लेखांक १२० : शिनोर चा गणपती ,अनसूया माता ते बद्रीकाश्रम

खाकरा केलेल्या पोळ्या खाऊन कनकेश्वरी माताजींचा आश्रम सोडला होता त्यामुळे भूक नव्हती . भरपूर चालायचे असे ठरवले . मालसर सोडल्यावर एक सुंदर वाळूचा किनारा लागतो. इथे छोटासाच परंतु पवित्र असा तपोवन आश्रम आहे.त्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो.


तपोवन आश्रम

वाळूचा किनारा खूप सुंदर आहे. शांतपणे वळणारी नर्मदा मैया पाहायला मजा येते.


महापुरामध्ये पायाखालची माती वाहून जाऊन इथल्या झाडांची अशी अवस्था होते



बहुतांश परिक्रमावासी वरील नकाशामध्ये लाल रंगाने दाखवलेल्या मार्गाने शिनोरला जातात .परंतु तसे न करता हिरव्या बाणाने दाखवलेल्या रस्त्याने जर गेले तर नर्मदा मातेची खूप सुंदर रूपे  पाहायला मिळतात ! हा संपूर्ण किनारा १००% निर्मनुष्य आहे


श्री धूतपापेश्वर महादेवाचे मंदिर शिनोर गावाच्या थोडेसे अलीकडे लागते.

काठाकाठाने  चालत शिनोर गाव गाठले . मध्ये कंटोई गावामध्ये कोटीश्वराचे मंदिर आहे . 



श्री भोगेश्वर महादेव  



श्री कोटेश्वर महादेव 

 त्याचे दर्शन घेऊन शिनोर गावातल्या राम मंदिरामध्ये आलो . सुंदर टुमदार गाव होते . राम मंदिरामध्ये हरी महाराज म्हणून आळंदीचे एक मराठी तरुण साधू सेवा देत होते . त्यांनी बसवून प्रेमाने चहा पाजला आणि चौकशी केली . राहा म्हणत होते परंतु नुकताच दिवस सुरू झाला होता त्यामुळे त्यांना विनंती केली की पुढे चालू द्यावे .




                                                                श्री रामजी मंदिर शिनोर 

 गावातील परिस्थिती त्यांनी सांगितली . गावात प्रचंड प्रमाणामध्ये परधर्मीयांची संख्या वाढलेली आहे . नर्मदा पुराणा मध्ये उल्लेख केलेली आठ तीर्थक्षेत्रे असलेले हे पवित्र गाव आज यवनाक्रांत आहे . कोणी म्हणेल त्याने काय फरक पडतो ? तर त्याचे उत्तर असे आहे की तुम्हाला तुमचे उपास्य दैवत समोर असले की आजूबाजूला कोण आहे याने फरक पडत नसला तरी देखील असे काही पंथ आहेत ज्यांना त्यांचे उपास्य दैवत वगळता अन्य कुठल्या देवाची उपासना त्यांच्यासमोर किंवा त्यांच्या आजूबाजूला केलेली नियमानुसारच चालत नाही ! त्यामुळे तुम्हाला त्यांचा काही प्रश्न नसला तरी त्यांना तुमचा प्रश्न असतो ! तुमच्या मते ते योग्य मार्गावर असले तरी त्यांच्यामध्ये तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत असता ! आणि तुम्हाला त्यांच्या दृष्टीने योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांनी केलेले उपाय हे आपल्याला परवडणारे नसतात ! हरी महाराजांची चर्चा केल्यावर असे कळाले की इथे जवळच प्राचीन गणेश मंदिर आहे व तिथे अनेक साधू मुक्कामाला येऊन राहिलेले आहेत . त्यांचा शेजारच्या गणेश मंदिरामध्ये गेलो. मंदिर फारच सुंदर होते .


शिनोरचे गणराया! 

 तिथे बसलेल्या अनेक साधूंची दर्शने झाली व थोडाफार सत्संग देखील लाभला . गावापुढे असलेल्या महत्वाच्या प्रश्नाबाबत चर्चा केल्यावर साधूंनी त्याबाबतीत निरीच्छा दाखवली . हा प्रश्न त्यांच्या अखत्यारीत येत नव्हता असा त्यांचा स्वर मला जाणवला . असो . ज्याला त्याला आपल्या आपल्या कार्यक्षेत्राचा प्रांत निवडण्याचे स्वातंत्र्य आहे ! इथे काही पूजा पाठ होता . त्यासाठी थांबणार का पुढे जाणार असे साधूने विचारल्यावर मी पुढे जाणार म्हणून सांगितले . चहाचा प्रसाद येथे देखील घेतला आणि पुढे निघालो .


शिनोर चा घाट असा वैशिष्ठयपूर्ण आणि मंदिरांनी भरलेला व भारलेला आहे  


हे आहे शिनोर गावाचे विहंगम दृश्य !

शिनौर गावामध्ये केदारेश्वर ,उत्तरेश्वर , रोहिणेश्वर ,कृष्णेश्वर ,भंडारेश्वर , धूतपापेश्वर ,भुवनेश्वर ,निष्कलंक महादेव अशी आठ पौराणिक तीर्थक्षेत्रे आहेत . समोर कार्तिक स्वामींचे  कांदरोज गाव आहे . 


श्री रोहीणेश्वर  महादेवाचे सुबक सुंदर मंदिर 

इथली  मंदिरे फार सुंदर आहेत 

शिनोर जवळचा मैय्याचा किनारा मोठा वैशिष्ठ्यपूर्ण आहे . त्यामुळे इथे मगरी घरटी करतात 


                                                                संग्रहित छायाचित्र 

यानंतर काठाने जाताना कृष्णेश्वर महादेवाचे मंदिर लागले. मंदिर अतिशय सुंदर आहे. परिसरात कोणीही भक्त किंवा पूजक नव्हते.



                                                                    कृष्णेश्वर महादेव मंदिर 


श्री कृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घ्या 

वाटेमध्ये भांडारेश्वर ,महादेवाचे सुंदर असे मंदिर लागते. या मंदिराकडे जाणारा घाट चांगलाच उंच असून वाहून गेलेला आहे . इथे एक मराठी साधू सेवा देतात. यांना परिक्रमावासी दिसला की त्याला ते बालभोग चहा किंवा भोजन प्रसाद घेतल्याशिवाय पुढे जाऊ देत नाहीत! सुदैवाने मी गेलो तेव्हा ते नव्हते. महादेवाचे सुंदर असे मंदिर इथे आहे. आता बांधलेले मंदिर खूप छोटे असून जुने भव्य मंदिर येथे असणार याची साक्ष परिसरात पडलेल्या भग्न मूर्ती आणि शिवलिंगे देतात. मूर्ती भंजकांनी आपला इतिहास मिटवण्याचा प्रचंड प्रयत्न गेली अनेक शतके केलेला आहे.परंतु मूर्तिपूजन करणारे संख्येने जास्त असल्यामुळे त्यांचे फारसे काही चालले नाही. लवकरच त्यांची संख्या कमी होऊन मूर्ती भंजकांची संख्या वाढेल तेव्हा चित्र उलटे असेल यात शंकाच नाही.

या भागामध्ये आजही मगरींचा वास आहे इथल्याच एका मगरीचे संग्रहित छायाचित्र


भंडारेश्वर महादेवाचे मंदिर एका अति भव्य वडाच्या झाडाखाली आहे


भंडारेश्वर महादेव


इथे भंडारेश्वर पातालेश्वर आणि श्री काशी विश्वनाथ असे तीन महादेव आहेत

मंदिराकडे जाणारा घाट महापुरात तुटलेला आहे



मंदिरामध्ये इतस्ततः विखुरलेले अवशेष पाहिल्यावर लक्षात येते की इथे देखील कधीकाळी मोठे मंदिर असावे.



मुख्य शिवलिंगा पेक्षा खूप मोठी पिंड इथे बाहेर आणून ठेवलेली आहे जी भग्न  आहे


या भागामध्ये आजकाल जुन्या मंदिराचे सौंदर्य घालवणारे सिमेंट काँक्रीटचे नवीन बांधकाम सुरू आहे यामुळे परिसराची रया निघून गेली आहे. पौराणिक बांधकाम असेल त्या ठिकाणी नव्या प्रकारचे बांधकाम करू नये त्याने शोभा जाते.उजव्या हाताला दिसणारे मनोऱ्यासारखे बांधकाम म्हणजे पक्ष्यांना खायला घालण्याची जागा आहे . आपला पारंपारिक “बर्ड फिडर” आहे तो!


शिनोर नंतर कंजेठा ,अंबाली ही गावे ओलांडली .अतिशय सुंदर अशा अरण्यातून चालत अनुसूया माता हे तीर्थक्षेत्र गाठले . हे अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे एरंडी नावाची नदी नर्मदा मातेला येऊन मिळते आणि हा संगम अतिशय पवित्र मानला जातो . काही विशिष्ट त्वचारोग असलेले रुग्ण या संगमावर स्नान करून बरे होतात अशी मान्यता आहे . इथे देखील सुवर्णशीला , हत्याहरण तीर्थ ,गंगा कूप अशी पवित्र स्थाने असून दत्ताचे मंदिर प्रसिद्ध आहे . इथल्या स्थानिक ब्राह्मण पुजारी लोकांनी स्थापन केलेले एक अन्नक्षेत्र आहे . दत्तप्रभूंची माता अनसुया हिचे हे तपस्थान आहे . या निमित्ताने अनुसया या शब्दाबद्दल थोडेसे सांगतो . मराठीमध्ये सर्रास आपण अनुसया असाच शब्द वापरतो . प्रत्यक्षामध्ये हा शब्द अनसूया असा आहे . अन + असूया अर्थात जिच्यामधून असूया ,द्वेष ,मत्सर यांसारखी पाप बुद्धी निघून गेलेली आहे अशी . असा त्याचा अर्थ आहे . या स्थानाचे भरपूरच महात्म्य नर्मदा पुराणाच्या पाचव्या अध्याया मध्ये सांगितलेले आहे .मी इथे गेलो आणि अनुसूया मंदिरामध्ये काहीतरी धार्मिक कार्यक्रम चालू आहे असे पाहून समोर असलेल्या एका झाडाच्या पारावर काही काळ बसलो .इथे उत्तर वाहिनी परिक्रमा करून आलेले मुंबईचे काही परिक्रमावासी भेटले . त्यांच्याशी गप्पा मारल्या मी काय बोलतो आहे हे लक्षपूर्वक ऐकणारी हरिपाल आणि व्रज नावाची दोन हुशार चुणचणीत मुले आणि त्यांचा बाप असे त्या पारावर बसलेले होते .त्यांनी देखील माझ्याशी संवाद साधायला सुरुवात केली .आणि त्यांच्या भरपूर शंका मला विचारल्या .मी माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे त्यांचे शंका समाधान व थोडेफार प्रबोधन केले . मुले माझ्यावर भलतीच खुश झाली . आणि मित्रत्वाच्या नात्याने माझ्याशी गप्पा मारू लागली ! मोठी माणसे मात्र सहज आपले स्वत्व हरवत नाहीत . यांच्या वडिलांचे परिक्रमे विषयी नकारात्मक मत होते ते बदलण्यात  मला यश मिळाले . त्यांच्यामते परिक्रमा हा वेळेचा अपव्यय होता . परंतु मी समजावून सांगितल्यावर मात्र त्यांचा हा भ्रम दूर झाला . आणि त्यासाठी त्यांनी माझे आभार मानले . मुंबईच्या लोकांनी माझ्यासोबत भरपूर फोटो काढून घेतले . मुंबईच्या परिक्रमावासींना घेऊन आलेल्या मुख्य व्यक्तीचे नाव मोहन नलावडे असे होते आणि ते सायन येथे राहतात. त्यांना अमरकंटक इथल्या (मंडला ) उत्तर वाहिनी परिक्रमेची माहिती पाठवावी अशी विनंती त्यांनी मला केली होती त्याप्रमाणे परिक्रमा संपल्यावर त्यांना मी ती पाठवली . मुंबईच्या लोकांनी जाताना मला राजगिरा लाडू आणि दक्षिणा दिली . इथे सज्जनगडावरील मंदार बुवा रामदासी यांच्यासारखे दिसणारे एक गुरुजी होते . मी त्यांच्याकडे पाहतो आहे लक्षात आल्यावर ते माझ्याकडे आले . त्यांना मी जेव्हा सांगितले की तुम्ही अमुक अमुक साधू सारखे दिसता तेव्हा त्यांनाही गंमत वाटली आणि त्यांनी मला भोजनाचे काय नियोजन आहे ते विचारले . मैया जसे म्हणेल तसे असे मी उत्तर दिल्याबरोबर ते म्हणाले की आज तुम्ही आम्हा विप्रगणांसोबत भोजन घ्यावे . फक्त एकच त्रास होता तो म्हणजे पूजा सुरू असल्यामुळे ती संपेपर्यंत मला थांबावे लागणार होते . परंतु मुख्य पुजारी व आले आणि त्यांनी ती देखील अडचण सोडवली . त्यांनी येऊन मला सांगितले की मी आत मध्ये असलेल्या ब्राह्मण उद्धारक मंडळामध्ये जाऊन यथेच्छ भोजन करावे . अन्य ब्राह्मणांची वाट पाहू नये . असे करायला हरकत नाही आहे हे कळल्याबरोबर मी ताबडतोब आत मध्ये जाऊन बसलो . सुंदर असे साग्र संगीत ,सुग्रास व सात्विक भोजन मिळाले . ब्राह्मण उद्धारक मंडळाकडून दक्षिणा सुद्धा मिळाली . इथे खूप गर्दी असल्यामुळे इथे न थांबता पुढे निघण्याचा निर्णय घेतला . 

आश्रम परिसराचे थोडेसे दर्शन आपल्याला घडवतो .

हाच तो पार आहे ज्याच्यावर मी नर्मदा भक्तांशी गप्पा मारत बसलो होतो
मागच्या बाजूला हे दत्त मंदिर आहे
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी लिहिलेले अनुसूया स्तोत्र
या मंदिरामध्ये महापुरामध्ये पाणी भरते
परिसरातील सुंदर मंदिरे
श्री अनसूया माता
अनसूया मातेच्या पोटी ब्रह्म  ,विष्णू आणि महेश यांनी जन्म कसा घेतला हे दाखवणारी कथा इथे आपल्याला पाहायला मिळते . आपापले पति ओळखा असे अनसूया मातेने सांगितल्यावर गडबडलेल्या पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती आपल्याला दिसत आहेत !
त्यामुळे इथे बाल दत्तात्रयांचे मंदिर आहे !
मंदिराकडे जाण्याचा मार्ग

अनसूया माता मंदिरातील दर्शने आटोपली आणि पुन्हा एकदा नर्मदा मातेचा किनारा पकडला आणि काठाकाठाने चालत जनकेश्वर  ,संकर्षण तीर्थ कोटेश्वर महादेव बरकाल येथील प्रभासेश्वर महादेव हे सर्व पाहत मोलेथा नावाच्या गावामध्ये आलो . 

या भागातील मैद्याचा किनारा असा आहे . पाहून आपल्याला वाटू शकते की चालण्यासारखी जागा नाही
परंतु बारकाईने पाहिल्यावर आपल्याला लाल बाणाने दाखवलेला परिक्रमा मार्ग दिसेल ! आपली इच्छा असेल तर मैयाच्या काठाने मार्ग नक्की मिळतो !
अनुसुया मातेचे मंदिर अंबाली या गावामध्ये आहे . इथेच मन्मथेश्वर महादेवाचे मंदिर देखील काठावरती दिसते . मंदिराची थोडीशी दुरावस्था झालेली दिसते .
मन्मथेश्वर महादेवाचे शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण आहे . याच्याभोवती पितळेचे कोंदण असून मध्ये शिवलिंग आहे
आपण जर कधी मंदिरामध्ये दर्शनाला गेलात आणि असे झाड आपल्याला दिसले तर आधी झाड तोडावे मग घंटा वाजवावी . कारण अशी झाडे एकदा मोठी झाली की मंदिराच्या बांधकामाला धोका उत्पन्न करतात . मन्मथेश्वर मंदिरातील संग्रहित चित्र .
महादेवाच्या शिवलिंगाला असे कोंदण फार कमी ठिकाणी पाहायला मिळते .
श्री मन्मथेश्वर महादेव
या भागामध्ये जुनी मंदिरे असावीत याची साक्ष देणारे भग्न अवशेष सर्वत्र दिसतात
जनकेश्वर महादेवाचे मंदिर देखील खूप सुंदर आहे
श्री जनकेश्वर महादेव
नर्मदा मातेच्या काठाने जाताना दूर वाळवंटामध्ये किंवा खडकामध्ये कुठेतरी साधना करीत बसलेला असा एखादा साधू पाहायला मिळणे हे अतिशय सर्वसामान्य दृश्य आहे . जनकेश्वर महादेवाच्या पुढे वाळूचा मोठा किनारा चालू होतो . मध्येच काही ठिकाणी असे खडक आहेत .

याच्यापुढे लागणारे कोटेश्वर महादेवाचे मंदिर देखील अतिशय सुंदर आहे ! या मंदिरामध्ये लोकांचा अधिक राबता असतो , त्यामुळे आपसूकच मंदिर स्वच्छ व सुंदर राहते .

प्रचंड उन्हामुळे अंग भाजून निघाले होते . माझ्याकडे असलेली सर्व वस्त्रे काही अंशी सुती होती तर काही अंशी कृत्रिम धाग्याने बनलेली होती . त्यातील कृत्रिम धागा उन्हामुळे खूप तापायचा आणि अंगाला चटके बसायचे . बरेच अंतर चाललो तरी कोणी दिसत नव्हते . अचानक एका शेतकऱ्याने सांगितले की डाव्या बाजूला एक आश्रम आहे तिथे जावे . त्याप्रमाणे मी आश्रम शोधत तिथे आलो हा आसाराम बापूंचा आश्रम होता आणि तिथे एक बंगाली साधू कृष्ण मंदिराची सेवा करत राहिला होता . त्याने लिटर भर सुंदर असे ताक बनवून मला अतिशय प्रेमाने पाजले . त्या ताकामुळे शरीराचा दाह शांत झाला . डोके देखील गार पडले . बराच माल मसाला टाकला होता . त्याने मला सांगितले की असे ताक तुला पुन्हा कुठेही प्यायला मिळणार नाही ! आणि ते खरेच आहे . तशीच चव परत मला कुठेच प्यायला मिळाली नाही ! साधू सोबत आसाराम बापू सध्या कसे आहेत वगैरे विषयावर चर्चा केली . आसाराम बापू यांच्या आश्रमातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या वह्या मी महाविद्यालयामध्ये वापरायचो . सहा रुपयाला दोनशे पानी अर्धी वही व बारा रुपयास २०० पानी फुलस्केप वही मिळायची ! त्या काळात साध्या वह्या वीस पंचवीस तीस रुपयाला असायच्या . ह्या वह्यांमुळे पैसे वाचायचेच . त्या शिवाय त्या वहीच्या प्रत्येक पानावर काही ना काही सुविचार लिहिलेले असायचे ते वाचायला मला बरे वाटायचे . अशाच एका वहीवर पाहिल्यामुळे मी "यौवन सुरक्षा " नावाचे बापूंनी लिहिलेले पुस्तक आणले होते आणि ते पुस्तक आणल्यापासून माझ्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे हे मी नर्मदा मातेची शपथ घेऊन सांगतो ! अतिशय योग्य वयामध्ये ते पुस्तक माझ्या हातात पडले . हे सर्व साधूला सांगितले आणि मी पुढे निघालो . सगळीकडे दाट झाडी होती . माणसे कुठे दिसत नव्हती . दुपारी तसेही कोणी घराबाहेर पडत नाही . कोतरडी नावाच्या गावामध्ये मारुती मंदिराचे दर्शन घेतले आणि गुप्तेश्वर महादेवांचे दर्शन घेतले .यातून आपल्या शरीराला जसा घाम येतो तसे पाणी निघते . हे पाणी निघताना मी प्रत्यक्ष पाहिले . हा एक चमत्कारच मानला पाहिजे ! 

अंगातून पाणी निघणाऱ्या गुप्तेश्वर महादेवाकडे जाणारा मार्ग .
इथे नर्मदा मातेचे जल अतिशय नितळ व सुंदर आहे . समोर व्यास बेट नावाचे वाळूचे प्रचंड बेट आहे . नर्मदा मातेची मोठी शाखा बेटाच्या पलीकडून वाहते तर छोटी शाखा आपण पाहत आहोत .
या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात चांदीची छत्रे लोकांनी वाहिलेली आहेत .

मोठ्या संख्येने घंटा देखील महादेवाला अर्पण केल्या जातात

थोडेसे अंतर चालत गेल्यावर एका उंच टेकाडावर एक वयस्कर माताराम हात करत आहेत असे दिसले . ह्या एक प्राध्यापिका होत्या आणि निवृत्तीनंतर आपली सर्व पुंजी पणाला लावून त्यांनी एक आश्रम बांधायला सुरुवात केलेली होती . प्राध्यापिका असल्यामुळे इंग्रजी उत्तम बोलत होत्या . मी त्यांना विविध आश्रमांमध्ये पाहिलेल्या काही सुविधा सांगितल्या ज्या इथे असणे आवश्यक आहे आणि काही अशा गोष्टी सांगितल्या ज्यांची आश्रमाला गरज देखील नाही . सुरुवातीलाच या गोष्टी नियोजनामध्ये आणल्या तर खर्च वाचेल हे माझे म्हणणे त्यांना पटले आणि त्यांनी तासभर मला बसवून ठेवले आणि माझ्याशी भरपूर गप्पा मारल्या . त्यांच्या माणसाला चहा करून आणायला सांगितले . त्या तर अर्ध्या  मुर्ध्या बांधून झालेल्या आश्रमामध्येच मुक्काम कर म्हणून माझ्या मागे लागल्या होत्या . परंतु मी त्यांना सांगितले की मला पुढे जाणे सोयीचे ठरेल . प्रत्यक्षामध्ये कारण असे होते की प्रोफेसर बाई घरी गेल्या असत्या परंतु तिथे ठेवलेल्या सेवेकर्‍याला गावातून माझ्यासाठी एकट्यासाठी जेवणखाण आणावे लागले असते .त्यापेक्षा पुढे असलेला बद्रिकाश्रम आता माझ्या टप्प्यामध्ये आहे असे माझ्या लक्षात आले होते . प्रोफेसर बाई खूप हुशार होत्या आणि योग्य वयामध्ये त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे असे मला वाटले . त्यांच्या आश्रमातून नर्मदा मातेचे खूप सुंदर दर्शन घडत होते . मला खात्री आहे की आता तो आश्रम खूप सुंदर झाला असेल . 


याच टेकडीवर प्राध्यापिका माताराम सोबत मी गप्पा मारत बसलो होतो . आता इथे चांगला आश्रम झाला आहे असे गुगल नकाशावरून दिसते .

आसाराम बापूंचा आश्रम अर्थात श्री राधाकृष्ण मंदिरापासून प्राध्यापक बाईंचा आश्रम म्हणजे श्री शिव रेवा धाम पर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला या नकाशामध्ये दिसेल . तसेच नर्मदा मातेच्या पातळ धारेच्या पलीकडे व्यास बेट दिसते आहे . याच्या पलीकडे मोठी धारा आहे .

इथून पुढे पुन्हा एकदा अरण्यमार्ग पकडला आणि एक पूल ओलांडत मृत्युंजय आश्रमात आलो . 

हा संपूर्ण परिसर आणि व्यास बेट कसे आहे हे आपल्या लक्षात यावे म्हणून हा नकाशा सोबत जोडत आहे .
व्यास बेट अतिशय प्रचंड असून त्याच्यावर वाळू शिवाय काहीच दिसत नाही !
प्राध्यापिका माताराम यांच्या आश्रमातून व्यास बेटाच्या पलीकडे श्रीरंग सेतू दिसायला सुरुवात होते .हा पूल पोईचा गावाला उत्तर तटाशी जोडतो . इथे स्वामीनारायण मंदिर आहे हे आपण पाहिले होते .
 हा पुल ओलांडल्याबरोबर मृत्युंजय आश्रम लागतो .

घनदाट अरण्यामध्ये वसलेला मृत्युंजय आश्रम हा अतिशय सुंदर आश्रम आहे . याचे मी बाहेरूनच दर्शन घेतले .

हा देखील अतिशय प्रसिद्ध आश्रम आहे . परंतु मला बद्रिकाश्रमातच जायची ओढ आतून लागली होती . त्यामुळे बदरिकाश्रमात आलो आणि पहिले पाऊल ठेवल्यापासूनच त्या आश्रमातील जबरदस्त स्पंदने अखंड मला जाणवत राहिली ! ही जागा अक्षरशः अदभूत होती ! १००% साधूंनी साधूंसाठी चालवलेला हा साधू प्रिय आश्रम होता .जिकडे पहावे तिकडे संन्यासीचा संन्यासी दिसू लागले ! या आश्रमाची व्यवस्था पाहणारे जे व्यवस्थापक होते ते देखील पूर्वाश्रमीचे मराठी असलेले संन्यासीच होते . मी गेल्याबरोबर नियमाप्रमाणे मुख्य व्यवस्थापकांना भेटून मुक्कामाची चौकशी केली . माझे चालणे बोलणे वागणे पाहून व्यवस्थापकांनी मला एक स्वतंत्र खोली दिली .जी शक्यतो फक्त साधू किंवा संन्याशी यांनाच दिली जाते .कारण माझ्या आसपासच्या प्रत्येक खोलीमध्ये सर्वत्र केवळ संन्यासीच होते . सोळा क्रमांकाची खोली मला मिळाली होती . खोलीतून नर्मदा मातेचे दर्शन होत होते . इथे भिलाडिया नावाचे दक्षिण तटावर नर्मदापुरम जवळचे जे एक गाव आहे तिथे राहणारा उमेश पदम नावाचा एक परिक्रमावासी मला भेटला . हा काही दिवस या आश्रमामध्ये राहिलेला होता . साधु वृत्तीने राहत होता . त्यामुळे त्याचे वर्तन पाहून त्याला संन्यासी महाराजांनी अधिक राहण्याची मुभा दिलेली होती . त्याच्याशी फार चांगला सत्संग मला घडला . पन्नाशीचा मनुष्य होता . ब्रह्मचारी होता . म्हणजे नुसता अविवाहित नव्हे , खरा ब्रह्मचारी होता . तसे असल्याशिवाय अशा ठिकाणी राहण्याची इच्छाच होणार नाही . या आश्रमातील स्पंदने इतकी वैराग्यपूर्ण होती की कोणालाही तिथे आल्याबरोबर संन्यास घेण्याची इच्छा व्हावी ! खोल्या अतिशय गरम होत्या त्यामुळे मी खोलीमध्ये गेलोच नाही . इथे समोर राहणारा एक नेपाळी संन्यासी वस्त्रांना काशय रंग देताना मला दिसला . यापूर्वी मी अद्वितीयानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या छाट्या कावेत कालवून गेरुवा अथवा भगव्या रंगाच्या करून दिल्या होत्या . परंतु या संन्याशाची पद्धत वेगळी होती . मला उत्सुकता आहे हे पाहिल्यावर त्याने मला सोबत घेतले आणि आम्ही दोघांनी मिळून बऱ्याच छाट्या रंगवल्या . त्यासाठी एक नवीन प्रकारचा रंग आजकाल मिळतो . तो रंग कुठला वापरायचा आणि साधू लोक संन्यासी लोक छाटीसाठी वस्त्र कुठले वापरतात ,कापड कुठले वापरतात ,ही सर्व माहिती त्यांनी मला सांगितली आणि मला देखील तसेच वस्त्र घेऊन पुढची परिक्रमा करण्याची सूचना केली .कारण आता उन्हाळा सुरू झाला होता आणि माझ्याकडे असलेली वस्त्रे उन्हाळ्यामध्ये कामाची नाहीत हे साधूने बरोबर ओळखले होते . वस्त्र रंगवण्याच्या पद्धतीमध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या . सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंग किती प्रमाणात बसला पाहिजे . दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो सगळीकडे एकसारखा बसला पाहिजे . काही ठिकाणी कमी व काही ठिकाणी गडद असे चालणार नाही . तसेच मध्ये अधे पांढऱ्या रंगाचे ढग आलेले देखील चालणार नाहीत . रंग दोन्ही बाजूने एक सारखा बसला पाहिजे . रंग एक सारखा बसण्यासाठी एका विशिष्ट तापमानाला पाणी गरम करावे लागते . छाटी विशिष्ट प्रकारे पिळावी लागते . हे सर्व मला त्या साधूने शिकवले . नंतर त्या छाट्या वाळत कशा घालायच्या ते देखील शिकवले . कारण वाळत घालताना सुद्धा रंगाचे ओघळ दिसू शकतात . असे सर्व शिक्षण झाल्यावर मी उमेश पदम यांच्याबरोबर नर्मदा मातेच्या काठावर बसून अप्रतिम असा सत्संग केला . तुम्हाला समोर कुठली व्यक्ती भेटते त्यानुसार तुम्ही कसे व्यक्त होणार ते ठरत असे . संत कबीरांचा एक दोहा प्रसिद्ध आहे .

सज्जन को सज्जन मिले, होवे दो दो बात। 

गधडे को गधडा मिले, खावे दो दो लात।। - संत कबीर.

या न्यायाने प्रस्तुत लेखक रुपी गाढवाला उमेश पदमरूपी सज्जन भेटला ! त्यामुळे चांगली श्रवण भक्ती घडली . तो आश्रमात काही दिवस राहिलेला असल्यामुळे इथल्या सगळ्या पद्धती आणि वेळा त्याला माहिती होत्या . सेवेला सोयीचे जावे अशी एक खोली त्याला देण्यात आली होती . माझी खोली वर एका कोपऱ्यात होती परंतु याची खोली अगदी आश्रमाच्या खालीच होती . हा आश्रम फारच मोठा होता . आणि जिकडे बघावे तिकडे विविध प्रांतातले विविध वयोगटाचे साधू फिरताना दिसत होते . प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रचंड शांतता विलसत होती . मला जणू काही मी एखाद्या पौराणिक काळातल्या ऋषीमुनींच्या आश्रमात आलो आहे की काय असा भास होऊ लागला ! इथून हलावेसेच वाटेना ! चातुर्मास करण्यासाठी हा एक अतिशय उत्तम आश्रम आहे !  इथे मगरी देखील भरपूर होत्या . बसल्या बसल्या आम्हाला मगरींनी सुद्धा दर्शन दिले . संध्याकाळी आरती उपासना वगैरे झाली . रात्री पुन्हा एकदा आम्ही गप्पा मारत बसलो . खोलीमध्ये गरम होत असल्यामुळे गच्चीमध्येच झोपलो . मला अंगावर पांघरूण घेण्याची सवय नाही . त्यामुळे कितीही उघड्यावर झोपलो तरी पांघरूण काही मी घेत नाही . परिक्रमे मध्ये या सवयीचा फार फायदा झाला . पांघरुणा वाचून कुठे अडले नाही ! नर्मदा मातेची मायेची पांघर सतत असायची . त्यामुळे वेगळे पांघरूण पांघरण्याची गरजच नव्हती ! गादीवर झोपण्याची देखील मला सवय नाही . त्यामुळे परिक्रमेत चांगलेच फावले ! रात्री खूप छान झोप लागली ! उघड्यावर झोपण्यातला आनंदच वेगळा आहे ! नर्मदा मातेचा प्रत्यक्ष सहवास जाणवतो ! 

बदरिकाश्रम परिसराचे जरा दर्शन आता घेऊयात आणि पुढे निघुयात 

बद्रिकाश्रमातून दिसणारे मैयाचे सुंदर रूप
इथे श्री बद्रीनारायणाचे तसेच नारायणेश्वर महादेवाचे मंदिर आहे अशा प्रकारे या आश्रमाने हरिहर ऐक्य साधलेले आहे !
आश्रमामध्ये साधूंच्या निवासासाठी ही एक इमारत आहे . अशा अनेक इमारती इथे निर्माण करण्यात आलेल्या आहेत .
उजवीकडे बद्रीनारायणाचे मंदिर दिसत आहे तर डावीकडे ठेवलेल्या बाकड्यांवर बसून मी आणि उमेश पदम गप्पा मारत बसलो होतो .
नारायणेश्वराचे शिवलिंग अतिशय तुळतुळीत व सुंदर आहे ! कृष्णधवल रंगामुळे ते उठून दिसते !
अलीकडे या आश्रमाच्या काठावर कोणीतरी अति भव्य अशा हनुमंत राया आणि अर्धनारी नटेश्वराच्या मूर्ती उभ्या केलेल्या आहेत . मी गेलो तेव्हा या मूर्ती नव्हत्या. दुर्दैवाने अशा मूर्ती नर्मदा मातेच्या काठावर फारशा टिकत नाहीत असा इतिहास आहे . तिचे महापूर भयंकर असतात .
बद्रिकाश्रमाचा पत्ता आणि टेलिफोन क्रमांक जिज्ञासूंसाठी देत आहे .
या आश्रमाचे काय महात्म्य आहे ते इथे लिहिलेले आहे . 
लवकरच या दोन्ही मूर्ती नर्मदामाता आपल्या कवेमध्ये घेणार असे स्पष्टपणे दिसते आहे ! इथे मातीचा किनारा असल्यामुळे कुठलेही पक्के बांधकाम टिकत नाही ! अर्धा अधिक घाट आधीचाच वाहून गेलेला आहे !
आपल्या महाराष्ट्रामध्ये त्रिशूल दिसत नसले तरी नर्मदे काठी मात्र प्रत्येक मंदिरामध्ये अजूनही असे त्रिशूल अर्पण करायची पद्धत आहे . आपणही आपल्या घरामध्ये त्रिशूल ठेवू शकतो कारण तो हिंदू धर्मातला पूजनाचा अविभाज्य भाग आहे . त्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही .
बद्रिकाश्रमाचे अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज असून कोठारी स्वामी ब्रह्मचारी अमृतानंद महाराज आहेत यांचे संपर्क क्रमांक इथे दिलेले आहेत .
स्वामी ब्रह्मानंद जी महाराज यांच्या नावाने नर्मदा परिक्रमावासींसाठी चालवले जाणारे अन्नक्षेत्र म्हणजे साक्षात अन्नपूर्णेचा कृपाशीर्वाद आहे ! अतिशय सुग्रास असे भोजन तिथे आपल्याला दिले जाते .
संध्याकाळच्या वेळी बद्रिक आश्रमातून दिसणारे नर्मदा मातेचे रूप हे केवळ स्वर्गीय असते !
आश्रमामध्ये पाहण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत ते या पाटीवर लिहिलेले आहे .हे दर्यापुरा नावाचे गाव आहे .
संध्याकाळी आश्रमाच्या गच्चीवर बसून हे दृश्य तासंतास पाहिले आणि हृदयात साठवलेले आहे !
आश्रमाची माहिती देणारी पाटी आता नवीन स्वरूपात लावलेली . परंतु काहीही म्हणा जुने सोनेच ! जुनी पाटी वाचताना जाणवणारी सात्विकता या पाटीत जाणवत नाही . कारण तिथे हाताने लिहिणाऱ्या माणसाची तळमळ त्या लिखाणात उतरलेली असते .
नर्मदा नदीच्या घाटाकडे जायचा रस्ता दाखवणारी पाटी तुम्हाला मगरींपासून सावध राहण्याची सूचना देखील देते ! इथे खरोखरीच खूप मगरी आहेत .
आज-काल बद्रिकाश्रमापासून चाणोद परिसरामध्ये पंचकोशी परिक्रमा केली जाते त्याचा मार्ग कोणीतरी वाटेत लावलेला आहे .
बद्रिकाश्रमाचा मला माझ्या वहीमध्ये मिळालेला शिक्का
बद्रिकाश्रम हा इतका महत्त्वाचा आश्रम आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील इथे येऊन गेलेले आहेत आणि इथल्या महंतांच्या संपर्कामध्ये असतात .

धर्माचाऱ्यांनी राजकारणाचा आश्रय घ्यावा का किंवा राजकारण्यांनी धर्मामध्ये ढवळाढवळ करावी का याचा जर विचार करायचा ठरवले तर समर्थ रामदास स्वामींचे विचार याबाबतीत अत्यंत आदर्श ठरतात . ते अवश्य वाचावेत . समर्थ रामदास स्वामी सांगतात , 

पहिले ते हरिकथा निरूपण । दुसरे ते राजकारण ।

तिसरे ते सावधपण ।  सर्व विषयी ॥

चौथा तो अत्यंत साक्षेप । फेडावे नाना आक्षेप ।

अन्याय बहु अथवा अल्प । क्षमा करीत जाणे ॥

अर्थात ज्या महंताला धर्म रक्षण करायचे आहे आणि धर्माचा उद्धार करायचा आहे त्याने सर्वात पहिला आधार हरिकथा निरूपणाचाच घेतला पाहिजे परंतु हे करत असतानाच राजकारणाकडेही त्याचे लक्ष असावे व अत्यंत सावधपणे त्याने सर्वच गोष्टी कराव्यात ज्यात धर्माधिष्ठित राजकारण आवर्जून करावे . अतिशय प्रयत्नपूर्वक त्याने लोकांचे सर्व संदेह शंका फेडाव्यात आक्षेपांचे खंडन करावे आणि तरीदेखील आपलीच माणसे आहेत हे समजून छोटे असोत किंवा मोठे अपराध क्षमा करून या लोकांना धर्म कार्यामध्ये सहभागी करून घ्यावे .  बद्रिकाश्रमामध्ये अशा प्रकारचे राजकारण चालत असावे असे जाणवले . एकंदरीतच साधू जीवनामध्ये कसे राहावे हे शिकवणारा मैयाच्या काठावरील एक महत्त्वाचा आश्रम म्हणजे बद्रिक आश्रम होय ! इथून पुढे एक वेगळीच दुनिया पाहायला मिळणार होती ! इथपर्यंत मात्र अतिशय सात्विक धार्मिक आणि अध्यात्मिक वातावरण नर्मदा मातेच्या कृपेने पामराला लाभले ! नर्मदा मातेची कृपा असेल तर या जगात काय कठीण आहे ? 

रेवा माय तदा कृपा जरी करी ।

आम्हा उणे काय ते ।

जो जे वांछित तेची त्यास मिळते । 

ही शांतते वाहते ॥

नर्मदे हर !

अनुक्रमणिका 

मागील लेखांक 

पुढील लेखांक

वरील लेख दृक्श्राव्य स्वरूपात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लेखांक एकशे वीस समाप्त (क्रमशः)



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर