लेखांक १२३ : तिलकवाडा येथील उत्तर वाहिनी नर्मदा माता व मणि संगमावरील मणीनागेश्वर

नर्मदा मातेच्या काठाकाठाने चालायला सुरुवात केली . लवकरच तिलकवाडा हे गाव लागले . किनारा अतिशय सुंदर होता . मोठे मोठे दगड गोटे वाळूमध्ये अडकून तयार झालेले भव्य व विचित्र खडक काठावर होते . इथे एक ब्राह्मण पुजारी स्नान करताना भेटला . त्याने मला गावातील विविध स्थानांची माहिती न विचारताच सांगितली . असे काही घडले की ओळखायचे की नर्मदा मातेची ती इच्छा आहे ! मी ज्या पुस्तकाच्या आधारे परिक्रमा करत होतो त्या पुस्तकाचे लेखक आत्म कृष्ण महाराज इथेच राहतात हे कळले होते . त्यामुळे त्यांना भेटावे असे वाटले . मी त्यांच्या आश्रमामध्ये गेलो सुद्धा . बाहेरून खूप आवाज दिला परंतु आतून कोणी होकार दिला नाही . आश्रमाच्या आत मध्ये जाऊन संपूर्ण परिसर फिरून आलो परंतु कोणीच दिसले नाही . अखेरीसस निराशेने पुढे निघून गेलो .

आत्मकृष्ण महाराज नर्मदे हर अन्नक्षेत्र नर्मदा तट तिलकवाडा
हेच त्यांचे जगप्रसिद्ध पुस्तक ज्याच्या मदतीने आजवर हजारो लोकांनी नर्मदा परिक्रमा सिद्ध केली !
आत्मकृष्ण महाराजांच्या पुस्तकाचे मलपृष्ठ
ज्यांना पुस्तक हवे आहे त्यांनी कृपया प्रकाशकांची संपर्क करावा . आजवर नर्मदा परिक्रमे  विषयी जेवढी पुस्तके पाहिली त्यातील सर्वात अचूक व अप्रतिम असे हे पुस्तक मला वाटले .
असो .
हाच आहे आत्मकृष्ण महाराजांचा आश्रम
हे जुने अन्नक्षेत्र असून सध्या महाराजांची प्रकृती बरी नसल्यामुळे बंद असल्याचे मला नंतर कळाले .
दुर्दैवाने मी आत मध्ये गेलो तेव्हा इथल्या ह्याच खोलीमध्ये महाराजांचे वास्तव्य होते . परंतु त्यांना झोप लागलेली असल्यामुळे त्यांनी मला परतून आवाज दिला नाही व त्यांच्या दर्शनाला मी मुकलो .
आत्मकृष्ण महाराजांचे संपूर्ण नर्मदा परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासींवर असलेले उपकार न फिटणारे आहेत !
वाळू गाळामध्ये मिसळून तयार झालेले तिलकवाडा येथील मोठे मोठे वालुकाश्म खडक .
नर्मदा माता दरवर्षी या खडकाचा थोडा भाग तासून पुढे वाहून नेते .
नर्मदे हर अन्नक्षेत्राच्या पुढे एक सरकारी शाळा लागली व त्यानंतर एक आयटीआयची इमारत लागली . तिथून पुढे गावाला सुरुवात झाली .
तिलकवाडा हे तसे मोठे गाव आहे . इथे हिंदू मुस्लिम अशी मिश्र वस्ती दिसते . हिंदूंची जुनी घरे फारच सुंदर आणि अतिशय अद्भुत कोरीव काम असलेली आहेत . कलेची आवड असलेल्या लोकांनी किंवा बांधकाम क्षेत्रातील लोकांनी या गावातील घरांचे अवश्य अवलोकन करावे . फार सुंदर घरे आहेत . 
तिलकवाडा येथील सुंदर घरांचे काही नमुने
अगदी छोट्यातल्या छोट्या घराला देखील असे सुंदर कोरीवकाम केलेले आढळते .
अशा प्रकारची कोरीव कामे करण्यामागे एक मोठे मानसशास्त्र आहे . प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारच्या तोडी किंवा वासे हे सहजासहजी मिळत नसतात . त्यामुळे ते वाया घालवणे परवडणारे नसते . परंतु तरीदेखील कलाकाराला त्याच्या कलेवर अन् कौशल्यावर इतका जबरदस्त आत्मविश्वास असतो की तो जगाला जणू दाखवत असतो की मी तोडीचे लाकूड वाया न घालवता त्याच्यावर अतिशय नाजूक कोरीव काम बिन चूक करून दाखवू शकतो ! शास्त्र आणि कला यांचा हा अनोखा संगम आहे .
तिलकवाडा गावांमध्ये अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत .आपल्या संस्कृतीमध्ये संगम असलेल्या स्थानाला विशेष महत्त्व असते . तसेच उत्तर वाहिनी नदी देखील पवित्र मानली जाते . इथे उत्तर वाहिनी नर्मदा माई आणि मणी नदीचा संगम असल्यामुळे हे स्थान अतिशय पवित्र मानले जाते . तिलकेश्वर महादेव , चंद्रेश्वर महादेव , नर्मदेश्वर महादेव ,रामेश्वर महादेव , राम मंदिर , समर्थ स्थापित हनुमान मंदिर तसेच गौतम ऋषी यांची तपस्थळी आणि सप्तमातृका अशी अनेक मंदिरे येथे आहेत . अलीकडच्या काळात काही नवीन तीर्थक्षेत्रे तयार झाली आहेत . ज्यामध्ये परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती उपाध्ये टेंबे स्वामी महाराज यांची चरण धूळ आणि अन्य वस्तू असलेली एक वास्तू तसेच धनकवडीच्या शंकर महाराजांचा मठ देखील उभा केलेला दिसतो .

तिलकवाडा मध्ये मणी किंवा मेण नावाची नदी नर्मदा मातेला येऊन मिळते

मेणनदी आणि नर्मदा मातेचा संगम मोठा अद्भुत आहे ! अतिशय भव्य दिव्य असा हा परिसर आहे !

या परिसराची लोकांना अधिक प्रमाणात माहिती झाली ती उत्तर वाहिनी परिक्रमेमुळे . नर्मदा माता तिच्या संपूर्ण प्रवासामध्ये केवळ दोनच ठिकाणी उत्तर दिशेला वाहते . बाकी तिचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडेच आहे . मंडला जिल्ह्यात एके ठिकाणी आणि तिलकवाडा येथे नर्मदा माता उत्तर वाहिनी झालेली आहे . या उत्तरवाहिनी परिक्रमेचे महत्त्व अलीकडच्या काळात वाढल्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक येथे येतात . त्यांच्यामुळे आणि त्यांनी काढलेल्या फोटो व्हिडिओ इत्यादीमुळे लोकांना हा भाग आता चांगला माहिती झाला आहे .
मी गेलो तेव्हा सुद्धा नेमकी उत्तर वाहिनी परिक्रमा सुरूच होती . यातले दक्षिण तटावरील रामपुरा येथून परिक्रमा न उचलणारे बहुतांश परिक्रमा वासी समर्थ स्थापित हनुमान मंदिर किंवा वासुदेव कुटीर या ठिकाणावरून परिक्रमा सुरू करतात .
तिलकवाडा येथील वासुदेव कुटीर
परमहंस परिवव्राजचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती उपाख्य टेंबे स्वामी महाराज .
याच भागात अनेक छोट्या मोठ्या कुटी आहेत

परंतु रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती हा विशेष महत्त्वाचा आहे कारण समर्थ रामदास स्वामींनी नर्मदे काठी केलेल्या भ्रमणाचा व धर्मकार्याचा तो पुरावा आहे .
समर्थांचे मठ आजही संपूर्ण भारतभरात पाहायला मिळतात . अगदी दक्षिणेतल्या रामेश्वरम चे मुख्य पुजारी बोकील रामदासी आहेत तर बद्री नारायणाला समर्थांचे दोन मठ आहेत .

या मारुती मंदिरापासूनच बरेचसे लोक उत्तरवाहिनी परिक्रमा चालू करतात


मारुती धाम असे या भागाचे नाव आहे

आणि हाच तो समर्थ स्थापित मारुती

समर्थ स्थापित अकरा मारुती पैकी मसूरच्या मारुतीची आठवण करून देणारे हे मारुतीचे ध्यान आहे
शेंदुराचा लेप उतरल्यावर मारुती असा दिसतो
समर्थ स्थापित मारुतीचे एक विशिष्ट ध्यान असते . त्याचे वर्णन त्यांनीच पहिल्या  स्तोत्रात स्वतः केलेले आहे . पुच्छ ते मुरडिले माथा । कीरीटी कुंडले बरी ।
सुवर्ण कटी कासोटी । घंटा किणकिणी नागरा ।
 ठकारे पर्वता ऐसा । नेटका सडपातळू 
चपळांग पाहता मोठे । महाविद्युल्लते परी ।
समर्थ स्थापित बहुतांश मारुती अशाच प्रकारचे असतात . त्यांनी पायाखाली एखादा राक्षस दबलेला असतो आणि हात शत्रु वर उगारलेला असतो किंवा हाताचा चपेटा केलेला असतो . मारुतीच्या या रूपाला वीर मारुती किंवा प्रताप मारुती असे म्हणतात . समर्थ स्थापित दुसरा प्रकारचा मारुती हा दास मारुती प्रकारचा असतो . हा मात्र हात जोडून उभा असतो . तिलकवाड्याचा मारुती वीर मारुती आहे . हा अत्यंत जागृत मारुती आहे . महारुद्र हनुमान की जय !

मारुती मंदिराकडे जाण्यासाठी अशी मोठी वेस लागते

तिलकवाडा येथील अशोक भाई यांच्या पूर्वजांचा जन्म टेंबे स्वामींच्या आशीर्वादामुळे झालेला आहे त्यांच्याकडे स्वामींच्या वापरातील अनेक वस्तू आहेत .
मी मारुतीरायाचे दर्शन घेतले . तिथे समर्थांनी रचलेली काही स्तोत्रे सवाया व कवने म्हटली . आणि परेश पंड्या गुरुजींचे घर शोधू लागलो . त्यांनी मला सांगितले होते की त्यांच्या शेजारच्या घरामध्ये अशोक भाईंच्या घरी टेंबे स्वामींच्या नित्य वापरातील अनेक वस्तू आहेत . टेंबे स्वामी हे परिव्राजकाचार्य होते याचा अर्थ ते सतत भ्रमण करत राहायचे . संन्याशाने तीन दिवसापेक्षा अधिक एका ठिकाणी राहू नये असा नियम आहे . तो त्यांनी आमरण पाळला . केवळ चातुर्मासामध्ये एका जागी राहावे असा शास्त्र संकेत आहे . टेंबे स्वामी महाराज हे अनवाणी चालायचे . आज अनेक लोक त्यांच्या पादुका घेऊन फिरतात परंतु स्वतः महाराजांनी कधी पादुका घातल्या नव्हत्या असे मला अशोकभाईंनी सांगितले . कदाचित काही लोकांनी त्यांच्या पायामध्ये अडकवून किंवा पायाला स्पर्श करून पूजनासाठी पादुका घरी नेल्या देखील असतील परंतु स्वतः महाराज पादुका घालून भ्रमण करत आहेत असे कधीच कोणीच पाहिलेले नाही . त्यामुळेच की काय परंतु अशोक भाईंच्या घरी टेंबे स्वामींच्या पादुका नसून चरण धुळ आहे . त्याची कथा मोठी रंजक आहे . अशोक भाईंचे पणजोबा नर्मदेमध्ये स्नान करून काठावर अनुष्ठान करत बसले होते . इतक्यात काठाने चालत टेंबे स्वामी तिथे आले . बुवांनी त्यांच्या पायावर डोकेतून नमस्कार केला व त्यांचे चरण प्रक्षालन करण्याची इच्छा व्यक्त केली . स्वामिनी होकार दिल्यावर तिथल्या एका दगडावर बसून त्यांनी स्वामींचे पाय धुतले व स्वामींच्या पायाला लागलेले चिखलाचे गोळे काढून आपल्या उपरण्यामध्ये बांधून ठेवले . तीच ही चरण धूळ होय !पुढे या घराण्यावर स्वामींची विशेष कृपा झाली . स्वामींनी वापरलेल्या ज्या गोष्टी या घरात आहेत त्यामध्ये स्वामींची छाटी ,चरणरज ,परात , लिखाण घोटण्यासाठी लागतात त्या गोट्या ,हस्ताक्षर इत्यादी सर्व गोष्टी आहेत या सर्व त्यांनी मला काढून दाखवल्या आणि मी मोठ्या भक्ती भावाने त्या पाहिल्या .
यांच्या अगदी शेजारीच परेश पंड्या यांचे घर होते .त्यांची दोन्ही मुले अतिशय गोड आहेत ! दोघांनी मला खूप आग्रह करून घरी नेले . चहा पाजला . दोन्ही मुले हसतमुख आहेत . अगदी त्यांच्या वडिलांसारखीच !

परेश पंड्या गुरुजी यांची गोड अशी मुले !
छोटी मैय्या तर फारच गोड होती !
 चिरंजीवांचे हास्य अतिशय सुंदर आणि मोहक होते !
 परेश पंड्या गुरुजी यांनी त्यांच्या मोबाईलवर काढलेला आमचा सेल्फी ! 

त्यानंतर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी सप्तमातृका मंदिर आणि गौतमेश्वर महादेवाचे दर्शन घेतले . चंद्रेश्वर आणि नर्मदेश्वर महादेवाचे देखील दर्शन घेतले .

श्री चंद्रेश्वर आणि नर्मदेश्वर महादेव तिलकवाडा
 
निशादीप्त अर्थात रात्री चमकणारी मारुती धाम ची पाटी

चंद्रेश्वर महादेव आणि नर्मदेश्वर महादेव यांचे मंदिर

तिलकवडा येथील तीर्थस्थाने


श्री गौतमेश्वर महादेव


प्रभू रामचंद्रांनी आवाहन केलेल्या सप्तमातृका

सप्तमातृका महात्म्य , महाराष्ट्रात यांनाच साती आसरा माता असे देखील म्हणतात

सप्तमातृका आणि त्यांची नावे

तिलकेश्वर महादेवाची पूजा तिळाने केली जाते


श्री गौतमेश्वर महादेव मंदिर . माझे गोत्र गौतम असल्यामुळे मला या मंदिराचे विशेष महत्त्व आहे असे पंड्या गुरुजींनी मला सांगितले .


सप्तमातृका मंदिराच्या खाली जुन्या मंदिराचे खांब शिल्लक आहेत यावरून हे मंदिर किती पुरातन आहे ते कळते .
यानंतर परेश पंड्या गुरुजी यांनी मला डॉक्टर चंद्रमौळी स्वामी यांचे दर्शन घेण्यास सुचवले . हे एक संन्यासी होते . आणि गेले अर्धशतक नर्मदे काठी राहिलेले होते . पूर्वाश्रमी च्या शिक्षणाने ते एमडी डॉक्टर होते . यांच्या आश्रमामध्ये मी गेलो तेव्हा माझ्या लक्षात आले की सगळीकडे काटे तारा लावण्यात आल्या आहेत . दार उघडून मी थेट आश्रमामध्ये गेलो आणि स्वामीजींच्या खोली पुढे उभा राहिलो . नर्मदे हर चा पुकारा केला .स्वामीजींना माझे तिथे येणे अपेक्षित नव्हते . कारण उत्तर वाहिनी परिक्रमेचे कोणीही परिक्रमा वासी इकडे येत नाहीत . त्यांच्यासाठी स्वामींनी खाली मार्गामध्ये स्वतंत्र आश्रम उघडलेला आहे . हा आश्रम म्हणजे स्वामींचे निवासस्थान होते . स्वामी सामोरे येताच मी त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणालो , "ओम नमो नारायणाय ! " स्वामी मला अस्खलीत इंग्रजीमध्ये म्हणाले , " हू टोल्ड यू अबाउट मी ? " " मिस्टर परेश पंड्या स्वामीजी . वी हॅड मेट यस्टरडे इन चुडेश्वर " मी इंग्रजी बोलतो आहे हे पाहिल्यावर बहुतेक स्वामीजी सुखावले . आणि मला म्हणाले "कम इन साईड यंग मॅन " स्वामीजी अखंड इंग्रजी मध्ये बोलत होते . मी देखील त्यांना इंग्रजी मध्ये उत्तरं देत होतो . स्वामींचा एक दिवाणखाना होता . तिथे ते बसले आणि मी त्यांच्या चरणाशी बसलो . ते मला वर बस म्हणाले परंतु मी त्यांना सांगितले की माझी ही जागा योग्य आहे . त्यांची एक डॉक्टर शिष्या आणि तिची मुलगी दोघी आत मध्ये स्वयंपाक करत होत्या . स्वामिनी तिला बाहेर बोलावून  घेतले . ती भाग्यनगरची होती . तिला इंग्रजी मध्ये स्वामिनी माझी ओळख करून दिली . " लूक ॲट दिस यंग मॅन . ही इज फ्रॉम पुणे . ॲन इंजिनिअर बाय एज्युकेशन . वॉकिंग अलोन विदाऊट अ फोन ऑर पेनी इन हिस पॉकेट " " आय एम नॉट अलोन स्वामीजी . नर्मदा मैया इज विथ मी ऑल द टाईम ! " मी क्षणात उत्तरलो . स्वामीजी जोरात हसले ! आणि म्हणाले "देअर यु आर ! " नर्मदा मैया तुझ्यासोबत अखंड आहे हे वाक्य बरोबर आहे ! नंतर ते मला सांगू लागले . मी सुद्धा गेली ५२ वर्षे नर्मदेच्या काठावर राहतो आहे . आणि नर्मदा मातेला माझे इतके प्रेम आहे की ती दरवर्षी माझ्या जवळ जवळ येते आहे ! असे म्हणत स्वामीजी मला बाहेर घेऊन आले . आणि त्यांनी मेण नर्मदा संगमाने खाल्लेली ३०० फूट जागा दाखवली ! म्हणजे आता आश्रमाची सीमा जिथे होती त्यापेक्षा ३०० फूट पुढे आश्रम होता ! परंतु दर वर्षी थोडा थोडा आश्रम वाहून जायचा . अजूनही ती प्रक्रिया सुरू होती . त्यामुळे त्या पडक्या बाजूला जाण्यासाठी लोकांना बंदी होती . स्वामीजींनी मला एक कट्टा दाखवला ज्यावर पूर्वी ते बसायचे . परंतु आता तिथे उभे राहणे सुद्धा धोक्याचे आहे ! गुजराती रेवा चित्रपटामध्ये तो कट्टा दाखवलेला आहे . स्वामीजी मला म्हणाले आज तू इथेच रहा . तुला मस्तपैकी जेवण बनवून देतो . राहण्यासाठी एक खोली देतो . आणि तुला जे हवे ते कर ! मी स्वामीजींना नम्रपणे सांगितले की चातुर्मास संपण्यापूर्वी मला परिक्रमा संपविण्याची आहे . त्यामुळे शक्य होईल तोवर मी मुक्काम टाळतो आहे . जशी तुझी इच्छा . असे म्हणत स्वामींनी एका सेवकाला आवाज दिला आणि मला खोली देण्यास सांगितले . मी आता उठणार इतक्यात स्वामीजी मला म्हणाले , " तुझ्या गळ्यातल्या छोट्या पिशवीत काय आहे ? " "माझी नर्मदा मैय्या आहे स्वामीजी " मी म्हणालो . आणि त्यांना माझी मैय्या दाखवली ! एखाद्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर चॉकलेट पाहिल्यावर जसा आनंद फुलतो तसा क्षणात स्वामींचा चेहरा आनंदी झाला आणि ते आनंदाने जोरजोरात हसू लागले ! त्यांनी त्यांच्या डॉक्टर शिष्येला आणि तिच्या मुलीला हाक मारली ! आणि म्हणाले पहा याची मैया किती सुंदर आहे ! स्वामींच्या डोळ्यात पाणी आले आणि माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत ते मला म्हणाले , " गेली ५२ वर्षे मी नर्मदे काठी राहतो आहे . परंतु इतकी सुंदर नर्मदा मैया मी कोणाकडेच पाहिली नाही ! " त्यांचे हे शब्द माझ्यासाठी फार अनमोल होते ! स्वामींनी त्या मुलीला त्यांचा आयफोन दिला आणि तिच्याकडे देखील एक चांगला फोन होता त्या दोन्ही फोनवरून त्यांनी माझ्या मैयाचे यथेच्छ फोटो काढून घेतले ! स्वामीजींना माझी नर्मदा मैया खूपच आवडली ! आम्ही पुन्हा तासभर गप्पा मारल्या . स्वामीजींनी मला स्लीपिंग आऊल ब्राण्डची उत्तम अशी  म्हैसूर कॉफी पाजली . सोबत अप्रतिम अशी खारी नानकटाई दिली . कॉफी पिता पिता आमचा संवाद सुरू झाला . स्वामींनी मला सांगितले की उत्तर वाहिनी परिक्रमा जोरात चालू झाल्यापासून त्यांनी परिक्रमा वासियांना आश्रमामध्ये प्रवेश देणे बंद केले आहे . कारण कितीही जाऊ नका म्हटले तरी लोक पुढे जातात आणि थेट खाली पडू शकतात . आश्रम फारच धोकादायक बनलेला आहे .शिवाय आता खरे परिक्रमावासी भेटत नाहीत अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली . ९३ साली महाराजांनी अनवाणी पायांनी पायी परिक्रमा केली होती  . त्यांच्या त्या परिक्रमेतले आणि अन्य भ्रमणातले अनुभव ते मला सांगू लागले . कर्नाटकातल्या एका जंगलामध्ये त्यांनी साधना केली होती तिथे देखील त्यांना खूप अनुभव आले होते . जंगलामध्ये भेटलेली वन्य श्वापदे व अन्य अनेक अनुभव त्यांनी मला सांगितले . ते पूर्वाश्रमीचे डॉक्टर असून मला काही मेडिकल प्रॉब्लेम असेल तर आवर्जून सांगावा हे सांगायला ते विसरले नाहीत . त्यांनी काही औषधे मला जवळ असावीत म्हणून लिहून दिली . सर्वसाधारणपणे ऍलोपॅथिक डॉक्टर हे तुमच्या स्थूल देहावर काम करतात . तुमच्या प्रत्येक कोशावर काम करणारा डॉक्टर चंद्रमौळी स्वामींसारखा डॉक्टर मिळाला तर अजून काय हवे !
मला ओंकारेश्वर येथे भेटलेला मुंबईचा तरुण परिक्रमा वासी सारंग देव याला माझ्याकडे होते तसे परिक्रमेचे पुस्तक हवे होते . नारेश्वर इथे ते मला मिळाले नव्हते त्यामुळे स्वामीजींना मी ते कुठे मिळेल असे विचारले . तेव्हा चंद्रमौळी स्वामींनी मला सांगितले की आत्मकृष्ण महाराज हे त्यांचे गुरुबंधू आहेत आणि सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांची सर्व व्यवस्था चंद्रमौली स्वामीच बघत आहेत . तसेच त्यांच्या पुस्तकाचे वितरण वगैरे देखील स्वामीच पाहतात . त्यामुळे त्यांनी माझ्याकडून सारंगदेवचा पत्ता लिहून घेतला आणि मी त्याला पुस्तक पाठवतो असे आश्वासन मला दिले . पुढे खरोखरच त्यांनी ते पुस्तक सारंगदेवला पाठवून दिले . आणि माझ्याकडून पैसे देखील घेतले नाहीत . 
हीच ती स्वामीजींची खोली आणि त्यातून दिसणारी उत्तरवाहीनी नर्मदा .
समोर शुलपाणीची झाडी असलेले सातपुड्याचे भव्य दिव्य पहाड दिसतात ! हिरवळीवर चरणारी गुरे आणि नर्मदा मातेचे मूळ पात्र आपल्याला दिसते आहे .
या चित्रामध्ये दिसणारी डावीकडची वरची खोली स्वामीजींनी मला दिली . इथून दिसणारे नर्मदा मातेचे रूप केवळ अविस्मरणीय होते .
माझ्या खोलीतून नर्मदा मैय्या अशी दिसत होती . डावीकडे तिचे मूळ पात्र दिसते आहे तर उजवीकडे नवीन पात्र आहे .  सरदार सरोवर धरणासाठी याच पात्रातील दगड गोटे उचलून नेले होते त्यामुळे इथून नवीन प्रवाह सुरू झाला .
कट्ट्यावर गप्पा मारत बसलेले स्वामीजी आपल्याला दिसत आहेत . खाली नर्मदा मातेचे दोन प्रवाह आपल्याकडे येताना दिसत आहेत . आणि डावीकडून उजवीकडे प्रवाहत होणारा मातकट प्रवाह मेण नदीचा आहे .
आश्रमातून दिसणारा संगम . उजवीकडे पाण्याचे दोन वेगळे रंग दिसत आहेत पहा ! डावीकडे मेण नदी तर उजवीकडे नर्मदा माता आहे
स्वामीजींची मी गप्पा मारत बसलो होतो तीच ही खोली आणि वास्तू .
इथून दक्षिण तटावरील मंदिरे व आश्रम देखील दिसतात . शुलपाणी झाडीची गुजरात मधील बाजू जंगलाने व्यापलेली आहे . ती देखील इथून स्पष्ट दिसते .

मी पडू पाहणाऱ्या त्या कट्ट्या वर स्वामीजींच्या परवानगीने गेलो . त्यांच्या सेवकाने मला उभे राहायला सांगून फोटो काढले .  माझ्या उजव्या हाताला नर्मदा मातेचा मूळ प्रवाह दिसतो आहे . डाव्या हाताला नवीन प्रवाह आहे . पुरामध्ये हे सर्व गच्च भरून जाते . 
आपल्या बैठकीच्या खोलीमध्ये स्वामीजींनी माझी नर्मदा माता हातात घेतली आहे !
हा कट्टा आता कदाचित पडून देखील गेला असेल इतका तो धोकादायक बनला होता
स्वामीजींनी काढलेले फोटो नंतर माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले . ते सर्वच इथे देत आहे .
स्वामींना माझी नर्मदा मैयाला सजवण्याची कल्पनाच फार आवडली . 
माझ्या खोलीतून दिसणारे नर्मदा मातेचे पात्र असे होते की त्यात नीट पाहिल्यावर एका मगरीचे दर्शन व्हायचे !
या फोटोत कदाचित त्याचा अंदाज येणार नाही परंतु मला मात्र मगर स्पष्ट दिसत होती ! त्यामुळे या पात्राचे नाव मी मकर वाहिनी नर्मदा माता असे ठेवले !
नर्मदा परिक्रमे तुमचे हात नेहमी असे असतात . या मुद्रेचा अर्थ जे काही घडते आहे ते मला मान्य आहे ! पुढे आपल्या जीवनात देखील आपले हात असेच असावेत !
सेवक तरुण असल्यामुळे त्याला फोटो काढण्याचा नाद होता . त्याने बरेच फोटो काढून घेतले . 
नर्मदा मातेचे देखील बरेच फोटो स्वामीजींनी स्वतः आग्रहाने काढून घेतले .
धन्य ते स्वामी आणि धन्य ती नर्मदामाता !
त्या दोघांच्या दर्शनामुळे धन्यता पावलेला प्रस्तुत लेखक
स्वामीजी खूप मोठे विद्वान होते . त्यांचा व्यासंग दांडगा होता . आणि वाणीवर अफाट प्रभुत्व होते . अशा थोर विभूतीमत्वाला आपली मैया भेटली याचा मला खूप आनंद झाला !
आणि त्याचा त्यांना झालेला आनंद ते देखील लपवू शकत नव्हते !
स्वामीजींनी माझ्यापुढे दोन पर्याय ठेवले . एक म्हणजे त्या सर्वांसोबत जेवणे . किंवा वरती मला दिलेल्या खोलीत गच्चीमध्ये बसून नर्मदा मातेकडे पाहत  एकांतात जेवणे . मी अर्थातच दुसरा पर्याय निवडला . खोलीमध्ये गेलो आणि गच्चीमध्ये आसन लावले . नर्मदा मातेचे इतके भव्य दिव्य आणि सुंदर रूप आजवर कुठेच पाहिले नव्हते . त्याला एक कारण आहे . एरव्ही नर्मदा माता डावीकडून उजवीकडे वाहताना  पाहायला मिळते . येथे मात्र ती समोरून आपल्याकडे येत होती ! त्यामुळे तिची संपूर्ण ऊर्जा अखंड आपल्यावर बरसत होती ! एक वेगळेच अद्भुत चित्र इथे उभे राहिले होते ! पुन्हा हे दृश्य बघायला मिळेल का नाही याची शाश्वती नसल्यामुळे मी माझ्या वहीमध्ये त्याचे कच्चे आरेखन करून ठेवले . 
हे चित्र आणि त्याच्या अक्षर फक्त मला कळेल असेच आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपली क्षमा मागतो . या चित्रात काय काय बघायचे ते आपल्याला सांगतो . डावीकडे वरती ताडाची झाडे दिसत आहेत तिथे मणीनागेश्वराचे मंदिर आहे . खाली दोन पूल आहेत एक सरदार सरोवर धरणाकडे जाणाऱ्या रेल्वेचा आणि दुसरा केवडिया साठी रस्ता मार्ग . त्यानंतर डावीकडे खाली मणी / मेण नदी दिसते आहे . डाव्या हातालाच उत्तर वाहिनी नर्मदा मातेचा मूळ प्रवाह दिसतो आहे . मध्ये मकर वाहिनी नर्मदा दिसते आहे . उजवीकडे नवा प्रवाह दिसतो आहे इथले गोटे नेऊन सरदार सरोवर बनविले गेले असे लिहीले आहे . एक नाव दिसते आहे . उजवीकडे वाळू गोटे दिसत आहेत . डावीकडे वर महाराष्ट्राचे डोंगर असे लिहिले आहे . ती सातपुडा पर्वताची रांग असून तीच शूलपाणी ची झाडी होय .

उत्तर वाहिनी परिक्रमा करणारे लोक नावेने मैया पार करून वाळवंटातून चालताना दिसत होते . त्यांची संख्या हळूहळू वाढत होती . भोजन प्रसाद घेतल्यावर काही काळ मी शांतपणे मैयाचे ते स्वरूप नजरेमध्ये साठवत बसून राहिलो .क्षणभर मला डोळा लागला . आज रविवारचा दिवस होता त्यामुळे सुमारे १२००० लोक आज ही परिक्रमा करत होते . परंतु मला पुन्हा एकदा तिला प्रत्यक्ष भेटण्याची अनिवार ओढ निर्माण झाली आणि मी निघालो . स्वामीजींना मी जातो आहे सांगितल्यावर क्षणभरच वाईट वाटले परंतु नंतर त्यांनी मला पुण्याला आल्यावर भेटूयात असे आश्वासन दिले आणि निरोप दिला . पुन्हा कधीही आलास तर इथे मुक्कामाला ये असे सांगायला स्वामीजी विसरले नाहीत

. पुढे परिक्रमा संपल्यावर पुण्यामध्ये स्वामीजी एकदा आले होते तेव्हा त्यांनी मला भेटण्यासाठी बोलावून घेतले . प्रभात रस्त्यावर त्यांच्या एका भक्ताने त्यांना एका आलिशान घरामध्ये राहण्याची सर्व व्यवस्था करून दिली होती . तिथे मी स्वामीजींचे पुन्हा एकदा दर्शन घेतले . अशा रीतीने पुण्याला आल्यावर आपण भेटूया हे शब्द देखील स्वामीजींनी खरे केले . असो .
 स्वामीजींची रजा घेऊन पुढे मार्गस्थ झालो . टळटळीत दुपार उतरत होती . उन्हाचा तडाखा अजूनही जाणवत होता . मधला एक चटकट पकडून मी मेण नदीवरचा पूल गाठला . या नदीच्या प्रवाहाने काठाचे बरेच नुकसान केले होते व अजूनही करत होता . नर्मदा मातेचा उत्तर दिशेकडे वेगाने येणारा प्रवाह तिलकवाड्याची इंच इंच भूमी दिवसेंदिवस खात होता . मेण किंवा मणी नदीचा उगम देखील शूलपाणीच्या झाडीच्या उत्तर तटावरील डोंगरांमध्येच असल्यामुळे ती देखील वेगाने नर्मदा मातेला येऊन मिळत होती आणि किनाऱ्याची धूप करण्यामध्ये तिला हातभार लावत होती . पुलावर काही काळ उभा राहून मी हे दृश्य पाहिले . इतक्या तिथे एक तरुणाला आणि मला म्हणाला , "क्या देख रहे हो बाबाजी ? इस तरफ की जमीन मत देखना । ये दिन ब दिन खतम हो जायेगी । आपको ऐसी जबरदस्त जमीन दिखता हु जो हमेशा बढती जायेगी । " हा माणूस कोण आहे आणि माझ्याशी का बोलतो आहे मला कळेचना . मी त्याच्याकडे पाहू लागलो . तो म्हणाला मी इथला इस्टेट एजंट आहे . सगळे साधू माझ्याकडूनच जमिनी घेतात . माझ्याशिवाय अन्य कोणीही इथे जमिनीचा व्यवहार करू शकत नाही . मी त्याला नाव विचारले . तो इकबाल भाई नावाचा इस्लाम धर्म मानणारा मुसलमान होता . तरी देखील हिंदू साधूंना याच्याकडूनच सर्व व्यवहार करून घ्यावे लागायचे . तू कोणाच्या हाताखाली काम करतोस ? असे मी विचारल्यावर त्याने मला काल मला भेटलेल्या राजपिपला गावच्या राजपूत बिल्डरचे नाव सांगितले ! मग मी त्याला त्याच्या मालकाबद्दल अजून एक दोन गोष्टी सांगितल्यावर तो एकदम माझ्या चरणाशीच आला ! त्याला वाटू लागले की मी सर्वज्ञ आहे आणि माझ्याकडे काहीतरी सिद्धी आहे ! आणि तो त्याला भेडसावणारे त्याच्या जीवनातील काही प्रश्न मला सांगू लागला . मी त्याला एवढेच सांगितले की नर्मदा मातेच्या काठावर साधूंना जमीन विकताना कधी त्यांना फसवू नकोस . नाहीतर नर्मदा मैया तुला माफ करणार नाही . तू जरी तिला आई मानत नसलास तरी ती तुला मुलगा मानते हे लक्षात असू दे . त्याने मला तसे वचन दिले . आणि मी पुढे आलो . डॉक्टर चंद्रमौळी स्वामींना या भागामध्ये मौली स्वामी म्हणायचे . मौली स्वामींचा एक आश्रम वाटेमध्ये लागला . इथे काही उत्तर वाहिनी परिक्रमावासी थांबलेले होते . एक मोठी परिक्रमा करणारा परिक्रमा वासी सेवेसाठी राहिला होता . उत्तर वाहिनी परिक्रमेतील मोठ्या संख्येमुळे याच्यावर अतिरिक्त ताण येत होता . त्याने मला देखील काही दिवस थांबण्याची विनंती केली . मी नम्रपणे त्याला नकार दिला . असाच नम्र नकार देता न आल्यामुळे त्याच्यावर ही सेवा करण्याची पाळी आली होती ! मला उत्तरवाहिनी परिक्रमा करणाऱ्या लोकांची मोठी गंमतच वाटत होती . एक छोटासा टप्पा चालल्यावर त्यातील बरेच जण थकून या आश्रमात थांबले होते ! फार फार तर एखाद दोन किलोमीटर चालणे झाले असेल . काही लोक जे रामपुऱ्यावरून आले होते त्यांचे देखील निम्मे अंतर फक्त चालून झाले होते जे दहा ते बारा किलोमीटर होते .
डॉक्टर चंद्रमौळी स्वामी चालवत असलेला परिक्रमा मार्गावरचा हाच तो आश्रम
 मला माझा परिक्रमेचा पहिला दिवस आठवला .जबलपूर रेल्वे स्थानक ते ग्वारीघाट हे आठ किलोमीटरच्या आसपास असणारे अंतर मला फार वाटले होते ! तशीच काहीशी अवस्था या सर्वांची होती . मी मोठी परिक्रमा करतो आहे हे कोणाच्या लक्षात येण्याच्या आत मी चहा पिऊन तिथून पोबारा केला . सर्वत्र उत्तर वाहिनी परिक्रमावाशांनी टाकलेला कचरा दिसत होता . स्वयंसेवक नव्हते असे नाही परंतु त्यांची संख्या फारच तोकडी पडत होती . सेवा देणाऱ्या माणसांना अक्षरशः मान वर करायला उसंत मिळत नव्हती . 
हजारो लाखो माणसे चालत गेल्यामुळे वाटा मळल्या होत्या . परंतु त्यांनी टाकलेल्या चहाचे कप , बिस्किटाच्या पुड्यांचे रॅपर , प्लास्टिकच्या पिशव्या ,प्लास्टिकच्या वस्तू , चमचे , थर्माकोलच्या पत्रावळी  आणि अन्य कचऱ्यामुळे परिक्रमा मार्ग अधिक जास्त व्यापला होता .हे दृश्य भयंकर वेदनादायक होते . विशेषतः काठाकाठाने चालत इथवर येताना अन्य बरेच किनारे पाहिलेले असल्यामुळे इथल्या किनाऱ्याची विदारक अवस्था चटकन जाणवली . कदाचित केवळ हाच किनारा बघणाऱ्या उत्तर वाहिनी परिक्रमा वासींना वाटू शकते की नर्मदा मातेचा किनारा हा असाच असतो . हा लेख वाचणाऱ्या आणि उत्तर वाहिनी परिक्रमा करू इच्छिणाऱ्या किंवा करून आलेल्या सर्वांना माझे एक विनम्र आवाहन आहे . आपण नर्मदा मातेला काही देऊ शकत नाही . तिच्याकडून फक्त घेऊ शकतो . असे असताना निदान तिला प्लास्टिकचा कचरा तरी देऊ नये . सोबत एक पिशवी बाळगावी ज्यामध्ये आपला व आपल्या सोबतच्या लोकांचा सर्व कचरा गोळा करावा . व नंतर गावात गेल्यावर त्याची विल्हेवाट लावावी . परंतु पाण्याच्या बाटल्या ,चहाचे कप , बालभोग घेण्याच्या पत्रावळी , उदबत्तीचे पुडे वगैरे तिथेच टाकून देऊ नयेत . ह्याने आपण नर्मदा मातेच्या असीम सौंदर्यामध्ये तर बाधा आणतोच आहोत परंतु निसर्गाचे देखील अनन्वित नुकसान करतो आहोत . आपण टाकलेला कचरा वाऱ्याने उडून नर्मदा मातेच्या प्रवाहात जातो . जलचर कळत नकळत तो खायचा प्रयत्न करतात . बरेचदा तो पाण्याच्या नैसर्गिक झऱ्यांमध्ये जाऊन शिरतो आणि झरे कायमचे बुजवून टाकतो . हजारो वर्ष प्लास्टिकला काहीच होत नाही . ते आहे तसे राहते . परिक्रमा करून आणण्याची हौस असलेले काही लोक असतात . अशा सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या समूहाला आधीच समज द्यावी की प्लास्टिकचा एक कपटा देखील त्यांच्याकडून नर्मदे काठी पडला नाही पाहिजे . इतरांनी टाकलेला कचरा उचलायचे काम जर करता आले तर सोन्याहून पिवळे ! परंतु लोकांनी केलेला कचरा गोळा करणे हा या समस्येवरचा उपाय नसून लोकांना कचरा न टाकण्यासाठी प्रवृत्त करणे हा खरा शाश्वत उपाय आहे . त्यासाठी आपण आपल्यापासून सुरुवात करावी . आज मी आपल्याला अभिमानाने सांगू शकतो की माझ्या संपूर्ण नर्मदा परिक्रमेदरम्यान माझ्याकडून प्लास्टिकचा एक कण देखील नर्मदेच्या काठावर पडलेला नाही ! आणि याचा मला अत्यंत अभिमान आहे .  असो .
पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातर्फे चालविल्या जाणाऱ्या योगेश्वर कृषी या उपक्रमाचे दर्शन वाटेत अनेक ठिकाणी होत होते . गुजरात मध्ये हा संपर्क अधिक प्रमाणात पसरलेला दिसतो . याही गावात योगेश्वर कृषी होती .
हा गुजरात मधील नर्मदा जिल्हा होता . 
पुढे मणीनागेश्वर तीर्थ लागले . हे नर्मदा पुराणात उल्लेख केलेले तीर्थ आहे . 
मणीनागेश्वर तीर्थाकडे जाणारा रस्ता
इथे एक वयस्कर साधू सेवा देत होते . मंदिर खूप सुंदर आहे . आश्रमामध्ये विविध मूर्ती कारंजी वगैरे लावून  तो सजवण्यात आलेला आहे . 
मणीनागेश्वराचे मंदिर
श्री मणीनागेश्वर महादेव
आश्रम परिसरातील आकर्षक मूर्ती आणि सजावट
या आश्रमातले स्वामीजी दिवस रात्र उत्तरवाहिनी परिक्रमा वासींची सेवा करून थकलेले दिसत होते .तरी देखील त्यांनी  " संपूर्ण परिक्रमा वासी " आला म्हणून आनंद व्यक्त केला . हा शब्द त्यांनीच वापरला आहे म्हणून मी देखील वापरतोय . कुणी कृपया वाईट वाटून घेऊ नये किंवा राग देखील मानू नये परंतु उत्तर वाहिनी परिक्रमेचा हेतू इतकाच आहे की ज्यामुळे तुम्हाला नर्मदा परिक्रमेची एक झलक मिळावी . किंबहुना नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा तुमच्यामध्ये उत्पन्न व्हावी . केवळ एक किंवा अनेक उत्तरवाहिनी परिक्रमा झाल्या म्हणजे आपली नर्मदा परिक्रमा झाली असा भ्रम कोणीही कृपया मनामध्ये बाळगू नये . संपूर्ण उत्तर वाहिनी परिक्रमा संपूर्ण नर्मदा परिक्रमेच्या एक टक्का सुद्धा नाही हे कायम ध्यानात ठेवावे . उत्तर वाहिनी परिक्रमा करताना आपले वर्तन देखील संपूर्ण परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासी सारखेच विनम्र आणि भावपूर्ण असावे . संपूर्ण परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासीचा अहंकार नर्मदा मातेने पुरता ठेचून टाकलेला असतो . ती संधी तिला उत्तरवाहिनी परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध होईलच याची खात्री नाही ! त्यामुळे उत्तर वाहिनी परिक्रमा करताना आपला अंहंकार थोडा अधिक जागृत असतो आणि अंगातली रग थोडी अधिक शिल्लक असते . त्यामुळे आपणच तिला ती संधी देऊ नये हे उत्तम !  उत्तर वाहिनी परिक्रमा अवश्य करावी . परंतु तिची तुलना संपूर्ण नर्मदा परिक्रमेशी करू नये . ताटामध्ये चटणीचे किंवा लोणच्याचे जे स्थान असते तेच नर्मदा खंडामध्ये उत्तरवाहिनी परिक्रमेचे आहे . केवळ लोणचे खाऊन किंवा केवळ चटणी खाऊन जसे कोणाचे पोट भरत नाही , त्यासाठी संपूर्ण जेवण करावे लागते तसेच हे आहे . व्यावसायिक बुद्धी असलेले लोक खूप हुशार असतात . ते समोरच्या माणसाचे गुणदोष आधी अभ्यासतात . उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेचे व्यावसायिकीकरण करणाऱ्या लोकांनी हे हेरले आहे की लोकांकडे स्वतःला देण्यासाठी पुरेसा वेळ नाही . त्यामुळेच एका दिवसामध्ये संपूर्ण नर्मदा परिक्रमेचे पुण्य मिळवा वगैरे जाहिराती करून त्यांनी या परिक्रमेला प्रतिष्ठा मिळवून दिली . आणि मी हे ऐकीव माहितीवरून सांगत नसून हा माझा स्वानुभव मी आपल्याला सांगतो आहे . मागे जेव्हा मी अद्वितीयानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जलसमाधी करता रामपुरा या गावामध्ये गेलेलो होतो तेव्हा मला नर्मदा परिक्रमा या विषयाबद्दल काहीही माहिती नव्हते . आणि त्याचवेळी तिथे असलेले नावाडी लोक मला सांगत होते की उत्तर वाहिनी परिक्रमा केली की संपूर्ण परिक्रमा केल्याचे फळ मिळत असते . त्यामुळे तेवढे केले तरी पुरेसे आहे . ही अतिशय चुकीची , अज्ञानमूलक , घातक आणि फसवी माहिती आहे . म्हणजे उत्तर वाहिनी परिक्रमेचे काही फळच नाही का ? तर तसे नाही .उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा केल्याचे एक वेगळे फळ निश्चितपणे आपल्याला प्राप्त होते .परंतु संपूर्ण नर्मदा परिक्रमेचे फळ आणि हे फळ एकच आहे असे सांगणे हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि धादांत असत्य आहे . नावाडी लोकांचा व्यवसायिक स्वार्थ त्यामागे आहे . प्रत्येक परिक्रमावासी मागे त्यांना २० - २० रुपये मिळतात . आश्रमांना देणग्या मिळतात . दुकानदारांना ग्राहक मिळतात . परिवहन व्यवसाय करणाऱ्या लोकांना गिऱ्हाईके मिळतात . पुजार्यांना यजमान मिळतात . आणि ग्रामस्थांना भरपूर सारा कचरा मिळतो ! या उत्तरवाहिनी परिक्रमेचा उपद्रव यावर्षी इतका वाढला होता की ग्रामस्थांनी काही दिवस ही परिक्रमा चक्क बंद करून टाकली होती ! त्यामुळे या काळात परिक्रमेला गेलेल्या लोकांना वाहनाने परिक्रमा करावी लागली . आपण उत्तर वाहिनी परिक्रमेच्या रूपाने एक आदर्श का उभा करू शकत नाही ? त्या परिक्रमा मार्गावरती सुंदर असे बागबगीचे उभे करणे असो किंवा झाडे लावणे असो असे काहीतरी सकारात्मक कार्य आपण का उभे करू शकत नाही ? तिथे मोठ्या प्रमाणात मगरी राहतात हे सर्वांना माहिती आहे . परंतु उत्तर वाहिनी परिक्रमेचा जनरेटा असाच सुरू राहिला तर हळूहळू इथल्या मगरी स्थलांतरित होणार हे निश्चित आहे . त्यामुळे आपण जर उत्तर वाहिनी परिक्रमा करू इच्छित असाल तर एक क्षणभर थांबावे आणि थोडेसे अधिक धैर्य एकवटल्यावर चक्क संपूर्ण नर्मदा परिक्रमा करावी असे मी आपल्याला सुचवेन ! ज्याप्रमाणे गिरनार परिक्रमेतील पूर्वीचा आनंद आता लाखोंच्या संख्येमुळे हरपला आहे ,ज्याप्रमाणे वारीमध्ये आता होणाऱ्या प्रचंड भाऊ गर्दीमुळे वारीचे  शेकडो वर्षांपूर्वीचे पावित्र्य कमी होत चालले आहे तसेच काहीसे या उपक्रमाचे देखील झालेले आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते . मला माहिती आहे की माझे हे लिखाण सर्वांना रुचणारे नाही . परंतु तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे 
सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियले नाही बहुमता ॥ हाच माझा बाणा सदैव राहिलेला आहे .त्यामुळे कोणाला काय वाटेल याचा विचार करून मी लिहिणार नाही . जे मी पाहिले , जे मी अनुभवले , जे मला दिसले , जे मला कळले ,जे मला स्फुरले , जे मला जाणवले ,जे मला आवडले ,जे मला बोचले , जे मला नर्मदा मातेने सुचविले तेच सर्व लिहितो आहे .  असो . 
वरील विवेचन वाचून एक जरी व्यक्ती विचारप्रवण होऊन कृतिशील होईल तरी या लेखन प्रपंचाचे सार्थक झाले असे मानावयास हरकत नाही .
नर्मदे हर ! 

टिप्पण्या

  1. नर्मदे हर,
    आपल्याला लेखात उत्तरवाहिनी नर्मदा हा संदर्भ आला म्हणून सांगावेसे वाटते. नेमावर पासून खाली, जोगा का किला, किटी घाट, चापडा घाट,
    त्याखालील मझधारा ते खाली लक्कड कोट चे पूर्ण जंगल हे सर्व आता पुनासा ड्याम किंवा इंदिरा सादर डॅम यामध्ये डूब क्षेत्र म्हणून झाले आहे. या ठिकाणी नर्मदाय उत्तर दक्षिण वाहिनी म्हणून प्रचलित होती व म्हणून त्याला गंगासदृश्य म्हटले जायचे. या ठिकाणाला नर्मदा तीन किलोमीटर अंतरामध्ये सात पाटातन वाहत होती. अत्यंत सुंदर असा हा प्रदेश होता आता इथे तुडुंब प्रचंड असा पाणसाठा दिसतो.
    सदानंद काळे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सविस्तर माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद ! असे अनेक महत्त्वाचे घाट आणि मंदिरे जलमग्न झालेली आहेत ! किंबहुना केलेली आहेत . . .

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर