लेखांक १३५ : सेमरद्याचे रेवामंदिर , बडा बडद्याचा जलेश्वर व अक्षय आंबेडकर
बोधवाड्याचे देवपथ लिंग पाहून पुढे निघाल्यावर काठाने जाणारा मार्ग मोठा मजेशीर होता . या भागामध्ये नर्मदा मातेच्या काठावरील गाळ मातीमध्ये चुना मिसळून चित्रविचित्र आकाराच्या कडक मूर्ती तयार होतात ! या मूर्तींमध्ये इतके चित्र विचित्र आकार असतात की एखादा तरी आकार कुठल्यातरी देवतेच्या जवळपास जाणारा सापडतोच ! त्यामुळे अगदी चार हात वगैरे असलेल्या देवाच्या मूर्ती देखील सापडतात ! मला इथे असे अनेक सुंदर आकार सापडले परंतु त्यांचं वजन आणि ठिसूळपणा यामुळे मी एकही दगड सोबत घेतला नाही ! तसेही निसर्गामध्ये भ्रमण करताना शक्यतो तिथल्या कुठल्या गोष्टी घरी उचलून आणू नयेत असे सर्वसाधारण गृहीतक आहे .या चित्र विचित्र आकाराच्या मूर्ती मैया चा प्रवाह वाढल्यावर पुढे वाहत जातात आणि त्यामुळे इथून पुढच्या बऱ्याच घाटांवर असे दगड सापडतात .
इथे बगाड नावाची नदी मी अतिशय सहज पार केली .
गांगलोद किंवा गांगली या गावामध्ये नंदिकेश्वर महादेवाचे तीर्थ आहे त्याचे देखील दर्शन घेतले . इथे गंगामाता नर्मदा मातेला येऊन मिळते अशी मान्यता आहे . या संपूर्ण टापू मध्ये अनेक छोट्या मोठ्या नद्या नर्मदा मातेला येऊन मिळत होत्या . गांगलोद गावामध्ये मी सात मात्रा नावाची नदी पार केली . ही नदी फार सुंदर होती .
पुढे अक्कलबाडा नावाचे गाव लागते त्याच्या काठाने चालताना वाटेमध्ये असलेल्या गंगाकुंडाचे दर्शन घेतले . इथे वागू नावाची नदी आडवी आली होती . तिचे देखील तीर्थ प्राशन करून पार केली . या गावांमध्ये एक रामाचे मंदिर आहे तसेच गावाबाहेर देखील अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत . अक्कलवाडा याच गावाची अनेक नावे आहेत . कुणी याला अक्कलबारा म्हणते , तर कोणी एकलबारा . कुणी अकलबाडा तर कोणी अक्कल वाडा ! काठावर वाघनाथ महादेव आणि जगन्नाथ महादेवाची मंदिर आहेत . यालाच काही लोक वाघेश्वर आणि जागेश्वर देखील म्हणतात . शिवलिंगावर असलेल्या वाघासारख्या पट्ट्यांमुळे वाघनाथ नाव पडले असावे .
काठाने चालत जाताना समोर पायवाटेकडे आपले लक्ष असतेच . इथे मला दोन व्यक्तींची पद चिन्हे जागोजागी दिसू लागली . एक व्यक्ती बूट घालून चालत होती . तर दुसरी व्यक्ती अनवाणी होती . बराच काळ मी या पावलांचा वेध घेत चालत होतो . नर्मदा मैयाने एक मोठे वळण घेतले . त्या वळणासोबत मी देखील वळलो . इथे एके ठिकाणी ती दोन्ही पावले अचानक गायब झाली ! मला आश्चर्य वाटले ! म्हणून मी असे ठरवले की ही दोन माणसे कुठे गेली ते शोधूयात ! डावीकडे घनदाट झाडी होती . मी त्या झाडीमध्ये शिरलो ! आणि अचानक समोर बसलेल्या दोन तरुणांकडे माझे लक्ष गेले ! माझे असे त्या झाडीमध्ये अचानकपणे येणे त्या दोघांसाठी अनपेक्षित ठरले असावे असे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला वाटले ! "आओ बाबाजी बैठो ! "असे म्हणत एकाने थोडासा पालापाचोळा बाजूला गेला . दोघे शेंगदाणे खात बसले होते . मला देखील मुठभर शेंगदाणे त्यांनी दिले . त्यांच्या हिंदीवरून मी ओळखले की ही मराठी मुले आहेत ! दोघेही तरुण होते ! अतिशय तरुण ! २५ ३० च्या आसपास वय असलेले ! यातील एक काळा सावळा तरुण होता त्यांचे नाव होते ओंकार कुलकर्णी गुरुजी . हे चिंचवड मध्ये राहत आणि अंत्येष्टीची पूजा सांगायचे .यांची दाढी चांगली वाढली होती . दुसरा तरुण अतिशय गोरापान आणि राजबिंडा होता . या तेजस्वी तरुणाचे नाव होते अक्षय आंबेडकर . पुण्यामध्ये गुलटेकडीला राहायचा . पुण्याचे प्रसिद्ध सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांचा हा शिष्य होता . हा एक मोठाच आवडीचा विषय आमच्या दोघांमध्ये सामायिक निघाला ! मी स्वतः उस्मान खाँ यांचे अनेक कार्यक्रम ऐकलेले आहेत .मला शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ऐकताना पहिल्या रांगेत बसून ऐकायची सवय आहे . त्यामुळे कलाकार आणि तुम्ही याच्यामध्ये कोणी अडथळा शिल्लक राहत नाही . तसेच बसल्या बसल्या कलाकारांचे चित्र काढून त्यावर त्यांची स्वाक्षरी घ्यायची सवय मला महाविद्यालयामध्ये असताना होती . अशा अनेक स्वाक्षऱ्यांची एक वहीच माझ्याकडे आहे . त्यामध्ये उस्मान खाँ यांची देखील स्वाक्षरी मी घेतलेली होती ! शुजात हुसेन खान , पंडित रविशंकर , विलायत खान या सतार वादकांच्या देखील त्यांच्याच चित्रावरील स्वाक्षरी मी प्रत्यक्ष कार्यक्रम ऐकून घेतलेल्या आहेत ! अगदी माझ्या घरी देखील एक सतार आजही आहे ! तो सर्व विषय त्या अनुषंगाने आपोआपच निघाला !
ओंकार कुलकर्णी गुरुजींना या विषयात फारसा रस नव्हता . परंतु दोघांमध्ये काही गोष्टी सामायिक होत्या ! एक म्हणजे मराठी भाषा ! दुसरे म्हणजे त्रिकाळ संध्या . आणि तिसरे म्हणजे बीडी किंवा सिगरेट ! आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नर्मदा मातेचा काठ सोडायचा नाही असा अप्रतिम संकल्प ! त्यावर हे दोघे एकत्रपणे चालत होते ! " तू आम्हाला एवढ्या झाडीमध्ये कसे काय शोधून काढलेस ?" मला ओंकार गुरुजींनी विचारले .मी त्यांना सांगितले की गेले अनेक दिवस मी काठाकाठाने चालत आहे . परंतु मी कोणाचे अनवाणी पाय काठाने जाताना अजून पाहिलेले नव्हते . ते दिसले म्हणून मला आश्चर्य मिश्रित कुतूहल होते की नक्की कोण आहे त्याचे दर्शन घ्यावे ! आणि तुमचे पाय अचानक थांबल्यामुळे मी असा अंदाज लावला की तुम्ही इथेच झाडीत कुठेतरी बसलेले असणार . आणि तसेच झाले ! दोघे तिथे अजून काही काळ बसणार होते . मी दोघांची रजा घेतली आणि पुढे निघालो . या दोघांची अतिशय सुखात परिक्रमा चालू होती . सकाळी लवकर ते भरपूर अंतर चालून घ्यायचे . आणि एकदा का पायाखालची माती वाळू तापू लागली की एखाद्या झाडाखाली थांबून घ्यायचे .
बर्मान घाटाच्या गुगल नकाशावर या दोघांची सापडलेली नंतरची भरपूर केस वाढलेली छायाचित्रे
शास्त्रीय संगीताचा ज्ञाता आणि सतार वादक अक्षय आंबेडकर पुणे
शास्त्रीय संगीताचा ज्ञाता आणि सतार वादक अक्षय आंबेडकर पुणे
हा जो अक्षय आंबेडकर नावाचा युवक होता त्याला पाहून मला राहून राहून मंदार बुवा रामदासी यांची आठवण येऊ लागली .अगदी हुबेहूब त्यांच्यासारखा दिसायचा ! हसायची पद्धत देखील तशीच ! आणि मुख्य म्हणजे याने देखील माझ्यासारखी छाटी घातलेली होती ! परिक्रमेमध्ये छाटी घातलेला माझ्या नंतर भेटलेला हा पहिलाच मनुष्य ! मंदार बुवा रामदासी यांनी देखील परिक्रमा केलेली होती . परिक्रमे मध्ये मंदार बुवांना भेटावे अशी माझी खूप इच्छा होती . ती या अक्षय आंबेडकर च्या रूपाने पूर्ण होते आहे किंवा असे मला वाटले ! कारण त्याचे चालणे बोलणे हसणे पाहून अक्षरशः मंदार बुवा रामदासीच समोर बसले आहेत असा भास मला सारखा व्हायचा . मी दोघांना तसे सांगितल्यावर ओंकार गुरुजींनी त्यांच्या मोबाईलवर मंदार बुवांचे फोटो तपासले आणि या गोष्टीवर आमची सहमती झाली !
धूम्रपान हा प्रकार माझ्या नाकात कमी आणि डोक्यात जास्त जात असल्यामुळे मी तिथून पुढे निघालो . दोघांचे अखंड धूम्रपान सुरू होते . जाता जाता मी विनाकारणच धूम्रपानाचे दुष्परिणाम या विषयावर छोटेसे भाषण ठोकून पुढे निघालो . विनाकारण म्हणायचे कारण असे की जो स्वेच्छेने धूम्रपान करतो त्याला तुम्ही कितीही सांगा काही फरक पडत नाही . त्याला आतूनच धुम्रपान करायची इच्छा झाली नाही तो खरा दिवस ! तोपर्यंत ब्रह्मदेव येऊन जरी यांना धूम्रपानाचे तोटे सांगू लागला तरी ही प्रजाती त्याला , " लाइटर आहे का रे भाऊ ? " असे विचारणार असला सगळा प्रकार असतो ! अक्षयला थोडासा खोकला येतो आहे असे पाहून मी धूम्रपानापासून त्याला परावृत्त करायचा प्रयत्न केला . परंतु ज्याला धूम्रपान करायचे असते तो ते करण्यासाठी हजार कारणे तुम्हाला सांगू शकतो . त्यामुळे असे सांगण्याचा फारसा उपयोग होत नाही . असो .
पुढे चालताना मला सेमरदा नावाचे गाव लागले . इथे षण्मुखानंद स्वामी नावाच्या तमिळ साधूंनी स्थापन केलेले नर्मदा मातेचे सुंदर मंदिर होते . तमिळ भाषेमध्ये क ख ग घ या सगळ्यासाठी एकच अक्षर असल्यामुळे यांच्या नावाचा उच्चार षण्मुगानंद स्वामी असा केला जातसे . स्वामींनी इथे चातुर्मास केला होता . त्यांनाही स्थान आवडल्यामुळे त्यांनी त्याचे रूपांतर एका आश्रमात केले . तीस लाख रुपये खर्च करून त्यांनी नर्मदा मातेचे अप्रतिम मंदिर येथे उभे केले आहे . हे मंदिर म्हणजे दाक्षिणात्य मंदिर स्थापत्य शैली आणि उत्तर भारतीय शैली यांचा सुंदर मिलाफ आहे . मी आश्रमामध्ये गेलो तेव्हा इथे दोन परिक्रमा वासी उतरलेले होते . गावाच्या बाहेर नर्मदा मातेच्या काठावर आश्रम आहे . जवळच एक छोटेसे दुकान आहे . दुकानदार दुकानाच्या मागच्या बाजूलाच राहतात . त्यांनी सांगितल्यामुळे मी आश्रमात आलो . आत प्रवेश केल्याबरोबर उजव्या हाताला नर्मदा मंदिर आहे . डाव्या हाताला मोठा आश्रम बांधलेला आहे . आत मध्ये काही दालने केलेली आहेत . वर पत्रा आहे . मंदिर परिसर मोठा आहे . एक पुजारी महाराज नित्य पूजा करतात . स्वतः स्वामी जी वर्षातून कधीतरी इकडे चक्कर मारतात . मी आश्रमामध्ये गेलो तेव्हा तिथे दोन परिक्रमावासी उतरलेले होते . गेले महिना दीड महिना दोघे एकत्र राहत होते . परंतु दोघांचे एकमेकांशी पटत नसल्यामुळे दोन स्वतंत्र चुली केल्या होत्या . दोघांचा एकंदर राग रंग पाहता मला कोणी करून खाऊ घालेल अशी शक्यता मावळलेली दिसत होती . त्यामुळे मी सदाव्रत घेतले आणि स्वतःच बनवून खाल्ले . नर्मदा परिक्रमेसारख्या उदात्त हेतूने निघालेल्या तीन माणसांना एकत्र स्वयंपाक करून एकत्र जेवता येऊ नये हेच आजवर आपल्या भारत देशाच्या झालेल्या अनेक तुकड्यांचे महत्त्वाचे कारण आहे ! आपण हिंदू म्हणून कधीच एकत्र येत नाही . सतत छोट्या मोठ्या वादविवादांमध्ये अडकून पडतो आणि क्षूद्र शुल्लक स्वार्थापोटी स्वतःचे , समाजाचे आणि पर्यायाने राष्ट्राचे नुकसान करतो . असो . इथे महिनाभर राहिल्यामुळे इथे राहणाऱ्या परिक्रमावासीला तो त्या आश्रमाचा मालक झाला आहे असे वाटू लागले होते . त्यामुळे त्याने मला सदाव्रत देताना देखील हात आखडता घेतला . मुठभरच तांदूळ आणि मुठभर डाळ दिली . त्याची थोडीशी खिचडी करून मी खाल्ली परंतु माझे पोट काही भरले नाही . त्या दोघांचा अबोला होता परंतु वस्तू आपटून एकमेकांवरचा राग ते व्यक्त करायचे . त्यामुळे त्या दोघांच्या मध्ये न झोपता मी आपला बाहेर अंगणात झोपायचा निर्णय घेतला . झोप येईना म्हणून मी चक्कर मारायला बाहेर गेलो . तेव्हा दुकानदाराने मला बोलावून घेतले आणि एक अख्खे खरबूज खायला दिले ! त्याने मात्र माझे पोट एकदम शांत झाले ! दुकानदाराची एक मोठी मुलगी होती . तिला काहीतरी शैक्षणिक मार्गदर्शन करा म्हणाले . तिला चार गोष्टी सांगून झोपायला पुन्हा आश्रमात आलो . संध्याकाळी पुजाऱ्याने छान आरती केली होती . पुजारी मात्र खूप चांगला होता . लाल रंगाचे कपडे घालून फिरायचा . आणि स्वतः स्वामीजी कायम हिरव्या रंगाचे कपडे घालून फिरत असे फोटो पाहिल्यावर लक्षात आले . अंगणामध्ये गार वाऱ्यामध्ये छान झोप लागली . सकाळी उठून पुढचा रस्ता पकडला . या आश्रमाचे काही फोटो गुगलवर मिळाले ते आपल्यासाठी टाकत आहे .
"नर्मदे हर जिंदगीभर " हे सत्य आहे की "नर्मदे हर ! जिंदगी के साथ भी , जिंदगी के बाद भी " हे सत्य आहे ? विचार करून पहा ! त्यामुळे शास्त्रामध्ये सांगितलेल्या "नर्मदे हर " या शब्दात कुठलाही बदल न करता तो शब्द वापरावा असे सांप्रत प्रस्तुत लेखकाचे स्पष्ट मत आहे . त्या मंत्राला सिद्ध करून घेण्यामागे मागे अनेक ऋषींची कठोर तपस्या आहे . अनेक लोक नर्मदे हर या शब्दाच्या मागे पुढे बऱ्याच गोष्टी जोडतात . ते फारसे योग्य नाही असे वाटते .
बीज मंत्र किंवा महामंत्र शक्यतो बदलू नयेत किंवा त्यात छेडछाड करू नये . नर्मदा पुराणा मध्ये कुठे जरी जिंदगीभर असा शब्द आला असता तर मी तो आनंदाने वापरला असता ! असो ज्याचा त्याचा प्रश्न !
दक्षिण भारतीय लोकांमध्ये श्री चा आकडा वाढवण्याची स्पर्धा असते ! श्री श्री श्री षष्मुगानंद स्वामी तथा हिरापूर वाले बाबा ! पुढे हिरापूर या गावामध्ये देखील त्यांनी मोठा आश्रम स्थापन केलेला आहे म्हणून त्यांना हे नाव पडले .
इथली नर्मदा मातेची मूर्ती मात्र खूप सुंदर आहे .
विविध अलंकारांनी तिला वेळोवेळी नटवले जाते . दक्षिण भारतातील सगुण पूजा वेगळीच असते .
मंदिराच्या समोर परिक्रमावासींसाठी शेड बांधलेली आहे .
शेड चांगली मोठी आहे .
मंदिराला उत्तम रोशणाई केली जाते .
इथल्या लोकांना बहुतेक षण्मुखानंद म्हणायला त्रास होतो म्हणून सगळे त्यांना हिरापूर वाले बाबा असे सरधोपट नावाने हाक मारतात !
हेच ते लाल वस्त्र घातलेले पुजारी महाराज !
मंदिराच्या कळसाची दाक्षिणात्य शैली लगेच नजरेत भरते
उत्तर भारतीय मंदिरासारखा सभामंडप आणि दक्षिण भारतीय शैलीची रंगरंगोटी केलेली दिसते
दक्षिण भारतीय पद्धतीप्रमाणे नर्मदा मातेच्या विग्रहाची अतिशय सुंदर पूजा मांडली जाते .
श्री श्री श्री हिरापूर वाले बाबा एका निवांत क्षणी नर्मदा मातेच्या काठावर बसलेले असताना .
पाणी उतरल्यावर नर्मदा मातेचा इथला काठ काहीसा असा असतो
आश्रमाचे आवर खूप मोठे असून मी इथेच उजव्या बाजूला बदामाच्या झाडाखाली झोपलो होतो .
नर्मदा मातेला आलेला महापूर या भागातील काठाला असे बुडवून टाकतो .
याच मंदिरात संध्याकाळी पुजारी महाराजांसोबत आरती केली .
रम्य नर्मदा काठ
आश्रमाची एक पाटी
आश्रमातून निघाल्यावर सेमरदा गावाचा काठ उन्हाळ्यामध्ये असाच दिसतो . पूजा करून लोकांनी टाकून दिलेले प्लास्टिक आपल्याला दिसेल . नर्मदा मातेमध्ये प्लास्टिक वाहून जाताना पाहताना फार वेदना होतात .खरा भक्त असे करूच शकत नाही . देवाचा व्यापारी असेल तरच तो असे काही करू शकतो . देवाचा व्यापारी म्हणजे देवाला काहीतरी नवस बोलून त्याच्या बदल्यात लालूच दाखवणारा दांभिक तथाकथित भक्त.
खाली करंबेळकर गुरुजी आहेत वरती मिहीर आणि हर्षद गोडबोले आहेत .
खरं म्हणजे मी झोळी उचलून निघालेलो होतो परंतु ओंकार कुलकर्णी गुरुजींनी अचानक व्हिडिओ लावल्यामुळे माझी तारांबळ झाली . मला व्हिडिओ कॉल हा प्रकार फारसा आवडतच नाही . प्रत्यक्ष भेटीचा आनंद त्यामध्ये कधीच मिळू शकत नाही . या चित्रात तुम्हाला माझी झोळी आणि निघण्याच्या तयारीत असलेला प्रस्तुत लेखक दिसेल .
मी निघण्याची तयारी कशी करतो आहे फेटा कसा बांधतो आहे वगैरे कुतूहलानं पाहणारे मित्र
मला विशेष आनंद याच गोष्टीचा झाला की मिहीर सारख्या गुणी बालकाला नर्मदा परिक्रमा म्हणजे काय असते हे या व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून मला समजावून सांगता आले . नुकतीच त्याने लंपन नावाच्या एका वेब सिरीज मध्ये प्रमुख भूमिका केलेली आहे .
करंबेळकर गुरुजींना मी अक्षय आंबेडकर याची देखील ओळख त्याचवेळी करून दिली तो क्षण .
बेल फळाचे सरबत गुरुजींना दाखवताना प्रस्तुत लेखक
करंबेळकर गुरुजी मूळचे कोकणातील असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हरकुळची भटवाडी हे त्यांचे मूळ गाव आहे . इथे यांची उत्तम पैकी जमीन वगैरे असून सुमारे साडेचारशे वर्षे जुने दत्त मंदिर यांच्या घरामध्ये आहे . गुरुजी मला लहान असल्यापासून ओळखतात .
शेवटी मी सर्वांचा निरोप घेतला .
या सर्वांना नर्मदे हर करताना प्रस्तुत लेखक तुम्हाला या चित्रामध्ये दिसेल .
या चित्रांच्या निमित्ताने आश्रमाचा परिसर देखील आपल्याला पाहायला मिळेल . भरपूर झाडी असलेला हा आश्रम चारी बाजूने जलमग्न होत असतो . आम्ही गेलो तेव्हा मात्र पाणी खूपच उतरलेले होते . या चित्रात आपल्याला माझा दंड आणि धनुष्यबाण देखील दिसेल .
चालत चालत आम्ही तिघे बडा बडा किंवा वराहपुर या गावाच्या सीमेवर येऊन पोहोचलो . इथे जलेश्वर महादेवाचे एक प्राचीन मंदिर होते . हे मंदिर वर्षातील बराचसा काळ जलमग्न असते .
परंतु सध्या चांगले उंच टेकडीवर दिसत होते .
इथे एक उंचापुरा नागा बाबा सेवा देत असे . साधू पक्का होता परंतु बोलायला फार हुशार होता . शब्दांमध्ये पकडायचा आणि झोडून काढायचा ! ओंकार भारती असे त्यांचे नाव होते . इथे दुपारी आम्हाला महाराजांनी टरबुजे खायला दिली . ती खाऊन आमचे पोट भरले ! झाडाच्या सावलीखाली तिघे पहुडलो . माझ्या हातात असलेला धनुष्यबाण कसा मिळाला वगैरे त्या दोघांना उत्कंठा होती ती शमवली . अक्षय चा दंड देखील खूप वेगळाच होता . त्याची माहिती देखील त्याने मला सांगितली . तो एक विशिष्ट जातीचा बांबू होता . बांबूसा वेन्ट्रीकोसा हा बाबू मूळच्या भारतीय प्रांतातीलच आहे . त्यामुळे याचे अजून एक नाव वामिन किंवा वामन असे सुद्धा आहे . कारण हा उंचीला कमी असतो . आज हा बांबू कंबोडिया पासून ते तिबेट पर्यंत आढळतो . पूर्वी हा संपूर्ण परिसर अखंड भारत वर्षाचा हिस्सा होता . अतिशय छोटी पेर आणि मजबूत चण असे या बांबूचे वैशिष्ट्य असते . कोण्या साधूने त्याला तो पेरं मोजून दिलेला होता . दंड म्हणून धारण करण्यासाठी त्या पेरांची विशिष्ट संख्या असावी लागते असा काहीतरी संकेत होता . याच बांबूला व्यापारी लोकांनी बुद्धा बेली बाबू असं सुद्धा नाव दिले आहे .म्हणजे बुद्धाची ढेरी !
साधूकडे भरपूर गांजा उपलब्ध होता . मी गांजा पीत नाही हे कळल्यावर साधूने मला खूप झापले . अर्थात ते माझी परीक्षा पाहत होते हे नंतर माझ्या लक्षात आले . परंतु मी निर्विकार पणे कुठलीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे साधु महाराज माझ्यावर प्रसन्न झाले ! साधूने आम्हाला बेलाच्या फळाचे सरबत करायला शिकवले . पुढे हे सरबत मी परिक्रमेमध्ये अनेक वेळा करून प्यायलो आणि त्यामुळे शरीराला आवश्यक घटकांचा पुरवठा संतुलित झाला .
इथून खरंतर पुढे जाणे आवश्यक होते परंतु या दोघांना हव्या त्या सर्व गोष्टी तिथे मिळाल्या होत्या . आणि मला आज फार चालण्याची इच्छा होत नव्हती . त्यामुळे तिघांनी तिथेच मुक्काम केला . साधूने आग्रह धरलेला होताच . संध्याकाळी दोघे नर्मदा मैयावर स्नान संध्येसाठी गेले . त्यांच्यासोबत मी देखील स्नान संध्या करून घेतली . इथे काठावर गाळ खूप होता . त्यामुळे नावेतून चालत जाऊन पुढे उतरून स्नान करावे लागले . पाणीदेखील नितळ स्वच्छ नव्हते . त्या प्रचंड जल वनस्पती वाढलेल्या होत्या . एखादा त्यात अडकून बुडाला असता इतकी झाडे होती . धरणाचे पाणी चढत उतरत असल्यामुळे अशी अवस्था होते . काठावर एका खडकावर बसून मस्तपैकी सायंसंध्या केली . परिक्रमेत प्रथमच हा उपक्रम राबवला . मी शक्यतो असे ठरवले होते ही अशी कुठलीही गोष्ट आपण नर्मदे काठी बसून करायची नाही जी घरी बसून करता येणे शक्य आहे ! फक्त आणि फक्त नर्मदे काठी बसून करता येतील अशाच गोष्टी तिकडे करायच्या ! त्यामुळे शक्यतो मी कुठलेही साधन नर्मदा मातेच्या काठावर बसून करण्याच्या भानगडीत पडत नसे . तिचे रूप डोळ्यामध्ये साठवणे आणि तिचे अस्तित्व अनुभवणे हीच एक मोठी साधना अखंड घडत होती .
इकडे दुपारी गप्पा मारता मारता आमच्या असे लक्षात आले की ओंकार कुलकर्णी गुरुजी आणि माझे बरेच सामायिक मित्र आहेत . त्यातील मनोजय करंबेळकर गुरुजी यांचा क्रमांक ओंकार कुलकर्णी कडे होता . त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना परस्पर गुरुजींना व्हिडिओ कॉल लावला आणि मला बोलायला दिले . परिक्रमेमध्ये मी आपण होऊन कोणाला आजवर फोन केलेला नव्हता . परंतु अचानक मी समोर दिसतो आहे कळल्यावर करंबेळकर गुरुजींनी माझा सांगलीचा बालमित्र हर्षद गोडबोले याला देखील त्या कॉल मध्ये जोडला . त्या दोघांशी काही काळ बोललो . हर्षद चा मुलगा मिहीर हा देखील अतिशय गुणी आणि गोड मुलगा आहे . अनेक जाहिराती आणि वेब सिरीज मध्ये कामे केल्यामुळे तो बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे . त्याला देखील माझ्याशी बोलून खूप आनंद झाला . त्या फोन कॉल चे गुरुजींनी काही स्क्रीनशॉट घेतले होते ते नंतर मला मिळाले .
जलेश्वर महादेव येथून ओंकार कुलकर्णी गुरुजींच्या फोनवरून करंबळकर गुरुजींना सकाळ सकाळी लावलेला व्हिडिओ कॉल
माझा अवतार बघून आश्चर्यचकित झालेला चि.मिहीर हर्षद गोडबोले
मी निघण्याची तयारी कशी करतो आहे फेटा कसा बांधतो आहे वगैरे कुतूहलानं पाहणारे मित्र
मला विशेष आनंद याच गोष्टीचा झाला की मिहीर सारख्या गुणी बालकाला नर्मदा परिक्रमा म्हणजे काय असते हे या व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून मला समजावून सांगता आले . नुकतीच त्याने लंपन नावाच्या एका वेब सिरीज मध्ये प्रमुख भूमिका केलेली आहे .
करंबेळकर गुरुजींना मी अक्षय आंबेडकर याची देखील ओळख त्याचवेळी करून दिली तो क्षण .
बेल फळाचे सरबत गुरुजींना दाखवताना प्रस्तुत लेखक
करंबेळकर गुरुजी मूळचे कोकणातील असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हरकुळची भटवाडी हे त्यांचे मूळ गाव आहे . इथे यांची उत्तम पैकी जमीन वगैरे असून सुमारे साडेचारशे वर्षे जुने दत्त मंदिर यांच्या घरामध्ये आहे . गुरुजी मला लहान असल्यापासून ओळखतात .
शेवटी मी सर्वांचा निरोप घेतला .
या सर्वांना नर्मदे हर करताना प्रस्तुत लेखक तुम्हाला या चित्रामध्ये दिसेल .
या चित्रांच्या निमित्ताने आश्रमाचा परिसर देखील आपल्याला पाहायला मिळेल . भरपूर झाडी असलेला हा आश्रम चारी बाजूने जलमग्न होत असतो . आम्ही गेलो तेव्हा मात्र पाणी खूपच उतरलेले होते . या चित्रात आपल्याला माझा दंड आणि धनुष्यबाण देखील दिसेल .
जलेश्वर येथे प्रस्तुत लेखकाचा ओंकार कुलकर्णी गुरुजी यांनी काढलेला फोटो . मागे त्या दोघांचे दंड दिसत आहेत . माझा दंड धनुष्याला बांधलेला आहे .
अक्षय आंबेडकर याने साधारण आमची भेट झाली त्याच काळामध्ये फेसबुक वर ज्या काही पोस्ट टाकल्या होत्या त्या बघितल्यावर त्याच्या मनस्थितीचा अंदाज येत असेल . पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पुन्हा पुन्हा मरणे आणि पुन्हा पुन्हा आईच्या उदराचा आश्रय घेणे हे परमेश्वरा मला आता नको आहे अशा अर्थाची ओळ त्यानी पोस्ट केली होती .
साधू जीवनाची असलेली ओढ त्यांच्या दोघांच्या फोटो मधून स्पष्टपणे दिसत असे !
अक्षय आंबेडकर याच्यासोबत प्रस्तुत लेखक . शेजारी अक्षयचा २१ पेरांचा वामन दंड देखील दिसत आहे . ओंकार गुरुजींच्या मोबाईलवर काढलेला हा सेल्फी नंतर अक्षय ने मला पाठवला होता .
पूर्वाश्रमीचा अक्षय आंबेडकर याच्यासोबत काढलेला अजून एक फोटो ! होय पूर्वाश्रमीचाच ! कारण माझी परिक्रमा संपन्न झाल्यावर मी एकदा अक्षयने दिलेल्या क्रमांकावर फोन केला असता पलीकडून आवाज आला कोण अक्षय आंबेडकर ? आणि मग माझ्या लक्षात आले की अक्षय आंबेडकर याने आपल्या पूर्व जीवनाचा त्याग करून संन्यास धारण केलेला आहे !
अक्षय आंबेडकर या तरुणाने परिक्रमा अतिशय सुंदर रितीने पूर्ण केली . जबलपूर पर्यंत एकत्र चालल्यावर ओंकार गुरुजी आणि अक्षय वेगळे झाले . अक्षय ला अमरकंटक इथे अवधूत नाथ नावाचे एक साधू भेटले जे परिक्रमेमध्ये होते . त्यांच्यासोबत सात आठ दिवस राहिल्यावर याने त्यांच्याकडे नाथ संप्रदायाची दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली . तिथून एका नागा साधू सोबत ओंकारेश्वर पर्यंत परिक्रमा पूर्ण झाल्यावर अक्षय दोन दिवस घरी जाऊन आला . आई-वडिलांची आणि बहिणीची रीतसर परवानगी घेतल्यावर विमानाने हरियाणातील गुरुंचे गाव गाठत तिथे त्याने नाथ संप्रदायाची दीक्षा प्राप्त केली .धन्य ते माता पिता यांनी आपला कर्ता सवरता पुत्र धर्मासाठी सहज अर्पण केलेला आहे ! आता अक्षय आंबेडकर यांचे नाव आहे योगी अजयनाथ , गुरु खडेश्री बाबा योगी अवधूतनाथ . हरयाणा हे त्यांचे गुरुस्थान आहे . हिमाचलप्रदेशातील जिल्हा सिरमोर येथील नहान तालुक्यामधील जमटा या गावांमध्ये योगी अजयनाथ यांचा आश्रम आहे . हरश्रीनाथ आश्रम असे या आश्रमाचे नाव आहे . बालासुंदरी मंदिराच्या समोर हा आश्रम आहे . योगायोगाने योगींना आता संपर्क केला असता ते पुन्हा एकदा नर्मदा परिक्रमेमध्ये असून आज त्यांचा मुक्काम नर्मदापुरम येथे होता .
अशा रीतीने नर्मदा मातेने मला एका खऱ्या मुमुक्षु साधकाचे दर्शन घडविले . तसे दोघेही साधू बनण्याच्या मार्गावर होते . परंतु एक सटकला व एक अटकला !
या मुलाचे वेगळेपण लक्षात आल्यामुळेच की काय परंतु मी संपूर्ण परिक्रमेमध्ये कुठेही न केलेली एक गोष्ट याच्या बाबतीत केली होती . आणि ती म्हणजे मी याला याचा फोटो मागून घेतला होता ! तो फोटो हा पहा ! अजूनही माझ्याकडे आहे ! आदर्श भारतीय तरुणांचे प्रतिनिधित्व करणारा हा फोटो आहे !
पूर्वाश्रमीचे अक्षय राजेंद्र आंबेडकर अर्थात सांप्रतचे योगी अजयनाथ जी महाराज
ओंकार कुलकर्णी गुरुजींना आपण शुभेच्छा तर नक्कीच देऊ शकतो ! गुरुजींची परिक्रमा देखील अतिशय अप्रतिम पद्धतीने पूर्ण झाली ! स्वतःचा कुठलाच नियम न पाळता जे जसे समोर येईल तसे स्वीकारत त्यांनी परिक्रमा केली . हे खूप कठीण असते ! आणि विशेषतः वैदिक पुरोहितांसाठी नक्कीच कठीण आहे !
या मुक्कामामध्ये मी दोन गोष्टी शिकलो . एक म्हणजे बेलफळाचे सरबत बनवायला शिकलो . आणि दुसरे म्हणजे सत्तूचे पीठ गूळ आणि दुधासोबत कसे खायचे ते शिकलो . सातूचे पीठ हे आजकाल आपण फारसे वापरताना दिसत नाही . परंतु ते खरोखरीच पूर्णान्न आहे असा अनुभव मी पुढे परिक्रमेमध्ये अनेक वेळा घेतला . परंतु ते बनवायला मात्र इथे शिकलो . अर्थात आम्ही खिचडी देखील बनवून खाल्ली . परंतु दिवसभर टरबूजे , कलिंगडे ,सरबते ,सातू ,खिचडी अशी अक्षरशः खवय्येगिरी आम्ही केली आणि तिघेही पक्के पुणेकर असल्याचे सिद्ध केले! जलेश्वरचे साधु महाराज चांगले धिप्पाड होते . ओंकार भारती महाराज हे जुना आखाड्याचे हे एक नागा साधू होते . स्वभावाने अतिशय परखड आणि स्पष्ट वक्त होते . आवाजामध्ये जरब होती .नजर अतिशय तीक्ष्ण आणि करारी होती . स्वभाव विनोदी होता . परंतु यांचा एकंदर राग रंग पाहता हे विनोद करत आहेत का चिडलेले आहेत ते कळत नसे ! आश्रमात काम करणाऱ्या महिला यांना घाबरून असत असे मी पाहिले . त्यांच्यासमोरून कोणीही जात नसे . आम्ही मात्र तिघेही सडाफटिंग असल्यामुळे आणि महाराज आम्हाला अनुकूल झालेले आहेत असे पाहिल्यावर ठरवून महाराजांची खूप थट्टा मस्करी केली !त्याने देखील आमच्यासोबत लहान होत आमच्या बाल लीला सहन केल्या !
महाराजांची करडी नजर आणि करारी चेहरा तसेच उंचीपुरी देहयष्टी येथे स्पष्टपणे दिसते आहे !
अशा भव्य दिव्य साधूंशी काही मुद्द्यांवरून तात्विक मतभेद झाल्यामुळे आम्ही तावातवाने चर्चा केली होती त्याचे आता आश्चर्य वाटते ! परंतु महाराज आमची परीक्षा बघत होतो हे नंतर उशिरा आमच्या लक्षात आले . नर्मदा खंडातील साधू फार चतुर आहेत ! ते त्यांच्या अंतरंगाचा ठाव सहजासहजी कुणाला लागू देत नाहीत !
अशा भव्य दिव्य साधूंशी काही मुद्द्यांवरून तात्विक मतभेद झाल्यामुळे आम्ही तावातवाने चर्चा केली होती त्याचे आता आश्चर्य वाटते ! परंतु महाराज आमची परीक्षा बघत होतो हे नंतर उशिरा आमच्या लक्षात आले . नर्मदा खंडातील साधू फार चतुर आहेत ! ते त्यांच्या अंतरंगाचा ठाव सहजासहजी कुणाला लागू देत नाहीत !
परंतु या आश्रमातील आमचा मुक्काम संस्मरणीय ठरला एवढे नक्की . खूप चांगला सत्संग घडला . काही चांगले मित्र मिळाले ! काही शिकायला मिळाले ! थोडीफार सेवा करायला मिळाली ! आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ध्या दिवसाची सक्तीची विश्रांती मिळाली ! त्याच आनंदाला झोळीमध्ये भरून सकाळी सात सव्वा सात वाजता पुढचे पाऊल उचलले . पायातला बूट पुरता फाटला होता . तळवा झिजला होता . परंतु त्यातून नर्मदा मातेचा सुखद गारवा तळपायाला प्रचंड अल्हाददायक वाटत होता ! त्याच आनंदात पुढे निघालो ! पुढे नर्मदा मातेने माझ्यासाठी काय विचित्र योजना करून ठेवलेली आहे याची मला पामराला कशी बरं कल्पना असेल !
लेखांक एकशे पस्तीस समाप्त (क्रमशः )
Narmade Har !!!!! Narmade Har !!!!! Narmade Har !!!!!
उत्तर द्याहटवानर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा