लेखांक १३७ :ऋद्धेश्वर ते शुक्लेश्वराच्या दरम्यान झालेली लूट व कुब्जा संगमावरील प्राचीन मंदिरसमूह


ऋद्धेश्वर मंदिर सोडल्यावर किनारा पकडला आणि नर्मदा मातेच्या अगदी जवळून चालायला सुरुवात केली . चालता चालता मनामध्ये विचार करत होतो . नर्मदा मैया कधीच सांगून दर्शन देत नाही . त्यामुळे तिच्या पाया पडता येत नाही . कधीतरी हिने सांगून दर्शन द्यावे ! म्हणजे मग तिचे पाय धरता येतील . कोणी जर मला नर्मदा परिक्रमे मध्ये चालताना पाहिले असते तर ठार वेडा समजले असते ! कारण मी जे काही मनात येईल तो सर्व संवाद नर्मदा मैयाशी थेटपणे साधायचो . अगदी हातवारे करून बोलायचो ! आता सुद्धा मी नर्मदा मातेशी बोलायला सुरुवात केली , " मैय्या तू अशी का आहेस ? तुझ्याशी संवाद साधावा म्हटले तर तू समोर उभी हवीस ना ! परंतु तू तर कधीच सांगून दर्शन देत नाहीस ! काहीतरी मोठा उपक्रम करतेस आणि मग नंतर लक्षात येते की अरे बहुतेक ही नर्मदा माई होती ! परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते . ते काही नाही . जर तू माझ्यावर प्रसन्न असशील माझी परिक्रमा योग्य मार्गाने सुरू असेल तर कुठल्यातरी रूपाने समोर येऊन मला तसे सांगशील . किंवा माझ्यावर अप्रसन्न असशील आणि माझे काही चुकत असेल तर ते देखील समोर येऊन मला सांगशील . " मैया चे पाणी संथपणे वाहतच होते . अतिशय संथ प्रवाह हे या भागाचे वैशिष्ट्य आहे .जणू काही आपण एखाद्या व्यक्तीशी खूप काही बोलावे आणि तिने प्रतिसादच न द्यावा तसे मला ते वाटले . मी पुन्हा एकदा तावातावाने तिला म्हणालो , "हे पहा मैय्या , तू काही दर्शन देत नाहीस . आता तुला दर्शन द्यावेच लागेल . इथून पुढे माझ्यासमोर जी कुठली पहिली व्यक्ती येईल किंवा प्राणी येईल किंवा पक्षी येईल किंवा जीव जंतू येईल ते तुझेच स्वरूप आहे असे मानून मी नमस्कार करेन ! " असे म्हणत मी झपाझप चालू लागलो . माझ्या उजव्या हाताला एक मोठा खडक होता जो नर्मदा मातेमध्ये बुडालेला होता . त्याला वळसा मारून मी पुढे आलो आणि इतक्यात माझे लक्ष नर्मदा मातेच्या पात्रामध्ये गेले . एक सत्तरीच्या आसपास वय असलेला म्हातारा मनुष्य इथे बसलेला होता . त्याने पायामध्ये गडद निळ्या रंगाची फॉर्मल पॅन्ट घातलेली होती . अंगामध्ये भोकं पडलेलं बनियान होतं . एक फाटका रुमाल आणि एक आकाशी रंगाचा सदरा धुवून गवतावर वाळत टाकलेला होता .  या माणसाचा एक विचित्र प्रकार सुरू होता . त्याच्या हातामध्ये एक छोटासा कंगवा होता . तो हा कंगवा नर्मदा मातेच्या पाण्यामध्ये बुडवायचा आणि आपल्या केसांवरून फिरवायचा . असे करून त्याने आपले सर्व पांढरट झालेले केस उलटे वळवलेले होते . पुन्हा पुन्हा हा प्रकार सुरू होता . मनुष्य परिस्थितीने गरीब वाटत होता . माझ्याकडे बघितले आणि एकदम रागाने तो म्हातारा म्हणाला , " इधर आओ " मी त्याच्या जवळ गेलो . म्हातारा मला म्हणाला , " मुझे दस रुपये दे दो । चाय पीना है । " कमरेला बांधलेल्या शेल्यामुळे माझ्या छाटीच्या पोटामध्ये एक गप्पा तयार व्हायचा . कोणी काही वाटेत पैसे दिले तर मी तिथे ठेवून देत असे . नंतर मुक्कामी गेल्यावर ते तिथेच राहिले असतील ,म्हणजे पडून भिडून गेले नसतील तर काढून मी ते झोळीमध्ये ठेवत असे . अलीकडेच कोणीतरी मला चहा पिण्यासाठी दहा रुपयाची एक नोट दिली होती ती माझ्या पोटामध्ये होती . हा बरोबर ! माण नदी पार केल्यावर मी केवटाला पैसे देऊ केले होते . परंतु त्यानेच मला दहा रुपये दिले आणि म्हणाला , "चाय पी लेना बाबाजी । "
 तेच १० रु काढून मी म्हातारबुवाच्या हातावर टेकवले . आधीच म्हातारा मनुष्य आणि त्यात केसांची इतकी काळजी घेतो आहे हे पाहून मला थोडासा रागच आलेला होता . त्यात कंगवा नर्मदा मैया मध्ये धुतला जात असल्यामुळे मला अजून संताप आलेला होता . परंतु मी तो बोलून व्यक्त केला नाही . म्हाताऱ्याने दहा रुपये बाजूला ठेवले आणि मला म्हणाला , " मेरा बनियान फट गया है । मुझे नया बनियान लेना है । " "कितने का आता है नया बनियान ? " मी विचारले . " १६० रुपया " म्हातारा तत्परतेने उत्तरला . माझ्या लक्षात आले की पुढे नेमावर पर्यंत काहीही मिळणार नाही म्हणून चप्पल बूट खरेदी करण्यासाठी आपण बाजूला काढलेल्या तीनशे रुपयाला आता हात लागलेला आहे ! मी झोळी खाली काढली . त्यातले १६० रुपये काढले आणि त्याला दिले . म्हातारा लगेच म्हणाला , " मेरा रुमाल भी फट गया है । नया रुमाल खरीदना है । " मी त्याला माझ्या डोक्यावरचे पागोटे काढून दिले . आणि म्हणालो , " यह रखलो । इसमे से जितने चाहे रुमाल निकाल लेना । " माझा खरा हेतू त्याला रुमाल देण्याचा नसून उरलेले १४० रुपये वाचवण्याचा होता हे प्रामाणिकपणे सांगतो!  तेवढ्या पैशात किमान एखादी  स्लीपर तरी आली असती असे माझ्या डोक्यात होते .म्हातारा भडकला आणि म्हणाला , " तेरा रुमाल मेरे क्या काम का ? मुझे नया रुमाल ही चाहिये ! पैसा देना है तो दे । नही तो फुट । " मी नाईलाजाने त्याला विचारले , "कितने रुपये का आता है नया रुमाल ? " मला वाटले हा २० -३० रुपये सांगेल .परंतु हा म्हणाला "देडसौ का आता है । " मी त्याला म्हणालो , " इतने पैसे तो नही होंगे मेरे पास बाबा । " "देख लेना ,देख लेना तसल्ली से । मिल जायेगा पैसा । " मी १४० रुपये आधीच बाजूला काढलेले होतेच . तेच त्याला देऊन टाकले . आता माझ्याकडे शून्य रुपये शिल्लक राहिले होते . पैसे मिळाले की बाबा विचित्र हसायचा आणि पैसे खाली जमिनीवर टाकून द्यायचा . तेवढ्यात मी त्याची चौकशी करून घेतली . इथे जंगलात एकटा काय करतो आहे असे विचारल्यावर म्हातारा म्हणाला , " छोटी कसरावद मे बजार के लिए आया था । अभी वापस घर जा रहा हू । बैठे बैठे सोचा कपडे धोकर सुखाते है । " " ठीक है बाबा । नर्मदे हर । " असे म्हणत मी पुढे निघालो . इतक्यात मला काहीतरी आठवले आणि मी परत मागे आलो . आणि त्या म्हाताऱ्याला पाण्यातून पाय बाहेर काढायला सांगितले . तो म्हणाला कशाला पाय बाहेर काढू ? मी म्हणालो मला तुम्हाला नमस्कार करायचा आहे . म्हातारा म्हणाला नर्मदा माईला नमस्कार कर . मला नमस्कार करायची गरज नाही . त्याने शेवटपर्यंत पाण्यातून पाय बाहेर काढले नाहीत . मी तिथूनच त्याला नमस्कार केला आणि पुढे निघालो . म्हातारा जोरात ओरडला , " रुक ! भोसडीके ! पुरा पैसा यहा खाली करके जा ! " आता मात्र मला राग आला . "बाबाजी मेरे पास जितना पैसा था पुरा आपको दे दिया है । अब और पैसा कहा से लावू ? " म्हातारा म्हणाला तुझी झोळी खाली ठेव . आणि नीट पहा अजून कुठे पैसे आहेत का . मी देखील आज्ञाधारकपणे झोळी खाली ठेवली आणि सगळे कप्पे तपासले . एका कप्प्याच्या कोपऱ्यामध्ये दहा रुपयांच्या नोटेची एक छोटीशी पुरचुंडी होऊन पडलेली होती . ती माझ्या हाताला लागली . ती मी त्याला दाखवल्याबरोबर म्हातारा हसायला लागला ! "हां ! हाँ ! अब पुरा खाली हो गया ! चल भाग ! " त्याने दहा रुपयांची ती नोट पुन्हा जमिनीवर फेकून दिली . मी पुन्हा एकदा म्हाताऱ्याला नमस्कार केला . मला म्हाताऱ्याचा राग येत होता परंतु तरी देखील मी त्याला नमस्कार का करतो आहे हेच मला कळत नव्हते . आपोआप नमस्कार घडत होता . बहुतेक मी आधी जे वाक्य बोललो होतो त्याचा हा परिणाम असावा . न जाणो कुठल्या रूपात कोण दर्शन देईल असाही एक सूक्ष्म विचार मनात होताच . हा शूलपाणीच्या झाडीचा उत्तर तट होता . म्हणजे झाडी आता संपत आली होती . इथे पूर्वी परिक्रमावास्यांची लूट व्हायची तशी आपली देखील लूट पाट व्हावी अशी एक सूप्त इच्छा माझ्या मनामध्ये होती . ती अशा रीतीने माईने पूर्ण केली असे मला वाटले . चार पावले चालल्या बरोबर घडलेल्या प्रकारामुळे मला आलेला राग अनावर झाला . आणि मी दोन्ही पायातले बूट जोरात लाथा झाडत लांब एका शेताच्या दिशेने भिरकावून दिले . आणि ओरडून म्हणालो , " तुला माझ्या पायात नवीन चप्पल बघवत नाही ना ? हे घे ! तुझी पायताणे तुला परत ! मला काहीच नको . मी अनवाणीच बरा आहे ! "  असे म्हणून मी मागे वळून बघितले तो काय आश्चर्य ! त्या खडकाजवळ कोणीच नव्हते ! म्हातारा देखील नव्हता खाली पडलेले पैसे देखील नव्हते आणि त्याने वाळत घातलेले कपडे देखील नव्हते ! मी खडबडून जागा झालो ! भानावर आलो ! आणि माझ्या लक्षात आले की आपण किती मोठी संधी पुन्हा एकदा दवडली ! साक्षात मैया समोर आलेली होती ! परंतु तिला ओळखण्यामध्ये मी पुन्हा एकदा कमी पडलो ! यावेळी आनंदाची गोष्ट इतकीच होती की संकल्प केलेला असल्यामुळे किमान तिला नमस्कार तरी करता आला ! परंतु तरीदेखील एक खवट म्हातारा या दृष्टिकोनातूनच मी या व्यक्तीकडे पाहत होतो . मी जिथे उभा होतो तिथून केवळ दहा-पंधरा फुटावर म्हातारा बसलेला होता . त्यामुळे वाळत घातलेले कपडे घालून , पैसे गोळा करून , ते खिशात ठेवून पळून जाण्याइतपत वेळच त्याच्याकडे नव्हता . मला पुन्हा एकदा पश्चात्ताप झाला . अनुसंधान किती आवश्यक आहे याची जाणीव मला त्या क्षणी झाली . एक क्षणासाठी सुद्धा आपले अनुसंधान सुटले नाही पाहिजे ! काही सेकंदांपूर्वी मी नर्मदा मातेला जर म्हणत असेन  की आता पहिली व्यक्ती तुझ्या रूपात मला दर्शन देणार आहे , तर मला ती व्यक्ती समोर आल्यावर मनात विकल्प का बरं निर्माण व्हावा ? केवळ तीनशे रुपयांसाठी मी इतका त्रागा का करावा ? मी समोरच्या शेतात जाऊन फेकलेले बूट उचलले . ते आता पूर्ण फाटून गेले होते . मी नर्मदा मातेची क्षमा मागितली . ती ज्या जागेवर बसली होती तिथे साष्टांग नमस्कार केला आणि पुढे निघालो . वाटेमध्ये एका झाडावरती ते फाटके बूट लटकवून ठेवले .केवळ पंधरा मिनिटे अंतर चाललो असेन . डावीकडे एक मोठी पत्र्याची शेड दिसू लागली . शेडमध्ये दोन-तीन झोपाळे टांगलेले होते . इथे वरती मंदिर किंवा आश्रम आहे असे लक्षात आले . हे शुक्लेश्वर महादेवाचे तीर्थ होते .   वरती गेल्याबरोबर एका तरुण ओडिया साधूने स्वागत केले . हा परिक्रमेमध्ये असलेला युवक इथे सेवा देण्यासाठी थांबलेला होता . आल्या आल्या त्याने माझे पाय पाहिले . आणि म्हणाला , " बाबाजी आप नंगे  पैर चल रहे है क्या ? " "हा । मतलब नही । परंतु मेरे जूते फट गये थे । इसलिये कुछ समय से नंगे पाव चल रहा हु । " मी असे म्हटल्याबरोबर साधूच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली ! समोर असलेल्या पिंपळाच्या झाडाकडे हात करत तो मला म्हणाला , "कलही एक भगत आया था । उस पेड के नीचे नए जूते छोडके गया है । और बोल के गया है किसी परिक्रमावासी को दे देना । देख लेना । अगर तुम्हे हो रहे है तो ले लेना । " मी आश्चर्याने झाडाखाली गेलो . अगदी तंतोतंत माझ्या पायाच्या मापाचे ते बूट होते ! आणि नुसते बूट होते असे नव्हे तर ते अतिशय महागड्या आंतरराष्ट्रीय ब्रँडचे बूट होते . त्याचे बाजार मूल्य किमान ६००० ते ८००० असावे असा अंदाज मी बांधला .संपूर्ण परिक्रमेमध्ये मला मिळालेले सर्वात आरामदायक बूट तेच ठरले ! त्यांचा रंग देखील अतिशय आकर्षक असा फिकट हिरवा  अथवा सॅप ग्रीन होता . मला असे निसर्गाच्या जवळ जाणारे रंग खूप आवडतात .साधूने माझ्यासाठी चहा टाकला . तोपर्यंत झालेला प्रसंग आठवून माझ्या काळजाचे शरमेने पाणी पाणी झाले . चहाचा कप घेऊन मी झोपाळ्यावर जाऊन बसलो . पायामध्ये मैयाने दिलेले बूट होते ! त्याच ठिकाणी मी नर्मदा मातेकडे पाहत संकल्प केला ही उभ्या आयुष्यात पुन्हा कधीही स्वतःचे डोके लावून आर्थिक नियोजन करण्याच्या भानगडीत पडणार नाही ! मी इतका कर्मदरिद्री होतो की घेऊन घेऊन किती रुपयांची झेप घ्यावी तर तीनशे रुपयांची ! आणि इकडे नर्मदा मातेने माझ्यासाठी हजारो रुपयांचा ऐवज आधीच राखून ठेवलेला होता ! तोही आंतरराष्ट्रीय दर्जाचा ! जीवनामध्ये आपले असेच असते पहा ! भविष्याची अनिश्चितता किंवा भविष्याची चिंता म्हणून आपण काहीतरी छोटी मोठी साठवणूक , गुंतवणूक करायचा प्रयत्न करतो . परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र जगन्नियंत्याने म्हणा किंवा नर्मदा मातेने म्हणा , सर्व नियोजन आधीच लावून ठेवलेले असते . आपण उगाचच भविष्याची चिंता करत असतो . देणाऱ्याचा हात घेणाऱ्याच्या हातापेक्षा नेहमी मोठा असतो हे लक्षात ठेवावे ! त्यामुळे हात पसरण्यापेक्षा पदरात पडलेले गोळा करणे हे अधिक श्रेयस्कर ठरते . परमेश्वराला संपूर्ण शरण गेल्यावर जे आपल्या नशिबात आहे ते आपल्यापासून कोणीही ,कधीही , कुठेही ,कसेही व जराही काढून घेऊ शकत नाही ; ते तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच ! आणि जे तुम्हाला मिळू शकत नाही ते तुमचे कधीच नसते ! हे निर्विवाद सत्य आहे .
त्यामुळे भविष्याची चिंता न करता वर्तमानात चिंतन करावे हेच उत्तम !  

चिडी नदी अशा धबधब्याच्या स्वरूपात खाली उतरते आणि मग नर्मदा मातेला मिळते . 


हे महापूर नावाचे गाव असल्यामुळे इथल्या धबधब्याला महापूरचा धबधबा असे म्हणतात .


इथे एरव्ही खूप पाणी नसते परंतु पावसाळ्यात मात्र हा सर्व परिसर जलमय असतो .


इथे जवळच टेकडीवर एका साधूंचा आश्रम आहे .


या भागातील नर्मदा मैया खूप सुंदर आहे .

शुक्लेश्वर महादेव मंदिराच्या इथे काळभैरवनाथांचे देखील स्थान आहे .
शुक्लेश्वर महादेव चिडिया संगम महापुरा

श्री शुक्लेश्वर महादेव शिवलिंग


पुरातन मंदिराला आधुनिक साज चढविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो


काठावर स्मशानभूमी आहे .


इथे भरपूर लहान मोठे झोपाळे टांगलेले असून त्यावर बसायला खूप मजा येते !


ही मोठी शेड आपले स्वागत करते


याच ठिकाणी मला नवीन बूट प्राप्त झाले ! 

मंदिर उंच टेकडीवर आहे

जुन्या शेडचे पत्रे फाटायला आलेले आहेत . 


चिडी नदी व नर्मदा मैया दोघींचे पात्र एवढ्या भागात खडकाळ आहे


या भागात काढलेली नर्मदा मातेची काही अप्रतिम चित्रे सापडली ती आपल्या दर्शनासाठी सोबत जोडत आहे .



उडिया तरुण साधू अतिशय सात्विक होता . त्याच्याशी काही काळ सत्संग केला . आश्रम मोठा होता . परंतु पुढे चालता येणे शक्य आहे असे लक्षात आल्यामुळे मी पुढे चालू लागलो . पायात आलेल्या नवीन पादत्राणामुळे जणूकाही पायात नवीन त्राणच आलेले होते ! अतिशय वेगाने चालत मी चिडी नदीचा अर्थात चिडिया संगम ओलांडला . इथे नदीच्या काठाने थोडेसे आत चालत गेल्यावर खडकांमध्ये तयार झालेला एक सुंदर धबधबा होता . अर्थात चिडी नदी या धबधब्यावरून उडी मारून नर्मदा मातेला येऊन मिळते . पावसाळ्यामध्ये हा धबधबा पार करता येणे अशक्य असते . परंतु मी गेलो तेव्हा मात्र सहज नदी ओलांडण्यासारखी जागा मला मिळाली . यानंतर काठावरती अतिशय घनदाट असे जंगल होते . पुढे गोगावा नावाच्या गावातून काठा काठानेच पुढे आलो . यानंतर सुलगाव लागले . इथे हनुमंताचे मंदिर आहे . नर्मदा मैया आणि भिलट देवाचे मंदिर पण आहे . परंतु दिवस मावळायला लागला होता . त्यामुळे मी हनुमंताचे दर्शन घेऊन पुढे निघालो . 
हनुमान मूर्ती
हनुमान मंदिराचा परिसर
हेच ते हनुमान मंदिर

इथून पुढे खतडगाव नावाच्या गावामध्ये अविमुक्तेश्वरानंद महादेवाचे मंदिर होते . तिथे मुक्काम करावा असे मला वाटेतील लोकांनी सुचवले . इथे प्रेमानंद नावाचे एक अतिशय तेजस्वी ब्रह्मचारी महाराज राहत होते .त्यांनीच या क्षेत्राचा विकास केला आहे असे ग्रामस्थांनी मला सांगितले . आश्रमामध्ये जाण्यापूर्वी मी नर्मदा मैया मध्ये स्नान करण्याचे ठरवले . आणि माझा तो निर्णय अतिशय योग्य ठरला ! कारण खतडगाव या गावांमध्ये नर्मदा मातेचे जितके शुद्ध आणि स्वच्छ पाणी मी पाहिले तेवढे उभ्या परिक्रमेमध्ये कुठल्याच तीर्थक्षेत्रात पाहिले नाही ! वरून खाली बघितले की पायाची नखे सुद्धा दिसायची ! पायाखाली असलेला बारीक वाळूचा कण सुद्धा उभ्या उभ्या डोळ्यांनी दिसायचा इतके पाणी स्वच्छ होते !  इथे नैसर्गिक रित्या दगडांची अशी रचना तयार झालेली होती की दोन मोठे पाच पाच फूट खोलीचे जलतरण तलाव जणूकाही मैयाच्या काठावर तयार झालेले होते ! इथे काही लहान मुले पाण्याला घाबरून काठावर डुंबत बसली होती . यातील नंदू नावाचा एक मुलगा आणि त्याच्या दोन-तीन मित्रांना मी पाण्यात पोहायला शिकवले . म्हणजे मी स्वतः पोहलो नाही परंतु त्यांना सूचना दिल्या आणि त्यांची भीती घालवली . स्नानाचा इतका अप्रतिम आनंद कुठेच मिळाला नव्हता इतका तो घाट लक्षात राहिला ! इथे नर्मदा मैया च्या काठा जवळ एक तरुण मनुष्य छाती एवढ्या पाण्यात उभा असलेला मला दिसला . बराच वेळ मी पाहिले तो तिथेच उभा होता . मी दगडांचा मधला उंचवटा ओलांडून खोल भागामध्ये स्नान करत होतो . तिथे काही व्यापारी तरुण भेटले त्यांच्याशी गप्पा मारल्या . माझे लक्ष राहून राहून त्या तरुणाकडे जात होते . शेवटी न रहावून मी त्याच्याकडे आलो .अतिशय मजबूत शरीरयष्टी असलेला हा तरुण न पोहता नुसता उभा का आहे हा प्रश्न मला पडला होता . मी त्याला विचारले की तो असा का उभा आहे ? त्यांनी जे सांगितले ते ऐकून माझी मती कुंठित झाली ! साधारण ४० वय वर्ष असलेला सुनील सोलंकी नावाचा हा तरुण होता . हा दररोज नर्मदा मातेमध्ये स्नान करायचा . जन्मापासून त्याचा हा नियम होता . एक दिवस त्याला अचानक लकवा मारला  . अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे त्याच्या शरीराची अर्धी बाजू लुळी पडली . डॉक्टरांनी सांगितले की हा फार तीव्र झटका आलेला असून यातून बाहेर पडता येणे आता अशक्य आहे . सुनील सोलंकीला असे सांगायचे होते की मला नर्मदा मातेकडे घेऊन चला . परंतु त्याची जीभच लुळी पडल्यामुळे बोलता येत नव्हते . शेवटी याने मध्यरात्री सर्वांचे लक्ष चुकवून थेट नर्मदा मातेकडे कूच केली . त्याला माहिती होते की नर्मदा मातेमध्ये स्नान केल्यावर त्याचा हा रोग दूर होणार आहे . आता तो उभा होता त्या ठिकाणी येऊन तो छाती एवढ्या पाण्यात उभा राहिला . कल्पना करून पहा ! इथे पाण्याची पातळी वर खाली होत असते . ओंकारेश्वर धरणातून पाणी सोडले की इथले पाणी अचानक पाच-सहा फूट वर जाते ! आणि याला तर पोहता देखील येत नव्हते कारण हात पाय लुळे पडले होते ! परंतु याला १००% खात्री होती की नर्मदा मैयाच आपल्याला या संकटातून बाहेर काढू शकते . तोंडाने बोलता येत नव्हते परंतु याने मनोमन नर्मदा मातेला प्रार्थना केली की तू मला बरे केले पाहिजेस तोपर्यंत मी पाण्यातून बाहेरच येणार नाही . आणि आश्चर्य म्हणजे त्याचा ८०% त्रास त्याच रात्री नष्ट झाला ! "मग पुढे काय झाले ? " मी उत्कंठेने विचारले . "तुम्हाला बोलता येऊ लागले की नाही ? " सुनील सोलंकी म्हणाला हे काय मी आत्ता बोलतो आहे की तुमच्याशी ! "म्हणजे ? कधीची घटना आहे ही ? " आश्चर्याने मी विचारले . ही घटना मागच्याच पंधरवड्यात घडली होती हे ऐकल्यावर मात्र माझ्या आनंदाला आणि आश्चर्याला पारावार उरला नाही ! केवळ दहापंधरा दिवसापूर्वी आधुनिक वैद्यकशास्त्राने जगण्यास नालायक सिद्ध केलेला एक मनुष्य माझ्यासमोर स्वतःच्या मुखाने त्याची कथा सांगत होता ! आणि आता तो जवळपास पूर्ण बरा झालेला होता ! तेव्हापासून तो दिवसातील अधिकाधिक काळ नर्मदा मैया च्या पात्रामध्ये असा बसून राहायचा ! आता सुद्धा अंधार पडू लागला होता परंतु सुनील काही पाण्यातून बाहेर आला नाही . शेवटी मी बाहेर पडलो आणि अविमुक्तेश्वराकडे धाव घेतली . मी मंदिरात पोहोचलो आणि माझ्या असे लक्षात आले की इथे आज एका लग्नाचे आयोजन करण्यात आलेले आहे ! गावातील सर्व चुली आज बंद होत्या ! परंतु परिक्रमावासीने लग्नासमारंभाचे जेवायचे नसते असे मला काही साधूंनी सांगितले होते .  कारण या सर्व विधींमध्ये नांदी श्राद्ध नावाचा एक विधी केलेला असतो . लग्न मुंज वास्तुशांती किंवा अन्य मोठे मोठे धार्मिक कार्यक्रम करण्यापूर्वी यजमानांच्या पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी नांदी श्राद्ध केले जाते . त्यांची (पितरांची )प्रार्थना केली जाते की त्यांच्या सर्व अपूर्ण इच्छा या अन्नामध्ये उतरून ते अन्न सेवन करणाऱ्या पाहुण्यांच्या हातून त्या पूर्ण व्हाव्यात ! आणि त्यासाठी अन्नदान केले जाते . आता कोणाच्या पूर्वजांची नक्की काय इच्छा आहे हे आपल्याला सांगता येत नाही . म्हणून शहाण्या माणसाने अशा ठिकाणी जेऊ नये असे माझे गुरु देखील मला सांगायचे . त्यामुळे हा नियम मी अगदी काटेकोर पाळत आलेलो होतो . अगदी स्वतःच्या लग्नात , स्वतःच्या घराच्या वास्तुशांतीत देखील मी जेवलो नव्हतो . याउलट एखाद्या संतांचे क्रियाकर्म असेल तर मात्र न बोलवता देखील जावे व त्यांचे तिथीचे अन्न जेवावे असे माझे गुरु सांगत . कारण जीवन मुक्त महात्म्यांची शेवटची इच्छा एकच असते .सर्व जीवमात्रांचे कल्याण व्हावे ! ती इच्छा आपल्या हातून पूर्ण होण्याची शक्यता त्यामुळे वाढते ! इथे असलेले प्रेमानंद साधू मोठे विद्वान होते . त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात या तीर्थक्षेत्राचा विकास केलेला होता . विशेषतः त्यांनी या संपूर्ण मंदिरामध्ये ५० लाख रुपयांचे रुद्राक्ष आणून मंदिर सजवले होते ! या संपूर्ण मंदिरात कुठेही पहा सर्वत्र रुद्राक्षच रुद्राक्ष दिसायचे !  खरे तर ही टाटंबरी बाबांची तपोभूमी होती . त्यांचे देखील मोठे स्थान या महात्म्याने निर्माण केले होते . टाट म्हणजे पोते किंवा गोणपाट . या टाटाचे अंबर अर्थात वस्त्र घालणारे म्हणून त्यांचे नाव टाटंबरी बाबा होते . यांच्याकडे अशी सिद्धी होती की ते खापरा खालून अन्न काढायचे ! कितीही लोक आले तरी त्यांच्या खापरा खालून निघालेल्या अन्नामुळे जेवण कधी कमी पडायचे नाही ! शूलपाणीच्या दक्षिण तटावर मला भेटलेला मनोज कुमार नावाचा मंगलोर चा कानडी साधू देखील इथे मी आंघोळ करतानाच आलेला होता . त्याला देखील मी आवाज देऊन थांबवून घेतले होते .
मंदिराची अतिशय सुंदर अशी पूजा व्यवस्था व शिस्त महाराजांनी लावलेली होती . एकंदर त्यांची सगुण पूजेची पद्धत पाहता ते मूळचे दक्षिण भारतीय असावेत असा अंदाज मी मनोमन लावला . इथले सेवक खूप दयाळू होते . लग्नासाठी शेकडो लोक जमलेले असून देखील त्यांनी आमच्या दोघांसाठी थोडीशी बटाट्याची भाजी आणि खिचडी केली .  रात्रभर लग्नाचा गोंधळ सुरू राहिला . मी एका कोपऱ्यामध्ये जाऊन आसन लावून झोपून टाकले . संसारीकांचा गोंधळ पाहायला नको वाटत असे ! रात्री प्रेमानंद महाराज आले . त्यांनी आवर्जून माझी चौकशी केली . मी त्यांनी केलेल्या या जिर्णोद्धाराबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले व तोंडभरून कौतुक केले . त्यांच्यातला साधू अखंड जागृत होता हे पाहून मला फार बरे वाटले . सर्व काही करून हा महात्मा कशातच नव्हता . हेच खऱ्या साधूचे लक्षण आहे .  रात्रभर नाच गाण्यांचा कार्यक्रम सुरू राहिला . महादेवांच्या समोर थोडी स्तुती पर कवने गाऊन मी निद्रादेवीचा आश्रय घेतला . 

अविमुक्तेश्वर अथवा अभिमुक्तेश्वर महादेवांची प्रेमानंद ब्रह्मचारी महाराजांनी मांडलेली अति उत्कृष्ट पूजा


मंदिराच्या बाहेर मोठे सिंह होते आणि जिकडे पहावे तिकडे रुद्राक्ष लटकवलेले होते
अगदी मंदिराचा सभामंडप देखील नेपाळवरून आणलेल्या रुद्राक्षांनी सजविण्यात आलेला होता
मंदिराचे सुंदर व रेखीव कळस
टाटंबर बाबांची खोली तर संपूर्णपणे रुद्राक्षमय करण्यात आली होती आणि त्यांची मूर्ती देखील जिवंत भासत होती !
दक्षिणात्यशैलीने भरगच्च सगुण पूजा करण्याची प्रथा प्रेमानंद ब्रह्मचारी महाराजांनी पाडलेली दिसते

हे मंदिर आणि त्याचा स्वच्छ सुंदर नीटनेटका परिसर कायम लक्षात राहील . 


सकाळी लवकर उठलो आणि मला सुनील सोलंकी याने बालभोग घेण्यासाठी घरी येण्याचे दिलेले आमंत्रण आठवले . मी गावातून विचारत विचारत त्याचे घर शोधून काढले . मी घरी येणार याची त्याला एवढी खात्री होती की त्याने बालभोग वगैरे सर्व सिद्धता करून ठेवली होती आणि सडा रांगोळी घालून ठेवली होती . मी आल्याबरोबर त्याच्या पत्नीने औक्षण वगैरे केले आणि मग मी बालभोग घेतला . मुळात अर्धांगवायूच्या झटक्यातून बाहेर येणे किती सोपे किंवा अवघड असते हेच त्या दोघांना माहिती नसल्यामुळे त्यांना हा किती मोठा चमत्कार घडलेला आहे याचीच कल्पना नव्हती . मी जेव्हा काही उदाहरणांसह त्यांना हा चमत्कार कसा आहे हे समजावून सांगितले तेव्हा दोघांच्या डोळ्यातून अखंड अश्रू धारा वाहू लागल्या . मला नर्मदा मातेमध्ये सापडलेली दोन अतिशय सुंदर अशी शिवलिंगे मी त्या दोघांना देऊन टाकली . या लिंगांची आमरण पूजा करू असे आश्वासन त्या दोघांनी मला दिले . सुनीलला एक मुलगा आणि एक मुलगी होते व दोघेही खूप हुशार आणि चुणचुणित होते . सुंदर असे चहा पोहे घेऊन मी पुढचा मार्ग धरला .इथून पुढे हतनावर नावाचे गाव लागते . इथे दारुकेश्वर महादेवाचे मंदिर आहे . राम मंदिर देखील आहे . परंतु माझ्यासाठी अत्यंत दुःखद अशी एक गोष्ट आता घडणार होती . इथून खलघाट आणि महेश्वर ही तीर्थक्षेत्रे अतिशय थोड्या अंतरावर असली तरी देखील विनोदाने म्हणायचे झाल्यास  केवळ राणी रूपमती नावाच्या एका महिलेच्या प्रतापामुळे मला नर्मदा मैया चा किनारा सोडावा लागणार होता ! रुपमती नावाची एक राणी होती . ती इथून ३०-४० किलोमीटर दूर असलेल्या मांडव गडावर राहायची . आणि तिथून रोज नर्मदा मातेमध्ये स्नाना साठी यायची . पुढे काही कारणामुळे तिला येणे जमले नाही तेव्हा स्वतः नर्मदा माता तिच्या किल्ल्यावर प्रकट झाली अशी दंतकथा आहे ! ती ज्या ठिकाणी प्रकट झाली ते नर्मदा कुंड किंवा रेवा कुंड आजही मंडू गडावर किंवा मांडव किल्ल्यावर पाहायला मिळते . हे ओलांडल्यास परिक्रमा खंडित झाल्याचे मानले जाते त्यामुळे बहुतांश परिक्रमावासी मांडवगडावर जाऊन मगच पुन्हा नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर येतात . त्यासाठी किनारा सोडण्याचे ठिकाण आता आले होते ! हे खुजावा नावाचे गाव होते . इथे खुज किंवा  कुब्जा नावाच्या नदीचा नर्मदा माते सोबत संगम झालेला होता . इथून मांडवगडापर्यंत जाण्यासाठी पूर्वी भुयार होते असे लोक सांगतात . आणि ते शक्य आहे कारण इथे सर्वत्र अखंड पाषाण असलेला पाहायला मिळतो .  अगदी खूप ज्या नदीचे पात्र देखील पाषाणांनी भरलेले आहे . किंबहुना एक अखंड पाषाणच आहे असे म्हटले तरी चालेल . इथे दगडात कोरलेली अनेक सुंदर मंदिरे पाहायला मिळतात . पर्यटकांनी अवश्य येऊन पहावे असे हे गाव आहे . हे एक अतिशय पौराणिक स्थान आहे . इथे बरोबर समोर बिल्वाम्लकतीर्थ आहे . याला जहागीरदार असे देखील म्हणतात . कारण हा सर्व राजांचा राजा आहे अशी मान्यता आहे . त्यामुळे आजवर कोणीही राजकारणी व्यक्ती इथे आलेला नाही . जो इथे येतो त्याचे राज्य निघून जाते अशी मान्यता आहे . आणि तसे अनुभव लोकांनी घेतलेले आहेत . समोरच मी मुक्काम केलेले ग्यारहलिंगी दिसत होते आणि तिथला बालकदास महाराजांचा आश्रम देखील दिसत होता . कुब्जा नदीच्या संगमावर सर्वत्र खडकच खडक आहे . इथे पूर्वी अमर कुंड होते .ते आता मोठ्या दगडाने झाकलेले आहे असे सांगतात . सात मातृका देखील आहेत . या सप्तमातृकांच्या इथूनच मांडवगडापर्यंत भुयार होते असे सांगतात . आता जे पूर्णपणे बुजलेले आहे . इथे संगमावर काही मंदिरे होती . ती जशीच्या तशी वरती हलवण्यात आलेली आहेत व खूप सुंदर रीतीने पुनर्स्थापित करण्यात आलेली आहेत .अवश्य बघावा असा हा परिसर आहे . इथे दहा-पंधरा फूट उंचीच्या तीन भव्य दिव्य मूर्ती आहेत .  एक विष्णूची आहे . एक कृष्णाची आहे व एक प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसलेल्या नृसिंह भगवंताची मूर्ती आहे . शेजारी दुर्गा मंदिर आहे .  त्यावर धनुर्धारी रामाची अप्रतिम मूर्ती कोरलेली आहे . सर्व मंदिरे पुरातन आहेत . मी हे सर्व पाहत असताना समोरच राहणारा एक तरुण मुलगा मला बघून तिथे आला . आणि त्याने माझे भरपूर फोटो काढले . नंतर घरी चहाला घेऊन गेला . हा केवट समाजाचा मुलगा होता . त्याने मला या परिसराची भरपूर माहिती दिली . 
जुन्या कुब्जा नर्मदा संगमातून विस्थापित करण्यात आलेली पुरातन मंदिरे

या मूर्तीची भव्यता फोटो मध्ये पकडता येणे कठीण आहे

अतिशय सुंदर सुबक व कोरीव अशा या मूर्ती आहेत परंतु मूर्ती भंजकांनी त्यांचा पुरता विध्वंस केलेला आहे

मूर्तींवर उगवलेले वर्ड पिंपळ उपटण्याचे साधे काम देखील पुरातत्व खाते करत नाही आहे . आणि पाहणारे प्रेक्षण देखील करत नाहीत . मी कुठल्याही मंदिरात गेल्यावर छोटा वड किंवा पिंपळ उगवलेला दिसल्यावर तत्काळ उपटून टाकतो

जुनी मंदिरे विस्थापित करताना अशा पद्धतीने दगडांना आकडे देण्यात आले होते त्यामुळे मंदीर पुन्हा जोडणे फार सोपे होऊन गेले

इथल्या प्रत्येक वास्तूच्या प्रत्येक दगडावर आपल्याला असे आकडे टाकलेले दिसतात

इथे असलेले शिवलिंग देखील भव्य आणि सुंदर आहे

दुर्गा मातेच्या मंदिराच्या भिंतीवर कोरलेली रामरायाची धनुष्य ताणलेली हीच सुंदर मूर्ती जिचा मूर्ती भंजकांनी विध्वंस केलेला आहे

गणरायाची गमतीदार मूर्ती
इथल्या सर्वच मूर्ती अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने घडविण्यात आलेल्या आहेत
मंदिर परिसर पाहता व त्याचा विस्तार पाहता आताच्या काळातील आधुनिक तुकडे गल्लीबोळयुक्त रस्ते आपण अजूनही किती मागे आहोत हेच दाखवतात
अशी अनेक मंदिरे येथे आहेत
मंदिरांचे कोरीव काम केवळ अप्रतिम आहे
या सर्व मूर्तींमध्ये मला विशेष भावली ती नरसिंहाची प्रल्हादावर प्रेम करणारी मूर्ती कारण आजपर्यंत आपण नरसिंहाचे कृद्ध स्वरूप पाहिलेले आहे ज्यामध्ये तो हिरण्यकश्यपूला फाडत असतो

शिवालय
नृसिंह प्रल्हादाची सुंदर मूर्ती . इतकी सुंदर मूर्ती तोडणाऱ्या मूर्ती भंजकांचे काय करावे ?



विष्णूचा भव्य दिव्य व सुंदर विग्रह
ही मूर्ती इतकी मोठी आहे की खूप दुरून सुद्धा दिसते


कुब्जा नर्मदा संगम . हा धबधबा पावसाळ्यामध्ये खूप छान दिसतो . इथूनच मांडवगडावर जाण्यासाठी भुयारी मार्ग होता . 
कुब्जा संगमावर असलेल्या रामरायाच्या मूर्ती सारखी धनुष्य ताणल्याची कृती करताना प्रस्तुत लेखक ! हे केवटाच्या मुलाचे डोके होते ! 
गावात नृसिंहाचा विग्रह आहे . तो आवर्जून पहा असे त्याने मला सांगितले .मी बाहेरून घरासारख्या दिसणाऱ्या नृसिंह मंदिरामध्ये गेलो . इथे १३०० च्या आसपास संत रामदास नावाचे मोठे संत राहत होते . त्यांना त्या नृसिंहाच्या मुखातून रोज एक सोन्याचे नाणे मिळत असे . रामदास महाराज हे प्रपंचामध्ये अतिशय समाधानी होते आणि त्यांची संपूर्ण दिनचर्या केवळ परमेश्वराच्या भजन पूजनामध्ये जात असे . परमेश्वराने प्रसन्न होऊन त्यांना हा वर दिला होता . त्यामुळे त्यांना प्रपंचासाठी वेगळे काही सुवर्ण गोळा करण्याची गरज पडू नये असा भावार्थ ! कारण रामदास बाबांची पूजा घेतल्याशिवाय देवाला सुद्धा बरे वाटत नसे ! पुढे रामदास महाराजांना तीर्थयात्रेला जायचे होते तेव्हा त्यांनी आपल्या एका शिष्याला तिथे बसवले आणि त्याला सांगितले की त्याने या शालिग्राम रुपी नरसिंहविग्रहाची पूजा करावी . महाराज निघून गेल्यावर काही दिवसातच शिष्याला लोभ सुटला आणि त्याने विचार केला की आपण जर हा विग्रह फोडून पाहिला तर आपल्याला खूप सोन्याची नाणी मिळतील ! त्यामुळे त्याने जमिनीवर आपटून या विग्रहाचे दोन तुकडे केले . त्यातून सोन्याची नाणी काही निघाली नाहीत मात्र आता आपले काय होणार या भीतीने त्याला ग्रासले आणि त्याने नदीमध्ये ते दोन्ही तुकडे टाकून दिले आणि पळून गेला . इकडे तीर्थयात्रेमध्ये असलेल्या रामदास महाराजांना स्वप्नामध्ये हा सर्व दृष्टांत दिसला आणि ते परत आले आणि मोठ्या कष्टपूर्वक नावाड्यांच्या मदतीने त्यांनी ती मूर्ती शोधून काढली. भग्नविग्रह पाहून बुवा व्यथित झाले आणि देवांना म्हणाले तुम्ही जर पूर्ववत व्हाल तर मी तत्काळ संजीवन समाधी घेईन .  व तसेच झाले ! तो विग्रह पुन्हा एकदा चिकटून एकसंध झाला आणि त्याच क्षणी रामदास महाराजांनी त्याच ठिकाणी समाधी घेतली . ती समाधी आणि तो विग्रह या दोघांचे दर्शन मला झाले ! मंदिरामध्ये राहणाऱ्या रामदास महाराजांच्या वंशज यांनी ही सर्व कथा मला सांगितली आणि मला बालभोग व चहा दिला . या मंदिराच्या दर्शनासाठी कोणीही परिक्रमावासी येत नाही हे देखील त्यांनी मला सांगितले . रामदास महाराजांची समाधी अतिशय जागृत होती . महाराजांची चौतिसावी पिढी सध्या सुरू आहे . मंदिराचा वाडा जुनाच आहे . व नवीन मंदिर बांधलेले आहे . 
नृसिंह मंदिराकडे जाताना वाटेत लागणारे मारुतीचे मंदिर . इथला मारुती खूप भव्य दिव्य आहे
नरसिंह मंदिर

बाहेरून पाहिल्यावर हे समाधी मंदिर आहे वगैरे काही लक्षात येत नाही .
गावातला मारुती देखील जुना आणि अतिशय भव्य दिव्य आहे .पुढे राम धाम आश्रम आहे .इथे रामाची सुंदर मूर्ती आहे .एक तरुण साधू महंत व्यवस्था पाहतात .काही वयस्कर साधू देखील इथे राहतात . तिथून चार घास पोटात ढकलून मी पुढे निघालो .
रामधाम आश्रमातील महादेव

रामधाम आश्रम असा एकटाच दूरवर पहुडलेला आहे

आश्रमाचे तरुण महंत
आश्रमातील रामरायाच्या सुंदर मूर्ती
रामाचे मंदिर
गावातून दिसणारी खूज अथवा कुब्जा नदी आणि तिच्या पलीकडे असलेले धर्मपुरी शहर

 इथून पुढे मात्र नर्मदा मैया चा काठ सुटला याचे अतोनात दुःख मला झाले .रस्त्याने चालत चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडव पर्यंत आता जावे लागणार होते . या गावांमध्ये यवनांची मोठी संख्या होती . वाटेमध्ये असलेल्या धरम काट्यावर वजन केले असता १२० किलो भरले ! मला आठवत होते त्याप्रमाणे परिक्रमेला सुरुवात केली तेव्हा सामानासकट माझे वजन १०० किलो होते . जे पुढे ९० किलो झाले होते ! परंतु मी गोळा केलेली शिवलिंगे आणि धनुष्यबाण वगैरे सर्व मिळून माझे वजन सामानासकट १२० किलो झालेले होते ! याचा अर्थ माझ्या पाठीवर सुमारे २५ ते ३० किलो वजनाची झोळी होती ! ही झोळी घेऊन आता मला मांडवगड नावाचा प्रचंड किल्ला चढायचा होता ! दुःख किल्ला चढण्याचे नव्हते परंतु नर्मदा मातेचा किनारा सुटला याचे अतोनात दुःख प्रत्येक पावलाला मला जाणवत राहिले . तिची उणीव प्रत्येक पावलाला भासायची आणि ती तिच्या नामस्मरणाने मी कमी करायचा प्रयत्न करायचो . नाम आणि रूप हे एकमेकांना बांधलेले असते ! नरेंद्र मोदी म्हटल्यावर आपल्याला एक विशिष्ट रूप आठवते . महात्मा गांधी म्हटल्यावर देखील एक विशिष्ट व्यक्ती आठवते . राहुल गांधी म्हणल्यावर आपल्याला महात्मा गांधी आठवत नाहीत . आणि महात्मा गांधी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर प्रियांका गांधी येऊ शकत नाही . तात्पर्य नाम आणि रूप यांची एक अखंड जोडी असते . त्यामुळे जेव्हा रूप समोर नसेल तेव्हा नामाचा आश्रय घ्यायला हरकत नाही ! नर्मदे हर ! 
 



लेखांक एकशे सदतीस  समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर