लेखांक १२४ : रेंगणचा कामदेश्वर आणि टेम्बे स्वामींचे समाधी स्थान गरुडेश्वर

                      उत्तर वाहिनी नर्मदा मैया 
मणीनागेश्वराचे मंदिर सोडले आणि रस्त्यावर पडलेला कचरा न बघवल्यामुळे एका शेतात घुसून नर्मदा मातेचा काठ गाठला . इथे मोठ्या प्रमाणात मगरी आहेत हे माहिती होते . परंतु काठाने चालल्याशिवाय मला चैनच पडत नसे , असे काहीसे झाले होते . इथे सुद्धा वाऱ्याने उडून आलेला कचरा दिसत होता . वाईट वाटले . हे वासण किंवा वासणा नावाचे गाव होते . समोर मांगरोल दिसू लागले . हाच नर्मदा खंडातील मगरींचा "कोअर झोन " होय ! मी माझ्या ओळखीची पूछकटी मगर कुठे दिसते का ते शोधत अतिशय सावधपणे चालू लागलो . न जाणो अचानक डाव्या हाताने मगर यायची ! म्हणून दोन्हीकडे माझे लक्ष होते . इथे मोठ्या प्रमाणात येणारे उत्तर वाहिनी परिक्रमा करणारे परिक्रमावासी मगरींच्या अस्तित्वाबाबत अनभिज्ञ आहेत असे माझ्या लक्षात आले . स्थानिक लोक व्यावसायिक गणित डोक्यात ठेवून त्यांना मगरींपासून असलेला धोका सांगत नाहीत . 
याच भागात मागे मगरीने एक मुलगा तोडला होता . असे प्रसंग या भागामध्ये वारंवार घडतात परंतु तरीही लोक बिनधास्तपणे पाण्यामध्ये उतरतात . 
या भागातील नर्मदेचे एक मोठे वैशिष्ट्य आहे . नर्मदा माता एरव्ही  पूर्व पश्चिम वाहत असल्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त तिच्या समोरच्या काठावर कधी दिसत नाही . परंतु इथे ती दक्षिण उत्तर वाहत असल्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त फार सुंदर दिसतात ! 
या भागातील सूर्यास्ताची काही दृश्ये 
अर्थातच ही संग्रहित छायाचित्र आहे
इतका सुंदर सूर्यास्त पुन्हा कुठेही दिसत नाही !
आज असाच सूर्यास्त पाहत मी चालत होतो .
चालता चालता एका नावाड्यांच्या समूहापाशी मी आलो . मला पाहून सर्वांनी ओळखले की हा पूर्ण परिक्रमावासी आहे . सर्वांनी मला नर्मदेहर केले . सर्वजण एकदम खुश दिसत होते . संध्याकाळची वेळ होती . दिवसभर उत्तर वाहिनी परिक्रमा करणाऱ्या लोकांना इकडून तिकडे तिकडून इकडे पोहोचवून सर्वांनी उत्तम कमाई केली होती . मी सहज त्यांना आकडा विचारला . सर्वांनी मिळून आज पाच लाख रुपये कमावले होते . त्यामुळे सर्व नावाडी भलतेच खुश होते . इतक्या पैशांमध्ये इथे वर्षभर अतिशय राजेशाही जीवन जगता येते . माणशी वीस रुपये तिकीट लावून सुद्धा इतके पैसे या लोकांनी कमावले होते . बोलता बोलता त्या लोकांनी मला नर्मदा परिक्रमेविषयी माहिती विचारायला सुरुवात केली . बरेचदा स्थानिक लोक जेव्हा तुम्हाला परिक्रमेविषयी माहिती विचारतात तेव्हा त्यांना ती माहिती जाणून घेण्यात रस नसतो तर तुम्ही खरोखरीच उत्तम प्रकारे परिक्रमा करत आहात का , याची परीक्षा ते घेत असतात ! आताही त्यांचा रोख तसाच वाटला . मी त्यांच्यावर उलट डाव खेळला ! मी म्हणालो मी करतो आहे ती परिक्रमा काय कामाची ! खरी सोपी आणि आदर्श परिक्रमा म्हणजे उत्तर वाहिनी परिक्रमा ! मग मात्र सर्वजण एक मुखाने मला सांगू लागले ! "नही नही बाबाजी !  ऐसा नही है । आप गलत सोच रहे है । असली परिक्रमा तो संपूर्ण नर्मदा परिक्रमा ही है । यह तो सिर्फ पंचकोसी है । संपूर्ण नर्मदा परिक्रमा का फल इस मे कहा !" त्यांच्याच तोंडून हे आले हे बरे झाले . मी त्यांना म्हणालो , " फिर आप लोगो को गलत जानकारी क्यू देते हो ? " " क्या करे बाबा जी । पापी पेट का सवाल है । यहा मगरमच्छ इतने ज्यादा है की ज्यादा मछली नही निकाल सकते । इसलिये सब कोई नाव चलाता है । " " बाबाजी हमारी संपूर्ण परिक्रमा हो जाएगी क्या ? " एका केवटाने हात जोडून तळमळीने विचारले . मी म्हणालो अरे तुम्ही तर साक्षात नर्मदेची लेकरे आहात ! ती आपली सर्वांची आई आहे ! आई मुलाचे गाऱ्हाणे नाही ऐकणार तर कोण ऐकणार ? नक्कीच सर्वजण परिक्रमा करू शकता ! उलट मी तर तुम्हाला असे सुचवेन की एकदा संपूर्ण नर्मदा परिक्रमा करून तुम्ही आलात की तुमचे व्यक्तिगत जीवन आणि ग्राहकांशी वागण्याची पद्धत सुद्धा आमूलाग्र बदलून जाईल ! तसेच एकट्याने परिक्रमा करण्याचे महत्त्व देखील मी त्यांना समजावून सांगितले . आपण कधी एकटे नसतोच हे केवट लोकांना चांगले माहिती असते . कारण नर्मदा मातेतून नाव वल्हवताना त्यांना तिच्या अस्तित्वाचे अनेक अनुभव आलेले असतात त्यामुळे सर्वांनाच माझे बोलणे पटले . आणि लवकरच एकट्या एकट्याने नर्मदा परिक्रमा करण्याचे सर्वांनी ठरविले . नर्मदा मातेच्या काठावर राहून देखील नर्मदा परिक्रमा करून शिकलेल्या स्थानिक लोकांच्या बोलण्यामध्ये हा सूर नेहमी जाणवतो . ते नेहमी आपल्याला म्हणतात की तुम्ही इतक्या लांबून येऊन नर्मदा परिक्रमा करत आहात . परंतु आम्ही इथेच राहत असून देखील आम्हाला जमत नाही म्हणजे आम्ही किती दुर्दैवी असू पहा ! मग आपणच त्यांची समजूत घालायची आणि सांगायचे की अरे तुम्ही अखंड नर्मदा मातेचे दर्शन आणि तिच्यामध्ये स्नान करत लहानपणापासून जगत आहात ते भाग्य आम्हाला कुठे ! मंदिराच्या बाहेरून येणारा मनुष्य मंदिराची प्रदक्षिणा किंवा परिक्रमा करतो परंतु मंदिराच्या दारातच उभे असलेले जय विजय यांना प्रदक्षिणा घालायची काय गरज ! असे काहीतरी ऐकल्यावर त्यांना थोडेसे बरे वाटायचे. परंतु तरी देखील तीव्र तळमळ असल्याशिवाय नर्मदा परिक्रमा होत नाही हे धगधगीत सत्य असल्यामुळे असा एखादा तळमळीचा मनुष्य दिसला तर त्याला नक्की नर्मदा परिक्रमे विषयीची सर्व ती माहिती मी आवर्जून सांगायचो . करणे न करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न . 
बघता बघता अंधार वाढू लागला . मला लक्षात आले की आज मी मुक्कामावर पोहोचायला उशीर केलेला आहे . पुढे कुठे जायचे मला काहीही माहिती नव्हते . पुढे गरुडेश्वर हे चालू होते परंतु ते अजून खूपच लांब होते . तिथे उजेडामध्ये पोहोचता येणे शक्य नव्हते . अर्थात हे मला तेव्हा माहिती नव्हते . मी कधीच आता पुढे कुठे मुक्काम करायचा याचा विचार करत नसे . नर्मदा मातेची इच्छा असे म्हणून चालत राहायचे . इतक्यात माझ्यासमोर एक म्हशींचा कळप आडवा आला . त्यांना चुकवण्यासाठी मी डावीकडून त्यांना ओलांडू लागलो . परंतु त्या हळूहळू वर सरकू लागल्या आणि त्यांच्यामध्ये मी पुरता अडकलो . अखेरीस त्यांच्या मागोमाग चालत चालत मी एका मंदिरापाशी येऊन पोहोचलो . अक्षरशः ते मंदिर येईपर्यंत म्हशींच्या कळपामधून मला बाहेरच पडता येत नव्हते अशी अवस्था झाली होती . काही काही म्हशी अतिशय भित्र्या असतात . त्यांना एखादा माणूस दिसला आणि त्याची भीती वाटली की मान अतिशय ताठ करून विचित्र पद्धतीने आपल्याकडे बघतात ! आणि आपण त्यांना घाबरवले की एका क्षणात उडी मारून पळून जातात ! ह्या म्हशी तशा नव्हत्या. या सर्व निवांत होत्या . त्यांच्या मागे चालत चालत मी एक मातीचा चढ चढलो . समोरच छोटेसे मंदिर होते . हे कामेश्वर किंवा कामदेश्वर महादेवाचे मंदिर होते . त्याचा नर्मदा पुराणा मध्ये उल्लेख आहे . इथे भगवानदास नामक एक महात्मा राहत असत .परंतु सध्या ते जागेवर नव्हते .कुठेतरी यात्रेवर गेले होते .त्यामुळे पंचवीस दिवसापासून एक भटकणारा गरीब ब्राह्मण इथे येऊन सेवा देत राहिला होता  आणि एक दरबार भगत सर्व सेवा कार्य पाहत होता . मोठ्या जमीनदार क्षत्रिय लोकांना या भागात दरबार म्हणण्याची पद्धत आहे . या दरबार लोकांचा रुबाब मोठा पाहण्यासारखा असतो .आपल्याकडे जसे पाटील , देशमुख असतात तसाच हा प्रकार . यांचे नाव होते सामरभाई बारिया दरबार . यांना ऐकायला थोडे कमी यायचे . दरबार भगत  (भक्त) आणि गरीब ब्राह्मण यांचे अजिबात पटत नव्हते . दोघांचे सतत खटके उडायचे आणि त्यांची लुटुपुटुची भांडणे बघायला मजा यायची ! परंतु तत्पूर्वी मी त्यांना विचारले की इथे जवळपास कुठला आश्रम आहे का जिथे मला मुक्काम करता येईल . तेव्हा सामरभाई म्हणाले या मंदिरामध्ये राहिले तर तुम्हाला चालणार नाही का ? मी म्हणालो माझी काही हरकत नाही . परंतु विचारणे हे माझे कर्तव्य होते म्हणून विचारले . दोघांना मी थांबणार आहे हे कळल्यावर आनंद झाला . पुन्हा त्यांची छोट्या मोठ्या गोष्टीवरून भांडणे सुरू झाली . ब्राह्मण गरीब असला तरी हळूच चिमटे काढायचा . दरबारला राग येईल असे काहीतरी मुद्दाम करायचा . मी कल्पना केली की हाच मनुष्य जर चुकून माकून श्रीमंत झाला तर किती उत्पात माजवेल ! सामर भाई दरबार हे एक मोठे मजेशीर व्यक्तिमत्व होते त्यांना सतत ओम किंवा नर्मदा माता किंवा ओम नमः शिवाय असे जोरात ओरडून म्हणायची सवय होती ! सर्वत्र शांतता असताना अचानक हे ओरडून वरीलपैकी कुठलातरी एक मंत्र म्हणायचे .त्यांना अजून एक सवय होती . कुठल्याही गोष्टीला नमस्कार करून तिला ते उदबत्ती ओवाळत बसायचे . त्यांना तो छंदच लागलेला होता ! संपूर्ण परिसर त्यांनी उदबत्ती मय करून टाकला होता . मी महादेवाचे दर्शन घेतले आणि आसन लावण्यासाठी कुठली जागा मिळते याची वाट पाहू लागलो . मंदिर एका कट्ट्यावर बांधलेले होते आणि छोटेसे होते . समोरच भगवानदास महाराजांची कुटी होती . परंतु परिक्रमावासीने नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण साधूची बरोबरी करून कधी त्यांच्याजवळ किंवा शेजारी झोपायला जाऊ नये . आसनही लावू नये . आपली साधक ही पायरी ओळखून दूर कुठेतरी आसन लावावे . साधू स्वतः म्हणाले तरच त्यांच्या जवळ आसन लावावे . असो . आता सुद्धा ब्राह्मण कुटीमध्ये झोपणार होता . त्यामुळे दरबार मला म्हणाला की आपण दोघे या कट्ट्यावर झोपूयात . मी लगेच कट्ट्यावर आसन लावले . तोपर्यंत चांगलाच अंधार पडला होता . गेल्यावर त्या भागाची माहिती घेण्याची मला सवय होती . त्याप्रमाणे मी सामरभाई दरबार यांच्याशी गप्पा मारू लागलो .या गावामध्ये मुस्लिम समाजाची साधारण ३०० घरं होती . अडीचशे घरे आदिवासी समाजाची होती . दरबार लोकांची दोन-चार घरे होती . 
 रेंगण गावातील मशीद
दरबार सांगू लागला . एकेकाळी आम्ही या संपूर्ण भूमीवर राज्य करायचो . आमच्या खापरपणजोबांनी शेतात कामाला म्हणून आदिवासी आणि मुसलमान लोक आणले . परंतु त्यांच्यामध्ये बहुपत्नीकत्व आणि बहुपुत्रत्व या दोन प्रथा असल्यामुळे बघता बघता इतकी घरे निर्माण झाली ! आता याच लोकांचा सरपंच असतो . आलटून पालटून गावावर आदिवासी आणि मुसलमान लोकांची सत्ता असते . दरबार लोकांचा मान पूर्णपणे संपलेला आहे . कालाय तस्मै नमः । मी पूजा करत असताना देखील दरबार माझ्याशी बोलत राहिले . त्यांना किती बोलू आणि किती नको असे झाले होते . इथे कोणीच राहायला येत नाही असे त्यांनी मला सांगितले . उत्तर वाहिनी परिक्रमा वासींना येथे सेवा दिली जात नाही असे देखील त्यांनी सांगितले . गरीब ब्राह्मण चैत्रमासामध्ये संपूर्ण उपवास करायचा व फक्त दिवसातून चार-पाच वेळा चहा तेवढा प्यायचा . एवढे कठोर व्रत पार पाडून देखील महिन्याभरात त्याचे वजन जरा देखील कमी जास्त होत नसे ! मुळात तो कृषच होता . दरबार नी त्याला चहा करून पाजला आणि माझ्यासाठी तिखट खिचडी बनवली ! इतकी तिखट खिचडी मी संपूर्ण परिक्रमेत खाल्ली नव्हती . मंदिराच्या शेजारीच एका मुस्लिमाचे घर होते . शक्यतो खेड्यापाड्यातील गोठे अतिशय स्वच्छ नेटके असतात . परंतु याने कुठलीही शिस्त न बाळगता कुठेही कुठलीही जनावरे कशीही बांधलेली होती . त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते . त्याचा वास मंदिरापर्यंत पोहोचत होता . तो हळूहळू मंदिराच्या बाजूला त्याची सीमा वाढवतो आहे असे देखील मला कळाले . शक्यतो खेड्यापाड्यामध्ये कोणी नवीन माणूस आला तर त्याच्याशी येऊन बोलण्याची किंवा ओळख करून घेण्याची पद्धत असते . परंतु यांना माझ्याशी काही देणे घेणे नव्हते . दरबार ने उगाचच त्यांना मंदिरातूनच ओरडून सांगितले की एक संपूर्ण परिक्रमावासी आलेला आहे . परंतु त्यांनी कमालीचे औदासिन्य दाखविले . अर्थात ही अपेक्षितच होते . परंतु मला आलेला अनुभव असल्यामुळे त्याची नोंद करून ठेवत आहे इतकेच .
गोला मध्ये दाखवलेले कामेश्वर महादेवाचे मंदिर आहे आणि शेजारी हिरव्या रंगाचे घर दिसते आहे .
 खिचडी खाऊन झाल्यावर मला झोप येऊ लागली . परंतु दरबारच्या गप्पा काही संपेनात ! त्यात सारीच एकेरी वाहतूक होती ! दरबार साहेबांना ऐकू येत नसल्यामुळे मी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता ! दोघांची भांडणे होण्याचे कारण देखील ब्राह्मण एक बोलतो आणि दरबार एक ऐकतो हेच होते . सामरभाई दरबार अखंड ज्ञान वाटप करत होते ! मला असे वाटले की नर्मदा मातेने मला या संकटातून सोडवावे ! आणि मी तिला मनोमन विनंती केली यांना गप्पा ऐकणारा कोणीतरी मनुष्य हवा आहे . कृपया तो उपलब्ध करून दे ! थोड्याच वेळात तिथे एक पोरसवदा मुलगा आला . अनिल तडवी त्याचे नाव . अकरावी मध्ये शिकत होता तरी अजून मिसरूड सुद्धा फुटले नव्हते . मला असे वाटले की मी सुटलो . परंतु लवकरच माझ्या लक्षात आले की मी आगीतून उठून फुफाट्यामध्ये पडलेलो आहे ! कारण याचा अजून आवाज देखील फुटलेला नव्हता परंतु त्या चिरक्या आवाजामध्ये हा जणू काही ब्रह्मज्ञानी असल्याचा आव आणत मोठ्या मोठ्या बाता मारत होता ! याचे असे म्हणणे होते की तो मसाण मेलडी मातेचा भक्त असून तिची कठोर उपासना करून त्याने तिला प्रसन्न करून घेतलेले आहे !  आणि तो त्या मंदिरामध्ये बसून मला मंदिरे कशी थोतांडी व मूर्खपणा पसरवणारी असतात हे सांगू लागला ! मंदिरापेक्षा स्मशान कसे श्रेष्ठ आहे हे तो सांगू लागला ! 
हीच ती मसाण मेलडी माता
मुलगा अतिशय विचित्र आणि विक्षिप्त होता . त्याला जरा सुद्धा मान मर्यादा कळत नव्हती . क्षणभर तो दारू पिला आहे की काय असे वाटत होते . हा मोटीया नावाच्या गावात राहत असे .इथे कुठल्यातरी नातेवाईकांकडे आला होता . मला त्याने परिक्रमा सोडून घरी जाण्याचा सल्ला दिला ! अखेर माझ्या लक्षात आले की आज काही झोपण्याचा योग दिसत नाही . आणि मी त्याच्या त्या मोठ्या मोठ्या बाता ऐकून त्याला अजून प्रश्न विचारून स्वतःची करमणूक करून घ्यायला सुरुवात केली ! त्याला कुठल्याही गोष्टीचे तीळमात्र ज्ञान नव्हते . परंतु एखादी गोष्ट किती गूढ आहे ते डोळे मोठे करून समजावून सांगण्याची त्याची हातोटी एवढी जबरदस्त होती की हा लवकरच आदिवासी समाजातील गुरु किंवा भगत बनणार याची मला खात्री पटली . याला माझे बोलणे आणि शंका कुशंका ऐकून अशी खात्री वाटू लागली की त्याला त्याचा पहिला शिष्य भेटला आहे ! आणि त्यामुळे तो अजूनच बाता मारू लागला ! माझी हसून हसून पुरेवाट होऊ लागली ! परंतु हा पठ्ठ्या काही हलायचे नावच घेईना ! मी देखील त्याला माझी चांगली करमणूक होते आहे म्हणून बसवून ठेवला ! अखेरीस मोठे मोठे ब्रह्मज्ञान बोलून झाल्यावर इथे जेवण मिळणार नाही हे कळल्यावर भुकेने कळवणारा तो बिचारा घरी निघून गेला . जाताना पुन्हा दरबारला काहीतरी ज्ञान शिकवून गेला . मोठा उसासा टाकत मी निद्रादेवीला शरण गेलो !
सकाळी लवकर निघालो . मी असा विचार केला की भल्या पहाटे निघावे म्हणजे उत्तर वाहिनी परिक्रमेचे परिक्रमावासी भेटणार नाहीत . असा विचार करत मी काल म्हशीं सोबत ज्या पायवाटेने वर आलो होतो त्याच पायवाटेने मैय्याच्या काठावर गेलो .  मला असे वाटले की आता काठावर मी एकटाच असेन ! पाहतो तर काय ! इथे उत्तर वाहिनी परिक्रमा करणाऱ्या लोकांचे ट्राफिक जाम झालेले होते ! इतके लोक नर्मदा मैयाच्या काठावर मी पहिल्यांदाच पाहत होतो ! अक्षरशः चालायला जागा नव्हती ! मला काय करावे ते सुचेना ! मी धावतच वाट सोडून अजून खाली मैयाच्या पात्रामध्ये  तो उतरलो आणि वेगाने चालायला लागलो . इथे पायवाट वगैरे काही नव्हती . फक्त झाडी होती . आता मला कुठूनही कसेही चालायची सवय झालेली असल्यामुळे त्याचे मला फारसे काही वाटत नव्हते . गर्दी मधून कोणीतरी ओरडले तो पहा परिक्रमावासी ! त्या गर्दीमध्ये तुंबलेले सारे लोक माझ्याकडे डोळे विस्फारून पाहू लागले . सर्वांनी नर्मदे हर चा पुकारा करायला सुरुवात केली ! बहुतेक प्रत्येक उत्तरवाहिनी परिक्रमा वासीला देखील संपूर्ण नर्मदा परिक्रमा वासी एकदा तरी वाटेत भेटावा किंवा दिसावा अशी इच्छा असते ! भल्या पहाटे सुद्धा एवढी गर्दी होण्याचे कारण होते . या लोकांना उन्हाचा त्रास नको असतो म्हणून ते अंधारातच परिक्रमा चालू करतात . त्यांना हे देखील माहिती नसते की परिक्रमेच्या नियमानुसार सूर्योदयाशिवाय बाहेर पडू नये . एवढ्या अंधारामधून काठाने चालताना काहीही होऊ शकते . विशेषतः या भागात मगरींचा वावर असल्यामुळे असे वेडे साहस करू नये . इथे मगरी इतक्या जास्त प्रमाणात असल्याचे एक महत्त्वाचे कारण आहे . नर्मदा माता अखंड पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहे . इथे अचानक ती उत्तरेला वळते . त्यामुळे पाण्याची गती कमी होते आणि प्रवाहा मधील माशांचा गोंधळ उडून ते हळूहळू पोहायला लागतात . त्यामुळे येथे माशांची घनता जास्त आहे . भरपूर खाद्य उपलब्ध होत असल्यामुळे मगरी देखील इथे तळ ठोकून आहेत . त्यामुळे उत्तरवाहिनी परिक्रमा करताना नर्मदा मातेच्या फार जवळ जाऊ नये . मगर इतकी गतिमान असते की एखाद्या माणसाला क्षणात पाण्यात ओढून दिले तरी कदाचित तुम्हाला कळणार नाही असा तिचा वेग असतो . हे कोणाला घाबरवण्यासाठी लिहीत नसून मला मगरींची अधिक काळजी वाटते आहे म्हणून लिहितो आहे . माणसे फार जवळ गेल्यावर मगरी तिथून लांब जातील अशी भीती आहे . जोपर्यंत एक मगर आहे तोपर्यंत तो जलाशय सुरक्षित आहे . जोपर्यंत एक वाघ आहे तोपर्यंत ते जंगल सुरक्षित आहे . जोपर्यंत एक सिंह आहे तोपर्यंत ते माळरान सुरक्षित आहे . जोपर्यंत एक गरुड आहे तोपर्यंत तेवढा प्रदेश सुरक्षित आहे . असो . पुढे तर चैत्री परिक्रमावासींची गर्दी इतकी वाढत गेली की अखेरीस मला त्यांच्यासोबत चालण्या वाचून पर्याय उरला नाही . हे देखील मग शांतपणे त्यांच्यासोबत रांगेतून चालू लागलो . थोड्याच वेळात ही गर्दी संपणार होती . इथे खासनीस आडनावाचे एक मुंबईकर मला भेटले ज्यांनी बरेच परिक्रमा वासी आणले होते . त्यांनी चटकन मला अडवून दक्षिणा दिली आणि नमस्कार केला . त्यांचे ते बघून त्यांच्यासोबत असलेल्या सर्वच लोकांनी मला दक्षिणा देऊन नमस्कार करायला सुरुवात केली . बघता बघता एक हजार रुपये जमले . सर्व लोक परिक्रमेविषयी मोठ्या आस्थेने विचारू लागले . सर्वांनाच संपूर्ण नर्मदा परिक्रमे विषयी टोकाची उत्कंठा होती . त्यांना जमतील तशी उत्तरे देत मी त्यांच्यासोबत चालत होतो .  अखेरीस त्यांच्या नावा आल्या आणि मी निःश्वास सोडला ! मोठ्या वेगाने मी पुढे झपझप निघून गेलो . तिथे नावेची वाट पाहत जमलेले सर्व परिक्रमावासी मी दिसेनासा होईपर्यंत मला नर्मदे हर चा आवाज देत राहिले ! त्यांच्यासाठी बघता बघता मी धुक्यामध्ये अदृश्य झालो असणार . कारण इथे चांगले धुके होते . मी काही मागे वळून पाहिलं नाही . वेगाने काठाने मार्गक्रमणा सुरू ठेवली . आता मात्र माझ्याशिवाय आणि नर्मदा माते शिवाय तिथे कोणीही नव्हते . चालता चालता सांजरोली नावाचे गाव डावीकडे आहे त्याच्या किनाऱ्यावर एक साधू स्नान करताना दिसला .  त्याने मला आवाज दिला . मी देखील हा तेजस्वी जटाधारी साधू कोण आहे हे पाहण्यासाठी जवळ गेलो आणि त्यांना वंदन करून आमच्या गप्पा सुरू झाल्या . साधू छाती एवढ्या पाण्यात उभे होते आणि त्यांचा फक्त चेहरा मला दिसत होता  . हा एक काठेवाडी मूळ असलेला धष्टपुष्ट  व पिळदार देहयष्टी असलेला साधू होता . परंतु कायम हिमालयातच राहायचा .बद्री ला जाताना पोलीस चेक पोस्ट लागते . तिथून एक किलोमीटरवर कांचनगंगा नामक एक जलप्रपात आहे . या भागाला गंगा बगिया असे  म्हणतात .  तिथे वर माया देवीचे मंदिर आहे . ही एक स्थान देवता आहे . तिच्या मंदिराखालीच एक गुप्त घळ आहे . तिथे हा राहत असे. अचानक नर्मदा मातेचे बोलावणे आले म्हणून इथे आला होता . आम्ही सुमारे दोन तास बोलत होतो . असा सत्संग लाभणे किती दुर्लभ आहे कल्पना करून पहा ! साधू अखंडपणे छाती एवढ्या पाण्यात उभा होता . आणि मी माझ्या काठीला टेकून काठावरच उभा होतो . मगरी किंवा अन्य कुठलेही भय ना साधूला होते ना माझ्या डोक्यात तो विचार आला . हिमालयात तपस्या करणारा एखादा साधू नर्मदा मातेच्या उदरामध्ये उभा राहून तुमच्याशी दोन तास सत्संग करतो आहे ही नर्मदा मातेची आपल्यावर केवढी मोठी कृपा आहे ! नर्मदा परिक्रमा करायची ती अशाच एखाद्या कृपा प्रसंगासाठी !  माझ्या अनेक शंका कुशंका साधूने दूर केल्या . मला अनेक नवीन गोष्टी सांगितल्या आणि माझे अनेक दृष्टिकोन त्याने कायमचे बदलून टाकले  . मी आधीच एके ठिकाणी म्हणालो होतो त्याप्रमाणे नर्मदा माते मध्ये उभे राहून जो कोणी बोलेल तो साक्षात नर्मदा मातेचा आदेश आहे असे मी मानत असे . इथे देखील संपूर्ण दोन तास साधू पाण्यामध्येच उभा होता . मध्येच तो एखादी डुबकी मारायचा व पुन्हा सत्संग सुरू व्हायचा . हा खरा साधू होता . याला कुठलीच आसक्ती राहिलेली नव्हती . साधू समाजामध्ये सुद्धा विविध पदे असतात त्यामुळे पदांची आसक्ती तिथे सुद्धा माणसाला सोडत नाही ! साधू बनून राहणे सोपे काम नाही ! गोंदवलेकर महाराज नेहमी सांगायचे , आयुष्यात काय वाटेल ते करा फक्त साधू बनू नका ! ते काम सोपे नाही ! 
मला तिथून निघून जावे असे वाटतच नव्हते . परंतु एक मगर वेगाने आमच्या दिशेने येताना आम्ही दोघांनी पाहिली . साधूला मी ती मगर दाखवल्यावर तो शांतपणे बाहेर आला . दोघांनी मगरीला आणि नर्मदा मातेला नमस्कार केला . आतापर्यंत मी मगरी दिसल्या की त्यांचे निरीक्षण करत बसायचो . साधूने मात्र नर्मदा मातेचे वाहन म्हणून मगरीला नमस्कार केला . साधू आणि सर्वसामान्य माणूस यांच्यामध्ये हाच फरक असतो . ते प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताला जोडतात . आणि आपण प्रत्येक गोष्टीतून भगवंताला वगळून काही शिल्लक राहते का ते पाहायला जातो .  साधू म्हणाला की मगरीला नर्मदा मातेनेच पाठवले . हे सांगायला की आता गप्पा बास करा ! साधूने मला हिमालयामध्ये राहायला येण्याचे आमंत्रण दिले .  आमचा संवाद इतक्या आत्मीय पातळीवर सुरू होता की त्याने मला आणि मी त्याला नाव देखील विचारले नाही ! नामरूपाच्या पलीकडील आत्मबोधावर आमचे मतैक्य झालेले होते ! ती अवस्था फार सुंदर होती ! समोर शांतपणे वाहणारी नर्मदामाई ! तिचे झोकदार वळण !  आणि असा साधू संग ! असा साधुसंग घडो मजलागी असे एक तारकाश्रम स्वामींचे सुंदर पद आहे ! तेच जणू इथे मी अनुभवले ! साधू फक्त लंगोटी वर होता . बघता बघता तो शेजारच्या झाडीमध्ये अदृश्य झाला .आणि मी पुढे मार्गस्थ झालो . साधू बहुतेक इथे असलेल्या हनुमान मंदिरामध्ये उतरला असावा . साधू स्नान करत होता ते रवी तीर्थ होते .
चालत चालत गरुडेश्वर च्या घाटावर आलो . इथे मैयाचे पाणी अतिशय म्हणजे अतिशय स्वच्छ आहे ! आधीच सरदार सरोवर धरणामध्ये त्याचा गाळ निवून गेलेला असतो . आणि त्यात गरुडेश्वर येथे पुन्हा एक लघुबंधारा आहे . ज्याला मराठीमध्ये चेक डॅम असं म्हणतात !  त्यामुळे पाणी अक्षरशः काचेसारखे पारदर्शक आहे ! जमीन खडकाळ असल्यामुळे तळ देखील दिसतो . इथे मी मनसोक्त स्नान केले . काही मुंबईकर तरुण आलेले होते . त्यांच्या परिक्रमाविषयक शंकांना उत्तरे देत स्नान केले . उत्तर वाहिनी परिक्रमा झाल्यावर बरेच लोक गरुडेश्वरला दर्शनासाठी येतात त्यातलाच हा एक गट होता . इथे अतिशय वेगळ्या आकाराचा आणि प्रकारचा सिमेंट काँक्रीट चा एक मोठा घाट बांधण्यात आलेला आहे . तो एखा दमात धावतच चढत वरती आलो . का कोणास ठाऊक परंतु टेंबे स्वामी बद्दल माझ्या मनामध्ये अपरंपार श्रद्धा आहे .भारत ही खरे तर संन्याशांची भूमी आहे परंतु असे फार थोडे संन्यासी होऊन गेले की ज्यांनी त्या परंपरेचा एकही नियम आयुष्यामध्ये कधी मोडला नाही किंवा त्याला अपवाद झाले नाहीत . आणि त्यामुळे त्यांना प्राप्त झालेल्या सिद्धी आणि देवत्वाचा पुरेपूर वापर धर्म संस्थापनेसाठी त्यांनी देहाच्या शेवटच्या श्वासापर्यंत केला . अशा संन्याशांचे मेरुमणी ठरावेत असे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज होते . त्यांना दत्तसंप्रदायामध्ये थोरले स्वामी असे म्हणतात . स्वामींच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले . इथे एक मराठी भाषा बोलणारे संन्यासी महाराज येऊन राहिलेले होते . ते देखील समाधीच्या जवळच उभे होते . त्यांना देखील दंडवत प्रणाम केला . समाधीसमोर काही काळ शांतपणे बसून राहिलो . तिथली स्पंदने अद्भुत होती . इथे वरती एक दत्त मंदिर आहे . तिथे देखील गेलो आणि नेमकी आरती मला मिळाली . त्यानंतर मंदिराच्या व्यवस्थापकांनी मला तळघरामध्ये असलेल्या एका खोलीमध्ये आसन लावण्याची सूचना केली . इथे असलेल्या स्वच्छतागृहामध्ये बहुतेक पाणी संपलेले होते त्यामुळे अतिशय कोंदट असा वास सर्वत्र साठून राहिलेला होता . इथे काही पुस्तके ठेवलेली होती ती वाचत मी बसलो . विशेषतः मेकिंग ऑफ सरदार सरोवर नावाचे एक भले मोठे कॉफी टेबल बुक होते ते सर्व मी वाचून काढले . त्यामुळे मला या धरणाविषयी बरीच रोचक माहिती मिळाली . याच पुस्तकामध्ये मी परेश पंड्या नरेंद्र मोदींना पूजा सांगतानाचा फोटो पाहिला . परेश पंड्या स्वतः कोणालाही हे सांगत नसे . दुपारी भोजन प्रसाद घेतला .

गरुडेश्वर आणि वरुणेश्वर यांना जोडणारा लघुबंधारा आणि गरुडेश्वरचा घाट .
याच्या सांडव्यावरून पाणी वाहते तेव्हा ते दृश्य मोठे मनोरम दिसते
नर्मदा मातेचा मोठाच जलप्रवाह या लघु बंधाऱ्याने अडवलेला आहे .
मंदिरापर्यंत येण्यासाठी खडा घाट चढावा लागतो
ब्रह्मीभूत परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती उपाख्य टेंबे स्वामी महाराज यांची समाधी ,श्रीक्षेत्र गरुडेश्वर
 थोरल्या स्वामीजींची समाधी
भव्य असे श्री दत्त मंदिर
श्री दत्तप्रभू . दत्त संप्रदायाचा महाराष्ट्रामध्ये प्रसार करण्यामध्ये टेंबे स्वामींचा निर्विवादपणे मोठा वाटा आहे .
महाराजांच्या निर्गुण पादुका देखील इथे आहेत
हेच संस्थानचे कार्यालय आहे ज्याच्या तळघरामध्ये मी सामान ठेवले होते.
 शेजारी एक छोटीशी धर्मशाळा होती तिथे शाश्वत मारुती धाम येथे मला भेटलेला मुंबईचा बीएसएनएल मध्ये नोकरी करणारा परिक्रमा वासी दिसला . याला तुळतुळीत टक्कल होते . हा गाडीने वगैरे प्रवास करत इथपर्यंत आला होता .त्याच्या विनंतीवरून मी त्या आश्रमामध्ये पाच दहा मिनिटे जाऊन बसलो . गरुडेश्वर गावामध्ये एक फेरफटका मारून आलो . एका मेडिकल वाल्याने ब्रश दिला . माझा ब्रश आणि टंगक्लीनर मी मालसरला विसरलो होतो . अर्थात कडुलिंबाची काडी मिळाल्यावर या दोन्हींची गरज लागत नसे . मैय्याचा काठ गाठण्यासाठी निघालो . गरुडेश्वर महादेवाचे दर्शन घेतले आणि पुढे जंगलामध्ये घुसलो .  इथले लोक मला काठाने रस्ता नाही वगैरे सांगू लागले होते . म्हणून कोणाला काही कळायच्या आत मी पटकन जंगलामध्ये शिरलो . हळूहळू मोठा चढ लागला .
श्री गरुडेश्वर महादेव मंदिर .
 श्री गरुडेश्वर
गरुडेश्वर मधून निघताना माझ्या डोक्यामध्ये सतत टेंबे स्वामींचा विचार होता . ह्यांनी माझे प्राण एकदा वाचवलेले होते . स्वाइन फ्लू किंवा वराह ज्वर या रोगाची सर्वप्रथम साथ जेव्हा भारतामध्ये आली होती त्यावेळी मला तो ताप आलेला होता . पूना हॉस्पिटल येथे मी दाखल झालो होतो . त्याच वेळी माझे एक नातेवाईक किडनीच्या विकाराने आजारी असल्यामुळे तिथेच उपचार घेत होते . त्यांना भेटायला गेल्यामुळेच खरे तर मला स्वाइन फ्लू झाला होता . कारण त्यांचा विभाग स्वाईन फ्लू विभागाच्या समोरच होता .  असो . तिथे मी घरातून एक पुस्तक घेऊन गेलो होतो . ते टेंबे स्वामींचे चरित्र होते . रुग्णालयामध्ये पडल्या पडल्या मी ते पुस्तक वाचून काढले . 
रोगाचा प्रभाव खूप होता . प्रचंड ताप यायचा . अशक्तपणा इतका आला होता की माझे वजन त्या पंधरा दिवसांमध्ये २० किलो कमी झाले होते . पडल्या पडल्या स्वाईन फ्लू वार्डातले आम्ही सर्व रुग्ण एकमेकांशी गप्पा मारायचो . सहज डोळा लागायचा आणि संध्याकाळी जाग आल्यावर बघितले तर लक्षात यायचे की त्यातले दोघे तिघे पार्सल करून बाहेर नेण्यात आले आहेत ! इतका त्या काळामध्ये मृत्यू स्वस्त झाला होता !  एक दिवस तर असा आला की डॉक्टरांनी सांगितले की आता हा गेला !  म्हणजे माझ्या आजूबाजूच्या रुग्ण मला सांगतात की डॉक्टरांनी माझ्या जगण्याच्या आशा सोडून दिल्या  होत्या . परंतु त्या ग्लानीमध्ये मला असे दिसले की परमपूज्य नारायण काका ढेकणे महाराज हे कुठून तरी आले आणि त्यांनी माझ्या डोक्यापासून पायापर्यंत हात फिरवला . हा दृष्टांत झाल्यावर लगेचच मी उठून बसलो होतो . डॉक्टरांनी सर्व चाचण्या केल्या असत्या निगेटिव्ह आल्या त्यामुळे त्यांनी ताबडतोब मला वार्डातून बाहेर काढले ! डॉक्टरांना देखील हा चमत्कार वाटला होता . तिथून घरी न जाता मी थेट वासुदेव निवास मध्ये गेलो . आणि नारायण काका ढेकणे नेमके त्याच दिवशी नाशिक वरून तिथे आले होते . तसं पाहायला गेलं तर मी यांच्याकडे कधी जात नसे . परंतु केवळ टेंबे स्वामींची परंपरा असल्यामुळे आणि मी पडल्या पडल्या त्यांचे चरित्र वाचत त्यांचेच चिंतन करत असल्यामुळे थोरल्या स्वामीजींनी माझे प्राण वाचवले होते असा माझा दृढ विश्वास आहे ! 
 प .पू . श्री नारायण काका ढेकणे महाराज
काकांना नमस्कार केल्यावर ते मला म्हणाले बरी आहे का आता तब्येत ? मी म्हणालो उत्तम आहे . ते म्हणाले मग जाताय ना ? मी म्हणालो हो जाणार तर ! आणि बाहेर येऊन विचार करू लागलो की कुठे जायचे आहे ? त्या क्षणी मला आठवले की पडल्या पडल्या मी माणगाव या टेंबे स्वामींच्या जन्म गावी जाण्याचा निश्चय करत होतो . तिथून मी पुन्हा एकदा गाडीला किक मारली आणि कोणालाही न सांगता थेट माणगाव गाठले होते . ही माझी आयुष्यातली पहिली माणगाव यात्रा होती ! तो परिसर मला इतका आवडला की विचारू नका !
सावंतवाडी जवळ असलेले माणगाव येथील दत्त मंदिर
 स्वाइन फ्लूच्या रोगामुळे आलेला अशक्तपणा , जून महिन्यामध्ये पडलेला पहिलाच पाऊस किंवा अन्य कुठलीही गोष्ट मला अडवू शकली नाही . तिथे तीन-चार दिवस राहून मी परत आलो होतो . तिथे एक जबरदस्त अनुभव मला आला होता . टेंबे स्वामी ध्यानाला बसायचे ती एक गुहा माणगावला जंगलामध्ये आहे .
माणगाव ची ध्यानगुंफा
 गुहेच्या आत गारवा होता व गुहेचा मोठा दगड तापलेला होता .  मला थंडी वाजत असल्यामुळे मी तापलेल्या दगडावर ऊन खात पडून राहिलो . मागे झाडीत काहीतरी खसफस होते आहे असे मला जाणवते . मी शुक असा आवाज करून जोराने हात झटकला . सूर्यदेव माझ्यासमोरच असल्यामुळे मी डोळे मिटलेले होते . असा आवाज बरेच वेळा झाला . मी जोरात हात आपटायचो आणि शुक करायचो . शेवटी तो आवाज फारच जवळ आला आहे असे मला वाटले म्हणून मी तिथून उतरलो आणि खाली आलो .
 हाच तो दगड ज्यावर मी चढून बसलो होतो
 पाच-पन्नास पावले चाललो नसेल इतक्यात मोठ्या मोठ्या आवाजात वाघाच्या डरकाळ्या मला ऐकू येऊ लागल्या . मला असे वाटले की आजारपणामुळे मला भास होत आहेत . परंतु वानरे व इतर पक्षी देखील वाघ असल्याची सूचना देऊ लागले . मी खाली आल्याबरोबर माझ्या लक्षात आले की मंदिरातील कर्मचारी मला शोधात आहेत ! मला सर्वांनी खूप झापले की तुम्ही वरती गुहेत कोणाला विचारून गेलात ? तिथे सध्या वाघ फिरतो आहे आणि तिथे जाणे धोकादायक आहे हे मला माहिती नव्हते . मी सर्वांची क्षमा मागितली . आणि त्यांना विचारले की कुठे असतो वाघ ? ते म्हणाले की टेंबे स्वामींची ध्यानाची गुहा आहे ना त्याच्यावर जो दगड आहे तिथे येऊन तो रोज बसतो ! याचा अर्थ मी जिथे ऊन खात पडलो होतो ती वाघाची जागा होती ! त्याही प्रसंगातून स्वामींनी मला वाचवले होते ! स्वतः टेंबे स्वामींच्या चरित्रामध्ये या ठिकाणी त्यांना वाघाचे भय उत्पन्न झाले होते असा एक उल्लेख आहे ! त्यावेळी साक्षात दत्तप्रभूंनी त्यांना त्यातून तारले होते . या सर्व घटना अगदी आत्ता घडल्यासारख्या माझ्या डोळ्यासमोर तरळू लागल्या . टेंबे स्वामींचे उपकार कुठल्या शब्दात वर्णन करावेत ? आज हा जो काही जन्म मला लाभलेला आहे तो त्यांनीच मला दिलेला पुनर्जन्म आहे याची मला संपूर्ण खात्री आहे . गरुडेश्वरी चिरविश्रांती घेत असलेल्या या साक्षात धर्मपुरुषाला साष्टांग वंदन करत मी पुढचा मार्ग धरला . 
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा ।
वासुदेवानंद सरस्वती सद्गुरु नाथा कृपा करा ॥
नर्मदे हर !





लेखांक एकशे चोवीस समाप्त  (क्रमशः )



 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर