लेखांक ७८ : दतवाडा चा स्वामी प्रबुद्धानंद भारती स्थापित रम्य असा रम्या परिक्रमावासी निवास आश्रम

त्यादिवशी मी पहाटे लवकर उठून आन्हीके आटोपून सिद्धेश्वरा समोर बसून शंकराची स्तवने म्हटली . परिक्रमावासी दांपत्यासोबत महादेवांचे आरती केली . माझी पूजा अर्चा आटोपून घेतली . 
    वहीमध्ये आश्रमाचा शिक्का घेतला .
गावातील एक मनुष्य आम्हा तिघांना चहा पिण्याचे आमंत्रण देण्यासाठी आला होता . त्याच्यासोबत त्याचे घरी चहा पिण्यासाठी तिघेही गेलो . याने सुंदर असा चहा पाजला आणि शेतातल्या भरपूर शेंगा सोबत खायला दिल्या . गावातील राम मंदिराचे दर्शन घेतले . तिथून निघालो आणि थेट मैयाचा किनारा गाठला . थोडेसे अंतर चाललो आणि एका कोळ्यापाशी येऊन थांबलो . धरणातील पाणी कमी जास्त होत असल्यामुळे येणारी भरती ओहोटी याचा अभ्यास करून याने अशा पद्धतीने जाळे लावले होते की रात्रभर भरपूर मासे त्याच्या जाळ्यात सापडले होते . दोघे नवरा बायको मासे गोळा करायचे काम करत होते . त्यांचे ते कर्म थोडावेळ पाहत राहिलो . तडफडणारे मासे इकडे तिकडे उड्या मारत होते . क्षणभर वाटले या माशांना उचलून परत पाण्यात सोडावे . परंतु हे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही . नर्मदेच्या काठावर जे काही सुरू आहे त्यात ढवळाढवळ करण्याचे काम परिक्रमा वासी ने जाणीवपूर्वक टाळायचे असते . हे सर्व मी पाहत असताना एक छोटासा मासा माझ्या पायावर येऊन पडला . मी त्याला उचलले आणि माझ्या मनातला भाव कोळ्याने ओळखला . मला म्हणाला "फेक दो बाबाजी मैया मे । " मी आनंदाने माशाला नर्मदा मातेमध्ये फेकले ! थोडेफार त्याच्या या व्यवसायाचे गणित समजून घेतले आणि पुढे निघालो . साधारण एक किलोमीटर चाललो असेन . इतक्यात डावीकडे काहीतरी आहे असे मला जाणवले म्हणून खडकाळ किनारा सोडून पुढे वर चढलो . समोर एक आश्रम दिसत होता . नर्मदा मातेकडे तोंड करून बांधलेल्या सुंदर ध्यान कुटी होत्या . आश्रमाला कुंपण होते आणि दार होते . परंतु दाराचे कुलूप उघडे आहे असे मला दिसले म्हणून मी ते उघडून आत गेलो . राधा नावाची एक माताराम बागेत झाडलोट करत होती . तिला बहुतेक माझे मागून येणे अपेक्षित नसावे . ती जोरात मला म्हणाली " कौन चाहिये बाबाजी ? " मी तिला विचारले की या आश्रमाचे व्यवस्थापक कोण आहेत ? तिने सांगितले की चेन्नई वाले स्वामीजी आहेत . आता तमिळ बोलायला मिळणार या आनंदामध्ये मी असतानाच आतून पांढरे शुभ्र कपडे घातलेला एक मनुष्य तिथे आला . "वणक्कम अय्या " मी म्हणालो . " वणक्कम वणक्कम . यार निंगे ? यन्न वेणुम ?  " अर्थात कोण तुम्ही ? काय पाहिजे तुम्हाला ? असे मला त्या व्यक्तीने विचारले . हे या आश्रमाचे व्यवस्थापक होते . मी म्हणालो '"नानू ओरू परिक्रमावासी . स्वामीजी ह्येंगे इर्कारे ? स्वामीयै पार्कलाम् " अर्थात मी एक परिक्रमा वासी आहे . स्वामीजी कुठे आहेत ? मला त्यांचे दर्शन घ्यायचे आहे . व्यवस्थापक राधाशी नेमाडी भाषेमध्ये बोलू लागले . त्यांनी तिला विचारले की हा माणूस आत मध्ये कसा काय आला ? राधा म्हणाली मी पण तोच विचार करते आहे . दार बंद असताना हा कसा काय आत आला ? ती नेमाडी भाषेमध्ये सांगत होती की मी तर या बाबाला बघून घाबरलेच ! अर्थात तिचा त्यात काही दोष नव्हता . गेले दोन दिवस प्रचंड चिखलातून चालल्यामुळे मळलेले माझे कपडे मी धुतलेच नव्हते ! त्यामुळे माझा वेश एखाद्या भिकाऱ्यापेक्षा कमी नव्हता !  माझ्या लक्षात आले की आता आपल्याला बहुतेक आल्या पावली त्याच दरवाजाने बाहेर काढले जाणार ! म्हणून मी शेवटचे अस्त्र काढले . आङ्ग्लास्त्र !  आणि म्हणालो , "sir, आय एम रियली व्हेरी सॉरी . आय वॉज नॉट सपोजड टू एंटर फ्रॉम बॅक गेट . But I saw the gate open so I came inside." अर्थात क्षमा करा . मी मागच्या दाराने आत मध्ये यायला नको पाहिजे होते . परंतु दार उघडे दिसले म्हणून मी आलो " No no. Please don't miss understand. I am just thinking who opened the lock if Radha didn't? Because I had myself locked it . Anyway welcome to ashram!" व्यवस्थापक म्हणाले छे छे तसे काही नाही . फक्त दरवाजाचे कुलूप राधाने नाही उघडले तर मग उघडले कुणी हा विचार मी करतो आहे . कारण मी स्वतः कुलूप लावले होते .
माझे हे वाले अस्त्र बरोबर बसले असे मला वाटले! परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत या कुलपाचा उलगडा काही झाला नाही . इतक्यात तिथे मल्ली नावाचा एक मनुष्य आला आणि कानडी मध्ये व्यवस्थापकांशी बोलू लागला . त्याने कानडी मध्ये त्यांना सांगितले की सर्व गाड्या धुवून झाल्या आहेत . व्यवस्थापक देखील अस्खलित कानडी मध्ये त्याला सांगू लागले की आता एक काम कर . या बाबाजींना त्यांची खोली दाखव . त्यांचे सामान न्यायला मदत कर . त्यांना कानडी मध्ये बोलताना ऐकून मी कानडी मध्ये विचारले " नीवु कन्नडीगारे ? "  " इल्ला . नानु मऱ्हाट्टा " "कुठलं गाव ? " "पुणे" "अरे वा ! मी पण पुण्याचाच आहे ! " असे मी म्हणालो मात्र आणि दोघेही हसायला लागलो ! कारण इतका वेळ आम्ही दोघांनी देखील एकमेकांना आपल्या मातृभाषेचा पत्ता लागू दिला नव्हता !  हा आश्रम स्वामी प्रबुद्धानंद भारती नामक एका जन्माने तमिळ असलेल्या ग्लोबल संन्यासी महाराजांचा होता . ग्लोबल म्हणायचे कारण असे की स्वामीजी कधी स्वतःला एका प्रांताशी , एका भाषेशी , एका विचारधारेशी ,एका पक्षाशी , एका राष्ट्राशी , एका पंथाशी , नव्हे नव्हे एका धर्माशी देखील बांधून ठेवत नसत .आणि हे व्यवस्थापक महोदय होते श्री सुहास सुरडी . एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करणारे सुहासजी स्वामीजींचे निस्सीम शिष्य होते . यांना भारतीय आणि विदेशी अशा अनेक भाषा येत होत्या . नुसत्या येत नव्हत्या तर अतिशय उत्तम येत होत्या ! माझा भाषिक अभिमान गळून पडण्यासाठीच नर्मदा मातेने यांची माझी भेट घडविली असा माझा ठाम विश्वास होता ! मला येणारी प्रत्येक भाषा तर यांना येतच होती . परंतु त्या शिवाय देखील अनेक भाषा यांना अतिशय सुलभतेने बोलता येत होत्या . हे ज्या भाषेत बोलायचे त्या भाषेचा लहेजा उचलून घ्यायचे घ्यायचे . त्यामुळे समोरच्या माणसाला त्यांची मातृभाषा ओळखता येणे खरंच खूप कठीण होते . मी सुहास जी म्हणाल्यावर त्यांनी मला सांगितले की फक्त सुहास म्हण . सुहास यांनी मला सांगितले की वरती आसन लावून स्वच्छ आंघोळ करून स्वामीं च्या दर्शनाला मी खाली यावे .परंतु मला क्षणभर स्वामींचे दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ व्हायचे होते . हे आंघोळ प्रकरण नवीन कुठून आले असा विचार मी करू लागलो ! कदाचित माझे मळलेले रूप पाहून यांनी मला हे सांगितले असावे असा विचार मी केला .ठीक आहे . जिथे जो नियम आहे तिथे तो पाळलाच पाहिजे असा विचार करून आता सामान घेऊन मी वरच्या मजल्यावर असलेल्या परिक्रमावासी निवासस्थानाकडे कुच करणार इतक्यात स्वामींचा धीर गंभीर आवाज घुमला . "यार पा ? " कोण आहे रे ? स्वामीजींनी विचारल्या बरोबर सुहासने तमिळमध्ये उत्तर दिले की स्वामीजी एक परिक्रमावासी आलेला आहे . तुमचे दर्शन घ्यायची इच्छा आहे . पाठव त्याला स्वामींनी तमिळमध्येच सांगितले . आणि मी आनंदाने धावतच आश्रमाच्या आत मध्ये आपल्या कुटी बाहेर वर्तमानपत्र वाचत आराम खुर्ची मध्ये बसलेल्या स्वामीजींकडे गेलो . धिप्पाड देहयष्टी असलेले तेजस्वी स्वामीजी खुर्चीमध्ये बसून पेपर वाचत होते .  मी गेल्या गेल्या स्वामीजींना साष्टांग नमस्कार केला . ओम नमो नारायणाय ! आणि त्यांच्यापुढे हात जोडून उभा राहिलो . त्यांनी मला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळले आणि म्हणाले , " why are your clothes so dirty young man? " अर्थात तुझे कपडे इतके मळलेले का आहेत ?
" They are not dirty Swami ji. They are full of holy mud from Narmada basin" मी म्हणालो की ते कपडे मळलेले नाहीत . नर्मदा खंडातल्या पवित्र धुळीने माखलेले आहेत . माझे हे उत्तर स्वामींना फार आवडले ! आणि त्यांनी जोरात टाळी वाजवली ! " दॅटस् द आन्सर ! "
हरी ? त्यांनी हरी नावाच्या शिष्याला हाक मारल्या बरोबर आतून एक तरुण तेजस्वी मुलगा पळत बाहेर आला . प्लीज गेट द फाईन क्लोथ फॉर यंग मॅन फ्रॉम माय कबर्ड .
माझ्या कपाटातून याच्यासाठी तलम असे वस्त्र घेऊन ये . 
हरी धावतच आतून सुंदर असे फिकट पिवळ्या रंगाचे दक्षिण भारतीय करवत काठी धोतर आणि उपरणे घेऊन आला .  याचे कापड खूप चांगल्या दर्जाचे होते . स्वामिनी माझ्या हातात ती वस्त्रे दिली आणि सांगितले की स्वच्छ आंघोळ करून ही वस्त्रे घालून पुन्हा मला भेटायला ये . वस्त्र हातामध्ये पडल्याबरोबर मी ओळखले की हे रामराज मिलचे कापड आहे . "रामराज अल्वा ? " मी म्हणालो . आणि स्वामीजी आश्चर्यचकित झाले ! हाऊ डू यु नो दॅट दिस इज रामराज क्लॉथ ? तुला कसे काय कळले की हे रामराज मिलचे कापड आहे ? मी तमिळमध्ये उत्तर दिले . इतके तलम कापड फक्त रामराजच बनवू जाणे ! स्वामीजी हसायला लागले ! त्यांनी शेवटपर्यंत मला ते तमिळ आहेत असे जाणवू दिले नाही . परंतु मी अधून मधून तमिळमध्ये बोलून त्यांना मनोमन खुश करून टाकायचो . त्या पहिल्याच भेटीमध्ये हे स्वामीजी मला आवडले ! का आवडले कसे आवडले हे प्रश्न निरर्थक आहेत . प्रत्यक्षात पाहिले तर आमचे अनेक विषयांमध्ये मतभेद देखील होते . परंतु मला स्वामीजी आवडले आणि स्वामीजींना देखील मी आवडलो असणार हे जाणवण्यासारखे बरेच काही पुढे घडले . 
चित्राखाली लिहिलेल्या ओळींचा स्वैर अनुवाद असा
साधूचे ध्येय देवाची किंवा धर्माची सेवा करणे हे नाही . त्याचे एकमेव ध्येय आहे मोक्षप्राप्ती .मोक्षप्राप्ती हे दैवी एकरूपतेचे प्रकटीकरण आहे . - सद्गुरु श्री श्री प्रबुद्धानंद भारती स्वामीजी

मी स्वामीजींना म्हणालो की मी आत्ता सकाळीच चालायला सुरुवात केली आहे . एक किलोमीटर सुद्धा चाललेलो नाही . आणि आज मला पुढच्या मुक्कामी पोहोचावे लागेल . त्यामुळे मी स्नान करून आपले दर्शन घेऊन पुढे निघेन . स्वामीजी म्हणाले , असे काही ठरवायची पद्धत नर्मदा परिक्रमेमध्ये असते का ? रोज अमुक अमुक किलोमीटर चालले पाहिजे असे कोणी सांगितले आहे ? आम्ही तुला आवडलो नाही का ? मला माझी चूक लक्षात आली . आणि मी हात जोडून उभा राहिलो . स्वामीजी म्हणाले हे पहा आम्ही संन्यासी आहोत . सतत भ्रमण करत असतो . उद्या मी बंगलोरला जाणार आहे . त्यामुळे आजचा दिवस जर तू राहिलास आणि थोडीशी विश्रांती घेतलीस तर आम्हाला आनंद वाटेल . तू खूप चालतो आहेस असे तुझा अवतार पाहून लक्षात येत आहे . तुला राहायचे तितके दिवस रहा . ताजा तवाना हो . आणि मग पुढे जा . त्यांनी आश्रमाच्या व्यवस्थापकांना आवाज दिला आणि सांगितले हा मुलगा आपल्या आश्रमामध्ये कधीही आला तरी त्याला जितके दिवस राहायचे आहे तितके दिवस राहू द्यावे . आमची स्पेशल परवानगी आहे . स्वामीजींनी इतक्या प्रेमाने आग्रह केल्यावर माझे डोळे पाणावले . आणि मी त्यांच्या पायावर लोटांगण घातले . स्वामीजी एका विशिष्ट पद्धतीने आशीर्वाद द्यायचे . अतिशय सुंदर अशा रीतीने त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला . त्यांच्या हातावर मी कधीही पाहिली नव्हती इतकी ठळक खोल आणि लांब भाग्यरेषा होती जी चटकन नजरेत भरायची .आशीर्वाद देताना ते अज्ञाचक्रावर आणि सहस्रार चक्रावर विशिष्ट गतीने आघात करायचे . यांना मर्मबिंदूंचे असलेले ज्ञान हे केवळ आध्यात्मिक नव्हते ! पूर्वाश्रमी हे स्वामीजी न्यूरोसर्जन होते ! आणि संपूर्ण जगभर मेंदूच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी अविरत प्रवास केलेला होता ! यांची पूर्वाश्रमीची श्रीमंती भल्याभल्यांना थक्क करेल अशी होती . परंतु त्यांनी या सर्व मोहमायेचा त्याग करून संन्यास घेतला . त्यांचे नियम अतिशय कठोर होते . ते कोणालाही शिष्य वगैरे करून घेत नसत . त्यांचे ठरलेले सात भक्त होते . या सर्वांनी मिळून एक कायम निधी उभा केला होता . स्वामीजींचा संपूर्ण खर्च आणि आश्रमाचा संपूर्ण खर्च यातूनच चालायचा . स्वामीजी आश्रमासाठी एक रुपया देखील देणगी घेत नाहीत . आताच्या काळामध्ये हे अतिशय दुर्मिळ आणि आदर्श असे उदाहरण आहे . मी परिक्रमावासींसाठी बांधलेल्या उत्तम अशा हॉलमध्ये आसन लावले . आश्रमाच्या बाहेर बांधलेल्या बाथरूम मध्ये जाऊन स्वच्छ आंघोळ केली . स्वामीजींनी दिलेले नवे कपडे घालून तयार झालो ! स्वामीजी खोलीमध्ये गेले होते . मग नुसते बसून राहण्यापेक्षा मी स्वयंपाक घरात शिरलो आणि तिथे मदत करायला सुरुवात केली . इथे पोळ्या बनविण्याचे आणि भाजण्याचे सुंदर मशीन होते . एकसारखे फुलके तयार व्हायचे ! आश्रमामध्ये सर्व आधुनिक यंत्रणा होती . स्वामीजींनी आश्रम उभा करताना प्रचंड खर्च केला होता . प्रत्येक गोष्ट सर्वोत्कृष्ट दर्जाची वापरली होती . स्वामीजींनी इथे तीन ट्रस्ट निर्माण केले होते .
१ ) राजराजेश्वरी महापीठम्
२ ) श्री विद्या महापीठम्
३ ) रम्या परिक्रमावासी निवास
आणि हे सर्व ज्या वास्तूमध्ये होते त्या वास्तूला काली मातंगी आश्रम असे नाव दिले होते .
स्वामीजी जगप्रसिद्ध सर्जन असल्यामुळे अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम होता . स्वभाव अतिशय कडक होता . वाणीमध्ये जरब होती . प्रचंड अभ्यास करण्याची वृत्ती होती . अद्भुत पाठांतर होते . प्रचंड ग्रंथांतर होते . रोखठोक बोलण्याचा स्वभाव होता . राजकारण या विषयाची प्रचंड घृणा त्यांना होती . हाडाचे तमिळ असल्यामुळे स्वाभाविक मोदी विरोध होता . बाहेरच्या लोकांशी केवळ इंग्रजी मध्ये बोलत . हिंदी चुकून सुद्धा बोलत नसत . स्वामीजी वर्षभर इथे राहिले होते आणि बंगलोरला निघाले होते त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या क्षणी मी तिथे पोहोचलो होतो . एक दिवस उशीर झाला असता तर स्वामींचे दर्शन झाले नसते . किंवा अगदी खालून चालताना वरती न पाहता सरळ गेलो असतो तरी आश्रम मागे पडला असता . मैया काठी जे होते ते चांगल्यासाठीच होते . स्वयंपाक करण्यासाठी दोन पगारी स्त्रिया ठेवलेल्या होत्या . त्या दोघी माताराम निमाडी मध्ये बोलायच्या . सुहास सुरडी यांच्या पत्नी देखील तिथे आलेल्या होत्या . त्यादेखील स्वयंपाक घरात मदतीसाठी थांबल्या होत्या . सुहास ना सर्व भाषा येत असल्यामुळे अस्खलित निमाडी मध्ये ते या स्त्रियांना सूचना करत . त्यांना देखील सुरडी कुटुंबीयांबद्दल खूप आदर होता असे जाणवले . या दोन्ही स्त्रिया परित्यक्ता असून स्वामीजींनी त्यांचा पोटच्या पोरीं प्रमाणे उत्तम सांभाळ केलेला होता . त्यामुळे दोघींना स्वामींबद्दल प्रचंड आदर होता . मी भाजी चिरली . परंतु इतकी भाजी का करत आहे हे मला कळले नाही . कारण जेवणारे फारसे कोणी नव्हते . परंतु नंतर मला लक्षात आले की स्वामीजी आसपासच्या गावातील सर्व मुलांना रोज मोफत भोजन देत ! या भागातील मुलांचे कुपोषण होत आहे असे स्वामींच्या लक्षात आले होते . त्यामुळे या मुलांना पोषक आहार मिळावा यासाठी स्वामीजींनी दररोजचे दोन वेळचे मोफत अन्नछत्र सुरू केले होते ! इथे विधवा स्त्रिया , परित्यक्ता आणि लहान मुले यांना दररोज भरपेट भोजन दिले जायचे ! किती मोठे कार्य आहे ! या कार्याला तोडच नाही ! स्वामीजींच्या दोन गाड्या होत्या . बोलेरो गाडी देवा नावाचा तमिळ चालक चालवायचा . आणि स्कॉर्पिओ गाडी मल्लिकार्जुन नावाचा कानडी चालक चालवायचा . या दोघांना मी त्या गाड्या धुवू लागलो . दोन्ही भाषा मला जुजबी येत असल्यामुळे दोघे देखील खुश झाले ! दोघांच्या मनात स्वामींच्या बद्दल प्रचंड आदर होता .जेव्हा नोकराच्या मनात स्वामींबद्दल मनापासून खराखुरा आदर असतो तेव्हा ओळखायचे की हा मालक खरोखरीच चांगला आहे ! स्वामीजी या स्त्रियांना आणि मुलांना भोजन द्यायचे आणि कपडा लत्ता देखील द्यायचे .मी इथे राहिलो त्या काळात स्वामीजींनी मला खूप वेळ दिला . त्या वास्तव्यात खूप काही शिकलो . आश्रम कसा असावा ,आश्रम कसा चालवावा , आश्रम कसा वाढवावा याचा आदर्श वस्तू पाठ म्हणजे रम्या परिक्रमावासी निवास आश्रम ! स्वामींनी मला एक फार महत्त्वाचे सूत्र दिले ! Learn to unlearn the things!  वरवर पाहता स्वामीजी कर्मकांडाला फारसे महत्त्व देत नाहीत असे वाटायचे . परंतु त्यांचे संन्यास धर्माचे सर्व नियम ते काटेकोर पाळत होते . त्यामुळे कर्मकांडाला महत्त्व देत नाहीत असे म्हणता येणार नाही . परंतु अनाठायी महत्त्व नक्कीच देत नव्हते .उदाहरणार्थ या आश्रमामध्ये रजस्वला स्त्रियांचा मुक्त वावर असायचा . त्यांना कुठलीही बंधने कुठल्याही दिवशी घातलेली नव्हती ! हे फारच क्रांतिकारक पाऊल आहे ! विशेषतः नर्मदा खंडामध्ये अन्यत्र कुठे असे उदाहरण मला पाहायला मिळाले नाही . असू देखील शकेल परंतु माझ्या पाहण्यात आले नाही .शाळकरी मुली त्यामुळे अतिशय आनंदाने आश्रमात बागडताना दिसायच्या . इथे तीन दैवते स्थापन केली होती . महादेवाची एक भव्य पिंड होती . एक सरस्वती माता होती . आणि एक काली माता होती . या तीनही मूर्ती एका कट्ट्यावर स्थापन केल्या होत्या . आजूबाजूला भिंती नव्हत्या. नर्मदेच्या पार्श्वभूमीवर या देवतांचे छान दर्शन व्हायचे . मीनाक्षी पूजा मंडप नावाची एक जागा बांधलेली होती . मदुराई मीनाक्षी देवीला वाहिलेली ही जागा होती . परिक्रमावासींची सोय देखील अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाची केलेली होती . मी सवयीप्रमाणे आश्रमाचा संपूर्ण परिसर बारकाईने पाहिला . मला सर्वात जास्त आवडलेली जागा म्हणजे नर्मदा मैयाकडे तोंड करून बांधलेल्या ध्यान कुटी होय ! इथे बसल्यावर सरळ तीस किलोमीटर रेषेमधले नर्मदा काठावरचे प्रत्येक स्थान दिसायचे ! ग्यारहलिंगी धर्मपुरी पर्यंतचा परिसर एका सरळ रेषेमध्ये इथून दिसायचा ! जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी ! आश्रम नावाप्रमाणे अतिशय रम्य होता ! 
आश्रमाची काही छायाचित्रे आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे .
मी आश्रमाच्या मागच्या बाजूने प्रवेश केला होता परंतु पुढच्या बाजूला असे भव्य प्रवेशद्वार बनविले होते .
अतिशय स्वच्छ व सुंदर परिसराचे महाद्वार देखील तितकेच सुंदर बनवले होते . दोन्ही बाजूला दोन पाट्या होत्या . 
आश्रम अगदी नर्मदा मातेच्या काठावर असल्यामुळे पाण्याची पातळी वाढली की असा बेटासारखा होऊन जायचा .
ह्याच खडकावरून मी जात असताना मला डावीकडे काहीतरी आहे असे जाणवले आणि मी वरती गेलो तेव्हा आश्रमाचे छोटेसे दार मला दिसले . समोर दतवाड गावाचे डोहकूप दिसते आहे .
हेच ते छोटेसे दार ज्याचे कुलूप उघडे दिसले म्हणून मी आत मध्ये प्रवेश केला होता .
नर्मदा मैया कडे तोंड करून बांधलेल्या ह्याच त्या ध्यान कुटी ! डावीकडे छोटेसे प्रवेशद्वार दिसते आहे .इथे तासंतास बसून मैय्याचे दर्शन करण्यातला आनंद अद्वितीय आहे. ही संकल्पनाच फार सुंदर वाटली ! 
आश्रमामध्ये अशी एक मोठी शेड होती जिथे भोजन प्रसाद दिला जायचा आणि दिवसभर मुलांचा धुडगुस इथे चालू असायचा . कितीही दंगा केला तरी मुलांना स्वामीजी काही बोलायचे नाहीत . मोठ्या माणसांना मात्र चांगलेच शिस्तीत ठेवायचे .
आश्रमामध्ये महाराजांनी अतिशय भव्य असे शिवलिंग स्थापन केले आहे .
या शिवलिंगाच्या कट्ट्यावर शक्यतो कोणाला जाता येत नाही . स्वच्छतेच्या कारणासाठी हे बंधन घालण्यात आले आहे . स्वामीजी पूर्वाश्रमीचे न्यूरोसर्जन असल्यामुळे स्वच्छतेला अतोनात महत्त्व देतात . 
शिवलिंगा शेजारीच सरस्वती देवीची मूर्ती आहे .
सरस्वती मातेच्या शेजारी कालीमाता उभी आहे .या सर्व मूर्ती नेपाळमधील कालीगंडकी नदीतून आणलेल्या काळ्याभोर पाषाणातून मैसूर भागातील कारागिरांनी घडविलेल्या आहेत . अयोध्येतील  बालकराम देखील याच भागातील कारागिराने घडविलेला आहे .मी काही काळ नोकरीनिमित्त मैसूर मध्ये राहिला असल्यामुळे इथली शिल्पकला जवळून पाहिलेली आहे .
महाराजांनी ग्रामस्थांसाठी महाकाली स्मशान घाटाची निर्मिती केलेली आहे . जन्मापासून मृत्यूपर्यंत सुंदर असे पालन पोषण करत हा आश्रम तुम्हाला सांभाळतो !
या आश्रमाची पाटी खरे तर मी लोहारा गावातच पाहिली होती .यातील सूचना वाचून हा आश्रम अतिशय कर्मठपणे परंपरा पाळणारा असेल असे माझे अनुमान होते परंतु अनुभव अतिशय वेगळा निघाला . 
आश्रमामध्ये बांधलेली सुंदर अशी भोजन शाळा
रम्या परिक्रमावासी निवास .खाली आणि वरती परिक्रमावासींची राहण्याची उत्तम सोय केलेली आहे .

वर जाण्यासाठी अशा जिन्याची निर्मिती केलेली आहे . या खोलीमध्ये मी फार कमी काळ विश्रांती घेतली . संपूर्ण वेळ आश्रमाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्यातच गेला आणि त्यातून खूप आनंद मिळाला !
स्वामीजींच्या आणि माझ्या बऱ्याच आवडी मिळत्या जुळत्या होत्या . मध्येच स्वामीजी बाहेर येऊन गाणी ऐकत बसले होते . तेव्हा त्यांनी उत्तम दर्जाच्या साऊंड सिस्टिम वर सुंदर तमिळ गाणी लावली होती ! गंमत म्हणजे आमची गाण्यांची आवड देखील सारखीच निघाली ! त्यांनी लावलेली तमिळ गाणी मी गातो आहे हे पाहिल्यावर त्यांना फार आनंद वाटला ! त्यांच्यासोबत असलेला हरी नावाचा कोवई अथवा कोइंबतूर येथील शिष्य देखील खुश झाला ! इलाई राजाची जुनी गाणी ठीक आहेत परंतु विद्या वॉक्स नावाच्या अति आधुनिक गायिकेचे माझे आवडते गाणे देखील स्वामीजींचे सर्वात आवडते होते ! पालिवाल भद्रवटकम् नावाचे हे गाणे खरे म्हणजे पारंपारिक देवीचे स्तवन आहे . तिला या विद्या ताईने आधुनिक रूप दिलेले आहे . मी हे आधुनिक रूप आणि जुने गाणे देखील बरेचदा ऐकत असतो . स्वामीजींनी देखील ते त्याच क्रमाने ऐकले . मी हे गाणे तोंडपाठ म्हणून दाखवल्यावर त्यांना फार मौज वाटली . उमामोहनची स्तोत्रे देखील स्वामीजी माझ्याप्रमाणेच ऐकायचे . सध्या डेटा मायनिंग हे क्षेत्र इतके पराकोटीचे प्रगत झालेले आहे की एखाद्या माणसाची आवड ठरविण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण झालेले आहे . तुम्हाला काय आवडले पाहिजे तेच तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवून तुमची आवड दृढमूल केली जाते . किंवा एखाद्या व्यक्तीला काय आवडते हे पाहिल्यावर दुसऱ्या व्यक्तीच्या सहवासात ती व्यक्ती आली की त्याच गोष्टी वाजवल्या किंवा ऐकविल्या जातात . परंतु यासाठी तुमचे प्रोफाईल असलेले डिवाइस तुमच्या सोबत असणे आवश्यक आहे . इथे माझ्याकडे काहीच नव्हते त्यामुळे स्वामीजींची ही आवड खरीखुरी होती आणि आमच्या दोघांच्या जुळणाऱ्या आवडी हा योगायोग नव्हता तर वास्तवात असे दिसत होते . तमिळ गाणी गाऊन दाखवल्यावर स्वामीजी भलतेच खुश झाले . त्यांच्याशी इतक्या मोकळेपणाने कोणी संवाद साधत नसे . त्यांची थोडीशी जरब ,दहशत असल्यासारखे होते . परंतु मला तशी काही भीती बाळगण्याचे कारण नव्हते . हीच भिक्षेच्या झोळीची ताकद असते . समर्थ रामदास म्हणतात 
भिक्षा म्हणजे निर्भये स्थिती । 
भिक्षेनें प्रगटे महंती । 
स्वतंत्रता ईश्वरप्राप्ती । 
भिक्षागुणे ।। 
याचा अर्थच मला येथे जणू कळत होता . या आश्रमामध्ये संध्याकाळी अजून काही परिक्रमा वासी आले . ओंकारेश्वर येथून नुकतीच परिक्रमा त्यांनी उचलली होती . यामध्ये प्रामुख्याने माझ्या लक्षात राहिले व अजूनही संपर्कामध्ये असलेले एक परिक्रमावासी होते ते म्हणजे तुकाराम बुवा सुरवसे ! हे बीड जिल्ह्यातील वडवणी जवळच्या चिंचाळा या गावातील होते . हे स्वभावाने अतिशय तापट होते . गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते होते . व्यवसायाने बांधकाम कारागीर होते . पत्नी व हे असे दोघेच राहायचे . अतिशय आनंदी व विनोदी स्वभाव असला तरी शीघ्रकोपी कशाला म्हणतात ते यांच्याकडे पाहून मला कळायचे . एका क्षणात यांच्या रागाचा पारा चढायचा ! धष्टपुष्ट धिप्पाड देहयष्टी असल्यामुळे समोरचे यांना घाबरून असायचे .
चिंचाळा वडवणी बीड येथील तुकाराम बुवा सुरवसे .
हे सध्या सायकल वरून बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा करत आहेत . 
तुकाराम बुवांनी परिक्रमा एकट्याने सुरू केली होती . परंतु उशिरा परिक्रमा उचलल्यामुळे त्यांना फारसे कोणी सोबत भेटले नव्हते .त्यातल्या त्यात एक मराठी काका आणि एक मध्य प्रदेश मधील संसारामुळे पिचलेला गांजलेला परिक्रमावासी त्यांना भेटला होता .तिघे काही काळ एकत्र चालत होते .
मध्यप्रदेश मधील हेच परिक्रमावासी तुकाराम सुरवसे यांच्यासोबत होते
तुकाराम बुवांच्या कडक स्वभावामुळे या तिघांचे सतत खटके उडायचे . मध्यप्रदेशातील मनुष्य बिचारा अतिशय गरीब होता . आणि दुसरा मराठी परिक्रमावासी मात्र आगाऊपणाने तुकाराम बुवांच्या खोड्या काढायचा . या तिघांची मजा पाहताना मला फार हसू यायचे ! आणि मी मनोमन मैय्याचे आभार मानायचो की बरे झाले माझ्यासोबत कोणाला गळ्यात बांधले नाहीस ! या आश्रमामध्ये कायमचे राहावे असे कोणालाही वाटावे इतका हा रम्य होता ! इथे सतत छोट्या मुलांचा राबता असल्यामुळे तसे असेल कदाचित . परंतु इथली स्पंदने अतिशय सकारात्मक होती . इथली बंधने देखील अतिशय स्वीकार्य आणि आदरणीय होती . स्वामीजींनी दुसऱ्या दिवशी सकाळी बंगलोरला निघताना कट्ट्यावरील तीनही देवांची महापूजा घातली . ते स्वतः कट्ट्यावर जाऊन तिन्ही देवतांना आंघोळ घालतात . याप्रसंगी अन्य कोणीही त्या कट्ट्यावर जात नाही . सर्वजण हात जोडून खाली उभे असतात . आज स्वामीजी जाणार हे माहिती असल्यामुळे गावातील बरेच लोक तिथे जमले होते . मला स्वामीजींनी कट्ट्यावर बोलवून घेतले . आणि आम्ही दोघांनी तीनही मूर्तींना सुंदर असे पंचोपचार पूर्वक अर्चन केले . नंतर मला आश्रमातील लोकांनी सांगितले की असे कोणाला स्वामीजी सोबत पूजेसाठी घेत नाहीत . कट्ट्यावर तर चढूच देत नाहीत . त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात .
हे भाग्य नक्की कसले आहे याचा विचार मी करू लागलो . मी जर माझ्या घरातून थेट या आश्रमात गेलो असतो तरी देखील मला वरती जाण्याची परवानगी दिली असती का . नक्कीच कोणीही दिली नसतीच . ही सर्व कृपा त्या नर्मदा मातेची होती . हा सर्व मानसन्मान त्या नर्मदा मातेला मिळत होता . तिला सोबत घेऊन चालल्यामुळे आमचा सन्मान . नरेंद्र मोदी जेव्हा रोड शो करतात तेव्हा लोक त्यांच्या अंगावर फुले उधळतात . त्यातील काही फुले त्यांच्या चालकाच्या अंगावर देखील पडतात . उद्या जर त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणू लागला मी अमुक अमुक रस्त्याने जाताना माझ्या अंगावर खूप लोकांनी फुले उधळली तर ते विधान किती हास्यास्पद ठरेल तितकेच मला मिळणारे सर्व मानसन्मान माझे आहेत असे मी म्हणणे हास्यास्पद होते ! यातील काही माझे नव्हतेच ! मी नर्मदा मातेची छोटीशी कुपी घेऊन चालणारा चालक असल्यामुळे तिच्यासोबत मलाही सर्व गोष्टी अनुभवायला मिळत होत्या इतकेच .
बरोबर निघण्याची वेळ झाल्यावर स्वामीजींच्या गाड्या दारात येऊन थांबल्या . मी आणि हरीने स्वामींचे सर्व सामान गाड्यांमध्ये नीट लावले . माझ्या गुरुदेवांनी आयुष्यभर सतत गाडीने प्रवास केला . अक्कलकोट स्वामींनी त्यांना असा आदेश दिला होता की तीन दिवसापेक्षा जास्त एका ठिकाणी राहू नकोस . खरे तर हा सन्याशाचा नियम आहे . परंतु गृहस्थ असूनही त्यांनी संपूर्ण ५६ वर्षे हा नियम प्राणपणाने जपला . त्यांच्यासोबत मी अनेक वेळा चालक म्हणून किंवा मदतनीस म्हणून हजारो किलोमीटर प्रवास केलेला आहे . त्यामुळे त्यांनी मला गाडीमध्ये सामान कसे लावावे इथपासून ते बॅगेमध्ये अधिकाधिक सामान कसे बसवावे इथपर्यंत सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत . त्या पद्धतीने सामान लावल्यावर गाडीमध्ये भरपूर जागा मोकळी राहते . त्या अनुभवाचा वापर करत मी सर्व सामान लावून दिले . हरीला आश्चर्य वाटले कारण येताना हेच सामान खूप वाटले होते परंतु जाताना खूपच चोखपणे लागले होते . मी स्वामीजींना नमस्कार करून आज्ञा मागितली . ते मला म्हणाले जेवल्याशिवाय जाऊ नकोस . गावातील सर्व मंडळी हात जोडून उभी राहिली . सुमारे वर्षभर सलग इथे राहून आश्रमाचे बरेचसे काम स्वामीजींनी उरकले असल्यामुळे स्वामीजींच्या सहवासाचे प्रेम सर्वांच्या मनात निर्माण झाले होते . त्यामुळे आता स्वामी ची जात आहेत या कल्पनेने सर्वच जण रडू लागले . नर्मदे हर चा पुकारा करत स्वामीजी निघून गेले . मातीच्या रस्त्यावरून धूळ उडवत जाणाऱ्या त्यांच्या त्या जीप पहात पहात मी आश्रमाचा दरवाजा लावून घेतला . आणि स्वयंपाकाला लागलो . काजल नावाची एक छोटीशी मुलगी इथे मदत करायची . स्वयंपाक झाल्यावर मुलांची पंगत झाली . रात्री मुक्कामाला आलेले परिक्रमा वासी सकाळीच निघून गेले होते . मी सर्वांचे भोजन झाल्यावर भोजन प्रसाद घेतला आणि झोळी उचलली .  
जाताना सुहास सुरडी यांनी वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मारून दिला . 
रम्या परिक्रमावासी निवास 
ग्राम -दतवाडा तहसील - अंजड 
जिला -बडवानी
आश्रमामध्ये मला भेटलेले बहुभाषाकोविद सुहास सुरडी
सारे जग फिरून झाल्यावर हा मनुष्य स्वामीजींच्या चरणाशी स्थिरावला होता
मला सुहास पुढचा रस्ता कसा आहे ते सांगू लागले . परंतु मी पुन्हा एकदा मागच्या गेटकडे निघालो . ते म्हणाले मागून रस्ता नाही . परंतु मी त्यांना सांगितले की नर्मदेच्या काठावर कुठेही रस्ता नाही असे होत नाही . त्यामुळे निश्चिंत राहावे ,मार्ग सापडेल . (सुहास सुरडी या माणसाला भेटण्याची प्रचंड इच्छा मनात आहे . अतिशय हुशार आणि विद्वान मनुष्य आहे . गुरूंच्या चरणी भाव कसा असावा याचा आदर्श वस्तूपाठ आहे ! त्यांनी दिलेला क्रमांक लागत नाही . वाचकांपैकी कोणाच्या परिचयाचे असतील तर मला नक्की कळवावे . )
अशा रीतीने परिक्रमेतील सर्वात कमी चालणे किती असू शकते हे अनुभवत मी या आश्रमाला निरोप दिला . प्रसंगी ५५ ते ६० किलोमीटर अंतर एका दिवसात चालण्याचा अनुभव गाठीशी असताना या आश्रमामध्ये आलो त्या दिवशी केवळ एक किलोमीटर चाललो होतो . परिक्रमेमध्ये तुम्ही किती चाललात ते महत्त्वाचे नसते . तर तुम्ही कुठपर्यंत चाललात हे महत्त्वाचे आहे . चालत तुम्ही कुठे पोहोचलात याला अधिक महत्त्व आहे . कधी गंतव्य स्थानावर पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप चालावे लागते तर कधी पावला पावलावर तुम्हाला थांबण्यासारखी ठिकाणे , माणसे , स्पंदने , निमित्ते भेटतात . बाहेर पडल्यावर दोन डोह कुपे पार केली आणि डाव्या हाताला असलेल्या एका तमिळ साधूच्या आश्रमाने पुन्हा एकदा लक्ष वेधले . आपण हनुमंताला मारुती किंवा हनुमान असे म्हणतो परंतु दक्षिण भारतात अंजनेय असे नाव वापरतात . इथे एक मारुती मंदिर होते .
आञ्जनेय शक्तिपीठम् दतवाडा / अंजड
पुराचे पाणी येत असल्यामुळे येथे अशी बांधकामे असतात
हनुमंताची गोजिरवाणी मूर्ती
आश्रम अगदी काठावर आहे
बाहेरूनच या स्थानाचे दर्शन घेतले आणि पुढे चालू लागलो . अजून एखाद्या ठिकाणी थांबणे परवडणारे नव्हते . नावा बंद होण्याच्या आत समुद्रकिनारा गाठणे क्रमप्राप्त होते .
दतवाडा या गावातील अजून एक वैशिष्ट्य आहे . नर्मदेच्या काठावर संपूर्ण अखंडपणे पसरलेल्या एका खडकामुळे इथे नर्मदेला वळण घ्यावे लागते . हा खडक इतका मोठा आहे की या खडकामध्येच एक अखंड घाट कोरलेला आहे ! हा घाट अतिशय सुंदर आहे ! एका दगडात कोरलेला नदीवरील असा घाट जगाच्या पाठीवर अजून कुठे असल्याचे ऐकण्यात नाही ! या घाटातील अक्षरशः प्रत्येक पायरीचे अवलोकन मी बसून बसून केले ! प्रत्येक पायरी वेगळे आणि प्रत्येक पायरी अतिसुंदर होती ! शिवाय या पायऱ्या करताना चुकीला वाव नव्हता . कारण एक चूक झाली की सगळा घाट कामातून गेला ! परंतु तरी देखील प्रत्येक पायरी अतिशय सुंदर पणाने कोरलेली होती . रम्या परिक्रमावासी आश्रमातून बाहेर पडल्यावर थोड्याच अंतरावर हा घाट लागला . इथे चंगाबाबा नावाच्या संतांची समाधी आहे . तिचे दर्शन घेऊन पुढे निघालो .
चंगा बाबा समाधी मंदिर
चंगा बाबा यांची समाधी
इथपर्यंत येण्याचा सुंदर काठावरचा मार्ग
या भागातील रम्य नर्मदा मैया
तुझ्या दर्शने स्पर्शने पुण्य जोडे !
अहंता मुळीची मुळातून मोडे ! नर्मदे हर !


लेखांक अठ्ठ्याहत्तर समाप्त ( क्रमशः )


टिप्पण्या

  1. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏 अलौकिक, अद्भभुत असे शब्दांकन डोळ्यांसमोर प्रत्यक्ष माईंचे चित्र उभे राहते. मानसिक परिक्रमा होते आहे. पुढील भागांची आतुरतेने वाट बघत आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय आवडती मिठाई पुरवून पुरवून खातो तशी आपली परिक्रमा आहे.आम्ही खूप भाग्यवान आहोत.नर्मदे हर!!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर