लेखांक १४५ : दीडशे वर्षे वयाचे बर्फानी बाबा आणि बडवाहचे श्रीराम महाराज रामदासी

पथराडच्या हनुमंताचे दर्शन घेऊन पहाटे निघालो . थेट किनारा पकडला . इथून मी फार गतीने वाटेतली गावे कापत पुढे पोहोचलो . चिराखान ( अर्थात चिरा दगडाची खाण असलेली जागा ) , बेगाव अथवा बेहगांव , पंड्याघाट , पितामली , चंदीपुरा ,कवड्या , सिटोक्का , निमगुल्या / निमगुळ , देवनाल्या  ,अर्धनारेश्वर (धारेश्वर ) ,दारुकेश्वर , बाथोली ,खैगाव , भामपुरा , गंगातखेडी , कपासतल , ढुआरे अशा मार्गे गेलो .वाटेतील प्रत्येक गावामध्ये अनेक मंदिरे आहेत त्या सर्वांचे दर्शन घेत पुढे गेलो . नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्हाला जितक्या वेळा मंदिरामध्ये जावे लागते तेवढे कदाचित आयुष्यात तुम्ही कधीच जात नसता . त्यामुळे अतिपरिचयात् अवज्ञा असे होण्याची शक्यता असते . अर्थात देवाबद्दल मनामध्ये चक्क अनादर उत्पन्न होऊ शकतो !तो होऊ नये आणि आपला भाव परिक्रमेच्यापहिल्या दिवशी पहिल्याच देवळातील पहिल्या देवाचे दर्शन घेताना जसा होता तसाच राहावा यासाठी परिक्रमावासींना विशेष प्रयत्न करावे लागतात !ऐकून हे कदाचित खोटे वाटेल परंतु ज्यांनी परिक्रमा केली आहे त्यांना मी काय म्हणतो आहे ते लक्षात येईल . असो . चालता चालता कडकडीत दुपार झाली . इथे एक गमतीदार घटना घडली . मी नर्मदा मातेच्या काठाने चालत होतो . चालताना नर्मदा मातेमध्ये काही कचरा पडलेला दिसला , आणि तो जर माझ्या हाताच्या किंवा दंडाच्या कक्षेमध्ये असेल तर तो मी उचलून बाजूला काढायचो . अशीच एक प्लास्टिकची वस्तू तरंगताना मला दिसली म्हणून मी ती दंडाने अलीकडे ओढली . तर तो अमूल लस्सी चा प्लास्टिकचा पेला होता . मी तो फेकून दिला खरा परंतु फेकता फेकता मनामध्ये त्या थंडगार चविष्ट लस्सीचे रूप उभे राहिले . आणि रूपाच्या पाठोपाठ गुणांचे स्मरण होतेच ! त्या भर उन्हामध्ये मला थंडगार लस्सी आठवू लागली ! क्षणभरच ओठावर तिची चव तरळली ! जिभेला देखील स्मृती असतात की काय देव जाणे ! काठाने चालत चालत पुढे निघालो . एका कठीण दगडाच्या कड्यापाशी एक तरुण मुलगा नाव नांगरताना दिसला . मी त्याला विचारले की पुढे चालण्यासारखा रस्ता आहे का ? मुलगा म्हणाला की रस्ता आहे परंतु आपली हरकत नसेल तर दोन मिनिटे घरी चला , चहापान करा आणि मगच पुढे जा . त्याचे घर अगदी काठावरच आहे असे तो म्हणाला म्हणून मी त्याच्या मागे चालू लागलो . अक्षरशः काठाजवळच त्याचे घर होते . त्याने धावतच आत मध्ये जाऊन घरातल्या सर्वांना बाहेर बोलावले . शेजारचे पाजारचे अजून दोघेजण तिथे येऊन बसले . मी घराच्या सभागृहामध्ये बसलो . इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या . मंडलेश्वर पासून मी कसा कसा आलो ते त्याला सांगितले . घरातील माताराम माझ्यापुढे आली आणि म्हणाली बाबाजी आपके लिये चाय बनाती हूँ । आणि आत मध्ये निघून गेली . तो केवट आणि त्याचे दोन शेजारी यांच्याशी गप्पा मारता मारता मी हरिराम केवट चा विषय काढला . मंडलेश्वर येथे हनुमान मंदिरामध्ये मला तो भेटला होता . अतिशय हुशार असा हा मनुष्य होता . त्याच्याबद्दल मी मागे एका प्रकरणांमध्ये लिहिलेले आहे पहा .तर त्या हरिराम चा विषय काढला आणि आणि त्यांना विचारले की या हरिराम पूनमचंद केवट चा अजय नावाचा भाऊ इथेच कुठेतरी राहतो असे त्याने मला सांगितले आहे . तो कुठे राहतो ? सर्वजण हसायला लागले आणि म्हणाले बाबाजी हाच तर अजय आहे ! हे हरिराम चेच घर आहे . अजय त्याचा धाकटा भाऊ आहे . मला या प्रकाराच मोठेच आश्चर्य वाटले .कारण निमगुळ गावामध्ये माझ्या भावाच्या नवीन बांधलेल्या घरी नक्की जाऊन या असा निरोप मला हरिरामने आवर्जून दिलेला होता ! निमगुळ हे नाव देखील माझ्या लक्षात राहिले कारण माझ्या गुरुदेवांची समाधी टाकरखेडा या गावांमध्ये आहे त्याच्या अलीकडचे गाव देखील निमगुळ याच नावाचे गाव आहे . मी अजयच्या भावाला भेटून आलो आहे हे कळल्यावर सर्वांनाच आनंद झाला . हरिराम आल्यावर त्याला नक्की सांगतो असे मला ते म्हणाले . इतक्यात आतून माता राम चार पेले घेऊन आली ! दही बनाया है बाबाजी , माताराम मला म्हणाली . पाहतो तो चारही पेल्यांमध्ये थंडगार लस्सी ! या भागामध्ये लस्सी बनवणे याला दही बनाना असे म्हणतात . मी आश्चर्यचकित झालेला पाहून ती मला म्हणाली चाय बनानी थी लेकिन गर्मी जादा है इसलिये सोचा आपको दही बनाके पिलाती हूँ । समोरच्या दोघांनीही लस्सी पिण्यास नकार दिला . त्यामुळे अजयने एक पेला उचलला तो वगळता तीन पेले लस्सी शिल्लक राहिली . अजय मला म्हणाला की अब ये पूरी  आपको खतम करनी पडेगी । क्षणभर मनामध्ये लस्सी पिण्याची इच्छा काय झाली नर्मदा मातेने मला तीन पेले थंडगार लस्सी प्यायला दिली ! अर्थात हे काही फार शहाणपणाचे नव्हते . परंतु कितीही प्रयत्न केले तरी सवयीमुळे अशा भौतिक इच्छा आपल्या मनामध्ये उत्पन्न होतातच ! त्या पूर्ण करून नर्मदा मैया सांगते की पुन्हा असल्या फालतू इच्छा मनामध्ये धरू नकोस , ज्या पूर्ण करण्यासाठी तुला पुढचा जन्म घ्यावा लागेल ! शांतपणे एक एक करत मी लस्सीचे तीनही पेले रिचवले . आणि घरातील सर्वांशी बोलून सर्वांचा निरोप घेतला .

असाच अमूल लस्सीचा डबा मला सापडला होता . ज्याने मला नर्मदा मातेच्या सामर्थ्याची पुन्हा एकदा प्रचिती दिली . आणि पुन्हा कुठलीही भौतिक इच्छा न करण्याची प्रतिज्ञा करवली . त्याच क्षणी मी नर्मदा मैया साक्षात समोर यावी अशी इच्छा केली असती तर ती देखील पूर्ण झाली असती ! परंतु माझी झेप अमूल लस्सी पर्यंतच होती . अजूनही जिभेवर पूर्ण ताबा न आल्याचे ते लक्षण होते . असो .

इथून जवळच धारेश्वर किंवा दारुकेश्वर महादेवाचे मंदिर होते . 

धारेश्वर नजीक खुलार नावाची नदी नर्मदा मातेला येऊन मिळते . परंतु मिळताना ती अतिशय सुंदर असा धबधबा तयार करते ! तो पार करण्यासाठी तात्पुरती लाकडे टाकलेली आहेत . मी हा धबधबा पार केला तेव्हा नदीला फारसे पाणी नव्हते .इथले पुजारी ८८ वर्षे वयाचे होते .परंतु बघितल्यावर साठीचे आहेत असे वाटायचे ! त्यांनी मला उत्तम पैकी टिक्कड आमटी खायला दिली . ती खाऊन क्षणभर पाठ टेकली . कृष्ण अर्जुनाचा सारथी होता .परंतु कृष्णाचा देखील एक सारथी होता . त्याचे नाव दारूक असे होते .या दारुकाची तपोभूमी म्हणून हे दारूकेश्वर महादेवाचे मंदिर प्रसिद्ध होते .बघा ज्याचा ड्रायव्हर देखील इतका तपस्वी असेल तो स्वतः कसा असेल ! चॉईस कसा आहे पहा साहेबांचा ! असो . 

दारूकेश्वर मंदिरातील परिक्रमावासींची व्यवस्था
मंदिर अतिशय सुंदर आणि भव्य आहे
धारेश्वर धबधबा मोठा आणि प्रसिद्ध आहे .
या भागात पुरातन मंदिरांचे अनेक अवशेष पडलेले दिसतात . याचा अर्थ पूर्वी मोठे मंदिर असणार हे स्पष्ट आहे .
श्री दारुकेश्वर महादेव
मंदिर आणि परिसरामध्ये पडलेले पुरातन अवशेष
हे अवशेष बघून आपल्याला मूळ मंदिराचा काळ ठरविता येतो
धारेश्वर चा धबधबा पार करण्यासाठी परिक्रमावासींना मोठेच दिव्य करावे लागते

इथे दरवेळी असे तात्पुरते पूल बनविले जातात व वाहून जातात .
नर्मदा मातेला येऊन मिळणारी ही खुलार नदी लक्षात राहते !

 इथून निघालो आणि अर्धनारेश्वराची एक सुंदर व पुरातन मूर्ती पाहिली . मूर्ती अतिशय सुंदर होती . इथे एक फार मोठा टॉवर पाहायला मिळाला .  अति अति उंच होता . जवळ जाऊन त्याचा अभ्यास केला . पाया कसा व किती घेतला आहे ,रचना कशी आहे सर्व पाहून घेतले . मध्ये सिटोक्का या गावांमध्ये पाण्यामध्ये खेळणाऱ्या मुलांशी भरपूर गप्पा मारल्या . त्यांच्यासोबत गाणी देखील म्हणालो . पुढे सेमलदा ,मुरल्ला , गंगातखेडी अशी गावे पार करून बेलसर या गावामध्ये आलो . आपण पूर्वी पाहिले आहे त्याप्रमाणे गंगात खेडी या गावाच्या समोर नर्मदा मातेच्या मधोमध गंगेचे प्राकट्य स्थान आहे त्यामुळे इथे गंगेचा ओटला बांधलेला आहे . इथे गंगामैया स्वयम् प्रकट झालेली असल्यामुळे नर्मदा मैयाचे पाणी त्या ओट्याला प्रदक्षिणा घालून मग पुढे जाते . हे आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळते ! नर्मदा मातेच्या पात्राच्या मधोमध एक भगवा ध्वज लावला आहे जो पाहून आपल्याला लक्षात येते की इथेच गंगामाता प्रकट झालेली आहे . इथे समोरच गजानंद बाबा यांचा चहा पाणी देणारा आश्रम मला लागलेला होता . 

हीच ती जागा किंवा ओटला जिथे गंगेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी गंगामैया प्रकट झाली आहे .
श्री गंगेश्वर महादेव आणि गंगामैया

हे स्थान नर्मदा मातेच्या उदरामध्ये मधोमध असल्यामुळे इथे परिक्रमा वासी जाऊ शकत नाहीत . परंतु नर्मदा माता गंगामातेची परिक्रमा करताना येथे आपल्याला स्पष्ट पाहता येते !

इथे मला एक वेगळाच अनुभव आला . इथल्या रंगीबेरंगी घाटावर काही क्षण बसावे आणि नर्मदा मातेचे दर्शन घ्यावे असे मला वाटले . पाण्यामध्ये बरीच लहान मुले खेळत होती . मला बघितल्याबरोबर सर्व पोहणारी मुले क्षणात बाहेर आली . मी त्यांना म्हणालो की अरे बाळांनो पोहा की !  कशाला बाहेर आलात ? तर मुले मला म्हणाली हा आमचा घाट आहे बाबाजी . हरिजनांचा घाट आहे . पण गुजरांची मुले आम्हाला पोहू देत नाहीत .ती बघा ती मुले येत आहेत . मी मागे वळून पाहिलं तर अजून दहा-बारा मुलांचा एक समूह तिकडे येताना मला दिसला . ही सर्व मुले साधारण सहा ते बारा या वयोगटातली होती . त्यांचे हे बोलणे ऐकून मी अचंबित झालो ! माझ्या लक्षात आले की या सर्वांचे एकत्रित प्रबोधन करणे आवश्यक आहे . मी सर्व मुलांना घाटावरती ओळीने बसवले आणि सुमारे तासभर त्यांच्याशी बोललो . आपला देश म्हणजे काय ? आपण कोण आहोत ?आपल्या देशाची सध्याची परिस्थिती काय आहे ?भविष्यामध्ये आपल्या देशाचे काय होऊ शकते ?आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते कशामुळे ?आणि आपल्या देशाची इतकी वाईट गत कशामुळे झालेली आहे ? हे सर्व त्यांना समजावून सांगितले आणि जातीवादाच्या विषामुळे आपल्या देशाचे कसे आतोनात नुकसान झालेले आहे हे त्या सर्वांना उदाहरणासह पटवून सांगितले . सर्व मुले गंभीरपणे ऐकत होती . मुलांना माझे सर्व विचार पटले . आणि मग एकेक मुले बोलू लागली . ती म्हणाली बाबाजी आम्हाला एकत्र खेळायचे असते पण घरातून विरोध होतो . दोन्ही बाजूचे पालक कारण नसताना अतिरिक्त तणाव निर्माण करत आहे त हे माझ्या लक्षात आले .  मी त्यांना म्हणालो ते काही नाही चला आज आपण सर्वांनी एकत्र पोहायचे ! आणि आज पासून हा घाट भारतातील सर्व नागरिकांचा घाट झालेला आहे ! मुलांना खूप आनंद झाला त्यांनी दणादण उड्या मारल्या ! खूप वर्षांनी ही मुले आपापसामध्ये एकत्र खेळताना दिसत होती ! मुलांच्या मनामध्ये उच्च नीचपणा काहीही नसतो . तो घालण्याचे पातक आपण कधीही करू नये . मी कमरे एवढ्या पाण्यात जाऊन तीन डुबक्या मारून बाहेर आलो आणि पुढे चालू लागलो . मागे वळून पाहिलं तर सर्व मुले आपापसामध्ये खेळण्यांमध्ये रममाण झालेली होती ! मला खूप बरे वाटले . हा प्रसंग मला दाखविला त्याबद्दल मी नर्मदा मातेचे मनापासून आभार मानले ! अजून अनेक ठिकाणी असे होत असणार . इथे नेमकी त्याच वेळी मला मुले भेटली म्हणून उलगडा झाला . जाती मानणे आणि जाती पाळणे यात जमीन आसमानाचा फरक आहे . असो . इथून थोडेसे पुढे आल्यावर बेलसर नावाच्या गावामध्ये विमलेश्वर नामक महादेवाचे स्थान आहे . तिथे ३७० किलो वजनाची घंटा ठेवलेली आहे . मंदिर नुकतेच पुनर्निर्मित करण्यात आलेले आहे . एका उंच टेकडीवर हे मंदिर आहे . ग्रामस्थ धर्माबाबत थोडेसे उदासीन असावेत असे मला वाटले . इथे बद्रीच्या दिगंबर महायोगी गंगाभारती उर्फ बर्फानी बाबांचा आश्रम आहे . या बाबांना बघितल्यावर मला त्यांचे वागणे बोलणे चालणे हे सर्व बघून अद्वितीयानंद सरस्वती स्वामींची आठवण सारखी येऊ लागली . या महान तपस्वी बाबांचे वय १६० वर्षाचे आहेत असे सांगतात .या बाबांचा मला खूप चांगला सत्संग लाभला . मी त्यांची पादसेवा देखील केली अर्थात पाय देखील चेपले . बाबांशी गप्पा मारताना त्यांनी मला सांगितले की साईबाबांच्या आदेशाने त्यांनी पहिली नर्मदा परिक्रमा केली होती . याचा अर्थ साईबाबांचे प्रत्यक्ष दर्शन त्यांना लाभले होते . तसेच इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना नित्यानंद स्वामी यांचा विषय निघाल्यावर त्यांनी सांगितले की या नित्यानंद स्वामींकडे ते गेलेले असताना तिथे एक निपुत्रिक माता-पिता आले होते व बाबांनी त्यांना आशीर्वाद दिल्यामुळे पुढे त्यांना महानु पुत्र प्राप्त झाला आणि त्याने पुढे एका डोंगराचा खूप विकास केला असे म्हणतात . हा प्रसंग ऐकल्या क्षणी माझ्या लक्षात आले की बर्फानी बाबा पालघरच्या सदानंद बाबांबद्दल बोलत आहेत ज्यांनी तुंगारेश्वर या स्थानाचा कायापालट केलेला आहे  . याचा अर्थ बर्फानी बाबा हे त्यांच्या जन्माचे देखील साक्षीदार होते . अशा अनेक जुन्या घटना बाबा जणू काही आता पाहिल्या आहेत अशा अविर्भावात सांगत होते . बाबांचा खूप मोठा जटा भार होता परंतु वयोमानापरत्वे त्यांच्या जटाभराचे वजन शरीरा इतके होऊ लागले ! म्हणून त्यांनी तो सर्व उतरवला असे त्यांनी मला सांगितले . आता मात्र ते संपूर्ण केस कापून साधे राहतात . त्यांचे वय किती असावे हे पाहून अंदाज येत नाही . त्वचा व डोळे बघता वार्धक्याची सर्व लक्षणे दिसतात . परंतु आवाज मात्र खणखणीत आहे . दीड वर्षांनी मी देह ठेवण्याची शक्यता आहे असे ते मला म्हणाले . एकंदरीत त्यांचे सर्व बोलणे ऐकल्यावर माझ्या असे लक्षात आले की मठातील कर्मचारी ओमप्रकाश व अन्य काही लोक हे त्यांची सतत तर उडवत असत असे ते म्हणाले व त्यामुळे ते व्यथित झालेले वाटत होते . हा मठ विकून किंवा कोणाला तरी चालवायला देऊन सरळ बद्री ला जाऊन रहावे असे वाटते असे ते दोन-तीन वेळा म्हणाले . मी बराच वेळ त्यांच्या खोलीमध्ये बसलो होतो आणि ओम प्रकाश मला कमीत कमी चार पाच वेळा येऊन तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करून गेला . परंतु मी स्पष्टपणे नकार देऊन बाबांची सेवा करत बसलो . त्यांच्या डोक्याला तेल लावून दिले . हात पाय दाबून दिले . बाबांना खूप बरे वाटले . मला म्हणाले तू इथेच रहा . तुला किती दिवस राहायचे तेवढे दिवस राहा . परंतु मला असे काही करायचे नव्हते . कारण नर्मदा मातेचा तसा आतून आदेश आलेला नव्हता . इथे वरच्या बाजूला परिक्रमावासींची राहण्याची सोय केलेली होती . आश्रम अतिशय उत्तम होता तसेच ओम प्रकाश जेवण देखील खूप सुंदर बनवायचा . फक्त त्याचा विनोदी स्वभाव असल्यामुळे तो सतत स्वामींची जाता येता चेष्टा करायचा . बर्फानी बाबांना भेटायला खूप लांबून लोक यायचे असे माझ्या लक्षात आले . मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा देखील त्यांच्या खोलीमध्ये काही माणसे बसलेली होती व नंतरही काही लोक त्यांना भेटून गेले . बाबा सर्वांचे सर्व ऐकून घेत . आणि आशीर्वाद देत . या सर्व लोकांनी माझ्याशी देखील भरपूर गप्पा मारल्या आणि नर्मदा परिक्रमा काय आहे वगैरे समजून घ्यायचा प्रयत्न केला किंबहुना माझीच परीक्षा घेतली असेल . काय सांगावे ! 

महायोगी दिगंबर गंगा भारती असे बर्फानी बाबांचे मूळ नाव आहे . महावतार बाबाजींचा क्रियायोग ते शिकवतात . त्यांचा जटाभार असलेला फोटो इथे लावलेला आहे .
सतत जटा बाळगण्याची सवय लागलेली असल्यामुळे डोके रिकामं ठेवल्यावर त्यांना त्रास होतो म्हणून डोक्याला असा जड फेटा किंवा पागोटे ते नेहमी बांधतात असे मला म्हणाले
हाच बर्फानी बाबांचा आश्रम आहे .आश्रम आणि आश्रमाचा परिसर अतिशय सुंदर आहे .
जटा भार उतरवल्यामुळे बाबाजी आता असे दिसतात . बाबांचे वागणे बोलणे एखाद्या नवीन जन्माला आलेल्या बालकाप्रमाणे निरागस आहे
याच खोलीमध्ये बसून मी बर्फानी बाबांचा सत्संग केला ! थोडीफार सेवा देखील घडली . बाबांकडे पाहून त्यांच्या वयाचा खरोखरच अंदाज येत नाही . परंतु अनेक ऐतिहासिक घटना ते स्वतः डोळ्यांनी पाहिल्याप्रमाणे वर्णन करून सांगतात . अजून दीड वर्षांनी मी देह ठेवणार आहे असे ते मला म्हणाले.असो . 
इथून वरती जाऊन मी विमलेश्वर महादेवांचे दर्शन देखील घेतले आणि ती ३७० किलो वजनाची मोठी घंटा देखील बघून आलो ! घंटा फारच मोठी आणि जड आहे . बर्फानी बाबांच्या आश्रमामध्ये झाडे खूप सुंदर होती . वेगवेगळ्या पातळीवर झाडे लावून बाबांनी उत्तम अरण्याची निर्मिती केली होती . आश्रमाचा परिसर मला फार आवडला . इथून नर्मदा मातेचे दर्शन देखील खूप सुंदर होत होते . इथे येऊन पुन्हा राहावे असा हा आश्रम आहे . 
विमलेश्वर महादेवांचे मंदिर खूप सुंदर आहे .
श्री विमलेश्वर महादेव भगवान
घंटा देवीचे मंदिर इथून जवळच एका डोंगरावर आहे
विमलेश्वर महादेव मंदिराची तटबंदी आणि दरवाजा खूप सुंदर आहे
मंदिरात लावलेली दगडी फरशी बघण्यासारखी आहे

हीच ती अजस्त्र घंटा !
टेकडीवर असलेल्या चंद्रेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये ही घंटा आहे . इथून नर्मदा मैयाचे खूप छान दर्शन होते .
चंद्रेश्वर महादेवाची अनेक शिवलिंगे आहेत त्यावर ही घंटा लटकवली आहे
एका पिंडीवर दहा शिवलिंगे असे चंद्रेश्वर महादेव यांचे स्वरूप आहे
या मंदिराचा नुकताच जिर्णोद्धार करण्यात आलेला आहे
घंटा मात्र अतिशय सुबक आणि सुंदर आहे ! तिचा नाद मंत्रमुग्ध करणारा आहे !भौतिक शास्त्रानुसार घंटेचा आकार जितका मोठा होत जातो तितकी तिच्या स्वराची फ्रिक्वेन्सी अर्थात वारंवारिता कमी होत जाते त्यामुळे ती थेट हृदयाला भिडू शकते . घंटेवर सुंदर कोरीव काम केलेले आहे . नाशिकच्या नारोशंकर मंदिरातील नारोशंकरी घंटेची किंवा नानासाहेब फडणवीस यांच्या वाईजवळच्या वाड्यातील घंटेची आठवण करून देणारी ही घंटा आहे .अशा मोठ्या घंटा बनवण्याची पारंपारिक कला आजही तामिळनाडू राज्यामध्ये जिवंत आहे . कुठल्याही पूजनाच्या आधी शंख आणि घंटा यांची पूजा करण्याची हिंदू पद्धत आहे . या दोघांना देवता मानले जाते . घंटा देव्यै नमः असा मंत्र आपण म्हणतो . त्यामुळे घंटा ही पद्धत हिंदू धर्मातून अन्य धर्मीयांनी उचलली आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . एक उत्तम ध्वनी उत्पन्न करणारी घंटा बनवताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो . तिचा आकार , तिचा व्यास ,तिची जाडी ,ती बनवण्यासाठी लागणारे धातूचे प्रमाण ,तिच्यावरील नक्षीकाम ,तिची साखळी , तिची उंची ,तिचा लोलक , त्याचा आकार आणि त्याचा धातू , तिच्यामध्ये काढण्यात आलेल्या गोल रिंगा या सर्वांचा तिच्या आवाजावर कमी जास्त प्रभाव पडत असतो .मेणाच्या साचात ओतकाम अर्थात लॉस्ट वॅक्स कास्टिंग पद्धतीने घंटा बनवण्याची पद्धत तमिळनाडू मध्ये आजही जिवंत आहे . असो .
मुरल्ला गावापासून नर्मदा परिक्रमा मार्ग पूर्व दिशे ऐवजी ईशान्य दिशेकडे वळतो . इथून खेडी घाट जवळच आहे . परंतु मधील मला प्रचंड चिखलाचा एक बेकार टापू लागला . प्रचंड राडा होता .त्या चिखलातून चालताना माझे बूट पूर्णपणे चिखलाने बरबटले . एके ठिकाणी मी उडी मारायला गेलो परंतु माझा उडीचा अंदाज चुकला आणि बुटावरती सर्व ताण येऊन क्षणात बूट फाटला ! शेवाळी हिरव्या रंगाचा हा नाइकी कंपनीचा बूट परिक्रमेमध्ये मला प्राप्त झालेला अकरावा बूट होता ! कसा बसा पुढे चालत राहिलो . पूर्णपणे काठाने रस्ता होता . कुठेही तुम्हाला नर्मदा मातेचा काठ सोडून गावात जावे लागत नाही .इथे एका पुलाचे बांधकाम सुरू आहे . आणि जुना मीटर गेज रुंदीचा एक रेल्वेचा पूल आडवा लागतो .म्हणजे तेव्हा लागला होता . आता ती रेल्वे कायमची इतिहास जमा झाली . त्यामुळे हा पूल देखील उतरवण्यात आला आहे असे मी नुकतेच गेल्यावर पाहिले . परंतु तेव्हा तो पूलही सुस्थितीमध्ये होता आणि त्यावरून छोटीशी रेल्वे गाडी देखील धावताना मी पाहिली आहे ! अरुंद मार्ग असल्यामुळे रेल्वेची गती कमी असते आणि आकारही छोटा असतो . इथे एका आश्रमामध्ये जाण्याची मला इच्छा होती . नर्मदा मातेच्या काठावर मोजकीच रामदासी स्थाने आहेत . त्यातील एक स्थान बडवाह या ठिकाणी आहे . इथे परमपूज्य श्रीराम महाराज रामदासी यांची समाधी आहे . सुदैवाने ते हयात असताना मला त्यांचे दर्शन काही वेळा लाभले होते . माझा मुलगा तेरा दिवसांचा असताना श्रीराम महाराज रामदासी पुण्यामध्ये आले आहेत असे मला कळाले . तेव्हा त्याला त्यांच्या चरणावर वाहिला होता .मुलाचे नाव रामदास ठेवले आहे हे कळल्यावर महाराजांना खूप आनंद झाला होता . त्यावेळी महाराजांच्या पत्नी अर्थात आईसाहेब देखील तिथे होत्या . गरोदरपणामध्ये श्रीराम महाराजांचे चरित्र रामदास च्या आईने वाचले होते त्यामुळे तिला देखील त्यांच्या दर्शनाची खूप ओढ लागली होती . पुढे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या एका गडकोट मोहिमेमध्ये श्रीराम महाराज आले होते . तेव्हा त्यांच्यासोबत बोलण्याचे आणि चालण्याचे भाग्य मला लाभले होते . सातारा शहरातील सप्तर्षी गडावर महाराज आले होते . सप्तर्षी गड म्हणजे अजिंक्यतारा ! अजिंक्यतारा हे किल्ल्याचे नाव अझीम तारा या शब्दावरून आलेले आहे .औरंगजेबाच्या एका मुलाचे नाव अझीम होते .परंतु सप्तर्षी गड हे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव आहे . या भागात असलेल्या सात किल्ल्यांचा राजा म्हणून त्याला सप्तर्षी असे म्हटले जाते . सप्तर्षीलाच सात तारा असे देखील म्हणतात . सात तारा या शब्दावरूनच सातारा शब्द आला आहे .असो . श्रीराम महाराज हे गोंदवलेकर महाराजांचे शिष्य . त्यांनी नर्मदा परिक्रमा देखील केलेल्या आहेत .  आजन्म कठोर नैष्ठिक ब्रह्मचर्याचे व्रत पाळल्या नंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी मूळच्या इंदोरच्या असलेल्या आई साहेबांशी विवाह केला . आश्रमाच्या पहिल्या दाराला कुलूप होते . परंतु पुढे असलेल्या मोठ्या दारातून आत प्रवेश केला . इथे मी तसा लवकर पोहोचलो होतो . परंतु इथे मुक्काम करावा अशी माझी इच्छा होती . गेल्या गेल्या आई साहेबांनी दर्शन दिले आणि मी न विचारताच त्या मला म्हणाल्या की आज मुक्काम करा ! मला अतिशय आनंद झाला . रामदास सोबत श्रीराम महाराजांची झालेली भेट आणि त्यावेळी घडलेल्या घटनांचा सविस्तर वृत्तांत मी त्यांना सांगितला . त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांना ही घटना चांगली लक्षात होती असे त्या म्हणाल्या . कारण आजकाल तुकाराम ,ज्ञानेश्वर , नामदेव ,रामदास असे आपल्या मुलाचे नाव सहसा कोणीच ठेवत नाही ते ठेवल्यामुळे महाराजांना आनंद झाला होता . आईसाहेबांनी महाराजांचे अतिशय भव्य दिव्य समाधी मंदिर बांधले आहे . मंदिराचा कळस खूप दुरून दिसतो . मी गेलो तेव्हा आश्रमाचा विस्तार खूप मोठा होता . मोठे भांडारगृह आणि भोजन कक्ष होता . तसेच काही खोल्या देखील होत्या . परंतु यातील बहुतांश बांधकाम हे रेल्वे खात्याकडून जागा अधिक्रमित केली जाऊन पाडले जाणार आहे असे त्यांनी मला सांगितले . मीटर गेज रेल्वे काढून तिथे मोठ्या रेल्वेचे दुहेरी लोहमार्ग बसवण्यात येणार होते . पुढे ते सर्व पाडले गेलेच . परंतु मूळ बांधकाम मला पाहायला मिळाले . महाराजांची समाधी अतिशय सुंदर आणि गोंदवलेकर महाराजांच्या समाधीची आठवण करून देणारी आहे . मंदिराचा आकार देखील औरस चौरस असून भव्य सभागृह आहे .मंदिराचे आवार बरेच मोठे आहे .परिसरात अजून काही छोटी मंदिरे आहेत . आई साहेबांनी मला वरती असलेल्या एका खोलीमध्ये आसन लावायला सांगितले .वेगळी खोली देत होत्या परंतु मी आधीच काही भक्त उतरले आहेत तिथेच उतरेन असे सांगितले . इथे परळीचे एक प्राध्यापक लोणीकर म्हणून गृहस्थ उतरलेले होते . रावसाहेब दानवे यांच्या खूप जवळचे होते . यांना गप्पा मारण्याची खूप आवड होती ! भरपूर गप्पा मारल्यावर आश्रमात फेरफटका मारून आलो . आश्रम फारच सुंदर आहे . प्रशस्त भोजन कक्ष होता . तिथेच गाड्यांचे मोठे पार्किंग होते . श्रीराम महाराजांना गाड्यांची खूप आवड होती . ते स्वतः गाडी चालवायचे . त्यांनी देह ठेवला तेव्हा देखील ते त्यांची लाडकी स्कॉर्पिओ गाडी चालवत होते .गोंदवल्या नजीक हा अपघात झाला होता . असा अपघात झाला आहे हे कळाल्यावर मी मुद्दामहून गोंदवल्याला जाऊन ती जागा देखील बघून आलो होतो . इथे लावलेल्या गाड्या पाहिल्यावर माझ्या त्या स्मृती जागृत झाल्या . विशेष म्हणजे महाराजांना अपघात झाला तेव्हा गाडीतील सर्व लोकांचे प्राण वाचले होते .त्या सर्वांचे प्रारब्ध जणू काही यांनी स्वतःवर ओढवून घेतले होते . सृष्टीचे नियम आणि नियती यातून कोणालाच सुटका नाही हेच खरे . . . 
आता भोजन कक्ष होता ती प्रशस्त जागा रेल्वेच्या ताब्यात गेली आहे . या भोजन कक्षामध्ये महाराजांवर लिहिलेले काही श्लोक लावलेले होते .  गोंदवल्याप्रमाणेच भोजन व्यवस्था होती . इथे मला उगार या नाटकातल्या गावातील अनंत बर्वे नामक एक जण भेटले ते त्यांचे बंधू आणि आई असे तिघे आलेले होते . माझे एक शिक्षक श्री अरुण हुपरीकर सर यांची सासुरवाडी उगार गावात होती .त्यांचा मुलगा आशिष माझा खास मित्र असल्यामुळे आम्ही त्याच्या मामाच्या गावाला जात असू ! दिवेकर असे तिकडचे आडनाव होते . या सर्व दिवेकरांना सर्व बर्वे ओळखत होते . कृष्णाच्या अगदी काठावर यांचे घर होते . आनंद बर्वे हे विमान तज्ञ होते .विमानांमध्ये झालेले मोठे बिघाड दुरुस्त करणे हे त्यांचे काम होते .एअर इंडिया मध्ये एव्हिएशन मेंटेनन्स विभाग ते सांभाळत . त्यामुळे ते मुंबईला विमानतळा जवळच राहत .महाराजांचे भक्त होते त्यामुळे अधून मधून इकडे येत असत . त्यांच्याशी खूप गप्पा झाल्या . त्यांना पाहून मला अभिनेता अतुल परचुरे याची आठवण आली ! इथे पुण्याचे एक घोडके नामक काका देखील आलेले होते . चांदणी चौका जवळ राहायचे . या सर्वांच्या परिक्रमाविषयक प्रश्नांना यथामती उत्तरे दिली .आईसाहेबांनी बोलवून घेतले आणि काही काळ सत्संग घडला . त्यांनी मला सांगितले की तुझ्याकडे काही जड सामान असेल तर ते इथे ठेवून जा . इथून ओंकारेश्वर जवळ आहे . परिक्रमा संपल्यावर घेऊन जा . अनेक परिक्रमावासी असे करतात . असे म्हटल्याबरोबर माझ्या डोक्यात सुस्पष्ट असलेली यादी मी त्यांना सांगितली आणि लगेचच त्यांनी एक सेवक माझ्यासोबत पाठवला ! एका मोठ्या पेटाऱ्या मध्ये सर्व सामान ठेवले गेले . धनुष्य आणि सर्व बाण ,अंकलेश्वर येथे घेतलेली मच्छरदाणी तसेच आजवर मिळालेली सर्व शिवलिंगे आणि काही अनावश्यक वस्त्रे असे सर्वच सामान इथे ठेवून दिले ! क्षणात माझा भार निम्मा झाला ! मला अतिशय आनंद झाला ! इथे गोंदवलेकर महाराजांचे मंदिर बांधले आहे ते वर खाली आहे . कुठून आलो आणि कुठे चाललो हे नवीन माणसाला लक्षात येत नाही ! महाराजांची मोठी पितळ्याची मूर्ती ठेवलेली आहे . मंदिर खूपच सुंदर आणि शांत आहे . शेजारीच आईसाहेबांची निवास व्यवस्था आहे . मी सामान ज्या खोलीमध्ये ठेवले होते ती खोली आता रेल्वेने पाडून टाकली . झाडे पण खूप लावलेली आहेत . आश्रमाची मोकळी जागा पण बरीच आहे . इथे भविष्यामध्ये अनेक बांधकामे होतील . आईसाहेबांनी बोलता बोलता एका चहा वाल्या आजीबाईचा उल्लेख केला . हिच्याशी श्रीराम महाराज जाता जाता शेवटचे काही बोलले होते . मी तिला आवर्जून भेटायला गेलो . ही म्हातारी परिक्रमा वासींना मोफत चहा पाजायची . श्रीराम महाराज जाता येता तिची ख्याली खुशाली विचारायचे .तिला आई म्हणायचे . म्हातारी कडे मी गेलो आणि तिने दिलेला चहा पीत बसलो . श्रीराम महाराजांची आठवण सांग असे मी तिला म्हणाल्यावर म्हातारी सांगू लागली . त्यादिवशी असेच महाराज गाडीतून निघाले . माझ्या टपरी समोर गाडी थांबवली आणि उतरून खाली आले . मला मिठी मारली आणि म्हणाले आई आता आपली ही शेवटची भेट . पुन्हा भेट होईल का नाही माहिती नाही . मी रागवून त्यांना चापट मारली आणि म्हणाले असे अभद्र कशाला बोलता ? परिक्रमावासींना चहा पाजत रहा . असे तिला सांगून श्रीराम महाराज निघून गेले . ते पुन्हा कधीच परत आले नाहीत . सांगताना म्हातारी ढसा ढसा रडू लागली . मला देखील अश्रू आवरले नाहीत . महाराजांना अशा रीतीने पुढे काय होणार हे आधीच कळले होते याची ती म्हातारी साक्षीदार आहे .म्हातारी अडाणी आहे आणि अतिशय भोळी भाबडी आहे . ती कधी खोटे बोलणार नाही . महाराजांच्या आज्ञेप्रमाणे ती आजही प्रत्येक परिक्रमा वाशीला फुकट चहा पाजते . ती सांगते प्रत्येक व्यक्तीला चहा पाजताना मला श्रीराम महाराजांची आठवण येते . असा माणूस पुन्हा होणे नाही . ते मोठे महाराज होते . मी एक साधी चहा वाली . तरी देखील माझी चौकशी केल्याशिवाय कधीच या रस्त्याने गेले नाहीत . सोबत कितीही मोठी माणसे असली तरी त्यांना सांगायचे ही माझी आई आहे . म्हातारीला अश्रू अनावर होत होते . महाराजांच्या आठवणींना उजाळा देत जगणे हेच आता तिच्या हातात उरले होते . मी तिला रामनामाची आठवण करून दिली . ती म्हणाली हो तर ! महाराजांनी मला सांगितले आहे नाम घेत जा ! मी आपली नाम घेत चहा बनवते ! म्हातारीला नमस्कार करून स्नानासाठी नर्मदा मातेकडे निघालो . वाटेमध्ये अनेक छोटे-मोठे आश्रम होते . बडवाह गावात खूप आश्रम आहेत . घाटावरती गेलो . इथे नर्मदा मातेचे पात्र अतिशय गमतीशीर आहे . प्रचंड रुंदी आणि अतिशय कमी खोली असे सर्वत्र आहे ! खाली वाळू किंवा जमीन नसून संपूर्ण खडक आहे ! त्यामुळेच मराठ्यांचे सैन्य नर्मदा नदी पार करताना बहुतेक इथूनच पार करत असेल . कारण घोड्यांना नदी पार करण्यासारखी ही एकमेव जागा मला आढळली .नदीचा तळ समतल आहे आणि कठीण आहे . पाण्याची पातळी देखील मर्यादित आहे . पूर येण्याची शक्यता नाही कारण विस्तार खूप मोठा आहे . म्हणूनच ही जागा मराठ्यांनी नर्मदा पार करण्यासाठी शोधून काढली असावी . बाजीरावांची समाधी नजीक असण्याचे कारण देखील तेच आहे . इथेच नर्मदा पार करण्यापूर्वी काही काळ विश्रांतीसाठी ते थांबले असावेत . परंतु आजारपणाने घात केल्याने त्यांना नर्मदे काठीच चिरविश्रांती घ्यावी लागली .स्नानासाठी मी खेडी घाटावर गेलो इथे एक गंमतच झाली ! मी नर्मदा मातेच्या जवळपास गेलो की पादत्राणे खूप लांब कुठेतरी काढून ठेवायचो . त्याप्रमाणे नाइकीचे हिरवे बूट एका बाजूला काढून ठेवले .आणि त्या उथळ पाण्यामध्ये स्नानासाठी गेलो . कितीही पुढे गेले तरी पाणी उथळच होते .इथे मनसोक्त स्नान केले . इतक्यात माझे लक्ष काठाकडे गेले . दोन कुत्र्यांनी माझे दोन बूट तोंडात उचलले होते ! मी त्यांच्याकडे जाऊ लागताच दोघे पळून गेले ! अशा रीतीने माझे अकरावे बूट या श्वानांनी खेडी घाटावर लांबवले ! ती इतक्या वेगाने आणि इतक्या दूर पळाली की त्यांना गाठता येणे मला शक्य नव्हते .सुपारी दिलेल्या एखाद्या सराईत चोराप्रमाणे त्यांनी ही चोरी केली ! मी अंग पुसून पुन्हा अनवाणी पायांनी आश्रमात आलो . इथे श्रीकांत पुरंदरे नावाचे एक तरुण तेजस्वी गुरुजी पूजेसाठी म्हणून राहिलेले होते . त्यांना बघून मला सज्जनगडावर राहणाऱ्या श्रीपाद भट गुरुजींची आठवण झाली ! त्यांची प्रतिकृतीच जणू ! महाराजांनी बडवाह या गावांमध्ये एका कुटीमध्ये राहून तपश्चर्या केली होती असे मी त्यांच्या चरित्रामध्ये वाचले होते .मोटर च्या पंपहाऊस मध्ये बसून महाराज साधना करत असत . ती कुठे आहे असे विचारल्यावर गुरुजी मला म्हणाले की मी आता तिकडेच निघालो आहे ! मग त्यांच्याबरोबर मी ती कुठे बघून आलो . छोटासा आश्रमच होता . काल इथेच मी पाणी पिलो होतो हे मला आठवले ! तेव्हा मला ही जागा काहीतरी विशेष आहे असे जाणवले होते . संध्याकाळी पुन्हा तिथेच आलो ! मी झाडांना पाणी घातले . तिथली थोडीफार स्वच्छता केली . आणि परतलो . रात्री भोजन प्रसादी घेताना मला मंगलोरचा रामकृष्ण मठाचा परिक्रमा वासी मित्र भेटला .याची परिक्रमा खूप उत्तम चालली होती .रात्री खोलीमध्ये गरम होत आहे म्हणून गच्चीवर जाऊन झोपलो . मैयाचा थंडगार वारा सुटला होता . क्षणात झोप लागली !


श्रीराम महाराज यांचे समाधी मंदिर
श्रीराम महाराजांच्या आश्रमातील भव्य भोजन प्रसाद गृह . आता हे पाडण्यात आले आहे . रेल्वेच्या रुंदीकरणांमध्ये ही जागा गेली
खेडी घाटावरून दिसणारे नर्मदा मातेवरचे पूल
परमपूज्य गोंदवलेकर महाराजांची अतिशय सुंदर अशी पितळ्याची मूर्ती आश्रमात ठेवलेली आहे
आश्रमामध्ये लावलेले श्रीराम महाराजांचे हे कट आउट इतके वास्तववादी आहेत की बाहेरून जाताना आत मध्ये महाराज खरोखर बसले आहेत असे वाटते .
गोंदवलेकर महाराजांचे आणि श्रीरामाचे सुंदर मंदिर येथे आहे
आश्रमाच्या शेजारून गेलेला मीटर गेज रेल्वे चा जुना लोहमार्ग . आता दुर्दैवाने हा लोहमार्ग इतिहास जमा झाला आहे .
हा लोहमार्ग हटवताना रुंदी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आश्रमाचा काही भाग अशा रीतीने पाडला होता . त्याला आश्रमाने जरा देखील विरोध केला नाही किंवा हरकत घेतली नाही . 
श्रीराम महाराजांच्या समाधी मंदिराचा सभामंडप खरोखरच खूप मोठा आहे .
श्रीराम महाराजांची समाधी पाहिल्यावर गोंदवले सज्जनगड आणि कल्याण स्वामींची डोमगावची समाधी अशा सर्व रामदासी समाधी आठवतात
मंदिराचा कळस अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य आहे .खूप लांबून दिसतो
आश्रमाच्या याच भागामध्ये मी आईसाहेबांची भेट घेतली
आश्रमाचे सुंदर प्रवेशद्वार
मंदिराचा बाहेरून दिसणारा भाग . इथून प्रवेश नव्हता त्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराने मी आत गेलो .
प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या सद्गुरु श्रीराम महाराजांचे समाधी मंदिर आहे
नर्मदा मातेच्या काठावर बसलेले श्रीराम महाराज रामदासी .यांच्या तीन पायी परिक्रमा झालेल्या होत्या .
श्रीराम महाराज आणि आईसाहेब .
श्रीराम महाराजांची एक मुद्रा
गोंदवलेकर महाराजांची पूजा करताना श्रीराम महाराज .
श्रीराम महाराजांची एक प्रसन्न हास्य मुद्रा
श्रीराम महाराजांना वाहन चालवण्याची खूप आवड होती . श्रीराम जय राम जय जय राम हा १३ अक्षरांचा नाममंत्र त्यांना गुरूंकडून लाभलेला असल्यामुळे त्यांच्या सर्व गाड्यांचे क्रमांक तेरा तेरा असायचे .श्रीराम महाराजांचा गोंदवले गावानजीक अपघात झाला तेव्हा त्यांची स्कॉर्पिओ गाडी होती तिचा क्रमांक एम एच १३ सी यु १३ १३ असा होता .महाराज आईसाहेबांना म्हणायचे की ही गाडी सांगते आहे सी यु म्हणजे पुन्हा भेटूया ! परंतु याचा गूढ अर्थ कोणाला कळत नसे . 
श्रीराम महाराजांच्या आश्रमाचे बोधचिन्ह
श्रीराम महाराज आणि आईसाहेब यांची प्रसन्नमुद्रा
श्रीराम महाराज संस्थानचे सर्व कार्य आता आईसाहेबच बघतात
नर्मदा मैया च्या काठावर नामस्मरण करत बसलेले श्रीराम महाराज

एअर इंडिया कंपनीमध्ये कार्यरत असणारे अभियंता उगारचे श्री अनंत बर्वे त्यांच्या फोनवर त्यांचा आणि प्रस्तुत लेखक यांचा श्रीराम महाराज आश्रमात काढलेला फोटो . हा फोटो परिक्रमा पूर्ण झाल्यावर त्यांनी मला पाठवून दिला .

पुण्यातील चांदणी चौकाजवळ राहणारे श्री घोडके काका यांच्यासोबत प्रस्तुत लेखक
मंगलोर चा अशोककुमार
रामकृष्ण मठाचा साधक असलेला हा परिक्रमावासी भोजन कक्ष आणि गाडीतळ याच्यामध्ये उभा आहे

श्रीराम महाराज रामदासी यांच्या मठामध्ये उभा असलेला प्रस्तुत लेखक . मागे दिसणारे सर्व बांधकाम आता रेल्वे रुंदीकरणात पाडण्यात आले आहे . 
श्रीराम जय राम जय जय राम ! 

 सकाळी लवकर उठून मंदिरामध्ये जाऊन काकड आरती केली व सवाया देखील म्हटल्या .मंदिराचे सभागृह भव्य दिव्य असल्यामुळे सवायांचा आवाज चांगलाच दुमदुमत होता !मजा आली ! याच मार्गावरती अनेक छोटे मोठे आश्रम आहेत . परंतु मराठी परिक्रमावासी आवर्जून श्रीराम महाराजांच्या आश्रमातच थांबतात असे लक्षात आले . आईसाहेबांनी घरचा क्रमांक मागून घेतला आणि त्यांनी घरी संभाषण केले . माझी तशी काही इच्छा नसताना माझी खुशाली त्यांनी घरी कळवली . परिक्रमेच्या माझ्या नियमात बसणारे हे नव्हते .तात्काळ त्यांची परवानगी घेऊन पुढे निघालो . सामान घेण्यासाठी परत येशील तेव्हा पुन्हा एकदा राहा असे त्यांनी सांगितले . नर्मदे हर ! जय जय रघुवीर समर्थ चा जयघोष करून झोळी काठी उचलली ! पादत्राणे नव्हतीच त्यामुळे अनवाणीच पुढे निघालो ! आणि पुन्हा एकदा नर्मदा माईचा किनारा पकडला .





लेखांक एकशे पंचेचाळीस समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर