लेखांक ११८ : श्री रंगावधूत महाराजांची तपोभूमी श्रीक्षेत्र नारेश्वर चे दर्शन व कहोणा मारुतीसाठी श्रमदान

नर्मदा मैया मध्ये मला तरंगणारी वीट सापडली तो परिक्रमेचा शंभरावा दिवस होता . पाठीवरचा भार प्रचंड वाढल्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकत होतो . आता मला वेध लागले होते ते नारेश्वरच्या दर्शनाचे . माझे सद्गुरु परमपूज्य श्री जनार्दन स्वामी महाराज खेर बडोदा यांच्या मुखातून मी नारेश्वरच्या रंगावधूत महाराजांच्या विषयी खूप काही ऐकले होते . तसेच येताना परिक्रमा मार्गामध्ये त्यांचे अनेक भक्त भेटले होते व दिसतही होते . सर्वसाधारणपणे भक्तांची आध्यात्मिक प्रगती पाहता त्यांचे उपास्य दैवत कसे असेल याचा अंदाज येऊ शकतो .  शिवाय बापजी असे ज्यांना प्रेमाने म्हटले जाते त्या रंगावधूत महाराजांनी स्वतः नर्मदा  परिक्रमा केलेली होती . त्यामुळे त्यांच्या तपस्थळीच्या दर्शनाची वेगळीच आस लागलेली होती . हळूहळू वाळूचा किनारा विस्तार घेऊ लागला . नर्मदा मातेची समुद्राजवळची वळणे मोठी असल्यामुळे इथे कित्येक किलोमीटर रुंदीचा वाळूचा किनारा आहे . प्रसंगी दोन किलोमीटर रुंद वाळू आपल्याला सहज लागते . मी मैय्या कडे पाहत चाललो असताना अचानक सर्व जग हलते आहे असे मला वाटले आणि क्षणात मी पंधरा फूट खोल वाळूच्या खड्ड्यात पडलो ! माझ्या असे लक्षात आले की चक्क जेसीबी लावून हा खड्डा पाडण्यात आलेला आहे . त्यातून बाहेर येताना फार कसरत करावी लागली . नाकातोंडात वाळू गेली .समोर पाहिले तर लक्षात आले की इथून पुढे कित्येक किलोमीटर असे खड्डेच खड्डे नर्मदा मातेच्या उदरामध्ये पाडून ठेवण्यात आलेले आहेत ! शब्दशः शेकडो जेसीबी इथे वाळू उपसायचे काम अहोरात्र करत होते . जेसीबी हा शब्द चुकीचा आहे . हे छोटे अर्थ मूव्हर्स नव्हते तर ही अजस्त्र एक्सकॅवेटर किंवा पोकलेन मशीने होती . त्याच्या एका जबड्यामध्येच एक छोटा हत्ती मिनी ट्रक भरून जाईल इतका मोठा त्याचा जबडा असतो !  नर्मदा मातेच्या काठावर वाळू उत्खनन अनेक ठिकाणी पाहिले . पण या भागामध्ये चाललेल्या वाळू उपशाने मैयाच्या काठाचे जे काही विद्रुपीकरण केले होते ते पाहून मन उद्विग्न झाले .

प्रातिनिधिक चित्र

 या सुंदर अशा वाळूच्या किनाऱ्याचे एक स्वतंत्र पर्यावरणीय महत्त्व असते . इथे अनेक प्रजातींचे कीटक , पक्षी , सरीसृप , वन्य जीव , मासे वास करतात . परंतु इथले वातावरण पाहता इथे मनुष्य सुद्धा टिकू शकणार नाही अशी अवस्था निर्माण करण्यात आली होती . मोठमोठी अवजड यंत्रसामुग्री त्याचा प्रचंड आवाज आणि त्यातून येणारे तेलाचे वास यानेच हा किनारा व्यापलेला होता . शब्दशः अगणित हायवा ट्रक किंवा डंपर वाळूची ने आण करत होते . त्यांची गती पाहता हा वाळूचा किनारा आहे राष्ट्रीय महामार्ग नाही हे चालक विसरल्याचे जाणवत होते . बऱ्याच डंपरचे चालक हे अतिशय लहान मुलेच असवीत वाटत होते .म्हणजे त्यांचे वय  जेमतेम १८ ते २२ असावे असे दिसत होते . या वयात स्वाभाविकपणे दिसणारी अंगभूत मस्ती यांच्या वाहन चालनातून प्रकट होत होती . संधी मिळाली आहे तर बेसुमार वाळू उपसा अशा प्रकारची मानसिकता सर्वच लोकांच्या वागण्यातून दिसत होती ! जणू काही ही संधी पुन्हा नाही असेच सर्वांचे वर्तन होते . कोणाचेही काठाने चालणाऱ्या परिक्रमावासीं कडे लक्ष नव्हते . लक्ष द्यायला मुळी कोणाकडे वेळच नव्हता . आपणच आपला जीव मुठीत धरून चालायचं असा सर्व प्रकार होता . इतका गोंगाट असल्यामुळे इथले वन्यजीवन पूर्णपणे अस्तंगत झाले होते . सरळ चालत जाण्यासाठी  रस्ताच मिळत नव्हता . वाळूतून जाणाऱ्या वाहनांनी इतके रस्ते तयार केले होते की विचारू नका . वाळू डंपर मध्ये भरल्यावर बराच काळ त्यातील पाणी झिरपत राहते . या पाण्यामुळे सर्वत्र चिखलच चिखल माजलेला होता . त्यामुळे गुडघ्याच्या खालचे संपूर्ण पाय चिखलाने माखलेले होते . नर्मदा मातेच्या अंगावर ओरबाडे काढण्याचे काम चालू आहे असे वाटत होते . वाळू माफिया कसा हैदोस घालतात हे आपण वृत्तपत्रातील बातम्यांमधून वाचत असतो .परंतु इथे आल्यावर ते प्रत्यक्ष पाहायला मिळते . कधी एकदा हा टापू संपतो असे मला झाले होते . अमरकंटकच्या बाजूला पाण्यात बुडी मारून आपल्याला हवी तेवढीच वाळू हाताने काढणे वेगळे आणि अशाप्रकारे मोठमोठी यंत्रसामग्री लावून आहे नाही ती सर्व वाळू ओरबाडणे वेगळे . ही वाळू तयार होण्यासाठी लाखो करोडो वर्षं गेलेली असतात . ती अशी काही वर्षात संपवणे हे नदी या परिसंस्थेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे . या भागातील नर्मदा मातेचे पात्र आपली दिशा बदलून वाहू लागले आहे इतका बेसुमार वाळू उपसा या लोकांनी केलेला आहे .  आपले वाचक सर्व वर्गातील आहेत . त्यातील काही निवडक सरकारी अधिकार असलेल्या वाचकांना सांगावेसे वाटते की आपल्या हातात जर कधी वाळू उत्खनन याविषयीचे काही अधिकार आले तर आपण कृपया पर्यावरणाचा विचार करून त्यावर साधक बाधक अभ्यासा नंतरच निर्णय द्यावा ही प्रार्थना . किंबहुना नर्मदा माता हिला राष्ट्रीय संपत्ती घोषित करून इथले वाळू उत्खनन पूर्णपणे बंद करावे . आज-काल वाळूला अतिशय सुंदर असे पर्याय उपलब्ध झालेले आहेत त्यांचा वापर करून घ्यावा . 
आपल्या काही वाचकांना माझे सतत नर्मदा मातेच्या आध्यात्मिक अंगाविषयी न बोलता डाव्यांसारखे केवळ पर्यावरण विषयक मुद्दे हिरीरीने मांडणे आश्चर्यकारक व दुःखदायक वाटू शकते . परंतु नर्मदा मातेची आध्यात्मिक अनुभूती येण्यासाठी तिचे मूळ स्वरूपात राहणे अत्यंत आवश्यक आहे .तिचे स्वरूपच जर आपण पालटले तर सारेच गणित बदलणार आहे व बिघडणार आहे .उदाहरणार्थ खालील चित्र पहा . या चित्रामध्ये नर्मदा मातेचा अजिबात वाळू न उपसलेला एक सुंदर किनारा दाखवला आहे . इथे जाणवणारी सात्विकता आपण अनुभवा . आणि त्याच्या खाली नारेश्वरच्या आसपासचे किनाऱ्याचे गुगल नकाशावरून घेतलेले फोटो टाकले आहेत त्यातून जाणवणारी स्पंदने अनुभवा . मला काय म्हणायचे आहे ते आपल्याला आपोआप लक्षात येईल .

नर्मदा मातेचा वाळू उपसा न झालेला एक सुंदर किनारा


धारेश्वर येथील बेसुमार वाळू उपसा झालेला नर्मदा मातेचा किनारा


इथला प्रत्येक फूट मी पावलाने चाललो आहे आणि त्याची वेदना अनुभवली आहे .  आता तर नर्मदा मातेने समोरच्या किनाऱ्यावर वाळू साठवायला सुरुवात केली आहे इतका तिचा प्रवाह पालटला आहे !


आपण जलदेवतेच्या उदरातील जलजीवनाशी किती बेकार पद्धतीने खेळत आहोत याची कदाचित कल्पना या कामगारांना नसावी . 


खोलच खोल नर्मदा पात्रामध्ये घुसून वाळू उपसली जाते . यंत्रसामुग्रीचे डिझेल ,तेल नर्मदा जला मध्ये सतत मिसळत राहते . प्रसंगी त्याचा तवंग आपल्याला दिसतो सुद्धा .


दिवस-रात्र वाहतूक करणारे डंपर नर्मदा मातेच्या काठावरील पर्यावरण उध्वस्त करून टाकतात .इतक्या आवाजामध्ये कुठलेही प्राणी किंवा पक्षी अधिवास करून राहू शकत नाहीत .


प्रचंड प्रमाणात वाळू उपसल्यामुळे आता उरलेल्या वाळूची बेटे मात्र इथे शिल्लक राहिलेली आहेत . आणि नर्मदा मातेचा मूळ प्रवाह मोठ्या प्रमाणात बदलला आहे .


नर्मदा मातेच्या किंवा कुठल्याही नदीच्या उदरातील वाळू उपसण्याची शास्त्रशुद्ध पद्धत शोधण्यावर प्रचंड संशोधन होणे गरजेचे आहे . त्याहून उत्तम म्हणजे वाळूला पर्याय शोधून काढणे . त्याहीपेक्षा उत्तम उपाय म्हणजे कमीत कमी जागेत राहण्याची सवय करून घेणे !  पर्यावरण पूरक घरांमध्ये झालेले संशोधन सार्वत्रिक होणे आवश्यक आहे . सिमेंट काँक्रीट चा भस्मासुर एक दिवस पर्यावरणाचा ऱ्हास केल्याशिवाय राहणार नाही ! 
याच वाळूचा शेवटचा किनारा मात्र चांगला जपला आहे कारण त्याचा विकास नारेश्वर बीच म्हणून करण्यात आलेला आहे . इथे अगदी उंट घोडे सर्व उपलब्ध आहे . खाण्यापिण्याची दुकाने आहेत . मोठ्या प्रमाणात गर्दी कायम या किनाऱ्यावर असते . इथून पुढे पुन्हा खडा किनारा चालू होतो . नारेश्वर संस्थांन ने सुंदर घाट बांधलेला आहे . बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यावर डावीकडे उजवीकडे रंगावधूत महाराजांचे संस्थान दिसू लागते . 


कचऱ्याने व्यापलेली नारेश्वर "बीच" 

नारेश्वर संस्थान ने बांधलेला घाट 


उंट, घोडे, दुकाने, पर्यटक, भक्तनिवास, वाळू, जंगल, आणि लांबच लांब चढाईचा नारेश्वर घाट ! सर्व एकाच चित्रात! 

या जागी रंगावधूत महाराज कसे आले याची कथा मोठी रंजक आहे .
महाराज तपश्चर्येसाठी हिमालयाकडे निघाले होते तेव्हा त्यांना आवाज आला की मागे फिर ! महाराज मूळचे मराठीच बर का ! त्यांचे वडील नोकरी निमित्त गोधरा गावामध्ये राहायला गेले होते . सांगायचे तत्पर्य इतकेच की "मागे फिर " हा आवाज त्यांना मराठीतच ऐकू आला ! त्यानंतर ते उलटे फिरले आणि नर्मदा किनारी आले . ह्या जागी आठ दहा गावांचे स्मशान होते . घनदाट झाडी आणि प्रचंड वन्यजीव असे सर्व वातावरण होते . इथे त्यांनी मुक्काम केला . त्यांना रात्री शंख ध्वनी आणि डमरूचा आवाज ऐकू येऊ लागला . त्यामुळे इथे महादेवांच्या अस्तित्व आहे हे त्यांना लक्षात आले . शिवाय इथे मोर आणि साप किंवा नाग आणि मुंगूस असे परस्परांचे शत्रू असलेले प्राणी एकत्र आनंदाने , गुण्यागोविंदाने नांदताना त्यांना दिसले . तेव्हा त्यांनी ओळखले की हीच ती जागा आहे जिथे आपल्याला तपाचरण करावयाचे आहे . आणि त्यांनी नारेश्वरची निवड केली . नारेश्वराच्या प्राचीन मंदिराचा जिर्णोद्धार आता झालेला आहे .


नारेश्वरानजीक आजही घनदाट अरण्य शिल्लक आहे   

स्वामींनी भरपूर लिखाण केले आहे . विशेषतः गुरुचरित्रातील ५२ अध्यायांचे सार सांगणारी गुजराती भाषेतील त्यांची रचना दत्त बावनी विशेष प्रसिद्ध आहे . रंगावधूत महाराजांमुळे गुजरात राज्यात दत्त संप्रदायाचा भरपूर प्रसार झालेला आहे . माझे गुरु गुजरात राज्यातील असल्यामुळे त्या संप्रदायांमध्ये दत्तबावनी म्हणण्याची परंपरा आहे .

जिज्ञासूंसाठी दत्तबावनी स्तोत्र सोबत देत आहे. 
"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा " या दत्त संप्रदायातील प्रसिद्ध नामजपाचा प्रचार व प्रसार रंगावधूत महाराजांनीच केला आहे .
 महाराज थोडेसे आक्रमक व तापट स्वभावाचे होते असा अंदाज त्यांची रचना ऐकल्यावर बांधता येतो . अक्कलकोट स्वामींच्या सारखा यांचा स्वभाव असावा . यातील "अनुभव तृप्तिनो उद्गार| सुणि हंशे ते खाशे मार || " ही ओळ मला फार आवडते ! इथे महाराज म्हणतात की ही दत्त बावनी म्हणजे माझ्या अनुभवातून तृप्तपणे आलेला उद्गार आहे आणि यावर जो कोणी कुत्रा हसेल , अर्थात अविश्वास दाखवेल तो मारच खाईल ! असा स्पष्टवक्तेपणा फार कमी संतांमध्ये जाणवतो . असे सत्य बोलण्यापेक्षा संत मौन राहणे पसंत करतात . परंतु बापजी मात्र बिनधास्त बोलतात ! दत्त बावनी हे स्तोत्र नित्य पाठामध्ये ठेवावे . खूप सुंदर आहे . विशेषतः ते म्हटल्यावर गुरुचरित्राचे संपूर्ण पारायण केल्यासारखे तुम्हाला वाटेल इतके ते सारगर्भ आहे . मला भेटलेला अवधूत फरले नावाचा वापीच जो परिक्रमावासी होता त्याला हे स्तोत्र पाठ होते . मलाही अर्धे अधिक स्तोत्र पाठ आहे . त्यामुळे आम्ही दोघे दक्षिण तटावर असताना एकत्र आलो की हे स्तोत्र म्हणायचो !  त्याचे नावच रंगावधूत महाराजांवरून अवधूत ठेवण्यात आले होते ! अर्थात त्याचे रंग वेगळे असले तरी होता तो अवधूतच ! "जय योगीश्वर दत्त दयाळ । तूच एक जगमा प्रतीपाळ । " अशी या दत्त बावनी स्तोत्राची सुरुवात आहे . असो . 
मला आज प्रचंड भूक लागली होती . आणि आश्रमा पर्यंत जाणारा तो मोठा च्या मोठा घाट चढताना देखील माझे पाय लटलट कापत होते . वाटेत एका दुकानदाराने चहा पाजला . आणि गाठीया शेव ,पापडी खायला दिली . मी देखील ती खाऊन टाकली . माझ्या अजिबात डोक्यात नव्हते की आज एकादशी आहे ! पुढे मंदिरामध्ये गेल्यावर तिथली सर्व व्यवस्था आणि टापटीप पाहून खूप आनंद वाटला . इथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात . परंतु कुठेही गडबड गोंधळ दिसत नाही . मंदिराचे व्यवस्थापन अतिशय चोख आहे . भव्य दिव्य प्रवेशद्वार आहे . मोठमोठे बगीचे आहेत . मंदिरे स्वच्छ व सुंदर आहेत . जागोजागी विविध भाषेमधील पाट्या लावलेल्या आहेत . प्रशस्त अन्नछत्र चालविले जाते . संस्थानच्या स्वतःच्या भक्त निवासासाठी मोठमोठ्या इमारती व खोल्या आहेत . स्वतंत्र पुस्तकालय आहे . सर्वच व्यवस्था उत्तम आहे . मंदिर खूपच मोठे होते . व आत मध्ये गेल्यावर अतिशय प्रसन्न वाटत होते . विशेषतः रंगावधूत महाराजांची मूर्ती फारच सुंदर आहे . ते अक्षरशः समोर बसले आहेत असे वाटते . मी गेलो तेव्हा अनेक भक्तमंडळी समोर बसले होते आणि समाधीची पूजा सुरू होती . मी काही काळ तिथे बसलो . पुजारी बुवांनी मला बोलावून घेतले आणि उंबऱ्याच्या जवळ जाऊन दर्शन घेऊ दिले . तिथून मी निघालो आणि संपूर्ण परिसराचे दर्शन घेतले . रंगावधूत महाराजांनी तपश्चर्या केलेले कडुलिंबाचे झाड येथे आहे . त्याची पाने आजही गोड लागतात . कडू लागत नाहीत ! मी ते स्वतः अनुभवले . असेच एक झाड शिर्डीमध्ये सुद्धा साईबाबांच्या गुरुस्थानाजवळ आहे . त्याचीच मला आठवण झाली . कार्यालयात जाऊन आश्रमाची थोडक्यात माहिती घेतली . ग्रंथालय पाहिले . ग्रंथ विक्री भंडार पाहिले . समोर असलेल्या भोजन प्रसादगृहाकडे जाण्याचे मला एका सेवेकरी काकांनी सुचविले . इथे बरेच मराठी सेवेकरी आहेत असे मला जाणवले .


रस्त्याच्या बाजूने असलेले आश्रमाचे भव्य प्रवेशद्वार 


मयूरद्वार 

    


"मौन अनिवार्य" आणि "परस्परो देवो भव" या दोन्हीही पाट्या मला आवडल्या ! मूर्ती तर सुरेखच आहे !




श्री रंगावधूत महाराजांची तपस्थळी 



श्री नारेश्वर महादेव 


श्री नारेश्वर महादेव 


इथे गुरु लीलामृत भवन नावाच्या एका नवीन वास्तूची निर्मिती केलेली दिसते जिथे बापजी विरचित श्री गुरुलीलामृत ग्रंथ सुवर्णाक्षरात लावलेला आहे 


दत्त संप्रदायातील विविध सत्पुरुषांचे फोटो इथे लावलेले आहेत जिथे आपल्याला अक्कलकोट स्वामींचे दर्शन सुद्धा होते


महाराजांचा उपदेश 


महाराजांची खोली 

भोजन प्रसाद गृह तर अतिशयच भव्य दिव्य होते ! खालच्या मजल्यावर भोजन व्यवस्था होती आणि वरच्या मजल्यावर निवास व्यवस्था होती . 


भोजनप्रसादगृह आणि संत निवास  


रंगावधूत महाराजांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत वळामे असे होते त्यांच्या नावाचे  भव्य प्रवेशद्वार केले असून आत मध्ये गेल्याबरोबर उजव्या हाताला पुस्तक भांडार आहे


रंगावधूत महाराजांच्या आई रुक्मिणीबाई यांचे देखील मंदिर येथे आहे


महाराज इथे कसे आले ते थोडक्यात गुजराती भाषेत लिहिलेले आहे, आपल्याला सुद्धा कळते

श्रीरंगावधूत महाराज आणि त्यांना वयाच्या पाचव्या वर्षी नरसोबाच्या वाडी येथे दीक्षा देणारे त्यांचे गुरु श्री टेंबे स्वामी महाराज उपाख्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज

महाराजांची मूर्ती सुंदर असून हिला विविध प्रकारचे साज केले जातात .
आई शिवाय दुसरे दैवत नाही ! बापजींच्या आई रुक्मिणी माताजींचे मंदिर .
अजून भोजनाला वेळ आहे असे पाहून मी वर गेलो . इथे एक काळे कुट्ट कपडे घातलेला परिक्रमावासी साधू येऊन झोपला होता . त्याचे पाहून मी देखील पाठ टेकवली आणि मला क्षणात डोळा लागला . दुपारी उशिरा मला तो साधू उठवतो आहे असे जाणवले . भोजन प्रसाद संपत आला आहे . करायचा असेल तर लवकर खाली जा असे त्याने मला सांगितले . मी धावतच खाली गेलो तर सेवेकरी लोकांची शेवटची पंगत बसली होती . मी चांगला पोटभर जेवलो . शिरा आमटी भात वगैरे होता . नंतर पुन्हा माझ्या लक्षात आले की आज आपण पुन्हा एकदा एकादशी मोडली ! तुकाराम सुरवसे माझ्यासोबत थांबले असते तर त्यांनी आठवण करून दिली असती परंतु त्यांना मी पुढे जा असे सांगितल्यामुळे सकाळीच ते पुढे निघून गेले होते . ते बिचारे मी सांगेल ते सर्व ऐकत होते . कोरोनाच्या भीतीने ते मास्क लावून फिरायचे . मी सांगितल्यामुळे त्यांनी मास्क वापरणे देखील बंद केले होते . एकादशी व्रत मोडल्याचे मला फार वाईट वाटले . याचे काहीतरी प्रायश्चित्त मैय्याने मला द्यावे असे मला मनोमन वाटू लागले .भोजन प्रसाद घेऊन मी पुन्हा वर आलो . सामान उचलले आणि पुढे चालू लागलो . तोपर्यंत खाली माकडांनी धुमाकूळ घातलेला मला पाहायला मिळाला . या आश्रमाचा परिसर सोडला तर अजूनही सर्वत्र घनदाट झाडी शिल्लक आहे . काठाने चालण्यासारखा मार्गच नव्हता . सर्व झाडी मैयामध्ये उतरलेली आहे . तरी देखील मिळेल तसा काठाकाठानेच उन्हामध्ये चालत राहिलो .

नारेश्वर शेजारी शिल्लक असलेले जंगल

 नर्मदा खंडामध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवतो . मैया चा किनारा सोडला की उन्हाने तुम्हाला पकडलेच म्हणून समजा ! परंतु काठाने चालताना मात्र उन्हाचा दाह थोडा कमी जाणवतो कारण शेजारी मैय्या असते . काठाने बरेच अंतर चाललो तरी जंगल संपत नव्हते .इथे वानर खूप होते . अखेरीस एक कोळी भेटला . त्याने सांगितले की इथे शेजारीच रस्ता असून हनुमंताचे एक नवीन मंदिर स्थापन होत आहे . तरी मी त्याचे दर्शन घ्यावे . मैयाचे नाव घेऊन जर कुणी काही करायला सांगितले किंवा मैय्याच्या पात्रामध्ये उभ्या असलेल्या माणसाने काही करायला सांगितले तर ते मैयाने सांगितले आहे असे समजून ऐकायचे असे माझे स्वतःचे एक गृहीतक होते . त्याप्रमाणे मी निघालो . हा एक राज्य महामार्ग असावा . बऱ्यापैकी वाहतूक होती . प्रचंड उन्हामुळे अंगाची लाही लाही झालेली होती . इथे थोड्याच अंतरावर रस्त्याच्या उजव्या हाताला एक छोटासा पुल दिसला . तिथे एक सुंदर असा कुलर ठेवलेला होता ! रस्त्यावरून जाणारा येणारा प्रत्येक चालक गाडी इथे थांबवून थंडगार पाणी पीत होता व लोकांना पाजत होता .वाळू नेणारे सर्व डंपर इथे थांबत होते . मी देखील थंडगार पाणी प्यायलो आणि कमंडलू भरून घेतले . 

 हाच तो कूलर / शीतक

आता पुढे निघणार इतक्यात मला उं उं उं असा रडल्यासारखा आवाज येऊ लागला . आवाज कुठून येतो आहे हे मला कळेना म्हणून मी पुन्हा पुढे निघालो . अजून जोरात आवाज आला ! म्हणून पाहिले असता पुलाच्या पलीकडे चित्रकूट वाला तिवारी मौनी बाबा  उभा असलेला दिसला ! तो जोर जोरात हातवारे करून मला खुणावत होता की आत ये ! त्याला बघितल्यावर मी उडालोच! इकडे काय करतो आहेस मी खुणेनेच विचारले ? त्याने आत येण्याची सूचना केली . आत डाव्या बाजूला एक स्लॅब टाकलेला होता . हा प्रत्यक्षामध्ये एक आश्रम होता ! बाहेरून काही कळत नव्हते . कारण आश्रम नुकताच सुरू करण्यात आलेला होता ! 



कूलर ची शेड व समोर तपोवन धाम आश्रम
आत मध्ये गेलो तर समोर तुकाराम बुवा बसलेले ! अजून एक मुंबईचे दांपत्य परिक्रमा करीत होते . तिवारी बाबा सध्या यांच्यासोबत चालत होता . आणि अमरकंटकचा एक आदिवासी बाबा होता . असे सर्वजण तिथे असल्यामुळे आता इथेच मुक्काम करावा असा सर्वांनी आग्रह धरला . मला देखील उन्हात चालून चांगलाच कंटाळा आला होता . त्यामुळे मी राहण्याचा निर्णय घेतला . 

ह्या सभागृहामध्ये उतरण्याची सोय केलेली होती

माझ्या नियमानुसार इथले मुख्य महंत कोण आहेत त्यांचे दर्शन घ्यायला गेलो . हा रामानंदी संप्रदायाचा आश्रम होता . आपण दक्षिण तटावर जे लाल कपडे घातलेले विविध साधू पाहिले होते त्याच संप्रदायाचा हा आश्रम . 

हे संकट मोचन हनुमंताचे मंदिर होते. म्हणजे आता मंदिर उभे आहे परंतु तेव्हा मंदिर निर्माण  होत होते

इथे उत्तर भारतीय असलेला एक साधू होता . साधू तरुण होता आणि भाषेवरून दिल्लीच्या बाजूचा वाटत होता . दर्शन घेतल्याबरोबर तो म्हणाला ," सेवा किये बगैर मेवा नही मिलेगा । " मी म्हणालो आज्ञा करावी काय सेवा आहे ! त्याने मला शेजारी सुरू असलेल्या मंदिराच्या बांधकामा जवळ नेले . प्लिंथ म्हणजे पाया घालून झालेला होता . इथे मारुती मंदिराचे बांधकाम सुरू होते . साधारण अडीच तीन फूट खोलीचा पाया होता . हा सर्व दगड माती वाळू टाकून भरून समतल करून घ्यायचा होता .आज एकादशी मोडलेली होतीच . त्याचे हेच प्रायश्चित्त असे मी मनात धरले आणि कामाला लागलो . कुदळ फावडे घमेले हातात घेतले आणि कामाला लागलो . आधी मोठे मोठे दगड गोटे भरून घेतले . नंतर त्यावर मध्यम आकाराचे दगड टाकले . मग त्यावर मुरूम आणि जाड वाळू टाकली . शेवटी बारीक वाळूचा थर टाकून त्यावर पाणी मारून धोपटण्याने सर्व धोपटून समतल केले . साधारण ५०० चौरस फुटाचे बांधकाम होते . आधी सुमारे एक दीड तास मी एकटाच काम करत होतो . नंतर हळूहळू मौनी बाबा , तुकाराम बुवा , आदिवासी बाबा असे लोक मदतीला आले .तुकाराम बुवा बांधकाम क्षेत्रातले तज्ञ असल्यामुळे त्यांच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या . पाणी कसे मारावे वगैरे शिकलो . धोपटणे मारायला पण शिकलो . साधारण चार ते पाच तास काम चालले . दिल्ली वाला बाबा एकदाही येऊन म्हणाला नाही की आता बास करा ! होते आहे तेवढे काम होऊ द्यावे असा त्याचा भाव दिसला . मलाही एकादशी मोडल्याचे प्रायश्चित्त घ्यायचेच होते . चार पाच तास असा काही घाम गाळला की विचारूच नका ! शेवटी पाणी मारण्याच्या नळीनेच आंघोळ केली ! बाकीच्या लोकांना मी अंग मेहनतीची कामे करू देत नव्हतो . कारण साधूने काम मला करायला सांगितले होते . शेवटी सर्व काम संपल्यावर साधू शंभर रुपयाच्या नोटा घेऊन उभा राहिला . सर्वांना त्याने शंभर शंभर रुपये दिले . मी ते घेतले नाहीत . मी त्याला म्हणालो ही मी मारुती मंदिरासाठी माझी सेवा अर्पण करीत आहे . पैसे घेतले तर ती सेवा ठरणार नाही . मजुरी ठरेल . त्यामुळे मी पैसे घेणार नाही . सेवा केल्याचा मेवा हनुमानजी देतीलच ! माझ्या उत्तरामुळे साधू थोडासा खजिल झाला . त्याला मला कामाला लावल्याबद्दल अपराधी भावना वाटत आहे असे त्याच्या चेहऱ्याकडे बघून जाणवले . मग मी त्याला एकादशी मोडल्याचा किस्सा सांगितला . आणि त्याची काहीतरी शिक्षामय्याने मला द्यावी अशी मी इच्छा व्यक्त केल्याचे देखील सांगितले . मग साधूच्या डोक्यात प्रकाश पडला ! तो म्हणाला , " तभी मै सोच रहा हूं कि मैंने परिक्रमा वासी को इतना काम कैसे लगाया ? यह काम मैने नही लगाया बलकी मेरे माध्यम से मैया ने खुद लगवाया ! " 

हेच ते मंदिर ज्याची वाळू मैयाने माझ्याकडून भरून घेतली

कष्ट केल्यामुळे प्रचंड अंग दुखत होते . आसनावर पडून राहिलो . सर्व मंडळींशी गप्पा सुरूच होत्या . तुकाराम बुवा आमचे एक एक किस्से तोडक्या मोडक्या हिंदी मध्ये सर्वांना सांगत होते ! संध्याकाळी आरती करून घेतली . इतक्यात नाशिक भागातील एक परिक्रमावासींची बस तिथे आली . काकडे महाराज नावाचे एक वारकरी कीर्तनकार होते त्यांची ही दहावी बस परिक्रमा होती . त्यांनी सोबत फराळाचे मुबलक साहित्य आणले होते त्यामुळे बस मधल्या लोकांसोबत फराळ केला . पैदल परिक्रमावासी भेटले आहेत आणि ते देखील मराठी आहेत म्हटल्यावर माझ्या भोवती आणि तुकोबारायांभोवती बस मधल्या लोकांचा गराडा पडला . परिक्रमेतील अनुभव सांगा , अश्वत्थामा भेटला का वगैरे वगैरे प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली . बऱ्याच लोकांनी आमच्यासोबत सेल्फी काढून घेतले . बघता बघता संपूर्ण सभागृह लोकांनी भरले . सकाळी लवकर उठून सर्व आटोपून घेतले . बांधकामाची काही किरकोळ कामे राहिली होती ती करून घेतली . मदतीला बस मधले दहा-बारा लोक आले . इथे नर्मदा मैया काठावरची फारशी वापरली न जाणारी जाडी भरडी वाळू आणून टाकण्यात आली होती . त्याच्यामध्ये सुंदर शिवलिंगे सापडत . ती कशी शोधायची हे बस मधल्या लोकांना दाखविले व जवळपास प्रत्येकासाठी एक शिवलिंग शोधून दिले ! त्या वाळूच्या ढिगाऱ्यातून मी किमान शंभर शिवलिंगे काढली असतील ! सर्वच जण खुश झाले ! बस मधल्या लोकांसोबत चहा घेतला आणि पुढे निघालो . पायी परिक्रमावासी आणि बस मधले परिक्रमा वाशी यांच्या आचरणामध्ये जमीन आसमानाचा फरक जाणवतो . देहाला कष्ट कमी पडलेले असल्यामुळे या लोकांमध्ये मोठा उत्साह असतो . तसेच नियम पाळण्याच्या बाबतीत फारसा काटेकोरपणा असतोच असे नाही . हे सरसकट विधान नाही . परंतु बहुतांश बस परिक्रमावासी यादृच्छिकपणे वागताना दिसतात . बस मे परिक्रमा आयोजित करणाऱ्या माणसांनी याची काळजी घेतली पाहिजे की त्यांना सुरुवातीलाच सर्व नियम व्यवस्थित समजावून सांगितले पाहिजेत तसेच वेळोवेळी आठवण करून दिली पाहिजे . असो . 
माझ्या पाठीवर "तैरती शीला " असल्यामुळे प्रचंड भार झालेला होता . इथे जवळच एक "तैरती शीला " मंदिर असल्याचे सर्वत्र लावलेल्या पाट्यांवरून दिसत होते . मी असे ठरवले की तिथे जाऊन आपली शीला तिथे देऊन टाकायची . तुकाराम महाराज देखील माझ्यासोबत होतेच . सोबत म्हणजे मागेपुढे . शेजारी कोणालाही घेऊन परिक्रमेमध्ये चालायचे नाही !तो मान फक्त मैय्याचा !  देरोली नावाचे गाव आले . इथे मैयाच्या अगदी काठावर बकुल आश्रम होता . एक गरीब ब्राम्हण हा आश्रम स्वखर्चाने चालवीत होता . तिथे जाऊन काही काळ मैयाच्या काठावर बसलो . 

देरोली च्या बकुळ आश्रमाची थोडक्यात माहिती 

आश्रम दुमजली असून अतिशय स्वच्छ सुंदर व नीटनेटका आहे





 उंच मातीच्या टिल्यावर असलेल्या या आश्रमातून मैय्याचे खूप सुंदर व भव्य दिव्य दर्शन होते 


आश्रम छोटासाच असला तरी नितांत सुंदर आहे



आश्रमातल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण पाट्या



उजव्या हाताला दिसणारा याच काठावरील जंगलातून चालत इथपर्यंत मी आलो होतो. इथले वन्य जीवन समृद्ध आहे


आश्रमाची वास्तू एका अतिउंच व भुसभुशीत मातीच्या ढिगार्‍यावर बांधलेली असल्यामुळे महापुरामध्ये या इमारतीला निश्चितपणे धोका आहे असे जाणवले.


आश्रमातले मुख्य आकर्षण आहे इथली तैरती शीला


एका काचपेटीमध्ये ही शिळा ठेवलेली आहे

जंगलातून चालताना अनेक ठिकाणी मला वानर दिसत होते परंतु कालपासून मला सर्वत्र दिसणारी वानरांची एकच एक टोळी होती असे नंतर माझ्या लक्षात आले ! मी आता त्यातील काही वानर ओळखू लागलो होतो ! आणि अर्थातच ते देखील मला ओळखत होते ! हे मी छातीठोकपणे सांगू शकतो कारण त्या टोळीमध्ये शेपटी तुटलेले एक वानर होते ! एक कान फाटलेले वानर होते ! या दोघांवरून मला टोळीचा अंदाज यायचा ! काठावरून चालताना किमान तीन ते चार ठिकाणी मला हीच वानरे भेटलेली होती ! जणू काही त्यांची सुद्धा परिक्रमा सुरू असावी ! मला पाहिल्याबरोबर शेपटी तुटलेले वानर बिस्किटे मागायला पुढे आले ! मी देखील माझ्याकडे असलेली बिस्किटे त्यांना खाऊ घातली . महाराष्ट्रातील वानर आक्रमक असतात . तशी इथली माकडे प्रेमळ वाटली . ती हातातून शांतपणे वस्तू काढून घेतात . दात दाखवत नाहीत . किंवा घाबरवत नाहीत . सुमारे ५० किलोमीटर वानरांचा हा कळप माझ्या सोबत होता . मी त्यांना त्रास देत नाही हे त्यांनी ओळखले होते . त्यामुळे ते माझ्याजवळ यायचे . परंतु तुकाराम बुवा आल्याबरोबर सर्वजण पळून गेले ! प्राणी किती संवेदनशील आणि हुशार असतात याचा हा नमुना ! इतक्यात आश्रमाचे पुजारी महाराज आले . त्यांनी तैरती शीला आम्हाला दाखवली ! माझ्याकडे आहे तशीच ही विट होती . फक्त आकाराने दुप्पट होती . मी त्यांना म्हणालो की माझी देखील वीट त्यांनी इथेच मंदिरात ठेवावी . त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि मला सांगितले की काहीही झाले तरी ही वीट घरी घेऊन जा कारण तो तुला मैयाने दिलेला प्रसाद आहे !असा कोणाला देऊन टाकू नकोस !  आता आली का पंचाईत ! एवढी जड वीट जाणार म्हणून मला झालेला आनंद क्षणात मावळला ! आपले भोग दुसरे काय ! महाराजांनी दिलेला सुंदर असा बालभोग घेऊन चहा घेऊन , वहीत शिक्का घेऊन पुढे निघालो . 

 बकुळ आश्रमाचा शिक्का 
पूँछकटे वानर माझ्यापुढे पळत होते . ओळखीचे माणूस दिसल्यावर वानरे हसतात ! त्यांच्या काही खाणाखुणा आता मला कळू लागल्या होत्या ! तसाही त्यांच्यात आणि माझ्यात फार काही फरक नव्हता ! त्यांना शेपटी होती . एकाची अर्धी होती . आणि मला नव्हती इतकेच ! बाकी नर्मदा मातेच्या बाबतीत या नराचे आकलन त्या वानरा इतकेच बालिश होते ! त्यामुळे तर तिला मी इतका त्रास द्यायचो ! ती तरी बिचारी काय करणार ! मुलगा कसाही असला कितीही वात्रट असला तरी आईला बिचारीला सांभाळून घ्यावे लागते ! मैया हे वह ! सब जानती है ! नर्मदे हर !




लेखांक एकशे अठरा समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर