लेखांक १६० : भारकच्छचे नर्मदाप्रसाद शर्माजी आणि अवंतिका धाम बिसेरचे बजरंगगिरी जी
नांदनेर गाव सोडल्यावर एक छोटासा पूल लागतो . हा पूल उत्तरेचे बख्तरा आणि दक्षिणेचे बाबई ही गावे जोडतो . सुंदर असा किनारा याही भागात आपली सोबत करतो . आखीव रेखीव शेती आणि वाळूचा किनारा ! कधी मातीचा कडा आणि भरपूर झाडी ! क्वचित कधी काटे कुटे आणि मध्ये येणारे ओढे नाले नद्या घाट . इतकी सोपी आहे नर्मदा परिक्रमा ! इथे डावीकडे एका शेतातून आत गेल्यावर परमहंस आश्रम आहे . मी काही इथे थांबलो नाही . परंतु थकला भागलेला परिक्रमावासी इथे मुक्काम करू शकतो .
नांदनेर गाव संपल्यावर नर्मदा मातेवर लागणाऱ्या पुलावरून नर्मदा नदी अशी दिसते .या भागामध्ये वाळूच्या प्रचंड साठ्यांमुळे काही ठिकाणी नर्मदामाता केवळ काही फुटातून वाहते
इथे वाहणारे पाणी अत्यंत खोल आणि वेगवान आहे .
वाळूचे अतिप्रचंड साठे असल्यामुळे इथे पात्र फारच लहान लहान होत जाते .
पुढे कुसुमखेडा नावाचे गाव लागते . या गावांमध्ये सत्यनारायण भगवंताचे मंदिर आहे . मंदिर अतिशय सुंदर असून आतमध्ये अप्रतिम रंगकाम व कलाकुसर केलेली आहे . सत्यनारायण भगवंताची मूर्ती देखील छोटीशीच परंतु सुंदर आहे .स्कंदपुराणातील रेवाखंडामध्ये सत्यनारायण भगवंताची कथा येते . त्यामुळे घरी सत्यनारायण घातल्याबरोबर शेवटी जी पोथी वाचतात ती नीट ऐकल्यावर तुम्हाला स्कंद पुराणे रेवाखंडे हे शब्द ऐकायला मिळतील !तीच कथा ! साधू वाणी आणि त्याच्या जावयाची !
सत्यनारायण भगवंतांचा विग्रह
मूर्ती लहानशीच परंतु सुबक व सुंदर आहे
इथे नर्मदा मातेवर असा घाट बांधलेला आहे .
मंदिरात अतिशय सुंदर आहे
मंदिर परिसर ऐसपैस व नीटनेटका आहे .
पुढे देहरी नावाचे गाव लागते . वाळूचा सुंदर किनारा आपल्याला समोरच्या तटावर दिसत राहतो ! आपण जणू काही स्वर्ग पाहात चाललो आहे असे भासवून देणारा ! बम्होरी नावाचे गाव देखील काठाने जाणाऱ्या लोकांना लागते . नर्मदामाई वळण घेत असल्यामुळे इथे सर्वत्र उभा तासलेला कडा आहे . सरळ निघून जाणाऱ्या लोकांना ही गावे लागत नाहीत . पुढे येते सोमलवाडा गाव . वाळूचा प्रचंड मोठा किनारा येथे आहे . महाराष्ट्रातील बहुतांश परिक्रमावासी ज्यांचे शिष्य असतात त्या जनार्दन स्वामींचा आश्रम इथे आहे . इथे देखील बरेच परिक्रमा वासी मुक्काम करतात . तुमच्या चालण्याच्या गतीनुसार मुक्काम ठरतो .कितीही कमी किंवा जास्त गती असू दे . तुमची मुक्कामाची सोय मैय्या करणारच ! फक्त तुम्ही परिक्रमे मध्ये हवे ! देहाने आणि मनाने सुद्धा !
या भागातील नर्मदा मातेचे दर्शन .समोर दिसणारा वाळूचा किनारा . मध्ये शेती करताना अशी कुंपणे घातल्यामुळे परिक्रमावासीयांची खूप कुचंबणा होते .
जनार्दन स्वामींची मूर्ती आश्रमात आणली तो क्षण .
परमपूज्य जनार्दन स्वामी महाराज .
या भागातील नर्मदा माई
आश्रमामध्ये स्थापन केलेली जनार्दन स्वामींची मूर्ती . प्राणप्रतिष्ठेपूर्वी आणि नंतर मूर्तीमध्ये कसा फरक होतो ते पाहावे !
या भागातील नर्मदा मातेचा उभा कडा भीतीदायक परंतु अतिशय सुंदर आहे .
याच्यापुढे जे महान तीर्थक्षेत्र लागते त्याचे नाव भृगु ऋषींच्या नावावरून पडलेले आहे ! भारकच्छ ! अतिशय भारदस्त नाव ! परंतु गंमत म्हणजे इथे नर्मदा मातेचे पाणी इतके उथळ आहे की स्नान करताना देखील कसरत करावी लागते ! इथे नर्मदा प्रसाद शर्मा नावाच्या एका सद्गृहस्थांनी छोटीशीच परंतु सुंदर धर्मशाळा विकसित केलेली आहे .इथून खालपर्यंत घाट देखील त्यांनी स्वतः बांधलेला आहे ! एकावेळी एकच माणूस चढेल व उतरेल असा घाट आहे . परंतु स्वतःचा आहे ! आश्रम पण अगदी छोटा परंतु टुमदार आहे ! खरं म्हणजे नर्मदा प्रसाद शर्मा आणि महेश शर्मा या दोघा बंधूंनी ही माँ कृपा धर्माशाला स्थापन केलेली आहे . या दोघांच्या १० परिक्रमा झालेल्या आहेत ! नर्मदा मातेच्या काठावरील पहिल्या रस्त्यावर भर मनुष्य वस्तीमध्ये हा आश्रम आहे . आश्रम म्हणजे एक छोटेसे सभागृह त्यावर जाणारा छोटासा जिना आणि मागे एक छोटीशी स्वयंपाकाची खोली ! त्या खोलीतून उभ्या गजाच्या खिडकीतून मागे दिसणारी नर्मदामाई ! बस ! अजून काय हवे !अलीकडे बाहेरच्या बाजूला संडास बांधलेला दिसतो आहे . बाकी इथे परिक्रमा वासींना सदाव्रत दिले जात नाही तर बना बनाया भोजन दिले जाते ! ज्या व्यक्तीने स्वतः परिक्रमा केलेली आहे तीच व्यक्ती तयार भोजनाचे महत्त्व जाणते ! मी आश्रमामध्ये पोहोचलो तेव्हा इथे केरळचे दास स्वामी आधीच आलेले होते . त्यांची चालण्याची गती तुफान असली तरी अर्धाच दिवस ते चालत असल्यामुळे दरवेळी आमची भेट व्हायची . ससा आणि कासव शर्यती सारखे ते झाले होते ! मी हळूहळू चालून देखील ते आहेत त्या मुक्कामी पोहोचायचो ! रात्री कांचन कुशवाह आणि तिचा भाऊ धर्मेन या दोघांनी आग्रह करून करून जेवू घातले ! सहावी सातवीतली पोरं बघा ! परंतु काय हुशार ! नर्मदा खंडाचे पाणीच वेगळे आहे !
नर्मदा प्रसाद शर्माजी यांची धर्मशाळा .मी गेलो तेव्हा धर्मशाळा काहीशी अशी होती .
परिक्रमावासींची सेवा करताना धर्मेन कुशवाह
आता इथे बाहेर संडास बांधलेला दिसतो आहे . वर जाणाऱ्या जिन्याच्या शेजारी खाली जाणारा घाट बांधलेला आहे
स्वयंपाक खोलीतून होणारे नर्मदा मातेचे दर्शन
समोर असलेले सुंदर छोटे खानी मंदिर .
सकाळी सर्व आटोपून लवकर निघालो . अतिशय कठीण अशा काठाने चालत मडागन तीर्थ गाठले . इथे मांडू ऋषींनी तपातून प्रकट केलेली गंगामाई गोमुखातून वाहते आहे .एका शिवलिंगावर अखंड या गंगा मातेचा अभिषेक होत आहे ! अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे ! मी कमांडोलो मध्ये गंगा भरून भरून अप्रतिम असे गंगा स्नान येथे केले ! ज्यांनी गंगास्नान केलेले आहे त्यांना लगेच लक्षात येते की या पाण्याचा स्पर्श , रूप , रस आणि गंध अगदी गंगा मातेसारखाच आहे . परंतु दुर्दैवाने सर्व परिक्रमावासी इकडे जात नाहीत . गडबडी मध्ये अंतर कापायच्या नादात पुढे पुढे निघून जातात .
हीच ती जागा जिथे गोमुखातून गंगामैया प्रकट झालेली आहे . पाण्याची वेगळी चव लगेच कळते . पलीकडे इथे बांधकाम करून नवीन स्वरूप दिलेले दिसते . मी इथे गेलो तेव्हा भयंकर घाण केली गेलेली होती .
नवीन घाट बांधण्यात आलेला आहे .
मडागन चा जुना घाट
किनाऱ्यावर दिसणारी सुंदर दृश्य .
या भागात एकंदरीतच पाणी खूप उथळ आहे . परंतु गतिमान आहे
इंग्रजांचे खरकटे खाल्ल्याशिवाय दिवस जाईल तो हिंदू कसला ! इतक्या पवित्र किनाऱ्यावर इंग्रजी भाषेत काहीतरी खरडून त्याचे पावित्र्य भंग झाल्यासारखे वाटते . शिकवा अजून पहिलीपासून इंग्रजी !
मडागन घाटावरून वाहणारी सुंदर नर्मदा माई
पुढे गाडरवास नावाचे गाव लागले . ओशो रजनीश यांचे गाव गाडरवाडा आहे आणि ते इथून जवळ आहे असे मला सांगण्यात आले होते .ते हेच गाव आहे की काय असे मला वाटले .परंतु नंतर त्यातला फरक कळला .नर्मदा काठावरील गावांची नावे या विषयावर कोणीतरी विद्यावाचस्पतीचा प्रबंध लिहू शकते !इथे एका घाटावर सिद्धेश्वराचे देवस्थान आहे . इथे काँग्रेसचे एक आमदार आहेत .आमदार देवेंद्रसिंग पटेल ठाकूर .त्यांचे हे मूळ गाव .
ठाकूर देवेंद्रसिंह पटेल हे काँग्रेस पक्षाचे आमदार असले तरी हिंदू धर्माला मानणारे आहेत .त्यांचा पुत्र मला इकडे एके ठिकाणी भेटला .त्याने मला सांगितले की गाडरवाडा हे आचार्य ओशो रजनीश यांचे गाव आहे असे लोक म्हणतात .परंतु त्यांचे खरे गाव म्हणजे मूळगाव कछवाडा म्हणून आहे .ते उदयपूर तहसील मध्ये येते. बोरास या नर्मदा काठावरील घाटापासून हे गाव पंधरा-वीस किलोमीटर उत्तरेला आहे .
कछवाडा गावातील ओशो रजनीश यांच्या आई वडिलांची व त्यांचे मूर्ती .इतक्या साध्या घरातून हा महामानव जन्माला आला .
ओशोतीर्थ जन्ममंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवणारी पाटी .
अर्थात इथून गाडरवाडा देखील जवळच आहे असे मला लोकांनी सांगितले .इथून पुढचा काठ अतिशय कठीण होता परंतु इथे चालायला फारच मजा आली ! मध्ये आडवी- तिडवी खुरटी झाडे होती ती वाघाप्रमाणे उड्या मारत पार केली . रस्ताच संपला की गवतातून मार्ग काढायचो ! गवत म्हणजे मैय्याच्या पाण्याजवळ उगवलेले गवत ! मला आजही फिरून फिरून आश्चर्य वाटते की इतक्या नको त्या ठिकाणी अचानक पाय घालून देखील मला कधीच सर्पदंश किंवा विंचुदंश कसं काय झाला नाही किंवा खेकडा वगैरे कसा काय चावला नाही !आपल्या अवतीभवती नर्मदा मातेचे कवच असते हे नक्की ! आणि गंमत म्हणजे इथे खरोखरच भवती नावाचे गाव होते ! गाडरवास ते भवती या किनाऱ्याने थरारक प्रवासाचा आनंद दिला ! वाळूचा किनारा देखील दमवणारा होता . नर्मदा माता मध्येच कधीतरी आपली परीक्षा पाहते .तशी परीक्षा पाहायचे तिने आज ठरवले ! कठीण मार्ग चालल्यामुळे पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता . त्यात वाळूचा किनारा किती दमवतो हे आपण पाहिलंच ! संपता न संपणारा हा किनारा अखेरीस गोरा मछवाडी नावाच्या गावामध्ये संपला . इथे एक राधा कृष्णाचे मंदिर लागले . खुश होऊन आत मध्ये गेलो ! मला वाटले चला आता आपल्याला भोजन प्रसादी मिळणार ! परंतु इथले महंत नेमके छातीमध्ये दुखते आहे म्हणून भोपाळला मोठ्या दवाखान्यात दाखवायला गेले होते . इथे एक व्यवस्थापक होते आणि एक लंगडा केवट सेवा द्यायचा . गंमत म्हणजे नर्मदेहर असा पुकारा करून देखील सुमारे तासभर दोघे बाहेरच आले नाहीत ! इकडे भुकेने माझा जीव कासावीस होऊ लागला होता . मी नर्मदा मातेचा धावा केला . इतक्यात एक चार वर्षाची छोटीशी कन्या माठातले थंडगार तांब्याभर पाणी घरातून घेऊन आली ! तिला नमस्कार केला आणि पाणी प्यायलो . पोटाला थोडासा आधार आला .जरा देखील चालायची शक्ती उरली नव्हती . आत या दोघांचे काय चालले आहे बघायला म्हणून गेलो तर दोघे निवांत पडले होते . मी त्यांना नर्मदे हर केले आणि भोजन प्रसादी मिळेल का असे विचारले .तर त्यांनी चक्क मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले ! आता आली का पंचाईत ! मी स्वतः बनवून खाल्ले तर चालेल का असे मी निर्लज्जपणे विचारले . असे खरं विचारायचे नसते . परंतु पोटात पडलेली आग बोलायला भाग पाडत होती . त्यांनी सांगितले की स्वामीजी इथे नसताना कोणालाही स्वयंपाक करायला परवानगी नाही . स्वामीजी म्हणाले तर काही करता येईल .
राधाकृष्ण मंदिराचे महंत व्यवस्थापक आणि केवट सेवकराधाकृष्ण मंदिराचे आवार मोठे आहे
आश्चर्य म्हणजे मला पाणी आणून देणाऱ्या छोट्या नर्मदा मैयाचे फोटो मला इंटरनेटवर सापडले ! ही चित्रे पाच वर्षे जुनी आहेत म्हणजे माझ्या परिक्रमेच्या दोन वर्षे आधीची आहेत .
हे पिल्लू बहुतेक रोज मंदिरातच खेळत असणार ! त्या दिवशी मला तिचे इतके कौतुक वाटले होते की काय सांगू ! नवनाथ खंडातील मुली किती गोड आहेत पहा ! अतिशय सात्विक तेजस्वी आणि हुशार आहेत ! नर्मदेचेच पाणी ते !
अखेरीस मी राधा कृष्णाला नमस्कार करण्यासाठी गेलो असता माझे लक्ष समोर ठेवलेल्या दुधाच्या वाटीकडे गेले . घरी जेव्हा जेव्हा माझी आजी किंवा आई किंवा मावशी किंवा अन्य कोणी देवापुढे ठेवलेले वाटीतले दूध द्यायचे तेव्हा मी तोंड वाकडे करायचो ! त्या दुधाला उगाचच विशिष्ट वास येतात असे मला वाटायचे . अत्तर उदबत्ती धूप वगैरेचे वास ते दूध शोषून घेते अशी माझी धारणा होती . मी पुन्हा एकदा त्या केवटाला विचारले की महाराज यह दूध पिया तो चलेगा क्या ? त्याने नाईलाजाने ती छोटीशी वाटी माझ्या हातात दिली . ते घोटभर दूध मला त्यादिवशी पोटभर पंचपक्वान्नांच्या जेवणाच्या तोडीचे वाटले ! त्याने मला मूठभर अतिशय खारट सादळलेला फलारी चिवडा दिला . कुठलाही चिवडा खाताना शेवटी जो मूठभर घास राहतो तो घास त्याने मला दिला होता . जो मिठाने ओतप्रोत भरलेला होता ! परंतु मला तो चिवडा साक्षात लक्ष्मीनारायण चिवड्याच्या तोडीचा भासला !कशी गंमत असते पहा ! भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशी म्हण मला माझी आजी नेहमी ऐकवायची .त्याची अनुभूती मी आज घेत होतो . अर्थात खरी भूक लागली असेल तर धान्याचा कोंडा देखील चवदार लागतो आणि खरी झोप आली असेल तर दगडावर देखील झोप लागते !याने मला सांगितले की पुढे बिसेर नावाचे गाव आहे ते फक्त अर्धा किलोमीटर आहे . इथे मला नक्की भोजन प्रसादी मिळेल . मोठ्या आशेने मी निघालो . काठाचा रस्ता अतिशय कठीण होता . त्यामुळे शेता शेतातून चालत होतो . परंतु हे अंतर सुमारे चार किलोमीटर निघाले आणि मला तिथे पोहोचायला तब्बल दीड तास लागला .प्रत्येक पावलाला माझी ऊर्जा कमी कमी होत होती .या प्रवासामध्ये मी असंख्य शेताची कंपनी पार केली आणि चिखलाने भरलेली शेते देखील ओलांडली . थोडीफार झाडी आणि बाकीची शेती असे चित्र होते .इथे मला अचानक एक लांडगा झाडाच्या आधाराने घात लावून बसलेला दिसला . म्हणून मी हळूच पायाचा आवाज न करता एका झाडाखाली सावलीत बसलो . आणि लांडग्याची मजा पाहू लागलो . लांडग्याने मला पाहिले होते परंतु त्याला दुसरे काहीतरी महत्त्वाचे मिळवायचे होते म्हणून तो माझ्याकडे दुर्लक्ष करून घात लावून बसला होता . इतक्यात पलीकडच्या शेतातून शेळ्यांचा एक मोठा कळप आला . माझ्या लक्षात आले की आता लांडगा शेळ्या खाणार ! मी गुराख्याला जोर जोरात आवाज देऊ लागलो .परंतु तो कानामध्ये हेडफोन घालून मोबाईलवर काहीतरी पाहत बसला होता . त्याला माझा आवाज शेवटपर्यंत गेला नाही . लांडग्याने बहुतेक मनातल्या मनात मला शिव्या घालत वेगाने कळपामध्ये घुसून एक शेळी उचलली आणि तो क्षणात दिसेनासा झाला ! त्याची ती गती आवेश आणि क्रौर्य पाहून मी स्तिमितच झालो ! प्रथमच मी प्रत्यक्ष लांडग्याने केलेली शिकार पाहिली ! तंत्रज्ञानाचा फायदा अशा रीतीने वन्य प्राण्यांना देखील होऊ लागला आहे हे पाहून बरे वाटले ! मी धावतच गुराख्यापाशी गेलो आणि त्याला झालेला प्रकार सांगितला . त्याचा माझ्यावर विश्वास बसेना . मग तो शेळ्या मोजायला लागला . आणि मी पुढे निघून गेलो . ज्या झाडापाशी मी बसलो होतो तिकडे माझे लक्ष गेले . या झाडाला मोठे मोठे डिंकाचे गोळे लटकले होते . मला इतकी भूक लागली होती की मी त्यातला एक गोळा काढला आणि खायला सुरुवात केली . तो डिंक कितीही चावले तरी संपत नव्हता . अर्धा तास मी तो डिंक खात होतो . माझे पोट असे काही भरले की जणू काही मला भूकच लागली नव्हती ! अर्थात आपण कुठे असे काही करू नये . कारण सर्वच झाडाचे डिंक खाण्यासारखे नसतात . हे देशी बाभळीचे झाड होते . त्यामुळे याचा डिंक खाल्लेला चालतो . मी खाऊन खाऊन कंटाळलो परंतु तो डिंक काही संपेना .
अगदी असाच तो डिंक होता !
मुळात झाडाचा डिंक म्हणजे काय हे आपण समजून घेतले पाहिजे . झाडाची मुळे खोल खोल जमिनीमध्ये जाऊन विविध मूलद्रव्य शोषून आणतात . त्याचे वहन एका द्रवाच्या स्वरूपात केले जाते . जेव्हा झाडाच्या खोडाला एखादी जखम होते किंवा जंतुसंसर्ग होतो ,बुरशी होते तेव्हा त्याचा प्रादुर्भाव आत मध्ये होऊ नये म्हणून झाडाचा रस तिथे पाझरू लागतो . त्यातला जलांश उडून गेल्यावर उरलेला भाग म्हणजे डिंक असतो . कधी कधी उन्हाळ्यामध्ये उष्णतेच्या प्रभावाने झाडातील रसाचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी देखील झाडाच्या फटी डिंक लावून बुजवण्याचे काम झाड करते . हा डिंक पाण्यामध्ये मिसळला तर पुन्हा आकारमान वाढवतो किंवा फुगतो . त्यामुळेच डिंक पोटात गेल्यावर फुगतो आणि पोट भरल्यासारखे वाटते .अचानक उष्णता दिल्यावर याच्या लाह्या देखील होतात. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मूलद्रव्ये असतात . त्यामुळे आयुर्वेदाने डिंकाला फार महत्त्व दिलेले आहे . गरोदर स्त्रियांना डिंकाचे लाडू त्याचसाठी खायला देतात . शरीराची झालेली झीज भरून काढण्याचे सामर्थ्य डिंकामध्ये असते . डिंकाचे अनेक प्रकार आहेत . खाण्याचे , सुगंधी , औषधी , विषारी , चिकट , रबरा सारखे असे विविध प्रकारचे डिंक आहेत . झाडाला विशेषतः जेव्हा आजार होतो किंवा ते संकटात पडते तेव्हा मोठ्या प्रमाणात डिंक बाहेर सोडते . मोहाचे झाड मरताना जो शुभ्र पांढरा डिंक बाहेर सोडते त्याची चव आणि स्पर्श अगदी च्युईंग गम सारखा असतो ! डिंकामध्ये सापडलेल्या डासावरून डायनासोर चा शोध लागला वगैरे आपण चित्रपटात पाहिले असेलच ! झाडाचा डिंक अतिशय मौल्यवान असे मूलद्रव्य आहे . झाडांना पाणी मिळत नसते तेव्हा हाच साठवलेला अन्नसाठा ते वापरत असते . विशेषतः जुन्या महा वृक्षांचे निरीक्षण आपण केले तर आपल्या लक्षात येईल की झाडाला खोडा वरती मध्ये गाठी आलेल्या आहेत . या गाठी म्हणजे अन्नासाठ्याच्या गाठी असतात ज्या दुष्काळामध्ये झाड वापरते . झाडाची साल संपूर्ण गोल कोरुन काढली की झाड मरून जाते . त्यामुळे असे पाप कधीच करू नये . डिंक काढणारे लोक झाडाची साल उभी तासतात , आडवी नाही .
असो . डिंकाने पोटाला आधार दिल्यावर पटापट अंतर कापले आणि बिसेर गाव गाठले . एका गाडीवाल्याने आईस्क्रीम खायला दिले . अजून एका दुकानदाराने शेव बिस्किटे आणि माझा प्यायला दिले !एका मातारामने बळजबरीने सातूचे पीठ खायला घातले . आज दिवसभर भोजन न मिळाल्यामुळे निषेध म्हणून रात्री सुद्धा आपण भोजन करायचे नाही असे मी ठरवले ! आता हे वाचताना गंमत वाटते . परंतु त्या दिवशी मी खरोखरच नर्मदा मातेचा निषेध असो असे मनोमन म्हणत भोजनाचा बहिष्कार केला होता ! अर्थात मुलाने बहिष्कार केला तरी आई त्याला काही ना काही खायला घालतेच ! तसे हे सगळे चुटुरपुटूर पदार्थ मैया मला आणून देत होती !आणि पोटात अन्न गेल्यावरच असले प्रकार सुचत होते !परिक्रमे मध्ये चालता चालता नर्मदा मातेवर कधी आपण अधिकार गाजवायला लागतो हे आपल्यालाच कळत नाही ! ते जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्वक टाळायला हवे असे निश्चितपणे वाटते . तिने मला भूक लागल्या क्षणी भोजन दिलेच पाहिजे असे आपल्याला वाटणे हा त्यातलाच प्रकार नाही का ! दुकानामध्ये मी माझा हे पेय पीत होतो . तिथे एक माणूस मला घरी बोलवायला आला . त्याच्याबरोबर मी घरी गेलो . त्याने मला एका चौरंगावर बसवले . समोर पाद्यपूजेचे सामान वगैरे ठेवले . मला म्हणाला ताम्हणामध्ये हात धरा . आणि माझ्या मागे म्हणा . मी तसे केले . हा म्हणू लागला . " इनके (म्हणजे याच्या बर का ) पडोसी की आठ एकर जमीन इनके नाम हो जाये इसलिये मेरी परिक्रमा का सारा पुण्य मै इनको अर्पण करता हु ! " मी हसायला लागलो ! पाणी वगैरे मी सोडले नाही परंतु त्याला चांगला तासभर घेऊन बसलो . आठ एकर जमीन कशाला पाहिजे म्हटल्यावर तो सांगू लागला की माझी बायको मला सोडून निघून गेली आहे . जमीन असेल तर ती परत येईल वगैरे वगैरे . मी त्याला बायको त्याला सोडून कशामुळे निघून गेली असेल ते समजावून सांगितले .त्याच्याकडे पाहिल्यावरच मला अंदाज येत होता की हात नक्की कसा माणूस आहे ! त्याला माझ्या परिक्रमेचे पुण्य तर दिले नाही .परंतु परिक्रमेतून आलेल्या अनुभवांची शिदोरी त्याच्यापुढे उलगडली आणि त्यातील बरेच मोती त्याला देऊन आलो ! जाताना तो ढसाढसा रडला . मला म्हणाला महाराज मला माफ करा . मी खूप पापी आहे . मी त्याला म्हणालो . मी महाराज नाही , आणि तू देखील पापी नाहीस ! जे जसे आहे त्याला तसे पाहायला आणि स्वीकारायला शिक ! समोरच्या व्यक्तीमध्ये किंवा घटनेमध्ये किंवा परिस्थितीमध्ये बदल करता येत नसेल तेव्हा शक्य तितका बदल आपल्यामध्ये करून घ्यावा हे उत्तम . या उपर भगवंताची इच्छा ! असे परिक्रमेचे पुण्य मागणारे अनेक जण वाटेमध्ये भेटले . किंबहुना बरेचदा तुम्हाला एखादी गोष्ट देताना देणाऱ्याचा हाच भाव असतो की या परिक्रमेचे थोडेसे पुण्य आपल्याला मिळावे .वाटेत अजिबात काहीही न घेता चालणारे परिक्रमावासी देखील मी पाहिले . असे लोक खूप मोठा पुण्य संचय करतात . परंतु मी अशा प्रामाणिक विचार केला की जे माझे नाहीच त्यावर मी अधिकार कशाला सांगायचा ! कुणी पुण्य घेत असेल तर घेऊ द्यावे ! पुण्य ही अशी गोष्ट आहे की जी कधी वाटून कमी होणार नाही ! तुमच्या हाताला सुगंध लागला असेल तर तुम्ही ज्याला हात लावाल तोही सुगंधी होईल ! तुमचा सुगंध फार काही कमी होणार नाही !
प्रेमाचेही तसेच आहे . तुम्ही आधी तुमच्या आई वडिलांवर प्रेम करता . अचानक आयुष्यात एक नवीन जोडीदार येतो मग त्या जोडीदारावर प्रेम करता . परंतु त्यामुळे आई-वडिलांवरचे प्रेम कमी होत नाही . नंतर मुले वाले जन्माला आली की त्यांच्यावर प्रेम करता . त्यामुळे जोडीदार आणि आई वडिलांचे प्रेम थोडीच कमी होते ! ज्याप्रमाणे प्रेम हे कधी कमी होत नाही ,तसेच पुण्याचे आहे !आणि महत्त्वाचे म्हणजे परिक्रमेमुळे पुण्याचा संचय होतो का नाही यापेक्षा पापांचा ऱ्हास नक्की होतो हे लक्षात ठेवावे . आणि मुळात पुण्य संचय करणे हा हेतू असूच नये असे मला वाटते .पाप आणि पुण्य जिथे समान होतात किंबहुना नष्ट होतात तिथून पुढे अध्यात्मिक प्रवासाचा प्रांत चालू होतो .धार्मिक मनुष्याला पाप-पुण्याचे खूप असते . अध्यात्मिक व्यक्तीला ते असेलच असे नाही ! किंबहुना नसावेच ! रामदास स्वामी दासबोधातल्या ब्रह्मप्रतिपादन निरूपण समासात म्हणतात
आपणासि ठावचि नाहीं । जन्म मृत्यु कैंचे काई ।
पाहतां वस्तूच्या ठायीं । पाप पुण्य नसे ॥ ३४॥
पाप पुण्य यमयातना । हें निर्गुणीं तों असेना ।
आपण तोचि तरी जन्ममरणा । ठावो कैंचा ॥ ३५॥
पाप पुण्याविषयी वरील उपदेश केल्यानंतर समर्थांनी सांगितलेल्या पुढच्या ओव्या देखील खूप सुंदर आहेत म्हणून थोडक्यात पाहुयात .
देहबुद्धीनें बांधला । तो विवेकें मोकळा केला ।
देहातीत होतां पावला । मोक्षपद ॥ ३६॥
झालें जन्माचें सार्थक । निर्गुण आत्मा आपण एक ।
परंतु हा विवेक । पाहिलाचि पहावा ॥ ३७॥
जागें होतां स्वप्न सरे । विवेक पाहतां दृश्य ओसरे ।
स्वरूपानुसंधानें तरे । प्राणिमात्र ॥ ३८॥
आपणास निवेदावें । आपण विवेकें नुरावें ।
आत्मनिवेदन जाणावें । याचें नांव ॥ ३९॥
आधीं अध्यात्मश्रवण । मग सद्गुरुपादसेवन ।
पुढें आत्मनिवेदन । सद्गुरुप्रसादें ॥ ४०॥
आत्मनिवेदनाउपरी । निखळ वस्तु निरंतरी ।
आपण आत्मा हा अंतरीं । बोध जाहला ॥ ४१॥
त्या ब्रह्मबोधें ब्रह्मचि झाला । संसारखेद तो उडाला ।
देह प्रारब्धीं टाकिला । सावकाश ॥ ४२॥
यासि म्हणिजे आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान ।
परब्रह्मीं अभिन्न । भक्तचि जाहला ॥ ४३॥
आतां होणार तें होईना कां । आणि जाणार तें जाईना कां ।
तुटली मनांतील आशंका । जन्ममृत्यूची ॥ ४४॥
संसारीं पुंडावें चुकलें । देवां भक्तां ऐक्य झालें ।
मुख्य देवासि ओळखिलें । सत्संगेंकरूनी ॥ ४५ ॥
गावामध्ये बजरंग गिरीजी महाराज नावाचे एक संन्यासी अवंतिका धाम या नावाने आश्रम उभा करत होते . महाराज पूर्वाश्रमीपासून काँग्रेस विचारसरणीचे होते आणि हिरीरीने काँग्रेस पक्षाचा प्रचार प्रसार करायचे .साधू महाराज अत्यंत हुशार आणि चाणाक्ष होते . कर्मयोगी हा शब्द त्यांच्यासाठी जास्त योग्य आहे . कारण ते सतत नवीन नवीन कामे उभी करत . नवीन नवीन आश्रम बांधण्याचा त्यांना छंद होता . मर्दान पुरा गुजरात , आवरी घाट आणि सलकनपूरच्या जंगलामध्ये मधोमध असलेले रुद्रधाम हे सर्व यांनीच उभे केलेले आश्रम होत .मी महाराजांना नमस्कार केला आणि चरणाशी बसलो . यांना भेटण्यासाठी काँग्रेसचे आमदार ठाकूर देवेंद्रसिंह पटेल यांचे पुत्र लवाजमा घेऊन आले होते .पत्नी मुले अंगरक्षक व मित्रमंडळी अशी बरीच माणसे होते . अतिशय तेजस्वी कुटुंब वत्सल आणि सात्विक मुलगा होता . महाराज त्याला म्हणाले तुम्ही दोघे बोला . त्यामुळे माझ्याशी तो आमदार पुत्र नंतर सुमारे तासभर बोलत होता .त्याच वेळी त्याने मला ओशो रजनीश यांचे जन्मस्थान सांगितले होते . याने मला संपूर्ण परिसर फिरवून दाखवला . इथे एका भव्य दिव्य मंदिराची संकल्पना महाराजांनी केली होती . मी गेलो तेव्हा तिथे पाया देखील घडलेला नव्हता परंतु आज मी जेव्हा बघतो आहे तेव्हा ते भव्य मंदिर साकार झालेले स्पष्टपणे दिसते आहे ! साधू संतांचे काम हे असे असते ! त्यांनी संकल्प केला की त्याची पूर्ती आपोआप होते ! फक्त त्यासाठी संकल्प शुद्ध असणे आवश्यक असते . आणि संकल्प सिद्धीचा मार्ग देखील योग्य असावा लागतो .
अवंतिका धाम मंदिराचा परिसर . महाराजांनी काळजीपूर्वक येथे वृक्षारोपण देखील केलेले आहे .
या ओसाड माळरानाचे रूपांतर त्यांनी अक्षरशः नंदनवनात केलेले आहे
नर्मदा मातेच्या काठापासून थोडेसे आत हे मंदिर बांधलेले आहे . नर्मदा मातेला येणारे पूर हे त्याचं कारण आहे .
बिसेर गावचा वाळूचा किनारा अतिशय सुंदर आहे
![]() |
उज्जैन या शहराचे पौराणिक नाव अवंतिका नगरी असे आहे .त्यावरून या आश्रमाचे नाव घेतलेले आहे . महाराजांचा मोठा शिष्य संप्रदाय होता . विशेषतः महाराज आश्रमाचे काम पूर्ण करण्यासाठी इथेच राहिलेले असल्यामुळे सेवेसाठी राहिलेल्या सेवकांची संख्या वाढलेली होती . इथे वाळूचा अप्रतिम किनारा आहे . तिथे जाऊन मी मनसोक्त स्नान करून आलो . पाण्याला प्रचंड गती आहे परंतु पाणी उथळ आहे . दंड वाळूमध्ये खोचायचा आणि पाण्यामध्ये फडकत राहायचे ! नर्मदा मातेच्या स्नानाचा मनसोक्त आनंद घेतला !
मी पुन्हा वरती येऊन पूजापाठ आटोपून स्वामीजींच्या समोर बसलो . त्यांनी त्यांच्या सर्व शिष्यांच्या समोर , जमलेल्या ग्रामस्थांच्या समोर आणि आलेल्या आमदार पुत्राच्या समोर मला ३२ एकर परिसराचा तो आश्रम सांभाळण्यासाठी इथे कायमचे राहण्याची विनंतीवजा सूचना केली . मी काहीच बोललो नाही . थोड्यावेळाने हळूच इथून उठून बाजूला गेलो . त्यांचे काही शिष्य धावत माझ्याकडे आले . आणि मला सांगू लागले की बाबाजी आमचे स्वामीजी अतिशय चिकित्सक स्वभावाचे आहेत .ते अशी सहजासहजी कोणाला "ऑफर " देणार नाहीत .तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि त्यांना विना विलंब होकार कळवा वगैरे वगैरे . मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही . थोड्यावेळाने पुन्हा स्वामीजींच्या सत्संगाला बसलो . स्वामीजींनी १९६२ साली केलेल्या परिक्रमेमधले अनुभव मला सांगितले . स्वामीजी सांगत होते , " देख बेटा लक्ष्य बडा होगा तो रास्ते के विघ्न अपने आप छोटे लगने लगते है ।हम जब परिक्रमा मे थे तब बाघ सिंह बडी संख्या मे थे । वे हमे चूहे की तरह लगते थे । "महाराजांनी अनेक विषयांवर बराच उपदेश केला .बराच वेळ झाल्यावर आम्ही दोघेच उरलो होतो . तेव्हा स्वामी अजून मोकळेपणाने बोलू लागले . त्यांनी सांगितले की त्यांना इथे आश्रम सांभाळण्यासाठी कोणीही आखाडे वाला साधू नको आहे . कारण आखाड्याचा साधू कितीही झाले तरी आखाड्याशी बांधलेला असतो . त्यामुळे आखाड्याचे वरचे लोक जो निर्णय घेतील तो त्याला मानावा लागतो . त्यांना ते स्वतः जुना आखाड्याचे असले तरी देखील असे वाटणे विचारप्रवृत्त करायला लावणारे होते .त्यांना एक सुशिक्षित , नम्र , उच्चविद्याविभूषित ,ब्राह्मण , विनापाश , निर्व्यसनी , फक्कड साधू हवा होता .या विषयावर आम्ही खूप चर्चा केली . त्यांनी सांगितले की साधू सुशिक्षित असला की सुशिक्षित लोकांना चांगले समजावून सांगू शकतो . साधू नम्र असला की आश्रमात भांडणे होत नाहीत . साधू उच्चविद्याविभूषित असला की त्याला चुकीच्या संकल्पना आणि परंपरा यांच्या आहारी न जाण्याची कारणे माहिती असतात . साधू ब्राह्मण असला की तो भ्रष्टाचार आणि व्यभिचार करत नाही . साधू विनापाश असला की तो द्रव्य संचय करत नाही . साधू निर्व्यसनी असला की सात्विक वातावरण वाढीला लागते . साधू फक्कड असला अर्थात कुठल्याही आखाड्याशी बांधलेला नसला की तो निर्णय घेण्यास स्वतंत्र आणि मुक्त राहतो . ही सर्व स्वामीजींची केवळ मते नव्हती तर अनेक दशकांच्या साधू जीवनाचा अनुभव होता . हे स्थान अत्यंत रमणीय होते . इथे एक तेलगू मौनी स्वामी राहत होते ज्यांना पाहून श्रीधर स्वामींची आठवण येतसे . हे साधू देखील कट्टर काँग्रेसी होते . स्वतः बजरंग गिरी स्वामीजी इंदिरा गांधींचे भयंकर मोठे चाहते होते . त्यांनी मला इंदिरा गांधींच्या कामाबद्दल देखील भरपूर माहिती सांगितली . काँग्रेसचा आमदार तिथे मंदिर उभे करत होता . त्यामुळे मला एकंदरीत सर्व गणित लक्षात आले . एखादे कार्य उभ्या करणाऱ्या कार्यकर्त्याची कदाचित ही अपरिहार्यता असावी की काय कोण जाणे ! परंतु त्यांना मदत करणाऱ्या लोकांचे अवगुण त्यांना झाकावे लागतात ! त्यामुळेच ते आमदार पुत्राच्या समोर इंदिरा गांधींचे गुणगान करत होते .म्हणजे असे माझे मत आहे . कारण त्यांचे बाकीचे धर्माचे राष्ट्राचे आणि समस्यांचे आकलन व्यवस्थित होते . परंतु काँग्रेसच्या त्या आमदाराकडून एक भव्य दिव्य काम उभे करून घेणे हे त्यांचे प्राधान्य होते . मी स्वामीजींना अतिशय विस्तारपूर्वक माझा नर्मदा परिक्रमा करण्याचा हेतू कथन केला आणि त्यांना सांगितले की नर्मदा माता हे कार्य सांभाळणारा मनुष्य आपण होऊन त्यांच्याकडे पाठवणार आहेच ! स्वामीजींनी देखील मग मला आनंदाने निरोप दिला परंतु आयुष्यात कधीही वाटले तर इथे येऊन कायमचे राहण्याची सूचना नव्हे नव्हे आज्ञाच केली !
सकाळी लवकर उठून मी पुन्हा एकदा त्या सुंदर काठावर मनसोक्त स्नान केले ! इथे केलेले स्नान कायमचे लक्षात राहिलेले आहे ! अतिशय वेगळाच अनुभव होता ! आजूबाजूला कोणीही नाही फक्त नर्मदा मैय्या आणि तुम्ही ! आणि नर्मदा मातेची गती तरी इतकी तुफान की तुम्हाला उभे सुद्धा राहू द्यायची नाही ! ज्याला पोहता येत नाही असा मनुष्य इथे टिकूच शकणार नाही इतकी गती ! मजा आली !
बसल्या बसल्या मी काही चिंतन केले . सहज विचार करून पहा .साधूने कुठल्या एका पक्षाचे असणे योग्य की अयोग्य ? पक्ष म्हणजे राजकीय पक्ष . या जगामध्ये सर्वार्थाने परिपूर्ण असे काहीच नसते . काही गोष्टी अमुक प्रकारे चांगल्या असतात तर काही तमुक प्रकारे .त्यामुळे सरसकट एखादा पक्ष घेण्यापेक्षा जे जे उत्तम उदात्त उन्नत आणि राष्ट्राच्या उत्थानासाठी हिताचे आहे उपकारक आहे त्याचा त्याचा पक्ष घेणे सर्वोत्तम . कारण एखादा पक्ष किंवा एखादी बाजू तुम्ही एकदा जाहीरपणे स्वीकारलीत की मग तुमच्यावरती शिक्का बसण्याची शक्यता असते . ते घातक असते कारण राजकारणी हे कधीच कोणाचे नसतात . साधे उदाहरण पहा . नरेंद्र मोदी हे मुसलमान विरोधी आहेत असा प्रचार करून त्यांना सत्तेवर आणले गेले . अर्थात हा प्रचार त्यांच्याविरोधकांनीच अधिक केला . परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांनी जगातील सर्व मुस्लिम देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करून एक वेगळेच राजकारण खेळले . त्यामुळे एखादा माणूस योग्य की अयोग्य किंवा त्याची विचारधारा योग्य की अयोग्य किंवा त्याचा पक्ष योग्य की अयोग्य असे ठरविण्यापेक्षा त्या व्यक्तीने त्याप्रसंगी केलेली कृती व्यापक राष्ट्रहिताच्या दृष्टीने योग्य की अयोग्य याचा अभ्यास करावा आणि त्यानुसार आपले मत ठरवावे ! अलीकडच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे शशी थरूर आणि अकबरुद्दीन ओवेसी यांचा ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनासाठी ज्या हुशारीने वापर करून घेतला तो पाहिल्यावर तुम्हाला मी काय म्हणतो आहे ते लक्षात येईल . राजकारण हे सर्वसामान्य माणसाला कळण्याच्या पलीकडचे असते हेच खरे . समर्थ म्हणतात त्याप्रमाणे राजकारण बहुत करावे । परंतु कळोची नेदावे । पर पीडेवरी असू न द्यावे । अंतर आपुले ॥ हे सर्वात उत्तम ! स्वामीजींचे जे काही आकलन मला झाले त्यानुसार आता ते दुसऱ्या एखाद्या स्थानाच्या निर्मितीमध्ये गुंतलेले असतील ! मठ करून ताठा धरू नये । या समर्थांच्या उक्तीला प्रत्यक्ष जगणारे हे संन्यासी होते . अतिशय परीक्षा पाहणार हा प्रसंग फारच सहजतेने हाताळत तिथून बाहेर पडण्याची प्रेरणा नर्मदा मातेने मला दिली . इथून पुढे निघाल्यावर मी जेव्हा नर्मदा मातेकडे पाहू लागलो तेव्हा मला ती हसते आहे असा भास झाला ! परिक्रमा केली जसजशी पूर्ण होण्याच्या जवळ येऊ लागली तसतसे नर्मदा मातेच्या परीक्षेतले प्रश्न देखील अवघड होऊ लागले ,असाच त्याचा अर्थ होता ! कुठलाही पूर्व अभ्यास न करताना अचानक या परीक्षेला बसलेला मी एक ढ विद्यार्थी होतो . सतत पुढच्या इयत्तेत ढकलावा लागणारा ! प्रत्येक वेळी काठावर पास होणारा ! नर्मदा मातेच्या काठावर ! नर्मदे हर !
पुढील लेखांक
लेखांक एकशे साठ समाप्त (क्रमशः )
(अपूर्ण )
मैय्याच्या काठावर सुवर्ण पदकासहित उत्तीर्ण झालेल्या परिक्रमावासीस ; नर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवा