महेश्वर चा घाट सोडला तरी त्याचे गारुड मनावर कायम होते ! आणि कायम राहील ! जगातील उत्तम उदात्त उन्नत सुंदर गोष्टींचे असेच असते ! त्या लवकर तुमच्या विस्मरणामध्ये जाऊ शकत नाहीत ! त्या समजून घेण्यासाठी मेंदूचे अधिकाधिक भाग वापरले गेलेले असतात ! त्यामुळे त्यांचा ठसा देखील मेंदूमध्ये खोलवर उमटलेला असतो . महेश्वर घाटावरून निघाल्यावर काशी विश्वनाथा चे दर्शन घेतले . हा घाट देखील सुंदर व सुबक होता . मंदिराचे सोनेरी खांब दुरून छान दिसायचे . इथे अनेक छोटे मोठे देव आणि मंदिरे आहेत . न कंटाळता सर्वांची दर्शने घेतली . नर्मदा परिक्रमेसाठी आपण जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा किंवा एकंदरीतच आयुष्यात सर्व वेळ केवळ आणि केवळ वर्तमान काळातच जगावे असे मला वाटते . नाहीतर घरात बसलेले असताना परिक्रमेला जाण्याची घाई आणि परिक्रमेला आल्यावर घरी परतण्याची घाई असे करू नये . आपण काही रोज रोज नर्मदा परिक्रमा करत नाही . त्यामुळे वाटेमध्ये येणारी मंदिरे ही काही आपल्याला सतत दिसणार नसतात . त्यामुळे कितीही पुनरावृत्ती झाली आणि कितीही कंटाळा आला तरी प्रत्येक मंदिरामध्ये जावे आणि दोन हस्तक तिसरे मस्तक आवर्जून जोडावे . प्रत्येक मंदिराचा इतिहास वेगळा असतो . प्रत्येक मंदिराचे पौराणिक महत्त्व वेगळे असते .प्रत्येक मंदिरामध्ये दर्शना घेण्याचे फल वेगळे असते . प्रत्येक मंदिरामध्ये जाणवणारी स्पंदने वेगळी असतात .प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला प्राप्त होणारी शक्ती वेगळी असते . प्रत्येक मंदिरामध्ये आपण का जाणार याचे कारण ठरलेले असते ! त्यामुळे जराही कंटाळा न करता सर्व देवी देवतांच्या मंदिरामध्ये जावे आणि तिथल्या पवित्रतेचा प्रसन्नतेचा अद्भुततेचा अनुभव आवर्जून घ्यावा अशा मताचा मी आहे . अर्थातच पिंडेपिंडे मतिः भिन्ना या न्यायाने प्रत्येकाचे याबाबतीतले मत वेगळे असू शकते . आणि ते स्वीकार्य आहे . इथून पुढे पेशवा घाट नावाचा छोटासा घाट होता . हा महेश्वरच्या उजव्या हाताला असला तरी महेश्वर पेक्षा थोडासा डावाच वाटला ! अर्थात घाट छोटा होता . इथे मी खंडोबाचे आणि रामेश्वर महादेवाचे दर्शन घेतले . इथून पुढे माहेश्वरी नदी आडवी येते . बहुतेक परिक्रमावासी इथून पुन्हा रस्ता पकडतात . त्यामुळे इथे पुढे असलेले सप्तमातृका मंदिर आणि जालेश्वर महादेव बहुतांश लोकांनी पाहिलेला नसतो . परंतु आपला नर्मदा मातेशी झालेला अलिखित करार होता त्याप्रमाणे आपण किनारा सोडणार नव्हतो ! इथे काठावर भरपूर नावा नांगरलेल्या होत्या . एक सारख्या आयताकृती नावा येथे दिसल्या . वाळू काढण्याचे काम सुरू आहे असे लक्षात आले . मी सप्तमातृकांचे दर्शन घेतले . आणि जालेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आलो . हे नागर शैलीतले एक सुंदर आणि छोटेखानी मंदिर होते . एका उंच टेकाडावर मंदिर बांधले होते . याची तटबंदी ढासळू लागली होती . लवकर बांधबंधिस्ती केली नाही तर हे अख्खे मंदिर वाहून जाण्याचा धोका होता . सुदैवाने गेल्याच वर्षी ही तटबंदी दुरुस्त केल्याचे google वरील फोटो पाहिल्यावर लक्षात आले . मी सप्तमातृकांच्या सात मंदिरांचे दर्शन घेत असताना तिथे एक नाव वाळू रिकामी करत होती . मी वरून खाली आल्यावर त्या नावाड्याने मला आवाज दिला आणि सांगितले की जर पंधराच मिनिटे थांबण्याची माझी तयारी असेल तर तो मला समोर कालेश्वरच्या घाटावर सोडेल ! मग काय ! शांतपणे मैयाच्या काठावर एका दगडावर बसलो ! पाच मिनिटातच वाळू रिकामी करून पुन्हा नवीन वाळू घ्यायला नाव निघाली . वाळू भरणाऱ्या नावेत बसण्याचा पहिला अनुभव ! माहेश्वरी नदी पार करून नावाड्याने मला पलीकडच्या तटावर सोडले . आणि पुन्हा उलटा निघाला . मी त्याला म्हणालो की अरे तुला तर या दिशेला जायचे आहे असे मला वाटले . त्यावर केवट दादाने खूप छान उत्तर दिले . तो म्हणाला आमच्या नावा कायम नर्मदा मातेच्या वर राहतात . नर्मदा माता तिच्या मूळ स्वरूपात आमच्या नावे मध्ये येऊन बसली तर आमची नाव बुडून तळाशी जाईल ! आमची फार इच्छा असते की नर्मदा मातेने आमच्या नावेत बसावे ! परंतु तिचे स्वरूप आम्हाला झेपणारे नाही ! त्यामुळे परिक्रमावासी जेव्हा आमच्या नावेत बसतात तेव्हा त्यांच्यासोबत असलेली नर्मदा मैया सुद्धा नावेत बसते ! त्यामुळे ती संधी आम्ही सोडत नाही ! मला एका कठीण खडकावर उतरवून नाव निघून गेली . माहेश्वरी नदीच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी आहे . एक उंच पायवाट चढत मी कालेश्वर मंदिराच्या दरवाजात आलो . आणि तिथे निवांत पहुडलेल्या श्वानांच्या एका कळपाने माझ्यावर हल्ला केला . त्यांना माझे असे जंगलातून येणे अनपेक्षित होते . मला कालेश्वर मंदिरात जाण्यासाठी एक छोटासा दरवाजा तिथे होता आणि नेमके हे सर्व भैरव त्या दारातच वाट अडवून बसले होते ! शेवटी माझा नाईलाज झाला आणि कोणी पाहत नाही असे पाहून मी माझे रुद्र रूप धारण केले ! सिंहमुद्रा करून मोठी गर्जना करत काठी फिरवत येणारा माझा तो अवतार पाहून सर्व कुत्री शेपट्या घालून अतिप्रचंड वेगाने पळाली ! मंदिरात प्रवेश केल्यावर माझे मलाच या प्रकाराचे हसू यायला लागले . नर्मदा मातेला मी म्हणालो की आई अजून काय काय करायला लावणार आहेस काय माहिती ! मंदिर अतिशय भव्य दिव्य होते . सुंदर असा सभामंडप अनेक खांबांनी सुशोभित होता . मंदिर म्हणजे एक मोठा किल्लाच होता . चहुबाजूने मजबूत तटबंदी होती . कालेश्वरच्या मंदिरापासून जालेश्वराचे सुंदर दर्शन व्हायचे . मंदिराच्या परिसरात खूप चांगली झाडे लावली होती . आंबा फणस वगैरे फळझाडे मोठ्या प्रमाणात होती . एकंदरीत मंदिरातले वातावरण खूप पवित्र होते . जालेश्वराच्या मंदिरात चिटपाखरू नव्हते . कारण तिथे येण्यासाठी रस्ता नव्हता . इथे मात्र डांबरी रस्ता पोहोचलेला होता . त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आलेले दिसत होते . मंदिर व्यवस्थापन चांगले होते . त्यांनी मला सुंदर असा चहा पाजला . मंदिरात बसून महादेवाचे स्तवन केले . आणि मंदिराचा परिसर फिरून पाहून घेतला . मगाशी मला शत्रू मानून हल्ला करणारी कुत्री आता शेपटी हलवत माझ्या मागे फिरत होती . श्वान वर्गीय प्राण्यांची मानसिकता मोठी मजेशीर असते हेच खरे . मार्जार कुलीन प्राणी इतक्या चटकन मत बदलत नाहीत . असो . एकंदरीत जालेश्वर आणि कालेश्वर ही मंदिरे आवर्जून पाहण्यासारखी आहेत हे मला सर्व वाचकांना सांगायचे आहे . कृपा करून रस्त्याने निघून जाऊ नका ! काठाने चालायची इच्छा असल्यास मैय्या बरोबर सोय करते !

महेश्वर गावामध्ये मंडन मिश्रा यांच्या पादुका कोरलेले एक ठिकाण आहे . कदाचित मंडन मिश्रांची ओली पावले येथे उठली असावीत व ती कोणीतरी कोरलेली आहेत .पेशवा घाट . हा घाट छोटासाच परंतु सुबक आहे .पेशवा घाटावरील रामेश्वर भगवानतत्पूर्वी एका उंच आणि सुबक घाटावर काशी विश्वनाथाचे मंदिर आपल्याला दिसते .श्री काशी विश्वनाथ महादेव महेश्वरइथेही उत्तम दर्जाची स्थापत्य कला आपल्याला पाहायला मिळते
यानंतर मात्र आपल्याला माहेश्वरी नदी आडवी येते . बहुतेक हिलाच ज्वाला नदी असे देखील नाव आहे . कारण ज्वाला नावाची दुसरी कुठली नदी मला आडवी आली नाही . आणि संगमावर जालेश्वर किंवा ज्वालेश्वर मंदिर आहेच .इथे मोठ्या संख्येने उभ्या असलेल्या वाळू उपसणाऱ्या बोटी आपल्याला या नकाशात दिसतील .अशाच एका नौकेने मला माहेश्वरी नदी पार करून दिली
जालेश्वराचे मंदिर असे एका उंच टेकडावर आहे .जालेश्वरावरून नर्मदा मातेचे अद्भुत दर्शन होते . मला बहुतेक याच नावेने पलीकडे सोडले होते . काठावरील परिक्रमेची पायवाट स्पष्ट दिसते आहे पहा !नर्मदा मातेला महापूर आला की मात्र इथला परिसर बऱ्यापैकी जलमग्न होतो . खालच्या बाजूला असलेल्या सप्तमातृका पूर्णपणे बुडतात .जालेश्वराचे मंदिर नागरशैलीतले असून उत्तम कोरीव काम असलेले आहे . त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे .डाव्या हाताला जी पांढरी मंदिरे अथवा देवळ्या दिसत आहेत त्याच सप्तमातृका आहेत . इथला तट ढासळत चालला होता म्हणून तिथे धारक भिंत किंवा रिटेन्शन वॉल बांधण्याचे काम सरकारने सुरू केले . ते सुरू असतानाच हे चित्र आहे .या चित्रात सप्तमातृका तसेच ढासळलेला डोंगर अधिक स्पष्ट दिसत आहे .हे आहेत श्री जालेश्वर महादेवढासळलेली जुनी तटबंदी , परिक्रमा मार्ग आणि वाळू वाहणारी नौका हे सर्व वरून असे दिसते .खालून दिसणारे जालेश्वराचे मंदिर आणि ढासळलेला बुरुज . जलेश्वर जालेश्वर ज्वालेश्वर अशी विविध नावे असलेल्या या महादेवाची व्यवस्था महंत ज्ञानेश्वर पुरी जी महाराज पाहतात असे दिसते . .
आता मात्र मंदिराची तटबंदी मजबूत करण्यात आली आहे परंतु त्यासाठी प्रचंड प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आलेली स्पष्टपणे दिसत आहे . स्वार्थी मनुष्य झाडांची कधी एकदा तोडणी करायला मिळते त्याचीच वाट बघत असतो की काय असे वाटते . घोर दुर्दैव आहे .
नावेने महेश्वरी नदी पार केल्यावर शेजारीच कालेश्वराचे मंदिर आहे .हे मंदिर देखील प्राचीन असून जालेश्वरापेक्षा भव्य बांधकाम केलेले आहे .हा देखील एक छोटेखानी किल्ला असून मी ज्या खडकांवर उतरलो ते खडक मी वर गेलो ती पायवाट आणि मी आत मध्ये शिरलो होतो तो छोटासा दरवाजा असे सर्व आपल्याला या चित्रामध्ये दिसेल . याच द्वारावर श्वानांशी माझी झटापट झाली !कालेश्वराच्या कळसा वरून दिसणारे जालेश्वर मंदिर ! एका चित्रात दोन दर्शने !हे आहेत कालेश्वर भगवान .एखाद्या युद्धमान किल्ल्याला असतात तशा जंग्या ,चऱ्या व फांजी असे सर्व याही मंदिराच्या तटबंदीला असल्याचे आपल्याला दिसते . जंगी याचा अर्थ तटबंदीवर दिसणारी एक खाच किंवा छिद्र ज्यातून बंदुकीने गोळ्या मारता येतात किंवा दगड गोळे खाली टाकता येतात .जंगी युद्ध व्हायचे तेव्हा या जंग्यांमधूनच मारा झालेला असायचा. चऱ्या याचा अर्थ कमळाच्या आकाराच्या दगडी पाकळ्या . याच्या मागे लपून गोळीबार करता येतो . तसेच तोफ गोळे अडवायचे काम त्या करतात . त्यावर तोफगोळा पडला की चरी तुटून जाते . आणि तटबंदी तुटायची वाचते . फांजी म्हणजे तटबंदी वरून गस्त घालण्यासाठी असलेली जागा . हे सर्व आपल्याला या छोट्या मंदिरात सुद्धा दिसते .मंदिराचा परिसर भव्य दिव्य सुंदर आणि हिरवागार आहे .इथून जालेश्वराचे सुंदर दर्शन होते . या दारातून मी आत प्रवेश केला होता . पुजारी महाराजांनी मला सांगितले की या दारातून आत मध्ये आलेला यावर्षीचा मी पहिला परिक्रमा वासी आहे . समोर दिसणारे जालेश्वर महादेव आणि नर्मदा माई .महेश्वर नगरातून इथे रोज सेवेसाठी येणाऱ्या अनेकांना मी भेटलो . सर्व लोक अत्यंत धार्मिक आणि भाविक आहेत . मध्यप्रदेश ने धर्म टिकवून ठेवला आहे असे पुन्हा पुन्हा जाणवते .इथे काही काळ बसून पुढे निघालो . काठाकाठाने घनदाट झाडीतून कशीबशी पायवाट शोधत जाता येते असा मार्ग येथे आहे . परंतु ग्रामस्थांनी मला सांगितले की इथे रस्ता जवळच असून तिथे एक मोठी गोशाळा आहे ती पाहण्यासारखी आहे . गोमातेचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याकडे निघालो . गोशाळा मोठी होती परंतु तिथे व्यवस्थापक कोणी न दिसल्यामुळे पुढे निघालो . गोशाळा अतिशय सुंदर पद्धतीने बांधण्यात आलेली होती . तिथली काही चित्रे गुगलवर मिळाली ती आपल्यासाठी जोडत आहे .
अशी गौशाला समिती प्रत्येक गोशाळेत झाली तर किती छान होईल !रेवा माई गौशालेचे भव्य प्रवेशद्वारइथून वेगाने पुढे निघालो . काठावर जाण्याचा जवळचा मार्ग कुठे आहे हे लोकांना विचारत होतो . इथे भिलट बाबांचे एक मंदिर लागले . त्याचे दर्शन घेऊन तिथून आत मध्ये घुसलो . इथे अग्निहोत्राचा प्रचार प्रसार करणारा एक आश्रम आहे असे मला सांगण्यात आले . अग्निहोत्र म्हटले की आपल्या तोंडामध्ये चटकन नाव येते ते अक्कलकोटच्या गजानन महाराजांचे . परंतु ज्या व्यक्तीने याच गजानन महाराजांच्या आदेशानुसार अग्निहोत्र करण्याचे फायदे आणि पद्धती उभ्या जगाला शिकवली त्या धुळयाच्या श्री वसंत परांजपे नामक महान सत्पुरुषांच्या नातवाने हा आश्रम चालवला आहे !
श्री वसंत परांजपे यांना १३ डिसेंबर १९७० रोजी गजानन महाराजांनी आदेश दिला की मी तुम्हाला जे ज्ञान दिले आहे त्याचा तुम्हाला आता जगभर प्रसार करायचा आहे . फाईव्ह फोल्ड मिशन या नावाने पाच गोष्टींच्या आधारे जीवन जगण्याची दीक्षा ही संस्था आपल्याला देते . यज्ञ , दान , तप, कर्म आणि स्वाध्याय ही पंचसूत्री पकडून हा संप्रदाय कार्य करतो . या आश्रमाला तपोवन असे देखील म्हणतात . आश्रमाचा परिसर मोठा असून हिरवागार आहे . सर्वजित परांजपे असे आश्रम संचालकांचे नाव आहे जो वसंतराव परांजपे यांचा नातू आहे. अतिशय तरुण असलेला हा युवक सर्व काही करणे शक्य असून देखील पूर्णवेळ इथे सपत्नीक सहकुटुंब राहून अग्निहोत्राचा प्रचार प्रसार करत आहे . मी आल्याबरोबर माझे स्वागत सर्वजितनेच केले . त्यांनी मला अतिशय कडू असा कडुलिंबाचा रस पाजला आणि त्याचे महत्त्व सांगितले . तो पिताना खरोखरच काही त्रास झाला नाही . त्यांनी मला भरपूर वेळ दिला आणि अग्निहोत्राचा इतिहास , तो का करावा याचे फायदे तसेच त्याचा प्रचार प्रसार कुठे कुठे झाला आहे त्याची अनेक उदाहरणे , त्यापासून झालेल्या लाभाची अनेक उदाहरणे असे सर्व सांगितले . इतक्यावरच न थांबता प्रत्यक्ष अग्निहोत्र करून दाखविले व करवून देखील घेतले ! अक्षरशः पाचच मिनिटांमध्ये होणारा हा विधी असतो . जे नियमित अग्निहोत्र करतात त्यांना हे माहिती आहे . पूर्वी ऋषीमुनी मोठे मोठे यज्ञ करायचे . ते करता येणे ज्यांना शक्य नाही त्यांनी पाच मिनिटाचे अग्निहोत्र रोज केले तरी फार मोठे लाभ होतात असा अनेकांचा अनुभव आहे . मुळात आपण हिंदू लोक अग्निपूजक आहोत हे आपण विसरता कामा नये असे मला सर्वजित परांजपे यांनी सांगितले . इथे अग्निहोत्राची विविध शिबिरे सतत होत असतात . ज्यांना त्यात रस असेल त्यांनी परांजपे यांच्याशी खालील क्रमांकावर संपर्क साधावयास हरकत नाही . सर्वजित परांजपे ९९९ ३१ २६ ४६५ (99931 26465 ) लाडवी . महेश्वर .
सहकुटुंब येऊन राहण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे . फक्त इथे परिक्रमावासींची सेवा करण्याचे भाग्य फारसे लाभत नाही कारण आश्रम ना धड रस्त्यावर आहे ना धड काठावर . काठाने जाणारा मनुष्य आत येऊ शकत नाही इतकी झाडी मध्ये आहे . परंतु आता तिथे घाट झालेला दिसतो आहे .
अग्निहोत्र शिबिरासाठी आलेल्या विदेशी अग्नी पूजकांसोबत श्री सर्वजित परांजपे . यांच्या आजोबांनी अग्निहोत्राचा जगभर इतका प्रसार केला आहे की आपण कल्पना देखील करू शकत नाही इतक्या देशातले परदेशी लोक न चुकता दररोज अग्निहोत्र करतात ! त्या त्या भागातील फक्त सूर्योदय आणि सूर्यास्त साधणे इतकाच मुख्य हेतू या अग्निहोत्राचा असतो . या विदेशी पाहुण्यांचे विशेष कौतुक आहे . कारण ते फक्त इथे येऊन शिबिरामध्ये सहभाग न घेता आजूबाजूच्या लोकांसाठी देखील कार्य करतात . उदाहरणार्थ साध्वी विशुद्धानंदा अर्थात सुश्री भारती ताई ठाकूर यांच्या नर्मदालय संस्थेतील मुलांना इथे येणाऱ्या विदेशी पाहुण्यांनी गोधड्या व रजया बनविण्याचे प्रशिक्षण तिथे जाऊन दिले होते असा उल्लेख त्यांच्या पुस्तकात आहे .सामूहिकपणे अग्निहोत्र आणि यज्ञ साधना करता यावी यासाठी एका अति भव्य यज्ञ मंडपाची निर्मिती आश्रमामध्ये केलेली आहे . तिथे चालू असलेल्या पूर्णाहुती चे एक संग्रहित चित्र . आजही दक्षिण भारतामध्ये पूर्णाहुती इतकी मोठी करतात की तिच्याच ज्वाळेमुळे यज्ञ मंडप जाळून नष्ट केला जातो .भगवान श्री परशुराम , अक्कलकोटचे श्री गजानन महाराज आणि अग्निहोत्रा च्या प्रचार प्रसारासाठी जीवन खपविणारे परांजपे कुटुंबीय .अक्कलकोटचे श्री गजानन महाराजश्री गजानन महाराज परांजपे कुटुंबीयांसोबतश्री वसंतराव परांजपे आणि गजानन महाराजहोम थेरपी अर्थात अग्निहोत्राचे उद्गाते श्री वसंत परांजपेवसंतराव परांजपे आणि गजानन महाराजत्यामुळे कुठल्याही यज्ञाच्या सुरुवातीला या सर्वांच्या फोटोची पूजा येथे केली जाते
आश्रमातील यज्ञ शाळेतील विविध आकाराची यज्ञ कुंडेआश्रमातील गोशाळा . या अग्निहोत्रासाठी सर्वात आवश्यक असते ते म्हणजे शुद्ध देशी गाईचे तूप आणि शेण किंवा गोवऱ्या . त्या बनविण्याची सुंदर पद्धत यांनी विकसित केलेली आहे .श्री सर्वजित परांजपे आपल्या सुविद्य पत्नी सोबत . या माऊलीची खूप चांगली साथ त्यांना या कार्यात लाभते आहे असे त्यांनी सांगितले . आजकालच्या पिढीतील अन्य मुलींचे वर्तन बघता ही माऊली निश्चितच कौतुकास पात्र आहे . चाकोरी बाहेर जाऊन काहीतरी कार्य करणाऱ्या पतीला साथ देणे हे एका आदर्श पतिव्रतेचे लक्षण आहे .अर्थातच हे नियम परस्परपूरक आहेत .
या अग्निहोत्राविषयी सर्वजित परांजपे यांनी मला सविस्तर माहिती दिली होतीच . परंतु ती आपणा सर्वांना कळावी म्हणून त्यांनी दिलेले पत्रक अर्थात त्याची चित्रे सोबत जोडत आहे . ती पाहून आपल्याला अग्निहोत्र म्हणजे काय ते लक्षात येईल .
अग्निहोत्र करण्यासाठी अगदी मर्यादित साधने लागतातत्याची सर्व माहिती येथे आपल्याला मिळतेअग्निहोत्र करणे देखील फार सोपे आहे . फक्त त्यासाठी अतिशय नियमितता आणि सातत्य लागतेअधिक माहितीसाठी आपण येथे संपर्क साधू शकता अग्निहोत्र कसे करावे हे या पत्रकात सांगितले आहे .अग्निहोत्राचा लाभ परिसराला कसा होतो ते देखील समजावून सांगण्यात येते . होमचिकित्सा कशी आहे याची माहिती आपल्याला इथे देण्यात येतेज्यांना आवड आहे त्यांनी सर्व जिथे परांजपे यांच्याशी अवश्य संपर्क साधावा . सर्वजित आता जेवण करून जा असे मला म्हणत होते . परंतु इथे काठावर एका साधूंनी नवीन शिवालय स्थापन केले असून त्याचा भंडारा सुरू आहे असे मला कोणीतरी सांगितले होते . तो प्रसाद घेण्याची इच्छा आहे असे सांगितल्यावर त्यांनी मला आनंदाने अनुमोदन दिले . शेजारीच सुरू असलेल्या मंदिराच्या बांधकामाकडे त्यांनी मला पाठविले . इथे आल्यावर एका महान सत्पुरुषाचे दर्शन होणार आहे याची मला पुसटशी देखील कल्पना नव्हती ! प्रचंड झाडी असलेल्या नर्मदा मातेच्या काठावरील एका जागी बारा वर्षाची नर्मदा परिक्रमा उचललेल्या एका जटाधारी साधू महाराजांनी अचानक एका शिवालयाची स्थापना केली होती . भगवान परशुरामांनी पृथ्वी निःक्षत्रीय करताना सहस्रार्जुनाचा वध केल्यावर त्यांचा परशु ज्या घाटावर धुतला तोच हा घाट होता . आणि त्यांच्या आदेशानुसारच त्यांनी इथे तत्काळ एका मंदिराची उभारणी केल्यामुळे या महादेवाचे नाव त्यांनी तत्कालेश्वर महादेव असे ठेवले होते ! शेजारी कच्चा मांडव उभा करून तिथे स्वयंपाक आणि पंगती सुरू होत्या . जयपुर लाल दगडामध्ये एक अष्टकोनी व सुंदर कोरीव काम असलेले मंदिर उभे करण्यात आले होते . शेजारीच एक कापडी तंबू टाकलेला होता जिथे साधु महाराज आहेत असे मला सांगण्यात आले . मी स्वच्छ हात पाय धुतले आणि साधु महाराजांच्या कुटीमध्ये प्रवेश केला . मी हातपाय धुवून आत मध्ये आलो आहे हे पाहिल्यावर साधु महाराज अतिशय प्रसन्न झाले ! ते म्हणाले की हा साधा संस्कार देखील लोक आजकाल विसरलेले आहेत ! देवाला जाताना किंवा सत्पुरुषांना भेटायला जाताना आपल्या शरीरावरचा मळ घेऊन जाऊ नये ! त्याचा बाहेरच त्याग करून मग स्वच्छ देहाने आत जावे ! कारण देवाला आणि सत्पुरुषाला भेटायला अनेक लोक येत असतात त्या सर्वांची चरण धूळ जर गर्भगृहामध्ये किंवा त्यांच्या कुटीमध्ये झाडू लागली तर स्वच्छतेचे मोठेच वांदे होतील ! या उलट देवालयातून किंवा सत्संगातून किंवा तीर्थयात्रेतून घरी आल्यावर लगेच हात पाय धुवू नयेत . थोडा वेळ बसावे मग हात पाय धुवावेत . तीर्थयात्रेचे सूक्ष्म रजकण देखील घरातल्या धुळीमध्ये मिसळले गेले की त्याचा लाभ त्या वस्तूतील सर्वांना होतो . हे पूर्णपणे शास्त्रीय आहे . ज्यांनी अतिसूक्ष्मदर्शकातून कधी सूक्ष्म जिवाणू पाहिले आहेत त्यांना मी काय म्हणतो आहे ते कळेल . It's all about your gut bacteria! असो गट वरून आठवले . महाराजांनी मला विचारले की तुमचे भोजन झाले आहे काय ? नाही म्हटल्यावर ते मला म्हणाले की आधी भोजन प्रसाद घ्यावा आणि मग पुन्हा त्यांच्या दर्शनासाठी यावे .ते माझ्यासाठी वेळ राखून ठेवणार आहेत . पुन्हा वेळ देण्याचे आश्वासन दिल्यामुळे मी तिथून उठलो आणि मांडवामध्ये बसून भोजन प्रसाद घेतला . इथे बॉलीवूड मध्ये पटकथा लेखन आणि गीत निर्मिती करणारे एक लेखक सर्वसंग परित्याग करून साधू बनून सेवेसाठी राहिलेले होते . त्यांच्याशी बोलता बोलता भोजन प्रसाद घेतला . बॉलीवूड आतून धर्मांध प्रवृत्तींनी कसे पोखरलेले आहे हे त्यांनी मला विस्तार पूर्वक सांगितले . त्यांचे एक एक अनुभव अंगावर काटा आणणारे होते . त्यांच्याकडूनच मी महाराजांची सविस्तर माहिती घेतली . कदाचित ती घेऊन मगच मी त्यांना भेटावे अशीच महाराजांची इच्छा असावी !
उत्तर भारतामध्ये दादू पंथ नावाचा एक संप्रदाय आहे . साधू दादू दयाल हे या संप्रदायाचे संस्थापक होते . पंधराशे चार मध्ये त्यांचा जन्म कर्णावती येथे झाला होता . त्यांनी धुधुवा भाषेत दादू वाणी नावाचा ग्रंथ आणि दोहे लिहिले आहेत . त्यांचे पुढे अनेक उपसंप्रदाय झाले . निर्गुणाची उपासना सांगणारा हा संप्रदाय आहे.दादू दयाल यांना राजस्थानचा कबीर म्हणून ओळखले जाते .
.jpeg)
याच संप्रदायाची दीक्षा घेतलेले मौनी बाबा अथवा स्वामी पूरणदासजी महाराज यांनी हे मंदिर उभे केले होते . महाराजांनी बारा वर्षाची नर्मदा परिक्रमा उचलली होती . अजूनही त्यांची परिक्रमा सुरू आहे . त्यांनी सोळा वर्षे मौन धारण केले होते व जगदीश मढी येथे जाऊन ते मौन सोडले होते त्यामुळे यांना मौनी बाबा असे देखील म्हणतात . यांनी अनेक ठिकाणी मंदिरे स्थापन केलेली आहेत . उदाहरणार्थ एकलबारे ,जागेश्वर ,जबलपूरचा गौगच्छा घाट , लाडवी इ . शूलपाणी च्या झाडीमध्ये मोलगी येथून सेवा देणारे भिलाशेठ हे या महाराजांना फार मानतात . त्यांच्या शूलपाणी झाडीतील वास्तव्यामध्ये भिलाशेठ त्यांना सतत भेटायला जायचे व जी लागेल ती मदत करायचे . भिलाशेठ यांना मी भेटलो होतो तेव्हा त्यांनी मला दोन अद्भुत साधूना नक्की भेट असे सांगितले होते .
मला एक सवय लागली होती कुठेही गेले की इथे दर्शन घेण्यासारखे वेगळे काय आहे असे विचारायचो . तसेच आपल्याला कोणी अधिकारी सत्पुरुष माहिती आहेत का असे देखील विचारायचो . त्यातून मग अशी माहिती मिळायची . एक स्वामी हिरण्मयानंद नावाचे बंगाली साधू होते . जे फक्त गमछाची लंगोट घालून बसलेले असत .गवाली इथे त्यांनी चातुर्मास केला होता . रोज एक पेला जेवण ते करायचे . पेला भर खिचडी होईल इतके डाळ तांदूळ घेऊन दिव्याच्या ज्योतीवर खिचडी बनवायचे . आणि ग्रहण करून अखंड नामस्मरण करत बसायचे .
दुसरे नाव या पूरणदास स्वामींचे त्यांनी सांगितले होते .स्वामीजींशी पुन्हा गप्पा मारायला लागल्यावर मला या गोष्टीचा उलगडा झाला ! कारण उपजत बहुचकवृत्तीनुसार मी स्वामीजींना विचारले की हा सुंदर तंबू तुम्हाला कुठे मिळाला ?तेव्हा त्यांनी सांगितले की मोलगी गावातील एक कार्यकर्ते आहेत त्यांनी मला दिला आहे . भिलाशेठ का ? असे विचारल्यावर स्वामींना अतिशय आनंद झाला ! आणि मग त्यांनी भिलाशेठ कशी कशी सेवा देतात ते मला सांगायला सुरुवात केली . स्वतः भिलशेठ ही माहिती कधीच देणार नाहीत आणि देतही नाहीत . परंतु एखादा विरक्त साधू जेव्हा सेवादाराचे कौतुक करतो तेव्हा ते खरोखरच कौतुकास पात्र असतात हे निःसंशय ! कारण स्तुती करणाऱ्या या साधूला काहीच साधायचे नसते किंवा गमवायचे देखील नसते . शुद्ध अंत:करणातून त्यांचे आशीर्वाद निघालेले असतात .
श्री दादू दयाल महाराज आणि शेजारी पूर्ण दास स्वामींची प्रतिमा . स्वामीजी अतिशय नीटनेटके राहतात . त्यांच्या मिशा विशेष लक्षात राहतील अशा आहेत . भाषा अतिशय सौम्य शांत आणि मवाळ आहे . समोरच्या माणसाला एका क्षणामध्ये जिंकण्याची कला त्यांच्यामध्ये आहे . तप:साधनेचे जबरदस्त तेज त्यांच्या चेहऱ्यावर सतत विलसत असते . दादू दयाल संप्रदायाचे सध्याचे उत्तराधिकारी श्री ओम प्रकाश दास जी महाराज यांच्या सोबत श्री पूरण दास जी महाराजश्री पूरण दास जी महाराजदादू पंथाच्या प्रमुखांना थेट मिठी मारण्या इतका अधिकार महाराजांना प्राप्त आहे .
स्वामीजींनी स्थापन केलेला तत्कालेश्वर महादेव .दगडावर कोरलेली फुलांची नक्षी इतकी सुंदर आहे की त्यामुळे त्यावर ऊन पडले असता जणू काही महादेवाला अग्नीची फुले वाहिलेली आहेत असे वाटते .राजस्थानच्या जयपुर लाल दगडामध्ये बांधलेली देवळी . आता या मंदिराचे मोठे सभामंडप वगैरे बांधून झालेले आहेत . हे चित्र मी गेलो त्या काळातलेच आहे . त्यामुळे स्वामीजींचा तंबू देखील डाव्या हाताला मागे दिसतो आहे पहा . इथेच बसून आम्ही सत्संग केला .लाडवीचा किनारा . मी काठाकाठाने चालतो आहे हे कळल्यावर स्वामीजींना फार आनंद झाला ! त्यांनी मला खूप वेळ दिला ! आणि खूप प्रेमही दिले ! बारा वर्षाची परिक्रमा उचललेल्या स्वामीजींची परिक्रमेची सात वर्षे अजून शिल्लक आहेत असे त्यांनी मला सांगितले होते . इथेच परशुरामाने परशु धुतला ! इथे परशुच्या आकाराचा दगड होता . तिथे घाट बांधण्याची इच्छा स्वामीजींनी व्यक्त केली होती .आता इथला घाट बांधून पूर्ण झाला आहे असे गुगल नकाशावर पाहिल्यावर दिसते .
भगवान परशुरामांचे बरेच वास्तव्य या भागाला लाभलेले आहे . कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाचा वध परशुरामांनी इथेच माहेश्वरी केला होता आणि लाडवीला येऊन परशु धुतला होता .इथून समोर दिसणाऱ्या एका डोंगरावर त्यांनी तपश्चर्या केली असे मला स्थानिकांनी दाखविले .
तसेच परशुरामांचे जन्मस्थळ जानापाव नावाच्या एका डोंगरावर आहे जो इथून ५० - ५५ किलोमीटर दूर आहे .
इथे साडेसात नद्यांचा उगम आहे . इथे आता भव्य मंदिर उभे होत आहे असे लोकांनी मला सांगितले .
जानापाव येथील भगवान परशुराम यांचे जन्मस्थळ
लाडवीच्या घाटावर मी स्नान केले आणि काठाकाठाने पुढे चालू लागलो . अतिशय रम्य असा हा निर्मनुष्य काठ होता . समोर कठोरा गाव होते जिथे मांडव ऋषींची गुहा आहे . खडकाळ काठ होता . परंतु त्यावर गाळ साचून वेगळ्याच प्रकारचा किनारा तयार झाला होता ! मध्ये एक सुंदर नदी किंवा छोटा ओढा मी ओलांडला . पाखरांशी गप्पा मारत , पाण पक्ष्यांच्या गमती बघत पुढे चालू लागलो .एरव्ही पाणपक्षी इतके जवळ कोणाला येऊ देत नाहीत परंतु परिक्रमा वासी दिसल्यावर मात्र ते सहसा उडून जात नाहीत असा माझा अनुभव आहे . पक्षी निरीक्षकांनी याचा जरूर विचार करावा . नर्मदा परिक्रमा ही किती जुनी परंपरा आहे याचाच हा शास्त्रीय पुरावा आहे . लहानपणापासून मी पाणपक्षी निरीक्षणासाठी जातो आहे . परंतु ते किती सावध असतात हेच मी अनुभवले आहे . इथे मात्र हजारो लाखो वर्षांपासून एकाच वेषातील परिक्रमा वासींची ये जा असल्यामुळे , आणि इथले पाण पक्षी देखील लाखो वर्षांपासून एकाच कुळातील असल्यामुळे त्यांच्या जनुकांमध्ये हा संदेश उतरलेला दिसतो . की अमुक अमुक वेषातील परिक्रमावासींना घाबरू नये . मोठा गमतीदार परंतु गंभीर विषय आहे . पक्षी तज्ञांनी नक्की विचार करावा .
दगड गोटे चिखलगाळ तुडवत एका स्मशानापाशी आलो . स्मशानामध्ये एक चिता धगधगत होती . आयुष्यभर ज्यांच्यासाठी तो जीव खपला होता त्याचा देह अर्धवट जळलेल्या अवस्थेत असतानाच सर्वजण आपापल्या घरी निघून गेले होते . मी तिथे काही काळ बसलो . तो जीव कोण होता माहिती नाही . परंतु जणू काही मला सांगत होता , अगदी नर्मदा मातेच्या साक्षीने सांगत होता ,बघ बाबाजी ! या जगात कोणीच तुझे नाही ! सगळ्यांना आपापली कामे पडलेली आहेत ! त्यामुळे जेवढे काम उरकते आहे तेवढे उरक आणि तुझ्या मार्गाने चालू लाग ! एके दिवशी पाचा तत्वांचे हे गाठोडे सुटणार आहे आणि पुन्हा पंचत्वात विलीन होणार आहे . ते तुझे नव्हते , तुझे नाही आणि तुझे नसेल ! तुझ्यासोबत येणार आहे ते फक्त तुझे चांगले वाईट कर्म . निरपेक्ष वृत्तीने कर्म करत रहा . त्याचा हिशोब लावायला ती बघ ती तिथे समोर बसलेली आहे ! समोर बघितले तर नर्मदा मैया गोड हसत होती ! एक छोटीशी कन्या नर्मदा मातेच्या पाण्यात पाय बुडवून उभी होती . आणि माझ्याकडे पाहून हसत होती . तिला दुरूनच नमस्कार केला . आणि पुढे चालू लागलो . मला माहिती होते की ती पुन्हा मागे दिसणार नाही . तरी उगाचच असे वाटले की एकदा मागे वळून पाहावे . म्हणून मागे वळून पाहिले . अपेक्षेप्रमाणे त्या तिथे कन्या तर नव्हतीच पण आश्चर्य म्हणजे चिता देखील जागेवर नव्हती ! फक्त पांढरी शुभ्र राख पसरली होती . मी फारसा विचार न करता पुन्हा पुढे मार्गस्थ झालो . काळ पुढे मागे करणे हे महाकाळाच्या कन्येला नाही जमणार तर कोणाला जमणार ? नर्मदा मैया च्या या सर्व लीलांची आता जणु सवय झाली होती . त्या बालिकेचा हसरा चेहरा सतत डोळ्यासमोर तरळू लागला . वैखरी मध्ये तिचा धावा करीत चालत राहिलो . नर्मदे हर ! नर्मदे हर ! ! नर्मदे हर ! ! !
लेखांक एकशे बेचाळीस समाप्त ( क्रमशः )
नर्मदे हर !
उत्तर द्याहटवाI am trying to do Manas Parikrama with you because of your invaluable generosity. This last incident brought tears to my eyes. Anekanek Dhanyavad. Narmade Har.
उत्तर द्याहटवा142 पुढील भाग बरेच दिवस आलेच नाहीत लवकर द्या 🙏❤️👍
उत्तर द्याहटवानर्मदे हर
उत्तर द्याहटवामंदार