लेखांक ११७ : मोटी कोरल चा पुनीत आश्रम आणि नर्मदा मातेने दिलेली " तैरती शीला "

चालत चालत मंगलेश्वर तीर्थ मागे टाकले . आणि उजव्या हाताला दिसणारा कबीरवड पाहत पुढे चालत राहिलो . संत कबीर यांनी दातून करून अर्थात दात घासून टाकून दिलेल्या वडाच्या काडीला फुटलेला हा महावृक्ष आहे . तो एका भव्य बेटावर आहे . त्यामुळे परिक्रमा वासीना तिथे जाता येत नाही . समोरील तटावर असताना झगडिया मढीच्या इथून हाच कबीरवड दिसत होता . 
कबीरवड
कबीरवड मंदिराचा गाभारा (परिक्रमावासी या बेटावर जाऊ शकत नाहीत म्हणून मुद्दाम दर्शनासाठी संग्रहित फोटो टाकले आहेत )

पुढे निकोरा नावाचे गाव लागले . इथे लिंगवराहाचे पुरातन मंदिर होते . या संपूर्ण भागात वराहाचे फार महत्त्व आहे असे मला जाणवले . 



लिंगवराह  मंदिर निकोरा

मंदिराचे दर्शन घेऊन काठाकाठाने पुढे निघालो . पुढे गुप्तेश्वर महादेवाचे मंदिर आहे . 

                       गुप्तेश्वर महादेव
त्याचे दर्शन घेऊन थोडे पुढे गेल्यावर एका अति भव्यदिव्य आश्रमाने लक्ष वेधून घेतले . या आश्रमाची वास्तू इतकी भव्य दिव्य होती की ती न पाहता पुढे जाता येणे शक्यच नाही ! हा आहे निकोरा येथील ध्यानी आश्रम . श्री आनंदी मा नावाच्या एका तरुण साध्वीने आपल्या गुरुदेवांच्या स्मरणार्थ हा आश्रम स्थापन केलेला आहे . हा आश्रम नसून पृथ्वीवरचा स्वर्गच आहे अशी त्याची रचना केलेली आहे ! कमळाच्या उमलणाऱ्या पाकळ्यांसारखे दिसणारे अतिशय भव्य ध्यानमंदिर हे आश्रमाचे मुख्य आकर्षण आहे . त्याचबरोबर सुंदर सुंदर बगीचे आणि अतिशय पंचतारांकित निवास व्यवस्था हे देखील इथले वैशिष्ट्य आहे . परंतु इथे परिक्रमावासींचे अगत्य नाही असे मला जाणवले . केवळ शिष्यमंडळींसाठी हा आश्रम खुला असावा असे मला वाटले . समर्थ रामदास स्वामी म्हणतात "उत्कट भव्य तेची घ्यावे । मिळमिळीत अवघेची त्यागावे । " केवळ या उक्तीला स्मरून आश्रम वरवर पाहून पुढे निघालो .

निकोरा येथील ध्यानी आश्रम


ध्यानी धाम आश्रमाच्या प्रणेत्या आनंदी मा आणि त्यांचे गुरुदेव 


ध्यानी धाम आश्रमातील सुंदर बगीचे 


आश्रमातील ध्यानगृह व भव्य वैचित्र्यपूर्ण कळस 

परिक्रमेमध्ये नसताना या आश्रमामध्ये येऊन राहायला कोणालाही आनंददायक वाटेल असे इथे वातावरण असणार याची खात्री वाटत होती . इतके भव्य आश्रम नर्मदा खंडामध्ये फार थोडे आहेत . इथून नर्मदा मातेचे देखील सुंदर असे दर्शन होते . इथे पुढे स्वामी मनीषानंद यांचा एक आश्रम आहे . परंतु तिकडे न जाता मी पुढे चालत राहिलो .


स्वामी मनिषानंदजी स्थापित परमहंस कुटीर

 नर्मदे काठी असे पावला पावलावर आश्रम लागतात . प्रत्येक आश्रमात जाण्याची गरज नसते . कुणी आग्रहाने बोलावले तर मात्र जावेच लागते . परंतु वर्षानुवर्षे दररोज लाखो परिक्रमावासी जात असल्यामुळे सरावलेले सेवेकरी कधी कधी तुम्हाला बोलवत नाहीत . त्यावेळी मैया ची इच्छा असे म्हणून पुढे चालत राहायचे असते . तुम्ही आपण होऊन जाऊन आश्रमामध्ये काही सोय होईल का असे विचारले तर क्वचित प्रसंगी अपमान देखील होण्याची शक्यता असते ,असे मी स्वतः घडताना पाहिलेले आहे . त्यापेक्षा काठाकाठाने चालत राहावे हे उत्तम . काठावर पुन्हा एकदा मंगलनाथ महादेवाचे मंदिर लागले . या अंगारेश्वर गावामध्ये अंगारेश्वर आणि स्वयंभू अंगारेश्वर अशी दोन मंदिरे आहेत . दोहोंचे दर्शन घेतले . 

स्वयंभू अंगारेश्वर महादेव 



स्वयंभू अंगारेश्वर महादेव आणि शुक्लेश्वर महादेव यांची ज्योतिर्लिंगे एकसारखीच दिसतात .. हा शुक्लेश्वर महादेव आहे.


अंगारेश्वर महादेव .  देवापुढे व संतांच्या पायावर आपली मुले घालण्याची प्रथा नर्मदा खंडात सर्वत्र दिसते  

पुढे घनदाट जंगलातून काठाकाठाने कठीण मार्ग चालत राहिलो . उभा तट होता . त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावे लागायचे . हे अवघड आहे पण अशक्य नाही . 


उभा तट . हा दुरून पाहिला धोकादायक वाटला तरी प्रत्यक्षात एक पाऊल ठेवण्या एवढी जागा सर्वत्र मिळते .

इथे खूप सारे दगड दिसायला सुरुवात झाली होती . यात मुख्यत्वे करून शिवलिंगे तर मिळतच परंतु चित्रविचित्र आकाराच्या देवतांच्या मूर्तींसारखे दिसणारे दगड मिळायचे ! हे दगड वर्षानुवर्षे एखाद्या मोठ्या खडकातील ठराविक खनिजांची झीज झाल्यामुळे उरलेले आकार असावेत असा अंदाज आहे . ते एकमेकांवर आपटले की खणखणीत धातू सारखा आवाज यायचा . आणि जोरात आपटले की फुटून जायचे . नर्मदा मातेच्या उदरातील शिवलिंगे मात्र काही केले तरी फुटत नाहीत ! महादेवाची क्षमा मागून सांगतो की मी अतिशय ताकतीने विविध आकाराची शिवलिंगे जमिनीवर ,किंबहुना खडकावर जोरात आपटून पाहिलेली आहेत . ती अतिशय बेकार पद्धतीने उलटी उसळी मारतात परंतु फुटत नाहीत ! याचे कारण वर्षानुवर्षी नर्मदा मातेच्या उदरामध्ये असलेल्या रांजणखळग्यांमध्ये फिरून फिरून त्यांच्यातील अनावश्यक भाग सर्व निघून गेलेला आहे आणि आवश्यक तेवढा भाग शिल्लक राहिलेला आहे . त्यामुळे ते टणक आणि कठीण असतात . कृपया कोणी हा प्रकार करून पाहू नये . चुकून कंकर उडून डोक्यात किंवा शरीरावर कुठे लागले तर मोठा अपघात घडू शकतो . इथले विविध देवतांच्या आकाराचे दगड मात्र ठिसूळ होते . मला इथे विविध आकाराचे खूप दगड सापडले परंतु पाठीवरचे वजन वाढवायला नको म्हणून मी ते तिथेच सोडून पुढे आलो .
या भागातील पाणी मात्र अतिशय गोड होते याचा अर्थ समुद्राचा संपर्क आता संपल्यात जमा होता . इथे अतिशय मोठ्या आकाराची दोन-तीन पंप हाऊस लागली . मोठे मोठे डोह कूप किंवा जॅकवेल बांधले होते ज्यातून  भरूच जिल्ह्यातील ५ -६ तालुक्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी जल उपसा केला जात असे . इथेच एक गेस्ट हाऊस सुद्धा होते . 


मोठे डोह कूप किंवा जॅकवेल . आता ओहोटीमुळे पाणी उतरलेले दिसत आहे . अन्यथा डोहकूपापर्यंत पाणी असते . पुरामध्ये तर डोह कूप अर्ध्याच्या वर बुडते .
या भागातील लहान मोठ्या नावा
 इथून काठाने चालणे फारच कठीण होऊ लागले . त्यात ग्रामस्थांनी प्रचंड काटे कुटे टाकून काठावरचा मार्गच बंद करून टाकला होता . असे का केले आहे विचारल्यावर नावाड्यांनी मला सांगितले की इथे मगरींचे प्रमाण खूप जास्त आहे . त्यामुळे इथून काठावरून कोणाला चालू दिले जात नाही . अतिशय निराश होऊन मी काठाला समांतर असलेल्या रस्त्याकडे चालत आलो . वाटेत सुंदर अशी शेती लागली . गुजरात राज्य महामार्ग क्रमांक १६४ वर पोहोचलो . 
 जवळच असलेल्या एका आश्रमातून आवाज देण्यात आला म्हणून आत गेलो . एका तरुणाने आवाज दिला होता . आत मध्ये जाऊन बघतो तर काय समोर साक्षात साईबाबा बसलेले आहेत ! शिर्डीला साईबाबांच्या मूर्तीची जशी रचना आहे अगदी तसेच बसलेले एक साधू तिथे होते ! त्यांनी ठरवून तशी पायाची घडी घातली असावी हे स्पष्ट दिसत होते ! मला हा प्रकार थोडासा बालिशपणाचा वाटला . मी देखील मजा केली . पाया वगैरे न पडता नुसताच तिथे बसून राहिलो . मग ते प्रति साईबाबा मला म्हणाले , " साईबाबांच्या पाया नाही पडणार का ? " मी म्हणालो , "कुठे आहेत साईबाबा ? " मग मात्र त्यांची पंचायत झाली . ह्या आश्रमाचे नाव स्वयं साई सद्गुरु स्थापित मिनी शिरडी धाम असे होते ! म्हणजे या साधू महाराजांनी स्वतःला बळेबळेच स्वयं साई म्हणून घोषित केलेले होते ! एका विशिष्ट वयानंतर माणसाचे सर्व केस पिकतात . आणि त्यात डोक्याला साईबाबां सारखे फडके बांधले आणि दाढी विशिष्ट प्रकारे कोरली की कोणीही साईबाबांसारखा दिसू लागतो ! इथेही तसलाच प्रकार होता . अंगावरची वस्त्रे त्यांनी जाणून-बुजून साईबाबांच्या सारखी घातली होती . आश्रमात जिकडे पहावे तिकडे साईबाबांच्या छायाचित्रांच्या विविध 'पोज' आहेत अगदी तशा 'पोज' दिलेले या बाबांचे फोटो लावलेले होते !अगदी स्पष्टपणे सांगायचे तर हा सगळाच प्रकार मला आचरटपणाचा वाटला . असो . ज्याचा त्याचा प्रश्न .माझ्या मागोमाग अजून काही परिक्रमावासी आश्रमात येऊन बसले . या बाबांनी आमच्या सर्वांशी गप्पा मारायला सुरुवात केली . बाहेर अंगणामध्ये एक झोपाळा होता त्यावर जाऊन ते बसले . इथे यांचा मुलगा आणि सून देखील होते . सून बिचारी फारच गरीब होती . तिला यांनी चांगलेच कामाला जुंपले आहे असे दिसत होते . तिला चहा करण्याचा आदेश स्वयंसाईबाबांनी दिला आणि सर्वांसाठी बालभोग मागवला . बाबा सर्वांना सांगू लागले , "मी तीन नर्मदा परिक्रमा केल्या आहेत ! आणि त्याही उलटे चालत ! "  हे ऐकल्यावर मात्र मी कपाळावर हातच मारून घेतला ! परिक्रमे मध्ये उलटे चालून परिणाम काय साध्य होणार आहे ?  परंतु काही लोकांना जगापेक्षा काहीतरी वेगळे करण्याची फार हौस असते . यांचेही तसेच काहीतरी होते असे मला जाणवले .  मी त्यांना विचारले उलटे चालल्यामुळे काय झाले ? ते म्हणाले सुलटे कोणीही चालते ! उलटे चालणे फक्त संतांना जमते ! आता मात्र माझी खात्री पटली की इथे सगळेच उलटे आहे ! मला लहानपणापासून उलटे पळण्याची आवड आहे . आणि मी अतिशय वेगाने उलटा पळू शकायचो . अगदी सुलटे पळणाऱ्यांच्या गतीने पळायचो . आणि मी तर मुळीच संत नाही . त्यामुळे केवळ संत उलटे चालू शकतात त्यांचे हे विधानच मोठे हास्यास्पद होते . किंबहुना स्वतःला संत घोषित करण्याचा तो केविलवाणा प्रयत्न वाटत होता . मी त्यांना काही कठीण अध्यात्मिक शंका मुद्दामहून विचारल्या . परंतु त्याचे काही फारसे समाधानकारक उत्तर मला मिळाले नाही . वरवरची उत्तरे मिळाली . परंतु मला अतिशय आनंददायक अशी गोष्ट इथे मिळाली ती म्हणजे बालभोग ! सुंदर अशी गाठीया शेव आणि गरम गरम चहा बिस्किटे सर्वांना देण्यात आली !


स्वयं साई आश्रमाचे गूगल  नकाशावरून मिळालेले चित्र. यात बाबांचा झोपाळा  दिसतो आहे आणि धरमशाला गावाची  निळी पाटी दिसत आहे.

 या भागामध्ये अतिशय मनापासून परिक्रमा वासीयांची सेवा करणारे काही आश्रम आहेत . त्यांना स्वयंसाईबाबा नावे ठेवत होते . हा असा आहे तो तसा आहे ,ही अशी आहे ती तशी आहे , हे सर्व शांतपणे मी ऐकून घेतले आणि "सरळ चालत" परिक्रमा करण्याची बुद्धी मला दिल्याबद्दल मनोमन नर्मदा मातेचे आभार मानले ! त्यांनी बांधलेल्या तंबू वजा आश्रमात परिक्रमावासींची उत्तम सोय व्हायची यात काही शंका नाही . तसेच त्यांनी जगातला पहिला संतांचा वृद्धाश्रम काढला आहे असे देखील त्यांच्या शिक्क्यावर लिहिलेले होते . हा ! हा शिक्का म्हणजे एक किस्साच आहे ! नर्मदा खंडातील सर्वात मोठा शिक्का अशी या शिक्क्याची नोंद आहे !प्रत्येकाला आवर्जून स्वयंसाईबाबा वहीमध्ये शिक्का मारून घ्या असे सांगत होते . मी माझ्या वहीमध्ये मारून घेतलेल्या त्या शिक्क्याचे चित्र खालील प्रमाणे !

स्वयंसाईबाबा यांनी माझ्या वहीमध्ये स्वतःच्या हाताने मारलेला शिक्का


आता या शिक्क्याचे थोडेसे विश्लेषण करूयात .सर्वात वर या बाबांनी आठ धर्मांची / पंथोपपंथांची चिन्हे छापलेली आहेत . इथूनच गडबडीला सुरुवात होते ! नर्मदा खंडामध्ये या इतर चिन्हांची काही गरज नाही . नर्मदा माता स्वयंसिद्धा आहे . आणि तिच्या काठावर कोणाची भक्ती केली जावी हे पुराण प्रसिद्ध आहे . गेल्या काही वर्षात निर्माण झालेल्या फडतुस पंथांचा गौरव इथे करण्याचे काही कारण नाही . त्याच्या पुढचा शब्द आहे बिन सांप्रदायिक ! म्हणजे आधी आठ संप्रदाय दाखवायचे आणि मग म्हणायचे की आम्ही बिन सांप्रदायिक आहोत ! म्हणजे विरोधाभास सुरू झाला ! लगेच पुढचे वाक्य आहे पूर्ण सनातन ! म्हणजे आम्ही कुठलाच संप्रदाय मानत नाही असे आधी म्हणायचे की पुढच्या वाक्यात सांगून टाकायचे की आम्ही पूर्ण सनातनी आहोत ! म्हणजे अजूनच मोठा वैचारिक गोंधळ दिसून आला ! त्यानंतर स्वयंसाईबाबांनी स्वतःला लावलेली सुंदर अशी बिरूदे वाचावीत अशीच आहेत !ब्रह्मनिष्ठ प्रेमावतार परमपूज्य आचार्य परमहंस जगद्गुरु स्वामी संत श्री सद्गुरु स्वयं साई गुरुजी ! आ हा हा ! काय ती बिरूदावली ! परंतु बिन सांप्रदायिक माणसाने अशी सांप्रदायिक बिरुदे कशाला लावावीत ! असो . पुढे ते म्हणतात मिनी शिर्डी तीर्थधाम . आता बिन सांप्रदायिक असल्यामुळे मिनी हा इंग्रजी शब्द चालणार आहे त्यामुळे तो क्षम्य आहे .प्रति शिर्डी असा शब्द वापरता आला असता परंतु तो सांप्रदायिक आहे ! साई प्रेम समय आश्रम असे पुढे नाव दिलेले दिसते . एकंदरीत हे बाबा प्रेमाचे भुकेलेले आहेत असे मला दिसले . त्यामुळे सगळीकडे प्रेम प्रेम प्रेम शब्द टाकला होता . आयुष्यामध्ये विचारांमध्ये स्पष्टता नसली की माणसाचे काय होऊ शकते याचे उदाहरण नर्मदा माई जणु आम्हाला दाखवत होती . आम्ही गेल्यापासून बाबा अखंड बोलत होते . आणि त्यातल्या एकाही वाक्याला आधीच्या वाक्याचा संदर्भ नव्हता . कमीत कमी वेळामध्ये त्यांनी काय काय केले आहे सांगायचा  केविलवाणा प्रयत्न ते करत होते . मला मनापासून या माणसाची दया आली . सुदैवाने ते योग्य ठिकाणी होते . नर्मदा माता नक्कीच त्यांचे कल्याण करेल यात शंका नाही . माझ्याबरोबर दक्षिण तटावर चालणाऱ्या बंगाली मुलांसोबत आणि अवधूत फरले सोबत चालणारे देखील असेच एक परिक्रमा वासी होते ज्यांचे किस्से ते मला सांगायचे . सहा फूट उंच असलेले हे पुण्याचे परिक्रमावासी साईबाबां सारखा वेश करून चालायचे . आणि कोणी नर्मदेहर म्हटले की आशीर्वाद देऊन उभे राहायचे . मग समोरचा माणूस आपसूकच येऊन पाया पडायचा .या मुलांनी त्या प्रतिसाई बाबांची भरपूर थट्टा केलेली होती . असे अनेक प्रकारचे लोक तुम्हाला नर्मदा परिक्रमेमध्ये भेटतात . अहो साक्षात आद्य शंकराचार्यांना देखील असे लोक भेटले तिथे तुमची आमची काय कथा ! उगाच नाही त्यांनी नर्मदाष्टकात म्हटले आहे "पंडिते शठे नटे " .
नटून थटून वेशभूषा करून वावरणारे सुद्धा भेटणार परिक्रमेत ! आपण त्यांच्याकडे पाहायचे आणि आपल्या मार्गाने चालत राहायचे . समोरचा प्रत्येक मनुष्य आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतो . एक तर काय करावे हे शिकवत असतो किंवा काय करू नये ते देखील शिकवत असतो . स्वयं साईबाबांची गाडी ज्योतिबेन वर घसरल्यावर मात्र मी उठलो . कारण त्या खरोखरीच निस्पृह पणे परिक्रमावासींची सेवा करत आहेत ! आणि त्यासाठी त्यांच्या वेशामध्ये त्यांनी कुठलाही बदल केलेला नाही ! आहे त्या घरात राहून आहे त्या वेशामध्ये त्या एका महान संत पदाला पोहोचलेल्या आहेत ! आणि हे त्या स्वतः म्हणत नसून माझ्यासारखे परिक्रमावासी त्यांना हे बिरूद देत आहेत . 


ज्योतिबेन

ज्याप्रमाणे फुलाला मी उगवलो आहे याची जाहिरात करावी लागत नाही , भुंगे आपोआप त्याचा शोध घेत येतात तसेच हे आहे . मी आता संत ,जगद्गुरु , सद्गुरु , आचार्य झालेलो आहे हे आपण सांगायचे नसते . तसे तुम्ही झालात की मुमुक्षु लोकांना आपोआप त्याचा वास लागतो ! जाताना मात्र परमेश्वर सगळीकडे आहे हा भाव मनात ठेवून स्वयं साई बाबांना साष्टांग नमस्कार केला आणि पुढे निघालो .दुर्दैवाने त्यांचा एकही फोटो कोणीच इंटरनेटवर टाकलेला दिसत नाही . नाहीतर तुम्हाला फोटो पाहायला नक्कीच मौज वाटली असती !  
राहून राहून असे वाटले की यांनी साईबाबांचा वेश धारण न करता केवळ परिक्रमावासी सेवा केंद्र चालवले असते तर त्यांना अधिक आनंद मिळाला असता आणि परिक्रमावासींना देखील त्यांच्याबद्दल अधिक आदर उत्पन्न झाला असता . माझ्यासोबत तिथे असलेले सर्व परिक्रमा वासी बाहेर पडल्यावर या प्रतिसाईबाबांची थट्टा मस्करी करीत होते , यातच सर्व आले . असो . 
इथून पुन्हा एकदा काठावर आलो . वाळू माफियांनी मोठाच उच्छाद मांडला होता . मैयामध्ये दोन मोठे पूल तयार केले होते व त्यावरून शेकडो डंपर चालले होते . काठाने चालणे कठीण करून सोडले होते . जिथे पाय ठेवून चालता येईल अशा जागेवरूनच डंपर जायचे . ते आले की बाजूला व्हावे लागायचे . बाजूला दीड दीड दोन दोन फूट उंच चिखलाचे ढीग असायचे . अखेरीस थोडासा वरचा शेतातला मार्ग पकडला आणि चालू लागलो . तत्पूर्वी धर्मशाला नावाच्या गावामध्ये धर्मेश्वर महादेवाचे मंदिर , दत्त मंदिर आणि पाच पांडवांची गुहा लागली . याचे दर्शन घेऊन पुढे निघालो होतो .

श्री धर्मेश्वर महादेव 


श्री धर्मेश्वर महादेव आणि दत्त मंदिर 


श्री धर्मेश्वर येथील मैय्या


पाच पांडव गुफा

झणोर  गावामध्ये बलकेश्वर महादेवाचे मंदिर आहे . तिथे दर्शन घेतले आणि भरूच जिल्हा संपला . आता नांद नावाचे गाव लागले जे भरूच जिल्ह्यामध्ये येते आणि याच्या पुढचे सोमज, देलवाडा  हे गाव बडोदा जिल्ह्यात येते.इथे असलेल्या नंदा देवी मातेच्या मंदिरामुळे या गावाला नांद हे नाव पडले असावे. 
नांदगावाचा घाट कायम गजबजलेला असतो . कारण इथे मगरींपासून संरक्षण करणाऱ्या जाळ्या लावलेल्या आहेत . त्यामुळे स्नान करणे तुलनेने सुरक्षित आहे . त्यामुळे उत्सवामध्ये आणि पर्वणी मध्ये येथे मोठी गर्दी असते . मगरीं पासून सावध करणारे फलक देखील सरकार ने जागोजागी लावलेले आहेत .


नांदगावातील मगरीं पासून सुरक्षित करण्यात आलेला घाट .


घाटावर स्नानासाठी झालेली भाविकांची गर्दी



यात्रे करून साठी उभा केलेला तात्पुरता तंबू . संग्रहित छायाचित्र .


मगरीपासून सावध करणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाच्या पाट्या




इतके सर्व करूनही लोक नको तिथे पाण्यात उतरतात आणि मगरींच्या भक्ष्यस्थानी पडतात . 

नांद मध्ये पोहोचेपर्यंत चांगली टळटळीत दुपार झाली होती. पोटात कावळे ओरडू लागले होते. परंतु इथल्या कुठल्या मंदिरामध्ये परिक्रमावासींची सेवा होत नव्हती. इतकाच एका ग्रामस्थांनी मला सांगितले की सद्गुरु कबीर धर्मदास सेवाश्रम नावाचा आश्रम या गावाच्या शेवटी शेवटी आहे तिथे अन्नदान केले जाते. त्याप्रमाणे तो कबीर आश्रम शोधत निघालो. अखेरीस गावाच्या शेवटी आश्रम सापडला, परंतु तिथे कोणीच नव्हते. बहुतेक गावातील खेळणाऱ्या मुलांनी परिक्रमावासी आले आहे अशी वर्दी दिली आणि मग दोन-तीन लोक तिथे आले आणि किती मूर्ती आहेत याचा अंदाज त्या प्रमाणात त्यांनी मला शिधा दिला आणि मी स्वयंपाक केला.  भरपूर बटाटे टाकून सुंदर अशी खिचडी मी बनवली. आश्रमाच्या मागच्या बाजूला चूल होती तिथे स्वयंपाक केला. माझ्याबरोबर अजून काही परिक्रमावासी तिथे पोहोचले होते. साधारण सात आठ जणांचा उत्तम स्वयंपाक केला आणि मी पोटभर भोजन घेतले. भोजन जास्त झाल्यामुळे आणि उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पुढे जायची इच्छा होईना. आश्रमाच्या आवारामध्ये सुंदर कडुलिंबाची झाडे होती आणि बसण्यासाठी बाकडी टाकलेली होती त्यातील एका बाकड्यावर बसल्या बसल्या माझा डोळा लागला.




नांद गावातील कबीर आश्रम आणि त्याचे ऐस पैस पटांगण


सत्यनाम सद्गुरु कबीर धर्मदास सेवाश्रम नांद



आश्रमाचा परिसर मोठा आहे आणि लिंबाच्या झाडांची सुंदर सावली इथे आहे


याच चुलीवर मी स्वयंपाक केला व नंतर सर्व भांडी वगैरे घासली

 चांगली तास दोन तास झोप काढल्यावर आपोआप जाग आली आणि आश्रमात कोणीच दिसत नाही असे पाहून मी पुढे जायला सुरुवात केली.

जेवण झाल्या झाल्या आश्रमातील सेवकांनी माझ्या वहीमध्ये दिलेला शिक्का.   
शिक्क्यावर जिल्हा भरूच असे लिहिले असून इथून पुढे वडोदरा जिल्हा लागतो  असे मला ग्रामस्थांनी सांगितले.
कबीर आश्रमाच्या शेजारीच योगानंद आश्रम नावाचा मोठा आश्रम होता. परमहंस योगानंद यांच्या नावाने काढलेला हा आश्रम दिवसा परिक्रमावासियांना चहा बालभोग वगैरे देत असे परंतु रात्रीचे भोजन आणि मुक्कामाची सोय इथे नव्हती.  आश्रमातील सेवकाने मला चहा पिण्यासाठी आत बोलवले.  आश्रम साधना करण्यासाठी बनविण्यात आला होता.



इथून बरोबर समोर सरळ रेषेमध्ये तरसाली गाव होते .तिथल्या तारकेश्वर किंवा तल्पेश्वर महादेवाची कथा किंबहुना व्यथा आपण मागील एका प्रकरणांमध्ये पाहिलीच आहे .
पुढे किनाऱ्यातील दाट झाडी डाव्या हाताला ठेवत मी चालत राहिलो. इथे जुना आखाड्याचा एक आश्रम होता. शंभू गिरी महाराज नावाचे साधू हा आश्रम चालवायचे. मी दर्शनाला गेल्यावर त्यांनी मला सांगितले की इथून पुढे एक खोल ओढा आडवा येतो त्यामुळे रस्ता नाही.परंतु मला किनारा सोडावयाचा नाही हे मी निक्षून सांगितल्यावर त्यांनी मला एक जबरदस्त जागा सांगितली जिथे तो ओढा ओलांडण्यासाठी कमरे एवढ्या पाण्याखाली मातीचा भराव भरण्यात आला होता . इथून मी तो ओढा सहज पार केला आणि देलवाडा गाव आले.


सुंदर झाडीमध्ये असलेला शंभूगिरी महाराजांचा जुना आखाड्याचा आश्रम . नागा साधू व अन्य साधू मुख्यत्वे करून इथेच मुक्काम करतात .  पुढे आडवा आलेला ओढा .

मी ओढा ओलांडला ती जागा .

 देलवाडा गावामध्ये कर्कटेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्याचे दर्शन घेतले. इथल्या प्रत्येक मंदिरामध्ये अजून दोन-तीन तरी छोटी उपमंदिरे असतातच.  इथे देखील कर्कटेश्वरासोबत शक्रेश्वराचे मंदिर होते आणि नर्मदा खंडातील प्रत्येक मंदिर समूहाप्रमाणे नर्मदा मातेचे एक मंदिर होते.कालीमातेचे मंदिर होते .


कर्कटेश्वर आणि शकरेश्वर महादेव


मंदिराचा कळस सजवताना भाविक

नर्मदा मातेचे आणि कालीमातेचे मंदिर

 जय काली माता ! 


शिवलिंगाचे तांब्याचे कवच

या भागातील वीटभट्ट्यांचे उंच विटांचे मनोरे किंवा चिमण्या असतात त्यातून धूर उंच आकाशात सोडला जातो .  इथे नर्मदा मातेच्या काठावरती विटांनी बांधलेल्या उभ्या मनोऱ्यावर उगवलेले एक सुंदर असे वडाचे झाड होते.  मुळात उंचावर असल्यामुळे कितीही पूर आला तरी हे झाड सडत नसे. हे झाड मला फार आवडले. मी चारही बाजूंनी त्याचे निरीक्षण केले.. आपल्याला पूर्वी एकदा कुठल्यातरी प्रकरणांमध्ये मी सांगितल्याप्रमाणे वडाचे बीज प्रचंड संयमी असते आणि अनेक वर्ष उगवण्यासाठी वाट पाहण्याची क्षमता त्या इवल्या बीजामध्ये असते.त्यामुळे भिंतीमध्ये किंवा विटांमध्ये वाट पाहून पाहून अशी वाळूमध्ये मिसळलेली बीजे योग्य वेळी उगवतात.त्याचे बीजावरण मोकळे होण्यासाठी तितके पावसाळे जावे लागतात. पक्षांच्या विष्ठेतून आल्यावर त्यातील आम्ल रसामुळे बीजावरण लवकर विरते आणि बीज लवकर उगवते .





हाच तो विटांच्या चिमणी वर उगवलेला वटवृक्ष 

ओढा ओलांडून सोमज गावाच्या हद्दीमध्ये आलो.  अतिशय शांत निवांत आणि निर्मनुष्य असा रस्ता नर्मदा मातेच्या काठावर चालण्यासाठी मिळाला. नर्मदा मैया उगमापाशी लहान आहे , तिथे शेतांचे तुकडे देखील लहान लहान आहेत . परंतु इथे नर्मदा मातेचे पात्र भव्य दिव्य आहे ,तसेच शेतांचे आकार देखील अतिशय मोठे मोठे आणि प्रचंड आहेत. एका एका माणसाचे सलग पन्नास शंभर एकराचे पट्टे इथे पाहायला मिळतात. इतके मोठे क्षेत्र करावयाचे असल्यामुळे आपसूकच यांत्रिकीकरणावर भर दिलेला दिसतो. त्यामुळे एकाच पिकाच्या लांबच लांब सरळसोट रेषा काढलेल्या पाहायला मिळतात.
शेतांचे सरळसोट मोठाले पट्टे
एकाच कुटुंबाची सलग शेती

या भागामध्ये खूप मोठमोठ्या वीटभट्ट्या असून त्यांचा धूर जाण्यासाठी उंचच उंच विटांचे मनोरे केलेले आपल्याला दिसतात.  मगाशी मी पाहिलेले वडाचे झाड अशाच एका मनोऱ्यावरती उगवलेले होते. 
या भागातील एका वैशिष्ट्यपूर्ण वीटभट्टीचे अवकाशातून काढलेले चित्र . विटांच्या मनोऱ्याची किंवा चिमणीची सावली पडलेली दिसत आहे पहा .

इथे पौराणिक असलेल्या मार्कंडेश्वर महादेवाचे दर्शन घेतले आणि नांगरलेल्या होडीतून एक छोटासा ओढा ओलांडला. म्हणजे होडी चालवायची वेळ आलीच नाही. तर होडीचाच पूल करून पलीकडे गेलो. 
 हाच तो होडीचा पूल! 
आता मात्र काठाने चालणे कठीण होईल अशा पद्धतीची कुंपणे शेतकऱ्यांनी घातलेली होती. त्यामुळे अगदी मैयाच्या काठावर असलेल्या एका शेतामध्ये शिरून शेतातूनच चालायला सुरुवात केली.सोमज , देलवाडा , ओझ , पुरा  अशी गावे पार करत असेल मोठी कोरल गाठले. 
ओझ गावामध्ये प्रत्येक अधिक ज्येष्ठ महिन्यामध्ये बारा वर्षांनी मोठा मेळा भरतो आणि इथे सुद्धा वेड्यावाकड्या आकाराच्या दगडांचा खच नर्मदेकाठी सापडतो . इथे पुनीत आश्रम नावाचा एक भव्य दिव्य मंदिर समूह होता!  अक्षरशः मंदिरेच मंदिरे होती! नर्मदा पूर्णा मध्ये वर्णन केलेली बारा तीर्थक्षेत्र इथे आहेत.
पंच कुबेरेश्वर भगवान हे इथे मुख्य दैवत आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक मंदिरे आहेत. मंदिरांचे वैशिष्ट्य असे आहे की प्रत्येक मंदिर दुसऱ्या मंदिरापेक्षा थोडेसे वेगळे आहे. त्यामुळे कदाचित ती वेगवेगळ्या काळामध्ये बांधली गेलेली असावीत अशी शक्यता आहे. परंतु सध्याच्या मंदिर व्यवस्थापनाने संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ ,सुंदर आणि उत्तम स्थितीमध्ये ठेवलेला आहे. संपूर्ण मंदिर परिसराला कोटा फरशी घालण्यात आलेली आहे. सगळ्या मंदिरांची रंगसंगती देखील एकसारखी ठेवलेली आहे.भाविकांसाठी उत्तम दुमजली निवासव्यवस्था असून सर्व खोल्या गाद्या गिरजा वगैरे अतिशय स्वच्छ आणि नीटनेटक्या आहेत. विशेषतः पंच कुबेरेश्वराचे मंदिर फार सुंदर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारातच दोन्ही बाजूला दोन छोटी मंदिर आहेत. महादेवाच्या पिंडीला अन्यत्र तांब्याचे किंवा पितळेचे कवच असते परंतु इथे मात्र चांगल्या दर्जाचे जाडजूड चांदीचे कवच महादेवाला चढवलेले आहे. मंदिर परिसरामध्ये उत्तम बागबगीचे आहेत. तसेच नर्मदा मातेच्या बाजूला मोठी मैदानवजा जागा सोडलेली असून तिथे फरसबंदी केली आहे आणि बसण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे.इसवी सन 1907 मध्ये जन्माला आलेल्या पुनीत महाराज नावाच्या संतांनी तीर्थक्षेत्र विकसित केलेले आहे. इथे बाराशे वर्षे जुने एक शिवलिंग आहे. निळकंठेश्वर महादेवाचे हे शिवलिंग दर महाशिवरात्रीला आणि व्यतिपात नावाच्या योगावर एक तीळ आकाराने वाढते आहे. तशी पाटी देखील मंदिरात लावलेली आहे. इथे रणछोड राय कृष्णाचे मंदिर आहे, गायत्री मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, भवानी माता , आशापुरी माता आहे ,महादेव तर आहेतच ,गणपती आहे ,मारुती आहे, अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत . फार पूर्वी इथे एखादे भव्य मंदिर असावे असे अवशेष जागोजागी सापडतात ते गोळा करून लोकांनी देव म्हणून पुजलेले आहेत. पुनित भवन नावाच्या वास्तूतील एका भव्य सभागृहामध्ये सर्व परिक्रमा वाशींची उतरण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.या पुनीत आश्रमापासून डास गायब झाले. नर्मदा मातेच्या पाण्याची चव सुद्धा पुन्हा पहिल्यासारखी झाली! मला आध्ये मध्ये भेटणारे सर्व परिक्रमावासी इथे मुक्कामाला आलेले होते. तुकाराम सुरवसे ,केरळी संन्यासी, मुंबईचा नागा बाबा ,तिवारी मौनी बाबा आणि अजून बरेच लोक इथे मुक्कामाला होते. मी काठाकाठाने चालत असल्यामुळे सर्वात आधी मुक्कामावर पोहोचत असे.हे लोक शॉर्टकट म्हणून डांबरी सडकेने चालत परंतु उशिरा पोहोचत. हे गणित मला कधीच सुटले नाही. अगदी नकाशावर अंतर मोजले तरीसुद्धा तुमच्या डोळ्याला स्पष्टपणे दिसते की डांबरी रस्ता सरळ असल्यामुळे अंतर वाचवितो परंतु काठाने कितीही वळणे घेत चालले तरी परिक्रमावाशी तेवढ्याच वेळात अधिक अंतर कापतो . हीच तर नर्मदा परिक्रमेची खरी मेख आहे! अतिशय प्रशस्त अशा भांडारगृहामध्ये उत्तम पैकी भोजन व्यवस्था आश्रमाने केलेली आहे.  या आश्रमाचे एक वैशिष्ट्य असे की इतकी सर्व व्यवस्था उभी केलेली असून तिथे तुम्हाला स्वच्छता करणारा किंवा पहारा देणारा किंवा व्यवस्था पाहणारा , पूजा अर्चा करणारा कुणीही मनुष्य फिरताना दिसत नाही ! तरी देखील सर्व सुरळीत चालू आहे! आहे की नाही गंमत! हे स्थान अतिशय पवित्र आहे, अतिशय जागृत आहे आणि चातुर्मास करण्यासाठी अतिउत्तम आहे! थोडासा आश्रमाचा  फेरफटका मारूयात .

पुनीत आश्रमातील मंदिर समूह
आश्रमातील भक्तनिवास
श्री पंचकुबेरेश्वर महादेव
श्री पंचकुबरेश्वर महादेव मंदिर
महादेवांचा चांदीचा साज शृंगार
पुरातन मंदिराचा अवशेष शनी म्हणून स्थापित केलेला आहे
ज्यांच्यामुळे हे तीर्थक्षेत्र पुनित झाले असे श्री पुनीत महाराज, पुनीत महाराजांनी इथे राहून गायत्री पुरश्चरणे केली होती.
पुनीत आश्रमातील बगीचे
संध्याकाळी इथे बसायला आणि दूरवर दिसणाऱ्या नर्मदा मातेचे दर्शन घ्यायला खूप भारी वाटते . मध्ये थोडीशी शेती आणि वाळूचा मोठा किनारा आहे . समोर भालोद गाव आहे . 
भोजनालयाच्या नावातच कुबेर असेल तर आत मध्ये पदार्थांची काय रेलचेल असेल याची कल्पनाच केलेली बरी !
 इथे पुरातन कुबेर मंदिर असल्याचे काही अवशेष
संत श्री पुनित महाराज म्हणतात 
સેવા અને સ્મરણ જગમાં કરવાના છે જે કામ 
સેવા તો જન સેવા કરવી લેવું રામનું નામ 
अर्थात
करावे स्मरावे जगी काही काम ।
जनांचीच सेवा मुखी राम नाम ॥
બારા સો વર્ષ પુરાણા શ્રી નીલકંઠેશ્વર મહાદેવ મહાશિવરાત્રી અને વ્યતિપાત હોય તો એક તલ જેટલા વધે છે अर्थात
बाराशे वर्ष जुन्या श्री निळकंठेश्वर महादेवांची शिवपिंडी महाशिवरात्र आणि व्यतिपात योग असेल तेव्हा एक तीळ वाढते !
श्री गायत्री माता आणि श्री दत्तप्रभू
श्री रणछोडरायकृष्ण
मंदिराची स्थापत्य शैली अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याने अनेक महापूर पाहिलेले आहेत !

 सभागृहामध्ये परिक्रमावासींची निवासाची व्यवस्था होत असते आणि मी देखील इथेच राहिलो होतो . याच दांड्यावर कपडे वाळत घातले होते ! असा मोठा आश्रम आला की तो कपडे धुण्याचा दिवस असतो !
मंदिरातील अनेक शिवलिंगांपैकी एक सुंदर शिवलिंग . मंदिरातील स्वच्छता दृष्ट लागण्यासारखी आहे !
 मंदिरातील नर्मदा देवीची मूर्ती


शिवलिंगांच्या जलहरीचे जितके प्रकार नर्मदा खंडामध्ये पाहायला मिळतात तेवढे जगात कुठेही पाहायला मिळणार नाहीत !
मंदिर समूह दुरून खूप छान दिसतो
श्री पंचकुबेरेश्वर महादेव
श्री आशापुरी माताजी

रामदासी शैलीतला वीर मारुती


पुनीत आश्रमातील विश्वस्तांचे क्रमांक असलेली पाटी
भल्या पहाटे उठून स्नान पूजनादि आन्हिके आटोपून नारेश्वर चा रस्ता धरला. अर्थातच रस्ता म्हणजे नर्मदा मातेचा काठ!  दर काही अंतर गेल्यावर मी माझा दंड तपासून पाहत असे. तो कोरडा पडला आहे याचा अर्थ आपला मार्ग चुकतो आहे!  लगेच नर्मदा मातेच्या काठाला जाऊन तिच्या जलामध्ये तो बुडवत मी चालायचो ज्यामुळे तो पुन्हा ओलावायचा. आता सर्वत्र वाळू आणि एका बाजूला घनदाट जंगल असा रस्ता होता .तिथे समोर मणीनागेश्वर आणि ज्याच्या पायऱ्या वाहून गेल्या होत्या ते शाश्वत मारुती धाम आदी स्थाने दिसत होती. माझ्या सोबत तुकाराम बुवा सुरवसे होते परंतु ते वरील झाडी जवळील मार्गातून चालत होते. मी मैयाच्या जवळून चालत होतो. काठाने चालण्याचा एक सर्वात मोठा फायदा असा होतसे की कमंडलू तून पाणी प्यायची वेळ यायची नाही. जेव्हा केव्हा तहान लागेल तेव्हा खाली वाकायचे आणि ओंजळीने नर्मदा मातेचे पवित्र जल आकंठ ,मनसोक्त , उन्मुक्तपणे प्यायचे! असे दिवसातून किमान तीस ते चाळीस वेळा असे पाणी पीत असे. त्यामध्ये तृषाशमन हा हेतू गौण असायचा तर रेवास्पर्श व नर्मदा जलाचे तीर्थ प्राशन पुन्हा पुन्हा घडावे हा हेतू अधिक असायचा . अशीच मला तहान लागली म्हणून मी नर्मदा जल पिण्यासाठी योग्य जागा शोधू लागलो.  जिथे काठावर चिखल अधिक असतो तिथे पाणी पिता येत नाही तर जिथे एखादा खडक असतो तिथे पाणी पिणे सोपे जाते. त्यातही जर गवत नर्मदेच्या पाण्यामध्ये शिरलेले असेल तर तिथे पाणी फार स्वच्छ असते. पाणी पिताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची असते ती म्हणजे आपला पाय नर्मदा मातेला लागला नाही पाहिजे. खरे तर पाणी पिताना पायातील पादत्राणे बाजूला काढून पाणी पिले पाहिजे परंतु ते दरवेळी करता येणे शक्य नसल्यामुळे मी अशी जागा शोधायचो जिथून आपल्या पादत्राणांचा नर्मदा मातेला स्पर्शच होणार नाही. आता सुद्धा मला अशी एक जागा सापडली. सर्वत्र हिरवेगार गवत होते आणि नर्मदा मातेच्या मधूनच साधारण दीड दोन फुटावर एक दगड वरती आला होता. अशी जागा फार उत्तम कारण त्या दगडावर एक पाय ठेवला आणि काठावर एक पाय ठेवला की खाली वाकून थेट तोंडाने सुद्धा पाणी पिता यायचे ! अर्थात तसे कधी केले नाही कारण असल्या उठपटांग गोष्टी करायला नर्मदा खंडामध्ये परवानगी नाही. नर्मदा मातेचे पावित्र्य जपले जावे याची प्रचंड काळजी सर्व साधू समाज घेत असतो. असो तर असा तो दगड मला दिसला आणि त्याच्यावर मी पाय ठेवणार इतक्यात एकदम माझ्या काळजात धस्स  झाले कारण तो दगड चक्क हलत होता! आश्चर्याने आणि कुतूहलाने मी पाहिल्यावर मला असे लक्षात आले की तो दगड नर्मदा मातेवर तरंगतो आहे!  त्याला दंडाने मी पुढे ढकलले तर तो प्रवाहात वाहून जाऊ लागला! मी पटकन पुन्हा त्याला दंडाने अलीकडे ओढले आणि तुकाराम बुवा ना आवाज दिला की धावत इकडे या! पहा काय चमत्कार आहे! त्याने देखील तो तरंगणारा दगड पाहिला आणि मला म्हणाले घे सोबत! मी म्हणालो की कशाला नसते ओझे! परंतु त्यांनी मला फार आग्रह केला आणि तो दगड सोबत घ्यायला लावला. तो दगड म्हणजे प्रत्यक्षामध्ये सच्छिद्र असलेली एक प्रकारची आधुनिक वीटच होती.आज-काल बांधकामामध्ये अशा तरंगणाऱ्या विटा मिळतात हे मला त्यावेळी माहिती नव्हते.
त्यामुळे ती अतिशय जड अशी वीट मी सोबत घेतली. शुक्ल तीर्थावर जितके वजन मी काल कमी केले होते त्याच्या दुप्पट वजन नर्मदा मातेने माझ्या पाठीवर लादले ! आम्ही घोड्यांना जेव्हा काम देतो तेव्हा त्याचे एक सूत्र असते. जितके तुम्ही घोड्याला किंवा कुठल्याही जनावराला मोकळे सोडायला आणि खाऊ पिऊ घालाल तेवढी त्याची मस्ती वाढत जाते. माणसांचे किंवा मुलांचे सुद्धा तसेच असते पहा. केवळ खाऊन पिऊन बिनकामाचे बसलेले लोक फार मस्तीखोर असतात. अशा घोड्यांना मग जड सामान लागून किंवा भरपूर काम देऊन पिदाडले की ते शांत होतात! आता सुद्धा नर्मदा मातेने ठरविले की याच्या पाठीवरचा भार हलका केला तर हा उड्या मारणार त्यापेक्षा त्याच्या पाठीवर चांगले वजन ठेवावे म्हणजे सरळ एका मार्गाने चालेल! अर्थात जरी बांधकामाची वीट असली तरी देखील त्या विटेने नर्मदा मातेमध्ये बरीच वर्षे प्रवास केलेला आहे हे तिची अवस्था पाहिल्यावर लक्षात येत होते. तिच्यावरती नानाविध प्रकारचे शेवाळे उगवलेले होते. ज्या नर्मदा मातेच्या काठावर बसून करोडो लोकांनी तीर्थ प्राशन केलेले आहे आणि तपश्चर्या केलेली आहे त्या तीर्थामध्ये न्हाऊन  माखून निघालेली ही वीट परिक्रमेमध्ये माझ्यासोबत असणे हे माझ्यासाठी आनंददायकच होते. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या आदेशानंतर मी लगेच ती वीट उचलली आणि एका वस्त्रामध्ये गुंडाळून झोळीमध्ये ठेवून दिली.

 हीच ती मोटी कोरल येथे मैय्याच्या पात्रात तरंगताना सापडलेली वीट अथवा तैरती शीला
 पाठीवरचा भार वाढल्यामुळे काही काळ गतीवर परिणाम झाला. परंतु लवकरच मी पुन्हा एकदा पहिल्यासारखी गती पकडली. तुकाराम बुवा मला सांगत होते की इथून समुद्र जवळ आहे आणि समुद्राच्या भरतीचे पाणी इथपर्यंत येते याचा अर्थ ही नक्कीच रामसेतूची वीट असणार , जी समुद्रातून वाहत वाहत इथपर्यंत आलेली आहे त्यामुळे ती तुझ्याकडे ठेव. ती वीट रामसेतूची आहे किंवा नाही हे मला तेव्हाही माहिती नव्हते व आता देखील माहिती नाही परंतु ती वीट नर्मदा मातेमध्ये मिळाली हे माझ्यासाठी पुरेसे आहे कारण नर्मदा मैया का हर कंकर शंकर होता है!  अशी वीट किंवा तैरती शीला मला नर्मदा मातेच्या प्रवाहामध्ये पुढे कुठेही दिसली नाही. आणि आधी देखील दिसली नव्हती. ह्या तैरत्या शिलेमुळे माझा भवभार जरी कमी होणार असला तरी पाठीवरचा भार मात्र चांगलाच वाढला ! आणि प्रत्येक पाऊल पूर्वीपेक्षा अधिक जड वाटू लागले ! अशीच जड पावले टाकत टाकत काठाने मार्गक्रमण सुरू ठेवले . नर्मदा माता शेजारीच असल्यामुळे कुठलाही भार हा फार वाटत नव्हता !

जधी माय रेवा असे दूर फार । 
तदा वाटू लागे स्वतःचाही भार ।
जसे चालतो नर्मदा माई काठी ।
मिटे भार सारा ,किती घेऊ पाठी ॥

नर्मदे हर !





लेखांक एकशे सतरा समाप्त (क्रमशः)



टिप्पण्या

  1. तैरती शीला चा फोटो दर्शनार्थ टाकलात त्याबद्दल धन्यवाद !
    नर्मदे हर.
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर