लेखांक ११६ : शुक्लतीर्थ राम मंदिरी रामनवमी साजरी व मंगलेश्वरी शशीबेन,ज्योतीबेन सेवाधारी
पहाटे लवकर उठून झाडेश्वरचे निळकंठ मंदिर सोडले . आणि पुन्हा एकदा मैया चा किनारा पकडला . माझ्यासोबत कोणी येऊ नये म्हणून मी गुपचूप निघालो होतो . एकटाच चालू लागलो . पहाटेच्या अंधुक उजेडात पायाखालचे तेवढे दिसत होते . मैयाचा किनारा गाळाने भरलेला होता परंतु गाळाचा वरचा थर वाळलेला होता . त्यामुळे मी मैयाच्या अजून जवळ जवळ जाऊ लागलो .
या भागात मैयाच्या किनाऱ्यावर असा गाळ आहे . कमी वजनाची माणसे त्यावरून चालून जातात . थोडेसे अधिक वजन असले की मनुष्य गाळात जातो .
समोर एक झुडुप आडवे आले . झुडपाच्या डावीकडून जावे तर मैया लांब जाणार म्हणून मी झुडपाच्या उजवीकडून जायचं ठरवलं . आणि झुडपाला वळसा मारू लागलो इतक्यात पायाखाली काहीतरी हालचाल होते आहे असे मला जाणवले . आणि कडक लागणारा चिखलाचा पृष्ठभाग अचानक तुटला आणि मी भसकन गुडघाभर चिखलात रुतलो ! तो चिखल इतका घट्ट होता की जणू काही पाच-सहा लोकांनी माझे पाय खाली पकडले आहेत असे पाय घट्ट रुतून बसले ! मी जसजशी बाहेर पडण्याची धडपड करू लागलो तसतसा पाय अजून खोलात जाऊ लागला . मला लक्षात आले की मी एका चांगल्याच दलदलीमध्ये पुरता फसलेलो आहे ! काठी घुसवून पाहिली असता ती खोल खोल खाली जात राहिली . याचा अर्थ इथे खाली एखादा जलप्रवाह मैय्याला येऊन मिळत असावा . मला प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले . आणि मी आजूबाजूला कोणी मदतीसाठी दिसतो आहे का ते पाहू लागलो . इतक्या सकाळी तिकडे कोण येणार ! माझा आगाऊपणा मला नडला की काय असे मला वाटू लागले . परंतु माझा हेतू शुद्ध होता . मला नर्मदा माईच्या अधिक अधिक जवळ जायचे होते . त्यामुळे जेव्हा केव्हा समोर दोन रस्ते यायचे तेव्हा त्यातील मैयाच्या जवळ जाणारा रस्ता मी निवडायचो मग तो कठीण असो किंवा लांबचा असो . आताही समोर झुडूप आडवे आल्यावर मी तेच केले होते . मैया च्या बाजूने निघालो होतो .
अशा प्रसंगात काय करायचे हे आता मला पक्के ठाऊक होते ! त्याप्रमाणे मी नर्मदेहर असा पुकारा केला ! दूरवरून मला पुन्हा नर्मदे हर असा ओळखीचा आवाज ऐकू आला ! हा आवाज तर तुकाराम बुवांचा होता ! मला हात करत ते पुढे निघून जाऊ लागले . त्यांना माहिती होते की मला सोबत चाललेले आवडत नसे . मी जोर जोरात ओरडून त्यांना जवळ बोलवू लागलो परंतु त्यांनी मला नर्मदे हर नर्मदे हर असे हात करत पुढे पुढे जाणे चालूच ठेवले ! आता मात्र पंचायत आली . मी रुतत रुतत त्या पक्क्या गाळात मांडीपर्यंत आत घुसलो होतो . जीवाच्या आकांताने एकदाच मी त्यांना हाक मारली . आणि मग त्यांच्या लक्षात आले की मी नेहमीपेक्षा थोडा बुटका दिसतो आहे ! आणि ते धावतच माझ्या दिशेने आले . मी त्यांना सांगितले की जवळ येऊ नका . दुरूनच मला वाचवायचा प्रयत्न करा .ते पण माझ्यासारखे रुतले तर पंचाईत ! त्यांनी त्यांच्या जवळची काठी माझ्या दिशेला पुढे केली आणि ती पकडायला सांगितली . तुकाराम बुवा हे गवंडी काम करणारे असल्यामुळे त्यांच्या अंगात खूप शक्ती होती . त्यांची संपूर्ण शक्ती पणाला लावत त्यांनी मला त्या काठीसकट बाहेर खेचून काढले ! मी ती काठी इतकी घट्ट धरून ठेवली होती की विचारता सोय नाही ! मांडीपर्यंत माझे पाय चिखलाने काळे झाले होते ! पुढे सर्वत्र असाच चिखल असल्यामुळे पाय धुणे शक्य नव्हते . मग चालत चालत पाय वाळवायचा निर्णय मी घेतला . तुकाराम महाराज योगायोगाने काठाने आल्यामुळे माझा प्राण वाचला ! नाहीतर हळू हळू हळू आत मध्ये घुसत मी त्या चिखलामध्ये कायमचा रुतून बसलो असतो .
मला एकटे चालावयास आवडते या विषयावर तुकाराम महाराजांनी माझी यथेच्छ खेचली ! "का ? आता चाल की यकटा ! व्हय रं सायबा ! " आणि माझ्याकडे बोलायला काहीच उत्तर नसायचे ! दोघांनी हसत खेळत पुढचा मार्ग एकत्र काटला . एके ठिकाणी मैयाच्या काठावर खडक लागला . तिथे मैय्यामध्ये स्नान करून मी तो सर्व चिखल पुन्हा मैयार्पण केला . यापूर्वी सुद्धा मी चिखलामध्ये अडकलो होतो . परंतु त्यावेळी जी मरणाची भीती वाटली होती ती का कुणास ठाऊक यावेळी अजिबात वाटली नाही ! कदाचित परिक्रमा तुम्हाला जे काही देते ते हेच धैर्य आहे ! जे तुम्हाला सांगते की काळजी करू नकोस ! योग्य तो मार्ग नक्की निघेल ! आणि मी देखील स्थितप्रज्ञा सारखा यावेळी गाळामध्ये रुतत चाललो होतो . आता मात्र मी गाळाच्या दिशेला जाऊ लागलो की तुकोबा जोरात खेकसायचे . "व्हय डाव्या अंगाला ! पुन्हा चिखलात ह्येंगायचं का तुले?" हे असे काही शब्द फक्त विदर्भ मराठवाड्यातल्या बोलीमध्ये सापडतात ! ह्येंगणे म्हणजे चढणे ! खरंतर चिखलात मी उतरत होतो . पण त्याला सुद्धा हे चढण्याची उपमा देत होते ! तुकोबाराया खेकसले की मी शांतपणे पुन्हा डावीकडे यायचो .त्यांनी नुकतेच माझे प्राण वाचवल्यामुळे त्यांना उलटून बोलणे शक्यच नव्हते ! त्यांनी देखील या घटनेचा पुरेपूर लाभ पुढील काळात उठवला ! कुठल्या मुक्कामी काठाने चालण्याबद्दल मी बोललो की तुकाराम बुवा हा प्रसंग सांगायचे ! आणि म्हणायचे याच्यामुळे मला काठाने चालायची सवय लागली . आणि मला सवय लागल्यामुळे हा वाचला ! आणि ते खरेच होते ! त्या प्रसंगासाठी तुकोबारायांचे उपकार मी कायम मान्य करतो . त्या दिवशी त्यांच्या जागी अन्य कोणीही परिक्रमा वासी असता तरी कदाचित मला बाहेर काढू शकला नसता . प्रचंड शक्ती अंगात असलेले आणि शंभर शंभर किलो ची खडी वाळू उचलणारे हात माझ्या मदतीला आल्यामुळे मला खेचून बाहेर काढू शकले ! किरकोळ माणसाला हे जमले नसते . आणि पुढे येण्याची हिंमत देखील कोणी दाखवली नसती . तुकाराम सुरवसे हे आजही माझ्या संपर्कात आहेत ! त्याला या अशा घटनांची माझं पार्श्वभूमी आहे ! ज्या माणसाने आपले प्राण वाचवले तो कसा का असेना आणि कुठेही का असेना , आपल्याला त्याच्याबद्दल आदर वाटतोच ना ! तुकाराम बुवा स्वभावाने थोडेसे तुसडे भासत असले तरी प्रत्यक्षात ते तसे नव्हते . ते स्पष्ट वक्ते होते आणि त्यांना खोट्याचा राग होता . फसवणूक न करणे आणि सत्य वचन बोलणे या दोन गोष्टी जो पाळत असे त्याच्यासाठी ते उत्तम मित्र होते !त्यामुळे आमची घनिष्ठ मैत्री झाली ! त्यांच्यासोबत राहिलेले अनेक जण मला मुक्कामी तुकोबारायांसोबत बसलेले पाहिल्यावर सांगायचे की तू या माणसासोबत कसा काय राहतो आहेस ! परंतु मला कधी त्यांच्या स्वभावाचा त्रास झाला नाही ! कदाचित तुकोबाराय माझ्याशी वेगळे वागत होते ! त्यांनी नवीनच परिक्रमा चालू केलेली असताना त्यांना मी भेटलेलो असल्यामुळे आणि मी त्यांना न विचारता बऱ्याच सूचना मोहन साधू प्रमाणे केलेल्या असल्यामुळे कदाचित त्यांना माझे वागणे आवडले असावे . काहीही असो . तुकाराम सुरवसे हा मनुष्य मला तरी फार आवडला . आता सुद्धा ते बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रा सायकलने करत आहेत . तेव्हा प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी मला फोन करतात . मी त्यांना खूप आग्रह केला की तुम्ही फोन पे जी पे काहीतरी चालू करा . पण अजिबात चालू करत नाहीत ! आपल्यापैकी कोणाला त्यांच्याशी बोलायचं असेल तर मला सांगा ! मी तुमचा क्रमांक देईन . तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लगेच येईल ! त्यांची भारत यात्रा संपल्यावर त्यांना पुण्यामध्ये येण्याचे आमंत्रण मी दिलेले आहे . तेव्हा कदाचित सर्वजण त्यांची भेट घेऊ शकतो ! बघूया मैयाचे काय काय नियोजन आहे !
आम्ही काठाकाठाने पुढे जात असताना एक ग्रामस्थ भेटला . त्याने सांगितले की डावीकडे जंगलामध्ये कोटेश्वराचे मंदिर आहे त्याचे दर्शन अवश्य घ्या . त्याप्रमाणे आम्ही मोर्चा बाहेरच्या दिशेला वळवला . या प्रसंगामुळे दोघांच्या कपड्याला बऱ्यापैकी चिखल लागला होता . आणि वस्त्रे मैया मध्ये धूत नाहीत त्यामुळे तशीच पिळून घातली होती . जाता जाता मी तुकाराम महाराजांना म्हणालो , " तुकोबाराया मैयाने चांगलाच चिखल फासला आपल्याला ! चांगले चुंगले कपडे द्यायचे राहिले बाजूला आणि हिने तर आहे ते पण रंगवून टाकले ! " आणि दोघेही हसायला लागलो . तुकाराम बुवा म्हणाले . "तुझे तरी ठीक आहे . तू तुझ्या गुणाने गाळात गेलास . माझा तर काही संबंध नसताना माझे कपडे रंगवले मैय्याने . खरं तर मला नवीन कपडे मिळायला हवेत ! " दोघे अशा पद्धतीने बोलत जात असताना समोरून एक रिक्षा आली . आणि आम्हाला बघून रिक्षावाल्याने थांबण्याची सूचना केली . आम्ही रिक्षा जवळ गेलो . मागे एक सत्तरीचे आजोबा बसले होते . त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहत होत्या ! त्यांनी आम्हाला नर्मदे हर केले . आणि गाडीत बसल्या बसल्याच दोन कोरे करकरीत उत्तम दर्जाचे सुती सदरे आम्हाला दिले ! ते म्हणाले की व्यापारासाठी ते भरूच मध्ये निघाले होते . आणि मैयाने त्यांना दोन सदरे घेण्याची प्रेरणा दिली . ते संपूर्ण रस्त्याने पाहत आले परंतु कोणीही परिक्रमावासी दिसले नाहीत . पहिले आम्हीच दिसलो . त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रेमपूर्वक त्यांनी सदरे दिले आणि घालून दाखवा असे सांगितले ! आम्ही दोघांनी आहे त्याच वस्त्रांवर ते सदरे घातले आणि दोघांनाही ते बरोबर मापात झाले ! खरे पाहायला गेले तर आम्ही दोघेही अन्य साधू आणि परिक्रमावासी यांच्याशी तुलना करता धष्टपुष्ट प्रवर्गामध्ये मोडणारे होतो . परंतु तरीदेखील आम्हाला ते सदरे चोख बसले . त्या काकांना खूप आनंद झाला ! आमच्या हातावर वर थोडी दक्षिणा टेकवून ते पुढे निघून गेले . मी आणि तुकाराम बुवा स्तब्ध होऊन एकमेकांकडे पाहत राहिलो . दोघांनाही बोलण्यासाठी काहीच उरले नव्हते . इच्छा करायचा अवकाश की मैयाने आम्हाला नवे कोरे कपडे दिले होते ! दोघेही मौनामध्ये चालत राहिलो . मैय्याच्या पुढे कुठलीही इच्छा व्यक्त करणे हे पाप आहे . क्षणात ती इच्छा पूर्ण करते .
बहुतेक याचसाठी मैयाने आम्हाला किनारा सोडून रस्त्यावरती आणले होते . थोडे अंतर चालल्यावर दाट झाडीमध्ये असलेले कोटेश्वराचे मंदिर दिसले . मंदिर अतिशय स्वच्छ सुंदर व नीटनेटके होते . राज्य महामार्गाच्या कडेला असून देखील धुळीचा कण देखील फरशीवर कुठे दिसत नव्हता . आधुनिक पद्धतीची फरशी घालण्यात आली होती . परंतु देवस्थान पुरातन होते . इथे कोणीच नव्हते . अतिशय शांत व रम्य वातावरण होते . इथे काही काळ शांतपणे बसून महादेवाचे स्तवन केले . मंदिराच्या परिसराची काही चित्रं आपल्यासाठी सोबत जोडत आहे .
शक्यतो कोटी लिंग अर्चन पूजा संपन्न झालेल्या ठिकाणी कोटेश्वर महादेव किंवा कोटीश्वर महादेव स्थापन केले जातात . नर्मदे काठी असे अनेक कोटेश्वर आहेत .
साक्षात कोटीभास्कर कोटेश्वराच्या दर्शनासाठी जणु आलेले होते !
इथून हलावेसे वाटतच नव्हते इतके सुंदर वातावरण होते . परंतु तुकाराम बुवा चला चला म्हणून मागे लागल्यामुळे पुढे निघालो . वाटेमध्ये एका साधून छोटीशी कुटी उभी केलेली आहे . आणि तो परिक्रमावासींना बालभोग सेवा देतो . तिथे बसून थोडासा बालभोग घेतला . गुजरात मध्ये फरसाण शेव वगैरे असाच बाल भोग जास्ती करून मिळतो . तो साठवायला सोपा असतो आणि टिकणारा माल असतो .
वाटेत आम्ही बालभोग घेतला ती बापा सिताराम मढुली . मोठी असते ती मढी . छोटुकली असते ती मढुली ! इथे समोरच झगडिया मढी होती . समोरच्या किनाऱ्यावर .
इथून थोडे अंतर चालल्यावर शुक्ल तीर्थ गावात जाणारा फाटा लागला . इथे जलाराम बाप्पांचे मंदिर होते .मंदिरात दर्शन घेऊन गावाकडे वळलो .
बापा किंवा बाप्पा म्हणजे देव . गणपती बाप्पा हा शब्द मराठी भाषेमध्ये गुजराती मधूनच आला असावा .
शुक्ल तीर्थ हे एक अतिशय पवित्र असे पौराणिक गाव आहे . इथे अक्षरशः पावला पावलावर ऐतिहासिक मंदिरे आहेत . परंतु आज रामनवमी असल्यामुळे आपण राम मंदिरामध्ये जावे असा संकल्प केला . जाताना गावाच्या रस्त्यामध्ये एक छोटीशी मिरवणूक लागली . मिरवणुकीत खूप गर्दी असल्यामुळे पुढे जाता येईना . अखेरीस मिरवणुकी सोबत चालतच आम्ही निघालो कारण मिरवणूक देखील नर्मदा मैया च्या काठाकडेच निघाली होती . मिरवणूक कसली आहे लक्षात येत नव्हते .आधी मला असे वाटले की रामनवमीच्या निमित्ताने ही शोभायात्रा निघाली आहे . परंतु नंतर असे लक्षात आले की दोन छोट्या मुलींचे जावळ काढण्यासाठी त्यांना वाजत गाजत राम मंदिराकडे मिरवणुकीने घेऊन जाण्यात येत होते ! या मुलींना आधुनिक वेषांमध्ये सजविण्यात आले होते ! म्हणजे चक्क टाय कोट घातला होता ! ती मिरवणूक पाहून मला खूप मौज वाटली ! अखेरीस मिरवणुकी सोबतच मी आणि तुकाराम बुवा राम मंदिरामध्ये पोहोचलो . राम मंदिरामध्ये मोठाच उत्सव सुरू होता ! जेवढी गर्दी बाहेर होती त्याहून अधिक गर्दी आधीपासूनच राम मंदिरामध्ये जमलेली होती . मी जाऊन रामरायाचे दर्शन घेतले .
शुक्ल तीर्थ मंदिर परिसर . डावीकडे नर्मदा माता मंदिर आहे . समोर राम राया आहे . बाकी अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत .
रामराया शेजारी एक झोपाळा होता . पुजाऱ्याने मला झोपाळ्यावर बसण्याची आज्ञा केली . माझ्या आजूबाजूला गावातील सर्व माताराम बसलेल्या होत्या . मी बसल्या बसल्या रामरक्षा म्हणायला सुरुवात केली . त्यांची सुद्धा भजने वगैरे सुरू होती . असा सुमारे तास दीड तास मी झोपाळ्यावर बसून राहिलो . मग रामजन्माचा सोहळा सुरू झाला . रामाचा पाळणा देखील मी म्हटला . आणि मग रामरायाची आरती झाली . परिसरात अनेक छोटी मोठी मंदिरे होते . नर्मदा मातेचे आणि गंगा मातेचे एकत्रित मंदिर होते . त्याच्या पलीकडे परिक्रमावासींच्या राहण्यासाठी दोन खोल्या होत्या .आता मी खोलीकडे जाणार इतक्या मध्ये त्या दोन मुलींचे आई-वडील माझ्याकडे आले आणि त्यांनी त्या मुलींना आशीर्वाद द्या असे मला सांगितले . मी त्यांना म्हणालो की या दोघी साक्षात गंगा आणि नर्मदा आहेत त्यामुळे मीच त्यांच्या पाया पडतो आणि मी चक्क पायावर डोके ठेवून दोघींना नमस्कार केला ! त्या दोघींनी देखील नर्मदा खंडातील परंपरेप्रमाणे डोक्यावर हा ठेवून मला छान आशीर्वाद दिला ! मग मुलीच्या वडिलांनी आमच्या तिघांचा एक सुंदर असा फोटो काढला !आणि मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
शुक्ल तीर्थ राम मंदिरामध्ये प्रस्तुत लेखकाने कडेवर घेतलेल्या आधुनिक वेशातील गंगामैया आणि नर्मदा मैया ! दोन्ही मुली फार गोड होत्या आणि त्यांचे केस खूप लांब होते ! एवढे लांब केस कापणार याचे मला थोडेसे दुःख च झाले !
मंदिराच्या पुजाऱ्यांनी मला सांगितले की तुमच्याच पुणे गावातील तीन महिला मंदिरामध्ये येऊन राहिलेल्या आहेत . मला आश्चर्य वाटले . पुण्यावरून एवढ्या लांब कसे काय कोणी येईल ? तेही इतक्या छोट्या गावात ? परंतु कोण आहे बघूया तरी असा विचार करत मी खोलीकडे निघालो . खोलीकडे जायचे कारण असे की पुजारी महाराजांनी गावातून जेवण मागवले होते आणि खोली मध्ये बसून जेवण करा असे मला सांगितले होते .
इतक्यात त्या तिघीजणींना देखील पुजारीबुवाने सांगितले की तुमच्या पुण्याचा परिक्रमा वासी आलेला आहे . त्यामुळे तुकाराम बुवा आणि मला भेटायला त्या तिघीजणी आल्या .बहिणी बहिणी वाटणाऱ्या ह्या तिघी प्रत्यक्षामध्ये मायलेकी होत्या .
पुणे येथील धनकवडी गावामध्ये राहणाऱ्या योगाचार्य सुनीता वसंत देवन नावाच्या एक तेजस्वी माताराम होत्या . यांच्या निकेता आणि अंकिता नावाच्या दोन मुली त्यांच्यासोबत आल्या होत्या . ह्या तिघीजणी चैत्र महिन्यातली उत्तर वाहिनी परिक्रमा करून इथे आल्या होत्या . तिघींपैकी निकेताने २०२१ सालामध्ये नर्मदा परिक्रमा केली होती . तिने अतिशय मनापासून , भक्ती भावाने आणि उत्तम रीतीने जी काही परिक्रमा जमली तेवढी केली होती . नर्मदा मैया प्रती तिच्या मनामध्ये अपार श्रद्धा होती .ती नर्मदा पुराण वाचण्यासाठी इथे आली होती . तिची धाकटी बहीण अंकिता गुरुचरित्राचे पारायण करत होती . आणि माताजींचा दुर्गा सप्तशतीचा पाठ चालला होता ! परिक्रमेदरम्यान मंदिराचे पुजारी धर्मेंद्र परमार यांच्याशी तिचा परिचय झालेला होता . त्यावेळी तिला हे स्थान आवडले होते त्यामुळे तिने आत्ता पारायणासाठी हेच स्थान निवडले असे ती म्हणाली . आम्ही सर्वजण एकाच गावातले अर्थात पुण्यातले असल्यामुळे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आमची मूळ गावे अर्थात सांगली आणि कोल्हापूर ही देखील शेजारी शेजारी असल्यामुळे आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या ! निकिता ही पुण्यातील एका शाळेमध्ये शिकविते . देवनकाकूंचे धनकवडी भागामध्ये योगासना चे वर्ग आहेत . मी त्या तिघींकडे एक विचित्र मागणी केली ! मी त्यांना म्हणालो की तुम्ही आता इथून थेट पुण्यालाच जात आहात तर माझ्याजवळ आतापर्यंत साठलेली शिवलिंगे व अन्य वजन तुमच्याकडे देऊन टाकू का ! आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी देखील आनंदाने अनुमोदन दिले ! मग काय विचारता ! माझ्या जुन्या कमण्डलू मध्ये भरून सर्व जड जड शिवलिंगे मी पुण्याला पाठवून दिली ! दतवाडा येथील स्वामीजींनी मला दिलेली वस्त्रे देखील मी पुण्याला पाठवून दिली . कारण आता मला समुद्र पार केल्यावर नवीन वस्त्र मिळालेले होतेच . तसेच मला पिपरहा गावामध्ये मिळालेले वस्त्र देखील अजूनही मी चांगले टिकवून वापरत होतो . वजन कमी करता करता माझ्या लक्षात आले की शिवलेले कपडे शक्यतो घालायचे नाहीत असा माझा संकल्प होता . त्यामुळे अंगात घातलेला सदरा देखील मी घरी पाठविणार होतो परंतु माझ्या लक्षात आले की हा सदरा मी तुकाराम महाराजांना सुद्धा देऊ शकतो . निकेता म्हणाली की तो सदरा काढण्यापूर्वी तुमचा दोघांचा एक फोटो काढते . मी तिला म्हणालो की माझ्या मैया ला सुद्धा फोटोमध्ये घे ! आणि मी मैय्याला बाहेर काढल्याबरोबर तिघींनी अक्षरशः एखाद्या लहान बाळाला अंगा खांद्यावर घेऊन नाचवावे तशी माझी मैया नाचवायला सुरुवात केली ! त्यांना ती इतकी आवडली की काही विचारूच नका ! तिला काय करू आणि काय नको असे तिघींना झाले ! सुदैवाने त्यांच्याकडे काही नवीन अलंकार नुकतेच विकत घेतलेले होते ! ते काढून त्यांनी माझ्या मैय्याला अतिशय सुंदर पद्धतीने सजवून दिली ! एक छान वस्त्र सुद्धा मला दिले . आणि रंगीबिरंगी टिकल्या लावून तिला सजवली !काही अलंकार जास्तीचे म्हणून माझ्यासोबत दिले . मग हा सर्व लवाजमा पसरून आमच्या तिघांचा फोटो तिने काढला ! नुकतीच पुण्यामध्ये भेट झाल्यावर हे सर्व फोटो तिने मला पाठवले . आपणही या नवीन सजवलेल्या मैयाचे दर्शन घेऊयात !
धनकवडीच्या देवन मायलेकींनी सजविलेली माझी नर्मदा मैया ! सकाळीच मिळालेले कोरेकरकरीत सदरे घातलेले जुनाट परिक्रमावासी ! प्रस्तुत लेखक आणि तुकाराम बुवा सुरवसे . हा फोटो निकेताने बहुतेक तिच्या instagram वर टाकलेला होता त्यामुळे तिने पुण्याचा परिक्रमावासी असे खाली लिहिलेले आहे .
शुक्ल तीर्थ राममंदिरात उभ्या डावीकडून अनुक्रमे
सौ सुनीता वसंत देवन ,कु . निकेता आणि कु . अंकिता
शुक्ल तीर्थ राम मंदिराची व्यवस्था पाहणारे श्री धर्मेंद्र परमार . यांनीच आम्हाला घरून डबा आणून जेवण दिले . जास्त संख्येने परिक्रमा वासी असतील तर इथेच जेवण बनवले जाते . एक दोन जण असतील तर घरचेच जेवण ते आणून देतात . हे व यांचा बंधू उपेंद्र व त्याची पत्नी हेमांगी परिक्रमावासीयांची सेवा करतात . यांचा क्रमांक येणे प्रमाणे .
९६३८८२८४४८ । 96388 28448
यांचे काकाजी नावाचे एक नातेवाईक आहेत . हे ब्रह्मचारी असून अनवाणी राहतात . अतिशय व्रत्तस्थपणे ते परिक्रमा वासियांची सेवा करतात . मंदिराच्या मागेच पिंपळाच्या वनामध्ये एका पडक्या खोलीमध्ये आपल्या आईची सेवा करत हे राहतात . परंतु नेमके आम्ही तिथे गेलो तेव्हा ते नव्हते . परंतु देवन माता-भगिनी त्यांच्याबद्दल भरभरून सांगतात .
राम मंदिरामध्ये भोजन घेणाऱ्या परिक्रमावासींचे संग्रहित छायाचित्र
रामनवमीच्या दिवशी सजविलेले प्रभू श्री रामचंद्र !
समोर भगवा केक वगैरे ठेवलेला दिसतोय पहा !
गावातील महादेव मंदिरामध्ये देवन मायलेकी
शुक्ल तीर्थ राम मंदिराच्या आवारातील पिंपळाच्या झाडाखाली नर्मदा पुराणाचे पारायण करायला बसलेली रेवाभक्त कु. निकेता वसंत देवन धनकवडी
हे सर्व फोटो निकेताने पाठवल्यामुळे आपल्या माहितीकरता सोबत जोडले आहेत .
योगा योगा चा भाग असा की मी हे सर्व लिखाण करत असतानाच देवन मायलेकी मैय्या च्या दर्शनासाठी घरी येऊन गेल्या ! ती त्यांची फार लाडकी आहे .
हे लिखाण चालू असतानाच घरी आलेल्या देवन काकू आणि निकेता . सोबत मैया ! किती अद्भुत योगायोग आहे पहा ! पूर्वी फोन नसायचे तेव्हा असाच संपर्क व्हायचा . ज्या व्यक्तीची आठवण होईल ती व्यक्ती समोर येऊन उभी राहायची .
एक फार महत्त्वाची गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते .
नर्मदा परिक्रमा किंवा आता देवन माता भगिनी करत असलेल्या सर्व गोष्टी या तरुण पणी करावयाच्याच गोष्टी आहेत. म्हणजे उतारवयात त्या करूच नयेत असे काही आहे का तर असे अजिबात नाही . परंतु उतार वयात तुम्हाला त्याचा पुरेसा लाभ मिळेलच याची खात्री देता येत नाही . उदाहरणार्थ एकच पदार्थ घ्या . पुरणाची पोळी समजा . ती एका लहान मुलाला खाऊ घातली , तरुणाला खाऊ घातली , वयस्कर माणसाला खाऊ घातली आणि जख्खड म्हाताऱ्याला खाऊ घातली . तर लहान मुलांच्या ती अंगी लागेल , तरुणाला ती शक्ती देईल , वयस्कर माणसाला ती जाणार नाही आणि जख्खड म्हाताऱ्याला तर अपचनच होईल ! तसेच नर्मदा परिक्रमेचा विविध वयामध्ये होणारा लाभ हा वेगळा वेगळा आहे असे मला वाटते . तरुणपणी ती केल्यावर शारीरिक क्लेशाकडे लक्ष कमी जाऊन आजूबाजूच्या आनंदाकडे लक्ष अधिक लागण्याची शक्यता वाढते . तसेच योग्य वयामध्ये नर्मदा परिक्रमा संपूर्ण झाल्यावर पुढील आयुष्यभर तो मनुष्य अधिक संयमित जीवन जगण्याची शक्यता देखील वाढते . उतार वयात परिक्रमा केल्याचे देखील लाभ आहेत परंतु ते या जन्मापेक्षा पुढच्या जन्मी अधिक कामाला येणारे आहेत . कारण उमेदीचा काळ निघून गेलेला असल्यामुळे अशी व्यक्ती खरोखरीच धडाडीने कार्य करणारी असेल तरच तिच्या परिक्रमेचा लाभ त्या व्यक्तीला आणि तिच्याशी संबंधित लोकांना अधिक होऊ शकतो . परंतु सरासरी तसे नसल्याचे आपल्याला सहजच जाणवते . इथे सुद्धा आपल्या तरुण मुलींना हे सर्व कार्य करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आणि त्यासाठी स्वतः त्यांच्यासोबत राहून पारायण करणाऱ्या देवान काकूंचे कौतुक करावेसे वाटते . आपल्या तरुण मुलीला एकटीला नर्मदा परिक्रमेसाठी पाठवण्याचा देवन काका काकूंचा निर्णय देखील अभिनंदनीयच आहे . आपल्या तरुण मुलाला किंवा मुलीला नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा झाली तर त्यांना कृपा करून अडवू नका . त्यांची काळजी घ्यायला नर्मदा मैया समर्थ आहे .आपले तेवढे सामर्थ्य अजिबातच नाही . बऱ्याच प्रसंगी असे देखील पाहायला मिळते की नवरा बायको तरुण असताना दोघांपैकी एका कोणाला परिक्रमा करण्याची इच्छा झाली तर दुसरी व्यक्ती आडवीत असल्यामुळे परिक्रमा करण्याचे अर्धवट राहून जाते . हे पातक देखील आपण न केलेले उत्तम आहे . येथे लक्षात घेण्याचा भाग इतकाच आहे की आपल्यावर अवलंबून असलेली एखादी व्यक्ती जर नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर तिला अडवू नका .कारण तुमच्या मनामध्ये ज्या शंका कुशंका आहेत त्यातील कुठलीही अडचण नर्मदा परिक्रमेदरम्यान येत नाही . कारण नर्मदा परिक्रमा करणारा परिक्रमावासी हा नर्मदा मातेचा बालक बनून गेलेला असतो . त्यामुळे त्याची संपूर्ण काळजी नर्मदा मैया अहोरात्र घेते .घेतेच घेते .याची निश्चिन्ती बाळगावी . आपल्या मनाच्या खेळामुळे एखाद्या व्यक्तीची महापुण्यप्रद श्री नर्मदा परिक्रमा बुडली हे पाप आपल्या माथ्यावर कधीच लागायला नको ! नाहीतर त्याचे क्षालन करण्यासाठी देव तुमच्याकडून एखादी परिक्रमा करून घ्यायचा ! असो .
भोजन प्रसाद घेतल्यावर सर्वांचा निरोप घेतला . मी पुण्यात गेल्यावर माझे सामान देवन कुटुंबीयांकडून स्वीकारणार होतो . त्यामुळे त्यांचा पत्ता वहीमध्ये लिहून घेतला . माझाही पत्ता त्यांना लिहून दिला आणि पुढे निघालो . पाठीवरचा भार असा काही हलका झाला होता म्हणता ! मला तर वाटले की रामनवमीच्या दिवशी साक्षात रामरायाच आपल्याला पावला ! इतके दिवस न पावणारा देव , देवन रूपाने पावला व मी माझा भार देवन यांना देवून टाकला व आभार मानले ! शुक्ल तीर्थ गावामध्ये अनेक मंदिरे होती त्यांचे दर्शन घेत घेत पुढे जावे असे ठरविले . दुपारचे कडकडीत ऊन पडलेले होते . रस्ता आग ओकीत होता . ओळीने एका एका मंदिरामध्ये जाऊन यथेच्छ दर्शन घेतले ! ही सर्व मंदिरे पौराणिक आहेत . विशेषतः एखाद्या गावाचे नावच शुक्ल तीर्थ असणे हे त्या गावाचे प्राचीनत्व सिद्ध करणारे आहे !
पाठीवरचा भार हलका झालेला मी आता देवदर्शनांसाठी सिद्ध झालो ! राम मंदिरातून बाहेर पडल्यावर मी थेट सोमेश्वर महादेवाचे मंदिर गाठले . इथेच शुक्लेश्वर महादेव देखील आहेत . मंदिर अतिशय स्वच्छ आणि सुंदर ठेवलेले होते . गुजरात मध्ये मंदिरांची स्वच्छता खूप ठेवतात असे मला जाणवले . कुठे धुळीचा कण सुद्धा नव्हता .
श्री शुक्लेश्वर सोमेश्वर महादेवाचे भव्य मंदिर
मंदिरातील वाखाणण्याजोगी स्वच्छता
श्री सोमेश्वर महादेव शुक्लतीर्थ
श्री शुक्लेश्वर महादेव शुक्लतीर्थ
दुपारची वेळ असल्यामुळे मंदिरात कोणीही नव्हते . छानपैकी दर्शन घेतले . इतक्यात एक-दोन परिक्रमावासी तिथे आले . त्यांच्याशी बोलून पुढील मंदिरात निघालो . वाटेमध्ये एका माताजींनी थंडगार पाणी पाजले आणि माझ्याकडे थर्मास आहे असे पाहून फ्रीजमधले थंडगार पाणी त्यात भरून दिले ! तुमच्या सामानात काय काय ठेवलेले आहे याकडे माताराम लोकांचे किती बारीक लक्ष असते पहा ! माझ्याही डोक्यात नव्हते की मी मागे थर्मास खोचला आहे .पण यांनी पाहिले ! प्रथमच त्यात थंड पाणी ठेवल्यामुळे आता यात पाणी किती काळ थंड राहते याची परीक्षा होणार होती . त्यात तो कमण्डलू चांगलाच पास झाला . सुमारे १६ तास पाणी थंड राहिले . असो .
इथून पुढे कनकाई किंवा कनकेश्वरी मातेचे दर्शन घेतले . शेंदूर फासलेली जुनी मूर्ती होती . जागृत देवीचे स्थान होते .
शुक्ल तीर्थ गावातील वैशिष्ट्य म्हणजे इथे ओंकारानाथ विष्णू भगवानाचे मंदिर आहे . पांढऱ्या रंगाच्या वालुकाश्म सदृश्य पाषाणापासून तयार केलेली विष्णूची एक अतिशय सुंदर मूर्ती इथे आहे . ही मूर्ती अभ्यासकांसाठी पर्वणी ठरणारी मूर्ती आहे . या एकाच मूर्तीमध्ये अन्य अनेक देवता कोरलेल्या आहेत . विष्णू भगवंता सोबतच सूर्यनारायण ,लक्ष्मी अशा मूर्तींची देखील स्थापना मंदिरात केलेली आहे . विशेषतः विष्णुच्या या एकाच मूर्तीमध्ये आपल्याला अनेक देवता पाहायला मिळतात . विष्णूच्या उजव्या हातामध्ये शंकर भगवान , गदा असून हृदयावर श्री लांछन , भृगु लांछन धारण केलेले आहे .याची कथा मोठी रंजक आहे . भगवान विष्णू किती क्षमाशील आहेत हे तपासण्यासाठी एकदा भृगु ऋषींनी लक्ष्मी सोबत ते बसलेले असताना अचानक येऊन त्यांच्या छातीवर लाथ मारली होती. यानंतर ताबडतोब विष्णू भगवंत उठले आणि भृगु ऋषींचा पाय हातात घेऊन कुरवाळू लागले . आणि म्हणाले तुमचा पाय कमळासारखा नाजूक आहे . माझी छाती वज्राप्रमाणे कठोर आहे . आपल्याला लागले तर नाही ना ? त्यानंतर भृगु ऋषींना पश्चात्ताप झाला . व त्या घटनेची खूण म्हणून विष्णू ने भृगु लांछन हृदयावर धारण केले . तीच ही जागा असे सांगतात . विष्णू भगवंताने डाव्या हातामध्ये ब्रह्मदेव , शेषनाग ,आणि चक्र धारण केलेले आहे . उजव्या हाताला वेदव्यास , पद्म किंवा कमळ , लक्ष्मी जी आणि जय अशा मूर्ती असून डाव्या हाताला राधिका , शंख ,सुखदेवजी किंवा शुकदेवजी आणि विजय अशा मूर्ती आहेत . मूर्तीच्या भोवती सुंदर दगडी महिरप केलेली आहे . समोर अर्थातच गरुडाचे मंदिर आहे . सूर्यनारायणाची सात घोड्यांच्या रथावर बसलेली मूर्ती देखील सुंदर आहे . लक्ष्मीची मूर्ती देखील सुबक ठेंगणी आहे . एकंदरीत आवर्जून पहावे असे हे मंदिर आहे .
मंदिरातील लक्ष्मीची सुबक ठेंगणी सुंदर मूर्ती
सात घोड्यांच्या रथावर बसलेले सूर्यनारायण भगवान
इथून थोडेसे पुढे गेल्यावर शेजारीच अंबाजी मातेचे मंदिर होते त्याचे देखील दर्शन घेतले . आंबे चा तांदळा शेंदुराने फासलेला आपल्याला पाहायला मिळतो . इथेच टेंबे स्वामींची मूर्ती आणि दत्ताच्या पादुका देखील पाहायला मिळतात . रंगावधूत महाराज यांच्यामुळे या परिसरामध्ये दत्तभक्तीचा प्रचार प्रसार झाला .
अन्नकोट रचणे हे गुजरात मधील मंदिरांचे वैशिष्ट्य आहे . अंबाजी मातेपुढे रचलेल्या अन्नकोटाचे संग्रहित छायाचित्र .
मंदिरामध्ये असलेली परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज उपाख्य श्री टेंब्ये स्वामी महाराजांची मूर्ती
या भागातील मंदिरांमध्ये एक चित्र नेहमी पाहायला मिळते ते म्हणजे लहान मुले मंदिरामध्ये आवर्जून आणली जातात . तुला मंदिरात जायचे आहे का ? असा पर्याय त्यांच्या पुढे ठेवलाच जात नाही .तर आई वडील किंवा आजी आजोबा किंवा ताई दादा कोणाच्याही सोबत लहान मुले मंदिरामध्ये येतातच येतात . लहान वयातच संस्कार झाला की तो आयुष्यभर टिकण्याची शक्यता वाढते त्यामुळे इथले लोक महाराष्ट्रातील लोकांपेक्षा अधिक भाविक आहेत असे सहज जाणवते . योगायोगाने माझ्या या अनुभवाची पुष्टी करणारे एक चित्र मला अंबाजी माता मंदिराच्या गुगल फोटोमध्ये सापडले . ते आवर्जून तुमच्यासाठी सोबत जोडत आहे .
पुन्हा एकदा ही छोटीशी देवळी पहा ! त्याच्या अगदी आत मध्ये बसून एक छोटेसे पिल्लू किती मनोभावे देवाशी हितगुज करते आहे पहा ! हे अतिशय सकारात्मक चित्र आहे ! या बालकाला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मानसिक रोग होण्याची किंवा मानसिक धक्का वगैरे बसण्याची शक्यता अतिशय दुरापास्त आहे . सगुण पूजेमध्ये ते सामर्थ्य आहे .
या गावांमध्ये अन्य अनेक मंदिरे आहेत . एक जैन मंदिर आहे . भाथीजी महाराजांचे मंदिर आहे . खप्पर मातेचे मंदिर आहे . रेवत मातेचे मंदिर आहे . राम पीर किंवा रामदेव बाबा यांचे मंदिर आहे .वैरही मातेचे मंदिर आहे. परंतु माझ्यासोबत मंदिर दर्शनाविषयी कमालीचे औदासिन्य असलेले तुकाराम बुवा असल्यामुळे आम्ही वैरही मातेचे दर्शन घेऊन त्यानंतर पुढे जाण्याचा निर्णय घेतला .
वाटेमध्ये प्रत्येक आश्रमामध्ये मला सांगण्यात आले होते की उत्तर तटावर ज्योतिबेन आणि शशी बेन यांची सेवा अवश्य घ्या . त्यामुळे याच्यापुढे असलेल्या मंगलेश्वर गावामध्ये जाऊन या कुटुंबाचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा मनामध्ये होती . त्यामुळे वेगाने मार्गक्रमणा करत मंगलेश्वर गाव गाठले . या गावामध्ये गेल्यावर सर्वच लोक तुम्हाला ज्योतिबेन यांच्या घराकडे जाण्याचा रस्ता दाखवायला सुरुवात करतात ! परिक्रमावासींची सेवा कशी असावी याचा एक आदर्श वस्तू पाठ या कुटुंबाने घालून दिलेला आहे ! आणि ही सेवा आजची नसून गेल्या सहा पिढ्या सतत परिक्रमावासींची सेवा हे कुटुंब करत आहे ! सध्या ज्योतीबेन ही सेवा पाहतात . या अविवाहित असून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य परिक्रमावासींच्या सेवेला समर्पित केलेले आहे . पंड्या असे आडनाव लावणारे हे एक ब्राह्मण कुटुंब आहे . घरची परिस्थिती काही फार श्रीमंतीची आहे असे नसून थोडीफार शेती आहे त्यावर यांचा उदरनिर्वाह चालतो . शशी बेन ,शांतीबेनआणि कमलबेन या बहिणी अविवाहित राहून परिक्रमावासींची सेवा यापूर्वीच्या पिढीमध्ये करत होत्या . त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सध्या ज्योतीबेन आणि बॉनीबेन या दोघी बहिणी ब्रह्मचारी राहून ही सर्व धुरा समर्थपणे सांभाळत आहेत . शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या ज्योती बेन यांना थोडीफार पेन्शन मिळते ती देखील त्या याच सेवेमध्ये लावतात . मी गेलो तेव्हा कमल बेन खूप थकलेल्या आणि अंध असल्यामुळे एका जागी बसलेल्या मला आढळल्या . परंतु आता या कुटुंबातील पुढची पिढी देखील यांच्या मदतीसाठी आलेली आहे . ज्योती बेन यांना दोन मामा आहेत त्यांची मुले देखील आता सेवेसाठी अधून मधून इथे येऊन राहतात . किशोर आणि गड्डूभैय्या अशी त्यांची नावे आहेत . गड्डू भैय्या २००५ साली कौन बनेगा करोडपती मध्ये ६ लाख जिंकून आलेला आहे असे मला ज्योतीबेन ने सांगितले ! पूर्वी सहकार्य करण्यासाठी कचरणारे ग्रामस्थ आता मात्र अतिशय प्रेमाने ज्योतिबेन यांना सहकार्य करतात आणि परिक्रमा वाशींची संख्या वाढल्यावर गावातील काही लोक परिक्रमा वासींना आपल्या घरासमोर झोपण्यासाठी जागा वगैरे देतात . किंवा परिक्रमेच्या हंगामामध्ये तर इथे चक्क मोठा मांडव घातला जातो त्यामध्ये सर्व परिक्रमावासी सार्वजनिक पद्धतीने उतरतात . परिक्रमावासींची आदर्श पद्धतीने सेवा कशी करावी हे आपल्याला इथे गेल्यावर लक्षात येते . ज्योतिबेन यांचा चेहरा सतत हसतमुख असतो . त्या स्वतः देखील गेल्या काही वर्षांपासून खंडित परिक्रमा करत आहेत . अतिशय प्रेमाने आणि आधाराने आलेल्या प्रत्येक परिक्रमावासींची त्या वैयक्तिकपणे विचारपूस करतात हे मी स्वतः अनुभवले . शशी बेन या ज्योती बेन च्या मावशीने घालून दिलेली परंपरा त्या अतिशय समर्थपणे सांभाळत आहेत . गेल्या काही दशकात ज्यांनी परिक्रमा केली आहे त्यांना शशी बेन ठाऊक आहेत परंतु दुर्दैवाने त्या आता आपल्यामध्ये राहिलेल्या नाहीत . त्यांची जागा आता ज्योतीबेन यांनी घेतलेली दिसते . कित्येक आश्रमामध्ये तुम्ही आलात काय किंवा गेलात काय याचा काहीही फरक न पडणारे सेवादार पाहिलेले असल्यामुळे आवर्जून तुमच्याशी व्यक्तिगतपणे बोलणारी सेवाधारी व्यक्ती पाहिल्यावर तुम्हाला खरोखरच मनापासून खूप बरे वाटल्याशिवाय राहत नाही . मी देखील या घरामध्ये गेल्याबरोबर स्वतः ज्योतिबेन मला सामोऱ्या आल्या आणि त्यांनी मला कुठून आला आहे ,परिक्रमा कधी उचलली आहे ,किती दिवसांची परिक्रमा आहे ,अन्य काय नियम मी पाळतो आहे , वगैरे सर्व मला विचारून घेतले . यांचे घर एका खोल खड्डा असलेल्या तलावाच्या शेजारी होते . बैठा बंगला होता . समोर थोडी मोकळी जागा होती . परंतु या जागेमध्ये प्रचंड अडगळ आणि अडचण आहे असे मला दिसले . या भागात डास प्रचंड आहेत कारण तलावात साठलेले पाणी . मला असेही लक्षात आले की यांच्या भूमिगत पाईपलाईन मधून अखंड गळती होत आहे . हे सर्व पाहिल्यावर मी नेहमीप्रमाणे माझे आसन ज्योतीताईंनी सांगितलेल्या ठिकाणी अंगणामध्ये लावले आणि झाडू हातात घेतला . इथे सुमारे १३ १४ परिक्रमावासी उतरलेले होते . केरळी साधू , चित्रकूटचा तिवारी बाबा , तुकाराम बुवा , मुंबईकर नागा साधू असे माझ्या ओळखीचे काही लोक त्यात होते . मी त्या संपूर्ण अंगणातील फरशा ,टाइल्स चे तुकडे ,विटा , दगड हे गोळा करून एका बाजूला छान रचून ठेवले . नको असलेली लाकडे पालापाचोळा कचरा सर्व गोळा करून त्याचा बंबापाशी ढीग लावून ठेवला . तिथे अन्य अशा बऱ्याच गोष्टी पडलेल्या होत्या ज्या अनेक वर्ष काहीच कामात आलेल्या नव्हत्या परंतु केवळ पडून राहिल्या होत्या . मी काम करतो आहे पाहिल्यावर ज्योती बेन जातीने स्वतः तिथे आल्या .सुरुवातीला त्या मला म्हणत होत्या की तुम्ही चालून थकलेले आहात तरी कृपया कुठल्याही कामाला हात लावू नका . आम्ही सर्व करून घेतो . परंतु मी त्यांना सांगितले की मी अजिबात थकलेला नसून आपल्या आश्रमामध्ये काहीतरी श्रमदान सेवा करण्याची माझी इच्छा आहे तरी कृपया मला काम सांगावे . मग मात्र त्यांनी मला त्यांच्यासमोर असलेल्या सर्व समस्यांचा पाढा वाचून दाखविला . हळूहळू अन्य काही परिक्रमा वासी देखील माझ्या मदतीला आले आणि मग आम्ही सर्वांनी मिळून अतिशय सुंदर पद्धतीने तो सर्व परिसर चकाचक करून टाकला ! जिथे जाण्यासाठी मांजर सुद्धा चार वेळा विचार करेल अशा अडगळीच्या ठिकाणी आता ३० परिक्रमावासी उतरतील अशी स्वच्छ जागा तयार झाली ! पाण्याच्या टाकीजवळ होणारी जी गळती आहे तिथे तिवारी बाबाने खडू ने श्री ज्योती धारा अशी अक्षरे लिहिली . आणि कौतुकाने त्यांना दाखवायला गेला . पहिल्यांदाच मी त्या माऊलीला चिडलेले पाहिले ! त्या तिवारी बाबाला रागावल्या आणि ती अक्षरे पुसायला लावली ! त्या म्हणाल्या ही आपली एवढी योग्यता नाही की आपण आपल्या नावापुढे धारा सारखा पवित्र शब्द लावावा . धारा फक्त नर्मदा मातेचीच असू शकते ! मला ते पाणी कुठून येत आहे याचा शोध घ्यायचा होता म्हणून मी ज्योती बेन यांची परवानगी घेऊन तिथली जमीन उकरून काढली . आणि मग माझ्या लक्षात आले की जमिनीखाली पीव्हीसी पाईपलाईन चे फिटिंग नीट झालेले नाही . प्लास्टिकचा वापर करून मी उत्तम दर्जाचे फिटिंग केले आणि पुन्हा जमीन समतल केली त्यामुळे ज्योती धारा लोप पावली !
माझ्या कामगिरीमुळे ज्योती बेन खूप खुश झाल्या . त्यांचा एक भाचा देखील तिथे येऊन मदतीसाठी राहिला होता . नंतर आम्ही आत मध्ये जाऊन कमलाबेन यांच्याशी गप्पा मारल्या . अत्यंत खेळीमेळीचे आणि आनंदाचे वातावरण राहील याची दक्षता सर्वच कुटुंबीय घेत असत . कल्पना करून पहा . आपल्या घरी अचानक कोणी पाहुणे आले की काही काळापुरते अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे , उल्हासाचे वातावरण निर्माण होते . आणि ते गेल्यावर शांतता पसरते . परंतु असे पाहुणे जर तुमच्याकडे सतत येत राहिले तर तुम्ही काय कराल ? किती दिवस उत्साह दाखवाल ? इथे परिक्रमावासी सहा पिढ्या अखंडपणे येत आहेत तरी देखील हे कुटुंबीय तितकाच उत्साह प्रत्येक वेळी दाखवते यावरून त्यांचे श्रेष्ठत्व आपल्याला सहज लक्षात यावे ! सोपी गोष्ट नाही मित्रांनो ! मी गोळा केलेला कचरा पेटवून देतो आहे हे पाहिल्यावर शेजारच्या माणसाने देखील त्याचे अंगण झाडून साफ केले व तोही कचरा मला जाळायला आणून दिला . एकंदरीत संध्याकाळपर्यंत तो संपूर्ण परिसर अतिशय चकाचक झाला . चालून कितीही थकले असले तरी असे काम केल्यावर एक वेगळा उत्साह ,एक वेगळी ऊर्जा माझ्या अंगामध्ये संचारायची हे मान्य केलेच पाहिजे .
परिक्रमावासींची सेवा कशी करावी याचा आदर्श वस्तू पाठ घालून देणाऱ्या पुण्यवान पुण्यात्मा डावीकडून श्रीमती ज्योती बेन मध्ये श्रीमती कमलबेन आणि उजवीकडे श्रीमती बोणिबेन . यांना भेटायला सतत कोणी ना कोणी येत असते . यांना स्वतःचे खाजगी जीवन उरलेलेच नसून सर्व आयुष्यच सार्वजनिक झालेले आहे .
आयुष्यभर परिक्रमा वासियांची सेवा केलेल्या कमला बेन . यांना दृष्टी नाही .परंतु स्मृती तल्लख आहे .
आयुष्यभर परिक्रमा वासियांची सेवा केलेल्या कमला बेन . यांना दृष्टी नाही .परंतु स्मृती तल्लख आहे .
समोर लाल रंगाची खोली दिसते तिथे यांचे निवासस्थान असून डावीकडे पंखा लावला आहे त्याच्या खाली मी आसन लावले होते .
यांच्या घरातील लहानातला लहान सदस्य सुद्धा परिक्रमावासींची मनोभावे सेवा करताना दिसे . ज्योती बेनदेखील लहान असल्यापासून परिक्रमावासींची सेवा पाहत असल्यामुळे आपणही तेच करावे असे त्यांनी ठरविले . लहान वयात होणारे संस्कार हे फार म्हणजे फार महत्त्वाचे असतात हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे .
ज्योती बेन यांनी मला सांगितले की आता जाऊन मंगलेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन यावे आणि त्या महादेवाच्या पिंडी मध्ये काय काय पहावे हे देखील त्यांनी मला सांगितले . आम्ही पाच-सहा परिक्रमावासी एकत्रितपणे मंगलेश्वर महादेवाच्या दर्शनाला गेलो . मंगळ देवाने स्थापन केलेले हे शिवलिंग आहे . शिवलिंगावरती एक खड्डा आहे . इथेच श्वेत वराहाची देखील मूर्ती आहे . कालगणना बघता सध्या श्वेतवाराहकल्प चालू आहे .
नर्मदा मातेचे मंदिर देखील छान आहे . इथून नर्मदा मातेचे खूप छान आणि रमणीय दर्शन होते . मंदिर छोटेसेच असले तरी प्रचंड ऊर्जा असल्याचे जाणवते .
या गावाला ज्यावरून नाव पडले त्या श्री मंगळनाथ महादेवांचे मंदीर . नर्मदा खंडातील बहुतेक गावांची नावे त्या गावातील मुख्य देवतेवरून पडलेली दिसतात .
श्री श्वेतवराहाची अतिशय दुर्मिळ आणि सुंदर मूर्ती . यावर खाली शिलालेख देखील लिहिलेला आहे .वराहरूपातील विष्णूच्या हातात शंख चक्र गदा पद्म माला असलेली आपल्याला दिसते . मूर्ती अप्रतिम असून सुस्थितीत आहे .
मंगळनाथाचे मंदिर हरिहर ऐक्य प्रतिपादित करणारे आहे . कारण मंगळनाथ महादेवांच्या सोबतच इथे विष्णू आणि लक्ष्मी चे विग्रह देखील प्रतिष्ठापित केलेले आहेत .
या भागातील नर्मदा मातेची काही सुंदर चित्रे पाहूयात . हळूहळू पाणी गोड होत चालल्यामुळे काठावर गवताचे प्रमाण वाढू लागते .
गवताच्या पार्श्वभूमीवर काढलेला मैयाचा अपोज्योती दर्शवणारा सुंदर फोटो . किती स्वर्गीय रूप आहे पहा मैयाचे !
नावे वरतीच केवट लोकांचा अर्धा संसार असतो .
सर्व दर्शने घेऊन आम्ही पाच-सहा जण पुन्हा एकदा आश्रमामध्ये दाखल झालो . आश्रमामध्ये सेवेसाठी गावातील काही तरुण येत जात असतात . यातील रामकृष्ण , मोनील आणि हेमंत नावाच्या तीन मुलांशी बऱ्याच गप्पा मी मारल्या . हेमंत वेडा आहे असे मला सांगण्यात आले होते . परंतु आपल्याकडे अतिशय सार्वत्रिकपणे दिसणारा परंतु सोयीस्करपणे दुर्लक्षित केला जाणारा आत्ममग्नता नावाचा एक आजार आहे . त्याचा तो रुग्ण होता . ज्याला इंग्रजीमध्ये ऑटिझम असे म्हणतात . आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहायला गेले तर या प्रकारच्या विकाराच्या अनेक छटा आढळतात . एकच एक रोग किंवा एकच एक लक्षणे अशी तुम्हाला आढळणार नाहीत . हेमंत तसा असला तरीदेखील परिक्रमा वासीयांची उत्तम सेवा करत होता . याचा अर्थ ही मुले सुद्धा खूप काही करू शकतात . फक्त त्यांना योग्य पद्धतीने वाढवावे लागते आणि त्यासाठी थोडेसे अधिक कष्ट घ्यावे लागतात इतकेच . या विषयावर पुरेसे किंवा म्हणावे तसे प्रबोधन आपल्याकडे होताना दिसत नाही . मुळात आत्ममग्नता नावाचा एक विकार अस्तित्वात आहे हे आपण स्वीकारणे ही त्याची पहिली पायरी आहे . या क्षेत्रात पूर्णवेळ काम करणारे एक डॉक्टर माझे खूप चांगले परिचित आहेत त्यांनी मला असे सांगितले की कोविड मध्ये दोन वर्ष लो लॉक डाऊन झाले होते त्या काळात जन्माला आलेली किंवा गर्भधारणा झालेली मुले या विकाराने अधिक ग्रस्त आहेत असे त्यांचे साधार निरीक्षण आहे . ज्या वयामध्ये लहान बालकांना सामाजिक जीवनाचा स्पर्श व्हावा लागतो त्या काळात सतत घरातील एकच एक प्रकारचे वातावरण पाहण्याचा परिणाम त्यांच्या बौद्धिक जडणघडणीवर झालेला दिसतो असे त्यांचे मत आहे . परंतु त्याचबरोबर बदललेली जीवनशैली , नियमित व्यायामाचा अभाव किंवा उशिरा विवाह करणे किंवा गर्भधारणा होत असताना आई-वडिलांची मन:स्थिती या सर्वांचा देखील परिणाम या विकाराच्या बालकांवर निश्चितपणे झालेला दिसतो असे देखील वैद्यकीय तज्ञांचे मत आहे . सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले मूल जन्माला आल्यावर त्याच्यामध्ये अशी काही लक्षणे आपल्याला आढळली तर विना विलंब वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी कुठलीही दिरंगाई करू नये . कुठली लक्षणे आढळतात ? अशी बालके उशिरा बोलतात किंवा बोलतच नाहीत . सतत पालथे पडून एखाद्या वस्तूकडे पाहत बसतात . विशेषतः हलणाऱ्या वस्तू किंवा गोल फिरणाऱ्या वस्तूंचे यांना आकर्षण असते .खेळण्यातल्या गाडीची चाके हे फिरवत बसतात किंवा सिलिंग फॅन कडे पाहत बसतात . यांना सतत दिव्यांच्या बटणांशी खेळायला आवडते . हाक मारल्यावर आपल्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती ते दर्शवितात .अशी बालके अति चंचलता देखील दाखवतात . किंवा विनाकारण रडत बसणे , काही केल्यावर रडू थांबवणे , रडत रडत झोपेतून जागे होणे व पुन्हा न झोपणे असे अनेक प्रकार असू शकतात . अशी लक्षणे एक दोन वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये आढळली तर लवकरात लवकर आत्ममग्नता या विषयातील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा . कमी वयामध्ये हे विकार बरे होण्याची शक्यता खूप जास्त असते . त्यासाठी काही ठराविक व्यायाम आणि औषधे असतात . परंतु एकदा एक ठराविक वय उलटून गेले म्हणजेच मेंदूची जडणघडण एका ठराविक टप्प्याच्या पुढे गेली की हा विकार बरे करणे अतिशय कठीण होऊन जाते . म्हणून माझा मुलगा तसला नाही किंवा माझी मुलगी तशी नाही असा आत्मघातकी विचार न करता केवळ शंका तरी आली तरी तज्ञ वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्यावा . फार फार तर तुम्हाला डॉक्टर सांगतील की तुमचे मुल सर्वसामान्य आहे . चिंता नसावी ! या क्षेत्राचे गांभीर्य ओळखून सरकारने देखील आता अशा काही स्वयंसेविका नेमलेल्या आहेत ज्या पालकांचे प्रबोधन करून त्यांना या विषयाची तोंड ओळख करून देतात . पुण्यामध्ये असे काम करणाऱ्या एक स्वयंसेविका मला माहिती आहेत . त्यांनी देखील मला हेच सांगितले की पालकांनी आपले मूल आत्ममग्न आहे हे स्वीकारणे हीच सर्वात कठीण पायरी आहे . जेव्हा उपचार सुरू करायचे त्या काळात पालक आमचे मूल तसे नाही असे म्हणून दुर्लक्ष करतात आणि मग जेव्हा हा विकार भयंकर स्वरूप धारण करतो तेव्हा प्रचंड पैसा खर्च करतात परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण हा विकार ठराविक वेळी बरा होणारा आहे . सुशिक्षित लोकांची वस्ती असलेल्या शहरातील आणि महानगरातील ही अवस्था आहे तिथे खेड्यातील अवस्था काय विचारायची ! या भागात सरसकट तो वेडा आहे किंवा ती वेडसर आहे असे जाहीर करून टाकले जाते आणि अशा मुलांना मोकळे सोडले जाते कारण त्यांच्यामध्ये चंचलता खूप असल्यामुळे एका जागी बसण्यापेक्षा गावभर फिरून ती शांत होतात . सर्वच पालकांनी केला पाहिजे असा एक आयुर्वेदिक उपाय मला इथे आवर्जून सांगावासा वाटतो . अर्थातच हा योग्य आहे का नाही याची खातरजमा मी एका अतिशय प्रसिद्ध आणि प्रथितयश आयुर्वेदाचार्यांकडून करून घेतलेली आहे . शुद्ध देशी गाईचे तूप घ्यावे . जर्सी गाईचे किंवा बाजारातील तूप चालणार नाही . आपल्याला खात्रीशीरपणे माहिती असलेल्या देशी गाईच्या दुधापासून घरी विरजण लावून घरीच कढवून केलेले तूप जर काही काळ ठेवले तर त्यातील रवाळ भाग खाली जाऊन वरती पातळ पाणी तरंगते .आयुर्वेदाच्या भाषेमध्ये याला घृतमंड असे म्हणतात . हे घृतमंड आपल्या घरातील बालकांच्या नाकामध्ये दोन दोन थेंब झोपताना सोडावे .सोडताना डोक्याखाली उशी न देता मान सरळ किंवा गादीच्या कडेवर डोके खाली सोडलेले अशा परिस्थितीत ठेवावी . यामुळे मुलांचा बौद्धिक विकास चांगला होतो व मुले शांत होण्यास मदत होते . आपल्याला लहानपणी आपले आजी आजोबा हे उपाय आपल्यावर करत असल्याचे आपल्याला नक्की आठवेल पहा . कानात तेल सोडणे , नाकात तूप सोडणे , दंतमंजनाने दात घासणे हे प्रकार आता बंदच झाले आहेत . अधिक विषयांतर नको .असो . तर हेमंत च्या या अवस्थेबद्दल मी गावातील मुलांना सांगितले आणि त्यानंतर मुलांशी त्याचे वागणे निश्चितपणे बदलल्याचे मला तत्काळ जाणवले .
मुळात ही समस्याच येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या घरातील मुलांची लग्नं सरकारने नेमून दिलेल्या योग्य वयात वेळच्यावेळी लावावीत हे सर्वोत्तम ! असो .
इथे रात्री मुक्कामासाठी एक बस आली . बस मधल्या परिक्रमावासींनी आम्हा सर्वांसाठी देखील स्वयंपाक केला आणि त्यांनी दिलेला सुंदर असा गक्कड ,डाळ , खीर असा महाप्रसाद आम्ही खाल्ला . पूर्वी ज्योतिबेन घरी स्वयंपाक करायच्या परंतु परिक्रमावासींची संख्या प्रचंड वाढल्यामुळे आता त्यांनी स्वयंपाक करण्यासाठी एक कुटुंब पगारावर ठेवलेले आहे . मला सर्वांना असे सुचवावेसे वाटते की आपण परिक्रमे मध्ये असताना शक्य झाले तर आश्रमाला मदत कराच .परंतु तेव्हा करता नाही आली तर वहीमध्ये नोंद करून ठेवून घरी आल्यावर अशा आश्रमांना आवर्जून अन्नदानासाठी मदत करावी . अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते . कारण हे एकमेव दान असे आहे ज्याच्या मध्ये दान घेणारा दात्याला , आता पुरे !आता मला बास ! असे म्हणतो ! ज्योती बेन यांचे वैशिष्ट्य असे की त्यांना हवे ते परिक्रमा वाशींना खायला न घालता त्या आलेल्या परिक्रमावासींना विचारतात की आज आपण काय करूया आणि तो पदार्थ बनवून खायला घालतात ! ही सुविधा सर्वच आश्रमात मिळेल याची खात्री देता येत नाही ! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या कोणाकडूनही एक रुपया सुद्धा देणगी घेत नाहीत! धान्य ही घेत नाहीत! सर्व कुटुंबीय आपल्या स्व खर्चातून ही सेवा चालवीत आहेत! म्हणून ती अधिक श्रेष्ठ मानली पाहिजे!
रात्री छान झोप लागली . सकाळी उठल्यावर आन्हीके आटोपून चहा पिऊन निघताना ज्योति बेन यांनी माझे सॅंडल पाहिले . आणि मला त्या घराच्या बाजूला असलेल्या एका ठिकाणी घेऊन गेल्या . त्या मला म्हणाल्या की तू काठाकाठाने चालतो आहेस तर हे सॅंडल तुझ्या कामाचे नाहीत त्यापेक्षा पाय पूर्ण झाकणारे बूट तू सोबत घे . असे म्हणत परिक्रमावासींनी सोडून दिलेल्या पादत्राणांचा मोठा ढीग त्यांनी मला दाखवला ! कोणी परिक्रमा अर्धवट सोडून जाणार असेल किंवा अन्य काही कारणामुळे पादत्राणे त्याला होत नसतील तर ती इथे सोडून नवीन पदत्राणे घेऊन लोक इथून पुढे जातात . त्या ढीगामध्ये किमान २०० जोड्या चप्पल बूट असावेत ! त्यातील आदिदास कंपनीचा असावा असा दिसणारा एक बूट मला दिसला जो माझ्या पायाला चोख बसत होता . ज्योतिबेन यांनीदेखील तो ओळखला आणि म्हणाल्या की मुंबईच्या एका परिक्रमावासीने हा बूट भरूच मध्ये घेतला परंतु त्याच्या पायाला होत नव्हता म्हणून त्याने इथेच ठेवून दिला . माझ्या पायाला तो नवा कोरा बूट चोख बसत असल्यामुळे मी तो घेतला आणि माझे सॅंडल तिथेच सोडून दिले . अशा रीतीने परिक्रमेच्या ९९ व्या दिवशी मला दहावा बूट मिळाला ! हा बूट पायाला अतिशय आरामदायक होता आणि त्याच्यामुळे माझी गती देखील थोडीफार वाढली ! ज्योती बेन यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला आणि त्यांची रजा घेतली .
नर्मदा मातेचा किनारा गाठला . तिला साष्टांग नमस्कार करून किनाऱ्यावरचा मार्ग पकडला ! पायाखाली हळूहळू गवत सुरू झाले होते . आणि सोबत थंडगार पाण्याचा थर्मास असल्यामुळे एक घोट पाणी पिले तरी एक वेगळीच ऊर्जा मिळत होती ! नर्मदा मातेचे दर्शन करत पुढे पावले टाकायला सुरुवात केली !
लेखांक एकशे सोळा समाप्त (क्रमशः )
मैय्या लै लै लै भारी; अगदी जगात भारी कोल्हापूरी सारखीच!
उत्तर द्याहटवाआई नर्मदे हर बाबाजी 🙏
Narmade Har !!!!!
उत्तर द्याहटवानर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाज्योती बेन यांचा अकाउंट नंबर?
उत्तर द्याहटवाआणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या कोणाकडूनही एक रुपया सुद्धा देणगी घेत नाहीत! धान्य ही घेत नाहीत! सर्व कुटुंबीय आपल्या स्व खर्चातून ही सेवा चालवीत आहेत! म्हणून ती अधिक श्रेष्ठ मानली पाहिजे!
हटवानर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवालेख लवकर लवकर लिहावेत ही विनंती. मानस परिक्रमेत स्पन्दन जपून ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे अस वाटत.
उत्तर द्याहटवानर्मदे हर.
डॉ वीणा देव [ Canada]
पुनर्वनीकरण प्रकल्पाच्या निमित्ताने नंदुरबारला सारखे जाणे होत आहे . हे अंतर 600 किलोमीटर असून प्रवासात येता जाता खूप वेळ जातो आहे . तरी कृपया सहकार्य करावे ही विनंती . लवकरच पुन्हा तिकडे जाणार आहे . पावसाळ्यामध्ये हे काम आटोपणे महत्त्वाचे आहे . लिखाणासाठी निवांत वेळ मिळाल्याशिवाय , घाई गडबडीत लिहिता येत नाही . आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे . नर्मदे हर
हटवानर्मदे
उत्तर द्याहटवाहर
बाबाजी
कहा
गायब?
भाबरी शूलपाणी झाडी
हटवा117 लेखांक मध्ये उल्लेखित विटेचा फोटो टाकाल का दर्शनासाठी.
उत्तर द्याहटवाअजून एक विनंती की, तुम्ही मागे जसे नर्मदा अष्टक
टाकलेत tasech नर्मदा मैया ची आरती पण पाठवा म्हणजे पाठ होऊन जाईल.
उत्तर द्याहटवानर्मदे हर.
डॉ वीणा देव
बाबजी परिक्रमा परत घेतली की काय
उत्तर द्याहटवा