लेखांक १२५ : "स्मार्ट सिटी" केवडिया कॉलनी अथवा एकतानगर येथील आदित्येश्वर

गरुडेश्वराचे मंदिर सोडल्यावर सर्वत्र बऱ्यापैकी झाडी होती . माझ्या लक्षात आले की मी एक छोटासा किल्ला चढतो आहे ! प्रत्यक्षामध्ये हा एका गिरनारी बाबाचा आश्रम होता . वरती टेकडीवर हनुमानाचे मंदिर होते . बाबा अतिशय गप्पीष्ट स्वभावाचे होते . या टेकडीवरून दिसणारे मैय्याचे दृश्य इतके अप्रतिम होते की त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत ! 
हनुमान टेकडीवरून दिसणारे दृश्य
समोरच वरुणेश्वर आणि इंद्रेश्वर महादेवाचे दर्शन होत होते . हे तेच ठिकाण होते जिथे तमिळ साधूने मला इडल्या खाऊ घातल्या होत्या !
मला वरुणेश्वर येथे इडल्या खाऊ घालणारे आणि नरसुची मदुरै कॉफी पाजणारे हेच ते तमिळ साधू !
खाली बांधलेल्या चेक डॅम किंवा लघुबंधाऱ्याच्या सरळ रेषेमध्ये ही टेकडी होती . त्यामुळे इथून फार मोठा परिसर दिसत होता . डावीकडे सरदार सरोवर धरणाची भिंत दिसत होती . त्यानंतर सरदारजी यांचा पुतळा होता . लघु बंधाऱ्यामुळे साठलेले नर्मदेचे पात्र सुंदर दिसत होते . उजवीकडे अतिशय कमी पाण्याने वाहणारी नर्मदा माई दिसत होती . तिलकवाडा सुद्धा दिसत होता . ही जागा केवळ अप्रतिम होती ! संध्याकाळ होऊ लागली होती . हा बाबा मला थांब सुद्धा म्हणेना आणि जाऊ देखील देईना .राहण्यासाठी तिथे एक छोटीशी झोपडी होती . उगाचच इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला . अखेरीस मीच तिथून निघालो .
हनुमान मंदिरा जवळील साधू कुटी . चित्रात दिसणारे साधू वेगळे आहेत .
 पाच वाजून गेले होते . अजून केवडिया गाव ६ किलोमीटर दूर होते . सगळेच गणित फिस्कटले होते . पळतच निघालो . मी निघून जाताना कोणीतरी गवतामध्ये लपले आहे असे माझ्या लक्षात आले . कदाचित साधू याचसाठी मला थांबू देत नसेल का ? क्षणभरच हा विचार माझ्या मनात तरळला. ती व्यक्ती कोण आहे यामध्ये उत्सुकता न दाखवता मी सरळ निघून गेलो . खाली उतरलो आणि मैयाचा काठ धरला . 
इथे नारदेश्वर महादेवांचे दर्शन घेतले .
 मैय्याच्या काठी जंगलामध्ये वसलेले नारदेश्वर तीर्थ
 मंदीर सुंदर आहे
 मूळ शिवलिंग असे आहे 
इथल्या शिवलिंगावर असे कवच घातलेले दिसते .
देवर्षी नारद यांची अतिशय सुंदर मूर्ती इथे पाहायला मिळते .
माझा आजपर्यंतचा अनुभव असा होता की काठाने अंतर लवकर कापले जाते . परंतु हा किनारा त्याला अपवाद ठरणार आहे हे मला माहिती नव्हते . मध्ये मोठ मोठाले दगड गोटे आणून टाकलेले होते . त्यांच्या फटी इतक्या मोठ्या होत्या की आत मध्ये एखादा माणूस सापडू शकेल ! आणि त्याला बाहेर निघणे दुरापास्त होईल !
असे मोठे मोठे दगड येथे आणून टाकले होते . हे त्याच भागातले चित्र आहे .
 जीवाच्या आकांताने त्या दगडांवरून उड्या मारत मी तो टापू पार केला . खूपच भीतीदायक असा तो परिसर होता . शंभर टक्के निर्मनुष्य ! एखादे भटकणारे कुत्रे सुद्धा दिसत नव्हते . इतकी निरव शांतता कधीच पाहायला मिळत नाही . त्यात नर्मदा मातेचा प्रवाह देखील जागेवर थांबलेला होता ! मुळात लघु बंधारा बांधून हे एक सरोवरच तयार करण्यात आलेले आहेत त्यामुळे सगळीच गती थांबल्यासारखी झाली होती ! मी वेगाने चालत राहिलो . इतका दूरवर मला एक मंदिर दिसले . हे मधुश्छंदेश्वर महादेवाचे तीर्थ होते . सकाळपासून मी अनेक मंदिरांची दर्शने घेतली होती . अगस्त्येश्वर , केदारेश्वर ,कुमारेश्वर , गरुडेश्वर , करोटीश्वर ,नारदेश्वर , दुधेश्वर असे सर्व महादेव पाहात इथपर्यंत आलो होतो . 
मधुष्चंद्रेश्वर  महादेवाचे मंदिर एका मोठ्या खाणीच्या पलीकडे होते आणि खाण पाण्याने गच्च भरली होती . मला वाटले की चला आता मुक्कामाचे ठिकाण आले ! आणि मी निवांतपणे चालत आश्रमामध्ये गेलो . इथे एक तरुण मुलगा आणि एक वयस्कर साध्वी होत्या . दोघांनीही शून्य अगत्य दाखविले . मी दर्शन घेऊन आल्यावर ती माझ्याशी एक शब्द देखील बोलले नाहीत . याचा सरळ अर्थ पुढे निघून जा असा होतो . संध्याकाळचे पाच वाजल्यानंतर शक्यतो कोणी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही . परंतु यांनी मला जाऊ तर दिले होतेच परंतु पुढे काय धोके वाढून ठेवले आहेत ते देखील मला सांगितले नाही त्याचे मला फार वाईट वाटले ! होय कारण इथून मी पुढे निघालो आणि एक अतिशय बेकार ओढा मला आडवा आला . नंतर पुस्तकात पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की ही भीमकुल्या नावाची नदी होती . आणि तिच्यामध्ये साध्या डोळ्यांना दिसतील इतक्या प्रचंड प्रमाणात मगरी होत्या ! त्यामुळे पोहत जाता येणे शक्य नव्हते . तिथे एकही नावाडी नव्हता . नर्मदेच्या जलाचा फुगवटा किंवा बॅक वॉटर आत पर्यंत घुसलेले होते . आता याच्या काठाने पार करता येईल इतक्या पातळ पात्रापर्यंत चालत जाणे याशिवाय दुसरा पर्याय नव्हता ! त्या नदीच्या काठावर मी काही काळ बसून मगरी दिसतात का ते पाहू लागलो . थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले की त्या पात्रामध्ये मगरीच मगरी आहेत ! त्या पात्रामध्ये इतक्या मगरी होत्या की त्याला जोडून असलेल्या एका खाणीमध्ये देखील मगरी शिरलेल्या होत्या . इथे मी एक मेलेली मगर पाहिली . सुरुवातीला मला वाटले किती मगर जिवंत आहे परंतु ती बराच वेळ हलत नाही असे पाहिल्यावर मी वरून तिला खडा फेकून मारला . तर ती अजिबात हलली नाही . मग मोठा दगड मारल्यावर माझ्या असं लक्षात आले की ती मगर खरोखरच मेलेली आहे . ती अशा अवघड ठिकाणी होती की तिथे कोणाला पोहोचता येणे शक्य नव्हते . मगर मेल्यावर तिचे काय होत असावे असा प्रश्न मला होता पडला होता त्याचे उत्तर अशा रितीने मैय्याने दिले .
हीच ती आडवी आलेली नदी जिच्यामुळे मला खूप मोठा फेरफटका मारून चालावे लागले .
त्या खाणीच्या काठावरून मी चालू लागलो . पाणी किमान ५० फूट खाली होते . आणि अत्यंत खोल होते . बहुतेक घेतला दगड तोडून सरदार सरोवरच्या बांधकामासाठी वापरण्यात आला होता . उभे ताशीव कडे असल्यामुळे मगरींना देखील काठावर थांबायला जागा नव्हती . त्यामुळे त्या एखाद्या उभ्या दगडाचा हाताने आधार घेऊन तिरक्या थांबताना दिसत होत्या ! परिस्थिती इतकी बेकार होती की चुकून जरी माझा पाय सटकला असता तर मी थेट त्या मगरींच्या समोर बालभोग स्वरूपात पडलो असतो ! त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकत होतो ! अक्षरशः घाम फुटला होता ! सगळे दगड अस्थिर होते ! जिथून जिथून नर्मदा माता कधीतरी वाहिलेली आहे तो सर्व परिसर अत्यंत स्थिर आहे . नर्मदा मातेचा स्पर्श न झालेला परिसर किंवा अतिरेकी मानवी हस्तक्षेप झालेला परिसर अस्थिर राहतो . नर्मदा मैया तिचा भव्य प्रवाह घेऊन जेव्हा वाहते तेव्हा सर्व निरवा निरव करत वाहते . कधी एकदा ही भिमकुल्या नदी संपते असे मला झाले ! काही केल्या ओलांडण्यासाठी जागा सापडेना !माझा आता चक्क उलटा प्रवास सुरू झाला होता ! नर्मदा माता माझ्या उजव्या हाताला होती ती आता माझ्या डाव्या हाताला आली होती आणि मी पुन्हा समुद्राच्या दिशेला निघालो होतो ! परंतु पर्याय नव्हता . 
या भागातील खाणीतील मगरीचे संग्रहित छायाचित्र


श्री मधुश्छंदेश्वर महादेवाचे मंदिर

श्री मधुश्छंदेश्वर महादेव

मधुश्छंदेश्वरासमोरील खाण
ही नदी ओलांडण्यासाठी जागा सापडत नाही तोपर्यंत मला चालणे क्रमप्राप्त होते . हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली होती . या भयानक जंगलामध्ये मगरींच्या सहवासात रात्र काढायची मला इच्छा नव्हती . त्यामुळे मी अतिशय वेगाने चालू लागलो . चालून चालून धाप लागत होती . एकही मनुष्य आजूबाजूला दिसत नव्हता . अखेरीस एके ठिकाणी नदीने ओढ्याचे स्वरूप घेतले आहे असे लक्षात आले . परंतु मगरींची संख्या पाहता आणि काठावर असलेली अस्पर्शीत झाडी पाहता खाली उतरण्याची हिंमत होत नव्हती . चुकून मागून मगरीने हल्ला केला तर पळून जाण्यासारखी देखील ती जागा नव्हती . इतकी दाट झाडी होती . काय करावे कळत नव्हते . अखेरीस मी मनाचा हिय्या केला आणि एके ठिकाणी कमरे एवढ्या पाण्यातून पळतच ती नदी ओलांडली ! पलीकडच्या काठावर गेल्यावर हुश्श वाटले ! आता पुन्हा नर्मदामाता उजव्या हाताला ठेवून चालू लागलो .मानवी वस्तीची चाहूल लागून देणाऱ्या माशा सर्वत्र दिसू लागल्या . खाणीच्या दुसऱ्या बाजूला मी आता आलो होतो . इथे कामगारांची वस्ती दिसली . कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते .पुढचा मार्ग एक दोघांना विचारून पाहिला . परंतु त्यांना काहीच माहिती नव्हते असे लक्षात आले . हे अंतर कागदावर जरी पाच मिनिटात कापले गेले असले तरी प्रत्यक्षात मी पाच किलोमीटर उलटा सुलटा चाललो होतो ! पुढे दुधेश्वर महादेवाचे मंदिर होते . त्याचे दर्शन घेतले . तिथे महादेव वगळता कोणीही नव्हते .

श्री दुधेश्वर महादेव


श्री दुधेश्वर महादेव मंदिर
 अतिशय वेगाने केवडिया गावाच्या दिशेने निघालो . एका क्षणात एक महामार्ग लागला . आणि लक्षात आले की आता हा सोडायचा नाही . कारण इथे इतका अतिरिक्त मानवी हस्तक्षेप झालेला आहे की जागोजागी प्रचंड मोठी कुंपणे केलेली आहेत . एका भयानक जंगलातून अचानक मी प्रचंड मोठ्या झगमगटामध्ये आलो ! रस्त्यावरती प्रचंड विद्युत रोषणाई केली होती ! प्रत्येक खांबावर सुंदर असे रंगीबेरंगी मोर वगैरे आकार काढलेले होते !आणि ते सर्व दिव्यांनी चमकत होते ! सर्वत्र झगमगाटच होता ! परंतु रस्त्यावर चिटपाखरू नव्हते ! मला तो सर्व विजेचा प्रचंड अपव्यय वाटला . जिथे एकही मनुष्य नाही तिथे इतका झगमगट काय कामाचा ? मुळात असा झगमगाट दिसला की तो वन्य प्राण्यांसाठी देखील तापदायक असतो . कदाचित इथे हजारो लाखो माणसे कायम येतील असा अंदाज डोक्यात ठेवून हे काम उभे केलेले आहे .जे काही केलेले आहे ते सुंदरच आहे यात वादच नाही ! फक्त वीज आदि संसाधनांचा इतका अपव्यय केला नाही तरी भारतीय लोक समजून घेऊ शकतात असे वाटते .रस्त्यावरती एकही मनुष्य नसलेली ही स्मार्ट सिटी होती ! आणि एक अतिशय दुर्दैवी अनुभव इथे मला आला ! जे काही चार-पाच लोक मला भेटले त्या सर्वांनीच मजा म्हणून माझा मार्ग भटकविण्याचा प्रयत्न केला ! हे माझ्यासाठी फारच वेदनादायक होते ! माझा विवेक आणि नकाशाचे भान जागृत असल्यामुळे मी त्यांचे ऐकले नाही हा भाग वेगळा परंतु मला उलट्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला हे आवर्जून इथे नमूद करून ठेवतो . ही "कार्निवल सिटी " उभी करताना इथे आयते आणून ठेवलेले हे लोक होते ! त्यांना ना नर्मदा मातेशी काही देणे घेणे होते , ना इथल्या संस्कृतीशी .  इथे दिसणाऱ्या भव्य दिव्य सुंदर झगमगाटी दृश्यामध्ये सर्वात तुच्छ कुठली गोष्ट असेल तर ती परिक्रमावासी हीच होती हे मी स्वतः अनुभवले . रस्ते अतिशय सुंदर होते . त्याला अप्रतिम पदपथ केलेले होते . मधोमध दिवे होते . दिव्याचे खांब अप्रतिम बनविण्यात आले होते . विजेने झगमगणारी झाडे तयार केली होती . प्रचंड खर्च करण्यात आला होता . फक्त त्या सुविधांचा उपभोग घेणारी माणसे तिथे नव्हती . बहुतांश पर्यटकांसाठी हे सर्व उभे केले होते . आणि त्यांच्या खिशातून पुरेसा मुद्देमाल काढून घेण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती . कारण मी तिथे गेलो तेव्हा हे सर्व दाखवण्याचे तिकीट साडेतीन हजार रुपये आहे असे मला कळले . (सध्या तिकीट एकवीस शे रुपये आहे असे संकेतस्थळ पाहील्यावर लक्षात आले ) . त्यासाठी विजेवर चालणारी टाटाची गाडी देखील दिवसभरासाठी तुम्हाला भाड्याने मिळत असे . एक पर्यटक म्हणून हा स्वर्ग होता ! परंतु एक परिक्रमावासी म्हणून पाहायला गेले तर मला हा सर्व प्रकार अनावश्यक आणि यातनामय वाटत होता . नर्मदा मातेवर देखील प्रचंड रोषणाई केलेली होती ! ती मुळातच इतकी सुंदर आहे ! तिला झगमगते अलंकार घातल्यावर ती कशी दिसत असेल कल्पना करून पहा ! एखादी मुळातच सुंदर स्त्री असावी आणि तिला साजशृंगार केल्यावर तिचे सौंदर्य शतपटीने खुलावे तसे नर्मदा मातेचे झालेले होते ! दोन्ही बाजूंनी लावलेले रंगीबेरंगी दिवे आणि लेझरच्या सहाय्याने केलेली रोषणाई नेत्र दीपक होती . परंतु हे शूलपाणेश्वर अभयारण्य आहे याचा विसर निर्मात्यांना पडला आहे हे स्पष्टपणे जाणवत होते .

या भागाला एकता नगर असे नाव दिलेले असून एकता नगर रेल्वे स्थानक देखील बांधण्यात आलेले आहे . जे अतिशय भव्य आहे
जागोजागी असे चमकणारे वृक्ष लावले आहेत
रात्री संपूर्ण केवडिया कॉलनी अथवा एकता नगर परिसर असा झगमगत असतो
रस्त्यावरील खांब आणि त्यावर चमकणारी फुलपाखरे
हे सर्व वैभव ज्या उत्सव मूर्ती भोवती उभे करण्यात आले आहे तिची भव्यता लक्षात यावी म्हणून हे चित्र टाकत आहे . यावरून आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीच्या आकाराची कल्पना यावी .
या परिसरात प्रवेश करण्यासाठी एक भव्य दिव्य प्रवेशद्वार लागते
पर्यटकांसाठी मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित केले जातात
दिवसा भव्यदिव्य दिसणारे हे रस्ते रात्री खांबावर लावलेल्या दिव्यांमुळे उजळून निघतात

जंगल सफारी चे प्रवेशद्वार

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीच्या हृदयातून नर्मदा मातेचे असे सुंदर दर्शन होते . 

अर्थात ही मूर्ती एका बेटावर असल्यामुळे परिक्रमावासी येथे जाऊ शकत नाहीत परंतु ती इतकी भव्य आहे की कुठूनही दिसते
अशा पद्धतीने ऑनलाईन तिकीट काढून तिथे फिरता येते
खलवानी गावामध्ये केलेले इको टुरिझम विशेष प्रसिद्ध आहे
 .
इथे खलवाणी नावाच्या गावामध्ये रिव्हर राफ्टिंग ची सुविधा केली गेलेली असून त्यासाठी नर्मदा मातेचे अडवलेले पाणी काही काळासाठी सोडले जाते .
परंतु रिव्हर राफ्टिंग साठी पाण्याचा अपव्य करणे थोडेसे दुःखदायक वाटते . कितीही नियोजन केले तरीदेखील यातून बरेच पाणी वाया जाते हे नक्की आहे . (प्रस्तुत लेखकाने अनेक ठिकाणी रिव्हर राफ्टींग केलेले आहे . त्यामुळे सुरक्षित रिवर राफ्टींग साठी किती खोल पाणी लागते याची कल्पना आहे . त्यातून केलेले हे अभ्यासपूर्ण विधान आहे )

गंगा नदीमध्ये ऋषिकेश येथे रिव्हर राफ्टींग करताना व त्यानंतर प्रस्तुत लेखकाला आलेला अनुभव ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता . 

इथल्या स्थापत्य अभियंत्यांचे कौतुक आहे कारण इथे अन्य उद्यानांसोबत निवडुंग उद्यान देखील आहे

शूलपाणेश्वर अभयारण्याची सफर हे इथले मुख्य आकर्षण आहे . चित्रात दाखवलेले सर्व प्राणी या जंगलात आहेत .
पर्यटकांना फिरवण्यासाठी अशी वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत
सरदार सरोवर धरण अतिशय भव्य दिव्य आहे . आणि एखाद्या धरणाभोवती इतके मोठे पर्यटन स्थळ उभे केले गेल्याचे कदाचित हे जगातील एकमेव उदाहरण असावे !
रात्री धरणाच्या भिंतीवर आणि एकता मूर्तीवर लेझर शो असतो
खलवाणि ते झरवाणी या आदिवासी गावांचा मोठा विकास मोदींनी करून दाखवला आहे
सरदार सरोवर धरणावरची रोषणाई नेत्रदीपकच आहे
इथे उभ्या केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अनेक लोकांनी आपली सौंदर्यदृष्टी आणि कौशल्य पणाला लावलेले स्पष्टपणे जाणवते
सरदार सरोवर धरणाच्या जलाशयांमधून एकता नगरचा परिसर काहीसा असा दिसतो
लहान मुलांसाठी देखील येथे मोठे मोठे उपक्रम चालविले जातात
अगदी फुलपाखरू उद्यानापासून डायनासोर उद्यानापर्यंत सर्व काही इथे पाहायला मिळते
एकंदरीत ही एक मोठीच मायानगरी मोदींनी उभी केली आहे . सर्व छायाचित्रे गुजरात पर्यटन विकास महामंडळाकडून साभार

असो .संपूर्ण परिक्रमेमध्ये फार कमी वेळा मी रात्री चाललो होतो त्यातली ही एक रात्र होती . दुर्दैवाने प्रचंड अंधार पडलेला असूनही मला अजूनही मुक्कामाचे ठिकाण सापडलेले नव्हते ! मी अतिशय वेगाने चालत होतो . पायाखालचा रस्ता संपतच नव्हता .
 अखेरीस आदित्येश्वर महादेवाचे मंदिर आले ! मंदिरामध्ये गेलो . विकासाचे वारे मंदिराला देखील लागले होते ! मंदिराचा अप्रतिम कायापालट केलेला होता ! भरपूर खोल्या बागबगीचे वगैरे बांधलेले होते . परंतु पुजाऱ्याने मला मी न विचारताच सांगितले इथे व्यवस्था होणार नाही . मी त्यांना म्हणालो इथून मैया च्या काठावर जायचा रस्ता मला सांगा . तिथे मी आसन लावणार आहे . मी तुमच्याकडे मुक्कामासाठी आलेलोच नाही . मग मात्र पुजारी गडबडला . मला म्हणाला काठावर जाण्यासाठी मार्ग नाही . सर्वत्र मोठ्या मोठ्या भिंती आणि कुंपणे आहेत . बागेतच कुठेतरी मी झोपावे . त्याप्रमाणे त्या बागेतील एका झाडाखाली मी झोपलो . मी एकटा राहणार नाही याची काळजी डासांनी घेतली ! स्मार्ट सिटी ती ! इथले डास सुद्धा स्मार्ट होते ! चावून गेल्यावर कळायचे की चावत होता ! हा आश्रम राजाजी पटेल नावाचे एक गृहस्थ चालवायचे . मी बागेतल्या झाडाखाली आसन लावले आणि स्नान पूजा वगैरे आटोपून घेतले . आज पर्यंत मी पाहिलेला सर्वात स्वच्छ असा हा आश्रम होता ! बागेतील गवत देखील एकसारखे कापले होते ! स्वच्छतागृह विशेष स्वच्छ ठेवण्यात आले होते . ते इतके स्वच्छ होते की तिथे मुक्काम केला असता तरी चालले असते ! आश्रमातील आणि मंदिरातील स्वच्छता पाहून मन प्रसन्न झाले ! रात्री आश्रम चालकांनी मला डाळ पोळी खायला दिली . मी सकाळी उठल्यावर जेव्हा त्यांना स्वच्छतेविषयी सांगितले तेव्हा पटेल काकांना खूप बरे वाटले . आणि त्यांनी मला पन्नास रुपये दक्षिणा दिली ! जाताना मला म्हणाले की तुम्ही आत मध्ये मुक्काम का नाही केला ? खूप सुंदर व्यवस्था आहे . आमचा पुजारी म्हणाला त्या बाबाला बाहेरच झोपायचे आहे ! यावर काय बोलावे तेच मला कळेना ! मी फक्त इतकेच म्हणालो की बाहेर झोपल्यावर मैय्या दिसते म्हणून बाहेर झोपलो बाकी काही नाही . आणि ते एक प्रकारे खरेच होते . आश्रमातल्या सुख सुविधा उपभोत लोळत पडण्यापेक्षा एखाद्या झाडाखाली पडून मैय्याचे अखंड दर्शन घेत झोपणे यासारखे सुख कुठे मिळणार ! 
आदित्येश्वर महादेव . इथे सुंदर काचेची सजावट केलेली आहे

श्री आदित्येश्वर महादेवाचे मंदिर


श्री आदित्येश्वर महादेव 

आश्रम श्रीमंत होता . आश्रमाची मागे शेती होती . स्वतःचे ट्रॅक्टर व अनेक गाड्या होत्या . फक्त आश्रमाला आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना "स्मार्ट सिटी " चा स्पर्श झाला आहे असे जाणवले . आपण "स्मार्ट " झालो म्हणजे जुन्या परंपरा "डिस्कार्ड " कराव्यात असे नसते .स्मार्ट असणे ही काही फार मोठी गोष्ट नाही . आजकाल फोन सुद्धा स्मार्ट आहेत !  मला विशेष खटकलेली बाब म्हणजे पुजाऱ्याने परस्पर मला व्यवस्था नाही म्हणून सांगितले होते . यातून त्याला काहीच लाभ नव्हता . ना कुठली हानी होती . परंतु त्याच्या या कृतीतून नर्मदा परिक्रमा या परंपरेविषयी त्याला असलेली अनास्था प्रतिबिंबित होत होती . ती मला अधिक व्यथित करून गेली . आपण भौतिक प्रगती अवश्य करावी परंतु ती करताना अध्यात्मिक नाळ तुटणार नाही याची काळजी देखील कटाक्षाने घ्यावीच घ्यावी . अन्यथा प्रचंड झगमगगणारी , डोळे दिपविणारी , उत्तमोत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि वाहतुकीची अत्याधुनिक साधने असणारी ही स्मार्ट सिटी आणि उत्तम साज शृंगार करून , महागडे कपडे घालून तिरडी वर सजवून ठेवलेले कलेवर अथवा मढे यात मला फारसा काही फरक वाटत नाही ! कारण दोन्हीही दिसायला अत्यंत सुंदर आहेत परंतु त्यात प्राण नाही !  
आपल्या भारतवर्षाचे तसेच आहे . १०० नव्हे  हजार स्मार्टसिटी उभ्या करा . परंतु जोपर्यंत इथला आध्यात्मिक वारसा जपला जात नाही तोपर्यंत तो विकास काहीच कामाचा नाही . मेट्रोचे जाळे उभे करणे सोपे आहे . परंतु त्या मेट्रो मधून मी कुठे जावे आणि का जावे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ती मेट्रो काय कामाची !  मुळात आपल्या देशातील हजारो तीर्थक्षेत्रे ही त्या त्या काळातील अतिशय प्रगत अशी स्मार्ट क्षेत्रे आहेत !  येणाऱ्या प्रत्येक भूतमात्राचे कल्याण करण्याची क्षमता असणारे ते भव्यदिव्य अन्नक्षेत्र आहे . तीर्थक्षेत्र आहे . दिव्य क्षेत्र आहे . सर्व संतांनी एकमुखाने हे सांगून ठेवलेले आहे . आपल्या पूर्वजांनी हजारो स्वयंपूर्ण नगरे उभी करून हे सिद्ध केलेले आहे . आधुनिकतेची कास धरत विकासाच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी करणे म्हणजे स्मार्ट सिटी नाही . तर त्या परिसराचा अभ्यास करून तिथल्या पर्यावरणाला जपत ,तिथली संस्कृती आणि परंपरा यांचे महत्ता वाढवत केलेला प्रत्येक जीव मात्राचा अध्यात्मपूर्ण आत्मिक विकास हाच खरा  शाश्वत विकास . शरीर सुदृढ , सालंकृत हवे तसेच प्राणही सुस्थिर हवेत . तरच तो देह कामाचा आहे . असो . 
ही " स्मार्ट सिटी " सोडून पुढे निघालो . वाटेमध्ये वन खात्याने बनवलेला एक बगीचा दिसला . आरोग्यवन असे त्याचे नाव होते .मला त्याची संकल्पना आवडली !भव्य दिव्य प्रवेशद्वार होते . प्रवेशद्वारावर मी चौकशी करू लागलो . अजून प्रकल्प उघडायचा होता . म्हणजे आत मध्ये कर्मचारी माळी वगैरे आले होते परंतु पर्यटकांसाठी दिलेली वेळ उशिराची होती . परंतु सुदैवाने तिथला मुख्य व्यवस्थापकच प्रवेशद्वारापाशीच भेटला . माझी उत्कंठा त्याच्या लक्षात आली . त्याने विशेष बाब म्हणून मला आत मध्ये घेतले . आणि पन्नास रुपये शुल्क असताना एकही रुपया न आकारता संपूर्ण बागेत तुम्ही कुठेही फिरा असे मला सांगितले . मोदींनी इथे छान कल्पना राबवलेली आहे . अरोमा गार्डन ,येलो गार्डन ,हेल्थ अँड आयुर्वेदा गार्डन , कलर गार्डन ,अल्बा गार्डन अशा विविध संकल्पना राबवलेल्या आहेत . मला मुळातच ही इंग्रजी नावे फार खटकतात . इंग्रजी बोलण्याने माणूस स्मार्ट होत नाही . मुख्य संकल्पना समजली पाहिजे . मग ती कुठल्याही भाषेत का असेना .  मला इंग्रजी भाषेचा द्वेष वाटतो असा गैरसमज कोणी कृपया करून घेऊ नये . उद्या इंग्लंड देशामध्ये कोणी सुगंध उद्यान , पीत उद्यान , आयुर्वेद उद्यान , रंग उद्यान , बेरंग उद्यान अशा नावाने उद्याने उघडली तरीदेखील मला त्याचा फारसा आनंद होणार नाही . ज्या त्या माणसांनी जिथली तिथली भाषा संस्कृती जपलीच पाहिजे . गुजरात मधल्या या आदिवासी क्षेत्रामध्ये तुम्हाला आजूबाजूला आदिवासी आहेत याची कल्पना सुद्धा येणार नाही इतका भपकेदार विकास करण्यात आलेला आहे . साधे डोके लावून पहा . परदेशातून विकसित राष्ट्रातून येणारा पर्यटक येथे येऊन सुद्धा सिमेंट काँक्रीटचा विकासच पाहणार असेल तर तो इथे कशाला येईल ! त्याला इथली संस्कृती इथली परंपरा दिसली तरच त्याला इथे आल्याचे सार्थक वाटणार ना ! कठीण आहे . असो . या उद्यानामध्ये दीड किलोमीटर लांबीचा रस्ता असा तयार केला होता की या प्रत्येक उद्यानातून आपण चालत जातो . खूपच सुंदर संकल्पना होती . विशेषतः आयुर्वेद उद्यानामध्ये आरोग्य मानव या नावाने मानवी शरीराचा आकार तयार केला होता व त्या त्या भागाला उपकारक वनस्पती त्या त्या भागात लावण्यात आल्या होत्या . ही संकल्पना मला फार आवडली . सुगंध उद्यानातील सुगंध देखील अतिशय मनमोहक होता . त्या त्या रंगाची फुले असणारी झाडे लावलेली उद्याने विशेष आकर्षक वाटली . फुलपाखरे देखील खूप होती . उद्यान उभे करणाऱ्या चमूने भरपूर अभ्यास केलेला दिसत होता . संपूर्ण उद्यानामध्ये मी एकटाच फिरत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी गेलो आणि तिथली माहिती वाचत पुढे पुढे चालत राहिलो . गर्दी नाही गोंधळ नाही काही नाही ! सर्वत्र निरव शांतता ! इथे एक अतिशय सुंदर असे कॅन्टीन बांधण्यात आले होते . फर्निचर साठी बांबू चा वापर करण्यात आला होता . आधुनिक पद्धतीचे टप लावण्यात आले होते . हवा उजेड भरपूर होता . स्थानिक आदिवासी महिला कर्मचारी हे कॅन्टीन चालवायच्या . इथे महामहीम राष्ट्रपती तसेच नरेंद्र मोदी स्वतः येऊन खाऊन गेले होते . त्यांना ज्यांनी खाऊ घातले त्या सर्व माता-भगिनी इथे होत्या . त्या सर्वांनी माझ्याशी खूप गप्पा मारल्या . नरेंद्र मोदी यांनी येथे काय काय खाल्ले ते मला द्या असे मी सांगितल्यावर त्यांनी मला कोकम सारखे लागणारे एक स्थानिक फळ होते त्याचे सरबत जे चवीला किंचित खारट होते आणि पोहे तसेच लस्सी दिली . दोनशे रुपये बिल झाले ! सर्व माता-भगिनी म्हणाल्या की आपण परिक्रमा वासी आहात . तुमच्याकडून पैसे घेणे पाप आहे . परंतु इथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत . आणि सर्व बिलिंग ऑनलाइन आहे . मी म्हणालो की काही काळजी करू नका मी बिल भरतो . मी शहरात राहणारा माणूस आहे . बिल भरून खाण्याची मला सवय आहे ! नर्मदा मातेच्या कृपेने पुरेशी दक्षिणा साठलेली असायची . त्यातले दोनशे रुपये बिलाचे भरले आणि सर्व माता-भगिनींना भरपूर टीप दिली ! मोदींविषयी बोलताना त्यांच्या डोळ्यात दिसणारी चमक विशेष लक्षात राहिली . मोदी यांचे व्यक्तिमत्व जादुई आहे असे त्यांनी सांगितले . त्यांनी प्रत्येक महिलेची व्यक्तिगत चौकशी केली होती . घरात कोण कोण आहे काय काय करतात ते सर्व विचारले होते . पगार किती मिळतो कामाचे तास किती याची माहिती घेतली होती . विशेषतः मोदी जेव्हा चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांशी बोलतात तेव्हा त्यांच्या व्यवस्थापकांना लांब ठेवले जाते . व्यवस्थापक काही त्रास तर देत नाहीत ना हे देखील मोदी विचारतात असे त्या महिलांनी सांगितले ! नंतर स्वयंपाक घरात देखील ते जाऊन आले . एकंदरीत सर्व कर्मचारी मोदींवर खूप खुश होते असे मला जाणवले . स्मार्ट सिटी मुळे त्यांना देखील त्रास होतो असे मला त्यांनी सांगितले परंतु त्यांनी आता सवय करून घेतली आहे . नरेंद्र मोदी यांनी देखील काउंटरवर जाऊन बिल भरले होते हे मला सांगायला महिला विसरल्या नाहीत !  मोदींचे या महिलांसोबत चे फोटो तिथे लावण्यात आले होते . इथे परिक्रमावासी कधीच येत नाहीत हे देखील मला कर्मचाऱ्यांनी सांगितले . वाटेमध्ये जे जे उत्तम उदात्त उन्नत आहे ते ते सर्व आवर्जून पहावे असे मला वाटते .
गुजरात राज्याच्या वनखात्याचा हा प्रकल्प आहे
नरेंद्र मोदी या प्रकल्पावर आले होते तेव्हाचे छायाचित्र
प्रकल्प अतिशय सुंदर आहे
मुख्य इमारत आकर्षक आहे
पंतप्रधान कार्यालयाने प्रकाशित केलेली छायाचित्रे
बुद्धिबळाचा डाव

आज तो आरोग्य मानव अर्थात औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या मानवी आकार .
या भागात सरदार सरोवर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी एका बाजूला घेऊन नर्मदा माते इतकी क्षमता असलेला कालवा बांधण्यात आलेला आहे . त्या सर्व प्रकल्पामुळे जुना परिक्रमा मार्ग बंद झालेला आहे . आणि फार मोठा वळसा मारून जंगलातून चालावे लागते . मध्ये कुठलाही आश्रम सुविधा काही नाही . त्यामुळे आता लवकर पुढे मार्गस्थ व्हावे असे ठरवले आणि निघालो . व्यवस्थापकांना भेटून जेव्हा समाधान व्यक्त केले तेव्हा त्यांना फार बरे वाटले . ते म्हणाले की फार कमी पर्यटक इतक्या चौकस पणे हे उद्यान पाहतात . सर्वजणांना पुढे जाण्याची घाई असते . त्यांनी शेरे वहीत माझा शेरा देखील लिहून घेतला . मध्ये एक छोटेसे स्वामीनारायण मंदिर लागले .पुढे एकांतपूर्ण रस्त्यावर झपाझप चालू लागलो . आजूबाजूला दाट अरण्य होते . इथून पुढे एक मोठे आश्चर्य माझी वाट पाहत होते ! नर्मदा मातेहूनही मोठा भासणारा एक भव्य दिव्य कालवा येथे बांधण्यात आलेला आहे ! हा जगातील सर्वात मोठा कालवा मानला जातो . आणि नर्मदामाता आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतेच अगदी त्याचप्रमाणे हा कालवा कोणी बांधला असेल असा विचार मी तेव्हा केला होता आणि मध्यंतरी एका ऑनलाइन कार्यक्रमामध्ये तो कालवा बांधणारे इंजिनियर मला भेटले . त्यांच्याकडून या कालव्याची सर्व माहिती घेतली . हा कालवा केवडिया कॉलनी येथे चाळीस हजार क्युसेक क्षमतेचा आहे . राजस्थानमध्ये जयपुर कडे जाता जाता तो अडीच हजार क्युसेक चा होतो . संपूर्ण गुजरात राज्य कच्छचे रण आणि राजस्थान मध्ये नर्मदा मातेचे पाणी या कालव्याच्या मदतीनेच फिरविलेले आहे . आपण गुगल नकाशावर या कालव्याचा माग घेत त्याने किती किलोमीटरचा प्रवास केला आहे याचा अंदाज घेऊ शकता ! याची लांबी तब्बल साडेचारशे किलोमीटर आहे ! याला नर्मदा मातेवरील कालवा क्रमांक एक असे म्हणतात . हा खरोखरीच क्रमांक एकचा कालवा आहे ! विशेषतः पुण्यामध्ये कुठल्याही पुलावरून मुठा नदी पाहण्याची ज्यांना सवय आहे त्यांना हा कालवा कित्येक पटीने मोठा व भव्य दिव्य वाटल्यास नवल नाही ! 
नर्मदा मातेवरील सरदार सरोवर धरणाचा कालवा क्रमांक एक 
या कालव्याच्य भव्यतेचा अंदाज यावा म्हणून अजून काही चित्रे सोबत देत आहे
या चित्रात गोलामध्ये दाखवलेली कार पहा तिच्या आकारावरून तुम्हाला कॅनॉलच्या आकाराचा अंदाज येईल !
दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आप निरूपण या समासामध्ये पाण्याचे महत्त्व सांगितले आहे . त्यामध्ये त्यांनी आवर्जून कालव्यांचा देखील उल्लेख केलेला आहे . तमिळ भाषेमध्ये कालवा हा शब्द गेल्या दोन हजार वर्षांपासून प्रचलित आहे . आणि तो कालवा याच अर्थी वापरला जातो . तिथल्या चोल आणि नायक राजांनी अनेक कालवे आणि त्यातून शेतात पाणी नेणारे पाट बांधलेले पाहायला मिळतात .आजच घटस्थापनेच्या मुहूर्तावर एक अतिशय आनंदाची गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजे मराठी भाषेला तिचा स्वतःसिद्ध असा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे ! त्यानिमित्ताने कालवा हा शब्द मराठी भाषेमध्ये देखील असणे ही तिची अभिजातता सिद्ध करणारी बाब निश्चितार्थाने आहे ! 
समर्थ रामदास स्वामी म्हणतात ,
उदक तारक उदक मारक 
उदक नाना सौख्यदायक 
पाहातां उदकाचा विवेक 
अलोलीक आहे ||२३||

भूमंडळीं धांवे नीर 
नाना ध्वनी त्या सुंदर 
धबाबां धबाबां थोर 
रिचवती धारा ||२४||

ठाईं ठाईं डोहो तुंबती 
विशाळ तळीं डबाबिती 
चबाबिती थबाबिती 
कालवे पाट ||२५||

जय जय रघुवीर समर्थ ! नर्मदे हर !





लेखांक एकशे पंचवीस समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. सुंदर ! वाचन संपूच नये असे वाटते !! नर्मदे हर !!!

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर आहे. वाचताना मन इतके एकाग्र होते की तुम्हाला आलेल्या प्रत्येक अनुभवाचा मनाला स्पर्श होतो. 🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. बाबाजी किती जन्म पुण्यच पुण्य कमवलयत!!!
    आई नर्मदे हर बाबाजी 🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर