लेखांक १३३ : रावणपुत्र मेघनादाची तपोभूमी आणि जलमग्न कोटेश्वर

धर्मीकोट वरून निघण्यापूर्वी आतून तीव्र प्रेरणा झाल्यामुळे गायवाल्या बाबांना मी आहाराची काही मूलतत्वे समजावून सांगितली .पोटातली हवा निर्माण कशामुळे होते आणि कमी कशी होऊ शकते हे देखील सांगितले . पोटात सळी खुपसून कधी हवा निघत नसते हे त्यांना देखील आता पटले होते . मुळात उडीया शरीर असल्यामुळे भात प्रचंड खाण्याची त्यांना सवय होती . ओरिसा किंवा ओडिशा या प्रांतामध्ये भारतातील सर्वाधिक भात खाणारी माणसे पाहायला मिळतात . अगदी तमिळ लोक सुद्धा इतका भात खात नाहीत . त्यांना चरबी आणि स्नायू यांच्या मधले सहसंबंध कसे आहेत ते समजावून सांगितले .माझ्यासोबत असलेली एक तेलाची छोटी बाटली देखील मी त्यांना दिली . वरून तेल लावल्यामुळे जखमेमध्ये पाणी जाणार नव्हते . दगडी पाला आणि कोरफड हे उपाय तर जखम तत्काळ बरी करतातच याचा माझा स्वतःचा दांडगा अनुभव होता . परंतु आत्ता त्यांना सर्वात जास्त गरज होती ती म्हणजे वैद्यकीय उपचारांची कारण त्यांना मधुमेह होता . त्यामुळे रस्त्याला लागल्याबरोबर धर्मराय गावात एका प्रचंड वृक्षाच्या छायेखाली मला एक दुकान सापडले . त्या दुकानदाराला मी सर्व परिस्थिती समजावून सांगितली आणि वीरू भाई यांना फोन लावायला सांगितले . त्यांना मी महाराजांची गंभीर वैद्यकीय परिस्थिती सांगितली तसेच मोटर देखील दुरुस्त करून देण्यास सांगितले . वीरूभाईंनी मला सांगितले की तुम्ही आता चिंता करू नका मी त्या आश्रमाची सर्व व्यवस्था लावून देतो . मगच माझा जीव भांड्यात पडला . आणि मी पुढे जाणार इतक्यात दुकानदार मला म्हणाला की इथून जवळच जलमग्न झालेले एक शिवमंदिर आता वरती आलेले आहे तरी त्याचे दर्शन घेऊन यावे ! त्याप्रमाणे मी त्या मंदिराच्या दर्शनासाठी निघालो . माझ्या दोन्ही बाजूंनी उध्वस्त आणि भग्न झालेली घरे दिसत होती . ही घरे दरवर्षी सरदार सरोवर धरणाच्या पाण्याखाली बुडालेली असतात . घरातील बऱ्याचशा वस्तू तशाच सोडून लोक निघून गेले होते . घरी जशीच्या तशी सुस्थितीमध्ये दिसत होती . फक्त प्लास्टरचे पोपडे निघाले होते . आणि काही ठिकाणी भिंती ढासळल्या होत्या . कौलांचा पत्ता नव्हताच . सर्वात भयानक दृश्य निर्माण करण्याचे काम करत होती ती म्हणजे वठलेली मोठी मोठी झाडे ! एकापेक्षा एक भव्य दिव्य महावृक्ष या रस्त्यावर पूर्णपणे वठलेले होते ! अनेक दिवस पाण्याखाली राहिल्यामुळे ही झाडे मरून गेली होती . झाडांना पाणी लागते परंतु प्रमाणामध्ये . अति तिथे माती ! पालापाचोळा कुजून गेल्यामुळे फक्त फांद्या शिल्लक राहिल्या होत्या . त्या पांढऱ्या फटक पडल्या होत्या . त्यामुळे एखाद्या भयपटाला शोभेल असे सर्वत्र वातावरण दिसत होते . त्यातील बरेचसे वृक्ष आडवे तिडवे उन्मळून पडलेले होते . असे सुमारे दीड दोन किलोमीटर अंतर चालावे लागले . त्यानंतर पाण्यातून बाहेर आलेली आणि अत्यंत सुस्थितीमध्ये असलेली दोन छोटीशी मंदिरे दिसली . मंदिरात जाऊन दर्शन घेतले . महादेवांची स्तुती केली . आणि तिथे शेजारी असलेल्या एका डोहकूपापाशी स्नान करण्याचे ठरवले ! नर्मदा मातेमध्ये स्नान करण्याची एकही संधी मी सोडत नसे ! डोह कूप जिथे होते तिथे खरोखरच खोल असा डोह होता . इथे माझ्या आधी सुमारे तीस एक आदिवासी मुले तरुण पाण्यामध्ये उड्या मारू मारू पोहत होती . मला वाटले की यांच्यासोबत जाऊन मी सुद्धा थोडेसे स्नान करीन . परंतु मी जसा पाण्याच्या दिशेने येऊ लागलो तशी सर्व मुले अक्षरशः घाबरून पाण्याबाहेर आली आणि अंग देखील न पुसता दिसतील ते कपडे घेऊन वेगाने पळत सुटली ! जणू काही मी एखादा मोठा राक्षस आहे असेच मला वाटू लागले ! मी त्यांना थांबा थांबा म्हणून आवाज दिला परंतु एकही मुलगा थांबला नाही . या भागातील आदिवासी मुले ही इतकी भित्री , लाजाळू आणि शामळू आहेत . मग मी एकट्याने स्नानाचा आनंद घेतला . परत येताना मंदिरामध्ये एक कुटुंब आलेले दिसले .
नर्मदा मातेचे पाणी उतरल्यावर काठावरील पूर्वी जलमग्न असलेल्या जमिनीची अवस्था अशी होते . 
हेच ते दरवर्षी जलमग्न होणारे परंतु तरीदेखील सुस्थितीत असणारे अप्रतिम शिवमंदिर ! भारतीय मंदिर रचना शास्त्र किती प्रगत आहे त्याचाच हा अद्भुत पुरावा आहे !
नर्मदा मातेचे पाणी आता जरी उतरलेले दिसत असले तरी देखील पाणी भरल्यावर चित्रात दिसणारा संपूर्ण महावृक्ष पाण्याखाली बुडालेला असतो यावरून पाण्याची पातळी किती वाढते याचा अंदाज आपल्याला येईल ! अशा वठलेल्या झाडांचा खच इथे पडलेला आहे . याचे लाकूड अजिबात दीर्घकाळ जळत नाही असे स्थानिकांनी मला सांगितले . कारण यातील कार्बनचे प्रमाण पाण्यात मिसळून कमी होऊन जाते .
मंदिराजवळचे सर्वच वृक्ष वठलेले होते . परिसरामध्ये एक गूढरम्य भयाण शांतता पसरलेली होती .
वाटेमध्ये आडवे तिडवे पडलेले महा वृक्ष इतके मोठे आहेत की ते नकाशामध्ये सुद्धा दिसतात !

 मी चालत पुन्हा दुकानापाशी आलो . दुकानदाराने मला एक शीतपेय वजा स्थानिक सरबत पाजले . आणि इथून पुढे मी काठाकाठाने निघालो . नर्मदा मातेचे पाणी चांगलेच उतरलेले होते . त्यामुळे मी ज्या रस्त्यावरून चालत होतो त्या रस्त्यावर कधीकाळी ५० फूट पाणी असेल याची कल्पना देखील करवत नव्हती ! केवळ आणि केवळ ५० फुटापेक्षा जास्त उंचीची असलेली आणि तरीदेखील पूर्णपणे पांढरी शुभ्र पडून वठलेली झाडे याची साक्ष देत होती की इथे कधी काळी इतके पाणी भरलेले असेल . भग्न घरांचे विदीर्ण अवशेष आणि लाखो महावृक्षांची पांढरी फट्ट कलेवरे असलेले हे भयाण भयपटभूषण दृश्य इथपासून ते थेट बोधवाडापर्यंत आपली सोबत करते .मध्ये मला वीरू भाई बोलले तो नवीन बांधला जाणारा आश्रम लागला . इथून निघून पुढे पिपरीपुरा  , कोणदा ,चंदनखेडी असा संपूर्ण भुताटकीचा वाटावा असा रस्ता तुडवत राहिलो .डोक्यावर रणरणते ऊन , पायाखाली प्रचंड तापलेला धूळ फुफाटा , वाहून आलेले काटे कुटे सर्वत्र पसरलेले , आणि जिकडे नजर जावी तिकडे वाळलेली आडवी-तिडवी झाडे , एखाद दुसरे जिवंत झाड दिसते तर ते केवळ बाभळीचे बाकी सर्वत्र भयाण शांतता ! अगदी वनचरांनी देखील नाकारलेला परिसर ! एकाही झाडावर एकही पक्षी दिसणार नाही ! वानरे नाहीत माकडे नाहीत ! जमिनीवर गवत नाही त्यामुळे गवत खाणारे प्राणी नाहीत . त्यामुळे त्यांची शिकार करणारे प्राणी सुद्धा नाहीत .सावली देणारे एकही झाड नाही ! नर्मदा माता शेजारी आहे परंतु अत्यंत खोल . त्यामुळे तिथे देखील जाता येत नाही . असा भयंकर मार्ग चाललो . त्यात सुद्धा एक वेगळी मजा होती ! कारण हेही दिवस जातील हे मला पक्के माहिती होते . परंतु जलमहाभूत काय करू शकते याची ही छोटीशी झलक होती . 
या भागातील नर्मदा माई कशी आहे बघा !
मोठमोठाले खडकाळ किनारे आणि वाळलेली झाडे . त्यामुळे काठाने चालले थोडे कठीण आहे परंतु अशक्य नाही . (संग्रहित छायाचित्र )
बरेच अंतर चालल्यावर एका जल उपसा प्रकल्पापाशी येऊन पोहोचलो . मोठ्या प्रमाणात उत्खनन करून नर्मदा मातेचे पाणी उचलण्यासाठी प्रचंड प्रकल्प उभा करण्याचे काम चालू होते . जे एम सी नावाची एक कंपनी इथे मोठेच डोहकूप बांधण्याचे काम करत होती . इथूनबारा फूट व्यासाच्या मोठ्या लोखंडी नळ्याद्वारे पाणी मध्य प्रदेशा उत्तरतम टोकापर्यंत जाणार होते इथे एक बंगाली अभियंता भेटला त्याच्याशी बंगाली भाषेत बोलल्यामुळे तो अत्यंत खुश झाला आणि त्याने मला संपूर्ण प्रकल्प फिरवून दाखवला तसेच प्रकल्पाची सर्व माहिती मला दिली आणि प्रकल्प कार्यालयामध्ये नेऊन सुंदर असा चहा देखील पाजला . दरम्यान मी देखील त्याला नर्मदा परिक्रमा काय असते हे समजावून सांगितले . या मार्गाने कोणीच परिक्रमावासी कधीच आला नाही असे त्याने मला सांगितले . इथून जवळच मेघनाथ किंवा मेघनाद घाट होता . तिथे पोहोचलो . अप्रतिम असा घाट होता . सुंदर परिसर होता . उत्तम पैकी बगीचा करण्यात आला होता . चांगले कुंपण घातले होते व बांधकाम देखील चांगले होते .
मेघनाद / मेघनाथ घाट
मेघनाद घाट आणि त्याच्या शेजारचा जल उपसा प्रकल्प

 इथे रावणाचा पुत्र मेघनाथाने किंवा मेघनादाने किंवा इंद्रजीताने तप केलेले होते . मेघनाथ हा इतिहासातील असा एकमेव योद्धा मानला जातो ज्याच्याकडे ब्रह्मदेवाचे ब्रह्मास्त्र , विष्णूचे वैष्णवास्त्र आणि शिवाचे पाशुपतास्त्र अशी सर्व अस्त्रे होती शिवाय इंद्राला हरवल्यामुळे त्याच्याकडे इंद्राचे वज्र देखील काही काळ होते असे म्हणतात . आज इजराइल पॅलेस्टाईन इराण युद्ध पाहिल्यावर आपल्याला सर्वसाधारणपणे ही अस्त्रे कशी काम करत असतील याचा अंदाज येतो ! इथे एक मंदिर आहे ज्याचे दार हे दीड फूट बाय दोन फूट एवढेच लहान असून आत मध्ये खाली बसून रांगत जावे लागते . महंत राम लखन दास यांनी अतिशय प्रेमाने माझे स्वागत केले आणि संपूर्ण आश्रम स्वतः फिरून मला दाखविला . माझे एक परममित्र श्री रमण चितळे यांच्या सारखा त्यांचा स्वभाव होता आणि दोघे दिसायलाही बऱ्यापैकी सारखे होते . एका नक्षत्रावर जन्माला आलेले दोन जीव ! परंतु त्यामुळे आमची लगेचच गट्टी जमली !  इथे अजून एक जटाधारी महाराज काही काळासाठी येऊन राहिलेले होते . ते दर्शनाला येणाऱ्या सर्वांना चॉकलेट प्रसाद म्हणून द्यायचे . दुरून पाहिल्यावर एखादा वीस वर्षाचा युवक बसला आहे असे वाटायचे परंतु प्रत्यक्षामध्ये ते साठीचे किंवा त्याच्याही पुढच्या वयाचे होते . साधूंच्या वयाचा अंदाज येत नाही हेच खरे ! कालच एका वृत्तपत्राने सियाराम बाबा यांचा फोटो छापून १८८ वर्षांचे संत सापडले असे लिहिले होते . मी नर्मदा मातेच्या कृपेने प्रत्यक्ष सियाराम बाबांना भेटून त्यांना त्यांचे वय विचारले नसते तर त्यांचे आज २०२४ सालामध्ये वय केवळ ९१-९२ वर्षांचे आहे यावर माझा कधीच विश्वास बसला नसता ! त्यांनी स्वतः मला त्यांचे वय ८९ वर्षे आहे असे सांगितले होते म्हणून बरे झाले ! तात्पर्य साधूच्या वयाचा अंदाज लावावयास जाऊ नये  . फार शंका असेल तर त्यांना थेट विचारून घ्यावे . या घाटावर एक परंपरा होती . परिसरातील अनेक गावातील गरीब श्रीमंत सर्व प्रकारच्या सामाजिक व आर्थिक स्तराचे लोक इथे सव्वा महिना राहण्यासाठी येत . साधारणपणे चैत्र वैशाख महिन्यामध्ये हे लोक जमायचे . पूर्वीच्या काळामध्ये शेतीच्या कामातून सवड मिळाल्यावर काही अध्यात्मिक साधना घडावी म्हणून ही परंपरा कोणीतरी चालू केली असेल . यामध्ये सिरवी समाजाचे लोक जास्त होते . सर्वजणच स्वतः स्वयंपाक करून खात पीत असत आणि दिवसभर नर्मदा मातेचे स्नान व भजन इतकाच कार्यक्रम असायचा ! एक प्रकारची आध्यात्मिक पिकनिकच म्हणा ना ! सायंकाळी त्यांची मुले नातवंडे त्यांना भेटायला येत ! मी मुक्काम केला त्या सायंकाळी घाटावर मुलांची एकच झुंबड उडाली ! सगळीकडे धावपळ दंगा आरडा ओरडा सुरू झाला ! खाली घाटावर स्नानासाठी मी गेलो . उत्तम पैकी बांधलेला घाट आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला मजबूत भिंती किंवा रुंद कठडे बांधलेले आहेत . इथे पाण्यामध्ये मोठे खडक असून अत्यंत खोल पाणी आहे . पाणी प्रचंड स्वच्छ होते . परंतु भयानक अशी खोली जाणवत होती . मगरी अर्थातच आहेत . परंतु फार खोल पाण्यामध्ये मगरी शिकार करायला जात नाहीत . कारण त्यांना शिकारीवर झेप घेण्यासाठी जमिनीचा आधार लागतो . त्यामुळे तसा घाट सुरक्षित होता . परंतु वरती लोकांचा फारच गडबड गुंडा चालू असल्यामुळे मी काठावरती बसून राहिलो . नर्मदा मातेचे जल इतके सुंदर होते की तीन चार वेळा आंघोळ केली तरी मन भरे ना ! शेवटी अंधार पडू लागल्यावर वर गेलो . गटागटामध्ये भजने सुरू होती . मी नर्मदा मातेची पूजा करायला बसलो आणि देवांशी नावाची एक छोटीशी मुलगी माझ्या मांडीवर येऊन बसली ! आजूबाजूच्या सर्व माताराम कौतुकाने तिच्याकडे पाहत होत्या ! कारण माझी नर्मदा मैया जशी होती अगदी तशीच ती देवांशी होती ! इतकेच काय तिचे कपडे आणि केस देखील माझ्या मैय्यासारखे होते ! तीन वर्षाची पण नसेल . पण ती इतकी गोड होती की विचारू नका ! ती मला येऊन जे चिकटली ती पुन्हा तिच्या आईकडे जाईच ना ! आईला माझ्या मांडीवर बसून टाटा करू लागली ! बऱ्याच वयोवृद्ध माताराम नी नर्मदा मैया म्हणून तिचे दर्शन घेतले ! माझी पूजा झाल्यावर मला एका एका गटामध्ये भजन ऐकायची इच्छा होती . प्रत्येक ठिकाणी देवांशी देखील माझ्यासोबत आली ! काही गटामध्ये मी ढोलक देखील वाजवला . सर्व लोक एक परिक्रमावासी आला आहे म्हटल्यावर मान देतात . त्याच सोबत छोटी मैया असल्यामुळे लोकांना फारच आनंद वाटत होता !  अखेरीस माझ्या मांडीवर घेऊन थापटून थापटून मी देवांशीला झोपवले आणि मग तिच्या आईकडे सुपूर्द केले . इथे जमलेल्या संसारिकांच्या बाजारात माझे मन रमेना . म्हणून मी जटाधारी साधूंच्या दालनामध्ये गेलो .  उघडीच शेड होती . बाबांच्या चरणाशी बसलो . त्यांनी मला खूप सुंदर पद्धतीने नर्मदा रहस्य सांगितले . बाबा मला सांगू लागले , "तू कधी विचार केला आहेस का की नर्मदा माता इतकी श्रेष्ठ का ? आणि फक्त नर्मदा मातेलाच इतका मान सन्मान का ? या भारत देशामध्ये काही इतर नद्या नाहीत का ? इतके सारे साधुसंत तडी तापसी संन्यासी वितरागी बैरागी योगी महंत अधिकारी पुरुष हिच्या मागे वेडे का ? याचे एक भौतिक कारण तुला आधी सांगतो ! तू अमरकंटकला गेला आहेस ! बरोबर ? तिथे माई की बगिया मध्ये तू काय पाहिलेस ? तर नर्मदा मातेची करंगळी एवढी धार निर्माण होते . आणि कुंडातून बाहेर पडताना मात्र सहा इंचाची धारा आहे ! " आणि हे खरे होते ! मी देखील हे स्वतः पाहिले होते ! "तू कधी असा विचार केलास का की तिथल्या तिथे चार-पाच फुटामध्ये करंगळी एवढी धार इतकी मोठी कशी काय झाली ? " खरंच की ! असा विचार तर मी कधीच केला नव्हता ! "पुढे देखील प्रत्येक कुंडामध्ये तिचे पाणी कित्येक पटीने वाढत जाते ! तिला येऊन मिळणाऱ्या नद्या इतक्याही मोठ्या नाहीत की ज्यामुळे हिला इतके पाणी बारमाही राहावे ! नर्मदा माता हे एक रहस्य आहे ! हिचे पाणी कुठून येते याचा तपास आजपर्यंत कोणालाही लागलेला नाही तसेच हिची खोली किती आहे याचा देखील अंदाज आजपर्यंत कोणाला बांधता आलेला नाही . हिचे पात्र कधीच कोरडे पडलेले नाही ! कुठे घोटाभर पाण्यात हिला ओलांडता येते तर कुठे हिच्यावर पूल बांधण्यासाठी पाया टाकण्या पुरती देखील जमीन सापडत नाही इतकी ती अद्भुत आहे ! " महाराज साश्रू नयनांनी सांगत होते आणि मी देखील एकाग्रतेने ऐकत होतो ! साधू आणि सर्वसामान्य माणसांमध्ये हा मोठा फरक आहे . साधू एकच गोष्ट कितीही लोकांना कितीही वेळा तितक्याच भावपूर्णतेने किंबहुना अधिक भाव टाकून सांगू शकतात . सर्वसामान्य माणसांचे तसे नसते . आपल्या सहनशीलतेला मर्यादा असतात . साधे घरी आपल्या मुलांना देखील समजावून सांगताना आपल्या नाकी नऊ येत असते. साधू महाराजांची आज्ञा घेतल्यावर त्या दारातून रांगत आत जाऊन तिथली आरती केली आणि आत मध्येच काही काळ बसलो . बाहेर इतका गलका असताना आत मध्ये मात्र त्या छोट्या दरवाजामुळे प्रचंड शांतता होती . रात्री इथे सांसारिकांच्या गोंधळात झोपायचे नाही असे मी ठरवले आणि नर्मदा मातेच्या काठावर गेलो . खाली उतरणार्‍या ज्या पायऱ्या आहेत तिथेच एका कट्ट्यावर मी झोपलो . तशीही त्या दिवशी या परिसरातली वीज गेलेली होती . मैय्या समोरच होती ! घनघोर रात्र झालेली असल्यामुळे तिथे दुसरे कोणी येण्याची शक्यताच नव्हती ! नर्मदा मातेचे पाणी सुंदर चमकत होते ! तिचा स्पर्श लाभलेला थंडगार वारा शरीराला अत्यंत सुखद भासत होता ! अचानक त्या निरव शांततेमध्ये काहीतरी हालचाल जाणवली . कोल्ह्याची एक जोडी हुंगत हुंगत माझ्या जवळ आली . आधी त्यांना इथे काय नवीन ठेवले आहे याचे आश्चर्य आणि कुतूहल होते . त्यामुळे त्यांनी माझा वास घ्यायला सुरुवात केली . कोल्हा हा प्राणी तसा मनुष्य प्राण्यासाठी सुरक्षित आहे हे लक्षात ठेवावे . एवढ्या जवळून कोल्हा पाहण्याची माझी पहिलीच वेळ होती . मी थोडीशी हालचाल केल्याबरोबर दोघेही वेगाने जंगलात पसार झाले . पहाटे जाग आली . 
हा आहे मेघनाथ / मेघनाद घाट
मेघनाद घाटावर मी झोपलो होतो ती जागा लाल खुणेने दाखवली आहे .

 मेघनाद घाटावरून दिसणारी नर्मदा मैया


नर्मदा मातेचे घननीळ धीर गंभीर शांत जल

हेच छोटे दार असलेले मंदिर
अतिशय सुंदर असा नर्मदा मातेचा किनारा या आश्रमाला लाभलेला आहे .
आश्रमातून नर्मदा मातेचे अखंड दर्शन होत राहते
आश्रमाचे भव्य प्रवेशद्वार
मंदिराच्या पलीकडे खुर्ची लावून बसलेला माणूस आहे तिथे मी आसन लावले होते . बाकी संपूर्ण परिसरात शेकडो लोक मुक्कामाला होते .
मैयावर देखील भाविक वृद्ध माताराम लोकांची अशी गर्दी त्यावेळी होती .
किनारा खडकाळ आणि खोल आहे .
त्यामुळे इथे स्नान करणे थोडेसे धोकादायक असते
काठाने चालायचे ठरवले तर मार्ग मिळतो ! फक्त त्यासाठी पाण्याची पातळी उतरलेली पाहिजे .
खरं सांगायचं तर सरदार सरोवर धरण हे विनाकारण आंदोलनांमुळे गाजले गेले . प्रत्यक्षामध्ये या धरणाचा विस्तार हा सर्वात कमी आहे . या धरणाची खोली जास्त आहे . आपण नकाशामध्ये सरदार सरोवर धरण आणि त्याच्यापूर्वी असलेले पुनासा धरण पाहिले ज्याला इंदिरासागर असे नाव आहे आणि जो काँग्रेसच्या काळातला प्रकल्प आहे , तर आपल्याला असे लक्षात येईल की पुनासा धरणाने फार मोठ्या प्रमाणात जंगले आणि गावे पोटात घेतलेली आहेत . . भारतातील सर्वात विस्तृत जलसाठा असलेले हे धरण आहे . जेव्हा पुनासा धरणातून पाण्याचा विसर्ग होतो आणि सरदार सरोवर धरणातील विसर्ग थांबतो तेव्हाच इथे फुगवता वाढतो . अन्यथा पाण्याची पातळी नियंत्रणामध्ये राहते . कुठल्याही धरणातून पाणी सोडण्यापूर्वी त्याची सूचना स्थानिक प्रशासनाला दिली जाते . ती कशी असते याची काही उदाहरणे आपल्या माहितीकरता खाली देत आहे . 

इंदिरा सागर धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यापूर्वी प्रशासनाने दिलेली सूचना .

सरदार सरोवर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी प्रशासनाने जारी केलेली सूचना . 
या दोन्ही धरणांच्या प्रशासनामध्ये समन्वय नसला की त्याचा त्रास काठावरच्या लोकांना भोगाव लागतो . काही काळापूरती जरी पाण्याची पातळी वाढली तरी खूप नुकसान करून जाते . पुनासा धरण आणि सरदार सरोवर धरण यांच्या आकारातला फरक आपल्या लक्षात यावा म्हणून नकाशाचे चित्र खाली जोडत आहे . 
नकाशामध्ये हिरव्या रंगात दाखवलेला विस्तार सरदार सरोवर धरणाचा आहे आणि लाल रंगांमध्ये दाखवलेला विस्तार हा इंदिरासागर धरणाचा आहे . आपल्याला सहज लक्षात येईल की सरदार सरोवर धरणाच्या आजूबाजूला संपूर्ण डोंगर व जंगल आहे परंतु पुनासा धरण मात्र भर मनुष्यवस्तीमध्ये बांधण्यात आलेले आहे . 


मेघनाद घाटाचा विकास करून त्याचे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवण्याचा प्रयत्न सध्या सरकार करत आहे .

सरदार सरोवराच्या भिंतीपासून इथपर्यंत १२० किलोमीटर अंतराची क्रूज राईड अर्थात नौका सेवा सुरू करण्यात येणार आहे .त्यासाठी लागणारे २ पाँटून अर्थात तरंगती नौकावतरण क्षेत्रे इथे आधीच पोहोचवली आहेत .

या संदर्भातल्या बातम्या सतत येत आहेत . लखनदास महाराजांनी देखील मला असे होणार आहे याची कल्पना दिलेली होती . वर्षातील बहुतांश काळ तीनही बाजूने पाणी असल्यामुळे हा घाट खूप सुंदर आहे . माझ्या वहीमध्ये देखील मी याला चांदणी करून ठेवलेली होती ! याचा अर्थ चातुर्मासासाठी उत्तम स्थान !

पर्यटकांच्या रेट्यामुळे येथील पावित्र्य बाधित होऊ नये एवढीच काळजी सरकारने घ्यावी !

ज्यांनी या घाटाचा विकास केला ते ब्रह्मलीन बालमुकुंददासजी महाराज आणि लखनदासजी महाराज . लखनदास महाराज १००% एका सेवकाच्या भूमिकेमध्ये २४ तास वावरतात .त्यांच्या वागण्याला महंतीचा जरासा देखील दर्प नाही ! साधू जीवन कसे असावे याचा आदर्श वस्तूपाठ त्यांनी घालून दिलेला आहे .
. बडवानीया या क्षेत्राचे महात्मा मेघनाद घाटावर भेटले . खूपच चांगले महात्मा वाटले .  अन्य एका साधूने चहा करून पाजला .इथून पुढे लोक रस्त्याकडे जातात आणि दोन किलोमीटर दूरवर असलेल्या एका पुलावरून नर्मदा मातेला येऊन मिळणारी उरी बागली नदी ओलांडतात . निसरपूर नावाचे गाव येथे लागते .परंतु मला माझ्या संकल्पानुसार नर्मदा मातेचा किनारा सोडायचा नव्हता त्यामुळे सर्वांनी सांगून देखील मी कोणाचेच न ऐकता पुन्हा एकदा शेता शेतातून नर्मदा मातेचा किनारा पकडला . बरीच शेती तुडविल्यावर थोडीशी झाडी लागली आणि अचानक तीव्र उतार लागला . ही उरी बागली नदी होती! माझ्या अपेक्षेपेक्षा हिचे पात्र फारच मोठे आणि अतिशय रुंद होते . उभे खडक आणि मातीचे किनारे होते . नर्मदा मातेचे पाणी या नदीमध्ये उलटे शिरत होते . आज शनि अमावस्येचा दिवस होता अर्थात शनिवार होता . समोरच्या तटावर कोटेश्वरा चे जुने मंदिर होते . नर्मदा मातेच्या काठावर अनेक कोटेश्वर आहेत परंतु मुख्यत्वे करून कोटेश्वर म्हटल्यावर याच मंदिराचा उल्लेख केलेला असतो . हे सतत जलमग्न असलेले मंदिर सध्या पाण्याबाहेर आलेले असल्यामुळे दर्शनासाठी ही झुंबड उडाली होती . समोर अवल्दा , भवती , बीजासन ही गावे होती .तिथून डिझेल इंजिन वर चालणाऱ्या नावेच्या सहाय्याने शेकडो लोक दर्शनाकरता कोटेश्वरला येताना दिसत होते . अनेक नावा पात्रातून धावत होत्या . परंतु या सर्व नावा माझ्यापासून खूप लांब होत्या . माझा आवाज तिथपर्यंत ऐकू जात नव्हता . नावांच्या इंजिनाचा आवाज फार मोठा असतो त्यामुळे नावाड्याला दुसरे काहीच ऐकू येत नसते . मी अर्धा तास त्या ठिकाणी उभा राहिलो .एक क्षणभर असे वाटले की मेघनाद घाटावर लोक सांगत होते त्यांचे ऐकायला पाहिजे होते . सर्वजण एक मुखाने मला सांगत होते की इथून निसरपूर मार्गे पुलावरूनच उरी बगली नदी पार करावी लागते . पाच किलोमीटर रस्त्याने जाऊन पुन्हा जुन्या कोटेश्वराच्या दर्शनासाठी चार-पाच किलोमीटर माघारी यावे लागत असे . इथे मात्र दोनच किलोमीटरमध्ये मी नदीपर्यंत आलो होतो आणि एवढी नदी पार केली की मी लगेच कोटेश्वरचे दर्शन घेणार होतो . अर्धा तास कोणीच न आल्यामुळे माझा संयम थोडासा ढळू लागला . एक मन सांगत होते परत फिर आणि दुसरे मन सांगत होते की आपण काहीही झाले तरी नर्मदा मातेचा किनारा सोडायचा नाही . अर्धा तास कडक उन्हामध्ये तिथे उभे राहिल्यावर मी मनोमन असा संकल्प केला की कितीही वेळ लागला तरी मी इथेच उभा राहीन आणि नावेनेच पलीकडे जाईन .तिथे फक्त मला उभे राहता येईल एवढी जागा मी तयार केली होती . बसण्यासाठी देखील जागा नव्हती इतका तीव्र उतार होता . त्या एकाच जागी उभा राहून मी नर्मदा मातेकडे पाहत होतो . बघता बघता अजून अर्धा तास गेला . खरं पाहायला गेलो तर हा हट्ट किंवा दुराग्रहच म्हटला पाहिजे . पण मी तो केला . तिच्या जीवावर केला . मी नर्मदा मातेला म्हणालो , " मैया जर तू अशी वागलीस तर इथून पुढे कोणीच काठाने परिक्रमा करणार नाही . केवळ तुझी संगत सुटू नये म्हणून काठाकाठाने चालणाऱ्या परिक्रमावासींचे तु जर असे हाल करणार असशील तर इथून पुढे मी तुझा किनारा कायमचा सोडेन आणि रस्त्याने परिक्रमा पूर्ण करेन ! " एक प्रकारे ही धमकीच मी नर्मदा मातेला देत होतो ! काय योग्यता माझी ? पण हिम्मत पहा कशी आली होती ! पुन्हा पाच मिनिटे गेली आणि कोणीही आले नाही . मी तिथून उलटा फिरलो आणि वर चढायला सुरुवात केली . साश्रू नयनांनी नर्मदा मातेला म्हणालो , " आता पुन्हा तुझा किनारा पकडतो का बघ ! " इतक्यात उरी बागली नदीच्या पलीकडच्या काठावरून जोरात आवाज आला , " नर्मदे हर बाबाजी ! रुक जाव ! आपके लिये नाव मंगाया है ! " मी चटकन मागे वळून पाहिले तर समोरच्या काठावर कोणीही दिसत नव्हते . मी पुन्हा पुन्हा नीट पाहिले परंतु कोणीच नव्हते . इतक्यात डावीकडे लांब वर उरीबागली नदीला एक ओढा येऊन मिळत होता तिथून एक नाव माझ्या दिशेने येत आहे असे मला दिसले . नाव सुमारे दोन किलोमीटर लांब होती . परंतु तरीदेखील तिथून नावाड्याने मला हात करून " थांब मी येत आहे " अशी खूण केली आणि ती मला स्पष्टपणे कळली ! नर्मदा मातेचे पाणी उरी बागली मध्ये उलटे शिरत असल्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध वल्हवत तो बिचारा केवट एकटाच येत होता . हळूहळू नाव माझ्या समोर येऊन थांबली . उभा कडा असल्यामुळे नावेत उतरता येणे शक्य नव्हते . केवटाने मला उडी मारायला सांगितले . बरोबर नावेचा मध्यबिंदू बघून मी उडी मारली .  छोटीशी नाव होती त्यामुळे उडी चुकली असती तर अक्षरशः नाव पाण्यात पलटी झाली असती . मी नावे मध्ये बसल्याबरोबर केवटाला नमस्कार केला आणि म्हणालो , "देवासारखे धाऊन आलात ! " केवट हसू लागला .मी त्याला म्हणालो "पण तुम्ही आलात कसे काय ? " केवट मला म्हणाला , "इथे समोरच्या तटावर दोन मछुवारे (कोळी) बराच वेळ मासे धरत बसलेले होते . त्यांनी मला सांगितले की तिथे एक बाबाजी बराच वेळ उभा आहे . म्हणून मी आलो . " केवटा कडून एक वल्हे मी घेतले . आणि दोघांनी नाव वल्हवत वल्हवत पलीकडच्या तटाकडे न्यायला सुरुवात केली . "इस रास्ते से कोई परिक्रमावासी नही जाता बाबाजी । " केवट सांगू लागला . "हा । वो बात सही है । लेकिन हमारा किनारे किनारे चलने का संकल्प है । इसलिये हम यही से आये । " दूर चार पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नव्या जुन्या पुलावरून परिक्रमावासी जातात असे केवटाने मला सांगितले . नवीन कोटेश्वर मंदिर देखील तिथेच झालेले आहे . " रोडही रोड चलने वालो के लिए वह नया आश्रम ठीक है । " "लेकिन वह मैया के किनारे नही है ना ! " मी असे म्हटल्याबरोबर केवट हसायला लागला . " बहुत जिद्दी हो । हम नही आते तो क्या कर लेते ? " केवटाने विचारले . या प्रश्नावर ती माझे एक तास चिंतन करून झालेले होतेच त्यामुळे त्याला लगेच सांगितले ! तसे तर पोहत पलीकडे जाण्याची माझी इच्छा होती . परंतु नदीचे पात्र काहीच्या काही रुंद होते . त्यामुळे अखेरीस पुन्हा किनाऱ्याने चालायचेच नाही असा अघोरी संकल्प मी करणार होतो हे सांगितल्यावर केवट पुन्हा हसायला लागला ! आणि म्हणाला "आप हमेशा किनारा पकड के चलना बाबाजी । कोई ना कोई आपको जरूर नदिया पार करा देगा । हमारा काम ही वही है । " समोरचा किनारा देखील तितकाच भयानक होता . केवट केवळ माझ्यासाठी इतक्या लांबून आला होता त्यामुळे याला पन्नास शंभर रुपये दक्षिणा द्यावी असा संकल्प माझे मन करत होते . नावेतून उतरण्यापूर्वी मी पैसे शोधू लागलो तर केवट मला म्हणाला , " आप से पैसे नही लेंगे प्रभू । भगवान के काम के पैसे हम नही लेते । यह पाप है । " वाटेमध्ये खाण्यासाठी म्हणून मला लखनदास महाराजांनी केळी सोबत दिली होती . ती मी त्याला दिली आणि म्हणालो , " निदान ही केळी तरी ठेव नर्मदा मातेचा प्रसाद म्हणून . " असे म्हणून मी त्याच्या हातात केळी दिली . केवटाने मला पुढे जाण्याचा मार्ग सांगितला . आणि पुन्हा एकदा उडी मारून मी खडा चढ असलेला काठ पकडला . धावतच चढावर गेलो . मागे वळून केवटाला अच्छा करावे म्हणून मी मागे वळून पाहिले . बघतो तर पाण्यामध्ये कोणीच नव्हते ! मी धावतच पुन्हा एकदा खाली आलो . आणि सगळीकडे शोधले परंतु संपूर्ण उरीबागली नदीच्या पात्रामध्ये किंवा नर्मदा मातेच्या पात्रामध्ये देखील एकही नाव किंवा नावाडी मला दिसले नाहीत . नाव गेल्यावर पाण्यामध्ये उठणारे तरंग देखील दिसले नाहीत . मी पुन्हा एकदा त्या संगमावर अश्रूंचा जलाभिषेक केला . किती मूर्खासारखे बोलत राहतो आपण ! समोर आलेली व्यक्ती कोण आहे याचा विचार देखील आपण करत नाही . आणि सर्वाभूती भगवंत हा भाव देखील आपल्या अंतकरणांमध्ये स्थिर झालेला नसतो त्यामुळे साक्षात परमेश्वर समोर येऊन गेला तरी आपल्याला कळत नाही इतके मूढ बुद्धीचे मळभ आपल्या मेंदूवरच साचलेले असते ! 
या नकाशामध्ये सर्व काही स्पष्ट होईल . डावीकडे मेघनाथ घाट दिसतो आहे . उजवीकडे कोटेश्वर महादेवाचे मंदिर आहे . मध्ये उरीबागली नदी नर्मदा मातेला येऊन मिळते आहे . लाल खूण केली आहे तिथून मी नदी ओलांडली . उरी बागली नदीच्या वर दिसणाऱ्या ओढ्यापासून नावाडी माझ्याकडे आला .
मध्ये अनेक छोटे मोठे ओढ नाले या जलसंस्थेमध्ये सहभागी होताना दिसतात .
कोटेश्वर कडे घेऊन जाणारी नाव आपल्याला नर्मदा मातेच्या पात्रात दिसेल . या मोठ्या नावा असून एका नावेत ५० ते १०० माणसे मावतात ! आता त्यावरून या परिसराचा आकार किती मोठा असेल याची कल्पना करावी !

थोडे अंतर चालल्याबरोबर कोटेश्वराचे जुने मंदिर समोर आले . इथे अक्षरशः जत्रा भरली होती इतकी गर्दी होती . शनि अमावस्येमुळे लोकांनी दर्शनासाठी झुंबड उडवलेली होती . इथे अनेक मंदिरे आहेत . सर्वच्या सर्व मंदिरे जलमग्न झालेली आहेत परंतु सर्वच्या सर्व मंदिरे सुस्थितीतच आहेत . पाणी उतरल्यामुळे मंदिरे पुन्हा एकदा दर्शनासाठी खुली झाली होती . कार्तिकी पौर्णिमेच्या आसपास ओंकारेश्वर पासून परिक्रमा उचलणाऱ्या परिक्रमा वाशींना ही मंदिरे कधीच पाहायला मिळत नाहीत . कारण ते ज्या काळामध्ये इथून जातात तेव्हा तिथे प्रचंड प्रमाणात पाणी भरलेले असते . माझ्या सगळ्याच गोष्टींना उशीर झालेला असल्यामुळे मला नर्मदा मातेची वेगळीच रुपे पाहायला मिळत होती . असो . गर्दीतून मार्ग काढत मी एक एक करत दर्शने घ्यायला सुरुवात केली . परिक्रमावासी आला की आसपासचे लोक बाजूला होऊन जागा देतात . दर्शनासाठी सुद्धा रांग असली तरी परिक्रमावासींना थेट जाऊन दर्शन घ्यायची मुभा असते . परिक्रमावासींना सगळीकडेच नर्मदा मातेच्या कृपेने "वाइल्ड कार्ड एन्ट्री " असते ! राम मंदिर , नर्मदा माई मंदिर ,कोटेश्वर भगवान ,मारुती मंदिर अशी सर्व दर्शने घेतली . पुजाऱ्यांनी सर्व परिसराची व्यवस्थित माहिती दिली . घाटावरती मांडव टाकला होता आणि तिथे गुलाबाचे थंडगार बर्फयुक्त सरबत वाटले जात होते . कमण्डलुमध्ये सरबत भरून घेतले . आणि तिथेच बसून सुमारे दोन-तीन लिटर सरबत रिचवले !  इतक्या मोठ्या प्रमाणात साखर पोटात घेण्याची कल्पना देखील आपण शहरी जीवनामध्ये असताना करू शकत नाही !  परंतु परिक्रमे मध्ये असताना मात्र तुमचे शरीर सतत शरीरातील शर्करा जाळत असते त्यामुळे काहीच फरक पडत नाही .

हाच तो सुंदर आणि मजबूत कोटेश्वर चा घाट जो वर्षातील बहुतांश काळ पाण्याखाली असतो . इथेच सरबत वाटप चालले होते .

जलमग्न झाल्यावर हा परिसर असा दिसतो .


कोटेश्वर महादेव भगवान


मी गेलो त्या दिवशी शनी अमावस्येमुळे अशीच मोठी गर्दी पाहायला मिळाली . काही भिक्षेकरी वस्त्र पसरून बसतात ज्यावर जाणारे येणारे भाविक मुठमुठ धान्य टाकतात .


घाटावर भाविकांची स्नानाची सुरू असलेली लगबग


कोटेश्वर येथील गणेश मूर्ती . शेंदूर लावलेल्या मूर्तींची अशी सजावट करण्याची पद्धत नर्मदा खंडामध्ये आहे .

इथले राम मंदिर देखील सुंदर आहे .


मारुतीरायाला देखील सुंदर सजावट करतात .


घाट खोल आहे आणि चालण्यासाठी खूप कमी जागा उपलब्ध आहे हे आपल्याला वरील चित्र पाहिल्यावर लक्षात येईल . ही पाण्याची सर्वात खालची पातळी आहे .


सर्वात वरची पातळी आली की एकही मंदिर दिसत नाही आणि मध्यम पातळीमध्ये अशा रीतीने मंदिरे दिसतात .हे आपण पाहिलेले रामाचे मंदिर आहे जे अर्धे जलमग्न झालेले आहे .
तरी देखील इथल्या राममूर्ती इतक्या सुंदर आहेत ! पुरामुळे त्यांच्यावर कसलाही प्रभाव पडलेला नाही .


नर्मदा मातेचे सुंदर असे मंदिर येथे आहे . पाण्यातून बाहेर आल्यावर या सर्व मंदिरांची आणि घाटाची तसेच मूर्तींची रंगरंगोटी केली जाते

पाण्यातून बाहेर आल्या आल्या मूर्तींचे स्वरूप काहीसे असे झालेले असते .


जलमग्न मंदिराचे दर्शन घ्यायला देखील लोक नावेतून येतात . 


मंदिराचा घाट इतका मोठा असून देखील आणि तो दरवर्षी पुन्हा एकदा पाण्याखाली जाणार आहे हे माहिती असून देखील घाटावर सेवा देणारी सेवा समिती दरवर्षी उत्तम प्रकारची रंगरंगोटी करते .

घाट मोठा सुंदर आणि तीव्र उताराचा आहे .

कोटेश्वरा चे मंदिर देखील अत्यंत सुंदर व मजबूत बांधकाम असणारे आहे . त्याचा एकही दगड इतक्या वर्षांमध्ये पाण्याखाली राहूनही हललेला नाही .

त्याही मंदिराला दरवर्षी उत्तम रंगरंगोटी केली जाते

घाटाचा उतार किती तीव्र आहे हे तुम्हाला या चित्रातून लक्षात येईल . 
इथे दगडू जी महाराजांची अखंड राम धुन चालवणाऱ्या आश्रमाचे अन्नक्षेत्र आहे . 
 सरबत घेतल्यावर काठा काठाने पुढे निघालो .सगळीकडे नर्मदा मातेचे पाणी उतरलेले असल्यामुळे प्रचंड गाळ माजलेला होता . त्यातून कशीबशी वाट काढत चालत होतो . पुढे एक छोटासा घाट होता . वरती कनक बिहारी मंदिर होते .तिथे वरून एका जटाधारी वामन साधूने आवाज दिला आणि वरती बोलावून घेतले . हा साधूंचा आवडता घाट आहे .
कनक बिहारी घाटावर पंचाग्नी साधन करत बसलेले साधू
 साधु महाराज मला म्हणाले की " अमावस्येच्या दिवशी परिक्रमे मध्ये चालायचे नसते . त्यामुळे आज तू आमच्या आश्रमात मुक्काम कर . " मी मात्र नम्रपणे त्यांना नकार दिला . नकार देणे ही एक कला आहे . कारण आग्रह करण्यात तर नर्मदा खंडातले साधू खूपच निपुण आहेत . परंतु नम्रपणे नकार दिला तर तो देखील ते सहज स्वीकारतात असा अनुभव आहे . इथे काही काळ बसल्यावर पुजाऱ्याने मला खरबूज कापून आणून दिले . ते देखील खाल्ले . पोटाला एकदम आधार आला . साधूंना नमस्कार केला आणि पुन्हा एकदा किनारा पकडला . मध्ये मध्ये खूपच ओढे नाले आडवे येत होते . तसेच नर्मदा मातेच्या पाण्यामुळे ते आडवे तिडवे गच्च भरलेले असत .  खूप उलटे चालावे लागले . पण या ओढ्याच्या भागातील पक्षी जीवन अत्यंत समृद्ध होते . सर्वत्र पाणीच पाणी ! त्यामुळे पक्षांची चंगळ होती ! इथे मैयाचे पात्र प्रचंड खोल होते . साधारण भूगोल असा होता . प्रचंड खोल नर्मदा मातेचे पात्र . त्यानंतर त्याला येऊन मिळणारे आणि पाण्याने गच्च भरलेले ओढेनाले . त्यानंतर ताजा ताजा तयार झालेला हिरवळीचा पट्टा .आणि मग बाधित डूब क्षेत्र दिसायचे . डुबक्षेत्राची रुंदी सुमारे एक ते तीन किलोमीटर असायची . अर्थात हे वैशाखातले किंवा एप्रिल मे महिन्यातले चित्र मी सांगतो आहे . सुमारे तीन किलोमीटर रुंदीचे वैरण वाळवंट ! पांढरी माती , पांढरी वठलेली झाडे खोडे ,त्यानंतर पुन्हा एकदा हिरवागार पट्टा आणि त्यानंतर पुनर्वसन झालेली गावे अशी साधारण रचना असायची . या डूब क्षेत्रातून चालताना एक काळजी घ्यायला लागायची . वाटेत प्रचंड प्रमाणात काटे कुटे असायचे . काटेरी फांदी अख्खी जरी कुजली तरी काटे मात्र आहे तसेच कडक राहतात . आणि बेकार टोचतात . लोक अक्षरशः आपली राहती घरं सोडून पुनर्वसित झाली होती . अशी भुताटकी वाटणारी असंख्य घरे इथे दिसायची . मी त्या घरांकडे पाहताना विचार करायचो . ही घरे बांधण्यासाठी किती लोकांनी किती वर्षे आणि किती टोकाचे कष्ट केलेले असतील ! परंतु तरी देखील एक दिवस सर्व काही इतिहास जमा झाले ! किती प्रेमाने आणि कष्टाने उभे केले असतील हे इमले ! पण सर्व उजाड ! निसर्गापुढे सारेच हतबल ! नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही . घरांची अवस्था अशी असली तरी मंदिरे मात्र सर्वच सुस्थितीमध्ये होती !  हीच दगडी बांधकामाची खासियत आहे आणि परमेश्वरी ताकद आहे . अगदी मूर्ती सुद्धा तशाच राहत . कोटेश्वर ची रामाची मूर्ती पांढरी शुभ्र आणि आहे तशी होती . पुन्हा काठाने चालू लागलो . वाटेमध्ये करोंदिया गाव लागले . एकाने चहा पाजला . गावातील मुलांना परिक्रमा कशी असते हे नकाशासह समजावून सांगितले . ही शेवटची काही आदिवासी घरं होती .आधुनिकतेचा स्पर्श झाल्यामुळे आजकाल या भागातले आदिवासी सोबत धनुष्यबाण ठेवत नाहीत . चक्क आदिवासी मुलांना देखील माझ्याकडे असलेला बाण पाहून हे काय आहे असे विचारताना पाहून मला दुःख झाले . समाधानाची गोष्ट इतकीच की आता काठाने चालण्याचा रस्ता मला मिळाला ! मी अतिशय खुश होतो ! परंतु मला अजिबात माहिती नव्हते की नर्मदा माईने माझ्यासाठी पुढे काय वाढून ठेवले आहे ! त्यादिवशी असे काहीतरी घडले की परिक्रमेत पहिल्यांदाच माझी वस्त्रे माझ्याच रक्ताने माखली !





लेखांक एकशे तेहेत्तीस समाप्त ( क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर