लेखांक १३८ : काली बावडीच्या बडी छितरी आश्रमातली आम्रानुभव !

खुजावापासून नर्मदा मैया चा किनारा सुटला . आता रस्त्याने चालत चाळीस किलोमीटर दूर असलेल्या मांडवगडापर्यंत जायचे होते .या परिसरामध्ये यवन खूप मोठ्या संख्येने होते .जाणवण्या इतपत त्यांची संख्या आणि व्यावसायिक प्राबल्य होते .इथे एक धरमकाटा होता , त्यावर वजन करायचे ठरवले . ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की धरम काटा म्हणजे सामानासहित , भरलेल्या मालासहित ट्रकचे वजन करणारा एक मोठा वजनकाटा असतो . एक मोठा लोखंडाचा रॅम्प असतो ज्यावर ट्रक उभा करायचा असतो . आणि डिजिटल काट्यावर तुमचे वजन कळते . या का  या काट्यावर खरे म्हणजे माणसाचे वजन करू नये . परंतु तरीदेखील दहा किलो पर्यंत अचूकता याच्यामध्ये येते . याचा अर्थ आलेल्या वजनापेक्षा दहा किलो कमी किंवा दहा किलो जास्त इतकाच फरक राहतो . धरम काट्यावर माझे वजन सामानासह १२० किलो भरले ! परिक्रमेला सुरुवात केली तेव्हा सामानासह माझे वजन १०० किलो भरले होते आणि पुढे ते ९० किलो झाले होते परंतु धनुष्यबाण आणि सोबत असलेले नर्मदा मैया मधील बाण यांच्यामुळे पुन्हा एकदा वजन १२० ला टेकले ! अर्थात माझे वजन कमी कमीच होत चालले होते परंतु पाठीवरील भार मात्र प्रचंड वाढत चालला होता . विशेष म्हणजे त्यामध्ये कपडे वगैरे काहीच नसून केवळ बाण लिंगांचे ते वजन होते ! त्यामुळे ज्यांना ज्यांना मी परिक्रमेवरून आल्यावर शिवलिंगे वाटली होती त्यातील बहुतांश शिवलिंगे ही बरीच परिक्रमा फिरून आलेली आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे ! असो . इथे एका दुकानदाराने मला केळी दिली . ती स्वीकारून पुढे पगारा गावाच्या दिशेने चालू लागलो . इथे वाटेमध्ये एक खूप सुंदर गणेश मंदिर आहे . पुरातन मंदिर आहे . इथे बसून काही काळ गणेशाची आराधना केली . इथले महंत थांब म्हणून आग्रह करत होते . परंतु पुढे चालावे अशी इच्छा आतून होत होती त्यामुळे त्यांना विनम्र नकार देत पुढे निघालो . 

हे गणपती मंदिर लक्षात राहिले ते मुख्यत्वे करून तिथे असलेल्या झाडांमुळे !


इथे महादेवाची पिंड देखील स्थापित केलेली होती

सर्वच झाडांना सुरेख पार आणि रंगरंगोटी करण्यात आली होती

इथल्या स्थानिक पद्धती नुसार गणपतीची देखील रंगरंगोटी केली जाते !
मंदिर सुरेख आणि भव्य आहे
मंदिर परिसरात खूप झाडे लावण्यात आलेली आहेत
मंदिराचे कुंपण देखील सुंदर आणि सुशोभित आहे
अगदी रस्त्यावर असलेले हे मंदिर टाळून कोणीही पुढे जाऊ शकत नाही इतका हा परिसर आकर्षक आहे
मी वक्रतुंड गणेशाचे असे शेंदूर लेपीत ध्यान पाहिले
वक्रतुंड गणेशा पुढे त्याचे वाहन मूषक देखील स्थापित करण्यात आलेला आहे .
मध्ये पिपल्या गुट हे गाव ओलांडले . सर्व रस्ते कच्चेच होते . या गावामध्ये गावाच्या बाहेर घनदाट झाडीमध्ये हनुमंताचे एक प्राचीन मंदिर होते . इथे एक साधू काही भगत मंडळींसोबत गांजा पीत बसले होते . त्यांनी मला चहा पिण्यासाठी बसवून घेतले आणि बराच वेळ त्यांचा गांजा पिण्याचा कार्यक्रम बघण्याची पाळी माझ्यावर आली ! या साधूंनी गावातील लहान मुलांना देखील गांजा पिण्याची सवय लावली होती हे पाहून मनोमन थोडेसे वाईट वाटले . तिथे सेवा करणाऱ्या लहान मुलांना जाता येता एक कश मारण्याची आज्ञा ते करायचे . बोलण्याची काही सोय नव्हती कारण सर्वच लोक गांजा ओढण्यामध्ये गढलेले होते . शेवटी कसा बसा चहा पिऊन जंगलातल्या शेतातल्या रस्त्याने पुढे वाटचाल चालू केली .
पिपल्या गुट गावाच्या बाहेर असलेला जंगलातील प्राचीन हनुमान मंदिर आश्रम .
 भरपूर चालून काली बावडी या गावामध्ये आलो . इथे एक ऐतिहासिक विहीर अथवा बावडी आहे ज्यावरून या गावाला हे नाव पडले आहे . मी आलो होतो गावाचा बाजाराचा दिवस होता त्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी होती . इथे किशोर कुमार राठोड नावाचे एक दुकानदार भेटले . त्यांनी मोठ्या आग्रहपूर्वक त्यांच्या किराणा दुकानामध्ये बोलावून नेले . मी पुण्याचा आहे हे कळल्यावर त्यांना विशेष आनंद झाला ! कारण ते पुण्याजवळ असलेल्या नारायणपूरच्या नारायण महाराजांचे अनुग्रहित होते ! मी मध्यंतरी माझ्या मित्रासोबत नारायणपूरची गुरुवारची वारी करायचो हे कळल्यावर त्यांना फारच आनंद वाटला . दिनेश रावल नावाचा हा माझा मित्र करोना च्या धामधुमीमध्ये देवा घरी गेला .त्याच्यासोबत मी अनेक गुरुवारची वारी केलेली आहे . कात्रज येथे राहणारे काही मित्र आहेत ते देखील ही वारी करायचे . त्यांच्यासोबत देखील मी जायचो . महाराजांनी नुकताच देह ठेवला असे कळाले . किशोर कुमार यांनी मोठ्या आग्रहाने मला शीतपेय पाजले . आता पुढे जाऊ नये . गावाच्या बाहेर असलेल्या आश्रमा मध्येच मुक्काम करावा असे त्यांनी मला सांगितले . बाजारातील भिल्लांची मजा पाहत पुढे चालू लागलो . या संपूर्ण परिसरामध्ये मावा गुटखा खाण्याचे फार मोठे व्यसन सर्वांना लागलेले आहे . अगदी लहान मुले मुली व महिला सुद्धा सर्रास गुटखा खाताना आणि सर्वत्र पचापचा थुंकताना दिसतात . इतका महाग गुटखा खाण्यामागचे खरे कारण काय हे अजूनही कळत नाही . एकंदरीत गुटखा खाणारा म्हणजे प्रतिष्ठित असा काहीतरी भ्रष्ट व भ्रमिष्ट समज या लोकांचा झालेला आढळतो . मला पक्के आठवते . मी लहानपणी माझ्या वडिलांना विचारले होते की गुटखा म्हणजे काय ? कारण त्यावेळी स्टार गुटखा माणिकचंद गुटखा यांच्या जाहिराती सर्वत्र झळकायच्या . त्यावर माझ्या वडिलांनी एका वाक्यात उत्तर दिले होते जे आजही माझ्या स्मरणात आहे . ते म्हणाले होते गुटखा या शब्दामध्ये ट सायलेंट आहे ! असा संस्कार जर प्रत्येक बालकावर झाला तर मला वाटत नाही कोणी गुटखा खाईल !  थोडेसे पुढे आल्यावर भैरवनाथाचे एक पुरातन मंदिर लागले . एका झाडाखाली भगव्या रंगाचे छोटेसे मंदिर दिसत होते . या मंदिरापेक्षा २० ते २५ पट मोठी मशीद या मंदिराचीच जमीन खाऊन बांधण्यात आलेली होती .गावकऱ्यांच्या नजरेसमोर हा सर्व खेळ उभा राहिला होता .परंतु सर्वधर्मसमभाव राखायचा म्हणून गावातील कोणी त्याला विरोध केला नाही . या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात यवनांची हालचाल दिसत होती . भैरवनाथ मंदिराशेजारी एक चहावाला होता त्याने मला चहा पाजला आणि बिस्किटे देखील दिली . हा बिचारा आदिवासी हिंदू होता . त्याने मला त्याच्या डोळ्यासमोर हे स्थान कसे भ्रष्ट झाले त्याचा इतिहास सांगितला . तसेच त्याने सांगितले की काली बावडी गावात फारसे मुसलमान नाहीत . परंतु धर्मपुरी येथून रोज नमाज पडायला शेकडो मुसलमान येथे येतात आणि शक्तिप्रदर्शन करतात . त्यामुळे गावातील आदिवासी हिंदू काही बोलत नाहीत . 
हाच तो कालीबावडी गावातील अतिपुरातन कालभैरवनाथ मंदिरावर अतिक्रमण करून बांधलेला दर्गा
काळभैरवनाथाचे केशरी मंदिर पाहिल्यावर तुम्हाला अतिक्रमणाच्या आकाराच्या पटीचा अंदाज यावा !
हजरत अब्दुल्ला शाह बियाबाणी असे दर्ग्याचे नाव आहे
दर्ग्याच्या भव्य आकारापुढे काळभैरवनाथाचे मंदिर अक्षरशः लपलेले व दबलेले आहे
इथे स्वाभाविकच हिंदूंना त्यांचे सण साजरे करण्यात मर्यादा येथे व अडचणी देखील येतात
लवकरच हे मंदिर नष्ट झाले अशी वार्ता आली तर आश्चर्य वाटणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे .

नकाशा मधून तर काळभैरवनाथाचे मंदिर गायबच करण्यात आलेले आहे

याच गावाच्या बाहेर गुप्त होण्याच्या मार्गावर असलेले गुप्तेश्वर महादेवाचे देखील एक मंदिर आहे जे पूर्णपणे जंगलाने व्यापलेले आहे . आदिवासी लोक जितके हिंदू धर्मापासून दूर जातील तितकी ही मंदिरे लवकर नष्ट होतील .


अंधार पडण्यापूर्वी बडी छितरी या गावात असलेल्या आश्रमामध्ये पोहोचलो . कच्च्या रस्त्याच्या उजव्या बाजूला एका समतल टेकाडावर हा आश्रम बांधण्यात आलेला होता . आश्रम अतिशय नीटनेटका व सुंदर होता . स्वामी देव नामक मूळच्या मुंबईकर तरुण असलेल्या तरुण आणि हसतमुख साधूने हा आश्रम चालविला होता . साधूने मुंबई पाहिलेली असल्यामुळे अर्धे जग पाहिले होते ! त्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यात एक वेगळा स्मार्टपणा होता . इथेच नरेश गीर नावाचे एक उत्तर भारतीय साधू सेवा देण्यासाठी थांबलेले होते . नर्मदानंद नावाचे एक संन्यासी देखील तिथे काही काळ मदतीसाठी थांबले होते जे मूळचे पश्चिम बंगालचे होते आणि पूर्वाश्रमीचे संघ प्रचारक राहिलेले होते . हे तीनही साधू पक्के साधू असल्यामुळे आश्रमातील वातावरण अतिशय खेळीमेळीचे आनंदाचे आणि शास्त्र चर्चेने भारलेले असे होते ! इथून पाय हलूच नये असे वाटावे अशी वातावरण निर्मिती करण्यामध्ये या साधूंना यश आलेले होते ! असे आश्रम फार थोडे आढळतात . इथे भजन करण्यासारखा आनंद अजून कुठे मिळणार ! 
स्वामी देव महाराज हौशी असून त्यांनी आश्रमामध्ये कारंजे वगैरे लावलेले आहे !
आश्रमामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे
स्वामी देव यांना फोटोग्राफी ची देखील भारी हौस आहे ! "आनंद लेते चलना है । " हे त्यांचे आवडते वाक्य आहे !
 नर्मदा मैय्याकाठी बसलेले स्वामी देव महाराज
नर्मदा माई मध्ये उभे असलेले स्वामी देव महाराज
एका खडकाळ टेकडीचा कायापालट करून त्यांनी त्यावर नंदनवन फुलवलेले आहे . इथे त्यांनी चंद्रमौळेश्वर महादेवाची स्थापना केलेली आहे
आश्रमामध्ये दर पौर्णिमेला आणि अमावस्येला कन्या पूजन केले जाते
स्वामी देव यांना दाढी-मिशा फारशा  नाहीत त्यामुळे ते वयाने खूप तरुण दिसतात . सज्जगडावर बदलापूर इथला अनंता करमरकर नावाचा एक रामदासी स्वयंपाकी होता . त्यांची आठवण मला या महाराजांना पाहून वेळोवेळी होत असे . दोघांच्या चालण्या बोलण्या दिसण्यात वागण्यात मोठे साम्य होते .
एका निवांत क्षणी नरेशगीर महाराज आणि स्वामी देव महाराज
चंद्रमौलेश्वर महादेवाची उपासना करत बसलेले स्वामी देव महाराज
केवळ आणि केवळ अध्यात्मा विषयी बोलणारे नरेशगीर महाराज
श्री चंद्रमौलेश्वर महादेव
आश्रमाचा सुरम्य परिसर आणि परिक्रमावासी भोजनाला बसतात ती जागा
एकंदरीत या आश्रमातला वेळ खूप चांगला चालला होता . मी आधी फिरून सर्व आश्रमाचा परिसर पाहिला . आश्रमामध्ये बरीच नवीन बांधकामे करण्याचा स्वामींचा मानस होता . परिक्रमावासींसाठी व साधकांसाठी साधन कुटी बांधण्याचा त्यांचा निश्चय होता . आश्रम मुळात एका छोट्या टेकडीवर असल्यामुळे इथून आसपासचा परिसर खूप छान दिसायचा . समोर भव्य मांडवगडचा पहाड दिसायचा . स्वामींनी इथे बरीच झाडे लावली होती . नियोजनपूर्वक फळझाडे फुलझाडे आणि भाजीपाला लावला होता . गावातील तरुणांचा आश्रमामध्ये चांगला राबता होता . तरुणांचे चांगले संघटन स्वामी देव महाराजांनी केलेले होते . स्वामींनी मला त्यांची कुटी आत नेऊन दाखवली . बंगाली संन्यासी आणि नरेश गीर संन्यासी हे दोघे तर अतिशय अप्रतिम साधू होते ! बंगाली संन्यासी केवळ देशाबद्दल बोलायचे . नरेशगीर महाराज फक्त शुद्ध अध्यात्मा बद्दल बोलायचे . आम्ही तिघांनी बसून खूप काळ एकत्र शास्त्र चर्चा केली . आधी देश का आधी देव या विषयावर आम्ही तासंतास चिंतन केले . दोघांच्या मधली एक समन्वयाची भूमिका माझी सुरुवातीपासून राहिलेली आहे ती दोघांनाही पटली . देवाचा शोध घेणे हे महत्त्वाचे आहेच . परंतु त्यासाठी लागणारे पूरक , सकारात्मक ,सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण ज्या एकमेव देशामध्ये आहे तो देशच जर टिकला नाही तर देव सापडणे किती कठीण आहे ! इथे अजून काही परिक्रमा वासी उतरले होते . बंगालचा युकेलेलो वाद्य वाजवणारा तरुण सुमन मुजुमदार देखील इथे काही वेळाने आला . तो थोडासा घाबरलेला होता . मागच्या मुक्कामावर त्याचे एका सहपरिक्रमावासीशी भांडण झाले होते . हा मोदींना शिव्या घालतो म्हणून तो मोदी भक्त परिक्रमा वासी याच्या डोक्यात काठी घालायला निघाला होता ! माझ्या संपूर्ण परिक्रमेमध्ये इतका टोकाचा मोदी भक्त असलेला एकच मनुष्य मला भेटलेला होता ! ते होते आपले तुकाराम बुवा सुरवसे ! मी वर्णन करून सांगितल्यावर सुमन मुजुमदार ने ओळखले की हाच तो परिक्रमावासी होय ! ते किती भयानक आहेत याचे रसभरीत वर्णन मी त्याला करून सांगितले ! आणि सुमनने पुढे गाडीने निघून जाण्याचा निर्णय घेऊन टाकला ! एकंदरीत दोघांमधील विसंवाद चांगलाच विकोपाला गेला असावा ! बंगाली संन्यासी महाराजांनी त्याला बंगाली भाषेमध्ये खूप काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला . त्याचा त्याच्यावर फरक पडला असावा अशी अपेक्षा आहे .परंतु एकंदरीत केवळ समोरच्या व्यक्तीला उचकवण्यासाठी किंवा भडकवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची निंदा नालस्ती करणे हे या वामपंथ प्रेमी तरुणाला चांगलेच महागात पडल्याचे त्याच्या भेदरलेल्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते ! या आश्रमामध्ये मला अनेक अवलिया भेटले त्यातली अजून एक व्यक्ती म्हणजे नगरचे सीमासुरक्षा बल अथवा बीएसएफ मधील माजी सैनिक रामनाथ ताकटे हे होय ! ते स्वतःचा उल्लेख आवर्जून भगौडा सैनिक असा करायचे !भारतीय लष्कराने सेवेतून बडतर्फ केलेल्या लोकांना अर्थात कोर्ट मार्शल झालेल्या लोकांना भगोडा म्हणण्याची पद्धत आपल्या समाजामध्ये आहे . म्हणजे घाबरून पळून गेलेला सैनिक ! पण रामनाथ काका स्वतःचा उल्लेख मोठ्या अभिमानाने भगोडा का करून घेत आहेत हे मला काही कळले नाही .मी त्यांच्या भगोडा या शब्दावर आक्षेप घेतला .  त्यांना खोदून खोदून विचारल्यावर त्यांनी सांगितले की त्यांची नियुक्ती राजस्थानच्या सीमेवरती गस्त घालण्यासाठी झालेली असताना तिथे एका महिलेवर हात उचलणाऱ्या माणसाला यांनी बेदम चोप देऊन ठार केले होते ! ही कृती लष्कराच्या शिस्तीमध्ये बसणारी नसल्यामुळे यांचे कोर्ट मार्शल करण्यात आले . परंतु त्यांना या गोष्टीचा अतिशय अभिमान होता . अगदी अशीच न्यायप्रिय कृती करून कोर्ट मार्शल झालेले माझे अजून एक मित्र आहेत . त्यामुळे मला यांचा भावार्थ लगेच समजला . भारतीय लष्करातील काही नियम जे पूर्वीच्या काळी इंग्रजांनी इंग्रजी सरकारला धार्जीणे ठरतील अशा रीतीने निर्माण केलेले होते ते आपण स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील अजून परंपरेने चालू ठेवले आहेत . ते बदलण्याची वेळ आता आलेली आहे असे फार वाटते . हे रामनाथ ताकटे कट्टर मोदी भक्त होते . आणि अण्णा हजारे यांचे टोकाचे विरोधक होते ! त्यांनी अण्णा हजारे यांच्यावरती अनेक खटले दाखल केलेले आहेत असे त्यांनी मला सांगितले . अण्णा हजारे हे देखील लष्करातून बडतर्फ करण्यात आलेले जवान होते असा यांचा दावा होता . आणि जो कोणी भेटेल त्याला त्याचे पुरावे देण्याची त्यांची तयारी होती .
रामनाथ ताकटे काकांचे काही फोटो मला अचानक गुगल नकाशावर सापडले होते ते सोबत जोडत आहे .
श्री रामनाथ ताकटे
रामनाथ ताकटे यांचा परिक्रमेदरम्यान काढलेला हा फोटो आहे कारण त्यांच्या सोबतचे सहपरिक्रमावासी नंतर मला भेटले होते .
 एकंदरीत अण्णा हजारे या विषयावरती ते तास दोन तास पोट तिडकीने बोलले . मला या विषयात फारसे स्वारस्य नसल्यामुळे मी फारसा उत्साह दाखवला नाही . परंतु यांच्याकडे अनेक गोष्टींचे पुरावे आहेत असे ते वारंवार सांगत होते . काका एकंदरीत तापट स्वभावाचे होते आणि अतिशय तळमळीने बोलायची यांना सवय होती . परिक्रमेला देखील ते अचानक घरातील सुनबाईंबरोबर झालेल्या तात्विक मतभेदांमुळे निघाले होते . ते पूर्ण वेळ चालत नसत . गरज पडल्यास गाडीने प्रवास करत . असो . या आश्रमामध्ये एक गमतीदार अनुभूती मला आली . त्याचे असे झाले !
सकाळी काली बावडी कडे चालत येताना मध्ये थोडीफार झाडी लागली . तिथे मला आंब्याची झाडे दिसली . झाडांना भरपूर आंबे लागले होते आणि काही आंब्यांना पाड आला होता . ते पाहिल्याबरोबर आता आंब्याचा हंगाम सुरू झाला असे माझ्या लक्षात आले ! आंबा हे फळ अर्थातच मला देखील खूप आवडते ! आणि ते फळ पाहिल्यामुळे मनामध्ये आंबा खाण्याची सूप्त इच्छा निर्माण झाली . पुढे मी तो प्रसंग विसरून गेलो .इकडे संध्याकाळ झाल्याबरोबर नरेशगीर महाराजांनी मला आवाज दिला . "अरे पुना वाले बाबाजी जरा यहा आओ तो । आप महाराष्ट्र से हो ना ? जरा देखो किसी भगत ने यह क्या भेजा है महाराष्ट्र से ? " असे म्हणत त्यांनी आंब्याची एक पेटी माझ्यापुढे केली . ती उत्तम दर्जाच्या रत्नागिरी हापूसची पेटी होती ! त्यामधील फळ हे निर्यातीच्या दर्जाचे अर्थात एक्सपोर्ट क्वालिटीचे होते ! कोकणामध्ये माझे अनेक मित्र असल्यामुळे मला आंब्याची प्रतवारी वगैरे याबाबत थोडेफार ज्ञान आहे . आपण जे काही आंबे भारतामध्ये खातो ते बऱ्यापैकी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दर्जाचे आंबे असतात . निर्यात करण्याच्या योग्यतेचा माल हा पूर्णपणे बाहेर देशांत पाठवला जात असतो . हा आंबा त्या दर्जाचा होता . ही पेटी पाठवून बरेच दिवस झाले होते . त्यामुळे आतील फळ अगदी तयार झाले होते ! बहुतेक ही हंगामातली पहिली पेटी पाठवलेली असावी . परंतु उत्तर प्रदेश मधील शरीर असलेल्या नरेशगीर महाराजांना आंबा या क्षेत्रातील फारशी माहिती असल्यामुळे त्यांनी ती पेटी एका बाजूला ठेवून दिलेली होती . त्यातील सर्वच आंबे तयार झालेले असून ते लवकरच संपवले नाहीत तर त्यांची चव उतरेल असे मी महाराजांना सांगितले . "तो फिर इसका क्या कर सकते है ? " नरेशगीर महाराजांनी मला विचारले . "कुछ भी कर सकते है । " "यह पेटी कितने की होगी ? " महाराजांनी उत्कंठेने मला विचारले . "हंगामातील या दर्जाच्या आंब्याची पहिली पेटी ही काही हजार रुपयांना असते हे मी त्यांना सांगितले . सहा सात हजार रुपये हा नवीन पेटीचा अगदी किरकोळ दर असू शकतो . हा आकडा सांगितल्यावर मात्र नरेशगीर महाराजांचे डोळे मोठे झाले ! ते म्हणाले की बाबा रे इतके महाग आंबे असतील तर ताबडतोब यांची विल्हेवाट लावून टाक ! असली महागडी बला आमच्या डोक्याच्या मागे नको ! सर्वानुमते या आंब्याचा आमरस करायचे ठरले ! आणि मी आंबे स्वच्छ धुऊन बाहेर मोकळ्या पटांगणामध्ये पसरून घेऊन बसलो . सोबत मदतीला बंगाली संन्यासी आणि सुमन मुजुमदार देखील आले . ताकटे काका साली आणि कोई खायला बसवले ! थोड्याच वेळात अप्रतिम असा आमरस तयार झाला ! या भागामधील लोकांसाठी तो नवीन पदार्थ होता . आता सर्वजण भोजन की हरिहर करणार इतक्यात अजून आठदहा परिक्रमावासी जे नाशिक आणि नगर भागातले होते ते तिथे जथ्थ्याने पोहोचले . आणि माझा चेहरा एकदम हिरमुसला झाला ! कारण त्या पातेलंभर आमरसाला आता इतके सारे वाटणीदार मिळाले म्हणून मला खरोखरच मनापासून वाईट वाटले ! इकडे नरेशगीर महाराज गरम गरम पोळ्या करायला बसले ! आणि सर्वांची भोजनाची पंगत बसली ! महाराजांना आमरस या विषयातले फारसे ज्ञान नसल्यामुळे त्यांनी प्रत्येकाला एक छोटी छोटी वाटी दिली आणि वाटी भरून आमरस वाढला . सोबत त्यांनी फणसाची भाजी केली होती जी अतिशय अप्रतिम झालेली होती ! उत्तर प्रदेशामध्ये फणसाची भाजी किंवा कटहल की सब्जी हा अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे . आणि तो ते ज्या पद्धतीने करतात ती पद्धत आणि चव मला खूप आवडते . सर्वांनी जेवायला सुरुवात केली आणि एकच मिनिटात सर्वांचा आमरस संपला ! भोजन प्रसादी घेण्यासाठी बसलेल्या लोकांमध्ये महाराष्ट्रीयन लोकांचे प्राबल्य असल्यामुळे सर्वांनाच आमरस मिळाल्याचा मोठा आनंद झालेला होता ! सर्वजण एकमेकांना खाणा-खुणा करू लागले ! आमरसाचे काय ! कधी वाढताय असा सर्वांचा भाव होता . मी नरेशगीर महाराजांच्या जवळ बसलेलो होतो . मला सर्वांनी खाणाखुणा करून महाराजांना आमरस वाढायला सांगण्याची सूचना केली . परिक्रमेमध्ये काहीही मागून खायचे नसते . त्यामुळे मी बोलत नव्हतो . आणि माझ्या शेजारी बसलेले सर्व मराठी परिक्रमा वासी कोपराने ढोसून ढोसून मला बोलण्यासाठी उद्युक्त करत होते ! शेवटी सर्वांची इच्छा आहे असे पाहून मी महाराजांना विचारले , "महाराज आमरस पूरण हो गया क्या ? " पूरण होणे म्हणजे वाढ संपणे . महापूरण म्हणजे पूर्णपणे संपणे .महाराज म्हणाले , "नही नही ! बहुत बाकी है बाबा ! यह सब आज ही महापूरण कर देना है । अरे भगतराम ? जरा ले आओ तो आमरस का भगोला । " वाढण्याची सेवा करण्यासाठी आलेला एक स्थानिक ग्रामस्थ तत्परतेने आत मध्ये गेला आणि आमरसाचे पातेले घेऊन बाहेर आला . पहिला मीच समोर बसलेलो होतो . त्याने आमरस वाढण्यासाठी डाव पातेल्यामध्ये घातला . रस चांगला ढवळला . आणि वाढण्यासाठी डाव माझ्या ताटावर आणला . मला अत्यानंद झाला ! वाटी छोटी असली तरी पुन्हा पुन्हा रस मागून घेऊ असे मी ठरवले ! भगत रामने रस वाढताना एक फार मोठा घोटाळा केला ! त्याने मला रस वाढताना चुकून डाव माझ्या वाटीला टेकवला ! "हरे हरे ! फेक दो यह आमरस ! पुरा झुटा हो गया । " नरेश गिरी महाराज जोरात ओरडले ! आणि सर्वांचेच चेहरे पडले ! वाढताना कधीही ताटाला डाव टेकवायचा नसतो असा साधू समाजातला एक अतिशय कठोर नियम आहे . आणि तो शास्त्रीय देखील आहे . जंतूंचे आदान प्रदान टाळणे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे . हाच नियम भक्ताने तोडलेला होता . तो देखील एकदम घाबरला आणि उठून उभा राहिला . नरेशगीर महाराज म्हणाले , " जाओ । यह आमरस बगीचे मे जाके फेक दो । " सर्वांचीच तोंडे पडली . हाता तोंडाशी आलेला आमरस असा निघून जाणार हे पाहून सर्वांना वाईट वाटले . मला तर मनोमन वाईट वाटले . कारण माझ्या ताटलीतल्या वाटीला डाव टेकल्यामुळे हे सर्व झाले होते . सर्वजण मान खाली घालून जेवू लागले . माझ्या मनात एक विचार आला आणि मी थोडेसे धैर्य एकवटून नरेशगीर महाराजांना म्हणालो , " महाराज , जाने दो ना । बाट दीजिए आमरस सबमे । किसी को कोई आपत्ती नही होगी । " " किसी को कोई आपत्ती नही इसलिये मे अधर्म नही कर सकता बाबाजी । शास्त्र के अनुसार थाली मे जिसका स्पर्श हुआ वह अन्न झूठा हो गया । उसे किसी को देना नही चाहिये । तुरंत नष्ट कर देना चाहिए । " "लेकिन जिसके थालीमे स्पर्श हुआ वह भी नही खा सकता क्या ? " मी स्वाभाविक उत्कंठेतून विचारले . " मै समझा नही । " नरेशगीर महाराज म्हणाले . " मतलब देखिये स्वामीजी । अभी इस भगत राम ने आमरस का स्पर्श मेरे थाली से किया । इसलिये वह झुठा हो गया । लेकिन वह आप सब लोगो के लिए झुठा हो गया । मेरे लिए भी हुआ क्या ? " " ओह ! ऐसे ! हा हा । तुम तो खा सकते हो । क्योंकि तुम्हारे लिए वह झुटा नही है ।  बल की तुम्हारे कारण बाकी सब लोगो के लिये झुटा हुआ है । लेकिन तुम कितना खाओगे । " " उसकी चिंता आप ना करना बाबाजी ! जितना पसंत हे उतना आमरस पा लूंगा ! " अत्यानंदाने मी अक्षरशः ओरडलो ! भगतराम ने माझ्यापुढे आमरसाचे पातेले ठेवले ! मी वाटीच्या ऐवजी थेट पातेल्यातून आमरस खायला सुरुवात केली ! पातेलंभर आमरस ! कल्पना करून पहा !  बाकी सर्वच परिक्रमावासींची तोंडे पडली ! खरे तर त्यांना देखील आमरस मिळावा अशी माझी इच्छा होती , परंतु महाराजांच्या कठोर नियमांपुढे कोणाचे काही चालणार नव्हते ! इकडे नरेशगीर महाराज गरम गरम पोळ्या करून माझ्या दिशेने फेकत होते ! आणि मी ते गरम तुकडे थेट आमरासामध्ये बुडवूनच गार करत होतो ! त्यादिवशी मी आकंठ आमरस खाल्ला ! त्या पातेल्यामध्ये आमरसाचा एक कण देखील शिल्लक ठेवला नाही ! खाता खाता बाकीच्या मराठी परिक्रमावासींना वाकुल्या दाखवायला मी विसरलो नाही ! माझी आमरस खाण्याची ती पद्धत आणि क्षमता बघून महाराजांना देखील आश्चर्य वाटले !  "आप मराठी लोगो को आमरस इतना पसंद है क्या ? " नरेशगीर महाराजांनी मला विचारले . "बहुत ज्यादा महाराज ! आप कल्पना नही कर सकते इतना प्रेमसे आम का फल महाराष्ट्र मे खाया जाता है ! " मी सांगितले . पातेलंभर आमरस हा खरोखरच खूप जास्त झाला . परंतु आकंठ खाल्ल्यामुळे पुन्हा आयुष्यात आमरस खायची इच्छाच होऊ नये अशी अवस्था नर्मदा मैयाने आणली ! परिक्रमेमध्ये कुठलीही सूक्ष्म देखील इच्छा करू नये . ती वासना नर्मदा माता कायमची पूर्ण करून टाकते . गोंदवलेकर महाराज देखील हा प्रयोग करायचे . जो पदार्थ खाण्याची वासना निर्माण होईल तो आकंठ खाऊन ती इच्छा मारून टाकायचे . तसेच काहीसे माझे आज झाले . आता घोटभर पाणी पिण्यासाठी देखील पोटात जागा होणार नाही इतका आमरस  त्या रात्री खाल्ला ! अर्थात दिवसभर भरपूर चाललेला असल्यामुळे तो सर्व जिरला . परंतु नर्मदा माता आपल्या भक्तांच्या इच्छा कशा पूर्ण करते याची पुन्हा एकदा अनुभूती या रूपाने मला मिळाली ! बाकीच्या परिक्रमावासींनी आमरस खाण्याची इच्छा मनामध्ये केलेली नसल्यामुळे त्यांना थोडा थोडा प्रसाद मिळाला इतकेच ! माझी मात्र आमरस खाण्याची हौस नर्मदा मैयाने कायमची फिटवली ! रात्री आम्ही सर्वजण अर्थात नरेशगीर महाराज , बंगाली संन्यासी महाराज , स्वामी देव महाराज असे बाहेर अंगणात बसून आमरस पचवल्यावर राम रसाचा आनंद घ्यायला सुरुवात केली अर्थात भरपूर शास्त्र चर्चा केली ! ही सर्वच मंडळी केवळ शुद्ध अध्यात्माची चर्चा करायचे . कोणीही एकदाही प्रापंचिक गोष्टींचा उल्लेख केला नाही . कोणी मला नाव गाव पत्ता कुळ गोत्र कलत्र काही विचारले नाही . केवळ सर्वांभूती भगवंत हा भाव ठेवून हे अन्नक्षेत्र चालविले जात असल्यामुळे इथे मला विशेष आनंद मिळाला . रात्री मी गच्ची मध्ये जाऊन झोपलो . उकाडा सुरू झाल्यामुळे उघड्यावर झोपायला आनंद मिळायचा . या महिन्यांमध्ये खूप जोरदार वारे वाहतात . त्याचा आनंद घेत झोपलो .सकाळी उठून सर्व आन्हिके आटोपली . बोरवेल च्या गरम पाण्याने मनसोक्त स्नान केले आणि पुढे निघालो . इतक्यात नरेश गिर महाराजांनी मला थांबवले आणि सांगितले की चहा घेऊन जावे . त्यांचा आदेश म्हणून मी थांबलो आणि चहा घेऊन निघणार इतक्यात ते मला म्हणाले थोडीशी भजी केली आहेत तेवढी खाऊन जा . पुन्हा पाच मिनिटे बसलो . मुगाच्या डाळीची सुंदर भजी त्यांनी करून आणली . भज्यांचा बालभोग घेऊन निघणार इतक्यात स्वामी देव महाराज आले आणि म्हणाले की भजी तेलकट असतात . ते तेल खाली सरकण्यासाठी पुन्हा एकदा गरम चहा प्यावा लागतो ! एकंदरीत मी तिथून जाऊ नये अशी या तिघांची इच्छा होती . मला देखील इथे अजून रहावे असे वाटत होते ! मनापासून वाटत होते ! शेवटी नरेशगीर महाराज म्हणाले , "आता झालीच आहे इच्छा तर थांब ! " आणि आम्ही चौघेही आनंदाने हसू लागलो ! मी पुन्हा एकदा आसन लावले ! आमची पुन्हा एकदा अध्यात्मिक चर्चा सुरू झाली ! वेळ कसा गेला कळलेच नाही ! बाकीचे सर्व परिक्रमावासी भल्या पहाटेच पुढे निघून गेलेले होते . नरेश गीर महाराज अतिशय हुशार आणि "प्रॅक्टिकल" होते . स्वामी देव महाराज थोडेसे कमी शिकलेले असले तरी देखील त्यांचा अनुभव खूप दांडगा होता आणि ते देखील अतिशय बुद्धिमान होते . बंगाली संन्यासी तर संघाचे प्रचारक राहिलेले असल्यामुळे त्यांचा समाजाचा आणि संघटनेचा अनुभव दांडगाच होता . अशा तीन महात्म्यांचा सत्संग लाभणे आणि तो देखील नर्मदा परिक्रमेमध्ये या परते भाग्य ते कोणते ! तो दिवस अतिशय आनंदात गेला ! परिक्रमेमध्ये फार कमी वेळा मी एकाच ठिकाणी एका दिवसाहून अधिक काळ राहिलो त्यातले एक ठिकाण ! दिवस मावळतीला गेल्यावर तुकाराम बुवा सुरवसे आले ! त्यांच्या भीतीने बंगाली पुढे निघून गेला आहे हे सांगितल्यावर सर्वजण हसायला लागले ! तुकाराम बुवांनी बंगाली बाबाच्या पातकांचे पाढेच मला वाचून दाखवले ! तुकाराम बुवांशी गप्पा मारत बसलेलो असतानाच एक अतिशय तेजस्वी तरुण तिथे प्रकट झाला ! परिक्रमावासी असलेला हा तरुण पुढे जाण्याच्या बेतात होता . या तीन निवांत साधूं सोबत राहून माझी देखील वृत्ती निवांत झाली होती ! मी पुढे जाणाऱ्या त्या तरुणाला आग्रह करून थांबवून घेतले . या तेजस्वी तरुणाचे नाव होते गुरूत्तम दत्ताराम पाटील ! हे थोडेसे वेगळेच नाव मला फार आवडले आणि लक्षात राहिले . सर्वजण त्याला गुरु गुरु म्हणायचे . पेण मध्ये राहणारा हा तरुण नक्की काय आहे हे मला जसे कळू लागले तसतसे मला आश्चर्याचे एकावर एक धक्के बसू लागले ! कारण अगदी वयापासून ते आवडीनिवडी पासून आमची प्रत्येक गोष्ट तंतोतंत एकसारखी आहे असे आमच्या दोघांच्याही लक्षात येऊ लागले ! अगदी परिक्रमेमध्ये त्याने सोबत घेतलेले सामान देखील मी घेतलेल्या सामानाबरोबर तंतोतंत जुळणारे होते ! बहुतेक दोघांची पत्रिका एकसारखी असावी असा अंदाज आम्ही दोघांनी बांधला ! त्याला देखील संगीताची ,गायनाची ,वाद्य वादनाची आवड होती . तो उत्तम पैकी तबला वाजवायचा तसेच त्याने सोबत एक बासरी देखील आणली होती . त्याची आणि माझी नाळ चांगलीच जुळली ! आम्ही दोघांनी रात्री उशिरापर्यंत बसून अनेक भजने म्हटली ! गुरु हा काही एका पिढीत अध्यात्माला लागलेला मुलगा नव्हता . त्याच्या घराण्यामध्ये पूर्वजांपासून अशी परंपरा होती की ते सर्वजण चातुर्मास ओंकारेश्वरला असलेल्या मार्कंडेय संन्यास आश्रमामध्ये राहून व्यतीत करायचे .याचे काका व वडील दत्ताराम देखील दरवर्षी चातुर्मासामध्ये ओंकारेश्वरी असायचे . गुरु एका ग्राफिक्स डिझाईन कंपनीमध्ये मुंबईला जाऊन येऊन नोकरी करायचा . परिक्रमेचा विचार डोक्यात आल्यावर नोकरी सोडून हा बाबाजी परिक्रमेला आलेला होता ! परिक्रमेला उशीर झालेला असल्यामुळे याने ओंकारेश्वर येथे परिक्रमा न उचलता समुद्र तटाच्या जवळून परिक्रमा उचलली होती ज्यामुळे नावा बंद झाल्या तरी परिक्रमा खंडित झाली नसती . एकंदरीत चातुर्मास लागण्यापूर्वी परिक्रमा संपण्यासाठी याच्याकडे फार कमी दिवस शिल्लक राहिले होते . मला आलेल्या परिक्रमेच्या अल्प अनुभवावरून मी त्याला त्याने रोज साधारण किती चालले पाहिजे आणि किती काळ मुक्काम केला पाहिजे याचे काही ठोकताळे बांधून दिले . रोज सरासरी ४५ किलोमीटर चालल्यावर याची परिक्रमा पूर्ण होणे शक्य होते .परंतु त्यासाठी त्याने मध्ये एकही दिवस अधिकचा मुक्काम करणे हिताचे ठरले नसते हे देखील त्याला समजावून सांगितले . त्याने देखील माझ्या पुस्तकात मी दाखवलेली महत्त्वाची ठिकाणे समजावून घेतली आणि त्यानुसार पुढील परिक्रमा करण्याचे ठरविले . याने अनवाणी परिक्रमा उचलली असल्यामुळे हे सर्व थोडेसे कठीणच होते परंतु अशक्य नक्कीच नव्हते . गुरु ची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्याचे अत्यल्प वजन हेच होते ! हलकेफुलके शरीर आणि तरीदेखील अतिशय मजबूत देहयष्टी असल्यामुळे गुरूला हे जमेल असा विश्वास मला वाटत होता . गुरूत्तम चे शरीर हे योगी देहयष्टीचे अतिशय उत्कृष्ट उदाहरण होते .त्यात तो ब्रह्मचारी असल्यामुळे एक वेगळेच तेज त्याच्या ठायी विलसत होते .गुरुत्तम दत्ताराम पाटील याची भेट व्हावी म्हणूनच कदाचित नर्मदा मैयाने मला त्यादिवशी तिथे अधिकचे थांबवून घेतले की काय असे मला आजही वाटते ! सकाळी पुन्हा एकदा मूग भजी खाण्याचा आग्रह झाला . मुगाची भजी खाऊन आणि चहा पिऊन मी पुढे निघालो . माझ्या मागोमाग तुकाराम बुवा सुरवसे देखील निघाले . माझ्याप्रमाणेच एकट्याने चालण्याचा संकल्प केलेला असल्यामुळे गुरु सर्वात शेवटी निघाला . आज भरपूर कष्टाची चाल करत मांडवगड नावाचा भव्य पहाड चढायचा होता . हा डोंगर अतिशय अंगावर येणारा आहे . इथले वन जीवन देखील समृद्ध आहे . या गडावर नक्की काय काय वाढून ठेवलेले आहे याची कल्पना नसल्यामुळे नर्मदा मातेचे स्मरण करत एक एक पाऊल चढू लागलो .



पुढील लेखांक 

लेखांक एकशे अडतीस समाप्त (क्रमशः )



(अपूर्ण )

टिप्पण्या

  1. नर्मदे हर ।। खूप सुंदर लेखमाला चालू आहे . परिक्रमेबरोबर तेथील लोकजीवनाचीही चांगली माहिती मिळत आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. प्राण कंठाशी येतो लवकर येऊ द्या 🙏 बराच वेळ लागतो 😂 आपण परीकरमेसाठी भरपूर कष्ट घेतले पण आपण प्रत्यक्ष त्यात होतात आम्हाला पुढील भाग कधी येइल असे होते आमची परीक्रमा थांबून गेली असं वाटत क्रुपया पुढील भाग लवकर पाठवा यु ट्युब वरील परिक्रमा पाहूनही तुमच्या प्रवासाची ओढ तसूभर कमी होत नाही ❤️❤️

    उत्तर द्याहटवा
  3. भाबरी आश्रमात जाऊन येऊन आहे . इथे वीज व रेंज नाही त्यामुळे लिहीता येत नाही . क्षमा असावी . नर्मदे हर !

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर