लेखांक १२२ : गरवाड्याचा देव गंभीर आश्रम, चुडेश्वर ची हनुमान जयंती

कुबेर भंडारी सोडल्यावर मी जो काही मार्ग किनाऱ्याने चाललो तो अत्यंत अविस्मरणीय असा होता. डाव्या हाताला उभी भिंत आणि उजव्या हाताला खोल असे मैयाचे पात्र आणि तरी देखील पायाखाली एक पाऊल ठेवायला जागा मिळते आहे ,हे सारेच मुळात अकल्पनीय होते! झपाझप पावले टाकत हळूहळू डाव्या बाजूला वळलेल्या मैयाच्या काठाने चालत राहिलो. जेव्हा मैया उजवीकडे वळते तेव्हा आपल्याला अधिक अंतर चालावे लागते. जेव्हा ती डावीकडे वळते तेव्हा अतिशय कमी अंतर चालून सुद्धा तुम्ही बरीच गावे ओलांडत पुढे येता. काल केवळ पाच-सहा किलोमीटर अंतर चाललेलो असल्यामुळे आता भरपूर चालायचे असे मी ठरवले. आणि अक्षरशः पायाला भिंगरी लागल्यासारखा सुटलो! माझे मलाच माझ्या वेगाचे कौतुक वाटू लागले! पुढे कुठले गाव आहे याची फारशी चौकशी मी करत नसे. म्हणजे आता लगेच कुठले गाव आहे ते विचारायचो परंतु दोन-तीन दिवस पुढे कुठली कुठली गावे लागतात याचा अंदाज मी अजिबात घेत नव्हतो. माझ्या हातात असलेल्या पुस्तकामध्ये देखील मी पुढे काय आहे ते पाहायची उत्सुकता कधी फारशी दाखवली नाही . याच्यामागे एक कारण होते .आणि ते असे होते की मला पक्के लक्षात आले होते की नर्मदा मातेच्या काठावर आपले नियोजन चालत नाही .त्यामुळे ती जसे नेईल तसे जायचे. ती जिथे नेईल तिथे पोहोचायचे .ती जसे ठेवेल तसे राहायचे .आणि ती जे काही देईल ते ग्रहण करायचे. इतका सोपा कार्यक्रम नर्मदा परिक्रमेमध्ये शिल्लक राहिलेला होता. मला अशी भीती वाटायची की उगाचच आपण एखाद्या गावी जायचे नियोजन करावे आणि नर्मदा मातेला ते न आवडावे असे होऊ नये. त्यामुळे तिची जी कृपा होते आहे त्या कृपेचा अखंडित प्रवाह खंडित होऊ नये म्हणून मी स्वतःचे नियोजन करणे जे बंद करून टाकले ते कायमचेच! इथला किनारा खूपच सुंदर होता. नर्मदा मातेचे अतिशय स्वच्छ जल शेजारून वाहत होते. इतके स्वच्छ जल फार कमी ठिकाणी आढळते.त्याला एक कारण आहे. इथून सरदार सरोवर धरण जवळ होते.त्या धरणामध्ये जेव्हा पाणी साठते तेव्हा त्यातील गाळ माती असलेला अंश, प्रवाहाला स्थिरता आल्यामुळे खाली बसतो आणि केवळ शुद्ध जल तेवढे सांडव्यावरून पुढे वाहत जाते. तेच हे पाणी होते! त्यामुळे अतिशय निवळ शंख होते! निवळ शंख पाणी म्हणजे इतके शांत पाणी की तळाशी पडलेले शंख शिंपले सुद्धा दिसावेत! आता वाळूचा एक अप्रतिम किनारा लागला! पूर्णपणे निर्मनुष्य! एकही मनुष्य प्राणी दिसत नव्हता! पाणपक्षी, टिटव्या हे तर नर्मदा मातेच्या काठावर पदोपदी भेटतात ,तसे इथेही होते. काठाने चालताना एखादा छोटासा घाट लागला की लक्षात यायचे की इथे जवळपास कुठले तरी गाव आहे. तसा एक घाट लागला. म्हणजे हा घाट बांधलेला नसतो परंतु लोकांची ये जा असल्यामुळे तिथे झाडे वगैरे उगवलेली नसतात आणि जनावरांच्या पाऊलखुणा वगैरे मातेकडे जाताना दिसतात. अशाच एका घाटाच्या पुढे एक केवट नावेतून उतरत होता. त्याने मला थांबवले आणि चौकशी करू लागला. कुठून आलो ,कुठे जाणार , वगैरे शक्यतो लोक तुम्हाला विचारतात. तुमचे मूळ गाव कुठले आहे हे देखील जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मी पुण्याचा आहे असे म्हटल्याबरोबर त्याने मला सांगितले की आमच्या गावात जो आश्रम आहे तिथे पुण्यातल्या एका संतांचे भक्त राहतात! मला आश्चर्य वाटले! पुणे तिथे काय उणे असे म्हणतात ती बाब संतांना देखील लागू आहे! पुण्याचे असे म्हणता येतील असे बरेच संत होऊन गेले! अगदी ज्ञानेश्वरमाऊली, निवृत्तीनाथ महाराज,सोपानदेव, मुक्ताबाई ,तुकाराम महाराज , मोरया गोसावी यांच्यापासून ते थेट अलीकडच्या काळातील रामानंद बिडकर महाराज ,मामासाहेब देशपांडे ,अण्णासाहेब पटवर्धन महाराज , वरदानंद भारती महाराज,धनकवडीचे शंकर महाराज,नव्या पेठेतले यशवंतराव देव मामलेदार,वसंत हरी करमरकर काका, वासुदेव देशपांडे काका, गुळवणी महाराज, दत्त महाराज कवीश्वर, काकासाहेब ढेकणे महाराज,जोशी काका, जंगली महाराज, बाबा महाराज सहस्रबुद्धे, ओशो, योगाचार्य बीकेएस अय्यंगार गुरुजी, दिगंबर दास महाराज, धुंडिराज महाराज जोशी,सयाजीनाथ माळी महाराज, साधू वासवानी, अवतार मेहेर बाबा, साखरे महाराज, आळंदीचे डॉक्टर काका, जोग महाराज, सोनोपंत दांडेकर , लोकमान्य टिळक ,आचार्य गोविंददेवगिरी महाराज , डॉक्टर धनेश्वर , दिघे मावशी, ज्ञाननाथ रानडे गुरुजी,मिलिंद मोघे गुरुजी, कात्रजचे माधव महाराज कुलकर्णी काका, स्वामी माधवनाथ, स्वामी मकरंदनाथ,  स्वामी माधवानंद, हरिभाऊ क्षीरसागर महाराज, डॉक्टर यशोधन परांजपे, संजीवनी चिकित्सा पद्धतीचे जनक संविदानंद सरस्वती अशा अनेक संतांचा कृपाशीर्वाद या भूमीला लाभलेला आहे व लाभतो आहे. ही माझ्या अल्पमतीला माहिती असलेली काही नावे आहेत.याच्याहून किती तरी जास्त संत या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत! ही भूमी संतांची आणि योध्यांची राहिलेली आहे! छत्रपती संभाजी महाराज, नानासाहेब पेशवे, महादजी शिंदे , चिमाजी आप्पा, लहुजी वस्ताद साळवे यांच्यासारख्या अनेक महावीरांनी याच भूमीमध्ये समाधी घेतलेली आहे. 

आता हे महाराज नक्की कुठल्या संतांचे भक्त आहेत ही उत्सुकता मला लागली आणि म्हणून मी आश्रमामध्ये गेलो.  आश्रम काठावरतीच होता आणि तिथे मोठा पंडाल किंवा मांडव टाकलेला होता. भागवत कथा सुरू होती. गेल्या गेल्या आश्रमातील सेवकांनी मला आदरपूर्वक आत मध्ये नेऊन बसवले. कथेतून मध्येच उठून जाऊ नये असे म्हणतात. त्याने तुम्हाला कथेचा होणारा लाभ मिळायचा बंद तर होतोच परंतु कथा श्रवणासाठी बसलेल्या बाकीच्या श्रोत्यांना देखील त्यामुळे लक्ष विचलित व्हायला होते आणि त्यांचे तसेच कथा वाचकांचे देखील लक्ष विचलित होऊन एकंदरीतच कथेचे आणि कथेच्या हेतूचे नुकसान होते. त्यामुळे मी असे ठरवले की आता काही काळ कथा ऐकत शांतपणे बसावे. हे वरवाडा, बरबाडा किंवा गरवाडा अशी तीनही नावे असलेले गुजरात मधील एक गाव  होते. गजानंद महाराज नावाचे एक साधू हा आश्रम चालवत होते. महाराजांची प्रकृती नावाप्रमाणे गणपती सारखी होती! गोल गरगरीत ढेरी, डोळ्यावर चष्मा आणि हसरा चेहरा! “खावानु , पिवानू मजामा रहावानु “ अशी वृत्ती! महाराजांनी मला प्रेमळ शब्दांमध्ये तंबीच दिली , की आता इथून पुढे जायचे नाही! आज इथेच मुक्काम करायचा! मी त्यांना म्हणालो की अजून थोडेफार चालता आले असते. परंतु त्यांनी सांगितले चालणार नाही इथेच राहायचे. मी पुण्याचा आहे समजल्यावर त्यांनी मला सांगितले की आता तर नक्कीच थांबा!  कारण तुमच्या पुण्याचे काही परिक्रमावासी इथे येऊन उतरलेले आहेत बरेच दिवस! 

या गरवाड्याच्या आश्रमामध्ये सतत काही ना काही कार्यक्रम सुरू असतात. अशाच एका प्रसंगी  सजविण्यात आलेल्या यज्ञ कुंडाचे चित्र



हे आहेत गजानंद बाबा. गजानन या शब्दाचा उच्चार गजानंद अशी करण्याची पद्धत गुजरात मध्ये दिसते.


हा वरवाडा किंवा गरवाडा येथील छोटासा आश्रम आहे. आश्रम छोटासा असला तरी कार्यक्रम मोठे मोठे आयोजित केले जातात आणि लोकांचा सतत राबता येथे असतो

आश्रमाच्या समोरच नर्मदा मैय्याचे सुंदर असे पात्र वाहताना दिसते


आश्रमाच्या बाहेर बसण्यासाठी नानाविध प्रकारची सुखासने ठेवण्यात आलेली आहेत!


आपण दक्षिण तटावर जे नानी पनोती मोठी पनोती मंदिर पाहिले त्याच्या बरोबर समोर गरवाड्याचा देव गंभीर आश्रम आहे. गंभीर हा शब्द फक्त या आश्रमाच्या नावात आहे बाकी आश्रमातील वातावरणामध्ये या शब्दाचा कुठे लवलेश सुद्धा नाही!

कथा संपल्यावर मी आत मध्ये जाऊन नक्की पुण्याचे कुठले महाराज आहेत ज्यांना हे बाबा मानतात ते पाहायला गेलो! पाहतो तर काय समोर शंकर महाराजांचा फोटो ,  अक्कलकोट स्वामींचा फोटो आणि तिथेच शेजारी कुंटे महाराजांचा सुद्धा फोटो होता! परिक्रमेमध्ये पहिल्यांदाच जगन्नाथ कुंटे अर्थात श्री अवधूतानंद स्वामी महाराजांचा फोटो पाहिला! आसन लावले तिथे एक मुलगी शंकर महाराजांच्या मूर्तीची पूजा करताना दिसली! पुण्यामध्ये अनेक वर्षापासून प्रसिद्ध असलेले कावरे कोल्ड्रिंक किंवा कावरे आईस्क्रीम वाले जे आप्पासाहेब कावरे म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांची कन्या काश्मीरा कावरे येथे काही दिवसांपासून सेवेसाठी येऊन राहिलेली होती. ही काश्मीराच पांढरे शुभ्र कपडे घालून पूजेला बसलेली होती! तिची पूजा झाल्यावर तिच्याशी बोललो. आप्पासाहेब कावरे यांचा आणि माझा पूर्वीपासून परिचय आहे त्यामुळे त्यांचीच कन्या आहेत हे कळल्यावर मला बरे वाटले. आप्पासाहेब कावरे हे एक अजब रसायन आहे ! ज्यांना त्यांना भेटायचे असेल ते कर्वे रस्त्यावर जे तीन पेट्रोल पंप जवळ जवळ आहेत पहा,  तिथे असलेल्या कावरे कोल्ड्रिंक दुकानांमध्ये जाऊन त्यांची भेट घेऊ शकतात. अतिशय दिलखुलास स्वभावाचा मनुष्य असून त्यांना साधुसंतांच्या दर्शनाची आणि भेटीची मोठी आवड आहे . तसेच त्यांना गूढ विद्यांमध्ये मोठी रुची आणि गती देखील आहे. त्यांना भेटायला गेल्यावर तुम्ही किमान एक तास बसल्याशिवाय बाहेर पडत नाही! 

कर्वे रस्त्यावरील आपल्या दुकानाबाहेर सडा घालताना आप्पासाहेब कावरे


रेवाभक्त काश्मीरा आप्पासाहेब कावरे 
काश्मीरा सोबत अजून एक परिक्रमावासी होते जे अप्पा साहेबांचे मित्रच होते . पुण्यामध्ये गणपतीचे भव्य दिव्य देखावे करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राजाराम महाराज मंडळ म्हणून आहे सदाशिव पेठ मध्ये त्याचे कार्यकर्ते असलेले प्रसाद निगुट हे काश्मिरा सोबत आलेले होते. पक्का सदाशिव पेठी मनुष्य होता! सदाशिव पेठी पुणेकर ओळखायची महत्त्वाची खूण तुम्हाला सांगून ठेवतो!तो तुम्हाला पत्ता कधी पूर्ण सांगणार नाही. आकड्यांमध्ये पत्ता सांगतो. प्रसादनी देखील मला  ८८१, सदाशिव पेठ असा पत्ता सांगितला! माझे आयुष्य पाचशे तीस सदाशिव पेठ आणि ३९२ नवी सदाशिव पेठ येथे गेलेले असल्यामुळे आमची लगेच गट्टी जमली!

आश्रमामध्ये अमरकंटकचा आदिवासी बाबा आणि धुळ्याचे गरुड काका हे परिक्रमावासी देखील मुक्कामासाठी आले.प्रसाद मनुष्य खरे म्हणजे परिक्रमा करण्यासाठी आला नव्हता तर त्याला काश्मीरा हिचे मतपरिवर्तन करून तिला घरी आणण्याची कामगिरी सोपवण्यात आली होती असे माझ्या लक्षात आले! काश्मीरा ही अतिशय खंबीर मुलगी! स्वतंत्र बाणा! बोलायला कदाचित कोणाला थोडीशी फटकळ वाटेल अशी .परंतु तेच तिचे मोठे हत्यार होते!तिच्या रोखठोक स्वभावामुळे सहजासहजी कोणी तिच्या जवळ जाऊ शकत नसे. वृत्तीने पूर्ण आध्यात्मिक होती.  संसाराचा कंटाळा आलेली व्यक्ती अध्यात्माकडे लवकर वळते. तसेच काहीतरी हिचे झाल्याचे मला जाणवत होते. तिच्याकडे शंकर महाराजांची खूप सुंदर मूर्ती होती. ती परिक्रमेमध्ये नव्हती परंतु परिक्रमा वासींच्या सेवेसाठी थांबली आहे असे तिने  मला सांगितले. परंतु नंतर लवकरच तिने परिक्रमा उचलली असे मला लक्षात आले कारण, मध्यंतरी एक चार वर्षाची मुलगी रासेश्वरी रमेश जाधव ही आपल्या आई अर्चना गिरी आणि तिच्या गुरुबंधूंसोबत परिक्रमेला निघाली आहे अशी बातमी सर्वत्र दाखवली जात होती. त्या समूहासोबत काश्मिरा चालत आहेत असे मला काही व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात आले.


वयाच्या केवळ चौथ्या वर्षी पायी परिक्रमा पूर्ण करणारी रासेश्वरी ! हिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!

गजानंद बाबांना आश्रमामध्ये पूर्णवेळ सेविका मिळाल्यामुळे आनंद झालेला होता आणि प्रसाद दादाची तगमग चालली होती की हिला या आश्रमातून बाहेर काढावे आणि पुण्याला घरी नेऊन हजर करावे! ती सर्व खदखद त्याने माझ्याकडे बोलून दाखवली. मी काश्मीराशी बोलावे आणि तिचे मतपरिवर्तन करावे असा तगादा त्याने लावला.असे काही करण्याचा नैतिक अधिकार मला नव्हता कारण काश्मीरा ही काही लहान मुलगी नव्हती. जाणत्या वयात तिने स्वखुशीने हा निर्णय घेतलेला होता. बऱ्या वाईटा ची समज तिला चांगली होती. तरीदेखील प्रसाद दादा फार मागे लागल्यामुळे मी तिच्याशी एकदा बोललो की नक्की तिच्या घराबाहेर पडण्याचा हेतू काय आहे. तिने दिलेले स्पष्टीकरण मला समाधानकारक वाटले. एक व्यक्ती म्हणून स्वतःचा शोध घेण्याची तीव्र ओढ निर्माण झाल्यामुळे तिने हा निर्णय घेतलेला होता. गंमत म्हणजे आप्पासाहेब कावरे यांना सुद्धा मी ओळखतो आणि त्यांचा स्वभाव सुद्धा बिनधास्त असल्यामुळे त्यांना देखील फारसा त्रास असण्याचे कारण नव्हते. परंतु प्रसाद दादाच स्वभावाचा हळवा असल्यामुळे, त्याने जीव काढला होता! अखेरीस आश्रमात सुरू झालेल्या भजनाने माझी सुटका केली! या भागातील भजन अतिशय वेगळे असते! एक रुपया ,दोन रुपयापासून,पाच रुपये, दहा रुपये ,वीस रुपये ,पन्नास रुपये, शंभर रुपये अशा नोटांची अक्षरशः बंडलेच्या बंडले आणून भजन गाणाऱ्या गायकांवर उधळली जातात! वादक चांगला वाजवत असेल तर त्याच्यावर सुद्धा पैशांची उधळण केली जाते! गायक वादक यांच्या समूहातील एक मनुष्य ते पैसे गोळा करायचे काम अविरतपणे करत असतो. या चमूचा व्यवस्थापक असलेला मनुष्य तुम्हाला उधळण्यासाठी सुट्या नोटा देतो त्याला तुम्ही बंदे पैसे द्यायचे असतात! हा असला प्रकार अध्यात्मिक क्षेत्रामध्ये मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो! डान्स बार मध्ये वगैरे बारबालांवर लोक पैसे उधळताना टीव्हीवर पाहिलेले होते. परंतु परमेश्वराची भक्ती दृढ करणाऱ्या भजन गाणाऱ्या गायकांवर असे पैसे उधळताना पाहून थोडेसे वाईट वाटले .कारण शेवटी काहीही झाले तरी लक्ष्मीला आपण एक देवता असे मानून पूजतो. तिची अशी उधळण करणे आणि तिला पायदळी पाडणे, तुडवणे हे मनाला पटणारे खचितच नव्हते. स्वतः गजानंद महाराज सर्वात जास्त पैसे उधळत होते! मुख्य मनुष्य जे करतो ते करताना खालच्या लोकांना फारशी भीती वाटत नाही तसेच काहीसे इथे झाले होते! गंमत म्हणजे चांगल्या घरातील स्त्रिया महिला व तरुण मुली सुद्धा येऊन पैसे उधळून जात होत्या! जितका अधिक पैसा उधळला जाईल तितका गाणाऱ्या गायकांना जोश चढत होता आणि ते भजनाचा आनंद अजून वाढवत होते! भजनाचे मूळ हे केवळ आणि केवळ परमेश्वराची भक्ती, अनन्य भक्ती ,निर्विकार भक्ती हेच असले पाहिजे असे माझे ठाम मत आहे.बरे मला  हा प्रकार पाहण्यासाठी बसविण्यात आले होते. परंतु ते फारसे सहन न झाल्यामुळे मी तिथून उठलो आणि खोलीकडे चालू लागलो. इतक्यात मला प्रसाद दादाने पकडले! रात्री तीन वाजेपर्यंत तो माझे डोके खात राहिला की तू काही पण कर आणि काश्मिराला पुण्याला घरी परत जायची बुद्धी दे ! मी त्याला सांगितले की अरे बाबा ती आता नर्मदा मातेच्या ताब्यात आहे. तिथे मी काही ढवळाढवळ करू शकत नाही! परंतु हा गडी ऐकायलाच तयार होईना!मला इतकी भयंकर झोप आली होती की बोलताना सुद्धा मी डोळे मिटत होतो. आणि हा मात्र नर्मदा मातेच्या काठावर एका अंधाऱ्या दगडावर बसून माझे डोके खात बसला होता! शेवटी न रहावून मी तिथेच दगडावर आडवा पडलो आणि झोपलो . मग मात्र त्यानी मला जागे केले आणि खोलीमध्ये आम्ही झोपायला गेलो. इथे नर्मदा मातेने मला एक छोटासा चमत्कार दाखवला! दोन दिवसांपूर्वी कहोना इथल्या मारुती मंदिरामध्ये असलेल्या एका परिक्रमावासीकडे मी नर्मदा मातेची सुंदर अशी प्रतिमा पाहिली होती आणि तशी प्रतिमा आपल्याला मिळाली तर किती बरे होईल असे मला वाटले होते! गंमत म्हणजे प्रसाद ने “आता मी निराश झालो आहे, आणि पुण्याला परत चाललो आहे” असे सांगून मला त्याच्या जवळची छोटीशी घंटा ,निरंजन आणि नर्मदा मातेची हुबेहूब तशीच प्रतिमा देऊन टाकली आणि  सकाळी उठून निघून गेला! त्याच्या मनामध्ये स्वाभाविकपणे नाना शंका कुशंका येत होत्या. परंतु तसे काही काश्मिराच्या अनुभवाला येत नव्हते, याची खात्री मी तिच्याकडून करून घेतली आणि पुढे मार्गस्थ झालो. जाताना मी तिला सांगितले की तुला पूर्ण परिक्रमेमध्ये कुठेही काहीही अडचण आली तर मला अमुक अमुक क्रमांकावर संपर्क साध.कारण तेव्हा जरी माझ्याकडे फोन नसता तरी घरी गेल्यावर तो मी चालू करणार होतो अर्थात पुढे सहा महिने बंद पडल्यामुळे तो फोन देखील कंपनीने बंद करून टाकला आणि क्रमांक दुसराच एका माणसाला देऊन टाकला हा भाग निराळा! तो क्रमांक ज्या कुठल्या माणसाला मिळाला आहे त्याची मला फार दया येते ! कारण माझ्या त्या क्रमांकावर अति प्रचंड प्रमाणामध्ये फोन येत राहायचे! ते सर्व आता त्या व्यक्तीला उचलावे लागतात! माझी मैयाने सुटका केली! 

चालता चालता मी विचार करू लागलो की समजा माझी मुलगी किंवा मुलगा असता आणि तिने किंवा त्याने परिक्रमेसाठी अशी परवानगी मागितली असती तर मी दिली असती का ? उत्तर असे आहे की नक्कीच दिली असती ! नर्मदा परिक्रमा ही इतकी उदात्त गोष्ट आहे की ती करण्यापासून कोणाला रोखणे यासारखे मोठे पाप असू शकत नाही ! तुम्ही आयुष्यातील सर्वात उत्तम निर्णय कुठला घेऊ शकत असाल तर कोणाला तरी नर्मदा परिक्रमेला जाण्यासाठी परवानगी देणे हा तो निर्णय आहे ! अशी संधी आली तर कधीच दवडू नका ! आणि विशेषतः जी व्यक्ती तुमच्यावर अवलंबून आहे किंवा तुमची काळजी करत आहे अशा व्यक्तीला तर नक्कीच परिक्रमेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू नका ! एक साधे लाभाचे गणित सांगतो की तुम्ही ज्या व्यक्तीला नर्मदा परिक्रमा करण्यासाठी परवानगी देत आहात त्या व्यक्तीच्या परिक्रमेच्या पुण्याच्या थोडासा हिस्सा तुम्हाला सुद्धा निश्चित अर्थाने मिळणार आहे ! किमान हे लक्षात घेऊन तरी परिक्रमेसाठी अडकाठी करू नये अशी नम्र विनंती ! असो .
आश्रमामध्ये बालभोग घेतला आणि पुढे निघालो . मी एकदम मैय्याचा किनारा पकडून चालू लागलो . अतिशय निसर्ग संपन्न असा हा भाग होता . पाण्यामध्ये प्रचंड मगरी होत्या . चालता चालता बऱ्याच मगरींनी दर्शन दिले ! यातल्या एका मगरीचे दर्शन दर फारच चित्त थरारक होते ! चालता चालता एखादी सुंदर जागा दिसली आणि बसण्यासारखी परिस्थिती असेल तर मी तिथे काही क्षण बसून नर्मदा मातेचे डोळे भरून दर्शन घ्यायचो ! एकट्याने चालण्याचा हा मोठा फायदा असतो ! तुम्हाला हवे तसे तुम्ही थांबू शकता . तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही निघू शकता ! इथे नर्मदा मातेच्या काठावर काही खडक होते ज्यावर बसण्यासारखी परिस्थिती होती . मी शांतपणे त्यातल्या एका खडकावर बसून राहिलो . अतिशय सुंदर असा हा किनारा होता ! मैय्याला किंचित वळण होते . सर्वत्र निरव शांतता होती . एखाद्या टिटवीचा आवाज ती शांतता भंग करायचा . पाण्यामध्ये अचानक उसळी मारणारे मासे या शांततेला अधून मधून संगीत द्यायचे . वाऱ्याचा देखील आवाज नव्हता . इतकी स्तब्धता फार कमी वेळा निसर्गामध्ये आढळून येते . नर्मदा मातेचे पाणीदेखील वाहत होते परंतु त्याचा आवाज अजिबात येत नव्हता . अतिशय संथ गतीने पाण्याचा प्रवाह पुढे चालला होता .असे वाटत होते की याच दृश्यामध्ये कायमचे विलीन होऊन जावे ! अचानक मला पाण्यामध्ये काहीतरी हलते आहे असे वाटले . ती शांतता इतकी जबरदस्त होती की ती सूक्ष्म हालचाल सुद्धा माझ्या नजरेने लगेच टिपली . पाण्यातून एक दगड वर येतो आहे असा मला भास झाला . नीट पाहिल्यावर लक्षात आले की ते एका मगरीचे डोळे होते ! डोळे हळूहळू माझ्याच दिशेने येत आहेत असे माझ्या लक्षात आले ! डोळे आणि नाकाचे टोक असे वर आलेले होते ! बाकी सर्व देह पाण्यामध्ये होता . डोळे आणि नाकाच्या टोकामध्ये जेवढे अंतर होते ते पाहिल्यावर लक्षात आले की ही मगर खूपच मोठी असणार आहे ! गमतीचा भाग म्हणजे या मगरीने अजून मला पाहिलेलेच नव्हते ! ती तिचे खाणे पिणे आटोपून ऊन खाण्यासाठी किनाऱ्याकडे यायला निघाली होती ! हळूहळू तिच्या पाठीवरचे काटे दिसू लागले ! नंतर शेपटीची सुरेख सर्पिलाकृती हालचाल देखील दिसू लागली ! डोळ्याचे अक्षरशः पारणे फेडणारे दृश्य नर्मदा मैया मला दाखवत होती ! परिक्रमेमध्ये मगरी खूप पाहिल्या होत्या परंतु इतक्या जवळून कुठली मगर पाहिली नव्हती ! आता तर मला त्या मगरीच्या डोळ्यांचा रंग देखील लक्षात येईल की ती जवळ आली ! गमतीचा भाग म्हणजे मी निश्चल बसलेला असल्यामुळे तिला अजूनही मी तिथे बसलो आहे हे लक्षात आलेलेच नव्हते ! सुदैवाने मी दंड समोर ठेवून बसलेला असल्यामुळे तरी अचानक ती माझ्या अंगावर आली असती तरी मध्ये दंड उभा होता त्यामुळे मी सुरक्षित होतो . परंतु हे सर्व मी आता बोलतो आहे त्यावेळी मात्र केवळ आणि केवळ तिचे ते स्वर्गीय सौंदर्य मी पाहत बसलो होतो ! आणि निशब्द स्तब्ध होऊन तिचे अवलोकन करत होतो ! मगरी पाण्यामध्ये पोहतात तशाच जमिनीवर त्या चालतात ! अगदी चार पायांवर चालणाऱ्या प्राण्यांसारख्या चालतात ! हळूहळू मगर पाण्याच्या बाहेर आली आणि तिने चालायला सुरुवात केली ! बहुतेक मी ज्या दगडावर बसलो होतो तीच तिची ऊन खात पडण्याची नेहमीची जागा होती ! मगर पोटभर खाऊन आली होती आणि मला जणू काही असे वाटले की निवांत चालताना ती मनातल्या मनात गाणे गुणगुणत असावी इतकी ती बिनधास्त होती ! तिला आजूबाजूच्या परिस्थितीचे काहीही भान नव्हते आपल्याच मस्तीमध्ये मश्गुल होऊन ती मस्त चालत होते ! चालता चालता मगर पाण्याच्या पूर्णपणे बाहेर आली होती आणि तिची लांबी साधारण १५ फूट आहे असे माझ्या लक्षात आले ! एवढी मोठी मगर इतक्या जवळून आणि तीही मध्ये जाळी नसताना मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत होतो ! बरं नुसती पाहत नव्हतो तर प्रत्येक क्षणाला ती मगर हळूहळू माझ्या जवळ येताना मला दिसत होती ! इथे नर्मदा मातेचा काठ अतिशय उथळ असा आहे . त्यामुळे साधारण ५० -६० फुटापर्यंत चार-सहा इंच खोल पाणी असते .त्यातून ही बया चालत येत होती ! ती चालताना डावीकडे उजवीकडे हलणारी तिची मान आणि सापासारखे चालत असताना आडवे तिडवे पडणारे पाय पाहून मला खूपच मजा वाटू लागली ! तिने अक्षरशः मला अजूनही पाहिलेले नव्हते त्यामुळे ती बिनधास्त पुढे येत होती ! ती मध्येच थांबायची डावीकडे उजवीकडे बघायची आणि कोणी नाही ना याची खात्री करून पुन्हा माझ्या दिशेला चालू लागायची ! मला मौजच वाटली ! समोर अख्खा माणूस बसलेला तिला दिसत नव्हता आणि आजूबाजूला एखादा छोटा प्राणी नाही ना याचा अंदाज बिचारी घेत होती ! मगर या प्राण्याचा उल्लेख सरसकट स्त्रीलिंगी करण्याची पद्धत आपल्याकडे आहे म्हणून मी तिला वगैरे म्हणतो आहे . प्रत्यक्षामध्ये तो नर मगर असण्याची शक्यता अधिक होती कारण .इतके बिनधास्त नरच असतात . साधारण २२ २३ वर्षाचा तरुण मुलगा कसा बोटामध्ये किल्ली फिरवत घराकडे येत असतो आणि आजूबाजूला माझ्याकडे कोणी पाहते आहे का याचा अंदाज घेत असतो ,तशा स्वरूपाचे हिचे वर्तन मला वाटले ! असे करता करता ती मगर माझ्यापासून केवळ पाच फूट अंतरावर येऊन उभी राहिली ! तिला पाहताना माझे भान हरपले होते ! एका क्षणात मी शुद्धीवर आलो आणि माझ्या लक्षात आले ही आता मगरीने फक्त एक झेप मारली किती माझा घास करू शकते ! तिचा एकंदर आकार बघता मला संपूर्ण खाण्याची तिची क्षमता होती ! हा विचार मनात आल्याबरोबर मी मागे पळून जाण्याची जागा आहे का याचा अंदाज घेऊ लागलो ! मागे सगळे खडक होते त्यामुळे पळून जाता येणे शक्य नव्हते ! आता काय करावे असा विचार माझ्या मनात आल्याबरोबर शरीराच्या सूक्ष्म हालचाली सुरू झाल्या ! आणि त्या नेमक्या तिने टिपल्या ! एक क्षणभर ती पण स्तब्ध झाली आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली ! माझ्यापासून बरोबर पाच फूट अंतरावर ती मगर उभी होती आणि हळूहळू तिचा जबडा उघडू लागला ! तिचा श्वास वाढलेला मला पोटाच्या हालचालीवरून दिसू लागला ! तिला देखील लक्षात आले की आपण कळत-नकळत एका मनुष्य प्राण्याच्या फार जवळ आलेलो आहोत !  मी देखील उठून पळून जाण्याच्या तयारीला लागलेलोच होतो . परंतु दगडांमुळे मी पडण्याची मोठी शक्यता होती . काहीही झाले तरी इथून सटकायचे असा निश्चय मी मनोमन करत होतो !  इतका वेळ शांतपणे बसलेले माझे शरीर आता थरथर कापू लागले ! मगर देखील आता पुरेशी सावध झालेली होती ! मागे वळून बघण्यासाठी मी माझी मान किंचित हलवली आणि नेमकी तीच हालचाल टिपून मगरीने पाण्याचा प्रचंड आवाज करत जागेवर गिरकी घेतली ! ती चार इंच पाण्यामध्ये होती जेव्हा तिने गिरकी घेतली ! त्यामुळे तिच्या शेपटीच्या सपकाऱ्याने उडालेले पाणी माझ्या अंगावर पडले ! आणि क्षणाचाही विलंब न लावता की चित्त्याच्या चपळाईने पाण्यामध्ये घुसली ! मला उठून पळून जायला जेवढा वेळ लागला असता तेवढ्या वेळात ती दहा-पंधरा फूट खोल पात्रात शिरली पण होती ! मी खाडकन जागेवर उठून उभा राहिलो ! ते तिच्या डोळ्यांना लक्षात आल्यावर तर तिने तिची गती अजूनच वाढवली ! आणि क्षणात ती नर्मदा मातीच्या पात्रात गायब झाली ! मी त्या खडकावर उभा राहून त्या अद्भुत प्रसंगाकडे पाहत होतो ! नर्मदा मातेचे वाहन असलेल्या मगरीने इतके सुरेख दर्शन द्यावे हे किती भाग्याचे होते ! मला खात्री आहे की जर मी काठावर बसलेलो आहे हे तिच्या लक्षात आले असते तर ती माझ्या इतक्या जवळ आलीच नसती ! आणि ती जर उपाशी असती तर रिकामी परत गेली पण नसती ! निसर्गाकडून आपण हेच शिकायचे असते की गरज नसेल तेव्हा समोर मेजवानी वाढवून ठेवलेली असली तरी देखील त्याला प्राणी पक्षी सरीसृप स्पर्श करत नाहीत ! नर्मदा मातेची किती मोठी कृपा होती की तिने आज सकाळ सकाळी या मगरीला बालभोग दिलेला होता ! भरपूर मासे खाऊन टम्म पोट फुगलेली ही मगर होती ! ती जर चुकून माकून उपाशी राहिलेली असती तर मोठाच प्रसंग ओढावला असता ! परंतु इथे माझ्या एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे अशी की मगरी कधीही आपण होऊन माणसावर हल्ला करत नाहीत ! मनुष्यच त्यांच्या अधिवासामध्ये अतिक्रमण करतो . त्यामुळे त्याला बाहेर काढण्यापुरते भीती दाखवण्याचे काम त्या करत असतात . बाकी मनुष्य प्राण्याशी त्यांना फारसे काही देणे घेणे नसते .
माझ्याकडे चालत येणाऱ्या त्या मगरीची आठवण मला करून देणारी काही चित्रे मला इंटरनेटवर सापडली ती आपल्याकरता सोबत जोडत आहे . ही सर्व संग्रहित चित्रे आहेत याची कृपया नोंद घ्यावी .




अगदी अशाच पद्धतीने त्या मकरविशेषाने मला दर्शन दिले !
इथे मगरींचा वावर खूप आहे हे लक्षात आल्यावर मी थोडा सावध चालू लागलो . आणि एकेठिकाणी मला त्यांच्या गुहा देखील सापडल्या ! हे मात्र थांबणे धोकादायक असते कारण मगरी तुमच्यावर हल्ला करू शकतात . मगर फक्त आणि फक्त आपल्या अंड्यांचे आणि पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी माणसावर हल्ला करते . तसे माणूस खाण्यात तिला काही फारसे स्वारस्य नसते ! असो . या संपूर्ण भागामध्ये अतिशय सुंदर शिवलिंगे मिळतात . पदोपदी सापडणारी शिवलिंगे पहात , उचलत , आवडलेली सोबत ठेवत मी मार्गक्रमणा करू लागलो . मोरिया , नलगाव अशी गावे पार करत चूडेश्वरला आलो . 


नंदिकेश्वर महादेव नलगाम

नंदिकेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन मी पुढे निघालो आणि काठाकाठाने चालू लागलो.  इथे मला नर्मदा मातेमध्ये स्नान करणाऱ्या एका माणसाने आवाज दिला.  मी त्याच्या जवळ गेलो.  हा या भागातील एक आदिवासी तरुण होता.  आणि सुमारे चार महिने त्याने नर्मदा मातेचे दर्शन घेतलेले नव्हते म्हणून तिची आठवण आल्यामुळे स्नानासाठी आला होता.त्याने मला सांगितले की हा त्याच्या जीवनातील सर्वात मोठा काळ नर्मदे शिवाय घालविलेला असा आहे! नाहीतर शक्यतो दररोज किंवा किमान आठवड्यातून एकदा तरी नर्मदा स्नान करायचेच असा या भागातील लोकांचा परिपाठ असतो! याचे गाव तिथून थोडेसे दूर होते परंतु तरीही तो दर पौर्णिमेला ,अमावस्येला ,एकादशीला वगैरे स्नानासाठी इथे यायचा.  तो मला विचारू लागला की महाराज चार महिने मी नर्मदा मातेच्या स्नानाला नाही आलो म्हणजे मला खूप मोठे पाप लागले असेल ना? मी त्याला म्हणालो की बाबा रे या चार महिन्यांमध्ये तुला नर्मदा मातेच्या स्नानाला आपण जात नाही याची आठवण होत होती का ? तो म्हणाला,” होय सतत मला याची आठवण येत असे.” “मग झालं तर! नर्मदा मातेमध्ये येऊन प्रत्यक्ष स्नान करण्यापेक्षा अधिक पुण्य तिचे केवळ स्मरण करण्यामध्ये आहे! कारण पाण्यात उतरल्यामुळे अन्नमय कोषाला  किंवा केवळ जडदेहाला स्नान मिळते, परंतु तिच्या स्मरणाने मन बुद्धी चित्त अहंकार या सर्वांना अवभृत स्नान घडते!” तो आदिवासी तरुण निश्चिंत झाला आणि मला म्हणाला की महाराज या गावामध्ये एक मंदिर आहे , तिथे आज हनुमान जयंती निमित्त यज्ञ चालू आहे. तरी कृपया तुम्ही यज्ञाचे दर्शन घेऊन, प्रसाद घेऊन मगच पुढे जावे. साक्षात नर्मदा मातेमध्ये उभा असलेला मनुष्य असे काहीतरी सांगतो आहे आणि आपण ते ऐकायचे नाही हे शक्यच नव्हते ! त्यामुळे मी शांतपणे माझा मोर्चा चुडेश्वर महादेवाच्या मंदिराकडे वळवला!


चंद्रेश्वर किंवा चुडेश्वर महादेवाचे मंदिर येथे पुरातन काळापासून आहे. ब्रम्हलीन कालिदास महाराज नावाचे साधू इथे अनेक वर्ष राहून तपश्चर्या व सेवा करत राहिले. त्यांची समाधी देखील या ठिकाणी आहे. चंदूभाई आणि रमेश भाई नावाच्या दोन भावांनी आपल्या शेतातील जागा दान करत तिथे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला होता. या गावांमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी होती. परंतु ते मंदिरामध्ये येऊन बसायचे. अशाच काही लोकांनी इथे राहणाऱ्या कालिदास महाराजांच्या एका शिष्याला दारूचा नाद लावला. त्यामुळे ग्रामस्थांनी चिडून त्याला तिथून हाकलून लावला होता. मी मंदिरामध्ये गेलो आणि महादेवांचे दर्शन घेतले.  समोर कट्ट्यावर सुंदर असा यज्ञ सुरू होता. हनुमान जयंतीच्या निमित्ताने इथे यज्ञ चालला होता.  हनुमंत राय हे अकरावे रुद्र अर्थात महादेवाचेच अंशावतार आहेत. इथे मला अनुसया माता मंदिरामध्ये भेटलेले मंदार बुवा रामदासी यांच्यासारखे दिसणारे गुरुजी पुन्हा एकदा भेटले! त्या गुरुजींनी  देखील मला लगेच ओळखले आणि मोठ्या आनंदाने तिथे चालू असलेल्या हनुमान यज्ञाला बसायला सांगितले! या यज्ञाचे मुख्य यजमान म्हणजे तिलकवाडा येथे राहणारे वेदशास्त्र संपन्न परेश पंड्या नावाचे गुरुजी होते.यांचा चेहराच हसतमुख होता! आणि अतिशय विनोदी स्वभाव होता! त्यांचे सहाय्यक गुरुजी मला ओळखत आहेत असे पाहिल्यावर त्यांनी देखील मला थोडीशी विशेष वागणूक द्यायला सुरुवात केली! ह्या सर्व आपल्या परीक्षा नर्मदा माता बघत असते. हे सतत आपल्या डोक्यामध्ये चालू राहिले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा मान , अपमान परिच्छिन्न झाल्याशिवाय परिक्रमेचा लाभ झाला असे म्हणता येणार नाही.
चुडेश्वर महादेव मंदीर . याच कट्टयावर यज्ञ सुरु होता .
श्री चुडेश्वर महादेव
यज्ञ सुरू असतानाच या मंदिराची व्यवस्था पाहण्यासाठी तिथे राहिलेले एक साधू येऊन बसले. मला त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांना आधी कुठेतरी पाहिले आहे असे वाटू लागले! ते देखील माझ्याकडे पुन्हा पुन्हा वळून बघत राहिले. बहुतेक त्यांना सुद्धा असेच वाटत होते. तीन वर्ष तीन महिने १३ दिवसाची परिक्रमा उचललेले हे परिक्रमा वासी होते आणि ग्रामस्थांच्या विनंतीवरून आणि हे स्थान आवडल्यामुळे इथे काही दिवस सेवा देण्यासाठी म्हणून ते राहिलेले होते. यज्ञ संपन्न झाल्यावर ते माझ्याशी बोलायला आले. मला पुन्हा पुन्हा यांचा चेहरा कुठेतरी पाहिला आहे असे वाटत होते. ते देखील म्हणाले की तुला मी आधी कुठेतरी भेटलो आहे असे मला का वाटत आहे? इतक्यात माझी अचानक ट्यूब पेटली! आणि मी त्यांना म्हणालो तुम्ही मुंबईचे करंदीकर काका ना ?!! ते देखील एक क्षणभर स्तब्ध झाले! आणि म्हणाले तू मला बरोबर ओळखले आहेस . परंतु आता मी आशिष करंदीकर राहिलेलो नाही.आता मी शिवाशिष दास झालेलो आहे!  मी परिक्रमेदरम्यान गृहस्थाश्रमाचा त्याग करून ह्या आश्रमाचा स्वीकार केलेला आहे! मला सर्व सूत्रे नर्मदा मातेच्या कृपेने पटापट जुळत गेली! सज्जनगडावरती सेवेसाठी अनेक लोक अधून मधून येऊन राहत असतात तसे हे करंदीकर काका देखील तिथे सेवेला वरचेवर यायचे! त्यामुळे त्यांचा चेहरा माझ्या परिचयाचा होता. यांचा स्वभाव मुळातच अबोल होता. सतत आत्ममग्न राहण्याची प्रवृत्ती स्पष्टपणे दिसायची. त्यामुळे गडावरती आमच्या फारशा गप्पा कधी झाल्या नाहीत. परंतु आज मात्र आम्ही दोघे अशा ठिकाणी भेटलो होतो जिथे दोघांनी सर्वस्व सोडून नर्मदा मातेच्या भरवशावर जीवन वाहून टाकलेले होते, त्यामुळे आमची अतिशय सुंदर अशी गप्पांची मैफल जमली! त्यात फोडणी द्यायला परेश पंड्या गुरुजी होतेच!


आश्रमाच्या नावाची पाटी आणि खाली शिवाशिष  दास बापूजींचा संपर्क क्रमांक
शिवाशिष दास बापू

आशिष करंदीकर या सुशिक्षित मुंबईकर शहरी तरुणाचे रूपांतर नर्मदा मातेने अतिशय सहजपणे शिवाशिष दास बापू नामक संतांमध्ये करून टाकलेले होते!  हे आहे नर्मदा मातेचे सामर्थ्य! ती कधी नराचा नारायण करेल सांगता येत नाही! शिवाशिष दास बापू यांच्याशी बोलून मला खूप आनंद प्राप्त झाला. ते अतिशय मनापासून तळमळीने नर्मदा मातेची परिक्रमा आणि परिक्रमा वाशींची सेवा करत होते. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमंताची आराधना व यज्ञ याग करून आपला रामदासी बाणा देखील त्यांनी जपलेला होता! माझे भाग्य किती थोर पहा की ऐन हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमंताच्या नावाने सर्वस्वाचा त्याग केलेल्या एका रामदासी संतांचे दर्शन मला झाले आणि त्यांच्या हातचा महाप्रसाद खायचे परम भाग्य लाभले! 

परेश पंड्या गुरुजी हे एक अजब रसायन होते! यांनी स्वतः नरेंद्र मोदी यांना सरदार सरोवर धरणाच्या उद्घाटना वेळी पूजा सांगितलेली होती! परेश पंड्या गुरुजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते.  आणि या संपूर्ण परिसरामध्ये त्यांचे भरपूर सेवा कार्य चालायचे.  त्यांना माणसे जोडण्याचा छंद होता त्यामुळे त्यांनी माझ्याशी भरपूर गप्पा मारल्या आम्ही सुमारे दोन तास गप्पा मारत बसलो होतो. त्यांनी माझ्याकडून माझ्या परिक्रमेदरम्यान आलेल्या अनुभवांचे आणि निरीक्षणांचे शांततापूर्वक श्रवण केले. तसेच त्यांच्या कामाबद्दल ही मला सांगितले.पुढे असलेल्या तिलकवाडा या गावामध्ये त्यांच्या घरी आल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही अशी प्रेमळ तंबी देखील मला देऊन ठेवली! शिवाशिष बापूंकडून मी परिसराची माहिती घेत होतो तेव्हा मी त्यांना असे म्हणालो की दक्षिण तटावर मी चालत असताना देखील तिथे एक शंखचुडेश्वर महादेवाचे मंदिर लागले होते.बापू मला म्हणाले हे काय समोर दिसते आहे तेच शंखचुडेश्वर महादेवाचे मंदिर आहे! आपल्याला जर आठवत असेल तर  सेहेराव  नावाच्या गावामध्ये हरी गिरी नावाच्या एका साधू ने चंद्रमौळी आश्रमामध्ये आमची सेवा केली होती असा उल्लेख दक्षिण तटावरील लिखाणामध्ये आलेला आहे पहा ! त्यांची मला आठवण झाली आणि मी शिवाशिष बापूंना म्हणालो की तिथे हरी गिरी नावाचा एक साधू नवीन आश्रम बांधण्याच्या तयारीमध्ये होता . बापू म्हणाले त्या झाडाखाली पहा कोण कोण बसले आहे . आणि दूरवर एका झाडाखाली पारावर बसलेल्या लोकांमध्ये मी आलो . पाहतो तो काय हरी गिरी साधू मधोमध बसला होता आणि त्याच्याभोवती ग्रामस्थ गप्पा मारत बसले होते ! चिलीमीचे झुरके मारत मस्त गप्पा रंगल्या होत्या . मला पाहिल्याबरोबर साधूने टुणकन् उडी मारली आणि खाली येऊन मला प्रेमाने मिठी मारली ! कितीही काही घडले तरी आयुष्यात केलेली पहिली गोष्ट कायम लक्षात राहत असते ! मी त्याच्या चंद्रमौळी आश्रमात आलेला पहिला परिक्रमावासी असल्यामुळे त्याच्या लक्षात राहिलो होतो !मी हरी गिरी साधूला सांगितले की आत्ताच मी त्यांची आठवण काढत होतो इतक्यात त्यांचे दर्शन झाले ! त्याने मला सांगितले की आता आज इथेच मुक्काम करायचा पुढे जायचे नाही ! त्याचा हा आग्रह इतका प्रेमपूर्वक व टोकाचा होता की तो मोडणे मला शक्य नव्हते . त्यामुळे पुढे जाण्याचा विचार मी सोडून दिला . आणि आश्रमाच्या हनुमान जयंती उत्सवामध्ये सहभागी झालो . परेश पंड्या गुरुजींची आणि हरी गिरी साधूची ओळख करून दिली . या भागामध्ये मगरींचा वावर आहे हे आपण हरीगिरी महाराजांच्या प्रकरणामध्ये पाहिलेले आहेच . त्यामुळे ग्रामस्थांसमोर या बाजूने नर्मदा मैया मध्येच स्नानाला जाण्याचा प्रश्नच नव्हता . विशेषतः या भागामध्ये मगरींची घरटी खूप आहेत . त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ देखील जपून वावर करायचे . गावामध्ये मुस्लिम लोकसंख्या मोठी असल्यामुळे साधू सोबत चिलीम पिणाऱ्यांमध्ये मुस्लिम लोक देखील होते . आमच्या धर्माचा नसलेला व्यक्ती हा कमी दर्जाचा व तुच्छ असा कुठलाही भाव न ठेवता साधू सर्वांची उष्टी चिलीम ओढत होता . मला न आवडणारे अनेक प्रकार एकत्र चालू असल्यामुळे मी तिथून निघालो आणि मंदिरामध्ये मुक्काम हलवला . प्रचंड गर्मी होती . एक फिरणारा टेबल फॅन तिथे होता . त्याच्यासमोर आसन लावण्याची सूचना मला शिवाशिष दास बापूंनी केली . 


आश्रमामध्ये कन्या भोजन व कन्या पूजन करताना शिवाशिष दास बापू
हाच तो पंखा ज्याच्या समोर मी आसन लावले . 
शिवाशिष दास बापू यांचे अनेक फोटो मला गुगल नकाशावर मिळाले . 
सेहेराव गावाच्या समोरच चूडेश्वर महादेवाचे मंदिर आहे .त्याचा नकाशा पाहिल्यावर आपल्याला परिस्थिती लक्षात येईल
इथे एक सुंदर असा संगम देखील पार करावा लागतो
नकाशा बघताना नर्मदा मातेच्या वाळवंटामध्ये बदामाकृती तलाव दिसला . नर्मदा मातेवर आपणा सर्वांचे आतोनात प्रेम आहेच . आणि जणू ती देखील आपल्या प्रेमाचा स्वीकार करत तिचे प्रेम व्यक्त करते आहे असेच मला वाटले ! असो . 
रात्री गावातील लोकांनी आश्रमामध्ये भजन केले . मी देखील आनंदाने त्या भजनामध्ये सामील झालो ! भजनाचा आनंदच काही वेगळा ! आणि त्यात समोर नर्मदा मैया दिसत असेल तर काय विचारता ! मारुती जन्म असल्यामुळे मारुतीची अनेक पदे म्हणालो . ग्रामस्थांना देखील मराठी भजन ऐकून मजा वाटली . इथे राजपूत नावाचा एक राजपिपला येथील श्रीमंत बांधकाम व्यावसायिक अथवा बिल्डर आला होता . हा गर्भश्रीमंत असला तरी टोकाचा मुमुक्ष होता . त्याच्या मनात अनेक शंका कुशंका होत्या . त्याच्याशी गप्पा मारता मारता अनेक विषयांवर आमचे सखोल चिंतन घडले . त्याला पडलेले प्रश्न मोठे मार्मिक होते . त्याच्या म्हणण्यानुसार सर्व सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत होती . मग असे असताना देखील त्याला घरातील मऊ मऊ सोफ्यावर सुख न वाटता नर्मदे काठी तापलेल्या वाळूच्या किनाऱ्यावर बसल्यावर अधिक आनंद का मिळतो या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळत नव्हते . आलिशान गाडीतून जाताना जितका आनंद मिळत नव्हता तितका आनंद नर्मदा मातेच्या काठावरील खडकाळ भागातून चालताना किंवा वाळू मध्ये फसलेले पाय सोडवत वाळवंटातून चालताना मिळत होता . हे असे का याचे उत्तर त्याला मिळत नव्हते . इथे एक साधी सोपी गल्लत त्याच्याकडून होत होती . अनुभव घेण्यापूर्वी त्याने गाडीला किंवा घरातील राजमहाल सदृश्य सुविधांना सुख सोयी असे नाव दिलेले होते . याच्यातील सुख हा शब्द अनुभवा ला येण्यापूर्वीच आपण नामकरण करून टाकत असतो . प्रत्यक्षामध्ये त्या सुख देणाऱ्या सुविधा नसून सुख मिळण्याच्या अपेक्षेमुळे उभ्या केलेल्या किंवा निर्माण केलेल्या किंवा खरेदी केलेल्या सुविधा असतात . परंतु त्यातून सुख मिळत नाही असे लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो . कदाचित तुमच्या अन्नमय कोशाला किंवा पांच भौतिक देहाला थोडेफार सुख त्या देतही असतील . परंतु आनंदमय कोश हलविण्याचे सामर्थ्य या सुविधांमध्ये नसते ! सुख सुविधा ,सुख सोयी किंवा सुखाचे सांगाती हे सर्व भ्रम आहेत !  सर्व संतांनी एकमुखाने सुखाची व्याख्या सांगितलेली आहे ! रामदास स्वामी आपल्याला सांगतात ,
सुख सुख म्हणता हे ,दुःख ठाकून आले ।
भजन सकळ गेले ,चित्त-दुश्चित्त झाले ।
भ्रमित मन वळे ना , हीत ते आकळेना ।
परमकठिण देही , देहबुद्धी गळे ना ॥

नामदेव महाराज सांगतात ,
सुखा लागी करीशी तळमळ , तरी तू पंढरीशी जाय एक वेळ ।
मग तू अवघाची सुखरूप होशी , जन्मोजन्मीचे दुःख विसरशी ।

आपण ज्यांना सुखाचे सांगाती समजतो ते किती काळ आपल्याला पुरणारे असतात याचे वर्णन समर्थ रामदासांनी करून ठेवलेले आहे .

सुखाचे सांगाती सर्वही मिळती ।

दु:ख होता जाती निघोनिया।।

निघोनिया जाती संकटाचे वेळे ।

सुख होता मिळे समुदाव।।

समुदाव सर्व देहाचे संबंधी ।

तुटली उपाधी रामदासी ।।

सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी वेगळी असते . परंतु सरासरी सुख मान काढायचे ठरवले तर , सुख अनुपम संतांचे चरणी ।  हेच खरे शाश्वत सत्य आहे असा अनेकांचा अनुभव आहे असे दिसते .

प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खरोखरीच आत्मिक किंवा अंतरिक सुख देणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत याचा अभ्यास करून ठेवावा . किमान अंदाज बांधून ठेवावा . अनुभव घ्यावा . आणि मग सुख देणाऱ्या गोष्टींवरती आपला वेळ अधिक खर्च करावा . त्यामुळे जीवन सुखी होण्याचे प्रमाण व शक्यता वाढते . 

आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीला किंवा समोरच्या व्यक्तीला जी गोष्ट सुख देणारी वाटत असेल ती गोष्ट किंवा घटना आपल्यासाठी सुखदायक असेलच असे नाही .  उदाहरणार्थ आपण एका घरात राहतो तेव्हा घरातील अन्य लोकांना ज्या गोष्टीमुळे सुख मिळते त्याच गोष्टीमुळे आपल्याला सुख मिळेल याची खात्री देता येत नाही . लहान मुलांना खेळण्यामध्ये सुख असते . स्त्रियांना घर सजविण्यामध्ये किंवा खरेदी करण्यामध्ये सुख असते . वयोवृद्ध लोकांना अजून काही वेगळ्या गोष्टींमध्ये सुख मिळते . प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी आहे . आपण आयुष्यातली प्रत्येक गोष्ट करताना कोणा ना कोणाशी तुलना करून ती करत असतो . अगदी घर घेणे , गाडी घेणे , मुलांना शाळेत घालणे ,कपडे घेणे , चपला घेणे , हॉटेलमध्ये जाणे , फिरायला जाणे , परदेशात जाणे या सर्व गोष्टी कोणा ना कोणाशी तुलना करून मग आपण बेतलेल्या असतात . आपल्याला कदाचित असे वाटत असते की हे केल्यामुळे समोरच्या व्यक्तीला सुख मिळत आहे तसे आपल्यालाही मिळेल . दहापाच हजार रुपये हजेरी देऊन रोजंदारीने जाहिरातीमध्ये काम करणारे खोटे हिरो हिरोईन आपल्याला मी अमुक एक गोष्ट केली आणि सुखी झालो असे खोटे खोटे सतत दाखवत असतात . आणि आपल्याला वाटते की हेच खरे सुखाचे निधान आहे !  परंतु खरे सुख मिळाल्या क्षणी आपल्याला त्या क्षणाचा किंवा त्या परिसराचा विसर पडत असतो ! आपण तद्रूप होऊन जात असतो ! जणू काही तो क्षण आपण स्वतः जगत असतो ! त्या सुखाच्या अवस्थेतून खाली उतरल्यावर किंवा बाहेर आल्यावर मग आपल्याला कळते की अरे इतका वेळ आपण सुखात होतो ! इतकी ती अवस्था उच्च असते !  राजपूत बिल्डर सोबत बराच वेळ सत्संग घडला . तो सत्संग अतिशय सुखदायक होता ! मी त्याला विचारले की हा प्रश्न तू मलाच का विचारलास ? तो म्हणाला की तुमच्या चेहऱ्यावर सुखाची लकेर स्पष्ट दिसते आहे म्हणून विचारले . आणि ते खरेच होते ! नर्मदा मातेच्या काठाने चालणे यासारखे दुसरे सुख ते काय असेल ! तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक दुःखाचा परिहार करण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी आहे ! सुख देणारी  म्हणजे सुखदा ! ती सुखदा आहे ! वरदा आहे ! मोददा आहे ! सर्वदा आहे ! तुम्ही सुखी आहात हे कोणाला सांगावे लागत नाही . ते सुख चेहऱ्यावर आपोआप दिसते ! 

 त्या रात्री सुखेनैव झोपी गेलो .  पहाटे लवकर उठून नर्मदा मातेमध्ये जाऊन स्नान करून आलो .  मगरींचे भय मनात दाटलेच नाही . सेहेराव मध्ये मुक्कामी असताना मगरी याच काठावर झोपतात हे मी पाहिले होते तरीही भय वाटले नाही ! सुख सुख म्हणतात ते हेच असावे ! 

अनुक्रमणिका

मागील लेखांक 

पुढील लेखांक 

वरील लेख दृक्श्राव्य स्वरूपात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लेखांक एकशे बावीस समाप्त (क्रमशः )


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर