लेखांक ११४ : भारभूतेश्वर , टिंबी दशानचा महाकाल व त्रिगुणातीत ध्यान आश्रम

नवेठ्याचा सदानंद अवधूत आश्रम सोडल्यावर कधी एकदा नर्मदा मातेचे दर्शन घेतो असे मला झाले होते .त्यामुळे अतिशय वेगाने पावले टाकत सकाळच्या थंड वातावरणामध्ये नर्मदा मातेच्या दिशेने निघालो . जे लोक कायम समुद्रापासून लांब राहिले आहेत त्यांना नदीचा त्रिभुज प्रदेश हा किती विचित्र प्रकार असू शकतो याची कल्पना करता येणे अवघड आहे . परंतु कित्येक मैल जागा पाय ठेवण्याच्याच काय साधी नाव नांगरण्याच्या योग्यतेची सुद्धा राहिलेली नसते इतका गाळ करोडो वर्षे त्या नदीने तिथे आणून गोळा केलेला असतो . त्यामुळे इच्छा नसताना सुद्धा किनारा सोडावा लागला होता .परंतु आता मात्र भारभूतेश्वर किंवा भाडभूत या स्थानापासून मैया चा सहवास पुन्हा लाभणार होता .
रस्ता सरळ होता . दुतर्फा शेती होती . इथे समुद्र जवळ असल्यामुळे थंडी अशी नव्हतीच . हवेत विचित्र दमटपणा होता . परंतु सूर्याचा दाह नसेपर्यंत अधिकाधिक चालून घेतलेले बरे असते . परंतु पोटाचे तंत्र अजून काही दुरुस्त झालेले नव्हते . आणि हमरस्त्यावर असल्यामुळे डोलडालची अडचण झाली होती . चालताना अचानक तीव्र कळ पोटात आली . आणि काय करावे तेच मला कळेना . मी पोट धरून खाली वाकलो , इतक्यात दुचाकीवरून जाणारा एक मनुष्य माझ्या शेजारी थांबला आणि म्हणाला बाबा इस खेत मे जाओ और डोलडल बैठो . मी त्याच्याकडे पाहू लागलो की याला कसे कळाले ? तो म्हणाला चिंता मत करना मेरा ही खेत है । माझी देहबोली पाहून त्याने माझी समस्या ओळखली होती ! आणि तत्काळ उपायोजना देखील सांगितली होती ! सुदैवाने शेतात जाण्याची पाळी माझ्यावर आली नाही . याच्या शेताच्या अलीकडेच  एक जंगल वजा भाग शिल्लक राहिला होता . तिथे कार्यभाग साधला . त्याने हुशारी करून शेताला पाणी सोडून दिले . त्यामुळे थोड्याच वेळात माझ्या आजूबाजूने पाणीच पाणी वाहू लागले . त्याच क्षणी मी निश्चय केला . की आता काहीही होऊ दे , आरो पाणी प्यायचे नाही . कितीही खारट असले तरी मैयाचेच पाणी प्यायचे . एरव्ही सुद्धा बाहेर कुठल्याही गावी गेल्यावर मी विकतचे पाणी कधीच पीत नाही . किमान पेलाभर का होईना त्या गावचे पाणी प्यावे . आधुनिक वैद्यक शास्त्राने सुद्धा आता हे मान्य केले आहे की त्यामुळे पोटातील उदरस्थ जीवाणू किंवा सोप्या मराठीमध्ये गट बॅक्टेरिया सुधारण्यास मदत होते .त्याने कदाचित पहिल्यांदा पोट बिघडते परंतु पुढच्या वेळेला मात्र आपले शरीर त्या पाण्यासाठी प्रतिकारक बनते . मी भाडभुत गावामध्ये पोचलो तेव्हा नुकताच सूर्य दिसू लागला होता . गावात एक मोठा तलाव आहे . त्याला वळसा मारून गेल्यावर नर्मदा मातेचा सुंदर किनारा लागतो . इथे केवट समाजाने एक सुंदर आश्रम बांधलेला आहे . समोरच भारेश्वर महादेवाचे मंदिर आहे .सोमेश्वराचे मंदिर देखील आहे . मी केवट आश्रमामध्ये सामान ठेवून मंदिरात दर्शनासाठी गेलो . एक पुजारी बाबा स्टायलिश पद्धतीने बसून प्रसाद वाटत होते . मला त्यांच्या त्या शैलीची खूप मौज वाटली ! बाहेर येऊन बघतो तर तुकाराम बुवा सुरवसे इथेच मुक्कामाला राहिलेले होते ! मला पाहिल्याबरोबर त्यांना खूप आनंद झाला ! दोघांनी प्रेमाने एकमेकांना नर्मदेहर केले ! मी तुकाराम महाराजांना त्या पुजारी बुवांबद्दल सांगितले . तुकोबारायांनी त्यांच्या खास शैलीमध्ये मला त्यांचे अनुभव सांगितले ! हा मंदिर परिसर खूप भव्य होता परंतु तरीदेखील इथून नर्मदा मातेचे इतके भव्य दिव्य दर्शन होत होते की मंदिराचा परिसर त्यापुढे छोटासा वाटत होता ! बाहेर नजर जाईल तिथवर नावाच नावा दिसत होत्या ! नर्मदा मातेच्या कृपेने या भागातील केवट समाज कोट्याधीश नव्हे अब्जाधीश आहे ! प्रत्येक घरामध्ये अनेक नावा आहेत ! जन्माला आल्यासारखी एक तरी नाव स्वतःची निर्माण करायचीच असा संकल्प प्रत्येक केवट बालक करत असते !  या भागात मोटरसायकलवर आलेले एक परिक्रमा वासी भेटले . त्यांनी तुकोबारायांच्या सोबत माझा फोटो काढला . आणि माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . आमच्या गप्पांमध्ये ते देखील सामील झाले होते त्यामुळे त्यांनी गुपचूप जाऊन पूजाऱ्याचा फोटो देखील मारून आणला ! बाईक परिक्रमेतील अनुभव कसे असतात हे समजून घेत काही काळ तिथे मैयाचे दर्शन घेत बसलो आणि अखेरीस न रहावून थेट स्नानासाठी उतरलो ! चालत जाऊन उतरता येणे शक्य नव्हते , त्यामुळे एका नावेतून गेलो आणि टोकावरून उतरून स्नान केले . पाणी दिसायला गडूळ होते . परंतु सणावाराला हळदी कुंकवाला नटून थटून जाणारी सवाष्ण आई काय किंवा धुणे भांडी केर फरशी करून थकून आलेली आई काय , मुलाला आई ती आईच ! नर्मदा मातेचे निवळ शंख पाणी असो , किंवा असे डहुळलेले रेवा जल असो तिचा केवळ स्पर्शच परमपवित्र करणारा आहे ! आपणही या घाटावरील रेवा मातेचे दर्शन घ्यावे ! तिचे पावित्र्य अनुभवावे ! मन किती शांत होते पहा ! आनंदाच्या लहरी सर्वांगामध्ये उमटतात ! म्हणतात ना गंगेच्या स्नानाने पापे जातात , तर नर्मदेच्या केवळ दर्शनाने पापे जळतात !
याबाबतीतला एक पौराणिक श्लोक प्रसिद्ध आहे .
स्कंद पुराणाच्या रेवाखंडामध्ये हा श्लोक येतो .राजा युधिष्ठिर मार्कंडेय ऋषींना विचारतो की नर्मदा नदी सर्व नद्यांमध्ये उत्तम का आहे ते कृपया मला सांगावे .
कथमेषा नदी पुण्या सर्वनदीषु चोत्तमा ।
नर्मदा नाम विख्याता भूयो मे कथयानघ ॥ २१.२ ॥
त्यावर मार्कंडेय महामुनी फार सुंदर उत्तर देतात .ते म्हणतात , 
नर्मदा सरितां श्रेष्ठा सर्वपापप्रणाशिनी ।
तारयेत्सर्वभूतानि स्थावराणि चराणि च ॥ २१.३ ॥
हे राजा सर्व पापांचा नाश करणारी नर्मदा नदी ही सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ आहे . ती केवळ जीव जंतूंना नव्हे तर स्थावर जंगम सर्वांनाच मोक्ष देणारी आहे .
नर्मदायास्तु माहात्म्यं यत्पूर्वेण मया श्रुतम् ।
तत्तेऽहं सम्प्रवक्ष्यामि शृणुष्वैकमना नृप ॥ २१.४ ॥
मी नर्मदा मातेचे जे काही महात्म्य ऐकलेले आहे ते तुला सांगतो .
गङ्गा कनखले पुण्या कुरुक्षेत्रे सरस्वती ।
ग्रामे वा यदि वारण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा ॥ २१.५ ॥
गंगा नदी कनखलक्षेत्रामध्ये पुण्य दात्री आहे तर सरस्वती कुरुक्षेत्रामध्ये विशेष पुण्य प्रदान करणारी आहे परंतु खेड्यापाड्यात वाहत असो किंवा अरण्य क्षेत्रामध्ये वाहत असो नर्मदा मात्र सर्वत्र समान पुण्य देणारी आहे .
त्रिभिः सारस्वतं तोयं सप्ताहेन तु यामुनम् ।
सद्यः पुनाति गाङ्गेयं दर्शनादेव नार्मदम् ॥ २१.६ ॥
सरस्वतीच्या जलाने तीन दिवस स्नान केल्यावर जे पुण्य मिळते किंवा यमुना मातेच्या सात दिवसाच्या पुण्य मिळते किंवा गंगा नदी मध्ये स्नान केल्यावर जे पुण्य मिळते ते नर्मदेच्या केवळ दर्शनाने प्राप्त होते ! 
हे माझे बोल नाहीत बरं ! ज्यांनी नर्मदा परिक्रमा ही परंपरा सुरू केली त्या मार्कंडेय महामुनींचे हे बोल आहेत ! ते फोल कसे ठरतील ! आपण स्वतःच अनुभव घेऊन पहा !
नर्मदा मैया च्या केवळ दर्शनाने प्रस्तुत लेखकाला झालेला आनंद ! आणि तो आनंद आपल्यासोबत वाटताना अजूनच आनंद वाटतो आहे ! आनंदाचे डोही आनंद तरंग ! आनंदची अंग आनंदाचे !
तुकाराम बुवा सुरवसे आणि प्रस्तुत लेखक भाडभूतेश्वराच्या घाटावर
 भारभूतेश्वर चे गुरुजी ( द्विचक्री वरून परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासी ने काढलेला भांकालेख किंवा फोटो )
प्रस्तुत लेखकाचे वरील फोटो याच जिन्यावर उभे राहून काढलेले आहेत .
श्री भारेश्वर अथवा श्री भारभूतेश्वर महादेव
मंदिर परिसर मोठा असून येथे अनेक लहान मोठी मंदिर आहेत .
अनेक मुखी शिवलिंग
भरपूर शिवलिंगे पाहिल्याशिवाय आपल्या शिवभक्तांचे समाधानच होत नाही ! घ्या दर्शन !
विषय निघालाच आहे म्हणून इथेच चालू असलेल्या एका मोठ्या प्रकल्पाविषयी थोडीशी तोंड ओळख करून देतो . हा प्रकल्प इतका अवाढव्य आहे की तो भूखी खाडीच्या अलीकडे मी होतो तिथूनही मला दिसत होता व इथून देखील त्याचे अस्तित्व जाणवत होते . या प्रकल्पाचे नाव आहे भाडभुत बॅरेज प्रकल्प . 
भारभूत रेवा प्रवाह परिवर्तन प्रकल्प
बॅरेज ला मराठी मध्ये काय म्हणतात मला माहिती नाही परंतु याचे कार्य धरणापेक्षा वेगळे असते . त्याला जल उपसा प्रकल्प देखील म्हणता येणार नाही कारण याच्यामध्ये पाणी उपसले जात नाही तर फक्त पाण्याची दिशा बदलली जाते आणि प्रवाह परिवर्तित केला जातो . त्यामुळे आपण याला भारभूत रेवाप्रवाहपरिवर्तन प्रकल्प असं म्हणू शकतो . धरणामध्ये पाणी अडविले जाते आणि मुख्यत्वे कडून साठवले जाते . इथे पाणी न अडविता छोट्या छोट्या भिंतींच्या साह्याने त्याचा मार्ग बदलला जातो आणि शेतीसाठी किंवा अन्य कामासाठी ते वापरले जाते . त्यामुळे पाण्याची पातळी फारशी वाढत नाही . इथून समुद्र सुरू होत असल्यामुळे समुद्राला जाऊन मिळणारे गोडे पाणी वाचवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे . सरदार सरोवर प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून नर्मदा पात्रामध्ये होणाऱ्या गोड्या पाण्याचा विसर्ग फारच कमी झाला आहे . या प्रकल्पाचे अभियंते राहिलेल्या एका सज्जनांनी नुकतीच मला अशी माहिती दिली की यातील केवळ क्रमांक एकचा कालवा चार हजार क्युसेक या गतीने पाणी उपसतो आहे ! त्यांनी नर्मदा परिक्रमा देखील केलेली आहे . गोड्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे समुद्राचे पाणी उलटे आत शिरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे . त्यामुळे भरून परिसरातील जमिनी खारफुटी झाल्या आहेत . तसेच कुपनलिका आणि विहिरी यांचे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही . यावर उपाय म्हणून गुजरात शासनाने गल्फ ऑफ खंबात डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अर्थात खंबातच्या आखाताचा विकास करणारा एक प्रकल्प कल्पसार या नावाने चालू केलेला आहे . नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता . त्याच्या अंतर्गत या बंधाऱ्याचे बांधकाम दोन्ही बाजूने सुरू आहे . यावरून सहा पदरी महामार्ग जाणार असल्यामुळे तो देखील एक लाभ स्थानिक जनतेला होणार आहे . एकूणच या प्रकल्पाचे उद्दिष्ट चांगले दिसते आहे . परंतु सरदार सरोवर प्रकल्पाच्या वेळी झालेल्या चुकांमुळे करावे लागलेले हे पापक्षालन आहे . 
भारभूत प्रकल्पाची भव्यता
उभ्या भिंती अथवा बॅरेजेस च्या साह्याने प्रवाहाचे केलेले परिवर्तन
प्रकल्पासाठी सुमारे ४१०० कोटी रुपयांचे बजेट देण्यात आलेले आहे
या एका चित्रावरून प्रकल्पाची भव्यता लक्षात यावी .प्रकल्पाची भव्यता सांगणे हा हेतु नसून इतका भव्य प्रकल्प जिच्यावर होतो आहे ती आमची नर्मदा माता किती भव्य असेल हे मनात ठसविणे हा उद्देश आहे !

या प्रकल्पने ६० कोटी घनफूट गोडे पाणी साठणार आहे जे शेती व्यावसायिक कारणे आणि पिण्यासाठी वापरता येणार आहे . शुक्ल तीर्थापर्यंत गेलेले खारे पाणी यामुळे कमी होणार आहे . पुरांचे प्रमाण कमी होणार असून त्यामुळे होणारी सुपीक जमिनीची धूप थांबणार आहे . या पूर प्रतिबंधक भिंतीची लांबीच वीस किलोमीटर आहे ! कारण पूर आला की नर्मदा मातेचे या भागातील पात्र आरामात तेवढे फुगते ! यावर बांधण्यात येणाऱ्या पुलामुळे दहेज आणि सुरत या दोन महत्त्वाच्या बंदरांमधील अंतर ३७ किलोमीटरने कमी होणार आहे . प्रथेप्रमाणे याही प्रकल्पाला काही डाव्या संघटनांचा विरोध सुरू आहे . मनात विचार आला की भविष्यामध्ये भुईला भार करणारा एखादा प्रकल्प इथे होणार आहे हे महादेवांना आधीच कळले की काय म्हणून भारभूतेश्वर बनून येथे राहिले ! सरकार त्याचे काम करत आहे . राष्ट्र विघातक शक्ती त्यांची कामे करत आहेत . परिक्रमावासी ने त्याचे काम केले पाहिजे ! ते म्हणजे तटस्थपणे सर्व गोष्टींची नोंद करून पुढे चालू पडणे ! चला तर मग जाऊयात पुढे ! अरे हो जाण्यापूर्वी आश्रमाचा शिक्का वहीमध्ये घेणे आवश्यक आहे ना !हा पहा घेतला शिक्का ! 



श्री अंबिका धाम सेवा सत्संग ट्रस्ट प्रभुज
त्याच आश्रमाचा दुसरा शिक्का आहे .
केवट आश्रम
श्री अंबिका धाम सेवा सत्संग ट्रस्ट 
ट्रस्ट रजिस्ट्रेशन क्रमांक १७९९ भरूच 
मुक्काम भाडभूत तालुका भरुच
पोटाची गडबड उडालेली असल्यामुळे इथे भोजन प्रसाद न घेता मी तसाच उपाशीपोटी पुढे निघालो . आता मैया शेजारी आल्यामुळे सर्व पीडा दुःख वेदना जाणीवा नष्ट झाल्या होत्या . फक्त तिचे ते भव्य स्वरूप पाहायचे ! आतापर्यंत तिच्या काठावरून चालताना प्रचंड झाडी शेती तुडवावी लागायची परंतु इथे तिचे रूप असे आगळे होते की पायाखाली मऊशार वाळूचा कित्येक किलोमीटर लांबीचा किनारा चालायला मिळाला ! असा सलग पाच-सहा किलोमीटर चा पट्टा अख्ख्या नर्मदा खंडात कुठे नाही ! वाळू रंगाने काळसर होती . किंबहुना ती वाळू नव्हतीच . तो होता रेतीमिश्रित गाळ . त्यामुळे मी सॅंडल हातात घेऊन त्या सुंदर थंडगार गाळाचा स्पर्श अनुभवत कित्येक किलोमीटर चाललो ! एका वेगळ्याच भावावस्थेमध्ये हे चालणे घडत होते . आश्चर्य म्हणजे इथे एकही मनुष्य नव्हता . हजारो नावा लावलेल्या होत्या परंतु नावाडी एकही दिसायचा नाही ! बहुतेक अक्षय तृतीया झाल्यावर नावा समुद्रामध्ये काढतच नाहीत त्याचा हा परिणाम असावा ! परंतु त्यामुळे जो काही एकांत चालताना मिळाला तो आवर्णनीय होता , अतुलनीय होता ! 

केवट आश्रमा समोरच्या नावा जिथे मी स्नान केले होते .

सर्वत्र नौकांचे साम्राज्य होते .


परंतु किनारा निर्मनुष्य असल्यामुळे फार आनंददायी होता .

नर्मदा मातेच्या प्रवाहामध्ये तयार झालेले आलिया बेट . चहू बाजूने नर्मदा मातेच्या पाण्याने वेढलेले हे एक वेगळेच जग आहे .

भाडभूतच्या केवट आश्रमापासून वाढवा दशान पर्यंत मैयाच्या काठाने चालण्याचा आनंद आवर्जून घ्या !


मध्ये वडवा गावामध्ये ऋणमुक्तेश्वराचे मंदिर लागले .


मंदिरातील देवतांची अवस्था दयनीय होती . 
प्रत्येक मोठ्या शहराच्या पूर्वी जी एक सामाईक गोष्ट मला आढळली होती ती इथे देखील आढळली .ती म्हणजे धनिकांचे नर्मदे काठी असलेले मोठे मोठे प्रासाद . फक्त इथले असे प्रासाद हे अधिकांश अरबी व्यापाऱ्यांचे होते . अरबस्थानातील बहुतांश व्यापार हा पूर्वीपासून भरूच बंदराद्वारेच होतो आहे . त्यामुळे या एकूणच परिसरामध्ये अरब धार्जिणी वस्ती जास्त आहे .

 नर्मदा मैया च्या काठावर परिक्रमा मार्गातच जमीन घेऊन अशा प्रकारचे ऐशोआराम करणारे प्रासाद बांधण्याचे प्रमाण सध्याच्या पिढीमध्ये अधिक दिसते आहे . नर्मदा माता ही अन्य नद्यांप्रमाणे नसून तिच्यावर लोकांची प्रचंड श्रद्धा असल्यामुळे अशा लोकांवर स्थानिकांचा प्रचंड रोष राहतो हे नेहमी लक्षात ठेवावे . त्यामुळे महापूर किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीमध्ये अशा संपत्तीधारकांना स्थानिक जरा सुद्धा सहकार्य करत नाहीत . असो .
आपण दक्षिण तटावर असताना पाहिले होते की नर्मदा मातेच्या मधोमध इथे एक फार मोठे बेट निर्माण झालेले आहे . ते आलिया बेट नावाचे बेट आता माझ्यासमोर होते . आणि पायाखाली साधारण दोनशे फूट रुंदीचा काळपट तपकिरी माऊशार किनारा ज्यावर गवताची काडी सुद्धा उगवलेली नाही ! चालण्याचा आनंद नव्हे अक्षरशः परमानंद त्या दिवशी घेतला ! असे वाटत होते की मरेपर्यंत याच रस्त्यावरून चालत राहावे ! अशीच नर्मदा मैया कायम आपल्या उजव्या हाताने वाहत राहावी ! आणि तिच्या काठावरून चालता चालताच कधीतरी शेवटचा प्राण निघून जावा ! किती भाग्य ठरेल ते ! परंतु आपल्याला मृत्यू कधी यावा हे आपल्या हातात थोडीच आहे । ते तर कालों के काल महाकाल यांचे काम आहे ! असा विचार मी करत होतो इतक्यात समोर एक आश्रम दिसू लागला . वरून एक तरुण साधू हात करून बोलवत होता . आत जाऊन पाहतो तो साक्षात महाकालेश्वराचे मंदिर होते ते ! जाऊन साष्टांग नमस्कारच घातला ! आणि जे काय सांगायचे ते सांगून टाकले ! एखाद्या मुख्य संस्थेचे स्थानिक कार्यालय मिळावे तसे मला झाले ! उज्जैन येथील महाकालेश्वराचे हे एक उपपीठ मानले जाते ! आणि हे पौराणिक स्थान होते ! गंमत म्हणजे इथे चालत पोहोचायला मला जितका वेळ लागला तितक्याच वेळाने मोटरसायकलवर परिक्रमा करणारा तो बिचारा परिक्रमा वासी देखील तिथे पोहोचला ! बरेचदा लोक विचारतात की सायकलवर किंवा गाडीवर परिक्रमा केलेली चालते का त्यांच्यासाठी हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे ! चालत तुम्ही लवकर पोहोचता आणि गाडी किंवा सायकलवर अंतर मात्र विनाकारण वाढत असते . असो . 
इथे जे साधू होते त्यांच्याकडे पाहिल्यावर मला जरा शंका आली . कारण ते साधू वेषामध्ये जरी असले तरी त्यांच्या चालण्या बोलण्या वागण्यात आधुनिकतेचा स्पर्श आहे असे मला जाणवत होते . मी आल्या आल्या त्यांना सांगितले की मला भोजन प्रसादी नको आहे . ते आत मध्ये गेले आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने एक कलिंगड आणि अजून काही फळे चिरून ती अप्रतिम पद्धतीने एका प्लेटमध्ये मांडून आणली ! हा प्रकार पाहिल्यावर मात्र मला खात्रीच पटली की हा विरक्त साधू वेश धारण केलेला मनुष्य इतका सौंदर्यदृष्टी असलेला कसा काय असू शकतो ? हा नक्कीच पूर्वाश्रमीचा कोणीतरी रसिक शहरी मनुष्य असणार आहे म्हणून मी मुद्दाम खोदून विचारल्यावर त्या तरुण साधूने मला त्याचे वास्तव सांगितले . चक्क दिल्लीमध्ये आयुष्य गेलेला तो एक टिपिकल शहरी तरुण होता ! म्हणजे तसे ते मूळचे वाराणसीचे होते आणि त्यानी दिल्लीमध्ये राहून हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स डिग्री घेतलेली होती ! त्याने ज्या पद्धतीने फळे चिरून आणली होती ते पाहिल्यावरच कोणालाही ते खाण्याची इच्छा झाली असती ! आता समोरच्या क्षेत्रातला तज्ञच बसला आहे म्हटल्यावर मी त्याला माझ्या पोटाचा झालेला गडबड गुंडा सांगितला ! त्याने आतून जिरेपूड आणि काळे मीठ आणून माझ्या बाजूच्या अर्ध्या फळांवर ते शिंपडले . मोटरसायकल परिक्रमा वासीला उरलेला अर्धा भाग खायला सांगितला . परंतु तो त्याच्या नशिबात नसावा कारण दोन तुकडे उचलल्यावर त्याला पुढे जायची घाई असल्यामुळे तो पुढे निघून गेला . साधू हा दिल्लीचा तरुण असल्यामुळे मी मनामध्ये थोडासा निवांत झालो होतो आणि त्यामुळे त्याला सहज म्हणून गेलो की तो नाही तर तुम्हीच खा उरलेला अर्धा भाग ! आणि त्यानेही कुठलाही आढावेढा न घेता ती अंडाकृती प्लेट स्वतःकडे वळवून घेतली आणि आम्ही दोघे मस्तपैकी फळे खात मैयाच्या काठावर मैय्याकडेच पहात अप्रतिम गप्पा मारत बसलो ! अतिशय सुंदर असा सत्संग त्या तरुण साधू सोबत घडला . साधू अतिशय तरुण तेजस्वी आणि निस्पृह होता . मी कल्पना करून पाहिली की याचे दाढी मिशा वगैरे जर उडवले तर तो एखादा चित्रपटातला नट शोभावा इतका रूपवान देखील होता ! परंतु असे सर्व असून देखील त्याने साधू जीवन का पत्करले या विषयावर आमची बराच काळ चर्चा झाली . साधू जीवनामध्ये तो अत्यंत सुखी होता ! हॉटेल मॅनेजमेंट चा विद्यार्थी असल्यामुळे तो या कामानिमित्त जगभर फिरून आलेला होता . इंग्लंड मध्ये आईल ऑफ मॅन नावाचे एक बेट आहे जे केवळ हॉटेल इंडस्ट्री साठी प्रसिद्ध असून इथे वेटरची सुद्धा नोकरी ज्याला करायला मिळते तो पुढे आपल्या देशात गेल्यावर मोठे हॉटेल टाकतो इतका समृद्ध अनुभव तिथे तुम्हाला मिळतो ! तिथे देखील काही वर्ष साधु महाराज राहून आले होते ! माणसांचे घरातले वर्तन वेगळे असते आणि हॉटेलमध्ये गेल्यावर चार भिंतींच्या पलीकडचे त्याचे ते वर्तन अतिशय वेगळे असते अशी एक नवीन प्रथा आजकाल रूढ झालेली आहे . पूर्वी माणसाच्या वर्तनामध्ये असा काही भेद नसायचा परंतु अलीकडे तो भेद असला पाहिजे अशा प्रकारचे प्रशिक्षण विविध पातळ्यांवर आणि विविध संस्थात्मक तसेच व्यक्तिगत संबंधांमधून सुद्धा पदोपदी त्याला दिले जाते . त्यामुळे पाहू नये ते सर्व त्या तरुणाने पाहिले होते आणि करू नये ते सर्व त्याचे करून झाले होते . त्यामुळे आता पुढे काय असा वाजवी प्रश्न त्याला आयुष्यात पडला आणि त्याचे उत्तर त्याला नर्मदा मातेने दिलेले होते ! कधी कधी मला प्रश्न पडतो की आयुष्याचे चटके बसल्यावर मगच आपण योग्य मार्ग धरला पाहिजे असा काही नियम आहे का ? पुढच्याच ठेच मागचा शहाणा या नियमाने कधीच काही होऊ शकत नाही का ? की आपण देखील त्या संकटात उडी घातल्यावर मगच आपल्याला योग्य काय होते त्याची जाणीव व्हावी ? या साधूला जगातील कुठलीही डिश उत्तम पद्धतीने बनवता येत होती ! कारण त्याने आश्रमाचा त्याग केलेला असला तरी ज्ञानाचा आणि संस्कारांचा त्याग इतक्या सहजासहजी होत नाही ! मी देखील शहरातला वाढलेला तरुण असल्यामुळे त्याची माझी नाळ पटकन जुळली . अर्थात खेड्यातल्या लोकांशी देखील माझी नाळ तशीच जुळते हा भाग निराळा ! परंतु साधुने मला आग्रह केला की आता मी याच आश्रमात रहावे ! तो रोज काहीतरी सुंदर बनवून मला खायला घालेल ! कडक ऊन पडलेले असल्यामुळे क्षणभर महाकालेश्वराच्या मंदिरातच पाठ टेकली . साधूने आतून एक पंखा आणून माझ्या शेजारी लावून दिला ! पडल्या पडल्या मी विचार करू लागलो ! बास ! सुख सुख म्हणजे अजून काय असते ! थंडगार वारा ! आश्रमाच्या परिसरातील झाडीतून येणारा फुलांचा सुगंध ! शेजारी वाहणारी नर्मदा माई ! आणि म्हणाल तो पदार्थ आता खायला मिळणार ! आज काय दक्षिण भारतीय ! उद्या काय कॉन्टिनेन्टल ! परवा काय चायनीज ! त्यानंतर मग ... . ? त्यानंतर ? मी उठलो ,दंड उचलला ,झोळी पाठीला लावली आणि किनारा पकडला ! अरे सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही तरी इतके सुचते होय तुला ! परिक्रमेला आला आहेस का सुखासीन आयुष्य जगायला ! चल निघ ! असा स्वतःवरच मनोमन खेकसलो आणि तीव्र चटके देणाऱ्या उन्हामध्ये भरा भरा भरा चालू लागलो . परिक्रमेमध्ये असे मोहात टाकणारे प्रसंग अनेक वेळा येतात . नर्मदा माता क्षणोक्षणी तुमची परीक्षा बघते . त्यात तुम्ही उत्तीर्ण व्हावे अशी तिची अट अजिबात नसते . किंबहुना पास नापास अशा स्वरूपाच्या निकालांवर तिच्या परीक्षा नसतातच . ती फक्त बघत असते की गडी किती पाण्यात आहे ? आणि एक नेहमी लक्षात ठेवायचे की नर्मदे काठी आपण नेहमी काठावर पास व्हायचे ! याचा अर्थ काहीही होऊ दे परंतु तिचा काठ , तिचा किनारा ,तिचा ध्यास सोडायचा नाही !
दशान गावात  दशकन्येश्वर अथवा दसकन्येश्वर महादेवाचे मंदिर होते . मंदिर छोटेखानीच होते . आत मध्ये मोठा ,लहान ,अजून लहान , आणि अतिसूक्ष्म अशी महादेवाची शिवलिंगे होती ! यातील छोटे शिवलिंग तर फार छोटे होते . पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये लिमये वाडी या भागात असे एक भव्य शिवमंदिर बांधलेले दिसते . मंदिराचा आकार बघून मनुष्य आत मध्ये जातो तर आपल्या घरातल्या देवाऱ्यात पूजेमध्ये असते त्याहून छोटी शिवपिंडी तिथे ठेवलेली दिसते ! त्याची मला आठवण झाली ! मंदिराला लागूनच एक भव्य मशीद आणि मदरसा बांधलेला होता . या भृगु क्षेत्रामध्ये व्यापार उद्योग करून अनेक हिंदू व्यापारी सधन झाले .परंतु कोणालाही एखादी वेदपाठ शाळा , गोशाळा किंवा साधी शाळा तरी काढावी असे वाटले नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे . प्रश्न शिक्षण संस्थेचा नसून त्या शिक्षण संस्थेमधून तुम्हाला काय शिक्षण मिळते आहे आणि त्याचा परिसराला काय लाभ किंवा हानी होते आहे हा विषय आहे . या दृष्टीने भारतातील सर्व संस्थांचे एकदा कठोर परीक्षण झालेच पाहिजे . असो . .



श्री दसकन्येश्वर महादेव मंदिर दशान


श्री दशकन्येश्वर महादेव



चित्रामध्ये केशरी रंगाचा कळस दिसतो आहे ते महादेव मंदिर असून बाकी सर्व मदरसा आहे . 

पुढे वरवाडा नावाचे गाव होते . हे देखील मुस्लिम बहुल होते . कुकर वाडा गावाच्या अलीकडे जटेश्वर महादेवाचे अतिशय सुंदर मंदिर होते . एक दोन शेते पार केल्यावर एका छोट्या टेकाडावर मंदिर बांधले होते . स्थान अत्यंत रमणीय होते . वडपिंपळाची मोठी झाडे परिसरावर सावली धरून बसली होती .



नर्मदा मैया चे पात्र मी पार केलेले शेत परिक्रमेचा गावातला मार्ग आणि जटेश्वर महादेवाकडे येणारा जिना

कुटी वजा दिसणारे जटेश्वर महादेव मंदिर

श्री तुलसीदासजी नामक एका संतांची ही तपस्थळी आहे

श्री नंदिकेश्वर  ,कासव , श्री जटेश्वर महादेव ,नागदेवता आणि तुलसीदासजी बापू यांचा कोणीतरी काढलेला सुंदर असा फोटो


ओम श्री जटेश्वर महादेवाय नम:|
पुढे कुकरवाडा नावाचे गाव लागले . इथे नर्मदा मातेच्या अगदी काठावरच सुंदर पद्धतीने अष्टकोनाकृती बांधलेले पंचमुखी ऋणमोचन हनुमंताचे मंदिर होते . मंदिर फारच सुंदर होते . इथून भरूच चा नवा पूल दिसायला सुरुवात झाली होती . रात्री हा पूल खूप आकर्षक दिसतो असे मला लोकांनी सांगितले . 

पंचमुखी हनुमान मंदिर कुकरवाडा
मंदिराची सुंदर अष्टकोनी रचना
मंदिराचा आकर्षक कळस
ऋणमोचक पंचमुखी हनुमानजी कुकरवाडा
मंदिरातून रात्री होणारे भरूच च्या नव्या पुलाचे सुंदर दर्शन (सर्व चित्रे गूगल नकाशाच्या सौजन्याने )
पुढे चालत निघालो आणि लक्षात आले की आता अंधारू लागले आहे . भरूच शहरामध्ये खूप जास्ती तीर्थक्षेत्रे पाहण्यासारखी आहेत . चुकून वेगाने चालत पुढे गेल्यामुळे त्यातील एखादे पहायचे राहिले असे व्हायला नको म्हणून आता जो कुठला आश्रम येईल तिथे मुक्कामाविषयी विचारणा करायची असा विचार मनामध्ये करून चालत राहिलो . मध्ये आडव्या आलेल्या एका महत्त्वाकांक्षी अभियांत्रिकी प्रकल्पाने माझे लक्ष वेधले . मी मुंबई पुणे दृतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग या दोन्ही महामार्गांची कामे सुरू असताना पाहिलेली आहेत त्यामुळे इथे चालू असलेले काम हे त्याच्याही पेक्षा कैकपटीने मोठ्या प्रकल्पाचे सुरू आहे हे पाहता क्षणी माझ्या लक्षात आले आणि त्यामुळे मी अभियंत्यांची भेट घेतली . हा दिल्ली मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प सुरू होता . देशाची आर्थिक राजधानी आणि राजकीय राजधानी यांना जोडण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मोदी सरकारने सुरू केला आहे . आणि तो खुबीने गुजरातच्या सर्व महत्त्वाच्या शहरांजवळून नेला आहे . त्यामुळे गुजरातची सर्व महत्त्वाची शहरे आता केवळ काही तासात दिल्लीला किंवा मुंबईला संपर्क करू शकतात ! हा दहा पदरी अति दृतगती महामार्ग आहे . याच्या पुलाचे बांधकाम बांधून पूर्ण झाले होते व रस्त्याचे काम फार मोठ्या प्रमाणात चालू होते . सुरतला वळसा मारून हा मार्ग थेट मुंबईला जातो . याच्या लगेचच पुढे अजून एक महामार्ग बनवण्याचे काम सुरू आहे जो बडोदा मुंबई जोडणारा आहे . हे दोन्ही महामार्ग अक्षरशः हाकेच्या अंतरावर समांतर आहेत .परंतु दिल्लीला जाणारा अति द्रुतगती महामार्ग बडोदा , सुरत किंवा अन्य कुठल्याही शहरात जात नसल्यामुळे शहरांना जोडत जाणारा दुसरा एक महामार्ग बनण्याचे काम सरकारने हाती घेतलेले असून हा मात्र सहा पदरी आहे . त्याच्या थोडेसेच पुढे गेल्यावर बुलेट ट्रेनसाठी पूल बनवण्याचे काम सुरू होते ! पायी चालताना केवळ काही किलोमीटरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची अशी भव्य दिव्य कामे चाललेली पाहून अभिमान देखील वाटला परंतु त्याचबरोबर नर्मदा मातेचा केवळ एक पाण्याचा स्त्रोत म्हणून विचार न करता तिचे पारंपारिक मूल्य लक्षात घेऊन तिच्या सौंदर्यामध्ये आणि पावित्र्यामध्ये कुठलीही बाधा येणार नाही अशा पद्धतीचा शाश्वत विकास किंबहुना शाश्वत भारतीय पद्धतीचा विकास जर करता आला तर ते अधिक चांगले ठरेल असे राहून राहून वाटते . या सर्व प्रकल्पातील कामगारांचे लेबर कॅम्प मैयाच्या काठावरच होते आणि त्यांच्याकडून मैया चा वापर सर्रासपणे पाण्याचा स्त्रोत म्हणून केला जात होता . 
दिल्ली मुंबई आर्थिक पट्टा अर्थात दिल्ली मुंबई इकॉनोमिकल कॉरिडॉर चा दहा पदरी अति द्रुतगती महामार्ग
कुकर वाडा गावातूनच जाणारा दिल्ली मुंबई अतिदृतगति महामार्ग व लगेच त्यानंतर दिसणारा पूल म्हणजे बडोदा मुंबई महामार्ग आहे . वरती कुकर वाडा गावात सुंदर असा चौक बनविण्यात आला आहे .
चौकातून कुठे कुठे जाता येते ते दाखवणारी पाटी . फक्त बडोद्याकडे असे न वाचता दिल्लीकडे असे वाचावे . खाली ऋणमोचन हनुमानजी दिसत आहे .
विकास जोपर्यंत होत असतो तोपर्यंत तो खूप भकास दिसत असतो . चालता चालता माझे विकास या विषयावर गंभीर चिंतन नेहमीप्रमाणे सुरू झाले . विकास ही संकल्पना किती सापेक्ष आहे विचार करून पहा ना ! एखाद्या जागेवरील झाडी साफ करून तिथे मस्तपैकी समतोल जमीन करून त्यावर एखादी टोलेजंग इमारत उभी करणे हा मनुष्य प्राण्याला विकास वाटत असेल . तर एखाद्या वाळवंटाचे घनदाट अरण्या मध्ये रूपांतर होऊन तिथे मोठ्या प्रमाणात गवत खाणारे प्राणी गोळा होऊन त्यांची संख्या वाढणे हा वाघाच्या दृष्टीने विकास असतो . आपण अधिक विकसित झालो असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण तुलना करण्यासाठी कोणाशी तुलना करत आहोत हे पाहणे फार महत्त्वाचे असते . विशेषतः भारतासारख्या खंडप्राय देशांमध्ये अक्षरशः एक एक खेडे पूर्वीच्या काळात स्वयंपूर्ण होते . मात्र सध्याच्या काळामध्ये विकासाची अशी मोठी केंद्रे किंवा कॉरिडॉर उभे करून तिथेच सर्व विकास घडवून आणणे व बाकीच्या लोकांना तिथे विकासासाठी यायला लावणे , भाग पाडणे याला खरोखरीच विकास म्हणता येईल का याचा गांभीर्याने विचार प्रत्येकाने करून पहावा . अनेक पाश्चिमात्य देशांनी या प्रकारे विकासाचे प्रारूप विकसित केलेले असेल देखील. परंतु ते अजून पूर्णपणे यशस्वी मानले गेले आहे का ? किंवा त्यांच्यापुढे असलेल्या समस्या कुठल्या आहेत ?त्यांच्या देशातील लोकसंख्या किती  ? त्यांच्या देशातील सांस्कृतिक वातावरण कसे आहे आणि त्यांच्या देशातील कौटुंबिक वातावरण कसे आहे ? या सर्व गोष्टींचा विचार आपण या आधुनिक विकास संकल्पनेचे अंधानूकरण करताना केलेला आहे काय ?असा प्रश्न निश्चितपणे विचारावयास वाव शिल्लक राहतो इतके कच्चे दुवे सहजपणे आपल्याला या विकासाच्या प्रारूपामध्ये आढळतात .

विकास! शब्द ऐकायला खूप छान वाटतो. एखादी मिटलेली कळी असेल, ती उमलणे याला विकास म्हणतात.

एखादे लहान मुल असेल, ज्याला काहीच येत नाही आणि काही वर्षे कठोर मेहनत केल्यावर त्याला आता बऱ्याच गोष्टी येऊ लागल्या तर त्याला विकास म्हणता येते. थोडक्यात आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे जाण्याची क्रिया  अशी आपण विकासाची व्याख्या करू शकतो.

 आता आपण विकासाच्या नावाखाली केलेल्या काही गंभीर चुका पाहुयात.

 हरितक्रांतीच्या नावाखाली आपण देशी सकस बियाणे नष्ट केले आणि संकरित बियाण्याचा मार्ग पत्करला .साधे गणित आपल्या लक्षात आले नाही की जे बियाणे दरवर्षी विकत घेऊन लावावे लागते ते सर्वोत्तम कसे असू शकेल? जे बीज आपल्यासारखे दुसरे बीज निर्माण करू शकत नाही त्या बीजामध्ये तुम्हाला देण्यासाठी विकासतत्वे असतील काय? तेच उदाहरण दुधाचे देखील आहे .धवलक्रांती नावाचा एक निव्वळ बाष्कळपणा आपल्या देशाने मध्यंतरी पत्करला.तमिळनाडूमध्ये तर ही समस्या मी जवळून पाहिली. तिथे देशी प्रजातीची एकही  गाय आता शिल्लक राहिलेली नाही. सर्व गाईंमध्ये संकर करण्यात आलेला आहे. उशिरा आपल्या लक्षात आले की या संकरित गाई दूध जरी जास्त देत असल्या तरी त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता कमी आहे. तसेच त्या दुधाचा कस देखील कमी आहे .शिवाय या गाईंचे बैल शेतीच्या कामाला उपयोगाचे नाहीत. आत्तासुद्धा आपण विकासाच्या नावाखाली 5g नेटवर्क जगात सर्वप्रथम कसे विस्तारता येईल हे पाहत आहोत. परंतु खरोखरीच मला सांगा, की शाळेत शिकणारा विद्यार्थी किंवा महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 5g गतीने चालणाऱ्या डेटा ची गरज आहे का? केवळ महत्त्वाची शासकीय आस्थापने किंवा संशोधन संस्था किंवा लष्कराला 5g गतीने इंटरनेट आपण देऊ शकतो. परंतु सरसकट सर्व देशाला 5g चे प्रचंड हानिकारक मायक्रोवेव्हस दिवस रात्र सोडणारे अँटीने देऊन आपण पक्षी जीवन, कीटक जीवन, तसेच मनुष्याच्या शांततामय जीवनातील स्वास्थ्य हरवून टाकत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही. कारण आपण या प्रकाराला विकास म्हणून स्वीकारलेले आहे.असे प्रत्येकच क्षेत्रामध्ये आपण विकासाचे पाश्चात्य धारजेने प्रारूप स्वीकारलेले आहे परंतु आज ते देश देखील छातीठोकपणे सांगू शकत नाहीत की आमचे हे विकासाचे मॉडेल यशस्वी आहे. उलट बहुतांश देशांमध्ये लोक भारतीय वैदिक परंपरेप्रमाणे छोटी छोटी नगरे निर्माण करून राहण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातील आनंद उपभोगत आहेत. अर्थात या क्षेत्रात काहीच काम सुरू नाही असे नाही. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या परिक्रमावासी स्मिता कुलकर्णी यांच्याकडून मला डॉक्टर डांगे या नंदुरबार जिल्ह्यातील एका व्यक्तीबद्दल कळाले जे योजक नावाची संस्था चालवून शाश्वत भारतीय पद्धतीचा विकास कसा असावा याचा प्रचार प्रसार आणि विस्तार करत आहेत. अशाच पद्धतीने कार्य करणारे अनेक लोक संपूर्ण देशामध्ये पसरलेले आहेत परंतु दुर्दैवाने त्यांची संख्या कमी आहे आणि ते एकमेकांच्या फारसे संपर्कात नाहीत कारण त्यांनी विकासाचे नवीन प्रारूप नाकारलेले आहे. आपल्या सर्वांच्या परिचयाचा झालेला दिनेश पावरा याचे देखील उत्तम उदाहरण इथे तुम्हाला मी सांगू शकतो.आपल्या कुटुंबाचा विकास व्हावा अशी प्रामाणिक इच्छा मनामध्ये धरून जेव्हा तो मातृवियोगानंतर नोकरीच्या शोधासाठी पुण्यामध्ये आला तेव्हा पुण्याचे भयानक दृश्य पाहून तो नखशिखांत हादरला होता. त्याने मला जे प्रश्न विचारले त्यामुळे मी खरोखरच अंतर्मुख झालो. इतकी गर्दी ,इतके ट्राफिक जाम ,इतके प्रदूषण ,इतके जलप्रदूषण, इतका गोंगाट, इतके अनारोग्य ह्या सर्वांना एकत्रितपणे विकास कसे काय म्हणता येईल?त्यावर आम्ही बसून जी व्यापक चर्चा केली त्यातूनच त्याने पुन्हा आपल्या गावी जाऊन काहीतरी व्यापक,सर्व समावेशक,व भारतीय संस्कृतीला सुसंगत असे शाश्वत विकासाचे कार्य उभे करावे असे आमचे ठरले. पुनर्वनीकरण प्रकल्प ही त्याचीच फलनिष्पत्ती होय. असो एकंदरीत आताच्या काळामध्ये ज्या गोष्टीचा अभिमानाने उल्लेख गडकरी साहेबांसारखे लोक वेळोवेळी करतात त्या आकड्यांच्या खेळाचा मला फारसा आनंद होत नाही याचे कारण हेच आहे की मला एवढे मोठे काम करणाऱ्या गडकरी साहेबांबद्दल आदर व प्रेम आहेच परंतु जेव्हा ते भोवळ येऊन पडतात तेव्हा अधिक काळजी वाटते कारण त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हे विकासाचे लक्षण खचितच नाही. विकास हा कमळाच्या फुलासारखा असावा. त्याची एकच पाकळी कधी उमलत नाही .तर सर्व पाकळ्या हळूहळू, एकाच गतीने ,एकाच वेळी आणि एकमेकांशी सुसंगत अशा उमलतात.

हे सर्व महामार्ग पाहिल्यावर आणि त्यावरून वेगाने जाणाऱ्या गाड्या पाहिल्यावर मनात एकच प्रश्न निर्माण होतो की हे सर्व लोक कुठे चालले आहेत? आणि कशासाठी चालले आहेत ?सतत कुठेतरी जावे लागणे आणि त्यासाठी गाड्या, इंधन व रस्ते उपलब्ध असणे हा विकास आहे ?का कुठेही जायची गरजच न उरणे हा विकास आहे? काल माझ्यावरती शंभर लोक अवलंबून होते आणि आज माझ्यावरती एक कोटी लोक अवलंबून आहेत हा विकास आहे? का काल माझ्यावरती शंभर लोक अवलंबून होते आणि आज पासून माझी गरज कोणालाही लागणार नाही हा विकास म्हणावा?

आपण करत असलेल्या तथाकथित विकासाचे मूल्य कोणी ना कोणी फेडत असते .बहुतांश वेळा हे मूल्य निसर्गाला फेडावे लागते. कारण तो या सर्व भकास विकासाचा मूक साक्षीदार असतो .परंतु निसर्गाचे खाते मोठे विचित्र आहे. तो जेव्हा परतफेड करतो तेव्हा व्याजासकट करतो .केदारनाथ चा प्रलय झाल्या झाल्या तिथे पहिले हेलिपॅड झाले होते तेव्हा मी जाऊन आलेलो आहे. तेव्हा तिथे अक्षरशः तंबूंचे बांधकाम सुद्धा पूर्ण झालेले नव्हते अशा वेळी मी गेलेलो असल्यामुळे केदारनाथच्या प्रलयाचा अतिशय भयानक नजारा मला पाहायला मिळाला होता. सुदैवाने या घटनेतून वाचलेला एक चहावाला मला भेटला ज्याने संपूर्ण प्रसंग जसा घडला तसा मला सांगितला आणि माझी विकासदृष्टीच त्या घटनेने बदलून टाकली.निसर्गाने ठरवले तर तो तुमच्या तथाकथित विकासाचा क्षणात कसा चुराडा करू शकतो याचे ते उत्कृष्ट उदाहरण होते. या संपूर्ण प्रलयातून वाचलेली एकमेव वास्तू म्हणजे केदारनाथाचे मंदिर होते कारण त्या मंदिरामध्ये वैदिक परंपरेनुसार आजही सर्व विधी चालू आहेत. त्यामुळे आश्चर्यकारकरीत्या निसर्गानेच त्या मंदिराला वाचविले. भीम शिळे ने तिथे येऊन पडणे ही काही सर्वसामान्य घटना नाही.

निसर्गाच्या प्रकोपाचा दुसरा जवळून घेतलेला अनुभव म्हणजे माळीण या पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील घडलेल्या प्रसिद्ध भूस्खलनाची घटना होय.ही घटना घडल्या बरोबर मदत कार्यासाठी जी काही मोजकी मंडळी तिथे उपस्थित होती त्यामध्ये उपस्थित राहण्याचे विचित्र प्राक्तन  मला प्राप्त झाले होते.जेसीबीचा अनैसर्गिक व अनिर्बंध वापर करून शेतांची रुंदी वाढविण्याचा प्रयोग या संपूर्ण गावाच्या अंगाशी आला. रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे डोंगरामध्ये नैसर्गिकरित्या पाणी साठवण्याची जी क्षमता असते तिचा कडेलोट झाला आणि अक्षरशः एका कडाच गावावरती वाहून आला. गोड साखर झोपेमध्ये असलेले अख्खे गावच या भूस्खलनामध्ये भूमी मग्न झाले. मी स्वतः या दुर्दैवी हातांनी असंख्य प्रेतांना मंत्राग्नी दिलेला आहे. 





२०१४ च्या माळीण भूस्खलन दुर्घटनेनंतर प्रेतांना मंत्राग्नी देताना. प्रस्तुत लेखक लाल बाणाने दाखवला आहे. इतक्या जवळून विकासाची “फळे” पाहिलेली असल्यामुळे पोटतिडकीने सर्वांना हा विषय सांगावासा वाटतो.


कुठल्याही अंत्येष्टीच्या प्रसंगी उपस्थित राहणे हे जरी मी एक व्रत म्हणून पाळत आलो असलो तरी त्या दिवशी एकाच वेळी नऊ प्रेतांना आणि एका दिवसात बहात्तर प्रेतांना स्व हस्ते दिलेला अग्नी, हा विकास या विषयावरील माझ्या चिंतनाला खूपच दाहक बनवून गेला. कदाचित बंद खोलीमध्ये बसून तुम्हाला त्या अनिर्बंध  अंध विकासाचा कुबट वास येणार नाही.

चिखलाप्रमाणे सडलेली मानवी प्रेते ढिगाऱ्यातून बाहेर काढताना त्यांचा तो सडलेला भयानक उग्र वास अजूनही नाकातून गेलेला नाही. कोरडी लाकडेच उपलब्ध नसल्यामुळे अक्षरशः गाड्यांचे टायर सारणासाठी वापरून,एका एका चितेमध्ये नऊ दहा देह ठेवून त्यांना अग्नी द्यावा लागला होता. या सर्व ग्रामस्थांना विकास म्हणजे काय ते माहितीच नव्हते. कोणीतरी त्या आदिवासी ग्रामस्थांना अजस्त्र यंत्राच्या रूपाने विकासाचे स्वप्न दाखवले होते. परंतु तो विकास किती जीव घेणा ठरेल याची कल्पना कोणालाच नव्हती. हे सर्व मी सांगतो आहे कारण विकास या विषयावरचे माझे चिंतन इतके तळमळीचे का आहे हे आपल्याला कळावे,व तितक्याच तळमळीने आपणही या विषयाचे गांभीर्याने अनुशीलन करावे अशी माझी कळकळीची विनंती आहे. बहुत काय लिहिणे , आपण सूज्ञ असा .मध्ये एकाने मला अतिशय थंडगार असे पाणी पाजले . त्याने थोडासा शांत झालो .
विचार करता करता मी कधी त्रिगुणातीत ध्यान आश्रमात पोहोचलो मलाच कळले नाही .आश्रमाचा परिसर अतिशय सुंदर होता . सर्वत्र झाडी होती . आज प्रवेश केल्याबरोबर उजव्या हाताला महादेवाचे मंदिर होते . त्याच्या पलीकडे शेड होती ज्यात एक लाल रंगाची स्विफ्ट गाडी लावलेली होती . समोर भोजन शाळा होती . स्वामी लोकेशानंद एक अध्यात्मिक गुरु हा आश्रम चालवितात . आश्रमाचे वातावरण मला खूप आवडले . कुठे जा किंवा जाऊ नको असे कोणी सांगत नव्हते . मुक्त प्रवेश होता . इथे एक ऋषी नावाचा तीन वर्षांचा अतिशय हुशार ,चुणचुणित व गोड मुलगा होता . त्याची माझी चांगली गट्टी जमली ! मी आजही भोजन घ्यायचे नाही असे ठरवले . आश्रमात आलेल्या भक्तांना मी भोजन प्रसाद वाढला .
त्रिगुणातीत ध्यान आश्रम
आश्रमाचा सुंदर परिसर
आश्रमातील यज्ञकुंड व भोजन शाळा
आश्रमातील महादेव
आश्रमाचे अध्वर्यू लोकेशानंद महाराज
सुंदर परिसर
भक्तांसोबत कर्मकांडामध्ये रममाण झालेले महाराज
असा हा श्री त्रिगुणातीत ध्यान सेवा आश्रम कुकडवाडा !
 रात्री खूप जास्त मच्छर असल्यामुळे दोन-तीन जागा बदलत अखेरीस मंदिराच्या शेजारी असलेल्या पार्किंग वजा सभागृहात मोठ्या पंख्याखाली मच्छरदाणी लावून झोपलो .  उद्याचा दिवस देवदर्शनांचा होता ! परंतु ज्याला देव दिसतात त्यालाच दानव देखील दिसतात ! जो देव मानतो त्याने दानव मानलेच पाहिजेत ! भृृगुक्षेत्राचे भरूच कसे झाले ते पुढच्या लेखात पाहूयात . नर्मदे हर !





लेखांक एकशे चौदा समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. अप्रतिम! आध्यात्मिक, भौगोलिक, टेक्निकल, मनोरंजन यांचा सुरेख मेळ साधलाय तुमच्या सगळ्या लेखातून. माईवरची असीम भक्ती आणि श्रद्धा आहेच. सध्याची वनीकरणाची तुमची धडपड बघून तुम्हाला साष्टांग दंडवत घालावासा वाटतोय. परिक्रमा जगलात तुम्ही! नर्मदे हर

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर