लेखांक १३४ : चिखलदा , खापरखेड्याच्या किनाऱ्यावरील अग्नीतांडव
कोटेश्वरच्या पुढे चालताना मध्ये एक मोठा ओढा आडवा आला. त्याला पार करताना तारांबळ उडाली. कारण अरुंद असूनही प्रचंड खोल होता .
कोटेश्वर पासून पुढे जाण्यासाठी फक्त किनाऱ्याचा मार्ग होता .नाहीतर थेट पाच किलोमीटर लांब गेल्यावर डांबरी रस्ता होता . किनाऱ्याचा मार्ग म्हणजे नर्मदा मातेचे पाणी उतरल्यामुळे तयार झालेला एक चिखलाचा पट्टा होता . त्याच्यावरून चालणे फारच सुखद अनुभव होता ! तुम्ही जेव्हा गतीने धपाधप चालता तेव्हा तुमच्या पावलांच्या जोडांवर खूप दाब येत असतो . गुडघ्यांवर , त्यातल्या कुर्च्यांवर दाब येत असतो . आपण पाय दुखतो , पाय दुखतो असं जे म्हणतो त्याचं कारण या अवयवांवर आलेला अतिरिक्त ताण असतो . परंतु इथे खाली माऊशार चिखल असल्यामुळे तुम्ही कितीही जोरात पाऊल टाकले तरी त्यातील सर्व शक्ती हा चिखल शोषून घेतो . आणि त्यामुळे तुमच्या पायाला एक वेगळी ताकद वेगळी गती प्राप्त होऊन जाते ! आज-काल ट्रॅम्पोलीन वर उड्या मारण्याची एक फॅशन आलेली आहे ! अगदी तितके नाही परंतु त्या पद्धतीचाच प्रकार इथे चालताना तुमच्या बाबतीत घडत असतो . त्यामुळे अतिशय आनंदाने मी पायांना गती दिली .
मैय्याच्या काठावरील चिखलाचा सुरेख पट्टा
माझ्या डावीकडे दूरवर पुनर्वसन झालेली गावे मागे पडत होती . रोहना , करोंदिया ,खापरखेडा अशी गावे मागे टाकत चिखलदा हे गाव गाठण्याचे माझे नियोजन होते . चिखलदा या गावांमध्ये थोरल्या स्वामीजींनी अर्थात परमहंस परिव्रजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती उपाख्य टेंबे स्वामी महाराज यांनी चातुर्मास केलेले असल्यामुळे मला या गावाचे विशेष अप्रूप होते .आणि तिथे काय आहे ते पाहण्याची उत्कंठा होती . त्यामुळे मी पायांना भयंकर गती दिली . हा संपूर्ण परिसर 100% निर्मनुष्य होता . काठावरती एकही मच्छीमार केवट शेतकरी गुराखी गावकरी दिसत नव्हता .त्याला कारणही तसेच होते . इथे पाणी इतके खोल आहे की मासेमारी करून काही फायदा होत नाही . खोल पाण्यामध्ये माशांना लपायला जागा मिळते . त्यामुळे उथळ पाण्यामध्ये जितके मासे सापडतात तितके खोल पाण्यात सापडत नाहीत . गुराख्यांना आवश्यक असणारे गवत इथे नावाला सुद्धा नाही .वर्षातील बराचसा काळ पाण्याखाली राहिल्यामुळे इथली जमीन थोडीशी क्षारपड आणि नापीक झाल्यासारखी आहे . शेतकरी काठावर येत नाहीत कारण इथून जिथपर्यंत पाणी भरते त्या क्षेत्राच्या पलीकडे त्यांची क्षेत्रे आहेत . आणि ते अंतर साधारण अर्धा ते एक किलोमीटर आहे . गावेच्या गावे पाच किलोमीटर मागे गेल्यामुळे गावकरी देखील किनाऱ्यावर फिरकत नाहीत . नदीचे पात्र खोल असल्यामुळे पाण पक्ष्यांना लागणारे दगड किंवा झाडेझुडपे इथे नाहीत . त्यामुळे बगळे चित्रबलाक चक्रवाक किंवा पाणकावळे हे देखील इथे दिसत नाहीत . अंडी घालण्यासारखी खडकाळ जमीन नसल्यामुळे टिटव्या दिसत नाहीत . गवत नसल्यामुळे गवत खाणारे पशु नाहीत . गवत खाणारे पशु नसल्यामुळे हिंस्र श्वापदे देखील इकडे फिरकत नाहीत . जमीन सतत पाण्याखाली राहिल्यामुळे इथे बिळात राहणारे उंदीर , ससे , घुशी किंवा तत्सम प्राणी नाहीत . हे प्राणी नसल्यामुळे साप अजगर यांसारखे सरिसृप सुद्धा नाहीत . एकंदरीत या संपूर्ण परिसरामध्ये तुमच्याशिवाय आणि नर्मदा मैया शिवाय कोणीही नसते ! याच्यापेक्षा अजून सुंदर अशी कुठली गोष्ट एखादा परिक्रमा वासी अपेक्षू शकतो ! फक्त मैया आणि आपण ! आनंदाचे डोही आनंद तरंग! आनंदची अंग आनंदाचे ! अतिशय आनंदाने या भागातून मार्गक्रमणा चालली होती ! थोडे अंतर चालल्यावर एक संकट सामोरे येऊ लागले . नर्मदा मातेच्या काठावर सरदार सरोवर धरणाचे पाणी साठल्यामुळे जी झाडे वाळतात किंवा वठून जातात त्यांची वाहत आलेली खोडे इथे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात साठलेली होती . त्यांचे प्रमाण इतके जास्त होते की कित्येक किलोमीटर मला सगळीकडे लाकडेच लाकडे दिसू लागली . साधारण एक सेंटीमीटर पासून पुढे ते अगदी तीन-चार फूट व्यास असलेली , अशा मापाची वाळलेली लाकडे काड्या काटक्या काटे कुटे यांचा मोठा ढीग नर्मदा मातेच्या काठावर साठलेला होता . सर्व लाकडे पांढरी फटक पडलेली होती . त्यांच्यावरील साल पाने इत्यादी कुजू शकणारा भाग कुजून .पूर्वीच पुढे वाहून गेलेला होता . शक्यतो लाकूड पाण्यावर टाकले की तरंगते . या वाळलेल्या लाकडांची गंमत अशी होती की ही पाण्यामध्ये टाकली की बुडून तळाशी जायची ! त्यांच्यामधील सर्व सत्व जणू काही निघून गेलेले होते ! एक आनंदाची बाब अशी होती की या लाकडांच्या खाली अगदी नर्मदा मातेच्या पाण्यातून चालले तर चालण्यापूरती वाट मिळायची . आता मला दूरवर दोन पूल दिसू लागले . यातला एक पूल होता तो चिखलदा ते राजघाट असा जाणारा छोटा कमी उंचीचा जुना पूल होता . आणि एक मोठा पूल होता तो छोटी कसरावद घाटावर जाणारा पूल होता . हे दोन्ही पूल मला दक्षिण तटावर चालताना लागलेले होते त्यामुळे तो परिसर माझ्या लक्षात आला . छोट्या पुलाखाली भुताटकी झालेल्या महिलेवर उपचार करणारे तांत्रिक मी पाहिले होते . आणि नंतर राजघाटावर स्नान करताना मैयाने भरपूर दक्षिणा मला देवविली होती . तोच हा परिसर होता . दक्षिण तटावरून चालताना मी उत्तर तट कसा आहे ते बघून ठेवायचो . त्यामुळे या परिसरामध्ये दूरपर्यंत मैयाच्या काठी काहीही मनुष्यवस्ती किंवा मानवी वावर नाही हे मी आधीच पाहून ठेवलेले होते . काठाने चालताना खूप हिरवळ लागली होती . याच्यामध्ये रान तुळशीची अक्षरशः जंगले माजलेली होती . त्यातून चालताना तिचा उग्र वास यायचा . लोकांकडून मी पुढचे मार्ग समजून घेतलेले होते . काठाकाठाने चालत गेहेलगाव मार्गे चिखलदा गाठावे असे माझ्या डोक्यात होते .परंतु मैयाचे नियोजन काहीतरी वेगळेच होते . हळूहळू माझ्या डावीकडे असलेल्या काड्या काटक्या वाढत गेल्या . इतक्या की आता मला पाय ठेवायला जागा मिळेना ! तो सर्व लाकूडफाटा इतका गरम आणि तापलेला होता की असे वाटायचे की आत्ता पेट घेतो की काय ! हात लावला तर चटका बसेल इतकी ती लाकडे तापलेली होती . सूर्याने आग ओकायला सुरुवात केलेली होतीच . आणि त्यात हे नवीन संकट ! मध्ये एक ओढा आडवा आला . तो पार करताना मी चुकून खाज खुजली च्या जंगलामध्ये शिरलो . आणि सर्व अंग आणि माझी छाटी खाज खुजली च्या हिरव्या पिवळ्या बारीक काट्यांनी भरून गेली ! दक्षिण तटावर केवळ तिच्या एका स्पर्शाने मला दोन ते तीन तास अक्षरशः रडवले होते तो प्रसंग आपण पाहिलेला आहेच ! आता तर मी पुरता खाज खुजलीमय झालो होतो ! अंग खाजायला सुरुवात झाल्याबरोबर मी दक्षिण तटावर केलेली माझी चूक आठवली आणि नर्मदा मातेकडे तोंड करून जोरात पुकारा केला ,
" नर्मदे हर ! मम पीडा हर ! "
आणि चमत्कार म्हणजे मला जराही खाज सुटली नाही ! माझे सर्व अंग काट्यांनी भरलेले मला दिसत होते . परंतु एकही काटा टोचत नव्हता किंवा खाजत नव्हता . या खाज खुजलीच्या जंगलातून वाचण्यासाठी मी पुन्हा एकदा काठावर आलो . ओढा पार झाला होता त्यामुळे काठाने चालणे सुरक्षित आहे असे मला वाटले . परंतु पुन्हा एकदा काटे कुटे सुरू झाले . मी आता पुढे जायचा मार्ग कसा आहे ते बघण्यासाठी आडव्या पडलेल्या एका ओंडक्यावर चढलो आणि वरवर चालत गेलो . खाली सर्व काड्या काटक्या काटे कुटे होते . जिथवर नजर जाईल तिथवर वाळलेली लाकडे साठलेली दिसत होती ! हा असला प्रकार मी आयुष्यात पहिल्यांदा बघत होतो . आता पुढे कसे जावे हा विचार मी करत होतो कारण ही लाकडे मैया मध्ये बुडलेली होती . त्यामुळे काठाने सुद्धा मार्ग नव्हता . काय करावे असा विचार करत असतानाच अचानक कडाड असा आवाज आला आणि मी उभ्या असलेल्या लाकडाची फांदी तुटून मी त्या काड्या काटक्यांमध्ये पडलो ! सगळ्या बाजूंनी असंख्य काड्याकाटक्या माझ्या अंगात घुसल्या . परंतु एक टोकदार काठी मात्र माझ्या मांडीच्या मागच्या बाजूने घुसून थेट थोडीशी वरच्या बाजूने बाहेर आली ! म्हणजे साधारण दीड इंच ती माझ्या शरीरामध्ये आत घुसलेली होती . फार खोल गेली नव्हती . वैद्यकीय भाषेत सुपरफिशियल किंवा त्वचेच्या थराच्या थोडे खाली घुसून बाहेर आली होती परंतु प्रचंड वेदनादायक प्रकार झाला होता ! मांडीतून प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला . माझी संपूर्ण छाटी रक्ताने माखली ! अजून दोन-तीन ठिकाणी जखमा झाल्या त्यातूनही रक्त वाहू लागले . यातून बाहेर पडावे तर खाली जमीन नव्हती . मी अधांतरी अडकलो होतो ! ज्या लाकडाचा आधार वाटला होता त्यानेच घात केला होता ! हात पाय लटकलेले ! झोळीमध्ये देखील काटक्या घुसलेल्या ! नशिबाने दंड माझ्या हातात होता . त्याच्या साह्याने आजूबाजूच्या काड्या तोडत मी पुन्हा उभा राहिलो . काड्या काटक्यांवरच उभा राहिलो ! आणि मैय्याकडे पाहत कळवळून जोरात ओरडलो !
" मैया कशाला हा रिकामाच लाकूडफाटा बाळगते आहेस ? काय गरज आहे तुला त्याची ? ना जळणाच्या कामाचा , ना तरंगण्याच्या कामाचा ! ना भिजत , ना कुजत ! आग लाव त्याला ! " रक्तबंबाळ अवस्थेत कसाबसा मी त्या लाकूड फाट्यातून बाहेर पडलो . क्षणभर वाटले मैय्या मध्ये जाऊन जखमा धुवाव्यात . परंतु नंतर मी असा विचार केला की आपल्या अपवित्र रक्ताने नर्मदा मातेचे पवित्र जल दूषित करण्याचा मला काही अधिकार नाही ! त्यामुळे मी तसाच उन्हामध्ये चालत वरती आलो . कडक तापमानामुळे काही वेळातच सगळे रक्त वाळून गेले . त्यावर फुफाटा चिकटू लागला . थोडे वर आल्यावर शेती दिसत होती . तिथे पाण्याची मोटर चालू करायला एक मनुष्य आला होता .त्याने मला सांगितले डावीकडे सरळ गेल्यावर चिखलदा गावातील आश्रम लागतो . नर्मदा मातेच्या काठावरील परिस्थिती पाहिलेली असल्यामुळे आणि डावीकडे जवळच आश्रम आहे अशी चुकीची माहिती मला दिलेली असल्यामुळे मी डावीकडे वळून चालू लागलो ! नर्मदा मातेचे वेगळेच नियोजन सुरू होते ! हळूहळू चालत मी दोन-तीन किलोमीटर नर्मदा माते पासून लांब आलो .इथे अजून एक मनुष्य भेटला ज्याने मला पन्नास रुपये दक्षिणा दिली आणि अजूनच मार्ग भरकटवला . अखेरीस एक शेतकरी भेटला . जगदीश बघेल असे त्याचे नाव होते . मी त्याच्याशी बोलायला गेलो तेव्हा तो मोटरसायकल वरून उतरत होता .शक्यतो आपण मोटरसायकल सावली बघून लावतो .त्याने एका छोट्याशा झाडाच्या सावलीत लावलेली मोटरसायकल काढून उन्हामध्ये लावली .मी त्याला म्हणालो , " सावलीत राहू दे ना गाडी ! " त्यावर तो मला म्हणाला , शेतातला काडीकचरा वाळलेला आहे . उगाच आग बिग लागली तर माझी गाडी जळायची ! अतिशय दुरापास्त शक्यता होती. परंतु त्या माणसाला नर्मदा मातेने बुद्धी दिली होती असेच आपण म्हणायचे .त्याने माझ्या हातात दहा रुपये दक्षिणा दिली आणि मला सांगितले की इथून जवळच एक आश्रम आहे . कडमाल नावाचे गाव आहे तिथे नवीनच आश्रम झाला आहे . तिथे नक्की जा असे त्यांनी मला सांगितले . थोडे अंतर झाल्यावर एक डांबरी रस्ता लागला . या डांबरी रस्त्यावरच उजव्या हाताला थोडे चालल्यावर नवीन आश्रम झालेला दिसत होता . आश्रमाच्या आत मध्ये गेलो आजपर्यंत मी पाहिलेल्या अनेक आश्रमांपैकी अतिशय अप्रतिम असा हा आश्रम मला वाटला . अत्यंत विचारपूर्वक ओमप्रकाश सोनी नामक कुक्षी गावातल्या एका वकिलांनी हा आश्रम आपल्या मातोश्री कमलाबाई हिरालाल सोनी यांच्या स्मरणार्थ बांधलेला होता . ९६ लाख रुपयाला अडीच एकर जागा विकत घेऊन त्यांनी हे साम्राज्य उभे केले होते . हे कडमाल , चंदनखेडी , गेहलगाव अशा तिन्ही गावांच्या जवळ असलेले ठिकाण होते . धार जिल्ह्यातला हा कुक्षी तालुका होता .आश्रम पाहिल्यावर मन अत्यंत प्रसन्न झाले ! आश्रमातले वातावरण अतिशय पवित्र होते . गेल्या गेल्या समोर एक आरसीसी बांधकामाचा बंगला होता यामध्ये परिक्रमावासींसाठी खोल्या स्वयंपाक घर आणि मोठा व्हरांडा होता तर उजव्या बाजूला अतिरिक्त परिक्रमा वासीयांसाठी पत्र्याची शेड केलेली होती . डावीकडे एक छोटेसे शिव मंदिर होते . तिथे बेलाचे मोठे झाड होते . मी आश्रमामध्ये गेल्याबरोबर तिथले सेवेकरी सुरज सिंग सोलंकी , संजय आणि मुकेश यांनी माझे स्वागत केले ! रक्ताने माखलेले माझे कपडे बघून त्यांच्या लक्षात आले की मी कुठल्यातरी मोठ्या संकटातून आलेलो आहे ! त्यांनी मला काय झाले असे विचारले आणि मी त्यांना सगळा प्रसंग सविस्तर सांगितला . सुरज सिंग यांनी लगेच मला मागच्या बाजूला असलेल्या मोरीकडे नेले आणि आंघोळ करून कपडे धुवावयास सांगितले . आश्रमाला सिद्धाश्रम असे नाव दिले होते .आश्रमामध्ये परिक्रमावासी मी एकटाच होतो. तिघेही माझ्याशी बोलत उभे राहिले . इतक्यात एक मनुष्य धावतच आश्रमामध्ये आला आणि सांगू लागला "मैया किनारे बहुत बडी आगी लगी है ! " हे ऐकल्याबरोबर मी उभा राहिलो . आणि म्हणालो , " शक्यच नाही ! मी आत्ताच तिकडनं आलेलो आहे . कुठेही आग वगैरे काही लागलेली नाही " .मी असे म्हणेपर्यंत अग्निशमन दलाच्या दोन गाड्या मोठमोठ्यांदा हॉर्नचा आवाज करत , सायरन वाजवत आणि घंटा बडवत आश्रमासमोरून वेगाने सणकत गेल्या ! आम्ही सर्वजण बाहेर आलो ! मी जिथून डांबरी रस्त्याला लागलो त्या वळणावर गाड्या पटापट वळून आत घुसल्या . सगळीकडे धावपळ उडाल्यासारखे वातावरण दिसत होते . काठावर शेती असलेले शेतकरी आपापल्या गाडीवरून तिकडे निघाले होते .इतक्यात माझे लक्ष मी ज्या दिशेने आलो त्या दिशेकडे गेले . काळ्याकभिन्न धुराचे प्रचंड लोट आकाशामध्ये उठलेले होते ! माझ्या डोळ्यासमोरचे सर्व दृश्य त्या धुराप्रमाणे धूसर होत गेले . काही मिनिटांपूर्वी घडलेला तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसू लागला . काड्या काटक्यांमध्ये आडवा तिडवा पडून तुटून फाटून काटेकुटे घुसलेला मी मैयाला पोट तिडकिने ओरडून सांगत होतो , "आग लाव तुझ्या लाकूड फाट्याला ! " आणि माझ्यासमोर ती आग , ते धुराचे लोट प्रत्यक्ष दिसत होते ! मला काय बोलावे तेच कळेना . दुसऱ्या दिवशी त्या आश्रमामध्ये सेवा देणारे पाटीदार नावाचे एक सेवक काका सर्व वृत्तांत घेऊन आले होते आणि तेव्हा त्यांनी सांगितले की काल लागलेल्या आगीमध्ये सुमारे तीन किलोमीटरचा परिसर जळून पूर्णपणे खाक झाला होता . तीन गावांमध्ये मिळून ही आग पसरली होती .पाटीदार काकांचे शेत इथेच आहे . त्यांची मोटर आणि पाईप मात्र आश्चर्यकारकरीत्या वाचला ! जगदीश बाघेल च्या शेताचे काय झाले असे मी विचारल्यावर त्यांनी सांगितले की त्याच्या शेतापर्यंत येऊन आग विझली . तो स्वतः आणि पाटीदार यांचे कुटुंबीय पिढ्यानपिढ्या परिक्रमावासींची सेवा करतात . डूब मध्ये सुद्धा बाघेलचे शेत आणि घर दरवेळी वाचते आणि बाकी सर्व गाव बुडून जाते असे पाटीदार काकांनी सांगितले ! पाटीदार काकांनी यावर्षी केळी लावली होती ती देखील वाचली . अगदी शेजारच्या शेतापर्यंत आग आली परंतु यांना काहीही नुकसान झाले नाही . मैया आपल्या लेकरांची किती काळजी करत असते तेच यातून कळाले .
अग्नितांडव झाले तो परिसर
काही दिवसांपूर्वीच ब्राह्मणसेरी गावामध्ये एका अंगणवाडी सेविकेने मला चहा पाजला होता तिच्या अंगणामध्ये घडलेली घटना मला आठवली .तिच्या अंगणात कोंबड्यांची पिल्ले खेळत होती .ती खेळता खेळता माझ्या अगदी जवळ आली . मी त्यातल्या एका पिल्लाला उचलण्याचा प्रयत्न केल्याबरोबर क्षणात कोंबडीने माझ्यावरती हल्ला केला होता ! अंगणवाडी सेविका कोंबडीवर धावून गेली . तेव्हा मी तिला म्हणालो होतो , "अरे कुछ मत करना उसको ! ये है माँ ! पिले पर संकट आया तो स्वयं हमला करती है ! " आता देखील तसेच काहीसे घडले होते . इकडे स्वयंपाक सिद्ध झाला आणि मला जेवायला बसवले . समोर मी माझे धुतलेले कपडे वाळत घातले होते . रक्ताचे डाग सहजासहजी जात नाहीत . त्यामुळे थोडेसे डाग दिसत होते . त्या संपूर्ण परिसराच्या आसमंतामध्ये धूर साठला होता . अग्निशमन दलाच्या गाड्या सतत येत जात होत्या . त्यांचे सायरन आसमंतात घुमत होते . सुरज सिंग ने केलेली अप्रतिम दाल भाटी खाताना ते डाग तो धूर आणि तो आवाज यांनी मला एका वेगळ्याच अवस्थेमध्ये नेले . नर्मदा मातेची आठवण होऊन माझ्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा सुरू झाल्या . त्या अवस्थेतच त्याच ठिकाणी व्हरांड्यामध्ये पंख्याखाली जमिनीवरच पाठ टेकली आणि डोळे मिटले . डोळ्यासमोर तो प्रसंग पुन्हा पुन्हा उभा राहत होता . असहाय अवस्थेमध्ये लटकलेला एक परिक्रमावासी ,ज्याची नर्मदा परिक्रमा करण्याची कणभरही योग्यता नाही ,त्याच्या केवळ एका आर्जवाखातर नर्मदा मातेने केलेले ते अग्नितांडव एकमेवाद्वितीय होते . एक आई म्हणून ती आपली किती काळजी घेते याचा हा धगधगीत पुरावा होता . इथून पुढे त्या मार्गाने जाणाऱ्या कुठल्याही परिक्रमा वाशीला एकही काडी कधीही टोचणार नाही .घुसणार नाही . खुपणार नाही . मिळेल सुंदर सपाट निर्धोक आणि अप्रतिम असा रेवाकाठ ! कुठल्या शब्दात तुझे उपकार मानू आई ? तुझे पांग फेडण्यासाठी काय काय करावे लागणार आहे माई ! अशी कशी गं तू ? आहेस तरी कोण तू ! जशी आहेस , जिथे आहेस ,जोवर आहेस तोवर प्रत्येक जन्म तुझ्याचसाठी हे वचन तुला देतो मैया ! नर्मदे हर ! हर हर नर्मदे !
संजयने मला हलवून उठवले तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते . आता पुढे जाता येणे शक्यच नव्हते . त्या तिघांनाही शनी अमावस्येच्या स्नानासाठी राजघाटावर जायचे होते . त्यांनी मला विनंती केली की तुम्ही जर आश्रम काही काळ सांभाळत असाल तर आम्ही आनंदाने स्नान करून येतो . मी होकार दिला आणि तिघेही गाडीवर निघून गेले . ओमप्रकाश सोनी हे पूज्यपाद श्रीमाली महाराजांचे शिष्य होते .त्यांचे स्वतःचे दोन ढाबे होते . ते नुकतेच चारधाम यात्रेला गेलेले होते .आश्रमाच्या मागे मोठी आमराई होती . शेती देखील केलेली होती . तो सर्व परिसर बघून आलो . गोमातांचे दर्शन घेतले . आणि पुढच्या खोलीमध्ये येऊन तिथे पडलेले रामपाल बाबा नावाच्या कोण्या बाबाचे करमणूक प्रधान पुस्तक चाळत बसलो .त्या पुस्तकामध्ये आचरटपणाने काहीही लिहिलेले होते . ज्या माणसाचा धर्माचा जरा देखील अभ्यास नाही त्याचा बुद्धिभेद करण्याची पुरेशी क्षमता असलेले हे पुस्तक होते . अशी पिवळी पुस्तके फार स्वस्तात किंवा फुकट वाटली जातात . प्रत्यक्षामध्ये आपला धर्म खिळखळा करण्याचे षडयंत्र चालवणाऱ्या लोकांचे हे कारस्थान असते .सर्वांना या निमित्ताने एक सांगावेसे वाटते . कुठलाही मनुष्य असू दे . त्याने कितीही बरोबर आणि योग्य गोष्टी तुम्हाला सांगू देत . परंतु जोपर्यंत तुम्हाला ती व्यक्ती त्या गोष्टींचे स्वतः आचरण करताना दिसत नाही किंवा तुम्हाला त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा स्वतःला अनुभव येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये . ९० टक्के बरोबर सांगायचे आणि त्यात दहा टक्के विष बेमालूमपणे मिसळून द्यायचे अशी या लोकांची "मोडस ऑपरेंडी " असते .त्यामुळे बरेचदा योग्य काय आणि अयोग्य काय याचा विवेक करण्याची क्षमता नसलेल्या व्यक्ती अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडतात . अगदी आपले नर्मदा मातेवरील जे लिखाण आहे ते देखील आपण सर्वांनी चिकित्सकपणे अवलोकावे . त्यातील जे प्रत्यक्ष अनुभवाला येईल तेच घ्यावे . असे केल्यामुळे आयुष्यामध्ये आपली फसवणूक होण्याची शक्यता कमी राहते . भारतीय समाज सरासरी पाहता अतिशय सहिष्णू आहे आणि भावनाप्रधान आहे त्याचा गैरफायदा घेऊन अनेक लोक स्वतःला गुरु सद्गुरु बाबा बुवा बापू स्वामी महाराज आचार्य म्हणून जाहीर करताना दिसतात . आपण स्वतःच्या अनुभवाला श्रेष्ठ गुरु मानून मगच त्यांच्या सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे हे नेहमीच श्रेयस्कर असते . किमान त्यात नुकसान तरी काही नाही . मी माझ्या या छोट्याशा आयुष्यामध्ये अशी अनेक उदाहरणे पाहिलेले आहेत की जिथे मोठमोठे विद्वान सुशिक्षित पंडित महापंडित साधक अशा दीड दमडीच्या फालतू व खोटारड्या लोकांना गुरु मानून आयुष्यामध्ये फसलेले आहेत आणि स्वतःच्या अध्यात्मिक परमार्थिक संसारीक आणि आर्थिक आयुष्याची पुरती वाताहात त्यांनी करून घेतलेली आहे ! ते पुस्तक फाडून फेकून द्यावे असे मला वाटत होते इतकी बुद्धीभेद करणारी विधाने त्यात होती . परंतु मला मोहन साधूने सांगितलेले सूत्र आठवले आणि मी नाद सोडून दिला . इतक्यात तिथे पाटीदार काका आले .हे कायम सायकल चालवायचे .आता देखील सायकल वरूनच आले होते .सायकल वर जाणाऱ्या या गरीब दिसणाऱ्या माणसाकडे पाहून कोणाला कल्पना देखील येणार नाही की यांच्या पूर्वजांनी आणि यांनी किती कोटी रुपयांचा दानधर्म केलेला आहे ! परिक्रमावासी यांची सेवा हेच त्यांना परंपरेमध्ये मिळालेले धन होते ! ते त्यांनी कैक पटीने वाढवले . त्यांचे बंधू मदनलाल पाटीदार हे देखील सध्या परिक्रमेमध्ये होते . आश्रमातील तुळस व अन्य मंदिरे येथे पाटीदार काकांची पूजा अर्चा सुरू झाली . मंदिरापाशी ठेवलेल्या एका घोड्यावर किंवा शिडीवर चढून त्यांना बेल काढताना पाहून मला आश्चर्य वाटले ! या वयातील शहरातील माणसे देहाला फार जपतात . परंतु पाटीदार काकांना भक्ती पुढे सर्व गौण होते .
गेहलगावात असलेला हा आश्रम फारच अप्रतिम आहे
दुपारी याच व्हरांड्यामध्ये पंख्याखाली झोपल्यावर मला झोप लागली होती .
उजव्या हाताला परिक्रमावासीं साठी अप्रतिम खोली बांधण्यात आलेली आहे
मधोमध उभे आहेत (पांढरा पायजमा पांढरा सदरा ) ते पाटीदार काका आहेत
हे चित्र पाहिल्यावर शिवमंदिर आश्रम आणि व्हरांडा यांच्या जागा लक्षात येतील . मागच्या बाजूला आंब्याची बाग आहे .
परिक्रमावासींना बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे
आतून तुम्हाला कल्पना देखील येणार नाही की वरती पत्रा लावलेला आहे . मी गेलो तेव्हा ही वापरायला अजून सुरुवात केलेली नव्हती
आश्रमामध्ये विद्युत रोषणाई छान केलेली आहे
थोड्या वेळाने दोन परिक्रमावासी तिथे आले .एक राजेश राणे म्हणून धार मध्येच राहणारा हिंदी बोलणारा मराठा परिक्रमावासी होता आणि एक मध्य प्रदेशातील अन्य गावातील परिक्रमावासी होते . धार ही पवार राजवंशाची गादी राहिलेली आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात मराठा अर्थात महाराष्ट्रीय लोकांची वस्ती राहिलेली आहे .महाराष्ट्रा बाहेर कुठल्याही जाती धर्माच्या मराठी माणसाला मराठा असेच म्हटले जाते हे मी स्वतः अनुभवलेले आहे . त्यात राणे तर जातिवंत ९६ कुळी मराठा होता .तो अत्यंत सात्विक स्वभावाचा होता आणि अध्यात्म सोडून एक शब्दही बोलत नसे . त्याच्या आगमनामुळे मला खूप चांगला सत्संग घडला ! राणे हा खरा साधू म्हणण्याच्या योग्यतेचा होता . राणे सोबत असलेल्या बाबांची झोळी फाटली होती . रात्री राजेशने सेवादारांकडून एक पोते मागून घेतले . खताचे पोते होते ते . मला मदतीला घेऊन त्याने त्या पोत्यापासून अतिशय सुंदर अशी पाठ पिशवी अर्थात सॅक बनविली !बघता बघता त्याने पोत्यापासून तयार केलेली ती कलाकृती पाहून मला आश्चर्य वाटले ! बरे ही पिशवी इतकी मजबूत होती की त्यात दगड भरले तरी ती तुटली नसती ! हे काम करताना मला खूपच मजा आली ! मी माझ्या अल्प बुद्धीनुसार त्या पिशवीच्या रचनेमध्ये काही मजेशीर बदल करून ही अधिक उपयुक्त होईल असा प्रयत्न केला . युजेबिलिटी नावाचे एक शास्त्र आहे . कुठल्याही गोष्टीची उपयुक्तता कशी वाढवता येईल याचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो . अगदी सॉफ्टवेअर व्यवसायापासून ते किरकोळ व्यवसायापर्यंत याची व्याप्ती पसरलेली आहे . ज्या आस्थापना "वापरण्याची सोय " किंवा यूजर एक्सपिरीयन्स , उपयुक्तता या विषयावर अधिक काम करतात त्यांची उत्पादने यशस्वी होतात .उदाहरणार्थ ॲपल कंपनीची उत्पादने . तेच गणित डोक्यात ठेवून त्या झोळी मध्ये थोडेफार बदल केले इतकेच .असो . या आश्रमातील भोजन देखील लक्षात राहिले ! इतके अप्रतिम भोजन बनवले जायचे की विचारता सोय नाही .सुरज सिंग अतिशय प्रेमाने सर्व करायचे . ओम प्रकाश सोनी यांच्याशी सुरज सिंगच्या फोनवरून बोललो आणि त्यांचे हा अप्रतिम आश्रम उभा केल्याबद्दल मनापासून आभार मानले . एखादा मनुष्य जेव्हा पोटतिडकीने एखादी गोष्ट करत असतो तेव्हा केवळ एका ओळीची कौतुकाची थाप सुद्धा त्याला शंभर हत्तींचे बळ देत असे हे नेहमी लक्षात ठेवावे . त्याच्या अगदी उलट केवळ एक देखील नकारात्मक प्रतिक्रिया त्याला हतोत्साहित करत असते . वचने किं दरिद्रता ? असो . सकाळी सर्व आटोपून पुढे निघालो . पुन्हा एकदा नर्मदा मातेच्या काठाकडे वाटचाल केली . चिखलदा गाव गाठले . माझा असा समज होता की टेंबे स्वामींनी इथे चातुर्मास केलेले आहेत म्हणजे एखादे फार मोठे स्थान असेल . परंतु प्रत्यक्षामध्ये हे एक जलमग्न झाल्यामुळे बाजार उठलेले गाव होते . जिकडे बघावे तिकडे जलमग्न झाल्यामुळे भग्न झालेली घरे होती . सध्या पाणी उतरलेले असल्यामुळे या घरांच्या आत मध्ये जाऊन परिस्थिती पाहता येत होती .फारच उद्विग्न करणारे दृश्य होते .टेंबे स्वामींनी जिथे चातुर्मास केला होता तो आश्रम आता शिल्लक राहिलेला नसून तिथे असलेली महादेवांची मंदिरे मात्र दगडात बांधकाम केलेली असल्यामुळे थोडीफार शिल्लक राहिलेली आहेत . माझ्या मागोमाग राणे आणि दुसरे परिक्रमावासी देखील आले त्यामुळे आम्ही तिघांनी जाऊन तिथे दर्शन घेतले . काही काळ तिथे शांतपणे बसलो . निळकंठेश्वर आणि हरिहरेश्वर अशी मंदिरे येथे सुस्थितीमध्ये होती .अशी कल्पना केली की परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांचा चातुर्मास सुरू आहे आणि ते आजूबाजूला वावरत आहेत तर त्या भागातील वातावरण कसे असेल याची कल्पना करून पाहिली .
हरिहरेश्वर मंदीर चिखलदा |
या मंदिराचा रंग प्रतिवर्षी दिला जातो कारण प्रतिवर्षी ही मंदिरे पूर्णतः जलमग्न होतात |
हे आहे श्री नीलकंठेश्वर महादेवाचे मंदिर |
चिखलद्याचा जुना पूल . इथेच समोर राजघाट आहे |
पुन्हा अशा पद्धतीच्या बोटी दिसायला सुरुवात झाली |
प्रत्येक वर्षी जलमग्न झाल्यावर मंदिरांचा पाया खचत चालला असून ही मंदिरे लवकरच धोक्यामध्ये येणार आहेत |
मंदिर पुरातन असून इथे अत्यंत सुंदर अशी शिवपार्वतीची मूर्ती पाहायला मिळते . कितीही काळ पाण्याखाली राहिले तरी देखील भारतीय स्थापत्य शास्त्रानुसार बांधलेले मंदिर जरा सुद्धा बाधित होत नाही आणि शिल्पकला देखील अक्षुण्ण राहते हेच त्याचे मोठेपण सिद्ध करते !
पाण्याखाली बुडून देखील मंदिराची रचना जरा देखील हललेली नाही याहून आपल्या स्थापत्य कलेच्या उत्तमतेचा काय पुरावा द्यावा ?
परमपूज्य थोरले स्वामी महाराज यांनी एकूण तेवीस चातुर्मास केले . त्यातील शालिवाहन शके १८२२ चा दहावा चतुर्मास आणि शालिवाहन शके १८३४ चा २२ वा चातुर्मास स्वामीजींनी चिखलदा येथे केला . पुढच्याच वर्षी गरुडेश्वर येथे चातुर्मास करून नंतर स्वामींनी आपले अवतार कार्य आटोपले . इतके या स्थानाचे महात्म्य आहे . स्वामींचा चिखलद्याला चातुर्मास सुरू असताना एकदा एका भक्ताने त्यांना विचारले होते की आमच्या हृदयामध्ये भक्ती जागृत का होत नाही ? इष्ट देवतेचे नाव घेतल्याबरोबर आमच्या डोळ्यातून प्रेमाश्रू का वाहत नाहीत ? तसे व्हावे यासाठी काही उपाय सांगावा . तेव्हा थोरले स्वामी महाराज म्हणाले होते की ज्ञानेश्वरी ,दासबोध , तुकाराम गाथा , एकनाथी भागवत , आणि भक्ती विजय यातील कुठलातरी एक ग्रंथ निवडून त्याचे नित्य क्रमशः वाचन करत गेले तर अंत:करणामध्ये परमेश्वराविषयी भक्ती प्रेम उत्पन्न होईल . हे ग्रंथ नसून साक्षात परमेश्वराची प्रकटस्वरूपे आहेत ! टेंबे स्वामींच्या चरित्रामध्ये वाचलेले असे अनेक प्रसंग तिथे बसल्या बसल्या मला आठवू लागले . तिथे मी शांतपणे बसलेला एकूणच काळ मोठ्या आनंदात गेला . टेंबे स्वामी महाराजांचे शरीर त्यांच्या इच्छेनुसार गरुडेश्वरी नारादेश्वरासमोरील नर्मदा मातेच्या डोहामध्ये अर्पण करण्यात आलेले होते . त्यामुळे हा संपूर्ण परिसर त्यांच्या अस्तित्वाने प्रभारित झालेला असा निश्चितपणे होता . टेंबे स्वामी महाराज चातुर्मास करताना इथे असलेल्या राम मंदिरात आणि हनुमानमंदिरात देखील राहिलेले होते . हा एक रामदासी मठच असावा असा माझा अंदाज आहे . इथेही दर्शन घेतले . मारुतीरायाचे दर्शन घेतले .
चिखलद्याचे प्रभु रामचंद्र ! दर वर्षी जलमग्न होऊन देखील या मूर्ती किती सुंदर आहे पहा !
इथे टेंबे स्वामींच्या हस्ताक्षरातील घोरकष्टोद्धरण स्तोत्र लावलेले आहे
श्री तारकेश्वर मारुती नंदन चिखलदा
राणे सोबत येण्यासाठी विचारत होते परंतु मी ज्यांना काठाकाठाने आणि एकट्याने चालण्याचा संकल्प आहे असे सांगितले आणि आपापल्या मार्गाने पुढे जाण्याची विनंती केली . किनाऱ्याला अगदी समांतर असा इथे एक रस्ता होता . परंतु मला थेट काठावरूनच चालायचे असल्यामुळे मी खाली उतरलो आणि मला चिखलदा या गावाच्या नावाचा खरा अर्थ कळला ! जिकडे पाहावे तिकडे प्रचंड चिखल माजलेला होता ! चिखल देणारी अशा अर्थाने नर्मदा माई या गावासाठी चिखलदा ठरलेली आहे ! एक किलोमीटर पर्यंत अखंड चिखल लागला . सुरुवातीला थोडासा त्रास झाला परंतु नंतर मी विचार केला की काल असलेल्या काट्याकुट्यांपेक्षा चिखल हा कितीतरी पटीने बरा आहे ! चालता चालताच मी अशी कल्पना करून पाहिली की समजा काल ती आग मी चालत असताना लागली असती तर मी काय केले असते ! अक्षरशः मी काहीही करू शकलो नसतो ! ती आग इतकी भयंकर होती की संपूर्ण तीन किलोमीटरचा परिसर तिने भस्मासात केलेला होता ! मी जरी नर्मदा मातेमध्ये उडी मारली असती तरी माझा शेवट निश्चित होता कारण या भागामध्ये नर्मदा मातेतील शेवटच्या दोन मोठ्या मगरी आहेत असे नाविकांनी मला सांगितले होते . छोट्या मगरी जरी माणसाच्या नादाला लागत नसल्या तरी मोठी मगर मात्र आहार म्हणून मनुष्य प्राण्याचा विचार करू शकते . चिखलदा गावातून नुकतेच एका माणसाला मगरींनी उचललेले होते . मोठ्याच कठीण प्रसंगातून मैयाने मला वाचवले होते आणि आगीची कुणकुण तिच्या सर्व भक्तांना आधीच लावून दिली होती ! हे अग्नी तांडव इतके मोठे होते की निश्चितपणे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये दुसऱ्या दिवशी त्याच्याबद्दल छापून आलेले असणार आहे . शोधायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे सापडेल .तो दिवस होता १ मे २०२२ . महाराष्ट्र दिन . इथून पुढचा किनारा मात्र अतिशय अप्रतिम होता ! सर्वत्र हिरवळ होती . पाणीही अतिशय स्वच्छ व शुद्ध होते !कितीही प्या ! गाळ नाही ! चिखल नाही ! जिथे जिथे नर्मदा मातेच्या पाण्याची पातळी उतरते तिथे ती खाली साठलेल्या गाळमातीपर्यंत पोहोचते . आणि मग तिचे पाणी पिताना काठावर पाय ठेवल्याबरोबर पायाखालचा गाळ उधळतो आणि पाणी पिता येत नाही . परंतु जिथे जिथे पाण्यामध्ये बुडलेले गवत आहे तिथे मात्र ही समस्या येत नाही . त्यामुळे कमण्डलू भरताना मी नेहमी पाण्यामध्ये बुडलेले गवत असलेला भाग शोधायचो किंवा खडक पाण्यामध्ये बुडला आहे असा भाग शोधायचो . त्यामुळे गाळविरहित शुद्ध पाणी पिण्यास मिळायचे .कसरावदचा पूल पण ओलांडला . मध्ये खूप पुरातन मंदिरे दिसत होती . सर्वांचीच दर्शने घेत घेत पुढे निघालो . समोरच्या बाजूला माझी लाडकी अर्थात मला आवडलेली तीन छोटी शिवमंदिरे दिसत होती . छोटी कसरावद या गावामध्ये असलेल्या या मंदिरांबद्दल पूर्वी लिहिलेले आहे .पायातले बूट फाटून संपल्यामुळे खालून मैयाचा सुखद गारवा सुखावत होता . मोजे जाड चिखलाने भरून जात . त्याने पाय फुटत पण गारवा ही टिकून राही .कसरावदच्या पुजाऱ्याने पुढचा सर्व मार्ग सांगितला . पुजारी स्नान आटोपून नुकतेच बाहेर आले होते आणि मी त्यांना सामोरा गेलो . नर्मदा मातेच्या काठावर कोणी परिक्रमा वासी दिसला तर लोक अनेक प्रकारे आपला आदरभाव व्यक्त करतात . कोणी नुसता हात जोडून नमस्कार करते . कोणी हात उंचावून नर्मदे हर चा पुकारे करते . कोणी खाली वाकून नमस्कार करते . कोणी दंडवत प्रणाम करते . कोणी पायावर डोके ठेवून नमस्कार करते . तर कोणी प्रेमाने अलिंगन देते ! समोरची व्यक्ती जसा आदरभाव व्यक्त करेल तसेच प्रत्युत्तर आपण द्यावे . सध्या अजून एक नवीन प्रकार आलेला आहे ! तो म्हणजे "बाबाजी एक फोटो ! " किंवा "बाबाजी एक सेल्फी लेते है ।" त्यावर मात्र माझ्याकडे कुठला उपाय नव्हता ! कारण आपल्याकडे फोनच नव्हता ! परंतु आज या लिखाणाला शोभा देण्याचे कार्य ही चित्रे वेळोवेळी करत आहेत हे मात्र नक्की .असो . आले नर्मदेच्या मना । तेथे कोणाचे चालेना !
पुजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे मलवाडा पार करून बोधवाड्याला आलो . नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर मासे धरण्याच्या विविध पद्धती पाहायला मिळतात . या भागातले कोळी लोक मासे पकडण्यासाठी जाळे न वापरता गळाला कणिक लावून लांब वर फेकतात आणि दगडाला दोरी गुंडाळून ती ठेवून देतात व काठावरती निवांत वाट बघत बसतात . ते गळ इतका दूर फिरतात की कल्पना देखील करता येणार नाही ! क्रिकेट खेळणारे खेळाडू देखील जितक्या दूरवर चेंडू फेकू शकत नाहीत तितक्या दूरवर यांचा गळ जातो .कारण हे गोफणी प्रमाणे गळ गोल फिरवून मग फेकतात ! हे पाहायला खूप मजा येते ! परंतु तितकेच धोकादायक देखील आहे ! काठाकाठाने चालताना समोर कोळी दादा उभा आहे त्याला काहीतरी विचारावे म्हणून मी जात असताना झूप असा आवाज करून माझ्यासमोरून काहीतरी गेले ! तर तो हा बाबाजी फिरवत असलेला गळ होता ! तो इतक्या लांब येतो याची मला कल्पनाच नव्हती ! मुळात तो असा गळ फिरवून फेकत आहे हेच मला कळत नव्हते . पुढे मला याची सवय झाली . काही लोक बाटलीला गुंडाळून गळाची दोरी ठेवून देतात . मलवाडा गावानंतर आलेल्या बोधवाडा गावांमध्ये श्रीयंत्रावर स्थापित केलेले देवपथ लिंगाचे किंवा देवप्रतिलिंगाचे अति प्राचीन मंदिर आहे . इथे तोताराम यादव नामक सेवेकरी राहत व एक मौनी बाबा गेली तीन वर्षे राहिलेले होते . इथे यादव बाबा ने भोजन प्रसाद आग्रह करून करून वाढला . एकटा परिक्रमावासी असेल आणि थोडेसेच अन्न शिल्लक असेल तर घरी ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला सगळे अन्न संपवण्याचा मक्ता दिलेला असतो तसे काहीसे होते ! सगळे संपवून टाकण्याचा आग्रह केला जातो ! बरं अन्न हे पूर्णब्रह्म आहे ! त्यामुळे त्याला नकार देखील दिला जात नाही .त्यामुळे बरेचदा अती खाणे होते . अर्थात त्यादिवशी अति चालून ते जिरवता येते . ही सुविधा परिक्रमे मध्ये सहज उपलब्ध आहे . घरी सहजलब्ध नाही ! असो . जेवण फार झाल्यामुळे थोडेसे आडवे पडावे असे वाटू लागले . आणि त्या आश्रमाच्या एका कोपऱ्यात जाऊन पडलो .
बोधवाड्याचे हे मंदिर पुरातत्व विभागाने संरक्षित केलेले आहे
मंदिर नर्मदा मातेच्या अगदी काठावर असून हे पुरातन असल्याच्या अनेक खाणाखुणा तुम्हाला इतस्ततः दिसतात
मी ज्या प्रकारच्या काड्या काटक्यांमध्ये अडकलो होतो तशाच काड्या काटक्या याही काठावर साठलेल्या दिसत आहेत .
हे आहे देव पथ शिवलिंग किंवा देवप्रती शिवलिंग
मंदिराच्या मागच्या बाजूला एक फार सुंदर मूर्ती आहे . मूर्ती अभ्यासकांसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही मूर्ती आहे
मंदिरातील मूळ नंदी चे मुंडके मूर्तीभंजकांनी तोडलेले असल्यामुळे आहे त्याच्यातच डोक्याचा आकार तयार करण्यात आला आहे |
मंदिराच्या मागे एक शिवलिंग देखील आहे . मूर्ती आपण मगाशी पाहिलीच . श्रीयंत्रावर तिची अशी रचना करण्यात आलेली आहे
हे खाली दिसणारे आकार म्हणजे श्रीयंत्र आहे !
मंदिर परिसरामध्ये सध्या भरपूर पाणी भरत असल्यामुळे अतिशय मोठे आणि पुरातन वृक्ष वठलेले इथे आपल्याला पाहायला मिळतात .
पाण्याची उतरलेली पातळी अशी असते .
पाणी भरल्यावर मंदिरातून दिसणारे दृश्य असे असते .
इथेच असलेले हनुमान दादा . त्यांची सजावट फार मजेशीर करतात !
अक्षांश रेखांश सांगणारे चित्र . बोधवाडा मलवाडा गावांचा हा परिसर आहे
हे सर्व पाण्याखाली जाते .
शिवलिंग अतिशय मोठे आणि सुंदर आहे .
असे पाणी भरलेले असताना देखील लोक येऊन पूजा करतात .
मंदिरात याच ठिकाणी बसून मी काही काळ शिवस्तुती म्हटली होती .
समोर दिसणारी महादेवाची भव्य पिंड हे एक अविस्मरणीय दृश्य होते !
या चित्रामध्ये श्रीयंत्राचा संपूर्ण आकार दिसतो आहे . शेजारी तोताराम यादव सेवादार उभे आहेत .मागे नर्मदा मैया दिसते आहे .
श्री देव पथ मंदिर आणि त्याचा पत्र्याचा सभा मंडप
ओम नमः शिवाय !
परंतु त्या दिवशी इतके भयंकर वारे सुटले की विचारू नका ! आश्रमातील प्रत्येक वस्तू उडून जाऊ लागली . शेवटी जेवण झाल्यामुळे मी सगळी भांडी घासून ठेवली होती . त्यातली जडच्या जड पातेली देखील वाऱ्याने उडून जाऊ लागली ! असले भयंकर वारे मी पहिल्यांदाच बघत होतो ! मी ज्या चटईवर झोपलो होतो . ती चटई माझ्यासकट उडून जायचा प्रयत्न करत होती ! यावरून तुम्ही वाऱ्याची गती किती होती याचा विचार करावा ! त्यामुळे नर्मदा मातेची आपण इथे झोपण्याची इच्छा नाही असे वाटून मी तिथून निघालो . आणि गंमत म्हणजे मी चालायला सुरुवात केल्यावर वारे आपोआप कमी झाले . भर उन्हामध्ये मी चालू लागलो . वैशाख महिन्यामध्ये साधारण याच कालावधीमध्ये असे वारे भारतामध्ये चालतात . त्याच्यामुळे अवकाळी पाऊस देखील पडतो . पुन्हा एकदा नर्मदा मातेच्या काठाकाठाने चालत गांगलोद सातमात्रा माई ओलांडून बगाड नदी पार करून अक्कलवाड्याला वागू नदी पार करून सेमरदा पेरखड ला काकडीया नदी पार करून शरीफपुरा पार करून थेट बडा वर्धा (बडदा ) गाठला ! माझ्या वहीमध्ये साधारण अशी वाक्यं लिहिलेली आहेत ! परंतु त्यातला एक एक नाव आठवलं की त्या मागचे सगळे प्रसंग आठवू लागतात ! स्वतःचा फोन क्रमांक देखील पाठ होऊ न शकणारा मी नालायक मनुष्य आहे . त्याला हे सर्व प्रसंग जसे घडले तसे आठवत आहेत ही नर्मदा मातेची कृपाच मानली पाहिजे ! आयुष्यात जी गोष्ट तुम्ही फार गांभीर्याने करता , एक चित्ताने करता , एकाग्रतेने करतात , एकतानतेने करता आणि मुख्य म्हणजे एकट्यानेच करता ती तुम्हाला कायम संस्मरणीय ठरते !
नर्मदे हर !
लेखांक एकशे चौतीस समाप्त (क्रमशः )
डोळ्यातून अश्रू आणि तोंडातून नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर ... 🙏
उत्तर द्याहटवाआई नर्मदे हर बाबाजी 🙏
नर्मदे हर 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाNarmade Har ! Narmade Har! Narmade Har !
उत्तर द्याहटवानर्मदे हर त्रिवार साष्टांग नमस्कार
उत्तर द्याहटवाnarmde har ! ekek anubhav angavar kata ananare ahet. goosebumps mhanto tase.
उत्तर द्याहटवा