बुधनी हे गाव अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे . मला नर्मदा परिक्रमेची प्रेरणा ज्या पुलावरून झाली तो पूल याच गावातून जातो ! समोरच्या तटावर नर्मदापुरम हे महानगर आहे . या भागात अनेक नद्या नर्मदा मातेला येऊन मिळतात . भागनेर , तिंदरी , गदरिया ,चांदनी , कुसुमेली अशा अनेक नद्या आणि असंख्य ओढे नाले नर्मदा मातेला याच भागात समर्पित होतात . लहानपणापासून मी ऐकत आलेले नाव वर्धमान धागे यांचे मुख्यालय किंवा मुख्य कारखाना बुधनी गावातच आहे . परिक्रमा मार्गावरती तो लागतो . इथे सतत मोठ मोठे ट्रक थांबलेले असतात .
वर्धमान फॅब्रिक्स कंपनीचे मुख्य प्रवेशद्वार
जगातील सर्व महत्त्वाच्या कापड उद्योगांना कच्चामाल पुरवण्याचे काम ही कंपनी करते आहे .
वर्धमान फॅब्रिक्स कंपनीचे एक वैशिष्ट्य आहे . भारतातील एकूण कापड उद्योगाच्या एक तृतीयांश व्यवसाय ही एकटी कंपनी करते ! १,५५० यंत्रमागांसह, वर्धमानची विणकाम क्षमता २२० दशलक्ष मीटर प्रतिवर्ष आहे आणि कापड प्रक्रिया क्षमता १८० दशलक्ष मीटर प्रतिवर्ष आहे. (वरील सर्व माहिती वर्धमान फॅब्रिक्सच्या संकेतस्थळावरून साभार ) हा माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा मतदारसंघ आहे .त्यामुळे त्यांनी रस्ते वीज पाणी उद्योगधंदे शेती व्यवसाय असा भरपूर विकास केलेला आहे . बुधनी मध्येच रेल्वेचे पूल असून लोहमार्ग नर्मदा मातेला ओलांडल्यावर ९०° मध्ये वळलेला पाहायला मिळतो . नर्मदा मातेमध्ये सायंकाळी स्नान करताना हे सर्व पूल मला दिसत होते . यातील गाडीच्या पुलावरून जातानाच माझा नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प घडलेला होता . तो पूल देखील दिसला . परंतु अतिशय तटस्थ भावाने मी त्या पुलाकडे पाहत होतो . परिक्रमा तुम्हाला तटस्थपणा देखील देते .
नर्मदा मातेवर असलेली विविध पूल आपल्याला या चित्रामध्ये पाहायला मिळतील . लाल रंगाची खूण दिसते आहे तिथे मी संध्याकाळी स्नान केले होते .
नर्मदेच्या काठावरील बुधनी गावाची वस्ती आपल्याला दिसते आहे
वळलेला लोहमार्ग आणि समोर असलेले विस्तीर्ण नर्मदापुरम शहर आपल्याला स्पष्टपणे दिसते आहे .वाळूचे प्रचंड किनारे येथे असून दिवस रात्र वाळू उपसली जाते .
हाच तो घाट आहे जिथे आमचा जलसंवाद झाला आणि मला स्नान घडले ! पाणी अतिशय संथ परंतु खोल आहे . इथे नर्मदा माता तुम्हाला संपूर्णपणे कवेत घेते . छोटासा घाट चढून वर आले की वस्ती लागते .
इथे काठावर घनघाट वस्ती आहे . त्या वस्तीतून नर्मदा मातेच्या शेजारून जाणारा एक रस्ता आहे . या रस्त्यावर अनेक मंदिरे आश्रम आहेत . एका छोट्या घरामध्ये आग्रहावरून थांबणार होतो . परंतु पुढे चालावे असा आतून आवाज आल्यामुळे मी चालत चालत बुधनी च्या मोठ्या घाटावर आलो . इथे देखील दोन-तीन आश्रम आहेत . पैकी श्रीराम हनुमान मंदिरामध्ये उतरावे असे गावकऱ्यांनी सांगितल्यामुळे इथे मी आलो .ही क्षत्रिय किरार समाजाची धर्मशाळा होती . एक महंत त्यांच्या मातोश्री आणि अतिशय गोड अपूर्वा नावाची छोटीशी मुलगी असे तिघे इथे राहत होते . महंतांनी मला एका कोपऱ्यामध्ये आसन लावायला जागा दिली . महंतांचा आवाज मोठा होता .त्यामुळे ते बोलताना भांडत आहेत असा भास व्हायचा ! त्यांचे पाहून बिचारी अपूर्वा देखील मोठ्या मोठ्याने बोलायची ! त्या इवल्याशा जीवाच्या घशाच्या शिरा ताणल्या जायच्या .मी तिला हळू बोलायला शिकवले आणि त्याचे महत्त्व पटवून सांगितले . तिला काय आवडते विचारल्यावर कॅडबरी आवडते म्हणाली .तिच्यासाठी दुकानातून कॅडबरी विकत आणली आणि तिला दिली . त्याबरोबर तिने मला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले ! आणि प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला ! जन्मदिवसाच्या संध्येला नर्मदा मातेनेच डोक्यावरुन हात फिरवून आशीर्वाद दिला असा माझा भाव झाला ! कारण डोक्यावर हात ठेवून नर्मदा खंडातील सगळ्याच मुली आशीर्वाद देतात .त्यांना घरून तसे शिकवलेलेच असते . परंतु त्यानंतर डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणे हे आईचेच लक्षण आहे !

हा आहे बुधनीचा घाट . नर्मदा मातेतून पाहिल्यावर बुधनी घाट असा दिसतो .
बुधनी घाटाच्या वरून पाहिल्यावर नर्मदा माई अशी दिसते . इथून सूर्योदय खूप छान दिसतो .
बुधनी घाटावरून लोहमार्ग व सडक मार्गाचे ५ पूल असे दिसतात .
हे बुधनी घाटावरील श्री राम मंदिरातील विग्रह आहेत .
कुर्मी क्षत्रिय किंवा क्षत्रिय किरार समाजाची ही धर्मशाळा आहे .
घाट अतिशय सुंदर रंगवलेला आहे .रामाचे मंदिर चांगले उंचावर आहे . वर जाण्यासाठी सुंदर जिने आहेत .
समोरच्या बाजूला महादेवांचे आणि राधा कृष्णाचे मंदिर आहे . इथे देखील परिक्रमा वासी उतरतात .
या घाटावर व अन्यत्र देखील अनेक ठिकाणी सरकारने आणि नर्मदा भक्तांनी पाट्या लावलेल्या आहेत .की बाबांनो इथे कचरा करू नका निर्माल्य टाकू नका वगैरे वगैरे . परंतु लोक काही ऐकत नाहीत !नर्मदा खंडाचे एक वैशिष्ट्य आहे !
ही अशी एकमेव जागा आहे की जिथे लोकं निर्माल्य काय साक्षात देवांचाच कचरा करून आणून टाकतात ! बघणं झालेल्या महादेवांच्या मूर्ती गणपतीच्या मूर्ती महादेवाच्या पिंडी बंगलेले नंदी यांचाच खच नर्मदेच्या काठावर पडलेला आहे ! तिथे हार फुले टाकू नका हे तुमचे कोण ऐकणार !
आणि हा कचरा करण्यामध्ये परिक्रमा वासी देखील मागे नाहीत !विशेषतः नर्मदा मातेच्या काठावरच ज्यांचे घर आहे अशा लोकांचा कचरा करण्याकडे अधिक कल असतो असे माझे निरीक्षण आहे . कारण नर्मदा मातेच्या बाबतीत त्यांचे अतिपरिचयात अवज्ञा असे झालेले आहे .

हे छायाचित्र कोणी काढले आहे माहिती नाही . परंतु या एकाच क्षेत्रामध्ये नर्मदा खंडातील जवळपास सर्व समस्या आपल्याला दाखवता येतात ! कशा ते सांगतो ! सगळ्यात पहिली समस्या आहे ती म्हणजे प्लास्टिकच्या कचऱ्याची . तो आपल्याला या चित्रात मुबलक दिसेल . दुसरी समस्या आहे वृक्षतोडीची . तुटलेली झाडे देखील दिसतील . तिसरी समस्या आहे ती म्हणजे विदेशी गोधन आपल्यावर लादले जात आहे त्याची ! या चित्रात चरणारी जर्सी गाय तेच सांगते आहे ! चौथी समस्या आहे पाळीव गुरांच्या अनिर्बंध चारण्याची . चरणे नव्हे चारणे ! अर्थात मालकच त्यांना चारायला घेऊन येतात आणि मग त्यामुळे आपण वृक्षारोपण करू शकत नाही ! लावलेली प्रत्येक गोष्ट ही भुकेली जनावरे खाऊन टाकतात !पाचवी समस्या आहे जलप्रदूषणाची . आपल्याला पुढे प्रदूषित जल दिसेल . सहावी समस्या आहे अशास्त्रीय आणि अनिर्बंध वाळू उपशाची .त्यासाठी वापरली जाणारी वाळू उपसाचे नाव आपल्याला चित्रात पुढे दिसेल . सातवी समस्या आहे नर्मदा मातेच्या काठावर घालण्यात येणाऱ्या अनावश्यक अशास्त्रीय काटेरी कुंपणांची . ते देखील चित्रात दिसेल . आठवी समस्या आहे चुकीच्या पद्धतीने लावलेल्या मोटर्स आणि पाईपची . तो देखील चित्रात दिसतो आहे . नववी समस्या आहे अनिर्बंध पाणी उपशाची . ती करणाऱ्या दोन जॅकवेल अथवा डोह कूप आपल्याला दिसताहेत . दूरवर दिसणारे जंगलांना सारून घडणारे नागरिकरण ही देखील एक समस्याच आहे जिला दहावा क्रमांक देता येईल ! चित्र झूम केल्यावर आपल्याला खालच्या बाजूला पाण्याजवळ जलपर्णी आणि काठावर काँग्रेसचे तण वाढलेले दिसेल . या तणांची वृद्धी ही देखील नर्मदा मातेच्या पात्रामधली आणि काठावरची एक समस्या आहे .जिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . आपण बघायचे ठरवले तर एखादे चित्र आपल्याला काय काय दाखवू शकते याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे नाही का ! फक्त त्यासाठी आपले डोळे उघडे असायला पाहिजेत ! आणि आपल्या डोक्यावर आपलेच धड असायला पाहिजे !

नर्मदेचा काठ तुम्हाला अखंड काहीतरी शिकवत असतो .चालता चालता इथे तुम्हाला दोन प्रकारची माणसे भेटतात जी अत्यंत मदत करतात . एखादी नाव घेऊन चाललेला केवट . किंवा अशा एखाद्या दगडावर धुणे धूत असलेली केवटाची पत्नी ! मला असे लक्षात आले आहे की या दोन व्यक्ती परिक्रमा वासीला कधीच चुकीची माहिती सांगत नाहीत किंवा फसवत नाहीत . मी फक्त एवढीच काळजी घेतो की आपल्याला माहिती देणारा मनुष्य नर्मदा मातेमध्ये अर्धा किंवा पूर्णपणे असला पाहिजे . अर्धा म्हणजे उदाहरणार्थ धुळे धुणारी एखादी महिला . किंवा स्नान करणारा एखादा ग्रामस्थ . आणि पूर्ण म्हणजे नावेत बसलेला नावाडी !किंवा मासे पकडणारा कोळी !
नावेत संचार करणारी माणसे तुम्हाला दर काही अंतरावर भेटतातच भेटतात !
या लोकांचा नर्मदा माते शी असलेला स्नेह जिव्हाळा नाते वेगळेच आहे !आपल्या जीवावर उदार होऊन ते रोज नर्मदा मातेमध्ये जात असतात आणि नर्मदा माता देखील कठीण प्रसंगांमध्ये त्यांचे प्राण वेळोवेळी वाचवत असते आणि त्यांना अनुभूती देत असते .
त्यामुळे नर्मदेच्या काठावरील केवट समाजाचा मी आजन्म ऋणी आहे !या लोकांना जी नर्मदा मैय्या कळलेली आहे ती भल्या भल्या साधकांना आणि परिक्रमावासींना देखील कळणे अवघड आहे ! असो !
आता सुद्धा पहाटे चार वाजता उठून मी घाटावर जाऊन नर्मदा मातेमध्ये स्नान करून घाटावरच बसलो . सूर्योदय होण्याची वाट पाहत बसलो . इथे काठाने रस्ता नाही असेच सर्वजण मला सांगत होते . परंतु एक केवट भेटला आणि त्याने शेवटपर्यंत काठाने कसे जाता येईल ते सांगितले . अत्यंत कठीण रस्ता आहे परंतु आहे ! सर्व जंगल आहे . वाटेत काय काय धोके आहेत ते सर्व त्याने मला समजावून सांगितले . केवट लोकांचा नर्मदा मातेमध्ये मुक्त संचार असतो .त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्याही जागेचा ताजा अहवाल उपलब्ध असतो ! ग्रामस्थांचे तसे नसते . ते काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी एखाद्या ठिकाणी जाऊन आलेले असतात ! केवट मात्र काही तासांपूर्वी जाऊन आलेला असतो ! त्यामुळे त्याचा सल्ला नेहमी विश्वासार्ह मानावा .हे नर्मदा मातेनेच मला परिक्रमे मध्ये शिकवले . इथून थोडेसे पुढे अंतर गेल्यावर बडवले बाबाजी नावाच्या एका अवलिया बाबांचा आश्रम आहे . हे बाबा मोठे कलाकार आहेत ! कारण त्यांनी संपूर्ण आश्रम इतका कलात्मक पद्धतीने उभा केला आहे की तो आवर्जून पहावा असा आहे ! या बाबांना बहुतेक सिमेंट मध्ये काम करण्याची आवड आहे ! त्यांनी संपूर्ण आश्रम रंगीबेरंगी सिमेंट शिल्पांनी सजवला आहे ! अगदी कुंपणापासून ते आश्रमाची पाटी सुद्धा सिमेंट मध्ये केलेली असून चित्र विचित्र आकाराची झाडे शिल्पे सिमेंट आणि विटांमध्ये त्यांनी बनवली आहेत ! अजूनही नवीन नवीन मंदिरांचे काम तिथे चालू आहे .

बडवाले गुरुजी यांचा आकर्षक रंगीबेरंगी आश्रम ! किती कल्पकतेने आश्रम उभा केला आहे पहा !
आश्रमातील हनुमानजीं ची मूर्ती
हाच तो वड आहे ज्यामुळे बाबांना वडवाले बाबा नाव पडले ! हिंदीमध्ये वडाला बड म्हणतात .
इथे चालू असलेले अजून एक बांधकाम ! बाबांना ही कला चांगली अवगत झालेली आहे असे दिसते ! साधू काय करतील याचा नेम नाही !
इथून पुढे दाट जंगल लागते . आणि एक दोन नद्या आडव्या येतात . ग्रामस्थांनी शेतातून परिक्रमावासी जाऊ नयेत असा जंगलातला मार्ग सुंदर पैकी आखून ठेवलेला आहे ! त्यामुळे ते झेंडे बघत चालले की आपण बरोबर मार्गस्थ होतो . सर्वप्रथम आपल्याला तिन्दरी नावाची नदी आडवी येते . माझी सर्वांना अशी विनंती आहे की किमान हा अडीच तीन किलोमीटरचा मार्ग कोणी चुकवू नये ! तशी माझ्या वहीमध्ये मी नोंदच करून ठेवलेली आहे ! अतिशय रम्य परिक्रमा मार्ग आहे ! इथे नर्मदा मातेचा उभा कडा कापलेला असल्यामुळे काठाने चालता येत नाहीत परंतु हा काठावरील जंगलातून गेलेला अप्रतिम मार्ग आहे . इथले जंगल खुरटे आहे आणि दाट आहे . बरेचदा खाली वाकून चालावे लागते . आपल्या उजव्या हाताला दूरवर शेती आहे हे लक्षात येते . परंतु तुम्ही मात्र जंगलातूनच चालत असता . तुमचे नशीब चांगले असेल तर वन्य प्राणी तुम्हाला इथे देऊ शकतात . कारण गदरिया नदीवर ते पाणी प्यायला येतात .
किनाऱ्यावरून चालण्याचा मार्ग अशक्य आहे हे लक्षात आल्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या सामंजस्याने शेतातून , जंगलातून , नाल्यातून ,वीट भट्ट्यांमधून व अखेरीस नदीच्या मधून जाणारा सुंदर मार्ग बनवला आहे . इथला मार्ग इतका मजेशीर आहे की तुमच्या प्रत्येक पावलानंतरचे पुढचे पाऊल सरळ न पडता उजवीकडे किंवा डावीकडे किंवा वर किंवा खाली नक्की पडते ! इतकी वळणे आणि चढ-उतार या मार्गावर आहेत . तिंदरी नदीचे पात्र मोठे होते परंतु पाणी कमी होते .इथे महर्षी महेश यांचा एक आश्रम आहे . महर्षी महेश योग विज्ञान विद्यापीठ . परंतु तिथे कोणीच दिसले नाही म्हणून मी पुढचा मार्ग पकडला .
मी वर वर्णन केलेला जंगलाचा मार्ग आपल्याला या चित्रात दिसेल . राम जानकी मंदिरापासून वरती जंगलातून चालत जावे लागते .उजवीकडे राखाडी रंगाचा रस्ता दिसतो तिथे गदरिया नदी पार होते .
ही आहे गदरिया नदी . नर्मदा मातेची हिचा संगम आपण पाहतो आहोत .
हिच्या पुढे चांदणी नावाची नदी आहे .तिचा आकार चांदणी सारखा असल्यामुळे हे नाव पडले असेल .नदीच्या काठावर झाडी आहे आणि समोरच सेठानी घाट आणि होशंगाबाद अर्थात नर्मदापुरम शहर आहे . या नदीच्या डाव्या बाजूच्या तटावर जे पांढऱ्या ठिपक्या सारखे दिसते आहे ते गुलजार घाटाचे राम मंदिर आहे .
गदरिया नदी ओलांडून पुढे आल्यावर तुम्ही गुलझारी किंवा गुंजारी घाटावर येता . अतिशय अप्रतिम असा हा घाट आहे .रामाचे एक सुंदर मंदिर इथे आहे .तुम्हाला अक्षरशः तुम्ही इतिहास काळामध्ये आहात असे वाटते ! इथे कोणीच नसते . अतिशय रम्य आणि शांत परिसर आहे .
या मंदिरांमधील प्रभू रामचंद्रांचे विग्रह .
समोरच्या तटावरून अर्थात नर्मदापुरम मधून पाहिल्यावर आपल्याला गुलजार घाटाचे राम मंदिर आणि चांदणी नदीचा नर्मदा मातेशी झालेला संगम असा रम्य दिसतो .
मंदिराची आणि घाटाची बांधणी अतिशय मजबूत आणि अप्रतिम आहे . महापुरामध्ये दरवर्षी हे मंदिर जलमग्न असते . परंतु मंदिर टिकून आहे .
या मंदिराच्या मागे सर्व अरण्य आहे . विंध्य पर्वतावरील हे अरण्य समोरच्या सेठानी घाटावरून असे दिसते .
मंदिरा मधील अप्रतिम कोरीव काम आणि रंगकाम ! दुर्दैवाने हे रंगकाम प्रतिवर्षी नवीन करावे लागते कारण मंदिर जलमग्न होते .
गुलझारी घाट आणि चांदणी नदीचा नर्मदा मातेशी झालेला संगम
घाटावरती कोणीच दिसत नव्हते . आता नदी पार कशी करावी असा विचार मी करत असताना दूरवर नर्मदा मातेतून एका डोंगावाल्याने मला हात केला . आणि थांब मी येतो आहे अशी खूण केली .
गुलझारी घाटावर याच ठिकाणी मला तो डोंगा मिळाला आणि ही खोल नदी मला पार करता आली . हा मनुष्य नर्मदा मातेच्या मधोमध मासेमारी करत होता . केवळ मला बघून तो मला सोडण्यापुरता काठावर आला आणि पुन्हा मासे धरायला निघून गेला . केवट समाज की जय हो ! हे लोक परिक्रमा वासींकडून खरंच पैसे घेत नाहीत . नदी पार करून थोडेसे अंतर काठाने चाललो .इथे काठाने चालताना मला मध्येच एक कुटी दिसली .ही एका बंगाली बाबांची झोपडी होती .वय बऱ्यापैकी जास्त होते . यांचे नाव एन सी अधिकारी . काही केल्या ते एनसी चा फुल फॉर्म मला सांगत नव्हते . मी खूप वेळा खोदून विचारल्यावर त्यांनी नेमाजी चंद अधिकारी असे त्यांचे नाव मला सांगितले . हे उच्च विद्या विभूषित बंगाली गृहस्थ होते .इथे शेजारीच एक छोटेसे काली मंदिर त्यांनी बनवले आहे . गुलझारी घाटाच्या आधी सुद्धा एक दुर्गा मंदिर आहे . हे जोपर्यंत बोलत नसत तोपर्यंत पाहणाऱ्या माणसाला यांचे चालणे वागणे हालचाली एखाद्या वयस्कर आजीबाई सारख्या वाटायच्या ! परंतु तोंड उघडल्याबरोबर खणखणीत पुरुषी आवाज बाहेर पडायचा ! तुळतुळीत दाढी केलेली असल्यामुळे काही कळायचे नाही .यांनी मला चहा पाजला . मी बसल्या बसल्या त्यांना काही बंगाली गाणी ऐकवली ! त्यांना मी बंगाली बोलतो आहे हे पाहून खूप आनंद झाला . इथे पुराचे पाणी येते . त्यामुळे भिंती खचल्या होत्या . उंदीर देखील त्रास द्यायचे . यांना मागेपुढे कोणी नव्हते . एकटेच या कुटीमध्ये राहायचे . अखंड साधनेमध्ये असायचे .

या चित्रामध्ये आपल्याला एनसी अधिकारी यांची कुटी दिसते आहे . त्यांच्यापुरता खाली नानासाठी नर्मदा माईमध्ये येण्याचा छोटासा घाट किंवा पायवाट आहे .कुटीची अवस्था फार चांगली नव्हती . जुनी व मळकट झाली होती .
.यांच्याकडे एक साधा फोन होता .त्याचा आवाज कमी यायचा . मी त्यांना त्या फोनच्या सगळ्या अडचणी सोडवून दिल्या .पूर्वाश्रमी हे मोठे विद्वान आणि मोठे अधिकारी असावेत असे त्यांच्याकडे पाहून जाणवत होते .परंतु कृतांतकटकमुळध्वजजरा अर्थात वार्धक्य दिसू लागल्यावर मनुष्य अतिशय हळवा ,भावनाप्रधान आणि असहाय होतो . याचा विचार प्रत्येक मनुष्यमात्राने करावा . कधी ना कधी आपल्यावर अशी वेळ येऊ शकते हे लक्षात ठेवून अंगामध्ये रग असताना प्रेमाने आनंदाने आणि कमीत कमी उन्माद करत जगावे हे उत्तम .आणि असे असाहाय्य वृद्ध समोर आल्यावर त्यांना तरुणपणाची आठवण करून देऊ नये .म्हाताऱ्या माणसाचे वागणे लहान मुलाप्रमाणे झालेले असते . त्यामुळे लहान मुलांना आपण जसे प्रेमाने गोड गोड बोलून गोडी गुलाबी ने समजावून सांगतो तसेच त्यांना देखील सांगावे . विशेषतः ८० च्या पुढे १०० वर्षाचे होईपर्यंत ज्येष्ठ नागरिकांचे वागणे वीस वर्षे ते शून्य वर्षे वयाच्या बाळाप्रमाणे होत जाते ! दरवर्षी एका वर्षाने ते लहान होत जातात ! असे डोक्यात ठेवून सेवा केली तर त्रास होत नाही . माझ्या आजीचा सुदैवाने मला भरपूर सहवास लाभला . त्या अनुभवावरूनच सांगतो आहे . असो .
इथे समोर नर्मदापुरमचा सेठानी घाट खूप सुंदर दिसायचा परंतु एक गंमत माझ्या लक्षात आली ! सेठानी घाटावर एक कारंजे लावलेले आहे जे दिवस रात्र चालू असते . सेठानी घाटावरून पाहिल्यावरती ते कारंजे नर्मदा मातेच्या मध्यभागी आहे असे वाटायचे . परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र ते कारंजे या काठापासून ९५ टक्के लांब आणि त्या काठावरून मात्र ५% लांब होते ! इथे नर्मदा मातेचे पात्र सुरेख आयताकृती आकारात वाहते आहे . पाच किलोमीटर लांबी आणि अर्धा एक किलो मीटर रुंदीचा हा सलग आयत असावा . इथले पाणी अत्यंत संथ असते . इथे एक मजेशीर योगायोग माझ्या लक्षात आला . समोरच्या नर्मदापुरम गावामध्ये मी असताना संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याशी माझा भ्रमणभाषावरून संवाद झाला होता . तो माझा परिक्रमेचा ४६ वा दिवस होता . आणि आजचा १४६ वा दिवस होता ! याचा अर्थ जबलपूरच्या उत्तर तटावरून परिक्रमा चालू केल्यास नर्मदापुरम चा दक्षिण तट ते पुन्हा नर्मदापुरम चा उत्तर तट असा प्रवास करण्यास शंभर दिवस लागतात !अर्थात त्यासाठी चालण्याचा सरासरी वेग साडेबावीस किलोमीटर प्रति दिवस पकडला आहे . ही परिक्रमेची योग्य गती आहे असे माझे स्पष्ट मत झाले आहे . याहून अधिक गतीने परिक्रमा करणे हिताचे नसते . त्यामुळे शारीरिक इजा होऊ शकतात . परिक्रमेमध्ये जेव्हा आपण चालतो तेव्हा सुरुवातीला काही दिवस चालण्याची सवय नसल्यामुळे पायाचे सर्व स्नायू दुखावतात किंवा तुटतात . विश्रांती घेताना ते दुरुस्त केले जातात . त्यासाठी शरीरातली सर्व चरबी खर्ची घातली जाते . परंतु काही दिवसातच चरबी संपून जाते मग शरीर स्नायू खायला सुरुवात करते . एक काळ असा येतो की पुरेसे स्नायू देखील पुरत नाहीत त्यानंतर मात्र तुमच्या हाडातील पोकळीमध्ये साठलेले द्रव वापरले जाते . आणि त्यामुळे तुमची बोंड डेन्सिटी किंवा अस्थि घनता कमी होऊ लागते . तुम्हाला वजन कमी झाल्यामुळे हलकेफुलके वाटत असते परंतु प्रत्यक्षामध्ये तुमचे शरीर नाजूक झालेले असते . कारण हाडांची ताकद कमी होत असते . अशावेळी हाडांमध्ये छोटे छोटे तडे किंवा हेअर लाईन क्रॅक जाण्याची शक्यता असते .हे टाळण्यासाठी सरासरी गती २०-२२ ठेवावी हे उत्तम . मध्येच काही दिवसांनी एक दोन दिवस विनाकारण विश्रांती घ्यावी . असे केल्यामुळे शरीराला झीज भरून काढण्यास सवड मिळते .नाहीतर उतार वयामध्ये परिक्रमा करताना झालेली झीज भरून येण्यास फार मोठा कालावधी लागू शकतो . मी अनेक उदाहरणे माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत त्यामुळे हे अनुभवातून सांगतो आहे . मी स्वतः इतक्या कमी गतीने चालून देखील परिक्रमा संपल्यावर माझी अस्थि घनता व स्नायू घनता कमी झालेली होती . मग दिवसाला ४० -४० , ५०-५० किलोमीटर चालणाऱ्यांचे काय होईल विचार करून पहा !असो . इथे पुढे जोशीपूर गावाचा घाट लागतो जिथे हनुमान मंदिर व राम मंदिर आहे .महाकवी तुलसीदासांची अतिशय सुंदर मूर्ती या मंदिरामध्ये पूजेमध्ये ठेवलेली आहे . इथे मला एक गुटगुटीत मनुष्य भेटला . याची दोन्ही मुले नागपूरला शिकायला ठेवलेली होती . मुले देखील गुटगुटीत आणि गोड होती ! नैतिक आणि त्याची बहीण असे दोघे होते . दोघांना परिक्रमे विषयी खूप साऱ्या शंका होत्या .मी त्यांना म्हणालो तुम्हाला जे काही विचारायचे ते विचारा . आणि मुलांनी माझ्यावर प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती चालू केली ! लहान मुलांना परिक्रमेविषयी किती कुतुहल असते आणि त्यांना काय काय प्रकारचे प्रश्न पडू शकतात हे पाहून मला आश्चर्य देखील वाटले आणि मौज देखील वाटली! विशेषतः नैतिक याला खाण्यापिण्याची आवड असल्यामुळे त्याचे सर्व प्रश्न खाण्यापिण्याच्या संदर्भातले होते ! मला फार हसू आले . जयास ज्याचे चिंतन । तयास तेची प्राप्त ।
इथे नैतिक च्या बहिणीने आमच्या तिघांचे फोटो काढले . आठवण म्हणून मी ते माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवायला त्यांना सांगितले .
हा आहे नागपूर येथे शिकण्यासाठी राहणारा परंतु मूळचा नर्मदापुरम येथील रहिवासी नैतिक आणि त्याचे बाबा . मागे दिसतो आहे तो नर्मदापुरम शहराचा घाट आहे . सेठानी घाट व अन्य घाट दिसत आहेत .
आपण उभे आहोत तो जोशीपुर घाट आहे . इथे आता मोठी अक्षरे लावण्यात आलेली आहेत . मी गेलो तेव्हा त्या घाटाचे काम पूर्ण नव्हते . इथून नर्मदा मातेचे विस्तीर्ण पात्र आणि समोरचा घाट परिसर खूप सुंदर दिसतो !
नैतिक सोबत काढलेला अजून एक फोटो ! विषय निघालाच आहे म्हणून सांगतो . अलीकडे आपल्या मुलांची काहीतरी हटके नावे ठेवण्याची एक नवीन फॅशन आलेली आहे ! पूर्वी जशी अनिल सुनील महेश गणेश अशी नावे असायची तशी आता छोटी परंतु हटके आणि विशेषतः संस्कृत भाषेतील वाटावीत अशी नावे ठेवण्याची एक नवीनच पद्धत समाजात रूढ होते आहे .त्यातून अशी नावे सुचतात ! मला कोणाला दुखवायचं नाही . परंतु माझे सांगणे इतकेच आहे की नाव ठेवण्यापूर्वी त्याचा नीट अर्थ शोधून काढावा .नावे सुचवणाऱ्या वेबसाईटवरील अर्थ ग्राह्य न धरता खरोखरीच संस्कृत भाषेचा अभ्यास असलेला एखादा पंडित गाठून त्याच्याकडून अर्थ समजून घ्यावा . आणि मगच मुलाचे किंवा मुलीचे नाव ठेवावे . अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो !
आता इथेच घडलेला एक अनुभव सांगतो ! पहिल्या मुलाचे नाव काय असे मी विचारल्यावर बाप म्हणाला नैतिक . आता दुसऱ्याचे नाव काय असे विचारताना आपोआप मला गालातल्या गालात हसू आले !आणि ते त्या बापाने पकडले व मला म्हणाला सर्वजण असेच हसतात ! स्वाभाविक आहे ना ! आपल्या मेंदूची जडणघडणच अशी झालेली असते की शब्द हे संदर्भाने लक्षात ठेवले जातात . अशीच काही नावे रुढ झालेली आहे ज्यांना काही अर्थ नसतो . किंबहुना ती संस्कृत भाषेमधील देखील असतात असे नव्हे . किंवा कधी कधी संस्कृत भाषेमध्ये त्या शब्दाचा अर्थ अतिशय वेगळाच असतो .उदाहरणार्थ श्लेष्मा , मायरा , समायरा , द्रविन , इरा , अवीर , अन्वित , इवान , अद्विक , अनाया , अमाया , अकीरा , अविष्का ,अनुष्का , तनिष , आलिया , कियारा , शनाया , आहान , निवान , अर्हान , आवान , आलान , जिया , लारा , अनाहिता , विकी , सनी , पिंकी , रिंकु , परी , बबलू , इशान्वी , नियान , रिया , इयान , झिशान , नियांश , मिखिल , यायीन , झोया , रीना , करीना , हृतीक , नायरा , साश्विका , वेदिका , क्रितिका , क्रीषा , सायेशा ,आविषा ,युविका ,तिशा ,प्रिशा , अन्वी ,आर्यव ,वियन ,आव्यान ,रायन ,आर्यव , रिवान, द्रविन, काविश, शौर्यांश, तविष, आव्यान, क्रिशा, आयांश, वेदांतिका, कियांशी, युविका, आन्वी, प्रिशान्वी, सायेशा, नोरा, कीयन, आर्यन, तिशा, आर्वि, रूहान, क्रिसा, अविषा, सैव, युग, रूहि, आयरा, वियन, वृशिका बापरे बापरे बाप !
यादी काढली तर फार लांबत जाईल . आपल्या घरातील कोणाचे नाव वरीलपैकी असेल तर कृपया राग मानू नये .माझ्या सांगण्याचा भावार्थ लक्षात घ्यावा . ही नावे ऐकायला छान वाटतात परंतु या नावांची गंमत अशी आहे की ऐकायला हे शब्द संस्कृत वाटले तरी संस्कृत भाषेमध्ये एकतर हे शब्द नाहीत किंवा त्यांचा अर्थ अतिशय विचित्र आहे जो नाव म्हणून वापरण्याच्या योग्यतेचा नाही ! किंबहुना कुठल्यातरी प्रसिद्ध पात्रावरून आपल्या मुलाचे किंवा मुलीचे नाव ठेवण्याची एक स्वाभाविक ओढ पालकांना असते . ज्या व्यक्तीचे नाव ठेवले आहे तसे आपले मूल व्हावे अशी स्वाभाविक अपेक्षा पालकांना असते . परंतु त्यातून अशा गमतीशीर चुका घडतात .आपल्याला एक विनंती आहे . आपल्या घरामध्ये किंवा परिचयामध्ये असे चित्रविचित्र नावाचे एखादे मूल किंवा नातवंड असेल आणि घरातील सर्वांना खात्री पटली असेल की हे नाव फारसे योग्य अर्थाचे नाही तर कृपा करून लवकरात लवकर सरकारी कागदपत्र करून त्याचे नाव बदलून टाकावे व एखादे सुंदर भारतीय नाव ठेवावे ! कारण पुढे आयुष्यभर त्या व्यक्तीला त्याचे नाव सर्वत्र सांगावे लागते . तेव्हा ते मूल चेष्टे चे विषय होऊ नये . बेटर लेट दॅन नेव्हर ! असो . कल्पना करून पहा . केवळ नर्मदा परिक्रमे विषयी लिखाण करताना आपली इतकी विषयांतर होते ! तर प्रत्यक्ष नर्मदेच्या काठी चालताना आपले मन कुठे कुठे भरकटत असेल !मग त्याला तळ्यावर आणायला सतत नर्मदा मातेचे नामस्मरण हा एकमेव खात्रीशीर उपाय आहे !नर्मदे हर ! हर हर नर्मदे !असे सतत म्हणत राहायचे . म्हणजे आपण परिक्रमे मध्ये आहोत याची जाणीव होते .आपण या घाटाची आणि मंदिराची एक छोटीशी चक्कर आता मारूयात .

जोशीपूर घाटाचे बांधकाम व्हायचे होते तेव्हा हा घाट असा होता .
इथे असलेले हनुमानजी आणि रामजी चे मंदिर आपल्याला दिसते आहे तसेच जुना घाट दिसतो आहे .
आता नवीन घाट खूप सुंदर पद्धतीने निर्माण करण्यात आलेला आहे .मी गेलो तेव्हा याचे काम चालले होते .
या घाटावर आता जोशीपुर घाट अशी मोठी अक्षरे लावलेली आहेत आणि ती समोरच्या घाटावरून सुद्धा दिसतात .
दगडांची बांध-बंधिस्ती करून महापुरापासून हा किनारा सुरक्षित राहील अशी काळजी घेण्यात आली आहे
हे इच्छापूर्ती महादेवांचे मंदिर आहे
राम मंदिरातील राम मूर्ती आणि विशेषतः तुलसीदासांची मूर्ती खूप छान आहे .त्यांचा चेहरा आणि डोळे बोलके आहेत . असे वाटते की आता तुलसी रामायणातली एखादी चौपाई ऐकवतील !
लाल खुणे ने दाखवलेले बंगाली बाबांचे स्थान आहे . तिथून काठाने गेल्यावर राम मंदिर पुढे आहे हे आपल्याला चित्रात लक्षात येईल .
इथे किनाऱ्यावर वाळूचा किती प्रचंड साठा आहे हे आपल्याला उपग्रह नकाशात लक्षात येते आणि त्याचबरोबर नर्मदा मातेची खोली देखील लक्षात येते !
हा वाळू साठा अतिप्रचंड असून कित्येक यंत्रे लावून तो दिवस रात्र उपासला जात आहे तरी देखील तो जरा देखील हलत नाही हे आपल्याला या चित्रात लक्षात येईल .
इथून पुढे बगवाडा नावाचे गाव होते ते पार करत पुन्हा काठाकाठाने चालत राहिलो . या भागात वाळू उपसण्याचा धंदा इतका प्रचंड प्रमाणात चालू आहे की आपण कल्पना करू शकत नाही .नर्मदापुरम हे शहर अतिशय वेगाने विकसित होत असल्यामुळे इथे प्रचंड बांधकामे सुरू आहेत आणि वाळूची वाढीव गरज निर्माण झालेली आहे . तिची पूर्तता करता करता दिवस रात्र इथे गाड्या पळतात .मला विशेष गंमत तेव्हा वाटली जेव्हा नर्मदा मातेच्या पाण्याच्या अगदी पातळीवर असलेल्या वाळूवरून वेगाने ट्रॅक्टर धावतात तेव्हा दुरून पाहिल्यावर असे वाटते की हे ट्रॅक्टर पाण्यावरून धावत आहेत ! हे दृश्य मोठे मजेशीर असते .
मी एका यवनाची जिरवली होती ते उद्यान समोर मला दिसत होते .या संपूर्ण मार्गावर पुलाखाली थोडीशी सावली मिळाली तेवढीच सावली होती ! बाकी रणरणत्या उन्हातून चालावे लागले .तापलेल्या वाळूमुळे अंगाची लाहीलाही होत होती . पुढे बांद्रा भान घाट येतो .
बांद्राभानच्या घाटावर असे सुंदर मंदिर आहे आणि नर्मदा मातेमध्ये सर्व खडक आहेत .
इथेच शंकराचार्यांचे देखील मंदिर आहे .
बांद्राभान येथून होणारे नर्मदा मातेचे सुंदर दर्शन . हा तवा नदी आणि नर्मदा मातेचा भव्य संगम परिसर आहे
संगमावरती अधिक प्रकारचे मासे मिळतात त्यामुळे इथले पक्षी जीवन खूप समृद्ध आहे . विविध प्रकारचे बगळे इथं पाहायला मिळतात
खंड्याच्या सर्व जाती नर्मदा खंडात दिसतात .
संध्याकाळी आपापल्या सारंगागाराकडे अर्थात घरट्यांकडे जाणारे पक्षी पाहिले की खूप भारी वाटते ! पक्षी या विशिष्ट आकारात का उडतात याचे कारण सर्वांना माहिती असेलच परंतु पुन्हा एकदा सांगून ठेवतो . शक्यतो स्थलांतर करणारे जे पक्षी असतात ते अशा फॉर्मेशन मध्ये किंवा आकारामध्ये उडतात .याचे कारण त्यांना खूप लांबचे अंतर तोडायचे असते . अशा आकारामध्ये उडले तर सर्वात प्रथम जो पक्षी उडतो त्याला हवा कापायला सगळ्यात जास्त शक्ती लागते परंतु त्याने कापलेल्या हवेवर स्वार होऊन मागचे पक्षी उडतात . आणि ही प्रथम क्रमांकाची जागा आळीपाळीने बदलण्याचे काम हे पक्षी बेमालूम पणे आणि नियमित पणे करत असतात . आपण थोडेसे निरीक्षण केले तर आपल्याला हे सहज घडताना दिसते .
मासे भरपूर असल्यामुळे मच्छीमारही मोठ्या प्रमाणात दिसतात .
इथे मला शिवनेरी नावाचे एक फार्म हाऊस किंवा साधना स्थळ दिसले . कुणीतरी रसिक मराठी मनुष्य इथे राहत आहे हे पाहून बरे वाटले .

त्यांच्या बंगल्यातील हे केवटाचे शिल्प मला विशेष आवडले .
आपण मागच्या वेळेस पाहिले त्याप्रमाणे नर्मदा मातेमध्ये येणारी सर्व वाळू ही तवा नदी आणून सोडते .नर्मदा मातेमध्ये वाळू आहे परंतु तिचे प्रमाण फारच कमी आहे . या चित्रामध्ये आपल्याला तवा नदीने आणलेली वाळू दिसते आहे . पुढची अनेक वर्षे वाळू उपसली तरी न संपणारी वाळू या तवा नदीने धारण केलेली आहे !
बांद्रा भान घाटाच्या अलीकडे भार्गव आश्रम आहे . त्यानंतर बांद्राभान चा सुंदर घाट लागतो . या घाटावर कायम गर्दी असते . कारण गाडी घाटापर्यंत येते . तसेच बांद्राभानच्या अलीकडे पूल देखील आहे . त्यामुळे खूप लोक स्थानासाठी इथे येतात . तवा नदीच्या बाजूने स्नानासाठी येण्यासाठी किमान एक किलोमीटर वाळू तुडवावी लागते . त्यापेक्षा बांद्रा भान येथील खडकाळ भागातील स्नान लोकांना सोयीचे वाटते .
बांद्राभान घाटापाशी एक सुंदर भौगोलिक दृश्य पाहायला मिळते . विंध्य पर्वतावरील वन्य जीवन सातपुडा पर्वतरांगेकडे जाण्यासाठी या नैसर्गिक पुलाचा वापर करते ! आपण जर वरील चित्रात बारकाईने पाहिले तर आपल्याला वर्षानुवर्षे वन्यजीवन या भागातून त्या भागात गेल्यामुळे तयार झालेला मातीचा पूल दिसेल ! हा संपूर्ण परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करावा असे मला वाटते . कारण दोन्ही तटावरची महत्त्वाची अभयारण्य जोडण्याचे काम हा सेतू करतो आहे .
तवा नदी नर्मदा मातेला मिळण्यापूर्वी किती मोठा द्राविडी प्राणायाम करते ते आपल्याला या चित्रात दिसेल .
बांद्रा भान घाट म्हटले की आजही मला ही दोन अर्जुन साल वृक्षाची झाडे आठवतात ! हा घाट आणि ही झाडे असे समीकरणच जणू झालेले आहे !
झाडे अतिशय मोठी आणि सुंदर आहेत .आजूबाजूला सर्वत्र खडकाळ प्रदेश आहे .मी गेलो तेव्हा या झाडांच्या सावलीमध्ये आणि खडकांवर अनेक माणसे बसली होती आणि ती सर्वजण माझ्याकडे पाहत होती ! कारण मी ज्या काठावरील मार्गाने आलो त्या मार्गाने सहसा कोणी परिक्रमा वासी जात नाहीत . रस्ता इथून शेजारीच आहे .
समोर दिसणारा घाट म्हणजे बांद्रा भान चा घाट असून त्यामागे दिसणारे पर्वत हे विंध्य पर्वताचे शेवटचे टोक आहे . इथे समृद्ध वनजीवन आहे . हा फोटो तवा नदीच्या बाजूने काढलेला आहे .
अर्जुन साल वृक्षांच्या खाली बसल्यावर नर्मदा मातेचे खूप सुंदर दर्शन होते !
या भागातील नका काहीशा अशा आहेत .
काठाने चालताना नर्मदा माता अगदी अशी दिसते ! बरेचदा आपले पाय गुडघ्यापर्यंत नर्मदा मातेच्या जलाने भिजलेले असतात .हे चित्र याच भागातील आहे .
इथे जहानपूर नावाच्या गावामध्ये ओशो मौलश्री कमीऊन नावाचा ओशो आश्रम आहे . यानंतर आपण हिरानी गाव पार करतो . मी या भागातून चालताना तिथे विजेचे मनोरे उभे करून त्यावरून तारा खेचण्याचे काम चालू होते . अशा प्रत्येक मनोऱ्या खाली पाच पाच जीप गाड्या आणि भरपूर लोक उभे होते . तारे खालून चालताना फार जपून चालावे लागले .
यानंतर आपल्यासमोर येतो तो शहागंज या गावातील सिधी घाट . घाटावर राम मंदिर आणि शिवमंदिर आहे .
स्नानासाठी हा घाट अत्यंत उत्तम आहे !
वरच्या बाजूला नर्मदा परिक्रमावासींसाठी एक आश्रम बांधण्यात आलेला आहे . हा खरे म्हणजे सुषमा स्वराज यांचा विदिशा मतदारसंघ येतो . इथले सर्वेसर्वा डॉक्टर अशोक भार्गव म्हणून आहेत जे भारतीय जनता पक्षाचे खासदार व केंद्रीय मंत्री रमाकांत भार्गव यांचे बंधू होत . या आश्रमाची व्यवस्था यांचे वडील म्हणजेच रमाकांत यांचे काका पाहत होते .
स्वर्गीय सुषमा स्वराज
माजी केंद्रीय मंत्री रमाकांत भार्गव
शहागंज येथे निवासस्थान असल्यामुळे इथली परिक्रमावासींची सेवा डॉक्टर अशोक भार्गव हे रमाकांत भार्गव यांचे बंधू करत आहेत . २०१५ मध्ये सुषमा स्वराज यांनी खासदार निधीतील २२लाख रुपये खर्च करून ही धर्मशाळा बांधलेली होती . समोर विनाकारण एक मशीद बांधण्यात आलेली होती .
हा आश्रम अतिशय शांत आणि रम्य होता . इथे एक ईशान्य भारतातील साधू परिक्रमेसाठी येऊन राहिलेला होता . आसामचा हा बालब्रह्मचारी अतिशय तेजस्वी आणि करारी होता . याखेरीज रविकांत पाटील नावाचा एक गुजराती सद्गगृहस्थ परिक्रमेमध्ये होता , जो दिसायला हुबेहूब साधू होता परंतु साधू नसल्याचे तो स्वतः सांगायचा . वागणे चालणे बोलणे राहणे मात्र हुबेहूब एखाद्या साधूला साजेसे होते . हे दोघेही चातुर्मासासाठी इथेच थांबणार असे ठरलेले होते त्यामुळे निवांत होते . रविकांत पाटील कडे भरपूर सामान होते आणि तो अतिशय स्वच्छ कपडे घालायचा . त्याला मराठी अजिबात येत नव्हते . गंमत म्हणजे गुजराती असून पटेल आडनाव न लावता पाटील आडनावच तो लावायचा . हा हुशार होता . शंख फुंकायच्या ऐवजी त्याने पीव्हीसी पाईप चा एक कर्णा बनवला होता तो हा फुंकायचा ! अगदी शंखासारखाच आवाज यायचा . आणि फुटण्याची भीती नाही ! मी जाऊन सर्व मंदिरांची दर्शने करून आलो . मला असे जाणवले की या घाटावरील पाणी चिखल युक्त पण वेगवान आहे . रात्री दोघा परिक्रमा वासीं सोबत खूप छान सत्संग झाला . भोजन प्रसादी घेऊन शांतपणे झोपी गेलो . सकाळी उठल्यावर इथून पुन्हा एकदा किनारा पकडला आणि बनेटा नावाच्या गावात आलो . या भागातील बऱ्याच गावांची नावे ब या अक्षरापासून चालू होणारी आहेत ! इथून पुढे नर्मदा मातेचे रूप अचानक पालटते आणि दोन मोठी वळणे घेत ती वाहू लागते ! आकाशातून पाहिल्यावर हा धनुष्याचा आकार दिसतो म्हणून या संपूर्ण आकाराला धनुष्य घाट असे म्हणायची पद्धत आहे ! या धनुष्य घाटाची सुरुवात बनेटा गावापासून होते ! हा घाट नसून खूप मोठा भूप्रदेश आहे . नर्मदा माता तिची अशी असंख्य रूपे आपल्याला परिक्रमेमध्ये दाखवते . आणि सांगते की बघ बाळा कशीही परिस्थिती आली तरी मी न थांबता न थकता वाहतेच आहे ! खडकाळ भाग येवो किंवा वाळूचा अडथळे येवोत किंवा धरण आडवे येवो किंवा खोल दऱ्या खोऱ्या येवोत . मी थांबत नाही . थकत नाही . झुकत नाही . आटत नाही . वाहतच राहते ! वाहतच राहते ! तू देखील असेच कर ! कितीही संकटे येऊ देत ! कितीही आपत्ती येऊ देत . कितीही मोठी आजारपणे येऊ देत . कितीही मोठे कर्ज डोक्यावर असू दे . कितीही अडथळे आडवे येऊ देत .कितीही कष्ट करावे लागू देत . तू थांबू नकोस .झुकू नकोस . कोणाचे ऐकू नकोस .फक्त पुढे पुढे चालत राहा ! चरैवेति चरैवेति !
लेखांक एकशे अठ्ठावन्न समाप्त (क्रमशः )
नर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवा