लेखांक १४४ : जलूदच्या जंगलातील एकांतप्रीय नागा बाबा आणि पथराडचे हनुमान
(अपूर्ण)
याच कट्ट्यावर मी भोजनानंतर काही काळ पडलो होतो
या भागातील जंगल कसे आहेत हे लक्षात येण्यासाठी हे उपग्रह चित्र पाहणे आवश्यक आहे !
लेपा बांध किंवा मंडलेश्वर बांध अवकाशातून असा दिसतो
हाच तो झोपाळा ! सात्यकी रॉय नामक जो छोटा बंगाली मला परिक्रमेत भेटला होता त्याच्या फेसबुक अकाउंट वर मला त्या झोपाळ्याचा हा फोटो मिळाला !
पथराडचे हनुमान जी
पथराडचे हनुमान दादा अजून एका श्रृंगारामध्ये
सेवा देण्यासाठी येणारे ग्रामस्थ
जगातील पहिले शिवलिंग मानले जाणारे गुप्तेश्वराचे स्थान मला फारच पवित्र वाटले . इथून पुढे निघालो आणि थोड्याच वेळात नर्मदा मातेवर एक पूल लागला . या पुलावरून ओंकारेश्वरला जाता येते . तो मागे टाकून डावीकडे वळलो . इथे शेजारी लेपा बांध किंवा मंडलेश्वर चा बांध असल्यामुळे मग याच्या जवळून जाता येत नाही . पंधरा पंधरा फूट उंच भिंतींची कुंपण घालण्यात आलेली आहेत . समोरच्या बाजूने चालताना अर्थात दक्षिण तटावरून चालताना मी लेपा बांधाची हीच भिंत चढून उतरलो होतो परंतु या बाजूला ते करता येणे शक्य होत नाही . इथून पुढे गेल्यावर १९७० साली इंदोर शहरासाठी बनवलेली प्रसिद्ध उपसा जल योजना लागते . तीन मोठाल्या नळ्यांमधून अर्थात पाईपलाईन मधून एक हजार अश्वशक्तीच्या आठ मोटर्स दिवस-रात्र पाणी उपसून इंदोर शहराला पाठवीत आहेत ! इथे एका गुप्त जागी एक साधू तपाचरण करीत बसलेले आहेत असे मला कळाले त्यामुळे ती जागा शोधायची असा निश्चय करून मी रस्ता सोडून जंगलामधून चालू लागलो . इथे खूप घनाघाट झाडी आहे . हे जलुद नावाचे गाव होते . लेपा बांध होणार म्हणून गाव इथून उठवले गेले परंतु बांधकाम पूर्ण झाला नाही .कर्मचाऱ्यांचे पगारही न केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी अखेरीस आपल्याच कंपनीचे लोखंड काचा वगैरे विकून तिथून पळ काढला . ८० च्या दशकातच पूर्ण झालेल्या या बांधावर वीजनिर्मिती होऊ शकणार होती परंतु ३२ रुपये प्रति युनिट या वाढीव दरामुळे कोणीही वीज खरेदी तयार होईना . खरे तर या बांधामागे वीजनिर्मिती हा हेतू दुय्यम असून काठावरील महत्त्वाची क्षेत्रे बुडवणे हाच प्रधान हेतू होता किंवा काय अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे .पूर्वी आपण पाहिले त्याप्रमाणे रावेर मधील बाजीराव पेशव्यांची समाधी किंवा सियाराम बाबा यांचा आश्रम आणि आता त्यांची समाधी अशी काही महत्त्वाची स्थाने त्याच्यामध्ये सहज आणि पूर्णपणे बुडणार होती किंवा अजूनही बुडू शकतात .असो .जलूद गाव जरी उठले तरी गावाचे मारुती मंदिर आणि भैरव मंदिर मात्र वाचले .एका अतिप्रचंड आणि पुरातन कडुलिंबाच्या वृक्षाखाली हे मारुती मंदिर होते .पारावरती ही दोन मंदिरे होती . इथेच शेजारी एक छोटीशी कुटी करून एक गुबगुबीत नागा बाबा राहत होते . छोटीशी अंधारी कुटिया होती . जमिनीपासून ही मंदिरे झाड व कुटिया थोडीशी उंचावरच होती . छोटीशी टेकडीच जणू .आत मध्ये पंखा टीव्ही फ्रीज वगैरे कुठलीही सुविधा नव्हती .शेकडो एकर जमिनीचा मालक असलेला हा मनुष्य वैराग्य आल्यामुळे सर्व जमीन भावाच्या नावावर करून सन्यास घेऊन नागा साधू बनला . याचा भाऊ दरमहा दोन हजार रुपये पाठवत असे . त्यावरच या साधूची संपूर्ण साधना , तपस्या चालू होते .दोन हजार रुपये प्रतिमाह मिळत असल्यामुळे भिक्षा मागण्याची वेळ त्याच्यावर येत नसे .तसेच अन्य भगतमंडळींचा गोतावळा उभा करण्याची गरज या साधूला वाटत नव्हती . शेतात चालणाऱ्या एका मोटरच्या सांडव्याचे अर्थात ओव्हर फ्लो चे पाणी २४ तास उपलब्ध व्हायचे . त्यामुळे पाण्याची देखील गरज नव्हती . साधू मैय्याकडे स्नानादीला जाण्याच्या ऐवजी मैयाच साधूच्या कुटीमध्ये येत होती ! मला साधूचे हे गुप्त स्थान सापडल्यामुळे खूप आनंद झाला . या स्थानाची माहिती मला इंदोर पाणी उपसा योजनेवर काम करणाऱ्या एका स्थानिक कर्मचाऱ्याचे दिली होती त्याचे मी मनोमन आभार मानले . नेमकी त्याची ड्युटी संपल्यामुळे पंप हाऊस सोडून तो घरी निघाला होता . आणि वाटेत मला भेटून त्याने या साधू बद्दल सांगितले होते . नर्मदा मातेला तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींना भेटवायचे आहे त्यांना ती बरोबर भेटवते असा अनुभव खूप वेळा आला . कुटीवर २४ तास कडुलिंबाच्या झाडाची गर्द छाया असल्यामुळे आत मध्ये एक सुखद गारवा होता . साधूने स्वतः देखील आजूबाजूला चांगले रान माजवले होते . एखादी जागा झाडून पुसून स्वच्छ करून मानवी वावराच्या खुणा दाखवण्यापेक्षा तिथे जंगल माजवून जणूकाही इथे कोणीच राहत नाही असा आभास साधूने उभा केलेला होता ! मी गेलो तेव्हा बाबा ध्यानस्थ बसलेले होते . त्यांची ती अवस्था उसनी नव्हती हे पाहताक्षणी लक्षात येत होते . सुमारे तासभर साधू त्याच अवस्थेमध्ये बसलेले होते . तासाभराने जेव्हा त्यांनी डोळे उघडले आणि समोर मला बसलेले पाहिले तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने स्मितहास्य करत माझे स्वागत केले . त्यांच्यासोबत माझे देखील थोडेसे ध्यान लागून गेले होते असे मला आठवते . आगीच्या शेजारी ठेवल्यावर मेणबत्ती जशी वितळते तसेच काहीसे माझे झाले . साधु महाराज मला काही प्रश्न विचारण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हते आणि मी कुठलेही उत्तर देण्याच्या अवस्थेमध्ये नव्हतो . दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद हाच आमच्या संवादाचा मुख्य दुवा होता ! मी कुठून आलो ? माझे गाव कुठले ? माझे नाव काय ? जात कुठली ? मी परिक्रमा कधी उचलली ? कुठून उचलली ? मी काल मुक्काम कुठे गेला ? मी पुढे कुठे जाणार आहे ? असा कुठलाही प्रश्न साधूने मला एकदाही विचारला नाही . कारण त्याला हे प्रश्न पडलेच नाहीत . मी देखील साधूला त्याचे नाव काय आखाडा कुठला वगैरे काहीही विचाराच्या भानगडीत पडलो नाही . समोर फुललेल्या अनेक फुलांपैकी मधुरसाने ओतप्रोत भरलेले फुल कोणते आहे हे भुंग्याला सांगावे लागत नाही . सूर्य नक्की कुठल्या दिशेला उगवला आहे याची चौकशी करावी लागत नाही . अगदी त्याप्रमाणे हा साधू खरोखरीच कितपत साधूत्वामध्ये आहे हे त्याच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान तेज आणि निवांतपणा खात्रीशीरपणे सांगत होता ! साधूने माझे स्वागत केले आणि इथे हवं तितकं रहा असे सांगितले . या मार्गाने कोणीच परिक्रमा वासी जात नाहीत हे सांगायला देखील तो विसरला नाही .
हाच तो भव्य कडुलिंबाचा वृक्ष ज्याच्या छत्रछायेखाली नागा बाबा राहत असे
मला बाबांची साधीसुधी कुटिया आणि समोरील मंदिर यांचा गुगल नकाशावर मिळालेला फोटोयाच कट्ट्यावर मी भोजनानंतर काही काळ पडलो होतो
या भागातील जंगल कसे आहेत हे लक्षात येण्यासाठी हे उपग्रह चित्र पाहणे आवश्यक आहे !
लेपा बांध किंवा मंडलेश्वर बांध अवकाशातून असा दिसतो
प्रत्यक्ष त्या भागातील झाडी इतकी घनदाट आहे .
हा नागा साधू वगळता येथे कोणीही राहत नाही .
इथे मी जो काही काळ व्यतीत केला तो पूर्णपणे सत्कारणी लागला आणि खूप चांगला सत्संग मला लाभला . पक्का साधू होता .साधुत्वाची सर्व लक्षणे ओतप्रोत त्याच्यामध्ये भरलेली होती . निस्पृह होता . निष्कलंक होता . निर्भय होता . निराहारी नव्हे परंतु अल्पाहारी होता . साधूला जागतिक राजकारणाची चांगली जाण आणि भान होते . गेली अनेक वर्ष सोबत मोबाईल वर्तमानपत्र काहीही न बाळगताही जागतिक समस्यांची इतकी सखोल माहिती या साधू महाराजांना कशी काय झाली असेल हे मला आजही न उलगडलेले कोडे आहे . इसराइल पॅलेस्टाईन प्रश्न असो किंवा रशिया युक्रेन समस्या असो किंवा चीन आणि शेजारी देशांची वादावादी असो ,साधूचा सखोल अभ्यास होता आणि स्पष्ट मते होती . साधू मनापासून मोदी भक्त होता असे मला जाणवले .युरोप मध्ये होणाऱ्या धार्मिक उलथापालथीची देखील त्याला पुरेशी माहिती होती . असे सर्व असून देखील संपूर्ण दिवस साधु महाराज आपल्या एकांत वासातील साधनेमध्ये व्यतीत करत होते . तिथे वीज नसल्यामुळे अंधार पडल्यावर ते झोपून जात . दुपारी उष्णता वाढू नये यासाठी त्यांनी आजूबाजूला भरपूर झाडी माजवली होती . तरी देखील उष्णता वाढली तर बाहेर त्यांनी बाथ टब च्या आकाराची एक टाकी बनवून घेतली होती त्याच्यामध्ये जाऊन ते म्हशीसारखे पडून राहत . अर्थात म्हशीसारखा हा शब्द त्यांनीच वापरला म्हणून मी सांगतो आहे ! असे काही मिनिटे पडून राहिल्यावर शरीरातली उष्णता कमी व्हायची आणि मग ते पुन्हा एकदा साधनेला बसायचे ! साधु महाराज शक्यतो कोणाचेही स्वागत करत नसत कारण त्यांनी एकांत वास प्रिय असल्यामुळे ही जागा निवडलेली होती . त्यांना लोकांताचे वावडे होते . परंतु नर्मदा मातेची असीम कृपा अशी होती की माझ्या बाबतीत मात्र त्यांनी अजिबात किंतु परंतु न बाळगता अतिशय प्रेमभाव व्यक्त केला . इथून पुढे खूप मोठे जंगल आहे त्यामुळे तो भोजन प्रसाद केल्याशिवाय जाऊ नको असे त्यांनी मला सांगितले . त्यांनी मला कणिक कशी मिळतात इथपासून ते त्रिकोणी आकाराचे भरपूर तेल लावलेले पराठे कसे बनवायचे हे शिकवले आणि माझ्याकडून बरेच पराठे करून घेतले. मी आयुष्यात पहिल्यांदाच असे पराठे करत होतो . साधूचा अभ्यास किती दांडगा आहे हे मला त्यांनी सांगितलेल्या बारकाव्यांवरून लक्षात आले . स्वयंपाक करणे हे देखील एक शास्त्र आहे . ती एक कला देखील आहे . शास्त्र आणि कला यांचा संगम जेव्हा साधनेच्या घाटावर होतो तेव्हा त्यातून निर्माण होणारे त्रिवेणी सृजन हे केवळ अविस्मरणीय असते . तेलाचे तापमान किती असावे , प्रत्येक पातळ थराची जाडी किती असावी , पिठी किती प्रमाणात वापरावी , लाटताना कितपत दाब द्यावा असे अनेक बारकावे त्यांनी मला शिकवले . भाजण्याची कला देखील शिकवली . त्यामुळेच पाकशास्त्र पारंगत असणाऱ्या माता-भगिनी या अत्यंत हुशार असतात असे माझे स्पष्ट मत आहे .आधुनिक भाषेत बोलायचे झाले तर त्यांचा बुद्ध्यांक हा इतरांपेक्षा थोडासा अधिकच असतो . त्यामुळेच त्यांच्या हाताला चव असते असे आपण म्हणतो . प्रत्यक्षामध्ये त्याच्यामागे फार मोठा अभ्यास ,अचूकता आणि नेमस्तपणा असतो . मी पराठे बनवण्याची कला पटपट शिकतो आहे हे पाहून त्यांना आनंद वाटला . तशी मला स्वयंपाकाची सवय होतीच . परंतु काही पदार्थ आपण प्रथमच पाहत असतो त्यातला हा प्रकार होता . भाजी देखील उत्तम सिद्ध झाली . दोघेही आकंठ जेवलो आणि मग त्यांनी मला पारावर विश्रांती घेण्याची सूचना केली . मला दुपारी शक्यतो झोप येत नाही . आणि चुकून माकून डोळा लागलाच तर जाग येत नाही .त्यामुळे मी झोपण्याऐवजी पडल्या पडल्या परिसर न्याहाळत बसलो .त्या लिंबाच्या झाडावर अनेक प्रकारचे पक्षी येत होते . अनेकांची तिथे घरटी होती . मला पक्षी निरीक्षणाची लहानपणापासून आवड आहे . पक्षी निरीक्षक किरण पुरंदरे यांची कृपा ! त्यांनी आमच्या शाळेमध्ये घेतलेल्या कार्यशाळांमध्ये मला ही आवड उत्पन्न झाली . जगन्नाथ कुंटे यांचे सुपुत्र कृष्णमेघ कुंटे हे देखील शाळेमध्ये सतत यायचे त्याच्यामुळे निसर्ग वाचनाची आवड निर्माण झाली . इतक्या तिथे तीन तरुण मुले आली . त्यांच्या मदतीने मी सगळा परिसर साफ करून घेतला . बाबांनी सर्वांसाठी एक मोठे कलिंगड कापले . ते खाल्ले आणि बाबांची रजा मागितली . नागा बाबा मला म्हणाला आपण आयुष्यात परत भेटू का नाही माहिती नाही . परंतु तुझ्याबरोबर घालवलेला हा थोडासा वेळ माझ्या नक्की लक्षात राहील . मला खात्री आहे की तू देखील मला विसरणार नाहीस . आणि ते खरंच होतं . या नागा बाबाचा बुद्ध्यांक बघितला तर तो कुठल्याही क्षेत्रामध्ये अतिशय उच्च पदावर पोहोचला असता हे सहज लक्षात येत होते . परंतु त्याने सर्वस्वाचा त्याग करून खरे साधुत्व पत्करले होते .त्याला महत्त्व आहे परंतु कोणाच्या ? ज्याच्याकडे काहीच नाही त्याने केलेला त्याग आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याने केलेला सर्वस्वाचा त्याग यात जमीन आस्मानाचा फरक राहतो . बाबाने खरोखरीच सर्वस्वाचा त्याग केला होता . आपले नाव देखील कळू न देणे हे किती महान संत असल्याचे लक्षण आहे पहा !उपाधी नको म्हणजे नकोच ! मला ते नागा बाबा सतत लक्षात राहतील . असे अनेक साधुसंत भेटवल्याबद्दल नर्मदा मातेचे किती आभार मानावेत ! या केवळ भेटीगाठी नसून या प्रत्येक भेटीतून नर्मदा मैया आपल्याला घडवत असते ! भविष्यासाठी तयार करत असते ! आपल्या भूतकाळातल्या सवयी बदलत असते ! बाबांचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा जंगलात घुसलो . इथे करोडो वर्षांपासून नर्मदा मातेने आणून घातलेला माती मिश्रित गाळ आणि वाळू असलेला असा सर्व परिसर आहे . वर इतके जंगल माजले आहे की खाली वाळू आहे हे लक्षात येत नाही . परंतु खोल खोल खड्डे काढून ही वाळू उपसून ती विकण्याचा मोठाच धंदा या भागामध्ये तेजी मध्ये आलेला आहे . हा भाग इतका घट्ट झालेला आहे की त्यामध्ये कितीही खोल गेले तरी पाणी लागत नाही . त्यामुळे खूप खोल खड्डे काढून वाळू उपसली जाते आणि विकली जाते . हे सर्व पूर्णपणे बेकायदेशीर कृत्य आहे . यावर कोणाचाही अंकुश नाही असे स्थानिकांशी बोलल्यावर लक्षात आले . ज्याला बांधकाम करायचे आहे तो इथे आपली स्वतःची गाडी घेऊन येतो आणि हवी तेवढी वाळू घेऊन जातो . त्या नादात आपण पर्यावरणाचे आणि या भागातील भूगोलाचे किती अतोनात नुकसान करत आहोत याचे भान कोणालाही नाही . अशा पद्धतीने वाळू काढण्याचे हजारो खड्डे इथे तयार झालेले आहेत . त्या प्रत्येक खड्डयाकडे जाणारी एक वाट आहे . प्रत्येक वाटेवर गाडीच्या चाकांच्या खुणा दिसतात . साधारण फुटभर खोलीचा फुफाटा सगळीकडे पसरलेला आहे . तो दिवसभर तापतो . त्यामुळे यातून चालताना संपूर्ण पाय भाजून निघतात . प्रचंड धूळ उडते . हाच फुफाटा गार असेल तर पायाला खूप सुखद वाटतो परंतु गरम असताना मात्र त्राहि माम् करून सोडतो ! तिथे चालताना तुम्ही कमीत कमी १०० वेळा वाट चुकू शकता !तसे होत असेल तर ते स्वाभाविक आहे असे समजावे ! एखादी पायवाट खूप अंतर आपल्याला चालून नेते आणि समोर असलेल्या एका मोठ्या वाळूच्या खड्ड्यामध्ये संपते . वाटांना अनेक उपवाटा फुटलेल्या आहेत . त्यामुळे तुम्ही ज्या वाटेने गेला त्याच वाटेने परत याल याची काहीच खात्री नसते . असा भूभाग मला समोरच्या तटावर देखील लागला होता . तिथे केलेल्या वाटचालीतून मी एकच अप्रतिम तोडगा शिकलो होतो . तो म्हणजे कुठल्याही प्रकारे पायवाटा किंवा मळलेल्या वाटा यांचा आधार न घेता केवळ नर्मदा मातेची दिशा एकदा लक्षात आली की तिला उजव्या हाताला ठेवून जी छोटी मोठी वाट समोर येईल त्या वाटेने चालत राहणे .अशा प्रकारच्या भूभागामध्ये गाडीच्या खुणा किंवा पाऊलखुणा या दोन्हींचा माग घेत चालणे हे धोकादायक ठरू शकते .जलूद गाव पार केल्यावर सुलगाव गोगावा अशी गावे शेता शेतातून पार केली . गोगावाच्या समोरच तेली भट्याण हे क्षेत्र आहे जिथे सियाराम बाबा राहायचे .त्यामुळे या गावातील बहुतांश लोक नाव चालवतात . उत्तर तटावरील लोकांना नावेने सियाराम बाबांकडे पोहोचवणे हा यांचा मुख्य व्यवसाय असतो . शेता शेतातून चालून खूप दमलो होतो . इतक्यात एका शेतात मोठ्या लिंबाच्या झाडाला एक झोपाळा टांगलेला दिसला ! ठिबक सिंचन च्या नळ्यांचा वापर करून झोपाळा विणलेला होता . त्यावर मस्तपैकी पडी टाकली . बराच वेळ झोपाळा घेत पडलो होतो . वारे पडलेले असेल तेव्हा झोपाळ्याचा खूप चांगला फायदा होतो . झोपाळा हलू लागला की आपोआप वारे लागू लागते .
नुकतेच सियाराम बाबा ब्रह्मलीन झाले तेव्हा या गोगावा गावातून पलीकडे जाणाऱ्या सर्व नावा बंद करण्यात आल्या होत्या , इतके लोक या ताटावर जमले होते असे मला त्याच काळामध्ये परिक्रमेत असणाऱ्या आणि तिथून जाणाऱ्या आपल्या एका वाचकांनी सांगितले . पुढे पथराड नावाचे गाव होते . तिथे पोहोचण्यासाठी मालन नावाची नदी पार केली . गावामध्ये भर वस्तीत हनुमंताचे मंदिर होते . समोर मंदिरापेक्षा मोठा दर्गा होता . या दर्ग्यामध्ये हिंदू लोक जास्त जाताना दिसले . देवळाला करतो तसा त्या दर्ग्याला लोक नमस्कार करत होते . काही लोक फक्त दर्ग्यासाठी आलेले देखील पाहिले . समोरच असलेल्या मारुती मंदिराकडे पाठ फिरवून यांची भक्ती सुरू होती ! मला हे दृश्य पाहून मोठे आश्चर्य वाटले . गिऱ्हाईक असल्याशिवाय माल खपत नाही हेच खरे . शाकाहारी लोकांच्या गावात पोल्ट्री फार्म कसा चालेल ! तो चालत असेल तर याचा अर्थ खाणारे लोक आहेत ! अगदी याच पद्धतीने आपल्या देशातील प्रार्थना स्थळे वाढत जात आहेत कारण तिथे जाऊन चादरी चढवणारे आपलेच लोक अस्तित्वात आहेत ! विरोध तिथे जाण्याला नाही . उत्तम पर्याय उपलब्ध असताना त्याकडे पाठ फिरवून तिथे जाण्याच्या गुलाम वृत्तीला आहे ! पथराडच्या मारुती मंदिरामध्ये पथारी पसरली . पथराडच्या मारुती मंदिरामध्ये एक परिक्रमा वासी चातुर्मासासाठी थांबला होता . निमाडीच होता . हुबेहूब श्री श्री रविशंकर ! बोलणे चालणे वागणे दिसणे सर्व काही तसेच ! मला मोठीच मौज वाटली ! हा इथे राहत होता खरा परंतु दुःखात होता . माझ्यापुढे व्यक्त झाला . गावातील काही लोक सेवा देण्यासाठी आले होते . त्यांच्याशी बोलताना मला एकंदरीत गावाचा अंदाज आला होता . हा बाबाजी कट्टर मोदी भक्त होता . आणि उभा गाव राहुल गांधी भक्त ! त्यातच याला उघडपणे गप्पा मारायची सवय होती .याच्या दुःखाचे हेच कारण होते . मला सल्ला विचारल्यावर मी त्या परिक्रमावासीला सदैव गप्प राहण्याचा सल्ला दिला .कारण त्याला अजून पाच सहा महिने काढायचे होते . गावकऱ्यांचा विरोध पत्करून राहता येणे शक्य नव्हते .
पथराडच्या हनुमान मंदिरामध्ये भोजन प्रसाद घेणारे परिक्रमावासीपथराडचे हनुमान जी
![]() |
पथराड येथील हनुमान मंदिर आश्रम |
रात्री मुक्कामासाठी अजून काही लोक आले . वर्धेच्या आंजीमुठी गावचा एक तरुण शिक्षक होता . आशिष रामदास वाटमोडे असे त्याचे नाव होते . अतिशय तेजस्वी होता आणि आनंदी स्वभावाचा तरुण होता . सतत हसतमुख ! त्याचे सोबत मंडला भागातील एक आदिवासी परिक्रमा वासी होता . हा देखील अत्यंत गुणी मनुष्य होता . काही काळ एकत्र गप्पा मारल्यावर तो माझ्यावरती अत्यंत खूष होऊन गेला . मी आशिषला काही फुकटचे सल्ले देत होतो ते त्याला आवडले असावेत किंवा मी केलेले मंडला भागाचे वर्णन त्याला आवडले असावे. ओंकारेश्वर वरून परिक्रमा उचललेल्या लोकांपेक्षा आता मी लौकिक अर्थाने थोडासा जुना परिक्रमा वासी ठरायचो ना ! अर्थात असे काही अजिबातच नसते पण यांना हे सांगावे कोणी आणि ऐकणार तरी कोण ! लोक आपले विचारत राहायचे की इकडे काय आहे ? तिकडे काय आहे ? वगैरे . आशिष च्या बाबतीत एक चमत्कार घडला होता ! २० एप्रिल रोजी खराब हवामानामुळे समुद्र पार करणाऱ्या नावा बंद झाल्या होत्या .त्यामुळे विमलेश्वर येथे दहा लोक अडकून पडले होते . इतक्यात गाडीने अजून पंधरा लोक आले .अखेरीस सर्वांच्या विनंती मुळे गुपचूप २५ दिनांक ला त्यांनी या २५ लोकांना एका खाजगी नावेने मिठीतलाईला सोडले . अमरकंटकहून परिक्रमा उचललेल्या आशिषला जेव्हा कळले की नावा बंद होणार आहेत तेव्हा त्याने तुफान चालायला सुरुवात केली ! अमरकंटक ते विमलेश्वर हे अंतर त्याने ३६ दिवसात कापले होते !हा तरुण फारच चालायचा ! चालून चालून तो इतका बारीक झाला होता की विचारू नका !त्याला चतुर्मास करण्याची इच्छा नव्हती त्यामुळे तो इतक्या वेगाने चालायचा .
सहपरिक्रमावासी आशिष रामदास वाटमोडे आंजीमुठी वर्धापथराडचे हनुमान दादा अजून एका श्रृंगारामध्ये
सेवा देण्यासाठी येणारे ग्रामस्थ
ज्याप्रमाणे गुरूत्तम दत्ताराम पाटील या पेणच्या तरुणाला मी वेगाने चालण्यासाठी काही मौलिक सूचना केल्या होत्या तशा सूचना आशिष वाटमोडे याला देखील केल्या . त्याला त्या पटल्या असाव्यात असे वाटले . इथे येणारी जी भगत मंडळी होती त्यात एक मोठ्या मिशा असलेला भक्त होता ज्याने कावड हातामध्ये घेऊन संपूर्ण नर्मदा परिक्रमा केली होती . त्याचा स्वभाव मला खूप आवडला .अत्यंत सेवाभावी आणि विनम्र असा तो मनुष्य होता . रात्री गरमागरम खिचडीचा प्रसाद खाल्ला . आश्रम लहानच होता परंतु सेवादारांच्या सेवाभावामुळे खूप मोठा वाटत होता . अतिशय आगत्याने ते येणाऱ्या परिक्रमावासीयांशी बोलत होते . पहाटे लवकर उठून मैयाचा किनारा पकडला . बेगांव अथवा बेहगांव , कवड्या , सिटोक्का , निमगुळ , अर्धनारेश्वर / धारेश्वर , दारुकेश्वर , खैगाव अशी गावे पार केली . आशिष आणि मंडलाचा आदिवासी यांना मी काठाने चालण्याची सूचना केली होती . परंतु ते तरीही वरच्या शेतातल्या रस्त्याने गेले आणि मी मात्र काठाने चालत राहिलो .अखेरीस पुढे दारूकेश्वर या ठिकाणी एकाच वेळी पोहोचल्यावर मात्र त्यांच्या लक्षात आले की काठाने चालल्यावर खरोखरीच अंतर लवकर तोडले जाते . दरम्यान मला पुन्हा एकदा वाळूचे खड्डे लागू लागले . कसाबसा रस्ता शोधून काढत चालत राहिलो . इथे मला एक मजेशीर प्रकार पाहायला मिळाला . एक छोटीशी नदी आडवी आली होती .तिचे नाव होते नान नदी . नान नदीमध्ये पाण्याचा थेंब नव्हता आणि नदीच्या पात्रात एक नाव उभी होती . एक माणूस अखंड त्या नावे मध्ये वाळू भरत होता . मी त्या माणसाला विचारले की अरे ही नाव तर जमिनीला टेकलेली आहे हिच्या मध्ये वाळू भरून तुला काय मिळणार आहे ? त्यावर तो माणूस मला म्हणाला की थोड्याच वेळात ओंकारेश्वर धरणातून पाणी सोडले जाईल . त्यानंतर या संपूर्ण भागात सहा फूट पाणी भरले जाते . हे पाणी अगदी काही काळासाठीच येते त्यामुळे तेवढ्या वेळात वेगाने नाव बाहेर काढावी लागते . हा प्रकार पाहून मला मोठीच मौज वाटली ! रात्री अपरात्री कधी ही पाणी सोडले जायचे तरीदेखील हे केवट लोक न घाबरता त्या तशा जंगलामध्ये पाणी पातळी वाढण्याची वाट बघत नावे मध्ये बसून राहत असत !
( अपूर्ण )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा