लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

सियाराम बाबांच्या इथून शरीर पुढे हलले तरी मन बराच काळ तिथेच होते .बाबांचे व्यक्तिमत्व अतिशय चुंबकीय आहे . ते फारसे बोलत नसले तरी कृतीतून खूप काही शिकवतात . सतत कार्य मग्न राहणे हा त्यांचा स्थायीभाव आहे . बाबांचा आश्रम सोडल्यावर मी पुन्हा एकदा मैया चा तट पकडला . इथे जबरदस्त झाडी होती . या संपूर्ण परिसरात साळींदर आणि बिबट्या यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे असे मला स्थानिक लोक सांगत होते . अजून तरी या भागात मगरीचा संचार सापडलेला नाही . परंतु चुकून माकून कोणी इथे मगर आणून सोडली तर तिच्यासाठी अतिशय उत्तम असा हा अधिवास आहे . कारण पुढे असलेल्या धरणामुळे येथे पाणी स्थिर आहे . तसेच मानवी वावर अतिशय कमी आहे . शक्यतो कोळी लोकांना मासेमारी करताना त्रास होतो म्हणून ते मगरींचा वावर वाढू देत नाहीत . मगरी त्यांचे मासे देखील खातात आणि मुक्त वावरावर बंधने देखील आणतात . परंतु ज्याप्रमाणे एक वाघ आल्यावर त्या भागातील जंगल सुरक्षित होते त्याप्रमाणे एक मगर आली की नदीचा कित्येक किलोमीटरचा किनारा सुरक्षित होऊन जातो हे वास्तव आहे . इथे बिल्वकेश्वर महादेवाचे मंदिर लागते त्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो . 
बिल्वकेश्वर महादेव घाट . इथे मैयाचे पात्र अतिशय शांत आणि विस्तृत आहे .
मंदिराचा परिसर असा आहे
 ॐ नमः बिल्वकेश्वराय
नर्मदे काठी प्रत्येक घाटावर छोटी-मोठी अनेक मंदिरे आढळतात . त्या सर्वांचे दर्शन घेत जाणे हा एक आनंदाचा भाग असतो ! प्रत्येक मंदिराचे दर्शन घेताना मी त्या मंदिराचे बांधकाम चालू असताना तिथे असलेल्या वातावरणाची कल्पना करतो ! किती लोकांचा हातभार या मंदिराच्या निर्मितीसाठी लागला असेल हे पाहून धन्य वाटते ! आज मला आनंद मिळावा , मला शांतता मिळावी म्हणून त्यावेळी अनेक लोकांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ आणि कष्ट येथे खर्ची घातलेले असतात . मंदिरातल्या स्थापित देवतेला नमस्कार करताना या सर्वांनाच मी मनोमन नमस्कार करतो .
 हा सर्व परिसर महापुरामध्ये जलमग्न असतो .
या घाटाच्या पुढे गोधारी घाट नावाचा एक घाट लागला
याच्यानंतर मात्र डाव्या हाताला किर्रर्र अरण्य चालू झाले . या भागामध्ये बिबट्या व अन्य हिंस्र प्राणी असण्याची शक्यता मला आतून जाणवत होती . कारण मानवी वावर शून्य असलेला हा भाग होता . आणि वन्य प्राण्यांना असे परिसर खूप आवडतात . शिवाय आपण माणसे चालून ज्या पायवाटा तयार होतात त्या थोड्या मोठ्या असतात .परंतु वन्य प्राण्यांच्या पायवाटा थोड्या-छोट्या असतात . जंगलातून पाणी पिण्यासाठी येणाऱ्या अशा पायवाटांची संख्या वाढली की ओळखायचे इथे श्वापदांचा वावर आहे ! अशा ठिकाणी न थांबता वेगाने पुढे निघून जाणे श्रेयस्कर ठरते . त्यामुळे मध्ये एखादा रम्य किनारा मिळाल्यावर थांबणारा मी इथे मात्र अखंड चालत राहिलो . मला कोणी दिसत नसले तरी मी कोणाला तरी दिसत होतो ! हातातील दंड तुम्हाला अशावेळी फार म्हणजे फार उपयोगाचा ठरतो त्यामुळे परिक्रमेला जाताना चांगला मोठा दंड सोबत घ्यावा ! तो केवळ आधारासाठी नाही . तो तुमचा प्राणरक्षक आहे .
या भागातील जंगल कसे आहे हे आपल्या लक्षात यावे म्हणून गुगल नकाशा आपल्यासाठी जोडत आहे .
 आपण थेट नर्मदेचा किनारा पहावा . जिथे जमीन आणि नर्मदा भेटते तिथून मी चालायचो . हे जंगल जरी दाट असले तरी एक पाऊल ठेवण्या एवढी जागा सर्वत्र मिळायची . 
अधून मधून असा एखादा गवताचा भाग लागायचा . परंतु डाव्या हाताला जंगल असायचेच .
पुढे पुढे हे जंगल अजून दाट होत गेले . अधून मधून लोक शेती करत असले तरी प्राण्यांना लपून बसता येईल अशी खूप झाडी इथे होती . 
इथे काठाने चालत मी एका नदीपाशी आलो आणि तिने माझा मार्ग अडवला . नदी फारच खोल दिसत होती . जसं जसे तुम्ही एखाद्या धरणाच्या जवळ येता तसतशा नद्या खोल होत जातात . मी तेली गाव सोडले होते . आणि लेपा गावाकडे निघालो होतो . मध्ये या नदीने वाट अडवली होती . वरून एका साधूने मला आवाज दिला म्हणून मी तिकडे गेलो . हा परिक्रमेमध्ये असलेला एक तरुण साधू होता . याचे नाव होते हार्दिक मुनी . वय फार फार तर २२ - २३ असावे . तब्येतीने गुटगुटीत होता . चेहऱ्यावर तेज होते . बोलण्यात हुशारी होती परंतु तितकीच नम्रता देखील होती . अतिशय कृतिशील होता . आणि सोबत फोन बाळगत नव्हता याचा अर्थ खरा साधू होता ! पुढे हा फार मोठे नाव कमावणार असे मला वाटले ! याने मला सांगितले की ही नदी पार करता येणे अशक्य आहे कारण इथे नाव नाही . तसेच नदी पार केल्यावर इतके घनघोर जंगल आहे की पाय ठेवायला सुद्धा जागा नाही . त्यापेक्षा इथून मागे थोडेसे चालत गेल्यावर असावड गावाच्या जवळून एक रस्ता जातो जो लेपा बंधार्‍याकडे जातो . परंतु या गावातून सरळ मी चालत गेलो तर वेदा नदीवरचा पूल लागतो तो ओलांडून मी पलीकडे जावे असे त्याने मला सुचवले . परंतु मला नदीच्या काठाकाठाने चालायचे आहे असे मी त्याला निक्षून सांगितले . तो मला त्याच्या छोट्याशा झोपडीमध्ये घेऊन गेला . आणि मला त्या भागातील सर्व परिस्थिती त्याने सांगितली . हा खरे म्हणजे परिक्रमेमध्ये होता . परंतु त्याला हे ठिकाण आवडल्यामुळे इथे चातुर्मास करायची इच्छा झाली . त्यामुळे तो या जंगलामध्ये एकटाच राहत होता . इथे बिबट्याचा मुक्त वावर आहे असे त्याने मला सांगितले . मला ज्या भागातून जायचे होते तिथे बिबटे सतत फिरत असतात असे त्याने सांगितले . कालच इथे मासेमारी करणाऱ्या एका नावाड्याने समोर बिबट्या पाहिल्याचे हार्दिक मुनी म्हणाला . 
नुकत्याच जाहीर झालेल्या प्राणी गणने नुसार मध्य प्रदेश मध्ये भारतातील सर्वाधिक ३९०७ बिबटे आहेत . (मार्च २०२४ ) . असोत .

ही नदी पार करण्यासाठी त्याने स्वखर्चाने साडेचार फूट रुंदीचा एक लोखंडी पूल बनवला होता . हा पूल बनवल्यापासून नदी पार करणे लोकांसाठी खूप सोपे होऊन गेले होते . त्याने मला या पुलापर्यंत जाण्याचा रस्ता समजावून सांगितला . परंतु तो थोडासा क्लिष्ट आहे हे लक्षात आल्यावर तो म्हणाला चला मी तुम्हाला स्वतःच तिथपर्यंत सोडून येतो . आणि माझ्यासोबत तो सुमारे तीन किलोमीटर चालला ! या काळात आमच्या भरपूर गप्पा झाल्या! मला तो मुलगा अतिशय आवडला ! एक आदर्श साधू होण्यासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी त्याच्याकडे होत्या . मुख्य म्हणजे वय त्याच्या बाजूने होते ! बाकी सर्व मिळविता येते परंतु वय फक्त गमावता येते ! त्याने बांधलेला पूल छोटा च परंतु अतिशय प्रभावी होता . ही नदी मोठ्या खडकाळ प्रदेशातून वाहत होती . नेमक्या त्यातील एका खडकावर हा पूल त्याने अंथरला होता . बाकी दोन्ही बाजूला फुफाटा होता . या पुलावरून मोटरसायकल सुद्धा जाईल इतका तो मजबूत होता . हा पूल बनवण्यासाठी साडेचार हजार रुपये खर्च आला असे त्याने मला सांगितले . हे पैसे त्याने भिक्षेतून वापरले . पुढे गेल्यावर डावीकडे गाव लागते तुम्ही उजवीकडे जंगलाकडे वळा असे त्याने मला सांगितले . याला काहीतरी द्यावे असे मला फार वाटत होते . मला अचानक आठवले की ओंकारेश्वरला गजानन महाराज मठामध्ये मला नवे कोरे धोतर शर्ट वगैरे मिळालेला आहे जो मी घालणार नाही ! मी लगेच त्याला ते वस्त्र देऊन टाकले . त्याने देखील मोठ्या आनंदाने वस्त्राचा स्वीकार केला ! पुन्हा याची कधी भेट आयुष्यात होईल का नाही माहिती नाही . हाच भाव चित्तात ठेवून त्याला कडकडून मिठी मारली आणि पुढे निघालो . हार्दिक मुनीची ती हार्दिक भेट कायम हृदयात राहील ! असे आश्वासक ,निस्पृह आणि निरोगी तरुण साधू बनत आहेत तोपर्यंत आपला धर्म अत्यंत सुरक्षित आहे ! पुढे जंगलातील मार्ग सुरू झाला . दुतर्फा भयंकर झाडी होती .
या भागातील वनक्षेत्र कसे आहे हे कळावे म्हणून वरील नकाशा पाहावा ! नर्मदा माता उजवीकडून डावीकडे वाहते आहे . 
इथल्या झाडीमध्ये बऱ्याच वन्य श्वापदांच्या हालचाली जाणवत होत्या . परंतु त्याकडे दुर्लक्ष करत मी नर्मदेचे नामस्मरण करत झपाझप पावले उचलत होतो . या भागातून कोणीही परिक्रमा वासी जात नाहीत हे मात्र खरे . कारण संपूर्ण मार्गात मला कोणीही भेटले नाही . स्थानिक ग्रामस्थ देखील इकडे फिरकत नाहीत . अशा ठिकाणी परिक्रमेचा अधिक आनंद मिळतो ! कारण इथे फक्त दोघेच जण असतात ! तुम्ही आणि मैया !
गावाची हद्द सुरू झाल्यावर हेमंत नामक एक दुकानदार सेवा देतो त्याने चहा बिस्किटे दिली . पुढे विक्रम नावाच्या एका सेवाधारीचा बालभोग घेऊन लेपा गावात  आलो .
 थोडेसे पुढे गेल्यावर एक छोटासा आश्रम लागला .इथे रामाच्या सुंदर मूर्ती होत्या . 
हाच तो लेपा गावातील आश्रम जिथे क्षणभर थांबलो .
 लेपा येथील श्रीराम प्रभू
या आश्रमात थांबण्याचा आग्रह होत होता . परंतु क्षणभर विसावा घेऊन पुढे निघालो . इथून परिक्रमावासी डावीकडे वळतात आणि वेदा नदी पुलावरून पार करतात .मी मात्र लेपा बांध जवळून पाहायचे ठरवले . त्यामुळे बिबट्याचा वावर आहे हे माहिती असून देखील निर्मनुष्य असा नर्मदेचा काठ पुन्हा पकडला . 
थोडेसे जंगल मागे टाकल्यावर अगदी लेपा बांधाच्या जवळ पोहोचलो ! या भागात खूप मोठे मोठे दगड होते . तसेच छोट्या-मोठ्या शिवलिंगांचा खच पडला होता .
  लेपा बाँध
धरणाच्या नंतर लगेच डावीकडून नर्मदेला येऊन मिळणारी वेदा नदी . वेदा आणि नर्मदे वरील पूल देखील इथे दिसत आहेत . 
 धरणाचे भव्य वक्राकार दरवाजे दिसत होते . मी उभ्या उभ्या दरवाजे मोजले . 
२७ - २८ मोठे वक्राकार पोलादी दरवाजे होते आणि २९- ३० छोटे दरवाजे होते .मोजताना डोळे फिरायचे इतके ते सुंदर व एकसारखे बांधकाम आहे.
 लेपा बांध पश्चिमेकडून दर्शन . सर्व काळे वक्राकार दरवाजे उघडलेले आहेत .
परिसर प्रचंड खडकाळ आहे .
धरणाकडे जाणारा काठावरचा मार्ग
निखळ आनंदाने वाहणारी नर्मदा माई !हिच्या ऊर्जेला बांध कोण बरे घालू शकणार !
  प्रचंड पोलाद वापरलेले वक्राकार लोखंडी दरवाजे
हे धरण बांधून पूर्ण झालेले आहे . परंतु या धरणामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करायला सुरुवात केली तर सियाराम बाबांचा मठ , बाजीराव पेशवा यांची समाधी आणि अनेक गावे बुडणार आहेत .त्यामुळे या भागातील लोकांनी प्रचंड विरोध करून धरणाचे काम बंद पाडले आहे ते कायमचेच ! मुळात या विषयावर स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केल्यावर मला असे सांगण्यात आले की ही जागा धरण बांधण्यासाठी योग्य नाहीच आहे . परंतु तत्कालीन सरकारांनी बाजीराव पेशवा यांची समाधी नष्ट व्हावी यासाठी इथे धरण बांधण्याचा घाट घातला .
इतके भव्य दिव्य बांधकाम करण्यासाठी किती खर्च आला असेल विचार करून पहा ! बाजीरावाची समाधी बुडविण्याचे हे सर्व बजेट नर्मदा किनाऱ्यावरील सजग ग्रामस्थांनी पाण्यात बुडविले !

 बाजीराव पेशवा यांचा इतिहास मराठी माणसांना फारसा ज्ञात नसला तरी मध्य प्रदेशातील सर्वच लोकांना त्यांचा प्रचंड अभिमान आहे . 
थोरले बाजीराव पेशवे
 उरी बाजी तानाजीला संस्मरावे . . .
बाजीराव पेशवा यांना ब्राह्मण म्हणून हिणवणे म्हणजे , छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा /कुणबी म्हणून मानणे किंवा नरेंद्र मोदी यांचे काम न पाहता , तेली ही त्यांची जात पाहण्या इतके ते केविलवाणे आणि हिणकस आहे . आज आपण ज्या अखंड हिंदुस्थानात राहत आहोत त्याचे सर्वप्रथम स्वप्न पाहणारे साक्षात शिवछत्रपती होते . आणि त्याच्या कर्तव्यपूर्तीसाठी अत्यधिक झटणारा एक महान योद्धा होता बाजीराव पेशवा . 
लाल खुणेच्या  इथून मी धरण पार केले . पुढे आडवी आलेली वेदा नदी आणि तिच्यावरचा पुल दिसतो आहे .
लेपा धरण बांधूून पूर्ण झालेले असले तरी अजून त्याचा वापर होत नाही ही त्यामुळेच आनंदाची गोष्ट आहे . इथून इंदोर शहराला पाणीपुरवठा गेलेला आहे . तसेच महेश्वर विद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून वीजनिर्मिती देखील केली जाते . तो समोरच्या तटावरील धरण क्षेत्राचा भाग आहे . सध्या मी इथले रंगीबेरंगी दगड पहात अगदी धरणाच्या पहिल्या दरवाज्यापाशी गेलो . तिथून खरे जर चालत पलीकडे जाता येईल अशी परिस्थिती होती . परंतु काँक्रीटच्या त्या भरावावर किमान अर्धा फूट शेवाळे वाढलेले होते . त्यामुळे चालत जायच्या ऐवजी सटकत जावे लागले असते ! शिवाय पुढे ते पाणी कुठे व कसे पडते आहे याची कल्पना नव्हती . तिथे खडक असण्याची खूप शक्यता होती . उथळ पाणी अधिक अपघातजनक असते . खोल पाणी तुलनेने सुरक्षित असते . त्यामुळे मी शांतपणे धरणाची भिंत तिरकस चढावरून चढलो . धरण चालवण्यासाठी लागणाऱ्या खोल्या , नियंत्रण कक्ष सगळे भिंतीवर होते . आत सर्व यंत्रणा होती . परंतु लोकांनी सर्वत्र तोडफोड केली होती . काचांचा खच पडला होता . बऱ्याच दिवसात तिथे कोणीच आले नसावे हे स्पष्ट जाणवत होते . धरणाचे दरवाजे कायमचे सताड उघडून ठेवलेले होते . धरण बांधून सोडून सर्वजण निघून गेले होते असे जाणवत होते . त्या भिंतीवरून जंगलामध्ये उतरलो . आता वेदा नदी चालत पार करणे एवढा एकच मार्ग माझ्या पुढे होता . कारण तिचा पूल खूप लांब होता आणि तिथवर जायला रस्ता नव्हता . नदीच्या पाण्याला वेग होता . पाण्याचा रंग लगेच वेगळा कळत होता . पिवळसर पांढरट रंगाचे हे पाणी होते आणि नदी विस्तृत आणि खडकाळ होती . पाण्याला प्रचंड गती असली तरी देखील भरपूर शेवाळे वाढलेले होते . नदीचे पाणी थोडेसे गरम होते . साधारण गुडघाभर पाण्यापर्यंत मी नदी पार करायला सुरुवात केली . प्रचंड वेगामुळे पाय थरथरू लागले . परंतु काठीचा आधार घेत मी कसा बसा चालत होतो . एक क्षण असा आला की प्रचंड शेवाळलेला पायाखालचा दगड अचानक घसरगुंडीसारखा उतरू लागला . जिथे उतार होता तिथे पाणी खोल होते . आता काय करावे असा मी विचार करेपर्यंत पाण्याचा एक वेगवान प्रवाह आला आणि माझे दोन्ही पाय सटकून मी पाण्यात पालथा पडलो ! एका क्षणात संपूर्ण भिजलो ! आता पाठीवरील सामान देखील भिजणे क्रमप्राप्त होते ! परंतु मला असे जाणवले की कोणीतरी मला उचलून धरले आहे ! म्हणून पाहतो तो माझ्या पाठीवरील झोळी अथवा सॅक पाण्यामध्ये बुडलेलीच नव्हती !  काठीचा आधार घेत कसाबसा उठलो ! आता पूर्णच भिजलेलो असल्यामुळे पाण्याचे भय निघून गेले ! आणि धावतच नदी पार केली ! सियाराम बाबांनी दिलेल्या तीन रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या मी पाठी जवळ ठेवल्या होत्या !  त्यामुळे माझे दप्तर वेदा नदीमध्ये बुडले नाही ! आणि त्यामुळे आतले सर्व सामान कोरडे राहिले ! बाबांनी घडवून आणलेला हा एक मजेशीर चमत्कार ! संत कुठलीही गोष्ट का करतात याचा आपल्याला त्या क्षणी अंदाजच येत नसतो ! पुढे ते लक्षात येते . नदी पार केल्यावर काठाने पुन्हा चालू लागलो . इथे एक मांत्रिक पाण्यामध्ये एका महिलेला व तिच्या पतीला उभे करून काहीतरी पूजा पाठ करत होता . यामध्ये त्या स्त्रीचे मोकळे केस धरून तिला तो पुन्हा पुन्हा पाण्यात बुडवायचा . ती स्त्री देखील शांतपणे हा अत्याचार सहन करत होती . मी तसाही मातीने माखलेला होतो . त्यामुळे इथे शेजारीच मी स्नान करू लागलो . थोडेसे त्या तिघांच्या जवळ जाऊन फक्त एकदाच खुणेने तिला विचारले की माझी गरज आहे का ? तिने नाही , तु पुढे जा , असे मानेने मला सुचवले . अशी खूप शक्यता होती की तिची इच्छा नसताना बळजबरीने तिला या लोकांनी पकडून येथे आणले असावे . तसे काही असते तर माझी दंड युद्धाची कौशल्ये वापरण्याची संधी मला इथे मिळाली होती इतकेच !परंतु तसे काही नाही हे त्या मातारामने सुचवल्यामुळे मी कोरडी वस्त्रे परिधान केली अन पुढे निघालो . 
अगदी याच ठिकाणी ती तांत्रिक पूजा चालली होती . मी संगमावरचे स्नान इथेच केले .
इथे कोपऱ्यावरतीच वेदवेदेश्वर महादेवाचे मंदिर होते . अतिशय सुंदर असे छोटेसे मंदिर होते . टेकडी चढून वर जाऊन दर्शन घेतले . इथे झाडी पण छान होती . 
प्राचीन श्री वेदवेदेश्वर महादेव मंदिर
इथे खाली परिक्रमावासींना विश्रांती घेता यावी म्हणून एका स्थानिक ग्रामस्थाने झाडाचा पार बांधलेला आहे .
अशी छोटी मोठी सेवा कार्ये  नर्मदा खंडामध्ये अनेक जण आपापल्या शक्तीनुसार बुद्धीनुसार करत असतात .
इथून थोडेसे पुढे गेल्यावर वेदांत विला आश्रम नावाचा एक सुंदर आश्रम आहे . ब्रह्मलीन संत श्री संजय जी वेदांती यांनी हा उभा केला आहे . यांचे नुकतेच दुर्दैवाने पुरी जगन्नाथ यात्रेवरून परत आश्रमाकडे येताना अपघाती निधन झाले होते . त्यामुळे त्यांची समाधी देखील आश्रमाच्या परिसरातच आहे . यांचे वय फार नव्हते . ५० च्या आतच होते . यांनी वयाच्या आठव्या वर्षी गृहत्याग करून सुमारे १८५०० किलोमीटरचे पदभ्रमण भारतभर केले होते . सायकलवर चारधाम यात्रा केली होती . ऋषिकेश येथून वेदांत विषयात डिग्री घेतल्यावर त्यांनी नर्मदा काठी आधी नयागावचा आणि नंतर माकड खेडा गावातला हा आश्रम स्थापन केला . इथे परिक्रमावस्यांची उत्तम सोय त्यांनी केली आहे . सध्या एक गृहस्थी साधू हा आश्रम सांभाळतात . या आश्रमात सर्वजण पुढच्या दाराने येतात . मी मागून आल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले . इथे पत्र्याची एक मोठी शेड आहे तिथे मी आसन लावले . बाबांनी सुग्रास भोजन प्रसाद वाढला . इथे एक तरुण सुशिक्षित साधू भ्रमणामध्ये आलेला होता . त्याने मला साधू जीवन परिक्रमेच्या व्यतिरिक्त कसे असते याबाबत खूप माहिती दिली . एकंदरीत परिक्रमा हे काही काळाचे साधू जीवन आहे . तर साधूजीवन ही आयुष्यभराची परिक्रमा आहे असे माझे आकलन आहे . एखाद्याला साधू जीवनामध्ये प्रवेश करायचा असेल ,परंतु ते जीवन कसे आहे याची कल्पना त्याला नसेल तर त्याला एक छोटीशी झलक देण्याचे काम परिक्रमा करते . जसे आंब्याची पेटी घेण्यापूर्वी आंबे वाला छोट्याशा चाकूने कापून तुम्हाला एक फोड खायला देतो तसा हा प्रकार आहे .त्याचा फायदा असा आहे की ज्यांना हे जीवन झेपत नाही ते नाहक साधू बनून साधूत्वाची गरिमा कमी करत नाहीत .  असो . वेदांत विला आश्रमात सर्व सुख सोयी होत्या . बांधलेले संडास बाथरूम होते . मी वेदांती महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आलो . गृहस्थी साधूंशी देखील चर्चा केली . बरेचदा तुम्हाला ठरलेले प्रश्न विचारले जातात व त्याची उत्तरे तुम्हाला तोंडपाठ झालेली असतात . तुम्ही कुठून आले ? परिक्रमा कुठून चालू केली ? तुम्ही एरव्ही काय करता ? परिक्रमा कशासाठी उचललेली आहे ? वगैरे हे ठरलेले पठडीतले ठराविक प्रश्न असतात . एक-दोन वाक्यातच या सर्व प्रश्नांचा निफटारा तुम्ही केला की मग मात्र बोलण्यासारखे खूप विषय शिल्लक राहतात . त्यामुळे मी गेल्या गेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे दोन वाक्यात देऊन पुढे त्यांच्याकडून काही विशेष ज्ञान मिळते का याची चाचपणी करायचो . माझ्या पायातील फाटलेले बूट पाहून या साधूंनी मला नवीन चपला दिल्या . हे चपलेचे लखानी कंपनीचे मॉडेल इथे प्रचंड प्रसिद्ध असून सर्वजण अशाच चपला घालतात . याच्या काही स्थानिक डुप्लिकेट येतात . चप्पल म्हटली की सर्वांच्या पायात हीच चप्पल दिसते . पुण्या मुंबईसारखे पायताणांचे सोस इथे पुरवत नाहीत असे माझ्या लक्षात आले . अशा रीतीने परिक्रमेच्या ६१ व्या दिवशी मी मैय्याकृपेने सातवे पादत्राण स्वीकारले ! 
वेदांतविला आश्रमामध्ये प्रस्तुत लेखकाला मिळालेली सातवी पादत्राणे
तत्पूर्वी उडिया परिक्रमावासी मिलन प्रधान ला मी दिलेले लोफर्स . अनवाणी परिक्रमा करू शकलो नाही याचे प्रचंड शल्य माझ्या मनात कायमचे आहे . किती ठिकाणच्या पवित्र मातीच्या स्पर्शाला मी केवळ पादत्राणे घातल्यामुळे मुकलो आहे याची कल्पना आपण करू शकणार नाही . : (
वेदांत विला आश्रमाचे संस्थापक ब्रम्हलीन संत श्री संजय जी वेदांती
आश्रमाचे प्रवेशद्वार
आश्रमाचा परिसर खूप मोठा असून महाराजांच्या अपघाती निधनामुळे इथे एक प्रकारचे औदासिन्य जाणवते .सर्वसामान्य भक्त मंडळी अजून त्या धक्क्यातून सावरलेली नाहीत .होय . संपूर्ण भारतभर पदभ्रमण केलेल्या या संन्यासी महाराजांनी सायकलवरून चारधाम यात्रा सुद्धा केली आहे . परंतु पुरी जगन्नाथ येथून भक्त मंडळीं सोबत येताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचे देहावसान झाले . कर्माचे भोग साधूला देखील चुकलेले नाहीत . फक्त सर्वसामान्य माणसाचा मृत्यू आणि साधूचे मरण यात एक फार मूलभूत फरक आहे . समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये तो सांगून ठेवला आहे . समर्थ म्हणतात ,

म्हणोन साधूनें आपुलें । जीत असतांच सार्थक केलें।
शरीर कारणीं लागलें । धन्य त्याचें ॥ 

जे कां जीवन्मुक्त ज्ञानी । त्यांचें शरीर पडो रानीं ।अथवा पडो स्मशानीं । तरी ते धन्य झाले ॥

साधूंचा देह खितपला । अथवा श्वानादिकीं भक्षिला।
हें प्रशस्त न वाटे जनांला । मंदबुद्धीस्तव ॥ 

साधू ने जिवंतपणीच आपल्या जीवनाचे सार्थक केलेले असते . त्यामुळे त्याचे शरीर आधीचेच कारणी लागलेले असते . अशा जीवनमुक्त त्यांनी पुरुषाचे शरीर कुठेही का पडे ना ! तरी तो धन्यच आहे !साधू चा देह अगदी खितपत पडला किंवा कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्ला तर लोकना ते अयोग्य वाटते .परंतु तसे काही नसते कारण साधू मुळातच मुक्त असतो ! असो .

दुपारी चार वाजता माकडखेडा गाव सोडले . आणि काठाकाठाने चालत कठोरा गावात आलो . इथे येईपर्यंत अंधार पडू लागला होता . गावाला एक छोटासा घाट आहे . घाटावरच्या लोकांनी मला सांगितले की गावामध्ये नानकदासजी महाराजांची संजीवन समाधी आहे तिथे मुक्कामाची सोय आहे . जवळच असलेल्या समाधी स्थानी पोहोचलो . स्थान अतिशय जागृत होते . एका मोकळ्या मैदानात समाधी मंदिर होते . समोर महादेवाचे मंदिर होते . शेजारी चार भिंतीवर पत्रा आंथरून परिक्रमावासींची मुक्कामाची उत्तम सोय केली होती . आत मध्ये जमीन दिसणार नाही इतक्या गाद्या घातल्या होत्या . क्षणभर विसावा घेतला . नंतर बाहेर येऊन परिसराचे अवलोकन करू लागलो . शहरातील स्त्रिया साधारण दुपारी चारच्या सुमाराला चहा वगैरे घेऊन टीव्ही तरी लावतात किंवा शॉपिंग वगैरे करण्यासाठी बाहेर पडतात . परंतु खेड्यातील स्त्रिया संध्याकाळी न चुकता पूजेचे ताट घेऊन जवळच्या मंदिरात जातात . मी महादेवाची स्तवने म्हणत बसलेलो असताना कमीत कमी ५० एक स्त्रिया येऊन दर्शन घेऊन गेल्या असतील . प्रत्येकीच्या डोक्यावर पदर असायचा . त्यांचा मुक्त संवाद आणि वावर असायचा परंतु आत मध्ये एक परिक्रमा वासी बसला आहे हे पाहताक्षणी त्या मर्यादशील व्हायच्या .आणि पदर सावरून पाया पडून शांतपणे पूजेला लागायच्या . आपल्या मौनातून अशा प्रकारे समोरच्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करण्याची ही पद्धत फारच वेगळी आहे . आश्चर्य म्हणजे साठीच्या पुढच्या स्त्रिया जशा देवाला येत असत तशा तरुण मुली सुद्धा यायच्या . तुलनेने रेवा खंडातील तरुण मुले देवधर्म कमी करतात असे निरीक्षण मी नोंदवित आहे .अर्थात सेवा कार्यामध्ये यांचा हिरीरीने पुढाकार असतोच . फक्त प्रत्यक्ष मंदिरात जाऊन पूजा करण्याचे प्रमाण थोडेसे कमी आहे इतकेच . बहुतांश मुली चांगला पती मिळावा यासाठी महादेवाची आराधना करतात . आणि लग्न झालेल्या स्त्रिया पतीने चांगले वागावे म्हणून महादेवाची आराधना करतात ! एकंदरीत महादेवाची आराधना काही कोणाला चुकलेली नाही ! पुरुष महादेवाची आराधना कमी करताना दिसतात याच्यामागे कदाचित "अशी बायको मला का दिलीस " याचा राग असावा ! अर्थात हा सर्व विनोदाचा भाग आहे हे आपण सर्वजण जाणताच असे गृहीत धरत आहे ! असो . या मंदिरात मी बराच वेळ बसलो होतो . विजवेश्वर महादेव असे या महादेवाचे नाव होते . जव म्हणजे गती . विजव म्हणजे विशेष गती असलेला . विजवेश्वर म्हणजे विशेष गती असलेला देव .

या भागातील काही छायाचित्रे वाचकांच्या माहिती करता देत आहे . सर्व चित्रे गुगल नकाशावरून साभार .

नर्मदा मातेच्या काठावरून दिसणारा नानकदासजी महाराज संजीवन समाधी आश्रम

कठोरा गावातील नर्मदा नदीचे पात्र . इथे खूप खडक आहेत .कदाचित त्यांच्या कठोरपणामुळेच गावाला कठोरा नाव पडले असावे .

कठोरा गावातील निर्मळ नर्मदा मैया

गुरु नानकदासजी महाराज यांची संजीवन समाधी

श्री विजवेश्वर महादेव मंदिर

श्री विजवेश्वर महादेव

परिक्रमावासींची निवास व्यवस्था . याच खोलीत मी मुक्काम केला होता .

देव दिवाळीनंतर नर्मदा परिक्रमा सुरू झाली की इथे अशा रितीने मोठ्या संख्येने परिक्रमावासी उतरतात व मोठ्या मोठ्या पंगती चालतात . परंतु नर्मदा मातेची माझ्यावर अशी असीम कृपा होती ,की इथून पुढे सर्वत्र मी एकटाच होतो .

 थंडी चांगली पडली होती . पत्रे असले की थंडी वाढते .माझे पडल्या पडल्या हवामानाचे निरीक्षण चालायचे . रात्र होईल तशी थंडी वाढत जाते . परंतु मला मात्र थंडी कमी होत असून उकाडा वाढत चालला आहे असे जाणवू लागले . मला मनोमन त्याचे आश्चर्य देखील वाटले . इथे काही साधूंच्या गुहा आहेत असे मला कळाले होते . नुसते बसून राहण्यापेक्षा त्या गुहा पाहून याव्यात असा विचार करून शेजारी असलेल्या एका टेकडीवरील दोन्ही गुहा बघून आलो . गुहा म्हणजे दगडातील गुफा नसून बांधलेल्या बंदिस्त खोल्या होत्या .अत्यंत कचरा व घाण याचे साम्राज्य हे सुचित करत होते की या गुफा अजिबात वापरात नाहीत . दर्शन घेऊन पुन्हा खोलीमध्ये एकटाच बसलेला असताना एक ग्रामस्थ आले . आणि त्यांच्या घरी जेवण्यासाठी येण्याची विनंती मला केली . बाहेर मैदानात मुले खेळत बसली होती . त्यांचा खेळ मी पाहत बसलेला असताना आनंदराम यादव नावाचे हे गृहस्थ आले .परिक्रमेमध्ये कोणाला नाही म्हणणे हा विषय नियमबाह्यच असल्यामुळे त्यांच्या मागोमाग निघालो . यांच्या समोरील घरात राहणाऱ्या शेतकऱ्याने कुबोटा नावाचा मिनी ट्रॅक्टर आजच विकत घेतला होता . माझे ट्रॅक्टरला हात लागावेत अशी इच्छा त्याने व्यक्त केली . नर्मदा मातेवर लोकांचे किती प्रेम आहे ते अशा प्रसंगातून लक्षात येते . मी देखील त्याच्या ट्रॅक्टरला हात टेकवून डोके ठेवून नमस्कार केला आणि यादवांच्या घरी गेलो . घरी याचे वयस्कर वडील देखील होते . बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या . सुरेख असे घरगुती भोजन त्यांनी दिले . आग्रह हा भारतीय उपखंडाचा जन्मसिद्ध अधिकार आहे ! प्रचंड आग्रह केला जातो ! त्यामागे हेतू हाच आहे की अनाठायी संकोचा पायी कुणी कमी खात असेल तर त्याला अन्न कमी पडू नये . आपल्या पूर्वसुरींनी अतिशय विचारपूर्वक आपली संस्कृती आखलेली आणि बेतलेली आहे . असो . पुन्हा आश्रमामध्ये येऊन महादेवापुढे पुन्हा थोडा वेळ बसलो . या मंदिराला फक्त छत होते भिंती नव्हत्या. त्यामुळे नर्मदेकडून येणारा सुगंधी वारा भावावस्था अधिक गहिरी करायचा . अचानक मृद्गंध येऊ लागला ! आणि पाहता पाहता धुवाधार पावसाला सुरुवात झाली ! नर्मदा खंडामध्ये कधी काय होईल याचा नेम नसतो ! धावतच खोलीमध्ये गेलो . आणि पडून राहिलो . भल्या पहाटे जाग आली तेव्हा मी उघडाच पडलेला होतो . परिक्रमे मध्ये चालताना इतके श्रम होतात की बरेचदा अंगावर पांघरूण घ्यायच्या आधी झोप लागते . कित्येकदा मी पाणी पिण्यासाठी कमंडलू उघडला आणि तो तसाच हातात धरून झोपी गेलो . सकाळी उठल्यावर पाहिले तर हातात कमंडलू तसाच ! तसेच काहीसे आज झाले . रात्रभर झालेल्या पावसामुळे वातावरण एकदम सुंदर झाले होते ! इथे काठाने खडकाळ भाग अधिक असल्यामुळे सर्व खडक स्वच्छ धुवून निघाले होते ! पावसामुळे निघायला थोडासा उशीरच झाला . पुढे चालत चालत बडगाव आश्रम गाठला .येथे मांडव्य ऋषींची एक प्राचीन ध्यान गुंफा होती . गेली २५ वर्षे इथे एक साधू राहत आहेत . साधू वृक्षप्रेमी आणि स्वच्छताप्रीय होते . आपल्या कुटीमध्ये रामनाम लिहीत बसायचे . त्यांची परवानगी घेऊन गुहेमध्ये जाऊन बसलो . दोन गुणिले दोन फुटाच्या छोट्याशा दरवाजातून आत जाताच समोर दोन मजले होते . एक वर ,एक खाली . वर शिवमंदिर होते तर खाली ध्यानाची खोली होती . आत मांडव्य ऋषींची अजून एक उप गुहा होती .इतकी खोल गुहा असून देखील आश्चर्य म्हणजे आत मध्ये हवा खेळती होती . निरव शांतता ! कुठलाही आवाज आत मध्ये येत नाही ! तुमच्या हृदयाची धडधड फक्त ऐकू येते . नंतर नंतर ती देखील शांत होते . आता तुमच्या मनामध्ये काय वादळे सुरू आहेत तेवढेच तुम्हाला ऐकू येऊ लागतात . बाकी बाहेरच्या कुठल्याही तरंगांचा परिणाम तुमच्या अंतकरणावर होऊ शकत नाही . अगदी नर्मदा मातेचा आवाज देखील आत मध्ये ऐकू येत नाही . कारण गुफा उताराची आणि खोल आहे . अशावेळी तुका म्हणे होय मनाशी संवाद ।आपुलाची वाद आपणासी ।याची अनुभूती नक्की येते ! बसल्या बसल्या कधी डोळे मिटले लक्षात देखील आले नाही . खूपच छान ध्यान लागले . तासाभराने बाहेर आलो . मन संपूर्णपणे निर्विचार झाले होते . मी कोण आहे ,मी कुठे आलेलो आहे , माझे काय सुरू आहे , मला कुठे जायचे आहे , या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे विसर पडला होता . फक्त आणि फक्त शांतता . . शांतता . .शांतता . . .बराच वेळ या शांत अवस्थेमध्ये गेला असावा . साधू महाराजांना या शांततेची सवय असावी त्यामुळे त्यांनी देखील मध्ये व्यत्यय आणला नाही . थोड्यावेळाने टप करून काहीतरी पडले ज्याने माझी ती अवस्था भंग पावली . झाडाला लागलेला एक अप्रतिम आवळा पडला होता ! आजूबाजूला पाहिले तर भरपूर आवळ्यांचा खच पडला होता .आवळे खायला सुरुवात केली . त्याच्या आंबट चवीने भानावर आणले . मैया चे पाणी पिऊन पोसलेले ते आवळे ! आवळ्याला मुळातच आयुर्वेदामध्ये अमृताची उपमा दिलेली आहे ! आणि त्यात हा नर्मदामृत प्राशन केलेला आवळा ! आम्लराजच जणू ! साधू बुवांनी चहा करून आणला . इथे त्यांनी झाडाला एक झोपाळा टांगलेला होता . त्याच्यावर बसून चहाचे झुरके मारत राहिलो . समोर प्रचंड झाडीच्या पलीकडे मैया वाहत होती . अतिशय रम्य असे हे ठिकाण होते . चातुर्मासासाठी अतिशय आदर्श . इथे परिक्रमेदरम्यान आलेल्या एका मराठी माता रामने काही कुटी बांधल्या होत्या . आणि बराच काळ त्या इथे राहिल्या होत्या असे मला साधूने सांगितले . 

मांडव्य ऋषींची गुहा दर्शवणारी पाटी . मी वर उल्लेख केलेल्या साधूंचे नाव राघवजी महाराज असे आहे परंतु यांना सगळे बालकबाबा म्हणून ओळखतात .

गुहेच्या आधी ओढ्यावर एक लोखंडी पुल आहे . परंतु मी हा ही ओढा पाण्यातूनच ओलांडला . त्यात एक वेगळाच आनंद आहे .

आश्रमाकडे जाण्यासाठी सुंदर पायवाट बांधलेली असून सुबक पायऱ्या वर गेलेल्या आहेत .

याच त्या पायऱ्या

आश्रमातल्या कुटींचा पाया . मी गेलो तेव्हा या सर्व कुटी बांधलेल्या होत्या .

आश्रमाकडे जाताना अशी झाडी आहे . परंतु आश्रम परिसरातही अनेक मोठे मोठे वृक्ष आहेत .

हेच ते प्रवेशद्वार जिथून गुहेमध्ये उतरून जाता येते .इथे शक्यतो मुक्त प्रवेश दिला जात नाही .माझ्या सुदैवाने बालक बाबांनी मला आत जाऊ दिले .

मी बसलो होतो ती उप गुहा किंवा कोनाडा

हाच तो झोपाळा यावर बसून मी चहाचा आनंद घेतला . इथे बसून भजनानंद घेणाऱ्या एका संतांचे संग्रहित छायाचित्र . (आपण महाराष्ट्रामध्ये संत हा शब्द फार जपून वापरतो . नर्मदा खंडामध्ये कोणालाही संत अशी उपमा सहज देतात . )

आश्रमामध्ये स्वच्छता करण्यासाठी एक आजीबाई येत असत . त्यांनी देखील खूप गप्पा मारल्या . साधूची मुलाप्रमाणे त्या काळजी घेत . त्यांना काय हवे काय नको ते पाहत . या साधू महाराजांना गावकऱ्यांनी बराच त्रास दिला आहे असे त्यांनी मला सांगितले . मला साधू ग्रामस्थ विसंवादाचे एक महत्त्वाचे सूत्र सापडले आहे . आणि ते सूत्र आहे विसंवाद ! साधू नक्की कसे आयुष्य जगत असतो किंवा जगलेला असतो याची माहिती तो वैराग्य वशात् सर्वसामान्य लोकांना देत नाही . आणि सर्वसामान्य लोक देखील त्यांच्या मनातील साधू विषयक शंकांचे समाधान त्यांच्याकडून करून घेत नाहीत . त्यामुळे हळूहळू ही विसंवादाची दरी वाढत जाते . साधू विषयक भ्रम पसरविणारी विविध माध्यमे देखील त्याला तितकीच कारणीभूत आहेत .मुळात कुठल्याही विषयाचे संपूर्ण ज्ञान असल्याशिवाय त्यावर अधिकारवाणीने भाष्य करणे हेच बऱ्याचशा दुःखांचे मूळ असते . त्यामुळे साधू विषयी अज्ञान असून देखील लोक , 'आम्हाला माहिती आहे तो काय लायकीचा आहे ' वगैरे गैरसमज मनात ठेवून त्याच्याशी वागायला जातात आणि तिथेच वादाची ठिणगी पेटते . हे साधू अतिशय सात्विक होते असे माझे निरीक्षण होते . परंतु सतत एकटे राहिल्यामुळे येणारे काही वैयक्तिक दुर्गुण देखील समाजापुढे प्रकट न करणे साधूला जमले पाहिजे . अन्यथा वादावादी अटळ आहे . आपल्या लहान मुलांना सतत साधूंच्या संपर्कात ठेवावे . लहान मुलांशी ते अतिशय मोकळेपणाने वागतात आणि त्यांना खूप चांगल्या गोष्टी शिकवतात . या उलट आपण "तो बुवाजी तुला झोळीत टाकून घेऊन जाईल " वगैरे भीती घालून मुलांना साधू आश्रयापासून वंचित ठेवतो .म्हणूनच लहानपणापासून मुलांवर धर्माचे संस्कार होणे अत्यावश्यक आहे . असा विचार करत मी आश्रमाच्या पायऱ्या उतरत असतानाच समोर एक पिता-पुत्र परिक्रमा वासी भेटले ! आणि जणू काही साक्षात माझ्या या विचाराला नर्मदामाता अनुमोदन देत आहे असे वाटले ! विशाखापट्टणम येथून नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आलेले राजेश प्रजापती आणि त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा तनय हे मला या पायऱ्यांवर भेटले . यांच्या विषयी पुढे अनेक वेळा लिहिले जाईल . सध्या या दोघांचे दर्शन घ्या इतकेच सुचवेन !

विशाखापट्टणम येथून नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आलेले राजेश प्रजापती आणि त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा तनय . 

या दोघांना भेटून मला अतिशय आनंद झाला ! हे पिता-पुत्र इतके सात्विक होते की विचारू नका ! हे पुढे निघाले होते . परंतु त्यांना मी गुहे विषयी माहिती सांगितली आणि आवर्जून दर्शन घ्यायला सुचवले . दोघेही वर गुहेकडे गेले . आणि मी पुढे मार्गस्थ झालो . वाटेत विशोकेश्वर महादेवाचे दर्शन घेतले . हा खरगोन जिल्हा होता . 

अनुक्रमणिका

वरील लेख दृक्श्राव्य स्वरूपात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लेखांक चौऱ्याहत्तर समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर