लेखांक ७७ : बुराड संगम ,देव संगम, कपिला संगम लोहारा आणि नाहिली संगमी सहस्त्रयज्ञाख्य तीर्थ मोहीपुरा

ग्यारहलिंगी आश्रमातून भल्या पहाटे मी निघालो खरा . परंतु अशा रीतीने अंधारामध्ये बाहेर पडणे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही . त्यामुळे त्याचे बसायचे ते सर्व फटके मला बसले ! वाटेमध्ये मला प्रचंड वन्यजीव भेटले . अनेक कोल्हे मला आडवे गेले . मोठे घुबड पाहिले . अंधारात अज्ञात जनावरे पळण्याचे आवाज ऐकले . पाण्यातून दोन खोल ओढे ओलांडताना माझ्या मनाची अवस्था काय झाली होती ही माझी मलाच माहिती ! त्यात ओढे ओलांडून भिजल्यामुळे पुढे चालताना अखंड थंडी वाजू लागली . अजूनही झाडी कमी झाली नव्हती .अंधुक दिसू लागले होते .  
ग्यारह लिंगी आश्रम सोडून काठाकाठाने पुढे निघाल्यावर डावीकडे अशी घनदाट झाडी आहे . नर्मदा मैया जिथे जमिनीला स्पर्श करते तिथून चाललात तरच चालण्यापूर्ती जागा मिळते अन्यथा चालता येत नाही . परंतु नर्मदेच्या कृपेने मला प्रत्येक वेळी एक पाऊल ठेवण्या पुरती तरी जागा मिळाली .
आपण वरून खाली चालत आहोत .
हेच ते दोन ओढे जे मी अंधारात पाण्यामध्ये उतरून पार केले . मला असे वेडे साहस करायची इच्छा त्यादिवशी का झाली माहिती नाही . परंतु हे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही .तरी कृपया अन्य परिक्रमावासिनी हे अनाठायी साहस करू नये अशी विनम्र प्रार्थना . मैया ला त्रास होतो .
हा संपूर्ण किनारा कसा आहे हे आपल्या लक्षात यावे म्हणून याचे अजून एक गुगल चित्र टाकत आहे . याच्यामध्ये शेती दिसत असली तरी शेतातून चालणे फारसे सुखावह नसते . त्यामुळे हातातील दंड मैय्यामध्ये बुडवत बुडवत चालायचे . खूप आनंद मिळतो . 
हळूहळू जसजसे उजाडू लागले तसतसे सभोवताली पसरलेले दृश्य पाहून तनमन हरखून गेले ! जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सर्वत्र केवळ हिरवळ च हिरवळ होती ! नर्मदेचे पाणी अतिशय शांत होते . शांतता सुद्धा शांत होण्यासाठी इथे येऊन काही काळ शांत बसत असावी ! त्यात मी भिजलेला असल्यामुळे अजूनच थंड पडलो होतो ! थंडगार वारा ! डोळ्यांना देखील थंडावा ! स्वर्गीय अनुभव होता ! असे वाटत होते इथेच राहावे ! भव्य दिव्य नर्मदा पात्र पाहत राहावे ! अचानक समोर एक भव्य दिव्य नदी आडवी आली ! ही नदी तीन वेगवेगळ्या शाखांद्वारे नर्मदेला मिळत होती ! बुराड नदी किंवा बोराणी नदी असे तिचे नाव होते . नदीचे पाणी अतिशय स्वच्छ आणि नितळ होते . पात्राच्या मधोमध उभा राहून आकंठ पाणी प्यायलो . प्रत्येक नदीच्या पाण्याची चव वेगळी असते हा निसर्गाचा किती मोठा चमत्कार आहे ! आणि त्या चवीतला वेगळेपणा आपल्या टिचभर जिभेला कळतो हा त्याहून मोठा चमत्कार आहे ! नदीचे पाणी मोठा त्रिभुज प्रदेश तयार करत नर्मदार्पण होत होते . इथे खूप सारी शिवलिंगे सापडत होती . नानाविध रंगांची नानाविध ढंगांची शिवलिंगे पाहून उचलण्याचा मोह व्हायचा . परंतु वजन होत असल्यामुळे नाद सोडून द्यायचो . त्यातल्या त्यात एखादे खूप चांगले शिवलिंग मिळालेच तर जुने ओबडधोबड शिवलिंग तिथे ठेवून नवीन घ्यायचो ! म्हणजे वजन तेवढेच राहायचे . ही नदी पार करायला मजा आली ! आधीच भिजलेला असल्यामुळे या नदीला पार करताना काही वाटले नाही . मध्ये खोल डोहामध्ये स्नान देखील केले . मैयाच्या काठाने चालताना अन्य नद्यांची भीती वाटायची बंद झाली होती ! त्या सर्व नद्या आपल्याच आहेत असे वाटायचे ! त्या आपल्याला काय करणार ! आई पेक्षा मावशी जास्त माया करते तसा अनुभव या नद्या द्यायच्या ! अतिशय प्रेमाने त्या परिक्रमावासींना पार करवितात . माझी अशी खात्री पटलेली आहे की या सर्व नद्या , नाले , ओढे यांना स्वतःचे अस्तित्व असते . स्वतःचे मत असते . कुणाला पार करावयाचे आणि कुणाला बुडवायचे हे ठरविण्याची शक्ती यांच्यामध्ये असते . आपण जेवढे त्यांना शरण जाल तेवढे ते आपल्यासाठी सुखकारक असतात . पंचमहाभूतांची परीक्षा घ्यायला जाऊ नये . आपली तेवढी योग्यता नाही . किंबहुना होणारे परिणाम भोगण्याची सहनशक्ती आपल्यामध्ये नाही .  ही नदी किती सुंदर होती हे तुम्हाला google नकाशा पाहिल्यावर कळेल .
विस्तारपूर्वक नर्मदार्पण होणारी बुराड अथवा बुराणी नदी . घाटवाड्या आणि नन्दगाव यांच्यामध्ये ही नदी लागते .
धरणाच्या पाण्यामुळे या भागातील बरीचशी गावे डूबक्षेत्रात जातात . त्याच्या खाणाखुणा तुम्हाला सर्वत्र दिसतात . मोठे मोठे महावृक्ष वठलेले आहेत . त्यांची पांढरी फटक खोडे नजरेत भरतात . काठावरील जी घरे दरवर्षी पाण्याखाली जातात ती सोडून लोकांनी मागे घरे बांधलेली आहेत . त्यामुळे ही जुनी पडकी घरे भकास दिसतात . मी साधूचा चहा बालभोग नाकारून पुढे आल्यामुळे आज मला वाटेमध्ये कोणी चहाच काय पाणी सुद्धा विचारत नव्हते . अर्थात वाटेत माणसे दिसतच नव्हती . परंतु जेव्हा एखाद्या गावातून जायचो तेव्हा देखील काही विचारणा होत नव्हती . इथे मध्ये अचानक डाव्या हाताला एक अतिप्रचंड खोल खड्डा काढलेला दिसला . मोठे मोठे जेसीबी अखंड काम करत होते . इथून नर्मदा मातेचे पाणी वळविण्याचे काम सुरू आहे असे मला कळले . या प्रकल्पाला नागलवाडी जल उपसा प्रकल्प असे म्हणतात . हा प्रकार फारच भव्य आणि अजस्त्र होता . गंमत म्हणजे नर्मदेपेक्षा खोल खड्डा काढून देखील खाली पाणी फारसे नव्हते . इथे बहुतेक नर्मदापात्रामध्ये खडक असल्यामुळे ही जागा निवडली होती . 
नागलवाडी जल उपसा प्रकल्प
प्रकल्पाची भव्यता दर्शविणारी काही छायाचित्रे
इथे खाली जिथपर्यंत खोदकाम कराल तिथपर्यंत वाळूच वाळू सापडते . नर्मदेच्या बाजूला मात्र मोठा अखंड खडक आहे असे अभियंत्याने मला सांगितले .
आता प्रकल्प पूर्ण झाला असून त्यात पाणी भरल्याचे दिसते . मी चालताना मात्र प्रकल्पाचे काम जोरात सुरू होते .
वरील चित्रात दिसणारा नागलवाडी प्रकल्प ब्राह्मणगाव चा घाट नर्मदा सेवा आश्रम आणि राम मंदिर . ही सर्व स्थाने पुढे पाहूयात .
नंदगाव मागे पडल्यावर ब्राह्मणगावात आलो . काठाने चालता चालता दगडी घाट लागला . घाट सुंदर होता . गावात राम मंदिर आहे असे कळले . दर्शनासाठी म्हणून वर गेलो . 

ब्राम्हणगावच्या घाटावर मी चालत आलो तो रस्ता समोर सरळ रेषेत  आहे . 


पायऱ्या चढून वर गेले की ब्राह्मणगाव सुरू होते . विशेष म्हणजे गावात ब्राह्मणांची घरे नव्हती . राम मंदिरांचे पुजारी तेवढे ब्राह्मण होते . 
गावामध्ये एक नर्मदा परिक्रमावासी धर्मशाळा उभी करण्यात आलेली आहे . नदीच्या अगदी काठावर पत्र्याची शेड टाकून धर्मशाळा बांधलेली आहे . इथे मी गेलो . परंतु कोणीही मला बस देखील म्हणाले नाही चहा पाणी तर दूरची गोष्ट ! अर्थात यात या कोणाचा दोष नाही हे आपण जाणता ! मला आज उपाशी मारायचे मैय्यानेच ठरवले होते ! रात्री आसरा देणाऱ्या साधूचा , चहा पाण्याचा अव्हेर करून केलेला अपमान , ही नर्मदा खंडामध्ये साधी गोष्ट नाही !  थोडा वेळ या धर्म शाळेत बसलो . आणि राम मंदिरात जाऊन यावे असा विचार केला . 


हीच ती धर्मशाळा . ब्राम्हणगाव जिल्हा बडवानी

पत्र्याची शेड असली तरी धर्मशाळा अतिशय अत्याधुनिक आहे . स्वच्छ फरशी जागोजागी पंखे लावलेले आहेत . अशा सुविधा फार कमी ठिकाणी मिळतात .


परिक्रमावासी अशा पद्धतीने आसन लावतात . 
इथे फारसे अगत्य न दिसल्यामुळे मी राम मंदिरात गेलो .घरासारखेच मंदिर होते . किंवा बहुतेक मंदिरातच घर थाटले होते .रामरायाचे दर्शन घेऊन आलो आणि ओसरी मध्ये मी क्षणभर बसलो .  सकाळचे दहा वाजले असावेत . इतक्यात आतून एक माताराम आल्या आणि त्यांनी सांगितले बारा वाजल्या शिवाय भोजन मिळणार नाही .


ब्राम्हणगाव येथील रामाच्या उत्सव मूर्ती . दक्षिण भारतात कुंभकोणम जवळ स्वामीमलई नावाचे गाव आहे . इथे या सर्व ओतीव मूर्ती बनवल्या जातात .

आज रामराया देखील आपली बाजू घेत नाही असे लक्षात आल्यावर तिथून शांतपणे उठलो आणि पुढचा मार्ग पकडला . पोटामध्ये भुकेची जाणीव हळूहळू तीव्र होत होती परंतु सकाळी केलेला पराक्रम माहिती असल्यामुळे निरुपाय होता . नर्मदा तिचे अनुभव इतक्या खात्रीशीरपणे देत असते की आपल्याला चूक केल्याबरोबर शिक्षा काय मिळणार याची देखील खात्री असते . तसेच माझे झाले होते . मनातल्या मनात माझे द्वंद्व सुरू होते . एक मन म्हणत होते कशाला निघायची घाई केली ? तो तांत्रिक असे माझे काय बिघडवणार होता ? आणि दिसली मानवी कवटी तर काय फरक पडतो ? दुसरे मन सांगत होते , जिथे आपल्याला कोणी विचारत नाही , तिथे क्षणभर तरी कशाला थांबावे ! आणि चालावे लागले उपाशी पोटी एखाद्या दिवशी तर काय फरक पडतो ! रोज सुग्रास अन्न देतेच आहे ना मैया ! एखाद दिवस सुट्टी घेऊ दे की तिला ! असे विचार करत किनारा पकडून झपाझप चालू लागलो . विश्वनाथ खेडा , चैनपुरा गावे ओलांडत मारु की चिंचली गावाची हद्द गाठली . चिंचली गावातील राम मंदिरामध्ये देखील भोजन प्रसाद मिळणार नाही असे मला सांगण्यात आले . तुम्हाला असे वाटू शकते की सारखे भोजन भोजन काय चालू आहे . परंतु जेव्हा पोटामध्ये आग पडते तेव्हा बाकीचे काही सुचत नाही . त्यात चालून कष्ट झालेले असतात जे तुमची भूक अजून गहरी करतात  .इथे देव किंवा डेब नावाची नदी आडवी येते . हिचे पात्र फार मोठे असून पाण्याला प्रचंड गती आहे . पाण्यात शेवाळे देखील खूप आहे . त्यामुळे थोडेसे उलटे गावात चालत जावे लागते . तिथून भयाण अशा वाळवंटातून नदी पार करावी लागते . म्हणजे तसं पाहायला गेलं तर हे जंगल आहे . परंतु कितीही खोल खणले तरी वाळूच सापडते . त्यामुळे हजारो लाखो वर्षांपूर्वीची ही वाळू अवैध रितीने उत्खनन करून काढण्याचा मोठा व्यवसाय या भागात आहे . वाळू खणणाऱ्या लोकांनी इतके विचित्र ठिकाणी उत्खनन करून ठेवलेले आहे की बरेचदा चार-पाचशे मीटर चालल्यावर आपल्या लक्षात येते की आता रस्ता संपला आहे व पुन्हा  उलटे जावे लागणार आहे . परत उलटे येताना देखील तुम्हाला पहिला रस्ता सापडेल याची खात्री नसते . इतका भयंकर भुलभुलैय्या येथे निर्माण झालेला आहे .  हा परिसर कसा आहे याची आपल्याला कल्पना यावी म्हणून या भागाचा गुगल नकाशा सोबत जोडत आहे . 
हे सगळे वाळू अधिक जंगल असे क्षेत्र आहे .
या भागात वन्य जीव देखील भरपूर असून कोल्हे लांडगे साळींदर यांची मोठी संख्या आढळते . जपून चालावे लागते . वाळूचे मोठे मोठे उभे कडे कापलेले दिसतात . त्यामुळे ज्या भिंती तयार होतात तिथे वेडे राघू  आपल्या गुहा किंवा घरटी बनवतात . अशा सुमारे २०० , ३०० घरट्यांचा समूह एकेका ठिकाणी मी पाहिला . एकंदरीत इथले चालणे भीती प्रद वाटते . पायाखालची वाळू देखील कधीही सटकेल याचा नेम नसतो . 
या देव अथवा डेबनदीचे एक वैशिष्ट्य आहे . हिच्या काठावर जेवढी म्हणून गावे आहेत त्या प्रत्येक गावाच्या नावात डेब हा शब्द आहे . उदाहरणार्थ  मेहगाव डेब , सेमलदा डेब ,पिपल्या डेब , पिपरी देब , बिल्वा डेब इ . फार थोड्या नद्यांना असे भाग्य मिळते . इथून पुढे नलवाई  किंवा नलवाय गावात आलो . इथे देखील कोणीही पाणी सुद्धा विचारले नाही . अखेरीस किनारा पकडून पुन्हा चालू लागलो . इथे कपिला नावाची नदी आडवी आली . नदी खोल होती . पलीकडच्या काठावर एक नाव नांगरलेली होती . तिथे आंघोळ करणाऱ्या एका माणसाने माझ्या दिशेला जोरात नाव ढकलून दिली . मी देखील काठीने नाव ओढून घेतली . नंतर स्वतःच नावेत बसून काठी ने वल्हवत वल्हवत पलीकडचा किनारा गाठला . माझ्या अंगातले सगळे बळ निघून गेले होते . कसाबसा घाट चढलो .हे लोहारा नावाचे गाव होते . इथे एका साधूची धर्मशाळा आहे असे कळले . मोठ्या आशेने धर्म शाळेमध्ये गेलो . साधूने सांगितले की जेवणाची वेळ टळून गेली आहे . दुपारी बारा वाजता आल्यावरच भोजन मिळते . त्याने आसन लावायला सुद्धा नकार दिला . आता मात्र मला खरोखरच पश्चाताप होऊ लागला .जाऊन जाऊन जावे तरी कुठे असा प्रश्न पडला . अखेरीस इथेच रस्त्यावर आसन लावण्याचा निर्णय मी घेतला . इथे घाटावरच एका निवृत्त कर्नल चा बंगला होता . त्याच्या बाहेर एक मोठे झाड होते . त्याच्या सावलीत रस्त्यावर मी आसन लावले . दुपारचे सुमारे तीन वाजले होते . नर्मदा मातेची क्षमा मागण्यासाठी मी घाट उतरून खाली गेलो . तसेही संगमावर स्नान केलेले नव्हतेच . अतिशय निसरड्या अशा त्या तिरक्या घाटावर तीन डुबक्या मारून स्नान केले . आणि हात जोडून नर्मदा मातेची मनोमन क्षमा मागितली . तिला मी सांगितले हे पहा मैया सकाळपासून मी अखंड चालतोच आहे . सुमारे दहा तास झालेले आहेत . पोटात अन्नाचा कण नाही . डोक्यावर सूर्य आग ओकतो आहे . आता इथून पुढे जाण्याची क्षमता माझ्या मध्ये नाही . मला मनापासून क्षमा कर . त्या साधूला सांग की ह्या परिक्रमावासीला त्याच्यापासून काही अडचण नव्हती . परंतु त्याने बाळगलेला मांत्रिक आवडला नसल्यामुळे हा पुढे निघून गेला . पुन्हा असा प्रमाद माझ्या हातून घडणार नाही . माझे तोंड मैया मध्ये बुडवले आणि डोळ्यांनी पुन्हा हाच निरोप तिला सांगितला . बाहेर आलो . अंग पुसले . आणि आसनावरती जाऊन पाठ टेकली . मंद गार वारा सुटला होता . दुपार टळून संध्याकाळ होण्याची लक्षणे दिसू लागली होती . आता छान झोप काढावी असा विचार मी केला . तसेही सुमारे २५ - २७ किलोमीटर अंतर मी सलग तोडले होते . आता माझा डोळा लागणार इतक्यात एक म्हातारी माताराम आली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला . "बुखार है क्या बाबाजी ? " "नही मैया । " " तो  फिर बाहेर क्यू सोये हो ?अंदर आश्रम मे जाओ ना । " " अरे वो आश्रम वाले महाराज ताला लगाके चले गये । "मी सांगितले . " कोई बात नही । शाम को भी यही पे भोजन करोगे ना ? " माता रामने मला विचारले . "मैया आज मैने भोजन नही किया । अब शाम का तो पता नही । मैया जाने । " माझ्या या उत्तराने म्हातारी ताडकन उभीच राहिली ! "लोहारा गाव मे परिक्रमावासी भूखा सोएगा ? " चिडून नेमाडी भाषेमध्ये तिने बहुतेक साधूला लाखोली वहायला सुरुवात केली . मी तिला म्हणालो "माताजी गलती मेरी है । मैने सुबह चाय बालभोग ठुकराया है । उसकी सजा तो  भुगतनी पडेगी ना । " म्हातारी उठून ताडताड निघून गेली . मला पुन्हा डोळा लागला . थोड्या वेळात काही लोकांची गडबड ऐकू आली म्हणून मी जागा झालो . समोर काही लोक पूजा मांडून बसले होते . नीट लक्षपूर्वक ऐकल्यावर मला लक्षात आले की हे लोक मराठीमध्ये बोलत आहेत ! एकीकडे पूजा चालू होती तर एकीकडे स्वयंपाक चालू होता . दाल भाटी बनवण्याचा कार्यक्रम चालू होता . त्यांच्यासोबत ची लहान मुले खेळत खेळत माझ्या जवळ आली . माझ्याकडे पाहून त्यांना मौज वाटत होती . रस्त्याच्या कडेला शक्यतो भिकारी झोपतात . आणि भिकाऱ्यांशी बोलू नये असे घरी मुलांना शिकवलेले असते . त्यामुळे मुले माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखी करत होती . खेळता खेळता त्यांचा चेंडू माझ्या अंगावर पडला . मी त्या मुलांना म्हणालो तुमची नावे सांगितली तरच चेंडू मिळेल ! मुले धावतच आपल्या नातेवाईकांकडे गेली आणि त्यांना सांगू लागली अहो तो भिकारी मराठी मध्ये बोलतो आहे ! त्यांचा काहीच दोष नव्हता . मी इतक्या नद्या ओढे नाले चिखलातून ओलांडून आलो होतो की माझे कपडे प्रचंड मळले होते ! बरं वस्त्रांवरची माती , हीच नर्मदेची विभूती हा भाव ठेवून चालत असल्यामुळे समोरच्या माणसाचा गैरसमज होणे स्वाभाविक होते . आणि तसेही एखाद्या भिकाऱ्यांमध्ये आणि माझ्या मध्ये काय फरक होता ? तो देखील भूक लागली म्हणून जेवायलाच मागतो ना ? मी दुसरे काय करत होतो ? तरी देखील त्या कुटुंबाचा प्रमुख माझ्याकडे बोलण्यासाठी आले . नमस्कार चमत्कार झाला . हे डॉक्टर चौधरी नावाचे अंमळनेर इथले वैद्यकीय डॉक्टर होते . त्यांनी बडवानी मध्ये क्लिनिक चालू केले होते . कुठल्यातरी पूजेच्या निमित्ताने सर्व नातेवाईकांना घेऊन ते नर्मदे काठी आले होते . मी परिक्रमा करतो आहे हे लक्षात आल्यावर त्यांच्या घरातील सगळे जण माझ्या भोवती गोळा झाले . यांच्या पत्नी जळगावच्या होत्या . सर्वांनाच मराठी बोलणारा परिक्रमा वासी भेटल्यामुळे आनंद झाला होता . डॉक्टर चौधरी मला म्हणाले , " नेमके आम्हाला यायला उशीर झाला . आम्ही दुपारपर्यंत पोहोचलो असतो तर आमच्या सोबतच तुम्हाला दाल बाटी खायला सांगितले असते . " मी केवळ हसलो आणि काहीच बोललो नाही . इतक्यात ती वृद्ध माताराम पदरा आड ताट झाकून घेऊन आली आणि तिने मला  गरमागरम चार पोळ्या आणि भाजी वाढली !  हे पाहिल्याबरोबर डॉक्टर साहेब अवाक् झाले ! " हे काय ?तुम्ही अजून जेवला नव्हतात? " त्यांनी आश्चर्याने विचारले . आणि मला प्रेमळ तंबीच दिली . की आता मला त्यांच्यासोबत दाल भाटी सुद्धा खावी लागेल ! मग काय विचारता ! तसेही चार पोळ्यांनी माझे पोट भरणार नव्हतेच ! सोबत भरपूर दाल भाटी खाल्ली ! चुर्मा खाल्ला ! मस्तपैकी आंब्याचे लोणचे ओरपले ! सर्वांनाच खूप आनंद झाला ! अशाप्रकारे मैयाने शिक्षा भोगायला लावून नंतर चांगले बक्षीसही दिले ! या परिसरातील छायाचित्रे आपल्या माहितीकरता जोडत आहे . म्हणजे आपल्या डोळ्यासमोर चित्र उभ राहील !
हाच तो उताराच निसरडा लोहारा घाट जिथे मी स्नान केले . समोर जो तट दिसतो आहे तिथूनच नावेने मी इकडे आलो . ज्या नावेने आलो ती नाव सुद्धा झाडीमध्ये दिसते आहे पहा . ही नाव इथेच नांगरलेली असते .डावीकडून येते आहे ती नर्मदामाता आहे उजवीकडून येणारी कपिला नदी आहे .
संगमाचे स्थान तसे रम्य आहे फक्त काठावर चिखल खूप आहे .
गुगल नकाशा मध्ये पाहिले असता संगम असा दिसतो . लोहारा घाट आणि कपिलेश्वर महादेवाचे मंदिर देखील दिसत आहे . निळा पत्रा दिसतो आहे तो कर्नल साहेबांचा बंगला आहे .

हीच ती परिक्रमावासी धर्मशाळा जिला कुलूप लावून व्यवस्थापक साधू निघून गेला .
त्यामुळे इथे या पारावर मी आसन लावणार होतो . परंतु तिथे भैरव समूह झोपलेला असल्यामुळे मी पुढे रस्त्यावर आसन लावले .
हाच तो काँक्रीटचा रस्ता जिथे मी आसन लावले . समोर धर्मशाळा दिसते आहे पहा .

अगदी याच नंदी मंडपाजवळ सावलीमध्ये मी आसन लावले .मागे काळे पांढरे दार दिसते आहे तो कर्नल साहेबांचा बंगला आहे .
कर्नल साहेबांच्या बंगल्यामध्ये एक आवळ्याचे झाड होते . त्याचा आवळा टप करून माझ्यासमोर पडला आणि मला आवळे खायची इच्छा झाली . तर जाताना डॉक्टर चौधरी यांनी न विचारता बिस्किटे आणि अर्धा पाऊण किलो आवळे मला सोबत दिले !पुढे बरेच दिवस या आवळ्यांनी माझी तहानभूक भागवली !
इथे पडल्या पडल्या नर्मदा कपिला संगमाचे असे सुरेख दर्शन होत होते . पाणी उतरल्यावर घेतलेले हे चित्र आहे . 
इथून थोडेसे पुढे गेल्यावर कपिलेश्वराचा घाट लागतो . ही भगव्या रंगाची नाव येथे कायम नांगरलेली असते . अशा नावा सरदार सरोवरामध्ये खूप आहेत .
कपिलेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या याच पायऱ्या उतरून मी खाली आलो आणि पुढचा मार्ग चालायला सुरुवात केली .
इथून पुढे बरेच चढ उतार लागले .ओळीने काही टेकड्या आहेत . पहिल्या टेकडीवर बीमलेश्वराचे मंदिर आहे .
इथून नर्मदेचे खूप सुंदर दर्शन होते .
दुसऱ्या टेकडीवर सिद्धेश्वराचे स्थान आहे .
टेकडीवर असलेल्या सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेतले . इथून पुढे देखील काही लोकांनी जमिनी विकत घेऊन आश्रम बांधलेले आहेत .एक साईबाबा मंदिर आहे . पुढचे सर्व आश्रम खालूनच पहात पुढे निघून गेलो . परंतु वाचकांपैकी कोणी त्या मार्गाने गेले तर माहिती असावे म्हणून गुगल वर सापडलेले त्या स्थानाचे फोटो सोबत जोडत आहे .
श्री विमलेश्वर महादेव
महादेव मंदिरातून नर्मदेचे सुंदर दर्शन होते
मंदिराची टेकडी बऱ्यापैकी उंच आहे
मंदिर प्राचीन आहे . रम्य स्थान आहे .
सिद्धेश्वराचे स्थान देखील इथून जवळच आहे
अशी प्रत्येक स्थानाची काही ना काही आख्यायिका नर्मदे काठी आहेच आहे . त्यामुळे तीन वर्षे तीन महिने १३ दिवसाची परिक्रमा केली तरच सर्व पाहून होते . 
पारंपारिक साहित्य वापरून आधुनिक दिसणारे बांधकाम पुढे केलेले दिसते .
स्थापत्य विशारदांसाठी नर्मदा काठ हे नंदनवन आहे हे मी याचसाठी म्हणत आहे . तिथे अजूनही विविध प्रकारच्या वास्तु उभ्या करण्यास पुरेसा वाव आहे . प्रत्येक प्रसिद्ध आर्किटेक्टने एक तरी वास्तू नर्मदे काठी सेवा म्हणून उभी करावी . खूप पुण्य मिळेल .आणि जगभरामध्ये नर्मदा खंडाचे नाव वास्तुवैविध्यामुळे प्रसिद्ध होईल . 
अजून एका टेकडीवरील साईबाबा मंदिर आणि आश्रम
मंदिराचा आकार थोडासा विचित्र आहे . परंतु कल्पक आहे . ओम श्री साई नाथाय नमः ।
या भागातील नर्मदा अतिशय भव्य दिव्य आणि शांत आहे .
पाण्याच्या मोटर्स चा आकार आणि उपसा क्षमता आता हळूहळू वाढत जाते आणि खांब लावून विद्युत तारा उचलून घेण्याचे प्रमाण वाढते . 
इथे अजूनच सावधपणे चालावे लागते . कारण आता थेट विजेचा झटका बसण्याची शक्यता असते ! मी बरेचदा खाली वाकून जायचो . परंतु माझी बिछान्याची गुंडाळी त्या वायरीं मध्ये नेमकी अडकायची . अजून थोडे खाली वाकावे तर गुडघे चिखलात आपटायचे ! तसाही इथून पुढे प्रचंड चिखल सुरू झाला ! मध्ये येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचे प्रमाण वाढू लागले . आणि सर्वच ओढे गुडघाभर चिखलाने भरलेले होते . धरणाचे पाणी उतरल्यामुळे असे झाले होते . त्यामुळे माझे सर्वांग चिखलाने भरून गेले ! खूप वेळा चिखलामध्ये रुतलो . घसरून आपटलो सुद्धा ! पाहणारे कोणीच नव्हते ! त्यामुळे बिनधास्त सर्व प्रकार चालू होता . धुण्याची देखील सोय नव्हती . कारण मैया मध्ये सुद्धा पाच ते दहा फूट चिखल झालेला होता . माझे मलाच हसू यायचे ! परंतु मी एक निरीक्षण केले . मैयाकाठचा चिखल पायाला लागला की पायाचे दुखणे कमी व्हायचे ! तो जणू काही औषधी चिखल होता ! दुखणाऱ्या पायांना मैयाने स्वतःच्या हाताने लावलेला लेपच जणू ! लेपा ! 
या भागातील ओढे नक्की कसे होते हे आपल्याला कळावे म्हणून त्या ओढ्यांचा गुगल नकाशा खाली जोडत आहे . हे सर्व ओढे कमरे एवढ्या पाण्यातून गुडघाभर चिखलातून पार केले . हळूहळू तुम्हाला जलस्रोत पाहिल्यावर तो किती धोकादायक आहे याचा अंदाज येऊ लागतो . आतला आवाज इथे तुम्हाला खूप मदत करतो . आणि तो निश्चितपणे आपला स्वतःचा नसतो ! त्याच्यावर देखील तिचीच सत्ता आहे !
हे सर्व ओढे काठाकाठाने चालत पार करायचे .अर्थात चातुर्मासामध्ये जेव्हा पाणी चढते तेव्हा हे सर्व जलमग्न झालेले असते . सुदैवाने मी पाणी उतरलेले असताना चालत होतो .
 नाहिली नामक नदी नर्मदेला येऊन मिळते तो संगम देखील असाच खूप मोठा आहे . या नदीला पार करणारी प्रत्येक व्यक्ती नाहीलीच पाहिजे असा तिचा नियम आहे ! त्यामुळे खोल पाण्यातून अंघोळ करतच बाहेर पडायचे ! ( परिक्रमेला जाण्याची त्यांना इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर पोहणे शिकून घ्यावे म्हणजे पाण्याची भीती जाते ! ) नद्या त्यांचे प्रवाह बदलत असतात . या नदीन बहुधा तिचा प्रवाह कधी बदलला नसावा . जगह से ना हिली इसलिये नाहिली ! असो . 
अखेर अतिशय सुंदर अशा मोहीपुरा आश्रमात येऊन पोहोचलो . सूर्य मावळतीला आलेलाच होता . गावातील तरुण आश्रमात केलेली सजावट उतरविण्याचे काम करत होते . सर्वांनी मोठ्या आनंदाने माझे स्वागत केले . परिक्रमा जवळपास संपलेली असल्यामुळे असा एखादा परिक्रमावासी जेव्हा येतो तेव्हा लोकांना खूप आनंद होतो असे मी अनुभवले .इथे ६२ वर्षे वय असलेले एक पती-पत्नी परिक्रमावासी अन्य परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी म्हणून थांबले होते . हा नितांत सुंदर आश्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांधलेला आहे असे मला सांगण्यात आले . हा आश्रम डूबक्षेत्रामध्ये बांधलेला असल्यामुळे दरवर्षी जलमग्न होतो . व पाणी उतरल्यावर पुन्हा त्याचा जिर्णोद्धार केला जातो . इथे असलेले सिद्धेश्वर महादेवाचे स्थान हे भार्गव ऋषींनी स्थापन केलेले आहे . अमृतानंद पुरी नामक एका यतींनी या स्थानाचा जीर्णोद्धार केला . पांडवांनी पूर्वी नर्मदे काठी एक सहस्र यज्ञ घातले होते . ते स्थान इथून दिसत होते .म्हणून या टोकाला सहस्रयज्ञाख्यतीर्थ असे नाव पडले . स्वामीजी स्वतः पूर्वाश्रमीचे संघ स्वयंसेवक होते . त्यामुळे ओघानेच या आश्रमामध्ये संघाच्या स्वयंसेवकांचा सदैव राबता राहिला आहे . आता देखील इथे अनेक तरुण काही ना काही काम स्वयंस्फूर्तीने करताना मी पाहिले . विशेष म्हणजे याच्यामध्ये लहान मुलांचा देखील मोठा सहभाग होता . सगळ्या वानरसेनेने मिळून तासाभरातच संपूर्ण आश्रम आवरून चकाचक केला .
 आश्रमाच्या याच खोलीमध्ये मुक्काम घडला . गावातील तरुणांचा आश्रमातील वावर लक्षात येण्याजोगा असतो .
आश्रमाचे स्वयंसेवक
आश्रमाच्या परिसरामध्ये सुंदर बगीचा दरवर्षी उभा केला जातो आणि दरवर्षी पुरामुळे ही सर्व शोभेची झाडे वठतात . मी आश्रमातील स्वयंसेवकांना टिकाऊ पाणथळ देशी वृक्षांची माहिती दिली . 
चातुर्मासामध्ये सिद्धेश्वराचे मंदिर आणि आश्रम अशा रीतीने जलमग्न असतो .
 या आश्रमामध्ये नर्मदेच्या काठावर एक अतिशय सुंदर अशी गोलाकार कुटीया उभी केली होती . मला या कुटीची रचना फारच आवडली . हिचे छप्पर देखील रंगीबेरंगी होते . गावातील एका तरुणाने मला कुटी आतून दाखवली . आणि त्या कुटी बाहेर उभे करून माझा एक फोटो त्याने काढला व मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . तो वाचकांसाठी सोबत जोडत आहे .
मोहीपुरा गावातील आश्रमामध्ये सुंदर अशा गोलाकार कुटी शेजारी उभा प्रस्तुत लेखक . मागे नर्मदा नाहीलि संगम दिसतो आहे .
हा आश्रम फारच रम्य होता . परंतु दुर्दैवाने येथे चातुर्मास करता येत नाही , कारण हा आश्रम चातुर्मासामध्ये  जलमग्न असतो .
चातुर्मासामध्ये हाच आश्रम अशा रीतीने संपूर्ण पाण्याने वेढला जातो . सरदार सरोवराची उंची वाढवल्यावर हा आश्रम बुडणे सुरू झाले . कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडता है ।
या भागातील अनेक पुरातन वृक्ष वठलेले आहेत आणि जुने वाडे देखील ढासळून ओस पडलेले आहेत . गावांमध्ये एक राम मंदिर आहे . द्वारके नंतर तशी हुबेहूब मूर्ती थेट याच गावांमध्ये आहे . त्यामुळे द्वारकाधीशाची ही मूर्ती प्रसिद्ध आहे . 
त्या मातारामने अतिशय सुंदर स्वयंपाक करून मला जेवायला वाढले . पोटभर जेवून बाहेर चालायला आलो .
इथे रात्री गावातील तरुणांचे प्लास्टिक बॉल क्रिकेटचे सामने आश्रमाला लागूनच चालले होते ते पाहत बसलो आणि समालोचकाचे विनोदी शैलीतील समालोचन ऐकून हसून हसून अक्षरशः पोट दुखायला लागले ! आपल्या समालोचनावर एक परिक्रमावासी हसून हसून लोळतो आहे हे पाहिल्यावर त्याने विनोदाची पातळी अजूनच वाढवली आणि संपूर्ण परिसर हास्यमग्न करून टाकला !
क्रिकेटच्या सामन्यामध्ये रंगत आणण्यासाठी समालोचन होते की समालोचनाची मजा वाढवण्यासाठी बाजूला क्रिकेटचे सामने ठेवले होते हेच कळत नव्हते ! कारण सर्वांचे लक्ष त्या स्टँड अप कॉमेडी कडेच अधिक होते !
माझ्यासोबत गावातील एक दोन मुले सामने बघत बसली होती . गावातील मुले क्रिकेट मात्र चांगले खेळत होती . या गावात सर्व मंडलोई आडनावाचे लोक होते . त्यामुळे फलंदाज पण मंडलोई , गोलंदाज पण मंडलोई आणि क्षेत्ररक्षक देखील मंडलोई असायचा ! तसा क्रिकेट या खेळाचा माझा फारसा संबंध नाही . मुळात मी स्वतः अतिशय टुकार दर्जाचे क्रिकेट खेळतो . हा खेळ मला कधीच फारसा आवडला नाही .मला कधीच भरवशाचा फलंदाज किंवा गोलंदाज म्हणून वापरले गेले नाही . परंतु काही वर्षांपूर्वी मी केलेल्या एका छोट्याशा उद्योगामुळे काही प्रसिद्ध क्रिकेटपटूंशी माझा संबंध आला होता इतकेच . आम्ही काही मित्रांनी मिळून एक यंत्र बनवले होते , ज्याच्यावर क्रिकेटचा सराव करता याचा . बघता बघता या यंत्राची कीर्ती सर्व प्रसिद्ध क्रिकेटपटूंमध्ये पसरली आणि त्या सर्वांनी ही यंत्रे आमच्याकडून विकत घेतली . सचिन ,द्रविड , गांगुली , सेहवाग , राहणे , भज्जी ,  इरफान पठाण ,युसुफ पठाण , कुंबळे वगैरे सर्वांनी आमची यंत्र वापरली होती .सहज बोलता बोलता मी ही माहिती माझ्यासोबत बसलेल्या त्या दोन मुलांपुढे बोलून गेलो . आणि ते धावतच स्टेजवर गेले . समालोचक लगेच तिथून माइक वर ओरडू ओरडू सांगू लागला ! आज आपले सौभाग्य आहे की तेंडुलकरचे मित्र आपले सामने पाहायला आलेले आहेत ! वगैरे वगैरे विनोदी शैलीतल्या लोणकढी थापा त्याने सुरू केल्या ! हे ऐकल्याबरोबर मी जी धूम ठोकली ते आश्रमाच्या खोलीत जाऊन आतून कडीच लावून घेतली . आणि झोपून टाकले ! रात्रभर बक्षीस समारंभासाठी कोण जागणार !  इथे मला एक महत्त्वाचा धडा मिळाला की स्वतःविषयी मौन राहणे परिक्रमेमध्ये किती आवश्यक आहे व का आवश्यक आहे !
आता विषय निघालाच आहे म्हणून वाचकांच्या माहिती करता याबाबतची काही निवडक चित्रे सोबत देत आहे . त्यातील काही खेळाडूंना आपण देखील ओळखत असाल . 
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या समवेत बांद्रयातील त्यांच्या घराच्या मागील अंगणात प्रस्तुत लेखक . 
अर्जुन तेंडुलकर यांच्यासमवेत त्याच 'बॅकयार्ड' मध्ये पुन्हा कधीतरी
हरभजनसिंह सह त्याच्या जलंधर मधील अकादमीमध्ये
पारस म्हाम्ब्रे यांच्यासह विदर्भ क्रिकेट अकादमी मध्ये
सर चंदू बोर्डे यांच्या समवेत चंदू बोर्डे पॅव्हेलियन समोर आमच्या यंत्रासह
क्रिकेटर विनू मंकड यांचे नातू आणि भारताकडून २० डेविस कप खेळलेल्या हर्ष मंकड यांच्यासमवेत
भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजीओ अली इराणी यांचे समवेत
क्रिकेट प्रमाणेच टेनिस सरावाचे यंत्र देखील आम्ही बनवायचो . भारताचा महान खेळाडू लिएंडर पेस समवेत
भारतातील क्रमांक एकचा टेनिसपटू रामकुमार रामनाथन आणि क्रमांक दोन बालाजी यांच्या समवेत कोवई मध्ये
राजकीय फटकेबाजी करणाऱ्या राज ठाकरे यांना टेनिस कोर्ट वरील फटकेबाजी बद्दल सांगताना
तेव्हा राज ठाकरे यांनी नुकतेच टेनिस शिकायला सुरुवात केली होती
अमित ठाकरे देखील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर टेनिसचे धडे गिरवीत होते
शर्मिलाताई ठाकरे यांचा सराव घेताना प्रस्तुत लेखक
या घटनेच्या बातम्या देखील तत्कालीन मीडियावर गाजल्या होत्या
राज ठाकरे यांच्या समवेत छ. शिवाजी पार्क मैदानावर प्रस्तुत लेखक
सचिन तेंडुलकर यांनी स्वाक्षरी करण्यापूर्वीचे चित्र
प्रस्तुत लेखकाने महाविद्यालयीन जीवनात काढलेली ही चित्रे संबंधित खेळाडू कडून स्वाक्षरी करून घेतलेली आहेत . कोठे गैरवापर होऊ नये म्हणून स्वाक्षरी चा भाग काढलेला आहे .
अकरावी मध्ये असताना रसायनशास्त्र प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करणे ऐवजी टीप कागदावर काढलेले सचिनचे चित्र देखील त्याला आवडले आणि त्याच कागदाच्या मागे त्याने स्वाक्षरी दिली .
चित्रापर्यंत ठीक आहे परंतु असे व्यावसायिक खेळाडू हे तरुणांचे आदर्श असू शकत नाहीत किंबहुना असू नयेत.
आपले म्हणजे तरूणांचे खरे आदर्श असेच हवेत !
महाविद्यालयीन जीवनातील प्रस्तुत लेखकाचे एक पेन स्केच !  असो .
हे सर्व सांगण्याचे कारण इतकेच आहे की  कोणाला असे वाटू नये की आयुष्यात काहीच न जमलेली माणसे नर्मदा परिक्रमा करतात . याउलट अनेक परिक्रमा वासी पाहिल्यावर मला असे जाणवले की आयुष्यात सर्व काही करून झाल्यावर अजून काहीतरी अप्रतिम आणि एकमेवाद्वितीय करण्याची , अनुभवण्याची उत्कट इच्छा असलेले लोकच नर्मदा परिक्रमा करतात . मी शक्यतो या सर्व गोष्टींविषयी फारशी वाच्यता आजवर कुठे केलेली नव्हती . कारण ती करण्यासाठी लागणारी समाज माध्यमे वापरणे मी २००६ सालापासूनच , VIS अर्थात virtual identity suicide करून बंद केलेले आहे . परंतु हा ब्लॉग मोठ्या प्रमाणात तरुण देखील वाचत आहेत . त्यांच्यामध्ये परिक्रमेविषयी आणि परिक्रमावासीं विषयी  नकारात्मक संदेश जाऊ नये म्हणून मुद्दाम वरील फोटो काहीशा अनिच्छेने सोबत जोडलेले आहेत ,याची सूज्ञ वाचकांनी कृपया नोंद घ्यावी . माझ्याशी वैयक्तिक परिचय नसलेले अनेक वाचक मनोमन असा विचार करू शकतात की आयुष्यात काही नकारात्मकता आली म्हणून या तरुणाने परिक्रमा उचलली की काय ? तर तसे काही नसून आयुष्यात देवदयेने आलेली सकारात्मकता योग्य प्रकारे वापरली जावी म्हणून ही परिक्रमा आहे ! 
आपली सर्व विहित कर्मे यथाशक्ती ,यथामती , यथायोग्य आटोपून घ्यावीत आणि मग गुर्वाज्ञेने यथावकाश , सावकाश परिक्रमा उचलावी हे उत्तम ! 
नर्मदे हर !



लेखांक सत्त्याहत्तर समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

टिप्पण्या

  1. साष्टांग दंडवत तुम्हाला. इतकी हरहुन्नरी व्यक्ती मी आजवर पाहिलेली नाही.लिहीत राहा. वाचते आहे. मानस परिक्रमा चालू आहे. नर्मदे हर.
    - स्मिता श्रीपाद

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच अप्रतिम सगळे लेख वाचून काढले 2 दिवसात एकडे अमेरिकेत. तुमची परिक्रमा पूर्ण झाली पण आमची कधी करणार माऊली..पुढचे भाग लिहा ना..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. काही अपरिहार्य दुःखद कारणामुळे लिखाण करता येणे शक्य होत नाही आहे . कृपया सहकार्य करावे ही विनंती .संपूर्ण लिखाण पूर्ण करण्याचे मानस निश्चितपणे आहे याची खात्री बाळगावी . नर्मदे हर

      हटवा
  3. aho tumhala kahi yet nai ashi goshta aahe ka ? Kharokhar kiti anubhav sampanna jagane aahe tumache! Maiyachi krupa tumachyavar akhanda rahu det!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर