लेखांक १०७ : झगडिया मढी चे जगदीश महाराज

मढी हे एक छोटेसे गाव आहे . झगडिया जवळचे मढी म्हणून लोक याला झगडिया मढी म्हणतात . परंतु या मढी गावातील सर्वात प्रसिद्ध कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे मढी गावातला नर्मदा परिक्रमा वासी सेवा आश्रम ! मी ज्या घाटावर आलो त्याच्या शेजारीच हा आश्रम होता . या आश्रमामध्ये गेली अनेक वर्ष अखंड रामनाम जप आणि अखंड तुलसी रामायण पारायण सुरू आहे ! अहो रात्र हे दोन्ही संकल्प सुरूच आहेत ! साधुसंतांचा अतिशय आवडता असा हा आश्रम आहे ! या आश्रमामध्ये सर्वसामान्य लोक येऊन राहू शकत नाहीत . केवळ परिक्रमेमध्ये असलेले परिक्रमावासी आणि भ्रमणामध्ये असलेले साधुसंत इथे राहू शकतात . असा नियम नर्मदा खंडातील अन्य कुठल्या आश्रमात फारसा दिसत नाही . परंतु त्याच कारणामुळे या आश्रमाचे पावित्र्य आणि वातावरण अतिशय अद्भुत आहे ! वेगळे आहे !  आश्रमामध्ये पहिले पाऊल ठेवल्यापासून तुम्हाला हे जाणवायला सुरुवात होते ! एका प्रचंड वृक्षाच्या शाळेमध्ये आश्रमाचे प्रवेशद्वार होते . प्रवेशद्वार म्हणजे मोकळी जागा ! या आश्रमाला कुंपणे भिंती काहीही नाही ! मुक्त प्रवेश आहे ! तरीदेखील तुम्हाला जाणवते की आश्रमाची सीमा आता सुरू झालेली आहे ! अशी जबरदस्त स्पंदने आत मध्ये आहेत . आत मध्ये गेल्या गेल्या उजव्या बाजूला एका छोट्याशा शिवमंदिरामध्ये अखंड रामायण पारायण गेली अनेक वर्षे सुरू आहे ! त्याचे ध्वनी आणि स्पंदने लगेच आपल्याला जाणवतात ! माझे भाग्य इतके थोर की आश्रमात गेल्या गेल्या समोर जे भोजनगृह होते त्याच्या बाहेर खुर्ची टाकून स्वतः जगदीश महाराज बसलेले मला दिसले ! अतिशय साधी राहणी असलेले जगदीश महाराज , परंतु पाहता क्षणी मला जाणवले की हेच या आश्रमाचे प्रमुख असावेत ! मी त्यांच्याबद्दल काही ऐकलेले नव्हते तरी मला हे जाणवले हे विशेष ! पांढरी लुंगी गुंडाळलेली . सावळा वर्ण . प्रचंड जटांचा व्यवस्थित गुंडाळून ठेवलेला संभार ! त्यावर बांधलेला पांढराशुभ्र फेटा ! साधू जीवनाचे सार असलेले स्मितहास्य चेहऱ्यावर सतत विलसत असलेले ! डोळ्यामध्ये प्रचंड करूणा ! आवाजामध्ये मार्दव . परिक्रमावासींच्याबाबतीत असलेला पूज्यभाव प्रत्येक कृतीतून दिसणारा . कडक शिस्त . तरीही आवाजात कुठलाही चढ-उतार नाही ! शांतपणे सर्व काही सांगणार . पाहता क्षणी एखाद्याला वाटावे की यांच्या चरणाशी बसून आयुष्यातील सर्व न सुटलेली गणिते या माणसाकडून सोडवून घ्यावीत ! निस्पृहता इतकी यांचा एकही व्यवस्थित घेतलेला फोटो मला इथे टाकायला सापडलेला नाही ! कारण हा माणूस असा खुर्चीत कधी बसतच नाही ! माझे काय थोर भाग्य असेल माहिती नाही परंतु पाच मिनिटांसाठी महाराज खुर्ची मध्ये आरामात बसलेले मला सापडले ! मी लगेच जाऊन त्यांना दंडवत प्रणाम केला . त्यांनी देखील नमस्कार केला आणि म्हणाले परिक्रमावासी ने केलेला नमस्कार घेऊ नये ! एका परिक्रमेचा बोझ साधू वर चढतो ! मी त्यांच्या पायाशी बसलो . महाराज म्हणाले , " कैसे हो ? " मी उत्तरलो "स्वस्थ हॅूँ महाराज । मैया की असीम कृपा है । अनुभव कर रहा हूँ ।" "कहा से आये हो ?और कहा जाओगे ? " महाराजांनी विचारले . आणि त्यांच्या चेहऱ्यावर मी काय उत्तर देतो आहे ते ऐकण्याची उत्सुकता मला स्पष्ट पणे दिसली ! "वही तो आपसे पूछने के लिए आया हूँ महाराज । " मी म्हणालो . महाराज मोठ्याने हसले ! "पक्के गुरु के चेले लगते हो ! " मी आपला हात जोडून बसून राहिलो . इतक्यात चेतराम सुद्धा आला . महाराजांशी न बोलता थेट माझ्याशी येऊन गप्पा मारू लागला , " कहा से आया रे तू ? " वगैरे वगैरे सुरु झाले . मी त्याला अधिक खुणे ने इशारा केला की महाराजांना नमस्कार कर . त्याच्या लक्षात येत नाही पाहिल्यावर वैखरीमध्ये सांगितले , " चेतराम भगत जी , जगदीश महाराज का चरण स्पर्श करिये । " मग हा पठ्ठया पाया पडला ! हे साधे सोपे गणित असते . सर्व क्षेत्रात लागू होणारे आहे . आपण जेव्हा समूहामध्ये असतो तेव्हा जी व्यक्ती ज्ञानाने ,अनुभवाने किंवा वयाने ज्येष्ठ आहे , श्रेष्ठ आहे ,तिचा आपण मान राखतो आहोत असे दर्शवणारी कृती सर्वप्रथम आवर्जून करावी . त्याने आपल्याला काहीही कमीपणा येत नाही . उलट तिथे उपस्थित अन्य लोकांना लक्षात येते की इथे जेष्ठ कोण आहे . "आप जानते हो इन्हे ? "महाराजांनी मला विचारले . चेतराम ला सावरून घेत मी महाराजांना सांगितले , " जबलपूर के भीकमपूर में इन्होंने बहुत बढीया सेवा करी थी महाराज । और तो और शूल पाणी की संपूर्ण झाडी किनारे किनारे चल के आये है ! " महाराज चेतरामकडे कौतुकाने पाहू लागले ! महाराज कौतुकाने पाहत आहेत हे पाहिल्यावर मला अजूनच जोर चढला ! मी म्हणालो , " इनके तो नाम मे ही राम है । चेतराम ! " लहान मुले जशी मोठ्या मोठ्या बाता मारतात आणि मोठी माणसे जणूकाही त्यांना माहितीच नव्हते असं दाखवत कौतुक करतात तसे महाराजांचे सुरू होते ! "इनका और एक नाम चंदन भी है । " मी सुरूच राहिलो ! "अच्छा ? चंदन नाम है इनका ? " जगदीश महाराज म्हणाले , " फिर तो घिसके देखना पडेगा ! " चंदनाचे हास्य खूपच लोभसवाणे होते ! एखाद्या तान्ह्या बाळासारखे तो मनापासून हसायचा !तसा तो हसू लागला ! त्याच्या पत्नीने देखील त्याच्या या हास्यावर भाळूनच लग्न केलेले होते असे त्याने मला सांगितले ! बहुतेक त्यामुळेच त्याच्या जीवनातले हास्य कायमचे हरपले होते !  "आप दोनो साथ में परिक्रमा कर रहे है ना ? " जगदीश महाराजांनी विचारले . चंदन म्हणाला "हा महाराज " मी म्हणालो , "नही महाराज । हम दो लोगे परिक्रमा मे है । मै और मैया । " महाराजांना काय लक्षात यायचे ते लक्षात आले . मी चंदन ला म्हणालो तू मला जे जे काही विचारत होतास ते सर्व महाराजांना विचार . तुला महाराज बरोबर मार्ग दाखवतील . महाराज म्हणाले , " अभी आराम से आसन लगाओ । चाय पानी पाओ । भजन करो । आनंद लो । हम कही नही जा रहे । इसी स्थान पर रहते है । बाद मे बहुत बाते करेंगे । " आणि महाराज खुर्चीतून उठले . एका सेवकाला आम्हाला परिक्रमावासींची निवास व्यवस्था कुठे आहे ते दाखवण्यासाठी आमच्यासोबत पाठवले . मी महाराजांना पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला . अशी खूप कमी ठिकाणे असतात जिथे तुम्हाला सर्व झोकून देऊन साष्टांग नमस्कार करावासा वाटतो . जगदीश महाराज तसे होते ! आश्रमाला लागून प्रचंड मोठी केळीची बाग होती . त्यातून गार वारे येत होते . बागेच्या शेजारीच एक मोठे सभागृह परिक्रमावासींसाठी आरक्षित ठेवण्यात आले होते . मी येण्यापूर्वीच आत मध्ये बरीच माणसे येऊन राहिली होती . मी एका बाजूला आसन लावले ,परंतु थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले की तिथे प्रचंड लाल मुंग्या निघाल्या आहेत . म्हणून मी सभागृहाच्या मधोमध दोन खांबांच्या मध्ये आसन लावले . इतक्यात महाराज स्वतः दोन कप गरमागरम काढा घेऊन तिथे आले . आश्रमात आलेल्या प्रत्येक परिक्रमावासीला सर्वप्रथम काढा पाजला जातो . त्यानंतर महाराज प्रत्येकाची स्वतःने जातीने विचारपूस करायचे आणि प्रत्येकाला स्वतः नीट जागा मिळाली आहे की नाही ते पाहून घ्यायचे . महाराज निर्व्यसनी होते . सुपारीच्या खांडाचे देखील त्यांना व्यसन नव्हते . अशा महाराजांचे दर्शन घेऊन सुद्धा बिचारा चेतराम त्याचा माल शोधायला निघून गेला . मी आश्रमातील सर्व मंदिरांची दर्शने घेतली . प्रवेश केल्या केल्या डाव्या हाताला नर्मदा मातेचे आणि प्रभू रामचंद्रांचे मंदिर होते . रामाच्या समोर अखंड रामनाम जप गेली अनेक वर्ष सुरू आहे ! एक मनुष्य थकला की दुसरा येऊन बसतो ! असे दिवस-रात्र चालू राहते . मी देखील मढीतील वास्तव्यामध्ये शक्य होईल तेव्हा इथे बसून जप केला . नंतर समोर जाऊन रामायण देखील वाचले . त्यातला आनंद काही वेगळाच ! रामायण वाचले म्हणण्यापेक्षा रामायण गाईले म्हटले पाहिजे ! तुलसी रामायण खरोखरच अतिशय गेय आहे .  त्यानंतर गोशाळेचे दर्शन घेऊन आलो . खूप सुंदर पद्धतीने हा आश्रम महाराजांनी उभा केलेला आहे . नंतर महाराजांच्या सोबत जाऊन बसलो ! काही काही लोकांचे व्यक्तिमत्व चुंबकीय असते ! तसे या महाराजांचे काम होते ! मला महाराज म्हणाले , " तुम्हारे कपडे कीचडसे बहुत भरे हुए थे । कही किनारे किनारे तो नही आये ? " मी त्यांना माझा येण्याचा मार्ग सांगितला . त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरल्याचे मला दिसले ! "चलो कोई तो माई का लाल आया उसके गोद मे चल के ! लेकिन रास्ते मे मगरमच्छ नही दिखे ?  " " दिखे ना महाराज ! दो मगरमच्छ देखे हमने । "  महाराज जणू काही त्यांना माहितीच नाही असा भाव चेहऱ्यावर आणून मी सांगतोय ते ऐकत होते ! "महाराज मुझे ये आश्रम बहुत अच्छा लगा । मै वापस यहा जरूर आऊंगा ! " मी म्हणालो . त्याबरोबर महाराजांनी सांगितले , "अगर वापस यहा आना होगा तो परिक्रमा उठा के ही आना पडेगा ! यहा परिक्रमावासी छोडके और किसी को भी आने की अनुमती नही है ! " त्यांचा हा नियम ऐकून मला एका बाजूने आश्चर्य मिश्रित आनंद वाटला तर दुसरीकडे इथे सहज जाता येता कधी येता येणार नाही हे कळाल्यामुळे दुःख देखील झाले . साधुसंतांना मात्र इथे मुक्त प्रवेश होता त्यामुळे आश्रमामध्ये भरपूर साधू इकडे तिकडे फिरताना दिसत होते . कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर सर्वत्र भगवी वस्त्रे दिसत होती ! गोशाळेतील गाई फार म्हणजे फार सुंदर होत्या ! त्यांची इतकी निगुतीने निगा राखली होती की पाहतच राहावे असे वाटायचे ! प्रत्येक सेवेकरी साधूला आपापले काम चांगले ठाऊक होते . महाराज एका ठिकाणी गादी किंवा आसन लावून न बसता सतत पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे संपूर्ण आश्रमामध्ये फिरत राहायचे आणि प्रत्येक परिक्रमावाशीशी वैयक्तिक संभाषण करायचे .रामदास स्वामींनी दासबोधामध्ये निस्पृह माणसाची अथवा महंतांची लक्षणे जागोजागी सांगितलेली आहेत .ती सर्व लक्षणे यांच्या ठाई एकवटलेली होती ! मी महाराजांना प्रश्न विचारला की इथे मैया चे पाणी उलटे कसे काय वाहत आहे ? त्यांनी मोदींना लाखोली वहायला सुरुवात केली ! ते म्हणाले की सरदार सरोवर प्रकल्प झाला नसता तर हे पाणी असे कधीच उलटे वाहिले नसते . त्या धरणामुळे मैया चे पाणी कमी झाले आणि समुद्र तिच्यावर वरचढ होत आहे . महाराजांना सरदार सरोवर धरण ही कोणाची संकल्पना आहे हेच माहिती नसावे असे मला जाणवले . मी धरणाच्या लाभार्थीं विषयी बोललो आणि एक प्रकारे सरकारची बाजू सावरून घेतो आहे असे चित्र उभे राहिले . त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला शिव्या घालायला सुरुवात केली ! मी त्यांना विचारले की तुम्हाला हे सर्व कोण सांगते ? आश्रमात येणारे साधू घडामोडी सांगत असतात . महाराजांनी मला सांगितले . मी त्यांना राईट टू पीएमओ अर्थात पंतप्रधानांना आपण थेट काहीही लिहू शकतो याबद्दल माहिती दिली . महाराजांसाठी हे नवीन होते . त्यांची अशी मागणी होती की किमान समुद्राचे पाणी उलटे मैया मध्ये शिरू नाही इतक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जावा . तसे पत्र पंतप्रधानांना पाठविण्याची विनंती मी त्यांना केली . या विषयावर आमची चांगली तासभर चर्चा झाली . ज्या विषयातले आपल्याला काहीही ज्ञान नाही , ते आपल्याला माहिती नाही असे सरळ सांगण्याचा मनाचा मोठेपणा महाराजांजवळ होता हा गुण मला फारच भावला ! आणि हेही लक्षात आले की अर्धवट ज्ञान असलेले काही भटके भगत विनाकारण आपल्या अज्ञानातून प्रस्थापित सरकार विषयी भ्रम पसरवत फिरत असतात . त्यांचे गणित फार सोपे असते .आम्हाला आसरा द्या आणि आम्हाला प्रस्थापित करून द्या मग आम्ही तुमचे गोडवे गातो !अर्थात सर्वच क्षेत्रांमध्ये असे स्तुती पाठक आपल्याला पाहायला मिळतात ! "आम्ही तुम्हाला मोठे करतो .तुम्ही आमचा जयजयकार करा ! " असे ते सर्व गणित असते !मी जेव्हा जगदीश महाराजांना मला माहिती असलेल्या सरकारी कामांविषयी माहिती दिली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी आनंद व्यक्त केला की चला कोणीतरी काहीतरी करते आहे . महाराजांचे मत हे केवळ नर्मदा परिक्रमा या एका धार्मिक अंगाला धरून होते .त्यामुळेच धरणातून अतिरिक्त पाणी सोडावे असे त्यांचे म्हणणे होते परंतु असे सोडलेले गोडे पाणी एकदा समुद्राला जाऊन मिळाले पुन्हा त्याचा काहीही उपयोग होत नाही हे त्यांनी गृहीत धरलेले नव्हते.शिवाय शेतीच्या कामासाठी नर्मदा मातेच्या जलाचा कसा कुठे व किती उपयोग होतो हे देखील मी त्यांना उदाहरण देऊन समजावून सांगितले . आपल्या देशाचे विभाजन करण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय कटकारस्थाने कशी चालू आहेत याची देखील कल्पना मी महाराजांना दिली . अर्थात हे सर्व मी स्वतः होऊन त्यांना सांगत नव्हतो तर महाराजच मला सांगत होते की याबद्दल अजून थोडी माहिती मला दे . विशेषतः नर्मदा बचाव आंदोलन आणि त्यामुळे धरणाच्या बांधकामामध्ये झालेली प्रचंड खर्च वाढ वगैरे माहिती त्यांना सांगितल्यावर त्यांना आश्चर्य वाटले . साधू समाज इतका साधा आणि धकाधकीच्या जीवनापासून नामा निराळा राहणारा असतो की त्यांना बरेचदा देशात किंवा जगात काय घडामोडी चालू आहेत हे माहितीच नसते असे मला जाणवले . मग ते श्रेष्ठ का ? आणि मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे ? तर तो फरक असा आहे की आपत्काळाच्या प्रसंगी किंवा संकटाच्या प्रसंगी परमेश्वर सर्वांनाच इशारा करतो तो सर्वात आधी या साधू लोकांनाच ऐकू येतो . आणि त्यावेळी ते कुठलाही किंतु परंतु न बाळगता क्रिया करून मोकळे होतात . आपण मात्र विचार करत बसतो . साधू आणि सर्वसामान्य माणसां मधला परत एका वाक्यात सांगायचा तर तो म्हणजे , 'आपण विचार करत बसतो , आणि साधू कृती करून मोकळे होतात . '
या घाटावरून सूर्यास्त खूप छान दिसतो . तो पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते . अगदी नर्मदा मातेच्या पाण्यामध्ये सूर्य मावळतो आहे असे दृश्य दिसते . भरती आणि ओहोटीमुळे या भागातील किनाऱ्यावर एक असा पट्टा तयार झालेला आहे की ज्यात गवताची काडी सुद्धा उगवत नाही . तर केवळ गाळ आणि चिखल दिसतो . तसेच इथले नर्मदा जल खारे असल्यामुळे शक्यतो कोणी स्नान करत नाही . तरीदेखील स्नान करायची इच्छा कोणाला असेल तर त्यासाठी संरक्षक साखळ्या बांधलेल्या आहेत . त्याच्यापुढे जाणे धोक्याचे आहे कारण पाण्याला प्रचंड प्रवाह असतो . भरतीच्या वेळी उलटा प्रवाह आणि एरव्ही सुलटा प्रवाह असतो . तसेच मगरींचा धोका आहेच . इथे बाहेर पर्यटकांनी प्रचंड कचरा केलेला होता . मी आसपासच्या काड्या काटक्या गोळा करून एक खराटा बनवला आणि सगळा कचरा झाडून एके ठिकाणी गोळा केला .  त्यात मुख्यत्वे करून प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकचे ग्लास आणि प्लास्टिकचा कचराच अधिक होता . आपल्या शहरांमध्ये जसा कोरडा कचरा किंवा प्लास्टिकचा कचरा उचलण्याची व्यवस्था असते तशी खेडोपाडी नसते त्यामुळे तो कचरा जाळून नष्ट करणे हा एकमेव उपाय दुर्दैवाने शिल्लक राहतो . त्यामुळे एका शेताच्या आणि रस्त्याच्या मधोमध मोकळा खड्डा बघून त्यात मी सर्व कचरा गोळा केला आणि पेटवून दिला . अलीकडेच गुगल नकाशावर पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की आता दररोज त्याच ठिकाणी कचरा पेटवायला सुरुवात झालेली आहे !  यानंतर थोडेसे रामायण वाचावे असा विचार करून मी महादेवाच्या मंदिरात जाऊन रामायण वाचायला बसलो . १९८५ सालापासून ही अखंड रामायण सेवा सुरू आहे .अखंड राम नाम जप १९९० सालापासून सुरू आहे . कल्पना करून पहा . कोणालाही आमंत्रण न देता अशा पद्धतीचे दोन दोन उपक्रम एकाच आश्रमात अविरत चालवणे , तेही अहोरात्र , हे किती कठीण काम आहे ! परंतु जगदीश महाराजांच्या तपामुळे आणि नर्मदा मातेच्या कृपेमुळे हे सर्व सुरळीत चालू आहे . जगदीश महाराजांनी मला खूपच वेळ दिला ! चंदन ला सुद्धा महाराजांना काही शंका विचारायच्या होत्या . ते दोघे एका कोपऱ्यात जाऊन बोलत बसले . महाराजांनी मला सुद्धा तिथे बोलावले . परंतु माझ्या असे लक्षात आले की मी शेजारी असल्यामुळे चंदन मोकळेपणे प्रश्न विचारू शकत नाही आहे . त्यामुळे मी महाराजांना सांगितले की महाराज मी रामनाम जप करतो . चंदनला त्याचे प्रश्न विचारू देत . चंदनशी महाराज तासभर बोलले असावेत . त्याचा परिणाम काय झाला ते लवकरच तुम्हाला कळेल ! मला मात्र हा परिसर फारच आवडू लागला ! रात्री पुन्हा एकदा मी घाटावर जाऊन मैयाचे रूप न्याहाळत बसलो . शांत धीर गंभीर वातावरण होते . काठावरती मैया शिवाय आणि माझ्याशिवाय कोणीच नव्हते ! मी मैय्याला विचारले की मैया तू आता समुद्रार्पण होणार . इतके दिवस तू विविध गावांतून , विविध जंगलांतून , विविध डोंगरदर्‍यातून ,विविध भूप्रदेशातून वाहते आहेस . अचानक हे सर्व सोडून नष्ट होणे तुला कसे काय बरे जमते ? अचानक आपले नर्मदा नदी म्हणून असलेले अस्तित्व संपवताना तुला वाईट वाटत नाही का ? 
मैयाच्या प्रवाहाकडे पाहत होतो . ती जणु काही सांगत होती , "अरे वेड्या ! मी संपणार थोडीच आहे ! मी तर अनादी आहे अनंत आहे ! सर्वत्र व्यापलेली आहे ! तू जिला नर्मदा मैया म्हणतो आहेस तो तिचा फक्त एक प्रवाह मात्र आहे ! तिच्या स्थितीमध्ये झालेले थोडेसे चळण आहे ! जलतत्त्व रूपाने ती सर्वत्र व्याप्त आहे ! समुद्रातला प्रत्येक बिंदू कधी ना कधी नर्मदामाता बनून वाहिलेला आहे ! जगातल्या प्रत्येक नदीमध्ये माझा अंश आहेच ! तुला जर मी दिसत नसेल तर समोर असलेल्या कुठल्याही जलदेवतेला नर्मदा माता म्हणून नमस्कार करून पहा ! तुला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही ! अरे सर्वत्र मीच व्यापलेली आहे रे ! या पृथ्वीवर जेव्हा पाण्याचा थेंबही नव्हता तेव्हा महादेवांनी माझी उत्पत्ती केली आहे ! मीच अहोरात्र वाहत पृथ्वीवर पाणी भरलेले आहे !  त्यामुळे समुद्राला मिळून मी नष्ट होत नाही तर माझ्याच स्व स्वरूपामध्ये विलीन होते ! पुन्हा ढगातून अवतरते आणि पावसाच्या रूपाने खाली उतरते ! डोंगरदऱ्यां मध्ये मुरते ! आणि उगमाच्या ठिकाणी पुन्हा प्रकट होते ! सर्वत्र माझे जीवन व्यापून उरलेले आहे ! अगदी घरातल्या पिण्याच्या पाण्याच्या पेल्यात जरी माझी कल्पना केलीस तरी माझा अंश आहेच ! एकदा मला हाक तरी मारून पहा ! बघ मी ओ देते की नाही ! मी रेवा आहे ! माझा आवाज तुला ऐकू आल्याशिवाय राहणार नाही ! फक्त मला मनापासून हाक मार ! मी आहेच ! तुझ्या आत बाहेर सर्व अणूरेणूंमध्ये माझेच अस्तित्व आहे ! हर हर महादेव ! "
मी एका भावसमाधी मध्ये गेलो . इतक्यात धबधब असा मोठा आवाज झाला आणि मी खडबडून भानावर आलो . एक आधुनिक तरुण स्त्री काठावरती कसलीतरी तांत्रिक पूजा करत असताना अचानक मगर तिथे आली होती आणि स्त्री जागेवरून पटकन उठल्यामुळे मगर घाबरून वळल्याचा तो आवाज होता . मी तिथे जाऊन त्या मातारामना सांगितले की इथे मगरी आहेत तरी कृपा करून काठावरती बसून रात्रीची पूजा करू नये . तिने मला वेड्यात काढले . ती उर्मटपणे मला म्हणाली , "नदीमध्ये कधी मगरी असतात का ! त्या तर समुद्रात असतात ! " वरवर पाहता अतिशय सुशिक्षित वाटणारी ती स्त्री हे बोलल्यावर मला हसावे का रडावे तेच कळेना ! बरे तिच्या म्हणण्याप्रमाणे फक्त समुद्रामध्ये मगरी असतात हे जरी एक वेळ मान्य केले तरी देखील इथले पाणी समुद्राचेच होते कारण खारट लागत होते ! शेवटी तिला नमस्कार करून मी तिथून निघालो आणि माझ्या लक्षात आले की तिच्या आलिशान गाडी जवळ तिचा पती उभा आहे . मी त्याला जाऊन नमस्कार केला आणि सांगितले की तुझ्या पत्नीला कृपा करून सांग की खाली मगरी आहेत ! त्यावर तो म्हणाला , " तुम्ही तिला सांगितलं तर नाही ना की खाली मगरी आहेत ? " माझ्या तोंडाचा आ च वासला गेला ! मी म्हणालो , "नुसत्या मगरी नाहीत तर महाकाय मगरी आहेत . एका झटक्यात मोठ्या जनावराला ओढून नेण्याची ताकद असलेल्या मगरी आहेत ! " तो माणूस म्हणाला , "तिला मी किती वेळा रात्री इथे पूजेसाठी आणलेले आहे . पण मगर काही तिला ओढूनच नेत नाही ! " त्याचे हे वाक्य ऐकले आणि मी आपादमस्तक हादरलो ! एकंदरीत प्रकार माझ्या लक्षात आला . बाईंची पूजा होईपर्यंत पंधरा-वीस मिनिटे मी या माणसाशी चर्चा केली . साधारण चाळीशीतले हे जोडपे होते . मनुष्य अब्जाधीश व्यापारी होता . सुरतला मोठा उद्योग धंदा होता . बाईंना जगातील सर्व सुखे देण्यात आलेली होती . परंतु त्यांचा स्वभाव अतिशय बेफिकीर , बेमुवर्तखोर आणि आगाऊ होता . त्यामुळे या दोघांचे सतत खटके उडायचे . या तरुणाला महाविद्यालयीन जीवनात या घाटावर येऊन बसत असल्यामुळे इथे खूप मगरी आहे त्याला माहिती होते ! त्यामुळे मगरीने ओढून नेली तर आयतीच पीडा गेली असा विचार करून तो तिला कसल्या तरी पूजेच्या निमित्ताने दरमहा इथे घेऊन यायचा ! मी मनोमन या माणसाला साष्टांग नमस्कारच घातला ! जगात इतकाही दूरचा विचार करू शकणारी माणसे असतात यावर विश्वासच बसत नव्हता ! मी माझ्या परीने त्याला , तो पत्नीपासून जरी मुक्त होऊ शकला नाही , तरी पत्नीच्या विचारांपासून आणि पत्नीच्या स्वभावामुळे होणाऱ्या त्रासापासून कसा मुक्त होऊ शकतो याचे काही उपाय सांगितले . त्यानेही ते भक्ती भावाने ऐकले . इतक्यात त्याची पत्नी आरडाओरडा करत आलीच ! तिच्या बोलण्यामध्ये इतकी जबरदस्त मग्रुरी होती की मी देखील अवाक् झालो ! एकही वाक्य ती सरळ बोलत नव्हती .
तोंड बारीक करून त्या युवकाने माझा निरोप घेतला . त्याची अजून एक संधी वाया गेली होती ! आता पुढच्या वेळी परत बघू असे म्हणून त्याने मला नर्मदे हर केले !
धूळ उडवत जाणाऱ्या त्यांच्या दीड कोटीच्या गाडीकडे मी पाहतच राहिलो ! बाहेरून कदाचित या गाडीतून जाणारे जोडपे पाहून सर्वांना असे वाटू शकते की ही माणसे किती सुखी आहेत ! परंतु त्यांच्या अंत:करणामध्ये काय खदखदते आहे हे ज्याचे त्यालाच माहिती असते ! नशीब मगरीने त्या दिवशी त्या बाईला ओढून नेले नाही . नाहीतर काहीतरी भयंकर प्रसंग पाहण्याचे दुर्भाग्य मला लाभले असते . पाण्यात झालेली खळबळ ही नक्की मगरीचीच होती याची मला खात्री आहे . कारण तो आवाज आता माझ्या ओळखीचा झाला होता .थोडेसे विनोदी अंगाने असे म्हणावेसे वाटते की आपल्या वाचकांना नम्र विनंती ! कोणीही हा प्रयोग आपल्या घरी करून पाहू नये !  आपण या परिसराचे थोडेसे अवलोकन चित्रांच्या माध्यमातून करूयात .
झगडिया मढी येथील घाटावर मगरींपासून सावध करण्यासाठी सरकारने लावलेल्या पाट्या . अशा पाट्या या भागातील सर्वच घाटांवर लावलेल्या असूनही लोक करायचे तेच करतात .
आश्रमातून समोरच दिसणारा कबीरवड बेटावरचा कबीर महाराजांच्या साधनेचा साक्षीदार असलेला अति भव्य वटवृक्ष
समुद्र जवळ आल्याचे सांगणारे सीगल पक्षी आता सर्वत्र दिसू लागतात
कबीर वडाच्या चहू बाजूंनी पाणी असल्यामुळे वन्य प्राण्यांना इथे सहजासहजी जाता येत नाही तरी देखील या बेटावर समृद्ध वन्यजीवन आहे इतके हे बेट मोठे आहे .
कबीर महाराजांचे मंदिर परिक्रमावासींना पाहता येत नाही परंतु आपल्या वाचकांकरता संग्रहित चित्र जोडत आहे
कबीरदासांना मानणारा मोठा निर्गुण उपासक संप्रदाय या भागात आढळतो . या लोकांशी बोलताना त्यांचा थोडासा वैचारिक गोंधळ झाला आहे असे मला जाणवायचे . अलीकडच्या काळामध्ये कबीरांच्या नावाचा वापर करून त्याच्या आडून सर्वधर्मसमभावाचे बाहुले नाचविण्याचे काम अनेक जण करतात असे मला जाणवले .
हाच तो सुंदर असा गवताचा किनारा ज्यावरून चालत मी जगदीश महाराजांच्या मढी मध्ये आलो ! उजव्या बाजूला दिसणारा किनारा किती सुंदर आहे पहा ! इथेच आपल्याला नर्मदा मातेचा रंग बदलला असून समुद्राच्या पाण्याचा रंग इथे आलेला लक्षात येतो . आणि भरतीच्या वेळी चक्क उलटा प्रवाह वाहतो !
मगरीं पासून सावध करणारे असे फलक अक्षरशः जागोजागी सरकारने आणि ग्रामपंचायतीने लावलेले आहेत . सरदार सरोवर धरणामध्ये मगरींचे उत्पत्ती स्थान आहे . इथे मानवी वावर शून्य असल्यामुळे त्यांची मुक्त संख्या झालेली आहे ! धरणातून पाणी सोडतात तेव्हा छोटी पिल्ले वाहत खाली येतात आणि ती या भागामध्ये आल्यावर मासे खाऊन मोठी होतात . त्यामुळे कितीही मगरी पकडला तरी त्यांची संख्या नियंत्रित राहू शकत नाही ! आणि ठेवावी तरी कशाला ! जिथे मगरी आहेत तिथेच नर्मदा मैय्या स्वच्छ आहे ! दुर्दैवाने आपण बहुतांश भारतीय दहशत बसल्याशिवाय नियमात वागतच नाही !
या घाटावरचा सूर्यास्त प्रसिद्ध आहे . तो बघण्यासाठी इथे लोक मोठी गर्दी करतात . आणि ..
आणि जाताना असा कचरा करून जातात . मी याच ठिकाणी कचरा पेटवला होता . गुगल नकाशावर पाहिल्यावर लक्षात आले की आता ती जागा कचरा जाण्याची जागा म्हणूनच वापरली जाते आहे . खरंतर कचरा जाळू नये . परंतु या छोट्याशा खेडेगावांमध्ये सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे तो अधिक पसरून विद्रूप रूप धारण करू नये म्हणून त्याला वेळेवर नष्ट करणे अत्यावश्यक ठरते . 
इथे ओहोटी असताना साधारण इतके पाणी असते .
भरतीच्या वेळी हे सर्व बुडून जाते !
काठावरती भरती ओहोटीच्या खेळामुळे चिखल साचलेला आहे त्यापासून संरक्षणासाठी अशा साखळ्या सर्वत्र बांधलेल्या दिसतात .
हा चिखल अतिशय फसवा आणि धोकादायक असल्यामुळे त्यात जाऊ नये . तसेच यात लपून बसलेल्या मगरी सुद्धा असतात ज्या चटकन लक्षात येत नाहीत .
इथल्या सूर्यास्ताच्या वेळी दिसणारी आपोज्योती केवळ अविस्मरणीय आहे !
सूर्यास्ताच्या वेळी प्रत्येक सेकंदाला आसमंताचे रंग बदलत जातात . हे चित्र हृदयात साठवण्यासारखेच आहे . 
 ॐ आपोज्योति रसोSमृतं ब्रह्मभुर्भुवस्वरोम् ।
हाच तो भव्य झाडाचा पार ! याच्यासमोरच आश्रम आहे . आश्रमाची पाटी झाडाच्या खाली तुम्हाला लावलेली दिसते . पाटीतला बाण उजवीकडे आश्रम आहे असे दाखवत असेल तर याचा अर्थ तुम्ही काठावरून चालत आलेले आहात .
पाटीवरचा बाण डावीकडे आश्रम आहे असे दाखवत असेल तर याचा अर्थ तुम्ही रस्त्याने चालत आलेले आहात .



पारावरून सरळ गेले की आपण घाटावर जातो आणि शेजारी आश्रम दिसतो . बाकी चहू बाजूला शेतीच शेती आहे .
घाटावरून निघाले की उजव्या हाताला आश्रम आहे . मध्यप्रदेश मध्ये क्वचितच दिसणाऱ्या म्हशी गुजरात मध्ये मात्र मुबलक प्रमाणात दिसतात .



आश्रमात प्रवेश केल्या केल्या डाव्या हाताला भव्य असे राम मंदिर आणि नर्मदा माता मंदिर आहे .



समोर भांडारगृह आहे . मी आश्रमात प्रवेश केल्यावर इथेच जगदीश महाराज बसलेले होते .
श्रीराम आणि नर्मदा माता मंदिराचे प्रवेशद्वार
आपण हा सर्व परिसर आता पाहत आहोत . हिरवीगार केळीची शेती आश्रमाचीच आहे .आणि अतिशय सुंदर पद्धतीने केलेली आहे .
श्रीराम मंदिराचे अंतरंग
श्री नर्मदा माताजी मूर्ती
श्री राम लक्ष्मण जानकी विग्रह
इथेच १९९० सालापासून अखंड रामनाम जप चालू आहे . मंदिराची स्थापना ८७ साली झालेली आहे .
राम मंदिराच्या समोरच असलेले महादेवाचे मंदिर व त्यातील महादेव
इथेच अखंड रामायण चालते . त्याचा संपुट मंत्र . (संपुट मंत्राविषयी अधिक माहिती मधपुरीच्या घोडाघाट वरील प्रकरणामध्ये दिलेली आहे )
इथे बसून मी देखील काही काळ रामायण सेवा केली आणि प्रचंड आनंद मिळवला !
परमपूज्य जगदीश महाराज आणि छोटी नर्मदा मैया ! परमपूज्य जगदीश महाराजांचे एवढे एकच चित्र मला मिळाले . हेच अशा लोकांच्या निस्पृहतेचे मुख्य लक्षण असते . त्यांच्याबद्दल तुम्ही शोधायला गेलात तर ऑनलाईन काहीही माहिती मिळत नाही आणि ऑफलाइन इतके अनुभव ऐकायला मिळतात की त्याचे एक पुस्तक व्हावे !

या आश्रमातला काळ कसा गेला ते लक्षात सुद्धा आले नाही . पहाटे लवकर उठून इथे बांधलेल्या स्नान कक्षात व स्वच्छतागृहात सर्व आटोपून निघण्यापूर्वी महाराजांची आज्ञा घ्यायला जाणार इतक्यात महाराज स्वतःच आले .ते स्वतः येऊन सर्व परिक्रमावासींना उठवतात आणि आजारी वगैरे कोणी असेल तर त्याची शुश्रुषा करतात . मी त्यांची आज्ञा घेऊ लागलो परंतु त्यांनी सांगितले की इथला नियम असा आहे की भोजन केल्याशिवाय आम्ही कोणाला जाऊ देत नाही .आनंदाची गोष्ट अशी होती की भोजन सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू व्हायचे !रात्रीचे जेवण संध्याकाळी सव्वा सात वाजता सुरू व्हायचे ! भोजन इथे अप्रतिम असायचे की विचारू नका ! दूध तूप ताक लोणी दही लस्सी हे सर्व पदार्थ जितके हवे तितके वाढले जायचे ! अप्रतिम असे भोजन घेतले . तत्पूर्वी पुन्हा काही काळ रामायण सेवा आणि रामनाम सेवा केली ! रात्रभर साठलेला कचरा पुन्हा एकदा गोळा केला आणि जाळला . चंदन सुद्धा माझ्यासोबतच निघाला होता . भोजन प्रसादी घेतल्यावर मी महाराजांची आज्ञा घेतली . मी त्यांना नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पुढचा मार्ग विचारून घेतला .खरे तर आज अमावस्या होती आणि महाराज आता चातुर्मास इथेच कर म्हणून माझ्या मागे लागले होते . परंतु मी गृहस्थी असल्यामुळे पुढे मार्गस्थ झाले पाहिजे असे त्यांना म्हणालो . त्यांनी चंदनला सडक मार्गाने येताना पाहिले होते त्यामुळे त्याला त्यांनी रस्त्याने पुढे जाण्याचा मार्ग सांगितला . तो मार्गस्थ झाला . मला म्हणाले , " हम यह वाला मार्ग वैसे किसी को बताते नही है । परंतु आप कल किनारे से आये हमने देखा । इसलिये आपको पता है कैसे आगे बढना है । तो आप बिलकुल किनारा पकडके चलते रहना । कोई आपत्ती नही आयेगी । बस किचड से बचके रहना । मगरमच्छ तो अभी आपके मित्र हो ही गये है ! " मी साष्टांग नमस्कार घालून निघालो . जाताना महाराजांच्या आणि माझ्या दोघांच्या डोळ्यात पाणी आले . मला म्हणाले , "एक बात बताऊ ? इस रास्ते से नागा साधू बहुत चलते है । उनको दुसरा रास्ता अपनाने की अनुमती ही नही है । परंतु तुम गृहस्थी होकर इस रास्ते से चल रहे हो , यही प्रमाण है की मैया की तुम पर बडी कृपा है । आज तक किसी गृहस्थी को इस रास्ते से हमने भेजा नही । पर तुम कर लोगे । वापस आना जरूर । नर्मदे हर ! " परत ये असे महाराज म्हणाले असले तरी परिक्रमा उचलल्याशिवाय या आश्रमात येता येत नाही हे माहिती असल्यामुळे माझ्या मनात थोडीशी कालवा कालव झाली . पुन्हा कधी भेट होईल दर्शन होईल माहिती नाही महाराजांचे . परंतु या जगदीश महाराजांनी माझ्या अंतःकरणावर एक खोल ठसा कायमचा उमटवला आहे . साधू कसा असावा याचे एक अतिव आदर्श उदाहरण ते आहेत . पुन्हा एकदा मैया चा किनारा धरला . 
येताना मी इथून आलो होतो
जाताना इथून पुढे निघून गेलो
मैयाचे पात्र आता खूपच अथांग झाले होते . कबीर वड बेट मध्ये आल्यामुळे छोटी वाटणारी मैय्या प्रत्यक्षात किती भव्य दिव्य आहे हे आता दिसू लागले ! तिच्या त्या भव्य दिव्य रूपापुढे किनारे सुद्धा किरकोळ वाटू लागले ! थोडे अंतर चाललो असेन नसेन इतक्यात एका शेतातून चंदन प्रकट झाला ! याला रस्त्याने चालायचे नव्हते . परंतु त्याची अत्यंत चलबिचल झालेली आहे असे मला जाणवत होते . मी त्याला विचारले की काय झाले ? तो स्वतःशीच बोलू लागला होता . हातवारे करत होता . रडत होता . हसत होता . मी त्याला एका झाडाखाली थांबवले आणि विचारले की बाबा रे तुला काय झाले आहे ? काल जगदीश महाराज काही म्हणाले का ? तो म्हणाला जगदीश महाराजांचे ऐकू का माझ्या मनाचे ऐकू असा प्रश्न पडला आहे . मी त्याला सांगितले कधीही जगदीश महाराजांचेच ऐकले पाहिजे . तो पुन्हा एकदा रडू लागला . म्हणजे तसे दाखवत नव्हता परंतु माझ्या लक्षात येत होते . पुढे एक छोटासा ओढ्यावरचा पूल आडवा आला . मला चंदन म्हणाला तू पुढे जा मी आलोच . मला वाटले याला लघुशंका वगैरे करायची असेल म्हणून मी पुलाच्या पुढे जाऊन त्याची वाट बघत थांबलो . पाच मिनिटे झाली दहा मिनिटे झाली .अर्धा तास झाला . चंदन काही आला नाही . चेतराम मेहरा भग उपाख्य चंदन याची आणि माझी ती शेवटची भेट ठरली . परत चंदन मला कधीही भेटला नाही . . . तो कुठे गेला , त्याचे काय झाले मला काहीही कळाले नाही . . .मी शांतपणे नर्मदा मातेचा जयजयकार केला आणि पुढचा मार्ग पकडला . नर्मदा खंडामध्ये फक्त नर्मदा मातेची इच्छा चालते ! तुमच्या इच्छेने इथे तुम्ही एक पाऊल देखील चालू शकत नाही ! होय . एक पाऊल सुद्धा नाही ! नर्मदे हर !





लेखांक एकशे सात समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर