लेखांक १४६ : च्यवन ऋषींची तपोभूमी नेत्ररोगनिवारक च्यवनाश्रम

बडवाहला नर्मदा मातेच्या दर्शनासाठी म्हणून खेडी घाटावर पुन्हा एकदा गेलो .मांडवगडासाठी ज्याप्रमाणे नर्मदा मातेचा काठ सोडावा लागतो अगदी त्याच पद्धतीने इथे देखील नागेश्वर या ठिकाणी असलेल्या रेवा कुंडाला परिक्रमा करावी लागते. त्यामुळे नर्मदा मातेचा किनारा सोडावा लागतो .हे ठिकाण इथून सुमारे पाच सात किलोमीटर दूर आहे . आता तिथे जावे लागणार म्हणून मी नर्मदा मातेचे दर्शन घ्यायला काठावर आलो होतो . काठावर भाविकांची प्रचंड गर्दी होती . मी नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार केला आणि परत फिरणार इतक्यात एक वयस्कर गृहस्थ माझ्या दिशेने पळत आले . आणि मला नर्मदे हर करून म्हणाले की तुम्ही कृपया बालभोग घेण्यासाठी माझ्या घरी चला . मी त्यांना म्हणालो की मी रेवा कुंडाकडे निघालो आहे . ते म्हणाले माझे घर त्याच वाटेवर आहे . आपण गाडीवर जाऊया . मी त्यांना सांगितले की मी गाडीवर बसत नाही . मग त्यांनी मला त्यांच्या घराचा पत्ता तोंडी सांगितला . सुमारे पाच किलोमीटर अंतरावर एक मोठा गृह प्रकल्प होता त्याच्या शेजारी बंगल्यांच्या सोसायटीमध्ये त्यांचे घर होते . मी तिथे रस्त्यावरती थांबतो आपण या असे म्हणाले . आणि घरी या ,नक्की या असे सांगत सांगत गाडीवर निघून गेले .यांचे नाव मदनलाल गुप्ता जी असे होते .बरेच अंतर चालत त्यांच्या घरापाशी आलो . मोठी बंगल्यांची सोसायटी होती .यांचे घर बरेच आत होते .परंतु घरी येतो असा शब्द दिल्यामुळे जावे लागले . डांबरी रस्त्यावरून अनवाणी चालताना खूप त्रास होतो . पायाला खडे टोचतात आणि चटके देखील बसतात . आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास करताना अनवाणी पायांच्या कधीच विचार केला जात नाही हे दुर्दैवी सत्य आहे असो .यांनी घरी गेल्यावर मी नको नको म्हणत असताना पद्धतशीरपणे औक्षण पाद्य पूजा वगैरे करून आगत स्वागत करून सुंदर असा शिरा पोहे आणि सरबत यांचा पोटभर बालभोग करविला . निर्विकारपणे मी हे सर्व पाहत होतो . झोळीत बसलेली महामाया अजून काय काय दाखवेल याचा नेम नाही असा विचार मनोमन करत होतो .यांचा पुत्र राहुल गुप्ता गाडीने नर्मदा परिक्रमा काढायचा . त्याचे माहितीपत्रक देखील त्यांनी मला दिले . माझ्या पायात बूट नाहीत कळल्यावर त्यांनी मला बूट देण्याचा संकल्प केला . माझ्यासोबत ते दुकानांमध्ये आले आणि ३४० रुपये किमतीचा एक बूट त्यांनी मला घेऊन दिला . खरेदीसाठी माझ्याकडे पैसे नव्हतेच . हा नर्मदा परिक्रमेतील माझा बारावा बूट ठरला . इतकी पादत्राणे घालून झाली होती की आज नक्की आपले पादत्राण कुठले आहे हेच माझ्या लक्षात यायचे नाही ! जीवनामध्ये पादत्राण आपल्याला खूप काही शिकवून जाते बघा ! जोवर आपण रोज पादत्राण पायामध्ये घालत असतो , वापरत असतो तोपर्यंत आपल्याला त्याचे खूप प्रेम असते . आपले पादत्राण कितीही गर्दीमध्ये आपण ओळखत असतो .परंतु एकदा का आपण त्याचा त्याग केला आणि नवीन चप्पल घेतली की बरेचदा जुने पादत्राण कुठले घालत होतो हे देखील आपल्याला आठवत नाही . आजकाल अनेक मोबाईल वापरून झाल्यावर आपले असे होते पहा . जोवर फोन वापरत आहे तोपर्यंत तो लक्षात राहतो . परंतु एकदा का नवीन फोन वापरायला सुरुवात केली की जुना फोन कुठला होता ते आठवत देखील नाही . कपड्यांचे देखील असेच असते . थोडक्यात काय तर हा मानवी स्वभाव आहे .कोणी आपल्यावर कितीही उपकार करू देत , जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या सोबत आहे किंवा नित्य संपर्कात आहे तोपर्यंतच आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आदर प्रेम राहते . एकदा का ती व्यक्ती नजरेआड गेली की आपल्या डोक्यातून ती निघून जाते . काही वर्षांनी तर आठवायची देखील बंद होते . हा सरासरी मानवी स्वभाव आहे हे लक्षात ठेवून आपण कधीही कोणाकडूनही अपेक्षा बाळगू नयेत . नेकी कर और दर्या मे डाल असे वागावे .परिक्रमेतील पादत्राणांनी मला इतकी साथ दिली होती तरी देखील त्यांचे फोटो उपलब्ध नसते तर मला त्यातले एकही पादत्राण आठवले नसते . असो . तुम्हाला अजून काय हवे ते मागून घ्या असे गुप्ताजी सारखे म्हणत होते . आणि मी त्यांना एकच सांगत होतो की गुप्ताजी जो प्राप्त है , पर्याप्त है । गुरु चरण सिंग नावाचा माझा एक खोराबीर या मडीयाहू तालुक्यातील जौनपूर जिल्ह्यातील गावचा मित्र आहे .आम्ही दोघे बोलत असताना एकदा सहज तो म्हणाला होता जो प्राप्त है पर्याप्त है । हे वाक्य माझ्या पक्के डोक्यात बसले .आणि मला आवडले . रात्रभर मी त्यावरच चिंतन करत राहिलो . सकाळी झोपून उठल्या उठल्या चार ओळी खरडून काढल्या त्या आपल्यासाठी सोबत जोडत आहे .

जो प्राप्त है पर्याप्त है ।


जिंदगी की दौड में ।

दिनरात हर कोई व्याप्त है ।

हम है परे इस मोह से ।

जो प्राप्त है पर्याप्त है ॥


जब रो पडा बचपन में ।

माँ ने ले लिया था गोद में ।

तब स्तन्य पाके धन्य हम ।

जो प्राप्त है पर्याप्त है ॥


कर खेलकुद आते थे घर । 

लगती क्षुधा तब पेटभर ।

माँ की बनायी रोटीया ।

जो प्राप्त है पर्याप्त है ॥


बढते गये पढते गये ।

नई सिढीयाँ चढते गये । 

मंजीलको पा के कह दिये ।

जो प्राप्त है पर्याप्त है ॥


घर बार सारा बस गया ।

कर ब्याह बंदा फस गया ।

तब फूल फल बेली पे जितने ।

प्राप्त है पर्याप्त है ॥


आयु मिली ईश्वर दया ।

जीवन सफल सारा किया ।

अब राह पे अंतिम मेरे ।

जो प्राप्त है पर्याप्त है ॥


धगधग रही मेरी चिता ।

जल के मिटी सारी व्यथा ।

है सार क्या सुनके कथा |

जो प्राप्त है पर्याप्त है ॥


गुप्ताजींनी जाता जाता त्यांच्या मुलाच्या यात्रा कंपनीची पत्रके मला दिली . 

मदनलाल जी गुप्ता यांचा मुलगा राहुल गुप्ता यांच्या नर्मदा परिक्रमा व अन्य यात्रांची माहिती देणारे हेच ते माहितीपत्रक

माहितीपत्रक केवळ आपल्या माहितीसाठी जोडलेले आहे याची कृपया नोंद घ्यावी . यात कुठलाही व्यावसायिक किंवा वैयक्तिक हितसंबंध नाही .

इथून पुढे चोरल नदीच्या काठावर परम आदरणीय दगडू महाराजांचा अतिशय सुंदर असा आश्रम चारुकेश्वर इथे आहे .एक अतिशय भव्य दिव्य असा वटवृक्ष या आश्रमामध्ये आहे . इथे अखंड राम नाम जप चालू असतो . आश्रम अगदी नर्मदा मातेच्या काठावर असल्यामुळे पुराचे पाणी आतमध्ये येते . आता आश्रमातील मंदिराचा जिर्णोद्धार झालेला असून भव्य दिव्य मंदिर बांधण्यात आले आहे . परंतु वटवृक्षाखाली बसण्याची मजाच वेगळी आहे ! चोरल माता आणि नर्मदा माता यांचा मोठा विहंगम संगम वटवृक्षाखाली बसून पाहता येतो !

हाच तो भव्य दिव्य वटवृक्ष . परमपूज्य दगा महाराजांचे सान्निध्य लाभलेले दोंडाईचा या गावचे एक व्यापारी आहेत .श्री शिरीष भाई इंदाणी असे त्यांचे नाव आहे .त्यांच्यासोबत पुन्हा एकदा चारुकेश्वरी जाण्याचा योग आला होता तेव्हा त्यांनी सांगितले की दगडू जी महाराज अथवा दगा महाराज या वटवृक्षाला बड दादा म्हणायचे . साधारण नर्मदा खंडामध्ये संतांना किंवा तपस्वींना दादा म्हणण्याची पद्धत आहे . तोच मान दगा महाराज या वटवृक्षाला देत यावरून आपण त्याची महानता लक्षात घ्यावी !
इथला नर्मदा मातेचा किनारा अतिशय मनोहर आहे .
शुद्ध वटवृक्ष अशी पाटी जाण्याच्या मार्गावर लावलेली आहे व वटवृक्षाची माहिती व महती देखील शेजारी लिहिलेली आहे .
वटवृक्षाखाली एका शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली असून ही मोठी तपस्थळी आहे हे गेल्यावर लगेच जाणवतं .
वरती असे भव्यदिव्य मंदिर जयपूरच्या लाल दगडात बांधण्यात आलेले आहे . इथेच अखंड राम नाम सुरू असते .
चोरल नदीच्या संगमावरच हे दिव्यस्थान आहे परंतु पलीकडे असलेल्या भूतेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आपण चोरल नदी पार करून जाऊ शकत नाही कारण रेवा कुंडाचे पाणी चोरल नदीमध्ये मिसळलेले आहे अशी मान्यता असल्यामुळे ही नदी पार केली जात नाही .

समोर आपल्याला नजर निहाल आश्रम आणि श्री श्री रविशंकर यांचा आश्रम दिसतो. परंतु मध्ये येणारे रेवा कुंड पार करून जाता येत नाही त्यामुळे चारुकेश्वर पासून चोरल नदी न ओलांडता पुन्हा पाच-सहा किलोमीटर आत मध्ये जावे लागते .परिक्रमेच्या पुस्तकामध्ये देखील याचा उल्लेख केलेला आढळतो .

परिक्रमेच्या पुस्तकांमध्ये आलेला रेवाकुंडाचा उल्लेख . अनायासे विषय निघालाच आहे म्हणून सांगतो .परिक्रमेचे माझे जे पुस्तक आहे त्यात माझ्या काही ठरलेल्या खुणा होत्या . .पोकळ गोल जिथे केला आहे त्या ठिकाणी मी भोजन प्रसादी घेतलेली असायची . भरीव गोल केला आहे ते मुक्कामाचे ठिकाण असायचे . आणि चांदणी म्हणजे जिथे पुन्हा जायला किंवा राहायला आवडेल असे एखाद्या रम्य ठिकाण असायचे .
असो .  

गुप्ताजींनी दिलेला बूट फारच आरामदायक होता . त्यांचे आभार मानून पुढे चालत नागेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी आलो . रेवा कुंडाचे दर्शन घेतले . येथे परिक्रमावासींसाठी मार्ग आखून ठेवलेला आहे . एका खोल खड्ड्यामध्ये मंदिर आणि रेवाकुंड आहे .रेवाकुंडाच्या मधोमध मंदिर आहे आणि मंदिरात जाण्यासाठी पूल बांधलेला आहे . कुंडामध्ये मोठे मोठे मासे आहेत . परिक्रमावासीयांनी कसे जायचे याचा मार्ग तिथे आखून ठेवलेला आहे व दाखविला देखील जातो .

हेच ते बडवाहचे रेवा कुंड आणि नागेश्वराचे मंदिर
या कुंडामध्ये कासव देखील आहेत
मोठे मोठे मासे इथे आपल्याला पाहायला मिळतात
जिवंत मासे असणे हे या पाण्याचा ताजेपणा व स्वच्छपणा सिद्ध करते
एका मोठ्या महाद्वारातून उतरल्यावर असा फुल आहे जिथे परिक्रमावासींना एकाच बाजूने जावे व यावे लागते .परिक्रमावासी दिसल्याबरोबर लोक तुम्हाला मार्ग सांगायला सुरुवात करतात .
रात्री इथे सुंदर असे कारंजे व रोषणाई केलेली दिसते .
मंदिराचे प्रवेशद्वार असे बाहेर असून खाली पायऱ्या उतरल्यावर मंदिरात जाता येते
श्री नागेश्वर महादेव
मंदिरात जाण्याचा व बाहेर पडण्याचा मार्ग वेगळा वेगळा आहे . या बाजूने बाहेर पडावे लागते .

पुजारी महाराजांनी मला मार्गदर्शन केले . मंदिरामध्ये सतत गर्दी होती . परिक्रमावासी आला आहे हे पाहिल्यावर लोक प्रेमाने नर्मदेहर करतात व नमस्कार देखील करतात . तो नमस्कार आपल्याला नसून नर्मदा मातेला आहे हे लक्षात घेऊन आपण डोळे मिटून तो नमस्कार तिला अर्पण करावा .पाठीवर ओझे असल्यामुळे आपल्याला वाकून नमस्कार करणे अवघड जाते परंतु मनोमन नमस्कार आवर्जून करावा . व तो नमस्कार करताना परस्परो देवो भव असा आपला भाव असावा .मंदिरातून बाहेर पडलो .मागे एक छोटासा ओढा होता . तो ओलांडण्याचा चटकट मार्ग होता . इथे मला आठ दहा वर्षे वय असलेला साई नावाचा एक अतिशय चुणचुणीत आणि हुशार मुलगा भेटला . त्याने मला मधले सगळे रस्ते दाखवत मुख्य रस्त्यावर आणले . वाटेतील अनेक मंदिरांचे दर्शन त्याने मला घडवले . इथे चोरल नदी पुन्हा एकदा आडवी येत होती . ती पार करायची नाही असा संकेत आहे . इथे मला एक दुकानदार भेटला . मला मेडिकल मधून काहीतरी वस्तू घ्यायची होती . परंतु दुकान चोरल नदीच्या पलीकडे होते . त्याने मला दुकानांमध्ये बसवले आणि स्वतः नदी पार करून माझ्यासाठी ती वस्तू घेऊन आला . त्याने मला चहापान करविले . याची पत्नी सी आय एस एफ मध्ये होती आणि सध्या तिची सेवा पुणे विमानतळावर चालू होती . त्याने मला फोन लावून तिच्याशी बोलायला दिले . मी त्या दोघांच्या संसाराचे खूप कौतुक केले आणि असेच सुखाने व आनंदाने नांदा अशा शुभेच्छा दिल्या .पुणे विमानतळावर तिला काही अडचण आली तर कोणाला संपर्क साधायचा तो क्रमांक देऊन ठेवला . शिक्षण कमी असल्यामुळे दुकान चालवावे लागणारा तिचा पती पत्नीसाठी आणि तिच्या प्रगतीसाठी काहीही त्याग करायला तयार होता हे पाहून मला खूप आनंद वाटला . इथून थोडेसे पुढे गेल्यावर नदी पार करता येईल अशी जागा आहे . तिथून सीआयएसएफ च्या ट्रेनिंग एरिया अर्थात प्रशिक्षण छावणीतून चालत बडवाह हे गाव सोडले . सकाळची वेळ असल्यामुळे जवानांचे ड्रिल आणि ट्रेनिंग सुरू होते . आश्चर्य म्हणजे हे जवान देखील जाणाऱ्या परिक्रमावासीला नर्मदे हर म्हणतात हे पाहून मला खूप बरे वाटले ! असे म्हणेल तेच खरे हिंदुस्तान चे सैन्य ! देवाला पाहून तोंड वाकडे करणारे सैन्य इंग्रजांचेच म्हणावे लागेल!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अथवा सीआयएसएफचे प्रशिक्षण केंद्र बडवाह येथे आहे . हा अतिशय मोठा आणि सुंदर रमणीय असा परिसर आहे .
सीआयएसएफ बडवाह यांचे मुख्य प्रवेशद्वार . मी जेव्हा जेव्हा कुठलेही लष्करी आस्थापन पाहतो तेव्हा मला असा प्रश्न पडतो की हे देखील आपल्याच लोकांनी बनविले आहे व आपलेच लोक वापरत आहेत मग इथे एवढी स्वच्छता आणि टापटीप , नीटनेटकेपणा दिसतो तसा बाहेरील रस्त्यांवर का दिसत नाही ? खरोखरच विचार करून पाहण्यासारखी गोष्ट आहे .

 इकडे छोटा साई काही केल्या माझा पिच्छा सोडेना . इतका लहान मुलगा एखाद्या अनोळखी बाबासोबत इतका लांब चालतो आहे हे दृश्य आपण शहरांमध्ये कल्पना देखील करू शकत नाही इतके भयावह वाटू शकणारे आहे . परंतु नर्मदा खंडामध्ये हे फार नित्याचे आहे . अखेरीस मी त्याला काही दक्षिणा आणि खाऊ दिल्यावर मगच साई पळाला . त्याला दक्षिणेची अपेक्षा होती परंतु मी त्याला सांगितले की दक्षिणा आई-वडील काढून घेतील परंतु खाऊ मात्र तुला खायला मिळेल !  मग मात्र त्याने खाऊ घेतला . इथून पुढे घनदाट जंगल सुरू झाले . वाटेमध्ये कोणीही नव्हते . अतिशय निर्मनुष्य रस्ता होता . पोटात आग पडू लागली . गुप्ताजींनी सोबत सातूचे पीठ आणि द्राक्षे दिली होती . एका दगडावर बसून ती खावी असा विचार केला . आणि द्राक्ष काढणार इतक्यात माकडांची मोठी टोळी मला बघते आहे असे लक्षात आले . मग मी ती द्राक्षे काढून सर्व माकडांना वाटून टाकली . स्वतः खाण्यापेक्षा इतरांना खायला दिल्यावर मिळणारा आनंद अधिक मोठा असतो ! आवाज करत द्राक्षे खाणारी माकडे पाहून खूप समाधान मिळाले ! निसर्गाचे निरीक्षण केल्यावर लक्षात येते की थोडेच खावे परंतु आनंद घेत खावे . असे केल्याने खूप समाधान मिळते . विषय निघालाच आहे म्हणून सांगतो की वन्य प्राण्यांना आपण होऊन खायला घालणे हे अतिशय चुकीची पद्धत आहे . कारण त्याच्यामुळे जंगलामध्ये जाऊन स्वतःचे अन्न शोधण्याची त्यांची क्षमता आपण कमी करत नेतो . इथे माझे लक्ष नसताना अचानक माकडे आल्यामुळे मला त्यांना द्राक्षे द्यावी लागली . अन्यथा त्यांनी माझे चालणे मुश्किल करून सोडले असते . असो. काल मेहता खेडी मध्ये मी एकादशीचे व्रत केले होते परंतु रात्री आश्रमामध्ये फक्त जेवणच केलेले असल्यामुळे जेवावेच लागले होते त्यामुळे नर्मदा मातेने आज मला उपवास घडवला होता ! मर्कट लीला पाहिल्यावर पुन्हा पुढे चालू लागलो . इथून पुढे जयंती माता नावाचे जंगल लागते आणि तिथे तुम्हाला सर्वाधिक काळ एकटे चालावा लागणारा एक २१ २२ किलोमीटरचा टप्पा लागतो असे अनेक ठिकाणी ऐकले होते .इथे जयंती माता मंदिर अशी पाटी दिसली आणि अंतर तीन किलोमीटर दाखवले होते हे पाहून मला आश्चर्य वाटले . मला क्षणभर कळेच ना की आपण जयंती माता जंगल पार केले की काय ? परंतु अधिक विचार न करता मी जंगलामध्ये शिरलो . आणि एका कोरड्या पडलेल्या चोरल नदीच्या काठाने चालत घनघोर अरण्या मध्ये असलेल्या एका डोंगरापाशी आलो . या डोंगरामध्ये एका गुहेमध्ये जयंती मातेचा विग्रह होता . हे जयंती माता म्हणतात ते मूळ ठिकाण नव्हे . परंतु त्याच मातेचे मंदिर होते . इथे परिक्रमावासी फारसे येत नाहीत असे पुजाऱ्याने मला सांगितले . स्थानिक ग्रामस्थ मात्र येत जात होते . ठिकाण अत्यंत घनदाट जंगलामध्ये आहे . आणि अतिशय रमणीय आहे . इथे काही काळ घालवला . फारच रम्य ठिकाण होते . आता नदी कोरडी पडली होती परंतु तिला पाणी असताना तर हा भाग स्वर्गासारखा भासत असणार ! परंतु केवळ सहा किलोमीटर अधिकचे चालावे लागते म्हणून परिक्रमा वासी इकडे येत नाहीत . मला मात्र नर्मदा मातेच्या कृपेने जयंती मातेच्या या दुर्मिळ गुहेचे दर्शन झाले ! 

नकाशा पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की चोरल नदीच्या काठावर असलेले जयंती माता मंदिर किती घनघोर अरण्यामध्ये विसावलेले आहे !हे संपूर्ण जंगल चालताना खूप मजा आली होती ! कानावर पडणारे विविध पशु पक्ष्यांचे आवाज फारच अल्हाददायक असतात . जंगलातून विविध झाडांचे सुगंध घेऊन येणारा वारा इतका सुखद असतो की त्याची बरोबरी जगातल्या कुठल्याच वातानुकूलन यंत्राशी होऊ शकत नाही .
जयंती माता मंदिराकडे जाणारा जो पूल आहे त्याच्या अलीकडे असे गोलाकार बंधारे घातलेले असून पावसाळ्यामध्ये हा परिसर फारच रमणीय दिसतो
प्रत्यक्ष जयंती मातेचे मंदिर म्हणजे डोंगरात असलेली एक गुहा आहे . पुन्हा एकदा सांगतो की जयंती माता जंगल म्हणून जे प्रसिद्ध आहे ती जयंती माता वेगळी .हा त्याच मातेचा एक विग्रह आहे .
घनघोर अरण्यामध्ये विसावलेली ही गुहा पुलावरून फार सुंदर दिसते .
गुहा डोंगरावर असल्यामुळे चढून जाण्यासाठी अशा पायऱ्या केल्या आहेत . 

गुहेमध्ये गेल्यावर जयंती मातेचे असे सुंदर दर्शन होते . पुजारी महाराजांनी पुढे जाण्यास सांगितल्यामुळे मी पुढे चालू लागलो .

इथून पुढे मी पुन्हा कोरड्या पडलेल्या नदीपात्रातून चालू लागलो . संपूर्णपणे जंगलातील रस्ता होता . अतिशय घनदाट अरण्य पाहून मन सुखावत होते . जयंती माता मंदिरामध्ये भोजन प्रसाद ची काही व्यवस्था नव्हती त्यामुळे उन्हातून उपाशीपोटी चालत राहिलो . सोबतचे पाणी कधी संपून गेले होते . घशाला कोरड पडू लागली . नदीचे पात्रच कोरडे असल्यामुळे बाकी कुठे पाणी मिळण्याची शक्यताच नव्हती .फक्त नदीपात्रात झाडी खूप हिरवीगार असते तिचा लाभ घेत मी चालत राहिलो. चालता चालता एके ठिकाणी रस्ता लागला . शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे चालण्याची गती मंदावली होती . इतक्यात मोटरसायकल वरून एक माणूस शेजारून निघून गेला . थोडे अंतर पुढे जाऊन पुन्हा वळून मागे आला आणि त्याने मला हलव्याची एक पिशवी दिली . तो म्हणाला की मी देवाला नैवेद्य दाखवायला म्हणून हा हलवा घेऊन चाललो होतो . परंतु तुम्ही उपाशी दिसता तर तुम्हीच हा हलवा खावा . मी देवाला दुसऱ्या कशाचा तरी नैवेद्य दाखवीन . माणसांमध्ये देव पाहणाऱ्या त्या माणसाचे मला अपरंपार कौतुक वाटले . देवाचे खरे स्वरूप याच माणसाला कळले बघा ! स्वतः परमेश्वराने भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की मीच वैश्वानर नावाचा अग्नि बनून प्रत्येक जीवाच्या पोटामध्ये वास करतो आहे ! अहं वैश्वानरो भूत्वा प्रणिनां देहमाश्रितः । त्या वैश्वानर अग्नीला हा नैवेद्य अर्पण होणार होता ! हा विवेक ,ही सद्बुद्धी प्रत्येक माणसाला आली तर आपल्या धर्माचे पुनरुत्थान व्हायला वेळ लागणार नाही ! एका झाडाखाली बसून मी तो हलवा खाल्ला ! हलवा म्हणजे हा रव्याचा चांगला खरपूस आणि तांबूस भाजलेला शिरा होता . घरच्या गाईच्या साजूक तुपामध्ये केलेला होता . पिशवीची गुंडाळी करून दप्तरामध्ये भरली आणि पानांना हात पासून पुढे चालू लागलो . अतिशय निर्मनुष्य असा अरण्यातून जाणारा रस्ता होता . रस्त्यावर वाहतूक अजिबातच नव्हती . उन्हाचा तडाखा वाढत होता . झाडांच्या सावल्या त्यांच्या पायाशी विरून गेल्या होत्या . हे पानगळीचे जंगल असल्यामुळे झाडांच्या नुसत्या काड्या शिल्लक होत्या . काळा भोर डांबरी रस्ता अक्षरशः तापून आग ओकत होता . थांबावे अशी जागा सापडत नव्हती . भराभर पावले उचलावीत तर अंगातली शक्ती कमी पडू लागली होती .मला इथून महोदरी किंवा मोदरी या गावातील च्यवन ऋषी आश्रमात पोहोचायचे होते .पुढे कुंडी मार्गे जावे लागते . इथे जाण्यासाठी दोन मार्ग होते .

 १ ) सुलगाव तीन किमी - कुंडी अकरा किमी 

आणि

 २) च्यवन आश्रम  ७ किमी - कुठावा (कश्यप आश्रम ) ३ किमी - पुन्हा च्यवन आश्रम ३ किमी - कुंडी १५ किमी

बहुतांश परिक्रमावासी कमी अंतर असल्यामुळे पहिला मार्ग निवडतात . परंतु मला वाटेतील सर्व स्थानांचे दर्शन घ्यायचे होते तसेच नर्मदा मातेचे दर्शन आणि स्नान देखील करायचे होते त्यामुळे मी दुसरा मार्ग निवडला होता . कारण कश्यप ऋषी आश्रम नर्मदा मातेच्या काठावर आहे . एकदा कुठल्याही कारणासाठी नर्मदा मातेच्या किनाऱ्याहून लांब गेले की परिक्रमावासी तिथून समांतर असलेला रस्ता पकडून चालत राहतात त्यामुळेच नर्मदा मातेच्या काठावरील दुर्मिळ स्थाने पाहायची राहून जातात . असे शक्यतो करू नये .परिक्रमा म्हणजे केवळ चालणेच आहे हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये चालण्याचा कंटाळा करू नये . असो . असेच उन्हातानातून चालताना एका झाडाखाली उजव्या हाताला एक मोठा रांजण पाण्याने भरून ठेवलेला दिसला आणि माझा तहानलेला जीव रांजणात पडला ! धावतच जाऊन मी ते थंडगार पाणी आकंठ प्यायलो . इथे पशु पक्ष्यांसाठी देखील पाणी भरून ठेवले होते . पिवळ्या कंठाची चिमणी ,टकाचोर भोरड्या किंवा सातभाई असे सर्व पक्षी तिथे येऊन पाणी पिऊन तृप्त होत होते . मी इथे सुमारे तासभर शांतपणे एका झाडाखाली पडून पक्ष्यांच्या गमतीजमती पहात बसलो .ज्याने कोणी हे पाणी भरले असेल त्याला मनापासून अनेक आशीर्वाद दिले . इतक्यात ते पाणी भरणारा मनुष्य गाडीवरून आलाच ! एक तरुण मुलगा दुचाकी वर पाण्याचे कॅन घेऊन ही सेवा करत होता ! तो बडवाहला कामाला जायचा तेव्हा एकदा दोन कॅन भरून पाणी रांजणात भरायचा आणि कामावरून परत जाताना पुन्हा एकदा पाणी भरून जायचा . त्याचे हे काम किती पुण्यप्रद आहे विचार करून पहा ! मी त्याला नाव विचारल्यावर त्याने नाव देखील सांगितलं नाही . म्हणाला प्रभुजी नाम मे क्या रखा है ? नर्मदा मैया के नाम पे सब चल रहा है । मी त्याला मनापासून धन्यवाद दिले आणि पुढे चालू लागलो . बरेच अंतर चाललो तरी अजून च्यवन ऋषी आश्रमाची कुठली खूण दिसेना . अखेरीस पुन्हा एकदा डाव्या बाजूला एका गर्द झाडाच्या जाळीमध्ये अर्धा पाऊण तास पडून राहिलो . इथे पूर्वी कोणीतरी अशाच पद्धतीने झोपून गेले असेल अशा खुणा आजूबाजूला दिसत होत्या . परिक्रमावासीच असणार ! दुसरे कोण इथून जाणार ! पाणी प्यायलो तिथून इथे येईपर्यंत एकही गाडी मला दिसलेली नव्हती यावरून हा रस्ता किती निर्मनुष्य असेल याची आपण कल्पना करून पहावी . हा रस्ता भर जंगलातून गेलेला असल्यामुळे इथे सर्व प्रकारची वन्य श्वापदे दिसतात . पट्टेरी वाघ ज्याला या भागामध्ये ढोरबाघ असे म्हणतात हा तर या जंगलाचे भूषण आहे ! परंतु त्याच सोबत बिबट्या , भेकर , कुरंग व सुरंग हरीणे , चितळ  ,सांबर, नीलगाय , रानडुक्कर ,साळींदर , कोल्हा , लांडगा ,तरस ,अस्वल असे सर्व प्रकारचे पशु इथे आढळतात . चरणाऱ्या गाई हिंस्त्र श्वापदांकडून उचलल्या जाणे हे इथल्या लोकांसाठी नित्याचे झालेले आहे . सुदैवाने दुपारची वेळ असल्यामुळे माझा यापैकी कोणाशी सामना झाला नाही परंतु जरी मला हे प्राणी दिसले नसले तरी त्यांना मी निश्चितपणे दिसत होतो याची मला खात्री होती .हळूहळू अरण्याची घनता वाढते आहे असे माझ्या लक्षात आले .

घनघोर जंगलातून जाणारा बडवाह ते च्यवन ऋषी आश्रमाचा मार्ग अथवा जयंती माता मार्ग !
इथे मी वर वर्णन केल्याप्रमाणे दोन मार्ग लागतात . मी नर्मदा मातेच्या जवळून जाणारा उजवीकडचा मार्ग निवडला . पुढे ओंकारेश्वर धरणाचे पाणी शिरल्यामुळे पुन्हा एकदा नर्मदा मातेपासून खूप लांब जावे लागते परंतु त्या नादात काही दुर्मिळ स्थानांचे दर्शन चुकू नये म्हणून मी हा मार्ग निवडला आणि तो निर्णय अतिशय योग्य ठरला असे पुढे लक्षात आले .
या अरण्याला सिद्धवरकूट अरण्य असे नाव असून अत्यंत घनदाट अरण्य असल्यामुळे मुख्य डांबरी सडक सोडून कुठेही डावीकडे उजवीकडे जाण्याचा प्रयत्न परिक्रमावासींनी करू नये .
मला आधी कळले असते तर इथेच असलेल्या काठाच्या रस्त्याने देखील मी गेलो असतो . परंतु हा मार्ग अतिशय दुर्गम असून इथे वाटेमध्ये कोणीही भेटत नाही . वरील नकाशामध्ये आपल्याला बडवाह किंवा चोरल नदीच्या संगमापासून कश्यप ऋषी आश्रमा पर्यंतचा नर्मदा मातेच्या किनाऱ्याने असलेला मार्ग दिसतो आहे . परंतु डावीकडे असणारे घनदाट अरण्य पाहता आपल्या लक्षात येईल की इथे कुठल्याही प्रकारची मानवी मदत मिळणे केवळ अशक्य आहे . अर्थात साधुसंत या मार्गानेच जातात हे देखील मी पाहिले आहे . मला मात्र नर्मदा मातेने जयंती मातेचे दर्शन घडवून , अरण्य दर्शन घडवून फिरवून पुन्हा काठावर आणले .
कश्यप ऋषी आश्रमाच्या समोरच ओंकारेश्वर हे अति पवित्र तीर्थक्षेत्र असून आपल्याला नर्मदा माता आणि कावेरी मातेचा संगम येथे पाहायला मिळतो . त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये येथे जायचेच असा निश्चय मी मनोमन केलेला होता . अर्थात तेव्हा मी नकाशा पाहिलेला नसल्यामुळे हे अंतर किती आहे किंवा अरण्य किती घनदाट आहेत याची मला काहीच कल्पना नव्हती परंतु पुढे आलेल्या अनुभवांनी मला त्या अरण्याची गहनता कायमची पटवून दिली .

च्यवन ऋषींचा आश्रम मी चालत असलेल्या जयंती माता मार्गावरतीच होता आणि कश्यप ऋषी आश्रमासाठी घनघोर अरण्यातून तीन एक किलोमीटर आत मध्ये चालत जावे लागायचे . परंतु तसे आपण जावे असा संकल्प नर्मदा मातेच्या कृपेने माझ्या मनाने घेतला . आणि त्यामुळेच परिक्रमेतील अत्यंत दुर्मिळ असे काही अनुभव मला घेता आले . प्रचंड उष्णतेमध्ये मी ज्या झाडाखाली झोपलो होतो ती सावली फारच सुखद वाटत होती . परंतु चुकून माकून डोळा लागला असता आणि रात्री जाग आली असती तर कठीण परिस्थिती उद्भवली असती त्यामुळे अखेरीस त्या हिरव्यागार गर्द झाडीतून माझे आसन उचलले आणि पुन्हा एकदा जंगलातून चालायला सुरुवात केली .काही अंतर चालल्यावर च्यवन ऋषी आश्रमाची पाटी दिसली . च्यवन हा शब्द ऐकल्यावर बऱ्याच लोकांना च्यवनप्राश आठवेल . ते अगदी योग्यच आहे ! या आयुर्वेदिक औषधाचा शोध च्यवन ऋषीं मुळेच लागलेला आहे .आणि अगदी याच आश्रमात लावलेला आहे ! कारण इथेच त्यांचा आश्रम होता आणि इथल्याच वनस्पती गोळा करून देवांचे वैद्य अश्विनी कुमार यांनी सर्व रोगांवर मात करण्याची प्रतिकारशक्ती देणारे आणि मनुष्याला पुन्हा तरुण बनविणारे च्यवनप्राश हे रसायन बनविले होते .मला हा आश्रम पाहण्याची मोठीच उत्सुकता होती . आश्रमाची पायवाट घनदाट जंगलातून जात होती . अचानक मला गाईंचा एक मोठा कळप चरताना दिसला . इथे थोडे अंतर चालल्यावर मला एक कुपनलिका दिसली जिला हातपंप लावला नव्हता परंतु ज्यातून आपोआप पाणी भसाभसा बाहेर पडत होते .हे पाणी पिण्यासाठी गाईंची आणि पशुपक्ष्यांची लगबग उडाली होती . इतक्या उन्हाळ्यामध्ये असे आपोआप बाहेर येणारे पाणी पाहून मला आश्चर्य वाटले आणि वनक्षेत्र असल्यावर भूजल पातळी कशी उन्नत राहते हे पुन्हा एकदा लक्षात आले . च्यवन ऋषींच्या आश्रमाची कथा मोठी अद्भुत आहे .इथे च्यवनेश्वर महादेवांची स्थापना करून च्यवन ऋषी तपाचरणासाठी अरण्या मध्ये बसलेले होते .अनेक वर्ष तप केल्यामुळे ते वृद्ध झाले होते . पुढे त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांचे मोठे वारूळ तयार झाले . एकदा शर्याती नावाचा राजा त्याची कन्या सुकन्या हिला सोबत घेऊन इथे वनविहारासाठी आला होता .सुकन्या वनामध्ये फिरत असताना तिला हे वारूळ आणि त्याला दोन डोळे आहेत असे दिसले . तिने गंमत म्हणून बाणाने दोन्ही डोळे फोडून टाकले . त्याबरोबर भयंकर आक्रोश करत तपोनिधी उठले आणि हे दृश्य पाहून राजा भयभीत झाला .आता ऋषी काहीतरी शाप देणार इतक्यात राजाने त्यांची क्षमा मागितली आणि मरेपर्यंत त्यांची सेवा करण्यासाठी सुकन्या ही आपली कन्या आपल्याला दान करीत आहे असे सांगून दोघांचा विवाह लावून दिला . सुकन्येला देखील तिच्या या कृत्याचा पश्चाताप झाल्यामुळे तिने वयोवृद्ध च्यवन ऋषींची खूप मनोभावे सेवा केली .एक दिवस देवांचे वैद्य अश्विनी कुमार भ्रमण करत इथे आलेले असताना त्यांनी सुकन्या देवी करत असलेली सेवा पाहिली आणि तिच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्यांनी सांगितले की माझ्याकडे एक असे औषध आहे ज्याच्या सेवनाने च्यवन ऋषी पुन्हा एकदा तरुण होऊ शकतात . इथे जवळच एक कुंड होते त्या कुंडामध्ये तिघेजण उतरले . ऋषींनी औषध प्राशन करून या कुंडांमध्ये अश्विनी कुमार आणि सुकन्या यांच्यासोबत डुबकी मारताच त्यांना पुन्हा एकदा पूर्वीचे तरुण शरीर प्राप्त झाले .  अश्विनी कुमारांच्या या कार्यावर प्रसन्न होऊन च्यवन ऋषींनी त्यांना भरपूर आशीर्वाद दिले आणि अजून अधिकचे काही अधिकार दिले .त्यामुळे चिडलेल्या इंद्राने इथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता ऋषीवरियांच्या शापामुळे तो स्थितप्रभ होऊन उभा राहिला . अखेरीस तो शरण आल्यावर त्याला उ:शाप मिळाला.तिथून पुढे वरील सर्व पात्रांचे स्मरण करून या कुंडामध्ये स्नान केल्यास नेत्ररोग बरे होतात अशी मान्यता त्या जलाला प्राप्त झाली .तसेच अश्विनी कुमारांनी च्यवन ऋषींना जे औषध खाऊ घातले ते च्यवनप्राश या नावाने प्रसिद्ध झाले . हा आश्रम अतिशय पवित्र होता आणि जणूकाही आपण जुन्या पौराणिक काळामध्ये आहोत असे वाटावे असे वातावरण येथे आपोआपच निर्माण झालेले होते . इथे मोहदरी मातेचे स्थान असून त्यामुळेच या गावाला मोदरी असे नाव पडलेले आहे . च्यवन गौड ब्राह्मण समाजाचे हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे या समाजा द्वारे हा आश्रम चालविला जातो .आश्रमाचे महंत तरुण असून गोसेवक आहेत . आश्रमामध्ये सहा वयस्कर गुरुबंधू एकत्र राहत आहेत असे मला लक्षात आले . त्यामुळे त्यांचे दर्शन घ्यावे अशी इच्छा महंतांकडे व्यक्त केली .आश्रमामध्ये प्रचंड प्रमाणात माकडे उपद्रव करीत असल्यामुळे या संतांचा निवास असलेली कुटी चहूबाजूंनी जाळीने वेढलेली आहे . परिक्रमावासींची राहण्याची सोय वेगळी केलेली असते परंतु या सहा गुरुबंधूंनी मला त्यांच्या इथेच आसन लावण्यासाठी तखत अर्थात लाकडाची खाट देऊ केली परंतु मी नम्रपणे तीन नाकारली आणि त्यांच्या पायापाशी जमिनीवरच आसन लावले . या सर्वांचा अतिशय उत्तम असा सत्संग मला लाभला . कच्ची कैरी पाड आलेला आंबा आणि पिकलेला आंबा ही जरी एका झाडाची फळे असली तरी तिघांची चव वेगवेगळी असते . अगदी त्याचप्रमाणे नवीन साधू , एखादा महंत आणि अनेक दशके साधुत्व धारण केलेले वयोवृद्ध साधू या सर्वांच्या अनुभवांमध्ये ,ज्ञानामध्ये , धारणे मध्ये जाणवण्याइतपत फरक असतात . असे साधू कुठे मिळाले तर आवर्जून सत्संगाचा लाभ घ्यावा . अतिशय दुर्लभ असा हा संत संग असतो . साधूंना शक्यतो समोर आलेला मनुष्य कसा आहे हे आपोआप कळत असते कारण तितक्या मोठ्या संख्येने त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये माणसे पाहिलेली असतात . बरेचदा लौकिक जीवनात अतिशय प्रतिष्ठित वाटणारी एखादी व्यक्ती साधूंसमोर गेल्यावर साधु मात्र त्या व्यक्तीचा अपमान करत आहे असे आपल्याला पाहायला मिळते . याउलट लौकिक जीवनात कफल्लक भासणारी एखादी व्यक्ती साधूंच्या समोर गेल्यावर साधू त्या व्यक्तीला सन्मानाने वागवत आहेत असे देखील पाहायला मिळते . इथे दोष त्या व्यक्तीमध्ये किंवा साधूच्या वर्तनामध्ये नसून दोष आपल्या दृष्टीमध्ये आहे . समोरची व्यक्ती जे दाखवते आहे तेच सत्य आहे असे मानून चालण्याची आपल्याला लौकिक जीवनामध्ये सवय लागलेली असते . या उलट साधू मात्र व्यक्तीच्या दिसण्यावर न जाता असण्यावर जात असतात . मला माझ्या अल्प आयुष्यामध्ये पूर्व सुकृतामुळे अनेक साधुसंत महंत बैरागी वितरागी तडी तापसी संन्यासी योगी विदेही महात्मे यांचे दर्शन व सहभास लाभलेला आहे . या सर्वांच्या बाबतीत मी हे निरीक्षण केलेले आहे की ते समोरची व्यक्ती कोण आहे याची तमा न बाळगता कशी आहे यावरून कसे वागायचे ते ठरवतात . या आश्रमामध्ये तरुण संन्यासी देखील अतिशय तेजस्वी आणि कष्टाळू होते . विशेषतः इथले एक तरुण साधू पाहिल्यावर मला गंजाल गोमती नर्मदा माता त्रिवेणी संगमावरील नागा साधूंची आठवण झाली . इथे जुन्या आखाड्याचे दत्त मंदिर सांभाळणारे जे महंत आहेत त्यांची हुबेहूब प्रतिकृती म्हणजे हा तरुण साधू होता . मी त्याला हे सांगितल्याबरोबर तो हसू लागला आणि मला म्हणाला की यापूर्वी अनेक साधुंनी मला हेच सांगितलेले आहे आणि मला खरोखरच त्या नागा साधूंना भेटण्याची मनापासून इच्छा आहे परंतु अजून योग आलेला नाही . या आश्रमामध्ये पाहण्यासारख्या खूप गोष्टी आहेत . नेहमीप्रमाणे मी आश्रमामध्ये एक फेरफटका मारला आणि सर्व गोष्टी अनिमिष नेत्रांनी पाहिल्या . सर्व देवस्थानांचे मनोभावे दर्शन घेतले . आपणही ते दर्शन घ्यावे .

महोदरी देवीचे मूळ स्थान असलेला महोदरीचा आश्रम हा च्यवन ऋषींची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे . च्यवनगंगा किंवा अमृतकुंड हे इथले प्रमुख तीर्थ आहे . त्याचे दर्शन अवश्य घ्यावे .
या संपूर्ण भागामध्ये घनदाट अरण्य असून भूगर्भातील पाण्याची पातळी देखील खूप वर आहे त्यामुळे सर्वत्र पाणी आढळते . पावसाळ्यात ओढ्याला आलेल्या पुरामुळे वाहून गेलेले रस्ते येथे पाहायला मिळतात .
आश्रमामध्ये मोठ्या संख्येने गोवंश सांभाळलेला असून सुंदर असा गोठा येथे आपल्याला पाहायला मिळतो . आश्रमातील सर्व गाई चरण्यासाठी जंगलामध्ये सोडल्या जातात व बरेचदा वाघाच्या हल्ल्यामध्ये गाई मरण पावतात .
हा आश्रम उदासीन आखाड्याच्या ताब्यात आहे . आश्रमात सगळीकडे हरि हर - हरि इच्छा असे लिहिलेले आढळते .
आश्रम परिसरामध्ये अत्यंत घनदाट अरण्य आहे . मोठ्या प्रमाणात वन्य श्वापदांचा वावर आहे . या संपूर्ण जंगलामध्ये अन्यत्र कुठेही परिक्रमा वासीयांची सोय होत नाही .
त्यामुळेच इथे असलेला परिक्रमा वासी निवास मंडप चारी बाजूंनी जाळ्यांनी बंदिस्त करण्यात आलेला आहे . त्यामुळे वन्य श्वापदे आणि माकडे यांच्या उपद्रवापासून परिक्रमावासीयांची आणि त्यांच्या सामानाची मुक्तता होते
या परिसरामध्ये अनेक छोटे मोठे ओढेनाले आहेत आणि सर्वत्र घनदाट झाडी पाहायला मिळते .
मुंग्यांची मोठमोठी वारुळे येथे आपल्याला पाहायला मिळतात . सर्व वारुळे किमान एक पुरुष उंचीची आहेत .
मठामध्ये गोरक्षनाथांची एक सुंदर मूर्ती आहे . ते स्वतः येथे उभे आहेत असा भास होतो .
चंद्र देवांची देखील सुंदर अशी मूर्ती इथे आहे .
परिसरामध्ये मोठ-मोठी अजस्त्र झाडे आपल्याला पाहायला मिळतात .

आश्रमाचा परिसर खूपच मोठा आहे . सर्वत्र हिरवीगार झाडे असल्यामुळे मन प्रसन्न होते .
हे या आश्रमाचे प्रवेशद्वार आहे . 
आश्रमाकडे जाणारा रस्ता असा कच्चा मातीचा आहे . दुतर्फा तुफान झाडी आहे .
हे या आश्रमाचे प्रमुख महंत असून हे अतिशय कर्तव्यनिष्ठ व गोसेवक आहेत .
आश्रमातील तरुण साधू सर्व पूजाअर्चा व अन्य कारभार सांभाळतात .
डावीकडचे हेच ते साधू ज्यांना पाहून मला नागा बाबांची आठवण झाली होती .
हे तरुण साधू अतिशय तेजस्वी असून मोठ्या कौशल्याने आश्रमाचा सर्व कारभार सांभाळतात .
हाच तो संत निवास आहे जिथे या सहा गुरुबंधू वयस्कर साधूंनी मला तखत दिला होता परंतु मी त्यांच्या चरणाशी बसून सत्संग केला . साधू क्षणाक्षणाला आपली परीक्षा घेत असतात हे नेहमी लक्षात ठेवावे .
आश्रमाचे तरुण महंत हरी इच्छा म्हणून सर्व कारभार सांभाळत आहेत .
हे सर्व तरुण साधू मला आश्रमात भेटले होते . हा आश्रम साधू संतांनी नेहमीच गजबजलेला असतो .
इथे राम गोपालदास नामक यतीवर्यांची समाधी असून त्यांची सुंदर मूर्ती इथे बसवलेली आहे .
साधू संतांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था इथे आहे . आणि तेच चांगले असते . गृहस्थी लोकांनी स्वतः साधूंनी परवानगी दिल्याशिवाय त्यांच्यासोबत राहण्याचा आग्रह धरू नये हेच उत्तम .
आश्रमाचा संपूर्ण इतिहास इथे लिहिलेला आहे तो आपण वाचू शकता .
आश्रमामध्ये साजरे होणारे विविध सण व उत्सव वरील प्रमाणे आहेत .
आश्रमाचा आतला परिसर मोठाच रम्य आहे . अमृतकुंड केंद्रस्थानी ठेवून आश्रमाचा विकास केलेला आहे .
चवनेश्वर महादेवांच्या मंदिरावर लिहिलेला एक श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे . 
शर्याती च सुकन्या च च्यवनः शक्रमश्विनौ ।
एतेषां स्मरणमात्रेण नेत्ररोगान् विनश्यति ॥ 
आश्रमाची कथा आपण मगाशी पाहिलीच त्या कथेमधील सर्व पात्रांचे स्मरण जो कोणी करतो त्याचे नेत्ररोग बरे होतात असा या श्लोकाचा भावार्थ आहे . ज्यांना नेतृत्व असतील त्यांनी प्रयोग करून बघायला काय हरकत आहे ! त्याचबरोबर अतिशय आरोग्यदायी असा चवनप्राश देखील आपण सेवन केला पाहिजे असा या संपूर्ण कथेचा भावार्थ निश्चितपणे आहेच .

कारण या संपूर्ण परिसरातील दुर्मिळ वनस्पतींपासून बनविलेले हे रसायन निश्चितपणे आरोग्यदायी असणार या शंकाच नाही .
हेच ते कूप आहे ज्याला पंपाशिवाय किंवा हातपंपाशिवाय अखंड पाण्याचे झरे लागलेले आहेत .
इथून जवळच असलेला महोदरीचा किंवा मोदरीचा जलप्रपात देखील प्रसिद्ध आहे .
इथे सरीसृप श्वापदांची संख्या अधिक असल्यामुळे पर्यटकांनी सावध राहावे अशा पाट्या सर्वत्र लावलेल्या आढळतात .
पवित्र असे औषधी जल असणारे हेच ते अमृतकुंड होय .
बरेचदा परिक्रमावासी मूळ रस्त्यापासून आश्रम थोडासा आत असल्यामुळे पुढे जाण्याचा विचार करतात परंतु तसे कृपया करू नये नाहीतर एका जबरदस्त स्थानाला आपण परिक्रमेदरम्यान मुकाल हे निश्चित आहे .
एकंदरीत हा आश्रम कायम स्मरणात राहील असा आहे आणि इथे पुन्हा जावयाचे असे ठरवले तर एका पायावर जायची आपली तयारी आहे . परंतु इथल्या साधूंशी चर्चा करताना असे लक्षात आले की इथून कश्यप ऋषींचा आश्रम केवळ तीन किलोमीटर दूर आहे . वाट जंगलातली आहे . परंतु नर्मदा मातेच्या काठावरती हा आश्रम आहे ! असे कळल्याबरोबर कुठलाही मागचा पुढचा साधक बाधक विचार न करता मी तत्काळ माझी झोळी उचलली आणि नर्मदा मातेच्या दिशेने झेपावलो . आईचा महिमा सांगताना समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये म्हणतात ,

क्षणभरी बाळ मातेसी न देखे ।
तरी आक्रंदोनी रुदन करी दुःखे ।
ते समयी मातेसारिखे ।
आणिक काहीच नाही ॥

जरी ब्रह्मादिक देव आले ।
अथवा लक्ष्मीने अवलोकिले ।
तरी नवचे बुझावले ।
आपले माते वाचोनी ॥

कुरूप अथवा कुलक्षण ।
सकळाहुनि करंटेपण ।
तरी नाही ती समान ।
भू मंडळी कोणीही ॥

आई कशीही असली तरी बाळासाठी तिचा सहवास हा हवाहवासाच असतो . आई शिवाय बाळ क्षणभरही आनंदामध्ये राहू शकत नाही . साक्षात ब्रह्मदेव आले किंवा लक्ष्मी सांभाळायला आली तरी बाळाला आई शिवाय दुसरे कोणीही नको असते .आई कुरुप किंवा कुलक्षणी असली तरी बाळासाठी प्रियच असते . इथे तर माझी नर्मदामाई इतकी सुंदर इतकी सुलक्षणी आणि इतकी अलौकिक होती की तिच्या दर्शनाशिवाय आणि स्पर्शाशिवाय एक क्षणही नर्मदा खंडामध्ये व्यतीत करणे म्हणजे मला वेळ वाया घालवण्यासाठी वाटत असे . त्यामुळे मी आश्रमातून बाहेर पडलो . अंधार पडेल का पुढे जंगल आहे का वगैरे कुठलेही प्रश्न मला पडले नाहीत . अनेक साधुसंतांच्या सहवासात बसलेला मी क्षणामध्ये एका अतिशय घनदाट अरण्यामध्ये घुसलो . आता मला सोबत होती की फक्त रात किड्यांच्या किर्र s s आवाजाची , मला दिसू न शकणाऱ्या परंतु मला पहात असलेल्या अनेक वन्य श्वापदांची आणि अखंड सुरू असलेल्या नर्मदा मातेच्या नामस्मरणाची . . .

नर्मदे हर !


अनुक्रमणिका 

मागील लेखांक 

पुढील लेखांक 

वरील लेखांक दृक्श्राव्य पद्धतीने ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लेखांक एकशे सेहेचाळीस समाप्त (क्रमशः)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका (Index)

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !