे हे झाड आहे !
पाण्याची पातळी उतरली की हाफेश्वराचे जुने मंदिर पुन्हा एकदा दिसू लागते !
मंदिराचा दगड आणि दगड सुस्थितीमध्ये असून अगदी वरून केलेले चुन्याचे प्लास्टर देखील हललेले नाही . यावरून या मंदिराच्या बांधकामाचा दर्जा किती उत्कृष्ट आहे ते लक्षात येते . आणि वाईट वाटते . इतके सुंदर मंदिर कसे काय वाचवता आले नाही ? अजूनही यातील एक एक दगड हलवला तर पुन्हा मंदिर जोडता येणे सहज शक्य आहे .
जुन्या मंदिरतून आणलेले जाते नवीन मंदिरात ठेवलेले आहे . ते फारच अजस्त्र आहे

जुने मंदिर अतिशय अप्रतिम अवस्थेमध्ये आहे . 
केवळ आत मध्ये साचलेला गाळ वगळता नक्षीचा एक दगड देखील हललेला नाही ! हलली आहे तर ती आपली श्रद्धा आणि आस्था ! 
मंदिराचा प्रत्येक घुमट सुस्थितीमध्ये आहे !
सरदार सरोवर धरणाचे पाणी कसे विस्तारले आहे ते या नकाशात दिसते आहे . इथे समोरच्या बाजूला महाराष्ट्र आणि या बाजूला गुजरातची सीमा आहे . हाफेश्वर नंतर लगेचच मध्य प्रदेश ची सीमा सुरू होते . लाल खूण दिसते आहे त्या ठिकाणी मी स्नान केले होते
गुजरात सरकारची पाणी उपसा योजना आपल्याला दिसते आहे . आणि लाल खुणे पाशी मी स्नान केले होते ती जागा आहे
अजून जवळून पाहिल्यावर ती जागा कशी आहे ते लक्षात येईल . 
मी गेलो तेव्हा मंदिर जलमग्न होते परंतु मंदिराचा वर आलेला ध्वज मात्र अशा रीतीने दिसला होता .
गुजरात पाणीपुरवठा आणि गटार व्यवस्था बोर्डाची टाकी आपण पाहिली . त्यांची मोठी इमारत इथे आहे
आणि शेजारीच मगरींपासून सावध करणारी पाटी लावलेली आहे . कारण इथे खरोखरच खूप जास्त मगरी आहेत . फक्त पाणी भरपूर आणि खोल असल्यामुळे त्या दिसत नाहीत . गरुडेश्वर पासून पुढे दिसणाऱ्या मगरी याच क्षेत्रातून वाहून धरण्याच्या सांडव्यावरून खाली आलेल्या असतात
मला अस्वस्थ करणारे दृश्य इथे देखील पुन्हा एकदा दिसले . आजूबाजूला असलेल्या डोंगरावर एकही झाड दिसत नाही . हीच शूलपाणीची झाडी आहे !
इथे जितक्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे तितक्या प्रमाणात झाडे वाढलेली नाहीत . त्यामुळेच इथल्या लोकांशी संपर्क ठेवून त्यांचे वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत प्रबोधन करणे हे अत्यंत अत्यावश्यक आहे .

नर्मदा मातेच्या आणि निसर्गाच्या भव्यतेपुढे आपण अत्यंत कःपदार्थ आणि खुजे आहोत हेच खरे !
नर्मदा मातेच्या या रूपाची मला भुरळ पडली . त्यामुळे मी परत मंदिरात जरी आलो तरी पुन्हा तिच्या दर्शनाची ओढ लागून राहिली . त्यामुळे संध्याकाळी नागा बाबा आणि मी असे दोघे पुन्हा एकदा नर्मदा मातीमध्ये स्नानासाठी आलो ! मी आधीच तिथे येऊन गेलेला असल्यामुळे मला जागेचा बरोबर अंदाज होता . नागा साधू मात्र सावधपणे उतरत होता . अनुभवाचा हाच फायदा असतो . नागा साधूंच्या काय काय परंपरा आहेत त्या मला याच्याकडून शिकायला मिळाल्या . अर्थात त्या फक्त नागा साधूंनीच करायच्य गोष्टी असतात .पुन्हा एकदा मनसोक्त स्नान करून मंदिरात परतलो . घंटांच्या दणदणामध्ये जोरदार आरती केली ! माझ्याजवळ मुलांना वाटण्यासाठी आणलेल्या गोळ्या संपल्या होत्या . आता पुन्हा एकदा आदिवासी क्षेत्र सुरू झाल्यामुळे सोबत गोळ्या ठेवा असे देवा सेविकऱ्याने सांगितले . मला प्रथमच जात असल्यामुळे काही अनुभव नव्हता . त्यामुळे मी गोळ्या नेल्या . आता माझ्या असे लक्षात आले आहे की मुलांच्या तब्येतीच्या दृष्टीने बदाम किंवा काजू वाटत गेलेले अतिउत्तम आहे . अर्थात ही मुले अनोळखी बिया खात नाहीत फेकून देतात हे देखील मी भाबरी मध्ये पाहिलेले आहे . परंतु अति चॉकलेट खाऊन मुलांचे दात कायमस्वरूपी खराब होतात हे मात्र खरे आहे . त्यापेक्षा चिक्की गुडदाणी रेवडी किंवा राजगिरावाडी असे काही नेले तर चालू शकते . फक्त फार मोठ्या प्रमाणात न्यावे लागते ! प्रत्येक गावामध्ये पाच-पन्नास मुले तुम्हाला दर्शन देतात ! आणि प्रसाद नेतात ! इथे मी थोड्या अनीच्छेनेच गोळ्या खरेदी केल्या . रात्री रड्या बाबा इथे पण हजर झाला ! त्यामुळे नागा साधूची आणि माझी पुन्हा एकदा भरपूर करमणूक झाली ! दोघे त्याला नकारात्मक मुद्द्यांवर भरपूर भडकवून त्याची मजा घेत राहिलो ! रात्री इथे कारमधून परिक्रमा करणारे एक दांपत्य आले . हरियाणा येथील भारतीय वायुसेनेतील निवृत्त अधिकारी असलेला हा मनुष्य होता . त्याच्याशी चांगल्या दोन तास गप्पा मारल्या . त्यांच्यासोबतच भोजन घेतले . मोठा अधिकारी आणि कारमधून आलेला असल्यामुळे त्याच्यासाठी सुंदर असे भोजन उडिया महाराजांनी बनवले होते ! त्याने मला देखील सोबत जेवायला बसण्याचा आग्रह केल्यामुळे महाराजांचा नाईलाज झाला ! मनुष्य कुठल्याही क्षेत्रात गेला तरी त्याचे वैयक्तिक गुण अवगुण त्याला बाधित करत असतात . कुठलाही मनुष्य निर्दोष असूच शकत नाही हे कायम डोक्यात ठेवावे . कुणाचा हा गुण चांगला तर कोणाचा तो गुण चांगला असतो . गणपतीची मूर्ती खरेदी करताना आपण किती बारकाईने पाहत असतो ! ज्याचा डोळा चांगला आहे त्याची सोंड वाकडी असते ! ज्याची सोंड सुबक आहे त्याचे कान कमी जास्त असतात ! थोडक्यात काही ना काही गुण अवगुण प्रत्येकामध्ये असतातच . त्यामुळे साधूंचे असे वागणे कुठे दिसले तरी त्याकडे दुर्लक्ष केलेले उत्तम असे माझे वैयक्तिक मत आहे . कारण सर्वगुणसंपन्न मनुष्य मिळणे कठीण आहे .
त्यातल्या त्यात उत्तम जे आहे ते पाहावे आणि पुढे चालू लागावे हेच सर्वोत्तम ! परिक्रमेचे अनुभव सांगताना अनेक लोकांनी अशा भेदभाव पूर्ण वर्तनाबद्दल आवर्जून लिहिलेले किंवा बोललेले दिसते . परंतु त्यामुळे आधीच अश्रद्ध होत चाललेल्या आपल्या समाजातील उरली सुरली श्रद्धा देखील पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता अधिक असते . त्यापेक्षा ज्याला त्याला स्वतः अनुभव घेऊ देणे हे उत्तम असे मला वाटते . परिक्रमेला जाण्यापूर्वीच त्यांच्या मनामध्ये विकल्प उत्पन्न करून ठेवू नये ! कदाचित ओडिया साधू माझ्याशी असा वागला तरी बाकी सर्वांशी चांगला वागलेला असू शकतो ! नर्मदा मातेन ठरवले असेल की माझी परीक्षा पाहायची तर ती कोणालाही कसेही वागण्याची बुद्धी देऊ शकते ! असो . 
नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी मंदिरामध्ये बसून शिवमहिम्नस्तोत्र म्हटले . अन्य काही शिवस्तुतीपर स्तोत्रे गायली .  मंदिरातच बसून डायरी अर्थात रोजनिशी लिहून काढली . आणि मग नागा साधूशी गप्पा मारत झोपेला स्वाधीन झालो . उद्यापासून मी जो मार्ग निवडला होता तो अत्यंत कठीण असा होता . वाटेमध्ये कुठेही कोणीही सेवा देत नाही असे मला सांगण्यात आले होते . हा भाग लवकरात लवकर पार करून पुढे जाण्याची सूचना मला देण्यात आली होती . संपूर्ण आदिवासी क्षेत्र होते . झाडांची सावली नव्हतीच ! डोंगरांचे भयानक चढ उतार होते . मी इश्राम देवा शांती या सर्वांकडून मार्ग समजून घेतला .दिलेल्या अप्रतिम सेवेबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल त्या तिघांचे मनोमन आभार मानले आणि पाठ टेकली . उद्यापासून चालवण्याचा मार्ग मला जितका कठीण वाटला होता त्याच्यापेक्षा कैक पटीने भयानक असणार आहे याची मला कल्पनाच नव्हती ! 




लेखांक एकशे अठ्ठावीस समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर