लेखांक १२१ : चाणोद, करनालचा ओरसंग-गुप्तसरस्वती-नर्मदा त्रिवेणी संगम आणि कुबेर भंडारी

 

सकाळी निघालो आणि नंदेरीया या गावातील नंदिकेश्वर महादेवांचे दर्शन घेतले . थोडेसे पुढे गेल्यावर एका उंच टेकडीवर गंगनाथ महादेवांचे मंदिर होते .त्याचे देखील दर्शन घेतले. गंगनाथ महादेवाचे दर्शन झाल्यावर काठाने चालताना भीमपुरा, यमहास ही गावे मागे टाकली. तिथे यमहासेश्वर किंवा यमहास्येश्वर महादेवाचे मंदिर आहे.

नंदेरीया या गावातील नंदिकेश्वर महादेव मंदिर 


या भागातील नर्मदा मातेचा किनारा . दूरवर  दिसणारा श्रीरंग सेतू    



 याला उपज्योतिर्लिंग मानतात


एका टेकडीवर हे मंदिर आहे


नंदिकेश्वर महादेव


याच्यापुढे असलेल्या गंगनाथ महादेवाच्या मंदिरापाशी मगरींचा वास आहे अशी पाटी लावलेली दिसते आणि इथे मगरी आहेत सुद्धा

गंगनाथ महादेव मंदिर


नर्मदा मातेचे अतिशय सुंदर असे दर्शन इथून होते (पूर्व दिशेची बाजू)

गंगनाथ महादेव
नर्मदा मातेचे अतिशय सुंदर असे दर्शन इथून होते (पश्चिमेची बाजू )


या भागातील नर्मदा जल अतिशय सुंदर, नितळ, निर्मळ आणि निळे शार आहे


अतिशय सुंदर अशा चंद्राकृती किनाऱ्यावरून चालत चांदोद अथवा चाणोद नावाचे एक मोठे शहर गाठले . रस्त्याने गेल्यावर हे अंतर पाच किलोमीटर आहे तर किनाऱ्याने केवळ दोन किलोमीटर आहे .इथे विजय भाई नामक एक दुकानदार परिक्रमावासींना चहा नाश्ता सेवा देतात . यांनी स्वतः परिक्रमा केलेली आहे . तेव्हापासून त्यांना दानाचे महत्त्व कळले . त्यांनी मला देखील चहा नाष्टा दिला आणि चाणोद गावामध्ये कुठली कुठली देवदर्शने कशा कशा क्रमाने करायची हे मला व्यवस्थित समजावून सांगितले .  


हेच ते छोटेसे टपरीवजा दुकान जिथून विजय भाई माछी परिक्रमावासीयांची सेवा करतात



सुदैवाने त्यांच्या दुकानाची पाटी असलेला एक फोटो मला सापडला. याच्यावर त्यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे. चाणोद ला  जाणार असाल तर यांना नक्की भेटा.  (ता क: विजय भाईंचे दोन्ही क्रमांक लागत नाहीत असे लक्षात आले आहे)

त्रिवेणी संगम हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला जातो त्यामुळे तिथे केलेल्या धार्मिक कृत्यांना विशेष महत्त्व प्राप्त होते. त्यामुळेच चाणोदच्या घाटावर अनेक प्रकारचे विधी वर्षभर केले जातात. गावात जिकडे जावे तिकडे कर्मकांड करणाऱ्या गुरुजींच्या नावाच्या पाट्या लागलेल्या दिसतात. अनेक छोट्या छोट्या धर्मशाळांमध्ये मुख्य पूजा करून शेवटी महत्त्वाचा विधी करण्यासाठी काठावर गुरुजी आपापल्या यजमानांना घेऊन येतात.


या भागातील गुरुजींनी आपली स्वतःची अशी कार्ड छापून घेतलेली असून अशी कार्ड पदोपदी पडलेली दिसतात.
(हे चित्र प्रातिनिधिक आहे याची कृपया नोंद घ्यावी, कुठल्याही विशिष्ट गुरुजींची अथवा धार्मिक विधीची शिफारस प्रस्तुत लेखक करत नाहीत)

गर्दीचा घाट असल्यामुळे इथे नावा देखील भरपूर आहेत. नावेतून पर्यटकांना व भाविकांना फिरवून आणणे हा इथला केवट समाजाचा मुख्य व्यवसाय आहे.


या भागातील नावा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर आहेत पारंपारिक आकारामध्ये कुठलीही तडजोड न करता या नावा बनवल्या गेलेल्या असल्यामुळे त्या पाहायला खूप सुंदर वाटतात.

थोर मराठा योद्धा मल्हारराव होळकरांच्या नावाने बांधलेला मल्हार घाट कायम नावांनी गजबजलेला असतो


इथला घाट खरोखरच खूप सुंदर आणि पक्क्या बांधकामाचा आहे

दुरून तो खूपच सुंदर दिसतो

या घाटावरील नावांची काही सुंदर चित्रे

घाटावरचे दगडातील कोरीव काम सुंदर आणि रेखीव आहे 

समोर असलेल्या पोईचा च्या  स्वामीनारायण मंदिरामध्ये आणि कुबेर भंडारी ला भाविकांना घेऊन जाण्याचे काम इथले नावाडी करत असतात

नर्मदा परिक्रमेवर आधारित रेवा नावाचा एक गुजराती चित्रपट आहे. तो फार गाजला .त्या चित्रपटामध्ये शेवटी एक वाक्य दाखवले आहे. जे दाखवून चित्रपट संपतो. ते वाक्य याच घाटावर लिहिलेले आहे. आणि ते वाक्य फार सुंदर आहे.संपूर्ण चित्रपटाचे कथानक जणू या एका वाक्यावर आधारित आहे असे दाखवले आहे.

वरील वाक्य दाखवून चित्रपट संपतो. ते दृश्य या व्हिडिओमध्ये पाहता येईल.

विजय भाईंनी सांगितली त्याप्रमाणे मला दर्शने करायची होती. तत्पूर्वी मला नेपाळी साधूने सांगितलेले वस्त्र विकत घ्यायचे होते . ते गोविंद क्लॉथ नावाच्या एका जुन्या दुकानामध्ये मिळेल असे त्याने मला सांगितल्यामुळे मी बाजारपेठेतील गोविंद क्लॉथ हे दुकान शोधून काढले . इथे मी ज्यूट नावाच्या अतिशय तलम आणि थंडगार पडणाऱ्या कापडाच्या दोन छाट्या आणि एक सुती लुंगी विकत घेतली . माझ्याकडे असलेली सर्वच वस्त्रे पुरती फाटलेली होती त्यामुळे साधूच्या आदेशानुसार नवीन वस्त्रे मला घ्यावी लागली . हे कापड तसे खूप महाग असते परंतु साधुसंतांसाठी गोविंद कापड दुकानदार ना नफा ना तोटा दराने हे कापड देतो . त्याने मला सांगितली की मी पहिला गृहस्थी परिक्रमावासी आहे ज्याने हे कापड मागितले ! कारण लोकांना या कापडाविषयी फारसे माहिती नाही . आणि त्याने देखील जो तागा आणून ठेवला आहे तो साधू संतांसाठी च आणला आहे.असो.   आता इथून पुढे मात्र मी देवदर्शने करण्याचा सपाटाच लावला. कारण या गावांमध्ये प्रसिद्ध सप्ततीर्थे असून अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत.सर्वांचे दर्शन घेत घेत पुढे निघालो. मला विजय भाई ने सांगितलेला मार्ग फार उत्तम असा होता त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त दर्शने झाली. चला तर मग आपणही ओळीने देवदर्शन करूयात!

सर्वात पहिले दर्शन साक्षात रेवा माईचे जिच्यामुळे बाकीची देवस्थाने आपल्याला पाहायला मिळाली!


दुसरे दर्शन घेऊ सूर्यनारायणाच्या आणि नर्मदा मातेच्या योगाने निर्माण झालेल्या आपोज्योतीचे ज्याच्या तेजामुळे आणि जिच्या कृपेमुळे ही सृष्टी प्रकाशमान आहे, जीवमान आहे.


घाटावर नर्मदा मातेचे मंदिर असून त्याची तटबंदी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ती समोरच्या तटावरून चालताना देखील आपले लक्ष वेधून घेते अशा पद्धतीचे तिचे बांधकाम आहे.


१९८१ साली  स्थापन करण्यात आलेली नर्मदा मातेची मूर्ती

त्याच्या शेजारीच जगदीशाचे मंदिर आहे. तिथे कर्मकांड व पूजापाठ अधिक प्रमाणात चालते .छोटेसेच घरगुती मंदिर आहे.

थोडेसे पुढे गेल्यावर उजव्या हाताला छोटेसे स्वामीनारायण मंदिर आहे. म्हणजे मंदिर तसे मोठे आहे परंतु स्वामीनारायण  मंदिर परंपरे कडे पाहिले असता खूपच छोटे आहे.


त्याच्या शेजारी असलेल्या रणछोडरायाच्या मंदिरातील मूर्ती काळ्या पाषाणातली असून खूप सुंदर आहे.



चाणोद गावामध्ये अक्षरशः घरे कमी आणि मंदिरे जास्त अशी अवस्था आहे! पहावे तिकडे मंदिरच मंदिर आहेत 



या भागामध्ये प्राचीन मंदिरे अस्तित्वात असल्याचे पुरावे आपल्याला पदोपदी सापडतात.



इथून जवळच काशीविश्वेश्वराचे अतिशय सुंदर आणि पुरातन मंदिर आहे.  सध्या मंदिराची थोडीशी दुरवस्था झालेली दिसते




 हे काशी विश्वेश्वराचे शिवलिंग आहे


मंदिराचे बांधकाम मराठा शैलीतले आहे.


मंदिराचा घुमट अतिशय सुंदर आहे आणि त्याच्यावर चुन्याने केलेले काम आता नष्ट होत आले आहे


काशी विश्वनाथ आणि काळभैरव हे एक अतूट नाते असलेले देव आहेत त्यामुळे इथे काळभैरवाची खूप सुंदर मूर्ती आहे.


मंदिराच्या आजूबाजूला भरपूर शहरीकरण झालेले असल्यामुळे चटकन मंदिर लक्षात येत नाही इथल्या बहुतांश मंदिरांची अशी अवस्था आहे


बडोद्याच्या गायकवाड सरकारांनी हे मंदिर बांधलेले आहे तशी पाटी दरवाजावर लावलेली दिसते . मराठ्यांनी आसेतुहिमाचल  मोठ्या प्रमाणात मंदिरांचा जीर्णोद्धार व नवीन मंदिरांची निर्मिती केलेली आहे. जातिवंत मराठे हे मुळात धर्माभिमानी असतात. धर्माला धरून चालण्याचे बाळकडू त्यांना रक्तातून मिळालेले असते. मराठे असा शब्द वापरताना त्यात मराठी बोलणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व जातींचा समावेश आहे हे लक्षात घ्यावे. त्यामुळेच चाणोद इथलाच घाट बांधणारे मल्हारराव होळकर देखील धनगर समाजातील असूनही या परिसरामध्ये मराठा म्हणूनच ओळखले जातात.



रामेश्वरच्या रामनाथ महादेवाचे मंदिर देखील येथे आहे.



या मंदिरामध्ये एक सुंदर असे श्रीयंत्र आहे ज्याची नित्य कुंकुमार्चन पूजा होते.



भगवान श्री शेषनारायणाचे अतिशय सुंदर असे मंदिर या गावांमध्ये आहे परंतु बहुतेक परिक्रमावासी तिकडे जात नाहीत असे मंदिरातील पुजाऱ्यांनी मला सांगितलं



हे मंदिर म्हणजे मंदिर नसून छोटा किल्लाच आहे आणि चढण्यासाठी सुंदर पायऱ्या आहेत नर्मदा मातेचे पूर लक्षात घेता मंदिर उंचावर बांधण्यात आलेले आहे



मंदिर आतूनही सुंदर आणि बघण्यासारखे आहे. मी गेलो तेव्हा मंदिर साधे होते आता सुंदर रंग दिलेला दिसतो आहे.


मंदिरामध्ये लाकूड काम देखील सुंदर केलेले आहे .शेषनारायण भगवान यांचा दरवाजा पाहण्यासारखा आहे


उत्तम कलाकुसर असलेल्या गर्भगृहामध्ये चांदीच्या पलंगावर शेषनारायण भगवान झोपलेले आहेत वरती जुन्या काळातील काचेच्या हंड्या लटकवलेल्या आहेत.


मंदिराच्या घुमटाच्या आतील बाजूस देखील उत्तम उत्तम पेंटिंग काढलेली असून त्यात सुद्धा शेषनारायण भगवान आपल्याला दिसतात


भगवंताची काळ्या पाषाणातील मूर्ती आणि चांदीचा पलंग खूपच सुंदर आहे



कपिलेश्वर महादेवाचे मंदिर देखील पुरातन आहे



महादेवांना खूप सुंदर पद्धतीने धोतर इथे नेसवले जाते



जस्मा माताजी मंदिर नावाचे मोठे मंदिर चाणोद गावात आहे.

देवांना सजावट किती सुंदर केली जाते हे आपण पहावे आणि आनंद घ्यावा!

या चित्रामध्ये नर्मदा मातेच्या ज्या काठावरून मी चालत आलो तो संपूर्ण किनारा दिसत आहे . दूरवर बद्रिकाश्रम दिसत आहे

या भागातील नावा मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत . त्यांची आतली रचना अतिशय पारंपारिक पद्धतीची व सुंदर असते . लाकडाचा भरपूर वापर केला जातो आणि वरून डांबराचा रंग दिला जातो .

चांदोद किंवा चाणोद गावातील सप्त तीर्थे खालील प्रमाणे आहेत.

चंडिका माता, चंडादित्य तीर्थ, शेषशायी नारायण , कपिलेश्वर,  ऋणमुक्तेश्वर,  पिंगलेश्वर,  नंदा आणि आनंदा माता. या सर्वांची दर्शने घडली.

चाणोद गावातील समस्त मंदिरांचे दर्शन घेत अखेरीस मी भोजन प्रसाद घेण्यासाठी टिकमजी मंदिरात गेलो . त्रिविक्रमजी या शब्दाचा अपभ्रंश गुजराती लोकांनी टीकमजी असा केलेला आहे !अतिशय सुंदर व शांत असा हा आश्रम होता . हा एक सुंदर असा मधोमध चौक असलेला मोठा वाडाच होता . खाली वरती दोन मजले होते . मला माडीवर असं लावण्यास सांगण्यात आले .भरत नावाचा एक बटू होता . त्याने मी आल्यापासून मला काय हवे काय नको सर्व विचारपूस उत्तम केली . आश्रमामध्ये सुंदर अशी संगमरवरी फरशी घालण्यात आली होती . त्यावर उत्तम नक्षीकाम करण्यात आलं होतं . त्रिविक्रमजी ची मूर्ती काळ्याभोर पाषाणातली असून फार सुंदर होती . हनुमानजीचे मंदिर देखील होते . गावातील सर्व उपेक्षित , वंचित ,गरीब , भिकारी , परित्यक्त लोकांना इथे रोज अन्नदान केले जायचे . महंत खूपच दयाळू व शांत वाटत होते . महंत भरत दास महाराज या आश्रमाची व्यवस्था पाहतात असे कळले . भोजन प्रसादाला अजून थोडासा वेळ होता . बसल्या बसल्या मी माझ्याकडे असलेली जुनी चार धोतरे घेऊन त्याची एक सुंदर उशी शिवली . मालसरच्या कनकेश्वरी देवी आश्रमामध्ये मला मिळालेले नवीन धोतर हे सिंथेटिक कापडाचे असल्यामुळे माझ्या कामाचे नव्हते त्यामुळे ते देखील मी त्या उशीमध्ये चिणून टाकले . एका माणसासाठी उत्तम उशी तयार झाली ! चांगले टाके घालून ती मी आश्रमाला दान केली . त्यांनी देखील आनंदाने ती उशी ठेवून घेतली ! माझ्या जवळचा भार अजूनच हलका झाला ! जसा जसा उन्हाळा वाढत चालला होता तसं तसे पाठीवर ओझे घेऊन चालायला त्रास होत होता . त्यामुळे जितके ओझे कमी होईल तितके चांगले असा माझा प्रयत्न होता . ही उशी हा त्याच प्रयत्नाचा एक भाग होता . भोजनाची वेळ झाल्यावर बरोबर गावातील २५ ते ३० गरीब लोक तिथे गोळा झाले . त्या सर्वांसोबतच मी देखील जेवायला बसलो . मला जेवणासाठी वेगळे बसा असे सांगण्यात आले होते ,परंतु मी याच लोकांबरोबर बसणार आहे असे महंतांना सांगितले व त्यांनी देखील मला विरोध केला नाही . परमेश्वर अनेक रूपाने नटलेला आहे . तसे अस्तित्व तो तेजस्वी ओजस्वी आणि तपस्वी रूपामध्ये लगेच दाखवीतो ! परंतु क्वचित प्रसंगी अशा एखाद्या भ्रांत दांत रूपात देखील तो प्रकट होऊ शकतो ! म्हणजे त्याचे अस्तित्व सर्वत्र आहेच .परंतु विशेष रूपाने प्रकट होणे हा एक वेगळा प्रकार आहे ! सर्वाभूती भगवंत हा भाव हृदयाशी ठेवला की सगळा आनंदी आनंद शिल्लक राहतो ! हे असे लोक होते ज्यांना कोणीही विचारत नाही . ज्यांच्या वाचून कोणाचे अडत नाही .  ज्यांच्या असण्या किंवा नसण्याने कोणालाच काही फरक पडत नाही . अशा लोकांना आधार देणे हे फार मोठे पुण्याचे काम महंत करत होते . 

समर्थ रामदास स्वामी यांनी काही पदे व अभंग देखील लिहिलेले आहेत. उद्धव स्वामी या त्यांच्या प्रथम शिष्यानी गोळा करून ठेवलेल्या काही पदांपैकी एक पद मोठे सुंदर आहे. समर्थ म्हणतात,


सखियेहो आहेति उदंड वेडे । ऐसे ते सज्जन थोडे| तयाची संगति जोडे ।परम भाग्यें ||

सकळांचे अंतर जाणे ।मीपणें हुंबरों नेणें | ऐसियावरून ।प्राणसांडण करुं ||

साहती बोलणें उणें । न पुसतां सांगणें |समचि देखणें उणें ।अधिक नाहीं  ||

अभिमान नावडे । धांवती दीनांकडे | तयांचे जे उकरडे ।महाल त्यांचे ||

आपपर नाही ज्यासी । पुसतां सांगती त्यासी|  ऐकतांचि भाविकांसी ।पालट होये ||

 रामीरामदास वास । पाहतो रात्रंदिस | ऐसियाचा सौरस । देईं राघवा ||

(अनंतदास रामदासी संकलित श्री समर्थांचा गाथा मधील बाराशे तेविसावा अभंग पान ३८० वे)


समर्थ सांगतात की या जगामध्ये उदंड संत आहेत ,महंत आहेत, योगी ,वितरागी, तडी, तापसी, संन्यासी आहेत. परंतु असे फार थोडे लोक आहेत ज्यांची संगत परभाग्याने आपल्याला प्राप्त होते .ते लोक कसे असतात हे सांगताना समर्थ म्हणतात की यांना सर्वांचे अंतर्गत कळते. अहंकाराचा किंवा मी पणाचा आश्रय घेऊन हे कधी शेफारून जात नाहीत . असा जर कुणी सज्जन मला भेटला तर त्याच्यावरून मी जीव ओवाळून टाकेन! यांना अभिमान नसतोच आणि यांची धाव सतत दिन दुबळ्या गरिबांकडे असते! शोषित वंचित पीडित गरीब यांचे जे उकिरड्या समान भासणारे स्थान असते तिथे हे धावत जाऊन त्यांचा उद्धार करतात!  आणि जणूकाही अशा कुटी वाटा, अशा झोपड्या त्या सज्जनांसाठी महालच असतात! हा माझा हा प्रकार असा भाव त्यांच्याजवळ नसतो आणि त्यांना विचारलेल्या प्रश्नांची अशी काही उत्तरे ते देतात की समोर बसलेल्या भाविकांचा अंतर्भाव पूर्णपणे पालटून जातो! रामदास स्वामी म्हणतात की हा रामाचा दास रात्रंदिवस अशाच संतांच्या संगतीची वाट पाहत बसलेला आहे! हे राघवा अशा संतांची आणि माझी भेट घडव! किती सुंदर पद आहे ना! नर्मदा मातेच्या काठावर तुम्हाला असे अनेक सज्जन भेटतात! 

ऐसियांचा संग देई नारायण | ओलावा वचन जयांचिया ||



टिकमजी मंदिरामध्ये अगदी याच ठिकाणी कोपऱ्यामध्ये दिसणाऱ्या जाळीपाशी मी माझे आसन लावले होते.



हनुमान जी चे मंदिर देखील इथे असून फरशीवर केलेले काम सुंदर आहे.


आश्रमाचे बांधकाम जुन्या पद्धतीचे असून मजबूत आहे. तसेच पूरनिरोधक बांधकाम केलेले आहे. पुरामुळे खालील मजल्याचा रंग उडालेला दिसतो पहा


टिकमजी अथवा  त्रिविक्रमजी यांची मूर्ती काळ्या पाषाणातील असून खूपच सुंदर आहे


मूर्तीला उत्तमोत्तम अलंकार केलेले असून मूर्तीच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज जाणवते




पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून मुळातच हा आश्रम जमिनीपासून उंचावर बांधलेला आहे




आश्रमाच्या मधोमध मोठा चौक आहे त्यामुळे आश्रमात हवा पाणी उजेड चांगले खेळते 




इथे वरती खिडक्या दिसतात तिथे मी आसन लावले होते


हे आहे टीकमजी मंदिर किंवा आश्रम जिथे गोरगरिबांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा चालते!

इथून पुढे काठाकाठाने चालत थेट त्रिवेणी संगमावर आलो. काठावरील मार्ग अतिशय कठीण ! उभा तासलेला कडा आहे.

त्यामुळे त्याच्यावरून चालावे लागते व इकडे अचानक तीव्र उतारावरून खाली उतरावे लागते. इथे ओरसंग  नदी आडवी आली. 

पुढे पुढे गेल्यावर नदी पार करण्यासाठी पूल होता परंतु मला पाण्यात उतरून नदी पार करायची होती. त्यामुळे मी कुठलाही विचार न करता कमरे एवढ्या पाण्यामध्ये शिरलो. नदीच्या मध्ये थोडासा वाळूचा भाग होता आणि पुन्हा दुसरी नदी होती ही होती गुप्त सरस्वती म्हणजे ती प्रकट रुपाने वाहताना दिसत नाही परंतु ओरसंग  नदीपेक्षा हिच्या पाण्याची चव देखील वेगळी आहे आणि तापमान देखील वेगळे आहे!ओरसंग  नदीचे पाणी गरम लागते तर हिचे पाणी थंडगार लागते!. यावरूनच लोकांनी ही वेगळी नदी आहे हे ओळखले आणि तिचे नाव गुप्त सरस्वती ठेवले! तुम्हाला जाणवणे इतर फरक दोन्ही पाण्यामध्ये आहे! इथून संगमावरती आलो आणि अतिशय मनोभावे आनंदाने त्रिवेणी संगमावर स्नान केले! मैय्याच्या पाण्याची चव आणि तऱ्हाच न्यारी! 


नर्मदा ओरसंग गुप्त सरस्वती त्रिवेणी संगम करनाली कुबेर भंडारी



चांदणी ने दाखविले आहे ते त्रिवेणी संगमाचे स्थान असून वरती दोन बाण दाखवले आहेत त्या दोन विविध तापमानाने वाहणाऱ्या दोन नद्या आहेत. खाली नर्मदा माता आहे


इथे सर्वत्र वाळूच वाळू असल्यामुळे नर्मदा मातेचे पात्र देखील खूप उथळ आहे. परंतु नावाड्यांनी त्यातील खोल खोल भाग शोधून तिथून नौकानयनाचा व्यवसाय चालू ठेवलेला आहे!  गुगल नकाशा मध्ये पाहताना देखील आपल्याला लक्षात येते की पाणी फारसे खोल नाही. म्हणजे पाणी खोलवर गेलेले आहे परंतु वाळूमुळे मात्र उथळ होऊन जाते. समोर स्वामीनारायण मंदिर आहे तिथले लोक नावेनी इथे येतात आणि त्रिवेणी संगमावर स्नान करून परत जातात. त्रिवेणी संगमावर स्नानासाठी लोकांची प्रचंड गर्दी होती. जिथे अतिशय खोल पाणी आहे असे वाटत होते तिथे जाऊन मी स्नान केले आणि बाहेर आलो. वारे इतके वेगाचे सुटले होते की क्षणात कपडे वाळून गेले. तसाच कुबेर भंडारी च्या दर्शनाला गेलो. अतिशय खडा चढ असलेला घाट चढल्यावर कुबेर भंडारीचे छोटेसे मंदिर आहे जिथे प्रचंड गर्दी वर्षभर असते.मुळात कुबेराचे हे एकमेव मंदिर असावे! धनाचा कुबेर! लक्ष्मीचा सांभाळ करणारा हा देव म्हटल्यावर त्याला सर्वसामान्य लोक कसे काय सोडतील! ज्यांना ज्यांना कुबेरासारखे भांडार जमवण्याची आवड आहे ते सर्व लोक कुबेर भंडारी ला सतत येत जात असतात!


कुबेर भंडारी या तीर्थक्षेत्राची कथा मोठी मजेशीर आहे. दोन प्रकारच्या कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार भगवान शिव पार्वती प्रवासाला निघाले असताना या ठिकाणी आले आणि पार्वती मातेला भूक लागली. तिच्यासाठी महादेवांनी या जागेला असा वर दिला की इथे जो कोणी येईल तो कधी उपाशी जाणार नाही आणि तिथून पुढे अक्षय धाम इथे निर्माण झाले अशी एक कथा आहे. तर दुसऱ्या कथेच्या नुसार रावणाचा चुलत भाऊ असलेला कुबेर लंकेचा राजा म्हणून स्थानापन्न झाला. परंतु रावणाला राग आल्यामुळे त्याने शिवाची तपश्चर्या केली. दोघेही भाऊ शिवभक्त असल्यामुळे शंकराने दोघांना परस्पर निर्णय घ्यायला सांगितले. तेव्हा कुबेराने लंकेचा त्याग करून इथे येऊन तपश्चर्या केली. तेव्हा प्रसन्न होऊन महादेवांनी कुबेराला वर दिला की या ठिकाणी कधीच कुठली कमतरता पडणार नाही आणि तसेच ते क्षेत्र आजही आहे. या क्षेत्रामध्ये गेल्या गेल्या तुम्हाला एक वेगळेच वैभव सर्वत्र जाणवायला सुरुवात होते. असे वाटते की इथे कशाचीच काही कमतरता नाही. वरती अनेक मंदिरे असून अनेक देवतांची स्थापना तिथे झालेली आहे त्या सर्वांची दर्शनी मी घेतली त्यात विशेष लक्षात राहिले ते म्हणजे एका झाडाखाली स्थापन केलेले बारा ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधी! इथे सर्व ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण केल्याचे पुण्य प्राप्त होते अशी भावना आहे. कुबेराचे दर्शन घेतले आणि घाटाला असलेल्या प्रचंड पायऱ्या उतरत खाली आलो असे म्हणतात की एकूण सातशे पायऱ्या  इथे आहेत. दोन-तीन घाट आहेत त्यामुळे त्या सर्व मिळून सातशे पायऱ्या आरामात असू शकतात.त्या उतरलो आणि अतिशय कठीण असा काठावरचा मार्ग पकडला.



स्वामीनारायण मंदिर पोईच्या इथल्या किनाऱ्यावर आले की कुबेर भंडारी मंदिर असे समोर दिसते



मंदिरातील गर्भगृह नावाप्रमाणे ऐश्वर्य संपन्न आहे




प्रचंड खडा चढ असलेल्या पायऱ्या चढून वर जावे लागते. मी एकाच दमात सर्व पायऱ्या चढून वर गेलो. हे प्रचंड दमवणारे होते. परंतु नर्मदा मातेच्या कृपेने जमले. जमले त्यामुळे लक्षात राहिले!


कुबेर भंडारी घाटावरून दिसणारा चाणोद चा सुंदर घाट


एका झाडाखाली स्थापन केलेली बारा ज्योतिर्लिंगे



कुबेर भंडारी मंदिर परिसर आणि कुबेराचा महामंत्र



कुबेर भंडारी म्हणजे कुबेराने पुजलेले शिवलिंग आहे याची कृपया नोंद घ्यावी. इथे कुबेराची मूर्ती असावी असे बऱ्याच लोकांना वाटते 



कुबेराची वंशावळ आणि तो रावणाचा मोठा भाऊ कसा होता हे दाखवणारी वंशवेली  (वंशावळ)



सातशे पायऱ्यांचा कुबेर भंडारी घाट



सातशे पायऱ्यांचा कुबेर भंडारी घाट


मी पुढे काठाने चालत गेलो तो मार्ग .फक्त या चित्रामध्ये पाणी खूप उतरलेले आहे .मी जेव्हा चालत गेलो तेव्हा अक्षरशः एक पाऊल ठेवता येईल एवढी जागा कशीबशी मिळत होती आणि सर्वत्र प्रचंड चिखल होता.



कुबेर भंडारी सोडल्यावर मी जो चिखलाचा किनारा पकडला तो अतिशय कठीण होता परंतु फार मजेशीर होता. प्रत्येक पाऊल अर्धा फूट चिखलामध्ये रुतत होते. पुढे रस्ता नाही असे सर्व नावाडी मला सांगत राहिले परंतु आतला आवाज सांगत होता की चालत राहा!मालसर पासून बद्रिकाश्रमामध्ये मी पोहोचलो तेव्हा मी सुमारे ३१ किलोमीटर अंतर तोडले होते परंतु आज सकाळपासून मी पाच-सहा किलोमीटर सुद्धा चाललो नव्हतो. त्यामुळे आता चालत राहायचे असे डोक्यात घेऊन सुटलो होतो. परंतु देवाच्या मनात काय आहे त्याची मला कल्पना नव्हती. अतिशय सुंदर आणि निर्मनुष्य अशा या किनाऱ्याने चालता चालता मी पुढे किमान दहा किलोमीटर अंतर चालायचे असे जे स्वप्न उराशी बाळगले होते ते लवकरच मैयाच्या कृपेने मावळले! नर्मदा मातेच्या काठावर आपण काहीच ठरवायचे नसते याची पुन्हा एकदा प्रचिती आली! पुढे असे काहीतरी होते की मला थांबावेच लागले!

अनुक्रमणिका 

मागील लेखांक 

पुढील लेखांक 

वरील लेख दृक्श्राव्य स्वरूपात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लेखांक एकशे एकवीस समाप्त (क्रमशः)

टिप्पण्या

  1. नमस्कार ! तुम्ही सुचविल्याप्रमाणे परिक्रमावासींची सेवा करणा-याना पैसे पाठवले तर ते तुम्हाला कसं कळवायचं ?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. mazinarmadaparikrama@gmail.com या ईमेल आयडीवर फक्त एक ईमेल करून स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा . लागलीच त्याची नोंद आपल्या ऑनलाईन केली जाते . जी सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध असते

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर