लेखांक १३६ : रेवा-माण-खेडी त्रिवेणी संगम । ऐसा फल कही नही मिलेगा !

आजचा दिवस नर्मदा मातेच्या अनुभवांनी भारलेला असणार आहे याची मला पुसटशी देखील कल्पना नव्हती . मी आपला जलेश्वर महादेव सोडल्यावर काठाकाठाने चालू लागलो . एकटाच चालत होतो . पुण्याच्या दोघाही वीरांना माझा एकट्याने जाण्याचा संकल्प पटलेला होता . त्यामुळे त्यांनी काही आडकाठी केली नाही . अतिशय रम्य अशा किनाऱ्याने शांतपणे चालत राहिलो . हे वाहते पाणी नसून भरावाचे किंवा बॅक वॉटर चे पाणी असल्यामुळे खूप शांतता वातावरणात साचलेली होती . मोठ्याने आवाज करत उडणारी एखादी टिटवी तिचा भंग करायची . एरव्ही सर्व स्तब्ध आणि शांत ! अगदी आपल्या मनासारखे ! जसे वातावरण असते तसे आपले मन होते ! आपोआपच होते ! धांगडधिंगा करणारी गाणी लावली की मन चंचल होऊन जाते ! माझा एक मित्र होता जो रॉक म्युझिक ऐकायचा . त्याने मला त्यातले विविध प्रकार सांगितले होते . याच्यामध्ये हेड बँगींग नावाचा एक प्रकार असतो म्हणे ! म्हणजे तुम्हाला गाणे जितके जास्त आवडेल तितके तुम्ही डोक्याला जास्तीत जास्त झटके देऊन डोके जवळच्या कुठल्याही वस्तूवर आपटत राहायचे ! हा पठ्ठ्या कीबोर्ड वर डोके आपटायचा ! किती घोर विकृती आहे ! कुठे आपली थोर परंपरा आणि कुठे ही घोर अवदसा ! असो . तात्पर्य इतकेच की शांत नर्मदा प्रवाहामुळे तुमचे मन तत्काळ शांत होऊन जाते याची अनुभूती या संपूर्ण किनाऱ्यावर पदोपदी येत होती . कालच्या एकाच दिवसात मी अनेक प्रकारची माणसे पाहिलेली होती ! अगदी व्याजाने पैसे देणारा एक गुजराती साधू सुद्धा मला भेटला होता ! हा मूळचा संसारीच . परंतु अध्यात्माची थोडीफार ओढ आणि जाणीव असल्यामुळे या भागात येऊन धंदा करत होता इतकेच . याचे ग्राहक म्हणजे विविध आश्रम वाले साधू व भगत असत !नर्मदा खंडामध्ये सगळेच अकल्पनीय ! 
चालता चालता बडा बडदा येथील प्रसिद्ध महाकालेश्वराचे मंदिर आले . येथील साधूने प्रेमपूर्वक चहा पाजला . तीन वर्षाची परिक्रमा करणारा हा चष्माधारी साधू सेवेसाठी काही दिवस इथे राहिलेला होता . इथेच हनुमंताचे मंदिर होते आणि रामाचे मंदिर देखील होते . उज्जैनच्या महाकालेश्वराप्रमाणे याही महादेवांचा सुंदर पद्धतीने शृंगार केला जायचा . 
या भागातील रम्य नर्मदा तट
श्री महाकालेश्वर महादेव बडा बडदा ( वर्धा )
महाकालेश्वराचे शिवलिंग अप्रतिमच आहे !
इथेच असलेले प्रभू रामचंद्रांचे विग्रह
जिथे श्रीराम आहे तिथे हनुमंत असणारच !
याच हनुमंतांचे अजून एक रूप !
हेच ते सेवाधारी परिक्रमावासी साधू .
थोडेसे अंतर चालल्यावर एक मोठा पक्का बांधलेला घाट होता . इथे श्री रुद्रेश्वर महादेवाचे छोटेसे मंदिर होते .ही आदितीची तपोभूमी मानली जाते . सप्तर्षींपैकी कश्यप ऋषींची आदिती ही पत्नी होती . 
रुद्रेश्वर महादेवाचा पक्का घाट
श्री रुद्रेश्वर महादेव भगवान
पुढे रातवा नावाच्या गावामध्ये अमरनाथाचे मंदिर होते . या भागामध्ये खूप छोटे मोठे ओढे नाले नर्मदा मातेला येऊन मिळत होते .
अमरनाथ मंदिर
या भागामध्ये नर्मदा मातेला येऊन मिळणारे ओढे नाले लाल बाणांनी दाखवलेले आहेत . 
आधीच तळवे फाटून गेलेले बूट इथे पुरते कामातून गेले . मला वाटेत भेटलेल्या एका ग्रामस्थाने सांगितले की आता इथून पुढे नेमावर पर्यंत मध्ये कुठल्याही प्रकारचे दुकान , मेडीकल वगैरे लागणार नाही . त्यामुळे औषध पाणी चपला बूट कपडे जे काही खरेदी करायचे असेल ते इथेच कोठेतरी खरेदी करून घ्यावे . त्यामुळे मी मला मिळालेल्या दक्षिणेतील तीनशे रुपये वेगळे बाजूला काढून ठेवले . आणि त्याच्या मिळतील तिथे चपला किंवा बूट घेण्याचे ठरवले . फाटलेले बूट हे संकट अतिशय किरकोळ वाटावे असे .इथे अजून एक वेगळेच संकट माझ्यावरती लक्ष ठेवून बसलेले होते ! या भागामध्ये भटक्या कुत्र्यांचा फारच त्रास होता . टोळ्या करून ही कुत्री फिरायची . आणि एखाद्या सैन्याच्या पलटणी प्रमाणे शिस्तबद्ध हालचाली करत बरोबर एखादं सावज हेरून शिकार करायची .शक्यतो शेळ्या-मेंढ्यांचे कळप यांच्या निशाण्यावर असायचे . या भागातील गुराखी अक्षरशः या कुत्र्यांच्या जाचाला कंटाळलेले होते . ही कुत्री गुरांची शिकार तरी करत किंवा त्यांना चावा घेऊन पळून जात . कोकरे पळवून नेणे तर अगदी नित्याचे झालेले होते . 
या भागात इतकी भटकी कुत्री आहेत की या परिसराच्या गुगल नकाशावर सुद्धा त्यांचे फोटो सापडतात .
किनारा बराचसा खडकाळ आहे
पुरामुळे उन्मळून पडलेले वृक्ष इथे देखील दिसतात .
मी असाच काठाने चालत असताना माझ्या असे लक्षात आले की शिस्तबद्ध पद्धतीने बारा ते पंधरा भटकी कुत्री माझ्या मागे लागलेली आहेत . मी सुरुवातीला दुर्लक्ष केले . परंतु नंतर असे लक्षात आले की ती सर्व कुत्री गांभीर्यपूर्वक आता माझ्या मागे धावत आहेत ! मग मात्र मी माझी गती वाढवली . आता मात्र मी वेगाने पुढे पळतो आहे आणि सर्व कुत्री माझ्या मागे लागली आहेत असे चित्र उभे राहिले . तुम्ही कितीही वेगाने पळाला तरी कुत्रे किंवा मांजर कुळातील प्राणी यांच्या गतीची आपण यत्किंचितही बरोबरी करू शकत नाही . शेवटी मी खाली वाकून सापडतील ते दगड गोटे उचलून त्यांच्या दिशेने फेकायला सुरुवात केली . कुत्री आता आक्रमक होऊ लागली . मला काय करावे तेच कळेना . आजूबाजूला मदतीसाठी कोणीही नव्हते . आधीच मला भूक लागलेली होती . आणि त्यात हे संकट माझा पिच्छा पुरवत होते .  मी हळूहळू हतबल होऊ लागलो . कुत्री माझ्या जवळ जवळ येऊ लागली . एक क्षणभरच मी उलटा फिरलो आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली ! सर्वच कुत्री दात काढून माझ्या दिशेने धावत येत होती !  माझ्या लक्षात आले की आपण नर्मदा मातेचा धावा अजून केलेलाच नाही ! बेंबीच्या देठापासून मी जोरात नर्मदे हर sss ! असे ओरडलो आणि इतक्यात माझ्या मागून त्या कुत्र्यांच्या अंगावर छोट्या छोट्या दगडांचा अक्षरशः वर्षाव सुरू झाला ! कुत्री घाबरून पळू लागली ! मी आश्चर्याने मागे वळून पाहिले तर दोन मुली आणि दोन मुले व एक म्हातारी असे पाच जण मिळून कुत्र्यांवर दगडांचा अक्षरशः वर्षाव करत होते ! मी देखील मग त्यांना सामील झालो . काही क्षणापूर्वी घाबरलेले माझे मन आता एकदम शूरवीरा सारखे पेटून उठले व मी दगड फेकू लागलो ! कुत्री पळून गेल्यावर हे पाचही जण पुन्हा आपापल्या कामाला निघाले . त्यातली एक छोटी मुलगी मला म्हणाली , " आओ बाबाजी , थक गये हो । तनिक यहा बैठो और विश्राम करो । " तिथे नर्मदा मातेच्या काठावर खरबुजांची शेती कोणीतरी केलेली होती . आणि एक म्हातारी बाई एक तरुण म्हणावी अशी मुलगी आणि एक छोटी मुलगी अशा तिघी टोपलीमध्ये खरबुजं घेऊन विकत बसल्या होत्या . ही दोन लहान मुले पिशव्या घेऊन त्यांच्यासमोर उभी होती . त्यांच्या अंगावर कपडे नव्हते . फक्त चड्ड्या घातलेल्या होत्या . मी त्या तिघींजवळ जाऊन बसलो . त्यांनी तिथे छान चटई अंथरलेली होती . तिघींच्या मागे खरबुजांचा मोठा ढीग लावलेला होता . माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी चौकशा करायला सुरुवात केली . ही कुत्री नेहमी इथे असतात का ? तरुण मुलगी म्हणाली , " अहो ही कुत्री फार बेकार आहेत . अनेकांना चावलेली आहेत . तुम्हाला घाबरून पळवून लावणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते . लहान मुलांच्या तर जीवाला सुद्धा धोका असतो . " तुम्ही तिघी इथे काय करत आहात असे विचारल्यावर म्हातारी सांगू लागली .पाणी उतरल्यावर आम्ही इथे शेती करतो . आणि खरबूजे पिकवतो . ही गरीब बिचारी मुले आहेत . यांना फार काही खायला प्यायला मिळत नाही . मग आमच्या खरबुजा मधील थोडीफार लागलेली जी खरबूजे असतात तेवढा भाग काढून टाकून बाकीचे खरबूज आम्ही यांना देऊन टाकतो . तेवढेच गरिबांचे पोट भरते .इतक्यात छोटी मुलगी माझ्याकडे एक खरबूज घेऊन आली आणि म्हणाली , " बाबाजी माझे खरबूज खा ! खूप गोड आहे ! " लागलीच तरुण मुलगी एक  खरबूज माझ्यापुढे करत म्हणाली , "बाबाजी आप मेरा वाला खरबुजा खाके देखना । शक्कर से भी मिठा है । " आजीबाईने बसल्या जागेवरून मागच्या ढीगातून दोन-तीन खरबूजे उपसली आणि माझ्या पुढे धरत मला म्हणाली , "आधी हे खाऊन पहा बाळ . याच्यापेक्षा गोड फळ कुठेच नाही . " त्या तिघींमध्ये लागलेली परिक्रमावासीला चारण्याची ती अहमहमिका पाहून मला मौज वाटली ! मी म्हणालो , " मी सगळ्यांची खरबूजे खाईन . परंतु मला चांगली खरबूजे देऊ नका . या मुलांना तुम्ही चांगले खरबूज कापून दिल्यावर जो खराब भाग उरतो आहे त्याच्या आजूबाजूचा बराच चांगला गर शिल्लक राहतो आहे . तेवढा मला पुरेसा आहे . तोच मी खाईन . चांगल्या खरबुजांना बाजारात चांगली किंमत येईल . ती माझ्यावर वाया घालवू नका . " तरुण मुलगी म्हणाली , "असं कसं म्हणता बाबाजी ! तुम्ही परिक्रमा वासी आहे . तुम्हाला जे सर्वोत्तम आहे तेच देणार . " "हो बाबाजी . सडका भाग आम्ही तुम्हाला देणारच नाही . " छोटी मुलगी पण लगेचच म्हणाली . इकडे तोपर्यंत दोन्ही मुलांच्या पिशव्या गच्च भरून टरबूजे गोळा झाली . परंतु तरीदेखील नवीन कोणीतरी गावात आलेले आहे तर त्याची मजा बघावी अशा हेतूने दोन्ही मुले आमचा हा प्रकार बघत उभी राहिली . मी आधी छोट्या मुलीने दिलेले खरबूज खाल्ले . त्याची चव इतकी अप्रतिम होती की काय सांगावे ! डोळे मिटून मी अगदी आनंदाने त्या खरबुजाचा आस्वाद घेऊ लागलो ! त्या मुलीला खूप आनंद झाला ! तोपर्यंत तरुण मुलीने अगदी साली काढून माझ्यासाठी खरबुजाच्या फोडी काढून एका खरबुजाच्याच वाटीत दिल्या ! त्याची चव तर पहिल्या खरबुजा पेक्षा सुद्धा अप्रतिम निघाली ! मी अगदी आनंदाने त्याचा आस्वाद घेऊ लागलो ! म्हातारीने खरबुजाच्या लांबच लांब फोडी काढून माझ्यासमोर ठेवल्या . ती फोड मी उचलली आणि तोंडाला लावली मात्र क्षणभर माझी भाव समाधी लागली की काय असे मला वाटले ! ते खरबूज नव्हतेच मुळी ! साक्षात अमृताची चव त्याला होती ! इतके अप्रतिम खरबूज माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी खाल्लेले नव्हते ! इतका गोडवा आणि इतकी अप्रतिम चव प्रथमच अनुभवत होतो ! "कैसा है फल बाबाजी ? " म्हातारीने विचारलेल्या प्रश्नामुळे मी भानावर आलो .  या तिघी माझ्यासमोर बसल्या आहेत याचाच विसर मला ती फळे खाऊन पडलेला होता ! "बहुत अच्छा है मैया ! इससे अच्छा खरबूजा आज तक मैने खाया नही ! " मी असे म्हटल्याबरोबर तिघीही खदाखदा हसू लागल्या ! मला दिलेल्या फोडींमधील दोन फोडी मी त्या मुलांना देखील दिल्या . मुले घेत नव्हती परंतु म्हातारीने घ्या सांगितल्यावर त्यांनी घेतले . तरुण मुलीच्या हातावर "पावना " असे नाव गोंदवलेले होते . मला स्पष्टपणे आठवते . माझ्या वहीमध्ये तशी नोंद देखील मी करून ठेवलेली आहे . बघता बघता मी तीन अख्खी खरबूजे खाल्ली होती यावर माझाच विश्वासच बसेना !  आणि मलाच माझा संकोच वाटू लागला ! ते म्हातारीने बरोबर हेरले आणि मला म्हणाली "बाबाजी चिंता मत करना । पेट भरके खा लेना ! और लेलो । ऐसा फल कही नही मिलेगा । " आणि तिचे म्हणणे खरेच होते . मी तिला म्हणालो " मैय्या , इतकी अप्रतिम चव कशी काय निर्माण होते साध्या मातीतून ! काय परमेश्वराची अगम्य लीला आहे ! " तिघी पुन्हा हसू लागल्या . त्या खरबुजाच्या स्वर्गीय चवीचे असे काही गारुड माझ्या बुद्धीवर आरूढ झाले की मी त्या तिघींकडे एकदा सुद्धा पाहिले नाही ! आणि आता मात्र जिभेचे चोचले बास असा विचार करून ताड करून उठलो आणि कोणाकडेही न बघता पुढे चालू लागलो ! मनातल्या मनात मी विचार करू लागलो , "कोण कुठला मी ! आणि मला वाचवण्यासाठी अचानक हे ग्रामस्थ येतात काय ! आणि पोटभर बालभोग देतात काय ! नर्मदा मातेची लीला अगम्य आहे ! " या सर्वांना नर्मदेहर करावे असा विचार करून मी मागे वळून पाहिले . आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली ! मी मटकन खाली बसलो ! मागे शेतही नव्हते आणि ते पाचही जण नव्हते ! शांतपणे पसरलेला नर्मदा मातेचा तो गूढरम्य किनारा होता आणि तिथे प्रचंड झाडी माजलेली होती . एक क्षणभर मला कळेचना की नक्की काय प्रकार झाला आहे ? समोरच एक मोठी नदी नर्मदा मातेला येऊन मिळत होती . तिथे एक केवट माझी वाट पाहत उभा होता . तो मला म्हणाला , " बाबाजी जल्दी आओ । कब से आपकी राह देख रहा हू । " मी त्याला विचारले तू मला कधी पाहिलेस ? तो सांगू लागला की तुमच्या मागे कुत्री लागली होती व तुम्ही पळत होता हे मी पाहिले . मध्येच तुम्ही गायब झालात . मला वाटले कुठेतरी गेले असाल . याल परत . मी अजूनही संभ्रमित अवस्थेमध्येच होतो . मी त्याला म्हणालो इथे खरबुजाचे शेत होते ते कोणाचे होते ? केवट आश्चर्यचकित होऊन मला म्हणाला की या संपूर्ण भागात कोणीच शेती करत नाही बाबाजी ! मी त्याला सांगितले की अरे बाबा आता इथे दोनच मिनिटांपूर्वी मी शेतात बसून खरबूजे खात होतो रे ! तिघीजणी खरबूजं विकत बसल्या होत्या पहा ! तू पहिले पण असशील आम्हाला . केवट म्हणाला , " बाबाजी मी रोज याच ठिकाणी नाव घेऊन बसलेला असतो . इथे कोणीही खरबूज विकायला येऊच शकत नाही !  कारण मुळात इकडे कोणी फिरकतच नाही ! गिऱ्हाईकच नाही तर माल कोणाला विकणार ? " मला नावेत बसायची सूचना करून त्याने नाव सोडवली . छोटासा डोंगा होता .  नाव पाण्यामध्ये शिरली . "ही कुठली नदी आहे प्रभू ? " मी केवटाला विचारले . " हे क्षेत्र सामान्य नाही बाबाजी ! हा त्रिवेणी संगम आहे ! माण खेडी आणि नर्मदा मातेचा ! पूर्वी सरदार सरोवर धरण होण्यापूर्वी हा संगम स्पष्टपणे दिसायचा . आता थोडेसे पलीकडे माण-खेडी नद्यांवरच एक छोटेसे धरण झालेले आहे . त्यामुळे संगम असा दिसत नाही . पण आहे त्रिवेणी संगमच ! माण नदी मोठी आहे . खेडी माई थोडी छोटी आहे . " केवट सांगत होता . मी निःशब्द झालो होतो . " हे क्षेत्र बाबा अमरनाथ आणि बाबा महाकालेश्वर यांचे आहे ! क्षेत्रपाल आहेत ते इथले . त्यांचा या किनाऱ्यावर जागता पहारा असतो " केवट सांगत राहिला . माझ्या अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांसमोर त्या पाच आकृती उभ्या राहिल्या . ती म्हातारी ,ती तरुणी , ती बालिका आणि ती दोन मुले ! म्हातारीचे ते शब्द कानामध्ये घुमत राहिले . " और लेलो बाबाजी ! ऐसा फल कही नही मिलेगा ! " नावेतून उतरलो आणि नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार केला . त्रिवेणी संगमा मध्ये उतरलो आणि स्नान केले . तीनही नद्यांचे जल प्राशन केले . ही चव ओळखीची वाटत होती . . . त्या खरबुजांसारखी . . . फार त्रास दिला आहे हो मी माईला . इतका नालायक मुलगा कुठल्याच आईला असू नये . . . 
 नर्मदे हर . . नर्मदे हर . . हर हर नर्मदे . . .
लाल खुणेने दाखवलेली हीच ती जागा आहे जिथे मी स्वर्गीय चवीची खरबूजे खाल्ली . 
नकाशामध्ये हा केवळ माण आणि नर्मदा नदीचा संगम आहे असे दाखवले आहे . परंतु धरणाचे पाणी उलटे आत शिरलेले असल्यामुळे त्रिवेणी संगम दिसत नाही .
  थोडासा नकाशा झूम आऊट केल्यावर लक्षात येते की माण आणि खेडी नदीचा संगम इथून जवळच आहे . जो हिरव्या रंगाने दाखवलेला आहे . 
मोठी आहे ती माण नदी आणि उजव्या हाताची छोटी नदी म्हणजे खेडी नदी आहे .  छोटासा बंधारा घातल्यामुळे नद्यांना भरपूर पाणी दिसते आहे . नर्मदा मातेचे पाणी उलटे या ठिकाणी शिरत असते . 
मला पलीकडे नेऊन सोडणारा डोंगा देखील या चित्रामध्ये दिसतो आहे . लाल खुणेने तो दाखवला आहे .
संगमाच्या पलीकडे लगेचच वृद्धेश्वर नावाचे तीर्थक्षेत्र होते . मंदिराकडे जाणारा लांबच लांब तिरपा रस्ता लक्षात राहिला . मंदिराचा कळस ही उंच होता . मंदिराचे आवार प्रशस्त होते आणि मंदिर देखील चांगले मोठे होते . मंदिरामध्ये मी एकटाच परिक्रमावासी होतो . इथे एक गुजराती साधू राहत होता . त्याने अतिशय प्रेमाने मला मदतीला घेऊन स्वयंपाक केला . मला विशेष लक्षात राहिली ती म्हणजे त्या साधूने केलेली आंब्याची आमटी ! कैरीपेक्षा थोडेसे पुढे गेलेले परंतु न पिकलेले आंबे घेऊन ते उकळून त्याची सुंदर अशी आमटी त्याने केली ! हा पदार्थ मी आयुष्यात पहिल्यांदाच खाल्ला ! अतिशय अप्रतिम अशी त्याची चव होती . मंदिर स्वच्छ आणि नीटनेटके होते . मंदिरात प्रवेश केल्यावर डाव्या हाताला एक कट्टा होता त्यावर काही काळ शांतपणे पडून राहिलो . माझ्या डोळ्यासमोरून अजूनही त्रिवेणी संगमवरचा प्रसंग जात नव्हता . त्या प्रसंगामुळे मी अबोल झालो होतो . इथे अजून एक जटाधारी साधू बसलेले होते . त्यांनी मला विनाकारण जवळ बोलावले आणि म्हणाले "माई की बडी कृपा है तुझ पर बच्चा ! " यानंतर मात्र मी उठलो आणि झाडू घेऊन मंदिराचा सगळा परिसर झाडून काढला . " आसुदे अन्न सेवू नये, वडिलांचेही " अर्थात फुकटचे अन्न वडिलांनी दिले तरी खाऊ नये असे रामदास स्वामी सांगतात .  
वृद्धेश्वराचे मंदिर
मंदिर मोठे आहे
आतला परिसर देखील विस्तीर्ण आहे . समोर हिरव्या कापडाखाली दिसणारा जो कट्टा आहे तिथे मी पडलो होतो . अन्नपूर्णा मातेचे चित्र काढलेली भिंत आहे तिथे आम्ही स्वयंपाक केला . जेवायला काही ग्रामस्थ आलेले होते .
हेच ते काठेवाडी गुजराती बाबाजी ज्यांनी आंब्याची आमटी केली . 
श्री वृद्धेश्वर महादेव
इथे असलेल्या हनुमंताच्या मूर्तीची विविध साजांमध्ये पूजा करण्याची पद्धत आहे .
त्यातले काही साज आपल्या दर्शनासाठी सोबत जोडत आहे .
अशाप्रकारे हनुमंताची मूर्ती सजवण्याची पद्धत अजून महाराष्ट्रात आलेली नाही . परंतु जर तशी पद्धत आलीच तर मात्र पर्यावरण पूरक साज शृंगार वापरला जावा इतकीच अपेक्षा . कारण जुनी पूजा उतरवून नवीन पूजा बांधताना जुने साज शृंगाराचे निर्माल्य कुठल्यातरी नदीतच जाणार आहे ! 
वृद्धेश्वरावरून निघालो आणि नर्मदा मातेचा किनारा पुन्हा एकदा पकडला . पाणी खाली उतरले असल्यामुळे काठाने चढण्यासाठी उत्तम रस्ता तयार झालेला होता . उत्तम म्हणजे एक पाऊल टाकता येईल असा रस्ता .  शेजारी शांत धीर गंभीर असा नर्मदा मातेचा प्रवाह होता . या प्रवाहाकडे पाहत पाहत किती अंतर चाललो लक्षातच आले नाही . एका धक्क्यातून सावरेपर्यंत दुसरा धक्का द्यायचा असे नर्मदा मातेचे धक्का तंत्र इथे मला अखंड अनुभवायला मिळत होते ! मला खरोखरच कल्पना नव्हती की माझ्यापुढे नर्मदा मातेने आता काय वाढून ठेवलेले आहे ! मी आपला तिच्या नामस्मरणामध्ये आणि तिच्या रूपाचे अवलोकन करत चालत राहिलो . माझ्या मनात असलेली एक शेवटची अहंकाराची कडी देखील ठेचायची असे तिने ठरवले होते . त्यामुळे यानंतर एक अतिशय अद्भुत अनुभव मला आला .




लेखांक एकशे छत्तीस समाप्त ( क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर