लेखांक १०६ : तरसालीचा तरसणारा तापेश्वर/तारकेश्वर आणि ओरपटारचा अरण्येश्वर

 वाटेत भेटणाऱ्या सगळ्या साधुसंतांनी मला सांगितले होते की भालोदनंतर मैया एक शेवटचे वळण घेते आणि समुद्राला जाऊन मिळते ! त्यामुळे हे शेवटचे वळण पाहण्याची प्रचंड उत्सुकता मनामध्ये दाटून राहिली होती ! त्यामुळे वेगाने गायत्री मंदिर सोडले आणि शेतात मधून जाणाऱ्या रस्त्याने पावले टाकू लागलो . नर्मदा मैयाने मातीची उभी भिंत कापलेली असल्यामुळे चालण्यासाठी रस्ता अजिबातच नव्हता . परंतु तरीदेखील कालच मी पाहून ठेवले होते की विजेचा टॉवर गेले की थोडाफार रस्ता मिळू शकतो . त्याप्रमाणे तीन अधिक एक असे चार मोठे मोठे विजेचे मनोरे मी चालतच पार केले .
विद्युत मनोरे आणि बरेच काही ...
 ते मनोरे अति भव्य होते . मला खरोखरच विजेचे मनोरे उभे करणाऱ्या अभियंत्यांचा हेवा वाटतो .खूप कठीण काम आहे ते . विशेषतः नर्मदा मातेसारख्या दोन्ही बाजूला भुसभुशीत माती असलेल्या नदीच्या अति भव्य पात्रातून इतके जड विद्युत मनोरे नेणे ही काही सोपी गोष्ट नाही मित्रांनो . त्यात ते मनोरे सरळ रेषेत आहेत तोपर्यंत ठीक आहे परंतु जिथे तारा वळतात तिथे त्या मनोऱ्यावर फार विचित्र प्रकारचा दाब आलेला असतो . तो हाताळता येईल अशा पद्धतीचे फुटींग किंवा पाया घालणे तो ही भुसभुशीत मातीमध्ये हे सोपे काम नाही . हळूहळू शेतात जाणारे शेतकरी दिसू लागले . परंतु माझ्या असे लक्षात आले की सर्व शेतकरी एकाच गणवेशामध्ये आहेत ! सर्वांनी अपरे पायजमा घातले होते . डोक्यावर गोल टोप्या होत्या . दाढी वाढवलेली होती . मिश्यांचा पत्ता नव्हता . काळे बुरखे घातलेल्या स्त्रिया रस्त्याने जाताना दिसू लागल्या . शाळेला जाणाऱ्या मुला मुलींचा ही वेश असाच होता . छोट्या छोट्या मुली त्या सुंदर मोकळ्या हवेमध्ये श्वास न घेता हिजाब घालून चालत होत्या . मला काही ते दृश्य बघायला नाही त्यामुळे मी एका शेतातून उडी मारून खाली उतरलो आणि परत मैयाच्या किनारी सापडलेली एक छोटीशी पायवाट पकडली .कधी पायवाट कधी जंगल असा हा मार्ग होता . परंतु निदान इथे माणसे तरी दिसत नव्हती .
मी पकडलेली मैया किनाऱ्या वरून जाणारी पायवाट
मध्येच ही पायवाट झाडीमध्ये घुसायची . इथले शेतकरी प्रचंड उपद्रवकारक होते . शेताला पक्की कुंपण घातलेली असल्यामुळे आत बाहेर करताना अवघड व्हायचे .
वाटेमध्ये भेटणाऱ्या केवट लोकांना मी त्यांची नावे विचारायचो . दिसायला सर्व हे लोक केवटच होते परंतु नावे मात्र बदलली होती . या संपूर्ण भागामध्ये प्रचंड धर्मांतरण झालेले आहे असे माझ्या लक्षात आले . इथे काही प्रमाणात वसावा आणि वंजारी समाजाचे लोक देखील राहत होते परंतु त्यांची संख्या फारच नगण्य होती . सुदैवाने मला एक वसावा आडनावाचा मासे धरणारा मनुष्य भेटला . त्याला मी विचारले की नक्की काय भानगड आहे या भागाची ? त्याने सांगितले की पूर्वी भालोद या शहरांमधील ब्राह्मणांच्या जमिनी इथे होत्या .बडोद्याच्या गायकवाड महाराजांनी त्यांना या जमिनी इनाम दिलेल्या होत्या . मोठ्या प्रमाणामध्ये समृद्धी होती . भालोदच्या ब्राह्मणांनी शेतामध्ये मजूर म्हणून वसावा आणि वंजारी लोकांना आणले . पुढे कुळ कायद्यामुळे ते लोक या जमिनींचे मालक झाले . आयती जमीन मिळालेली असल्यामुळे तिचे फारसे मोल इथल्या लोकांना राहिले नाही .आणि खरेदीसाठी आलेल्या परधर्मीयांना या जमिनी कवडीमोल भावाने त्यांनी विकायला सुरुवात केली . बघता बघता या भागातील सर्व जमिनी या लोकांनी विकत घेतल्या . जमीन आली की तिथे राहणे आले त्यासाठी घर बांधणे आले अशा पद्धतीने हळूहळू सर्वच लोकांची घर येथे झाली . लोकसंख्या वाढीचा दर मोठा प्रचंड असल्यामुळे लवकरच हा संपूर्ण परिसर बाहेरून आलेल्या लोकांनी व्यापला गेला . आज परिस्थिती अशी आहे की यांचे ९०% मतदान इथे आहे . स्थानिक आदिवासी वसावा वंजारी लोकांना केवळ दहा टक्क्याचा वाटा शिल्लक राहिलेला आहे . तेही लोक मग यांच्याशी जुळवून घेऊन वागू लागले आहेत . यांची पुढची पिढी सर्व मित्र परधर्मी असल्यामुळे त्या धर्माकडे आकृष्ट होऊ लागली आहे . अनेक लोकांनी धर्मांतरण देखील केलेले आहे . धर्मांतरित झाल्यावर सुद्धा ते वसावा हेच आडनाव लावतात . एकंदरीत हा सर्व परिसर नकारात्मक ऊर्जेने भरलेला असल्यामुळे या भागातून एकही परिक्रमा वासी अजिबात म्हणजे अजिबातच जात नाही . मी विचारात पडलो . शासनाच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाचे किती मोठे पडसाद समाजामध्ये पडू शकतात याचे हे उत्कृष्ट उदाहरण होते . फार लांब कशाला जा ! माझे स्वतःचे देखील असेच काहीसे झालेले आहे ! मी तीन वर्षाचा असेपर्यंत आमच्या मूळ गावी स्वतःच्या वाड्यामध्ये राहत होतो . माझे आजोबा गावातील एकमेव शाळा मास्तर असल्यामुळे त्यांचा प्रचंड मान होता . स्व कष्टार्जीत अशी सुमारे ४५० एकर जमीन आमच्या कुटुंबाकडे होती . मुळात कर्नाटकातून यावनी आक्रमणाला कंटाळून २१ पिढ्यांपूर्वी स्थलांतरित झालेले असल्यामुळे इथे स्वतःची जमीन असण्याचा प्रश्नच नव्हता .तर ती सर्व कमावलेली होती . परंतु कुळ कायदा आल्याबरोबर आजोबांनी अतिशय उदार अंतकरणाने जो जो मनुष्य जमीन करत होता त्यांना त्यांना ती विना मोबदला देऊन टाकली . आजही मी गावामध्ये गेल्यावर लोक मला आकडे सांगतात की तुझ्या आजोबांनी मला एवढी एवढी जमीन दिली . स्वतःकडे फक्त २७ एकर जमीन उरली . पुढे एका परधर्मीय वाटेकर्‍याने आजोबांना सार्वजनिक वाचनालयामध्ये एकटे गाठून सुऱ्याचा धाक वगैरे दाखवून ती २७ एकर जमीन नावावर करून घेतली . आणि पुढे सहाच महिन्यात तो स्वतः कबर बंद झाला . गांधी हत्येनतर  कठोर गांधीवादी असलेल्या  माझ्या आजोबांना अतिशय दुःख झाले होते . परंतु तरी देखील त्यांच्यासमोर त्यांच्याच काही माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा वाडा जाळला हे पाहून त्यांचे गावातील मनच उठले . ज्या विद्यार्थ्यांची आयुष्य घडवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून त्यांना पोटच्या पोरांप्रमाणे शिकवले , शेतीभाती दान केली त्याच लोकांनी घर पेटवल्यावर आजोबांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला . उरलेसुरले सर्व दान करून आम्ही गाव कायमचे सोडले . तत्पूर्वी या विरहाच्या धक्क्यामुळे आजोबांचे त्याच जळलेल्या वाड्याच्या उरलेल्या भागात आम्ही राहत असताना निधन झाले . माझे सर्व काका एकमताने गावातून कायमचे बाहेर पडले . आज त्या गावाची काय परिस्थिती आहे आम्हाला जरा सुद्धा माहिती नाही . तिथे असलेल्या नवनाथांच्या देवस्थानचे रूपांतर आता भव्य दिव्य पिरामध्ये झाले आहे असे ऐकण्यात येते . त्याच्या उरुसामध्ये उर्वरीत हिंदू समाज हिरीरीने सहभागी होतो . हे केवळ मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेले एक प्रतिनिधिक उदाहरण आहे . अशी लाखो उदाहरणे भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील . काश्मिरी हिंदूंचा वंश विच्छेद या विषयावर आता बऱ्यापैकी जनजागृती झालेली आहे . परंतु गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात झालेला विशिष्ट वर्गाचा वंश विच्छेद या विषयावर कोणीही तोंड उघडत नाही . आज त्या भागातील बहुतांश पुढच्या पिढीचे लोक परदेशामध्ये जाऊन अब्जाधीश झालेले आहेत आणि तिथेच आनंदाने आपले आयुष्य जगत आहेत . या लोकांना गावाबाहेर घालून आपण काय गमावले आहे हे कळण्याची सुद्धा बुद्धिमत्ता ग्रामस्थां जवळ नाही हे पाहून त्यांची कीव येते .
इथे देखील तसेच काहीतरी झाले होते . हळूहळू भालोद गावातील सर्व ब्राह्मण समाज बाहेर पडला आणि त्यामुळे इथे अन्य लोकांचा शिरकाव झाला . तो इतका पराकोटीला आणि विकोपाला गेला की आता त्या भागामध्ये पूर्णपणे त्यांचीच सत्ता आहे . कोणाला तरी वाटेल की मी हे द्वेष भावनेतून लिहीत आहे काय ? तसे नाही मित्रांनो . नर्मदा मातेचे स्मरण करून तुम्हाला सांगतो की मी जे काही लिहीत आहे ते फक्त आणि फक्त माझे अनुभवच लिहीत आहे . त्यात अनुमानाला जरा सुद्धा स्थान नाही . इथून पुढे मला अतिशय विदारक अनुभव येत गेले . तोठीदरा नावाचे हे गाव होते .  इथून पुढे नर्मदा पुराणा मध्ये उल्लेख असलेले तारकेश्वर / तल्पेश्वर अथवा तापेश्वर महादेवाचे मंदिर आहे असे मला एका साधूने सांगितले होते . नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर दर किती फुटावर मंदिरे असतात हे  गणित आता डोक्यामध्ये पक्के बसलेले होते . परंतु इथे मात्र कित्येक किलोमीटर चालले तरी मंदिराचा पत्ताच नव्हता . खूप अंतर चाललो तरी फक्त शेतीच दिसत होती . हळूहळू गावातील छोटी छोटी मुले दिसू लागली . मला छोट्या मुलांची आवड आहे हे तर आपण सर्वजण आता जाणताच ! त्यामुळे कौतुकाने मी त्या मुलांशी बोलायला जायचो . तर ती मुले माझ्या दिशेला थुंकून हसत हसत पळून जायची . वाटेत भेटलेल्या स्थानिक शेतकऱ्यांना महिलांना सर्वांना मी विचारत होतो की इथे तारकेश्वर महादेवाचे मंदिर कुठे आहे . सर्वजण मला एक मुखाने सांगत होते की तुम्ही इथून परत जा इथे कुठलेही मंदिर नाही . हळूहळू माझा संताप वाढू लागला . साधू संतांनी सांगितले आहे की इथे मंदिर आहे याचा अर्थ इथे मंदिर नक्की असणार आहे . मग हे लोक मला परत का पाठवत आहेत ? अखेरीस तरसली गावामध्ये मी शिरलोच . अक्षरशः पाकिस्तानातून चालतो आहे असे मला वाटत होते . इतकी गलिच्छ आणि घाणेरडे वस्ती खूप दिवसात नर्मदे काठी पाहिली नव्हती . प्रत्येक घरातून सांडपाणी बाहेर तसेच सोडण्यात आले होते . त्याचे वाहून जाणारे गटार वगैरे न केल्यामुळे घाणेरड्या काळया रंगाचे पाणी सर्वत्र साठले होते . त्यात डुकरे लोळत होती . सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते . प्रचंड वास येत होते . संपूर्ण वातावरण अतिशय नकारात्मकतेने भरलेले होते . घरं सुद्धा सुंदर लिपाई पुताई केलेली नसून यादृच्छिक रीतीने बांधलेली पत्रे बित्रे टाकून कशीबशी उभी केलेली होती . कोणीच माझ्याशी बोलायला तयार नव्हते . मी चिकाटीने दिसलेल्या प्रत्येक माणसाला नर्मदे हर असे म्हणून पाहिले परंतु एकाही व्यक्तीने मला नर्मदे हर असे प्रतिउत्तर दिले नाही . खूप लोकांना मी विचारले की इथे महादेवाचे मंदिर कुठे आहे . लोकांनी मला सांगितले की मी रस्ता भटकलो आहे आणि परत भालोदला निघून जावे . आता मात्र मी इरेलाच पेटलो . बरेच अंतर चालल्यामुळे मला तहान लागली होती . परंतु गावातील एकही व्यक्ती चहा तर सोडा पाणी सुद्धा विचारत नव्हती . सर्वांच्या नजरेमध्ये एक प्रकारचा द्वेष मला स्पष्टपणे दिसत होता . माझ्या नजरेमध्ये अजिबात द्वेष नव्हता कारण नर्मदे काठी राहणारी सर्व माणसे अतिशय परम भाग्यवान असतात असा शुद्ध भाव अंतकरणात ठेवून मी चालत होतो . परंतु काही केल्या मला या गावांमध्ये कोणीच कुठलीच माहिती देईना . काही मुले मला पत्ता सांगायला आली परंतु त्यांनी मला चुकीचा पत्ता सांगून भरकटवले . अखेरीस चिडून मी एका घराबाहेर बाज टाकून बसलेल्या म्हाताऱ्या माणसाच्या समोर गेलो . पांढरी शुभ्र दाढी डोक्यावर फेटा कमरेला लुंगी घालून हा मनुष्य उघडा बसला होता . "अस्सलाम वालेकुम " . मी म्हणालो . "वालेकुम अस्सलाम ! " म्हातारा खुश झाला ! "इधर तारकेश्वर महादेव का मंदिर किधर है ? " मी म्हाताऱ्याला विचारले . " इधर कोई महादेव वगैरा नही है । ये हमारे मोमीन समाज की बस्ती है । " म्हाताऱ्याने टेचात उत्तर दिले .मी त्याला विचारले की तो या गावात किती वर्षांपूर्वी आला ? त्याने सांगितले त्याला इथे येऊन ७० वर्षे झाली . मी त्याला सांगितले " आब्बा , ये तारकेश्वर महादेव जो है ना वो यहा ७००० साल से रह रहे है । तुम्हारे जैसे कितने आये और कितने गये । महादेव इधर ही है । " म्हातारा विचारात पडला . आणि मला म्हणाला , "लेकिन तुम इधर से क्यू आये ? ये कोई परिक्रमा का रस्ता नही है । यहा से कोई नही आता जाता । तुम भटक गये हो ।वापस भालोद चले जाओ । वहां से झगडिया का रस्ता है । " मी त्याला सांगितले की काहीही झाले तरी मी नर्मदा मातेचा किनारा सोडणार नाही . त्याला माझा कटू अनुभव सुद्धा सांगितला .की वाटेत भेटलेला एकही माणूस मला नीट उत्तर देत नाही . मी त्याला म्हणालो , "आपको नर्मदा मैया की कसम है , सच बोलना । आपके जवानी में आप लोग ऐसा बर्ताव करते थे क्या ? ये अभी अभी क्या हुआ है आप लोगो को ? एक भी आदमी ढंग से क्यू बात नही कर रहा ? "म्हातारा गंभीर झाला आणि म्हणाला , " हमे भी यह सब अच्छा नही लगता । एक जमाने मे बहुत अच्छा भाईचारा रहता था । लेकिन अभी हम भी कुछ कर नही सकते ।बुढे हो गये है । किधर झमेले मे पडे । इसलिये इधर पडे रहते है । " मी त्याला म्हणालो , "कम से कम आप हमे सही रास्ता तो बता सकते है ना ? या आप भी झूट बतलाओगे की या मंदिर नही है ? " म्हातारा पुन्हा एकदा विचारात पडला आणि म्हणाला , "अगर तुम्हारी इतनी तगडी ख्वाईश है तो बताता हूं मंदिर तक का रास्ता । लेकिन खुदा की कसम तुम से देखा नही जायेगा । इसलिये नही बता रहे थे । " आणि त्या म्हाताऱ्याने समोरच्या दोन घरांकडे बोट करत त्याच्यामधून जाणारी पायवाट पकडून सरळ जाऊन कसे कसे मंदिरापर्यंत पोहोचता येईल ते मला सांगितले . त्याला नर्मदे हर करून मी पुढे निघालो . आश्चर्य म्हणजे म्हातारा नर्मदे हर म्हणाला ! आपल्या आस्थां विषयी थोडीफार आपुलकी असलेली ही शेवटची पिढी . त्या दोन घरातून मी जाताना एका घरातून माझ्यापुढे खरकटे पाणी फेकले गेले . मी मागे वळून पाहिले तर म्हाताऱ्या भोवती सात-आठ माणसे गोळा झाली होती आणि आमचे काय बोलणे झाले त्याला विचारत होती . मी मनोमन नर्मदा मातेची प्रार्थना केली की त्या म्हातार्‍याला काहीही त्रास होऊ देऊ नकोस . त्याने मला मंदिराचा रस्ता योग्य सांगितला होता . विचित्र पद्धतीने नांगरलेली आडवी तिडवी शेते पार करत मंदिरासमोर आलो . मंदिर ? याला मंदिर का म्हणावे ? याच्यापेक्षा तर मध्य प्रदेशातल्या काही जमीनदार लोकांच्या शेतातून पाणी उपसणाऱ्या मोटर्स असतात , त्या मोटर्सचा स्वीच बोर्ड ठेवण्यासाठी बांधलेल्या खोल्या भव्य दिव्य सुंदर आणि मजबूत असतात ! केवळ तीन पडायला आलेल्या भिंती वर मोडकेतोडके छप्पर . जमिनीला सुद्धा तडे गेलेले . आणि महादेवाची एक दुर्लक्षित पिंड . कोरडी ठणठणीत . कुठेही फुले नाहीत बेल नाही पाणी नाही दिवाबत्ती नाही काही नाही . मी धावतच जाऊन त्या शिवलिंगाला बिलगलो . त्याची ती अवस्था माझ्याच्याने पाहावली नाही . माझ्याकडचे पिण्याचे पाणी संपले होते परंतु डोळ्यातील अश्रूधारांनी त्या शिवपिंडीला अभिषेक घडला . काय अवस्था करून ठेवली आहे आपण आपल्या देवाची ! ती देखील साक्षात नर्मदा मातेच्या काठावर ! महादेवांची कन्या असलेली नर्मदा माता ,स्वतः ज्या लोकांचे पोट दिवस रात्र भरत आहे , तिच्याच पित्याची ही अवस्था आपण लेकरांनी करून ठेवली ! कुठे फेडू ही पापे ? आणि कुठल्या नरकात स्थान मिळेल आपल्याला ? या मंदिराच्या परिसरामध्ये जुन्या भग्न मंदिराचे अवशेष इतस्ततः विखुरलेले होते . चारही बाजूच्या शेतकऱ्यांनी मंदिराची जमीन गिळंकृत केली होती . मंदिराच्या आतून अतिशय घाण असा एक वास येत होता . तो कशाचा होता याची कल्पना देखील मला करायची नव्हती . याची देही याची डोळा मी हे पाहतो आहे यावर माझा विश्वास बसत नव्हता . प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर मी महादेवांची स्तुती म्हणायचो परंतु इथे मला तसे काही करण्याची इच्छाच होईना . डोळे मिटून मी महादेवांच्या पुढे बसलो आणि त्यांना विचारले की सांगा देवा मी काय करू ? महादेवांनी सांगितले , "काहीच करू नकोस . फक्त परिक्रमा कर ." "फक्त परिक्रमा कर ? म्हणजे ? तुमची ही जी दुरावस्था झाली आहे त्यासाठी मी काहीच करू शकत नाही" "तेच तर सांगतो आहे वेड्या ! फक्त परिक्रमा कर ! " मला अजूनही काही उलगडा होईना . मी विचार करू लागलो की फक्त परिक्रमा कर याचा अर्थ काय ? आणि मग एकदम माझ्या लक्षात आले ! सध्या लोक परिक्रमा करतातच कुठे ! भालोद मधून कधी एकदा विमलेश्वर चा समुद्रकिनारा गाठतो असे सर्वांना होऊन जाते ! त्यामुळे कोणीही इकडे फिरकतच नाही ! हे तारकेश्वर महादेव तीर्थक्षेत्र सुद्धा परिक्रमेचाच एक भाग आहे हे कोणाला लक्षातच राहिलेले नाही !जो तो घरी पोहोचण्याच्या गडबडीमध्ये आहे ! परिक्रमा कोण करतो आहे ? कल्पना करून पहा . दरवर्षी जे आठ लाख ते दहा लाख परिक्रमावासी गाडी बस दुचाकी सायकल पायी अशा विविध मार्गाने नर्मदा मातेची परिक्रमा करतात , ते सर्वजण तारकेश्वर महादेव तीर्थक्षेत्र या ठिकाणी भेट द्यायला येऊ लागले तर या मंदिराचे कसे पुनरुत्थान होईल ! झक मारत इथल्या लोकांना मंदिराची व्यवस्था नीट ठेवावी लागेल . लोकशाही म्हणजे सगळा संख्येचा खेळ आहे ! कल्पना करा जर जंगलातल्या राज्यामध्ये लोकशाही लागू केली तर ज्याच्या एका डरकाळीने जंगलातील सर्व पशुपक्षी भयभीत होऊन थराथरा कापतात त्या वाघालाही लोकशाहीमध्ये एकच मत टाकता येईल . आणि रानडुकरांचा एखादा कळप असेल तर त्यांनाही प्रत्येकी एक मत टाकता येईल !  आहे की नाही गंमत ! 
त्यामुळे माझी सर्व परिक्रमावासींना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये परिक्रमा मार्ग सोडून चटकट घ्यायला धावू नका . जिथे जिथे परिक्रमावासी जायचे बंद झाले त्या त्या स्थानाची आज अतिशय दुरावस्था होत चाललेली आहे . तुमचे तिथे जाणे हेच त्या ठिकाणाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आहे . ताकद आहे . बळ आहे . किमान भालोद मध्ये पोहोचलात तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तरसाली गावातून चालत जाऊन तारकेश्वर महादेवाचे मंदिर पाहून तिथे पूजा वगैरे करून मगच पुढे जावे अशी सर्वांना नम्र नम्र नम्र विनंती आहे . गुजरात मधील धनिकांनी या मंदिराचा लवकरात लवकर जीर्णोद्धार करावा अशी त्यांना प्रार्थना आहे . शासनाच्या पातळीवर काम करणारे कोणी आपले वाचक असतील तर त्यांच्या माहिती करता सांगून ठेवतो तरसाली हे गाव झगडिया तालुका भरूच जिल्हा गुजरात राज्य या ठिकाणी येते . इथे उरलेल्या एकमेव तारकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा .  किमान त्याची होत चाललेली पडझड रोखण्यात यावी . त्याच्या आजूबाजूच्या जमिनींमध्ये अतिक्रमणे झालेली आहेत ती सर्व शासनाकडून काढण्यात त्वरित यावीत . आणि तारकेश्वर महादेवांना मोकळा श्वास घेता येईल अशी परिस्थिती उत्पन्न करावी . हे सर्व आपण केले तर ठीक आहे . नाहीतर तुमच्या माहिती करता म्हणून सांगून ठेवतो की हे नर्मदा मातेचे शेवटचे वळण आहे . महादेवांनी तिसरा नेत्र उघडला तर हे संपूर्ण वळणच समुद्रार्पण होऊन जाईल . नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर असलेले हे गाव महापुरामध्ये समुद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी तिला एक मिनिट पुरेसे आहे . ज्याप्रमाणे केदारनाथ या बोकाळलेल्या तीर्थक्षेत्राचे पुनर्वसन शासन करत नाही हे पाहिल्यावर महादेवांनी स्वतःच करून टाकले तशी अवस्था येथे यायला नको . हा तारक म्हणजे तुम्हाला तारणारा महादेव आहे . याने आपले मारक रूप धारण करून आपल्याला बुडवावे याची वाट कृपया पाहू नये . तरसालीचा तारकेश्वर महादेव परिक्रमावासींच्या दर्शनासाठी तरसतो आहे . "परिक्रमावासींनी कृपया आपल्या व्यस्त दिनाचर्येतून तारकेश्वर महादेवांना दर्शन देण्याची कृपा करावी ! " तारकेश्वर महादेवांचा जयजयकार असो ! हर हर महादेव !
तरसाली गावाबाहेर उपेक्षित अवस्थेत असलेले तारकेश्वर अथवा तापेश्वर महादेवाचे पडीक मंदिर .
ब्रह्मलीन तपोमुर्ती स्वामी ओंकारानंद गिरी यांनी लिहिलेले श्री नर्मदा परिक्रमा नावाचे एक हिंदी पुस्तक आहे यात तापेश्वर तीर्थाची माहिती येते .
देव शिरा ऋषींच्या या तपोभूमीमध्ये आज देव भक्तांना शिरायचे वांदे झालेले आहेत .किती घोर दुर्दैव .
इथून पुढे पुन्हा एकदा वाळूचा किनारा मी पकडला .परंतु तत्पूर्वी एका शेतामध्ये मला हातात पूजेचे ताट घेऊन चालत येणारा एक हिंदू मनुष्य दिसला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला ! ओर पटार गावात राहणारा मनोहर गिरी नावाचा हा माणूस होता . हा शक्यतो दररोज परंतु नाही जमले तर किमान जमेल तितक्या वेळेला त्याच्या गावातून इथे चालत येत महादेवांची पूजा करून परत जायचा . मी या माणसाला साष्टांग नमस्कार घातला . महादेवाची पिंड जी काही थोडीफार स्पर्श करण्यायोग्य राहिली होती ती या माणसामुळेच ! नाहीतर काय झाले असते याची कल्पना सुद्धा करता येत नाही . याच महादेवाचे पुराणातील नाव तल्पेश्वर किंवा तापेश्वर असे आहे असे मनोहर गिरीने मला सांगितले . गावातील सर्वांचे या मंदिराकडे घोर दुर्लक्ष आहे असे त्याने मला सांगितले आणि ते सांगायची गरज देखील नव्हती . समोर दिसतच होते . भग्नमूर्तींच्या खचामध्ये खितपत पडलेला तल्पेश्वर , तापेश्वर अथवा तारकेश्वर महादेव तुम्हाला सांगतोय , हिंदूंनो जागे व्हा ! कदाचित या तीन नावांची तीन मंदिरे सुद्धा इथे असतील ! कोण जाणे ! जिथे देवाच्या नावाने घराबाहेर पडलेले लोक सुद्धा जात नाहीत तिथे देवाने तरी राहून काय करावे ! भविष्यामध्ये हे गाव नर्मदा मातेने वाहून नेले तर मला कांहीही आश्चर्य वाटणार नाही . अशी हजारो गावे यापूर्वी तिने पोटामध्ये घेतलेली आहेत . वाळू उपसा नर्मदे काठी सर्वत्र चालतो परंतु इथल्या लोकांनी इतका विचित्र पद्धतीने वाळू उपसा केलेला आहे की बघवत नाही .
बेकायदेशीर रीतीने अनैसर्गिक अवैध वाळू उपसा करून विद्रुप करून टाकलेला नर्मदा मातेचा किनारा . इथून चार पावले सुद्धा धड सरळ चालता येत नाही .
पटार आणि ओर ही दोन जुळी गावे होते . त्याचा एकत्रपणे ओरपटार असा उल्लेख केला जायचा . इथे हिंगळजाई मातेचे एक मंदिर होते . हिलाच हिंगलज माता , हिंगलाज माता किंवा हिंगुलांबिका असे सुद्धा म्हणतात . हीचे मूळ स्थान सध्या पाकिस्तानात गेलेले असून तिथे आता भारतीय लोकांना जाता येत नाही . भावसार समाजाच्या लोकांची ही कुलस्वामिनी असते . इथला हिंदू समाज जागृत झाला नाही तर लवकरच यादेखील मंदिराची अवस्था मूळ मंदिरासारखी व्हायला वेळ लागणार नाही . या मंदिरामध्ये जाऊन मातेचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो .
 ओरपटार गावातील हिंगळजाई मातेचे मंदिर
जय अस्त्र शस्त्रधारी हिंगलाज माता ! 
मंदिर गावाच्या मधोमध आहे आणि चांगले ठेवले आहे . 
गावात अन्य छोटी मंदिरे होती . हनुमान दादा चे दर्शन घेतले आणि पुन्हा एकदा शेतातून जाणारा रस्ता पकडला . इथे पुढे अरण्येश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे असे कोणीतरी सांगितले . थोडे अंतर चालल्यावर डावीकडे खरोखरच खूप झाडी दिसू लागली . तिथेच एका पायवाटेने गेल्यावर अरण्येश्वराच्या मंदिरात पोहोचलो .  मंदिराचा परिसर उजाड झालेला होता . एक भव्य पिंपळाचे झाड पडल्यामुळे संपूर्ण आश्रमाचे अपरिमित नुकसान झाले होते . सर्वत्र दगड मातीचा ढिगरा पडलेला होता . एका कोपऱ्यामध्ये छोट्याशा खोलीमध्ये एक तापट साधू राहत होते . हे स्वभावाने माणूसघाणे होते . महादेवांचे दर्शन घेऊन मी त्यांच्या पाया पडलो . त्यांना राग आला . ते म्हणाले ही सर्व नाटके करायची काही गरज नाही . खायला हवे असेल तर तसे सांग . मी काहीच बोललो नाही . मला म्हणाले झाडाच्या मागे सावलीत जाऊन बस .तुला थोड्यावेळाने जेवायला वाढतो . मंदिराच्या मागे एका कडुलिंबाच्या झाडाच्या सावलीत शांत पडून राहिलो . थंडगार वारा सुटला होता . दुपारची वेळ असली तरी चारी बाजूला शेती असल्यामुळे वातावरण चांगले होते . पडल्या पडल्या माझे मन विचार चक्रात गुरफटून गेले . राहून राहून तापेश्वराचे मंदिर माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले . हे मंदिर निदान आपल्यासमोर आहे . परंतु अशी लाखो मंदिरे या देशात आहेत की जी कुठे गेली याची कुणाला खबरबातच नाही ! आणि कोणाला त्याचे काही देणे घेणे सुद्धा नाही ! आपला समाज इतका कृतघ्न कसा काय असू शकतो ? ज्यांनी आपल्यासाठी मंदिरे उभी केली त्यांचे स्मरण नाही ठेवले तर एक वेळ ती कृतघ्न पणाची कृती आपण समजू शकतो परंतु ज्यांचे मंदिर उभे केले आहे त्या देवतेचे देखील स्मरण आपल्याला राहत नसेल तर ते किती घातक आहे ? नवीन पिढीतील लोकांनी नवीन मंदिरे उभी करावीत की न करावीत ? कारण जुन्याच मंदिरांची जर अशी अवस्था होणार असेल तर मग भविष्यकाळ किती बेकार असेल ? आपल्या देशामध्ये अशी लाखो भग्न मंदिरे आजही शिल्लक आहेत . व्हाट्सअप ग्रुप करून नको त्या विषयांवर चर्चा करणारे खूप लोक पाहिले . परंतु एखादा प्रत्यक्ष गट किंवा समूह तयार करून अशा एखाद्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करणारी एकही टीम किंवा टोळी माझ्या पाहण्यात अजून आलेली नाही . या विषयावर मी एकही शब्द बोललो नसतो . परंतु स्वतः तीन-चार ठिकाणी अशी मंदिरे उभे करण्यासाठी दगड फोडल्यानंतर आता हे बोलावे असे वाटत आहे . आपण नक्की कशासाठी जगतो आहोत ? याचे ठाम उत्तर आपल्याकडे आहे काय ? आपण पुढची पिढी कशासाठी जन्माला घातली आहे ? याचे एकच एक आणि पक्के उत्तर आपल्याकडे आहे काय ? आपण सर्व संपत्ती कशासाठी आणि कोणासाठी गोळा करत आहोत याचे भान आपल्याला राहिलेले आहे काय ? आपण आणि आपले कुटुंबीय , केवळ इतकेच जग नसून त्याही बाहेर काही जग आहे आणि ते जग किंवा समाज आपल्या आयुष्यावर थेट प्रभाव पाडू शकतो याची जाणीव आपल्याला आहे काय ? आपण अचानक हे जग सोडून गेलो तर आपण कमावलेल्या संपत्तीचा योग्य विनियोग योग्य ठिकाणी होणार आहे काय ? आपल्या आयुष्यामध्ये आपण एक तरी अशी कृती केली आहे काय ज्याने आपल्याला पाठ टेकल्याबरोबर समाधानाने झोप लागावी ? अशा अनेक प्रश्नांनी डोक्यामध्ये काहूर माजवले . या सर्व प्रश्नांची उत्तरे ज्याची त्याने सोडवायची आहेत . प्रत्येकाचे उत्तर वेगळे येणार आहे . सर्व समाजाचे सर्व प्रश्न सारखे असणार आणि त्याची उत्तरे देखील एकच एक असणार असे भंपक माओवादी कम्युनिस्ट चायनीज तत्वज्ञान इथे लागू होत नाही . प्रत्येकाने आपापल्या जीवनातील एक तारकेश्वर शोधून काढायचा आहे . कोणाला तो स्त्री शिक्षणामध्ये सापडेल . कुणाला तो अनाथ मुलांमध्ये दिसेल . कोणाला तो परित्यक्ता मातांमध्ये दिसेल . कोणाला तो वृद्ध आजी आजोबांमध्ये सापडेल . कोणाला तो ऊस तोडणी कामगारांमध्ये दिसेल . कोणाला अंध अपंग आणि विशेष समाज घटकांमध्ये तारकेश्वर आढळेल . कोणाला लग्न मंदिरामध्ये तो दिसेल . क्षेत्रे अनेक आहेत . ती निवडून तिथे जाऊन आधी प्रबोधन करायचे आहे . मग अनावश्यक तण उपटून टाकायचे आहे .मग राडा रोडा घाण हटवायची आहे . मग पुन्हा नव्याने पाया खणून नवी मजबूत टिकाऊ इमारत उभी करायची आहे ! इथे समोर पडलेला मंदिराचा राडा रोडा पाहून माझ्या मनात हे विचार येत होते . तिथे दर्शनासाठी गावातील दोन तरुण शेतकरी आले. ते माझ्याशी गप्पा मारू लागले . मी माझे वरील सर्व चिंतन त्यांच्यापुढे मांडले .त्यांनी देखील लवकरात लवकर अरणेश्वर आणि तापेश्वर महादेवांचा जीर्णोद्धार व्हावा अशी इच्छा व्यक्त केली . सुदैवाने गेल्याच वर्षी अरणेश्वराचा जन्मोतर झालेला google फोटो पाहिल्यावर दिसतो आहे ! अतिशय सुंदर असे नवीन बांधकाम येथे केलेले आहे !
जुन्या भग्न अवशेषांचा कुठे मागमूसही दिसत नाही !
मी भोजन घेतले ती साधूकुटी पुन्हा नवीन बांधण्यात आली आहे .
मंदिरही नव्याने बांधण्यात आले आहे
इथे येणाऱ्या महापुरातही टिकेल असे बांधकाम आहे
संपूर्ण परिसराच्या कायापालट झालेला आहे !
साधूने मला आवाज दिला आणि मी त्याच्या पडझड झालेल्या कुटीच्या बाहेर बसून भोजन प्रसादी घेतली . तो माझ्याशी एकही शब्द बोलला नाही . मी त्याला तरसली गावातील तारकेश्वरा बद्दल विचारायचा प्रयत्न केला . परंतु एकही शब्द प्रत्युत्तरादाखल साधू महाराज बोलले नाहीत . त्यामुळे त्यांची इच्छा दिसत नाही असे गृहीत धरून मी नाद सोडून दिला . आणि पुढे मार्गस्थ झालो . शक्यतो पुढील मार्गा बाबत साधू मार्गदर्शन करतात . यांना विचारल्यावर ते आत निघून गेले आणि कडी लावून घेतली . माझा नक्की काय अपराध झाला आहे हेच मला कळेना . मी बापडा पुढे मार्गस्थ झालो . ऊन कडक पडले होते . अंगाची लाही लाही होत होती . त्यात पोटामध्ये जठराग्नी पेटलेला असला की उष्णता अजून जाणवते . परंतु दुपारी मी झोपत नसे त्यामुळे चालत राहिलो . तापलेल्या त्या वातावरणात तापलेल्या अवस्थेत तापेश्वराचे चिंतन करत चालत राहिलो . तापेश्वराचे चिंतन करता करता त्याने माझे सर्व ताप कधी हरले माझ्या लक्षातच आले नाही ! आणि सुंदर असा मैयाचा किनारा लागला ! इथे आता वाळू कमी आणि चिखल जास्त दिसू लागला ! समुद्र जवळ असल्याची ती लक्षणे होती . समृद्ध जलजीवन होते . दोन मगरींनी सुंदर दर्शन दिले . मगरींसाठी हा चिखलाने भरलेला परिसर नंदनवन होता .
या भागातील मगर
आपण मगरीच्या फार जवळ जात असू तर ती अशा रीतीने जबडा उघडून आपल्याला इशारा देत असते की तू जवळ येऊ नकोस
सर्वत्र असा चिखल असल्यामुळे काठाने चालता येणे अशक्य होऊ लागले . त्यामुळे थोडेसे अलीकडून तयार झालेल्या पायवाटा पकडून चालू लागलो .
असा चिखल सर्वत्र होता . वाटेत येणारे विजेचे मनोरे पाहत चालले की अंतर किती कापले गेले ते लक्षात यायचे .
मनोरे पहात चालत राहिलो .
नर्मदा मैया चे संपूर्ण पात्र आता एखाद्या खाडी सारखे वाटू लागले होते . खाडीचा एक वेगळा वास येतो तसा वास यायला आता सुरुवात झाली होती . पाण्याचा प्रवाह जवळपास थांबल्यासारखा होता . छोटे-मोठे ओढे आडवे येतच होते . अचानक एक मोठी नदी आडवी आली हिचे नाव मधुमती असे होते. या नदीमध्ये मैयाचे पाणी शिरल्यामुळे खाडी तयार झाली होती . नदी नागमोडी वाहत मैयाला समांतर चालली होती . कशीबशी मी पाण्यामध्ये उतरूनच मगरींचा अंदाज घेत ही नदी पार केली . मध्ये एका शेतामध्ये छोटीशी कुटी करून एक शेतकरी बसला होता . तीव्र उन्हाळा असल्यामुळे मी देखील क्षणभर तिथे थांबलो .त्याने पटकन तीन दगडांची चूल करून त्यावर सुंदर असा काळा चहा केला . तो पिल्यामुळे मला थोडीशी तरतरी आली . माझ्याजवळ असलेले एक सुंदर शिवलिंग मी त्याला भेट दिले . या भागात शिवलिंगे सापडत नाहीत त्यामुळे त्याला देखील त्याचे अप्रूप होते . याच्याशी बराच वेळ गप्पा मारल्या आणि मग पुढे मार्गस्थ झालो . त्याने पुन्हा एकदा नदी पार करून देण्यासाठी मला मदत केली . कठीण अशा एका टप्प्यावरून याच्या सांगण्यावरून नदी पार केली तेव्हा लक्षात आले की माझे अनुमान होते त्यापेक्षा हा रस्ता सोपा निघाला . म्हणून आयुष्यात गुरुचे खूप महत्त्व आहे .
हीच ती दोन वेळा पार करावी लागलेली वेडी वाकडी वळणे असलेली मधुमती नदी .नर्मदा मातेला येऊन मिळणाऱ्या प्रत्येक नदीच्या पाण्याचा स्वतःचा एक वेगळा रंग आहे हे किती मोठे आश्चर्य आहे !
 त्याने मला सांगितले की इथून पुढे दलदल सुरू होत आहे . तरी गावात जावे . अमुक अमुक मंदिरात जावे . तिथून लोक मार्ग दाखवतील त्याप्रमाणे पुढे जावे . पुढे खरोखरच पाऊल टाकण्यासारखे जागा नव्हती . इथे भरतीमध्ये समुद्राचे पाणी उलटे शिरते . आणि ओहोटीमुळे उतरते . या दोन्हीमुळे जो एक दलदलीचा भाग तयार होतो त्यातून चालता येणे कठीण असते .
तशाही स्थितीमध्ये लोक नर्मदा मातेमध्ये दिवे सोडतात .
विविध प्रकारचे नैवेद्य दाखवतात . 
इथे पाण्याची चव चांगलीच खारट लागत होती . नर्मदा मातेच्या पाण्यातला गोडवा हळूहळू कमी होत चालला होता .  इथे नर्मदा मातेचे पात्र अचानक लहान झाले आहे असे आपल्याला वाटते . परंतु प्रत्यक्षामध्ये एक कबीर वड नावाचे अतिप्रचंड बेट मध्ये निर्माण झालेले आहे आणि त्यामुळे नर्मदा मातेचे दोन प्रवाह झालेले आहेत. यातला छोटा प्रवाह आपल्या शेजारी दिसतो . 
हा नकाशा नीट पहावा .उजवीकडे वरती भालोद शहर दिसते आहे .तिथून डावीकडे आपण तरसालीला गेलो .त्यानंतर अरण्येश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आता कबीरवड बेटाला गोल वळसा मारून प्रांकड ,जरसाड , अविधा , पोरा , लिमोदरा करत झगडिया मढी मध्ये जाणार आहोत . .
पोरा किंवा पारा नावाच्या गावामध्ये आल्यावर एक वेगळी स्पंदने जाणवू लागली . चौकशी अंती असे लक्षात आले की ही पराशर ऋषींची तपोभूमी आहे म्हणून तिला परा असे नाव पडलेले आहे . इथे पराशरेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्याचे दर्शन घेतले एका घरातून चहासाठी मला बोलावण्यात आले म्हणून त्यांच्या अंगणामध्ये बसून मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतला . 
भालोद वरून थेट झगडिया मढीला येणाऱ्या परिक्रमावासींना मध्ये जरसाड गावांमध्ये चंद्रेश्वराचे मंदिर लागते आणि अविधा गावामध्ये रामेश्वराचे मंदिर लागते . परंतु मी किनारा पकडल्यामुळे हे वेगळेच देव मला पाहायला मिळत होते . 

पारा गावातील पराशरेश्वर महादेवाचे मंदिर जंगलाच्या मध्ये असून शेजारी मोकळे मैदान आहे

मंदिराच्या स्वागत कमानीवर रामदेव पीर बाबा घोड्यावर बसलेले दाखवले आहेत

गुजरात येथील छोट्यातल्या छोट्या गावांमध्ये सुद्धा शेवटपर्यंत काँक्रीटचे रस्ते झालेले आपल्याला दिसतात अगदी रस्त्या शेजारी छोटेसे मंदिर बांधले आहे तिकडे जायला सुद्धा काँक्रीट अंथरलेले आहे !

आपण गेलो नसलो तरीसुद्धा अविधा येथील रामेश्वराचे दर्शन घ्यायला काय हरकत आहे !

रामेश्वर महादेव आणि सप्त कोणी जलहरी
मी ज्यांच्याकडे चहा घेतला त्यांच्या मुलाचे नाव आनंद वसावा असे होते .यांनी पुढे जाताना मध्ये एक खाडी आडवी येते त्यामुळे तुम्हाला पुढे जाता येणार नाही असे मला सांगितले . तिथे मगरी असल्याचे देखील सांगितले . परंतु मी इथपर्यंत सर्व नद्या सुखरूपरीत्या पार करत आलेलो आहे याचा अर्थही नदी देखील पार होईल असा विश्वास व्यक्त केल्यावर त्याचा नाईलाज झाला आणि तो मला म्हणाला की तुम्ही एक काम करा . तिथे जाऊन थोडेसे थांबा .मी एक काम करून तिथे पोहोचतो आणि तुम्हाला रस्ता दाखवतो .जंगलातील वाट तुडवीत मी चालत निघालो . माझ्या आधीच तो संगमावरती जाऊन थांबलेला होता .

हाच तो बिंदू जिथे मी पोहोचलो होतो आणि इथूनच मी नदी पार केली . 
तो माझ्या पाया पडला आणि त्याने माझ्या हातावर पाचशे रुपयाची नोट ठेवली . तो म्हणाला की आता लवकरच तुम्हाला नावे ने समुद्र पार करावा लागेल तेव्हा तुम्ही हे पैसे नवाड्याला द्या . तसेही माझ्याकडे नावाड्याला द्यायला पैसे शिल्लक नव्हते . ती सोय मैय्याने अशा रितीने लावून दिली . मी देखील त्याच्या पाया पडलो आणि गळाभेट घेतली . साधारण छाती एवढ्या पाण्यातून मी नदी पार केली . समोरचे जंगल चढायला सुरुवात केली . मी नजरेआड होईपर्यंत आनंद वसावा मला तिकडून नर्मदेहर चा पुकारा देत होता ! मला वाटले की आता भरपूर जंगल लागेल . परंतु प्रचंड प्रमाणात शेती सुरू झाली ! सर्व शेते दक्षिणोत्तर असल्यामुळे त्याचे बांध तिरके तिरके होते . केळी पपया चिकू अशा मोठ्या मोठ्या फळबागा होत्या . मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांची शेती होती त्यामुळे पाच पाच दहा एकराचे पट्टे होते . झपाटल्यासारखा या शेतांमधून पुढे जात राहिलो . उजवीकडे खाली उतरायला जागाच नव्हती इतकी जबरदस्त बाभळीची राने माजली होती . अचानक एक ठिकाणी पडलेले बाभळीचे झाड दिसले . त्याच्या खोडावरून घसरगुंडी करत खाली उतरलो . आणि मैयाचा काठ गाठला ! इथे भरपूर मगरी होत्या . समोरच्या बेटावर पडलेल्या एकदोन मोठाल्या मगरी दिसल्या . मोठा आ वासून या उन्हामध्ये पडून असतात . मला चालण्यासाठी जणू काही मैय्याने एक मोठा हिरवळीचा पट्टाच तयार केला होता ! त्याच्यावरून चालायला खूप मजा येत होती ! इथून डावीकडे जायला जागा नव्हती उजवीकडे मैय्या होती ! 
 

हाच तो हिरवळीचा पट्टा
समुद्र गरुड समुद्र भागातील पक्षी हळूहळू दिसू लागले . इथे चमत्कारिक रित्या नर्मदा मातेचे पाणी उलटे वाहते आहे असे मी पाहिले ! नंतर मला कळाले की ही समुद्रातून चालू असलेली भरती होती . बरेच अंतर पुढे आलो आणि लिंबोदरा गावाच्या छोट्याशा घाटापाशी मी कुणीतरी शेतातच बांधलेली ख्रिश्चन पद्धतीची कबर पाहिली . इथे मगरी पासून धोका आहे अशी पाटी रस्त्याच्या बाजूला लावलेली आहे . अशा पाट्या इथे सर्वत्र आहेत . तरी देखील लोक नको ते करायला जातात आणि मगरीच्या भक्ष्य स्थानी पडतात . 
लिमोदरा गावातील मगरीची पाटी .
पुन्हा एकदा मोठा गवताचा टप्पा लागला . हा मार्ग इतका सुखद होता की संपूच नये असे वाटत होते !
मध्येच पुन्हा एकदा वरती शेतात शिरावे लागले . एका फार मोठ्या शेतकऱ्याचे फार्म हाऊस होते . केळीच्या बागा आणि मोठी मोठी नारळाची झाडे होती . 
इथे मध्ये एक महादेवाचे मंदिर आणि जगन्नाथाचे मंदिर देखील आहे असे नकाशावर मला लक्षात आले . प्रत्यक्षामध्ये मी अगदीच काठावरून चालल्यामुळे मला हे मंदिर दिसले नव्हते . परंतु जगन्नाथाच्या भक्तांनी जायला हरकत नाही . 

श्री पुरी जगन्नाथ मंदिर

श्री कुश्मेश्वर महादेव मंदिर


हर्ष राजसिंह यांच्या शेतातील नारळाची झाडे
संधी मिळताच पुन्हा एकदा नर्मदा मातेच्या काठावरचा रस्ता पकडला . एका सरळ रेषेतला हा रस्ता होता .सूर्य मावळतीला निघाला होता . पुढे काय वाढून ठेवले आहे याची काहीच कल्पना नव्हती . परंतु एका हाताला उलट्या दिशेला वाहणारी नर्मदा माता दिसत होती . तिच्या दर्शनाचा आनंद घेत चालत राहिलो .
अखेरीस तरुणांची भरपूर गर्दी एका घाटावर दिसू लागली . आणि माझ्या लक्षात आले की इथे काहीतरी आहे . एक मोठा घाट होता . लवकरच एका महान सत्पुरुषाचे दर्शन मला होणार होते . पुरीच्या जगन्नाथाचे दर्शन राहून गेले परंतु साक्षात जगदीश दर्शन देण्यासाठी झगडिया च्या त्या मढीमध्ये वाट पहात थांबलेला होता . म्हणूनच झगडिया मढीला परिक्रमा वासी मात्र जगदीश मढी असे म्हणतात ! 





लेखांक एकशे सहा समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. narmde har. atyant vegat suru ahe lekhan. tarihi details nemke ani bharpur photo.

    उत्तर द्याहटवा
  3. He vachatana, Aapan doghe Tarasalila jayche ase attach mazya manat aale . Narmade Har !

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नक्की जाऊया गुरुजी !
      वाचकांच्या माहिती करता , डॉक्टर ए एस कुलकर्णी माझे प्राध्यापक होते . मला प्रथम नोकरी लावण्याचे पुण्याचे काम यांनी च केले . ती लागली नसती तर कदाचित लवकर सगळ्यातून सुटलो नसतो आणि ही परिक्रमा च झाली नसती ! आपल्याला साष्टांग नमस्कार सर ! नर्मदे हर !

      हटवा
  4. Mi aaj paryant 2 vela Bhalod yethe jaun aalo aahe. Pan he mahitch navhate. Aata tisrya veli darshan yog aahe kkay te paahooya.

    उत्तर द्याहटवा
  5. मी आपलं लेखन नियमानं वाचते, खूप आवडतं वाचायला, एका वेगळ्या विश्वात(आभासी नव्हें तर खऱ्याखुऱ्या) जाऊन येते तो तेवढा काळ! तुमचं लेखन अगदी आतून आलं आहे..पूर्ण झाल्यावर पुस्तक जरुर प्रकाशित करा! मनःपूर्वक शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद . आपलेही लेखन प्रवाही आहे . आत्ताच ब्लॉग पाहिला .
      नर्मदे हर !

      हटवा
    2. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

      हटवा
  6. आपल्या माईच्या प्रतिक्षेत नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  7. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏 ताई मला लिंक पाठवाल काय झोका

    उत्तर द्याहटवा
  8. नमस्कार तीन दिवस झाले पुढील लेखांक आला नाही. सर्व कुशल मंगल आहे अशी आशा व स्वामी चरणी प्रार्थना करतो.

    उत्तर द्याहटवा
  9. पुढचा लेख कधी येणार.
    नर्मदे हर
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  10. Uttam lihile aahe. Don divas raatri swapnaatun Tarsali gele naahi. Bhalodla varshaatun 1-2 vela Japanese hote. Yaveli, tarsalila jaaun ye een.

    उत्तर द्याहटवा
  11. आपल्या आधीच्या लेखांमध्ये शूल पाणी आणि महाराष्ट्र सीमेला खप्परमाळा याबद्दल माहिती दिली ती चांगलीच आहे ,याच संदर्भात एक माहिती वजा लेख लोकप्रभा दिवाळी अंक 2022 मध्ये वाचण्यात आला .प्रसाद निक्ते यांनी नर्मदा किनारी असणाऱ्या भराड या गावातून सुरुवात करून सातपुड्यात नर्मदा किनाऱ्यावरून चालत सुरुवात करून पुढे सह्याद्रीचे उत्तर टोक गाठायचे मग घाट माथ्याने डोंगर भटकंती करत दक्षिणेला महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर चोरला घाटात मोहिमेचा शेवट करायचा असं नियोजन करून एक टप्पा पूर्ण केला .त्याच्यामध्ये आपण शूलपाणीच जे वर्णन केलेले ,महाराष्ट्र सीमे लगतचं त्यापैकी गाव आणि तिथली संस्कृतीचा थोडेफार उल्लेख आहेत तो लेख मिळाल्यास जरूर पाहावे आदिवासी संस्कृतीचं सुंदर दर्शन त्यातही आलं आहे .
    आपल्या लेखांच्या प्रतीक्षेत.
    सदानंद काळे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर