लेखांक १०९ : अंकलेश्वरच्या रामकुंड तीर्थावर माझ्या मैय्याला प्राप्त झाले सगुण स्वरूप !

 अंकलेश्वर हे एक मोठे शहर आहे . गुजरात राज्यामध्ये असल्यामुळे रस्ते उड्डाणपूल पदपथ वगैरे चांगला विकास झालेला दिसतो . भरूच ला जोडणारा सरदार पुल ओलांडल्यावर जुना कांसिया मार्गे मैयाच्या काठाने चालत आल्यामुळे आमचे बरेच अंतर वाचले . झगडिया वरून येणारे परिक्रमावासी शक्यतो मोटा सांजा , उचेडिया ,गुमानदेव ,मूलदमांडवा ,नवगवा - नवागाम , सामोर , अंदाडा, गडखोल, झरकुंड या सडक मार्गे अंकलेश्वरला येतात . आम्ही मात्र मढी ,उचेडिया , गुवाली ,जुना कांसिया मार्गे अंकलेश्वर गाठले . अंकलेश्वर शहरांमध्ये अंतरनाथ किंवा अक्रूरेश्वर महादेवाचे मंदिर आहे . परंतु मंदिर कुठे आहे हे गावातल्या कुणालाही विचारल्यावर सांगता आले नाही . धर्माशी थोडेसे एक हात अंतर ठेवून राहणारा सुशिक्षित वर्ग येथे जास्त आढळला . गावाच्या बाहेर पडताना देवखात भागामध्ये रामकुंड आहे जिथे सर्व परिक्रमावासी मुक्कामाला येतात . या रामकुंडाचे वैशिष्ट्य असे आहे की इथे साक्षात प्रभू रामचंद्रांनी नर्मदा माता इथून वाहत असताना येथे स्नान केले होते . आता त्रिभुज प्रदेश थोडासा लांब म्हणजे तीन किलोमीटर दूर गेलेला आहे . त्याचबरोबर मांडव्य ऋषींना देवराज नावाच्या येथील राजाने सुळावर चढवले होते ती जागा देखील इथेच आहे ! त्याची कथा मोठी रंजक आहे . देवराज या धार्मिक राजाला कुमुदिनी नावाची मुलगी होती .तिच्या सौंदर्यावर भाळून एका राक्षसाने तिला आकाश मार्गाने पळवून नेले . जाता जाता आपले दागिने तिने मांडव्य ऋषींच्या तपोभूमीवर टाकले . तपोमग्न ऋषींना राजाचे सैनिक पकडून घेऊन आले . अविचाराने अधिक चौकशी न करता राजाने मांडव्य ऋषींना सुळावर चढवले .ही वार्ता करताच सर्व ऋषीवर्ग सप्तर्षीं सह इथे गोळा झाला .परंतु मांडव्य ऋषींनी त्यांना सांगितले की हा माझा कर्मभोग आहे . मला भोगू देत .त्याच रात्री एक शाण्डिली नावाची  पतीव्रता स्त्री आपल्या पती देवांचे कोड दूर करण्याकरता त्यांना नर्मदे काठी घेऊन निघाली होती . अंधारात तिचा ऋषींच्या पायाला धक्का लागला आणि ऋषी कळवळले . त्यांचा आवाज ऐकून सप्त ऋषींनी अंधारातच शाप दिला की ज्यांनी कुणी मांडव्य ऋषीं ना धक्का मारला असेल ते उद्या सूर्योदया बरोबर मरून जातील . परंतु पतिव्रतेच्या सत्वा मुळे सहा महिने सूर्य उगवलाच नाही . अखेर सर्व देव , ऋषी तिला शरण गेले आणि मग सूर्योदय झाला .त्याबरोबर तिचा कोड आलेला पती नष्ट होऊन तिथे एक दिव्य पुरुष प्रकट झाला . हे सर्व याच ठिकाणी घडलेले आहेत अशी पुराणांमध्ये नोंद आहे . 
रावणाचा पुतण्या अक्रूर देखील इथेच येऊन पश्चाताप झालेल्या अवस्थेत महादेवाची आराधना करून मुक्त झाला . त्याने स्थापन केलेला महादेव म्हणजे अक्रूरेश्वर तोही जवळच आहे . अंकलेश्वर हे नाव त्यावरूनच पडले आहे . रामकुंड हे नाव ऐकल्यावर अतिशय सुंदर अशा एका कुंडाची कल्पना माझ्या मनात निर्माण झाली होती . परंतु प्रत्यक्षात हे कुंड अतिशय घाणेरड्या पाण्याने भरलेले आहे . इथल्या पाण्याचा उपसा नीट होत नाही . तसेच कुंडाची दगडी भिंत एका बाजूने खचत चालली आहे .तिला गेलेले मोठे तडे लगेच नजरेत भरतात . पाणी इतके शेवाळलेले आणि हिरवेगार आहे की स्पर्श देखील करावासा वाटत नाही .मी इथे गेलो तेव्हा शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानावर मोठ्या प्रमाणात राम कथा चालू होती .कारण चैत्री नवरात्राचा तो पहिला दिवस होता . मोठा मांडव घालण्यात आला होता . इथे एक मोठी गोशाळा आहे आणि त्याच्या वरती परिक्रमावासींची राहण्याची सोय केलेली आहे . जिन्याने वरती जाऊन आसन लावले . इथे एक असा अनुभव आला की भोजन प्रसाद तयार झालेला असूनही परिक्रमावासींना बोलवायला कोणी आलेच नाही . त्यामुळे तिथे चहा भोजन प्रसाद काहीही न घेता मी राम कथेला जाऊन बसलो . गोपाळदास महाराजांचे भोजन नाकारल्याची मैय्याने चांगलीच शिक्षा दिली !मांडवा मध्ये जाऊन उपाशीपोटी राम कथा ऐकायला बसलो . संगीतमय राम कथा झाली . सगुण उपासनेचे महत्त्व कथाकार सांगत होते . मी मैयाची आरती करायला बसलो . आणि मला अचानक असे वाटू लागले की आपण इतके दिवस फक्त पाण्याची बाटली घेऊन तिची पूजा करत आहोत . आपण आपल्या नर्मदा मातेला थोडेसे सगुण स्वरूप का देऊ नये ? आणि त्यामुळे माझ्या मनात असे आले की आता संधी मिळेल तेव्हा आपण नर्मदा मातेचा थोडाफार शृंगार करूया . असा विचार करून मी खाली आलो आणि भागवताच्या मांडवाच्या बाहेर लागलेले दुकानांचे स्टॉल पाहू लागलो . इथे एक तरुण मुलगी लड्डू गोपाल अर्थात बाळकृष्णाचे दागिने आणि वस्त्रे वगैरे विकत होती ! तो स्टॉल पाहताच मला आनंद झाला ! जोगी मीरा असे तिच्या दुकानाचे नाव होते . आणि या तरुण मुलीचे नाव होते मीरा गुप्ता किंवा नेहा . मी तिला मैया ला सजवण्याविषयी सांगितले . तिने मला नर्मदा माता घेऊन खाली येण्यास सांगितले . मी माझी बाटली तिच्यासमोर ठेवली . तिने तिच्याकडे असलेले सर्वोत्तम कपडे शोधून काढले आणि नर्मदा मातेला सजवले ! केसांना जावळ लावले ! डोक्यावर फेटा घातला ! बघता बघता बाटलीचे स्वरूप बदलले आणि एका बालिकेचे स्वरूप निर्माण झाले ! फक्त या बालिकेला चेहरा नव्हता . तिने मला एक प्रकारचे मेण दिले . आणि त्या मेणाने दागिने चिकटवायला सांगितले . मी असा विचार केला की त्या मेणाचा किंवा एमसीलचा चेहरा तयार करावा . परंतु त्या मेणाशिवाय सुद्धा किंवा चेहऱ्याशिवाय सुद्धा माझ्या नर्मदा मातेला एक स्वरूप प्राप्त झाले होते ! त्या मुलीने आनंदाने नर्मदा मातेचे भरपूर फोटो काढले ! आणि माझ्याकडून काही केल्या पैसे घेण्यास नकार दिला व अखेरीस म्हणाली मला फक्त अकरा रुपये द्या. मी माझ्याजवळ असलेले १०२ रुपये तिला दिले आणि एक सुंदर असे शिवलिंग सुद्धा दिले .ही मुलगी दिल्लीची होती . आणि जिथे जिथे भागवत कथा ,राम कथा ,अन्य सत्संग चालू असतात अशा ठिकाणी जाऊन भगवान श्रीकृष्णाचे कपडे विकायची ! मी काही दिवसांपूर्वी कांदरोज जवळ चोरिया डेडा या ठिकाणी सजवलेली देवी पाहिल्यावर मला नर्मदा मातेला सजवण्याची इच्छा झाली होती ! ती अशा रीतीने मैयाने लवकरच पूर्ण केली ! त्या मुलीने सजविलेल्या नर्मदा मातेचे फोटो काढून घेतले . आणि एक फोटो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
सजविलेल्या मैयाचे त्याच रात्री त्या मुलीने काढलेले छायाचित्र ! मागे भागवताचा मांडव दिसतो आहे . 
Appy fizz या पेया च्या छोट्या बाटलीमध्ये मी मैया ठेवायचो . तिच्या झाकणावरच डोके समजून शृंगार केलेला आहे ! मला तिचे हे नवीन रूप पाहून आतोनात आनंद झाला !
यापूर्वीचे ९० दिवस मी नर्मदा मातेची पूजा अशी थेट शिशीमध्ये अर्थात बाटलीमध्येच करायचो . 
आजच्या दिवसापूर्वीची माझी पूजा अशी असायची

माझ्या पूजेमध्ये दिसणाऱ्या काही गोष्टी म्हणजे मैयाचे पवित्र जल असलेली बाटली तिची छोटीशी प्रतिमा ,लाल रंगाची विजेरी (बॅटरी टॉर्च) दंड आणि शेजारी ठेवलेली निळ्या रंगाची झोळी अथवा सॅक
ही बाटली पहा आणि आताची मैया पहा ! 
मैयाच्या या नव्या रूपामुळे मी भलताच खुश झालो होतो ! इथे अजून बरेच परिक्रमावासी उतरले होते ! रस्त्याने चालत येणारे सर्वजण इथेच एकत्र येतात . त्या सर्वांनी माझी मैया पाहिली ! 
हे संपूर्ण तीर्थक्षेत्र अत्यंत पवित्र होते . इथे अनेक साधुसंतांच्या समाधी होत्या . रामानंदी आखाड्याच्या ताब्यात हे मंदिर होते . त्यामुळे त्या परंपरेतील साधुसंतांच्या समाधी इथे होत्या . सहा शिव लिंगे होती . देवीचे काळभैरवाचे मंदिर होते आणि मुख्य म्हणजे रामदरबार होता . तसेच हसमुख मारुती देखील प्रसिद्ध होता . कुंड तर अति भव्य स्वरूपात समोर प्रकट होतेच . त्यामुळे इथे दिवसभर भाविकांची मोठी रीघ लागलेली असायची . श्री गंगा दास बापू नावाचे महंत गेली पंधरा वर्षे हा आश्रम सांभाळत आहेत . हे स्वभावाने थोडेसे कठोर वाटले . परिक्रमावासींशी फार बोलत नसत .याचे महत्त्वाचे कारण आपण समजून घेतले पाहिजे . आश्रम रस्त्यावर असल्यामुळे इथे रोज इतक्या मोठ्या प्रमाणात परिक्रमा वासी येतात की रोज सर्वांशी बोलायचे ठरवले तर यांना हातातली कामे टाकून द्यावी लागतील . मी आपले त्यांना जाऊन नमस्कार करून घेतला . भोजन प्रसाद तयार झाला होता परंतु कोणी बोलावले नव्हते . त्यामुळे देवदर्शन करत बाहेर आलेलो असताना राम कथेच्या ठिकाणी पुरी भाजीचा प्रसाद सुरू होता . तिथे कोणीतरी मला सन्मानाने घेऊन गेले आणि खाऊ पिऊ घातले . लाल रंगाचे कपडे घातलेले रामानंदी संप्रदायाचे साधू सर्वत्र फिरताना दिसत होते . सध्या अयोध्येचे राम मंदिर याच आखाड्याच्या ताब्यात आहे . परंतु या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेणारे एक छोटेसे वामन साधू तिथे होते . म्हणजे त्यांचा चेहरा नुसता पाहिला तर काही लक्षात येणार नाही परंतु आकार पाहिला तर एखाद्या पाच वर्षाच्या मुला एवढा त्यांचा आकार होता ! जाणारे येणारे सर्वच लोक त्यांना नमस्कार करायचे आणि ते देखील लगेच आशीर्वाद द्यायचे . त्यांचा आवाजही थोडासा लहान मुलासारखा होता . सर्वच गात्रांचा आकार लहान असल्यामुळे स्वरयंत्र देखील लहान राहते . मी सुद्धा त्यांना नमस्कार केला . त्यांनी मात्र माझी चांगली विचारपूस केली . 
आश्रमामध्ये अतिशय सुंदर अशी गोशाळा आहे . त्या गोशाळेमध्ये जाऊन मी बराच काळ रमलो . समुद्रसपाटीपासून जवळ असल्यामुळे की काय कोणास ठाऊक परंतु इथे पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्थित व्यवस्था नव्हती . त्यामुळे गोमूत्र तसेच एका गटारात साठले होते . आणि तिथे प्रचंड म्हणजे कल्पना करता येणार नाही इतक्या प्रचंड प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली होती .  तसे हे ठिकाण उंचावर आहे . याला सिद्धटेकडी असेच म्हणतात . परंतु रामकुंडाच्या पातळीला भूजल पातळी असल्यामुळे जल निस्सारण व्यवस्था उभी करणे कठीण आहे . या भागातील अतिशय वेगळे आणि महत्त्वाचे दर्शन म्हणजे ज्या सुळावर मांडव्य ऋषींना चढवले होते ते शूल येथे आजही आहेत . हे सर्व पाहिले . रामाच्या मूर्ती फार सुंदर आहेत . एकंदर परिसराला उत्सवाचे स्वरूप आल्यामुळे बाहेरचे भरपूर लोक मुक्कामासाठी आले होते . सर्वांचे आगत स्वागत करण्यात आश्रमाचे लोक व्यग्र होते . डासांनी उच्छाद मांडला होता . त्यामुळे राम कथेच्या पंडालमध्ये लावलेले प्रचंड मोठे कुलर पंखे लावून त्याच्यासमोर जाऊन बसलो . झोपण्यासाठी वरती गेलो तेव्हा अक्षरशः डासांचा कहर पाहून रडायची पाळी आली ! सर्वच परिक्रमावासी तळमळत होते इतके डास त्यांना चावत होते . मी मच्छरदाणी उघडली आणि त्यात जाऊन झोपलो . ही मच्छरदाणी कशी वापरायची याचा अजून अंदाज मला आलेला नव्हता . त्यामुळे आत जाईपर्यंत ५० ६० डास आत मध्ये आले . त्यांना मारण्यातच माझा वेळ जाऊ लागला . रात्रभर सर्वजण तळमळत राहिले . अखेरीस मी मच्छरदाणीतून बाहेर आलो आणि पुन्हा एकदा मांडवातील पंख्या पुढे जाऊन झोपलो . तिथे वाऱ्यामुळे डास चावू शकत नाहीत हे लक्षात आल्यावर मी आत येऊन सर्व परिक्रमावशींना तसे करण्यास सांगितले . दहा-बारा जण माझ्यासोबत आले आणि मांडवामध्ये सर्वजण झोपलो . एकंदर त्या रात्री झोपेचे खोबरेच झाले . गुजरात मध्ये जेवढे डास पाहिले तेवढे उभ्या आयुष्यात कुठेच नाही पाहिले !  असो सध्या आपण आश्रम परिसराचे दर्शन घेऊयात .
श्री रामकुंड . हे अजून थोडे स्वच्छ ठेवता येईल . डावीकडे वरच्या कोपऱ्यात खचलेली भिंत दिसत आहे .
रामकुंड आश्रमाची गोशाळा
गोशाळेमध्ये जातीने लक्ष घालणारे गंगा दास बापू महंत
गोसेवा कशी केली जाते यावरून साधारण आश्रमाच्या महंतांची आपसुकच परीक्षा होते
रामकुंड तीर्थधामाचे महंत गंगादास बापू गेली पंधरा वर्षे हा आश्रम सांभाळत आहेत . 
गोशाळा बाहेरून अशी दिसते
आश्रमातील रामरायाचे मंदिर
आश्रमातील राममूर्ती सुंदर आहेत
चैत्र नवरात्र अर्थात रामरायाच्या नवरात्राचा पहिला दिवस असल्यामुळे मी गेलो त्या दिवशी मूर्तींचा विशेष शृंगार केलेला होता व मूर्ती फारच उठावदार दिसत होत्या . वरील सर्व चित्रे संग्रहित आहेत याची कृपया नोंद घ्यावी .
रामकुंड अतिशय मोठे असून त्याच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात रामकथा मांडवामध्ये सुरू होती . आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे .
लाल वस्त्रे परिधान केलेल्या रामानंदी साधूंची लगबग परिसरात सुरू असते .वरती जाणारा जिना भक्त निवास कडे जात असून डावीकडे च्या गुलाबी इमारतीमध्ये वरच्या बाजूला परिक्रमावासींच्या निवासाचा हॉल किंवा सभागृह आहे .
रामकुंडाचा परिसर मोठाच आहे . परंतु ते लवकर दुरुस्त केले नाही तर मोठी पडझड होण्याची शक्यता आहे .
आश्रमामध्ये रामानंदी संप्रदायातील अनेक त्यागी महात्म्यांच्या समाधी आहेत
त्यागी महाराज
श्री मांडव्येश्वर महादेव
 मांडव्य ऋषींना सुळावर दिले ती जागा आणि प्राचीन मंदिरांचे अवशेष
या सूळा चा इतिहास आपण वरती पाहिलाच
देवीची सुंदर मूर्ती
शेजारीच क्षिप्रा गणपती मंदिर आहे
हेच ते वामनमूर्ती साधू . त्यांच्या हातातील माळेचे मणी मोठे नसून स्वतः महाराजांचीच मूर्ती लहान आहे . 
साधूंचे दर्शन घेताना एक परिक्रमा वासी (संग्रहित छायाचित्र सौजन्य युट्युब )
हे महाराज चांगलेच लक्षात राहिले . बाकी बोलताना मात्र हे संपूर्ण ब्रह्मज्ञान बोलत होते . उंचीने , आकाराने ,प्रकृतीने ,तब्येतीने , रंगाने , वर्णाने ,जातीने , वयाने ,पदाने , सांपत्तिक परिस्थितीने परब्रह्माच्या आकलनामध्ये कुठलीही अडकाठी येऊ शकत नाही हेच खरे !
सकाळी लवकरच निघालो . महामार्गावरून चालणे भाग होते . मैय्याचा त्रिभुज प्रदेश इथून पुढे इतका विस्तारात गेलेला आहे की पाऊल ठेवायला सुद्धा जागा मिळत नाही . पुढे रुद्र कुंड नावाची जागा होती .माझ्या डोक्यामध्ये कुठे एमसील मिळते का ते पाहावे असे चालू होते .म्हणजे मग मी सजवलेल्या नर्मदा माईला छोटासा चेहरा करून लावता आला असता असा माझा भोळा भाव होता .परंतु काही केल्या दुकानच दिसेना . इतक्यात रस्त्याच्या कडेला अगदी कचरापेटी म्हणले तरी चालेल अशा प्रकारे साचलेल्या केरामध्ये मला एका बाहुलीचे छोटेसे मुंडके दिसले .पहिल्या क्षणी मला ते आवडले ! मला असे वाटले की आपल्या नर्मदा मातेला हा चेहरा किती छान दिसेल ! तिचे केस लाल होते . परंतु दुसरे मन सांगू लागले की अरे मुर्खा हे रस्त्याच्या कडेला पडलेले घाणीतले मुंडके काय उचलतोस ! तू रोज जी ची पूजा करणार ती मूर्ती अशी कचऱ्यापासून बनवणार काय ? चल निघ पुढे ! आणि मी बिचारा माझ्याकडे अगतिकतेने पाहणाऱ्या चेहऱ्याला नमस्कार करत पुढे निघून गेलो . पुढे काही लोकांनी मला इकडून रस्ता नाही तिकडे जा म्हणून सांगितले . त्या चौकातल्या लोकांनी असे नाही तसे जा म्हणून सांगितले . भटकता भटकता १५ मिनिटात माझ्या असे लक्षात आले की मी पुरता मार्ग चुकलेला आहे . हा संपूर्ण वेळ माझ्या डोक्यात ते छोटेसे डोके पिंगा घालत होते . मला असे फार वाटू लागले की आपण पुन्हा जावे आणि ते डोके उचलून घ्यावे . किमान ते सोबत तरी ठेवावे . तो चेहरा जणू काही मला पुन्हा हाक मारतो आहे असा मला भास होत होता . असा विचार करत चालता चालता माझ्या असे लक्षात आले की मी पुन्हा फिरून त्याच चौकात आलेलो आहे ! समोर ते डोके अजूनही पडले होते आणि आता ते आनंदाने हसते आहे असे मला दिसले ! मी धावतच जाऊन ते डोके उचलले ! कमांडलूतील पाण्याने स्वच्छ धुतले . जणू काही माझ्याच साठी मैयाने तिथे ते ठेवले होते ! समोरच एका दुकानात फेविक्विक घेतले आणि डोके चिकटवून टाकले ! आता माझ्या मैय्याचे रुपडे एकदम पालटले !  ती इतकी सुंदर दिसू लागली की काय विचारता ! मी आनंदाने तिला घेऊन लहान मुलासारखा नाचतच पुढे निघालो ! आपणही तिचे हे रूप पहावे ! 
हेच ते बाहुलीचे डोके जे लावल्यावर माझ्या मैयाचे सगुण स्वरूप पूर्णपणे साकार झाले !
हे रूप इतके आकर्षक होते की मी तासनतास त्याकडे पाहत बसायचो ! मैया चा चेहरा अतिशय बोलका आहे . त्यावरील भाव सतत बदलत राहायचे ! आणि ते सर्वांना जाणवायचे !
मैया च्या जुन्या आणि नव्या रूपातील फरक तुम्हाला सुद्धा जाणवेल पहा !
हे नवीन रूप !
चेहऱ्यावरचे बदलणारे भाव तुम्हाला जाणवतात का पहा !
रत्नसागराच्या दिशेने वाटचाल करताना प्रत्येक पावलावर मैयाचे ते सगुण स्वरूप मला खुणावत असे . गळ्यातच लटकवलेल्या झोळीत मी तिला ठेवले होते . सारखे बाहेर काढून तिला पहायचो ! खूप आनंद मिळायचा ! आजही मिळतो ! मी तिचे किती लाड आणि कोड कौतुक केले असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकता ! माझी नर्मदा मैया ! आपल्या सर्वांची नर्मदा मैय्या ! ही सोबत असताना चिंता कशाची ! नर्मदे हर !

(टीप : मोबाईलची स्मृती अर्थात मेमरी फुल होत असल्यामुळे लिहिलेला सगळा लेख अचानक नष्ट होणे हा प्रकार अलीकडे खूप वेळा झालेला आहे .पुन्हा न कंटाळता शून्यापासून सर्व लेख लिहावा लागतो . त्यामुळे इथून पुढे लेखांचा आकार थोडासा लहान करत आहे . तरी कृपया समजून घेणे ही विनंती . तसेच शुद्धलेखनाच्या काही चुका राहिल्या असतील तर कमेंट मध्ये अवश्य सांगणे)





लेखांक एकशे नऊ समाप्त ( क्रमशः )

टिप्पण्या

  1. Ek numbar.mai sundar diste ahe.Telliya bhatyan ,siyaram babanchya ashrama pudhe dukane hoti tithe mala sundar vastre milali hoti,ti chan disaychi.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रकाशित करण्या पूर्वी तुम्ही मोबाईल वर लिहिण्या पेक्षा गुगल ड्राइव्ह वर लेख लिहा म्हणजे कायम व्यवस्थित राहील

    उत्तर द्याहटवा
  3. गुगल ड्राइव्ह वर मराठी टायपिंग करता येईल

    उत्तर द्याहटवा
  4. अत्यंत विलोभनीय दिसते मैय्या 🙏
    आई नर्मदे हर बाबाजी 🙏

    उत्तर द्याहटवा
  5. Google drive kinva Microsoft sharepoint var lihu shakta, auto save hoil. Khup Sundar lekh astat, vachakanchi manas parikrama shorten karu naka.

    उत्तर द्याहटवा
  6. लाल रंगाची वस्त्रे घातलेली वामन मूर्ती म्हणजे अयोध्येजवळच्या हनुमान गढीचे सूरदासजी महाराज असावेत. आता त्यांचे वय साधारण 11 असेल. खूप छान बोलतात. चालू घडामोडींविषयी सर्व माहिती असते त्यांना. खूप गोड व्यक्तीमत्व आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. सुंदर दिसती आहे मैय्या.नर्मदे हर 🙏🏻🙏🏻

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर