लेखांक १४३ : टेंबे स्वामी आणि गोंदवलेकर महाराजांच्या स्मृतीने पावन मंडणमिश्रांचे मंडलेश्वर आणि जगातले पहिले शिवलिंग गुप्तेश्वर
काठा काठाने चालताना खडक संपला आणि मऊ माती सुरू झाली . एखादे मोठे शहर जवळ आल्याच्या खुणा दिसू लागल्या . दुर्दैवाने या सर्व खुणा अतिशय वाईट आणि निंदनीय अशा आहेत . सर्वप्रथम माशा घोंगावू लागल्या . तदनंतर प्लास्टिकचा कचरा दिसू लागला . नर्मदा मातेच्या पाण्याचा प्रवाह दूषित भासू लागला . थोड्याच वेळात अतिशय घाणेरडे पाणी थेट मैया मध्ये नेऊन टाकणारे नाले आडवे येऊ लागले . त्यातच पाणी उपसणारी डोहकुपे बांधलेली दिसत होती . नक्की कुठले पाणी हे लोक पीत होते काय माहिती ! कसेबसे ते घाणेरडे नाले पार केल्यावर एक छोटासा रस्ता लागला . हे मंडलेश्वर नावाचे गाव होते . महेश्वर मंडलेश्वर ही तशी जोड गोळी . मंडलेश्वर म्हणजे प्राचीन महेष्मती नगरी ची मंडल गल्ली होती असे म्हणतात . आद्य शंकराचार्य जेव्हा धर्मप्रसारासाठी बाहेर पडले होते तेव्हा त्यांना आपल्या बुद्धी सामर्थ्याने आणि युक्तिवादाने जेरीला आणणारे मंडण मिश्रा आणि त्यांची पत्नी भारती मिश्रा यांचे हे गाव .अर्थातच शंकराचार्य हा शास्त्रार्थ जिंकले होते . आणिआज आपण कुंभमेळा किंवा पंचदशनामी आखाडे वगैरे जे काही पाहतो त्याची सुरुवात या शास्त्रार्थानंतरच झाली होती . परंतु ही नगरी किती प्राचीन आहे हे मला आपल्याला सांगायचे आहे . इथे अनेक छोटे मोठे घाट होते . पावला पावलावर मठ आणि मंदिरे आहेत . हरिहरेश्वर , गणेश्वर ,काशीविश्वेर , ऋणमुक्तेश्वर ,टोकेश्वर , अमरेश्वर , मलशमनेश्वर ,कालभैरव मंदिर , नृसिंह मंदिर , राधाकृष्ण मंदिर ,दत्त मंदिर , प्रगट हनुमानजी , गुप्तेश्वर ,छप्पन्न देव मंदिर अशी किती मंदिरे सांगावीत ! एका साधूने मला हाक मारली म्हणून मी त्यांच्या मंदिरात गेलो . रस्त्याच्या कडेलाच एक हनुमंताचे मंदिर होते . एका झाडातून स्वयंभू हनुमान प्रकट झाले होते . हेच ते झाडातून प्रकट झालेले प्रकट हनुमानजी
आता इथे अशी मोठी मूर्ती देखील स्थापन केलेली आहे व समोर नर्मदा मातेचे वाहन मगर तिची देखील मूर्ती पाहायला मिळते .
आता इथे अशी मोठी मूर्ती देखील स्थापन केलेली आहे व समोर नर्मदा मातेचे वाहन मगर तिची देखील मूर्ती पाहायला मिळते .
साधु महाराज जटाधारी होते व अशिक्षित होते . थोड्याच वेळात माझ्या असे लक्षात आले की त्यांच्या सर्वांगाला फंगल इन्फेक्शन झालेले आहे . साधु महाराज अखंड सर्वांग करा करा खाजवीत होते . आज-काल भारतामध्ये अचानक फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढलेले दिसते . याला अनेक कारणे आहेत . दूषित पाणी ,दूषित हवा , दूषित आहारामुळे दूषित रक्त हे सर्व याचे कारक आहेत . परंतु सर्वात महत्त्वाचा आणि दुर्लक्ष न करता येण्यासारखा एक मुद्दा आहे . एखादा रोग जेव्हा अचानक फोफावतो तेव्हा ते जैव युद्ध असण्याची शक्यता देखील असते ! शत्रु राष्ट्रातील लोकांना त्रास देण्यासाठी असे प्रकार करण्याचे प्रमाण अलीकडे वाढलेले आहे . विशेषतः संपूर्ण भारतभर या रोगाचा प्रसार झाल्याचे मला आढळले . दक्षिणेपासून उत्तरेकडे सर्वांनाच एकाच वेळी अचानक इतका त्रास कसा काय होऊ शकतो ! मोठे जलसाठे असतात त्यामध्ये काही विषाणू मिसळले की हे करता येणे खूप सोपे आहे . औषध विक्रेत्यांशी बोलल्यावर असे लक्षात आले की गेल्या पाच वर्षापासून अचानक फंगल इन्फेक्शन वरील औषधांची मागणी वाढलेली आहे . यामागे नक्की काहीतरी काळे बरे आहे एवढे निश्चित . मी साधू महाराजांना त्या रोगावर काय काय उपाय करता येतील हे त्यांची परवानगी घेऊन नम्रपणे सांगितले . महाराज म्हणत होते की हे माझे भोग आहेत . ते देखील बरोबरच होते . परंतु त्या भोगावर कोणी मात्रा सांगत असेल तर ती देखील परमेश्वरी इच्छा आहे असे मी त्यांना सांगितले आणि त्यांना ते पटले . सुरुवातीलाच जर त्यांनी उपाययोजना केली असती तर हा रोग इतका पसरला नसता हे माझे म्हणणे त्यांना पटले . आपल्या देशात पसरू पहाणारे अनेक रोग आहेत . त्यावर देखील वेळीच उपाय करणे इष्ट आहे . पाकिस्तानात जन्म झालेले एक महान व्यक्तिमत्व माझ्या नशिबाने माझ्या ओळखीचे होते . पंडित वसंतराव गाडगीळ हे त्यांचे नाव ! आपण सर्वांनी त्यांना अनेक विद्वज्जनांसोबत विविध व्यासपीठावर पाहिलेले आहे .
कै. पं . वसंतराव गाडगीळ
नुकतेच त्यांचे देहावसान झाले . त्यांचा जन्म आजच्या पाकिस्तान मधला ! त्यांनी जाणत्या वयामध्ये तो संपूर्ण भाग पालथा घातलेला होता . ते नेहमी सांगायचे की आम्हाला स्वप्नात देखील वाटले नव्हते की महाराष्ट्रापेक्षा मोठ्या मराठी शाळा असलेली कराची आणि लाहोर सारखी हिंदू बहुल शहरे कधी आपल्याला कायमची पारखी होतील ! वेळीच रोगावर उपाययोजना न केल्यामुळे अखंड भारत मातेच्या देहावरील पाकिस्तान , बांगलादेश , अफगाणिस्तान या रूपाने मोठे मोठे अवयव आपल्याला कायमचे कापावे लागले . त्यामुळे अखंड सावधान राहून योग्य वेळी योग्य उपाययोजना योग्य प्रकारे करणे हेच इष्ट असते हेच खरे . आपल्याला अशी उपाययोजना करता येत नसेल तर किमान जे उपाययोजना करत आहेत त्यांच्या पायात पाय न घालणे हे देखील फार मोठे धर्मकर्तव्य असते . असो . महाराजांनी आणलेला चहा मी आनंदाने प्यायलो . कारण पर्यायच नव्हता ! इथे मला एक केवट भगत भेटला . तो इतका हुशार , इतका विद्वान ,इतका व्युत्पन्न आणि इतका अभ्यासू होता की मला फार आश्चर्य वाटले ! माझ्याशी गप्पा मारत तो बसला . त्याने या संपूर्ण परिसराची इत्थ्यंभूत माहिती मला दिली . याचे नाव हरिराम केवट असे होते .
विजयलक्ष्मी साधौ यांचा आश्रम
मंडलेश्वर गावातून जर सडक मार्गाने आले तर हा घाट उतरताना उजवीकडे राम मंदिर लागते
मंदिर अतिशय सुबक सुंदर आणि नीटनेटके आहे
थोरल्या स्वामी महाराजांची प्रतिमा आणि नाना महाराज तराणेकर यांची मूर्ती
काशीविश्वेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार . इथेच गुफा आणि जहागीरदार यांचा निवास आहे
गुफेचा परिसर
समोरच दत्त मंदिर आहे
काशी विश्वनाथ मंदिरात याच कट्ट्यावर बसून मी काकांशी गप्पा मारल्या
दत्त मंदिर देखील समोरच आहे व सुंदर दत्त मूर्ती आहे
मा नर्मदा आश्रय स्थल नर्मदा तट मंडलेश्वर जिल्हा खरगोन मध्य प्रदेश माझ्या वहीतील आश्रमाचा शिक्का . हा १२७ वा मुक्काम होता .
मंडण मिश्रा भारती मिश्रा आणि आद्य शंकराचार्यांचे शिल्प
मंदिराचा रस्त्यावरील फलक
हे जगातील पहिले शिवलिंग असल्याचा पुराणात उल्लेख आहे असा लेखी प्रचार वारंवार केलेला आढळतो
ओंकार सेवा मिशनचे सेवाभावी कार्यकर्ते हा परिसर सांभाळतात असे दिसते .
हेच ते गुप्तेश्वर महादेवाचे विश्वातील सर्वप्रथम शिवलिंग
इथे येण्याचा मार्ग खरोखरच अतिशय अरुंद निमुळता आणि कठीण आहे
पूजनासाठी बसलेल्या माणसाच्या उजव्या हाताला कोपऱ्यात जो काळा खड्डा दिसतो आहे तिथून पाण्याचा अखंड झरा वाहत आहे .
शिवलिंग अतिशय सुंदर असून त्याचा स्पर्श दैवी आहे .
मागे पार्वती मातेची मूर्ती आहे .
मला त्याच्या ज्ञानाचे खरंच खूप कौतुक वाटले .पुढील काही गावांमध्ये त्याचे नातेवाईक कुठे कुठे राहतात ते देखील त्याने मला सांगितले . आणि जाताना त्यांच्याकडे थांबून सेवा घेण्याची विनंती केली . थोडेसे पुढे गेल्यावर विजयलक्ष्मी साधौ नामक काँग्रेस पक्षाच्या एका माजी खासदार माताराम चा आश्रम होता .
माजी खासदार डॉ विजयलक्ष्मी साधौविजयलक्ष्मी साधौ यांचा आश्रम
दारामध्येच नर्मदा मातेची सिमेंटची मूर्ती असून रात्री आश्रम असा झगमगतो .
तळमजल्यावर स्वयंपाक खोली असून पहिल्या मजल्यावर राहण्यासाठी मोकळा परिसर ठेवलेला आहे .नर्मदा मातेचे सुंदर दर्शन होत असल्यामुळे हा आश्रम खूप छान वाटला . इथे दर वर्षी पुराचे पाणी शिरते .
इथे राहणाऱ्या परिक्रमावाशींनी मला वर बोलावले म्हणून मी आसन लावले . इथे एक दांपत्य उतरले होते . पाहता क्षणी मी त्यांना ओळखले ! त्यांनी देखील मला लगेच ओळखले ! दतवाड्याच्या अलीकडे एकच किलोमीटर असलेला मोहीपुरा इथला जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आश्रम होता तिथली व्यवस्था हे दोघे पाहत होते . त्यावेळी काकांचे नाव विचारायचे राहिले होते . आता लक्षात आले की त्यांचे नाव शेरसिंग बाघावत असे आहे ! एकाच नावात दोन वेळा वाघाचा उल्लेख ! म्हणजे मनुष्य किती धडाडीचा , शूर आणि निर्भय असेल असे आपल्याला वाटते ! परंतु काका मात्र पत्नी पुढे पक्के मांजर होते ! गमतीचा भाग सोडून द्या . परंतु ते स्वभावाने खूप शांत आणि अंतर्मुख होते . या उलट काकू मात्र गपिष्ट , बहिर्मुख आणि अत्यंत हट्टी स्वभावाच्या होत्या . अशाच जोड्या चांगल्या टिकतात ! दोघेही बोल घेवडे असले तर मग ऐकायचे कोणी असा प्रश्न पडतो ! मुलेबाळे संसाराला लागल्यावर दोघांनी परिक्रमा उचलली होती . हा आश्रम मोठा मजेशीर होता . खाली मोठे सभागृह आणि भोजन व्यवस्था होती . पहिला मजल्यावर मोकळी जागा होती जिथे परिक्रमा वासी उतरायचे . दुसऱ्या मजल्यावर वातानुकूलित खोल्या होत्या . आश्रमाचे त्या वेळचे कर्मचारी हे अत्यंत आळशी उद्दाम आणि उर्मट होते ! परंतु सेवा देणारे काँग्रेस कार्यकर्ते मात्र स्वभावाने चांगले आणि गप्पिष्ट होते . ते सर्वजण सहकुटुंब संध्याकाळी आलेच त्यामुळे सर्वांशी परिचय झाला . इथला घाट स्नानासाठी अतिशय सुरक्षित आहे . कित्येक फूट लांबीचा सिमेंटचा घाट बांधण्यात आलेला आहे . त्यावर कमरे इतकेच पाणी असते . त्यामुळे ज्यांना पोहता येत नाही त्यांच्यासाठी अत्यंत सुरक्षित घाट आहे .
नावेच्या उजव्या हाताला आपल्याला पाण्याखाली बांधलेला मोठा चबुतरा दिसेल ज्यामुळे इथे स्नान करणे खूप सुरक्षित झालेले आहे .
मनसोक्त स्नान करून आलो . माझ्यासोबत बाघावत काका-काकू देखील आले . दोघांची मुले माझ्या वयाची होती . त्यांची लग्नं वगैरे करून देऊन हे बाहेर पडले होते . पाण्यामध्ये आल्याबरोबर काकूंमधील लहान कन्या जागी झाली ! आणि त्या पाण्यामध्ये लहान बाळासारख्या उड्या मारू लागल्या ! घाटावर अजून पन्नास एक लोक स्नान करत होते . काकूंना आजूबाजूच्या लोकांचे जरा देखील भान नव्हते . त्यांचा तो दंगा काका उद्विग्न आणि खिन्न नजरेने पाहत होते . मला त्यांची खूप दया आली . आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल तर ती स्पष्टपणे सांगता आली पाहिजे . समोरच्या व्यक्तीने देखील आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीला काय हवे काय नको त्याप्रमाणे आपल्या वर्तनामध्ये थोडाफार बदल केलाच पाहिजे .यालाच यशस्वी सहजीवन म्हणतात . आणि जर हे गणित जुळत नसेल तर शांतपणे आणि कोणतेही दुःख व्यक्त न करता स्वतंत्र राहता आले पाहिजे . ते जमत नसेल तर आयुष्यभर दुःख भोगणे याशिवाय दुसरे काहीही हातात राहत नाही !मग मीच पुढाकार घेऊन काकूंशी बोललो आणि त्यांना म्हणालो की तुमचे हे वागणे काकांना आवडत नाही असे दिसते . काकू म्हणाल्या , त्यांना कोण विचारते ! आणि हसत खिदळत पुन्हा नर्मदा जलामध्ये बागडू लागल्या ! आता आली का पंचाईत ! आपल्याला न विचारणाऱ्या व्यक्तीसोबत देखील ओढून ताणून राहणे हे किती लाचारीचे लक्षण आहे ! दोघेही आपापल्या स्थानावरून दोन दोन पावले पुढे मागे सरकले असते तर अधिक बरे चालले असते असे मला वाटले . म्हणजे काकांनी थोडासा स्वभाव बोलका केला असता आणि काकूंनी थोडेसे मौन धारण केले असते तर दोघे एकाच पातळीला आले असते .असो . शहाण्या माणसाने कधीही पती-पत्नीच्या भानगडीमध्ये नाक खूपसू नये असे पूर्वजांनी सांगून ठेवले आहे ! आपापसात भांडणारे दोघे कधी पलटी मारून क्षणात एक होऊन जातील हे ब्रह्मदेवालाही सांगता येत नाही ! त्यामुळे सूज्ञपणे मी तिथून काढता पाय घेतला . आणि पूजा पाठ आरती करून नगर दर्शनासाठी बाहेर पडलो .
काँग्रेसचा हा आश्रम झाल्यावर लगेचच पुढे भारतीय जनता पक्ष समर्थक असलेल्या आरती मंडळाचा आश्रम होता . इथे घाटावर ९० वर्षे जुने अतिशय सुरेख गोंदवलेकर महाराजांना समर्पित राम मंदिर होते . मोडक नावाचे एक रामदासी तिथली सर्व व्यवस्था पाहत होते . त्यांचे आजोबा रामदासी दीक्षा घेतलेले होते . एकदा त्यांना नर्मदा तटावर एक उदास बसलेला पारसी कॉन्ट्रॅक्टर दिसला .त्याच्या जवळ जाऊन त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले असता त्याची सर्व कंत्राटे लटकल्याचे आणि त्यामुळे आर्थिक दृष्ट्या बेजार झाले असल्याचे त्यांनी सांगितले . बुवांनी त्याला नर्मदा मातेच्या साक्षीने राम नाम दिले आणि त्याचा अखंडित जप करायची सूचना केली . पारसी मनुष्याला साक्षात परमेश्वर भेटल्यासारखे वाटले आणि त्याने मनोभावे रामनाम स्वीकारले . त्यामुळे लवकरच तो विपन्नावस्थेतून बाहेर आला ! बुवा त्याला म्हणाले की चल तुला गोंदवल्याला नेतो आणि तिथून तू नामाची दीक्षा घे . परंतु हा पारसी मनुष्य बुवांनाच गुरु मानून बसला आणि काहीतरी मागा म्हणू लागला . मग बुवांनी नर्मदेच्या काठावर भव्य राम मंदिर बांधण्याचा मानस व्यक्त करताच तत्काळ त्याने सुंदर असे मजबूत , सुबक व अत्यंत सुंदर राम मंदिर बुवांना बांधून दिले .शेजारीच त्यांना राहण्यासाठी मोठे घर बांधून दिले.त्यामुळेच मोडकांच्या वाड्यावर पारसी वास्तु शैलीचा प्रचंड प्रभाव जाणवतो .
मोडकांच्या राम मंदिराचे प्रवेशद्वारमंडलेश्वर गावातून जर सडक मार्गाने आले तर हा घाट उतरताना उजवीकडे राम मंदिर लागते
मंदिर अतिशय सुबक सुंदर आणि नीटनेटके आहे
मंदिर परिसरात मोठमोठे वृक्ष लावलेले असून त्यांची वेळोवेळी छाटणी केली जाते .
मोडक काकांनी माजी अतिशय प्रेमाने चौकशी केली आणि मला घरी घेऊन गेले . आधी बालभोग घेऊ आणि मग मंदिरात दर्शनाला जाऊ असे ते मला म्हणाले . त्यांनी मला उपीट आणि आमरस खायला दिला . मंदिर पाहून आल्यावर चहा घेऊया म्हणाले . त्यांची कन्या नातवंडे वगैरे त्यांना भेटण्यासाठी आलेले होते . हे परदेशात राहत असल्यामुळे इंग्रजी बोलायचे . मी इंग्लिश बोलतो आहे हे पाहून त्या लहान मुलांना फार आश्चर्य वाटले ! मंदिर अतिशय सुंदर आहे . सज्जनगड प्रमाणे या ही मंदिराला खाली एक दालन केलेले आहे . इतके भव्य दिव्य मंदिर असून देखील महापुरामध्ये राम रायांच्या चरणापर्यंत पाणी कधी कधी येते . गेल्या वर्षी आलेल्या ( २०२३ ) महापुरामध्ये मात्र या मंदिराचे फारच नुकसान झाले आहे असे पुन्हा गेलो होतो तेव्हा कळाले . गतवर्षी पुन्हा एकदा मंडलेश्वरी दर्शनाला गेलो होतो तेव्हा मंदिराचे काही फोटो मी काढले . ते पाहूयात .
मंडलेश्वर येथील श्री रामप्रभू
मंदिराची वास्तु शैली फारच अप्रतिम आहे तसेच मोडक कुटुंबीय या मंदिराला खूप सुंदर असे रंगकाम दरवर्षी करतात .
या मंदिराची स्थापना गोंदवलेकर महाराजांनी केली आहे असे बऱ्याच लोकांना वाटते . परंतु महाराजांनी स्थापना केलेली नसून इथे महाराजांची वस्त्रे ठेवलेली आहेत . पूजेमध्ये असलेली ही वस्त्रे शक्यतो कोणाला दाखवली जात नाहीत परंतु काकांनी मात्र मला आवर्जून त्या वस्त्रांची पेटी बाहेर आणून वस्त्राचे स्पर्श दर्शन घेऊ दिले . परिक्रमावासी असल्याचे असे काही फायदे असतात !परिक्रमा उचललेल्या मनुष्याला नर्मदा मातेचा व्ही व्ही आय पी पास मिळतो ! अलीकडे ती वस्त्रे एका काचपेटीमध्ये बाहेरच दर्शनासाठी ठेवलेली आहेत . असो . गोंदवलेकर महाराजांच्या वस्त्राला स्पर्श केल्याबरोबर संपूर्ण अंगातून आनंद लहरी दौडू लागल्या ! लहानपणापासून गोंदवल्याला माझे जाणे येणे आहे . आमच्या सांगली भागातील शाळेच्या सर्व सहली गोंदवल्यालाच जायच्या ! सर्व मुलांचे एक वेळचे जेवण तिथे निघते असा साधा सोपा हिशोब त्यात असायचा ! केवळ एक छोटेसे मंदिर इथपासून आता श्रीक्षेत्र गोंदवले म्हणून झालेला या गावाचा भव्य दिव्य विस्तार या गोंदवल्याच्या प्रवासाचा अनेकांप्रमाणे मी एक मूक साक्षीदार आहे . २५ तास अखंड नामस्मरण या संकल्पनेचा चैतन्य राम नाम जप संकुल या नावाने प्रचार प्रसार करणाऱ्या पोस्टमन काका नावाच्या एका सत्पुरुषांच्या प्रकल्पामध्ये देखील मी सहभागी होत असे . महाराजांचा संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे म्हणून मी महाराजांचा पोस्टमन आहे इतका उदात्त भाव त्यांच्या या नावामागे होता ! त्यांचे चिरंजीव नंदू काका जोशी आता हे संकुल उत्तम रीतीने चालवतात .एका गावामध्ये जर ३६५ घरामध्ये जर रोज एका घरात याप्रमाणे २५ तासाचा अखंडित रामनाम जप सुरू असेल तर त्या गावाला नामग्राम म्हटले जाते. अशी आठ दहा नामग्रामे आता तयार झालेली आहेत ! त्यांना प्रथमपासून प्रचंड साथ देणाऱ्या नामतपस्विनी सौ अश्विनी देउस्ककर काकू यादेखील मला मुलगा मानत असत . नुकताच त्यांनी देह ठेवला तेव्हा त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी गोंदवले क्षेत्री नेण्याचे भाग्य मला त्यांच्या जुळ्या मुलांसोबत लाभले . आरती मंडळाची आरती देखील आपल्या घरी झालेली आहे . असो . सांगण्याचे तात्पर्य हेच की गोंदवलेकर महाराज प्रणित नाममार्गावरचा मी देखील एक प्रवासी आहेच ! त्यामुळे मला इथे आल्यावर माहेरी आल्यासारखे वाटले !
मोडकांचे बंधू इंदोर पुणे आदि ठिकाणी राहतात असे त्यांनी मला सांगितले . घर नदीच्या उतारावर बांधलेले असल्यामुळे एक मजला खाली उतरणारा तर दुसरा मजला चढल्यावर गच्चीच्या पातळीला पोहोचताच समोर बाहेरच्या रस्त्याची सपाटी असे गमतीशीर काहीतरी पाहायला मिळाले . या मंदिराच्या मागे उत्तम पैकी बांधलेल्या पडव्या धूळ खात पडलेल्या होत्या . मंदिराची रंगरंगोटी मात्र अतिशय सुंदर पद्धतीने केली जाते . एकंदरीत मंदिर खूप सुस्थितीत राखले आहे . सवयीप्रमाणे मी या गावांमध्ये पाहण्यासारखे अजून काय काय आहे ते मोडक काकांकडून समजून घेतले . टेंबे स्वामींनी चातुर्मास केलेली एक गुफा पाहण्यासारखी आहे असे मला सांगण्यात आले . इथे एक दत्ताचे मंदिर आहे . आणि समोरच्या बाजूला एका वाड्यामध्ये ही गुफा आहे . अनिल जहागीरदार नावाचे एक मराठी काका हे सर्व सांभाळतात . काकांचा स्वभाव अतिशय बोलका आहे . त्यांची एकंदर शरीरयष्टी आणि चेहरेपट्टी अक्कलकोट स्वामींसाठी आहे असे मला उगाचच वाटले . तसे मी त्यांना बोलून देखील दाखवले . हे मला सांगणार तू पहिला नाहीस असे देखील काकांनी हसत मला सांगितले ! टेंबे स्वामींची ध्यान गुफा अतिशय सुंदर आहे . छोटीशीच खोली असून खाली वाकून आत जावे लागते . परंतु आत गेल्याबरोबर तिथली ऊर्जा आपल्याला जाणवू लागते . या छोट्याशा खोलीला काकांनी वातानुकूलन यंत्र अर्थात एसी बसवला आहे . इथे इंदूरच्या नाना महाराज तराणेकरांची एक सुंदर मूर्ती मला दिसली . ती जहागीरदार काकांना नर्मदा मातेमध्ये सापडली असे त्यांनी मला सांगितले .
टेंबे स्वामींच्या ध्यान गुंफे मध्ये बसलेले जहागीरदार काकाथोरल्या स्वामी महाराजांची प्रतिमा आणि नाना महाराज तराणेकर यांची मूर्ती
काशीविश्वेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार . इथेच गुफा आणि जहागीरदार यांचा निवास आहे
गुफेचा परिसर
समोरच दत्त मंदिर आहे
काशी विश्वनाथ मंदिरात याच कट्ट्यावर बसून मी काकांशी गप्पा मारल्या
दत्त मंदिर देखील समोरच आहे व सुंदर दत्त मूर्ती आहे
काकांचा इथेच राहा म्हणून आग्रह चालू झाला . तसा होण्याची शक्यता आहे हे मला मोडक काकांनी आधीच सांगून ठेवले होते . त्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला परंतु उद्या सकाळी जाताना चहाला तरी यावेच लागेल अशी प्रेमळ तंबीच त्यांनी मला दिली . परतीच्या वाटेवर एका बाजूला राधे राधे बाबांचा आश्रम आहे . तिथे देखील गेलो . बाबा अतिशय तेजस्वी आणि अति प्रेमळ स्वभावाचे होते .त्यांनी पुन्हा एकदा मला मोठ्या प्रेमाने फरसाण खाऊ घातले आणि चहा पाजला . त्यांच्या त्या छोट्याशा आश्रमातून मैयाचे खूप छान दर्शन होत होते . रात्री जेवायला ये आपण आमरस पुरी खाऊ असा आग्रह त्यांनी धरला . परंतु मी माझे असं लावलेले आहे असे त्यांना सांगितल्यावर ते मला म्हणाले मग सकाळी न विसरता ये तुझ्या नावाचा आमरस मी फ्रीजमध्ये काढून ठेवेन . सर्व मंदिरे पाहून मैया मध्ये घाटावर स्नान करून रात्री भोजन प्रसादी घेतली . भोजन प्रसादी अतिशय उत्तम पद्धतीने बनवली जात होती . आश्रमाचे कार्यकर्ते अतिशय तत्परतेने काय हवे नको ते पाहत होते . बाहेर गेल्यावर लक्षात आले की सर्व कार्यकर्ते सहकुटुंब तिथे येऊन रोज गप्पा मारत बसतात . त्यांच्याशी गप्पा मारता मारता सुमारे अडीच तीन तास कसे सरले लक्षातच आले नाही ! आश्रमाचे कर्मचारी वेगळे आणि कार्यकर्ते वेगळे असे चित्र होते . कर्मचारी थोडेसे त्रस्त वैतागलेले आणि उद्धट वाटत होते परंतु कार्यकर्ते मात्र उत्साही आणि सेवाभावी होते . मी कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारतो आहे हे पाहिल्या मुळे बहुतेक रात्री उशिरा एक कर्मचारी माझ्याकडे आला आणि गुपचूप मला उठून त्याच्यामागे येण्याचा इशारा करून चालू लागला . जिना सोडून तो वर गेला त्याच्या मागे मी वर गेलो . इथे त्याने मला एक खोली उघडून दाखवली जी वातानुकूलित खोली होती आणि आत मध्ये हॉटेल सारखा डबल बेड आणि संडास बाथरूम जोडलेले असा सर्व प्रकार होता . मला म्हणाला आप यहा सोना बाबाजी . मला एकट्यालाच इथे झोपायला का सांगत आहे ? असे विचारल्यावर तो म्हणाला की तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांचे मित्र आहात म्हणून तुमची काळजी घेतली पाहिजे ! मला या प्रकाराचे फार हसू आले ! मुळात मी कोणाचाही मित्र वगैरे नव्हतो . आणि जरी असलो तरी कधीही कुठेही कोणाकडूनही अशी विशेष सुविधा घेण्याचे आपल्या रक्तातच नाही त्याला काय करावे ! मी त्याला पुन्हा एकदा नम्रपणे नकार दिला ! आता मात्र माझ्यातले वैराग्य जागृत झाले आणि मी गादीचा देखील त्याग करून खाली जाऊन जमिनीवर उघड्यावर रात्रभर झोपलो . ती केवळ जमीन नव्हती . चातुर्मासामध्ये नर्मदा माता धुवून काढते असा तो पवित्र परिसर होता ! नर्मदा मातेमध्ये वाहून येणारे कण त्या भूमीच्या अंगा प्रत्यंगात साठलेले होते . याच्यापेक्षा आरामदायी शैय्या कुठला असू शकणार ? पहाटे लवकर उठून पुन्हा एकदा घाटावर जावून स्नान केले . परिक्रमेमध्ये अशा पद्धतीने उघड्यावर झोपण्याची सवय लागल्यामुळे अंगाखाली काय अंथरलेले आहे किंवा अंगावर काय पांघरले आहे याचा झोपेशी काहीही संबंध राहिलेला नाही तो कायमचाच ! पहाटे नर्मदा मातेमध्ये स्नान करणे यासारखे पुण्याचे काही नसते ! अंधार असतो . आपल्याला काही दिसत नसते . परंतु तरी देखील नर्मदा मातेची किंवा तिच्यामध्ये असलेल्या जलचरांची भीती अजिबात वाटत नाही ! भीतीहारी वर्मदे अशी ती नर्मदा आहे ! शेरसिंग बाघावत पती-पत्नी देखील आले . त्यांनी मला टपरीवर चहा पाजला . माझ्यासोबत कोणी येऊ नये म्हणून मी हळूच सामान उचलले आणि पोबारा केला . रात्रीच शिक्का वगैरे घेतला होता .
मा नर्मदा आश्रय स्थल नर्मदा तट मंडलेश्वर जिल्हा खरगोन मध्य प्रदेश माझ्या वहीतील आश्रमाचा शिक्का . हा १२७ वा मुक्काम होता .
शक्यतो परिक्रमावासी मुक्कामाच्या ठिकाणावरून पुढे जाताना गर्जना करीत किंवा गाजावाजा करीत निघतात . मी याच्या अगदी उलट हळूच सटकून जात असे . कारण कोणी सोबत चालण्यासाठी गळ्यात पडू नये हा त्यामागचा मुख्य हेतू ! चालता चालता मला आठवण झाली की राधे राधे बाबांनी आमरस खायला बोलावले आहे . मला असे वाटले की बाबा विसरून गेले असतील त्यामुळे जायला नको . सकाळी ते मौनामध्ये साधना करायचे . परंतु एकदा त्यांचे दर्शन तरी घ्यावें म्हणून गेलो . आश्रमामध्ये गेल्यावर लक्षात आले की बाबा तिथे नव्हतेच परंतु जगदीश पाटीदार नावाच्या एका सेवादाराला तिथे ते माझी वाट बघत उभा करून गेलेले होते ! जगदीश पाटीदार केवळ आणि केवळ मी येण्याची वाट पाहत तिथे बाहेर गच्चीमध्ये उभा होता ! मी आल्याबरोबर त्याने कुलूप उघडले आत मध्ये जाऊन फ्रीज उघडला आणि माझ्यासाठी काढून ठेवलेला मोठा पेलाभर अप्रतिम अमृतमय आमरस मला दिला ! तो गारेगार आमरस पिऊन रात्रभर जमिनीचा थंडावा शोषून गार पडलेले माझे शरीर अजूनच गार झाले ! साधू वचनाचे किती पक्के असतात याची अनुभूती पुन्हा एकदा आली . आपण गृहस्थी लोक वचन पाळणे बिळणे या भानगडीत फारसे पडतच नाही की काय असे वाटते ! कदाचित मी माझ्या मनाचे ऐकून बाबांकडे कशाला जायचे बाबा विसरले असतील असा विचार करून पुढे निघालो असतो तर हा पाटीदार माझी वाट पाहत तिथे किती वेळ थांबला असता विचार करून पहा ! धन्य ते गुरु आणि धन्य त्यांचा शिष्य ! मला असे वाटले की जगदीश पाटीदार यांचे अजून काहीतरी काम असेल .परंतु मी निघाल्यावर कुलूप लावताना त्यांनी मला सांगितले ते केवळ माझ्यासाठीच थांबलेले होते . आणि सुमारे तासभर थांबलेले होते ! कारण बरेचदा परिक्रमावासी फार लवकर निघून जातात म्हणून राधे राधे बाबांनी त्यांना सकाळी लवकरच येऊन थांब असे सांगितले होते . सगुण भक्ती कशी करावी आणि भक्तीमध्ये प्रेम कसे असावे हे मी राधे राधे बाबांकडे पाहून अगदी सहज शिकलो ! मी पाटीदार ला विचारले की समजा मी आलो नसतो तर तू काय केले असतेस ? तुम्हाला यावेच लागले असते कारण माझ्या गुरुदेवांचा तसा निरोपच मला होता ना ! त्यांचे हे वाक्य ऐकले आणि एका वाक्यात मला गुरुभक्ती म्हणजे काय किंवा गुरु वाचनावर श्रद्धा ठेवणे म्हणजे काय याचा अर्थ उमगून गेला ! परिक्रमा ही अशा पद्धतीने तुम्हाला हसत खेळत जाता येता अध्यात्मातले मूलभूत सिद्धांत शिकवून जाते ! त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही . फक्त आपले मन , डोळे ,कान आणि मेंदू सतत उघडे ठेवावे लागतात ! शिकार करण्यापूर्वी वाघाची जशी उत्कटपणे सावध अवस्था असते , दशेंद्रियांचे कान करून जसा तो बसलेला असतो तशी सावध अवस्था , किंवा पौर्णिमेच्या चांदण्याचे प्राशन करण्यासाठी चकोर किंवा चातकपक्षी जसा आ वासून बसलेला असतो , तशी उत्कट अवस्था संपूर्ण नर्मदा परिक्रमेमध्ये साधकाची असावी असे वाटते . त्याशिवाय सावज अर्थात आत्मबोधाचे अमृत कण हेरता येणे कठीणच आहे . असो . इकडे जहागीरदार काका देखील माझी वाट पाहत बसले होते . मराठी माणसे परिक्रमेमध्ये आल्यावर त्यांना विशेष आनंद होतो असे मला जाणवले . जे स्वाभाविक आहे . त्यांनी मला चहा तर पाजलाच परंतु सोबत सातूचे पीठ देखील दिले . सातूचे पीठ किंवा सत्तू म्हणजे नक्की काय असते हे जाणून घेण्याची इच्छा मी व्यक्त केल्यावर त्यांनी मला सातूचे पीठ बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली . गहू भिजत घालून ते फुगल्यावर पुन्हा एकदा उन्हामध्ये वाळवले जातात त्यानंतर ते भाजून दळून त्याच्यामध्ये भाजलेली चणाडाळ असते तिचे पीठ घालून जे मिश्रण बनवितात त्याला सातूचे पीठ असे म्हणतात . याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालून पाण्यामध्ये कालवून ते खाता येते किंवा दूध आणि ताका बरोबर देखील खाता येते . मुठभरच सातूचे पीठ खाल्ल्यावर भूक लागत नाही इतके सत्व त्याच्यामध्ये असते . त्यामुळे साधू लोकांचा हा आवडता शिधा आहे असे काकांनी मला सांगितले . थोडेसे सातूचे पीठ कालवून त्यांनी मला खायला शिकवले ! सोबत सोन केळी दिली .पैसे देखील हवे आहेत का असे विचारत होते परंतु मी नम्रपणे नकार दिला . परिक्रमावासींना जे हवे ते देण्याचा माझा नियम आहे असे काकांनी सांगितले . अखेरीस आता मला आपली जी प्रेमळ संगती आहे तिची रजा हवी आहे अशी विनंती मी केली व काकांनी मला ती देऊन टाकली ! इथून पुढे मंडलेश्वरच्या किल्ल्याचा भाग लागतो ज्याचे रूपांतर सरकारने आता केंद्रीय कारागृहामध्ये केलेले आहे .त्यामुळे अगदी नर्मदा मातेच्या काठावर असलेल्या या किल्ल्याच्या नर्मदा मातेकडील बाजूने कोणालाही जाता येत नाही ,कारण हा प्रतिबंधित परिसर झालेला आहे .इथे सतत बंदूकधारी पोलिसांचा पहारा असतो त्यामुळे इथून अजिबात जाऊ नको असे मला सर्वांनीच सुचविले . किल्ल्याच्या बाजूने आल्यावर छप्पन्न देव मंदिर पाहिले . इथे चार बाजूला चार देव होते . वाकड्या कपाळाची तापट डोळ्यांची छछप्पन देवाचे मंदिर
छप्पनदेवाच्या विविध भावमुद्रा
छप्पन्नदेवाची मूर्ती मोठी भयानक परंतु मजेशीर होती .
छप्पनदेवाच्या विविध भावमुद्रा
छप्पन्नदेवाची मूर्ती मोठी भयानक परंतु मजेशीर होती .
महेश्वर आणि मंडलेश्वर या गावांमध्ये घरोघरी हातमाग आहेत व लाखो रुपयांच्या महेश्वरी साड्या इथे दिवस रात्र बनविल्या जातात .चालताना या हातमागांचे आवाज ऐकू यायचे आणि तत्क्षणी मनामध्ये कबीरदासांच्या झीनी झीनी बीनी चदरिया या भजनाचे गायन मनन चिंतन स्मरण सुरू व्हायचे . हे अतिशय सुंदर भजन असून मला फार आवडते . आपल्या देहाला वस्त्राची उपमा देऊन कबीरदासांनी त्या हातमागाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेले आहे !
सो चादर सुर नर मुनि ओढे । ओढ के मैली किनी चदरिया । असे या अंग वस्त्राचे वर्णन करतानाच आपण मात्र हा देह फार जपून वापरतो आहोत असे सांगताना कबीर म्हणतात दास कबीर जतन से ओढी । ज्यों की त्यों धर दिनी चदरिया ॥
या सुंदर भजनाचा रसास्वाद ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजातील किंवा कुमार गंधर्व व अन्य अनेक महान गायकांच्या आवाजातील हे पद जरूर ऐकावे .
झीनी झीनी बीनी चदरिया ॥
काहे कै ताना काहे कै भरनी,
कौन तार से बीनी चदरिया ॥ १॥
इडा पिङ्गला ताना भरनी,
सुखमन तार से बीनी चदरिया ॥ २॥
आठ कँवल दल चरखा डोलै,
पाँच तत्त्व गुन तीनी चदरिया ॥ ३॥
साँ को सियत मास दस लागे,
ठोंक ठोंक कै बीनी चदरिया ॥ ४॥
सो चादर सुर नर मुनि ओढी,
ओढि कै मैली कीनी चदरिया ॥ ५॥
दास कबीर जतन करि ओढी,
ज्यों कीं त्यों धर दीनी चदरिया ॥ ६॥
चालता चालता कुणालाही ध्वनी प्रदूषण वाटू शकेल असा वाटणारा तो हातमागाचा आवाज अशा रीतीने केवळ सत्संगतीमुळे किंवा संत वचनांच्या स्मरणामुळे एक सखोल चिंतन ज्वाला प्रज्वलित करून गेला .
भजनाची एक वेगळीच उंची त्या आवाजाने गाठून दिली . त्या चिंतनामध्ये चालता चालता मी कधी गुप्तेश्वर महादेवां पाशी आलो हे माझे मलाच कळले नाही ! नर्मदा मैया च्या काठावर हजारो नव्हे , लाखो नव्हे तर शब्दशः करोडो शिवलिंगे आहेत . मग याच महादेवांचे असे वैशिष्ट्य काय ? तर हे स्वतः भगवान शंकरांनी स्थापित केलेले जगातील पहिले शिवलिंग आहे असे मानले जाते ! कसरखाली नामक एका नदीच्या रम्य तीरावर हे छोटेसे मंदिर वसलेले आहे . मंदिर इतके छोटे आहे की एकावेळी एकच मनुष्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकतो आणि पूजा करू शकतो . मंदिर खोल खड्ड्यामध्ये असून उतरण्यासाठी एक मार्ग आहे आणि बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग आहे .आजूबाजूला घनदाट वृक्षराजी आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की इथे शिवलिंगावर सतत अभिषेक करण्यासाठी एक झरा निर्माण झालेला आहे जो अहोरात्र वाहतच आहे . त्याचे पाणी साठलेले असल्यामुळे गर्भगृहामध्ये बसता येत नाही . लिंग झिजलेले आहे आणि संगमरवराचे आहे परंतु सतत हळद-कुंकू वगैरे वाहिले गेल्यामुळे त्याला मानवी त्वचेचा रंग प्राप्त झालेला आहे आणि हे शिवलिंग दोन्ही हाताने जर आपण पकडले तर अक्षरशः मानवी त्वचेला स्पर्श करतो आहोत की काय असा भास होतो इतके ते जिवंत आणि जागृत आहे ! अन्य कुठल्याही शिव मंदिरामध्ये आपल्याला जाणवणार नाही असा स्पर्श या शिवलिंगाला जाणवतो . असाच स्पर्श केदारनाथाच्या शिवलिंगाला देखील जाणवल्याचे मला लगेच आठवले . हे स्थान मोठेच पवित्र आणि अद्भुत आहे . इथे फारशी वर्दळ अजिबात नसते . ओंकार सेवा समिती नामक एक संस्था इथे सेवा कार्य करते व त्यांनी पुढे काही बांधकाम केलेले आहे परंतु मूळ मंदिर आहे तसेच ठेवलेले आहे व ते उत्तम आहे. कारण शक्यतो जिथे पाण्याचे झरे असतात तिथे बांधकाम करू नये असा संकेत आहे . या भागात सीता अशोकाची अनेक झाडे मला पाहायला मिळाली .
या मंदिराचा संक्षिप्त इतिहास आपण येथे वाचू शकतो .मंडण मिश्रा भारती मिश्रा आणि आद्य शंकराचार्यांचे शिल्प
मंदिराचा रस्त्यावरील फलक
हे जगातील पहिले शिवलिंग असल्याचा पुराणात उल्लेख आहे असा लेखी प्रचार वारंवार केलेला आढळतो
ओंकार सेवा मिशनचे सेवाभावी कार्यकर्ते हा परिसर सांभाळतात असे दिसते .
हेच ते गुप्तेश्वर महादेवाचे विश्वातील सर्वप्रथम शिवलिंग
इथे येण्याचा मार्ग खरोखरच अतिशय अरुंद निमुळता आणि कठीण आहे
पूजनासाठी बसलेल्या माणसाच्या उजव्या हाताला कोपऱ्यात जो काळा खड्डा दिसतो आहे तिथून पाण्याचा अखंड झरा वाहत आहे .
शिवलिंग अतिशय सुंदर असून त्याचा स्पर्श दैवी आहे .
मागे पार्वती मातेची मूर्ती आहे .
मंदिराचा परिसर हिरवागार असून खाली कसरखाली नावाची नदी वाहते जी पुढे मंडलेश्वर किल्ल्याला वळसा मारत नर्मदा मातीमध्ये विलीन होते .
आपण वरती पाहिले त्याप्रमाणे या जागेचे अजून एक वैशिष्ट्य असे आहे की मंडणमिश्रा आणि त्यांची पत्नी भारती देवी यांचा आद्य शंकराचार्यांसोबत झालेला प्रसिद्ध शास्त्रार्थ हा याच लिंगाभोवती कुठेतरी १०० गज जागेमध्ये झालेला आहे असे मानले जाते . त्यामुळे हा संपूर्ण परिसर एका वेगळ्याच अद्भुत पौराणिक ,ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरतो . ही कथा अतिशय प्रसिद्ध असून सर्वांना माहिती आहेच . परंतु कोणाला माहिती नसेल तर सारं स्वरूपात सांगतो . मंडणमिश्र या पंडितांसोबत आद्य शंकराचार्यांचा २१ दिवस शास्त्रार्थ चालला होता . हा शास्त्रार्थ भारतीय सांस्कृतिक इतिहासाचा एक ठेवा मानला जातो . शंकराचार्य शास्त्रार्थनामध्ये पराजित होत नाहीत हे पाहिल्यावर मंडण मिश्रा यांची सुविद्य पत्नी भारती मिश्रा हिने शंकराचार्यांची अनुज्ञा घेऊन त्यांना कामशास्त्राच्या विषयीचा एक प्रश्न केला . याचे बरोबर उत्तर दिले गेले असते तर शंकराचार्यांचे कठोर नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत विवादास्पद ठरले असते . शंकराचार्यांनी भारती मातेसमोर नतमस्तक होऊन तिला सहा महिन्यांचा कालावधी मागितला . आणि योगसिद्धीने परकाया प्रवेश करून अमरक राजाच्या मृतदेहात शिरून पुन्हा त्याला जिवंत करून सहा महिने गृहस्थाश्रमाचा अनुभव घेतला आणि मग पुन्हा येऊन भारती देवीच्या प्रश्नाचे योग्य ते उत्तर दिले .
साक्षात जगद्गुरु शंकराचार्यांशी शास्त्रार्थ करणारे मंडण मिश्रा किती मोठे विद्वान असतील हे आपल्याला लक्षात येते .
तसेच त्यांची पत्नी देखील त्यांच्या इतकीच विद्वान होती यावरून आपल्याला हे देखील लक्षात येते की आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांचे शिक्षणा वर बंदी कधीच नव्हती ! आणि त्यांना दुय्यम वागणूक कधीच दिली जात नव्हती . ती इंग्रजांनी रचलेली कपोलकल्पित कथा आहे असे प्रस्तुत लेखकाचे स्पष्ट मत आहे .
आपल्या महान भारतीय संस्कृतीला समजून घेताना मंडणमिश्रा यांचा आद्य शंकराचार्यांच्या सोबतचा शास्त्रार्थ हा खूप सहाय्यभूत ठरणारा प्रसंग निश्चितपणे आहे .
या महान घटनेचा साक्षीदार झालेल्या भूमीमध्ये काही काळ वास करता आला याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो ! नर्मदा परिक्रमा यासाठी करायची असते . ती पदोपदी आपले अनुभव विश्व समृद्ध करत नेते आणि पदोपदी आपल्या कर्मांचे डोंगर जाळते . पदोपदी आपल्या जाणीवा उन्नत करत नेते आणि पदोपदी आपल्या अहंकाराची पुटे गाळून पाडते . पदोपदी ती आपल्याला नवनव्या गोष्टी दाखविणे आणि पदोपदी आपल्या जुन्या अनावश्यक दुःखद स्मृतींचा नाश करून टाकते . नर्मदा माता केवळ नदी नाही .ती केवळ जलधारा नाही . ती एक विचारधारा आहे . ती एक परंपरा आहे . ती एक ऊर्जा आहे . तरल चित्ताने वावरणाऱ्या कोणालाही ती अनुभूती देणारच ! मैया है वह । सब जानती है !
लेखांक एकशे त्रेचाळीस समाप्त (क्रमशः)
नमस्कार बाबाजी
उत्तर द्याहटवापुढचा भाग कधी येणार वाचकांची मानस परिक्रमा कधी पूर्ण होणार
लवकर वेळ काढा बाबाजी
भाग पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत... नमामि देवी नर्मदे
उत्तर द्याहटवाबाबाजी, पुढील भागाच्या प्रतिक्षेत.. कृपया लिखाण पुनः सुरू करावे. नर्मदे हर
उत्तर द्याहटवानर्मदे हर 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर 🙏🏻🙏🏻
उत्तर द्याहटवा