लेखांक ११९ : आश्रमांचे गाव मालसर इथला महामंडलेश्वरी कनकेश्वरी देवी आश्रम

  देरोली गावामध्ये बकुळ आश्रमात वानरांना भरपूर बिस्किटे चारली आणि पुढे निघालो. समोरच्या तटावर इंदोर वासणा ही गावे होती. नर्मदा मैया च्या पात्रामध्ये प्रचंड वाळू होती . आणि काठावर झाडी देखील भरपूर होती . वाळू माफियांनी या भागामध्ये एक अति धोकादायक रस्ता तयार केलेला आहे . दोन्ही बाजूंनी उंच उंच वाळूचे तट आहेत . चुकून माकून या रस्त्यावरून गाड्या जात असताना दोन्ही तट पाण्यामुळे ढासळले तर फार मोठा अपघात होण्याची शक्यता आहे . परंतु तरी देखील दिवस-रात्र या रस्त्यावरून सर्रास वाहतूक चालू आहे .

वाळू माफियांनी बनवलेला हाच तो धोकादायक रस्ता
या भागात नर्मदा मातेच्या काठावर अतिशय मोठी मोठी व सुंदर अशी "फार्म हाऊसेस " लोकांनी बांधलेली आहेत . इथे क्वचित कधीतरी धनिक लोक ऐशो आराम करण्यासाठी येतात . परंतु एरवी हा सर्व परिसर त्यांनी "केअर टेकर " कुटुंब व जातिवंत कुत्र्यांवर सोडलेला असतो . असाच एका फार्म हाऊसच्या जवळून जाताना अचानक कुंपणावरून उडी मारून एक मोठा जर्मन शेफर्ड कुत्रा बाहेर आला आणि माझ्या अंगावर धावून आला . या कुत्र्यांना चांगल्या दर्जाचे ट्रेनिंग दिलेले असते . त्यामुळे ट्रेनर ची इंग्रजी भाषा त्यांना लगेच कळते ! मी देखील त्या कुत्र्याला स्टॉप आणि सीट असे म्हटल्याबरोबर तो थांबला आणि खाली बसला ! कशी गंमत आहे पहा ! हाच कुत्रा जेव्हा भटका म्हणून निसर्गामध्ये फिरत असतो आणि स्वतःचे अन्न स्वतः शिकार करून शोधून मिळवत असतो तेव्हा तो फक्त स्वतःचे ऐकतो . परंतु त्याच कुत्र्याला कोणीतरी बिस्किटाचे किंवा हडूक चाटवण्याचे आमिष दाखवून जे हवे ते शिकवले की मग मात्र हाच कुत्रा जे म्हणाल ते ऐकू लागतो ! त्याला त्याच्या खऱ्या क्षमतांचा विसर पडतो ! तो कुत्रा अशा वेळी मालक ज्या व्यक्तीवर छूः म्हणेल त्याच्यावर भुंकू लागतो ! उठ म्हणले की उठू लागतो .बस म्हणले की बसू लागतो . अशा पाळीव कुत्र्यांचा वापर धनिक लोकांना चांगला करून घेता येतो . कृपया वाचकांनी वरील उदाहरणाचा वापर सद्यस्थितीतील राष्ट्रविरोधी राजकारण समजून घेण्यासाठी करू नये अशी विनंती आहे ! कारण कुत्रा हा कसाही वागला तरी प्रामाणिक असतो ! कुठल्यातरी कणाहीन व्यक्तींशी तुलना करून केलेला त्याचा अपमान प्रस्तुत लेखक सहन करणार नाही ! असो . कुत्रा जागेवर बसलेला पाहून त्या बंगल्याचा रखवालदार वेडाच झाला ! तो म्हणाला की पहिल्यांदा कुठल्यातरी परिक्रमा वासी वर हा कुत्रा भुंकलेला नाही ! नाहीतर तो यापूर्वी बऱ्याच जणांना चावलेला आहे ! मी रखवालदाराला सांगितले की अरे बाबा त्याला इंग्रजी भाषा कळते त्यामुळे तो माझं ऐकणारच ! ज्या भाषेत मनुष्याचे शिक्षण होते त्या भाषेत लिहिलेले साहित्य आणि त्या भाषेत दिल्या जाणाऱ्या सूचना त्याला फार जवळच्या वाटतात हे नेहमी लक्षात ठेवावे ! आपल्यापैकी बहुतांश लोकांना जर हे लिखाण आवडत असेल तर ते लिखाण उत्कृष्ट आहे असे त्याचे कारण नसून ते लिखाण मराठी भाषेमध्ये आहे एवढा एकच मुद्दा त्यासाठी पुरेसा आहे !  त्या फार्म हाऊस समोर एक पत्र्याची शेड केली होती व तिथे बसण्यासाठी खूप छान व्यवस्था केली होती . इथून खाली उतरण्यासाठी एक लोखंडी जिना देखील मालकाने बनवला होता . खालून चालण्यासारखा मार्गच नव्हता इतकी घनदाट झाडी खाली होती . म्हणूनच मी काही काळाकरता वर आलो होतो आणि या कुत्र्याने माझी वाट अडवली होती . इतक्यात तिथे एक गवळी आला आणि त्याने मला भरपेट दूध पाजले ! शुद्ध देशी गायींचे धारोष्ण दूध पिताना जो काही आनंद मिळाला तो वर्णनातीत होता ! दूध पिताना तो कुत्रा माझ्या शेजारीच बसला होता . मी त्याच्या डोक्यावरून अंगावरून व्यवस्थित हात फिरवत होतो .कुत्रा खरोखरीच जातिवंत होता . परंतु सवयीनुसार लाळघोटेपणाने माझ्या तोंडाकडे पाहत होता ! म्हणजे अशा प्रकारचे आपल्यावर भुंकण्यासाठी ट्रेन केलेले कुत्रे आपण देखील माणसाळवू शकतो हेच यातून मला शिकायला मिळाले ! फक्त त्यासाठी तुम्हाला इंग्रजी भाषा यायला हवी हे मात्र अनिवार्य आहे ! गवळी महाराजांनी दिलेल्या दुधामुळे पोटाला चांगला आधार मिळाला ! तसे बकुल आश्रमामध्ये चहा आणि बालभोग घेतला होता . परंतु नर्मदा परिक्रमा करताना सकाळी लवकर जितका आहार पोटात जाईल तितका तो चालण्यासाठी बल प्रदान करतो असे उगाच आपल्याला वाटत राहते ! एक मानसिक समाधान राहते की आता आपली "टाकी फुल " झालेली आहे ! इथून पुढे कोठीया नावाचे गाव गेल्यावर सुमारे १२ किलोमीटर पर्यंत फारसे मनुष्य वस्तीचे अस्तित्व दाखविणारे ठिकाण लागत नाही . फक्त शेजारी मैया आणि डाव्या हाताला जंगल !
या कोठिया गावामध्ये एका भव्य मंदिराच्या कळसाने माझे लक्ष वेधून घेतले म्हणून मी आत शिरलो . इथे एका अतिप्रचंड शिव मंदिराचे निर्माण सुरू होते . बडोद्याचे कोणीतरी या मंदिराची निर्मिती करत होते असे कळाले . मंदिराचा कळस अतिप्रचंड होता आणि हे सोमेश्वर महादेवाचे मंदिर होते . अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने मंदिराचे बांधकाम सुरू होते . मंदिराची बांधकामे जवळून पाहिलेली असल्यामुळे मला त्यामध्ये असलेल्या अडचणींची चांगली कल्पना आहे . याही मंदिराचे ८० टक्के काम पूर्ण झाले होते परंतु बहुतेक निधीच्या अभावी उरलेले काम रखडले आहे असे दिसत होते . त्यामुळे इतक्या प्रचंड वास्तूमध्ये इतस्ततः पडलेले कोरीव काम करून ठेवलेले दगड आणि मंदिराची अर्धवट बांधून झालेली वास्तू वगळता कोणीही नव्हते . अक्षरशः सुरक्षारक्षक देखील ठेवलेला नव्हता . मी संपूर्ण मंदिर फिरून त्याचे बांधकाम कसे चालू आहे याचा अभ्यास केला . मंदिरातील कोरीव काम विशेष सुंदर होते . सुदैवाने आत्ता गुगल नकाशावर शोधल्यावर असे लक्षात आले की आता हे मंदिर पूर्णत्वाला गेलेले असून इथे लोकांची ये जा देखील सुरू झालेली आहे . मंदिर फारच सुंदर आहे . या मंदिराचे काही फोटो गुगल नकाशावर मिळाले ते आपल्यासाठी सोबत जोडत आहे .


कोठीया गावामध्ये नवीनच बांधण्यात आलेले श्री सोमेश्वर महादेवाचे अप्रतिम देवालय


श्री सोमेश्वर महादेव

मंदिरातील अप्रतिम कोरीव काम


मंदिराच्या कळसावरील ध्वजा बसवितानाचे हे चित्र आहे जे पाहिल्यावर तुम्हाला मंदिराच्या कळसाच्या आकाराची व मंदिराच्या आकाराची कल्पना यावी.


सोमेश्वर महादेवाचे मंदिर थोडेसे बाहेर आहे परंतु कोठिया गावाच्या मधोमध चंद्रमौलेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्याचे देखील दर्शन घेतले

इथून पुढे मैयाच्या वळणावर रणापुर नावाचे गाव आहे. नर्मदा मैयाच्या काठावरील अन्य सर्व गावांप्रमाणे हे देखील एक छोटेसे, स्वयंसिद्ध ,टुमदार गाव आहे.या गावांमध्ये कंबोकेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्याचे वैशिष्ट्य असे की जगातील फक्त याच शिव मंदिरामध्ये शंख जलाने महादेवांना अभिषेक करता येतो.  अन्यत्र कुठे असा करता येत नाही.  ही माहिती नर्मदा परिक्रमेचे जे छोटेसे पुस्तक माझ्यासोबत होते त्यामध्ये आत्म कृष्ण महाराजांनी लिहून ठेवलेली आहे.  त्याप्रमाणे मी महादेवांना मंदिरात ठेवलेल्या शंखाने अभिषेक केला.  महादेवाची स्तवने नेहमीप्रमाणे या मंदिरामध्ये गायली. मंदिर जुने व साधे होते.  आता बहुतेक ग्रामस्थांनी याचा जीर्णोद्धार सुरू केला आहे असे दिसते.

कंबुकेश्वर महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी तिथे शंख ठेवलेला आहे

कंबुकेश्वराला जलाभिषेक करताना एक माताराम

या गावात अजून काही मंदिर आहेत. रणछोड राय बलराम यांचे एक मंदिर आहे यातील विग्रह खूप सुंदर आहे.

श्री रणछोड राय आणि बलराम भैया यांचे विग्रह

त्याचबरोबर केसरिया हनुमंताचे मंदिर आहे जे अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेले आहे .

केसरिया हनुमंताचे मंदिर

या गावातून बाहेर पडताना मैयाच्या काठावर एक भव्य पिंपळाचे झाड आहे तिथून मैयाचे भव्य दिव्य वळण फारच सुंदर दिसते अतिशय मनमोहन असे हे दृश्य आहे. समुद्राला अर्पण होण्यापूर्वी नर्मदा मातेची जी मोठी वळणे आहेत त्यातील हे एक महत्त्वाचे वळण आहे. हे दृश्य इतके भव्य दिव्य आहे की आपल्याला आपल्या मनाचा व देहाचा विसरच पडतो.  आपले अस्तित्व तिच्या त्या भव्यते पुढे शून्य होऊन जाते.

रणापुर गावातून होणारे नर्मदा मातेच्या वळणाचे भव्य दिव्य दर्शन

या भागामध्ये मला एक वनस्पती सर्वत्र आढळली. हिची पाने औदुंबराच्या पानांसारखी होती परंतु आकाराने खूप मोठी होती. तसेच हिचे लाकूड देखील औदुंबरा सारखेच वाटायचे .परंतु हे झाड वृक्षासारखे वाढत नसून थोडेसे खुरटे राहते आणि या झाडाची वाढ देखील प्रचंड वेगाने होते असे मला जाणवले. सुदैवाने गुगल नकाशा व या झाडाचा एक फोटो सापडला. वृक्षतज्ञांनी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

 

हीच ती औदुंबरा सारखी दिसणारी वनस्पती जी नर्मदा खंडामध्ये भरपूर सापडते


या गावातून बाहेर पडताना काठावरती मला एक असा आश्रम सापडला जो पूर्णपणे बंद पडलेला आहे.  हे एक असे अन्नक्षेत्र होते जिथे एकेकाळी खूप सुबत्ता असावी असे पाहिल्यावर जाणवत होते परंतु अचानक तो आश्रम सोडून कोणीतरी निघून गेले असावे त्यामुळे त्या आश्रमाची पुरती रया गेली होती. नर्मदा खंडामध्ये जाऊन आश्रम स्थापन करण्याची इच्छा अनेकांना असते त्या लोकांनी नेहमी लक्षात ठेवावे की आश्रमाकडे लक्ष दिले नाही तर त्याची अवस्था अशी देखील होऊ शकते.  त्यापेक्षा आहे त्या आश्रमांना बळ देणे कधीही श्रेष्ठ. या विषयावर भरपूर चिंतन करून माझे एक गुरुबंधू श्री मिलिंद भारदे नगर यांनी एक उपाय शोधून काढलेला आहे .त्यांनी दुचाकी वर नेता येणारा आश्रम आणि चार चाकी मध्ये बनविलेला कॅराव्हॅन सारखा फिरता आश्रम असे दोन आश्रम तयार केलेले आहेत. त्यामुळे हे आश्रम चालक चक्क तो आश्रम चालवत जिथे गरज आहे अशा ठिकाणी नेऊन उभा करू शकतात .आणि तिथून चहा बालभोग किंवा भोजन प्रसादी याची व्यवस्था परिक्रमावासिया साठी करू शकतात. निवासासाठी या गाडीमध्ये तंबूंची व्यवस्था केलेली असते. असो.

इथून पुढे दिवेर नावाचे गाव लागते म्हणजे गाव आपल्याला दिसत नाही परंतु वाळूचा प्रचंड मोठा किनारा या गावाला लाभलेला आहे आणि या किनाऱ्याची स्थानिक लोकांनी बीच करून टाकलेली आहे. त्यामुळे एका बीचवर चालतात त्या सर्व घडामोडी येथे देखील चालतात. सुदैवाने भर उन्हाची वेळ असल्यामुळे मी तिकडून जाताना तिथे कोणीच नव्हते परंतु संध्याकाळी मात्र इथे पाऊल ठेवायला जागा नसते असे गुगल वरील फोटो पाहिल्यावर लक्षात आले, आणि लोकांनी केलेला कचरा देखील तेच सांगत होता. इथे उंट आहेत, घोडे आहेत ,वाळवंटात चालवायच्या गाड्या आहेत, नौका आहेत ,पाण्यात खेळण्यासाठी विविध प्रकारची तरंगणारी खेळणी आहेत, खाण्यापण्याची रेलचेल आहे. इतकेच काय इथे पॅराग्लाइडिंग देखील चालते! परंतु मी जाताना मात्र ही संपूर्ण बीच रिकामी होती आणि एका रांगेत बांधलेली तात्पुरती तंबू वजा दुकाने वगळता येथे काहीच दिसत नव्हतं. इथला वाळूचा किनारा संपृक्त होता. त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाळू होती.


दिवेरच्या किनाऱ्यावरील दुकाने पर्यटक वाळू आणि कचरा



अतिशय निर्दयीपणाने तिथल्या दुकानातून प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तू खरेदी करून लोक नर्मदा मातेमध्ये फेकून देतात. सरकारने किमान नर्मदा खंडामध्ये प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणावी असे फार वाटते.


अशा स्वार्थी लोकांच्या गर्दीमध्ये जेव्हा एखादे देवभक्त बालक अशा प्रकारे नर्मदा मातेच्या काठावर बसून परमेश्वराची उपासना करताना दिसते तेव्हा ते चित्र फार आश्वासक वाटते! अशी अनेक बालके मी परिक्रमेमध्ये पाहिली . हे केवळ एक प्रातिनिधिक चित्र आहे


खऱ्या देवभक्ताला पूजेसाठी फार कोरीव काम असलेल्या मूर्तीची गरज नसते तर वाळूतून बसल्या बसल्या त्याने निर्माण केलेले एखादे शिवलिंग देखील शिवस्वरूप बनून ती पूजा स्वीकारते !


हा वाळूचा किनारा इतका मोठा आहे की इथे हौशी पॅराग्लायडिंग सुद्धा चालते. पॅराग्लायडर ना उड्डाण करण्यासाठी लागणारी सपाट, लांब ,सुरक्षित व मऊशार जागा येथे उपलब्ध आहे.


इथे इतकी वाळू आहे की कितीही खोल गेले तरी वाळू संपत नाही!  नर्मदा मातेचे पाणी उतरल्यावर तुम्हाला इथे किती वाळू आहे त्याचा अंदाज येतो!


धर्मांतरण केल्यामुळे किंवा श्रद्धेचा लय झाल्यामुळे लोकांनी घराबाहेर काढलेले देवदेवतांचे फोटो ,प्रतिमा, मूर्ती व देव्हारे यांचा ढीग आपल्याला नर्मदे काठी सापडतो. हे चित्र मनाला फार वेदना देणारे आहे.

चालताना जपून चालावे लागत होते. पाणी अतिशय म्हणजे अतिशय स्वच्छ होते त्यामुळे अगदी पाच दहा फुटापर्यंतचा तळ दिसत होता. वाळूचा उतार पाण्यामध्ये होता. परंतु मागे आपल्याला सांगितले त्याप्रमाणे जिथे भूमिगत जलप्रवाह असतो तिथली वाळू फार भुसभुशीत झालेली असते. असा वाळूचा एक टापू मला लागला जो बराच मोठा होता. मी तिथून पुढे गेलो आणि माझ्या लक्षात आले की काही वयस्कर माताराम ज्या बस परिक्रमेमध्ये असाव्यात, त्या स्नानासाठी त्याच ठिकाणी निघाल्या होत्या. मी धावत जाऊन त्यांना अडवले आणि स्नानासाठी योग्य जागा दाखवली. त्या सर्वांनी परिक्रमावासी म्हणून मला नमस्कार केला. तिथून मी पुढे निघालो. रात्री कपडे फारसे वाळत नाहीत कारण नर्मदा मातेच्या काठावर बऱ्यापैकी आर्द्रता असते. त्यामुळे न वाढलेले कपडे मी झोळीला लटकवून ठेवत असे. लंगोटी, गमछा आणि भरूच मध्ये मला मिळालेले जॉकी चे अंतर्वस्त्र असे सर्व नेहमी माझ्या झोळीला लटकलेले असे. या निमित्ताने एक सूचना करावीशी वाटते. आयुष्यामध्ये नेहमीच ही सवय असावी ती म्हणजे आपली सर्व वस्त्रे व अंतर्वस्त्रे स्वच्छ व कोरडी असावीत. परिक्रमेमध्ये तर कटाक्षाने सर्व वस्त्रे कोरडी राहतील याची काळजी आपण घ्यावी. आधीच भरपूर चालल्यामुळे प्रचंड घाम येत असतो.  त्यात मध्ये अनेक जलस्त्रोत पार करावे लागतात.त्यामुळे नेसलेली वस्त्रे ओली होतात. ती कडकडीत वाळवावीत अन्यथा ते त्वचा रोगांना आमंत्रण ठरू शकते. अशा रीतीने मी जात असताना दुकानांच्या ज्या राहुट्या पडलेल्या होत्या त्यामध्ये बसलेल्या एका केवट मुलाने माझे चित्रीकरण सुरू केले. मी जात असताना त्याने एक छोटासा व्हिडिओ घेतला. आणि मला हाक मारून माझा फोन नंबर विचारू लागला. माझ्याकडे फोन नाही हे कळल्यावर मी सांगितलेल्या माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी तो व्हिडिओ पाठवून दिला. लाव रे तो व्हिडिओ!

नर्मदा माईच्या काठाकाठाने चालताना खूप काळजी घ्यावी लागते. चालताना तुमच्या पायाचा चुकूनही तिला स्पर्श होऊ नये याची काळजी घ्यावी. चुकून स्पर्श झालाच तर लगेच तिला नमस्कार करावा. काही लोकांना चालताना विनाकारण थुंकायची सवय असते. त्यांनी अपरंपार काळजी घ्यावी की आपली थुंकी मैया मध्ये पडू नये.हे ऐकायला तुम्हाला किळसवाणे वाटेल परंतु मी जे प्रत्यक्ष पाहिले आहे त्यावरून लिहीत आहे. विशेषतः वाळूतून चालताना डावीकडची वाळू प्रचंड तापलेली असायची. उजवीकडे नर्मदा मातेचे शीतल जल असायचे. मध्ये तुम्हाला पाय ठेवण्यासाठी फूटभराचा एक अरुंद ओलसर पट्टा मिळायचा. त्याच्यावरून तोल सांभाळत चालावे लागायचे. वरील व्हिडिओमध्ये तुम्हाला शंकर महाराज अमरावती यांचा अंगरखा मी घातलेला दिसेल. या अंगरख्याला परिक्रमा घडवून आणावी असे मला बाळासाहेब वाल्हेकर यांनी सांगितले होते. प्रत्यक्षामध्ये जणू काही तो अंगरखाच मला परिक्रमा घडवत होता कारण तो एका साक्षात्कारी सत्पुरुषाचा अंगरखा होता. अंगरखा या नावातच त्याचे काम आलेले आहे! अंगाची राखण किंवा रक्षण करणारा तो  अंगरखा! त्याच्या खिशामध्ये तुम्हाला लटकणाऱ्या ज्या वस्तू दिसत आहेत ती मला सापडलेली शिवलिंगे आहेत. पाठीवर लंगोटी गमछा आणि  अंतर वस्त्र वाळत घातलेले आहे. झोळीच्या एका बाजूला कमंडलू रुपी थर्मास ठेवलेला आहे. गळ्यामध्ये एक वस्त्र अडकवलेले आहे. होळीच्या वजनाने खांदे दुखू लागले की हे वस्त्र मी खांद्याखाली घेत असे. एक छाटी अंगावर एक छाटी डोक्यावर आहे. पायात ज्योतिबेन यांनी दिलेले नवीन बूट आहेत. मुखामध्ये सद्गुरूंनी दिलेले नाम आहे. डोळ्यांमध्ये नर्मदा मातेचे रूप अखंड साठवले जात आहे! चित्तामध्ये तिचाच ध्यास आहे ! हातातली काठी किंवा दंड अखंड नर्मदा मातेच्या स्पर्शाने ओला राहील याची काळजी  सतत घेतली जात आहे. बाजूला कोणी चित्रीकरण करत आहे याचे देखील भान मला चालताना नव्हते. त्या मुलाने हाक मारून थांबवल्यामुळे मला कळाले व्हिडिओ घेतो आहे.

खिशामध्ये गोळा झालेली शिवलिंगे मी नंतर ज्या कुठल्या आश्रमात जाईन तिथे बाहेर काढत असे. त्यातील चांगली चांगली वाटणारी शिवलिंगे दत्तराज ठेवत असे. बाकीची त्याच आश्रमात एखाद्या झाडाखाली ठेवून देत असे. आश्रमात येणारे भाविक भक्त ही शिवलिंगे घरी घेऊन जात आणि पूजेमध्ये ठेवत. कारण जिथे आश्रमातील भक्तांचा मानवी वावर असतो अशा ठिकाणाची शिवलिंगे संपलेली असतात आणि मला सापडणारी शिवलिंगे ही नर्मदे काठच्या अतिशय दुर्गम भागामध्ये सापडलेली असायची. त्यामुळे ती माझ्यासाठी जरी अति संख्या झाल्यामुळे फारशी उपयुक्त नसली तरी लोकांसाठी परमपूज्य असायची. या शिवलिंगांचा प्रचंड भार माझ्या पाठीवर दिवसेंदिवस वाढत गेला व मी देखील तो वाढू दिला कारण त्या जबरदस्त वजनामुळे माझे पाय कधीही हवेत गेले नाहीत तर कायम घट्ट जमिनीमध्ये रोवले गेले. परिक्रमा संपली त्यावेळी माझ्या झोळीचे वजन पंचवीस किलो झालेले होते! आणि यात वस्त्रे पाहायला गेले तर दोन-तीनच होती! बाकी सर्व वजन शिवलिंगांचेच होते! एखाद्या आश्रमामध्ये गेल्यावर माझी झोळी कोणी उचलायचा प्रयत्न केला तर आवर्जून मला विचारायचे की एवढे जड काय ठेवले आहे झोळीमध्ये !

लोकांच्या झोळीचे सरासरी वजन सात आठ किलो ते जास्तीत जास्त दहा-बारा किलो असायचे. त्यापेक्षा अधिक वजन सोबत घेऊन देखील नये नाहीतर चालताना त्रास होतो.

असो, तर अशा रितीने त्या समुद्रकिनाऱ्यासारख्या मऊशार वाळूतून चालत चालत काठाने पुढे जात राहिलो. वाटेमध्ये नर्मदा मातेचे स्वच्छ निर्मल जल आकंठ प्यायलो. आता घनघोर अरण्याचा मार्ग लागला इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मगरी आहेत आणि मैयाच्या काठावर खाज खुजली ची जंगले आहेत. दक्षिण तटावर असताना ह्याच भागामध्ये आम्हाला खाज खुजलीने हैराण केलेले होते! मी आणि चंदन खाज खुजली मुळे मेटाकुटीला आलो होतो तो भाग समोर मला दिसत होता! उत्तर तटावरून चालण्याची एक वेगळीच मजा असते! तुम्ही दक्षिण तटावरून पार केलेली स्थाने तुम्हाला समोर दिसत असतात आणि ती काहीतरी वेगळीच वाटतात. कारण तुम्ही त्यांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असता! हळूहळू खाज खुजली चे प्रमाण वाढू लागले. तिने याही तटावर आपला पराक्रम मला दाखविलाच! माझ्या सर्वांगाला प्रचंड खाज सुटली होती.त्यात डोक्यावरील उन्हाचा तडाका वाढू लागला आणि मगरींच्या अस्तित्वामुळे मैयाच्या काठावर जाऊन पाणी पिणे अवघड होऊ लागले. पुढे रस्ता बंद झाला त्यामुळे कठीण वाटेने चढत शेतातला एक मार्ग पकडला. आईने उन्हातून चालताना कुठे जर थोडे पाणी प्यायला मिळाले तर बरे होईल असे वाटत असतानाच एका गोशाळेसमोर आलो. एका बडोदेकर संतांनी इथे ४१ गाईंचा सांभाळ करणारी गोशाळा उभी केली होती आणि तिथे गाईंची व्यवस्था पाहायला दोन भावांची कुटुंबे नियुक्त केलेली होती. नोकराने गोशाळेमध्ये बोलावले आणि बसायला सांगितले. इथे गाईंना पाणी पाजण्याचा एक मोठा हौद होता. मी माझ्या सर्वांगाचा झालेला दाह या गाईने उष्ट्या केलेल्या पाण्याने शांत केला. माझ्या झोळीमध्ये इतके जड काय ठेवले आहे असे त्या कामगाराने मला विचारल्यावर मी त्याला मैया मध्ये मला सापडलेली तैरती शीला काढून दाखवली आणि त्याने मला ती शीला हौदामध्ये तरंगून दाखवण्यास सांगितली. मी त्याला दाखवत असताना त्याने एक छोटासा व्हिडिओ बनवला. नंतर मी त्याला तो व्हिडिओ मित्राच्या क्रमांकावर पाठवण्यास सांगितले. मी ही शिळा पाण्यामध्ये कशी तरंगते हे दाखवत असताना त्या कामगाराची छोटीशी मुलगी तिथे हौदाच्या काठावर बसून कौतुकाने सर्व पाहत होती! नंतर देखील मी त्याने केलेला फोडणीचा भात आणि चहा ग्रहण करताना त्याची मुले माझ्या अंगा खांद्यावर खेळत राहिली! या कामगाराने बडोद्यातील त्या संतांची खूप चांगली माहिती मला सांगितली. जेव्हा नोकर मालकाविषयी चांगले बोलत असतो तेव्हा तो मालक खरोखरच खूप चांगला मनुष्य असतो असे ओळखायला हरकत नसते!

त्या कामगारांनी घेतलेला व्हिडिओ आपल्या करता खाली देत आहे आहे.

हाच तो गो शाळेत घेतलेला तरंगणाऱ्या दगडाचा/ विटेचा व्हिडिओ.

तरंगणारा दगड तपासून पाहताना गोशाळेतील कामगार आणि छोटी मैया

त्याने त्याच्या सर्व नातेवाईकांना बोलावून हा दगड कौतुकाने दाखवला


नर्मदा मातेचे भव्य पात्र ,त्याच्या शेजारी हिरव्या रंगाच्या बाणाने दाखवलेली खाज खुजली ची जंगले आणि लाल बाणाने दाखवलेली बडोद्याच्या संतांची गोशाळा

खाज खुजली ने आपला प्रताप दाखवलेला असल्यामुळे आणि पुढे

शेवटपर्यंत तिचेच जंगल दिसत असल्यामुळे मी शेतातल्या मार्गाने

चालत मालसर गाव गाठले.

वाटेमध्ये तुम्हाला भेटणारे परिक्रमा वासी एखाद्या गावाबद्दल किंवा

एखाद्या आश्रमा बद्दल माहिती सांगत असतात. विशेषतः मी

परिक्रमा जबलपूर या अनवट घाटावरून सुरू केलेली असल्यामुळे

मला भेटणारे परिक्रमा वासी हे अर्धी अधिक परिक्रमा पूर्ण केलेलेच

भेटायचे. त्यामुळे ते मला काही गावांबद्दल किंवा आश्रमा बद्दल

माहिती देऊन ठेवायचे.  नाही म्हटले तरी या स्मृती योग्य वेळी योग्य

गाव आल्यावर आपोआप जागृत व्हायच्या.  मला सारंग देव या

मुंबईच्या मुलाने सांगितले होते की तू मालसर या गावांमध्ये गेलास

की तुला ३० पेक्षा अधिक आश्रम दिसतील आणि सर्वजण तुला

मुक्कामासाठी बोलावतील परंतु तू कनकेश्वरी माताजी यांच्या

आश्रमामध्येच मुक्काम कर.  का ते त्याने सांगितले नाही परंतु जा

एवढे नक्की सांगितले. अखेरीस असा आणि मालसर

या दोन गावांना जोडणारा एक पूल माझ्या डोक्यावरून गेला.



असा आणि मालसर या गावांना जोडणारा नर्मदा मातेवरचा पूल आणि उत्तर तटावरील खाज खुजली वनस्पती युक्त घनदाट झाडी


या पुलाखालून चालत मालसर गावांमध्ये दाखल झालो.एकाच

गावामध्ये ३० पेक्षा अधिक आश्रम असणे हेच माझ्यासाठी

आश्चर्यकारक होते! कारण आतापर्यंत कुठल्याच गावात इतके

आश्मी पाहिले नव्हते. इथे मला सर्व ३० आश्रम काही पाहा

यला मिळाले नाहीत परंतु गावात आश्रम भरपूर होते एवढं नक्की.

उन्हाने भाजून आणि खाज खुजली मुळे थकून मी या गावात

आलो होतो.

मला कधी एकदा कुठेतरी आसन लावतो असे झाले होते.

असा म्हणजे तेच गाव जिथे दगडू महाराज प्रेरित अखंड रामनाम

धून चालायची आणि जिथे कुत्र्यांनी माझ्यावरती पहिल्यांदा हल्ला

केला होता.गावामध्ये आल्यावर मला एका हात गाडीवाल्याने

सुंदर अशी केळी खायला दिली. ती खाल्ल्यामुळे पोटाला थोडासा

आधार आला. इतक्यात अजून एका हात गाडीवाल्याने मला

बोलावून घेतले आणि एक अखेर कलिंगड कापून मला खायला

लावले! अगदी समोर बसून आग्रहपूर्वक त्याने संपूर्ण कलिंगड

मला खाऊ घातले! परिक्रमेमध्ये तुमची भूक राक्षसा सारखी

झालेली असते!  मी अर्धा डझन केळी आणि एक मध्यम आकाराचे

अख्खे कलिंगड एकट्याने फस्त केले! बहुतेक मला खाताना बघून

आजूबाजूला जमलेले लोक हसत असावेत! परंतु मला

त्यांच्याशी काही देणे-घेणेच नव्हते ! आपल्याला देणारा  मैया च्या

नावाने देत होता आणि आपण मैया च्या नावाने घेत होतो!

घेतले नाही तरी पंचायत होते हा अनुभव असल्यामुळे नाही

म्हणायचा विषयच नव्हता. आयुष्यात आपण बऱ्याच वेळेला

स्वतःची बुद्धी पणाला लावून समोर आलेल्या संधींना नाही नाही

असे म्हणत नाकारत असतो.  देव सर्वांना समान संधी देतो असे

माझे मत आहे . फार कमी लोक आहेत जे योग्य संधी ओळखून

ती स्वीकारतात. आपण स्वतःचे डोके लावले की देवाची कृपा

आपण नाकारत असतो. याचा अर्थ स्वतःचे डोके लावूच नाही

असे नाही. योग्य वेळी आता स्वतःचे डोके लाव अशी बुद्धी

देखील देवच तुम्हाला देत असतो! आता देव म्हणजे त्याला तुम्ही

काहीही नाव द्या, परंतु विश्वाची नियंती किंवा नियंत्रण करणारी

शक्ती असा अर्थ मला अपेक्षित आहे. या मालसर गावांमध्ये खूप

सारे आश्रम होते.परंतु कलिंगड वाल्या माणसाने देखील मला

कनकेश्वरी देवीच्या आश्रमात जा असे सांगितले. किंबहुना त्याने

आश्रमाचे नाव सांगितल्यावरच मला सारंगदेव ने

ही कनकेश्वरी देवी आश्रम सुचविल्याचा प्रसंग आठवला होता.

योगानंद आश्रम, अवध नारायण आश्रम,कच्छी

सेवा आश्रम,अंगारेश्वर /मंगलनाथ मंदिर, पांडेश्वर महादेव

तीर्थ ,अंबिका माता मंदिर, प्रेमानंद आश्रम, सत्यनारायण मंदिर,

संत माधव दासजी तथा डोंगरे जी महाराज समाधी मंदिर ,

श्रीधाम आश्रम ,गजानन महाराज आश्रम ,साईबाबा मंदिर,

पंचमुखी हनुमान मंदिर नाग मंदिर ब्रह्मकुमारीज राजयोग

मेडिटेशन सेंटर असे काही आश्रम या गावामध्ये आहेत. यातील

. डोंगरे महाराजांची समाधी अतिशय प्रसिद्ध आहे. नर्मदा खंडामध्ये ज्या संतांचे नाव अतिशय आराने घेतले जाते त्यातील डोंगरे जी महाराज एक होत.कनकेश्वरी माताजी या अलीकडच्या काळातील एक धडाडीच्या संन्यासी म्हणून ओळखल्या जातात.अतिशय तरुण वयामध्ये आपल्या गुरूकडून दीक्षा मिळवलेल्या कनकेश्वरी माताजी आता महामंडलेश्वर झालेल्या आहेत.साधू संप्रदायांमध्ये महामंडलेश्वर झालेल्या साधना विशेष महत्त्व व मान आणि आदराचे स्थान असते.कुंभमेळा व अन्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये महामंडलेश्वर हे नेतृत्व करताना दिसतात. आज पर्यंत महामंडलेश्वर या पदावर पुरुष म्हणून जन्माला आलेल्या साधूंची संख्या अधिक असली तरी अलीकडे काही महिला महामंडलेश्वर देखील दिसू लागल्या आहेत. मी या आश्रमामध्ये गेलो तेव्हा तिथे आधीच काही परिक्रमावासी मुक्कामाला आलेले होते. कहोना येथील हनुमान मंदिरामध्ये असलेले दांपत्य इथे आले होते. तसेच एक आई आणि तिचा मुलगा असे परिक्रमावासी देखील होते.  मध्य प्रदेशातील साध्या गरीब शेतकरी कुटुंबातील अनेक परिक्रमावासी येथे उतरलेले होते. तिथे इतक्या अधिक प्रमाणात परिक्रमावासी पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की काहीतरी गौड बंगाल आहे म्हणून मी या आश्रमाचे व्यवस्थापक असलेल्या एका वयोवृद्ध आजोबांशी गप्पा मारता मारता चौकशी केल्यावर मला असे लक्षात आले की या आश्रमामध्ये परिक्रमावासींना जे हवे ते दिले जाते . त्यामुळे वस्तू गोळा करण्यासाठी परिक्रमेला निघालेले काही लोक थेट या आश्रमामध्ये परिक्रमावासींच्या वेशामध्ये येतात आणि वस्तू गोळा करून नंतर आपल्या घरी निघून जातात! बऱ्याच वर्षांपासून माझे असे निरीक्षण आहे की आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड या टप्प्यामध्ये अनेक वारकरी आहोत असे भासवणारे लोक वारीमध्ये शिरतात आणि भरपूर वस्तू गोळा करून सासवड नंतर आपापल्या गावी निघून जातात त्यातलाच हा प्रकार! खरा वारकरी कधीच कोणाला काही मागत नाही. अगदी त्याचप्रमाणे खरा परिक्रमावासी कधी कोणाला काही मागायला जात नाही तर नर्मदा मातेने आपण होऊन काही दिले तरच स्वीकार केला जातो.  असो.   तुकाराम बुवा सुरवसे आणि तिवारी मौनी बाबा देखील इथे पोहोचले होते. एकंदरीत एका छोट्या खोलीमध्ये आम्ही बरेच जण उतरलेलो होतो. आश्रम अतिशय स्वच्छ सुंदर नीटनेटका आणि भव्य दिव्य आहे. कनकेश्वरी माताजी सगळे जग फिरून आलेल्या असल्यामुळे त्यांनी आश्रमाची आंतरराष्ट्रीय व्यवस्था लावलेली आहे. ही व्यवस्था इतकी आंतरराष्ट्रीय आहे की इथे देशी शौचालय सुद्धा नाही!  तर सगळे कमोड बसवलेले आहेत. त्यामुळे या खेडूत परिक्रमावासींचे खूप हाल होतात कारण त्यांना कमोड वर बसता येत नाही. आश्रमामध्ये अजूनही काही भक्त मंडळी पर्यटक आणि चैत्र महिन्यात होणारी उत्तर वाहिनी परिक्रमा केलेले लोक येऊन थांबले होते. अतिशय प्रशस्त अशा भोजनगृहामध्ये भोजन प्रसाद घेतल्यावर मी मराठी बोलताना दिसत आहे असे पाहून एका दांपत्याशी बोलू लागलो. प्रसाद बिरवाडकर व सौ नेहा बिरवाडकर अशी नावे असलेले ठाणे येथे राहणारे हे दाम्पत्य होते.प्रसाद यांचा ठाणे शहरांमध्ये जुन्या गाड्या खरेदी विक्री करण्याचा मोठा व्यवसाय होता. नेहा ताई माहेरच्या गुजराती होत्या. तर प्रसाद यांचे गाव कोकणामध्ये शिवथरघळी जवळ बिरवाडी म्हणून आहे ते होते. यांच्याशी गप्पा मारता मारता मला एक युक्ती सुचली! मला पाठीवरती प्रचंड भार झालेला होता आणि तो पुण्या मुंबईकडे जाणाऱ्या माणसांना दिला तर जमते असे मला शुक्ल तीर्थाला लक्षात आलेले होते! ठाण्याला माझे बरेच नातेवाईक राहत असल्यामुळे तिकडे माझे जाणे येणे होत राहते त्यामुळे मी असा विचार केला की जर यांनी माझ्या जवळचे अतिरिक्त ओझे त्यांच्यासोबत ठाण्याला नेले तर मला ते कधीतरी ठाण्याला गेल्यावर ताब्यात घेता येईल! तशी विनंती मी केल्याबरोबर दोघांनीही अतिशय आनंदाने म्हणाल ते सामान घेण्याची तयारी दाखवली .कारण ते तसेही गाडी घेऊन आलेले होते!त्यांनी होकार दिल्याबरोबर माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही! नाचतच जाऊन मी माझ्याकडे अतिरिक्त साठलेली धोतरे आणि त्यामध्ये "तरंगणारा दगड " गुंडाळून त्यांना दिला. तत्पूर्वी तो दगड कसा तरंगतो हे देखील त्यांना दाखवले आणि तो चमत्कार पाहण्यासाठी सगळेच लोक गोळा झाले. त्यांनी आपला क्रमांक मला वहीमध्ये लिहून दिला आणि कधीही ठाण्याला येऊन संपर्क करावा असे सांगितले. जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुमचा हा दगड कोणालाही दिला जाणार नाही असे त्यांनी दिलेले वचन मला फारच आश्वस्त करणारे ठरले!

श्री प्रसाद व सौ नेहा बिरवाडकर उत्तर वाहिनी परिक्रमेदरम्यान

त्या दोघांशी गप्पा मारताना त्यांचे परिक्रमाचे अनुभव जाणून घेतले

आणि माझे अनुभव त्यांनी विचारून घेतले. विशेषतः

बोलता बोलता त्यांना मी एक उदाहरण दिले आणि दोघांच्या

डोळ्यात पाणी आले कारण ते दुपारीच कुठल्यातरी संतांना भेटून

आले होते. त्यांनी या दोघांना अगदी तेच उदाहरण सांगितले होते. 

परंतु त्याच्या सत्या-सत्यतेबाबत बहुतेक यांच्या मनात

संदिग्धता असावी.  परंतु मी देखील तेच उदाहरण दिल्यामुळे त्यांची

खात्री पटली की हा उपदेश नर्मदा मैया त्यांच्यासाठीच

पुन्हा पुन्हा विविध मुखाने ऐकवते आहे. त्यांनी मला तुमचे नर्मदा

परिक्रमेचे अनुभव सांगा असे म्हटल्यावर मी त्यांना

म्हणालो होतो की एखाद्या स्त्रीची कल्पना करा. ती कोणाची तरी

माता आहे, कोणाची तरी कन्या आहे ,कोणाची तरी पत्नी आहे,

कोणाची तरी मैत्रीण आहे ,कोणाची तरी बहीण आहे.. जरी व्यक्ती

एकच असली तरी तिच्या आजूबाजूला असलेल्या

प्रत्येक माणसाला येणारा अनुभव वेगळा आहे. पित्याला कन्या

म्हणून अनुभव येत आहे. मुलाला आई म्हणून अनुभव येत आहे.

पतीला पत्नीचा अनुभव येत आहे .मित्राला मैत्रीण असा अनुभव

येत आहे. तर भावाला बहीण अशी अनुभूती मिळत आहे.

याचा अर्थ व्यक्ति जरी एक असली तरी समोरच्या व्यक्तीच्या

मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल भाव कसा आहे यावरून त्याला

किंवा तिला येणारा अनुभव ठरत असतो. अगदी त्याचप्रमाणे

नर्मदा मैया जरी एकच असली तरी परिक्रमा करणाऱ्या

प्रत्येक परिक्रमा वाशीच्या मनामध्ये तिच्याबद्दल काय भाव आहे

त्यानुसार त्याला वेगवेगळी अनुभूती येते. असे मी

सांगितल्याबरोबर नेहा ताई डोळे पुसू लागल्या कारण दुपारी त्यांना

त्या संतांनी अगदी याच शब्दात सांगितलेले होते.

त्यांनी मला विचारले की असे कसे काय झाले? तुमचा दोघांचा

काहीही संबंध नसताना दोघांनी एकच उदाहरण कसे काय दिले?

त्यावर माझ्या मुखातून खालील प्रमाणे उत्तर मैयाने देवविले.

मी म्हणालो यालाच तर ज्ञान असे म्हणतात. ज्ञान ही अशी शाश्वत

गोष्ट आहे जी विश्वामध्ये सर्वत्र व्यापून उरलेली आहे .

फक्त ते ग्रहण करण्याची क्षमता, तरलता तुमच्या अंतकरणांमध्ये

निर्माण झाली की तुम्हाला ते ज्ञान स्फुरू लागते. 

स्फुरण रूपाने जे जाणवते तेच ज्ञान. मग ते ज्ञान कोणालाही

कुठेही कधीही कसेही जाणवू शकते. त्या ज्ञानावर एका

कोणाचा मक्ता नसतो. समर्थ व्यक्तीचा कृपा हस्त तुमच्या

डोक्यावर असेल तर रेडा सुद्धा वेद बोलतो हे आपण

पाहिलेले आहे!  काय सामर्थ्य असेल त्या माऊलीचे!आ हा हा!

काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती  | वेद म्हैशामुखी बोलविले ||

त्याच ज्ञानेश्वर माऊलींची एक खूप सुंदर ओवी आहे.

एर्‍हवी सर्वांच्या हृदयदेशी। मी अमुक आहे ऐसी ।जे वृत्ती स्फुरे अहर्निशी। ते वस्तु गा मी।।

अर्थात प्रत्येकाच्या हृदयामध्ये ,”मी आहे” अशा स्फुरण रूपाने जे तत्व वास करते आहे ते तत्त्व म्हणजेच मी होय !

गप्पा मारता मारता बराच उशीर झाला. त्या दोघांना दुसऱ्या

दिवशी ड्राइविंग करायचे होते म्हणून मी त्यांची रजा घेतली

आणि निद्रा देवीला स्वाधीन झालो. 



मालसर गावातील नर्मदामातेचे रमणीय दर्शन



महामंडलेश्वरी कनकेश्वरी माताजी यांचा श्री सद्गुरू धाम आश्रम मालसर



आश्रमातील महादेव आणि मधल्या चौकातील छोटासा परंतु सुंदर बगीचा


प्रशस्त भोजन कक्ष आणि उत्तम व्यवस्था या आश्रमाचे वैशिष्ट्य आहे



खांबावरती गुरुदेवांची प्रतिमा लावलेली आहे आणि स्वतः महामंडलेश्वरी कनकेश्वरी माताजी आपल्या भक्तांशी हितगुज साधत आहे असे संग्रहित छायाचित्र . दुर्दैवाने आम्ही गेलो तेव्हा माताजी कुठल्यातरी धार्मिक यात्रेवर गेल्यामुळे त्यांचे दर्शन होऊ शकले नाही. परंतु नर्मदा खंडामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे नाव ऐकायला मिळाले.

श्री प्रसाद आणि सौ नेहा बिरवाडकर यांच्यासोबत याच खुर्च्यांवर बसून बराच काळ हितगुज साधले


गंमत म्हणजे नंतर अर्थात परिक्रमा पूर्ण झाल्यावर प्रसाद बिरवाडकर यांचा क्रमांक माझ्याकडून गहाळ झाला आणि त्यांचे नाव देखील मी विसरून गेलो. परंतु एक दिवस अचानक माझ्यासमोर जुन्या गाड्या खरेदी विक्री ची जाहिरात आली ज्यात त्यांचे नाव पाहिलं आणि मला सर्व प्रसंग आठवला!  आणि मग त्यांना मी भाष करून ठाण्याला जाऊन तरंगणारा दगड ताब्यामध्ये घेतला . त्यावेळी त्या दोघांना जो काही आनंद झाला होता तो केवळ अवर्णनीय असा होता! नेहा ताईंनी ठाणे ते पुणे या किरकोळ प्रवासासाठी सुद्धा मला  साग्रसंगीत डबा करून सोबत दिला होता,  इतके या दोघांचे प्रेम मला लाभले! नर्मदा मातेची सर्व लेकरं कायम भावंडाप्रमाणे राहतात मग रक्ताचे नाते असो किंवा नसो! मुळात त्या सर्वांच्या धमन्यांमधून वाहणारे जे रक्त आहेत त्यातील ८० टक्के जलांश हा नर्मदा मातेचाच असतो ! कारण परिक्रमेदरम्यान अखंड नर्मदा मातेचे जल प्राशन घडत असते.

असो.  मी झोपायला आलो तेव्हा एक मजेशीर घटना घडली. तिवारी

बाबा मनामध्ये असला तरी मला काहीतरी सांगायचा प्रयत्न

करत होता. मला काही केल्या तू काय सांगतो आहे कळाले नाही.

काल कहोना मारुती मंदिरात मुक्काम केला होता तिथे देखील

तो मला काहीतरी सांगू पाहत होता. अखेरीस त्याने कुठून तरी एक

कागद आणि पेन आणले आणि मला त्या कागदावर त्याने

लिहून दिले  , “वह दोनो चोर है |” बापरे! परिक्रमावासी आणि चोर?

त्याने कपाळावर हात मारून घेतला आणि मला मौनातच

सांगू लागला की कालपासून मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे

आणि तू मात्र काळजीच घेत नाहीस ! परंतु समजा ते दोघे

चोर असले तरी देखील मला गमवायचे काय होते हेच मला कळले नाही!

कारण माझ्याकडे अशी कुठलीच गोष्ट नव्हती जी

त्यांनी चोरल्यावर माझे नुकसान होणार होते! सर्वकाही नर्मदा मैयाने

दिलेले होते!  माझे एक आवडते वाक्य आहे. काहीही

हरवले किंवा चोरीला गेले किंवा विसरले किंवा नष्ट झाले की मी म्हणतो

, “ज्याचे होते त्याने नेले”.

अगदी नात्यांच्या बाबतीत सुद्धा हेच शाश्वत सत्य आहे.  जे तुमचे आहे ते

तुमच्या पासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही

आणि जर तुमच्यापासून हिरावले गेलेले दिसत असेल तर ते तुमचे असू

शकत नाही! परंतु ते दोघे कोण हे मला काही कळेना!

तिवारी बाबा आत मध्ये येऊन अंगुली निर्देश करून दाखवायला नकार

देऊ लागला! तिथे अशा बऱ्याच परिक्रमावासींच्या

जोड्या होत्या. पती-पत्नी ,मित्रमित्र ,भाऊ भाऊ, स्नेही स्नेही, गुरु शिष्य

आणि आई मुलगा यातील नक्की कुठली जोडी ते मला

कळेना! शेवटी तिवारी बाबाने पाळण्यात ठेवलेल्या मुलाची नक्कल

करून मला आई मुलगा चोर आहेत हे सांगितले! त्याचे

असे म्हणणे होते की कालपासून ते दोघे माझ्या मागावर असून त्यांना

माझी झोळी तपासून काही चोरता येते का ते

पाहायचे आहे! बहुतेक माझ्या हातामध्ये मोबाईल दिसत नाही म्हणजे

तो माझ्या झोळीमध्ये असणार असा समज त्यांनी

करून घेतलेला असावा! तसेच आजकाल परिक्रमावासी संपूर्ण परिक्रमेला लागेल किंवा पुरेल इतका पैसा सोबत बाळगतात

त्यावर देखील त्यांचा डोळा असावा असे तिवारी बाबाचे म्हणणे होते. परंतु माझ्याकडे तर या दोन्हीही गोष्टी नव्हत्या.

त्यामुळे त्यांची घोर निराशा होणे सुनिश्चित होते. मी मुद्दाम माझी झोळी त्या आई आणि मुलगा या दोघांच्या दिशेला मधोमध

ठेवून झोपलो . तिवारी बाबाचा तळतळाट झाला, परंतु मला मजा वाटत होती! अखेरीस पहाटे लवकर उठून सर्व आटोपल्यावर

आश्रमाची व्यवस्था बघणारे आजोबा माझ्याकडे आले आणि माझ्याकडे काय कमी आहे ते त्यांनी मला विचारले.

तसे पाहायला गेले तर माझ्याकडे सर्वच गोष्टी होत्या परंतु तरी देखील त्यांनी मला आग्रहाने एक पातळ धोतर आणि

एक गुलाबी गमछा दिला.मला या दोन्ही गोष्टी खरे तर नको होत्या परंतु नाही म्हणायचे नाही या न्यायामुळे त्या स्वीकाराव्या

लागल्या पुढे मी त्याचे काय केले ते तुम्हाला योग्य वेळी सांगेनच. मध्ये कोणीतरी मला एक टूथब्रश आणि टंग क्लीनर

तसेच टूथपेस्ट असा दंत शुद्धी संच भेट दिला होता. तो मी इथेच विसरून गेलो. तुकाराम बुवा आणि मला मिळालेले

सदरे तेदेखील वाळत घातलेले इथेच राहून गेले. या जगामध्ये काहीतरी गेल्याशिवाय दुसरे काही मिळत नाही हे नेहमी

लक्षात ठेवावे. आणि काहीही न गमावता जर गोष्टी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ लागल्या तर याची निश्चिती बाळगावी

ही भविष्यात कधी ना कधी तुम्हाला हक्काच्या गोष्टी गमवाव्या लागणार आहेत! किमान माझे तरी निरीक्षण असेच आहे.

आणि हे अक्षय्यतेच्या शास्त्रीय सिद्धांताला धरून आहे. असो. 

पुढे डोंगरे जी महाराजांची समाधी लागते. आणि त्यानंतर शिनोर नावाचे गाव लागते .



आश्रमामध्ये उत्तम अशी निवास व्यवस्था आहे आणि सुंदर बाग बगीचा केलेला आहे



दुरून पाहिल्यावर प्रथमदर्शनी राधा कृष्णाचे वाटणारे परंतु प्रत्यक्षामध्ये गोपीनाथ भगवान आणि सत्यनारायण भगवान यांचे असणारे सुंदर असे मंदिर आश्रमामध्ये आहे.



परिसरातील मंदिरांच्या कळसावर उगवणारी झाडे वेळोवेळी स्थानिक भक्तांनी काढावीत अशी त्यांना विनंती आहे कारण त्यामुळे मंदिराच्या रचनेला हळूहळू धोका उत्पन्न होतो. मी कुठल्याही मंदिरामध्ये किंवा घरामध्ये गेल्यावर वड पिंपळ किंवा औदुंबर अशी छोटी छोटी रोपे दिसली तर ती लगेच काढून दुसरीकडे लावून टाकतो.



इथे १९९४ सालापासून हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे | हरे राम हरे राम राम राम हरे हरे | या महामंत्राचा अखंड नाम जप यज्ञ सुरू आहे.



श्री सत्यनारायण भगवंताचे मंदिर खूप सुंदर आहे



वैष्णव जनतो तेने कहीये, जे पीड पराई जाने रे | असा उपदेश करणारे जुनागड येथील नरसी मेहता यांचे देखील मंदिर येथे आहे. बऱ्याच लोकांना हा अभंग महात्मा गांधी यांनी लिहिला आहे असे वाटते परंतु तसे नाही.
नरसी मेहता नामे द्विजकुलभूषण जुनागडा माजी |  होऊन गेला ज्याने  सत्चिद्घन श्याम ठेविला राजी ||
असे लहानपणी कीर्तनात ऐकल्याचे आठवते! कीर्तनासी नर हो तुम्ही जा गा!


परमपूज्य पुनीतजी महाराज



श्री डोंगरेजी महाराज 


श्री डोंगरेजी महाराज 


श्री डोंगरेजी महाराज 


मालसर ला येणाऱ्या बसेसचे वेळापत्रक


डोंगरे महाराजांचा अनमोल उपदेश

उत्तर तटावर पावला पावलावर नर्मदा पुराणा मध्ये उल्लेख केलेली तीर्थक्षेत्र आढळतात. त्या सर्वांचे दर्शन घेत पुढे जावे असा

संकल्प मनोमन करत मार्गस्थ झालो. पाठीवरचा भार अतिशय हलका झाला होता. आणि नको असलेल्या अन्य गोष्टी सुद्धा

कुठेतरी देऊन टाकाव्यात असा संकल्प मनोमन करत मी पावले टाकू लागलो. मुखामध्ये अखंड नर्मदा मातेचे नाम येत राहील

याची काळजी परिसरातील लोक घेतात! आणि कोणी परिक्रमावासी बाबाजी जाताना दिसला की एक मुखाने पुकारा करतात.

नर्मदे हर!



अनुक्रमणिका 

मागील लेखांक 

पुढील लेखांक 

वरील लेख दृक्श्राव्य स्वरूपात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लेखांक एकशे एकोणीस समाप्त (क्रमशः)

टिप्पण्या

  1. Narmade Har!!!!! Two paragraphs are not word wrapped.

    उत्तर द्याहटवा
  2. मालसर आश्रम परिसर छायाचित्रात स्थानिक नसलेले पाम आणि चक्क ख्रिसमस ट्री! किमान कडुलिंब, आंबा, औदुंबर, पिंपळ, पळस इ. प्रामुख्याने दिसावीत, अशी अपेक्षा. नर्मदे हर!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सुज्ञ वाचकांच्या लक्षात यावे म्हणूनच हे चित्र टाकलेले होते! मला देखील हा प्रकार आवडला नव्हता.अगदी खाली अंथरलेली गवताची जात सुद्धा परदेशी आहे.आपण पाहू शकता की आपल्या देशातील वातावरणात विदेशी झाडे फारशी जगत नाहीत . चित्रांमध्ये एक मृत झालेले बॉटल पाम ट्री दिसत आहे ते त्याचमुळे,

      हटवा
    2. क्षमस्व..एक जिवंत झाड आहे आणि तीन मृत !

      हटवा
  3. नर्मदेहर🙏 छान वर्णन, मी देखील kankeshwari मंदिरात मुक्कामाला होतो

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर