लेखांक १०८ : उचेडियाचा सर्पेश्वर , गुवाली पंचमुखी हनुमान अन् अंकलेश्वर

काही काळ किनाऱ्याने चाललो . आणि समोर गाळच गाळ सुरू झाला . अमावस्या असल्यामुळे उधाणाची भरती आलेली होती . पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी साधारण सूर्य चंद्र पृथ्वी एका रेषेत आलेले असतात . त्यामुळे चंद्र आणि सूर्य या दोघांच्या गुरुत्व बलाचा परिणाम पृथ्वीवर अधिक होतो आणि नेहमीपेक्षा मोठी भरती किंवा ओहोटी येते . आज तशी मोठी भरती आलेली होती . त्यामुळे चालायला फारच त्रास होऊ लागला . इथे पुढे कुठेही घाट किंवा मनुष्यवस्ती असल्याच्या खुणा नव्हत्या. तसेही झगडयामढी हा शेवटचा घाट आहे असे मला काही परिक्रमा वासींनी आधीच सांगितले होते . इथून पुढे नर्मदा मातेचे रूप बदलत जाते आणि नदीचे रूपांतर त्रिभुज प्रदेशात होते . हळूहळू तिचा विस्तार आडवा होत जातो . प्रचंड वाळू गाळ यांनी भरलेला एक अति प्रचंड भूभाग सुरू होतो . अजूनही हिला काही नद्या येऊन मिळत होत्या . त्यातली मधुमती नदी मी पार केली . प्रचंड गाळ असलेला तिचा संगम होता . 
डावीकडून येणारी मधुमती नावाची नदी आहे आणि उजवीकडे भव्य दिव्य नर्मदा माता आहे .चिखलामुळे चालणे कठीण होते .
हळूहळू चिखलगाळाचे प्रमाण फारच वाढले . याची पूर्वकल्पना मला जगदीश महाराजांनी दिलेली होती . समृद्ध पक्षी जीवन सांगत होते की इथे मानवी वावर शून्य आहे . विशेषतः सीगल पक्षी फारच मोठ्या प्रमाणात दिसत होते . जबलपूर मध्ये सुद्धा हे पक्षी दिसतात परंतु ते आकाराने छोटे होते .इथले सीगल फारच मोठे होते .
 ओये प्राजी की गल है ? सीगल है ! यांच्या पायातले पडदे यांना पोहायला मदत करतात . 
अखेरीस चालणे अशक्य होऊ लागल्यामुळे मी एक पातळी वर आलो . यापूर्वीचा चिखल हा वेगळा होता आणि इथला चिखल वेगळा होता . यापूर्वीचा चिखल हा शुद्ध चिखल असायचा . त्याचा पृष्ठभाग वाळला की त्यावरून चालता यायचे . हा चिखल वाळू मिश्रित होता . याच्यामध्ये पाय खूप खोल फसायचा . शिवाय प्रत्येक पावलाला जमिनीची पातळी खाली जात असल्यामुळे भूजल पातळी वाढत होती . समुद्राच्या अगदी जवळ आपण आलो आहोत याची ही खूण आहे . त्रिभुज प्रदेशांविषयी शाळेमध्ये खूप शिकलो होतो .परंतु प्रत्यक्षात त्रिभुज प्रदेश कसा असतो याची अनुभूती आता येऊ लागली होती . इतक्यात एक केवट दिसला . त्याने सांगितले की इथून थोडेसे वर गेल्यावर ओळीने मंदिरे च मंदिरे आहेत आणि सर्व पौराणिक आहेत . मैयाच्या काठावर आता पुढे एकही आश्रम नाही . सर्व गावे पूररेषेच्या पलीकडे वसवलेली आहेत . त्यामुळे डावीकडे लावलेल्या एका गुरांच्या वाटेतून गावात आलो . आणि खरोखरच ओळीने मंदिरांची दर्शने घेत सुटलो ! 
आपणही नर्मदा पुराणात उल्लेख असलेल्या या सर्व देवांची दर्शने घ्यावीत !
श्री कुबेरेश्वर महादेव
 श्री अनरकेश्वर महादेव
श्री दुधेश्वर महादेव
श्री वाघेश्वर महादेव
श्री सरपेश्वर महादेव
 श्री सर्पेश्वर महादेव (मोक्षतीर्थ )
श्री लिंबेश्वर महादेव
श्री जगन्नाथ महादेव
नर्मदा मातेच्या अगदी काठाकाठाने चालत असल्यामुळे माझी यापूर्वी अशी अनेक महत्त्वाची मंदिरे पहायची राहून गेली आहेत हे निश्चित आहे . परंतु नर्मदा मातेचे अखंड दर्शन मिळत राहिल्यामुळे त्याचा फारसा विषाद नाही . आज मात्र प्रचंड प्रमाणात देवदर्शने झाली ! इतक्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेतल्यामुळे की काय परंतु मला ग्लानी येते आहे असे मला वाटले . जगन्नाथ महादेवाच्या मंदिरामध्ये एका ओसरीमध्ये मी क्षणभर बसलो . हे राणीपुरा नावाचे गाव होते . झोळीवर डावा हात ठेवून दोन्ही पाय आडवे पसरून बसण्याची मला सवय होती . त्याच स्थितीमध्ये मला गाढ झोप लागली ! आणि मी थेट तीन तासांनीच उठलो ! उष्मा भयंकर वाढला होता . उन्हाच्या चटक्यामुळेच मला जाग आली . आणि मी पटकन पुढे निघालो ! सोबत घड्याळ नसल्यामुळे किती वेळ वाया गेला हे ओळखायचे काही साधन हातात नव्हते . परंतु सूर्याची स्थिती पाहून अंदाज यायचा . चालत चालत पुढे निघालो . सरपेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये दोन साधू होते . एक साधू राज योगी होते . आणि दुसरे १०८ !  १०८ वगैरे आकड्यांची गंमत तुम्हाला सांगतो . आपल्या महाराष्ट्रामध्ये सुदैवाने ही पद्धत नाही ! परंतु दक्षिण भारतात आणि उत्तर भारतातही हे सर्रास वापरले जाते .  कुठल्याही माणसाचे नाव आपण सरळ लिहित किंवा उच्चारत असतो . उदाहरणार्थ नारायण . आता तो व्यक्ती थोडासा महनीय असेल किंवा अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे तर त्याने चार पैसे गोळा केलेले असतील तर त्याच्या नावामध्ये श्रीयुत लावायची पद्धत आहे . श्री म्हणजे लक्ष्मी . श्रीने युत अर्थात लक्ष्मी ज्याने जोडली आहे असा . त्याचा लघुरुपात उच्चार नुसता श्री असा केला जातो .श्री नारायण . मग हळूहळू आमचे गुरु तुमच्या गुरु पेक्षा श्रेष्ठ कसे हे सांगण्यासाठी गुरुच्या नावामध्ये दोन वेळा श्री लावायची पद्धत सुरू झाली . श्री श्री नारायण ! 
पुढे काही लोकांनी चहाटळपणा वाढवत नेला आणि श्री श्री श्री श्री श्री नारायण असे चालू केले . होय माझ्यामते हा चहाटळपणाच आहे . नुसते नारायण हे नाव सुद्धा पुरेसे असते . मग अजून जरा साधना केली की त्या गुरुच्या नावामध्ये १०८ श्री लावतात . १०८ श्री नारायण . येथील साधू १०८ होते . त्याच्यावर कडी १००८ श्री वाल्यांनी केली ! १००८ श्री नारायण . मग १०००८ श्री आणि १००००८ श्री सुद्धा बाजारात आले ! आता सध्या सर्वाधिक भाववाले अनंत श्री नारायण आहेत ! सगळाच वेड्यांचा बाजार आहे ! भक्ताने नावामध्ये किती वेळा श्री जोडले आहे यावरून थोडीच त्या माणसाची बौद्धिक किंवा भौतिक संपत्ती कळणार आहे किंवा ठरणार आहे !
त्यामानाने आपले महाराष्ट्रातील लोक खूप शहाणे आहेत . संतांना प्रेमाने हाक मारायची पद्धत आपल्याकडे आहे . ज्ञानोबा किंवा ज्ञानेश्वर माऊली ,तुकोबा , गोरोबा , निळोबा , चोखोबा अशी संतांना प्रेमाने आपुलकीने हाक मारायची पद्धत आपल्याकडे आहे . वरील पद्धतीने नामकरण केले असते तर त्या नुसार चोखोबा हे १००८ श्री आहेत का १०८ श्री आहेत असा नवीनच वाद सुरू झाला असता ! मला भक्तांच्या भावनेचा अनादर करायचा नाही परंतु या प्रथा आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथा नसून अलीकडे घुसलेल्या कुप्रथा आहेत असे माझे मत आहे . त्यामुळे त्यांच्यामध्ये वाहवत जाण्यापेक्षा मूळ गाभ्याकडे लक्ष देणे कधीही श्रेष्ठ . आमचे गुरु किती श्रेष्ठ आहेत हे जगाला उच्च रवाने सांगण्यापेक्षा गुरूंनी सांगितलेली एखादी जरी गोष्ट आपल्या रोजच्या जीवनात अमलात आणली तरी ते फार महत्त्वाचे आहे . या दोघांनी माझ्याशी भरपूर गप्पा मारल्या . सुदैवाने दोघांचेही फोटो मला गुगलवर सापडले . आपणही दर्शन घ्या . त्यांनी एका ग्लासातून मला काहीतरी आणून दिले . एक घोट पिल्यावर लक्षात आले की ते कोकाकोला आहे ! स्वर्गीय राजीव दीक्षित यांची व्याख्याने मी शाळेमध्ये असताना कॅसेट प्लेयर वर ऐकायचो . सांगलीला भास्करराव मराठे नावाचे माझ्या मित्राचे वडील होते त्यांनी मला या ४० कॅसेट आणि त्या ऐकण्यासाठी कॅसेट प्लेयर दिला होता . दिवस रात्र झपाटल्याप्रमाणे मी त्या सर्व कॅसेट ऐकून काढल्या होत्या . त्या दिवसापासून मी विदेशी पेय पिणे बंद केले होते . अर्थात फार काही रोज रोज मी ते पीत होतो असा भाग नव्हे परंतु आवर्जून पिणे बंदच झाले . त्यामुळे कोकाकोला थम्सअप वगैरे नावे जरी ऐकलेली असली तरी त्यांची प्रत्यक्षात चव कधी घेतलेली नव्हती . कडकडीत उन्हातून चालून आल्यामुळे बर्फाळलेले ते शीतपेय तोंडाला लावल्याक्षणी एक झटका बसला .आयुर्वेदानुसार हे अत्यंत चुकीचे आहे . टीव्हीतल्या जाहिरातीमध्ये हे पाहायला खूप छान वाटते . परंतु तुमच्या शरीराचे अतोनात नुकसान शीतपेये करतात .एकतर ती साखरेने संपृक्त असतात . दुसरी गोष्ट अतिशय गार असल्यामुळे तुमचा इसोफेगस किंवा घसा गार करून टाकतात .आणि तापमान कमी आहे अशा ठिकाणी जिवाणूंची विषाणूंची वाढ लवकर होत असते . त्यामुळे घसा धरणे वगैरे जे प्रकार होतात ते या उतरलेल्या घशाच्या तापमानामुळे होतात . मी क्षणभर थांबल्यावर महाराज म्हणाले , " पीओ पीओ बाबाजी , प्रसादी है । " मग महादेवांचा प्रसाद म्हणून मी ते शीतपेय पिऊन टाकले . 
मला 'कोक प्रसाद ' दिलेले राज योगी महाराज
(यातील कोक हा शब्द इंग्रजी आहे याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी ! संस्कृत मध्ये याचा वेगळा अर्थ निघतो .)
परमपूज्य १०८ श्री महाराज . (यांचे पूर्ण नाव कोणाला माहिती असल्यास कृपया कळवावे . )
मी साधू संतांना थेट त्यांचे नाव कधी विचारत नसे . तो खरा साधू असेल तर ठीक आहे . परंतु थोडाफार कच्चा असेल तर त्याला राग येणे स्वाभाविक आहे . की याला माझे नाव माहिती नाही ? ही हिम्मत ? मला नाव विचारतो ? असे काहीतरी विपरीत मत होऊ नये म्हणून मी आपला आजूबाजूच्या भक्तांना तरी नाव विचारायचो किंवा लिहिलेल्या पाट्या वाचायचो . इथे तशी संधी मिळाली नाही . दोघांची रजा घेतली आणि पुढे निघालो . चालत चालत शेतातील मार्गाने एका नदीच्या काठावर आलो . नर्मदा मातेचे पाणी खारे झाल्यामुळे दोन दिवसापासून पाणी कमी प्यायलो होतो . या नदीचे नाव कावेरी होते . आणि तिचे पाणी अतिशय शुद्ध स्वच्छ व निर्मळ होते ! त्यामुळे अक्षरशः आकंठ पाणी प्यायलो ! खूपच सुंदर नदी होती . तिच्या काठाकाठानेच चालत राहिलो . एका वळणावर मला समोरून कुणीतरी इकडे या असा आवाज दिला . या नदीच्या काठावर चांगले घनदाट जंगल होते आणि वन्यपशूंच्या अस्तित्वाच्या खुणा जाणवत होत्या . नदी पार करून पलीकडे गेलो . मला बोलवणारी व्यक्ती दिसली नाही परंतु मार्ग दिसू लागला त्याने चालू लागलो . वाटेमध्ये एका तरुणाने परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी एक छोटासा तंबू उभारला होता . नर्मदा मातेची एक प्रतिमा ठेवून तो तिथे परिक्रमा वासींना चहा आणि फरसाणचा प्रसाद देत होता . बसण्यासाठी ताडपत्री अंथरलेली होती . त्यावर काही काळ बसलो आणि त्या तरुणासोबत गप्पा मारल्या .याने माझ्यासोबत फोटो काढून घेतले . आणि मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले . 
या तरुणाचे नाव होते विष्णू पटेल . याला परिक्रमा वासींचे फारच अगत्य होते असे मला जाणवले .
बजरंग कोल्ड्रिंक्स नावाचे त्याचे दुकान होते .त्याने वहीमध्ये शिक्का सुद्धा दिला !
नर्मदा मैयाची प्रतिमा आणि विष्णू पटेल या युवकासोबत प्रस्तुतलेखक
अशी सेवा करण्याची इच्छा गावातल्या हजार मुलांतील एखाद्याच मुलामध्ये निर्माण होते परंतु निर्माण होते आहे हेच कौतुकास्पद आहे .
विष्णू पटेल ने दिलेला शिक्का
इथून पुढे गुमानदेव नावाचे हनुमंताचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे . परंतु तो सर्व सडक मार्ग आहे . माझी चालण्याची रुची काय प्रकारची आहे हे विष्णूच्या लगेच लक्षात आले . आणि त्याने सांगितले की तुम्ही सरळ काठाकाठाने पुढे जावे . गुमानदेव हनुमंताचे दर्शन होणार नाही परंतु गुवाली गावातल्या पंचमुखी हनुमान मंदिरापर्यंत नक्की पोहोचाल . त्याप्रमाणे मी पुढे निघालो .वाचकांनी गुमानदेव हनुमंताचे दर्शन घ्यावे .
गुमानदेव येथील हनुमान दादा (गुजरात मध्ये देवाला किंवा दैवी सत्पुरुषाला दादा म्हणतात )
इथे मोटा सांजा नाना सांजा वगैरे मार्गे परिक्रमावासी जातात . परंतु माझा मार्ग थोडासा वेगळा होता . या मार्गाने फारसे कोणी जात नाही . त्यामुळे वाटेत भेटलेल्या काही पांथस्थांनी मला सांगितले सुद्धा की तुम्ही चुकीच्या रस्त्याने जात आहात . परंतु मला आता याची सवय झाली होती . मी हात जोडून नम्रपणे त्यांना सांगायचो की माझा काटा काटा चा मार्ग किंवा किनारा मार्ग आहे .मग मात्र कोणी काही बोलायचे नाही . थोडेसे अंतर चाललो . जंगलातून जाणारा एकाकी रस्ता होता . वन्य श्वापदे आपल्या अस्तित्वाच्या खुणा सर्वत्र सोडतात त्या दिसत होत्या . अचानक डावीकडे एका टेकाडावर भव्य दिव्य मंदिराचे बांधकाम सुरू आहे असे दिसले .मंदिर फार सुंदर होते म्हणून वळसा मारून आत गेलो .हे रामदेव पिराचे मंदिर होते . रामदेव नावाच्या संतांना उत्तर भारतात सर्वत्र रामदेव पीर नावाने ओळखले जाते .पीर हा शब्द देव अशा अर्थी वापरला जातो . अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर असा आश्रम निर्माण करण्याचे काम सुरू होते . बाहेर काही कामगार स्त्रिया विश्रांती घेत बसल्या होत्या . त्यांनी आत मध्ये सेवेकरी असल्याचे सांगितले . मंदिराचा परिसर भव्य होता आणि दोन्ही बाजूने सुंदर बगीचा केलेला रस्ता मंदिराकडे घेऊन जात होता . इथे एक गुजराती आजोबा सेवा देत होते . मला मंदिर बांधकामाविषयी आवड आहे असे सांगितल्यावर त्यांनी चालू असलेल्या मंदिराचे बांधकाम बघायला परवानगी दिली . इथल्या मूर्तिकारांशी आणि कारागिरांशी बोलून मंदिर रचनेच्या त्यांच्या पद्धती समजून घेतल्या . एखादी निर्माण झालेली गोष्ट पाहणे वेगळे परंतु ती गोष्ट निर्माणाधीन असताना खूप काही शिकायला मिळते .ती संधी कधीच दवडू नये ! इकडे आजोबांनी माझ्यासाठी सुंदर असा चहा केला ! दाट देशी दुधाचा चहा ! आश्रमाची स्वतःची सुंदर अशी गोशाळा सुद्धा होती . संपूर्ण आश्रम फिरून त्यांनी मला दाखवला . अजून बांधकाम सुरू असल्यामुळे निवासाची व्यवस्था नव्हती . परंतु भविष्यामध्ये कितीही परिक्रमावासी इथे उतरू शकतात असे त्यांनी मला सांगितले . या मंदिराचे बांधकाम आता पूर्ण झालेले दिसते आहे . त्याचे काही फोटो आपल्यासाठी टाकत आहे .
बाबा रामदेव अथवा रामदेव पीर यांचे हेच ते मंदिर ज्याचे बांधकाम पाहण्याचे भाग्य मला लाभले .
मंदिर फारच सुंदर व आखीव रेखीव आहे .
रात्रीच्या वेळी सुंदर रोषणाईने मंदिर उजळून निघते .
अश्वारूढ रामदेव बाबांचे दर्शन घ्या !
रामदेव बाबा किंवा रामदेव पीर किंवा रामशापिर नावाने ओळखले जाणारे हे संत म्हणजे चौदाव्या शतकात होऊन गेलेले एक शासक होते . पोखरण ला अटल बिहारी वाजपेयी यांनी अणुचाचणी केली होती . तेच यांचे मूळगाव . यांना काही सिद्धी प्राप्त असल्यामुळे हे प्रसिद्ध झाले . यांना मानणारा मोठा वर्ग गुजरात आणि राजस्थान भागात आहे . असो . 
चहा प्रसादी घेऊन मी इथून पुढे निघालो . हे मंदिर नर्मदा मातेच्या काठावरच आहे . मी पुन्हा नर्मदा मातेकडे निघालो होतो . परंतु बाहेर बसलेल्या सर्वच माताजींनी एकमुखाने मला डावीकडे जाऊन गुवालीच्या हनुमान मंदिरात मुक्काम करावा असे सांगितले . तसेही सूर्य मावळतीकडे निघाला होता . बहुतेक स्थानिक रहिवासी असल्यामुळे उजवीकडच्या जंगलातील रस्त्यामध्ये असणारे धोके यांना माहिती असावेत .तसेही पुढे कुठलाही आश्रम गाव काहीच नव्हते . सगळा त्रिभुज प्रदेशच होता . त्यांच्या शब्दाला मान देत मी डावीकडे वळलो आणि शेताभातातून मार्ग काढत निघालो . बरेच अंतर चालल्यावर एक मोठा महामार्ग लागला . याच महामार्गावर ग्वारी , गुवारी किंवा गुवाली नावाचे गाव होते . एकाच नावाचे कितवे गाव आहे वाचकांनी ठरवावे ! कावेरी नदी देखील नर्मदा मातेला येऊन मिळणारी दुसरी कावेरी नदी होती आणि एकुणात तिसरी . पूर्वी लोक फारसा प्रवास करत नसल्याचा हा परिणाम असावा किंवा छोटी छोटी राज्य असल्यामुळे एकाच नावाच्या नद्या दोन राज्यांमध्ये निर्माण केल्या जात असाव्यात असा माझा अंदाज आहे . परंतु नर्मदा खंडामध्ये हे सर्रास आढळते . एकच नावाची अनेक गावे अनेक नद्या सापडतात . अंधार पडता पडता मी गुवालीगावातील पंचमुखी हनुमान मंदिरात आलो .इथे एक वयस्कर साधू निवांत राहिलेला होता . गावातील तरुण परिक्रमावासींची सेवा करायचे . इथे माझ्या आधी नऊ परिक्रमावासी उतरलेले होते . भालोद वरून महामार्गाने चालत थेट इथे लोक येतात .  यात पूर्वी कुठे कुठे भेटलेले लोक देखील होते . सर्वांनी मी आल्यावर आनंद व्यक्त केला ! तुकाराम महाराज सुरवसे देखील होते . दोघांनी शेजारी शेजारी आसन लावले . तुकाराम महाराजांचे कोणाशी पटत नसे . परंतु माझ्याशी मात्र चांगली गट्टी जमली होती ! कारण मी त्यांना कधीही तुमचे अमुक अमुक चुकते आहे असे कधी म्हणायचोच नाही ! तसे कोणी म्हणाले की त्यांचा पारा चढायचा . आता ही आत मध्ये उतरलेल्या लोकांसोबत त्यांची वादावादी झालेली होती . त्यामुळे त्यांनी बाहेर अंगणात येऊन माझ्या शेजारी आसन लावले . मी त्यांना काठावरून चालताना येणाऱ्या अनुभवांची आणि गमतीजमतींची माहिती सांगत होतो . ते म्हणाले , " बास झालं गड्या ! उद्यापासून आपण सुद्धा काठाने चालणार ! " आणि उद्या ते माझ्यासोबत येतील असे त्यांनी परस्पर ठरवून जाहीर करून टाकले . रात्री दिवसभर नोकरी धंदा सांभाळून आपापल्या घरातून एकेक पदार्थ घेऊन गावातील तरुण एकत्र आले . कोणी भाजी करून आणली , कोणी पोळ्या करून आणल्या , कोणी भात आणला , कोणी आमटी आणली . अतिशय सुंदर असा भोजन प्रसाद आम्ही घेतला . इथे समोरच छोटा हत्ती चालवणारा एक सेवेकरी होता .प्रकाश वसंतभाई ठाकूर असे त्याचे नाव होते . तो रात्री उशिरापर्यंत माझ्याशी गप्पा मारत बसला होता . त्याच्याकडून त्या भागाची इथ्यंभूत माहिती मला मिळाली . या आश्रमा शेजारी मोठी टाकी होती तिथे पाणी चालू केले की सर्व गावाला पाणी मिळायचे . त्यामुळे पाणी चालू करण्याच्या ठराविक वेळा होत्या . परंतु परिक्रमावासी ऐकत नसत आणि जेव्हा हवे तेव्हा पाणी चालू करायचे . त्यामुळे गावात अचानक पाणी यायला लागायचे ! परंतु हे सर्वांना सांगत बसण्यापेक्षा गावकऱ्यांनी हे सत्य स्वीकारलेले होते ! किती समंजसपणा ! हा गुजरात राज्याचा राज्य महामार्ग क्र १६५ होता . इथून सुरत आणि दहेज बंदराकडे जाणारी जड वाहतूक चालायची . त्यामुळे अखंड मोठे मोठे कंटेनर ,ट्रक , डंपर , टँकर , ,ट्रेलर , ट्रॅक्टर इथून जात होते .राजपिपला राजबर्डी अंकलेश्वर भरूच अशा सर्व ठिकाणी हा मार्ग जोडलेला होता . पूर्वी पुण्यामध्ये वडगाव मावळ येथे ग्रामस्थांनी महामार्गावर रस्ता ओलांडताना लहान मुलांना अपघात झाल्यामुळे चिडून एक अतिशय अनैसर्गिक एक फूट उंचीचा गतिरोधक उभा केला होता .इथल्या ग्रामस्थांनी देखील असाच एक अतिशय अनैसर्गिक गतिरोधक उभा केला होता ज्यामुळे प्रत्येक गाडी त्याच्यावर खणा-खाणा वाजून पुढे जात असे. हा छोटा हत्ती मालक समोरच राहायचा . 
गुगल नकाशावर टाकलेल्या चित्रामध्ये त्याची गाडी सुद्धा दिसते आहे ! हाच तो अखंड जड वाहतूक सुरु असलेला महामार्ग . 
आश्रमामध्ये जी लागेल ती मदत हे युवक करायचे . वेळोवेळी आश्रमामध्ये कन्याभोजन केले जायचे . कन्या भोजनासाठी जमलेल्या स्थानिक गुजराती कन्या
कन्याभोजन हा उपक्रम सुरू करणाऱ्या व्यक्ती अतिशय मोठ्या सामाजिक अभ्यासक असल्या पाहिजेत ! ज्या कुणी ऋषीमुनींनी ही परंपरा चालू केली आहे ते अत्यंत दूरदर्शी होते . कन्याभोजनाच्या निमित्ताने समाजाचे एकत्रीकरण तर होतेच , संघटन आयतेच होते . परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलींच्या मनामध्ये आपण इतर समाजापेक्षा कमी नाहीत तर समाजासाठी पूज्य आहोत ही भावना योग्य वयामध्ये रुजवली जाते . व हे होणे अत्यंत गरजेचे आहे . 
गुवाली गावातील पंचमुखी हनुमान मंदिर
श्री पंचमुखी हनुमान जी
बाहेर अजून एक मारुती स्थापन केला होता .तो का ते मला अजून कळले नाही . परंतु हा एकमुखी मारुती होता .
इथे अंगणामध्ये यज्ञ शाळेच्या शेजारी मी आसन लावले होते . या संपूर्ण भागात प्रचंड डास आहेत .
मंदिराकडे घेऊन जाणारा रस्ता . रस्त्याने चालत येणारे परिक्रमावासी इथून प्रवेश करतात . मी मागच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीच्या इथून चढून वर आलो .
इथे राहणारे साधू अत्यंत विरक्त होते . कोण आले कोण गेले त्यांना कशाचे काही नव्हते ! आपल्यास मस्ती मध्ये बसून राहिलेले होते .भल्या पहाटे पाच वाजताच लोहारा मोहीपुरा व धार इथले परिक्रमावासी पुढे पळाले .
जाताना मात्र महाराजांनी मला बोलावून घेतले आणि स्वतःच्या हस्तक्षराने मध्ये लिहून दिले .
हा माझा नव्वदावा मुक्काम होता . 
૧ /૪/૨૦૨૨
પંચમુખી હનુમાન મંદિર ગોવાલી 
ગુજરાત ભરૂચ 
દિનકર મહારાજ (?)

सकाळी लवकर उठून सर्व आटोपून सूर्य उगवल्यावर मी पुढे निघालो . तुकाराम बुवा सुरवसे देखील माझ्यासोबत निघाले . कारण त्यांनी कालच जाहीर केल्याप्रमाणे त्यांना काठाने चालून बघायचे होते . मी देखील त्यांना अडवले नाही तर त्यांच्यासाठी मोहन साधू बनायचे ठरवले . आम्ही दोघे पाण्याच्या टाकी कडून निघालो . इथे उजव्या हाताला एका आदिवासींच्या देवीचे स्थान होते . तिथे मी काल येतानाच दर्शन केलेले होते . त्यामुळे दुरूनच नमस्कार करून पुढे निघालो . 
गावातील गुप्तेश्वर आणि गोपेश्वर महादेवाचे दर्शन घेतले .शेतातले रस्ते पार करत थेट मैया चा किनारा गाठला . या रस्त्याने जाण्याच्या मागे एक महत्त्वाचे कारण होते . मी आयुष्यात सर्वप्रथम नर्मदा मातेचे दर्शन भरूच च्या पुलावरून घेतले होते . आणि भरूच हे शहर समोर दिसायला सुरुवात झालेली होती . याचा अर्थ भरू चा पूल आता जवळ होता . कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पुलावरून मी नर्मदा मातेचे दर्शन सर्वप्रथम आयुष्यात घेतले होते त्या पुलाखालून जाण्याची माझी इच्छा होती . या पुलावरून पुढे अनेक वेळा मी नर्मदा मातेचे दर्शन घेतलेले होते . त्यामुळे नर्मदा मातेकडे जाणाऱ्या एका नदीच्या काठाकाठाने निघालो . वाटीमध्ये डाव्या हाताला गोपाल दास नावाच्या एका साधूंची कुटी लागली . घनदाट झाडीमध्ये एका नर्मदेश्वर महादेवाची स्थापना यांनी केली होती . अतिशय साध्या पद्धतीने स्वच्छ सुंदर आश्रम बांधून साधू राहत होते . यांचे वय बरेच असावे . ८०-९० च्या दरम्यान वय होते .त्यांनी आग्रहपूर्वक चहा पाजला . थोडा वेळ बसवून घेतले . समोर मैयाचे सुंदर दर्शन होत होते . मागे गुवाली गाव होते आणि समोर गुवाली बेट होते . मला हे स्थान फारच आवडले . 



लाल खुणेने दाखवलेला गोपालदास महाराजांचा आश्रम . समोर मोठे बेट आहे आणि जवळच भरुचला जोडणारे पूल आहेत . एक वाळूचा मोठा टापू लाल खुणेजवळ दिसतो आहे दिसतो आहे .तिथेच मैया ला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांच्या नद्यांच्या झालेल्या खाड्या दिसत आहेत .

साधू अतिशय विरक्त होते . महापुरामध्ये या संपूर्ण आश्रमाला  मैया चा वेढा पडत असे तरीदेखील ते आश्रम सोडत नसत . वरती एक मजला त्यांनी बांधून ठेवला होता तिथे राहात .
साधु महाराज म्हणाले की आता आल्यासारखे भोजन करून जावा . मला ते आवडले असते कारण साधू महाराजांशी खूप सुंदर गप्पा चालू होत्या . वयोमान अधिक असलेला मनुष्य भेटला की त्याजवळ अनुभव तुमच्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता खूप जास्त असते असे गृहीत धरून त्याच्या चार गोष्टी ऐकल्या तर तुम्हाला कमी वयात जास्त ज्ञान प्राप्त होते ! त्यामुळे मी त्या साधू महाराजांच्या चरणाशी बसून राहिलो . त्यांनी देखील परिक्रमा का करावी वगैरे खूप छान समजून सांगितले . परंतु तुकोबारायांना पुढे जायची घाई झाली होती . सोबत कोणी घेतली की असेच होते . तुकोबाराय मनाने खूप निर्मळ परंतु स्वभावाने अतिशय तापट होते . हे समीकरणच आहे ! जे लोक आपल्या मनात काहीही न ठेवता फाडफाड तोंडाने बोलून मोकळे होतात त्यांचे मन नेहमी निर्मळ आणि स्वच्छ राहते ! फक्त त्यांच्या बोलण्याच्या सवयीमुळे समोरचा दुखावला जातो . या उलट जे लोक तोंडावर गोड बोलत सगळं मनामध्ये ठेवतात त्यांना मात्र अनेक मानसिक त्रास होतात . आणि त्यांचे मन कधीच मोकळे राहत नाही . तुकोबाराय तोंडाने अतिशय निर्भीड आणि फटकळ होते . त्यांना कधी एकदा किनाऱ्याने चालतो असे झाले होते . त्यामुळे आम्ही साधूंचा निरोप घेतला . साधू महाराज म्हणाले मैयाची इच्छा ! तुकोबारायांची परिक्रमा नवीन नवीन सुरू झाली होती .माझ्या सांगण्यावरून त्यांनी त्यांच्यासोबत चालणारे लोक मागे सोडून दिले होते आणि एकटे निघाले होते . मी त्यांना सांगितले हे पहा आपण परिक्रमेचा महत्त्वाचा नियम तोडलेला आहे . कुणी भोजन प्रसाद देऊ केला तर त्याला नाही म्हणायचे नसते ते आपण केलेले आहे . त्यामुळे आज आपल्याला कधी खायला मिळते पाहूयात ! तुकाराम बुवा म्हणाले असे काही नसते . मैया कधी कोणाला उपाशी ठेवत नाही .परंतु लवकरच त्यांना कळाले की भोजन प्रसाद घेऊन जाणे सोयीचे ठरले असते ! गोपालदास साधूंच्या रूपाने मैयाच तर जेवायला घालत होती ना ! परिक्रमेमध्ये सोबत कोणी घेतले की असे काहीतरी होऊन जाते .तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला वागता येत नाही .महाराजांचा आश्रम सोडून आम्ही सरळ रेषेत मैय्या कडे गेलो . आता शेतांचे आकारही वाढले होते आणि माती देखील ओली होती . एक मोठी खाडी आम्हाला आडवी आली . याच्यामध्ये मगरी होत्या . मी धावतच ती खाडी ओल्या पाण्यातून पार केली . तुकाराम बुवा फिरून लांबून चालत आले . नंतर एक प्रचंड वाळूचा किनारा लागला . इथे वाळूच वाळू होती . दगड आणि तारा वापरून इथे पूर संरक्षक भिंत बांधण्यात आली होती त्यावर ही वाळू साठली होती . ती वाळू नेणारे काही लोक तिथे दिसले . ही खाडी आणि हा वाळूचा किनारा चांगलाच लक्षात राहिला . अनेक विजेच्या मोठ्या तारा पार करत आम्ही पुढे निघालो . काठाने चालताना हे मनोरे दिसायचे . अशी लांबची एखादी खूण पकडून चालत राहिले की मजा यायची .त्यामुळे आपण किती अंतर आलो ते लक्षात यायचे . 
आम्ही पार केलेली कठीण खाडी आणि वाळूचा मानवनिर्मित किनारा . शेजारी वाहणारी धीरगंभीर नर्मदा मैया .
परिक्रमेमध्ये कोणाचाही भोजनाचा आग्रह मोडू नका . पुढे तुम्हाला भोजन मिळणार नसते हे मैय्याला आधी माहिती असते .त्यामुळे तिने ह्या माणसाला तुम्हाला जेवू घालण्याची प्रेरणा दिलेली असते . तुम्ही अमुक व्यक्तीला नाही म्हणालात त्याचा बदला म्हणून तुम्हाला मैय्या उपाशी ठेवत नाही , तर पुढे तुम्हाला उपास घडणार आहे हे माहिती असल्यामुळे अमुक व्यक्तीला मैयाने तुम्हाला जेऊखाऊ घालण्याची प्रेरणा देऊ केलेली असते .दगडांची बांधबंधिस्ती सुंदर आणि नेटकी असली तरी देखील अधून मधून छोट्या छोट्या खाड्या पार कराव्या लागल्या . पायाखालची झुडपे हळूहळू बदलत होती . इथे एक वेगळाच प्रकारची काटेरी बाभूळ सदृश्य वनस्पती दिसू लागली होती जिथे काटे अतिशय टोकदार आणि विषारी होते . ते टोचल्यावर प्रचंड खाज सुटायची .त्यामुळे या बाभळी पासून सावध राहून मी चालत होतो . मैया च्या पाण्याचा रंग बदलून गढूळ मातकट रंग आला होता . समुद्राच्या येण्या जाण्यामुळे खालील गाळ उधळून मैयाचा रंग बदलला होता . समोरच्या बाजूला भव्य दिव्य भरूचे शहर आपले दर्शन देत होते . हे शहर फारच मोठे आहे असे इकडून वाटत होते . थोड्याच वेळात एक सुंदर दगडी बांध लागला . दुतर्फा शेती व पलीकडे भव्य मैय्या चे पात्र . बांधावर बाभळीची सावली पडलेली त्यामुळे चालणे सुखदायक होते .भरूच चा पूल आता जवळ येऊ लागला . इतक्यात डाव्या हाताला दिसलेला प्रचंड  ढिगारा पाहून जीव दडपला ! हा अतिप्रचंड ढिगारा कचऱ्याचा होता ! एखाद्या दहा मजली इमारतीपेक्षा हा उंच होता ! कचऱ्यातूनच वरपर्यंत जाण्यासाठी रस्ता केला होता त्यातून कचरा टाकणाऱ्या गाड्या वर जाऊन त्याची उंची दिवसेंदिवस वाढवत चालल्या होत्या . जिकडे नजर जावी तिकडे कचराच कचरा ! यात बहुतांश करून प्लास्टिकचाच कचरा होता . आश्चर्य म्हणजे कचऱ्याचा दुर्गंध जरा देखील येत नव्हता ! नाहीतर एरव्ही छोटीशी कचऱ्याची पेटी उघडली तरी  घाण वास सुटतो .इतका कचरा एकत्र एका जागी मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत होतो . यातील हलक्या फुलक्या पिशव्या उडून मैया मध्ये जात होत्या . कचऱ्यामधून नैसर्गिकरित्या तयार होणारा मिथेन वायू उन्हामुळे पेट घेतो त्यामुळे काही ठिकाणी कचरा धुमसत होता आणि त्याचा धूर बाहेर पडत होता .
कचऱ्याचा हा ढीग इतका मोठा आहे की तो उपग्रहातून सुद्धा दिसतो . ढीग हा शब्द चुकीचा आहे .हा चक्क डोंगरच होता ! खालील उपग्रह चित्र पहा तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतो आहे !
मैया काठी उभा केलेला कचऱ्याचा पर्वत आणि शेजारून जाणारा मोठा चार मार्गिकांचा पाय रस्ता .
आपण या देशाचे नागरिक म्हणून आता बऱ्यापैकी सुशिक्षित झालेलो आहोत असे मानावयास पुरेसा वाव आहे . परंतु आपण सुसंस्कृत कधी होणार ? प्लास्टिकचा कचरा मुळात करूच नये आणि केलाच तर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावता आली पाहिजे हे आपल्याला कधी कळणार ? पालिकेला देखील कचरा टाकण्यासाठी नर्मदा मातेचा पवित्र किनाराच सापडला का ? अन्य एखाद्या खाणीमध्ये ,खड्ड्यामध्ये हे करता आले नसते का ? यातील वाऱ्यामुळे उडून जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या पाहिल्यावर माझा जीव कासावीस होत होता . आज माझा परिक्रमेचा ९० वा दिवस होता . गेल्या तीन महिन्यात मी जितके प्लास्टिक गोळा केले नव्हते तितके प्लास्टिक वाऱ्याची एक झुळूक आली की मैय्यामध्ये जाऊन पडत होते . इथून समुद्र जवळच असल्यामुळे ते समुद्राकडे जात होते . पुढील शेकडो वर्ष ते प्लास्टिक समुद्रामध्ये असेच तरंगत राहणार हे निश्चित आहे . समुद्रामध्ये देखील पाण्याचे प्रवाह असतात . असे प्रवाह या प्लास्टिकला एखाद्या अशा ठिकाणी नेऊन सोडतात जिथे पाणी कायम थिजलेले असते . आपल्या माहिती करता म्हणून सांगून ठेवतो .जगभरातून वाहून आलेल्या अशा प्लास्टिकची मोठी मोठी बेटे समुद्रामध्ये तयार झालेली आहेत . आणि तिथले जलजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे . आपण आपल्या घरात बसून दूर कुठेतरी असलेला सागरी जीव मारू शकतो इतकी आपली ताकद आहे ! विचार करून पहा .
प्रशांत महासागरामध्ये तयार झालेले प्लास्टिकचे मानवनिर्मित बेट तीनशे किलोमीटर लांबीचे आहे .
याला ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच असे म्हणतात .
जगातील अनेक देशांपेक्षा या बेटाचा आकार मोठा आहे . आणि दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे .जगातल्या कुठल्याही देशाकडे इतके प्लास्टिक साठवून ठेवण्याची व्यवस्था नाही .
अर्थात जगाच्या मानाने आपण भारतीय कमी प्लास्टिकचा कचरा निर्माण करतो हे देखील खरे आहे . परंतु जो काही कचरा निर्माण होतो तो अशा रीतीने सहज नदीमध्ये फेकण्याची आपली प्रवृत्ती आहे . आपल्यापैकी किती जणांनी आजपर्यंत प्लास्टिकच्या पिशवीत टाकून निर्माल्य तसेच पिशवी सकट नदीमध्ये फेकलेले आहे ? नर्मदा मातेची शपथ घेऊन स्वतःला च सांगा ! आज पासून आपण सर्वजण एक संकल्प करूया . -घराबाहेर जाताना एक छोटीशी कापडी पिशवी घडी करून खिशात ठेऊ . 
-दुकानदाराने अनावश्यक प्लास्टिकच्या पिशव्या दिल्या तर त्याला जागेवर परत करू . 
-घरी वापरून झालेल्या प्लास्टिकच्या पिशव्या नीट घडी करून ठेवून देऊ . 
-ओला कचरा सुका कचरा वेगळा वेगळा करून टाकू म्हणजे तुमच्या पालिकेला विल्हेवाट लावणे सोपे जाते .
- निर्माल्या चे सर्वात सहज आणि वेगाने खत होते ते करून घरी वापरू . अगदीच वेळ आलीच तर मात्र ,
-निर्माल्य नदीत टाकताना केवळ फुलांचा भाग टाकू . त्याचे सात्मीकरण करण्याची व्यवस्था नदीमध्ये आहे .परंतु प्लास्टिकचे काहीच करता येत नाही .
- नदीमध्ये दिवे सोडताना प्लास्टिकच्या वाट्या द्रोण वगैरे वापरणार नाही . पानावर कणकेचा दिवा सोडू जो नंतर मासे खाऊन टाकतात .
- आपल्या गरजा कमी करून अनावश्यक खरेदी टाळू . प्रत्येक वस्तूच्या पॅकेजिंग साठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक थर्माकोल वापरले जाते . 
- लहान मुलांचे प्लास्टिक वापरा संदर्भात प्रबोधन करू . त्यांना प्लास्टिक हा किती मोठा भस्मासुर आहे याची जरा देखील कल्पना नाही .
- पिण्याचे पाणी सोबत बाळगायचे असेल तर धातूच्या सुंदर बाटल्या आजकाल मिळतात त्या वापरू .
- 'सिंगल युज प्लास्टिक ' वर पूर्णपणे बंदीच घालू . निदान आपल्या आयुष्या पुरती तरी ...

यावर काहीच उपाय नाही का ? तर निश्चितपणे आहे !मी मदुराई मध्ये काही काळ राहिलो आहे . सुमारे साडेतीन वर्षांच्या माझ्या या वास्तव्यामध्ये जे काही महान लोक मला भेटले त्यातील सर्वात आदराने घ्यावे असे नाव म्हणजे डॉक्टर राजगोपालन् वासुदेवन् . यांनाच भारत सरकारने आदराने प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया अशी उपाधी दिलेली आहे ! पद्मश्री पद्मभूषण सारखे पुरस्कार यांना मिळालेले आहेत . आणि अलीकडच्या काळात मिळालेले आहेत हे विशेष ! पूर्वी ठराविक रक्कम भरल्यावर हे पुरस्कार दिले जायचे त्या स्कीम मधून यांना पुरस्कार मिळालेला नाही .तर यांनी प्लास्टिकचा वापर रस्त्यामध्ये करून त्या रस्त्याचे आयुर्मान कित्येक पटीने वाढविण्याचे संशोधन कुठलाही स्वार्थ न बाळगता मोफत देशाला अर्पण केले त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे !
 पद्मश्री डॉ राजूगोपालन वासुदेवन मदुरै
यांनी निर्माण केलेले प्लास्टिक पासून रस्ते बनवण्याचे तंत्रज्ञान त्यांनी पंतप्रधानांकडे राष्ट्रार्पण केलेले आहे .
 या वासुदेवन सरांची एक गंमत आहे . त्यागराजर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग इथे ते आजही शिकवतात . त्यांचे वय आता ७५ आहे . पण महाविद्यालय आणि विद्यार्थी त्यांना निवृत्त होऊ देत नाही आहेत ! तुम्ही रोज येऊन महाविद्यालयामध्ये फक्त बसा असे सर्वांचे म्हणणे आहे ! इतका हा मनुष्य ज्ञानाचा सागर आहे ! वासुदेवन सर रोज दुपारी जेवण झाले की एका वडाच्या झाडा समोर येऊन बसतात . आणि त्या झाडाला भगवद्गीता सांगतात ! गंमत पहा बर का ! हा संवाद सर आणि झाड असा आहे ! अर्थात कोणाला ऐकण्यात रस असेल तर ते देखील येऊन बसू शकतात ! परंतु समजा कोणीच ऐकायला आले नाही तर मात्र सरांचे भगवद्गीते वरचे प्रवचन थांबत नाही ! कारण ते झाडाला भगवद्गीता ऐकवताहेत ! मोठी मोठी झाडे जी असतात ती काहीतरी किरकोळ चूक करून पुन्हा जन्माला आलेली मनुष्य प्राण्याचीच रूपे असतात असे मला नर्मदे काठी काही साधू नी सांगितले होते . वासुदेवन सरांचा देखील तोच भाव होता . या झाडाला मोक्ष प्राप्तीचे ज्ञान मिळावे म्हणून त्याला ते भगवद्गीता ऐकवायचे ! अजूनही ऐकवतात ! मी त्यांना विनंती करून त्यांचे हे प्रवचन ऐकायला बसायचो . तमिळ इंग्रजी हिंदी अशा मिश्र भाषांमध्ये त्यांचे संभाषण चालायचे ! परंतु भावार्थ लक्षात यायचा ! हा उपक्रम गेली ४४ वर्षे चालू आहे ! अशा या महान शास्त्रज्ञाने शोधून काढलेले जे तंत्र आहे ते वापरले तर जगातील प्लास्टिक कमी पडेल इतके प्लास्टिक फक्त भारतातील रस्ते बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ! 
 'प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया' डॉक्टर आर वासुदेवन
फक्त या तंत्राचा प्रचार प्रसार लोक करत नाहीत कारण या पद्धतीने तयार केलेला रस्ता दुप्पट तिप्पट टिकतो आणि त्याला काहीच होत नाही ! हे तंत्र वापरून कोणाला रस्ता बनवायचा असेल तर कृपया मला संपर्क करावा . मी तुम्हाला योग्य त्या व्यक्तीकडे जोडून देईन . वासुदेवन सरांनी मला दक्षिण भारतातील अनेक दुर्मिळ मंदिरे दाखवलीच परंतु त्यांच्या गुरुदेवांचे देखील दर्शन घडवले होते . यांचे आतोनात प्रेम मला लाभले हे माझे अनेक जन्मांचे भाग्यच ! असे थोर महात्मे जन्माला येत आहेत म्हणून आपल्यासारख्या कचरा करणाऱ्या अवलादी टिकून आहेत . नाहीतर निसर्गाचा समतोल कधीच ढळला असता . एक वाघ जिवंत आहे म्हणून जंगलातील गवत शिल्लक राहते . नाहीतर वर्षाला १०० - २०० पिल्ले जन्माला घालणारी हरणे कधीच जंगल साफ करून बसली असती ! एक मगर दिसली की त्या भागातील नर्मदामाता एकदम चकाचक होऊन जाते ! कुणी दिवे सोडत नाही आणि शाम्पूची पुडी टाकून आंघोळ करत नाही ! डर अच्छा है ! असो .
भरूच शहर किती मोठे आहे याचा आपल्याला अंदाज यावा म्हणून हे उपग्रह चित्र पाहावे ! लाल खुणेने कचऱ्या चा डोंगर दाखवलेला आहे . त्याच्या आधी अर्धवर्तुळाकार चालण्याचा मानवनिर्मित मार्ग आणि त्याच्या आधी वाळूचा पट्टा दिसतो आहे .
हाच तो मानवनिर्मित अर्धवर्तुळाकार दगडी भिंतीवरून जाणारा मार्ग . इथे मैयाच्या काठावर प्रचंड गाळ असल्यामुळे चालता येत नाही . परंतु या मार्गावर बाभळीची भरपूर सावली मिळते . पाण्यातून दिसणाऱ्या मनोऱ्यावरून विजेच्या तारा जात आहेत . 
हा कचऱ्याचा डोंगर संपल्यावर भरूच चे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६५ किंवा सुवर्ण चतुष्कोण योजना महामार्ग पार करविणारे पूल मला खालून पार करायचे होते . व त्यानंतर एक मोठी खाडी आडवी आलेली आहे पहा ! ती देखील ओलांडायची होती . उपग्रहातून सुद्धा डोंगर दिसतो आहे म्हणजे किती मोठा आहे कल्पना करून पहा !
अजून थोडे लांब गेले की आपल्याला ग्वालीबेट भरूचचा पूल आणि दूरवर दिसणारे अंकलेश्वर शहर दिसेल . गोलाकार खाडी ओलांडून या अंकलेश्वर शहरामध्ये मुक्कामासाठी आज आम्हाला पोहोचायचे होते .
चालत चालत भरूचच्या पुलाखाली आलो . आणि आठवणींची मनात दाटी झाली ! याच पुलावरून माझे सद्गुरू परमपूज्य जनार्दन स्वामी महाराज यांना त्यांच्या गाडीतून बडोद्याला घेऊन जाताना त्यांच्यासोबत नर्मदा मातेचे दर्शन कधीकाळी घडले होते ! त्यांच्या मुखातून नर्मदा मातेची महती ऐकायला मिळाली होती ! त्यांचे गुरु श्री नाना महाराज तराणेकर यांनी केलेल्या जलहरी परिक्रमेचे अनुभव ऐकायला मिळाले होते ! त्यांनी सांगितलेले श्री वासुदेवानंद सरस्वती उपाख्य टेंबे स्वामी महाराज यांचे किस्से ऐकायला मिळाले होते . हे सर्व काही आठवले आणि पुलावर थांबून नर्मदा मातेला नमस्कार करणारा मी मला खालून दिसू लागला ! पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती ! वरून जाणारे शेठ लोक मोठ्या गडबडीमध्ये होते ! सुरत भरूच बडोदा मुंबई भागातील धनिकांची ये जा या भागातून चालते . या लोकांकडे वेळ खूप कमी असतो . आणि कामे खूप जास्त असतात ! त्यांना असे वाटत असते की आपण जर काम केले नाही तर ही सृष्टी चालणारच नाही ! त्यामुळे आजच्या पेक्षा उद्याचा दिवस अधिक व्यग्र कसा राहील याची काळजी ते घेतात . वेळ वाचवण्यासाठी अधिकाधिक वेगवान जीवनशैली पत्करतात . बाजारामध्ये अधिक आकर्षक दिसण्यासाठी लागेल ते सर्व ते करतात . सतत नवीन गाड्या , नवीन कपडे ,नवीन ऑफिसेस ,नवीन फर्निचर ,नवीन घरे ,नवीन माणसे असे सर्व चालू असते ! रोज नवीन कचरा निर्माण करण्यात यांच्या इतका हातभार कोणीच लावत नसेल ! परंतु एवढे सगळे करून एक दिवस असा उगवतो की त्यांच्या लक्षात येते की आपण काहीच करू शकत नाही आहोत ! जीवाला कळत असते की आपल्याला काहीतरी करायचे आहे .परंतु देहाने साथ सोडलेली असते ! मृत्यु का काय म्हणतात तो आलेला असतो ! आणि मग संपूर्ण जीवन व्यर्थ गेले हे लक्षात येते ! करायच्या अनेक गोष्टी राहून गेलेल्या असतात . परंतु तोपर्यंत उशीर झालेला असतो . नर्मदा माते वरून जाणाऱ्या भरूच च्या पुलावरून हजार वेळा हा मनुष्य गेलेला असतो .परंतु मोबाईलवर ईमेल चेक करताना किंवा आयुष्यात जी व्यक्ती भेटणे फार दुरापास्त आहे अशा एखाद्या व्यक्तीशी चॅट करताना नर्मदा मातेचे दर्शन घ्यायचे राहून गेलेले असते ! नर्मदा मातेला काहीच फरक पडत नाही ! ती गेली करोडो वर्षे वाहत आहे ! संपूर्ण पृथ्वीवर प्रलय झाला तरी देखील नर्मदा माई मृत होत नाही म्हणून तर तिचे नाव नर्मदा आहे ! 
तिची व्याख्या करताना पुराणकार सांगतात ,
समुद्राः सरितः सर्वाः, कल्पे-कल्पे क्षयं गताः । 
सप्त कल्पक्षये क्षीणे न मृता तेन नर्मदा ॥
सर्व समुद्र सर्व नद्या आणि सर्वच जीवजंतू प्रत्येक कल्पांमध्ये येणाऱ्या महाप्रलयामध्ये नष्ट पावतात परंतु सात कल्प झाले तरीसुद्धा जी मृत पावलेली नाही ती न मृता म्हणजेच नर्मदा ! म्हणजेच नर्मदा ही एकमेव नदी कधीच नष्ट न पावणारी आहे !
नर्मदा पुराणा मध्ये हा श्लोक आलेला आहे . 
दुर्दैवाने वरून जाणारे मोठे मोठे व्यापारी नोकरदार शिक्षक वकील डॉक्टर शेतकरी हे फारच मोठे असल्यामुळे नर्मदा मातेकडे पाहायला त्यांना वेळ नसतो .
पुनरुपि जननम् पुनरपि मरणं । पुनरपि जननी जठरे शयनम् । 
हा भोग मग या बिचाऱ्या जीवाला सुटत नाही आणि या दुष्टचक्रात तो जीव पुरता अडकून जातो .
सुदैवाने आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा या पुलावरून गेलो आहे तेव्हा तेव्हा आदरपूर्वक माझी गाडी एका बाजूला थांबवून नर्मदा मातेचे दर्शन घेतले आहे आणि मगच पुढे गेलेलो आहे . या दिव्य नदीच्या अस्तित्वापुढे आपली योग्यता किती आहे याची पक्की जाणीव मला फार पूर्वीपासून आहे ही केवळ गुरुकृपाच होय ! तिच्या त्या दिव्यत्वाचा एक अंश तरी आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून तिच्यापुढे नतमस्तक झाले तर त्याने आयुष्यातला वेळ वाया जात नसून सत्कारणी लागणार आहे . अशाच एखाद्या अज्ञ जीवाला मैया लक्षात ठेवते आणि परिक्रमेला बोलवते की काय असा संशय घेण्यास पुरेशी जागा आहे ! टेंबे स्वामींचे चरित्र मी पूर्वी वाचले होते त्यात एक उल्लेख आहे की त्यांच्या गावाजवळून वाहणारी एक नदी त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि मला नाव द्या असे म्हणाली . त्यानंतर स्वामीजींनी तिचे नामकरण केले . परंतु याचा अर्थ प्रत्येक छोट्या-मोठ्या नदी नाल्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असा त्याचा अर्थ आहे ! हा भाव चित्तामध्ये ठेवून मी वाटेमध्ये येणाऱ्या कुठल्याही नदीला किंवा नाल्याला मनापासून नमस्कार करतो ! जसे आपल्यासमोर आलेल्या कुठल्याही माणसाला आपण नमस्कार किंवा राम राम किंवा हाय हॅलो करतो तसेच हे आहे . प्रत्येक नदीला जाता जाता आपण नमस्कार करावा म्हणजे या नद्या आपल्याला लक्षात ठेवतात असा माझा भोळा भाबडा भाव आहे . आजपर्यंत अनेक जीव घेण्या प्रसंगातून या नद्यांनी मला वाचवले आहे याचे कारण हेच तर नसेल ना ? नद्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे हे मान्य करावेच लागेल ! आणि नद्यांशिवाय आपले अस्तित्व शून्य आहे हे देखील स्वीकारावे लागेल !  या जगातील प्रत्येक मोठे गाव कुठल्या ना कुठल्या नदीच्या तीरावरच वसलेले आहे . नद्या मोठ्या होत जातात तसे शहरांचे आकार देखील मोठे होत जातात याचे कारण नदीतील वाहणारे पाणी आणि शहराची भरभराट यांचे थेट प्रमाण आहे . गुरुचे पूल खालून पार केले . पूर्वी दोनच पूल होते आता तीन पूल झालेले आहेत . या पुलावरून मैयाचे खूप विहंगम दर्शन होते . मी पूर्वी प्रत्येक वेळी जाताना वरून खाली कोणी परिक्रमावासी दिसतो आहे का ते शोधायचो . परंतु कधीच कोणी दिसले नाही याचे कारण आता परिक्रमा केल्यावर लक्षात आले आहे की लोक आता किनाऱ्याने जातच नाहीत . केवळ नर्मदापुरम येथील पुलावरून खाली पाहताना दिसलेल्या तीन परिक्रमा वाशींमुळे माझ्या आयुष्यामध्ये ही परिक्रमा घडली यावरून त्या काठाने चालण्याचे महत्त्व आपल्या लक्षात यावे ! त्या तिघांना काठ्या टेकत जाताना पाहिल्यावर माझ्या चित्तामध्ये जी कालवा कालव झाली ती मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही . परंतु तेच संकल्पाचे बीज ठरले . गोदावरी नदीच्या काठावर जळका नावाचे गाव आहे . इथे संत अन्वर बाबा नावाचे मुस्लिम समाजातील थोर शिवभक्त संत होऊन गेले . जन्माने मुसलमान असले तरी आयुष्यभर त्यांनी शंकराची आराधना आणि सेवा केली . हे त्रिकालज्ञानी होते . हे त्यांच्या भक्तांना सांगायचे . गोदावरी मातेला पार करताना मोकळ्या हाताने जाऊ नका . एखादे फळ घेऊन जा आणि ते जाता जाता तिला अर्पण करून नमस्कार करून मगच पुढे जा ! त्यामुळे आजही आम्ही गोदावरी नदी पार करताना मध्ये थांबून तिचे दर्शन घेऊन तिला एखादे फळ वगैरे अर्पण करून मगच पुढे जातो . माझे मित्र श्री बाळासाहेब वाल्हेकर यांनी अन्वर बाबांचे समाधी मंदिर बांधलेले आहे . इथे महादेवाची स्थापना केलेली असून नित्य वैदिक पद्धतीने पूजाअर्चा चालते .
जळका येथील साक्षात्कारी संत थोर शिवभक्त अन्वर बाबा .
नद्या या अशा रीतीने आपल्यासाठी उपकार आहेत हेच सार आहे . नद्यांना मलीन करणारा मनुष्य आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही . आणि नद्यांचे पावित्र्य जपणारा मनुष्य आयुष्यात योग्य मार्गाने प्रगत झाल्याशिवाय राहत नाही . 
भरूच येथील मैयावरचे पूल . पाण्याचा बदललेला रंग आपल्या लक्षात येईल . हा समुद्राच्या पाण्याचा रंग आहे .
पुलावरून काढलेले हे चित्र आहे . याच काठावरील मार्गाने चालत आम्ही मार्गक्रमणा केली .
वाटेमध्ये नर्मदा मातेला प्रदूषित करणारे असे अनेक छोटे मोठे ओढेनाले पाहिले . मन विषण्ण व्हायचे .बहुतेक हा ब्लॉग लिहीण्यामागची मुख्य प्रेरणा हे सर्व प्रदूषणच आहे . हे सर्व नर्मदा मातेच्या काठावर होत नसते तर कदाचित माझ्या हातून लिखाण देखील झालेच नसते . 
नवीन पुलाचे बांधकाम चालू असतानाचे चित्र
 पुलांची रचना सुंदर रीतीने केलेली आहे . हा नर्मदा मातेचा त्रिभुजप्रदेश मोडत असल्यामुळे इथे पूल बांधणे हे सोपे काम नाही . या पुलाच्या अभियंत्यांना मनापासून नमस्कार !
खालून जाताना या पुलाची भव्यता लक्षात येते .
असो .
हे पूल ओलांडून पुढे गेलो आणि डोके चक्रावून गेले इतका भव्य भूप्रदेश दिसू लागला ! शक्यतो किनारा छोटा असतो परंतु इथे कित्येक किलोमीटरचा किनारा दिसू लागला ! कुठे जावे काहीच कळेना . तुकाराम बुवा म्हणाले की सरळ पुलावर जाऊ आणि थेट अंकलेश्वर गाठू . परंतु मला असे काही करायचे नव्हते . अगदी शक्य होईल तेवढे काठाने चालून मला अंकलेश्वरला जायचे होते . त्यामुळे मी त्यांना सांगितले की आता पुढे काय करायचे असा प्रश्न पडला की नर्मदा मातेच्या सर्वात जवळ जाणारा रस्ता पकडून चालत राहायचे . तसे आम्ही केले आणि थोड्याच वेळात एक कोळी वाटेल भेटला . त्याने नेहमीप्रमाणे पुढे रस्ता नाही वगैरे सांगितले . परंतु काठाने चालण्याचा निर्धार सांगितल्यावर मग मात्र त्याने समोर असलेल्या सर्व संकटांची व्यवस्थित कल्पना दिली . इथे एक मोठे वर्तुळाकार वळण घेत एक नदी मैयाला येऊन मिळत होती . तिच्यामुळे एक सुंदर बेट तयार झाले होते . ते चालून एका ठिकाणी आम्हाला नदी पार करायची होती . संपूर्ण नदी खोल आहे फक्त या एकाच ठिकाणी पार करता येण्यासारखी करण्यात आलेली आहे . परंतु या जंगलातून आम्हाला ते ठिकाण सापडणार कसे ? त्या माणसाने अतिशय सुंदर झाडांच्या खुणा मला सांगितल्या ज्या शोधत शोधत बरोबर त्या ठिकाणापर्यंत जाता येणे सहज शक्य झाले . 
भरूच चा पूल ओलांडल्यावर लागलेली नदी . तिच्यामध्ये तयार झालेले सुंदर जंगलाचे बेट . आणि खाडी पार करावी लागते ती जागा लाल खुणेने दाखवली आहे . 
हे जंगल फारच सुंदर होते . इथे वन्य जीवन समृद्ध होते . वाटेमध्ये बोरांची भरपूर झाडे लागली . झाडे फार मोठी होती . आणि महाराष्ट्रातील बोरांना सर्व काटे उलटे असतात तसे नसून इथे काही काटे सरळ आणि काही काटे उलटे अशा फांद्या होत्या . काही ठिकाणी बोरे वाळत घातलेली दिसत होती . परंतु या संपूर्ण बेटावर एकही मनुष्य नव्हता . मध्ये एक कुटी आम्हाला लागली . परंतु तिथे बरेच दिवस कोणीच राहिले नव्हते असे लक्षात आले . एखाद्या साधूने साधनेसाठी काही काळ इथे वास्तव्य केले असावे . चातुर्मासामध्ये तर हे संपूर्ण बेट जलमग्न असते . किंवा चहू बाजूने पाण्याने वेढले जाते . मला हा परिसर खूप आवडला . त्या कोळ्याने आम्हाला फार महत्त्वाच्या काही सूचना केल्या होत्या ज्या मला सुरुवातीला अनावश्यक वाटल्या परंतु खाडी पार करताना त्यांचे महत्त्व कळले . त्याने मला आकाशाकडे पाहून भरती ओहोटीचे वेळापत्रक सांगितले . आणि मला म्हणाला की तुमच्याकडे तीन तास आहेत . मी सांगतो त्या बिंदूला जाऊन तीन तास वाट बघा आणि मगच खाडी पार करा . त्याच्या आधी करू नका . तसेच त्या भागात भरपूर मगरी आहेत . त्यामुळे काठावरती सावध बसा . आणि मगरी दिसत असतील तेव्हाच खाडी पार करा . प्रत्यक्षात गेल्यावर त्याचे म्हणणे किती योग्य होते याची मला जाणीव झाली . या नदीच्या काठावर प्रचंड गाळ साठलेला होता . त्यामुळे आत जाताना कसरत करावी लागत होती . पाण्याची पातळी खूप जास्त होती . मला असे वाटले की आता बहुतेक इथून परत उलटे फिरावे लागणार आणि पुलावरून जावे लागणार . भरती सुरू असल्यामुळे नदी उलटी वाहत होती . अखेरीस त्याने तीन तास थांबा हा सल्ला का दिला ते माझ्या लक्षात आले . आणि काठावरच शांतपणे आसन लावले . इतक्यात काठावर आसन लावू नका हा त्याचा सल्ला देखील आठवला आणि थोडेसे आत जंगलामध्ये एका झाडाखाली जाऊन आम्ही थांबलो . हे सर्व प्रत्यक्ष जीवनात उपयोगाला येणारे सल्ले देण्याचे या लोकांना जमते याचे कारण त्यांचे लौकिक शिक्षण झालेले नसते . लौकिक शिक्षणामध्ये माणसाचा अहंकार फुलविण्याचे काम केले जाते . आयुष्यात क्वचित कामाला येणारे किंवा कधीच कामाला न येणारे भरपूर माहितीचे साठे डोक्यामध्ये कोंबले जातात आणि तुम्ही खूप शिकलेले आहात हुशार आहात असा तुमचा गैरसमज करून दिला जातो . हा मनुष्य अडाणी असल्यामुळे त्याने आम्हाला अगदी बरोबर इथपर्यंत आणून सोडले होते आणि इथे राहून काय करायचे ते देखील मोजक्या शब्दात सांगितले होते . मी एक काठी घेतली आणि ती नदीमध्ये रोवली . पाण्याची पातळी किती वाढते आहे किंवा कमी होते आहे हे पाहण्याची माझी ही जुनी युक्ती होती . ती फळाला आली . आणि तीन तासाने बघता बघता पाण्याची पातळी दीड दोन फूट खाली गेली . त्याबरोबर ही खाडी पार करण्याचा निर्णय मी घेतला . तुकाराम सुरवसे माझ्यावर अत्यंत चिडले होते . झक मारली आणि तुझ्याबरोबर आलो असे त्यांनी मला खूप वेळा ऐकवले ! परंतु मी अत्यंत संयमाने त्यांना सांगत होतो की आता आपल्याकडे असलेल्या अर्ध्या तासात आपण जर ही खाडी पार केली नाही तर पुन्हा अडकून पडू . ओहोटी सुरू झाल्यामुळे मगरी बाहेर येऊन बसलेल्या असतात . तेवढ्या काळात नदी पार करणे आवश्यक होते . भरती किंवा ओटी सुरू असताना खालचा गाळ उधळला जातो त्याचा त्रास होऊ नये म्हणून मगरी बाहेर येऊन बसतात . किंवा पाण्यात जरी असल्या तरी त्यांना दिसायचे बंद होते . मला समोर मगरी बसलेल्या दिसतच होत्या . तुकाराम बुवा प्रथमच इतक्या काठाने चालल्यामुळे त्यांची पाण्यामध्ये उतरण्याची हिंमतच होईना . अखेरीस मी एक धाडसी निर्णय घेतला . मी माझे सर्व सामान उतरवून ठेवले आणि त्यांना चालत पलीकडे जाऊन दाखवायचे आणि परत यायचे असे ठरवले ! सुरुवातीचा चिखल खूपच विस्तारला होता त्यातून मी अक्षरशः पळत जाऊन पाण्यात उतरलो . आणि काठीचा अंदाज घेत घेत पुढे चालू लागलो . पायाखाली प्रचंड गाळ वाळू चिखल होता . त्यामुळे वेगाने चालत राहिलो . बघता बघता पाण्याची पातळी गुडघ्यापर्यंत मांडीपर्यंत पोटापर्यंत आणि छातीपर्यंत आली ! उजव्या हाताला काठावर बसलेल्या मगरींकडे माझे लक्ष होते .तिथे मगरी बसल्या आहेत हे मी तुकाराम बुवांना दाखवले नव्हते . अखेरीस पाण्याची पातळी पुन्हा कमी कमी होऊ लागली आणि मी पलीकडच्या काठावर पोहोचलो ! तिकडचा काठ उभा होता ! तिथून जोरात नर्मदेहरचा पुकारा मी केला ! आणि तुकाराम बुवांना म्हणालो की जाऊ का पुढे ? या तुम्ही मागून ! ते विनवणीच्या सुरात मला म्हणाले , " अरे नको बाबा !परत ये !आपण एकत्र जाऊ ! " आता गंमत पहा बर का ! जी नदी ओलांडायला प्रथम मला १५ ते २० मिनिटे लागली तीच नदी परत ओलांडून जाताना मी पाचच मिनिटात गेलो ! कारण मध्ये कुठलाही धोका नाही याची मला खात्री पटलेली होती ! सुरुवातीला जाताना माझे अनुमान माझी गती कमी करत होते . आता परत जाताना माझा अनुभव माझी गती वाढवीत होता ! दोघांनी आपापले सामान डोक्यावर घेतले . आणि तुकोबारायांना अक्षरशः फरफटत मी नदी पार करवली . त्यांनी त्यांच्या परिक्रमेमध्ये पार केलेली ही पहिली नदी ठरली . आणि माझी नर्मदा मातेच्या दक्षिण तटावर पाण्यात उतरून पार झालेली ही बहुतेक शेवटची नदी ठरली ! मगरी अजूनही आ वासून माझ्याकडे बघत होत्या . अगदी शेवटची दहा पावले राहिलेली असताना मला तुकाराम बुवांची गंमत करण्याची लहर आली आणि त्यांना मी त्या मगरी दाखवल्या ! तुकाराम बुवा अक्षरशः पळत सुटले आणि त्यांनी नदी पार केली ! माझी हसून हसून पुरेवाट झाली ! काठावर गेल्यावर त्यांनी काठी उगारून मला दम भरला ! की खोटे बोलून , इथे मगरी नाहीत सांगून मला नदी पार करवलीस .तुझ्यामुळे मी मेलो असतो तर काय केले असते ! परंतु तसेही तुकाराम बुवा विनापाश असल्यामुळे फार काही नुकसान झाले नसते असे मी म्हणालो आणि दोघेही टाळ्या देऊन देऊन हसायला लागलो ! ती नदी पार करण्याचा प्रचंड तणाव तुकाराम बुवांना आला होता तो आता निवळला आणि ते खुलले ! आमचे कपडे चिखलाने माखले होते . या भागातील पाणी फारच गाळयुक्त आहे . तरीदेखील मी आचमन करून घेतले तो भाग वेगळा ! परंतु पाणी प्रचंड मातकट आणि खारट होते . अर्धा समुद्रच समजा ना ! हे पाणी एक पेलाभर कुणी प्याले तर लगेच वमन करेल अशी त्याची चव होती . तशा अवतारामध्ये आम्ही समोरील शेत पार केले . शेतामध्ये एक घर दिसले म्हणून तिकडे गेलो . पोटात भुकेची आग पडली होती . तुकाराम महाराजांचा देह धिप्पाड आहे त्यामुळे त्यांना लगेच भूक लागायची . मी त्यांना सांगेपर्यंत त्यांनी पटकन जाऊन ती चूक केलीच ! जाऊन थेट घरातल्या मातेला विचारले की आम्हाला जेवायला मिळेल का ? त्यांची परिस्थिती गरिबीची दिसत होती . घरात बरीच मुले होती . ती आत मध्ये निघून गेली ती पुन्हा बाहेरच आली नाही . याचा अर्थ नाही असा असतो हे मी तुकाराम महाराजांना सांगितले . आणि पुन्हा असे थेट विचारू नये हे देखील त्यांना सांगितले . मी नंतर त्या म्हातारा मला बाहेरूनच मोठ्या आवाजात सांगितले की आम्हाला भोजन नको आहे फक्त अंगावरचा चिखल धुण्यासाठी थोडेसे पाणी मिळाले तर बरे होईल . तिने खिडकीतूनच एक टाकी दाखवली . तिथे जाऊन दोघांनी स्नानच केले . कपडे धुऊन पिऊन टाकले . तुकाराम बुवांना अजूनही थोडीशी आशा होती की भोजन मिळू शकेल . परंतु अशाच ठिकाणी आपल्या संयमाची परीक्षा असते हे मोहन साधूने मला सांगितले होते तसे मी त्यांना सांगितले आणि दोघे पुढे निघालो . थोड्या वेळाने तिचा नवरा देखील आला . तो बोलण्याच्या अवस्थेत दिसत नव्हता . याचाच अर्थ आपण समजून घ्यावा . त्या बिचार्‍या माउलीला किती वाईट वाटले असेल ! घरात भरपूर मुले जन्माला घालून एक दाणाही शिल्लक न ठेवणारा नवरा तिला मिळाला होता . त्यामुळे आल्या गेल्या लोकांची सेवा इच्छा असूनही तिला करता येत नव्हती . अर्थात या मार्गाने कोणीच परिक्रमा वासी जात नाहीत हे देखील खरे असले तरी कधी नव्हे ते कोणीतरी परिक्रमा वासी आला आणि विन्मुख गेला याचे दुःख तिला कायम सतावणार होते . म्हणून कायम लक्षात ठेवावे की आपण होऊन कधी कोणाला भोजन प्रसादी किंवा काहीही मागू नये . आपल्याला जे योग्य आहे ते मैय्या देतेच . हा केवळ परिक्रमेपुरता नियम नसून आयुष्यामध्ये देखील हा नियम पाळला तरी चांगलाच आहे . नुकतेच मी एका प्रसिद्ध वैद्य माताराम कडे भोजनासाठी गेलो होतो . त्यांनी मला बरेच पदार्थ वाढले . परंतु मी वर सांगितलेला हा नियम विसरलो आणि एक भाजी त्यांना मागितली . नेमकी तीच भाजी त्यांनी थोडीशीच केलेली असल्यामुळे संपली होती . त्यांना त्या गोष्टीचे फार म्हणजे फार वाईट वाटू लागले . इथे खरे म्हणजे त्यांची काही चूक नव्हती तर चूक माझी होती . परंतु आता काय वाढू असे विचारल्यावर मी त्यांना जे असेल ते काहीही वाढा असे न म्हणता विशिष्ट पदार्थाचे नाव सांगितले ही फार मोठी चूक मी केली . त्यामुळे त्यांना त्या अन्नदानाचा आनंद पुरेसा मिळू शकला नाही . मला जरी भोजनाचा भरपूर आनंद मिळाला तरी त्यांना तो माझ्या एका मूर्खपणाच्या मागणीमुळे मिळू शकला नाही याचे शल्य कायम मनात राहणार . असे होऊ नये म्हणून कधीही कोणालाही काही ही मागूच नये हेच उत्तम . देणारा योग्य वेळी योग्य ते देत राहतो . इंग्रजी मधील एक म्हण अगदी तंतोतंत लागू होत नसली तरी याच आशयाची आहे . Beggars can't be choosers. परिक्रमावासी हा काही बेगर नाही , परंतु बेघर नक्की आहे !  असो .
पुढे आम्ही मार्गस्थ झालो . तुकाराम बुवांना देखील मी समजावून सांगितल्यावर थोडेसे वाईट वाटले . आणि दोघेही परमेश्वराचे नामस्मरण करत भजन करत वाटचाल करू लागलो . मी त्यांना एक युक्ती शिकवली ! आपल्याला भूक लागली की विविध पदार्थांनी भरलेले ताट हातात घेऊन आपण जेवत आहोत अशी कल्पना करायची ! सुमारे अर्धा तास अशा पद्धतीने मी त्यांना जेवू घातले ! आणि अक्षरशः दोघांनाही ढेकर आले ! हसत खेळत भजन करत आम्ही पुढे चालत राहिलो . आता आम्हाला अंकलेश्वर शहरात जायचे होते . एक मोठा महामार्ग आडवा आला . त्या रस्त्याने अंकलेश्वर शहरात जाता येत होते . मोठमोठ्या गाड्या वेगाने जाताना पाहून काळजात धस्स होत होते ! कधीकाळी मी देखील असाच वेगवान गाड्या हाकणारा मनुष्य होतो ! परंतु आता मात्र या गाड्या परक्या वाटत होत्या ! मी या प्रत्येक गाडीत बसलेला प्रत्येक मनुष्य कुठून कुठे निघाला आहे याचा विचार करत होतो ! बहुतांश लोकांना ते कुठून कुठे निघाले आहेत आणि कशासाठी चालले आहेत हेच माहिती नसते ! केवळ हा निघाला आहे म्हणून तो निघालेला असतो आणि ती करते आहे म्हणून ही देखील करत असते ! सगळी गंमतच आहे ! अशातच एक गंमत झाली . हा रस्ता अंकलेश्वरला जातो आहे हे मला लक्षात आलेच होते . इतका मोठा रस्ता शहराकडेच जाणार . परंतु तुकाराम महाराजांनी एका कारवाल्याला हात केला आणि तो पुढे जाऊन थांबला . त्यांना हिंदी बोलता येत नसल्यामुळे ते मराठीमध्ये त्याला पत्ता विचारू लागले . हा मनुष्य अतिशय मग्रूर होता . तो तुकाराम महाराजांना उलटे पालटे बोलून झापू लागला . सुदैवाने तुकाराम बुवांना तो काय बोलतो आहे काहीच कळत नव्हते त्यामुळे त्यांनी मला बोलवून घेतले आणि म्हणाले हा काय म्हणतो आहे पहा रे !  तुकाराम बुवा फुटपाथ वर उभे होते आणि कार फुटपाथला दाबून लावलेली होती . मी ड्रायव्हरच्या बाजूने गेलो आणि स्वतः ती गाडी चालवणाऱ्या मालकाच्या काचेवर टकटक केली . त्याने काच खाली घेतानाच शिव्या घालायला सुरुवात केली . "तुम भिकारी लोग अभी भीक मांगने का नया नया तरीका ढूँड के निकाल रहे हो । You beggars! Get lost from here! " खरे म्हणजे तुकाराम बुवांनी याला का थांबवले मला तेच कळत नव्हते . पण अगदी त्याच्या गाडीच्या दिशेने जात त्यांनी हात केल्यामुळे याला थांबावे लागले होते . आवडी क्यू ७ गाडी हा चालवत होता . आणि मोठा व्यापारी असावा असे दिसत होते . मी माझे ठेवणीतले अस्त्र काढले . आंग्लास्त्र ! याने कोणालाही घायाळ करता येते ! 
मी त्याला विचारले , " कौन भिकारी है ? " "तुम लोग ! परिक्रमा के नाम पर भीक मांगते फिरते हो । Bloody beggars!" तावातावाने तो उत्तरला . मी सुरू झालो . "व्हॉट इस द ब्रँड ऑफ युवर कार सर ? " " ऑडी " तो म्हणाला . "इट्स नॉट ऑडी ! इट्स आउडी . यू डोन्ट इव्हन नो द एक्झॅक्ट प्रोनउन्सिएशन ऑफ युवर कार्स ब्रँड ब्रो अँड यु आर टेलिंग मी दॅट आय एम अ बेगर ! Huh ? Okay, do you know what a pedal l shifter is? And where is located? " तो मनुष्य प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहू लागला . "Damn! you don't even know that your car Audi Q7 is having pedal shifters on your steering wheel console! And you are telling me that I'm a beggar! " तो माणूस आवंढे गिळू लागला ! त्याला कुठे एवढं इंग्लिश येत होतं ! माझा उत्साह अजून वाढला ! " Have you ever used cruise control of your car? Or do you even know where it is and how to operate it? " मी सुरूच ! समोरचा पार काळवंडला ! " Are leave it man! If you stop paying EMI of your car will it be yours or will your bank take it away? You don't even own your own car. You will have to beg for your car to your bank! You beggar! Get lost! " तो बिचारा तोंड पाडून निघून गेला . तुकाराम महाराजांना काय झाले काहीच कळले नाही . ते म्हणाले काय झाले ? मी म्हणालो , " तो माणूस सांगत होता की अंकलेश्वर आता थोडेच राहिले आहे ! चला जाऊ अंकलेश्वरला !  " "मग तो एवढा चिडला का होता ? " "तो म्हणाला की तुम्ही रस्त्यावरून कशाला चालत आहात ? किनाऱ्याने का चालत नाही ? म्हणून मी त्याला सांगितले की आमच्या तुकाराम महाराजांना भूक लागली आहे म्हणून अंकलेश्वर च्या एखाद्या आश्रमात आम्ही निघालो आहोत ! " "पण इतका वेळ काय बोललात ? " "तो माणूस सांगत होता समोर उसाचा रस मिळतो आहे तो प्या ! तुकाराम महाराज पैसे भरतील ! " आणि आम्ही दोघेही हसायला लागलो ! माझे छद्मयुक्त हसू होते आणि तुकाराम महाराजांचे निर्मळ हास्य होते ! त्यांना ते सर्व देखील खरे वाटले होते !  सुशिक्षित ही जातच बेकार राव ! अज्ञानात खरेच सुख आहे ! हाहाहा ! 
पुढे खरोखरीच रस वाल्याने आम्हाला आवाज दिला आणि एक एक पेला रस पाजला .  याच्याकडे काचेचे ग्लास आणि प्लास्टिकचे ग्लास असे दोन्ही होते . मी त्याचे प्रबोधन करून प्लास्टिकचे ग्लास न वापरण्याची विनंती केली . परंतु त्याने सांगितले की जीवाच्या भीतीने लोक काचेच्या ग्लासाने रस पीत नाहीत तर युज अँड थ्रो प्लास्टिकचा ग्लास च  मागतात ! नका रे असं करू मित्रांनो ! प्रत्येकाचा मृत्यू कधी येणार हे ठरलेले आहे . असे किरकोळ काहीतरी होऊन मरण्या इतके मरण स्वस्त नाही . बिनधास्त जगा ! काचेच्या ग्लासातूनच चहा किंवा उसाचा रस पीत जा ! प्लास्टिकच्या ग्लासामुळे तुम्ही जगाल परंतु पर्यावरण मरेल ! फार वाटले तर स्वतः ग्लास धुवून घ्या . मी कुठेही बाहेर काही पिताना माझ्या बाजूचा ग्लासाचा भाग स्वच्छ पुसून घेतो . किंवा चहा पिताना सर्व लोक उजव्या हातात कपाचा कान धरून चहा पितात . क्वचित कुणी डाव्या हातात कान धरून पितात . मी दोन्हीच्या मध्यभागातून चहा पितो जिथे कोणीच तोंड लावत नाही . त्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता कमी होते .म्हणजे मी चहा पिताना कपाचा कान माझ्याबरोबर समोर असतो . अशा काही छोट्या सवयी लावल्या की आपण प्रदूषण कमी करण्यामध्ये अंशतः तरी हातभार लावू शकतो . उसाच्या रसाने चांगली तरतरी आली .
समोरच एक मंदिर होते तिथे काही काळ आम्ही थांबलो .
महामार्ग वरील हेच ते मंदिर जिथे काही काळ आम्ही थांबलो होतो
 इथे एक मोठा उड्डाणपूल सुरू होत होता . त्याच्या पलीकडून जाण्यासाठी शेतातला रस्ता आहे असे मला दिसले म्हणून मी रस्त्या ओलांडला . इथे पुलाच्या खाली ओळीने काही लोक मच्छरदाण्या झोपाळे वगैरे विकत बसले होते . त्यातील एक जण पळतच माझ्याकडे आला आणि म्हणाला बाबाजी आप मच्छरदाणी खरीदलो . मी म्हणालो अरे मी परिक्रमे मध्ये आहे . मला त्याची गरज नाही . तो क्षणाचाही विलंब न लावता म्हणाला , "आपको नर्मदा मैया की कसम है आप मच्छरदाणी रख लो । आपसे पैसा नही लूंगा । " आता मोठीच पंचायत आली . नर्मदा मातेची शपथ कशाला घालायची ! मी त्याला म्हणालो , " ये आप कितने का बेचते हो ? " " ९५० का एक बाबा " मी झोळी मध्ये पाहिले तर माझ्याकडे पाचशे रुपयाची एकच नोट होती . ही कोणी कधी दिली मला आठवत नाही . 
अंकलेश्वर रस्त्यावरील उड्डाणपूल आणि मच्छरदाणी विक्रेता . इथून उजवीकडे दिसणाऱ्या जंगलातून आम्ही मार्ग काढला
हा ! आठवले . पारा गावातल्या तरुणाने मला दिली होती .नावेत बसताना देण्यासाठी . मी त्याला म्हणालो की माझ्याकडे फक्त पाचशे रुपये आहेत त्यामुळे मला तुझी मच्छरदाणी नको . परंतु तो मागेच लागला . पैसे अजिबात देऊ नका असे म्हणत होता . त्या मच्छरदाणीची घडी केली की साधारण दोन फुटाचा गोल तयार व्हायचा . एक गोलाकार पिशवी आणि तिला हँडल होते त्यात ती बसायची . आता ही पिशवी हातात घेऊन कुठे फिरायचे ? तो म्हणाला तुम्हाला मी दप्तराला मागे बांधून देतो . पण ते देखील सोयीचे नव्हते . अखेरीस मी माझी पाठ आणि दप्तर याच्या मधल्या फटीमध्ये ती पिशवी खोचून दिली आणि पाचशे रुपये त्याच्या खिशात कोंबून पुढे चालायला लागलो . तुकाराम बुवांना देखील मच्छरदाणी घ्यायची होती परंतु त्यांना तो किंमत कमी करून देईना . अखेरीस त्याला चार बोल ऐकवून ते पुढे आले .
इथे एक गंमतच झाले ! फ्रेंच भाषेमध्ये ज्याला दे जा वू असे म्हणतात , अर्थात एखादी घटना पूर्वी घडून गेली आहे असा भास आपल्याला होतो तसे काहीसे मला झाले . अंकलेश्वर च्या रस्त्यावरून चालताना वरती एक पाटी मी पाहिली यावर लिहिले होते की या मार्गाने महात्मा गांधी दांडी यात्रेला गेले होते . आपण रत्नसागरामध्ये ज्या ठिकाणी नावेत बसतो तिथून दांडी गाव खूप जवळ आहे . परंतु ही पाटी मी पूर्वी कधीतरी पाहिली आहे असे मला वाटले . आणि अचानक मला आठवले ! काही वर्षांपूर्वी मी माझ्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील आता उद्योगपती असलेल्या काही मित्रांच्या सोबत रिबाउंड स्पोर्ट्स या नावाने टेनिस आणि क्रिकेटच्या सरावासाठी लागणारी उपकरणे बनवून विकायचो . त्यावेळी ती उपकरणे खूप गाजली होती . आणि देशा परदेशातून त्याला चांगली मागणी होती . त्यावेळी अंकलेश्वर येथील एका टेनिस अकॅडमीने ते उपकरण घेण्यासाठी रस दाखविला होता . आनंद बडोदा अहमदाबाद गांधीनगर या भागातील उपकरणांची डिलिव्हरी देण्यासाठी मी आलेलो असताना इथल्या टेनिस कोचला भेटायला गेलो होतो . त्याच अकॅडमी समोरून आता मी परिक्रमा वासी म्हणून चालत निघालो होतो !  ती दोन वेगळी आयुष्यं होती ! पण जगणारा आणि अनुभव घेणारा एकच होता ! आणि जसा आहे तसाच होता ! हीच गुरुकृपा दुसरे काय ! मी तिथून चटकन पुढे निघून गेलो . चुकून मागून त्या सरांनी मला पाहिले असते तर अजून डिलिव्हरी का नाही दिली म्हणून मागे लागले असते ! टेनिस जगतामध्ये त्या काळात माझ्या बऱ्यापैकी चांगल्या ओळखी निर्माण झालेल्या होत्या . आणि त्या केवळ व्यावसायिक नव्हत्या हे विशेष . 
राज ठाकरे हौशी टेनिस खेळाडू आहेत . त्यांना शिवाजी पार्क मैदानावर टेनिसचे धडे देताना प्रस्तुत लेखक .
हा प्रकार सुरू आहे हे प्रसार माध्यमांच्या लक्षात आल्यावर सर्वजण तिथे गोळा झाले आणि माध्यमांनी दिवसभर हा कार्यक्रम टीव्हीवर दाखवला होता ! 
एक मराठी मनुष्य टेनिस साठी काहीतरी करतो आहे याचा राज ठाकरेंना अभिमान वाटला होता .
भारतातील तत्कालीन क्रमांक एक आणि क्रमांक दोन टेनिस खेळाडू रामकुमार रामनाथन आणि बालाजी यांच्यासोबत तमिळनाडूमध्ये प्रस्तुत लेखक . हे दोघेही माझे खूप चांगले मित्र आहेत .विशेषतः मी तमिळनाडूमध्ये नवीन असताना याने मला खूप सहकार्य केले होते . 
भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेस याला देखील स्पर्धांच्या निमित्ताने भेटणे व्हायचे .
अंकलेश्वर येथील टेनिस प्रशिक्षकांशी बोलताना सुद्धा नर्मदा मातेविषयीच आमच्या गप्पा झाल्या होत्या हे मला आठवते . अगदी पुढे फोनवर जरी कधी बोलणे झाले तरी नर्मदा मातेचा विषय काढल्याशिवाय ते बोलणे पूर्ण होत नसे . परंतु परिक्रमेमध्ये मी स्वतः कधीतरी येईन असे मला तेव्हा स्वप्नातही वाटले नव्हते हे मान्य केले पाहिजे .आणि तेही चालत येईन हे तर स्वप्नवतच होते . कारण मी तिथे टेनिस यंत्राचा डेमो द्यायला आणि व्यवसाय विस्तार विषयक चर्चा करायला गेलो होतो . व्यावसायिक भागीदार मित्राच्या शोफर ड्रीव्हन आलिशान कार मधून गेलो होतो . तरी देखील तेव्हा मला मी खूप लांब आलो आहे असे वाटले होते . आणि आता मी सहज कित्येक मैल चालत सहज तिथपर्यंत तर आलो होतोच परंतु तिथून पुढे सुद्धा निघून गेलो होतो ! आपल्या क्षमतांची आपल्याला नव्याने ओळख करून देण्याचे पुण्याचे काम नर्मदा परिक्रमा नक्की करते .
कधीकाळी टेनिस क्षेत्राशी इतक्या जवळून निगडित असल्यामुळे अंकलेश्वर येथील टेनिस कोच ने मला पाहू नये अशी मी नर्मदा मातेला प्रार्थना केली !  आणि शेतातल्या एका मार्गात घुसलो .
व्यावसायिक आयुष्याचा आणि त्यातल्या खोट्या उपचारांचा  मला प्रचंड कंटाळा आलेला होता.त्याचे स्मरण सुद्धा मला नको होते .आपण चांगला रस्ता सोडून शेतात का जातो आहोत हे तुकाराम महाराजांना कळेना . परंतु तो मार्ग जवळचा देखील होता .तुकाराम बुवांचे एक चांगले होते .त्यांना एकदा एक मार्ग समजावून सांगितला की ते का कू करत नसत तर शांतपणे आपल्या मागे चालत येत असत. शेतातील मार्ग चालत आम्ही एका यवनाक्रांत रस्त्याने चालत रामकुंड गाठले ! हे मोठे पौराणिक स्थान होते !  ही तपोभूमी होती . इथे चांगलीच स्पंदने जाणवत होती . इथे फार मोठा उत्सव सुरू आहे असे लक्षात आले ! रामकुंड माझ्या कल्पनेपेक्षा खूप वेगळेच निघाले ! 





लेखांक एकशे आठ समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. आई नर्मदे हर बाबाजी 🙏
    अतिशय प्रवाही लेखन. वाचताना उदंड आनंद होतो.

    उत्तर द्याहटवा
  2. नर्मदे हर गुरुजी ! आपल्यासारखे सक्रिय वाचक आणि मार्गदर्शक हेच या ब्लॉगचे बळ आहे !

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच अलौकिक नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  4. समोरील मानसिक परिक्रमेची आतुरता लागलेली असते आपल्या वर मैयाची असीम कृपा आहे. आपले प्रत्येक बाबतीत ले धाडस, बुद्धीमत्ता अफाट.

    उत्तर द्याहटवा
  5. कोहम बाबाजी सादर नमस्कार नर्मदे हर
    मी प्रदिप कुलकर्णी आपल्या लेखांचा नियमित वाचक व प्रशंसक आहे
    मला माझ्या व्यवसायात सिंगल युज प्लॅस्टिकच्या पिशव्या वापराव्या लागतात आपण आज प्रसारित केलेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे जर काही टेक्नॉलॉजी वापरून त्या प्लॅस्टिक चा पूर्नवापर शक्य असेल तर मला त्या संबंधी काम करायची इच्छा आहे क्रुपया आपण मला असा संदर्भ द्या माझा चल ध्वनी क्रमांक ९८२३९१३४७४ आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नमस्कार प्रदीप जी ! आपल्याला नक्की संपर्क करतो . थोडेसे लिखाण हातागळे झाले की भाष करतो . या संदर्भात काम करणाऱ्या माणसांशी तुम्हाला जोडून देतो .

      हटवा
    2. धन्यवाद नमस्कार नर्मदे हर

      हटवा
  6. नर्मदेहर🙏 मला माईने ही सर्व ठिकाणे तुमच्या मार्फत दाखविली व ज्या काही जागी गेलो नव्हतो तेथे नेले, premium परिक्रमा कळाली, ही माहीती अत्यंत उपयुक्त व स्वतः माई सांगते आहे असंच वाटतंय.
    माझी वही हरवली,बीलखेडी गावा पूर्वी, उत्तर तटावर, तीही तिचीच इच्छा असं मी समजतो.🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  7. नर्मदे हर आपले लेख वाचून मातेची ओढ लागली परंतु परिस्थिती आणि आरोग्य यामुळे जाणे होणार नाही तरी माता स्वयं ध्यानीमनी नसताना घरी आल्या त्यांची पूजा करून देवाऱ्यात स्थापन केलं एकदा परिक्रमा करता यावी हीच इच्छा आपण सर्व देवतांचे दर्शन घडवत आहात सर्व पुण्य आपणास मिळो पुढील भागांसाठी कासावीस होतो 🌹🙏❤️

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर