लेखांक १५७ : बीजासन मातेचे सलकनपूर शक्तीपीठ , उत्तम स्वामींचा आश्रम आणि जन्मदिनी रेवास्नान

आंवरी घाट सोडला आणि डांबरी सडकेने सलग १० -११ किमी चालत सलकनपूर गाव गाठले .अखंड भारतवर्षात पसरलेल्या  देवीच्या ५२ शक्तिपीठांपैकी हे एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते .ज्यांना आपली कुलस्वामिनी माहिती नाही त्यांची कुलस्वामिनी सलकनपुर ची बिजासनी माता असते अशी मान्यता आहे . रक्तबीज नावाच्या राक्षसाचा वध केल्यावर देवांनी देवीचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी तिला विंध्य पर्वतातील या शेवटच्या शिखरावर आसन दिले . म्हणून तिचे नाव विजयासनी माता किंवा बिजासनी माता किंवा विंध्यवासिनी माता असे पडले ! आठशे ते हजार फूट उंचीच्या डोंगरावर वसलेले हे रम्य ठिकाण अतिशय सुंदर आहे . इथे वर जाण्यासाठी १४०६ पायऱ्यांचा रस्ता आहे . उत्तम दर्जाचा गाडी रस्ता देखील बनवला आहे . आणि रज्जू मार्ग अर्थात रोपवे देखील आहे . मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील रेहटी तालुक्यामध्ये हे स्थान येथे . बाकी हा संपूर्ण डोंगर जंगलाने व्यापलेला आहे आणि इथे वन्यपशूंना अभय आहे . हे स्थान नर्मदा मातेच्या काठावर नाही याची कृपया नोंद घ्यावी . परंतु शक्तीपीठ असल्यामुळे बहुतांश परिक्रमावासी इथे दर्शनासाठी जातात . मला एका साधूने सांगितल्यामुळे मी बिजासनी मातेचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला . मी जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा उडन खटोला चालू होता आणि त्याचे शंभर रुपये तिकीट होते .शेवटची फेरी माझ्यासमोर गेली . परंतु ते देखील एक प्रकारचे वाहनच आहे त्यामुळे मी उडन खटोला वापरायचा नाही असे ठरवले . इथे खाली मोठेच शहर वसलेले असून उडन खटोला जिथून चालू होतो तिथे देवस्थानचे कार्यालय आणि भरपूर मोठी निवास तसेच गाडीतळ व्यवस्था आहे . संस्थानच्या टाटा सुमो गाड्या वर खाली करून भाविकांची ने आण करतात ते ७० रुपये तिकीट लावतात . मी नंतर परिक्रमा झाल्यावर पुन्हा एकदा गाडीने घाटातून वर जाऊन आलेलो आहे . हा घाट अतिशय सुंदर आहे . रस्त्याचा दर्जा अप्रतिम आहे .मागील लेखामध्ये आपण पाहिले त्याप्रमाणे इथे वैशाख कृष्ण एकादशी ते अमावस्या अशी चालणारी पंचकोशी परिक्रमा सुरू झालेली होती त्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी इथे होती . बरेचसे परिक्रमावासी बिजासनी मातेचे दर्शन घेऊनच ही परिक्रमा चालू करायचे . इथे सुदैवाने सामान ठेवण्याची सोय होती . त्यामुळे मी झोळी खाली ठेवली . मैय्या ची थैली उचलली आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली . थोड्या वेळाने मला असे वाटले की परिक्रमेमध्ये मी माझ्या झोळीला अंतर दिले नाही पाहिजे .  आणि मी प्रचंड वजनाची म्हणजे सुमारे २५ किलो वजनाची ती झोळी उचलून पायऱ्यांपाशी आलो . दहा-पंधरा पायऱ्या चढलो आणि मला अचानक जोश आला ! मी अक्षरशः एका दमात एका संथ परंतु सातत्यपूर्ण गतीने १४०६ पायऱ्या चढून वर पोहोचलो ! हे अंतर मी केवळ पंधरा ते वीस मिनिटात कापले. हे आयुष्यात परत कधीच जमेल असे वाटत नाही . परंतु परिक्रमेच्या काळात नर्मदा माई तुम्हाला कुठली शक्ती देते हेच लक्षात येत नाही ! देते हे मात्र खरे !माझ्यासोबत ज्यांनी चढायला सुरुवात केली होती ते लोक बऱ्याच वेळाने वरती आल्यावर मला भेटले . त्यांनी तिथे माझा एक फोटो देखील काढला . इथे डोंगराच्या खाली हेलिपॅड बनवलेले आहे . शिवराज सिंह चौहान यांच्या मतदारसंघांमध्ये हे ठिकाण येत असल्यामुळे त्यांनी करोडो रुपये खर्च करून या भागाचा आणि क्षेत्राचा विकास केलेला आहे .त्यांनी केवळ सलकनपूरच्या मंदिराच्या नूतनीकरणासाठी सुमारे ४४ कोटी रुपये मंजूर केले होते.

मार्गाने चढताना वाटेमध्ये शेकडो दुकाने आहेत .दुकानदार चढणाऱ्या लोकांना आवाज देतात . काहीतरी खरेदी करा म्हणून गळ घालतात . मला बऱ्याच दुकानदारांनी नर्मदे हर असा आवाज दिला . खरं म्हणजे तीच माझी वर चढण्याची ऊर्जा होती ! नाहीतर दिवसभर उन्हातानातून चालल्यावर एवढी शक्ती येणे अशक्यच आहे ! परंतु आपल्याला आपल्या क्षमतांची नव्याने ओळख करून देणे हाच नर्मदा मातेचा हेतू असल्यावर दुसरे काय होणार ! बरेचदा आपल्याला आपल्या क्षमतांची कल्पनाच नसते . आपण नेहमी क्षमतेपेक्षा अलीकडेच स्वतःला गणत असतो . परंतु आपली खरी क्षमता तुम्हाला नर्मदा परिक्रमेमध्ये कळते . वरती गेलो आणि भव्य मंदिर पाहून डोळे दिपले ! बिजासनी मातेची मूर्ती मधोमध आहे आणि खूप मोठा गाभारा आहे . समोर फार मोठे सभागृह आहे . तिथे कितीही लोक आरामात बसू शकतात . मी रांगेत थांबून मूर्तीचे दर्शन घेतले .पुजाऱ्यांना काय वाटले काय माहिती . त्यांनी देवीच्या अंगावरील एक मोठे लाल तलम वस्त्र काढले आणि माझ्या गळ्यात घातले . तसेच प्रसाद म्हणून काही फळे मला दिली . देवीच्या विग्रहामध्ये जबरदस्त ऊर्जा होती जी क्षणाक्षणाला जाणवत होती . वस्त्रामुळे ती ऊर्जा माझ्यासोबतच आली ! दर्शनामुळे मन सुखावले !

सलकनपूरच्या देवीचे हेच ते अंगवस्त्र ! 


महाराज दे अंगीचे वस्त्र आता । बहुजीर्ण झाली देह बुद्धी कंथा ॥

शक्ती पिठाचा परिसर फिरून पाहिला . इथे भरपूर विकास कामे केली होती व करण्याचे काम सुरू होते . वर निवासाची व्यवस्था अजिबात नाही . वनक्षेत्र असल्यामुळे सर्वांना खाली उतरावे लागते . खाली मात्र मोठी धर्मशाळा आहे . दर्शन घेऊन मी परत उतरू लागलो तेव्हा माझ्यासोबत चढायला सुरुवात केलेले लोक वर येताना दिसले . त्यांच्याशी थोडे बोललो . त्यांनी राजगिरा लाडू घेऊन दिले .उपासाचे काम झाले ! फळे आणि राजगिरा लाडू ! आणि माझ्यासोबत फोटो काढले . मी मित्राचा क्रमांक त्यांना देऊन फोटो पाठवायला सांगितले . 

सलकनपूरच्या शिखरावर पोहोचल्यावर काढलेला हाच तो फोटो . डावीकडे दिसताहेत ते राजगिरा लाडू नंतर मला मिळाले .

आता थोडेसे सलकनपूरच्या परिसराचे दर्शन करूयात . अर्थातच त्यासाठी गुगलवर मिळणाऱ्या छायाचित्रांचा आधार घ्यावा लागणार आहे . 

नर्मदा मातेवर असलेल्या आवली घाटापासून सलकनपूर हे साधारण इतके लांब आहे . विंध्य पर्वतातील एक शेवटची पर्वत शृंखला इथे आपल्याला पाहायला मिळते .
या परिसरामध्ये इतके घनदाट अरण्य आहे की विचारता सोय नाही !
सलकनपूरच्या आसपासच्या सर्व डोंगरांवर प्रचंड झाडी आहे . बाणाने दाखवलेल्या शिखरावर मंदिर आहे .
या चित्रामध्ये आपल्याला सलकनपूरच्या पर्वताच्या पायथ्याशी असलेले कार्यालय धर्मशाळा झील वगैरे दिसत आहे . इथेच महामार्गावर हेलीपॅड सुद्धा आहे . उडनखटोला इथूनच चालू होतो .वरती चढण्याचा पायऱ्यांचा मार्ग आणि वरचे मंदिर दिसते आहे .उजवीकडे जंगलातून गाडी रस्ता देखील गेलेला दिसतो आहे .
हे मंदिर प्रांगणाचे मुख्य प्रवेशद्वार आहे .
मंदिर परिसरामध्ये खूप सुंदर विकास करण्यात आलेला असून हा जिना लक्षात राहतो . सडक मार्गाने ने येणारे लोक इथून खाली उतरतात .
खालील महाद्वार देखील भव्य दिव्य आहे . विजयासन द्वार असे त्याचे नाव आहे .
ही खालच्या बाजूला असलेली धर्मशाळा आहे . इथे राहण्यासाठी उत्तम खोल्यांची व्यवस्था आहे . मोफत राहायचे असल्यास एका मोठ्या सभागृहात झोपता येते . 
वरती असलेल्या खोल्या सुशुल्क असून कोपऱ्यामध्ये स्वच्छतागृहे आहेत . डावीकडे दिसणाऱ्या मोकळ्या जागेत आणि प्रांगणामध्ये मोफत झोपू इच्छिणारे भाविक झोपतात .  मी इथे गेलो तेव्हा पंचकोशी परिक्रमाची प्रचंड गर्दी असल्यामुळे एका झाडाखाली काही काळ पडलो होतो.परंतु गर्दी आणि गडबड गोंधळ पाहून इथून पुढे निघण्याचा निर्णय मला घ्यावा लागला होता .
इथे सुंदर असे उद्यान निर्माण करण्यात आलेले आहे .
उद्यानाच्या मागच्या बाजूला असा सुंदर रमणीय परिसर आहे .
इथेच एक मोठा तलाव देखील बांधण्यात आलेला आहे .
तलावाच्या जवळच उडन खटोला आहे .
बिजासनी मातेचे मंदिर अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर आहे .
हे बिजासनी मातेचे गर्भगृह असून ते किती रुंद आहे हे आपल्याला पाहता क्षणी लक्षात येईल !
मंदिर परिसरामध्ये अशा अनेक भव्य दिव्य वास्तू आहेत .
हे मंदिर वगळता सर्वत्र घनदाट अरण्य आहे !
विशेषतः रज्जू मार्गाने जाताना अरण्याचे विहंगम दर्शन होते .
झाडी चांगली असल्यामुळे पावसाळ्यामध्ये इथे पाण्याचे प्रमाण खूप असते . आणि पर्यटकांसाठी हा संपूर्ण परिसर स्वर्ग बनून जातो .
सडक मार्गाने आल्यावर हा जिना लागतो आणि आपण समोर असलेल्या मंदिरामध्ये येतो .
चला तर मग विंध्यवासिनी किंवा विजयासनी किंवा बिजासनी मातेचे दर्शन घेऊयात आणि धन्य होऊयात !
आकाशातून पाहिल्यावर मंदिर परिसर असा दिसतो .
इथून दिसणारे सुखद अरण्य दृश्य डोळ्यांना आनंददायी आहे ! अशी अरण्ये भारतात सर्वत्र पुन्हा उभी रहावीत असे फार वाटते !
या संपूर्ण परिसराच्या विकासाचे श्रेय मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांना भाविकांनी मिळून दिलेले दिसते !
एका बाजूला नजर जाईल तिथपर्यंत अरण्य आहे तर दुसऱ्या बाजूला नर्मदा मातेपर्यंत पसरलेली हिरवीगार शेती दिसते ! वातावरण चांगले असेल तर नर्मदा मातेचे सुंदर दर्शन इथून होते !
इथे येऊन विशेष अनुभवण्यासारखी गोष्ट म्हणजे इथून दिसणारा सूर्यास्त ! मी देखील हा अनुभवला आणि धन्य झालो !

मंदिराचे सभागृह अतिशय मोठे असल्यामुळे इथे बराच वेळ बसलो होतो .अगदी देवीच्या समोर सरळ रेषेत बसलो आणि तिच्याकडून येणाऱ्या स्पंदनां मध्ये न्हाऊन निघण्याचा आनंद घेत राहिलो ! 

जिन्याने उतरत जेव्हा मी खालच्या धर्म शाळेमध्ये आलो तेव्हा तिथे दृश्य पाहून मला मौज वाटली ! अक्षरशः शेकडो भाविक पंचकोशी परिक्रमा करण्यासाठी आले होते व त्यांनी येताना सोबत बकऱ्या कोंबडे वगैरे देखील सर्व सामान आणलेले होते !सर्वत्र लेकी बाळी मुले बाळे आणि बकऱ्या कोंबड्या यांचा गोंधळ चालला होता ! साधकासाठी असे वातावरण हिताचे नसते . त्यामुळे शांतपणे एका झाडाखाली पडून झोप लागते का हे मी पाहिले आणि झोप लागत नाही असे लक्षात आल्यावर तिथून काढता पाय घेतला . इथून जवळच उत्तम स्वामींचा आश्रम आहे असे माझ्या कानावर आलेले होते . आश्रम इथून फक्त एक किलोमीटर अंतरावरती होता . तिथे जाण्यासाठी निघालो . तत्पूर्वी मी येथे सुंदर स्नान केलेले होते . त्यानंतर वाळ टाकलेला गमछा गडबडीमध्ये मध्ये तिथेच विसरलो .

अशा बऱ्याच गोष्टी परिक्रमे मध्ये विसरल्या जातात . लंगोटी , गमछे ,कमण्डलू ,अगदी दंड सुद्धा एकदा विसरलो होतो ! चितळे मैय्यांच्या लछोरा या गावामध्ये !त्यामुळे परत न फिरता आश्रमात पोहोचलो . उत्तम स्वामींचा आश्रम हा नावाप्रमाणे अतिशय उत्तम होता ! इथे एक शेतकी महाविद्यालय त्यांनी चालू केले होते आणि या महाविद्यालयाचे सेक्रेटरी देशमुख म्हणून यावलचे गृहस्थ होते .अतिशय सज्जन मनुष्य . मी आत मध्ये गेल्यावर त्यांना सर्वप्रथम आश्चर्य वाटले . कारण या आश्रमामध्ये परिक्रमा वासी कधीच येत नाहीत . परंतु माझ्या परिक्रमेमध्ये उत्तम स्वामी काही अंतर ठेवून पुढे चालत होते त्यामुळे हे कोण साधू आहेत हे बघायची उत्कंठा मला लागलेली होती ! ज्या ज्या गावांमध्ये मी जायचो तिथे तिथे उत्तम स्वामींचे फोटो लावून स्वागत वंदन अभिनंदन असे फलक लागलेले असायचे !  मी स्वामीजींना भेटायची इच्छा मनामध्ये बाळगून इथे आलो आहे हे कळल्यावर देशमुख सरांनी मला खूप सन्मानाने वागवले . सर्वप्रथम त्यांनी मला भोजनाची विनंती केली . परंतु माझा उपवास आहे कळल्यावर त्यांनी मला दूध दिले ज्याच्यामध्ये कालवून मी राजगिऱ्याचे लाडू खाल्ले . इथे एक वेळ सर सेवक होता . महाराजांना झोपायची जागा दाखवा असे सांगितल्यावर तो मला वरती घेऊन गेला आणि उत्तम स्वामी महाराजांची जी खोली आहे त्याच्या बाहेर आसन लावायला सांगितले . मी देखील आनंदाने तिथे वरांड्यामध्ये उघड्यावरच आसन लावले . समोरच्या बाजूलाच महामंडलेश्वर कनकेश्वरी माताजींची देखील खोली होती . त्या कधी इथे आल्या तर राहायच्या असे कळाले . बहुतेक देशमुख सरांनी सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार पाहिला आणि ते स्वतः वरती आले आणि सेवकाला झापले . त्यांनी माझी क्षमा मागितली आणि मला व्हीआयपी सूट दिला . मी त्यांना सांगितले की मी परिक्रमे मध्ये आहे त्यामुळे मला व्हीआयपी सूट नको परंतु सर काही ऐकेनात .  मग त्या व्हीआयपी सूटमध्ये मी जमिनीवर झोपलो ! नेमके उत्तम स्वामी प्रवासामध्ये होते त्यामुळे त्यांचे दर्शन होऊ शकले नाही . इथे कृषी महाविद्यालय आणि वसतिगृह वगैरे सर्व आहे तसेच शेजारी एक मोठा तलाव आहे जिथे वन्य प्राणी रात्री पाणी प्यायला येतात असे मला सरांनी सांगितले .

हे उत्तम स्वामींचे कृषी महाविद्यालय आहे . 
आजूबाजूला जंगल असल्यामुळे हा अतिशय रम्य परिसर आहे .
मी इथे साधारण अंधारातच पोहोचलो होतो आणि इथपर्यंत आणून सोडणारा रस्ता अत्यंत एकाकी आणि अंधारातून जाणारा तसेच जंगलातून जाणारा असल्यामुळे भीतीदायक आहे . इथे वन्य प्राणी हल्ला करू शकतात हे मला आश्रमात पोहोचल्यावर कळले ,त्यामुळे इथ  रात्री अपरात्री चालण्याचे दुःसाहस करू नये असे मला वाटते .
आश्रमाच्या शेजारीच मोठा तलाव आहे .
हे उत्तम स्वामीजी आहेत . हे मूळचे अर्थात पूर्वाश्रमीचे अमरावतीचे असल्यामुळे मराठी बोलू शकतात . परम पूज्य अनंतश्री विभूषित् महामंडलेश्वर श्री श्री १००८ ईश्वरानंद ब्रह्मचारी तथा श्री उत्तम स्वामी जी महाराज श्री शंभू पंच अग्नि अखाड़ा असे यांचे पूर्ण नाव आहे . स्वामीजी विविध कथा करतात . खापरमाळ येथे देखील त्यांच्या भक्तांनी उत्तम आश्रम चालवला आहे .
महाविद्यालयामध्ये संघाची शाखा चालते .
ही आश्रमाची मुख्य वास्तू आहे . इथेच मी मुक्काम केला होता आणि तळघरामध्ये भांडारगृह आहे तिथे दूध लाडू खाल्ले होते .
हा आश्रम देवीच्या मंदिरापासून तसा खूप जवळ आहे . थोडासा उलट्या दिशेला आहे . नंतर पुन्हा तुम्हाला हेलिपॅडपाशी येऊन सरळ महामार्ग पकडावा लागतो .

 इथे एकमेकांना समांतर दोन रस्ते आहेत . दोन्ही रस्ते मोठे आणि चांगले आहेत . मी सकाळी ठीक सात वाजता निघालो आणि जंगला जवळचा रस्ता पकडला आणि अतिशय वेगाने गती घेतली .इथून बुधनी हे मोठे गाव ३० किलोमीटर अंतरावर होते . थोडे अंतर गेल्यावर काही ढाबे आहेत तिथे एका सदभक्ताने मला चहा पाजला . पायांना गती दिली परंतु मध्ये मध्ये सारखाच चहा पाजला जाऊ लागला . त्याची दोन कारणे होती . एकतर या भागातून परिक्रमावासी फारसे जात नसावेत . आणि दुसरे कारण म्हणजे इथे दर एक किलोमीटरवर वेगळे गाव लागत होते . नर्मदा मातेच्या काठावर सरासरी दोन किलोमीटरवर गाव बदलते असे आपण पाहिले आहे परंतु इथे दर किलोमीटर ला गाव बदलत होते ! पहिल्यांदाच असा अनुभव आला ! वाटेमध्ये सारू मारू बौद्ध लेणी जवळ असल्याची पाटी दिसली . इथे नटनी की कछार म्हणून एक जागा आहे . जिथे टपकेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे असे कळाले . परंतु ते पाच किलोमीटर आत असल्यामुळे गेलो नाही .इथे पुन्हा एका दुकानदाराने चहा पाजला . 
हे टपकेश्वर महादेवांचे मंदिर / घळ आहे .

ही सारूमारू ची बौद्ध लेणी आहेत .

बुधनीच्या वाटेमध्ये गावेच गावे पार केली !  इटारसी , पान गुराडिया , दीपखेडा , सटार , ओंदिया , बयान , बिबडा , उंचाखेडा , होलीपुरा , पंदारो , खांदाबड , देवगाव , पीली करार , खापा खुर्द , तालपुरा इतकी सारी गावे पार केल्यावर बुधनी गावी लागते !
रस्त्याने चालायचे असल्यामुळे पायांनी भयंकर गती पकडली . तुम्हाला नर्मदा मातेचे विस्मरण होणार नाही याची काळजी ग्रामस्थ घेत असतात ! जरा तुम्ही कुठला बाहेरचा विचार चालू केला की कोणीतरी अचानक नर्मदे हर असा पुकारा करून तुम्हाला मूळ पदावर आणतेच आणते !पिली करार गावामध्ये अजून एक करुणा धाम आश्रम आहे . कथावाचक सुदेश बालगोविंद शांडिल्य यांचाच हा आश्रम आहे . करोंद माफी गावात आपण यांचा आश्रम पाहिला होताच . सलग बरेच अंतर चालल्यामुळे इथे थोडा वेळ बसलो . इथे समोर एक मोठी दिनदर्शिका टांगली होती . परिक्रमेमध्ये चालताना कुठला वार चालू आहे कुठला महिना चालू आहे काहीही पत्ता लागत नाही . इथे दिनदर्शिका दिसल्यामुळे कौतुकाने पाहायला गेलो . इथे एक दाम्पत्य आणि अजून एक मदतनीस असे तिघे सेवादार थांबलेले होते . आश्रमाची व्यवस्था अत्यंत चोख होती . आश्रम म्हणजे पत्र्याची साधी शेड होती परंतु आत मध्ये सर्व सुविधा ठेवलेल्या होत्या . 
करुणाधाम आश्रमामध्ये असे पिवळ्या रंगाचे फलक सगळीकडे लावलेले दिसतात . हे बहुदा शांडिल्य महाराजांचे आणि त्यांच्या वडिलांचे / गुरुंचे फोटो आहेत .
आश्रम अप्रतिम आहे .
महाराजांचे भक्त मंडळ काय काय सेवा चालवते ते लिहिलेले आहे .
आश्रम आतल्या बाजूने असा असून सर्व सुख सुविधा युक्त आहे . पत्र्याच्या दोन छोट्या खोल्या आतमध्ये दिसतात तिथे परिक्रमावासींचा स्वयंपाक आणि सेवादारांची निवासाची सोय आहे .
दिनदर्शिका पाहिल्यावर माझ्या असे लक्षात आले की बऱ्याच वर्षांनी येणारा योग आज आलेला होता . शक्यतो आपल्या वाढदिवसाची तिथी आणि आंग्ल दिनांक फिरून एकाच दिवशी लवकर येत नाहीत . तो योग आज आला होता . मी चटकन म्हणालो , " अरे माझा तिथीने आणि तारखेने वाढदिवस आज एकाच दिवशी आलेला आहे ! " हे ऐकल्याबरोबर तिघे सेवादार खुश झाले . आणि म्हणाले आज गोडधोड खाल्ल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही !किंबहुना तुम्ही आज येथे मुक्काम करा . परंतु मला मुळातच वाढदिवस साजरा करणे ही संकल्पना आवडत नाही . अन्य दिवसांसारखाच हा एक दिवस असतो . त्याला विशेष महत्त्व देणे ही व्यावसायिक लोकांची गरज असू शकते , माझी नाही .हुशार व्यापारी लोकांनी वाढदिवसाच्या भोवती मोठेच अर्थकारण बेमालूमपणे गुंफलेले आहे . तुम्ही नवीन कपडे घेता . कापड दुकानदाराचा फायदा होतो . तुम्ही केक आणता बेकरी वाल्याचा फायदा होतो . फुगे झिरमुळ्या आणता . दुकानदाराला पैसे मिळतात .गोडधोड खायला आणता . हलवायचा फायदा होतो . शुभेच्छा देण्यासाठी प्रवास करता . पेट्रोल पंप वाल्याचा फायदा होतो . पुष्पगुच्छ आणता . फुल माळ्यांचा फायदा होतो .जन्मदिवस लक्षात ठेवायचाच असेल तर तो संतांचा ठेवावा . परंतु त्याला वाढदिवस न म्हणता जयंती असे म्हणतात ! आपल्याकडे महापुरुष देखील जन्मदिवसाला फारसे महत्त्व देताना दिसत नाहीत . कारण तसे असते तर शिवाजी महाराजांच्या तीन-तीन जन्म तिथींचा वाद उत्पन्न झाला नसता . त्या धामधुमीच्या काळामध्ये त्यांचा जन्मदिवस खरोखरच इतिहासाच्या काहीसा विस्मरणातच गेला .आश्रमातल्या सेवादार काकू म्हणाल्या तुझ्यासाठी मी शिरा करते आहे तेवढा खाऊन जा . मग सर्वांच्या आग्रहाखातर सुंदर असा गरमागरम शिरा पोटभर खाल्ला आणि मग पुढे निघालो . कधी एकदा नर्मदा मातेकडे पोहोचतो आणि तिला बिलगतो असे मला झाले होते .झपाझप पावले उचलत पुढची गावे पार केली . बुधनी मध्ये पोहोचेपर्यंत अंधार पडायला सुरुवात झाली होती . इथे नर्मदा मातेवर अनेक घाट आहेत .नर्मदा मातेचे वळण असल्यामुळे उभा कडा आपल्या बाजूला येतो . अर्थातच पाणी खूप खोल आहे . इथे एक अगदी छोटासा घाट मला दिसला . धावतच गेलो . अलीकडच्या पायऱ्यांवर झोळी टाकून दिली आणि खूप दिवसांनी गावावरून आलेल्या आईला लेकरू जसे बिलगते तसा तिला जाऊन बिलगलो . वैशाख कृष्ण द्वादशी च्या दिवशी कदाचित माझ्या या जन्मातील मातेने मला जन्म दिला असेल ! परंतु जिच्या कुशीमध्ये मी आत्ता विसावलो होतो ती माझी जन्मजन्मांतरी ची आई होती ! जगातील समस्त मातृ रुपांची प्रतिनिधी होती ! 
माझ्यापुढे दोन पर्याय होते . एकतर तिला माझ्या भाषेमध्ये अर्थात वैखरी मराठीमध्ये बोलू द्यायचे . किंवा मी तिच्या भाषेमध्ये भावना व्यक्त करायच्या ! पाण्याची भाषा ! जलसंवाद ! ही भाषा फार सोपी आहे ! आणि पाण्यामध्ये उभे असताना तर फारच सोपी ! कोणालाच कळत नाही की तुमचा आपल्या आईशी डोळयांवाटे संवाद सुरू आहे ! ! 
हर हर नर्मदे ! नर्मदे हर !





लेखांक एकशे सत्तावन्न समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका (Index)

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !